Tuesday, August 25, 2020

कान्हा नॅशनल पार्क - रामटेक (भाग ६) समाप्त

भोरमदेव झाल्यानंतर हॉटेल वर येऊन सर्वांच्या (मागे राहिलेल्यांच्या) शिव्या खाऊन.. वर त्यांनाच (उगाच) ४ शिव्या घालुन मी झोपले.. चिडचिडीवर उतारा म्हणुन खरेदी हा प्रकार (नशिबाने) शेवटी ठेवला होता.. बाकी सगळे खरेदीला निघुन गेले.. म्हणजे काय तर गेट वर एक लहानसे दुकान आहे.. तिथे पगमार्क असलेले टी शर्ट वगैरे निरुपयोगी गोष्टी मिळतात.. मला त्यातल्या त्यात खुप सारे पॉकेट्स असलेल्या जर्किन मध्ये इंटरेस्ट होता.. तेवढं माझ्यासाठि आणा म्हणुन मी पांघरुणात घुसुन समाधिस्त झाले..
दुसर्‍या दिवशी सकाळी रामटेक पाहुन नागपुरात मुक्काम करायचा असा प्लान होता.. सकाळी ११-१२ वाजलेच निघायला.. मुबावाल्यांनी लहान मुलं सोबत आहेत म्हणुन चकटफु नाश्ता दिला..
संध्याकाळी ६ वाजले आम्हाला रामटेकला पोहोचायला.. आधी आम्ही कालिदासाचे स्मारक पाहिले.. नंतर मंदिर..
हे कालिदासाचे स्मारक..
Smarak 1
इथे कालिदासाच्या काव्यांवर आधारित चित्रे (टाईल्सच्या तुकड्यांपासुन बनवलेली आणि काही पेंटिंग्स) आहेत.. कालिदासाचे संपुर्ण काव्य (मला वाटतं मेघदुत असावं..) मागच्या बाजुस कोरलेले आहे.. खाली मराठी अनुवाद आहे.. (त्याचे फोटो काही माझ्या कडे नाहियेत..)
Smarak 2
स्मारक उंचावर आहे.. तिथुन दिसणारे खालचे दृष्य...
Smarak 3
Smarak 4
कालिदासाच्या काव्यांबद्दल थोडक्यात माहिती आणि खाली त्यावर आधारित चित्र अशी सुंदर रचना आहे.. वर तो घुमट दिसतो आहे त्यात आतमध्ये कालिदासाच्या काव्यांवर आधारित पेंटिग्स आहेत.. एकाहुन एक सुंदर पेंटिंग्स आहेत.. खाली नावं पाहुन कळालं की कलाकारही अगदी नामांकित आहेत..
वर्णन आणि टाइल्स पासुन बनवलेली चित्रे..
मेघदूतम
Meghdut
Meghdut 2
अभिज्ञान शाकुंतलम
AS
AS2
विक्रमौर्वशियम
Vikramaurvashiyam
Vikramaurvashiyam 2
कुमारसंभवम
Kumara sambhav
Kumara sambhav 2
अभिज्ञान शाकुंतलम (अजुन एक दृष्य..)
abhijnaan shakuntalam
abhijnaan shakuntalam 2
रघुवंशम
Raghuvasham
Raghuvasham 2
आतमधली पेंटिग्स..
1
2
3
4
5
हे मला अर्वात आवडलेले.. मुरली लाहोटी ह्यांचे..
6
एकंदरीत स्मारक सुंदरच आहे.. पण आपल्यावर उपकार म्हणुन ठेवल्यासारखे सुरु आहे.. ५ रु प्रवेश फी असली तरी आत मध्ये तसं काही विषेश व्यवस्था नाही.. जरा बाग वगैरे करता येईल.. कारंजेही बंदच पडलेले आहे (महाराष्ट्रात चालु कारंजं मी फारसं कधी पाहिलच नाहीये.. कारंजी असतातच बहुदा बंद पडण्यासाठी..)
एवढं सगळं पाहिस्तोवर अंधार पडला होता.. त्यामुळे मंदिराचे फार काही फोटो काढता आले नाहीते.. पण मंदिरही छान आहे..
प्रवेशद्वार आणि त्यातुन दिसणारे आतले कळस..
Ram Mandir
Ram Mandir
ह्या फोटोमधुन काही अर्थबोध होत नसला तरी साधारण कल्पना येण्यासाठी देत आहे..
आतल्या मुर्तींचे फोटो काढायची परवानगी नाही, पण मुर्ती सुरेख आहेत अगदी..
मंदिराबाहेर तटबंदी आहे.. पायर्‍या चढुन तटबंदीवरुन खाली पहाता येतं.. आणि तिथुन दिसणारा हा रामटेक गावाचा नजारा..
Ramtek Gav
दिक्षाभुमीचे काही फोटो
Chaityabhumi
Deeksha bhumi
Deeksha bhumi
एकंदरीत कान्हा - भोरमदेव - रामटेक - नागपुर ट्रिप मस्त झाली.. वाघ दिसला नसला तरी भोरमदेवच्या मंदिरानी ती कसर भरुन काढली.. रामटेक मधलं कालिदास स्मारक बोनस होता..
खुप दिवसांनी माहेरच्यांसोबत मोठ्या ट्रिपला गेले होते.. नवर्‍यासोबत तर माझी ही पहिली ट्रिप.. त्यात अबीर सोबत.. त्यामुळे प्रवासासोबत डायपर, मऊ भात आणि सर्दी ह्यांचही टेन्शन होतंच..! निघतानाच बहीण किती वेळा रडणार.. आई घेतलेल्या १ टन कपड्यांपैकी किती कपडे खरंच घालणार.. कोण पहिली उलटी करणार.. असल्या अनेक बेट्स लावल्या होत्या.. त्यांचे हिशोब अजुनही व्ह्यायचे आहेत..
ह्या लेखांमधुन सगळी ट्रिप परत अनुभवली.. कदाचित अजुन १०-१५ वर्षांनी नुसते फोटो बघताना जेवढी मजा येणार नाही तेवढी हे लेख वाचुन येईल..

कान्हा नॅशनल पार्क - भोरमदेव (भाग ५)

"इथुन भोरमदेव कडे जातानाच्या रस्त्यावर...आणि आपण तिथे जायचचं.. तुला वाघ दाखवायचाच.."
इतका वेळ सोडुन दिलेल्या आशा परत पल्लवीत झाल्या..शांत झालेली डोक्यातली चक्रं परत फिरु लागली.. आणि एकच सवाल परत घुमु लागला..
"दिसेल का?"......
दुसर्या दिवशी सकाळी ६ पर्यंत मला १० वेगवेगळे प्लान ऐकवण्यात आले होते.. किंवा एकाच प्लानचे, नवरा आणि दादा आणि हॉटेलचा मॅनेजर आणि आजुबाजुचे गावकरी लोक आणि ड्रायव्हरने २-३ दिवसात जमवलेले मित्र ह्या प्रत्येकाकडुन १ असे १० व्हर्जन्स सांगण्यात आले..
पैकी दादा आणि नवरा सोडुन बाकीच्यांना समजलेला (किंवा ज्याने त्याने आपापल्या कुवतीने अर्थ काढल्याप्रमाणे) प्लान असा की सकाळी लवकर उठुन कुठल्या तरी एका रस्त्याला लागायचे कारण तो रस्ता म्हणे कोअर जंगला मधुनच जातो पण रात्रभर बंद असतो. सकाळी ६ ला दोन्ही बाजूंची गेट्स उघडतात. थंडीमुळे वाघ व इतर प्राणी दव आवडत नसल्याने त्या रस्त्यावर उबेला येऊन बसलेले असतील तर दिसतील.. पण आपण जर लवकर गेलो तरच हे शक्य आहे कारण एकदा का रहदारी सुरु झाली की प्राणी जंगलात निघुन जातील..
जिथे जंगलात ६ तास फिरुन वाघ दिसेल की नाही हे माहीत नव्ह्तं.. तिथे एका रस्त्यावर "कदाचित" वाघ येऊन बसला असेल आपली वाट पहात असं मला वाटत होतं.. मलाच नाही.. सगळ्यांनाच.. आणि मी, दादा, नवरा आणि बाबा चक्क नशिब आजमावायला निघालोही..!!
ह्यात उरलेल्या लोकांचा असा समज होता (किंवा करुन देण्यात आला होता..) की आम्ही २०-३० किमी जाणार, मग परत फिरणार. ९ च्या सुमारास परत हॉटेलला येऊन बाकीच्यांना घेऊन "कुठल्या तरी एका" मंदिरात जाणार.. म्हणजे त्यांच्या द्रुष्टिने ते लोक झोपेतुन उठायच्या आत तर आम्ही परत येणार होतो.. मलाही हेच वाटत होतं.. म्हणुन तर अबीरला सोडुन मी आणि नवरा निवांत निघालो..
सोबत हॉटेलचा वॉचमन घेतला, त्याला रस्ता माहित होता. मुबानी नाश्ता बांधुन दिला.. सकाळी ६ ला आम्ही निघालो.. थोड्यावेळात समजलं की आम्ही भोरमदेव कडे जात आहोत.. आणि हे फार प्रसिद्ध मंदिर आहे.. मुक्की गेट पासुन साधारण ८० किमी वरती.. मध्यप्रदेश आणि छ्त्तीसगढ च्या बॉर्डरवर... (म्हणजे ज्या "कुठल्या तरी" मंदिराच्या आशेनी बाकी प्रजा हॉटेलवर निवांत झोपली होती, आम्ही नेमेके त्याच दिशेने जात होतो...!!)
आत्तापर्यंत एकंदरीत मध्यप्रदेश बद्दल माझा जो काही समज झाला होता, त्या प्रमाणे भोरमदेव हे एक शेंदुर फासलेल्या दगडाचे ६ बाय १० चे मंदिर निघाले असते तरी मला अजिबात आश्चर्य वाटलं नसतं. कान्हा जवळच्या गावात एक नाग मंदिर आहे जिथे जिवंत नाग-नागिण कशाची तरी रखवाली करतात असं काल परवा पासुन २-४ जण सांगत होते. त्यामुळे "भोरमदेव हे जागृत देवस्थान आहे" ह्या वाक्याने माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही.तसंही मला वेध वाघाचे लागले होते आणि वाघ दिसला नाही तर परत फिरायचं असं ठरलेलं असल्यानं मंदिर पहायचं वगैरे काही प्लान मध्ये नव्ह्तं..
पहाटेच निघालो.. अजुन अंधारच होता..डोळे फाडुन आजुबाजुला बघायला सुरवात केली..कुठं काही दिसतय का.. कुठे काही ऐकु येतंय का... हळु हळु उजाडायला लागलं होतं..
Sun rise
७- ७.३० पर्यंत चांगलच उजाडलं होतं..आम्हाला मोजुन १ हरीण आणि २७ माकडं दिसली होती..मध्येच कुरणं लागायची.. मध्येच जंगल..मध्येच हे काही मोर दिसले..
2
इथे मोरांपेक्षा रस्ता पहा कसाय ते...
मध्येच ह्या दोघांची जुंपली होती..
Zunj
अधुन मधुन चेकपोस्ट लागत होते. प्रत्येक चेकपोस्ट वर मागच्या चेकपोस्टला केव्हा रिपोर्ट केलं ती वेळ तपासत होते. म्हणजे तुमचा वेग किती हे समजतं..कान्हा मध्ये एका ठिकाणाहुन दुसर्या ठिकाणी किती वेळात पोहोचायचं याचेही नियम आहेत. तुम्ही फार जोरात जाऊ शकत नाही किंवा कुठे जास्त थांबुही शकत नाही..रस्ते इतके वाईट आहेत की तसंही गाडी पळवणं अशक्य आहे..
जवळपास ९.३० होत आले होते.. खराब रस्त्यांनी काळ-काम-वेगाच गणित पार बिघडवलं होतं.. आम्ही आता वाघ दिसायची आशा सोडुन दिली होती..मला झोप येतं होती, भुक लागली होती..आता मला वाघ बिघ काही आठवत नव्ह्ता.. आपण फुकट फिरतोय ह्याची मला जाणिव झाली होती..
"बास आता..थांबवा कुठेतरी..खाऊन घ्या आणि चला परत" शेवटी मी शरणागती पत्करली
जवळच एक चेक्पोस्ट आले होते, तिथे थांबु, खाऊ आणि परत फिरु असं ठरलं. गाडी चेकपोस्टला थांबली. सहज म्हणुन तिथल्या अधिकार्याला "भोरमदेव" विषयी विचारले..
"अरे ते तर फारच सुंदर मंदिर आहे..दुरुन दुरुन लोक येतात पहायला..आता इथवर आला आहातच तर नक्की पहा.. २०-२५ किमी तर राहिलय आता.." अधिकारी फारच भक्तीभावानी म्ह्णाला..
मध्यप्रदेशात किमी वरुन किती तास लागतील हे गणित संपुर्ण बदलतं.. सकाळी ६ पासुन आम्ही निघालो होतो आणि ६० किमी कापायला आम्हाला ३-३.५ तास लागले होते..!!
"२०-२५ किमी म्हणजे अजुन १-२ तास..."
"छे छे.. आता मध्यप्रदेश बॉर्डर लागेल ना.. तिथुन पुढे रस्ते एकदम चांगले आहेत..फारतर पाऊण तासात जाल तुम्ही"
काय करायचं?? आम्ही अर्धी प्रजा हॉटेलमध्येच सोडुन आलो होतो.. त्यांना वाटत होतं की आम्ही आता येऊन त्यांना बाहेर नेणार आहोत.. पण आता मंदिराबद्दल इतकं ऐकलं होतं की एवढ्या जवळ येऊन ते पहायचं नाही म्हणजे मुर्खपणाच झाला असता.. शेवटी हॉटेलात परत गेल्यावर जे होईल ते बघुन घेऊ म्हणुन आम्ही भोरमदेव कडे निघालो..
मध्यप्रदेश सरकारचं रस्तेविषयक धोरण काय आहे ते जाऊन पहायला हवं एकदा.. मध्यप्रदेशची सीमा ओलांडली की रस्ते दुप्पट रूंद आणि चौपट गुळगुळीत होतात. इथेही तेच झालं.. त्यामुळे खरच तासाभरात आम्ही भोरमदेवला पोहोचलो..
भोरमदेव हे एक खुप जुने शिवाचे मंदिर आहे.. आणि ते खरंच फार सुंदर आहे.. एका भल्या मोठ्या आणि कमळांनी भरलेल्या तळ्याच्या काठी हे मंदिर आहे..
तळ्याकाठी एक मोठी बाग आहे.. आणि बाजुला टेकडीवर हे मंदिर आहे..
Lake
ही बागेचे प्रवेशद्वार..
Entrance
4
समोरच हा मोठा नटराज उभा आहे..
Natraj
हेच ते भोरमदेवचे प्रसिद्ध मंदिर..
Temple 1
Temple 2
Temple 3
त्या दिवशी काही कारणास्तव मंदिरात खुपच कडक सुरक्षा होती, जागो जागी पोलीस तैनात होते, आमच्या सोबत असलेल्या वॉचमनने नेमकी हॉटेलचा गणवेष , आर्मी मधल्या सैनिकांसारखा ड्रेस घातला होता.झालं... लग्गेच त्याला कोपर्यात घेऊन चौकशी सुरु.. तो बिचारा भांबावुन गेला.. आम्ही पण पळत पळत तिकडे गेलो.. हा आमच्या सोबत असलेला वॉचमन आहे, नक्षलवादी नाही हे पटवुन देता देता नाकी नऊ आले.. पण लोकांनी फक्त आम्ही पोलीसां सोबत बराच वेळ बोलतोय हे पाहिलं असावं.. शिवाय नवर्यानी जाता जाता समोरुन येणार्या पोलीसांच्या साहेबाला उगाच स्माईल दिली, ते पण हसले.. मग आजुबाजुचे अजुनच चौकस झाले.. त्यात आमच्या हातात मोठे मोठे कॅमेरे*.. मी भीत भीत फोटो काढत होते, नवरा आणि दादा मात्र दणादण फोटो काढत होते.. लगेच आजु बाजुच्यांनी चौकशी सुरु केली..
"कोण तुम्ही?"
"आम्ही एका मोठ्या वेबसाईट कडुन आलोय.. वेगवेगळ्या ठिकाणांविषयी माहिती आणि फोटो देतो म्हणजे टुरिस्ट लोक तिकडे जातात.." मी ठोकुन दिलं...
"होका... अरे वा वा..."
मग काय, थाप पचली आहे हे पाहुन मी पण धडाधड फोटो काढायला सुरुवात केली..
Temple 3
Temple 4
Temple 5
Temple 6
Temple 7
Temple 8
Temple 9
आणि अचानक माझ्या लक्षात आलं..
भोरमदेवचं मंदिर साधं सुधं मंदिर नसुन... चक्क "मिनी खजुराहो" आहे..!!!
"अरे...." मी विस्फारलेल्या डोळ्यांनी नवर्याकडे पाहुन चित्कारले..
"हो हो.. म्हणुनच सगळे लोक हे मंदिर पहाच म्हणुन आग्रह करत होते.. आता गप्प बस.."
आता ह्या जाणिवे नंतर मी काढलेले अर्धे फोटो मी ह्या लेखात टाकु शकत नाही ह्याची मला जाणिव झाली.. आणि जे हजारो वर्षांपुर्वी कुणी तरी दगडात कोरुन ठेवलय ते आपण २१ व्या शतकात जाहिर फोरम वर टाकायला कचरतो हे समजुन स्वतःचीच दया आली...
कान्हा ट्रिप प्लान करताना, मी ओढुन टाणुन "खजुराहो" ट्रिपमध्ये बसवायचा प्रयत्न करत होते, पण शेवटी खुप नाईलाजानी मला प्लान वर पाणी सोडावं लागलं होतं.. त्या दु:खावर भोरमदेव म्हणजे जबरदस्त मलम होतं!
ह्या मंदिराच्या बाजुलाच एक म्युझियम आहे.. तिथे काही शिप्ले ठेवली आहेत.. बहुदा ती उत्खननात सापडली असावीत.. ही शिल्पे देखील अत्यंत सुंदर आहेत..
Shilp 1
Shilp 2
Shilp 3
Shilp 4
Shilp 5
Shilp 6
Shilp 7
अगदी तृप्त मनानी आम्ही मंदिरातुन बाहेर पडलो..! बाहेर येताच हॉटेल मधुन फोन यायला सुरवात झाली.. ११ वाजले होते आणि आम्ही हॉटेल पासुन ८० किमी वर होतो (मध्येप्रदेशातले ८० किमी..!!), अबीरनी गोंधळ घालायला सुरवात केली होती..बाकी बायकांना दिवस फुकट गेल्याची जाणिव झाली होती.. त्यांचा विश्वासघात झाल्यामुळे अगदी रणकंदन माजले होते.. आम्ही ताबडतोब परतीची वाट पकडली..
गाडी जंगलातुन पळत होती.. दादानी विचारलं..
"उद्याची सफारी मिळते का ते पहायचं का?"...
अरे हो की.. अजुन वाघ दिसलाच नव्हता...
"नको.. आता पुरे झालं..." मी शांतपणे डोळे मिटुन घेतले..
२-३ दिवसांपासुन चालु असलेला वाघाचा शोध मी शांत मनानी थांबवला होता...
* - कॅमेरा लय भारी असला तरी तो माझ्या हातात असल्याने फोटो यथा तथाच आहेत.. गोड मानुन घ्या..

 भोरमदेव मंदिराविषयी अधिक माहिती:-

छत्तीसगढ़ का खजुराहो 'भोरमदेव'

http://anilpusadkar.blogspot.com/2008/08/blog-post_10.html

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...