लगोलग त्यांना मेल टाकून चौकशी केली. फोलिएज दरवर्षी हा ट्रेक घेऊन जातात. एकदा जायचं नक्की झाल्यावर रीतसर त्यांचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला व तयारीला लागले. या ट्रेकची तयारी करताना तुमचा स्टॅमिना चांगला असण्याची गरज आहे. ट्रेकच्या दृष्टीने फिटनेससाठी साधारण काय तयारी करायची हे फोलिएजकडून कळलं. म्हणजे उदाहरणार्थ दर विकांताला सिंहगडावर जाणे अर्थात गड चढण्याचा व्यायाम करणे, जिने चढायचा व्यायाम करणे. शेवटचा ट्रेक करून मला ३ वर्ष होत आली होती. आखाती देशात गड चढण्याचा व्यायाम शक्य नव्हता. जिने चढणं सहज शक्य होतं खरंतर, पण मी नाही केलं. मग एकच उपाय दिसत होता तो म्हणजे जीम लावण्याचा. म्हणून मग जीम लावायचा निर्णय घेतला व पुढचे ३ महिने फिटनेससाठी दिले. पूर्वतयारी म्हणून गड चढण्याची किंवा एखादी टेकडी वगैरे जवळपास असेल तर ती चढण्याची प्रॅक्टीस करत राहाण्याचा फायदा बाकीच्या टीम मेंबर्सना झालेला बघितला मी. ट्रेकचे दिवस हळूहळू जवळ येत होते. यथावकाश मुंबई-काठमांडू व परतीचे बुकिंगही झाले. माझं ट्रेकिंगचं सगळंच सामान मुंबईत असल्याने आधी तिथे जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
ट्रेकचा कालावधी १ ते १५ मे असा असणार होता म्हणून मग एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पोहोचले. तोवर ट्रेकमध्ये नक्की कोण-कोण सहभागी असणार आहेत वगैरे तपशील कळले नव्हते, फक्त एकूण ५ जण आहोत इतकंच कळलं होतं. मुंबईत गेल्यावर बाकीचे सगळे तपशील कळले. ट्रेकमध्ये मी एकटीच मुंबईची होते व ट्रेक लीडर धरून बाकीचे चार जण पुण्याहून येऊन मला दिल्ली एअरपोर्टवर भेटणार होते.
१ मे २०१४ रोजी सकाळची ९ ची मुंबई-दिल्ली फ्लाईट घेऊन दिल्लीला उतरले व टर्मिनल बदलून आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले. तिथे ट्रेकमधल्या दोघांची भेट झाली. ह्यात पुण्याची अपर्णा होती, जी पुढचे १५ दिवस माझी पार्टनर असणार होती. मग एकत्रच चेक-इन केलं व लंच उरकून थोडावेळ भटकलो. तोपर्यंत काठमांडूला जाणार्या फ्लाईटची वेळ होत आलीच होती. मग तंगडतोड करत गेटजवळ जाऊन बसलो. फ्लाईट दुपारी ३.५० ची होती व ५ वाजून ५० मिनिटांनी आम्ही काठमांडूच्या वेळेप्रमाणे उतरणार होतो. विमान वेळेवर सुटलं मात्र उतरताना खराब हवामानामुळे तास ते सव्वा तास आम्ही काठमांडूवर घिरट्या घालत होतो. तिथेच मनात शंकेची पाल चुकचुकली. हवामान खराब राहिलं असतं तर उद्या 'लुकला' ला जाणारं विमानही नक्कीच अडकलं असतं. शेवटी संध्याकाळी ७ च्या सुमारास एकदाचे काठमांडूला उतरलो. उतरताना बघितलं तर काठमांडूला पावसाचा मागमुसही नव्हता. सामान घेऊन बाहेर पडतो न पडतो तोच पावसाला सुरुवात झाली. आम्हांला घ्यायला आमचा ट्रेक लीडर व अजून ट्रेकमधलाच एक मुलगा आले होते. ते दोघे काठमांडूला दुपारीच पोचले होते. आधीच उशीर झाला होता त्यामुळे हॉटेलवर जाऊन सामान न टाकता आम्ही सरळ जेवायला एका नेपाळी रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे लाईव्ह लोकल नाच-गाणी सुरु होती. जेवण उरकून आता केव्हा एकदा हॉटेलवर जातो असं झालं होतं आम्हांला कारण उद्या लुकला ला जायला लवकर निघायचं होतं व त्यासाठी बॅग्ज भरायच्या होत्या. १०-१०.१५ च्या सुमारास हॉटेलवर पोचलो असू. तिथे आम्हांला ट्रेकसाठी लागणार्या डफेल बॅग्ज व फेदर जॅकेट्स दिली. ह्या बॅग्ज आता ट्रेकच्या कालावधीत पोर्टर उचलणार होते. त्यांचं वजन जास्तीत जास्त १० किलोपर्यंतच असायला हवं होतं. मग आम्ही सामानाचं व्यवस्थित सॉर्टिंग केलं. आमच्याही पाठीवर जास्तीत जास्त ५ किलोपर्यंत वजन असलेल्या सॅक्स असणार होत्या. इतकं सगळं होईपर्यंत १२ वाजत आले होते. ट्रेक लीडरने येऊन वजनाचा अंदाज घेतला व ग्रीन सिग्नल दिला. उद्या लुकलाची फ्लाईट ६.३० वाजताची होती व ५ वाजता पॅक ब्रेकफास्ट घेऊन हॉटेल सोडायचं होतं. झोपायला फार वेळ नव्हताच. ३.१५ चा गजर लावून आडव्या झालो.
दिवस १ :- काठमांडू-लुकला ते फाकडिंग (लुकला ते फाकडिंग अंतर ७ कि.मी. अंदाजे)
वेळेच्या बदलामुळे गजराचा काहीतरी घोळ झालाच. जाग आली तेव्हा ४ वाजून गेले होते. पटापट आवरून ५ वाजता खाली उतरलो. पॅक ब्रेकफास्ट घेऊन काठमांडूच्या आंतरराज्यीय विमानतळाकडे निघालो. आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय विमानतळ दोन्ही अगदी बाजूबाजूलाच आहेत. सकाळपासूनच विजांच्या कडकटासह व ढगांच्या गडगडासह पाऊस पडतच होता. लुकलाला जाणारं विमान उडेल याची काहीही शाश्वती नव्हती तरीही विमानतळावर जाऊन सामान टाकलं व बोर्डिंग पास घेऊन बसलो. बॅग स्क्रिनींगच्या वेळेस लक्षात आलं, सॅकमधल्या मेडिकल कीटमध्ये चुकून माझा स्वीस नाईफ राहिला होता. डफेल बॅग्ज आधीच चेक-इन होऊन गेल्या होत्या. त्यामुळे स्वीस नाईफची आहुती दिल्यावर आता ट्रेक व्यवस्थित पार पडेल याची खात्री झाली.
काठमांडूचं आंतरराज्यीय विमानतळ अगदीच छोटं होतं आणि वाट पाहणारी माणसं त्याहून जास्त. विमानतळावर आलो तेव्हा आम्हांला आमच्या ट्रेकचा गाईड 'आन्ग डेंडी शेर्पा' भेटला. पुढचे १४ दिवस हा आता आमच्याबरोबरच असणार होता. डेंडी वयाने लहान आणि अनुभवाने फारच मोठा होता. त्याने दोन वेळा एव्हरेस्टवर चढाई केली होती व अमा दबलम जो एव्हरेस्टपेक्षाही चढाईला कठीण आहे, त्यावर एकदा चढाई केली होती. भारीच वाटलं आम्हांला ऐकूनही. त्यानेच फोन करून चौकशी केली तर 'लुकला' ला एकदम छान हवामान होतं. परंतू काठमांडू व अधलं मधलं हवामान ठीक झाल्याशिवाय आमची प्रतिक्षा संपणार नव्हती. इथे येऊन ३-४ तास होत आले होते. पावसाचं थांबायचं लक्षण नव्हतं पण २ वाजेपर्यंत वाट पहायची असं सांगितलं होतं. मध्ये मध्ये आम्ही तिथल्या तिथेच पाय मोकळे करायचे म्हणून २-३ फेर्या मारून येत होतो. बोर्डिंग पासवर आमच्या फ्लाईटचा नंबर लिहिला होता. पहिल्या लॉटमधलं दुसरं विमान असणार होतं आमचं. ११-११.३० च्या सुमारास पाऊस थांबला एकदाचा व आमच्या आशा पल्लवीत झाल्या. बसून बसून भूकही लागली होती केव्हाची म्हणून मग वरच्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन जेवलो.
जेवण झाल्यावर डेंडीसरांनी थोड्याच वेळात लुकलाच्या फ्लाईट्स उडतील अशी गुड न्यूज आणली. लगबगीने आम्ही खाली आलो आणि नव्या उत्साहाने आमचा नंबर केव्हा येईल याची वाट पहायला लागलो. खरंच थोड्या वेळात आम्ही बोर्डिंगसाठी गेटपाशी गेलो. आम्हांला बसमध्ये बसायला सांगितल्यावर आता आपण नक्की उडणार याची खात्री पटली. विमानाजवळ गेल्यावर तिथे इंधन भरणे, सामान चढवणे सारखी कामं चालली होती त्यामुळे उन्हात परत अर्धा तास थांबावं लागलं. अखेर ९ १/२ तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ३.३०-३.४५ च्या सुमारास आम्ही लुकलाच्या दिशेने उड्डाण केलं. हे विमान फक्त १२ सीटर होतं, त्यामुळे सामानाच्या वजनावरही निर्बंध होते. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एकदाचे लुकलाच्या विमानतळावर उतरलो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून वैमानिकांचं अभिनंदन केलं. उतरल्यावर आम्हांला आमच्याबरोबर असणारा अजून एक गाईड व दोन पोर्टर्स भेटले. एका ठरलेल्या टी-हाऊसमध्ये चहासाठी गेलो. इथे पोचेस्तोवर ४.३० वाजून गेले होते.
आम्हांला 'लुकला' ला घेऊन जाणारं विमान
लुकलाचं एअरपोर्ट (तेनझिंग-हिलरी एअरपोर्ट) हे अगदी छोटं आहे. एव्हरेस्ट बेस कँप ट्रेकला जाण्यासाठी इथूनच ट्रेक सुरु होतो म्हणून प्रसिद्ध. फक्त तारांनी बांधलेलं कंपाऊंड व आजूबाजूला घरं असं याचं स्वरूप. जगभरातील ट्रेकर्स इथे येतात म्हणून असेल पण 'स्टारबक्स कॉफी' आहे इथे.
लुकलाची धावपट्टी
लुकलाला पोचल्यापासून गरम पाण्याचे (पिण्याच्या, अंघोळीच्या) पैसे आपल्याच खिशातून जातात. पिण्याच्या पाण्यात काटकसर करून चालत नसल्याने त्याचाच खर्च या ट्रेकमध्ये जास्त होतो. साधारणपणे ७-८००० नेपाळी रूपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे त्याचा विचार करून तेवढे पैसे जवळ ठेवावेत.
आज आम्हांला 'फाकडिंग' गावात पोहोचून मुक्काम करायचा होता. लुकला होतं ९२०० फुटांवर तर फाकडिंग ८७०० फुटांवर. त्यामुळे लुकला ते फाकडिंग २.३०-३ तास लागणार असले तरी उतरायचं होतं. चहापान झाल्यावर ताजेतवाने होऊन ट्रेकसाठी सज्ज झालो. रमत गमत फोटो काढत चाललो होतो. इथे नेपाळमधल्या प्रसिद्ध 'दुधकोशी' नदीचं पहिलं दर्शन झालं. नदीचं पाणी थोडं हिरवट, निळसर रंगाची झाक असलेलं होतं. ही नदी नंतर १३ दिवस सतत भेटत राहिली. या नदीचा उगम गोक्यो लेकच्या पूर्वेकडून होतो व दक्षिणेकडे वहात ती नामचे बझारकडे जाते. दुधकोशी नदीला तेंगबोचेजवळ 'इम्जा खोला' ही नदी येऊन मिळते. लुकला-फाकडिंगच्या वाटेवर पहिल्या झुलत्या पुलाशी गाठ पडली. नंतर पूर्ण ट्रेकमध्ये असे अनेक झुलते पूल पार करावे लागले. एका ठिकाणी परतणार्या ट्रेकर्समध्ये दोन मराठी मुली भेटल्या. रात्री ७.४५-८ च्या आसपास 'फाकडिंग' गावात पोहोचलो. इथे पोहोचल्यावर थंडी जाणवायला लागली. गरम पाणी पिऊन व जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही आम्हांला दिलेल्या रुममध्ये सामान टाकून फ्रेश झालो. खोल्या म्हणजे फक्त प्लायवूडचं पार्टिशन टाकून केलेल्या होत्या व अगदी दोन बेड मावतील एवढीच जागा. डायनिंग रूममध्ये आलो व जेवणाची वाट पहायला लागलो. तोवर तिथे असलेल्यांनी फायर प्लेस लावून रूम उबदार करायचं काम सुरु केलं होतं. पहिलाच दिवस असल्याने आणि अंदाज नसल्याने भरपूर जेवण ऑर्डर करून कौतुकाने जेवलो. उद्याचा दिवस हा ट्रेकचा कठीण टप्पा होता.नाही म्हटलं तरी टेन्शन आलं होतंच. सकाळी ६.३० ला ब्रेकफास्ट आणि ७ वाजता निघायचं अशी सूचना डेंडीसरांनी जेवणानंतर दिल्यावर आम्ही झोपायला रुममध्ये आलो. उद्याला लागणार्या गोष्टी हाताशी ठेवल्या व लवकरचा गजर लावून झोपून गेलो.
दिवस २ रा : फाकडिंग ते नामचे बझार (११,३१८ फूट) (अंतर अंदाजे १२ कि.मी.)
गजर झाल्यावर ठरल्याप्रमाणे उठलो. थंडगार पाण्याने तोंड धुवून फ्रेश झालो व सामान आवरून ब्रेकफास्टसाठी डायनिंग रूममध्ये आलो. ऑम्लेट-ब्रेड व लेमन टी पिऊन आजच्या दिवसासाठी सज्ज झालो. फाकडिंग ते नामचे हे अंतर ७-८ तासांचं व उंचीही गाठायची होती. बरोब्बर ७-७.१५ च्या आसपास फाकडिंगचा निरोप घेऊन नामचेच्या दिशेने कूच केले. मॉंजो गाव सोडल्यावर जोरसाले गाव येताना 'सगरमाथा नॅशनल पार्क'ची बिल्डिंग लागली. पूर्व नेपाळमधील हिमालयाचा मुख्यत्वे करून माऊंट एव्हरेस्टचा सगळा भाग हा 'सगरमाथा नॅशनल पार्क' च्या संरक्षित हद्दीत येतो. इथे सगरमाथा नॅशनल पार्कमध्ये शिरायची प्रवेश फी घेऊन ट्रेकर्सची परमिट्स बनवली जातात. तिथे फोटोसेशनचा ब्रेक घेऊन झाल्यावर परत चाल सुरु झाली. जोरसाले गावातच आमचा लंच ब्रेक असणार होता. आमचा आघाडीचा गाईड 'आन्ग गुम्बु' एका टी-हाऊसजवळ थांबला होता. आम्हीही त्याच्या मागोमाग आत शिरलो. आम्ही पोचल्यावर जेवणाची ऑर्डर दिल्याने लंचब्रेकमध्ये तासभर मोडणार होताच. या गावातून थोडं पुढे गेल्यावर 'हिलरी ब्रिज' येतो. तो ओलांडल्यावर नामचेची ३-४ तासांची चढण पार करायची होती.
जेवण, गप्पा-टप्पा झाल्यावर नामचेच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. एक झुलता पूल ओलांडल्यावर जुना ब्रिज व नवीन 'हिलरी ब्रिज' दिसायला लागला. जुना ब्रिज बर्यापैकी खाली परंतू आता वापरात नव्हता, तर नवीन ब्रिज चांगलाच उंचीवर होता. जोरसाले नंतर बर्यापैकी चढण सुरु झाली होतीच. ब्रिज ओलांडत असताना खूप रक्त सांडलेलं दिसलं. एका घोड्याचा पाय घसरून तो जायबंदी झाला होता.
हिलरी ब्रिज
इथे पोचेस्तोवरच माझ्या गुडघ्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होतीच, त्यामुळे पुढच्या चढाईचं टेन्शन होतं. चढाई चांगलीच दमछाक करणारी होती. परंतू अल्टिट्यूडचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणून अगदी हळू चालायचा नियम आहे, त्यामुळे आम्हीही अगदी हळूहळूच चाललो होतो. दुपारी ३-३.३० दरम्यान केव्हातरी 'नामचे बझार' ला पोचलो. सगळेच जण चांगलेच दमले होते पण आता उद्याचा दिवस एक अॅक्लमटायझेशन वॉक सोडला तर आराम होता. नी कॅप असूनही दुखर्या गुडघ्याने माझी हवा काढली होती.
आज ट्रेकच्या दुसर्याच दिवशी एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे हायड्रा पॅक खूपच गरजेचा आहे. माझ्याकडे होता तरी मी तो ट्रेकला बरोबर न घेण्याचा मूर्खपणा केला. हायड्रा पॅकमुळे तुम्हांला पाण्यासाठी वेगळे ब्रेक्स घ्यावे लागत नाही, त्यामुळे पाणीही भरपूर पोटात जाते. ट्रेकदरम्यान भरपूर पाणी पिणे व बाथरूमला जात रहाणं खूप महत्वाचं आहे.
'नामचे बझार' हे एव्हरेस्टच्या भागातलं सगळ्यात मोठं गाव, ट्रेकर्समध्ये ही एकदम प्रसिद्ध. माऊंटेनिअरींगचं सगळं साहित्य मिळतं इथे. नामचेला 'हॉटेल स्नोलँड' मध्ये आमची व्यवस्था केली होती. गेल्यावर आधी डायनिंग रूममध्ये जाऊन लेमन/जिंजर टी घेऊन फ्रेश झालो. रुममध्ये गेल्यावर स्वच्छ व प्रशस्त बाथरूम बघून आम्ही अंघोळ करून ताजेतवाने व्हायचा प्लॅन केला व लगेच गरम पाणी सांगितलं. इथे एक गरम पाण्याची बादली ३५०/- नेपाळी रुपयांना होती पण इलाज नव्हता. मस्त अंघोळ झाल्यावर खरंच चढायचा शीण गेल्यासारखं वाटलं. आज बाहेर जायचा प्लॅन नव्हताच त्यामुळे जेवणाची वेळ होईस्तोवर रूममध्येच बसून राहिलो. इथे संध्याकाळी ५ वाजताच जेवणाची ऑर्डर द्यावी लागायची.
जेवणात तशी बर्यापैकी व्हरायटी असायची. ४-५ प्रकारची सूप्स, डाळ-भात-भाजी, चाऊमेन, थुक्पा, मोमो वगैरे मिळायचं. नंतर नंतर तर त्याचाही कंटाळाच आला ते वेगळं. जेवण झाल्यावर उद्या ७.३० वाजता अॅक्लमटायझेशन वॉकला निघायचं असल्याची सूचना डेंडीसरांनी केली, म्हणजे ७ वाजता ब्रेकफास्टला डायनिंग रूममध्ये भेटायचं. नामचेच्या अजून डोक्यावर साधारण १.३०-२ तासांच्या अंतरावर एक 'एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट' नावाचं हॉटेल होतं. हवामान स्वच्छ असताना बरीच शिखरं तिथून दिसतात, एव्हरेस्टही. त्यामुळे तिथपर्यंत जायचा प्लॅन होता. अल्टिट्यूडमुळे आल्यापासून डोकं दुखत होतं म्हणून आम्ही दोघींनी अर्धी अर्धी डायमॉक्स घेतली. रात्री सुरुवातीला झोप लागली नंतर मात्र अजिबातच डोळ्याला डोळा लागला नाही. हेच सत्र पुढे पूर्ण ट्रेकभर सुरु राहिलं. गुडघ्यांमुळे मला आता पुढच्या ट्रेकचं फारच टेन्शन आलं होतं. उद्याच्या अॅक्लमटायझेशन वॉकला जायचाही मूड नव्हताच. उद्या अजून एक नी-कॅप विकत घ्यायची असं ठरवलं.
हॉर्स शू च्या आकाराचं नामचे बझार
दिवस ३ रा :- नामचे बझार
सकाळी ठरल्याप्रमाणे ब्रेकफास्ट करून निघालो. वातावरण पाऊस नसला तरी थोडंसं ढगाळ होतं. नामचे च्या वर एक 'स्यांगबोचे' नावाचं गाव लागलं. इथे कार्गोचा रनवे आहे. आरामात चालत चालत 'एव्हरेस्ट व्ह्यू पॉईंट' हॉटेलला पोचलो. आमचं नशीब काही जोरावर नव्हतं कारण एकही शिखर दिसत नव्हतं. शेवटी कॉफीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजून निघालो. उतरताना बरीच ट्रेकर्स मंडळी अॅक्लमटायझेशन वॉकसाठी चढत असताना दिसली. ह्या पॉईंटपर्यंत वॉक फारच पॉप्युलर होता तर.
अॅक्लमटायझेशन वॉकनंतर खूपच मस्त वाटत होतं. येताना एका ठिकाणी मसाजची पाटी बघितली म्हणून चौकशी केली. दर जास्त वाटले म्हणून काही न बोलता हॉटेलवर परतलो. जेवणानंतर भटकायचा/खरेदीचा प्लॅन होता. म्हणून मग मसाजची चौकशी केली होती तिथेच गेलो. पण मगाशी काहीच कन्फर्म न सांगितल्याने त्याने आम्हांला बाहेरचा रस्ता दाखवला. नामचेमध्ये अजून एका ठिकाणी मसाज करून मिळतो असं त्याने सांगितलं. म्हणून आम्ही शोधत निघालो. ५ मिनिटं चालल्यावर एका 'कॅफे दान्फे बार' असं लिहीलेल्या ठिकाणी मसाजची सोय दिसली म्हणून आत शिरलो. कॅफे दान्फेमधलं वातावरण एकदम जिवंत होतं. पूर्ण कॅफेमध्ये तिथे भेट दिलेल्या लोकांनी/ग्रूप्सनी म्हणजेच ट्रेकर्सनी टी-शर्ट्सवर त्यांची आठवण लिहून ते टी-शर्ट्स लावले होते. इंग्लिश गाणी सुरु होती. टिव्हीच्या मोठ्या पडद्यावर कुठची तरी सॉकरची मॅच सुरु होती. लोकं बीअर पीत होती, गप्पा मारत होती. बाजुलाच पूल टेबल होतं. आम्हांला मसाजकरिता ४० मिनीटं थांबावं लागणार होतं म्हणून मग एक कॉफी ऑर्डर केली. थोड्या वेळाने नंबर आल्यावर मी पायांना मसाज करून घेतला, एकदम रिलॅक्स वाटलं. दान्फे (हिमालयन मोनाल) हा नेपाळचा राष्ट्रीय पक्षी, त्यावरूनच या कॅफेचं नाव ठेवलं होतं. मसाजनंतर एका फार्मसीमध्ये नी-कॅप विकत घेतली. एक जर्मन बेकरी बघितली होती, ती शोधत निघालो. या जर्मन बेकरीमध्ये फारच टेम्प्टिंग खाद्यपदार्थ होते. मग परत एक कॉफी आणि खायला घेऊन तिथेच थोडा वेळ गप्पा मारत बसलो. आमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ ठरलेली असल्याने फार वेळ न दवडता निघालो. उद्याचा दिवसही ६-७ तासांच्या वॉकचा होता. नवीन नी-कॅपमुळे गुडघ्यांना आराम मिळावा एवढीच इच्छा होती. रात्री परत एकदा अंघोळ करून घेतली कारण आता नामचेला परत येईंपर्यंत अंघोळीचं नाव काढायचं नव्हतं. सामान आवरून आडव्या झालो.
दिवस ४ था :- नामचे बझार ते देबोचे (अंतर अंदाजे १२ कि.मी.)
सकाळी बाहेर बघितलं तर पाऊस पडत होता. पावसातही ट्रेक सुरु करायचा की नाही ते कळत नव्हतं. आवरून डायनिंग रूममध्ये ब्रेकफास्टसाठी आलो. तोवर पाऊस थांबून आजूबाजूच्या पीक्सनी ओझरतं दर्शन दिलं. आम्ही 'तेंगबोचे' ऐवजी त्यापुढे २० मिनीटांवर असलेल्या 'देबोचे' गावात आज मुक्काम करणार होतो. तेंगबोचेच्या वाटेला लागण्याआधी आम्ही नामचे बझारमध्ये असलेलं शेर्पांच्या जीवनाची माहिती देणारं तसंच या भागात आढळणार्या फुलझाडांची माहिती देणारं म्युझियम बघणार होतो. मगाशी मोकळं झालेलं वातावरण आता परत पूर्ण ढगाळ झालं होतं. पाऊस पडू नये एवढीच इच्छा होती.
म्युझियम बघून तेंगबोचेच्या वाटेला लागलो. सुरुवातीचा बराच सरळच रस्ता होता. नामचेपासूनच एक कोरियन ग्रूप आमच्या पुढे-मागे होता. वाटेत आम्ही थांबलो असता त्यांची चौकशी केली. त्यांची ट्रेकिंग टीम 'अमा दबलम'च्या बेसकँपपर्यंत जाणार होती. मग त्यांच्यातल्या एकाने अपर्णाला ते लिहीलेला एक स्कार्फ भेट म्हणून दिला. अपर्णानेही त्यांना घरी बनवलेले एनर्जी बार्स दिले. रस्त्यात लागलेल्या २-३ गावांमध्ये सोवेनिअर्स, गळ्यातल्या माळा अश्या वस्तू विकायला ठेवलेल्या दिसल्या. मध्येच थोडा पावसाचा शिडकावा झाल्यावर कॅमेरा सॅकमध्ये जाऊन सॅकवर कव्हर चढलं. वाटेत एक मुंबईहून आलेली मुलगी दिसली. अल्टिट्यूड सिकनेसमुळे तेंगबोचेहून परत चालली होती. चेहरा अगदी उतरला होता तिचा. साहजिकच होतं म्हणा. माझ्यासारखंच तिनेही कदाचित या ट्रेकचं स्वप्नं किती वर्ष उराशी बाळगलं असेल...किती पैसा, वेळ आणि मन त्यात गुंतवलं असेल आणि त्यात असं ट्रेक अर्धवट टाकून माघारी फिरायचं म्हणजे....:अरेरे: या ट्रेकमध्ये काही त्रास झाल्यास तुमचं तुम्हांला एकटंच परत यावं लागतं. हेलिकॉप्टर (ते ही सगळीकडे नाहीच मिळत)/घोडे वगैरे खूपच महाग आहेत. आमच्यापैकी अजूनतरी सगळेच एकदम फीट व उत्साहात होते. एकावर एक अश्या दोन नी-कॅप्स लावल्याने माझाही गुडघा शांत वाटत होता.
जेवायला 'फुंकी थांगा' नावाच्या गावात थांबायचं होतं. या गावात पाण्यावर चालणारी प्रार्थना चक्र (प्रेअर व्हील्स) आहेत. फुंकी थांगा गाव जवळ यायच्या आधी खूप उतार होता कारण आता दुधकोशी नदीच्या पात्रापर्यंत खाली उतरायचं होतं. ह्या गावानंतर तेंगबोचेची अंगावर येणारी चढाई सुरु होते. इथून तेंगबोचेला पोचायला साधारण ३ तास लागतील असं कळलं. जेवल्यावर बाटल्यांमध्ये पाणी भरून तेंगबोचेला जायला निघालो. आमच्या आगे मागे बरेच हमाल की शेर्पा(?) पाठीवरून अवजड सामान घेऊन तेंगबोचेची चढण चढत होते. पुढच्या गावांमध्ये कोणतंही सामान पोचवायचा याक्/घोडे किंवा मग माणसांच्या पाठीवरून हाच मार्ग होता. चढताना डेंडीसरांच्या एक्स्पिडिशनच्या स्टोर्या तोंडी लावायला होत्या. इथेही आम्हांला मुंबईचा एक ग्रूप भेटला. त्यांच्याशी बोलताना कळलं की त्यांना गोरक शेपला हवामान फार स्वच्छ मिळालं नाही. साधारण ३ तासांच्या चढणीनंतर तेंगबोचेला पोचलो. कमानीतून आत शिरल्यावर लगेचच मॉनेस्ट्री होती. ही मॉनेस्ट्री या भागात सगळ्यात मोठी आहे. आम्ही पोचलो तेव्हा मॉनेस्ट्री बंद होती, परंतू उघडायची वेळ होतच आली होती त्यामुळे तिथेच थांबून राहिलो. पाचच मिनीटांत मॉनेस्ट्रीचं दार उघडलं व आमच्यासारखे बरेच ट्रेकर्स आत शिरले. आत बुद्धाचा खूप मोठा पुतळा होता. एक मुख्य धर्मगुरु व इतर दोन असं तिघांचं पठण चाललं होतं. मधून मधून बहुधा गरम पाणी पित होते. ५-१० मिनीटं तिथे थांबून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघालो. तेंगबोचे गाव तसं मोठं नाही वाटलं. आम्ही इथून २० एक मिनीटं अंतरावर असलेल्या 'देबोचे' गावात मुक्काम करणार होतो. देबोचेची उंची तेंगबोचे पेक्षा किंचित कमी असावी कारण तेंगबोचेनंतर २० एक मिनिटांचा रस्ता उताराचाच होता.
'तेंगबोचे' ची मॉनेस्ट्री
देबोचेही अगदी छोटेखानी गाव होतं. आम्ही थांबलो तो लॉजही १०-१२ खोल्यांचा व अगदी गावाच्या टोकाला होता. वर वर चढत होतो तसा खोल्यांचा साईझही छोटा होत होता. पण कदाचित या ट्रेकला फॉरेनर्स जास्त असतात म्हणून असेल टॉयलेट्सची परिस्थिती खूपच चांगली होती. संध्याकाळचा वेळ रिकामाच होता म्हणून मग डायनिंग रूममध्येच उनोचा डाव मांडला. जोडीला तोंड चाळवायला आम्ही आमच्याकडंचं खाणं काढलं. उद्या इथून 'डिंगबोचे' कडे प्रयाण करायचं होतं, जवळपास २००० फूट वर चढायचं होतं.
दिवस ५ वा:- देबोचे ते डिंगबोचे (१४,१०७ फूट) (अंतर अंदाजे ११ कि.मी.)
सकाळी बाहेर येऊन बघितलं तर आकाश छान निळं दिसत होतं. आज हवामान स्वच्छ असेल असं वाटत होतं. निघायची वेळ साधारण ७ ते ७.३० च्या आसपास ठरलेली असायची. आजही ५-६ तासांची चाल होती. देबोचे सोडल्यावर आता परत दुधकोशी नदीच्या पात्राजवळ आलो होतो. एक मोठा ब्रिज तुटलेला दिसत होता. त्याला पर्याय म्हणून पुढेच एक नवीन ब्रिज बांधलेला दिसत होता. ब्रिज ओलांडल्यावर चढण सुरु झाली.
देबोचे सोडल्यावर
डोंगरावर एक कमान दिसत होती, ती ओलांडून पुढे आल्यावर दूरवर 'पांगबोचे' गाव नजरेच्या टप्प्यात आलं. येताना आमचा एक रात्र मुक्काम पांगबोचेमध्ये असणार होता. तिथे एक चहाचा स्टॉप घेतला. तेव्हा असं ठरवलं की दुपारच्या जेवणासाठी अधे-मधे कुठेही न थांबता सरळ 'डिंगबोचे'ला पोचल्यावरच जेवावं. इथून साधारण अजून ३ तास लागतील असा अंदाज होता. रस्ता फार चढाचा वगैरे नव्हता, परंतू कडक ऊन जाणवत होतं. आणि अचानक त्या स्वच्छ आकाशात अमा दबलम, ल्होत्से(चौथ्या क्रमांकाचं शिखर) आणि एव्हरेस्ट या शिखरांनी पहिल्यांदाच अगदी काही मिनीटांसाठी ओझरतं दर्शन दिलं. एव्हरेस्ट बघुन मला नक्की काय वाटलं हे कळायच्या आतच त्याने लगेचच ढगांचा पडदा ओढून घेतला. खरंतर हवा स्वच्छ असती तर नामचेहून निघाल्यापासूनच ही शिखरं दिसली असती. पण तसं झालं नव्हतं त्यामुळे रुखरुख लागून राहिली.
पांगबोचे नजरेच्या टप्प्यात
पांगबोचेला बरीच ट्रेकर्स मंडळी पुढे मागे होती. तिथून पुढे निघाल्यावर दूरवर एक गाव दिसत होतं. डेंडीसरांनी तिथे जेवायला थांबू असं सुचवलं कारण डिंगबोचेला पोचायला २ वाजून गेले असते. त्यामुळे मग 'स्यमोरे' नावाच्या गावात जेवायला थांबलोच. गेल्या ५ दिवसातलं पहिलं चवदार जेवण जेवलो. उकडलेले बटाटे आणि फ्राईड राईस.
जसं जसं वर चढत होतो तशी झाडं गायब होत होती. स्यमोरे ते डिंगबोचे च्या वाटेवर फक्त खुरटी झुडपंच होती. फारच कंटाळवाणा रस्ता वाटला. मगाशी पुढे-मागे असणारी ट्रेकर मंडळी केव्हाच पुढे निघून गेली होती. डिंगबोचेच्या वाटेवर एक 'लाओस' हून आलेली मुलगी दिसली. एकटीच होती, कदाचित पोर्टर पुढे-मागे असावा कुठेतरी. पण त्यादिवशी पार गोरक शेपहून उतरत आली होती व पांगबोचेला मुक्काम करणार होती. गोरक शेप ते पांगबोचे हे अंतर तसं बरंच. म्हणजे गोरक शेप-लोबुचे-थुकला-डिंगबोचे ही गावं पार करून ती पांगबोचेला जात होती. आम्हांलाही असंच यायचं होतं आणि मुख्य म्हणजे ती ट्रेक करून परत चालली होती म्हणून तिचं कौतुक वाटलं. दुपारी ३.३० च्या आसपास एकदाचं डिंगबोचे दिसायला लागलं. तेंगबोचेपेक्षा आकाराने मोठं वाटलं. आणि मगाशी कंटाळवाणा वाटणार्या रस्त्यांवरुन चालत इथपर्यंत पोचल्याबद्दल बक्षिस म्हणुन पुन्हा एकदा अमा दबलम आणि ल्होत्से च्या जोडीला आयलंड पीक, नुप्त्से, थामसेरकु, कान्गतेन्गा, चोलात्से, मकालू (पाचव्या क्रमांकाचं शिखर) ह्यांनी सुरेख दर्शन दिलं. डिंगबोचेला आमचा उद्या दुसरा व शेवटचा रेस्ट डे असणार होता. अर्थात सकाळी अॅक्लमटायझेशन वॉक होताच. उद्या आरामाचा दिवस म्हणून रिलॅक्स वाटत होतं. रात्री जेवायच्या आधी मस्त अंताक्षरी खेळलो. बाहेर निळ्याशार आकाशात सगळी शिखरं चंद्रप्रकाशात मस्त न्हाऊन निघालेली दिसत होती. आत्तापर्यंतचे सगळे ट्रेक्स हे उत्तरांचलमध्ये केले असल्याने ही अशी शिखरं काही पहिल्यांदाच बघत नव्हते पण इथे आजूबाजूला असणारी सगळी शिखरं नावाजलेली होती त्यामुळे फारच भारी वाटलं. आता हे असंच हवामान अगदी शेवटपर्यंत म्हणजे निदान काला पत्थरला पोचेपर्यंत तरी राहू देत म्हणजे ज्यासाठी आलो होतो त्या एव्हरेस्ट्चं दर्शन नीट होईल अशी मनातल्या मनात प्रार्थना केली. ट्रेकमध्ये पहिल्यांदाच फेदर जॅकेट घालावं लागलं इथे आल्यावर.
दिवस ६ वा:- डिंगबोचे
अॅक्लमटायझेशनसाठी डिंगबोचेच्या मागच्या बाजुलाच एका टेकडीवर जाऊन समीट करायचं असं आधी ठरलं होतं. पण मग नंतर नुसतंच तासभर जाऊन परत यायचं ठरलं. टेकडीच्या पलिकडून आमचा उद्याचा 'थुकला' ला जायचा रस्ता दिसत होता. बरीच जणं अॅक्लमटायझेशन वॉकसाठी आले होते. आमच्यातले तीन जण अजून वर जाऊन चढून आले. आता बाकीचा दिवस अगदीच मोकळा होता. उद्या उंची गाठणार असलो तरी वॉक मॉडरेट व फक्त ३ तासांचा होता. देबोचे सोडल्यापासून फोनचं नेटवर्क गेलं होतं. गोरक शेपला दोन-तीन मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स आहेत त्यामुळे तिथे व्यवस्थित नेटवर्क मिळतं असं डेंडीसरांकडून कळलं. इथे सॅटेलाईट फोन दिसत होता, ज्याचे दर फारच महाग होते. इंटरनेटचे दरही असेच असायचे.
डिंगबोचेहून आजूबाजूची शिखरं :- मा. अमा दबलम
टेकडीवरून डिंगबोचे गाव
आम्ही ट्रेकमध्ये पहिल्यांदाच दुपारी जेवणानंतर ताणून द्यायचा प्लॅन केला. २-२.३० तास झक्कास झोप झाल्यावर अजूनच फ्रेश वाटायला लागलं. आमच्यातले दोघं तिघं कॅरम खेळायला गेले होते. ते परत आल्यावर आम्ही पण डायनिंग रूममध्येच पत्त्यांचा डाव मांडला. आमच्या टी-हाऊसजवळच फ्रेंच कॅफेचा बोर्ड अपर्णाच्या चहा/कॉफीबाज नजरेने हेरला होता. त्यामुळे तिथे जाऊन कॉफी पिऊन येणं प्राप्त होतं. मग तिथेच कॉफी पित पित पत्ते कुटायचा प्लॅन सर्वानुमते ठरला व आम्ही मोर्चा फ्रेंच कॅफेकडे वळवला. कॉफी व पेस्ट्रीज ऑर्डर केल्या व पत्त्यांचा डाव मांडला. कॅफेत आमच्याशिवाय कोणीच नव्हतं त्यामुळे त्या मालकिणीलाही प्रॉब्लेम नव्हता. काहींच्या कॉफीच्या दोन राऊंड्स झाल्यावर व अंधार पडत आल्यावर आम्ही आमच्या टी-हाऊसवर परतलो.
आज आमच्या टी-हाऊसमध्ये ट्रेकर्सची बरीच गर्दी झाली होती. त्यामुळे जेवणानंतर डायनिंग रूममध्ये न रेंगाळता रूमवर परतून उद्याची तयारी केली. फेदर जॅकेट सॅकमध्येच ठेवा अशी सूचना ट्रेक लीडरने केली होती. 'थुकला' ची उंची खरंतर खूप नव्हती पण थंडी जास्त असण्याची शक्यता होती.
डेंडीसरांच्या बहिणीची तब्येत बिघडली असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे त्यांना डिंगबोचेहून तिच्या गावाला जावं लागणार होतं. तिथूनच ते आम्हांला 'लोबुचे' ला भेटणार होते. उद्या अगदी पहाटेच ते निघणार होते. त्यामुळे उद्यापासून आमचा दुसरा गाईड 'आन्ग गुम्बु' वरच सगळी जबाबदारी होती.
दिवस ७ वा:- डिंगबोचे ते थुकला/तुगला/तुकला (१४,२७१ फूट)
डिंगबोचेच्या खालच्याच बाजूला 'फेरिचे' गाव आहे. डिंगबोचे डोंगरावर तर फेरिचे खाली होतं. थोडं चालून गेल्यावर गाव दिसायला लागलंच. या गावात हॉस्पिटल तसंच हेलिपॅड आहे. त्यामुळे थुकलाला जाताना रेस्क्यूचं हेलिकॉप्टर सारखंच नजरेला पडत होतं.
डिंगबोचेकडून थुकलाकडे जाताना खाली दिसणारं 'फेरिचे'
आज तसा बर्यापैकी रमत गमत ट्रेक होता. फार उंची गाठायची नव्हती व फक्त ३ च तास असं डेंडीसरही म्हणाले होते. आता डिंगबोचे सोडल्यावर तर आमच्या चोहोबाजुंना हिमाच्छादित शिखरांनी गर्दीच केली होती. हवामानही स्वच्छ असल्याने निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती भन्नाट दिसत होती. आणि आज चालही फार नसल्याने आम्ही त्या आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेत चाललो होतो. ऊन कडकडीत असलं तरी हवेत गारवा होता. जेवणाच्या वेळेपर्यंत 'थुकला' आलंच. मोजून २-३ टी-हाऊसेस होती इथे. रूममध्ये सामान ठेवलं व डायनिंग रूममध्ये जेवायला आलो.
थुकला
अल्टिट्यूडचा बाकी काहीच त्रास होत नव्हता, फक्त भूक असली तरी जेवायची इच्छा नसायची. तेच तेच पदार्थ बघूनही कंटाळा आला होता. त्यामुळे मी आणि अपर्णा अगदी ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत दोघीत मिळून एकच पदार्थ ऑर्डर करायचो. कधी कधी तर ते ही जायचं नाही. नामचेला डेंडीसरांनी आम्हांला चव म्हणून लसूण व मिरची वाटलेला ठेचा काय दिला, त्यांना तो बाटलीत भरून त्यांच्या बरोबरच घ्यावा लागला. प्रत्येक जेवणाच्या वेळेस ते तो आम्हांला काढून द्यायचे. आम्हीही तो कशातही घालून खायचो. काल निघायच्या गडबडीत तो ठेचा 'डिंगबोचे' लाच राहिला होता. इथल्या डायनिंग रूममध्ये आम्ही लाल मिरचीचा ठेचा बघितला म्हणून घेऊन बघितला तर तो कायच्या काय तिखटजाळ निघाला.
अल्टिट्यूडचा त्रास होऊ नये म्हणून तसंही रुममध्ये जाऊन बसायला किंवा झोपायला मनाई होती त्यामुळे जेवण झाल्यावर आम्ही तिथेच पत्त्यांचा डाव मांडला. तिथे दोघं जण आले होते. कोणत्यातरी एक्सपिडीशनला जात असावेत असं वाटलं म्हणून चौकशी केली असता कळलं की ते ६५ दिवसांचा 'ग्रेट हिमालयन ट्रेल' करत होते. त्यातले २३ दिवस पूर्ण झाले होते व ४२ दिवस शिल्लक होते. नुसतं ऐकूनही भारी वाटलं आम्हांला.
दिवस जसा कलायला लागला तशी चांगलीच थंडी जाणवायला लागली. इथल्या डायनिंग रूममध्ये फायर प्लेस असायचीच. संध्याकाळी त्यात शेणाच्या गोवर्या वगैरे घालून ती पेटवली की मस्त उबदार वाटायचं. आम्हांला बर्याचदा डायनिंग रूममध्येच झोपायची इच्छा व्हायची. इथला पत्त्यांचा डाव पार रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत सुरु राहिला. रात्री झोपल्यावर तर रजईच्या आत चादर लावून व फेदर जॅकेट असूनसुद्धा चांगलीच थंडी वाजत होती.
दिवस ८ वा:- थुकला ते लोबुचे (१६,१७४ फूट) ते गोरक शेप (१६,९२९ फूट)
आज २००० फूटांची उंची गाठायची होती परंतू चाल तीन तासांचीच होती. चढणही फार नव्हती असं गुम्बुने सांगितलं होतं. काल सॅकमध्ये ठेवलेलं फेदर जॅकेट आज परत डफेल बॅगमध्ये टाकलं व अंगावरचे कपड्यांचे लेअर्स तेवढे वाढवले. काल चढताना सॅकमध्ये असलेल्या त्या जॅकेटचं वजनही सहन होत नव्हतं. आमच्या प्रोग्रॅमप्रमाणे आम्ही आज 'लोबुचे' ला मुक्काम करणार होतो. पण सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस ट्रेक लीडरने सगळ्यांना जमत असेल, अल्टिट्यूडचा त्रास वगैरे नाही झाला तर आपण आज लोबुचेला मुक्काम न करता दुपारच्या जेवणानंतर 'गोरक शेप' करिता निघू असं सुचवलं. थुकला सोडल्यावर एक टेकडी ओलांडेपर्यंत चढच होता. टेकडी ओलांडल्यावर एव्हरेस्ट मोहिमेत मृत्यूमुखी पडलेल्यांची आठवण म्हणून बांधलेली स्मारकं नजरेस पडली. काही नुसतीच दगड रचून केलेली तर काही पक्की बांधलेली. त्यात बाबू चिरी शेर्पा व स्कॉट फिशरचंही एक होतं. बाबु चिरी शेर्पाच्या नावावर दोन विश्वविक्रम आहेत. एक म्हणजे एव्हरेस्टच्या माथ्यावर तो २१ तास ऑक्सिजनचा बाह्यपुरवठा न घेता राहिला व जलद एव्हरेस्ट चढणे.
हे स्मारक 'बाबू चिरी शेर्पा' चं
लोबुचे गाव
थुकला सोडल्यापासून आता पांढर्या दगड धोंड्यांतूनच सगळी वाट दिसत होती. डाव्या बाजुला 'लोबुचे' शिखर दिसायला लागलं. शिखरावर चढाई करणारी माणसंही दिसायला लागली. १२ वाजेपर्यंत लोबुचेला पोचलो देखील. थुकलापेक्षा लोबुचे मोठं दिसत होतं. इथे पोचेपर्यंत तसा काही थकवा जाणवत नव्हता त्यामुळे जेवल्यावर लगेचच आमच्या ट्रेकचा शेवटचा टप्पा 'गोरक शेप' ला जायचं ठरल.
लोबुचे सोडल्यावर बराच वेळ सपाटीच होती. नंतर मात्र एका चढानंतर परत जी दगड धोंड्यांची वाट सुरु झाली ती अगदी शेवटपर्यंत. लोबुचे ते गोरक शेप साधारण ३ तास लागतील असा अंदाज होता. पण गोरक शेप काही येत नव्हतं. जाताना उजव्या बाजुला खुंबू ग्लेशिअरचा भाग दिसत होता. नुप्त्से शिखरही दिसत होतं. इथे मात्र उंचीमुळे डोकं दुखायला लागलं होतं. शेवटी ४.३० तासांच्या चालीनंतर गोरक शेप दृष्टीस पडलं. बाजुलाच 'काला पत्थर' ही टेकडीही दिसत होती. खरोखरच काळसर रंगाच्या मातीची टेकडी होती.
मा. पुमोरी समोरच (त्याच्या खालीच मातकट रंगाची टेकडी दिसतेय तीच काला पत्थर)
संपूर्ण मोरेनचा रस्ता. उजवीकडे खुंबू ग्लेशिअरचा भाग.
पोचलो एकदाचे. 'गोरक शेप'
गोरक शेपला पुण्याच्या "गिरीप्रेमीं" नी २०१२ साली स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पण आम्ही ज्या बाजूने उतरलो त्याच्या दुसर्या बाजूला तो आहे हे नंतर कळलं. शिवाजी महाराजांचा हा सर्वाधिक उंचीवर असलेला पुतळा आहे असं म्हटलं जातं.
गोरक शेपला पोचल्यावर थोडं गरम पाणी पिऊन अर्धी डायमॉक्स व एक कॉम्बिफ्लाम घेतली व रूममध्ये जाऊन १०-१५ मिनीटं पडून राहिले. नंतर एकदम ओके वाटायला लागलं. इथल्या हॉटेलमध्ये लोकांची बर्यापैकी गर्दी दिसत होती. इथे तसंही आता संध्याकाळभर काहीच उद्योग नव्हता. उद्या सकाळी ५ वाजता काला पत्थरला जायचं ठरवलं होतं त्यामुळे पहाटे ४ वाजता उठायचं होतं. म्हणून मग रात्री ९ च्या आधीच आडवे झालो. थुकलाला जायला निघण्यापूर्वी काला पत्थरहून सुर्योदयच्या वेळेस माऊंट एव्हरेस्टचं दर्शन घ्यायचं होतं.
दिवस ९ वा: गोरक शेप (१६,९२९ फूट) - काला पत्थर (१८,५१३ फूट) ते थुकला
काला पत्थरला जायला ठरल्याप्रमाणे वेळेवर उठलो व आवरून डायनिंग रूममध्ये आलो. हॉटेलचे कर्मचारी तिथेच गाढ झोपले होते. आम्ही चहा घेतला, गरम पाणी बाटल्यांमध्ये भरून घेतलं व निघालो. ५ वाजत आले होते पण उजाडलं होतं. बाहेर चांगलीच थंडी होती. अगदी ग्लोव्हज घालूनही बोटं बधीर झाली होती. आमच्यासारखीच बरीच जणं काला पत्थरच्या दिशेने निघाली होती. काला पत्थरहून एव्हरेस्टचं दर्शन चांगलं होतं एवढंच काय ते त्याचं महत्व.
आम्ही पोहोचतानाच शिखरं उजळलेली बघून असं वाटलं की अजून लवकर यायला हवं होतं, यापेक्षा झकास वाटलं असतं.
काला पत्थर डाव्या हाताला ठेवल्यावर काला पत्थरच्याच मागे पुमोरी, त्याच्या बाजुलाच लिगत्रेन व समोरच खुंबुत्से दिसत होती. काला पत्थरकडे पाठ करून उभं राहिल्यावर तोंडासमोरच नुप्त्से दिसत होता. एव्हरेस्टने नुप्त्से शिखराच्या मागून डोकं काढलं होतं. ज्यासाठी हा सगळा अट्टाहास केला ते जगातलं अत्युच्च शिखर आता समोर दिसत होतं. आजपर्यंत कल्पनेत मी ह्याचं अनेकदा दर्शन घेतलं असेल.पण आज प्रत्यक्षात ते दृश्य समोर असताना का कोण जाणे हरखून जायला झालं नाही खरं. तरीही तो नजारा डोळ्यांत आणि कॅमेर्यात साठवून घेतला. काला पत्थर अर्धा चढून मग तिथेच थांबलो कारण आज परतीचा रस्ता धरायचा होता. आमच्यातले तीन जण काला पत्थरच्या माथ्यापर्यंत म्हणून जाण्यासाठी निघून गेले.
जगातील अत्युच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट, काला पत्थरहून सूर्योदयाच्यावेळेस. (उजवीकडचा समजलात? उजवीकडून दुसरं टोक, तोच मा. एव्हरेस्ट)
बर्फाच्छादित शिखरं सूर्योदयाच्या वेळेस
फोलिएज हा एव्हरेस्ट बेस कँपचा ट्रेक गोरक शेप व काला पत्थरपर्यंतच नेतात, एव्हरेस्ट बेस कँपपर्यंत घेऊन जात नाहीत. एव्हरेस्ट बेस कँपहून खरंतर एव्हरेस्ट नीट दिसत नाही. तो काला पत्थरहून चांगला दिसतो, त्यामुळे बरेच जण बेस कॅंपपर्यंत न जाता काला पत्थरहूनच मागे फिरतात.
आज परततांना थुकलापर्यंत नक्की आणि जमलं असतं तर फेरिचेला मुक्काम करायचं ठरत होतं. म्हणून मग सकाळी ६,३० च्या आसपास हॉटेलवर परतलो. सामान आवरून ब्रेकफास्टला खाली आलो. तोवर आमचे काला पत्थरच्या माथ्यापर्यंत गेलेले मेंबर्सही परतले. त्यांचं आवरून होईस्तोवर निघायला १०.३० वाजलेच. येताना कदाचित रस्त्याचा अंदाज होता म्हणून की काय कोण जाणे पण २ तासात लोबुचेला पोचलो. जेवताना कोणीतरी आज रात्रीच्या मुक्कामाला 'पांगबोचे'ला जायची टूम काढली. पांगबोचेपर्यंत पोचायला कदाचित संध्याकाळचे ६.३० वगैरे वाजले असते. फेरिचेपर्यंत अंदाज घेऊन पुढचं ठरवू असं ठरवलं. लोबुचेला जेवण उरकून लगेच थुकलाकडे निघालोच. दुपारी २.३० वाजता म्हणजे लोबुचेपासून तासाभरात थुकलाला पोचलो.
गोरक शेपचा निरोप घेऊन लोबुचेकडे जाताना
थुकलाहून फेरिचेपर्यंत सगळा उताराचाच रस्ता होता त्यामुळे फेरिचेला पोचायला फार वेळ लागणार नाही असा अंदाज होता. रस्ता अगदीच सपाटीचा होता तरी बरंच अंतर होतं चालायला त्यामुळे ४.३० वाजले पोचायला. आन्ग गुम्बु म्हणाला की आज पांगबोचेला नकोच जायला, इथेच मुक्काम करू. आमच्यातल्या डॉक्टरांची उतरताना अचानक लोअर बॅक दुखावली त्यामुळे आज पुढे जाणं त्यांनाही जमलं नसतंच. त्यामुळे फेरिचेला मुक्काम करायचं नक्की झालं. आता परतीचे वेध लागले होते म्हणून की काय कोण जाणे पण पत्ते खेळायचा मूड झालाच नाही आज.
उद्याचा पट्टा पण तसा मोठा होता पण किंचित उशीरा म्हणजे ८ वाजता निघायचं ठरलं होतं.
दिवस १० वा:- फेरिचे ते नामचे
सकाळी सकाळी डेंडीसरांनी येऊन आम्हांला सरप्राईज दिलं. त्यांना बघून सगळेच एकदम खुश झाले. डेंडीसर म्हणजे चैतन्याचं प्रतिक होतं. आम्ही काठमांडूला पोचल्यावर लगेच ते दोन दिवसांत 'कैलास मानसरोवर यात्रा/ट्रेक' साठी तिबेटला जायला निघणार होते.
ठरल्याप्रमाणे निघालो पण ज्या रस्त्याने डिंगबोचेला आलो होतो त्यापेक्षा हा रस्ता वेगळा होता. सुरुवातीचा उत्साह होता त्यामुळे झपाझप चाललो होतो. हा रस्ता ज्या स्यमोरे गावातून येताना आलो होतो तिथेच जाऊन मिळाला. आधी स्यमोरेतच जेवायचा प्लॅन होता पण ते फारच लवकर झालं असतं त्यामुळे तेंगबोचेच्या खालच्याच गावात 'फुंकी थांगा' ला जेवू असं ठरलं.
अमा दबलम पांगबोचेहून अगदी विरुद्ध कोनात (फोटो पॉईंट अॅन्ड शूटने काढला, त्यामुळे मनासारखी सेटिंग्ज नाही करता आली. म्हणून इमेज HDR केलीये.)
देबोचे ते तेंगबोचे हा चढ सोडला तर बाकी पूर्ण उताराचाच रस्ता होता. हे अंतर तसं फक्त २० मिनीटांचच, पण त्या चढानेही चांगलीच दमछाक केली. येताना ढगाळ हवामानामुळे काहीच दिसलं नव्हतं पण आज लख्ख ऊन होतं त्यामुळे तेंगबोचेच्या आजूबाजूची सगळी हिमाच्छादित शिखरं मस्त दिसत होती. आमच्यातल्या डॉक्टरांचा तिथून पायच निघत नव्हता. तेंगबोचेहून उतरत असताना एक रनर दिसला आम्हांला. तो धावत चालला होता. इथे एक 'एव्हरेस्ट मॅरेथॉन' नावाची रेस दरवर्षी आयोजित केली जाते. ही रेस 'गोरक शेप' ला सुरु होऊन 'नामचे बझार' ला संपते. गेल्यावर्षीचा रेकॉर्ड ३ तास ४० मिनीटं ४३ सेकंदाचा आहे.
आत्तापर्यंत राहिलेल्या दोन-तीन टी-हाऊसमध्ये आम्ही तिथल्या सहभागी लोकांनी लावलेली सर्टिफिकेट्स बघितली होती. हा बघितलेला रनर त्याच मॅरेथॉनची प्रॅक्टिस करत होता. हाच नंतर आम्हांला फुंकी थांगा ते नामचेच्या वाटेवर परत येताना दिसला. तेंगबोचेची उतरण आम्ही उतरतोय व लोकं चढतायत हे बघायला बरं वाटत होतं.
फुंकी थांगाला पोचल्यावर पायातले बूट अक्षरशः फेकून द्यावेसे वाटत होते. उरलेला ट्रेक फ्लोटर्सवर करायचा मोह झालेला. उतारामुळे पायाची बोटंही दुखायला लागली होती. अजून अर्ध अंतर शिल्लक होतं, त्यात फुंकी थांगानंतर तासा-दीड तासाचा चढ होता. जेवण झाल्यावर पाणी भरून घेऊन राहिलेल्या चालीसाठी सज्ज झालो. नामचेला पोचल्यावर काय काय करायचं त्याचे प्लॅन्स ऑलरेडी झालेच होते. त्यामुळे पाय रेटण्याशिवाय पर्याय नव्हता. चढामुळे गाडी न्युट्रल गिअर मध्येच चालली होती. छोटे छोटे ब्रेक्स घेत घेत एकदाचे ५.३० च्या सुमारास नामचे ला पोचलो. आमच्या ग्रूपमधले आघाडीचे शिलेदार जे पुढे गेले होते ते आधीच फ्रेश होऊन बसले होते.
सगळ्यांचा 'कॅफे दान्फे' ला जायचा प्लॅन होता. आज या टी-हाऊसचं डिनर न खाता बाहेरच खायचं ठरवलं. तसंही तेच तेच खाऊन कंटाळाही आलाच होता. मग सगळ्यांनी तिथे गेल्यावर पूल खेळून, व्हरायटी खाऊन जीवाचं नामचे केलं.
उद्याचा ट्रेकचा चालायचा शेवटचा दिवस होता. परंतू भरपूर चालायचं होतं. नामचे बझार ते लुकला हे अंतर भरपूर होतं. नामचे ते फाकडिंग उतारच होता तसा. पण फाकडिंग ते लुकला मात्र तीन तासाचा चढ होता.
दिवस ११ वा :- नामचे बझार ते फाकडिंग ते लुकला
सकाळी ७ वाजता निघायचं ठरलं होतं पण निघायला ७.१५ झाले. फाकडिंगपर्यंत उतार असल्याने फार वेळ लागणार नाही असं वाटत होतं. डेंडीसरांनी ४ तासांचा अंदाज वर्तवला होता. नामचेला शिरताना एक चेक पोस्ट लागतं तिथे पंधरा एक मिनीटं मोडली व आम्ही उताराला लागलो. येताना जो तीव्र चढ चढलो होतो तो आता उतरायचा आहे ह्या विचारानेच बरं वाटत होतं. झपझप उतरत तासाभरात हिलरी ब्रिजजवळ पोचलो देखील.
आज आम्ही उतरत असताना या वाटेवर बेस कँपला जाणारे भरपूर ट्रेकर्स दिसत होते. आणि...आत्ता थोड्या वेळापर्यंत सगळं आलबेल असलेल्या मला अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. नाक अचानक बंदच झालं. खोकल्याचा त्रास कालपासून होत होताच. पण नाकाने श्वास घेणं बंद झाल्यावर तोंडाने श्वास घेण्यावाचून काही पर्याय राहिला नाही आणि घसा कोरडा पडून खोकला वाढला. जोरसाले गाव मागे टाकल्यावर तर मी हैराणच झाले कारण प्रत्येक दोन पावलांनंतर थांबावं लागत होतं. ट्रेक लीडर सोडल्यास बाकीची मंडळी केव्हाच पुढे निघून गेली होती. मी लीडरकडे 'ऑट्रिविन' चे ड्रॉप्स आहेत का याची चौकशी केली. पण त्याच्याकडे असलेले ते ड्रॉप्स डफेल बॅगमधून पुढे गेले होते. मला आजपर्यंत कधीच ऑट्रिविन घालायची वेळ आली नव्हती त्यामुळे माझ्याबरोबर घेतले नव्हते मी. मध्ये-मध्ये नाकपुड्या वर ओढून श्वास घेणं चाललं होतं. हे कमी होतं म्हणून की काय, घसा कोरडा पडत होता म्हणून सतत लेमनड्रॉप्स चघळल्याने दाढही दुखायला लागली.
या अवस्थेत मला फाकडिंग-लुकला हे ३ तासांचं अंतर चालणं शक्य नाही हे कळून चुकलं. कारण उतरताना इतका त्रास होत होता, चढताना सतत तोंडाने श्वास घेत राहाणं अशक्य होतं. लीडरला तसं बोलून दाखवलं मी आणि मला घोडा मिळू शकेल कां याची चौकशी केली. नुसत्या कल्पनेने मला कसंसच झालं खरंतर पण नाईलाजच होता. कारण ३ तासांच्या चालीसाठी मला ६-७ तास कितीही लागू शकले असते. कशीबशी फाकडिंगला पोचले एकदाची. जेवणाचा ब्रेक घेऊन लगेच लुकलासाठी निघायचं होतं. मी तिथे घोड्याची चौकशी करून ठरवूनच टाकला.
माझ्याबरोबर आन्ग गुम्बु असणार होता. घोड्यामुळे खूपच सोप्पं झालं मला पण प्रवास अधेमधे फारच ड्येंजर होता. उतारावरच्या पायर्यांवर किंवा अगदी निमुळत्या वाटेवर जीवात जीव नव्हता. शेवटी एकदाची दीड तासाने 'लुकला' ला पोचले. बाकीचे मेंबर्स हळूहळू आलेच मागोमाग.
'लुकला' चं हे टी-हाऊस अगदीच सुमार होतं. त्यामुळे आम्ही दोन खोल्या बदलल्या. संध्याकाळी 'स्टारबक्स' ला भेट द्यायचा प्लॅन ठरला होता. आज शेवटचा दिवस असल्याने दोन पोर्टर्स व गाईड 'आन्ग गुम्बु' ला निरोप द्यायचा होता. त्यामुळे संध्याकाळी ७.३० वाजता डायनिंग रूममध्ये जमायचं ठरलं. त्याआधी आम्ही आवरून 'स्टारबक्स' ला गेलो. बर्गर व कॉफी घेऊन तिथेच गप्पा मारत बसलो. तेव्हा नाकात काहीतरी अडथळा जाणवला म्हणून स्वच्छ केलं तर बर्यापैकी रक्त पडलं व नाक एकदम मोकळं झालं. हे आधीच झालं असतं तर...? हा नाकातून रक्त यायचा प्रकार उंचीवर नाही झाला अजिबात पण पुढचे २-३ दिवस चालू राहिला. त्यामुळे नाक स्वच्छ करण्यावरही आम्ही दोघींनी रेशनिंग लावून घेतलं होतं.
स्टारबक्समधून आल्यावर आज पोर्टर्स व गाईडबरोबर जेवण केलं व त्यांना टीप दिली. उद्या सकाळी लुकला-काठमांडू विमानासाठी नशीब आजमावायचं होतं, त्यामुळे ब्रेकफास्टकरिता ५ वाजता डायनिंग रूममध्ये भेटायची शेवटची सूचना डेंडीसरांनी दिली.
दिवस १२ वा: लुकला ते काठमांडू
आज लवकर उठायचा शेवटचा दिवस होता . सकाळी ४.१५ ला उठलो. आवरून वेळेवर ५ वाजता डायनिंग रुममध्ये जाऊन ब्रेकफास्ट व चहा घेतला. बाहेर हवामान छान दिसत होतं. काठमांडूला जायला विमान उडेल याची खात्री वाटली. आमच्या पोर्टर्सनी शेवटच्या आमच्या डफेल बॅग्ज उचलल्या व आम्ही लुकलाच्या विमानतळावर पोचलो. तिथे सगळ्यांची झुंबड उडालेली. विमानतळ म्हणजे इन मीन तीन खोल्या. डेंडीसरांच्या कृपेने आमच्या सामानाचं चेक इन पटकन झालं. परत जाताना आमचं तिसरं विमान असणार होतं. सगळे सोपस्कार आटोपून आत जाऊन बसलो. दहा एक मिनीटांत विमानं यायला सुरुवात झालीच. एका मागोमाग एक विमानं उतरत होती. काठमांडूहून आलेलं सामान व लोकं उतरून नवीन चढवली की लगेचच काठमांडूसाठी उडत होती. बिल्डिंगमधून लोकंही फोटो काढत होते. यावेळेस अजिबातच वाट पहावी लागली नाही आम्हांला. सकाळी ७ वाजून १० मिनीटांनी आम्ही काठमांडूच्या दिशेने उडालो देखील.
८ च्या आसपास काठमांडूला उतरल्यावर लगेचच हॉटेलच्या गाडीने हॉटेलवर गेलो. सामान टाकून, फ्रेश होऊन पशुपतीनाथ व बुद्धनाथ बघायला बाहेर पडलो. आज पहिल्यांदाच नीट काठमांडू बघत होतो. अगदीच बकाल, बेशिस्त वाटलं. इथे आता २ दिवस काढायचे होते. त्यात उंचीवरून जाऊन आल्यामुळे काठमांडूचा उकाडा अगदीच नको वाटत होता. पशुपतीनाथाचं दर्शन त्यामानाने खूपच चांगलं झालं. केदारनाथला जाऊन आल्यावर पशुपतीनाथाचं दर्शन घ्यायचं असतं असं ऐकलं. खखोदेजो. आमच्या ग्रूपमधल्या आम्हां तिघांचं केदारनाथ करून झालं होतं. तिथूनच सरळ 'बोधनाथ/बुद्धनाथ' ला गेलो. तिबेटियन व नेपाळी बुद्धधर्मीयांचं हे पवित्र स्थान. दुसर्याच दिवशी 'बुद्धजयंती' असल्याने तिथे वेगवेगळे कार्यक्रम चालले होते. बोधनाथच्या आजूबाजूला बरीच सोवेनिअर्स, कपड्यांची दुकानं व रेस्टॉरंट्सही आहेत. बुद्धजयंतीनिमित्त स्तूप बंद होता त्यामुळे आत जाता आलं नाही मग आम्ही आसपासच्या दुकानांमध्ये फिरलो व नंतर तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवून हॉटेलवर परतलो.
बोधनाथ
काठमांडूमधला असाच एक प्रसिद्ध भाग म्हणजे 'थामेल', शॉपिंग पॅराडाईस अगदी माऊंटेनिअरींगचे साहित्यही छान मिळते. दुसरा दिवस आम्ही दिवसभर थामेलमध्ये फिरण्यात घालवला. काठमांडूमध्ये इतके परदेशी पर्यटक येतात पण मला तर ते हरिद्वारपेक्षाही अस्वच्छ वाटलं. प्रचंड धूळ व प्रदुषण असल्याने रस्त्याने चालणार्या बर्याच लोकांच्या नाका-तोंडावर मास्क होता. उद्या इथून सकाळी दिल्लीला जायला निघायचं होतं. म्हणून मग रात्री काठमांडूमधल्या फेमस 'फायर अॅन्ड आइस पिझ्झेरिया' ला गेलो आणि ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.
ट्रेकनंतर :-
इतकी वर्ष मनात असलेल्या ट्रेकला जाता आलं, तो पूर्ण करता आला याचा खरंतर खूप आनंद व्हायला हवा होता. पण तो तसा नाही झाला. कुठेतरी काहीतरी अपूर्ण राहिल्याची रुखरुख आहे. कां? ते माहीत नाही. खूप विचार केला यावर मी आल्यावर.
कदाचित.... माझा स्टॅमिना खूप कमी पडला म्हणून असेल. ट्रेकसाठी नाही परंतू मागच्या वर्षीपासूनच मी वजन उतरवायला सुरुवात केली होती. रोजचा व्यायाम नियमित सुरु होता त्यामुळे तशी फीट होते मी. त्यामुळे खूप त्रास होणार नाही अशी अपेक्षा होती माझी. अल्टिट्यूडचा त्रास होईल ही भिती होती, ती मात्र शेवटचा दिवस सोडला तर अगदीच फोल ठरली.
कदाचित....फोलिएज हा ट्रेक एव्हरेस्टच्या बेस कँपपर्यंत नेत नाहीत म्हणून ती अपूर्णतेची भावना असेल कां? कारण तिथपर्यंत गेलो तरी त्या ठिकाणी नाहीच पोचलो ही रुखरुख आहेच.
ट्रेकहून परत येताना आमच्या विरुद्ध दिशेला जाताना लोकं बघितली की मनात सगळ्यात आधी हाच विचार यायचा, हुश्श्य, झाला एकदाचा ट्रेक पूर्ण. या लोकांना अजून किती चालायचं आहे. त्यावेळेस मनात एक विचार असाही आणून बघितला की मला या ट्रेकला परत यावंसं वाटेल कां? त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंच आलं होतं. ट्रेकच्या दिवसांत फक्त आणि फक्त ट्रेकबद्दलचेच विचार डोक्यात असायचे. बर्याचदा असं झालं की अगदी फोटो काढायचंही डोक्यात यायचं नाही किंवा आलं तरी कंटाळा केला जायचा. खूप मेमरी कार्ड्स वगैरे घेऊन गेले होते खरंतर पण इतके फोटो निघालेच नाहीत. त्यामुळे फोटोंसाठीही परत जावंसं वाटतंय. आता ट्रेकहून परत आल्यावर ज्या चुका या ट्रेकमध्ये माझ्याकडून झाल्या त्या सगळ्या टाळून हा ट्रेक खर्या अर्थाने परत एकदा पूर्ण करावासा वाटू लागलाय. फिंगर्स क्रॉस्ड.
समाप्त
No comments:
Post a Comment