आयुष्यभर आठवणीत राहील असा अमोल ठेवा (६५०० km, १९ दिवस) शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतोय.
हा तर... !!! गेल्या वर्षी मी आणि तुषार भीमाशंकरला गेलो होतो. दिवसभर झालेल्या गप्पांमध्ये दोन विषय लक्षात ठेवण्यासारखे झाले. १: बुलेट घ्यायची आणि २. लेह ला जायचं. पुढे मग साधारण महिना दोन महिने गेले असतील आणि तुषारचा फोन आला.
तुषार: समीर !!! मी पाडव्याला बुलेट बुक केली.
मी: काय SSS सहीच.. एकदम...!!! थांब मी पण बुक करून टाकतो. आयला परवा परवा पर्यंत माझ्या समोर पल्सर २२० ची महती गाणारा प्राणी अचानक बुलेट बुक करून आलास पण. भारीच !!! करणारच शेवटी आपली चॉईस हाय ;)
पुढे अश्याच शिळोप्याच्या (आईचा ठेवणीतला हा शब्द) गप्पा झाल्या आणि दोन दिवसांनी मी पण जाऊन बुलेट बुक केली. ट्रीपमध्ये चर्चा झालेला एक विषय हातावेगळा झाला होता. बुलेट १० महिन्यांनी मिळणार होती. आता वेध लागले होते दुसऱ्या विषयाचे. "Mission लेह" चे. त्यानंतर वर्षभर जेव्हा जेव्हा भेटलो, बोललो तेव्हा तेव्हा, किमान एकदा तरी लेह वारीची चर्चा व्हायची. पहिले ७-८ महिने काही वाटलं नाही पण जेव्हा गाडी कधी मिळणार याची चौकशी सुरु केली तेव्हा गाडी मिळायला एक दोन महिने जास्त वेळ लागणार म्हणून डीलर कुणकुण करू लागला आणि आम्ही "आम्हाला गाडी लवकर द्या !!! लेह ला जायचय" म्हणून भूनभून करायला लागलो. अखेर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुहूर्त लागला आणि दोघांनाही एकाच दिवशी गाड्या ताब्यात मिळाल्या. लेहला यंदा १००% जायचं अस ठरवलं असल्यामुळे गाड्या पळवायला सुरुवात केली. कारण २-३ सर्विसिंग (निदान ३००० - ४००० km तरी ) शिवाय गाडी घेऊन जाता येणार नव्हते. ४-५ लांब ट्रीपा मारल्या आणि तो कोटा भरून काढला.
मधल्या काळात कुठून जायचं, कसं जायचं आणि काय काय समान न्यायचं/घ्यायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधून काढली. काही अनुभवाचे आणि काही फुकट असे भरपूर सल्ले मिळाले. सारं काही ऐकून (पटेल ते घेऊन) अखेर १८ ऑगस्टला निघायचं ठरवलं. १७ ऑगस्ट उजाडला. तुषारला फोन केला, घेऊन जाण्याचं सगळं समान गोळा झाल्याची खात्री केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.०० ला निघायचं ठरलं. ट्रेकिंगसॅग मध्ये सगळं काही भरून ठेवलं आणि झोपलो. पहाटे ४.०० ला उठून अर्ध्या तासात आवरलं आणि सॅग गाडीला बांधायला खाली आलो. सगळे प्रयत्न करून सुद्धा, ती मोठी पिशवी गाडीला नीट बांधता येईना. १० - १५ मिनिटे आणखी प्रयत्न केला पण काही जमेना मग सरळ ट्रेकिंगसॅग न्यायचं रद्द केलं. परत वर गेलो आणि ट्रेकिंग सॅग रिकामी करून सॅडल बॅग (फोटो मध्ये दिसेलच) मध्ये सगळं समान भरलं.
पंक्चर काढण्याचं कीट, गाडीचे आणखी काही लागणारे पार्ट, कपडे आणि बाकी किरकोळ भरपूर गोष्टी मिळून अंदाजे ३० किलो वजन भरेल एवढं समान होतं आणि ते परत व्यवस्थित लावायचं होतं. या सगळ्या प्रकारात अर्धा पाउण तास गेला आणि तुषारला उशीर होतोय म्हणून फोन करायचा राहिला. इकडे हा बाबाजी ५.३० लाच निगडी नाक्यावर येऊन उभा राहिला होता आणि दर ५ मिनिटांनी फोन करत सुटला होता. मी इकडे पळापळ करून (३० किलो घेऊन) घामाघूम झालो होतो आणि मध्ये मध्ये याचे फोन. कसंबस गाशा गुंडाळला आणि ६.०० ला घरून निघालो. १८ ऑगस्ट उजाडण्या आधीच निघण्याचा बेत फसला होता. ढगाळ वातावरण होतं पण पाऊस पडत नव्हता म्हणून मग आणखी उशीर न करता रेन कोट नुसताच बरोबर घेतला. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. घर सोडून १-२ km झाले असतील आणि तो (पाऊस) आला. मग न थांबता तसाच भिजत निगडी नाका गाठण्याचा ठरवलं आणि १५ मिनिटात तिथे पोहोचलो. आमच्यावर मुक्त तोंडाने फुले उधळण्यासाठी, साहेब आमची वाट बघत उभे होतेच. गुमान सगळं ऐकत मी अख्खा रेनकोट चढवला पण त्या शहाण्याने बडबडीच्या नादात नुसतेच जर्किन घातले. मी आपला हो हो म्हणत निघू म्हणालो आणि आवरत घेतलं. देशाच्या उत्तर टोकाचा प्रवास सुरु झाला होता.
देहूरोड येई पर्यंत पावसाचा जोर वाढला आणि आम्ही थांबलो. श्रीमंत गाडी थांबवून उतरले, गाडी साइडस्टॅंडला लावली आणि रेनकोट घालू लागले. कशी कुणास ठाऊक पण आम्ही गप्पा मारत असतानाच त्याची गाडी साइडस्टॅंडच्या विरुद्ध दिशेला कलंडली आणि पडली. मी मागेच उभा होतो पण, आधीच वजनदार (मी नव्हे, गाडी) आणि त्यात आणखी ३० किलो वजन जास्त असलेलं ते धूड मागे उभा राहून सांभाळणे केवळ अशक्य होतं. तरी लगेच पुढे झालो आणि जमिनीला आलिंगन दिलेली गाडी झटक्यात उचलली. "माझ्यात एवढं बळ कुठून आलं ?" माझं मलाच आश्चर्य वाटलं. गाडी पडली आणि त्याची पुढच्या ब्रेकची लिवर अर्धी तुटली. ती वाकून वजन न पेलवल्यामुळे तुटताना मी अगदी हतबल होऊन पहिली होती. प्रवासामध्ये अडथळ्यांची परीक्षा सुरु झालीच होती त्यात आणखी भर पडली. थोडसं वाईट वाटलं पण काय करणार, अर्धी तुटकी ती कांडी टाकली बॅग मध्ये आणि निघालो पुढे. लोणावळ्यात थोडावेळ थांबलो, पाऊस पण थांबला होता,सगळीकडे कसं हिरवागार टवटवीत होतं. गाड्या पुन्हा एकदा चेक केल्या आणि निघालो.
घोडबंदर मार्गे अहमदाबाद हायवे पकडायचा आणि मग तो धरून, थेट उत्तरे कडे प्रयाण करायचे असं ठरवलं होतं. मुंब्र्या पर्यंत न चुकता आलो, टोल नाका पार करून हायवेला लागलो. आधी एकदा घोडबंदर मार्गे विरारला गेल्यामुळे, एक २-३ km पुढे गेल्यावर आपण रस्ता चुकलो आहोत कि काय असं वाटायला लागलं. "तो मी नव्हेच" असं तो (रस्ता) ओरडून ओरडून सांगत होता आणि तेच बरोबर होतं. तुषारला रस्ता चुकलोय असं खुणेने सांगितलं आणि एक ठिकाणी चौकशी केली तर कळलं आम्ही आग्रा हायवेवर आहोत. झालं कल्याण... असो..थोडी विचारपूस केल्यावर पुढून भिवंडी मार्गे रस्ता आहे हे कळलं, पण भिवंडीच्या गर्दीतून आणि खराब रस्त्यावरून जाण्यात वेळ जाणार होता म्हणून मग हो-नाही करता करता मागे वळायच ठरलं. परत ठाण्यात येऊन घोडबंदर रोडला लागलो. आता रस्ता ओळखीचा वाटू लागला. लोणावळ्याहून निघाल्यावर कुठेही थांबलो नव्हतो. पोटात कावळे ओरडण्याबरोबर नाचायलाही लागले होते आणि वर ढग गडगडायला लागले होते. सगळीकडे अंधारून आलं होत. सकाळचे ९.३० वाजलेले असून सुद्धा संध्याकाळी ७.०० चं वातावरण होतं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मग एक हॉटेल बघून थांबलो. रेनकोट वगैरे काढून ठेवताना नजर हॉटेलचा अंदाज घेत होती (साफ सफाई स्वच्छता वगैरे वगैरे). हॉटेलचा मालक अस्सल मुस्लीम पेहराव, डोक्यावर टोपी इत्यादी गोष्टी घातलेला. म्हंटल मुस्लीम असला म्हणून काय झालं, हॉटेल तसं बर दिसतंय. नित्यनियमा प्रमाणे काय काय मेनू मध्ये आहे, ते (पाठ झालेलं) त्याने सांगितलं. ऑर्डर गेली "एक कांदा उत्तपा आणि इडली सांबर". लगेच ती ५ मिनिटात आली सुद्धा पण घोर निराशेला बरोबर घेऊनच, अगदीच बकवास चव. बाहेर पाऊस धो-धो सुरु झाला होता आणि मी काहीतरी चांगलं खायचं सोडून बेचव उत्तपा खात होतो. तुषार पण वाकडतिकडं तोंड करून समोर आहे ते गप गिळत होता. माझा उत्तपा थोडा खाऊन झाल्यावर या महाराजांनी सांगितलं, "दोनीही गोष्टींना मटणाचा वास येतोय". त्यातल्यात्यात तुषारला तर जास्तच. त्यात हा प्राणी सगळे प्राणी खातो तरीही त्याला वास सहन होत नव्हता. का कुणास ठाऊक पण मला तसला कसलाही वास आला नाही. तसच अर्ध पोटी खाणं टाकलं, चहा प्यायला आणि रेनकोट घालून भर पावसात तिथून निघालो. १०.०० वाजले तरीही मुंबापुरी अजून फार काही लांब गेली नव्हती. आजचा पहिला मुक्काम होता घरापासून ८५० km लांब उदयपूरला, म्हणून मग सुसाट गाडी हाकायला सुरुवात केली. रस्ता एकदम चकाचक, ८०-९०-१०० km तशी वेगाने दोन बुलेट पळत होत्या. पाऊस धो-धो कोसळत होता, समोरचं १०० - २०० फुटाच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं, इतका तो जोरदार कोसळत होता. तो थांबायचं नाव घेत नव्हता आणि आम्ही थांबायचा काही प्रश्नच नव्हता. चकाचक रस्ता असला तरी उतार चढ असल्या मुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. अंगावर उडणाऱ्या पाण्याची फिकीर न करता भरधाव त्यातून आम्ही निघून जात होतो. एका पाटोपाठ एक ट्रक मागे टाकत आणि मधूनच एखाद-दोन चारचाकी सप्पकन आम्हाला मागे टाकून पुढे जात होत्या. अगदी महाराष्ट्राच्या सिमे पर्यंत हाच खेळ चालू होता. महाराष्ट्र सिमे जवळचा टोल नाका येई पर्यंत दुचाकी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच (आमच्या दोन सोडून) दिसल्या. टोल नाक्याला पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता, मग तिथेच एक रिकाम्या लेन मध्ये गाड्यांना आणि स्वतःला विश्रांती देण्यासाठी थांबलो.
चांगली १५-२० मिनिटे आराम केल्यावर पुढचा प्रवास चालू केला. आमचा नाष्टा झाला होता पण गाडीचं काय? सकाळी निघाल्या पासून ३०० km झाले असतील तरी ती अजून उपाशीच होती, म्हणून मग थोडं पुढे गेल्यावर एक पंप दिसला आणि आत वळलो. पंप मस्त धुवून काढून, हार फुलांनी सजवलेला होता. पूजा अर्चा झालेली होती. पंपाकडे जाताना, दोन विचित्र माणसं, दोन काळ्या बुलेट, ते सुद्धा MH-14 पासिंगच्या, इकडे कुठे आल्या म्हणून लोकं कुतुहुलाने आमच्या कडे बघत होती. आम्ही आपलं गेलो आणि दोनीही टाक्या फुल करून घेतल्या. इतक्यात पंपाचा मालक बाहेर आला. कुठून आलात, कुठे चाललात वगैरे चौकशी केली. त्याला त्याच्या प्रश्नांची आश्चर्यकारक उत्तरं मिळाल्यावर गड्याने आमचे नाव पत्ते वगैरे लिहून घेतले. पंपाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून ही सजावट, पूजा वगैरे आहे असं त्याच्या कडून कळलं आणि सोबत सामोसे चहाचा नाष्टा पण मिळाला. सामोसे म्हणजे माझा जीव कि प्राण... अहाहा... !!! क्या बात... !!! पावसात भिजून आल्यावर गरम गरम सामोसे आणि चहा... वा... वा... एकदम मस्तच ! चांगले दोन तीन सामोसे हाणले. आणखी घेणार होतो पण "ऊस मुळा सकट खाऊन नये" हा वाक्प्रचार आठवला आणि स्वतःला आवरलं. सकाळच्या बेचव नाष्ट्याची उणीव याने भरून काढली. खाऊन पिऊन झाल्यावर निघायच्या वेळेला गोधरा मार्गे उदयपूरला जाण्याचा सल्ला मालकाने दिला. गाडीचं जेवण आणि आमचा नाष्टा दोनीही झालं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीचा वेग ताशी ९० -१०० km ठेवला होता. त्याच्या वर गेला तर बुलेट इतका थरथराट करते कि हातासकट अख्या शरीराला मुंग्या यायला लागतात. ९० ने सुटणे म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव घेत दुपारी २.३० - ३.०० पर्यंत गाडी दामटत होतो. पोटात पुन्हा कावळे डिस्को करायला लागले म्हणून थांबलो. जेवलो ( तेवढीच गाडीला पण विश्रांती) आणि पुन्हा निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजत आले तेव्हा बडोद्याची वेस दिसायला लागली. गोधरा मार्गे जायचं असल्यामुळे बडोद्याच्या बायपास वर अहमदाबाद रोड सोडला आणि एका गंभीर घटने मुळे उजेडात आलेल्या गावाचा (गोधाराचा) रस्ता धरला. उन्हं उतरायला लागली होती आणि उदयपूर अजून चिक्कार लांब होतं. घरातून निघताना, "रात्री गाडी न चालवण्याची सक्त ताकीद दिली गेली होती (दोघांनाही)". स्वतःच्या आणि गाडीच्या तब्यतीसाठी ती अमलात आणायची ठरवलं होतं. ज्या गावाबद्दल नुसत्या बातम्याच वाचल्या, ते कसं असेल, तिथली लोकं कशी असतील आणि आपण तिथेच रहायचं का? याचा हिशोब मनात सुरु झाला. पण आम्हाला गोधरा सुद्धा गाठता आलं नाही. अंधाराचं साम्राज्य पसरलं, तेव्हा आम्ही गोधरा पासून ५३ km अलीकडे "हलोल" मध्ये होतो. मग तिथेच पहिला मुक्काम पडला. सकाळी निघायला झालेला एक दीड तास उशीर, आग्रा रोडची गडबड आणि त्या धुडाला (बुलेटला) घेऊन १०० km ताशी वेग मर्यादा ओलांडता न येणे या मुळे ठरलेल्या योजनेचा (उदयपूरला पोहोचण्याचा) बट्याबोळ झाला होता. असो...त्या छोट्याश्या गावामध्ये एक छोटेखानी हॉटेल शोधलं, खोल्या चांगल्या असल्याची खातरजमा केली आणि तिथेच थांबण्याचा निश्चय केला. लगेच घरी फोन फोनी करून सगळा रेपोर्ट दिला आणि रिकामा झालो. मस्त फ्रेश झालो आणि जेवलो. हॉटेल लहान होतं पण जेवण मात्र अप्रतिम होतं. साधीच ऑर्डर दिली. दाल फ्राय, जीरा राइस, रोटी, पनीर टिक्का, मटर पालक. त्यात जोडीला ताक. अक्षरशः पोट भरून एक एक पदार्थ हाणला आणि तृप्त झालो. पहिला मुक्काम चुकलाच होता, त्यामुळे पुढचे मुक्काम बदलेले. मग पुढच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आराखडा बांधला, कुठे थांबायचं, काय करायचं (साहेबाच्या भाषेत प्लान A, प्लान B वगैरे वगैरे) ठरवलं आणि सकाळी लवकर निघायचं ठरवून झोपलो. जवळपास ६०० km गाडी चालवून प्रवासाचा पहिला दिवस संपला होता.
क्रमशः
पहिला मुक्काम चुकलाच होता, त्यामुळे पुढचे मुक्काम बदलेले. मग पुढच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आराखडा बांधला, कुठे थांबायचं, काय करायचं (साहेबाच्या भाषेत प्लान A, प्लान B वगैरे वगैरे) ठरवलं आणि सकाळी लवकर निघायचं ठरवून झोपलो. जवळपास ६०० km गाडी चालवून प्रवासाचा पहिला दिवस संपला होता.
अता पुढे.......
डोळे उघडले तेव्हा ६.०० वाजले होते आणि ठरलेल्या प्लानचे पुन्हा १२ वाजले होते. आवरून निघता निघता ७.३० झाले. मग नाष्ट्याचा बेत पुढे ढकलून निघालो, म्हंटल सांच्याला जयपूरला पोहोचलो तरी बेहत्तर. रोड एकदम चकाचक होता त्यामुळे एका त्रासातून सुटका झाली होती. दोन तास तुफान गाडी चालवल्यावर एके ठिकाणी (गावाचं नाव लक्षात नाही) न्याहरीसाठी थांबलो. गाडीवरून उतरलो आणि हॉटेल वजा दुकानाबाहेर भजीची वाट बघत आम्ही थांबलो.
गरम गरम भजी आणि चहा. लाजवाब नाष्टा !!! आम्ही तिकडे हातातोंडाची लढाई करत होतो आणि इकडे गावकरी लोक दोनीही गाड्यांभोवती जमा झालेले. काय दिमाखात त्या दोघी उभ्या होत्या म्हणून सांगू..!!! आणि गावकऱ्यांच्या तोंडावर आश्चर्यमिश्रित ते भाव !!!. कोणी म्हणे डीझेल वर चालत असेल, कोणी त्याची किंमत किती? याचा विचार करत होता, गाडी जवळ उभं राहून आपापसात कुजबुज चालू होती. असो... नाष्टा झाल्यावर गाडी जवळ गेलो तेव्हा सगळे बाजूला झाले. यावेळी स्टार्टर वापरायचा सोडून मुद्दाम गाडीला किक मारली. थोडा भाव खायला चान्स मिळत असेल तर कोण सोडेल? पहिल्या किक मध्येच धडधड धडधड करायला लागली आणि धडधडीचा दमदार आवाज करत तिथून आम्ही एकदम शान मधे कल्टी मारली. उदरभरण झाले होते त्यामुळे आता २-३ तास चिंता नव्हती. गाडी सुसाट पळत होती. पहिल्या दिवसाचा ९० ने सुटण्याचा अनुभव पुन्हा एकदा घेत होतो.
पावसाळा चालू होता त्यामुळे सगळी कडे मस्त हिरवा गालीचा पसरलेला आणि त्यात सरळसोट टार रोड. त्या वातावरणात बघता बघता कधी उदयपुरला पोहोचलो कळलंच नाही. उदयपुर मधे शिरताना सीमेवरचं बांधकाम पाहून आपण राजस्थान मध्ये आहोत हे लगेच जाणवलं. उदयपुर गावात शिरायच्या आधीच बाह्यवळण रस्त्याला वळलो आणि चित्तोडगडचा मार्ग धरला. साला तो रोड पण झक्कास.
उदयपूर मधे स्वागत....
उदयपूरच्या दुसर्या वेशीवर...
वेशी वरचा दरवाजा...
थोडसं नक्षीकाम....
मुंबई सोडल्यापासून गोल्डन क्वाड्रीलॅट्रल काय चीज आहे याचा km - km वर (पदापदावर सारखं) अनुभव घेत होतो. भाजप सरकारच्या काळात सुरु झालेली आणि नंतर प्रत्यक्षात आलेली हि कल्पना खरच स्तुत्य आहे. भूक तशी फार लागली नव्हती म्हणून मग एके ठिकाणी फक्त चहा प्यायला आणि पुढे प्रवास सुरु केला. चित्तोडगडला सुद्धा बगल देऊन आम्ही आमचा मोर्चा किशनगड कडे वळवला. वाटत होतं जयपूरचा ठरलेला मुक्काम आज होणार म्हणजे होणार.
दिल्ली अभि दुर है...
कंटाळा आला कि थोडा वेळ थांबणे. चहा वगैरे मारणे आणि पुढे जाणे. दोन दिवस हेच चालू होते आणि पुढे दोन आठवडे हेच करणार होतो. संध्याकाळचे ६.०० - ६.३० वाजत आले तेव्हा नासिराबादच्या अलीकडेच पोहोचलो होतो. पुन्हा एकदा ढाब्यावर थांबलो, तोंड धुवून फ्रेश झालो आणि चहा मागवला. ढाब्यावर काही ट्रकवाले जवळ आले. पुन्हा चौकशी सुरु झाली? विचारपूस करताना "फौज में हो क्या?" हा प्रश्न आला. तसा हा आधी काही ठिकाणी थांबलो तिथे हि आला होता, पण तेव्हा आम्ही खरं उत्तर दिलं होतं. या वेळी मात्र तुषारने "हां, फौज में है, जम्मू जा रहे है" असं बिंदास सांगून टाकलं. असो... चहा प्यायला आणि सुटलो किशनगडकडे. ७.०० वाजले किशनगड जवळ पोहोचायला. सूर्य मावळून गेला होता तरी आम्ही गाडी चालवत होतो. एकच दिवस नियम पाळून आम्ही तो लगेच दुसऱ्या दिवशी मोडला होता. जयपूर आणखी १०० km लांब होते. अंधार असून सुद्धा जोरात गाडी चालवायची खुमखुमी अजून गेली नव्हती. मनात ठरवलं होतं, आज उशीर झाला तरी चालेल, पण जयपूर गाठायचच. पण एके ठिकाणी गडबड झाली. जोरात चाललो असतानाच एका ट्रेलरला ओवरटेक करताना धडाधड एका पाठोपाठ एक, असे एकदम चारपाच मोठ्या मोठ्या खड्यात गेलो. माझ्या पाठोपाठ तुषार पण त्याच मार्गाने. म्हंटल आता काही खर नाही, जातोय त्याच्या (ट्रेलरच्या) खालीच. गाडी सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले. तेव्हा जाणीव झाली कि आपण आता थांबलं पाहिजे. एकतर अंधार त्यात असे खड्डे पुन्हा येऊ शकतात, म्हणून मग किशनगडच्या थोडसं पुढे एक चांगलं हॉटेल बघितलं आणि गाडीला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला. तुषार जाऊन रूम बघून आला. ८००/१००० रुपये एक रूम. बोंबला, फक्त ८ -१० तासासाठी १००० रुपये मोजावे लागणार होते. पण नाईलाज होता. दुसरं हॉटेल शोधण्याची अजिबात इच्छाहि नव्हती आणि तेवढा वेळाही नव्हता. दिवसभर गाडी चालवून दमल्यामुळे निदान झोप तरी शांत लागावी म्हणून रूम घायायचं ठरवलं. तुषार पूर्ण व्यवहार करून येई पर्यंत मी सगळं समान गाडी वरून उतरवलं. उशीर झाला होता म्हणून पटापट सगळं आवरलं आणि जेवायला आलो. जेवलो, दिवसभराचा सगळा हिशोब मांडला, तिसऱ्या दिवशी निदान चंडीगड तरी गाठू असं ठरवलं आणि परत रूमवर आलो. दार उघडून बघतो तर काय, सगळी कडे किडेचकिडे. एकतर हॉटेल हायवे वर त्यात पाऊस पडून गेलेला, रूम सगळीकडून बंद असून सुद्धा हे कुठून कसे प्रकट झाले कुणास ठाऊक? हॉटेल मालकाला बोलावून सगळा प्रकार दाखवला आणि रूम बदलून घेतली. दुसऱ्या रूम मध्ये पण तीच तऱ्हा पण किड्यांच प्रमाण थोडं कमी होतं म्हणून फायनल केली. किड्यान पासून सुटका हवी म्हणून मग दिवा मालवला, एका कोपऱ्यात फोनची टॉर्च लावून बिनधास्त झोपलो.. ६९० km प्रवास करून आजचा दुसरा दिवस संपला होता.
दिवस नंबर ३
सगळे किडे टॉर्चकडे गेल्यामुळे झोपेच खोब्र नाही झाल. आपसूकच उठायला नेहमी प्रमाणे उशीर झाला अन सगळं आवरून निघता निघता ८.०० वाजले. आज चंडीगड मुक्काम ठरवला होता. होईलच याची शाश्वती नव्हती. सकाळी ८.०० ला जे निघालो ते डायरेक्ट १०.१५ ला ढाब्यावरच थांबलो. जेव्हा थांबलो तेव्हा आम्ही जयपूर बाह्यवळण मार्गावर होतो. नाष्ट्याला काय??? विचारलं तर काहीच नाही, फक्त जेवण मिळत म्हणाला. मग काय जेवायचं ठरलं.
म्हंटल आता जेवलं कि परत ३.०० वाजे पर्यंत काळजी मिटेल. मसुराची झणझणीत उसळ, फुलके, लोण्याचा एक मोठ्ठा गोळा, दाल फ्राय आणि भात. मारला अडवा हात दोघांनी पण. प्रत्येक फुलक्याला भरपूर लोणी लावून आत्मा तृप्त होई पर्यंत जेवलो आणि थोडा आराम करून निघालो.
या ढाब्यावर जे २-४ फोटो काढले तेवढेच.....पुन्हा फोटो काढायला रात्रच उजाडली.....कशी ? ते वाचालच....
थोडसंच पुढे गेलो असू, तर समोर आभाळ भरून आलेलं दिसलं. सगळीकडे अंधारून आलेलं. एक दिवस (दुसऱ्या दिवशी) रेनकोट पासून सुटका मिळाली होती पण आज ती मिळेल असं समोर बघून बिलकुल वाटत नव्हतं. पावसाचे मोठे मोठे थेंब पडायला सुरुवात झाली तेव्हा एका झाडाखाली थांबून रेनकोट चढवला. गाडीला किक मारली आणि निघालो. जस जसं पुढे जाऊ लागलो, पावसाचा जोर आणखी वाढू लागला. तो इतका वाढला कि पहिल्या दिवसासारखच पुढे १०० -१५० फुटा पलीकडे दिसायचं बंद झालं. समोर एक खिंड दिसत होती. मनात वाटत होतं, खिंड ओलांडली कि जोर कमी होईल, पण कसलं काय, खिंडी पलीकडे तर पाऊस आणखी वाढला. समोरचं दिसण्याचं प्रमाण आणखी कमी झालं. आमच्या दोघांमधलं अंतर फार फार तर १० फुट ठेवलं असेल आम्ही. पावसाचे थेंब हेल्मेटवर टनाटन आदळत होते. मधूनच २-४ थेंब हेल्मेटला हि न जुमानता आत येत होते. चेहरा सगळा ओला झाला होता. दोन दोन जर्किन घातले होते तरी अख्खा भिजलो होतो. एवढं असून सुद्धा गाडी ७०-७५ ने हाकतच होतो. पण हे कितीवेळ करणार? थोडं पुढे गेल्यावर आमचा जोर कमी झाला पण पावसाचा आहे तसाच होता. जरा वेग कमी केला तर ती बुलेट सुद्धा भूकभूक करायला लागली. म्हंटल आता या पावसात हि जर बंद पडली तर आपलं काही खरं नाही. धड कोणी मदतीला पण थांबणार नाही असा तो भाग होता. तसाच तिचा कान पिळत, तिला चालू ठेवली आणि पुढे जात राहिलो. थोड्याच वेळात तिची भूकभूक बंद झाली आणि मला हायसं वाटलं. पाऊस मात्र अजून चालूच होता. आज कसली परीक्षा देव घेत आहे ? हाच विचार राहून राहून मनात पिंगा घालत होता. चंडीगड लांबच राहिलं आम्ही निम्म्यात तरी पोहोतोय कि नाही अशी शंका येऊ लागली. अखेर बराच वेळ भिजत गाडी चालवल्यावर त्याला आमच्यावर दया आली आणि तो थांबला. थांबला कसला??? आम्ही त्याभागातून पुढे आलो म्हणून आमच्यासाठी थांबला. तिकडे तू धुमाकूळ घालतच असणार. पुढे पुढे जात होतो. एके ठिकाणी नदीचा पूल आला आणि अख्या पुलावर तळं साचलेलं. रस्त्यावर जवळ-जवळ एक फुट पाणी असेल . दुसरा पर्यायी रस्ता नव्हताच. घातली गाडी मग पाण्यात. आधी तुषार गेला आणि त्याच्या मागे मी. मोठ्या गाड्या जात आहेत त्यांना पाहून, रस्त्याचा अंदाज घेत घेत पुढे जात होतो. सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून जोरात जोरातरेझ करत होतो. पण एके ठिकाणी समोरच्या गाडी मुळे तुषार थांबला, सायलेन्सर मध्ये पाणी गेलं आणि गाडी बंद पडली. त्या बरोबर आपणही लटकून ताप वाढवायला नको म्हणून मी त्याच्या बाजूने तसाच गाडी रेझ करत पुढे निघून गेलो. कसाबसा पूल ओलांडला, बाहेर पडलो आणि थांबलो. २-३ मिनिटे गेली तरी हा बहादूर अजून का नाही आला? हे पाहण्यासाठी गाडी लावली आणि चालत परत मागे जाणारच तेवढ्यात महाशय गाडी घेऊन आलेच. पुलावर जरा वरच्या भागात पाणी कमी होतं तिथे नेऊन, त्याच्या (आणि माझ्या पण) नशिबाने ती चालू झाली होती. गाडी चालू आहे हे बघून किती बरं वाटलं होतं तेव्हा. मग थोडा वेळ तिथेच थांबलो. गाडीला आणखी काही झालं आहे का बघितलं आणि पुढे निघालो.
पाऊस रिमझिम चालू होताच. दिल्लीला न जाता हरयाणा मधून रेवाडी - रोहतक - पानिपत असा मार्ग ठरवला होता. उद्देश फक्त एकच, जास्त गर्दीत न जाता लवकरात लवकर चंडीगडला पोहोचणे. पण नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होत. जस आम्ही हायवे सोडून रेवाडीच्या रस्त्याला लागलो, तसं पुन्हा पावसाचं थैमान चालू झालं. रोड एकदम खराब आणि त्यात जोरदार पाऊस. जसा सकाळी होता त्या पेक्षा जरा जस्ताच पण कमी नाही. थोडं पुढे गेल्यावर तुषारच्या बुलेटच्या मागच्या ब्रेक मधून कसला तरी विचित्र अवज येऊ लागला. २-३ वेळा थांबून पाहिलं पण काहीच कळेना. तसेच पुढे निघालो. रेवाडी सोडून पुढे झज्जर कडे निघालो होतो. रस्ता आणखीनच खराब झाला. एका मोठ्या खड्यात गेल्यावर माझ्या बुलेटच्या पुढच्या चाकातून पण काही तरी घासल्याचा अवज येऊ लागला. दोनीही गाड्यांची आणि आमची वाट लागली होती, पण नाईलाज होता. पुढे जात राहणे क्रमप्राप्त होतं. बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू होतं म्हणून आम्हाला सारखा रस्ता बदलावा लागत होता. २-४ km जरा कुठे चांगला रोड लागलाय अस वाटू लागताच परत खड्यांच राज्य चालू व्हायचं. जयपूर जवळ, सकाळी १० - १०.३० ला जे काही खाल्लं होतं तेवढ्यावरच होतो, त्यानंतर जेवायला सुद्धा उसंत मिळाली नव्हती. त्यात सतत पाऊस चालू असल्यामुळे दोघेही नखशीकांत भिजलो होतो आणि आणखी भर म्हणजे गाडी चालवण्याचा वेग थोडा कमी झाला होता. पण त्यातही मी एक सुख शोधलं होतं. ते होतं आजू बाजूच्या निसर्गाचं. दोनीही बाजूला नजर जेईल तिथ पर्यंत हिरवीगार शेती पसरलेली होती. हिरव्या रंगा शिवाय दुसरा रंगच दिसत नव्हता. वर अंधारून आलेलं आभाळ, धो धो कोसळणारा पाऊस, आजूबाजूला हिरवीगार शेती आणि रस्त्यावर भिजत चाललेलो आम्ही दोघे. मस्त वाटत होतं. रोहतक ओलांडून पुढे गेल्यावर एक ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो. ६ वाजून गेले होते. आज कुठे पर्यंत मजल मारता येईल याची आमच्यात चर्चा सुरु झाली.
मी: जमलं तर जाऊ चंडीगडला...
तुषार: रस्ता असला भंगार असेल तर आपण पानिपतला सुद्धा पोहोचू कि नाही याची शाश्वती नाही.
मी: बघू रे!!! जमेल तेवढं जाऊ.
५-६ तास खड्ड्यांमध्ये गाडी चालवून बिचारा वैतागला होता, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत. मी मात्र निसर्गात सुख शोधून रिकामा झालो होतो त्यामुळे खड्यांच काही वाटत नव्हतं. असो... आम्ही तिथून निघालो आणि पुढे गाडी चालवताना परत तेच गुऱ्हाळ चालू झालं. बघता बघता तुषारचा संयम सुटला. माझी आणि त्याची थोडी बाचाबाची झाली आणि साहेब एकदम पेटले आणि पुढे....
तुषार : "मी नाही येणार तुझ्या बरोबर. आपण वेगळे वेगळे जाऊ. तुला पाहिजे तिकडे तू जा, मला पाहिजे तिकडे मी जातो.
मी (शांतपणे): "राजे, शांत व्हा !!! अजून आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचाय, इतक्यातच नांगी टाकू नका...
तुषार: असलं कसलं प्लान्निंग रे तुझं??? रस्ता कसा आहे वगैरे माहिती करून घायायला काय झालं होतं???
मी (मनात): आता याला कोण सांगणार कि गुगल वाट्टेल ते शोधून देत नाही? त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. इथे रस्ते कसे आहेत, त्यांची परिस्थिती काय हे मी पुण्यात बसून कस शोधणार होतो ?
तुषार: अरे तीन दिवस झाले नुसती गाडी चालवतोय? पाहायला काहीच मिळालं नाही..... मी काय फक्त गाडी चालवायला आलेलो नाहीये.
मी (पुन्हा मनात): ऑ SSS !!! तीन दिवस आजू बाजूला जे सृष्टीसौंदर्य मी पाहिलं.. ज्या नवीन गोष्टी मी अनुभवल्या, मी पहिल्या त्या न पहाता याने काय डोळे मिटले होते का? आयला एवढा सगळं नवीन पाहायला मिळालं तरी म्हणतो काही पहिलच नाही.... !!! कमाल आहे याची...
मी: अबे आधी आपण पानिपतला पोहोचू मग बघू काय करायच ते.. तो पर्यंत गप्प बस आणि गाडी चालवत रहा...
सूर्य मावळला होता, ७ वाजून गेले होते. पुढचा अर्धा तास आम्ही दोघेही फक्त गाडी चालवत होतो, एकमेकांना दिवा(गाडीचा) लावून रस्ता दाखवत होतो. हे सगळ गपचूप चालू होतं, एकही शब्द न बोलता. पानिपतचा बायपास आला तेव्हा तिकडे न वळता सरळ शहरात शिरलो. अंधारात गाडी चालवल्यावर काय होते हे माहित असल्यामुळे चंडीगडचा मुक्काम पुढे ढकलला होता. पाहिलं हॉटेल शोधलं, ते खूप महाग वाटलं. म्हणून आणखी दोन चार हॉटेलं पहिली तर पाहिलं हॉटेल स्वस्त वाटायला लागलं, मग १५-२० मिनिटे फिरून परत त्याच हॉटेल मध्ये गेलो. रूम बुक केली आणि सगळ ओलं-कच्च समान घेऊन आम्ही दोघे रूम मध्ये गेलो.
इतका वेळ शांततेत गेल्यामुळे साहेबांचा पारा उतरला होता आणि ते नॉर्मल वागू लागले होते. आम्ही ओलं झालेलं एक एक समान बाहेर काढून ठेवत होतो. पाहता पाहता सगळी बॅग रिकामी झाली. काही गोष्टी भिजू नयेत म्हणून प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवल्या होत्या, त्या सुद्धा ओल्या झाल्या होत्या. लाडूच्या पिशवी मध्ये साधारण २० एक रव्याचे लाडू असतील त्यांचा सगळा मिळून एकच लाडू झालेला (पुढे काही दिवस आम्ही एकच लाडू थोडा थोडा खात होतो). पोह्याचा चिवडा आणला होता. त्या पिशवीत थोड्या चिवड्याच उपीट झालं होतं (कसं ते समजून घ्यावे). जी माझी परिस्थिती होती तीच तुषारची पण होती. त्याच्या कडे गाडीचे पार्टस होते, कसे ?? तर भिजलेले. एक एक काढून चांगलं पुसून गड्याने एका कडेला ठेवले. अख्या रूम मध्ये समान पसरलं होतं.
बरचसं समान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असून सुद्धा, साला, त्या पावसाने आमच्या सकट एक पण गोष्ट कोरडी सोडली नव्हती. सगळ काही वाळावं म्हणून AC लावला, पंख लावला आणि बसलो गप्पा हाणत. दिवसभराच्या त्रास बद्दल. पुढच्या प्रवास बद्दल. झालेल्या भांडणा बद्दल. एका वरून एक विषय निघत होते. भूक कधीच पळून गेली होती. हॉटेल मध्ये जेवायची सोय होती पण जास्त भूक नसल्यामुळे जेवायला रुमच्या बाहेर जायचा मूड नव्हता. तुषारने काही पराठे आणले होते.... म्हंटल बाहेरून लोणचं अणु आणि खाऊ पराठे. पण बाहेर कोण जाणार??? दोघेही कांटाळलेलो.... पुन्हा भांडण व्हायची चिन्हे. मग एक शक्कल लढवली. रिसेप्शनला फोन लावला आणि त्यांच्या कडूनच लोणचं (फुकटात) मागवलं. तोही खुश आणि मीही खुश. मग काय पराठे हाणले. मोठ्या लाडूचा छोटा छोटा भाग खाल्ला, सोबतीला पोह्याचा चिवडा होताच. जेवण रुपी नाष्टा आटोपल्यावर पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरली. चंडीगड १५० km होते. चंडीगडला सकाळी लवकर पोहोचायचं. गाडी सर्विसिंग करून घ्यायची (लगेच तेव्हा सर्विस सेंटरला फोन लावून येणार असल्याची माहिती दिली), कृष्णाला (माझा मित्र) भेटायचं आणि त्याच्या कडेच राहून आराम करायचा, अस ठरलं. आम्ही येत आहोत हे मी कृष्णाला आधीच सांगितलं होतं त्यामुळे हॉटेल शोधायची भानगड नव्हती. बस, ठराव मंजुर झाला आणि पलंगावर अडवा झालो. कधी झोप लागली ते कळलंच नाही. आयुष्यात पहिल्यांदा, धो धो कोसळणाऱ्या पावसात, इतका वेळ गाडी चालवली असेल. पावसाने भरलेला तिसरा दिवस पुन्हा जवळपास ६०० km अंतर कापून संपला होता.
क्रमश:
आयुष्यात पहिल्यांदा, धो धो कोसळणाऱ्या पावसात, इतका वेळ गाडी चालवली असेल. पावसाने भरलेला तिसरा दिवस पुन्हा जवळपास ६०० km अंतर कापून संपला होता.
सकाळी जरा उशिराच जाग आली. आज तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी त्या मनाने जरा कमीच गाडी चालवायची होती (फक्त १५० km). छान सगळं आवरलं आणि दोघेही निघालो. आज आपण ठरलेल्या ठिकाणी लवकर पोहोचणार म्हणून झक्कास वाटत होतं. काळजीच काही कारण नव्हतं. पण असा एकही दिवस जाईल तर शपथ!!! चौथा दिवस पण कायम स्वरूपी आठवणीत राहील असाच निघाला. रोज सकाळी निघताना टाकी फुल करणे आता नियम झाला होता. आदल्यादिवशी पोहोचता पोहोचता दोघांच्याही गाड्यां मधलं पेट्रोल संपत आलं होतं म्हणून मग पानिपत सोडून २-३ km पुढे गेल्यावर एका पेट्रोल पंपावर थांबलो. तुषारने पेट्रोल भरल्यावर मी पेट्रोल भरायला पुढे झालो. पेट्रोल भरून झालं आणि कस कुणास ठाऊक??? पण टाकीच झाकण बंद करताना माझा जोर झाकणासकट त्याला लावलेल्या चावीवर पण पडला आणि चावी मोडली. झाला का बाल्या आता...!!! अर्धी चावी हातात आणि अर्धी चावी झाकणात. आता पुढे काय ???... तुषारला झालेला प्रकार सांगितला... "तरी तुला म्हणत होतो, आणखी एक चावी बरोबर घे, तर मला उडवून लावलंस.... कशाला पाहिजे एक्स्ट्रा चावी वगैरे? आता बस बोंबलत...." इति तुषार. हि आणि अशी आणखी काही वाक्य ऐकून घेण्याशिवाय माझ्या कडे दुसरा पर्यायच नव्हता. गुमान ऐकून घेत होतो आणि आता पुढे काय ? हा विचार करत होतो. पहिला विचार मनात आला "वाट लागली आता ट्रीपची.... गाडी चालू कशी करायची??? इथेच थांबावं लागतंय आता", पण भानावर आलो. पेट्रोल पंपावर चावी तयार करणारा कुठे मिळेल का? याची चौकशी केली तर समजलं, मागे ३ km पानिपत मध्ये एक आहे, तो मिळाला तर ठीक नाही तर नाहीच.. आली का पंचाईत....?. बरं परत उलटं, गाडी घेऊन जायचं तरी कसं?? गाडी ढकलत...??? शक्यच नाही. ३ km!!! तेहि आहे त्याच्या पेक्षा २५-३० किलो जास्त वजन असलेलं धूड ढकलत कोण नेणार? डोक्यात चक्र गरागरा फिरत होतं. एकदा वाटलं तुषारला पाठवून त्यालाच(चावी वाल्याला) इकडे घेऊन यावं पण स्वतःचं दुकान सोडून कोण येणार एवढ्या लांब? तुषार म्हणाला थांब आपण गाडी चालू करू, ते सुद्धा चावी न वापरता आणि घेऊन जाऊ चाविवाल्याकडे. हि आयडिया आवडली. त्याने लगेचच स्क्रूड्रायवर काढला, पुढचा दिवा उघडला आणि इग्निशन वायर शोधली. आता इग्निशन डायरेक्ट करायचे होते म्हणजे आणखी एक वायर हवी होती. ती कुठून आणणार?? असलं काही होईल अशी कल्पनाच नव्हती त्यामुळे आमच्या कडे ती नव्हती. म्हणून मग पेट्रोल पंप वाल्यालाच मागितली. कुठून तरी शोधून त्याने एक छोटीशी वायर आणून दिली (ती मी अजून जपून ठेवली आहे). ती वापरून इग्निशन चालू केलं, गाडी चालू झाली. अर्धी चावी अजूनही टाकीच्या झाकणातच होती. लगेच परत उलटा पानिपत मध्ये आलो. आम्ही दोघेही मिळून चावीवाला शोधत होतो. थोडं फिरल्यावर त्याचा ठावठिकाणा समजला आणि त्याला गाठला. किती बरं वाटलं त्याला पाहिल्यावर !!!. लगेचच दोन चाव्या तयार करायला सांगितल्या ( न जाणो परत अशी वेळ आली तर गडबड नको..). तुषारने पण त्याच्यासाठी आणखी एक चावी तयार करायला सांगितली.
चावीवाला आणि मी.
चाव्या तयार होतात तो पर्यंत मग शेजारच्या टपरी वर कटिंग मारली आणि पानिपतचा बाजार पहात बसलो. अजूनही पानिपत मध्ये माणसाने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा वापरल्या जातात. रिक्षा ओढणारी ती माणूसरुपी आकृती पाहून कोणालाही कीव येईल अशीच सगळी माणसं दिसत होती. हात पायाच्या कड्या झालेल्या तरी रिक्षा ओढत होते. मनात विचार आला जग कुठे चाललंय आणि हे शहर अजून एवढे मागे का? असो... या विषयावर पुन्हा कधीतरी...
पानीपत बाजार..
पानीपत बाजार
भर चौकात दोन काळ्या बुलेट थांबलेल्या असल्यामुळे, लोकं वळून वळून गाड्यांकडे आणि आमच्याकडे बघत होती. एक दोन जण जवळ येऊन चौकशी पण करून गेले. बोलता बोलता एकाने तर "तुम जो ये कर रहे हो, इसमे समजदारी वाली बात कोई भी नाही" असा शेरा पण मारला. मी हि त्याला "हम जो कर रहे है, उसमे छुपा हुआ मजा क्या है?? वो खुद किये बिना आपको समज नही आयेगा" असं सडेतोड उत्तर दिलं. पुढेही बरीच चर्चा झाली पण जाऊदेत. या सगळ्या उद्योगात एक दीड तास गेला आणि अखेर चाव्या तयार झाल्या.
तडक निघालो चंडीगडकडे. पुन्हा पानिपत सोडल्यावर ५० -६० km नंतर एके ठिकाणी खाण्यासाठी थांबलो. आलूप्याज पराठा, दाल मखनी आणि दही. लाजवाब चव होती. माणसाने पराठा खावा तर हरयाणा, पंजाब मधेच. भरपेट खाऊन झाल्यावर जे निघालो ते डायरेक्ट चंडीगडलाच थांबलो. पानिपत - चंडीगड रोड एकदम चकाचक होता. एकही खड्डा नाही. कालच्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा त्रास भोगला होता पण आज मात्र गाडी चालवण्याचा उपभोग घेत होतो. दुपारी १ ला चंडीगडला पोहोचलो. बुलेटच्या सर्विस सेंटरला आधीच फोन करून कळवलं होतं. चंडीगड म्हणजे एकदम नियोजन करून बांधलेलं शहर. सगळे रस्ते जवळ जवळ काटकोनात आणि सगळी कडे सेक्टर्स पाडलेले आहेत. तरी त्या नवीन शहरात सर्विस सेंटर शोधण्यात अर्धा तास गेला. अखेर ते मिळालं आणि आपली गाडी पुन्हा नवी होणार याचा आनंद झाला. त्या बरोबर तुषारला पुढच्या ब्रेकची नवीन लिवर मिळणार याचा त्याला जास्त आनंद झाला होता. बिचारा घरून निघाल्या पासून चार दिवस अर्ध्या लिवरवर ब्रेकचं काम भागवत होता. हात दुखत असून सुद्धा सहन करत होता. कृष्णाला फोन करून चंडीगड मध्ये दाखल झाल्याचं कळवलं.
चांगले २-३ तास थांबून दोनीही गाड्या सर्विस करून घेतल्या. चमचम करणारी गाडी बघून खूप बरं वाटत होतं. कामावरून सुटल्यावर कृष्णा घ्यायला आला आणि मग आम्ही दोघे त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेलो. गप्पा रंगायला सुरुवात झाली. आम्ही जवळ जवळ १० वर्षानंतर भेटत होतो. कॉलेजच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. गप्पा मारताना, फक्त एकच रात्र राहणार आहे हे कळाल्यावर गडी नाराज झाला पण परतीच्यावेळी पुन्हा चंडीगड मुक्काम दोन दिवस करेन असं सांगितल्यावर स्वारी खूष झाली. दोन दिवसात चंडीगडला पोहोचणार होतो पण चार दिवस लागले होते. जे काही ठरवलं होतं तसं काहीच होत नव्हतं. पण याची फिकीर कोणाला? लेहला जायचं, एवढं ध्येय होतं आणि आम्हाला फक्त तेच दिसत होतं (पक्षाच्या डोळ्याप्रमाणे). बाहेर जाऊन मस्त जेवण केलं, पुन्हा घरी आलो (यावेळी रूम नव्हती, घर होतं) आणि झोपलो. दिवसाची सांगता छान चांगली झाली होती.
कृष्णाला ७.०० ला कामाला जायचं असल्याने सकाळी लवकर उठलो. लगेच आवरलं आणि कृष्णा बरोबरच बाहेर पडलो. कृष्णा हायवे पर्यंत सोडायला आला होता. आज मनालीला पोहोचायचं ठरलं होतं. अंतर ३०० km, म्हणजे रोजच्या पेक्षा कमीच, त्यामुळे आजचा मुक्काम ठरलेल्या ठिकाणीच होणार हे निश्चित वाटत होतं. नाष्टापाणी न करता, तसेच चंडीगड सोडला आणि एक दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरु झाला. दिसाड पावसात चिंब भिजणे काय असते? ते आम्हाला विचारा. धो धो पावसात शिमला रोडने पुढे गेल्यावर पिंजनौर मध्ये शिमल्याकडे जाणारा रस्ता सोडून डावीकडे बद्दी मार्गे स्वारघाट कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. जस जसं बद्दी जवळ यायला लागलं तस तसं पावसाचा जोर कमी झाला. मधेच एके ठिकाणी आम्हाला TVS मोटर्सचा कारखाना दिसला. दोन अडीच तास गाडी चालवल्यावर एका ढाब्यावर थांबलो. भरपेट जेवण केलं आणि निघालो. आता कुठे खरा प्रवास सुरु झाला होता. स्वारघाटच्या डोंगररांगा दिसू लागल्या होत्या. स्वारघाटकडे जाताना जो घाटरस्ता सुरु झाला तो झालाच. एका नंतर एक डोंगर चढत होतो, उतरत होतो. वासुंधरेने हिरवा शालू नेसला होता. वर निरभ्र आकाश आणि आजूबाजूला हिरवळ पाहून मनाला प्रसन्न वाटत होतं.
घाटरस्ता धरल्यापासून, रस्त्याच्या बाजूने नदी दिसायला सुरुवात झाली, कधी ती उजव्या बाजूला असायची तर कधी डाव्या बाजूला, कधी ती आमच्या बरोबर वाहायची तर कधी आमच्या विरुद्ध. कधी ती संथ वाहत होती, कधी खळखाळाट करत धावत होती. कशीही असो आणि काहीही होवो तिने साथ काही सोडली नाही. जस जसं स्वारघाट जवळ यायला लागला तस तसं डोंगर आणखी उंच होऊ लागला आणि ढग खाली येऊ लागले. आपल्याकडे पावसाळ्यामधे, सह्याद्रीत हे दृश्य सगळीकडेच पाहायला मिळतं पण आम्हाला ते उत्तरेत पाहायला मिळत होतं. ढगातून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. हवेतला गारवा हवा हवासा वाटत होता. बघता बघता स्वारघाटला पोहोचलो. थोडा वेळ थांबलो. डोळे भरून आजू बाजूचा निसर्ग पाहून घेतला आणि पुढे निघालो.
सकाळ पर्यंत चमकणारी... काही तासातच स्वारघाटला पोहोचल्यावर हि अशी झाली.
घाट रस्ता असल्यामुळे, दुहेरी वाहतूक सुरु झाली होती. एकतर दुहेरी वाहतूक, त्यात जास्तीजास्त ट्रकवाले, आणखी कहर म्हणजे खड्डेमय रस्ता. त्यामुळे गाडी चालवण्याचा वेग बराच कमी झाला होता. तरी उतारावर थोडा वाढायचाच. जमेल तिकडे खड्डे चुकवत, जमेल तिथे जमेल त्या वाहनांना मागे टाकत पुढे सरकत होतो. असेच जात असताना एका उतारावर घोळ झाला आणि मी पडलो. पुढे बऱ्यापैकी अंतरावर एक ट्रक चालला होता आणि मी त्याच्या पाठोपाठ. अचानक एक खड्डा चुकवता न आल्यामुळे त्यातून हळू जावं म्हणून मी जोरात ब्रेक दाबला आणि तिथेच चूक केली. तो इतक्या जोरात दाबला गेला कि गाडी स्लीप झाली आणि मी पडलो. मागून तुषार येत होता, त्याचही मित्रप्रेम अगदी त्याच वेळेला उफाळून आलं आणि तोही लगेच गळाभेटीला आला. मी पडलो होतोच, तोही पडला. फरक इतकाच कि त्याची गाडी पडली पण तो अडवा नाही झाला. नशीब तेव्हा मागे कोणतीहि गाडी नव्हती. नाही तर काही खरं नव्हतं. असो... तुषारने उठून त्याची गाडी बाजूला घेतली. मी हि तो पर्यंत गाडीचं इंजिन बंद करून गाडी उचलण्याचा प्रयत्न करत होतो. तळ हाताला खर्चटलं होतं बाकी काही विशेष लागलं नव्हतं. गाडीला लेगगार्ड असल्याचा फायदा झाला (पाय वाचले होते). तो परत येई पर्यंत जाणारी येणारी वाहन काही झालच नाही, अशा तोर्यात निघून जात होती. तुषार आणि मी दोघांनी मिळून माझी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. तोंड-हात धुतले, पाणी प्यायलो, दोनीही गाड्यांना काही झालं का? ते पाहिलं आणि तिथेच १०-१५ मिनिटे थांबलो. सगळकाही नॉर्मल झाल्यावर तिथून निघालो आणि पुढे एके ठिकाणी चहासाठी पुन्हा थांबलो. चहा घेतला, थोडा आराम केला आणि पुढे निघालो. आता गाडी जास्तच लक्षपूर्वक चालवत होतो. बराच वेळ वळणा वळणाच्या रस्त्यावर गाडी हाकून झाल्यावर एके ठिकाणी छोटं धारण ओलांडून
पुढे गेलो. थोडंसं वर चढल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो.
या बाजूने धरणाचा नजारा छान दिसत होता. पुन्हा १० - १५ मिनिटे आराम केला आणि निघालो. संध्याकाळचे ४ वाजले असतील. सकाळ पासून अनुभवलेला रस्ता बघून मनालीला पोहोचायला रात्र होणार हे निश्चित होतं. पण मनाने निर्धार केला होता, काहीही झालं तरी मनाली मुक्काम चुकवायचा नाही. कारण तो चुकला तर आधीच चुकलेली गणितं आणखीनच चुकणार होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदी बरोबर आमचा प्रवास सुरूच होता. जाता जाता एके ठिकाणी भोगदा आला. लांबीने साधारण २-२.५ km पण रुंदी ने तसा लहानच होता. पुढे चाललेल्या मोठ्या गाडीला ओवरटेक करायला सुद्धा जागा नव्हती. भोगदा पार झाला आणि जगच बदलल्या सारखं वाटू लागलं.
मनाली लांब असून सुद्धा जवळ वाटू लागली. नदीच्या पाण्याचा खळखळाट वाढला. पाण्याचा तो अजब नादब्रह्म बराच वेळ आमच्या बरोबर होता. तो निसर्ग मनात साठवत हळू हळू पुढे जात होतो. थोडं पुढे गेल्यावर आधुन मधून लांब जाऊन जवळ येणारी नदी खूपच जवळ आली. इतकी कि कोणत्याही ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी लावून दोन पाऊलं पुढे टाकली कि नदीत उतरता येईल. बघता बघता कुलू पार केलं. ६.०० वाजून गेले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. ढग दाटून आले होते त्यामुळे जास्तच अंधारून आलं होतं. आता तर मनाली आलंच असं वाटू लागलं होतं. किती तरी वेळ आम्ही मनालीचा बोर्ड दिसण्याची वाट बघत होतो पण एकही बोर्ड दिसेल तर शप्पथ. रस्ता लहान झाला होता आणि ठिकठिकाणी दगड धोंड्यांचा होता. रस्त्याच्या दुतर्फा छोटी छोटी घरं, रेसोर्ट दिसायला सुरुवात झाली होती. आम्हाला वाटलं मनालीत पोहोचलो. मग एके ठिकाणी हॉटेल मध्ये रूमची चौकशी केली तेव्हा कळलं मनाली आणखी २० km आहे. आयला!!! आणखी अर्धा तास तरी सुट्टी नाही. जिथे थांबलो होतो तिथेच एक सफरचंदाच झाड दिसलं.
इतके दिवस सफरचंद फक्त फळाच्या गाडीवर सजवलेली पहिली होती. पहिल्यांदा ती झाडावर सजलेली पाहून जाम भारी वाटलं. लगेच फोटो काढून घेतला आणि पुढे निघालो. पाऊस पुन्हा सुरु झाला. सामान भिजू नये म्हणून लवकरात लवकर मनालीत पोहोचून हॉटेल शोधणे गरजेचे होते. पुन्हा गाडी दामटायला सुरुवात केली. वरवर भिजलो पण अखेर मनालीत पोहोचलो. एक दोन हॉटेल बघून राहण्याची जागा निश्चित केली. सगळं व्यवस्थित आवरलं, घरी फोन करून सगळा रिपोर्ट देणे आणि रोजचा हिशोब करणे या नित्यनियम बनलेल्या दोन गोष्टी केल्या, गप्पा मारत मस्त जेवलो आणि झोपलो.
क्रमशः
अखेर मनालीत पोहोचलो. एक दोन हॉटेल बघून राहण्याची जागा निश्चित केली. सगळं व्यवस्थित आवरलं, घरी फोन करून सगळा रिपोर्ट देणे आणि रोजचा हिशोब करणे या नित्यनियम बनलेल्या दोन गोष्टी केल्या, गप्पा मारत मस्त जेवलो आणि झोपलो.
भरपूर आराम मिळाल्यामुळे सकाळी लवकर जाग आली. पाण्याचा आवाज येत होताच. आधी वाटलं कि अजूनही पाऊसच चालू आहे पण खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर शेजारून नदी वाहताना दिसली. पाण्याचा खळखळाट ऐकून आणि शेजारी असलेल्या डोंगरावरचा निसर्ग पाहून टवटवीत झालो.
खिडकितून बाहेर पहाताना...समोर डोंगर आणि पायथ्याशी खळखळाट करणारी नदी
पटापट सगळं आवरलं आणि हॉटेल सोडलं. नुसतं वाचून आणि ऐकून माहिती होतं कि इथून पुढचा प्रवास खडतर आणि आव्हानात्मक आहे. आता तो आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचा होता. मनाली पासून लेह पर्यंत, मधे तंडी सोडलं तर, कुठेही पेट्रोल पंप नाही हे माहिती होतं आणि तंडी, मनाली पासून फार काही लांब नाही हेही माहिती होतं म्हणून मग मनाली मधेच दोनीही गाड्यांमध्ये पेट्रोल फुल भरून घेतलं, शिवाय रिस्क नको म्हणून दोन कॅन मधे आणखी ५ -५ लिटर पेट्रोल घेतलं. आणखी एक महत्वचा घटक म्हणजे पैसे. लेह पर्यंत कोणत्याही बँकेची शाखा अथवा ATM नाही. अहो ज्या रस्त्यावर बऱ्याचश्या ठिकाणी गवताची कडी सुद्धा बघायला मिळत नाही, तिथे या गोष्टींची काय गत असेल. असो... दोन महत्वाची कामं झाली आणि आम्ही निघालो. पुढे गेल्यावर लक्षात आलं कि घरी फोन केला पाहिजे, कारण BSNL पोस्टपेड व्यतिरिक्त लेह पर्यंत इतर कोणतही कार्ड चालत नाही. लगेच थांबून घरी फोन लावला. १०-१५ मिनिटे बोलून झालं, त्यात बोलताना हे हि सांगून टाकलं कि आता जर मधे फोन नाही मिळाला तर थेट दोन दिवसांनतर "लेह" मधे पोहोचलो कि फोन करेन. दोनचार निसर्गाचे फोटो काढले आणि निघालो.
मनालीतून निघताना... वाहुन गेलेला पूल
तुषार...
छोटे छोटे आणि पांढरे शुभ्र धबधबे दिसायला लागले. आता कुठे निसर्गाच रूप हळूहळू उमलायला लागलं होतं आणि आम्ही हळू हळू समुद्र सपाटी पासून वर आणि मानवी जगा पासून लांब जायला लागलो होतो. जिकडे पाहू तिकडे त्याने...हो त्या निसर्गानेच सुंदर चित्र रेखाटलेलं दिसत होतं. आम्ही ते सगळं डोळ्यात साठवून पुढे पुढे मार्गक्रमण करत होतो. आता प्रवास आरामात करायचा होता, काही घाई नव्हती. वाट्टेल तिथे थांबत होतो, मनमुराद आनंद घेत होतो आणि पुढे जात होतो.
घाट रस्ता.
मी...
अवाढव्य डोंगर... ट्रक शोधा बरं....
रोहतांग पास (उंची 3,979 मीटर, 13,054 फुट) अजून लांब होता. पण त्याच्या अलीकडेच पावसाचा आणखी एक रंग पाहायला मिळाला. रंग म्हणण्या पेक्षा पाऊस आपल्याला आणखी एका प्रकारे कसा गंडवू शकतो ते पाहायला मिळालं. रोहतांग पासच्या १०-१५ km अलीकडे, रात्री धो-धो पाऊस पडून गेला होता. त्यामुळे आधीच नसलेला रस्ता अगदीच खराब झाला होता. जिकडे तिकडे चिखलच चिखल. रस्त्यावर १ - १.२५ फुट चिखल आणि त्यातून बुलेट सकट वाट काढणारे आम्ही दोघे. आम्ही तसे बरेच वर गेलो होतो, इतके कि आजू बाजूला ढग होते. ढगांमुळे हवेत गारवा होता, पण गारवा असून सुद्धा, ते धूड सांभाळून सांभाळून आम्ही दोघेही घामेघूम झालो होतो. एखादा ट्रक अधून मधून आमच्या बाजूने निघून जायचा. असेच मोठी वाहने जाऊन जाऊन जो रस्ता तयार झाला होता त्यातून कसेबसे पुढे (अक्षरश:) रांगत होतो. बुलेट वर बसून जायचं तर सोडाच. खाली उतरून, गाडी चालू करून, गियर मध्ये टाकून तिला आणि स्वतःला पुढे ढकलत होतो. ५ - १० मिनिटाला थांबत होतो. जिथे जमीन (रस्ता नव्हे) थोडी कडक असेल, तिथे गाडीवर बसायचं, नसेल तिथे खाली उतरून ढकलत जायचं. असं सारखच चालू होतं. इतक्यात एक फिरंगी जोडपं, एकाच बुलेटवर वरून येताना दिसलं. आमच्या जवळ आल्यावर ते थांबले. आम्ही एकमेकांना पहिला प्रश्न विचारला......बाबारे !!! आणखी किती वेळ असाच रस्ता आहे ? मी सांगितलं २-३ km असेल अजून, मग निवांत जा. त्याचं पण तेच उत्तर आलं, "अजून किमान ३-४ km तरी असेल, नंतर एकदम चकाचक रस्ता आहे". आणखी ३-४ km ऐकून काय म्हणावं तेच कळेना? कुठून बुद्धी सुचली आणि इकडे आलो असं वाटायला लागलं. वजन पेलून पेलून खांदे भरून आले होते. एकदा तर असं वाटलं, जाऊदे, मरुदेत...इथेच बसून राहू, जो पर्यंत रस्ता नीट होत नाही. मधे मधे BRO (Border Road Organisation) वाले रस्ता दुरुस्त करताना दिसत होते. पुन्हा पाऊस पडला कि सगळी मेहनत वाया जाणार हे माहिती असून सुद्धा तिथल्या लोकांसाठी, पर्यटकांसाठी ते अथक परिश्रम घेत होते आणि पुढेही घेत राहणार होते. असो... एके ठिकाणी तर मला त्यांनी मोलाचा सल्ला पण दिला. मी आपला गाडीवर बसून जाता यावं म्हणून कडे कडेने (दरीच्या) जात होतो. तिथे जमीन थोडी कडक होती म्हणून, पण अचानक एके ठिकाणी रस्ता खचला असल्यमुळे पुढे जाता येईना. गाडीवरून खाली उतरलो आणि काय करावं हा विचार करत होतो. तुषार अजून मागेच होता. तो तिकडे अडकल्यामुळे त्याने माझ्या मदतीला येणे शक्यच नव्हते. मागे फिरायचा पर्याय पण नव्हता. एकच पर्याय होता, गाडी चिखलात घालणे. पण ते तरी कुठे जमत होतं. आधीच हात पाय दुखत होते, त्यात दरीच्या कडेचा भाग उंच, ज्याच्यावर मी गाडी सकट उभा, एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला गाडीच्या पलीकडे फुटभर चिखल. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गत झाली. तेव्हाच ते BRO वाले देवा सारखे धावून आले. त्यांनी गाडी ढकलायला मदत केली आणि मी चिखलात उतरलो. जाता जाता एक जण सांगून गेला. "काहीहि झालं तरी दरीच्या कडेने जाऊन नका, फुकट पडून मराल. त्या पेक्षा मधून जा, चिखलातून, काही होणार नाही". हे ऐकल्यावर पुन्हा काय मी गाडी कडेला न्यायची डेरिंग केली नाय. असाच एके ठिकाणी आराम करायला थांबलो होतो, तेव्हा आणखी एक जण वरून खाली ट्रेक करत उतरत होता. तो आमच्या जवळ आला आणि
इसम: मी मेकॅनिक आहे. आत्ताच एकाची क्लच प्लेट बदलून येतोय. तुम्हाला काही मदत हवी आहे का ?
मी: नको रे बाबा, अजून तरी गाडी धडधाकट आहे. काही प्रोब्लेम नाही.
इसम: तुम्हाला या चिखलातून गाडी काढून देऊ का ?
मी (मनात): तुला पैसे देऊन गाडी इथून बाहेर काढायची असती तर इथे कशाला मारायला आलो असतो. जा निवांत तू खाली.
मी: नको आम्ही जाऊ जमेल तसं.
इसम: हे घ्या माझं कार्ड!. काही लागलं तर फोन करा.
मी (मनात): तुला फोन लावायला नेटवर्क तर हवं ना !!!
मी: बरं!!!
तो कार्ड देऊन झपझप खालच्या प्रवासाला लागला आणि आम्ही वरच्या प्रवासाला. कधी गाडीवर, कधी चालत असं जवळ पास ७-८ km हा खेळ चालू होता. तो पट्टा ओलांडून जायला आम्हाला २.५ ते ३ तास लागले.
चिखलमय..
चिखलमय...
वाटसरु मी.
हि वाट दुर जाते.. स्वप्नातल्या गावा......
BRO कामगार.......
पुढे मग रस्ता चांगला लागला आणि आम्ही एके ठिकाणी थांबलो. जेव्हा त्या भंगार रस्त्यावर होतो, तेव्हा चीखलात लपलेल्या दगडांचा अंदाज न आल्याने गाडीच्या इंजिनला आणि सायलेन्सरला बऱ्याच वेळा मार लागला होता. पण दर वेळेस थांबून ते बघणं जीवावर यायचं म्हणून मग असं निवांत थांबल्यावर सगळं पुन्हा चेक केलं. फार काही विशेष झालं नाहीये समजल्यावर जीव भांड्यात पडला. फक्त एका कॅन मधून पेट्रोल हळू हळू गळतय हे लक्षात आलं. नक्की कुठून ते काही कळलं नाही. दोनीही गाड्यांमध्ये भरपूर पेट्रोल आणि दुसरा कॅन होता, तो अर्धा भरलेला, त्यामुळे त्यात पेट्रोल टाकून हेन्काळून सांडणार म्हणून मग पहिला कॅन रिकामा पण करता येईना. थोडं पेट्रोल चांगल्या कॅन मधे टाकलं आणि बाकी तसच घेऊन जायचं ठरलं. म्हंटल गाडीत टाकू अजून थोडं पुढे गेल्यावर. मग थोडा वेळ गप्पा मारत बसलो. बोलताना तुषारने सांगितल कि येताना तो एका मोठ्या दगडावर गाडी सकट चढला होता, पण नशीब चांगलं म्हणून फार काही न होता गाडी खाली घेऊन सुखरूप आला. हे नंतर ऐकायला छान वाटलं पण त्याने जे काही त्या वेळेला अनुभवलं ते त्याचं त्यालाच माहिती. सकाळी निघाल्या पासून काही खाल्लं नव्हतं आणि एवढी मेहनत केल्यावर भूक पण खूप लागली होती. मग अशा अडनानिड वेळी उपयोगी पडेल म्हणून तुषारने आणलेल्या सुक्यामेव्यावर ताव मारला. अर्धा तास घालवला आणि पुढे निघालो. पुढचा रस्ता लई म्हणजे लईच भारी होता. आता वर्णन करण्यापेक्षा फोटोच बघा.
वातावरणात बदल....
सगळं डोळ्यात आणि मनात साठवून आम्ही पुढे जात होतो. दोघेही थोड्या फार अंतराने मागे पुढे रहात होतो. पेट्रोल कॅनच हेन्काळणं थांबलं होतं, पण पेट्रोल तरीही बाहेर येतच होतं. एकतर पेट्रोल मिळण्याचे वांदे आणि हे भरभर उडून गेलं तर जायचं कसं ? शेवटी एके ठिकाणी थांबलो आणि तो गळका कॅन दोनीही गाड्यांमध्ये रिकामा केला तेव्हा कुठे बरं वाटलं. प्रवास मस्त चालू होता. कधी एखादि जागा आवडली म्हणून तो थांबायचा, कधी मी थांबायचो आणि कधी आम्ही दोघेही थांबायचो. सकाळी झाली तेवढी गडबड, धडधड पुरे नव्हती कि काय, कि आणखी एक घोळ माझ्यासाठी झाला. एकदा मी फोटो काढायसाठी थांबलो आणि हा गेला पुढे निघून. फोटो काढून झाल्यावर मीहि मागोमाग आलो आणि एके ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटले तिथे थांबलो. आमचे महाशय कसलीही खुण मागे न सोडता कोणत्या रस्त्याने गेले याचा काहीच पत्ता लागत नव्हता. आजू-बाजूला दऱ्या डोंगरांशिवाय काहीच नाही. बरं सावलीला तिथे एक झाड सुद्धा नाही. न कोई आगे , न कोई पिछे, १०-१५ मिनिटे एकटाच त्या जागी थांबलो होतो. कुठून जावं हा विचार करत बसलो. तेव्हा मागून एक गाडी आली. त्यांना हात करून थांबवलं.
मी: केलोंगचा को कहाँ से जानेका ?.
ड्रायवर: कौनसा भी रस्ता ले लो. दोनो उधरही जाता है !
मी (मनात): झाली का पंचाईत? आमचे साहेब कुठून गेलेत कुणास ठाऊक ?
मी: कौनसा रस्ता से ज्यादा गाडी जाती है ?
ड्रायवर एका फाट्या कडे बोट दाखवून, दुसऱ्या फाट्याने निघून गेला. आयला मला एक रस्ता सांगतोय आणि स्वतः दुसऱ्या रस्त्याने जातोय. पुन्हा तिथे १० मिनिट थांबलो. मागून एक ट्रक आला आणि ड्रायवर ने दाखवलेल्या रस्त्याला वळला.
मग काय आधीच्या आणि ह्या दोनीही ड्रायवर विश्वास ठेवून ट्रक गेला त्या दिशेने पुढे जायला सुरुवात केली. म्हंटल बघू हा शहाणा (तुषार) भेटला तर ठीक नाही तर संध्याकाळी सापडेलच, जातोय कुठे या वाळवंटात? धुळीने माखलं जाऊ नये म्हणून पटकन ट्रकला ओवरटेक केलं आणि पुढे गेलो. रस्त्यात तो(तुषार) दिसतोय का बघत होतो आणि फाट्यावर थांबला नाही म्हणून शिव्या घालत होतो. बराच पुढे गेल्यावर बंधू एके ठिकाणी फोटो काढताना दिसले तेव्हा कुठे जीवात जीव आला. त्याच्या जवळ गेलो, थांबलो, चार शिव्या घातल्या आणि सोबत चार फोटो काढले. पुन्हा अस काही करायचं नाही हे बजावलं आणि पुढे निघालो. एकदा थांबून पुन्हा पेट्रोल भरण्याचा कार्यक्रम झाला. दुसरा कॅन पण रिकामा केला आणि पेट्रोल उडून जाण्याची काळजी मिटली. सकाळी निघाल्यापासून सुक्यामेव्या शिवाय काही खाल्लं नव्हतं, हॉटेलचा तर पत्ताच नव्हता. साधारण दोन वाजता एक गाव दिसलं. गाव कसलं १५-२० कुटुंब रहात असतील एवढेच लोक. पण महत्वाचं कारण तिथे हॉटेल, ढाबा काहीही म्हणा ते होतं. मेनू ठरलेलाच. मिक्स डाळीची उसळ, पोळी, भात आणि वरण. पोटभर जेवलो आणि जेवण झालं कि चहा प्यायला. ते गाव दरीत होतं, त्यामुळे उन असून सुद्धा हवेत गारवा होता आणि गार वातावरणात गरम गरम चहा पिण्यात काय मजा असते ते सांगायलाच नको. थोडा आराम केला आणि पुढे निघालो.
पुन्हा तेच चालू. हवे तिथे थांबणे आणि निसर्गाचा आनंद लुटणे. असेच पुढे जाताना एके ठिकाणी आम्हाला रस्त्यावर ओढा लागला. रस्त्यावरून थंडगार पाणी वहात होतं. वाचून आणि फोटो पाहून माहिती होतं कि लेहला जाताना खूप ओढे ओलांडावे लागतात आणि हा आमच्यासाठी पहिला होता. पुढेहि खूप ओलांडले, त्यातल्या त्यात हा बऱ्या पैकी चांगल्या रस्त्यावर होता. थोडक्यात ओढा चांगल्या रस्त्यावरून वाहत होता तरीही तुषारने खाली उतरून ओढा ओलांडण्यात काही अडचण आहे का आणि कुठून कसं जायचं ते पाहिलं. मग तो आधी गेला आणि त्याने क्रोस केल्यावर मी हि त्याच वाटने चाकावर चक (पायावर पाय सारखं) ठेवून गेलो.
आधी वाटलं बर्फ आहे...पण झुम करुन पहिलं तर पाणी वहात होतं...
पांढर्या पायघड्या...
हिला विसरुन कसं चालेल.
खळखळाट....
केलोंगची वेस...
पुन्हा उतरणे...
पुढे तंडी आलं. तंडी म्हणजे शेवटचा पेट्रोल पंप. म्हंटल बसेल तेवढं पेट्रोल भरू आणि जाऊ पुढे. सोपस्कार म्हणून जेमतेम पेट्रोल भरलं आणि पुढे दवडू लागलो. बघता बघता केलोंग मागे पडलं. पुढे जीस्पाला थांबायच ठरवलं होतं. जीस्पा जवळ पोहोचायला आम्हाला सहा वाजले. केलोंग पासून पुढे जीस्पा पर्यंत रस्ता काही ठिकाणी सोडला तर एकदम चकाचक होता. दिवस मावळला नव्हता पण पुन्हा एकदा अंधारून आलं. दुसरं काय असणार, पावसाचं लक्षण. देवाचा धावा सुरु केला. दिवसाच्या शेवटी भिजायची अजिबात इच्छा नव्हती. जीस्पात पोहोचलो तेव्हा थेंब पडायला सुरुवात झाली. जर्किन, हेल्मेट, बूट होते त्यामुळे बाकी कुठे काही जाणवत नव्हतं पण हातात हातमोजे (काहींसाठी ग्लोव्ज) घातले नव्हते. बोटं सुन्न करून टाकली त्यांनी, एवढे थंड होते ते थेंब. पावसा पासून वाचावं, पटकन निवारा मिळावा म्हणून एका हॉटेल मध्ये घुसलो. पोराने गरजू व्यक्तींना ताडले होते आणि एक रूमचा १२०० भाव सांगून अडून राहिला. घासाघीस केली पण पठ्या मानायला तयार नव्हता. मग काय त्याला भिक न घालता तिथून निघालो आणि पुढे गेलो. थंड थेंब थेंब पाऊस सुरु होताच पण आम्हाला भिजवेल एवढा नव्हता. पुढे HPTDC (आपल्या MTDC सारखं) दिसलं. ५०० रुपये भाडं. काहीही आढेवेढे न घेता रूम बुक केली आणि पटकन सामान सोडून आत घेऊन गेलो. जाता जाता तिथल्या माणसाकडे जेवणाची चौकशी करून ठेवली. दुर्गम भाग असल्यामुळे हॉटेल जास्त वेळ चालू ठेवत नाही असं कळल. सगळं काही पटापट आवरायला घेतलं. आवरत असताना पाऊस भूर भूर सुरु झाला आणि आवरून झालं तरी तो पडतच होता. तो उघडण्याची वाट पाहत बसलो. चांगला तासभर बरसून झाल्यावर त्याने विश्रांती घेतली. मग आम्ही बाहेर पडलो, हॉटेलवाल्याने आमच्यासाठी हॉटेल चालू ठेवलं होतं. मॅगी आणि ब्रेड ओम्लेट शिवाय काही पर्याय नव्हता. मॅगीची ओर्डर दिली आणि बसलो गप्पा मारत. स्वतःच्या फोन वरून घरी फोन लावण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न झाल्यावर हॉटेल वाल्याचा फोन वापरला, सुखरूप असल्याची आणि इतर माहिती दिली. तिकडे फक्त आणि फक्त BSNL पोस्टपेड चालतं हे लक्षात ठेवावे. असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो.
क्रमश:
असो.... गरम गरम, चटपटीत मॅगी खाऊन थोडा वेळ बसल्यावर हॉटेलवाल्याचा निरोप घेतला आणि आम्ही दोघे रूमवर आलो. सगळा हिशोब केला आणि नव्या दिवसाची नवी सफर करण्यासाठी झोपी गेलो.
सकाळी लवकर ५.३० लाच उठलो. रात्री झोपताना लाईट जी गेली होती ती परत आलीच नव्हती. लाईट गेली म्हणून झोपताना एक मोठ्ठा स्क्रूड्रायवर आणि हातोडी जवळ घेऊन झोपलो होतो. तुषारने पण जवळ हातोडी ठेवली होती. बरोबर आणलेल्या सामानाचा असा नाही तर तसा उपयोग. एक तर दुर्गम भाग, कधी कोण येऊन काय करेल याचा नेम नाही. रात्री एकदा जाग आली तेव्हा सगळं समान जाग्यावर असल्याची खात्री केली आणि पुन्हा निर्धास्त झोपलो. सकाळी उठल्यावर पटापट सगळं आवरलं आणि रखवालदाराला निघण्यासाठी सांगावा धाडला. तो आला तेव्हा सगळा हिशोब केला आणि ६.३०ला निघालो. सुर्यनारायणाने सगळीकडे वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. सकाळची कोवळी किरणे अंगावर घेण्याची खूप इच्छा होती पण गारवा इतका होता कि ती इच्छाच रहिली. निर्सर्गाच कोवळं रूप मनात आणि कॅमेऱ्यात साठवून पुढे पुढे जात होतो. सकाळी सकाळी आमच्या सोबतीला HPSTC (हिमाचलच महामंडळ) बरोबर होतं. कधी ते पुढे कधी आम्ही पुढे असा खेळ चालू होता. अर्थात आम्ही जेव्हा कुठे थांबू तेव्हाच त्यांना पुढे जाण्याची संधी मिळायची.
१. निघण्याची तयारी.
२. इन्स्पेक्टर तुषार.
३. वरती उन्हाची सोनेरी झाक, डोंगर आणखी ऊंच आहे.
४.
५.
६. रस्त्यावरील आणखी एक ओढा.
७. बार्लाचालाला आराम.
जे आदल्यादिवशी केलं तेच चालू होतं. हवं तिथे थांबणे आणि डोळे भरून सगळं पहाणे. गाडीचा काहीही त्रास नव्हता. फक्त काही काही वेळा वेग कमी केला कि बंद पडत होती. कारण होतं हवेतील ऑक्सिजनची कमतरता. जसे जसे आपण वर जातो तस तस ते प्रमाण कमी होत जातं. मग एके ठिकाणी थांबून, तुषारने दोनीही गाड्यांचा एयर इन्टेक वाढवला. मग लागल्या एकदम डौलात चालायला. तुषार म्हणाला काल रोहतांगलाच हे करायला हवा होतं. तिथेहि मधे मधे गाडी बंद पडण्याचा जो त्रास झाला तो झाला नसता. असो...आता आलं ना लक्षात!!! झालं तर मग. प्रवास मजेत चालू होता. कधी बार्लाचाला आलं कळलच नाही. महामंडळ आमच्या आधीच येउन थांबलं होतं. नाष्ट्याचा स्टॉप आला म्हणजे नाष्टा हा केलाच पाहिजे. दोनच पर्याय उपलब्ध होते. ब्रेड ऑम्लेट आणि मॅगी. त्यातला मला एकच मॅगीचा पर्याय होता. मग काय मी हाणलं पोटभर मॅगी आणि तुषारने ब्रेड ऑम्लेट. टाकी फुल झाली. गाडीची टाकी फुल करण्याचा प्रश्नच नव्हता. महामंडळात प्रवास करणारे जवळपास सगळेच पर्यटक होते. एका ग्रुप बरोबर गप्पा सुरु झाल्या. आम्ही सरावलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आणि इतर गप्पा झाल्या. 'लेह'च्या जवळ पास हिंडायच असेल तर परवानगी घ्यावी लागते हे माहितच होतं. शिवाय 'लेह' मधलं ते कार्यालय, जिथे परवाना मिळतो ते शनिवारी अर्धवेळ आणि रविवारी पूर्णवेळ बंद असतं. आजचा दिवस होता शुक्रवारचा. महामंडळ त्याच दिवशी 'लेह'ला पोहोचणार होतं आणि आम्ही शनिवारी पोहोचणार होतो म्हणून मग परवान्यासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही एकाला दिली आणि परवाना काढण्यासाठी सांगितलं. ते पुढे निघून गेले. आम्ही राहिलो मागे. निवांत आराम करून निघालो. आता पुढे शब्दात वर्णन करण्यापेक्षा फोटोच बघा..
८.
९.
१०.
११.
१२. तुषार.
१३. रस्त्याचं काम चालु होतं...मुरुमावरुन गेलो.
१४.
१५.
सगळं काही मनात साठवत पुढे पुढे जात होतो. आजही तो रस्ता, तो निसर्ग डोळ्या समोर उभा असल्यासारखा भासतो इतका तो भिनला आहे. तर पहाता पहाता आम्ही 'सरचू' (एक छोटंसं गाव) क्रॉस केलं आणि गाटा लुप्सच्या पायथ्याशी आलो. एक एक वळण घेत वर चढत होतो. मधेच एके ठिकाणी आमचे साहेब थांबले. फोटो वगैरे काढून झाल्यावर निघताना चांगला रस्ता सोडून आमच्या साहेबांना शॉर्टकट मारण्याची हुक्की आली. मी नको म्हणत असताना सुद्धा गडी घुसला मातीच्या रस्त्या मधे. मग मी हि घुसलो, दुसरं काय करणार ?, ठरवून जे आलो होतो!!! काहीही झालं तरी जिकडे जायचं तिकडे बरोबर जायचं. थोडंच वर गेल्यावर गाडी मातीत घुसायला लागली. चालवता चालवताच तुषार खाली उतरला आणि चालू गाडी (पहिल्या गियर मधे) ढकलू लागला. अखेर तो दमला आणि थांबला. तो थांबला होता त्याच्या बाजूनेच मी पुढे वर गेलो पण एके ठिकाणी मलाहि तेच करावं लागलं. खाली उतरून गाडी ढकलू लागलो. टायर मातीत गेल्यामुळे दिसतही नव्हता. मी पण दमलो आणि थांबलो. आम्ही होतो १४००० - १४५०० हजार फुटावर. दम लागण्याचा मुख्य कारण होतं हवे मधील प्राणवायूची कमतरता आणि आम्ही त्या परीस्थितीत केलेले नाहक परिश्रम. १५-२० फुटाच्या अंतराने आम्ही दोघेही थांबलो होतो. ते सुद्धा जमिनीला ५० - ६० अंश कोनात मातीत फसलेली गाडी धरून. सगळी माती भुसभुशीत असल्यामुळे गाडी स्टँडलाही लावता येत नव्हती. इतक्यात महामंडळ चांगल्या रस्त्याने आमच्या पुढे गेलं. आम्ही ५ मिनिटे दम खाल्ला आणि पुन्हा प्रयत्न चालू केला. पहिल्याच प्रयत्नात तुषारने पूर्ण ताकद लावली आणि कसेबसे माझ्या शेजारून गाडी ढकलत ढकलत वर गेला. वर गेल्यावर गाडी लावली आणि डोकं धरून बसला. त्याच डोकं दुखायला लागलं होतं. मला सांगितलं त्याने, पण मी काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो. माझी गाडी काही केल्या हलायला तयार नव्हती. कारण मागच्या चाकाच्या पुढे माती मधे एक न दिसणारा पण जाणवणारा मोठ्ठा दगड होता. धड मला गाडी पुढे नेता येत नव्हती आणि बाजूला ओढताहि येत नव्हती. खाली परत उलटं जाणे म्हणजे गाडीबरोबर गडगडत जाणे अशी परिस्थिती होती. वरून तो म्हणाला थांब १० - १५ मिनिटे. बर वाटलं कि मी येतो तिथे. पुन्हा थांबलो. कालच्या सारखे खांदे भरून आले होते. थोडा वेळ गेल्यावर तो खाली आला. स्टार्टर मारला आणि गाडी चालू केली. जर गाडीला बटन स्टार्टर नसता तर?? बापरे!!! दुसऱ्या बाजूने किक मारायला तिसरा जण कुठून आणणार होतो आम्ही.....जाऊदेत कल्पना पण नको त्याची. मग तो मागून आणि मी बाजूने अशी चालू गाडी ढकलत वर नेली. माझही डोकं दुखायला लागलं होतं पण तीव्रता त्याच्या इतकी नव्हती, कमी होती. पुन्हा आम्ही १५ मिनिटे थांबलो. आराम केला, जरा बर वाटायला लागलं म्हणून मग निघालो. तुषारच डोकं दुखायचं थांबलं नव्हतच. ती फक्त पुढे काय होणार याची चाहूल होती. प्रवास सुरु झाला. १५-२० मिनिटे गाडी चालवल्यावर पुन्हा थांबलो. त्याने ग्लुकोस घेतलं, गोळी घेतली. मग थोडा आराम केला आणि निघालो. मी पुढे पुढे जात होतो मागे वळून पाहतो तर तुषार मागे नाही. लगेच थांबलो. आमचा हिरो कुठे दिसतोय का पाहू लागलो. डोंगरावरील रस्ते दिसत होते. परत जावं अस वाटत असतानाच एक काळा ठिपका पुढे पुढे येताना दिसायला लागला. मधेच तो ठिपका थांबला. तो तुषार होता. तो का थांबलाय हे कळायला काहीच मार्ग नव्हता. कॅमेरा लेन्स मधून झूम करून पाहिलं तेव्हा कळलं कि त्याचा त्रास अजून गेला नाही. डोके दुखीने त्याला सोडलं नव्हतं. मग मी तो येई पर्यंत तिथेच थांबलो. बऱ्याच वेळाने तो आला. जेव्हा आला तेव्हा त्याला बर वाटतंय असं दिसत होतं. पुढच्या प्रवासाचा आमचा वेग मंदावला. हळू हळू पुढे जायला लागलो. आम्ही मारलेला शॉर्टकट खूप महागात पडला होता.
१६. गाटा लूप्स
१७.
१८. आम्ही मारलेला शॉर्टकट.
१९. वरती डाव्या कोपर्यात तुषार.
२०. झुम करुन पहिलं, तेव्हाचा तुषार.
२१. वाट बघत थांबलेलो ति जागा.
२२. थोडा आराम.
'लाचुलुंगला' पास केला आणि 'पांग'ला पोहोचलो. बघतो तर तिथे महामंडळ थांबलेलं होतच पण आम्ही पोहोचताच ते पुढे निघाले. आम्ही चहा प्यायला, १०-१५ मिनिटे थांबलो आणि निघालो. मानालीतून निघाल्या नंतर, जीस्पा पहिला तर 'पांग' हा बऱ्याच जणांचा दुसरा मुक्काम असतो पण आम्ही तिथे दुपारी २.०० लाच पोहोचलो होतो. मी एका मित्राला (जो आधी येउन गेला होता) विचारून ठेवलं होतं त्याच दिवशी पुढे 'उप्शी'ला पोहोचण्याबद्दल बद्दल आणि त्याने आरामात पोहोचाल असं सांगितलं होतं. तुषारला काही त्रास होत नव्हता म्हणून मग पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 'पांग' सोडलं कि पुढे लागातात 'मूर प्लेन्स ' (उंची साधारण १५५०० फुट). एक लांब आणि भरपूर रुंद पठार. त्या पठारावर काही ठिकाणी आहे काळा डांबराचा पट्टा आणि बाकी ठिकाणी कच्चा रस्ता ज्याचा काही उपयोग नाही. जेव्हा आपण 'मूर प्लेन्स' वर गाडी चालवतो तेव्हा ध्येय फक्त एकच असतं. समोर दिसणारा डोंगर पायथा. अख्या पठारावर तुम्हाला वाट्टेल तिथून वाट्टेल तशी गाडी चालवायची मुभा असते. जेव्हा आम्ही 'मूर प्लेन्स' ओलांडायला सुरुवात केली तेव्हा १५ km वगैरे एकदम चांगला रस्ता होता, अशा वेळेला आधीच एवढे दगड धोंडे खाल्यावर उगाच दगड धोंड्यातून कोण जाईल ? मस्त सुसाट गेलो तेवढा रस्ता, पण नंतर रस्ता संपला आणि सुरु झाला रस्ता शोधण्याचा खेळ. रेफरन्ससाठी होता मधोमध असलेला निरुपयोगी कच्चा रस्ता आणि इतरत्र आधी गेलेल्या वाहनांच्या टायरचे ठसे. पठारावर बरीच झुडुपं आणि भुसभुशीत माती होती. झुडूपांमधून वाट काढत काढत आम्ही पुढे जात होतो. मातीत दोनीही चाकं रुतायची पण तसेच पुढे गाडी दामटत होतो. एव्हाना अशा प्रदेशात गाडी चालवायला सरावलो होतो. कधी खाली उतरून गाडी ढकलायची, कधी रस्ता चुकला (चुकला म्हणजे पुढे जाण्यास जागा नसायची) आणि अडकलो कि पुन्हा थोडं मागे जाऊन नवीन रस्त्याने पुढे जायचं असं चालू होतं. डोंगर माथ्यावर पाणी भरलेल्या ढगांनी गर्दी केलेली दिसत होती. पावसाचा सावट जाणवू लागलं. पण तो नुसतीच हूल देत होता, बरसत नव्हता.
२३.
२४.
२५.
२६.
२७.
२८.पांग, इथे 'फक्त' टेंट मधे रहाण्याची सोय आहे.
२९.
३०.छोटासा पुल, एकच ट्रक कसाबसा जाईल.
३१. निसर्गाची किमया.
३२. निसर्गाची किमया.
३३.
३४.
३५. ह्या खाली पडत नाहित.
३६.
३७. 'मुर प्लेन्स'ची सुरुवात.
३८.
३९.झुडुपातुन रस्ता काढताना.
४०. धुळलेलो मळलेलो.
४१.
४२.
मजेत डोंगर पायथ्याजवळ पोहोचलो आणि पुन्हा तुषारला डोकं दुखायचा त्रास सुरु झाला. काय करावं ते कळेना? आम्ही बरेच पुढे आलो होतो त्यामुळे मागेहि जाता येईना. पुढेच जात रहाणे हा एकच पर्याय होता. पुढे जे पाहिलं गाव लागेल तिथे थांबायचं ठरवलं. डोंगर चढून पुन्हा तो उतरल्या नंतर मग गाव मिळण्याची अशा होती. घाट चढायला सुरुवात केली. आमचा वेग खूपच कमी झाला होता. तसही रस्ता नावाचा प्रकार नव्हताच. होते फक्त दगड, धोंडे आणि मुरूम. हळू हळू पुढे जात होतो. मधे मधे BRO कामगार दिसायचे. त्यातल्याच एकाला थांबून विचारलं तर म्हणाला डोंगर उतरलात कि आहेत दोन तीन छोटी गावं, किती लांब विचारलं तर उत्तर आलं इथून टांगलांगला टॉप (१७५०० फुट) ६ km आणि तिथून पुढे खाली १५ km. मी ते उत्तर जसंच्या तसं तुषारला सांगितलं. टांगलांगला टॉप आम्हाला दिसतच होता.
आम्हाला लवकरात लवकर जवळचं गाव गाठणे आणि मुक्काम ठोकणे एवढच लक्ष होतं. जगातला दुसरा सर्वात उंच रस्ता आल्यावर आम्ही थांबलो. पाहतो तर 'रुम्त्से' (डोंगर पायथ्याच गाव) आणखी २८ km. ते वाचून तुषारच अवसानच गळालं. पुढे
तुषार: मी इथून पुढे गाडी चालवू शकत नाही. इथे पर्यंतच कसा आलोय ते माझं मला माहिती.
मी: अजून थोडा धीरधर. आता डोंगर उतार आहे. जस जसं खाली जाऊ तस तसं बरं वाटेल तुला.
तुषार: आजची रात्र इथेच राहू, उद्या सकाळी जाऊ.
मी: शक्यच नाही, अशा या आड जागी एक तर राहायचं नाही आणि इतक्या उंच तर नाहीच नाही. आधीच इथे ऑक्सीजनची कमतरता, त्यात आणखी काही व्हायला लागलं तर काय करणार ? खाली जाऊ, पाहिलं ठिकाण मिळेल तिथे थांबू.
४३. टांगलांगला
४४.
४५.
आणखीनही बरच काही बोलणं झालं पण आता आठवत नाही. शेवटी तुषार मला शिव्या घालत घालत खाली येण्यास तयार झाला आणि आम्ही निघालो. एक बरं होतं कि अंधार अजून झाला नव्हता. डोकेदुखीमुळे त्याचं डोकं ठिकाणावर नव्हत त्यामुळे त्याची बडबड चालू झाली. कुठून किती अंतर आहे याची आणखी तपशिला सकट माहिती का नाही काढली म्हणून माझ्या नावाने शंख चालू झाला होता. आणखीनही बरीच मुक्ताफळं उधळायला सुरुवात झाली. त्याच्या प्रत्येक वाक्यावर माझं एकच वाक्य ठरलेलं होतं. "तू आधी खाली चल, रूमवर गेलं कि काय शिव्या घालायच्या तेवढ्या घाल पण थांबू नकोस". शक्य तितकं त्याला दरीच्या कडेला न ठेवता आतून गाडी चालवायला सांगत होतो आणि स्वतः दरीच्या बाजूने गाडी चालवत होतो. जेणे करून काही गडबड होऊ नये. एकदा तर हा थांबलाच आणि पुन्हा तेच चालू झालं. इतक्या लांब आलो, अजून काही पाहिलं नाही.. सविस्तर आठवत नाही आता पण एक ना अनेक गोष्टींची उजळणी करत बसला . अगदी कि पार मारामारी करतो कि काय अशी वेळ आली. मला त्याचा त्रास दिसत होता पण त्याला खाली सुखरूप घेऊन जाणे एवढी एकच गोष्ट साधायची होती म्हणून मग माझा ठरलेलं वाक्य मी पुन्हा पुन्हा त्याला ऐकवत होतो. कसेबसे आम्ही खाली 'रुम्त्से' मधे आलो. एक रेसोर्ट दिसला आणि आत घुसलो. रूम आहे का विचारून पुढे सगळं समान काढून रूम मधे घेऊन गेलो. पण तिकडचा संस्थापक आला आणि रूम बुक्ड आहे म्हणून सांगू लागला. मी आधी का नाही सांगितलं म्हणून भांडत होतो आणि रूम सोडायला तयार नव्हतो. शेवटी तुषार म्हणाला जाऊदेत सोड, पाहू दुसरी कडे. पुन्हा सगळं समान बांधलं आणि निघालो. पुढे ३-४ km गेल्यावर एक छोट्या घरात विचारपूस केली आणि दोन रूम घेतल्या. तुषारने वाटेतच येताना "आपण वेगळ्या रूम घेऊ" म्हणून फतवा जाहीर केला होता. मी नको म्हणालो पण माझा नाईलाज होता. त्याला काहीही करून सुखरूप खाली आणणे भाग होतं. थांबलो तेव्हा तुषार तापला होता. त्याचं अंग चांगलंच भाजत होतं. हॉटेल वजा घर असल्यामुळे, गरम पाणी आणि जेवणाची सोय होती. तो फ्रेश झाला आणि लगेच झोपला. मी जेवणाची ऑर्डर दिली आणि STD ची माहिती विचारून फोन करायला बाहेर पडलो. घरी फोन करून सुखारूप असल्याची महिती दिली आणि परत रूम वर आलो. थोडा वेळ थांबल्यावर जेवण तयार झालं. तुषारला जाऊन उठवलं. अंगात ताप होताच. घरी फोन करून खुशाली कळवायला सांगितलं. आधी नाही म्हणाला पण थोडा आग्रह केल्यावर तयार झाला. त्याने पण घरी फोन करून सुखरूप असल्याचं सांगितलं आणि आम्ही परत रूम वर आलो. आता तुषार बराच शांत झाला होता. डोक्यातला ताप उतरला होता पण अंगातला ताप अजून उतरायचा होता. शांतपणे जेवलो आणि तुषारच्या रूम मधे गेलो. औषध घेतलं (आम्ही लागतील म्हणून बरोबर आणलीच होती) आणि तो झोपला. मीहि मग झोपायला गेलो. तो निवांत झोपला पण मी मात्र मधून मधून रात्री दर एक तासाला उठून त्याच्या कडे येऊन ताप चेक करत होतो.
पहाटे चांगली झोप लागली पण लगेच सकाळ झाली. ७.०० वाजले तरी तुषार अजूनही झोपलाच होता पण तेव्हा ताप उतरला होता. थोड्या वेळाने उठला. आता साहेब चांगले ताजे तवाने आणि नॉर्मल झाले होते. थोड्या वेळाने बाहेर आलो तर उन्ह वर यायला लागली होती. पाहतो तर तुषार गायब आणि त्याची गाडी पण गायब. लगेच घर मालकाला विचारलं, तर म्हणाला नाही गेला अजून. मग आहे तर कुठे आहे? शोधाशोध करू लागलो. मला वाटलं हे बेनं आणखी रुसून खरच निघून गेलं कि काय पुढे? पण नाही, साहेब होते. मागच्या अंगणात गाडी धुवत होते. नळाला भरपूर पाणी (थंडगार) होतं. मग काय मी पण माझी गाडी धुवून घेतली. पुन्हा घरात आलो आणि गप्पा सुरु झाल्या. गप्पा मारताना आदल्या दिवसाचा विषय निघाला तेव्हा साहेबांनी "जे झालं ते चुकीचं झालं म्हणून कबुली दिली". मी तर ते तेव्हा हि मनावर घेतलं नव्हतं आणि पुढेही घेणार नव्हतो. असो...गप्पा मारताना, घर मालकाने दोन कंदमूळं आम्हला खायला आणून दिली. नाव विचारलं तर म्हणाला "शल्घम". बीटा सारखं दिसणारं ते पांढर कंदमूळ खात खात गप्पा झाल्या.
४६. शल्घम
घरून निघताना प्रवासाची जी आखणी केली होती तिचा पार बट्ट्याबोळ झाला होता. रोज नवीन आखणी करायची वेळ आली होती आणि हे सगळं करून आम्ही आज 'लेह' ला पोहोचणार होतो. आरामशीर सगळं आवरलं, नाष्टा केला आणि १२.०० - १२.३० ला निघालो. 'लेह' काही फार लांब राहिलं नव्हतं. छान दिवस उगवला होता. त्या रम्य दुपारी आणि तो रम्य निसर्ग बघत शक्य तितक्या जोरात आम्ही 'लेह' कडे धावत होतो. दोनीही बाजूला अवाढव्य डोंगर, मधे दरीतून वाहणारी नदी आणि नदीच्या शेजारील रस्त्यावरून धडधड करत जाणारे आम्ही दोघे. मनाली नंतर पुन्हा दोन दिवसांनी आम्हाला नदीची साथ लाभली होती. एकदम मस्त वाटत होतं. कधी एकदा 'लेह'ला पोहोचतो असे झाले होते. जाता जाता वाटेत आम्हाला MH १४ ची गाडी घेऊन एक तरुण थांबलेला दिसला. आम्ही पुढे गेलेलो पुन्हा मागे वळलो आणि त्याला जाऊन भेटलो. गाडी पंक्चर झाली म्हणून तो थांबला होता. मनाली कडे निघाला होता आणि गाडी ट्रक मध्ये टाकून नेण्यासाठी एखाद्या ट्रकची वाट बघत होता. त्याचा मित्र आधीच पुढे निघून गेला होता आणि हा एकटाच मागे राहिला होता. त्याला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आणि निघालो. हे असलं काही आमच्याबरोबर होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती आणि सगळीकडे एकत्रच प्रवास केला होता आणि करणार होतो. तिथून निघालो आणि रमत गमत 'लेह'ला पोहोचलो. का कुणास ठाऊक पण मनाली पासुन 'लेह' पर्यंतच्या प्रवासात 'लेह'कडे जाणारे आम्ही दोघेच होतो. जे कोणी फटफटीवाले आम्हाला दिसले ते सगळे उलट्या दिशेने मनालीकडे जाणारे होते. जेव्हा डोकं जाग्यावर नव्हतं तेव्हा तुषारने त्याच्यावरही विशेष टिप्पणी केली होती. कसे का असेना आम्ही 'लेह' मधे पोहोचणार होतो. नदीच्या कडेकडे ने, डोंगर दरीतुन अम्ही लेहला पोहोचलो. तिथे पोहोचलो तेव्हा काय वाटत होतं हे मला शब्दात सांगता येणार नाही. मस्त मार्केट मधे हिंडत हिंडत हॉटेल शोधलं आणि रूम बुक केली. आता पुढची घाई होती ती लवकरात लवकर परवानगी मिळवण्याची. आदल्या दिवशी ज्या हिरोला पावनागी काढण्यासाठी सांगितलं होतं त्याचा फोन लागत नव्हता म्हणून मग आम्हीच तडक 'लेह' कार्यालयात गेलो. जर परवानगी मिळाली नसती तर रविवारचा दिवस फुकट जाणार होता आणि ते आम्हाला नको होतं. ४.०० ला ते बंद होतं आणि आम्ही अगदी वेळेत ३.३० ला तिथे पोहोचलो. लगेच पैसे भरून ज्या ज्या प्रदेशात जायचय त्याची परवानगी काढली आणि परत आलो. भूक लागली होती म्हणून एका हॉटेल मध्ये गेलो. पंजाबी जेवण होतच (ते कुठे कधी नसतं का ?) पण आम्ही त्याला 'लेह' स्पेशल 'थूपा' आणायला सांगितलं. जिथे गेलोय तिथली स्पेशल डिश न खाऊन कसं चालेल? वेगवेगळ्या भाज्या आणि नुडल्स घातलेल्या थूपा वर मस्त ताव मारला आणि रूम वर गेलो.
४७.
४८.
४९.
५०.
फ्रेश झालो आणि पुन्हा हिंडायला बाहेर पडलो. तिथली लोकं कशी राहतात, कशी बोलतात, तिथलं वातावरण अनुभवत हिंडत होतो. भर-भर चाललं कि लगेच धाप लागत होती. कोणताही काम करा पण एकदम हळू करा हे इथलं नवीन माणसासाठी सूत्र आहे. उगाच घाई गडबड केली तर दमून बेजार व्हाल. सेल लागलेली दुकानं जशी असतात तसं एक दिसलं आणि आम्ही आत घुसलो. दोन तीन कानातले आवडले. म्हंटल घेउयात महिला मंडळासाठी. भाव विचारला तर बाई म्हणाली कमीत कमी ८०० रुपये. मी आ करून तिच्याकडे पाहत होतो तर म्हणाली सगळे चांदीचे आहेत. लगेच विचार मनातून काढून टाकला आणि तिथून काढता पाय घेतला. बाहेरच्या लोकांना बघून फालतू फालतू गोष्टींचे चढे भाव सांगत होते सगळेच. एके ठिकाणी किचेनचा भाव पहायला. बाईने सांगितला २०० रुपये. बराच वेळ हुज्जत घातली तेव्हा कुठे ती ५० रुपया वर आली आणि मी लगेच २०० ची चार घेतली. असेच उनाडक्या करत वेळ घालवला आणि रात्री एका हॉटेल मधे जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली करताना घरी फोन करून सगळा रिपोर्ट सांगितला, रूम वर गेलो, हिशोब केला आणि झोपलो.
क्रमश:
असेच उनाडक्या करत वेळ घालवला आणि रात्री एका हॉटेल मधे जेवलो. जेवण झाल्यावर शतपावली करताना घरी फोन करून सगळा रिपोर्ट सांगितला, रूम वर गेलो, हिशोब केला आणि झोपलो.
सकाळी लवकर उठलो पण आरामात सगळं आवरल. आजचा दिवस खारदुंगलाच्या नावावर केलेला. खारदुंगला, जगातला सगळ्यात उंच (१८३८० फुट) रोड. तसं बघितलं तर मेरीस्मेक'ला' (भारतातच आहे) आणि खारदुंगला यात मतभेद आहेत पण जास्त प्रसिद्ध आहे तो खारदुंगला. तुम्हाला इतक्या वेळा प्रत्येक शब्दामागे 'ला' 'ला' कशाला लावतात हा प्रश्न नक्कीच पडला असेल. मलाही पडला होता. तर 'ला' म्हणजे पास किंवा डोंगर माथ्यावरचा रोड. खारदुंग हे गाव आहे आणि त्या गावाला जाणारा पास म्हणून खारदुंग'ला'. असो... निघाल्या पासून ठरलेल्या योजने प्रमाणे आम्ही 'लेह'ला पोहोचलो नव्हतो. एक दिवस 'लेह'ला पोहोचायला उशीर झाला होता त्यामुळे खारदुंगलाच्या पुढे नुब्रा व्हॅलीत जायचा बेत पुढच्या वारीवर ढकलावा लागला. मग खारदुंगलाला (लेह पासून ४० km) जाऊन परत येण्याचे ठरले. आरामात ८.०० ला निघालो. आज इकडे पोहोचलेच पाहिजे, हे झालंच पाहिजे असं कसलंही बंधन नव्हतं. निसर्गाचं अगदी रुक्ष पण तेवढंच मोहक अस वेगळच रूप अनुभवत होतो. मस्त रमत गमत खारदुंगलाला पोहोचलो.
१.
२.
३.
४.
५. खारदुंगलाला पोहोचलो तो क्षण.
तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हाच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. कर्ण्यावर (लाउड स्पीकरवर) अखंड काही तरी संगीत चालू होतं. काय होतं ते नाही समजलं पण वरती असलेल्या बुद्ध मंदिरात चालू होतं. दोनीही गाड्या लावल्या एका बाजूला आणि हिंडायला लागलो. आम्ही डोंगर माथ्यावर होतो. एके ठिकाणी अजूनही बर्फ होता. आम्ही उशिरा ट्रीप प्लॅन केल्यामुळे आम्हाला आता पर्यंत रस्त्यावर कुठेही बर्फात हिंडण्याचा चान्स मिळाला नव्हता. जरा महिनाभर लवकर आलो असतो, तर जेवढे सगळे ओसाड डोंगर पहिले, ते सगळे बर्फाने झाकलेले पाहायला मिळाले असते. तेव्हाच पुढची वारी लवकर करून हि खंत भरून काढायच ठरवलं. तर आयुष्यात पहिल्यांदा बर्फात पाय ठेवत होतो. लई भारी वाटत होतं. जाम थंड होता तो. थोडा वेळ बर्फात घालवला आणि वर बुद्ध मंदिरात गेलो. दर्शन घेतलं आणि खाली उतरलो. मग तिथे असलेल्या एकुलत्या एक कॅफेटेरिया मधे गेलो. भूक लागलेली होतीच. गरम गरम मॅगीवर ताव मारला आणि चवदार मोमोज खाल्ले. त्यावर गरम गरम वाफाळलेला दोन कप चहा प्यायला. मस्त नाष्टा झाला. पुन्हा बाहेर येउन हिंडण्यात वेळ घालवला. तिथे एक मेजरसाहेब भेटले. नाव आठवत नाही पण गप्पांमधे पुण्यातून गाडी चालवत आलो आहोत आणि परत तसेच जाणार आहोत हे कळल्यावर त्यांनी आमचे फोटो काढून घेतले. ते जेव्हा पुण्यात होते तेव्हाच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या बरोबर आणखी थोडं बोलून झाल्यावर तिथून निघालो. पाय निघत नव्हता पण आम्ही तिथून परत जाण्याचा निर्णय घेतला. तिथे एक देवीचं (बहुतेक दुर्गादेवी) देऊळहि आहे. निघताना न चुकता देवीच्या देवळात जाऊन आलो आणि मग निघालो.
६. नुब्रा व्हॅलीत जाणारा रस्ता
७.
८. जगातील सर्वात ऊंच कॅफेटेरीया.
९. हमारा बजाज तिथे सुद्धा होती. :)
१०. मॅगी स्टोरी.
पुन्हा नुब्रा व्हॅलीत जाण्यासाठी येणार असा निश्चय करून खारदुंगलाला राम राम ठोकला. परत रमत गमत खाली उतरायला सुरुवात केली. पण आमच्या निघण्या अगोदरच भारतीय सेनेतील ट्रकची एक मोठी फ्लीट निघाली. नाही म्हणायला एक दोन ट्रॅव्हलसवाल्या गाड्या हि होत्याच. त्या सगळ्यांनी समोरील सगळा रस्त्या धुळीने व्यापून टाकला. नाईलाज होता पण त्या धुळीच्या ढगात शिरून एक एक गाडीला मागे टाकत आम्ही पुढे निघालो. एक ट्रक मावेल एवढाच रस्ता होता. मग ज्या ठिकाणी थोडीशी जास्त जागा असेल तिथे सैनिकी ट्रक थांबत होते आणि आम्हाला पुढे जायला संधी देत होते. असे करत करत सगळे ट्रक आम्ही मागे टाकले आणि मग सुसाट पुढे निघालो. सुसाट म्हणजे तशी ५० - ६० चा वेग. तिथे एवढा वेगही सुसाटच असतो. एके ठिकाणी तुषारला दरी मधे चेंदामेंदा झालेला ट्रक दिसला. ट्रक असा नव्हताच, फक्त अस्ताव्यस्त पडलेल्या भागांमुळे ट्रक असेल असा कयास बांधला. तिथे थोडा वेळ थांबलो आणि पुढे निघालो. खाली यायला जास्त वेळ लागला नाही. आता लगेच रूम वर जाण्यापेक्षा बाकी गोष्टी पण पाहून घेऊ म्हणून मग 'शांती स्तूप' पाहायला गेलो. 'लेह' मधल्या गल्ली बोळातून वाट काढत काढत आम्ही तिथे पोहोचलो. दुपारचे २.०० वाजले असतील. तिथली फरशी चांगलीच तापली होती. चटके बसत होते. 'शांतीस्तूपा' बद्दल माहिती वाचली होती पण नीटशी आठवत नाही आता. तिथे एक तासभर थांबलो आणि 'लेह'चा राजवाडा पाहायला गेलो. पुन्हा गल्ली बोळांची मदत घेऊन राजवाड्या जवळ आलो. हा राजवाडा भारतीय पुरातत्व विभाच्या अखत्यारीत येतो. 'लेह'चा राजवाडा बांधलाय दगडमातीचाच पण साधारण १०० खोल्या असलेला राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. बाहेरून जरी तो एक मोठ्ठच्या मोठ्ठ घर वाटत असला तरी तो राजवाडा आहे हे आत गेल्यावर जाणवत. काळाच्या ओघात बरीच पडझड झाली असली तरी काही जुन्या खुणा तिथे सुबत्ता नांदत होती याची साक्ष देतात. या खोलीतून त्या खोलीत अस करत तो सगळा नऊ मजली राजवाडा पाहण्यात साधारण तासभर गेला.
११. फ्लीट.
१२. शॉर्टकट मारायचा का ???
१३.
१४. मोड्लेला ट्रक.
१५.
१६. मी.
१७. 'लेह'चा राजवाडा १
१८. शांती स्तुप
१९. 'लेह'चा राजवाडा २
२०. राजवाड्यातुन दिसणारा गाव
२१.
राजवाडा बघून झाल्यावर रूम वर जाऊन आराम करायचे ठरले. मस्त रमत गमत लेहच्या मार्केट मधील रूम वर आलो आणि पसरलो. थोडावेळ आराम केला, फ्रेश झालो आणि पुन्हा निघालो फेरफटका मारायला. 'लेह'ला आल्यावर आमच्या प्रवासाचा टी शर्ट करून घ्यायचं ठरवलं होतं. चौकशी करत करत एका दुकानात पोहोचलो. कारागिराने केलेली आधीची कामे पहिली आणि लगेच प्रत्येकी दोन, अशी ४ टी शर्टची ऑर्डर देऊन टाकली. दोन दिवसांनी घायायला येतो अस सांगितलं आणि बाहेर पडलो. उगाच इकडे तिकडे प्रेक्षणीय स्थळे बघत भटकत राहिलो. निवासी लोकांपेक्षा तिथे अनिवासीच जास्त आढळले. त्यातही परदेशी अनिवासी जरा जास्तच. हे दुकान बघ ते दुकान बघ करत ८.०० वाजले तेव्हा जेवायला जायला पाहिजे अस शरीराने खुणावलं. आमच्या गेस्टहाउसच्या पोऱ्याकडून दोन-चार चांगल्या हॉटेलची माहिती घेतली होतीच. त्यातलच एक निवडलं आणि घुसलो आत. आत गेलो चारीही बाजूला फिरंगी लोकं आणि एक देशी जोडपं. लख्ख उजेडा ऐवजी, लाईट गेल्यावर मिणमिणते दिवे लावतात तसं अंधारं वातावरण. आयला कुठे आलो अस झालं. आलोच आहेत तर खाऊ दोन घास आणि निघू अस ठरवून बसलो जेवायला. मी पनीर हंडी आणि तुषारने मटन (तिकडच्या स्पेशल शेळीचं मटन) हंडी मागवली. चवीला जेवण बरं होतं म्हणायला हरकत नाही. जेवलो आणि पुन्हा रूमवर आलो. हिशोब करायचा कंटाळा आला होता म्हणून मग ते सोडून पसरलो. कधी झोप लागली ते कळलच नाही. जाग आली ते सकाळी गजर वाजल्यावरच.
सकाळी नाष्टा वगैरे करून आरामात १० ला निघालो. निघताना पेट्रोल कॅन तेवढे हॉटेलवर ठेवले आणि दुसऱ्या दिवशी येतो म्हणून त्यांचा निरोप घेतला. पहिला पेट्रोल पंप गाठला आणि दोनीही गाड्यांच्या टाक्या फुल करून घेतल्या. तिची काळजी मिटली. आज जायचं होतं सुप्रसिद्ध 'पँगोंग लेक'ला (१४२७० फुट). पहिल्यांदा या तलावाचे फोटो पहिले तेव्हाच 'लेह'ची ओढ लागली होती आणि ती आज आम्हाला इथ पर्यंत घेऊन आली होती. ३ इडीयट्स मधे तर हिची झलक पण पाहायला मिळाली. तर पँगोंग लेक, 'लेह' पासून साधारण १५० km आहे. बरेचसे प्रवासी सकाळी लवकर निघतात आणि तो रम्य तलाव ओझरता पाहून संध्याकाळी परत 'लेह'ला येतात. पण आम्ही तिथे रहायचा निश्चय केला होता आणि म्हणूनच आम्ही आरामात १० ला निघालो. पूर्ण दोन दिवस याच्यासाठीच राखून ठेवले होते. १५० km फक्त अवाढव्य आणि ओसाड डोंगर पाहणार होतो. पण ते पाहण्यात सुद्धा एक मजा आहे. हवे तिथे थांबत होतो, सगळं काही डोळ्यात साठवत होतो आणि पुढे जात होतो. हळू हळू डोंगर चढत होतो. गारवा चांगलाच जाणवायला लागला होता. दगडधोंड्या मधून वाट काढत आम्ही बघता बघता चांग'ला'ला पोहोचलो. घड्याळात तेव्हा १२.०० वाजले होते. चांग'ला', खारदुंगला नंतर जगातला दुसरा उंच रोड. अशा स्पेशल ठिकाणी पोहोचलो कि काही वेगळाच आनंद होतो जो शब्दात व्यक्त करता येत नाही. चांग'ला' वर एक मिलिटरी कॅफे आहे. यात्रेकरूंसाठी (हो आमच्या सारख्या लोकांसाठी हि नुसती सफर नसून यात्राच) इथे पाहिजे तितका चहा फुकटात मिळतो. मस्त चव आहे तिथल्या चहाची आणि त्यात एवढ्या वर न काही खत पिता आलं तर तो चहा आणखीनच चवदार लागतो. चांग'ला'वर थोडा वेळ घालवला. तिथे आम्हाला बरेच पुणेकर आणि पेणकर भेटले. चार पाच वेगवेगळे ग्रुप होते. मिलिटरीने तिथे चांग'ला', खारदुंग'ला' एम्बोस केलेले किचेन्स, टी शर्टस, टोप्या विकायला ठेवलेले असतात. तिथे ते सगळं सामान घेण्यासाठी झुंबड उडाली होती. आम्हीहि हात मारून प्रत्येकी दोन तीन टी शर्टस आणि १०-१५ किचेन्स घेतल्या. पेणकरांबरोबर तर काही ओळखी पण निघाल्या. त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा मारल्या, चांग'ला' बाबांचा आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो.
२२. चांगला ला जाताना रस्ता
२३.
पुन्हा दगड धोंड्यातून वाट काढत थोडं खाली उतरलो. खाली उतरल्यावर मात्र रस्ता एकदम चकाचक झाला. मस्त वाटलं तिथे गाडी बुंगाट पळवायला. दोनीही बाजूला उंचच उंच डोंगर आणि मध्ये दरीतून जाणारा रस्ता. मधून मधून एक नदी साथ देत होती. काही ठिकाणी मधेच चोहीकडे हिरवंगार तर बऱ्याच ठिकाणी नजर जाईल तिकडे सगळं ओसाडच ओसाड. इतकं कि गवताची काडी पण दिसणार नाही. शृष्टीची किमया बघत 'टांगत्से' (मध्ये लागणारं एक छोटं गाव) कडे दवडू लागलो. खूप भूक लागली होती म्हणून कधी एकदा टांगत्सेला पोहोचतो असं झालं होतं. अखेर तिथे पोहोचलो. एका छोट्या हॉटेल वजा घरात थांबलो. मेनू एकच ठरलेला, "मॅगी". या मॅगीने, प्रवासात सगळीकडेच आम्हाला तारून नेलंय. तर मस्त गरम गरम मॅगीचा आस्वाद घेतला. १०-१५ मिनिटे आरामात घालवली आणि मग पुढे निघालो.
२४.
२५.
२६. नागमोडी वळणारा तुषार.. ;)
२७. विश्रांती तर हवीच कि ओ..
२८. याक
वाळवंटी प्रदेशातून निवांत पुढे जाताना अचानक समोर 'पँगोंग लेक'ने दर्शन दिलं. ठरवलेलं लक्ष्य अगदी दृष्टीपथात होतं, ५ मिनिट तिथे थांबलो आणि लगेच निघालो ते लक्ष्य गाठायला आणि पोहोचलो सुद्धा. 'पँगोंग लेक', समुद्र सपाटीपासून एवढ्या उंच एक सुंदर तलाव, निसर्गाची ती रंगांची मिसळ पाहून कोणीही माणूस दंग नाही झाला तरच नवल. तिथे राहण्याचा आणि ते सगळं पाहण्याचा अनुभव केवळ अप्रतिम आहे. हा तलाव ३०% भारतात तर उरलेला चीन आणि तिबेट मधे आहे. पण या ३०% ला कितीही वेळ पहिलं तरी मन भरत नाही असा तो आहे. खाऱ्या पाण्याच्या या तलावात जीवन (मासे किंवा इतर जलचर प्राणी) नाही. असो... आम्ही तिथे ४.०० वाजता पोहोचलो. गाड्या अगदी तलावाच्या काठावर नेल्या आणि शानमधे तिथे लावल्या. थोडा वेळ मजा मस्ती करत तिथे घालवला आणि मग राहण्याची सोय बघायला लागलो. तो तलाव जिथे सुरु होतो, तिथे जेवणाची सोय असलेले काही छोटे स्टॉल्स आहेत. त्यांच्या कडेच काही टेण्ट्स आणि खोल्या राहण्याकरता मिळतात. मग तिथल्याच एकाला पकडला, राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली आणि गेलो परत धडधड करत हिंडायला. तलावाच्या कडे कडेने दगडी गोट्यांमधून, गाडी आणि स्वतःला सांभाळत पुढे पुढे जात होतो. कुठे पाय वाट, होती, कुठे नुसतेच गोटे. स्वतःचीच वाट शोधत तसेच गाडी हाकत जाताना पुढे एके ठिकाणी गेलो आणि अडकलो. १-२ फुट खोल आणि २ -३ फुट रुंद असलेला मोठ्ठा ओढा समोर होता, ज्यातून खळखळ करत वितळलेल्या बर्फाचं पाणी तलावाला येउन मिळत होतं. एकदा गाडी घालण्याचा विचार मनात आला पण लगेच तो आवरला. फालतू डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा मागे वळलेलं बरं असा ठराव पास झाला आणि आम्ही मागे आलो. नंतर नंतर मला कंटाळा आला, असे उलट सुलट हिंडण्याचा आणि आमच्या साहेबांना नेमका त्याच वेळी हुरूप आला होता. जिकडे तिकडे गाडी पळवत सुटला होता. माझ्या कंटाळ्याच मुख्य कारण होतं मुंग्या. गारठ्यामुळे हातापायाला मुंग्या आल्या होत्या. सुन्न झाले होते दोनीही आणि त्यात मी कसाबसा गाडी चालवत होतो. तुषारला आणखी पुढे १० km जाऊन पुन्हा मागे यायची इच्छा होती आणि मी रूम वर जाऊ म्हणून कोकलत होतो. ३-४ km गेल्यावर त्याला म्हणालो आपण उद्या सकाळी पुन्हा जाऊ तिकडे आजचा प्रवास थांबवू इथेच. गड्याला ते पटलं म्हणून मग आम्ही रूम वर परत आलो. रूम मधे गेलो तेव्हा जरा बरं वाटलं. पण बलाकलावा (गाडी चालवताना घालण्याची काळ्या कापडाची माकडटोपी) काढली आणि चेहऱ्याची त्वचा कोणी तरी ओढतय असं वाटू लागलं. पुन्हा ती घातली आणि बसलो निवांत. त्या बाबाजीला त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडत नव्हता. तुषार म्हणाला मी बाहेर चक्कर मारून येतो तलावा जवळ तू बस इथेच, काही नाही होत आणि तो निघून गेला. मुंग्यांनी माझा पिच्छा काही सोडला नव्हता. काही केल्या जाईनात. दोन दिवस आधी तुषारची वेळ खराब होती आणि आता माझा नंबर होता. थर्मल वेअर बरोबर आणलेले तेही चढवले पण तरीही काही उपयोग नाही झाला. जाग्यावर बसलो होतो तर जास्तच चेव आला त्यांना (मुंग्यांना), म्हणून मग हालचाल करू लागलो. थोडी हालचाल केली तेव्हा त्या थोड्या कमी झाल्या. मग म्हंटल इथे बसून काय करायचं, आपणही जाऊ बाहेर हिंडायला. कुलूप लावलं आणि चप्पल घालून मीही तुषार गेला होता तिकडे गेलो. उगाच तलावाच्या कडे कडे ने भटकत, गप्पा मारत वेळ घालवला आणि परत स्टॉलवर येउन बसलो. माझी हालत बघून तिथल्या एका ट्रेकरने कोल्हापुरी चप्पल काढून बूट घालण्याचा सल्ला दिला. म्हणे पायातूनच गारठा अंगात जातोय, त्यांना वाचव, मुंग्या आपोआप पळून जातील. मी आपला इमाने इतबारे त्याचा सल्ला ऐकला आणि पुन्हा रूम वर बूट घालायला गेलो. इकडे तुषार भटकण्यात आणि फोटो काढण्यात मश्गुल होता. इतक्यात काल खारदुंगलाला दिसलेले आमच्या सारखेच दोन बुलेट वेडे (जसजीत आणि राहुल) आपापल्या बुलेटा घेऊन आले. थोड्यावेळा पूर्वी तलावाजवळ आम्ही त्यांना पुढे गेलेलं पाहिलं होतं तेव्हाच ओळखलं होतं. पण तेव्हा वाटलं ते पुढे थांबतील पण नाही ते पुन्हा मागे आले होते आणि तेही नेमके आमच्या इथेच मुक्कामासाठी. खारदुंगलाला नुसतीच तोंड ओळख झाली होती. मी बूट घालत असताना जसजीत अगदी जुनी ओळख असल्यासारखा आत आला.
जसजीत: क्यों भाई, एकही दिन में लेट गये !, तेरे पार्टनर ने बताया कि हालत खराब है !
मी: ज्यादा नही रे, थोडे गुजबंप्स आये है. बाकी कुछ नही! (इथे बोलताना मुंग्यांना पर्यायी हिंदी शब्द शोधत होतो पण शेवटी विंग्रजीच मदतील धावून आली).
जसजीत: कोई नाही रे, चल कुछ नाही होता ! अपनेआप ठीक हो जायेगा !
आणखी दोनचार वाक्य टाकून तो शेजारच्या खोलीत सामान ठेवायला निघून गेला. मग आम्ही दोघेही बोरोबरच बाहेर पडलो. तिकडे राहुल आणि तुषारची चांगली ओळख झाली होती. आता चौघेजण मिळून हिंडत होतो. काल ते दोघे खारदुंगला वरून पुढे नुब्रा व्हॅलीत गेले होते आणि आज सकाळी तिकडून निघून इथे पोहोचले होते. असे करण्याचा विचार माझ्याही मनात आला होता पण आम्हाला आराम जास्त महत्वचा वाटला. नुब्रात गेलो असतो तर नुसतीच पळापळ झाली असती आणि लेह पहायचं राहिलं असतं आणि म्हणूनच तो विचार रद्द केला होता. असो..त्यांनी काढलेले फोटो बघूनच नुब्रात जाऊन आल्याच समाधान (न होणारं) मानलं. पुढे भरपूर गप्पा झाल्या. स्टॉलवर आलो आणि जेवणाची ऑर्डर दिली. गप्पा मारताना हॉटेलवाल्या कडून कळलं कि तलाव थंडीत पूर्ण गोठतो. इतका कि त्या बर्फावर ट्रक आणि इतर गाड्या हि आरामात चालवता येतात. त्याने स्वतःहि तलावावरून गाडी चालवल्याचं सांगितलं. तो बाकी गोष्टी सांगताना आम्ही फक्त त्यांची कल्पनाच करत होतो. मस्त जेवलो आणि पुन्हा रूम वर गेलो. रूम वर जाताना रस्त्यात माझी कॅमेरा केस पडली. तिच्यात कॅमेरा पण होता. लगेच कॅमेरा काढूनवरवर पहिलं, काही झालं नाहीये याची खात्री केली आणि पुढे गेलो. रात्री पुन्हा बाहेर पडलो. काय सुरेख वातावरण होतं. मस्त चांदणं पसरलेलं आणि आजूबाजूला एकही मानव निर्मित दिवा नाही. होता तो फक्त चंद्र प्रकाश. खूप मस्त वाटत होतं. त्यात त्या दोघांकडेही उच्च प्रतीचे कॅमेरे होते. मस्त फोटो काढले त्यांनी. आम्ही आपले साधेसुधे फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू केला. पाहतो तर लेन्स अर्धीच बाहेर आली आणि आली ती परत आत न जाण्यासाठीच. धड आतही नाही आणि बाहेरही नाही अशी मधल्यामध्ये अडकून बसली. मघाशी कॅमेरा पडला तेव्हाच त्याची वाट लागली होती फक्त ती कशी हे आत्ता या घडीला कळलं. फोटो काढण्याचा सगळा उत्साहच मावळला. तसाच अर्धवट चालू अर्धवट बंद कॅमेरा, केस मधे टाकला आणि त्यांची कलाकारी बघत बसलो. घरी रिपोर्ट सांगायला आज सुट्टी होती. जिथे वीजच नाही तिथे फोनचा काही प्रश्नच नव्हता. 'लेह' मधून निघतानाच दोन दिवसांनी फोन करेन अस सांगून निघालो होतो. तर पुढे थोडा वेळ घालवला आणि मग झोपायला गेलो. आधीच वाट लागली होती म्हणून मग खबरदारी म्हणून झोपताना एक क्रोसिन घेऊन मगच झोपलो.
२९. वाळवंटी रस्ता.
३०.
३१. पॅंगोंग लेक, पहिलं दर्शन.
३२. लेक आणि तुषार, दोघे आजुबाजुला
३३.
३४.
३५.
३६.
३७.
३८.
३९.
४०
४१.
४२. जिथे अडकलो तो ओढा
४३.
४४. अम्ही रहिलो त्या खोल्या.
दुसऱ्या दिवशी उठलो आणि पुन्हा हिंडायला चौघेही बाहेर पडलो. कालचा होणारा त्रास पळून गेला होता. पुढे एक १० km जाऊन, सगळं पाहून परत यायचं होतं. आता चार बुलेट धडधड आवाज करत निघाल्या होत्या. जाम भारी वाटत होतं. ३ इडीयट्सच शुटींग जिथे झालं त्या जागी जायचं ठरलं होतं. शोधत शोधत, दगडधोंड्यातून वाट तयार करत तिथे पोहोचलो. पुढे दगड संपले आणि भुसभुशीत वाळू सुरु झाली. मी आपला गाडी ताणत जितक्या आत जाता येईल तितक्या आत जायला लागलो. हे तिघे मात्र मागे राहिले आणि आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागले. "हा नक्की करतोय तरी काय? गाडी मातीत फसत चालली आहे, तरी ओढतोच आहे.असा विचार करत होते". जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी बराच आत गेलो होतो आणि गाडी ढकलून बाहेर काढण्याशिवाय मार्ग नव्हता. मी गाडी लावली आणि उतरलो. ते तिघे मागेच गाड्या लावून चालत आले. तुषार म्हणाला आधी इथे काय वेळ जायचा तो जाऊदेत. निघतानाच गाडी बाहेर काढू. मग दिली गाडी सोडून तिथेच आणि गेलो सगळे तलावाकाठी. अगदी क्षणाक्षणाला दृश्य बदलत होतं. मधेच ढग दाटून यायचे, कुठल्यातरी शिखराला घेरून टाकायचे, पुन्हा वेगळे व्हायचे. मधेच कुठेतरी एकटाच ढग अख्या डोंगराला सावली खाली झाकून टाकायचा निष्फळ प्रयत्न करायचा. एक न अनेक गोष्टी आम्ही अनुभवत होतो. खूप मस्त वाटलं तिथे. पण किती वेळ थांबणार. "वापस घर भी जाना है", असं म्हणून निघण्याचं ठरवलं. तुषारने आणि मी, माझी गाडी ढकलून जमीन जिथे कडक होती तिथे आणली आणि मग पुन्हा आम्ही सगळेच एका मोठ्या छत्री खाली आराम करायला गेलो. गप्पा मारताना जसजीत ने सांगितलं, "काल रात्री दोन वाजता एक फिरंगी जोडपं, बुलेट घेऊन आलं". भर दिवसा आम्ही ज्या तोडक्या मोडक्या रस्त्यावरून आलो त्या तिथून हे लोकं रात्रीच्या अंधारात आले हे ऐकून त्यांच्या प्रती ईर्ष्या निर्माण झाली. रात्रीच्या काळोखात लांब लांब पर्यंत कोणताही प्राणी नाही. चंद्र प्रकाश सगळी कडे पसरलेला आणि त्यात एकाच बुलेट वर समोर दिसणाऱ्या खडकाळ रस्त्यावरून एकमेकांना चिकटून जाणारे फक्त ते दोघेच. कसलं भारी वाटलं असेल त्यांना ते वातावरण अनुभवायला? असो.. आणखी अशाच काही गप्पा मारत तिथे थोडा वेळ घालवून आम्ही परत रूम वर आलो. सगळा गाशा गुंडाळला, हिशोब मिटवला आणि निघालो.
४५.
४६.
४७.
४८.
४९. ३ इडियट्स वाली जागा.
५०.
५१.
५२.
५३.
५४.
काल येताना दोन बुलेट होत्या आणि आता चार बुलेट होत्या. वातावरणात धडधड आवाज घुमत होता. एकमेकांबरोबर चुरशी चालू झाली. कधी कोण पुढे. कधी कोण माघे. सुसाट निघालो होतो. जेव्हा परत जायची ओढ असते तेव्हाची ती मानसिकता असतेच. अंतर नेहमी कमीच वाटत रहातं. अंतर तेवढच, रोड पण तोच पण परत येताना अस वाटलं चांग'ला' पर्यंत रोड चांगला होता. मोजक्याच एक दोन ठिकाणी थांबलो असू. पहिला मोठ्ठा ब्रेक घेतला तो चांगलालाच. दगडी आणि अवघड रस्ता गौण वाटला तेव्हा. खूप मजा आली तिथे पोहोचे पर्यंत. पुन्हा अप्रतिम चहाचा आस्वाद घेतला आणि निघालो. आता थांबण्याचा काही चान्स नव्हता, वाटेत असेलेलं सगळं पाहून झालं होतं त्यामुळे थेट 'लेह' गाठायचं होतं. पुन्हा सनाट निघालो आणि 'लेह'ला पोहोचलो. पुढे ते त्यांच्या रूमवर आणि आम्ही आमच्या रूमवर गेलो. फक्त येताना जसजीत आणि मी जेवायचं ठरवलं होतं त्या प्रमाणे आम्ही परत एक हॉटेल मधे भेटलो. तुषार आणि राहुल, भूक नाही म्हणून आलेच नाहीत. आम्ही दोघे मस्त जेवलो, गप्पा झाल्या आणि पुन्हा संध्याकाळी भेटू अस म्हणून निरोप घेतला.
५५. लेह ला परत येताना वाटेत एके ठिकाणी याला टिपण्यासाठी थांबलो होतो.
संध्याकाळी तुषार आणि मी, 'लेह' भटकायला बाहेर पडलो. आजचा शेवटचा मुक्काम होता. उद्या 'लेह'ला अलविदा करायचं होतं. घरच्यांसाठी काही मिळतंय का ते पाहत होतो. तुषारने त्याच्या लेकीसाठी आणि पुतण्यासाठी लडाखी पोशाख घेतला. शिवाय महिला मंडळासाठी पण खरेदी केली. मीही आई, बहिण आणि बायकोसाठी काही खरेदी केली. दोन चार दुकानात कॅमेरा दुरुस्त करता येइल का? याची चौकशी केली पण एकही जण हात लावायला तयार होइना. फक्त एकाच ठिकाणी दुकानदार पहातो म्हणाला पण तेव्हा मि घरी गेल्यावर बघु असा विचार केला आणि नको म्हणालो. पुढे मग आम्ही टी-शर्ट वाल्याकडे गेलो. ४ टी शर्ट्सची ऑर्डर पूर्ण झाली होती. झक्कास दिसत होते ते. ते घेउन मग आम्ही जसजीत आणि राहुलला भेटायला गेलो. पुन्हा काही गप्पा झाल्या, शेवटी त्यांचा निरोप घेतला. ते श्रीनगर वरून आले होते आणि मानली मार्गे दिल्लीला जाणार होते आणि आम्ही अगदी विरुद्ध दिशेला. मनालीला जाताना रोहतांग पासला काळजी घ्या असा सल्ला त्यांना दिला आणि आम्ही परत आमच्या रूमवर आलो. थोडा वेळ टीव्ही बघितला आणि परतीच्या प्रवासाचा आराखडा बांधत दोघेही झोपलो.
क्रमश:
मनालीला जाताना रोहतांग पासला काळजी घ्या असा सल्ला त्यांना दिला आणि आम्ही परत आमच्या रूमवर आलो. थोडा वेळ टीव्ही बघितला आणि परतीच्या प्रवासाचा आराखडा बांधत दोघेही झोपलो.
सकाळी लवकर उठलो आणि आवरलं. 'लेह'ला राम राम म्हणायची वेळ आली होती, शिवाय घराचीहि ओढ लागली होती. या वेळी अर्धवट राहिलेल्या गोष्टी पुढच्या वेळी पूर्ण करण्याचे मनोमन ठरवून साधारण ८.०० ला आम्ही 'लेह' सोडलं. घरून निघाल्यापासून इथ पर्यंत प्रत्येक वेळेस ठरलेल्या आराखड्याचे १२ वाजले होते. त्यामुळे 'लेह'ला मुक्कामी असताना परतीचा प्रवास एकदम आरामात जमेल तसा करायचा ठरवलं. त्यात चंढीगड पासून पुढे घरी जाण्यासाठी किमान ४-५ दिवस तर घ्यायचेच. उगा पळापळी नाही करायची असही ठरलं. तुषारच्या वडिलांनी तर गेल्या मार्गेच परत या म्हणजे तुमचं ३०० km अंतर वाचेल असही सुचवलं. श्रीनगर-जम्मू मार्गे गेलं काय आणि मनाली मार्गे गेलं काय, चंढीगडला पोहोचायला ४ दिवस लागणारच होते. फक्त मनाली मार्गे गेलो तर ३०० km वाचणार होते. पण आल्या मार्गी परत मनालीला जाणे म्हणजे वेडेपणा होता. नवीन ठिकाणी, नवीन लोकांचा, नव्या जगाचा अनुभव घेणे आमच्या रक्तातच आहे. तुषारनेही फार आढेवेढे न घेता श्रीनगर-जम्मू मार्गे जायचं मान्य केलं आणि त्या प्रमाणे आम्ही श्रीनगरच्या दिशेने दौडू लागलो. रम्य सकाळी कोवळ्या उन्हात आम्ही निघालो होतो. वातावरण अगदी मस्त होतं. आवडेल त्या ठिकाणी थांबत मजेत प्रवास चालू झाला. माझा कॅमेरा आधीच धारातीर्थी पडल्यामुळे मी मोबाईलवर फोटो काढत होतो तर तुषार नेहमी प्रमाणे कॅमेरा घेऊन स्वार झाला होता. सकाळी निघताना वाटेत काय काय बघण्यासारखं आहे, हे हॉटेलच्या संस्थापकाला विचारायला मी विसरलो नाही. त्यामुळे पहिला ऑफीशियल थांबा होता मॅग्नेटीक हिल. खूप ऐकून होतो याच्या बद्दल. गाडी आपोआप खेचून घेतो हा डोंगर अशी बातमी कळली होती. त्यामुळे कुतुहूल इतकं होतं कि, गाडीवर चाललो असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक डोंगराकडे बघुन हाच असेल का तो डोंगर? हाच असेल का तो डोंगर? असं मनाला विचारात होतो. रस्ता चकाचक होता त्यामुळे गाडीचा वेग चांगला ठेवला होता आणि असेच जात असताना रस्त्यावर मोठा चौकोन आखलेला दिसला. स्त्याच्या दोनीही बाजूला मॅग्नेटीक हिलची पाटी होती. आम्ही तिथे थांबलो. गाडी बंद करून निवांत थांबलो, म्हंटल बघू कशी खेचली जाते ते. पण कसलं काय ओ... ते धूड ढिम्म सुद्धा हलल नाही. आहे त्या जागीच, आहे तशी लावली होती, तशीच. तुषार म्हणाला मी डोंगरावर रस्ता आहे तिथ पर्यंत जाऊन येतो आणि तसा तो गेला पण. पार अगदी वर रस्ता संपे पर्यंत गेला आणि मागे वळून परत आला. त्यालाही काही जाणवलं नाही. मला तर तिथल्या इतर डोंगरांप्रमाणेच हा हि डोंगर तितकाच भक्कास पण आकर्षक वाटला. असो... आम्ही तिथून पुढे निघालो आणि थांबलो ते एका संगमावर. नद्यांची नावं आठवत नाहीत पण दरी मध्ये दोन नद्यांचा संगम होता तिथे आम्ही थांबलो. छान दृश्य होतं. दोनचार क्लिकक्लिकाट केले आणि तिथून काढता पाय घेतला.
१. मॅग्नेटीक हिल आणि त्यावर गेलेला तुषार.
२.
३.
४. संगम
जेव्हा संगम पहिला तेव्हा आम्ही डोंगरावर होतो पण खाली उतरून आलो तेव्हा संगमाने तयार झालेली ती नदी आमच्या साथीला आली होती. खळखाळाट करत वाहणाऱ्या पाण्याबरोबर शर्यत लावून आम्हीहि जोरात निघालो होतो. मजल दर मजल करत एक एक छोटं गाव मागे टाकत आम्ही पुढे जात होतो. बऱ्याच गावातले रस्ते खूपच खराब होते. सगळी कडे रस्त्याचं काम चालू होतं. पण दोन गावांना जोडणारा रस्ता मात्र एकदम मस्त होता. तस का होतं या कोड्याचं उत्तर काही मिळालं नाही. मधे मधे सेनेचे ट्रक येता जाता दिसत होते आणि खारदुंगलाला जशी पुढे जायला जागा दिली तशी आताही देत होते. 'लेह'च्या दिशेने निघालेले आमच्या सारखेच, बरेच बुलेट वेडे, आम्हाला अंगठे दाखवून ("थंप्स अप") पुढे जात होते. आम्हीहि तेच करत पुढे चाललो होतो. असेच जात असताना पुढे एके ठिकाणी गाड्यांची रांग लागलेली दिसली. आम्हाला ओवरटेक करून पुढे गेलेल्या चारचाक्या इमानदारीत एका पाठोपाठ थांबलेल्या दिसल्या. आम्ही आपलं राजरोस पणे त्यांच्या शेजारून थेट पुढे पर्यंत गेलो. पाहतो तर काय? दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला होता. BRO वाले रस्ता दुरुस्त करण्यात मग्न होते आणि आम्ही ते कसं काम करत आहेत हे पाहण्यात दंग झालो होतो. गाडी स्टँडला लावली आणि पुढे गेलो. मोठ मोठे दगड ते यंत्राने नदीत ढकलत होते. रस्त्यावर पसरलेला राडारोडा बाजूला सरकवत होते. एकदा खाली पडलेला दगड पाहावा म्हणून कडेला जाऊन बघितलं तर तो दगड नाहीसा झाला होता. त्या नदीने त्याला लीलया आपल्यात सामावून घेतलं होतं. तेव्हा त्या नदीला नुसताच उथळ पाण्याचा खळखाळाट नसून ती खोल पण होती हे जाणवलं. पुन्हा मागे आलो. एक सैनिक त्यांच्या गाडीतून खाली उतरून ते सगळं पाहत होता. त्याच्या जवळ जाऊन बोलावंस वाटलं म्हणून पुढे गेलो तर तो नेमका महाराष्ट्राच्या मातीचा निघाला. कोपरगावचा. गप्पा सुरु झाल्या. तो सुट्टी संपली म्हणून परत आला होता आणि पुढे कारगिलला चालला होता. आमच्या गाड्या बघून आणि बाकी प्रवासाची माहिती ऐकल्यावर त्याने तर आम्हाला त्यांच्या छावणीत आमंत्रण पण दिले. (पण आमच्या कडे तेवढा वेळ नव्हता म्हणून ते राहून गेले). असो... थोड्या वेळाने रस्ता नीट झाला आणि आम्ही त्याला निरोप देऊन तिथून निघालो.
५.
६.
७.
८.
९. BRO रस्ता साफ करत आहेत.
निघाल्या पासून ३ तास झाले होते आणि काहीही खाल्लं नव्हतं. म्हणून मग एका चांगल्या ढाब्यावर थांबलो आणि यथेच्छ जेवण केलं. थोडा आराम केला आणि निघालो. थोडं अंतर कापल्यावर आम्ही एका दरीत प्रवेश केला. दुतर्फा उंचच उंच डोंगर आणि मधून जाणारे आम्ही आणि आणखी काही गाड्या. पुढचा रस्ता कसा असेल असा विचार चालू असतानाच बाजूच्या डोंगरावर थोडं वर लक्ष गेलं आणि सेनेच्या ट्रक्सची भली मोठी रांग नागमोडी वळणं घेत हळू हळू वर चढताना दिसली. एक ट्रक जाईल एवढाच रस्ता असलेला तो घाट होता. आम्ही घाट चढायला सुरुवात केली आणि लवकरच त्यांच्या जवळ पोहोचलो. एके ठिकाणी सगळ्याच गाड्या थांबल्या होत्या. समोरून पण वाहनं आल्याने, पुढे जाण्यासाठी दोनीही बाजूंचा प्रयत्न चालू होता. घाटात काही ठिकाणी दोन ट्रक एकमेकाच्या बाजूला मावतील एवढी जागा होती. सेनेच्या अनुभवी चालकांनी हे सगळं ओळखून त्यांच्या गाड्या आधीच थांबवल्या होत्या. पण आम्ही फटफटी घेऊन वाट काढत, कधी दरीच्या बजूने, कधी कड्याच्या बाजूने कुठेही न थांबता पुढे निघून गेलो. पुन्हा मजेत प्रवास सुरु झाला. डोळ्यात सगळं साठवून पुढे जात असताना भुसभुशीत मातीचा एक डोंगर दिसला. निदान तसा भास तर नक्कीच झाला. असं वाटलं जर या डोंगरावर कोणी उडी मारली तर तो तिथे वर उभा न रहाता थेट डोंगराच्या पोटात तळच गाठेल. आठवण म्हणून त्या डोंगराला कॅमेरा मध्ये कैद केलं आणि पुढे निघालो. पुढे लामायुरू मोनास्ट्रि येई पर्यंत कुठेही थांबलो नाही. निर्जन ठिकाणी वसलेली हि मोनास्ट्रि खूपच जुनी आहे. एक दोन दिवस इथे राहायला हवं होतं असाही एक विचार मनात येउन गेला. पण तो नुसताच विचार राहिला. थोडा वेळ लांबूनच तिचं दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. घाट लागल्या पासून रस्त्याचा चांगल्या वाईटाचा खेळ चालू झाला होता. कधी चकचकीत डांबरी तर कधी भरपूर मातीने माखलेला मातीचाच. समोर ट्रक असेल तर काय विचारायलाच नको. धुळीच्या ढगातून गाडी चालवण्या शिवाय पर्यायच नव्हता. भरपूर धूळ खाऊन खाऊन आम्ही शेवटी फोटू'ला' टॉपवर (उंची - १३४८० फुट) पोहोचलो. तिथे आधीच एक नवीन लग्न झालेलं जोडपं एकमेकाचे फोटो काढण्यात दंग होतं. भरपूर वारं सुटलेलं आणि दुसरं चीटपाखरू हि नव्हतं. ते फक्त दोघेच होते आणि आम्ही तिथे पोहोचून त्यांच्या एकांताची वाट लावली. आता आम्ही चौघे होतो तिथे. आपसूकच नवरोबा, त्या दोघांचा एक फोटो काढावा हि विनंती घेऊन गप्पा मारण्यासाठी जवळ आले. फोटो वगैरे काढून झाल्यावर गप्पात कळलं कि तो हिरो लग्नाच्या बायकोला आणि तिच्या सवतीला (फटफटीला) घेऊन हिंडण्यासाठी गुजरात वरून आला होता आणि श्रीनगर वरून प्रवास सुरु करून लेह'ला' चालला होता. मला हेवा वाटला त्याचा. बायकोला आणि फटफटीला घेऊन यायचं म्हणजे कमालच केली गड्याने. असो... सुखरूप प्रवासाच्या त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही (ते पण) तिथून निघालो.
१०. भुसभुशीत मातीचा डोंगर
११. लामायुरु मोनास्ट्रि
१२. फोटुला टॉपवर...
फोटू'ला टॉप उतरायला सुरुवात केली आणि आम्ही धुरळ्या मध्ये गुडूप झालो. थोडेच खाली उतरलो असू कि पुन्हा आमच्या समोर BRO वाले दत्त म्हणून उभे राहिले होते. घाटात दरड कोसळली होती ती दूर करण्याचं काम चालू होतं. तिथे थांबून त्यांच काम बघण्यापलीकडे आम्हाला काही काम नव्हतं. इतक्यात सेनेचे ट्रक मागून धुरळा उडवत आले आणि जवळ येउन थांबले. पण समोरून एक अतिशहाणा क्वालिसवाला आला. कुणालाही न जुमानता सरळ मुरुमाड रस्त्यात घुसला आणि त्याची गाडी फसली. गाडी ताणत होता जोरात पण गाडी जाग्यावरच. चाकं जाग्यावरच फिरत होती. एक तर काम संथ गतीने चालू होतं आणि त्यात या शहाण्याने व्यत्य आणलं होतं. शेवटी आतली दोघं खाली उतरली आणि गाडी ढकलू लागली. कशी बशी ती मागे पुढे घेत, गाडी निघाली. ढकल काम करून दमलेले दोघे गाडीत बसले आणि ते निघून गेले. BRO वाले आले आणि त्यांनी तो मुरूम नीट करून आम्हाला जायला रस्ता तयार केला. या BRO ने मनाली सोडल्या पासून आता पर्यंत कितीतरी ठिकाणी आम्हाला मदत केली होती. त्या साठी त्यांना सलाम. असो... पुढे रस्ता एकदम झक्कास लागला. त्यामुळे आपसूकच गाडीचा वेग वाढला. दोन तास आम्ही न थांबता गाडी चालवत होतो. घाट नव्हता पण वळणावळणाच्या रस्त्यावर गाडी चालवून कंटाळा आला होता. आपल्या इथे जशी वड-पिंपळाची झाडं रत्याच्या कडेने असतात तसं विसाव्यासाठी सावली देणारं एकही झाड आम्हाला रस्त्यात सापडेना. म्हणून मग एके ठिकाणी मोठ्ठा बोर्ड दिसला त्याच्या सावलीत थांबलो. गाडी बाजूला लावली आणि निवांत खाली मांडी घालून दोघेही जमिनीवर बसलो. गप्पा मारत अर्धा तास काढला. आज कमीत कमी कारगिलला तरी पोहोचायचं ठरवलं होतं.
१३.
१४.
१५.
थोडा क्षीण कमी झाल्यावर आम्ही निघालो. रमत गमत आरामात जायला सुरुवात केली. फोटूला टॉपला चढायला सुरुवात केली तेव्हा नदीने आमची साथ सोडली होती, ती पुन्हा आमच्या साथीला आली. तीच नदी होती कि दुसरी ते नाही माहिती. पण बरोबर पाण्याचा प्रवाह असला कि छान वाटतं गाडी चालवायला. मधेच एके ठिकाणी काही ट्रक वाले नदी जवळ ट्रक धुताना दिसले. ते पाहून आमच्या साहेबांना पण गाडी धुण्याची हुक्की आली. संध्याकाळचे ४ वाजले असतील आणि कारगिल गाठायचं होतं म्हणून मी न थांबण्यासाठी भांडत होतो आणि हा बाबाजी उशीर झाला तरी चालेल पण गाडी धुवायची म्हणून अडून बसला होता. गाडी धुवून काही फायदा नाही परत धुळीने माखणार आहे हे किती तरी वेळा त्याला सांगितलं पण गडी ऐकेचना. शेवटी म्हंटल जा धु तुझी गाडी, मी थांबतो इथेच तुझी वाट बघत, मला नाही गाडी धुवायची. पण तेव्हा काय झालं कुणास ठाऊक, साहेब लगेच निघण्यासाठी तयार झाले पण थोडं चिडूनच. त्याचा पारा काही उतरला नव्हता. गाडीला किक मारली आणि गेला सुसाट पुढे निघून. मी आपला, तो दिसतोय इतक्या अंतराने गाडी चालवत राहिलो. पण एक घोळ झाला. गाडी चालवताना माझ्या लक्षात आलं कि मागच्या चाकात काही तरी आवाज येतोय. एकदा गाडी थांबवून पाहिलं पण काही कळलं नाही म्हणून पुढे जाऊ लागलो. तुषार एव्हाना बराच पुढे निघून गेला होता. मागच्या चाकातून आवाज येणे चालू होतेच. शेवटी एकदम खाड !!! खाड !!! खाड्याक !!!! असला काही तरी भयंकर आवाज आला आणि माझा तोल थोडा गेला. गाडी सांभाळली, लगेच थांबलो आणि नीट पाहू लागलो. सगळीकडे पाहताना नजर चेन वर गेली. तर तिच्यावर थोड्या थोड्या अंतराने कापडाचे तुकडे अडकलेले दिसले. नक्की काय झालं ते मला समजलं होतं. सॅडल बॅगचा एक बंद चेन मध्ये अडकून तुटला होता आणि त्याचे तुकडे तुकडे होऊन सगळ्या चेन मध्ये अडकले होते. हळू हळू चाक फिरवत एक एक तुकडा काढून टाकला. एक दोन तुकडे राहिले होते तेव्हड्यात तुषार परत येताना दिसला. तो आल्यावर झाला प्रकार सांगितला. तो आला तेव्हा त्याचा राग कमी झाला होता. पुन्हा सगळी चेन व्यवस्थित बघितली आणि एकही तुकडा मागे राहिला नाही याची खात्री केली. गाडीवर टांग टाकली आणि आम्ही दोघे पुढे निघालो. कारगिलला पोहोचे पर्यंत ५-५.३० झाले होते. तुषार म्हणाला जाऊ पुढे द्रास पर्यंत. पोहोचू आरामात. मग काय पेट्रोल भरलं आणि आम्ही लागलीच द्रास कडे प्रस्थान केले. कारगिल सोडल्यावर द्रासकडे जाताना एके ठिकाणी "Enemy is watching you" हा बोर्ड आहे, असं एका मित्राने सांगितलं होतं. रस्त्यावरिल पाट्यांकडे लक्ष ठेवूनच होतो. नदी साथीला होतीच. आम्ही दरीतून पुढे पुढे जात होतो आणि आमच्या उजव्या बाजूला नदी होती. रस्ता तसा बरा होता. असेच जात असताना आम्हाला तो बोर्ड दिसला. तो बोर्ड दिसला तेव्हा पासून नदीच्या पलीकडील डोंगरावरून खरच आपल्याला कोणी पाहत असेल का? हा विचार करू लागलो पण कोणीच दिसलं नाही. तोच विचार डोक्यात घोळत असताना दरी संपली आणि डोंगररांग लांब गेली. अंधार पडायला लागला तेव्हा आम्ही द्रासला पोहोचलो. द्रास !!! भारतीय सिमेवरचं सर्वात महत्वाचं ठिकाण. १९९९ मध्ये जिथे भारताने, पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिकून घुसखोरांना हाकलून लावले ते ठिकाण.
१६.
१७. कारगिल.
१८.
१९. द्रासकडे जाताना...
द्रास मधील हुतात्मा स्मारक पाहण्याचं आधीच ठरलेलं होतं पण ते दुसऱ्या दिवशी. संध्याकाळचे ७ वाजले होते त्यामुळे आधी राहण्याची आणि पोटपाण्याची सोय बघायला प्राधान्य होते. JKTDCची सोय होती पण तिथे आधीच बुकिंग फुल होतं. एका शाळेची ट्रीप आल्यामुळे एकही खोली रिकामी नव्हती. तिथल्या संस्थापकाच्या सांगण्यावरून जवळच्याच एका रस्त्यावरील हॉटेलचा पत्ता मिळाला. लगेच रस्त्यावर रात्रभर गाडी लावायची या विचाराने भुवया उंचावल्या आणि गाडीच्या सुरक्षेचं काय हा मोठ्ठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. तिथल्या तिथेच संस्थापाकाला विचारणा केली तर तो म्हणाला काही होत नाही. काळजी करू नका. पण आमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून शेवटी म्हणाला पाहिजे असेल तर आमच्या इथे आत आणून गाडी लावा. मी परवानगी देतो. तो असं म्हणाला तेव्हा बरं वाटलं आणि आम्ही हॉटेलचा पत्ता घेऊन तिथून बाहेर पडलो. JKTDC पासून ते हॉटेल जेमतेम ५०० मीटर वर असेल. गाडी लावून तुषार रूम पाहायला गेला. थोडा निराश होऊनच परत आला. पण काय करणार? नाईलाज होता म्हणून आम्ही रूम बुक केली. गाडी कुठे लावायची त्याला विचारलं तर हॉटेलवाला म्हणाला लावा इथेच बँकेच्या समोर. काही होत नाही. समोर पोलिस स्टेशन आहे. रात्रभर एक पोलिस बाहेर खुर्ची टाकून बसलेला असतो. काळजी नका करू. काही होत नाही गाडीला. हॉटेल मालकाचं म्हणणं पटलं आणि घेतल्या गाड्या वर. समान सोडून वर जाऊन बघितलंतर रूम एकदम अंधारी. त्या १० X १० च्या अंधाऱ्या रूम मधे मिणमिणत्या बल्बच्या उजेडात रात्र काढायची होती. सगळं आवरलं आणि फेरफटका मारायला बाहेर पडलो. हॉटेल जरी न आवडणारं असलं तरी हॉटेलचा मालक मात्र चांगला वाटला. माणुसकी नावाची चीज होती त्यात अस वाटलं. रूम मधून खाली आलो आणि पाणी प्यायला मागितलं. एक मुलगा लगेच शेजारिच जमिनीवर असलेल्या नळी मधून पाणी भरून घेऊन आला. पुढे.
मालक: ये जमीन से निकाली नेहर का पानी है! मिनिरल वाटर से भी अच्छा है!
मी: हां वो तो है! लेकिन उस नली को बंद क्यो नाही करते!
मालक: कोई जरुरत नही!. पुरा सिझन चालू रहा फिर भी पानी आना बंद नही होगा!
मी (मनात): कसं होईल. एवढा बर्फ वितळत असतो. चुकून जास्त वितळला तर "पाणीच पाणी चोहीकडे" म्हणावे लागेल तुला.
मी (वास्तवात): तो हम लोग गाडी धो लेते है! चलेगा क्या ?
मालक: हां हां जरूर, क्यो नही !
बास आम्हला हेच हवं होतं. लगेच वर जाऊन चाव्या घेऊन आलो. दोघांनीही आपापल्या गाड्या धुवून घेतल्या. गाड्या धुवून झाल्यावर दोनीही एकदम जवळ जवळ लावल्या. मी एक मोठी चेन आणि कुलूप घेऊन आलो होतोच. घातली दोनीही गाड्यांच्या चाकामधे साखळी आणि लावलं कुलूप. एकतर समोर एक पोलिस बसलेला आणि शिवाय साखळी घालून कुलूप लावलेलं. गाडी आता आमच्या नकळत कुठेही जाणार नाही याची शाश्वती झाली. हे सगळं झाल्यावर आम्ही फिरायला गेलो. येताना एका STD मधे जाऊन घरी ख्याली खुशाली कळवली आणि ऐकून पण घेतली. पुन्हा हॉटेल वर आलो. जेवलो आणि झोपलो.
सकाळी जाग आली ती रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या ट्रकच्या आवाजानेच. खिडकीतून बाहेर डोकावलं तर समोर पोलिस स्टेशनच्या मागे भला मोठ्ठा डोंगर दिसला. वरती असलेल्या छोट्या छोट्या शिखारांमुळे उन सावलीची नक्षी तयार झालेली. लगेच ती कॅमेरा मध्ये साठवून घेतली. पटकन सगळं आवरलं आणि आम्ही बाहेर पडलो. हुतात्मा स्मारक बघायला पुन्हा उलटा ६ km मागे गेलो. प्रत्येक भारतीयाने जाऊन बघावं असं ते स्मारक, १९९९ मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचं प्रतिक दिमाखात तिथे उभे आहे. आपले जवान प्रतिकूल परीस्थितीत कसे लढले, त्यांनी काय काय पावलं उचलली आणि यश मिळवून दिले याची शौर्यगाथा तिथे मांडलेली आहे. संग्रहालयात खूप गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्या तिथे जाऊनच बघाव्यात अशा आहेत (म्हणुन इथे फोटो दिले नाहित). त्यावेळच्या घडलेल्या घटना, आम्हाला एका सैनिकाने सांगितल्या. काल दिसलेल्या बोर्ड बद्द्ल त्याच्या कडे चौकशी केली तर म्हणाला तो असाच लावलेला आहे. LOC आणखी लांब आहे. चांगले २-२.३० तास तिथे सगळं बघण्यात गेले. तिथेच मग कॅन्टीनला पोट भर नाष्टा केला आणि पुन्हा रूमवर आलो. हॉटेलचा हिशोब मिटवला आणि द्रास मधून प्रस्थान केलं.
२०.
२१. स्मारकाकडे जाताना.
२२.
२३. मानाचा मुजरा...
२४.
२५.
आजचा दिवस श्रीनगरच्या नावावर केलेला. श्रीनगर फार काही लांब नव्हतं. निवांत पोहोचणार होतो म्हणून आरामात गाडी चालवत होतो. शेवटचं त्या निसर्गाला डोळ्यात साठवत पुढे जात होतो. परत या डोंगरदर्यां मध्ये भटकायचा योग लवकर येणार नाही याची जाणीव व्हायला लागली होती. दोनीही बाजूला उंचच उंच डोंगर आणि मधून जाणारे आम्ही दोघेच. छोट्या छोट्या चढउतारावरून मस्त हेलकावे घेत चाललो होतो. हवे तिथे थांबून मजा लुटत होतो. बघता बघता जोझी'ला' पासला पोहोचलो. हा शेवटचा पास आहे. या पुढे माणूस हळू हळू खाली उतरायला लागतो आणि समुद्रासपाटीच्या जवळ यायला लागतो. जोझीलाला थोडा वेळ गेला आणि आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर एक सैनिक वॉकी टॉकी घेऊन उभा राहिलेला दिसला आणि त्याने आम्हाला पुढे जाण्याचा इशारा केला. आणखी पुढे गेलो तर सगळ्या मोठ्या गाड्या ओळीने थांबलेल्या दिसल्या. गेट लागला होता. घाटात रस्त्यची रुंदी कमी असल्यामुळे आळीपाळीने गाड्या वर किंवा खाली सोडतात. जोवर वरचा सैनिक खालच्या सैनिकाला सांगत नाही तोवर. एकदा का वरच्या गाड्या खाली जायला लागल्या तर खालच्या गाड्या खालीच थांबतात. हेच पुन्हा उलटं, खालच्या गाड्या वर जायला लागलं कि करतात. यालाच गेट लागणे म्हणतात. गेट लागला कि १-२ तास एकीकडच्या ड्रायवर लोकांना बसून राहण्याशिवाय पर्याय नसतो. दुचाक्यांना याचा काही फरक पडत नाही. गेट लागलेला असला तरी दुचाकीस्वरांना (स्वतःच्या जवाबदारीवर) दुचाकी सकट पुढे जाऊ देतात. नेहमी प्रमाणेच कडेकडेने आम्ही एकदम पुढे गेलो. समोरून सैनिकी ट्रकांची एक रांग वर येताना दिसली. आम्ही थोडे पुढे जायचो आणि जागा बघून थांबायचो. एक दोन ट्रक पुढे गेले आणि जागा झाली कि पुन्हा पुढे जायचं. असं करत करत आम्ही खाली उतरलो. खाली उतरताना पुढे सोनमर्गचा रम्य नजरा दिसत होता. खाली उतरलो आणि आरामासाठी एके ठिकाणी थांबलो.
२६.
२७.
२८.
२९.
३०.
३१.
३२.
३३.
३४.
३५.
३६.
३७.
३८. वरिल फोटो (३७) मधील बर्फाच्या कडेला झुम केलं तर मेंढरं चरताना दिसली.
३९.
४०.
४१. पाणी वाहुन रस्त्यात चिखल झाला होता. ८ दिवसापुर्वी दरड कोसळुन घाट रस्ता बंद झाला होता तो नुकताच २ दिवस आधी वाहतुकीसाठी खुला केला होता.
४२. खाली जाण्याची वाट बघताना.
नदी पुन्हा आमच्या साथीला आली होती. थोड्या वेळाने तिथून निघालो. प्रवासात आम्ही मागे पुढे नेहमीच व्हायचो. कधी तो पुढे कधी मी. या वेळी मी पुढे होतो पण तो आरशात दिसत राहील, एवढं अंतर ठेवून होतो. रस्त्यावर मेंढरं घेऊन एक जण चालला होता. मेंढररांनी सगळा रस्ता व्यापून टाकला होता. गाडीचा कर्कश हॉर्न वाजवून सुद्धा ती बाजूला होत नव्हती. कसा बसा कडे कडेने मी त्यातून पार झालो. आरशात पाहिलं तर तुषारची तीच परीक्षा चालू होती. त्याची वाट बघत मी हळू हळू पुढे जात राहिलो. तर पुढे पुन्हा तेच. रस्त्यावर सर्वत्र मेंढरांच राज्य होतं. एपिसोड पुन्हा रिपीट टेलीकास्ट झाला. पण या नादात, माझी तुषारवर असलेली नजर हटली. मी पुढे गेलो तरी याचा पत्ता नाही. हा गडी पुन्हा अडकला असणार, येईल थोड्या वेळात असं समजून मी पुढे जात राहिलो. पुढे आणखी एक प्राणी रस्ता अडवून आरामात चालला होता. यावेळी घोडे होते. समोरून ट्रक आलेला त्यामुळे रस्ता जाम झाला होता. तो घोड्यांचा तांडा ओलांडून मी पुढे जात राहिलो. पुन्हा त्याच समजात कि तुषार येईल थोड्या वेळात. पण कसलं काय...??? तुषारचा कुठे पत्ताच नव्हता. आरशावर नजर ठेवत मी चांगला १-२ km पुढे गेलो पण हा आलाच नाही. शेवटी मग त्याची वाट बघत एके ठिकाणी थांबलो. ५, १०, १५, २० मिनिटे झाली तरी हा गायब. मग मात्र माझा संयम संपला आणि मी गाडी मागे फिरवली. त्याला बघत बघत पुन्हा उलटा जाऊ लागलो. डोक्यात शंभर विचार चालू झाले. कुठे गेला असेल? पडला कि काय कुठे? नदीत तर पडला नसेल? अशा ढीगभर विचारांनी काहूर माजवलं डोक्यात. वाटेत एका गुराख्याला माझ्या सारखा आणखी एक प्राणी दिसला का याची चौकशी केली पण नाहीच. बाबाजी कुठे गेले होते काय माहिती? शेवटी ठरवलं. जिथे आरमासाठी थांबलो होतो तिथ पर्यंत पुन्हा जायचं आणि हळू हळू शोध घेत पुन्हा यायचं. सुसाट निघालो आधीच्या थांबलेल्या जागेकडे. तिथ पर्यंत पोहोचलो. तिथे दोन सैनिक होते त्यांच्या कडे विचारपूस करत असतानाच त्यांनी उलट्या दिशेने माझ्या मागेच बोट दाखवले आणि मला तुषार दिसला. शिव्यांचा वर्षाव करतच त्याच्याकडे गेलो. तिथे पोहोचलो आणि पुढे:
मी: कुठे तडफडला होतास बे ?
तुषार: रिवर राफ्टींग बघत रिसोर्टपाशी थांबलो होतो. तुला परत उलटं जाताना पाहिलं आणि ते सोडून तुझ्या मागे आलो.
मी: साल्या !!! इथे माझी वाट लागलेली. कुठल्या दरीत जाऊन उलथलास हे पाहायला परत आलो होतो.
तुषार: अबे!!! होर्न वाजवत तुला थांबण्याचं सांगत होतो. त्या हॉर्नचा आवाज ऐकून रस्त्यावरची लोकं पण वैतागली. पण तुझ लक्ष कुठे होतं? सुसाट उलटा चालला होतास.
मी: तू कुठे धडपडलास ते बघायचं कि माझ्या मागे कोण हॉर्न बडवत येतोय ते बघायचं.
तुषार: फुकट ५ km मागे यायला लावलंस.
मी: आता घरी जाता जाता असले उद्योग नको. उगा डोक्याला ताप साला !!!
अजूनही बरच तोंडसुख घेतलं त्याच्यावर पण असो... आम्ही परत निघालो. सोनमर्ग मध्ये पोहोचलो होतोच. एक मस्त चहा घेऊन मग पुढे जावं यावर एकमत झालं म्हणून तिथे थांबलो. एका टपरी वर चहाची ऑर्डर दिली आणि तिथलं सौंदर्य न्याहळत बसलो शिवाय गप्पा हि चालू होत्याच. सोनमर्ग खरच मनाला भावलं. पुन्हा इथे घरच्या मंडळींना घेऊन चांगले ४-५ दिवस यायलाच पाहिजे असे वाटून गेले. आणखी थोडा वेळ तिथे गेला आणि मग आम्ही तिथून निघालो. थोडेच पुढे गेलो असू तेव्हा तुषार म्हणाला इतक्या दिवसात नदी एवढ्या जवळ असताना आपण एकदाही थांबून नदीत उतरलो नाही. हि वेळ पुन्हा येणार नाही. बस मग काय !!! लगेच थांबलो. जागा बघून गाड्या बाजूला लावल्या आणि उतरलो नदीत. थोडा वेळ घालवला आणि निघालो. बाहेर पडताना मी काही गोटे आठवण म्हणून बरोबर घेतले (घरी असलेल्या फिशटँक मधे ठेवलेत). आता कुठेही थांबायचं नव्हतं. रस्ता झक्कास होता. दऱ्याडोंगर बघत, वळणावळणाच्या चकचकीत रस्त्याने वारा कापत पुढे जात रहाणे. अहाहा!!! काय सुख होतं ते. तिथून निघाल्यापासून एकाही गाडीला आम्ही ओवरटेक करू दिले नाही. श्रीनगर जवळ आलं तेव्हा थोडा वेग मंदावला. खूप दिवसांनंतर एक मस्त राईड मिळाली.
४३.
४४.
४५. चुकमुक होण्याआधी थांबलो होतो ति जागा
४६. मि त्याची शोधाशोध करत असताना, आमचा प्राणी हे बघत बसला होता.
४७. खळखळाट... हे बघुन आम्हि येथे थांबलो...
४८. विश्रांती.
४९.
५०.
श्रीनगर मध्ये खूपच लवकर पोहोचलो. श्रीनगर मधे राहणार असाल तर नगिन लेकला रहा असा सल्ला आम्हाला लेह मध्ये भेटलेल्या राहुलने दिला होता. तसं चौकशी करत आम्ही नगिन लेकला पोहोचलो. तिथे हॉटेल असं एकही नव्हतं. सगळ्या हाउसबोट्स. रेट विचारला तर १५०० सांगितला. आयला ८-१० तास घालवायचे त्यासाठी १५०० जास्तच होते. नुसता मुक्कामच तर करायचाय. उद्या सकाळी इथून निघणार आहोत. कशाला फुकट १५०० घालवायचे? हाउसबोट मधे राहायची हौस बायको बरोबर पूर्ण करू असा विचार केला आणि तिथून निघालो. वेळ पुष्कळ होता. आता चौकशी सुरु झाली दलसरोवराची. गल्ली बोळातून मार्ग काढत काढत तिथे पोहोचलो. वाटलं जगप्रसिद्ध दल सरोवराजवळ मुक्काम करू आणि होडीने त्यात फिरू. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. सोनमर्गवरून आल्यामुळे त्या सरोवराजवळ आम्ही उत्तरेकडे पोहोचलो होतो. हॉटेलची विचारपूस केली तर एकही गड्याला नीट सांगता येईना. सरोवराच्या वरील अर्धगोला भोवती ४-५ वेळा फिरून झालं पण हॉटेल काही मिळेना. एका टोकाला विचारलं तर तो दुसऱ्या टोकाकडे असेल म्हणून सांगायचा. ५-६ km गाडी चालवून तिकडे गेलो तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात परत उलटे जावा असं उत्तर मिळालं. पुन्हा उलटं गेलो. फिरून फिरून भोपळे चौकात अशी गत झाली. इकडचे लोक तिकडची माहिती सांगायचे आणि तिकडचे लोक इकडची माहिती सांगायचे. एकी कडून दुसरीकडे करण्यात दोन तास गेले. तिथल्या (मंद) माणसांना एकही हॉटेलचा पत्ता नीट सांगता येईना. एवढ्या मोठ्या सरोवराजवळ एकही हॉटेल नाही मिळत म्हणून दोघांचीही चिडचिड झाली होती. शेवटी ठरवलं मरू देत सरोवर. आपण हायवेलाच थांबू आणि सकाळी लगेच निघू. म्हणून मग दक्षिणेकडे मोर्चा वळवला. रत्यावर जाताना पाटी दिसली 'दल गेट'. पुढे जाऊन बघतो तर काय हॉटेलची मोठी रांगच होती. ओळीने भरपूर हॉटेल्स. अगदी पाहिजे तशी. शिवाय सरोवरामध्ये हाउसबोट्स पण ओळीने लागलेल्या.
५१. दल सरोवरामधे ओळीने थांबलेल्या हाउसबोट्स.... रात्री चक्कर मारताना काढला.
आयला 'दल गेट'ला जावा असं सागायला त्यांची काय जीभ जड झाली होती कुणास ठाऊक? एक दोन हॉटेल्स बघितले आणि आम्हाला ५०० रुपड्यांमध्ये एक चांगली रूम मिळाली. जीव भांड्यात पडला. पण या सगळ्यात २-२.५ तास गेले त्यामुळे दल सरोवरात हिंडायचे राहून गेले. झटपट सगळं आवरलं आणि लेक भोवती फेरफटका मारायला निघालो. हाउसबोट्सच्या एजंट्सचा सुळसुळाट झालेला अनुभवला. कडेकडेने फिरत असताना कमीत कमी १०-१५ जणांनी हाउसबोट्स पाहिजे का? हा प्रश्न विचारला. त्यांना नको नको म्हणताना नाकी नऊ आले. अखेर थोडं लांब पर्यंत गेल्यावर आम्ही परत माघारी फिरलो आणि एका हॉटेल मध्ये जेवायला गेलो. मस्त पंजाबी थाळी होती. कडाडून भूक लागली होती. दणकून हाणले सगळे पदार्थ आणि तृप्त होऊन तिथून बाहेर पडलो. पुन्हा दलच्या कडेने चक्कर मारत हॉटेलवर आलो. चक्कर मारताना घरच्या रिपोर्टिंगच काम उरकून घेतलं. दिवस मजेत संपला. झालेल्या प्रवासाची गोळाबेरीज करत झोपी गेलो.
क्रमश:
सकाळी सगळं आवरून निघायला ९.०० वाजले. ज्यासाठी आलो होतो तो उद्देश पूर्ण झाला होता. अमरीत्सर पहायचा मानस होता पण वेळे अभावी तो रद्द केला. त्यामुळे आता लवकरात लवकर आणि सुखरूप घर घाठायचं होतं. श्रीनगर सोडलं आणि सुरु झाला परतीचा प्रवास. शहर सोडलं आणि पुढे एका पेट्रोल पंपावर थांबून गाडीची पेटपूजा उरकून घेतली. एकदा का तिची मेजवानी झाली कि दिवसभर ती कसलाही ताप देणार नाही याची आता पर्यंतच्या प्रवासात खात्री पटली होती. आज आम्ही पठाणकोटला मुक्काम करायचं ठरवलं होतं. श्रीनगर - पठाणकोट अंतर आहे साधारण ३५० km. पण मधला उधमपूर-सांबा मार्ग सोडून जम्मू मार्गे गेलं तर ५० km अंतर वाढतं. ५० km जास्त अंतर पडलं तरी चालेल पण रस्ता चांगला असेल म्हणून जम्मू मार्गे जायचं ठरवलं होतं. काय करणार खडकाळ भागातून गाडी चालवण्याचा कंटाळा आला होता. असो... तर आम्हाला एकूण ४०० km अंतर कापायचं होतं ज्यात सर्वात मोठा अडथळा होता या मार्गावर असलेला २५० km चा घाट, जो सतत वाहता असतो. श्रीनगरला जम्मूशी आणि इतर अख्या देशाशी जोडणारी लाईफ लाईनच म्हणा ना. आम्ही श्रीनगर सोडून ५०-६० km आलो असू आणि तोच सुरु झाला वळणा वळणाचा प्रवास. हळू हळू वर जात असताना दिसलं कि थोड्या थोड्या अंतराने CRPF चे जवान पहारा देत होते. दर १०० - २०० मीटर नंतर एखादा तरी जवान दिसत होताच. यावरून हा घाट किती महत्वाचा असेल याची कल्पना येते. आम्ही थोडे वर पोहोचलो तेव्हा मागे वळून पहिलं तर बोर्ड दिसला "First view of Kashmir valley". पण आमच्यासाठी तो "Last view of Kashmir valley" ठरला होता. लगेच तुषारला थांबण्यासाठी खुणावलं आणि गाड्या बाजूला घेतल्या. डोळेभरून ते दृश्य पाहिलं. मधे मधे त्या पॉईंटवर असलेला, तिथला टोप्यांचा व्यापारी आम्हाला काश्मिरी टोपी विकत घेण्यासाठी खूप त्रास देत होता. पण आम्हाला काय तो टोपी घालू शकला नाही. त्याच्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आम्ही "The Kashmir valley"च डोळेभरून दर्शन घेतलं आणि तिथून निघालो.
१. लास्ट व्ह्यू ऑफ काश्मीर १
२. लास्ट व्ह्यू ऑफ काश्मीर २
जसे जसे पुढे गेलो तसा आम्हाला समोर दिसला जवाहर टनल. शेजारी शेजारी, कमी रुंदी असलेले, साधारण २ ते २.५ km लांब असलेले दोन भोगदे. रुंदी इतकी कमी कि भोग्द्यात कोणत्याही गाडीला ओवरटेक करता येत नाही. ते अंधारी भोगदे ओलांडले आणि खऱ्या अर्थाने आम्ही काश्मीरला मागे टाकले. अजून खूप अंतर जायचं होतं. वळणा वळणाच्या रस्त्यावर कुठेही दुभाजक नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा (जास्त करून ट्रकांचा) अंदाज घेत एक एक गाडी ओलांडून पुढे जात होतो. एका नंतर एक डोंगर चढून उतरत होतो. हा खेळ दुपारी १.३० पर्यंत चालला होता. सकाळी निघाल्या पासून काही खाल्लं नव्हतं, शिवाय काश्मीरच दर्शन घेतल्या नंतर कुठेही थांबलो नव्हतो. अखंड २-२.५ तास गाडी चालवून झाल्यावर शरीर थांब थांब म्हणून ओरडायला लागलं म्हणून मग एक चांगला ढाबा बघितला आणि थांबलो. सणकून भूक लागली होती. मसुराची उसळ, भरपूर लोणी लावलेली रोटी, भात आणि डाळ. जोडीला कांदा आणि लोणचं. वाह!!! मस्त मेनू होता, पोटभर जेवलो. जेवण झाल्यावर तिथेच झोपावं अशी इच्छा झाली पण आमच्या मेंदूने ती कृतीत उतरू दिली नाही. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. घरी फोन करून हालहवाल कळवला गेला. साधारण तासभर तिथे थांबलो आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. लेह मधल्या नुसत्याच मातीच्या आणि खडकाळ, भकास डोंगरांची जागा आता हिरवाईने नटलेल्या, जीवनाने ओथंबून वाहणाऱ्या डोंगरांनी घेतली होती. दरीत वाहणारी ती सरिता मात्र अजून बरोबर होती. तिच्या साथीने प्रवास करता करता एकदम ती गायब झाली.
३. खळखळाट
४.
आम्ही डोंगर माथ्यावर पुन्हा चढायला लागलो. बघता बघता पटनी टॉप आला (हिल स्टेशन) आणि मागे गेला. २ तास प्रवास केल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो. न थांबता, गाडी डोंगर दऱ्यातून पिळत होतो. त्यामुळे ती चांगलीच गरम झाली होती. १० - १५ मिनिटे थांबून ती शांत झाल्यावर तिथून निघालो. साधारण ४-४.३० वाजले तेव्हा आम्ही उधमपूर जवळ पोहोचलो. जम्मू अजून दृष्टीपथात पण नव्हतं. पठाणकोटचा मुक्काम हुकणार यावर शिक्कामोर्तब झालं. तरी जम्मू ओलांडून पुढे जमेल तिथ पर्यंत जाऊ असं ठरवलं. हळू हळू घाट रस्ता कमी होऊ लागला आणि आम्ही पठारावर यायला लागलो. परत तासा भाराने एके ठिकाणी चहाब्रेकसाठी थांबलो आणि जम्मूच्या बायपासची चौकशी केली. शिवाय राहण्यासाठी कुठे व्यवस्था होईल याची हि माहिती घेतली. ज्या ट्राफिक इंस्पेक्टरला विचारलं त्याने जम्मू पासून १७ मैलावर, "१७ miles" असं हॉटेल आहे त्याची माहिती दिली. तडक आम्ही त्या दिशेने निघालो. थोड्याच वेळात जम्मू बायपासला पोहोचलो. जम्मू ओलांडताना सूर्यदेव आपलं दिवसाचं काम आटोपतं घेऊ लागले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. आम्हाला शोधायचं होतं "१७ miles". जम्मू पासून रस्ता एकदमच चकाचक होता. सुसाट निघालो आणि हॉटेल जवळ पोहोचलो. त्या हॉटेलचं बाहेरील रूप पाहूनच तुषार म्हणाला, "हे आपल्या कामाचं हॉटेल नाही". "बघू, चौकशी तर करू, हे नाही तर दुसरं", असं म्हणत मी गाडी लावली आणि आत गेलो. हॉटेल मधल्या सुंदरीने खोट्या हास्यवदनाने स्वागत केलं आणि माहिती द्यायला सुरुवात केली. तिचं पाहिलं वाक्य होतं. "एका खोलीच कमीत कमी भाडं ४५०० रुपडे फक्त" (फक्त, हे विशेषण फक्त हॉटेल मालकांसाठी आणि त्या मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असतं). बास हे ऐकल्यावर माझ्या कानातले अदृश्य फिल्टर चालू झाले आणि पुढची तिची सगळी वाक्य गाळू लागले. त्यामुळे पुढे ती काय बोलली यातला एकही शब्द मला आठवत नाही. ती काही तरी बोलत होती एवढच काय ते आठवते. मी पण तिच्या सारखच तितक्याच हास्यवदनाने, ती जे काही बोलते आहे ते ऐकतो आहे, असा आव आणत होतो. डोक्यात वेगळेच विचार चालू होते. "च्यायला!!!, आम्ही १५०० ला सुद्धा टांग देतो आणि ४५०० तुझ्या डोम्बल्यावर कधी मारणार???", वगैरे वगैरे. ५ मिनिटांनी ती गप्प बसली आणि मी बाहेर पडलो. तुषार बाहेरच थांबला होता. त्याला जे झालं ते सांगितलं आणि आम्ही तिथून निघालो. अंधार पडला होता आणि आम्हाला लवकरात लवकर रूम शोधायची होती. रस्त्यावर चौफेर नजर फिरत होती. एके ठिकाणी आश्रमाची पाटी दिसली. पण रोड पासून २ km आत होतं म्हणून तुषार नको म्हणाला. असेच पुढे जात राहिलो पण हॉटेल काही मिळेना म्हणून मग सांबा पर्यंत जाऊ असे ठरले. सांबा आल्यावर हायवेलाच एक हॉटेल दिसलं. बाहेरून आणि आतून बरं वाटलं आणि मुख्य म्हणजे बजेट मध्ये होतं. ६०० रुपयात रूम मिळाली आणि आम्ही लगेचच आमच्या प्रायवेट विधानसभे मधे हॉटेलच बिल पास केलं. सगळं समान वर नेऊन टाकलं. फ्रेश झालो आणि जेवण्यासाठी बाहेर पडलो. मालकाने सांगितलेल्या जवळच्याच एका ढाब्यावर गेलो. जेवलो आणि रूम वर आलो. चार पाच दिवसांचा हिशोब राहिला होता तो केला आणि दिलं अंग झोकून. दिवसभर अखंड प्रवास करून क्षीण आला होता. बेडवर पडल्या पडल्या निद्रादेवीच्या आधीन झालो.
सकाळी लवकर उठलो आणि ७.०० - ७.३० लाच हॉटेल सोडलं. आज चंडीगडला लवकर पोहोचून गाडी सर्विसिंग करून घ्यायची होती. सांबा पासून चंडीगड होतं ३०० km आणि सगळा चकचकीत टार रोड. रस्त्याच्या दुतर्फा हिरीविगार पसरलेली शेती. काय मस्त वाटत होतं गाडी चालवताना. हवेतला गारवा मी म्हणत होता आणि आम्ही सुसाट पुढे निघालो होतो. मनात म्हणालो "हा आजू बाजूचा टवटवीत परिसर पुन्हा बघायला मिळणार नाही", तसे लगेच होतो तिथे तुषारला थांबायला सांगितलं. १०-१५ मिनिटे उगीचच थांबलो आणि मग पुढे निघालो. साधारण १० वाजता जेव्हा पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा नजर रस्त्यावर कमी आणि आजूबाजूच्या ठेल्यांवर जास्त जाऊ लागली. अचानक समोर MacD चा बोर्ड दिसला आणि गाड्या आपोआपच त्या दिशेने वळवल्या. खूप दिवसांनंतर MacDत जाऊन बर्गर खायला मिळणार होता. इतर MacD प्रमाणेच हे हि होतं, काहीही नाविन्य नाही. पंजाबात काय आणि पुण्यात काय, इथून तिथून सगळे MacD सारखेच. मस्त दोन दोन बर्गर हाणले आणि निघालो. पंजाबच्या रस्त्यावरून जोरात गाडी चालवत होतो. या वेळीहि आम्ही, एकही गाडी पुढे जाऊ दिली नाही. एक एक गाव मागे टाकत पुढे जात असताना एका पट्यात रस्त्याच्या दोनीही बाजूला संत्र्यामोसम्बाच्या बागा लागल्या. आपसूकच गाडीचे ब्रेक लागले गेले आणि एका बागे बाहेर असलेल्या रसवंतीगाडी जवळ आमची गाडी थांबली. दोन दोन ग्लास ताजा मोसंबी रस पिउन झाला आणि मग आम्ही निघालो.
४. पंजाब मधील सकाळ
५.
६.
७.
८.
आम्ही निघालो ते थेट चंडीगड मधेच थांबलो. साधारण दुपारी १ ला आम्ही चंडीगडला पोहोचलो. ३०० km अंतर तीन वेळा थांबून ६ तासात कापलं. तिथे पोहोचलो आणि गाडी थेट सर्विस सेंटरला घेऊन गेलो. या वेळी शोधाशोध करायची भानगड नव्हती. गाड्या सर्विसिंगसाठी सोपवल्या आणि कृष्णाला, आम्ही पुन्हा छळायला आल्याची वर्दी दिली. गाडीचं काम होई पर्यंत ३-४ तास जाणार होते म्हणून मग तिथून बाहेर पडलो. दोन बर्गर वर तग धरण्याची ताकत नसलेले पोट पुन्हा भरण्यासाठी हॉटेल शोधू लागलो. पण त्या सेक्टर मध्ये एकही हॉटेल मिळेना. जिथे तिथे गाडीची सवय असलेले पाय किती वेळ चालणार हो!!! थोडे भटकून झाल्यावर शेवटी एके ठिकाणी रस्त्यावरच छोले-भटुरे विकणारा एक ठेला दिसला. तुषारला भूक नव्हती पण मला काही राहवेना. तिथेच फुटपाथ वर बसलो आणि ऑर्डर दिली. एका नंतर एक गरम गरम भटुरे पानात पडू लागले. छोले संपले कि तो कप्पा पण लगेच भरत होता. मस्त गरम गरम ७-८ भटुरे हाणले तेव्हा कुठे पोटोबा शांत झाले. शेजारीच असलेल्या ड्रम मधून पाणी घेतलं. थोडं हात धुवायला वापरलं आणि उरलेलं पिउन टाकलं. अहाहा !!! किती बरं वाटलं तेव्हा.. सुख सुख म्हणतात ते असं असतं. तिथून निघालो, ATM शोधलं, पैसे काढले आणि सर्विस सेंटरला स्वारी पुन्हा हजर झाली. एव्हाना ५ वाजले होते. आमची घोडी खरारा करून स्वच्छ अंघोळ घालून तयार झाली होती. आपली गाडी चकचकीत बघितली कि खूप छान वाटतं. तिथला सगळा हिशोब मिटवला आणि कृष्णाच्या घरी गेलो. परत आल्याचं पाहून त्याला खूप आनंद झाला. शिवाय एक दिवस त्याच्याकडे मुक्काम करण्याचं वचन आम्ही पूर्ण करणार म्हणून गडी आणखी खूष होता. निवांत गप्पा मारत संध्याकाळ गेली. हॉटेल मध्ये जाऊन 'बसण्यापेक्षा' घरीच 'बसायचं' ठरलं. मग घरी बसण्यापेक्षा घरा सारखीच त्याच्या एका मित्राची रूम होती. तिकडे मुक्काम करायचं ठरलं. उगाच त्याच्या घरच्यांना कशाला त्रास. त्या प्रमाणे सगळं जेवण रूमवर मागवून आरामात जेवण केलं. रात्री ३ - ४ वाजता कधी तरी झोप लागली.
आता एवढ्या उशिरा झोपल्यावर सकाळी कोणी लवकर उठतं का? आरामात १० ला उठलो. सगळं आवरून कृष्णाकडे जायला १२.०० वाजले. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि वहिनीच्या हातचं मस्त जेवण करून आम्ही चौघे बाहेर पडलो. दोनीही बुलेटला सुट्टी देऊन त्यांच्या गाड्यांना थोडी तसदी दिली. चंडीगड मधे फेरफटका मारला. संध्याकाळी चंडीगड मधील एक दोन ठिकाणं बघायचं ठरवून, दुपारी मित्राच्या रूम वर आलो. पण नियतीने काही वेगळंच ठरवलेलं होतं. गेल्या १०-१२ दिवसात ज्याची आम्हाला आठवण सुद्धा आली नव्हती, त्याने त्याचं अस्तित्व दाखवायचं ठरवलं आणि त्या प्रमाणे दुपारी ३.०० नंतर अंधारून यायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात तो मोठ मोठे टपोरे थेंब घेऊन कोसळायला लागला. चांगले २ - ३ तास त्याचा थयथयाट चालू होता. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट एवढेच काय ते आवाज ऐकू येत होते. फेरफटका तर लांबच राहिला पण घरा पासून ५ फुट बाहेर सुद्धा पडता आलं नाही. पूर्ण संध्याकाळ घरी बसून घालवावी लागली. अखेर तो उघडल्यावर पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही बाहेर पडलो. जेवण करून घरी आलो आणि झोपलो. चंडीगड फिरायचं राहून गेलं.
वारीच्या परतीचा प्रवास अंतिम टप्यात आला होता. चार - पाच दिवसात घरी जाऊ असं लेह मधे असतानाच ठरवलं होतं. त्या प्रमाणे एक दिवस गेला होता आणि आणखी चार दिवस उरले होते. आज जयपूर पर्यंत जायचा बेत होता. त्या प्रमाणे सकाळी लवकर उठून आवरलं आणि ७ - ७.३० लाच आम्ही बाहेर पडलो. चंडीगडच्या वेशी पर्यंत कृष्णा सोडायला आला होता. तिथून पुढे तो कामाला गेला आणि आम्ही राजधानीकडे कूच केले. १५ दिवस आधीचा पावसाळी अनुभव लक्षात घेता हरयाणाच्या गावा-गावातून वाट काढत, खड्यांचे धक्के खात जाण्यापेक्षा दिल्ली मार्गे जायचा निर्णय घेतला होता. पानीपत पर्यंत रोड ओळखीचा होता त्यामुळे सुसाट निघालो होतो. पुन्हा ८०-९०-१०० ने गाडी हाकायला सुरुवात झाली. दोन काळ्या बुलेट दिसेल त्या गाडीला मागे टाकत पुढे मार्गक्रमण करत होत्या. आदल्या दिवशी धो-धो पडलेल्या पावसाने आज मात्र उघडीप घेतली होती त्यामुळे हायसं वाटत होतं. पानिपत ओलांडून पुढे आलो आणि नवीन परिसर चालू झाला. पाण्याने भरलेले ढग नाहीसे झाले पण पावसाळा चालू असल्यामुळे चहूकडे हिरवळ दिसत होती. अशा वातावरणात प्रसन्न मनाने सलग २-३ तास गाडी चालवल्या नंतर पोटोबा गप्प कसे बसतील. मग त्यांना शांत करण्यासाठी एका ढाब्यावर थांबलो. भरपेट नाष्टा केला. दुपारी २-३ वाजे पर्यंत तरी काही लागणार नाही एवढं खाल्ल्यावर तिथून लगेच निघालो. पुन्हा तोच अखंड प्रवास चालू झाला. कुठेहि कुणासाठी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. काम फक्त एकच, "सपाट रस्त्यावर सुसाट गाडी चालवणे". बघता बघता दिल्ली आली आणि तिने आमचं स्वागत केलं.
९.
दिल्लीत पोहोचल्यावर रस्ता शोधणे सुरु झाले. दर दोन चौकात विचारपूस करून करून शेवटी एकदाचा NH८ सापडला आणि जीव भांड्यात पडला. चंडीगड पासून दिल्ली पर्यंत टोल रोड होता त्यामुळे रस्ता चकाचक आहे. तीच तऱ्हा NH ८ ची. पुन्हा वेगाने आमचं डोकं काबीज केलं आणि आम्ही वाऱ्या बरोबर उडू लागलो. सकाळी ७ ला निघाल्यावर १० ला नाष्ट्याला थांबलो होतो. तिथून ११ ला निघालो आणि दिल्ली ओलांडून पुढे कुठेही न थांबता दुपारी ३ वाजे पर्यंत गाडी चालवली. कुठेतरी जेवयचचं आहे म्हणून मग एक चांगलं हॉटेल बघितलं आणि थांबलो. चांगला तास भर आराम केला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. ठरल्या प्रमाणे जयपूरला पोहोचणारच होतो. संध्याकाळचे ५ - ५.३० वाजले असतील तेव्हा आम्ही जयपूर जवळ पोहोचलो. जयपूर मध्ये प्रवेश केला आहे असं वाटत असतानाच रस्त्यावरचे दगड वेगळीच कथा सांगू लागले.
१०.
इतका वेळ दर चार दोन किमी ने आम्हाला सगळ्या दगडांवर NH८ लिहिलेलं दिसत होतं ते अचानक NH ११ दिसू लागलं. ४-५ किमी पुढे गेल्यावर माझी ट्यूब पेटली. जोरात गाडी चालवण्याच्या नादात कधी NH८ सुटला आणि NH ११ लागला कळलंच नाही. मी तुषारला रस्ता चुकलो आहोत हे खुणावलं. लगेच थांबलो आणि किशनगड रस्त्याची चौकशी सुरु झाली. रस्ता विचारण्यासाठी १०० वेळा थांबून, गल्ली बोळातून मार्ग काढण्यात बराच वेळ गेला. ते अख्खं गुलाबी शहर ओलांडताना ६.०० वाजून गेले. पुन्हा जेव्हा NH ८ असलेला दगड दिसला तेव्हा बरं वाटलं. अंधार पडायला सुरुवात झाली होती. किशनगड आणखी १०० km होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि दोघांच्या डोक्यात एकच विचार आला. "किशनगडला जायचं का ?" ( याला म्हणतात टेलीपथी). दोघांचेहि डोळे चकाकले आणि गाड्या किशनगडकडे धावू लागल्या. किशनगडला पोहोचायला आणखी किमान सव्वा ते दीड तास लागणार होता. पण त्यात दोन फायदे होते. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी १०० km कमी गाडी चालवायची आणि दुसरं म्हणजे हॉटेल शोधायची भानगड नाही, 'लेह'ला जाताना ज्या हॉटेल मध्ये थांबलो होतो त्याच हॉटेल मध्ये पुन्हा थांबायचं होतं. सूर्य मावळला होता पण गाडी चालवायचा उत्साह मात्र मावळला नव्हता. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला नुसतेच ट्रक धावत असताना दोन बुलेट त्यांच्या मधून सरशी साधून पुढे झेपावत होत्या. कधी त्याला वाट दिसण्यासाठी किंवा वाहन ओलांडण्यासाठी मी लाईट दाखवून मदत करायचो, कधी तो मला मदत करायचा. सुमारे तासभर हा खेळ चालू राहिला आणि मग आम्ही दिवसाअखेर साधारण ६२५ km गाडी चालवून हॉटेलला पोहोचलो. रूम बुक केली. या वेळी रूम मधे कुठेही किडे नव्हते. ते बघून झोप शांत लागणार याची शाश्वती मिळाली. मस्त पंजाबी जेवण घेतलं, रूमवर येउन हिशोब केला आणि झोपलो.
सकाळी लवकर उठलो आणि आदल्या दिवशी सारखच ७.०० - ७.३० ला निघालो. आजचा मुक्काम होता हलोलला. जिथे आम्ही 'लेह'ला जाताना राहिलो होतो ते गाव. आधीच्या त्याच "हॉटेल राजधानी" मध्ये रहायचं ठरवलं होतं. एवढी भूक नव्हती म्हणून नाष्टा न करताच निघालो. रोड माहितीचाच होता. रमत गमत जाण्यात मला काही तथ्य वाटलं नाही आणि त्यालाही तसा फारसा इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आपसूकच इकडे तिकडे न बघता दोघेही जोरात निघालो होतो. मनमुराद गाडी चालवण्याचा आनंद आम्ही दोघेही लुटत होतो. आत्ता पर्यंतच्या प्रवासात दोघांपैकी एकालाही गाडी चालवण्याचा कंटाळा आला नव्हता. अर्थात काही वेळा आला पण तो तात्पुरता त्या ५-१० मिनिटांपूरताच. पुन्हा तो धूम पळून जायचा आणि आम्ही गाडी पुढे रेटायला मोकळे असायचो. सलग ३-४ तास गाडी चालवल्यावर आम्ही एका ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबलो. वारीला निघताना इतरांनी आणि घरच्यांनी भरपूर सूचना दिल्या होत्या. त्या पैकी "राजस्थान मधून जाणारच आहात तर "दाल-बाटी" नक्की खा असा प्रेमळ सल्ला वजा धमकी" बायकोने दिली होती. जाताना हा बेत काही जमला नव्हता म्हणून तो आत्ता साधायचा ठरवला आणि मी "दाल-बाटी"ची ऑर्डर दिली. तुषारला त्यात काही रस नव्हता म्हणून त्याने नेहमी सारखंच डाळ भात आणि रोटी आणायला सांगितलं. उभ्या जन्मात मी कधी दाल-बाटी खाल्लं नव्हतं, फक्त ऐकून होतो, त्यामुळे कुतुहूल होतच. एक पोऱ्या, ५-६ कणकीचे मोठे गोळे असलेली थाळी घेऊन आला आणि माझ्या समोर ठेवून गेला. मी आपला घुम्या सारखा हे काय आणून ठेवलं समोर, असं म्हणून याचं करायचं काय? हे खायचं कसं? याचा विचार करू लागलो. शिवाय त्यातला एक गोल हातात घेऊन खेळू लागलो. तुषारचा डाळभात येई पर्यंत हातातला गोळा अर्धा केला. एक त्याला दिला आणि एक स्वतः खाऊ लागलो. अर्धा खाल्ला म्हणून काय? सगळेच कोण असं खाणार होतं? मी ढाब्याच्या मालकाकडे प्रश्नार्थक नजरने पाहू लागलो. बहुदा माझी मनस्थिती त्याला कळली असावी. त्याने लगेच पोऱ्याला काहीतरी सांगितलं आणि दाल घेऊन पाठवलं. तो हिरो आला आणि थाळीतल्या गोळ्यांचा चुरा करून त्यात दाल घातली. "अभी मेरेको समझा, दाल-बाटी कशी खातात ते" असं मनात म्हणालो आणि केली सुरुवात हाणायला. मस्त चव होती. तो हिरो पुन्हा आला आणि कढी चाहिये क्या? म्हणून त्याने विचारलं. तिची पण चव बघावी म्हणून मी हो म्हणालो आणि पुढे काही म्हणायच्या आतच पठ्याने वाटी वगैरे मध्ये न देता सरळ, आहे त्या थाळी मध्ये एक डाव ओतला. आता अर्ध्या थाळीत दालबाटी आणि अर्ध्या थाळीत ती कढी. या दोनीही पदार्थांची एकरूप होण्यासाठी लगबग सुरु झाली आणि मी शक्य तोवर त्यांचा डाव हाणून पडायला लागलो. दालबाटी खायची आणि कढी ओर्पायची. जेव्हा थाळी रिकामी व्हायला लागली तेव्हा मालक म्हणाला "साब और चाहिये क्या, गरम गरम है? आणि भट्टीतली बाटी कडू लागला. ते बघून राहवलं नाही आणि मी उत्साहात दे म्हणालो. लगेच आणखी २-३ बाटी आमच्या पुढ्यात पेश झाल्या. अडवा हात मारला त्यावर आणि एकदाची काय ते दालबाटी खाऊन तृप्त झालो. त्याच ढाब्यावर मग थोडा आराम केला आणि पुढे निघालो.
११. पुन्हा उदयपूरच्या वेशीवर...
दुपारचे १२ वाजून गेले होते. प्रवास सुरु झाला. पावसाळा चालू आहे याचा मागमूस सुद्धा नव्हता. गरम वारा अंगावर घेत गाडी चालवत होतो. कुठे दोन दिवसा पूर्वी धो-धो पाऊस पडताना बघितलेला आणि कुठे हे जीव घेणे उन. समोर दिसत असलेल्या काळ्या पट्ट्या वरून सनाट निघालो. उन्हामुळे रस्ता चांगलाच तापला होता आणि त्यात जड वाहने जाऊन जाऊन, डांबर वितळून रस्त्यावर दोन ट्रॅकच तयार झाले होते. थोडक्यात लांबच लांब असेलेले दोन खड्डे. एकदा एक ट्रॅक पकडला कि जो पर्यंत एखादा ट्रक ओलांडायची वेळ येत नाही तो पर्यंत ट्रॅक सोडायचा नाही. वाहनांना ओवरटेक करताना जाम पंचाईत व्हायची. धडपडण्याची भीती वाटायची. पण नशिबाने तसं काही झालं नाही. रखरखीत उन्हात कुठेहि न थांबता एका मागून एक गावे मागे टाकत आम्ही हलोल कडे सरकत होतो. डोक्यावरचा सुर्य हळू हळू पश्चिमेकडे कलू लागला होता. दुपारी २ - २.३० ला पुन्हा एके ठिकाणी चहासाठी थांबलो. ५-१० मिनिटे गाडीला पण थंड होऊ दिले आणि निघालो. NH८ वर असलेले सामलाजी (एक गाव) ओलांडताच तो ओळखीचा फाटा दिसला, NH८ सोडला आणि लगेच वळलो. समोर पाटी दिसली, "वडोदरा २१२ km". मुक्कामाचं ठिकाण आपल्या टप्यात आहे याची जाणीव झाली. राजस्थान मागे राहिलं होतं आणि गुजरात स्वागत करत होतं. मागल्या वेळे प्रमाणेच अहमदाबादला फाट्यावर मारून थेट बडोद्याला जायचं होतं आणि बडोद्याच्या ३५ km अलीकडे, वाटेत हलोलला मुक्काम ठरला होता. उन्हं उतरायला लागली होती. कुठेतरी थांबावं असं वाटत होतं पण नेमकं ठिकाण (खाण्या पिण्याची सोय असलेले) सापडत नव्हतं. इथे नको पुढे बघू असं करत करत बरेच अंतर कापले आणि शेवटी एका गावात भेल-पकोडीची गाडी बघून थांबलो. त्या लहानश्या गावात, खालपासून वर पर्यंत जवळ पास काळ्या रंगाचे किंवा तत्सम गडद रंगाचे कपडे घातलेले आम्ही दोघे आणि तशाच काळ्या कुट्ट आमच्या गाड्या दिसल्यावर लोकं आश्चर्याने बघत होती. एव्हाना आम्हाला याची सवय झाली होती. आम्ही आपलं नॉर्मल राहून भेळेचा स्वाद घेतला आणि निघालो. जेव्हा निघालो तेव्हा पश्चिमेला तांबड पसरलं होतं, सुर्य अस्ताला चालला होता. अंधार पडायला लागला होता पण रस्त्याची काळजी अजिबात नव्हती. एकदम चकाचक रस्ता आणि रस्त्यावर भरपूर पाट्या असल्यामुळे चुकण्याचं काही कारण नव्हतं. जेव्हा गोधरा जवळ पोहोचलो तेव्हा सुर्य मावळा होता. हलोल आणखी ५०-५५ km लांब होतं. अंधार मी म्हणायला लागला आणि एक नवीन त्रास सुरु झाला. रस्त्याच्या दोनीही बाजूला शेती आणि झाडी असल्यामुळे चिलटांचा आणि इतर किड्यांचा सुळसुळाट होता. हेल्मेटची काच खाली केली तर समोरच अंधुक दिसायचं आणि वर केली कि किडे डोळ्यात जाण्याची भीती. गोधरा ओलांडून पुढे जाऊ लागलो तेव्हा समोर आभाळ भरून आलेलं दिसलं. शिवाय हवेतही गारवा जाणवायला लागला. हलोलला पोहोचे पर्यंत पाऊस पडू नये म्हणून मी धावा करू लागलो. हेल्मेटची काच खाली ठेऊन वेळप्रसंगीच फक्त उघडून त्या परिस्थितही गाडीचा वेग काही कमी केला नाही. कारण थांबला तो संपलाच्या धर्तीवर वेग कमी केला तो भिजला असं वाटत होतं. तुषार पुढेच होता आणि मी मागे. जोरात गाडी चालवत होतो आणि माझ्या समोर झपकन काही तरी रस्ता क्रॉस करून गेले. थोडा वेग कमी करून निट पहायलं तर कोल्हा दिसला. असो... त्याला त्याच्या नशिबावर सोडून मी आमच्या नशिबाकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले. ढगांचा गडगडाट ऐकू येत होता. काहीही झालं तरी पाऊस सुरु व्हायच्या आत हलोलला पोहोचणे गरजेचे होते म्हणून जोरात गाडी दामटत होतो. जर पाऊस सुरु झाला तर कुठेतरी थांबून रेनकोट घालण्याचे सोपस्कार करावे लागणार होते, ज्यात आणखी वेळ जाणार होता. शिवाय गाडीचा वेगही कमी ठेवावा लागला असता. पण नशिबाने आमची साथ दिली आणि आम्ही हलोल मध्ये पोहोचलो. गाडी हॉटेलच्या पार्किंग मध्ये लावत असतानाच, धो-धो करत तो आलाच. आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो होतो. तसेच भिजत भिजत पटकन सगळं समान काढून गाडीला भिजायला मोकळी केली आणि आम्ही हॉटेल मध्ये गेलो. हॉटेलवाल्याने आम्हाला ओळखलं होतं. रूम घेतली, फ्रेश झालो आणि हॉटेलच्या खानावळी मध्ये जेवायला हजर. १५ दिवसा पूर्वीची इथली चव अजूनही जिभेवर होती. भरपेट उत्तम जेवण केलं आणि रूम वर आलो. "आम्ही आणखी दोन दिवसांनी येऊ", अस घरी फोन करून सांगितलं आणि झोपलो. ६३०-६३५ km चा मस्त प्रवास करून तो दिवसही सार्थकी लागला होता.
१२. कपाळमोक्ष
दोन दिवसात घरी जायचं होतं, त्या प्रमाणे सकाळी आरामात उठलो. आवरून हॉटेल मधेच नाष्टा केला आणि ९.०० ला निघालो. साधारण ३०० km वर असलेल्या दमन मधे मुक्काम करायचं ठरवलं होतं. बडोदा आलं आणि पुन्हा NH८ आम्हाला भेटला. आता मुंबापुरी पर्यंत तोच साथीला राहणार होता. बडोदा ओलांडून थोडेच पुढे गेलो असू आणि समोर क्षितिजा पर्यंत काळे ढग दाटून आलेले दिसले. आता पुढे कितीवेळ पाऊस लागेल हे सांगता येणार नव्हते. चंडीगड मधून निघाल्या पासून दोन दिवस हुलकावणी दिलेला पाऊस आज आमच्या समोर येउन ठाकला होता. मी अजून आहे, मी अजून आहे!!! असं आम्हाला सांगत होता. लेहला जाताना आम्हाला एवढं झोडपलं होतं याने कि आता आम्ही बेफिकीर होतो. जसं जसं पुढे जाऊ लागलो तसं तसं अंधारून यायला लागलं. घड्याळ, सकाळचे ९ वाजल्याचे सांगत होते आणि वातावरण संध्याकाळचे ७.०० वाजल्याचे खुणावत होते. समोर रस्ता ओला झालेला दिसत होता. आम्ही पावसाच्या टप्यात आलो आणि टन!!! टन!!! हेल्मेटवर मोठ्ठे मोठ्ठे थेंब आदळायला सुरुवात झाली. दोघांनीही गाडी थांबवून रेनकोट चढवला आणि लढायला तयार झालो. थेट दमनला थांबण्याचा निश्चय करून तिथून निघालो. पाऊस धो-धो कोसळत होता आणि आम्ही त्याचा प्रतिकार करत शक्य तितक्या जोरात गाडी पळवत होतो. पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे रस्त्यावरील दुचाक्यांची आधीच कमी असेलेली गर्दी जवळपास नाहीशी झाली होती. आमच्या मधी मधी करणारे कोणीच नव्हते. उलट आम्हीच ट्रक वाल्यांच्या मधी मधी करून त्यांना मागे टाकून पुढे जात होतो. नंतर नंतर तर तो इतका जोरात पडू लागला कि हेल्मेटच्या काचेतून पुढचं अगदीच धुसर दिसू लागलं. उगाच कुठे धडपडायला नको म्हणून हेल्मेटची काच वर केली. चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब आणि शेजारून गेलेल्या वाहनांचे शिंतोडे सहन करत गाडी चालवत होतो. बराच वेळ पावसात गाडी चालवली. ४० - ५० km गाडी चालवून झाली, पावसाचा जोर कमी जास्त व्हायचा पण तो कधी थांबला नव्हता. समोर दिसणारा काळा ढग कधीही न संपणारा वाटत होता. रेनकोट घालून सुद्धा आम्ही पूर्ण भिजलो होतो. साला!!! कसल्याही मटेरीयलचा रेनकोट आणला असता तरी भिजलोच असतो असा त्या पावसाचा आवेग होता. अखेर भरूचला नर्मदा ओलांडल्यावर त्याने विश्रांती घेतली. नर्मदेचा पूल क्रॉस करून थोडंच पुढे आलो असेन तेव्हा माझ्या गाडीतून खाड!!! खडक!!! खाड!!! खडक!!! असला काहीतरी आवाज यायला लागला. तसा तो १-२ तास आधी पासूनच येत होता पण आता त्याची तीव्रता वाढली होती. गाडी चालवताना जाणवलं कि जेव्हा ती थरथराट जास्त करायची तेव्हा जास्त आवाज करायची. गाडी बाजूला घेतली आणि निरीक्षण केलं पण काहीच सापडायला तयार नव्हतं. शेवटी, बघू पुढे असं म्हणून निघालो. पावसाने उघडीप घेल्यामुळे छान वाटतं होतं. वेग थोडा कमी करून!!! म्हणजे ९० चा ७० - ८० करून आरामात पुढे जात राहिलो. कारण त्या वेगाला गाडीचं थरथरण्याचं प्रमाण कमी होतं. सुरत आणखी २५ -३० km लांब होतं आणि आम्हाला करमणुकीच एक साधन गवसलं. का कुणास ठाऊक? पण एक हिरो TVS Access घेऊन आमच्याशी शर्यत करू लागला. तो आम्हाला मागे टाकून पुढे जायचा आणि पुन्हा आपोआप कधीतरी मागे पडायचा. आम्ही काही वेळेला त्याला पुढे जाऊन देत होतो. काही वेळा जाणून बाजून त्याला मागे टाकत होतो आणि पुढे जाऊच देत नव्हतो. काही वेळेला त्याच्या थोडेच पुढे राहत होतो जेणे करून त्याला वाटावं आता ओवरटेक करणार पण त्याला तसं करता येत नव्हतं. सुरत येई पर्यंत हा खेळ चालू राहिला. शेवटी तो सुरतकडे निघून गेला आणि आम्ही सरळ दमनकडे.
१३. एका पेट्रोलपंपावर थांबलेले असताना याने दर्शन दिले.
सुरतच्या फाटा मागे टाकून थोडेच पुढे आलो होतो तेव्हाच पावसाने पुन्हा एकदा आम्हाला गाठलं. आताशी कुठे आम्ही थोडेसे वाळलो होतो तर पुन्हा हा भिजवायला हजर झाला होता. पुन्हा तेच सगळं रिपीट. राष्ट्रीय मार्ग ८ (NH८) खूपच मस्त बांधला आहे. प्रवास करणाऱ्याला कुठेही आडकाठी होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गावांना वळसा घालून केलेले बायपास किंवा त्या गावातून जाणाऱ्या मार्गावरच बांधलेले छोटे छोटे पूल केले आहेत. चकचकीत खाली वर करत जाणारा रस्ता आणि त्यावर जाणारे आम्ही दोघे. झक्कास एकदम!!! पाउस चालू होता आणि गाडी पळवणेहि चालूच होते. बघता बघता दमन आलं पण आम्ही दमनच्या फाट्यावर वळलोच नाही. कारण तिथल्या तिथेच थेट घरी जायचे ठरवले गेले. पावसात तसेच पुढे प्रवास करत राहिलो. आता घरी जायचे ठरल्यामुळे गाडीचा वेग पुन्हा वाढला. पाऊस कोसळत होता आणि आम्ही दनादन गाडी चालवत होतो. एक एक गाव, एक एक शहर मागे टाकत पुढे पुढे सरकत होतो. जेव्हा महाराष्ट गुजरात सीमेवरचा भला मोठा टोलनाका आला तेव्हा लेहला जाताना इथे थांबलो होतो तो दिवस आठवला. बरोबर १९ दिवसांनी आम्ही पुन्हा त्याच टोलवर आलो होतो. जाताना 'लेह' वारी एक स्वप्न होतं आणि आज येताना ते स्वप्न सत्यात उतरलं होतं. टोल नाक्यावर न थांबता तसेच भिजत पुढचा प्रवास चालू ठेवला तो पार अगदी विरार पर्यंत. विरार आल्यावर पुन्हा एकदा गाडी आवाज करू लागली. तेव्हा मात्र आवाज ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या. वारी संपत आली आणि अन अगदी शेवटला हि का उगाच त्रास देऊ लागली? म्हणून मी कासावीस झालो होतो. आडोसा वगैरे बघून थांबायची शुद्धच नव्हती. जिथे जाणवलं तिथेच गाडी कडेला थांबवली आणि नीट बघू लागलो. वरून पाऊस पडत होता आणि आम्ही दोघे अगदीच नवखे डॉक्टर रस्त्याच्या कडेला थांबून पेशंट्ला बघत होतो. त्यालाही कळत नव्हतं काय भानगड आहे ते. कोणता तरी भाग सैल झाला आहे आणि गाडी रेझ केली कि वाजतो आहे एवढच समजत होतं. गाडी रेझ करत करत जमेल तिथे सगळी कडे हात लावून बघत होतो. तेव्हा समजलं प्रवासात कधीतरी बॅटरीचं कुलूप तुटून पडलं होतं आणि झाकण अधांतरीच आहे. म्हणून मग झाकण गच्च दाबून धरलं आणि पुन्हा रेझ करून पाहिलं तर आवाज काही थांबला नव्हता. मुख्य समस्येचं निदान अजून बाकी होतं. पुन्हा नीट एक एक भाग बघायला सुरुवात केली. अनवधानाने एकदा पेट्रोलच्या टाकीवर जोर पडला आणि आवाज बंद झाला. दोनदा तीनदा चेक करून पाहिलं आणि खरी गोची कळली. पेट्रोलच्या टाकीचा नट सैल झाला होता.त्यामुळे ती थरथर कापून आवाज करत होती. लगेच तो घट्ट पिळला आणि आवाज बंद झाला. आता गाडी कितीही रेझ केली तरी उगाच कशीपण आवाज काढत नव्हती. भलं मोठं वाटणारं ऑपरेशन छोटसच निघालं. थोडक्यावर निभावलं म्हणून देवाचे आभार मानले आणि आम्ही पुढे निघालो. धो-धो पडणारा पाऊस, जोरात गाडी चालवायची मस्ती आणि लवकर घरी पोहोचणे या सगळ्याच्या नादात सकाळ पासून काहीच खाल्लं नव्हतं. भूक भरपूर लागली होती. पण आमच्या साहेबांनी ढाब्यावर जेवण्याची फर्माईश केली. वसई मागे पडलं पण हवा तसा चांगला ढाबा सापडला नाही. मग साहेबांना सांगितल, "आणखी थोडी कळ काढा, आता पनवेल नंतरच चांगला ढाबा मिळेल. ठाण्यामधे सगळी हाटेलच असतील". साहेब तयार झाले. घोडबंदर रोडला लागलो तसा पाऊस गायब झाला. पुढे मुंब्र्या मार्गे पनवेलला आलो आणि पनवेल ओलांडताच एका ढाब्यावर जेवायला थांबलो. एव्हाना ५.०० वाजले होते. घरच्यांना जोर का झटका धीरसे देण्यासाठी फोन करून सांगितलं, "आम्ही आजच दोन तासात घरी येत आहोत". बऱ्याच वेळा प्रवासात आम्ही थांबू तिथे सवडीने घरी फोन करून बित्तम्बात्मी देत होतो पण आज तसं काहीच केलं नव्हतं. सकाळ पासून ना फोन, ना मेसेज. त्यामुळे घरी मी येणार हे कळल्यावर लैच आनंदी आनंद झाला. असो… तर ढाब्यावर जेवलो आणि मग निघालो. वसई नंतर पाऊस बंद झाला होता. पूर्ण वाळलो होतो, तेव्हाच खंडाळ्यात पुन्हा आमचं पावसाने स्वागत केलं. मस्त बरसत होता. ओळखीच्या रस्त्यावरून भिजत येताना दोघांनाही कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालं होतं. भर भर वाऱ्याला कापत एकदाचे आम्ही देहूरोडला (पुण्याचा बाह्यवळण मार्ग सुरु होतो तिथे)पोहोचलो. इथून पुढे आमचे रस्ते वेगळे होणार होते. तो त्याच्या घरी भोसरीला आणि मी चिंचवडला जाणार होतो. आम्ही थांबलो. वारी यशस्वीपणे आणि सुखरूप पूर्ण झाल्याचे एकमेकांना अभिनंदन केले आणि पुन्हा अशीच लांबची वारी करण्याचं मनात ठरवून आम्ही एकमेकांचा त्या दिवसाचा निरोप घेतला. मी चिंचवडकडे प्रस्थान केले. घराच्या ओढीने पुन्हा जवळपास ६०० km गाडी चालवली गेली. चंडीगडवरून निघाल्या पासून तिसऱ्या दिवशी घरी पोहोचणार होतो.
रात्री ८.३० ला गेटच्या आत शिरलो आणि पार्किंगमध्ये धडधड!!!! धडधड!!! बुलेटचा आवाज घुमायला लागला. गेले १९ दिवस तो आवाज, सतत, दिवसभर आमच्या कानात घुमत होता. आवाज ऐकून आई जवळ आली. घरी फोन करून "मी येतोय" असं आधीच सांगितलं असल्यामुळे ती आधीच खाली येऊन उभी राहिली होती. मी घरी आलो होतो. पाऊस रिपरिप चालूच होता. बुलेट स्टँडला चढवली (हो बुलेट हि स्टँडला लावता येत नाही, ती चढवावी लागते) आणि आई कडे वळलो. तिला कडकडून मिठी मारायची होती पण दोन-दोन जर्कीन घालून सुद्धा पार भिजलो होतो. वर पासून खाल पर्यंत सगळी कडून टप-टप पाणी गळत होतं. आपला लेक सुखरूप आणि धडधाकट घरी परत आलेला पाहताना तिच्या चेहऱ्यावरच समाधान आणि तिला झालेला आनंद मला अजूनही आठवतो. हळू हळू त्या धुडावरचा सगळा बोजा मी उतरवला आणि तिला (बुलेटला) रिकामं केलं. आता तिलाही कंटाळा आला असेल, किती दिवस तिने ते समान काहीही न तक्रार करता वागवलं होतं. असो... तिला आराम करायला सोडून, सगळा पसारा उचलला आणि घरात गेलो. बाबा आणि शुभदा वाट बघतच होते. सगळा प्रवास उत्तम होऊन मी घरी परत आल्याचा त्यांनाही खूप आनंद झाला होता. झालं, थोडा वेळ शांत बसलो आणि एक एक बॅग उघडायला सुरुवात केली. सगळं समान बाहेर काढलं आणि आधी होता तो पसारा आणखी वाढवला. मग हळू हळू परत सगळं आवरता आवरता भरपूर गप्पा झाल्या. मस्त गरम गरम जेवलो आणि झोपायला गेलो. आयुष्यभर लक्षात राहील असा एक प्रवास संपला होता.
१४. हक्काच्या जागी....
१५. लेह मधे करून घेतलेले दोन टी शर्ट्स
१६. नकाशा पुन्हा एकदा....
समाप्त....
No comments:
Post a Comment