जॉर्डनसारख्या प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध असलेल्या पण आधुनिक आकर्षणांचे काहीच वलय नसलेल्या देशाच्या सफरीसाठी साथी मिळविणे कल्पनेपेक्षा जरा जास्तच कठीण गेले. जाहिरातीला २५ -३० जणांनी प्रतिसाद दिला, आगाऊ रक्कम भरण्याची वेळ आली तोपर्यंत अकरा जणच शिल्लक उरले, फिलिपिनो नागरिकांना व्हिसा देण्याच्या जॉर्डनच्या काही नियमांमुळे त्यातले चार गळले आणि शेवटी सात जणच बाकी राहिले. सहलीची किंमत ठरवताना २५ जणांना जमेस धरल्याने टूर एजन्सीने आता सात जणांसाठी दर माणशी जास्त पैसे पडतील असे सांगितले. नशिबाने तो फरक सातही जणांना मान्य झाल्याने सहल नक्की झाली आणि आमचा जीव भांड्यात पडला !
सहलीत विविध स्तरांवरचे कर्मचारी असल्याने खर्च ताब्यात ठेवण्यासाठी दम्माम या आमचे सौदी अरेबियातल्या ठिकाणापासून जॉर्डनची राजधानी अम्मान पर्यंतचा साधारण १७०० किमी लांबीचा प्रवास बसने करण्याचे ठरले. इतक्या लांबीचा आणि अठरा-वीस तासांचा बसप्रवास मी पहिल्यानेच करत असल्याने जरा काळजी वाटत होती. पण दम्माम ते अम्मान अशी तडक आरामबस असल्याने जरा बरे वाटले. शिवाय आपल्याच संस्थेतले सहा सहप्रवासी असल्याने प्रवास गप्पा मारत मजेत होईल हा दिलासा होताच.
या प्रवासाचा मार्ग खालील नकाश्यात दाखवला आहे...
दम्माम ते अम्मान बस प्रवासाचा मार्ग (मूळ नकाशा जालावरून साभार)
बसच्या खुर्च्या आरामदायक होत्या. दिवसाउजेडीचे पहिले आठ-नऊ तास खेळीमेळीने गप्पा मारत गेले आणि रात्र पडू लागली. एका थांब्यावर पोटपूजा आटपल्यावर सर्वच जण आलटून पालटून डुलक्या आणि गाढ झोप घेऊ लागले. बाहेर नेहमीच दिसणारे वाळवंट आणि त्यात रात्र असल्याने बाहेर बघण्यात कोणालाच रस नव्हता. पहाटे पहाटे सौदी-जॉर्डन सीमाचौकी आली तेव्हा देशबदलाचे सोपस्कार आटपायला उठवले गेले. टूर एजन्सीच्या माणसाने आमचे पासपोर्ट ताब्यात घेऊन सगळी कारवाई केली. त्यामुळे त्या आवारात पाय मोकळे करत गप्पा मारायला अर्धा तास मिळाला. नंतर पुढे असलेले साधारण २०० किलोमीटर परत आलटून पालटून डुलक्या आणि गाढ झोप असेच गेले.
ही आहेत त्या प्रवासातली काही क्षणचित्रे...
प्रवासातले एक बस स्थानक
.
एका थांब्यावर पोटपूजा आटपल्यावर उघड्या आकाशाखाली चहा-कॉफीपानाची मजा घेताना
जॉर्डन
जॉर्डनमध्ये फिरायला सुरुवात करण्या करण्याअगोदर त्या देशाची थोडी तोंडओळख करून घेतल्यास सहलित जरा अजून जास्त मजा येईल.
सर्वसाधारणपणे जॉर्डन (Jordan; अरबीमध्ये : الأردن म्हणजे al-Urdun किंवा al-Ordon) असे संबोधल्या जाणार्या या देशाचे औपचारिक नाव आहे 'जॉर्डनचे हाशेमाईट राज्य' (हाशेमाईट किंगडम ऑफ जॉर्डन; अरबीमध्ये: المملكة الأردنية الهاشمية म्हणजे al-Mamlakah al-Urdunīyah al-Hāshimīyah). पश्चिम आशियामध्ये असलेल्या या देशाच्या दक्षिण व दक्षिणपूर्वेस सौदी अरेबिया, उत्तरपूर्वेस इराक, उत्तरेस सिरीया, पश्चिमेस इझ्रेल व मृत समुद्र आणि दक्षिणेच्या अती चिंचोळ्या भूभागाला लागून रक्त समुद्रातले आकाबाचे आखात आहे.
आजपासून ५०,००० वर्षांपूर्वी मानवाने प्रथमच कायमस्वरूपी पादाक्रांत केलेल्या सुपीक चंद्रकोर किंवा लेवांत नावाच्या भूमीचा एक भाग आहे. तेथे आतापर्यंत सर्वात जुने मानवाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. या भागातून पुढे जाऊन नंतर मानवाने युरोपमध्ये वस्ती करायला सुरुवात केला. त्यामुळेही या भूभागाला पाय लावण्याची माझी खास इच्छा होती.
प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने आणि महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व होते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत दंतकथा, स्थानिक पुराणे आणि लिखीत इतिहास यापैकी एक किंवा जास्त पुरावे असलेली अनेक राज्ये-साम्राज्ये येथे होऊन गेली. काही राज्ये जॉर्डन किंवा फारतर आजूबाजूचा काही प्रदेश इतकीच मोठी होती तर इतर काही साम्राज्ये जॉर्डनसह इतर बराच मोठा भूभाग व्यापून होती. आधुनिक जॉर्डन आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाला फार पूर्वीपासून ट्रान्स़जॉर्डन असे संबोधले जात असे. ट्रान्स़जॉर्डनवर सत्ता गाजवणार्या महत्त्वाच्या राजसत्ता अशा होत्या: मोआब, अम्मॉन, बाशान, अस्सिरिया, बॅबिलोनिया, पर्शिया, मॅसेडोनिया, सिल्युसिड, पार्थियन, नेबॅतियन, रोमन, इस्लामी, ऑटोमान, युरोपियन साम्राज्ये, इत्यादी.
इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष तेथे अजूनही बर्यापैकी शाबूत राहिलेले आहेत. आपण भेट देणार असणारी पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे. इ स १०६ मध्ये रोमन साम्राज्याने या भूभागावर कब्जा केला. नंतर इ स ६३३ ते ६३६ मध्ये अरबी व्दीपकल्पातून उत्तरेकडे पसरणार्या अरब सत्तांच्या ताब्यात हा भाग गेला. त्यानंतर अनेक इस्लामिक सत्तांतरे होत होत सोळाव्या शतकात हा भाग ऑटोमान तुर्कांच्या ताब्यात आला. त्यावेळी त्याचे नियंत्रण दमास्कस (आता आधुनिक सिरीयाची राजधानी) येथून होत होते.
पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमान साम्राज्याची शकले झाली आणि १९२० साली त्यातला एक भूभाग "जॉर्डन" या नावाने ब्रिटिश प्रभावाखाली आला. इ स १९२१ मध्ये जॉर्डनची सत्ता अब्दुल्ला इब्न हुसेनच्या हाती सोपवली गेली. इ स १९२३ मध्ये ब्रिटनने जॉर्डनला आंशिक स्वातंत्र्य दिले, पण "ब्रिटीनचे संरक्षित राष्ट्र (ब्रिटिश प्रोटेक्टोरेट)" ही स्थिती कायम ठेवली. दुसर्या महायुद्धात केलेल्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटनने इ स १९४६ साली जॉर्डनला पूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि राजा अब्दुल्ला (पहिला) आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.
अब्दुल्लाचा १९५१ मध्ये वध झाल्यावर त्याचा मुलगा तलाल सत्तेवर आला. तलाल मानसिक रोगी असल्याने पुढच्याच वर्षी त्याची सत्तेवरून उचलबांगडी करून त्याचा मुलगा हुसेन याला राजसत्ता दिली गेली. प्रदीर्घ अरब-इझ्रेल संघर्ष, १९५६ चे सुवेझ कालवा प्रकरण, सिरीया देशाची निर्मिती, पॅलेस्टिनी समस्या, आखाती युद्ध, इ वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि पाश्चिमात्य सत्ता व अरब हितसंबंध यांच्या ओढाताणीत जॉर्डनला सुरक्षित आणि बर्यापैकी सुस्थितीत ठेवण्याचे श्रेय राजा हुसेन याला जाते. इ स १९९९ मध्ये कर्करोगाने त्याचे निधन झाल्यावर त्याचा मुलगा अब्दुल्ला (दुसरा) राजसत्तेवर आला आहे. त्याने जॉर्डनमध्ये २००३ मध्ये पहिली निवडणूक घेऊन लोकांनी निवडलेल्या लोकसभेची स्थापना केली; मात्र पंतप्रधानाची नेमणुक-बरखास्ती करण्याच्या अधिकारासह महत्त्वाचे शासकीय अधिकार स्वतःकडेच ठेवले. तेव्हापासून जनक्षोभामुळे अनेकदा बरखास्त केलेली मंत्रिमंडळे, अरब स्प्रिंग, इत्यादी अडथळ्यांवर अडखळत जॉर्डनची आधुनिक काळातली खडतर मार्गावरची वाटचाल चालू आहे.
तर असा आहे हा आजचा जॉर्डन... ७७,८०० चौ किमी क्षेत्रफळाच्या भूमीवर वसलेल्या ६०-६५ लाख लोकसंखेचा देश. या लोकसंखेत ९८% अरब आणि ९२% मुस्लिम आहेत. बराचसा वाळवंटी असलेल्या या देशातला सर्वात मोठा पर्वत १,८५४ मीटर उंच असून त्याची शिखरे हिवाळ्यात बर्फाच्छादित असतात आणि सर्वात सखोल जागा असलेला मृत समुद्राचा किनारा जागतीक समुद्रसपाटीच्या ४२० मीटर खाली आहे ! उन्हाळ्यात रखरखीत उष्ण असणार्या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.
===================================================================
अम्मानमध्ये हॉटेलवर पोहोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. बसच्या खुर्च्या कितीही आरामदायक असल्या तरी त्यांच्यात अठरा तास बसून अंग आंबलेले होते. पण बस थांब्यावरच भेटलेल्या स्थानिक मार्गदर्शकाने "दोन तासांत अम्मानच्या सहलीला बाहेर पडायचे आहे" असे सांगितले होते. त्यामुळे सर्वच जण आपापल्या खोल्यांकडे शॉवरादी प्रभातकर्मे करायला पळाले. ताजेतवाने होऊन आणि सज्जड न्याहारी आटपून हॉटेलच्या लॉबीत पोहोचलो तेव्हा अम्मानचा स्थानिक मार्गदर्शक, खमीस, आमची वाट पाहत बसलेला होता. वेळ न दवडता हॉटेल मधून बाहेर पडलो.
अम्मान
या जागेवरच्या प्राचीन वस्तीचे नाव "रब्बाथ अम्मान" म्हणजे "अम्मोनाईट लोकांचे महानगर" असे होते. राजा डेविडने हे शहर जिंकून घेतल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. डेविडच्या प्रेयसीच्या नवर्याला डेविडने युद्धावर पाठविल्यावर तो या जागेवरच्या एका चकमकीत मारला गेला अशीही नोंद आहे. दुसरा टॉलेमी फिलाडेल्फस (इ स पूर्व २८३ ते २४६) या नावाच्या इजिप्तच्या राजाने हा भाग जिंकल्यावर या शहराचे नाव बदलून स्वतःच्या नावावरून फिलाडेल्फिया असे ठेवले होते. सातव्या शतकात हे शहर उम्मायद अरबांच्या ताब्यात गेल्यावर त्याचे परत अम्मान असे नामकरण केले गेले. उम्मायुदानंतरच्या कालखंडात या जागेचे महत्त्व कमी होऊन तिचे महत्व कमी झाले. एकोणिसाव्या शतकात ऑटोमान साम्राज्याच्या ट्रान्सजॉर्डन प्रांताची राजधानी म्हणून अम्मानला परत एकदा महत्त्व आले, ते कमी अधिक प्रमाणात आजतागायत चालू आहे.
नव्या-जुन्याच्या संगमाने चित्तवेधक झालेले हे शहर सात टेकड्यांचा समूह असलेल्या भूभागावर वसलेले आहे. राजधानी असण्याबरोबर हे शहर जॉर्डनचे मुख्य आर्थिक शहरही आहे. जॉर्डनची साधारणपणे अर्धी लोकवस्ती (३० लाख) या एका शहरात राहते. जॉर्डन आणि अम्मानच्या वैविध्यपूर्ण इतिहासामुळे या शहरात साहजिकपणे आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या संस्कृतींची सरमिसळ झालेली आहे. तिचे दर्शन आपल्याला शहरात फिरताना होते. या शहराच्या हद्दीत असलेले काही प्राचीन / ऐतिहासिक अवशेष खास आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षणे आहेत. चला तर निघूया अम्मानची फेरी मारायला.
हॉटेलवरून आजच्या एका मुख्य थांब्याकडे जाताना या शहराच्या सात टेकड्यांवर वसलेल्या नव्या व जुन्या भागांपैकी काहींचे दर्शन झाले...
जुन्या अम्मानची पहिली झलक
.
नव्या अम्मानची पहिली झलक
अम्मानच्या सहलीत त्याच्या विविध भागांचे दर्शन आपल्या होत राहीलच.
अम्मान सिटॅडेल (अम्मान किल्ला)
अम्मानमधिल काला नावाच्या, इंग्लिश "L" या अक्षराच्या आकाराच्या, एका टेकडीवर अम्मान सिटॅडेल (Amman Citadel) ही जॉर्डनमधली एक राष्ट्रीय ऐतिहासिक जागा आहे. या टेकडीवर नवअश्मयुगापासून ते आजतागायत मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे हे शहर जगातली सर्वात जास्त (सुमारे ७,००० वर्षे) सलग मानवी वस्ती असणारी जागा समजली जाते ! अर्थातच या सगळ्या कालखंडात होऊन गेलेल्या राजसत्तांना आणी उलथापालथींना या जागेने पाहिले आहे.
त्याचबरोबर हा परिसर मध्यपूर्वेत जन्मलेल्या आणि जगभर पसरलेल्या जुदाइझम, ख्रिश्चियानिटी आणि इस्लाम तीन एकेश्वरवादी धर्मांच्या शेकडो वर्षांच्या वाटचालीचा साक्षीदार आहे.
तुलनेने आधुनिक काळात (ब्राँझ युग, इ स पूर्वी १८०० वर्षे) ह्या भागाभोवती भिंत उभारली गेली आणि त्यावरून याचे नाव अम्मान सिटॅडेल म्हणजे अम्मानचा किल्ला असे पडले आहे. मात्र येथील प्राचीन अवशेष सिटेडेलच्या बाहेरच्या जागेवरही विखुरलेले आहेत. त्यातील काही तर अम्मानच्या इतर भागांतही आहेत. या प्राचीन ठेव्याचे बरेचसे उत्खनन आणि अभ्यास अजून बाकी आहे.
चला तर बघूया ही अशी विविधरंगी जागा...
अम्मान सिटॅडेलचा नकाशा
हराक्लेस (हर्क्युलीस) चे मंदिर
येथे इ स १६२ ते १६६६ मध्ये बांधलेले हर्क्युलीसचे मंदिर आहे. या मंदिराचा आकार रोममधील हर्क्युलीसच्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा आहे. मंदिराचा परिसर १२२ x ७२ मीटर आहे आणि मुख्य इमारतीचा आकार ३१ मी x २६ मीटर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशव्दारात प्रत्येकी १० मीटर उंचीचे सहा स्तंभ आहेत. मंदिराच्या अंतर्भागांचे बरेचसे अपेक्षित अवशेष न सापडल्यामुळे या मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले असावे असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
हर्क्युलीसच्या मंदिराचे अवशेष : ०१
.
हर्क्युलीसच्या मंदिराचे अवशेष : ०२
.
हर्क्युलीसच्या मूर्तींच्या हाताचा अवशेष (तसा काय फार मोठा नाही माझ्या हातापेक्षा ;) )
बायझँटाइन काळातील चर्चचे अवशेष
पाच-सहाव्या शतकात बांधलेल्या या चर्चचे फक्त काही खांब आणि कुसाचे अवशेष राहिलेले आहेत.
बायझँटाइन काळातील चर्च
इतर काही अवशेष
अम्मान सिटॅडेल : ०१
.
...
अम्मान सिटॅडेल : ०२ आणि ०३
.
सिटॅडेलवरून दिसणारे टेकडीच्या पायथ्याशी असलेले रोमन अँफिथिएटर
.
सिटॅडेलवरून दिसणारे रोमन अँफिथिएटरचे कार्यालय
.
सिटॅडेलवरून आमच्या पुढच्या थांब्याकडे नेणारा रस्त्याचा काही भाग अम्मानच्या आधुनिक उच्चभ्रू वस्तीतून जात होता...
आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०१
.
आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०२
.
आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०३
.
नव्या-जुन्याची सरमिसळ असलेल्या अम्मानमधून आमची गाडी अज्लून किल्ल्याकडे निघाली...
एका जुन्या वस्तीच्या मागे दिसणारा अम्मान सिटॅडेल
(क्रमशः )
बाकी अल
या शब्दाचा the असा अर्थ आहे काय? आणि बर्याच इमारती एकाच रंगाच्या कशा ? काही कन्वेन्शन आहे का तिथे ? जसे जोधपूर मधे ब्राह्मणांची घरे निळी आहेत .
अरबी अल् इंग्लिशमधल्या the सारखाच साधारणपणे वापरला जातो.
सौदी अरेबियात इमारतींचे रंग बहुदा वाळवंटाच्या तपकिरी रंगाच्या छटांचे असतात. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारणपणे कर्मठ इस्लाममध्ये रंगीबेरंगी वस्तूंबद्दलचा निषेध असावा. तसेच हा रंग मुळातच मातकट असल्याने बराच काळ खराब होत नाही, त्यामुळे इमारतींच्या रखरखावीचा खर्च कमी होतो :)
जॉर्डनची राणी फार सुंदर आहे
आता यापुढे काही दिवस अम्मानच्या बाहेर पडून जॉर्डनची भटकंती करायची आहे, तिचा संपूर्ण मार्ग निळ्या रंगाने आणि प्रवासाच्या दिशा तांबड्या बाणांनी खालच्या नकाश्यात दाखवल्या आहे...
जॉर्डनमधिल भटकंतीचा मार्ग (मूळ नकाशा जालावरून साभार)
अज्लून किल्ला
अम्मानच्या उत्तरपश्चिमेला अज्लून नावाच्या प्रादेशिक राजधानीच्या ठिकाणी एक प्राचीन किल्ला आहे. त्या गावावरून नाव पडलेला हा किल्ला बाराव्या शतकात (इ स ११८४ ते ११८५) आयुबीद राजवटीमध्ये सालादीनच्या पुतण्याने बांधलेला आहे. किल्ल्याभोवती १६ मीटर रुंद आणि १२-१५ मीटर खोल खंदक आहे.
या किल्ल्याचा उपयोग मुख्यतः ख्रिश्चन क्रुसेडर्सचा प्रतिकार करण्यासाठी केला गेला. त्याच्या मोक्याच्या ठिकाणामुळे तेथून आजूबाजूच्या मोठ्या प्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होत असे. त्या किल्ल्याजवळून जाणाऱ्या तीन मुख्य रस्त्यांमुळे जॉर्डन, सिरीया आणि इजिप्तमधले दळणवळण सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला. अज्लूनच्या जवळ लोखंडाच्या खाणी असल्याने तर अर्थातच या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण होते. १२६० साली मंगोल आक्रमणात त्याची बरीच नासधूस झाली. पण त्यापेक्षा जास्त नुकसान १९२६-२७ साली झालेल्या शक्तिशाली भूकंपात झाले.
किल्ल्याच्या मध्यभागी पूर्वी अस्तित्वात असलेल्या बायझांटाईन ख्रिश्चन चर्चच्या चौथऱ्यावर बांधलेली ८०० वर्षे पुराणी मशीद आहे. जुन्या इमारतींवर पूर्वी ग्रीक लिखाण होते असे म्हणतात. २०१३ साली झालेल्या पाऊस आणि बर्फाच्या अतिवृष्टीमुळे मशीदीची पश्चिमेकडील भिंत पडून त्या मलब्यात बायबलची प्रत आणि काही क्रूस मिळाले होते.
चला तर करूया या महत्त्वाच्या प्राचीन किल्ल्याची सफर...
अज्लून किल्ला : ०१ : दुरून होणारे दर्शन
.
अज्लून किल्ला : ०२ : जवळून
.
अज्लून किल्ला : ०३ : किल्ल्याभोवतालच्या मोटेवरील मुख्य प्रवेशद्वाराकडे नेणारा पूल
.
...
अज्लून किल्ला : ०४ व ०५ : अंतर्भाग
.
अज्लून किल्ला : ०६ : किल्ल्यावरून दिसणारे आधुनिक अज्लून शहर आणि आजूबाजूचा परिसर
.
किल्ल्यातून बाहेर पडून प्राचीन रोमन अवशेषांसाठी प्रसिद्ध असणार्या जेराश शहराकडे निघालो. हा दुसरा थांबा बराच वेळ घेणारा असल्याने वाटेत एका रेस्तराँमध्ये पोटपूजा केली...
अरबी तंदूर ०१ : दूरून
.
अरबी तंदूर ०२ : जवळून
.
जेवणाची सुरुवात (स्टार्टर्स) : वरून घड्याळाप्रमाणे सलाद, हुमस, खुब्ज, पिकल्, फिलाफिल
.
जेराश शहर (मध्यपूर्वेतले पॉम्पेई)
आमचा पुढचा थांबा होता जेराश. ही जागा अम्मानच्या ४८ किमी उत्तरेला आहे. झाडीने आच्छादिलेल्या टेकड्यांनी वेढलेल्या आणि समुद्रसपाटीपासून २५० ते ३०० मीटर उंचीवर असलेल्या या सपाट जागेवर गेल्या ६,५०० वर्षे सलग मनुष्यवस्ती आहे. सुपीक जमीन व योग्य हवामानामुळे येथे प्राचीन काळापासून अनेक प्रकारची धान्ये व फळांची शेती केली जाते.
इ स पूर्वी ३३१ मध्ये अलेक्झांडरने इजिप्तच्या मोहिमेवरून परतताना येथे त्याच्या वृद्ध होऊ लागलेल्या सैनिकांसाठी जेरॅस्मेनॉस (Gerasmenos म्हणजे ग्रीक भाषेत वयोवृद्ध माणूस) नावाच्या शहराची पायाभरणी केली. आजचे जेराश हे नाव त्याचेच अपभ्रंशित रूप आहे.
रोमन जनरल पॉम्पे याने इथले शहर इ स ६३ ला काबीज केले. रोमन सत्तेचा काळ या शहराचे सुवर्णयुग होते. जेराशची रोमन काळातल्या सर्वोत्कृष्ट दहा शहरांत (डीकॅपोलीस लीगमध्ये) गणना केली जात असे. ७४९ साली झालेल्या शक्तिशाली भूकंपात या शहराची खूप पडझड झाली. नंतरही लहानमोठे भूकंप व युद्धे यामुळे या शहराचे अनेकदा अतोनात नुकसान झाले.
हे शहर प्रसिद्ध गणिती निकोमाकस ऑफ जेरेसा (Nicomachus of Gerasa, इ स ६० ते १२०) याचे जन्मस्थान आहे.
आज हे ठिकाण रोमन शहरी स्थापत्यकलेचे जगातले सर्वोत्तम अवशेष समजले जातात. हे अवशेष अनेक शतके वाळूखाली पुरले गेले होते आणि म्हणूनच ते इतक्या चांगल्या अवस्थेत राहिले असावेत. गेली ७० वर्षे त्यांच्या उत्खननाचे काम चालू आहे. येथील अवशेषांत दगडी फरसबंदीचे (पेव्ह्ड) रस्ते, प्रशस्त चौक, टेकड्यांवरील देवळे, सुंदर नाट्य-सभागृहे (अँफिथिएटर्स), सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, शहराची तटबंदी, इत्यादीचे रोमन स्थापत्यकलेतील उत्तम नमुने आहेत. यामुळे या शहराला काहीश्या चुकीने मध्यपूर्वेचे पॉम्पेई म्हटले जाते, चुकीने अश्याकरिता की भूकंपाने या शहराचे खूप नुकसान झाले असले तरी येथे पाँपेईसारखा ज्वालामुखीचा उद्रेक कधीच झालेला नाही.
रोमन स्थापत्यकलेच्या खाली असलेल्या भूस्तरांत पौरात्य-पाश्चिमात्य कलांचा संगम असलेले अवशेष आहेत. जगाच्या पूर्व-पश्चिम संधिभागावर वसलेल्या या जागेचा दीर्घ इतिहास पाहता हे अपेक्षितच होते म्हणा.
चला तर या सर्वात जास्त शाबूत असलेल्या प्राचीन रोमन शहराच्या फेरफटक्याला...
वेशीवरचे स्वागत
शहराच्या वेशीवर रोमन सम्राट हेड्रीयनने या शहराला इ स १२९-१३० मध्ये दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली कमान आपले स्वागत करते...
जेराश : ०१ : शहराच्या वेशीवरची हॅड्रीयन कमान
.
या शहराची संरक्षक भिंत मजबूत व कलापूर्ण बांधणीची होती. तिचा शाबूत असलेला काही भाग याची ग्वाही देतो...
जेराश : ०२ : संरक्षक भिंतीचा एक भाग
शहरात शिरल्या शिरल्या बॅगपाईप आणि ढोलाच्या बँडने आमचे जंगी स्वागत केले
जेराश : ०३ : जेराश शहरात स्वागत करणारा बॅगपाईप बँड
मंदिरे
इथल्या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. तरीसुद्धा एका टेकडीवरचे झेउसचे प्रशस्त मंदिर बरेच शाबूत होते. या मंदिराच्या खांबाच्या मांडणीची खासियत म्हणजे ते देवळाच्या एका टोकाची कुजबूजही दुसर्या टोकाकडे पोचवत असत. त्यामुळे त्यांना "जेराशचे कुजबुजणारे स्तंभ (whispering columns of Jerash) असे म्हणत. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या पुनःस्थापनेचे काम चालू होते...
जेराश : ०४ : टेकडीवरचे झेउसचे मंदिर
देवळाच्या भव्य खांबांच्या टोकावरची नक्षी लक्षवेधक होती.
जेराश : ०५ : झेऊसच्या मंदिराच्या स्तंभांची कोरीव टोके
तेथे अजून एका आर्टेमिसच्या मंदिराचेही अवशेष आहेत...
जेराश : ०६ : आर्टेमिसच्या मंदिराच्या खिडकीवरील कोरीवकाम
या दोन मोठ्या मंदिराबरोबरच जेराशमध्ये अनेक छोटी मंदिरे पण आहेत.
फोरम आणि कोलोनेड
शहराच्या मध्यभागी असणारी प्रशस्त वर्तुळाकार फरसबंदी (फोरम) आणि तिच्या सभोवती उभे केलेल्या खांबांच्या रांगा (कोलोनेड) असलेले चौक हे रोमन नागरी स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. ही जागा बाजारहाट करण्याचे आणि नागरिकांनी गप्पा मारायला भेटण्याचे ठिकाणही (कट्टा) असे त्यामुळे तिला फोरम असे म्हटले जाते. जेराशचा कोलोनेड बराच प्रशस्त आहे आणि आजतागायत बर्याच चांगल्या अवस्थेत टिकलेला आहे...
जेराश : ०७ : रोमन ओव्हल फोरम आणि कोलोनेडचा एक भाग
.
जेराश : ०८ : पुर्णाकृती रोमन ओव्हल फोरम आणि कोलोनेड (जालावरून साभार)
कार्डो (रस्ते)
जेराशचे कोलोनेडने सुशोभित केलेले रस्ते (कार्डो), त्याच्या आजूबाजूला असलेल्या धनिकांच्या भव्य घरांचे सुंदर स्थापत्य आणि रस्त्याशेजारी असलेली मोठमोठी कारंजी पर्यटकांना जेराशच्या गतवैभवाची पुरेपूर कल्पना देतात...
जेराश : ०९ : कार्डो आणि कोलोनेड
.
जेराश : १० : कार्डोवरील कारंजे असलेले एक स्थळ
अँफिथिएटर
अँफिथिएटर नाही तर ते कसले रोमन शहर म्हणायचे ? जेराशच्या अँफिथिएटरची गणना जगातल्या मोठ्या रोमन अँफिथिएटरमध्ये केली जाते (जेराश डिकॅपोलीस लीग मध्ये गणले जात होते ते काही उगाच नाही !). विशेष आश्चर्य असे की याच्या रंगभूमीवरून आणि तिच्या समोरच्या अर्धगोलाच्या मध्यात वक्त्यासाठी असलेल्या एका फरशीवर उभे राहून केलेली कुजबूजही रंगमंदिराच्या अगदी सर्वात दूरच्या रांगेतीलही प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे ऐकू येते अश्या प्रकारची प्रगल्भ ध्वनिकी (अकॉस्टिक्स) असलेली याची रचना आहे !
जेराश: ११ : दक्षिण जेराशमधिल अँफिथिएटर
शहराच्या दक्षिणेस असलेल्या या मोठ्या अँफिथिएटर बरोबरच उत्तरेस अजून एक छोटे अँफिथिएटर आहे.
सर्कस / हिप्पोड्रोम
ग्रीकोरोमन संस्कृतींचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या आणि घोड्यांनी ओढलेल्या रथांच्या शर्यती. या खेळांसाठी खास मैदान बांधले जात असे. रोमन आणि ग्रीक मैदानांच्या आकारमानात थोडाफार फरक असला तरी त्याचा आराखडा सर्वसाधारणपणे सारखा असे. रोमन अश्या मैदानाला त्याच्या लंबगोल / गोल आकारामुळे सर्कस असे म्हणत तर ग्रीकांनी त्याला हिप्पोड्रोम (ग्रीक भाषेत "हिप्पॉस" म्हणजे घोडा आणि "ड्रोमॉस" म्हणजे धावमार्ग) असे नाव दिले होते.
जेराश : १२ : सर्कस अथवा हिप्पोड्रोम (रोमन रथांच्या शर्यतींचे मैदान)
इतर काही
जेराश : १३ : दक्षिणव्दार
.
जेराश : १४ : आधुनिक जेराशच्या पार्श्वभूमीवर दिसणारे प्राचीन जेराश (जालावरून साभार)
.
या शिवाय शहरात ठिकठिकाणी रोमन संस्कृतीची निशाणे सार्वजनिक स्नानगृहांच्या रूपात आहेत.
जेराशमधे फिरताना तेथील अवशेषांची भव्यता आणि सौंदर्य आपल्याला क्षणभर तरी रोमन काळात नेतात. हे शहर त्याच्या मूळ स्वरूपात त्या काळाचे एक अतिशय प्रभावी आणि प्रसिद्ध शहर असणार यात काहीच शंका वाटेनाशी होते.
जेराशमध्ये फिरताना देहभान विसरायला झाले. पण तरीही उन्हे उतरू लागली आणि थकलेले पाय हॉटेलवर परतण्यासाठी गाडीकडे निघाले.
(क्रमशः )
तिसरा दिवस जरा लवकरच उजाडला. कारण आज अम्मान सोडून दक्षिणेच्या दिशेने चारचाकीचा ३००-३५० किमी प्रवास करायचा होता आणि तेही वाटेतली पर्यटक ठिकाणे पाहत पाहत. अर्थातच सगळ्यांनी भरपेट न्याहारी केली आणि बाहेर पडलो.
जॉर्डनमधिल जमीन बहुतांशी वाळवंटी असली तरी आजच्या आमच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऑलिव्हची लागवड दिसत होती...
ऑलिव्हची शेती : ०१
.
ऑलिव्हची शेती : ०२
हा भाग त्याच्या ऑलिव्ह आणि ऑलिव्ह तेलासाठी प्रसिद्ध आहे. या जॉर्डनच्या नगदी पिकांमुळे (कॅश क्रॉप) तेथे आलेल्या समृद्धीची जाहिरात रस्ताभर विखुरलेली सधन शेतकर्यांची घरे करत होती...
ऑलिव्ह शेती करणार्या सधन शेतकर्याचे घर : ०१
.
ऑलिव्ह शेती करणार्या सधन शेतकर्याचे घर : ०२
मात्र काही वेळातच गाडी नेबो पर्वताच्या डोंगराळ भागात शिरली आणि नजरेच्या टप्प्याच्या पलिकडेपर्यंत दूरवर पसरलेला वाळवंटी भाग दिसू लागला...
नेबो पर्ततावरून दिसणारा वाळवंटी परिसर
नेबो पर्वत (Mount Nebo)
तसं पाहिलं तर नेबो हा काही फार उंच पर्वत नाही. पण ८१७ मीटर उंचीच्या या पर्वताला त्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक भूतकाळामुळे अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. हाच तो पर्वत ज्याच्यावरून मोझेसला शब्द दिलेली पवित्र जमीन (प्रॉमिस्ड होली लँड, ज्याला सर्वसाधारणपणे आधुनिक इझ्रेल असे संबोधले जाते) दाखवली गेली असा बायबलमध्ये उल्लेख आहे. या पर्वतावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दर्शन होते. त्यात पवित्र जमिनीबरोबरच, उत्तरेकडील जॉर्डन नदीच्या खोर्याचा काही भाग, इझ्रेलमधिल जेरिको शहर आणि जर आकाश निरभ्र असले तर जेरुसलेम शहराचेही दर्शन होते.
जेरिको शहर इझ्रेलमध्ये असल्याने त्याला जरी आपण भेट देणार नसलो तरी त्या शहराची काही वैशिष्ट्ये जाणून घेणे मनोरंजक ठरेल
१. हे शहर समुद्रसपाटीपेक्षा २५० मीटर खाली आहे. या प्रकारे हे जगात सर्वात खालच्या स्तरावर वसलेले शहर आहे.
२. १०,००० वर्षांपूर्वीचे मानवी वस्तीचे अवशेष सापडल्यामुळे हे जगातील सर्वात जुने शहर समजले जाते.
३. तेथे असलेल्या अनेक प्राचीन आणि धार्मिक अवशेषांमुळे ते एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. त्यातली काही महत्त्वाची अशी आहेत जिझस ख्राईस्टचा बॅप्टिझम जेथे केला गेला तो जॉर्डन नदीचा भाग, टेम्प्टेशन पर्वत, एलिशा झरा, सायक्यामोअर वृक्ष, सेंट जॉर्जचे थडगे, इ.
Book of Deuteronomy प्रमाणे मोझेसने नेबो पर्वतावरून इझ्रेलचे दर्शन घेतले पण त्याचे पाय त्या जमिनीला लागू शकले नाहीत. तेथे जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या पुस्तकाप्रमाणे तेथून जवळच मोआबच्या दरीत त्याचे दफन केले गेले. दोन वेगवेगळ्या जागांवर त्याचे थडगे असल्याचे दावे आहेत, पण नक्की सत्य काय ते कोणालाच माहीत नाही. काही विद्वानांच्या मते तर हा पर्वत Deuteronomy मध्ये उल्लेखलेला नेबो पर्वत नाही.
चला तर अश्या काहीश्या वादग्रस्त पण तरीही बरेचसे प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या नेबो पर्वतावर. हे पवित्र स्थान असल्याने, गाडी धार्मिक आवाराच्या बाहेर उभी करून अर्धा अधिक डोंगर पायी चढून जावा लागतो.
चढण पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पोप जॉन पॉल दुसरा याच्या इ स २००० मधील भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...
पोप जॉन पॉल दुसरा याच्या भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा
त्यानंतर इ स २००९ मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावा यानेही या जागेला भेट देऊन तेथे एक भाषण केले होते.
थोडे पुढे गेल्यावर मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...
मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा
इ स १९३३ मध्ये पर्वतमाथ्यावर एका बायझांटाईन चर्च आणि मोनास्टरीचे अवशेष सापडले. हे चर्च सर्वप्रथम चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात मोझेसच्या मृत्यूच्या जागेवरचे स्मारक म्हणून बांधले गेले. त्याचा पाचव्या आणि परत सहाव्या शतकात विस्तार केला गेला. सद्याच्या चर्चची नवीन इमारत जुन्या अवशेषांचे संरक्षण होईल अश्या रितीने नव्याने बांधलेली आहे.
बायझांटाईन चर्च
.
उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून बनवलेली बायझांटाईन चर्चची प्रतिमा
या चर्चची खासियत तेथे असलेल्या कलापूर्ण प्राचीन मोझेईक कलाकृतींचे अवशेष आहेत...
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०१
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०२
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०३
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०४
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०५
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०६
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०७ : लेख
.
बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०८ : लेख
.
बायझांटाईन चर्च : ०९ : प्राचीन काळातील मातीची भांडी
.
बायझांटाईन चर्च : १० : प्राचीन काळातील मातीची भांडी
.
चर्चला वळसा घालून पलीकडे गेल्यावर आपण परिसराचे दर्शन घेण्यासाठी बनवलेल्या एका सापटीवर जातो. तेथे गिओवान्नी फान्तोनी (Giovanni Fantoni) नावाच्या इटालियन कलाकाराने बनवलेले Brazen Serpent Monument नावाचे आधुनिक शिल्प आहे. या शिल्पात कलाकाराने मोझेसने चमत्काराने निर्माण केलेल्या सापाचा आणि जिझसच्या क्रुसाचा प्रतिकात्मक उपयोग केलेला आहे...
Brazen Serpent Monument
.
आम्ही गेलो तेव्हा (सप्टेंबर २०१०) तेथे सापडलेल्या अवशेषांसाठी पर्वतमाथ्याच्या एका टोकावर भलेमोठे संग्रहालय बांधले जात होते. आतापर्यंत कदाचित ते पूर्णही झाले असेल...
मध्यपूर्वेत स्थापना झालेल्या दोन मोठ्या धर्मांच्या सुरुवातीच्या काळाशी संबद्ध असल्याचा दावा असलेल्या ठिकाणाची आणि तेथील अवशेषांची ओळख बरोबर घेऊन आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाच्या दिशेने सुरू झाला.
(क्रमशः )
मोझेसच्या स्मरणार्थ चर्च ही संकल्पना समजली नाही. मोझेस हा मुख्यतः ज्यूंचा प्रेषित ना? मग सिनेगॉग का नाही?
मोझेस हा तिन्ही ग्रांथिक धर्मांमध्ये पूर्व प्रेषित म्हणून मानला जातो पण क्रिस्टियनांमध्ये त्याचे इतके स्थान असेल हे माहित नव्हते.
अॅडम, अब्राहम आणि मोझेस या तिघांना ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांत मानले जाते. मध्य्पूर्वेत उगम पावलेले हे तीन धर्म अब्राहामीक धर्म समजले जातात.
अजून काही रोचक माहिती :
OLD TESTAMENT GENERATIONS LISTED ADAM TO MOSES
Pentateuch Charts List : The Generations before Moses
Adam : lived 930 years, died 216 yrs. before the birth of Noah
Seth : Adam's 3rd son, lived 912 years. Seth knew Noah for 34 years before he died
Methuselah : 4th great grandson of Seth, lived 969 years, Methuselah knew Adam 243 years*, Methuselah knew Seth 355 years
Lemech : son of Methuselah, lived 777 years (died before his father), he is the father of Noah, died 5 years before the flood
Noah : lived 950 years
Methuselah : knew Noah 600 years and died the year of the flood; Talked with his father, Lemech 595 years
Shem : son of Noah (father of all Semites), lived 600 years, talked with Methuselah 98 years*, lived after the flood 502 years
Eber or Heber : great-grandson of Shem, lived 464 years, knew both Noah and Shem
Terah : 3 x great grandson of Eber, lived 205 years, 130 yrs old when Abraham is born, talked with both Noah and Shem
Abraham (Abram son of Terah) : lived 175 years, Abraham knew Shem son of Noah 150 years
Noah : died 2 yrs. before Abraham was born
Heber : outlives Abraham by 4 years
Isaac (son of Abraham and Sarah) : lived 180 years, knew Shem (son of Noah) 50 years*
Jacob (called Israel and son of Isaac and father of the 12 tribes) : lived 147 years
knew Abraham 20 years
Levi (3rd oldest son of Israel – Jacob) : knew Isaac about 45 years*, knew Amran father of Moses who was his grandson*, great grandfather of Moses
Levi : passed on the oral history to his grandson Amran*
Moses (son of Amran son of Kohath son of Levi) : Lived 120 years, brother of Aaron who knew their father approx. 65 years*, Moses receives the Oral Tradition from God and is commanded to write the first 5 books of the Old Testament.
(Michal Hunt Copyright © 1991 Agape Bible Study. Permissions All Rights Reserved.)
अल्जिरियामध्ये सुद्धा सगळं असंच नि हेच म्हणण्याइतपत आहे. मोझाईक मधली नक्षी, अवशेष असेच दिसतात.
मागच्या लेखात आपण म्हटल्याप्रमाणं रोमन साम्राज्य ह्या भागात होतंच.
वाखाणण्यासारखं 'निसर्गसौंदर्य' जॉर्डन मध्ये देखील असंच आहे का ते ठाऊक नाही. :)
खरं तर आपण आपल्या अलिकडच्या जगाच्या आकलनामुळे युरोप आणि उत्तर अफ्रिकेला वेगळे समजतो. प्राचीन काळापासून भूमध्य समुद्राच्या युरोपियन आणि आफ्रिकन किनार्यांवर पसरलेली तीन मोठी साम्राज्ये होऊन गेली. त्यामुळे सहाजीकच सुपीक चंद्रकोर, युरोपचा दक्षिण किनारा आणि अफ्रिकेचा उत्तर किनारा त्या साम्राज्यांच्या (ग्रीको-रोमन) अवशेषांनी भरलेले आहेत.
त्या साम्राज्यांचा पसारा असलेले नकाशे पाहून नीट कल्पना येईल...
१. कार्थेज साम्राज्य (इ स पूर्व ६५० ते इ स पूर्व १४६)
.
२. (पश्चिम) रोमन साम्राज्य (इ स पूर्व २७ ते इ स ४७६)
.
३. बायझांटाईन (पूर्व रोमन) साम्राज्य (इ स ३३० ते इ स १४५३)
(सर्व नकाशे जालावरून साभार)
प्राचीन काळी येथिल भूभाग हिरवागार, समृद्ध आणि सुपीक होता आणि म्हणूनच तेथे प्रथम मानवी संस्कृती उदयाला आली असे समजले जाते. म्हणूनच त्याला "सुपीक चंद्रकोर (fertile crescent)" या नावाने ओळखले जाते.
केवळ मोरच नव्हे तर या पाणथळ आणि हिरव्यागार भूमीवर अनेक प्राणी, पक्षी आणि वनस्पती होत्या. माणसाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सामरिक प्रगतीत उपयोगी आलेल्या (माणसाळवलेल्या) प्राणी व वनस्पतींच्या पूर्वज प्रजातींपैकी बहुसंख्य (जवळ जवळ ७५% पेक्षा जास्त) सुपीक चंद्रकोरीच्या भूभागात आस्तित्वात होत्या.
येथिल जंगले नाहिशी होऊन वाळवंट कसे बनले याच्याबद्दलच्या सिद्धांताचा महत्वाच्या शास्त्रिय पुराव्यांसह उल्लेख पुढच्या एका भागात येईलच.
मदाबा गाव
अम्मानच्या दक्षिणेला ८६ किमीवर मदाबा नावाचे गेल्या ४,५०० वर्षांपासून अस्तित्वात असलेले गाव आहे. याचा बायबलमध्ये "मोआबाईट लोकांचे मदाबा" असा उल्लेख आहे. अनेक शतकांच्या मोआबाईट आणि नेबॅतियन राजसत्तांनंतर रोमन सम्राट ट्राजानने हा भूभाग रोमन सत्तेच्या अरेबिया प्रांताचा भाग बनवला.
ख्रिश्चन धर्मविरोधी असलेल्या '(पश्चिम) रोमन' साम्राज्यात (Western Roman Empire) विरोध व छळ होत असूनही पहिल्या शतकात ख्रिश्चियानिटी येथे जोमाने वाढत होती. चवथ्या शतकात सम्राट काँस्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर मात्र तो धर्म राजमान्य आणि अर्थातच सर्व साम्राज्यभर प्रबळ झाला. हा नंतरचा काळ 'पूर्व रोम' अथवा 'बायझांटाईन' साम्राज्याचा (Eastern Roman / Byzantine Empire) काळ समजला जातो. हा काळ मदाबाचा सुवर्णकाळ होता. या परिसरात सापडणार्या रंगीत दगडांचे तुकडे वापरून ६ ते ८ व्या शतकात वैशिष्ट्यपूर्ण मोझेईक कलाकृती असलेली अनेक चर्चेस येथे बांधली गेल्यामुळे हा भाग नावारूपाला आला. इ स ७४९ मध्ये झालेल्या जबरदस्त भूकंपाने हे गाव जमीनदोस्त होऊन जवळ जवळ हजार एक वर्षे ओसाड झाले.
इ स १८९७ मध्ये शेजारच्या केराक नावाच्या शहरातून काही ख्रिश्चन कुटुंबांनी या ओसाड पडलेल्या गावात स्थलांतर केले. ते परत वसविताना, नवीन इमारती बांधण्यासाठी खणताना, अनेक जुन्या इमारती, चर्चेस आणि मोझेईकचा खजिना जगाच्या नजरेला आला. इथल्या नवीन नागरिकांनी मोझेइकची कला पुढे आणून मदाबाला आधुनिक काळातले जागतिक पर्यटक आकर्षण बनविले आहे.
इ स १९९६ पासून आजतागायत येथे टोरोंटो युनिव्हर्सिटी (कॅनडा) तर्फे उत्खनन केले जात आहे.
चला तर मारूया फेरफटका या एका वेगळ्या प्राचीन कलाकारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावाचा...
मदाबा : ०१ : एक रस्ता
.
मदाबा : ०२ : एक रस्ता
.
मदाबा : ०३ : मोझेईक चित्रे व चिनी मातीच्या वस्तू
.
मदाबा : ०४ : लाकडावरील मोझेईक कला
.
मदाबा : ०५ : मोझेईक कलाकृती
.
मदाबा : ०६ : मोझेईक चित्रे
सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च आणि पवित्र भूमीचा मोझेईक नकाशा
बाजारपेठेतून फिरत फिरत आम्ही सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्चला पोहोचलो. गावाच्या मध्यभागी असलेल्या या प्राचीन चर्चमध्ये इ स ५६० मध्ये बनवलेला पवित्र जमिनीचा (होली लॅंडचा) मोझेईक नकाशा आहे. इ स १८९७ मध्ये या जागेवर नवीन चर्च बनविण्यासाठी खणताना हा अमोल प्राचीन खजिना सापडला.
मूळ नकाशा १५.७ x ५.७ मीटर आकाराचा होता. २० लाख रंगीत दगडांच्या तुकड्यांनी बनवलेल्या या नकाश्यात उत्तरेकडील (आधुनिक लेबॅनॉनमधील) टायर आणि सायडॉन या शहरांपासून दक्षिणेकडील इजिप्तपर्यंत, तर पश्चिमेकडील भूमध्य समुद्रापासून पूर्वेकडील अरबस्थानापर्यंत इतक्या विशाल आवाक्याचा समावेश आहे. नकाश्याच्या मध्यभागी असलेल्या जेरुसलेम शहराची आणि त्यातील महत्त्वाच्या (Church of the Holy Sepulchre, कॉर्डो मॅक्सिमस, कोलोनेड असलेले रस्ते, इ) भागांची मांडणी आश्चर्यकारक वाटावी इतकी अचूक आहे. त्याशिवाय त्यात अनेक डोंगर-दर्या, शहर-गावे, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, इत्यादी १५७ महत्त्वाच्या जागा त्यांच्या नावासकट दाखविलेल्या आहेत. त्या नावांमध्ये मदाबा व केराक या आजच्या सफरीतल्या दोन गावांचाही समावेश आहे.
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०१ : मार्गदर्शक खमीस मोझेईक नकाशाचा फोटो वापरून त्याची माहिती देताना
.
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०२ : मोझेईक नकाशा
.
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०३ : मोझेईक नकाशा
.
मदाबातले सेंट जॉर्ज ऑर्थॉडॉक्स चर्च : ०४ : अंतर्भाग
.
त्याबरोबरच अनेक चर्चेसमध्ये आणि मदाबातील इतर ठिकाणीही मोझेईकमध्ये बनवलेल्या पाने-फुले, प्राणी-पक्षी, मासे, शेती, दंतकथा आणि सर्वसामान्य जीवनातल्या अनेक गोष्टींची चित्रे आहेत. त्यातील हिप्पोलायटस या एका महालातील सुंदर मोझेईक बर्याच सुस्थितित आहे...
मदाबा हिप्पोलायटस हॉलमधले मोझेईक
.
गावात फिरायला मिळालेल्या मोकळ्या वेळात भटकताना "इंस्टिट्यूट ऑफ मोझेईक आर्ट अँड रिस्टोरेशन" समोर आली. बाजारहाटीत फारसा रस नव्हताच त्यामुळे उरलेला वेळ तेथे घालवला. तेथे प्रवेशासाठी फी भरावी लागते. पण तेथे अजून काही प्राचीन मोझेईकचे नमुने बघायला मिळाले...
.
मोझेईक इंस्टिट्यूट : ०१
.
मोझेईक इंस्टिट्यूट : ०२
.
मोझेईक इंस्टिट्यूट : ०३
.
मोझेईक इंस्टिट्यूट : ०४
.
मदाबातून बाहेर पडून दक्षिणेकडील केराकच्या दिशेने आमची सफर परत सुरू झाली. आताचा सगळा प्रवास रखरखीत वाळवंटातून होता. भर वाळवंटात मधूनच एखादे झाड नजरेस पडत होते...
मदाबा ते केराक रस्ता : ०१
आणि रस्त्याशेजारच्या एका वस्तीमध्ये चक्क हिरवाई आणि फुले दिसली...
मदाबा ते केराक रस्ता : ०२
मध्येच एका डोंगरावर आम्ही थांबा घेतला. तेथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पहायला मिळाले. तपकिरी रंगाच्या असंख्य छटांचे वाळवंटी डोंगर आणि दर्या-खोरी, त्यातून नागमोडी वळणे घेत सापासारखा वळवळणारा काळा टार्मॅकचा रस्ता, त्या रखरखीत पार्श्वभूमीच्या मध्येच पाण्याने भरलेले राजा हुसेन धरण आणि धरणापुढच्या दरीत कोरडे पडलेले जॉर्डन नदीचे पात्र. रणरणत्या उन्हातला हा देखावा तेवढासा सुखकारक नसला तरी काही काळ खिळवून ठेवणारा नक्कीच होता...
मदाबा ते केराक रस्ता : ०३
पर्यटक हमखास थांबण्याचे ठिकाण असल्याने एका स्थानिक गालिचे विक्रेत्याने ती निर्जन मोक्याची जागा काबीज करून तिच्या कठड्यांवर आपले दुकान उघडले होते...
मदाबा ते केराक रस्ता : ०४
रस्त्याने पुढे निघालो आणि परत एकदा गाडीतून धरण आणि त्याच्या परिसराचे विहंगम दर्शन झाले...
मदाबा ते केराक रस्ता : ०५
केराकला पोहोचेपर्यंत पोटात कावळे ओरडू लागले होते. सर्वप्रथम पोटोबा करून मग किल्ल्याच्या दिशेने निघालो.
केराक गाव व केराक किल्ला
केराक शहर अम्मानच्या दक्षिणेला १४० किमीवर आहे. केराकच्या जागी कमीत कमी लोहयुगापासून तरी मानववस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. बायबलमध्ये या गावाचा उल्लेख अस्सिरियन साम्राज्याचा भाग असलेले 'केर हारेसेथ' किंवा 'मोअबचे किर' असा केलेला आहे. उत्तर पॅलेस्टाईनमध्ये स्थिरावण्याआधी ज्या जागी सिरियन लोक गेले तो हा भाग असल्याचा Books of Kings व Book of Amos या पुस्तकांत उल्लेख आहे.
पहिल्या शतकात हा भाग नेबॅतियन साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर रोमन, बायझँटियन आणि अरब अश्या सत्तांनी त्याच्यावर हक्क प्रस्थापित केला. ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातल्या क्रूसेड्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युद्धांमध्ये इथला किल्ला ख्रिश्चनांनी अखेरपर्यंत ४६ वर्षे लढवला. पण अखेरीस इ स ११४८ मध्ये तो सालादीनच्या हाती पडला. दमास्कस व इजिप्त मधला व्यापारी मार्ग आणि दमास्कस-मक्का हा धार्मिक यात्रेचा मार्ग हे दोन मार्ग या किल्ल्यावरून जात असल्याने तो सतत एक महत्त्वाचे ठाणे राहिला आहे.
नामवंत अरब वैद्य इब्न अल् कफ् याचे केराक गाव जन्मस्थान आहे. त्याच्या शल्यचिकित्सेवरील पुस्तकांची गणना अरब जगतातील त्या विषयावरील पहिल्या काही पुस्तकात केली जाते.
समुद्रसपाटीपेक्षा १००० मीटर उंचीवरचा केराक किल्ला ट्रान्स्जॉर्डन विभागातल्या मोठ्या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. त्यातला हाच एकटा आधुनिक जॉर्डनमध्ये आहे इतर दोन किल्ले आधुनिक सिरीयात आहेत.
शहरात शिरण्याअगोदर उंचावर असलेला हा किल्ला आपल्या नजरेस पडतो...
केराक किल्ला : ०१ : दुरून झालेले पहिले दर्शन
.
केराक किल्ला : ०२
.
केराक किल्ला : ०३ :
.
केराक किल्ला : ०४
.
उंच कड्यांमुळे मिळणार्या नैसर्गिक संरक्षणाचा अभाव असलेल्या किल्ल्यांवर हल्ला करताना पूर्वीच्या काळी त्यांच्या भिंती चढून जाण्यासाठी अनेक प्रकारच्या शिड्यांचा वापर केला जात असे...
किल्ल्याची भिंत चढण्यासाठी वापरल्या जाणार्या शिडीचा एक प्रकार (चित्रात डावीकडे) (चित्र जालावरून साभार)
अश्या शिड्या किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचू शकणार नाहीत इतक्या तिरक्या कोनात टेकडीच्या उताराचे बांधकाम करून संरक्षणातली ही कमी भरून काढली आहे...
केराक किल्ला : ०५
हा किल्ला क्रूसेड्सच्या शेवटापर्यंत अजिंक्य राहण्यात या अभियांत्रिकी युक्तीचा सिंहाचा वाटा होता.
.
केराक किल्ल्याच्या फेरफटक्यानंतर आम्ही या सहलीचे मुख्य आकर्षण असलेल्या पेत्रा दरीच्या दिशेने निघालो.
(क्रमशः )
पेत्रा दरी हे जॉर्डनमधले सर्वात महत्त्वाचे आणि जगातल्या मुख्य प्राचीन आकर्षणांपैकी एक आहे. खरं तर जेव्हा पेत्राचे फोटो पाहिले तेव्हाच जॉर्डन माझ्या प्रवासांच्या स्थळांच्या यादीत अलगद येऊन बसला होता. त्यामुळे पेत्राच्या दिशेने गाडी धावू लागली आणि उत्सुकतेने परिसीमा गाठली होती.
पेत्रामधली पहिली वसाहत साधारण इ स पूर्व ७००० वर्षाची असावी. इजिप्शियनांच्या उत्तरेकडच्या मोहिमांत आणि बायबल आणि त्याच्याशी संबंधित प्राचीन लेखनात पेत्राचे उल्लेख आहेत.
इ स पूर्व १६८ (काहींच्या मते इ स पूर्व ३१२ पासून येथे नाबातियन लोकांची वस्ती होती) च्या सुमारास आताच्या दक्षिण जॉर्डनमध्ये पेत्रा नावाच्या ठिकाणी नाबातियन साम्राज्याने आपली राजधानी स्थापन केली. रोमन साम्राज्याने नाबातियन्सचा पाडाव करून हे शहर इ स १०६ मध्ये आपल्या कब्ज्यात घेईपर्यंत ती कायम होती. मूळ नाबातियन स्थापत्याबरोबरच येथे रोमन आणि ग्रीक शैलीचा प्रभाव असणारे स्थापत्यही दिसते.
नाबातियन साम्राज्याचा नकाशा (जालावरून साभार)
पेत्रा दरीला आणि त्यातल्या पेत्रा शहराला एकत्रितपणेच पेत्रा किंवा पेत्रा दरी असे संबोधले जाते. हे ठिकाण निवडताना नाबातियन लोकांनी अरुंद आणि उंच नैसर्गिक दरीचा संरक्षक तटबंदीसारखा उपयोग करून जणू एक भूकिल्लाच बनवला होता. खोल दरीत वसलेले असल्याने या शहरावर अचानक येणार्या पुराची तलवार सतत टांगलेली होती. त्यापासून वाचण्यासाठी दरीच्या कड्यांना कोरून केलेले येथील स्थापत्य त्या काळातलेच नव्हे तर आजही एक आश्चर्य समजले जाते. त्याचबरोबर पुराचा प्रतिबंध करण्यासाठी धरणे-कालवे आणि पावसाचे पाणी वर्षाच्या इतर काळासाठी व दुष्काळी परिस्थितीसाठी साठवण्यासाठी केलेल्या जलवाहक प्रणाली आजही आश्चर्यकारक व्यवस्था समजली जाते. या प्रकारे ३०,००० लोकसंख्येला वर्षभर पुरे होईल इतके पाणी या दरीतल्या शहरात साठवलेले असे. याशिवाय आजूबाजूच्या प्रदेशातल्या भूमीवरच्या आणि भूमीखालील अनेक झऱ्यांच्या पाण्याचे नियोजन करून राजधानीच्या आजूबाजूला डेरे टाकून बसलेल्या ५ लाख कायम आणि प्रवासी व्यापाऱ्यांसाठी पाण्याची सोय केलेली होती. यामुळेच, नाबातियन साम्राज्याच्या या राजधानीचा निसर्ग आणि मानवाने मिळून बनवलेल्या जगातल्या उच्चतम आश्चर्यांत समावेश होतो. पेत्रा दरीच्या गुलाबी रंगाच्या कातळांमुळे या शहराला "गुलाबी शहर (रोज सिटी)" असेही म्हटले जाते.
रेशीम, मसाल्याचे पदार्थ आणि इतर वस्तूंचे भारत, चीन, इजिप्त, सिरीया, ग्रीस आणि रोम यांना जोडणार्या मार्गांवरचे पेत्रा महत्त्वाचे ठाणे होते. थोडक्यात त्या काळचा कोणताही जागतिक व्यापार पेत्राला वगळून होऊच शकत नव्हता ! एखाद्या शहराचे यापेक्षा जास्त महत्त्व ते काय असू शकते ?! पाण्याच्या विक्रीमुळे मिळणारे उत्पन्न आणि व्यापारावरचा कर यामुळे पेत्रा त्या काळाचे मध्यपूर्वेतले सर्वात सधन शहर होते.
नाबातियन साम्राज्याच्या अंकित असलेले व्यापारी मार्ग (जालावरून साभार)
इ स १०६ मध्ये नाबातियन राजघराणे लयाला गेले तरी व्यापारी महत्त्वामुळे पेत्राचे वैभव बराच काळ कायम राहिले. मात्र त्यानंतर इ स १३०-२७० च्या काळात हळू हळू मुख्य व्यापारी मार्ग उत्तरेकडील पामिरा शहराकडे वळले आणि पेत्राच्या वैभवाला उतरती कळा लागली. त्यातच रोमन साम्राज्याच्या समुद्री व्यापारी मार्गांना प्राथमिकता देण्याच्या नीतीमुळे पेत्राच्या समस्येत भरच पडली. महत्व कमी होत चाललेल्या या शहराच्या इमारतींची आणि पाण्याच्या प्रणालींची ५५१ साली झालेल्या भूकंपाने अपरिमित हानी झाली. त्यानंतर सातव्या शतकात दक्षिणेकडून झालेल्या अरबी आक्रमणांनी तर पेत्रा ओस पडले आणि पुढची अनेक शतके त्याचे अस्तित्व वाळूने भरलेले पुरातन अवशेष एवढेच राहिले. प्राचीन खजिन्यांच्या लोभाने कारणाने भेट देणाऱ्या चोरांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला त्याच्यामध्ये फारसा रस राहिला नाही आणि हे शहर लोकांच्या स्मृतीतून जवळ जवळ निघून गेले.
जोआन लुडविग बर्कहार्ड्ट हा १८१२ मध्ये पेत्राला भेट देणारा पहिला युरोपियन प्रवासी होता. १९२९ साली अग्नेस कॉनवे आणि जॉर्ज हॉर्सफिल्ड हे दोन ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ; डॉ तौफिक कन्नान नावाचा एक लेबनानी डॉक्टर आणि लोककथा विशारद, आणि डॉ दितलेफ नील्सन हा डेन्मार्कमधील एक पुरातत्त्व अभ्यासक; या चार सभासदांच्या संघाने पेत्राची शास्त्रीय पाहणी करून तेथे उत्खनन सुरू केले. ते आजतागायत चालू आहे. आधुनिक तंत्राने भूगर्भाची तपासणी केल्यावर आतापर्यंत फक्त ५-१०% टक्के अवशेष वाळूतून वर काढले गेले आहेत असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
१९८५ साली पेत्राला UNESCO World Heritage Site म्हणून मान्यता देताना तिचा उल्लेख, "मानवाच्या अत्युत्तम सांस्कृतिक ठेव्यांपैकी एक" असा केला गेला होता. स्मिथसोनियन नियतकालिकाने पेत्राचा "मरण्यापूर्वी बघाव्या अश्या २८ जागा" मध्ये केला आहे.
पेत्राचा उल्लेख अथवा चित्रीकरण अनेक कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट इत्यादीमध्ये केला गेलेला आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
* कविता : १८४५ मध्ये जॉन विल्यम बर्गनच्या पेत्रासंबंधीच्या कवितेला Newdigate Prize मिळाले.
* संगीत नाटक : १९७७ मध्ये राहबानी बंधूंनी "पेत्रा" या नावाने लेबेनॉनच्या यादवी युद्धावर एका संगीत नाटक लिहिले.
* कादंबऱ्या : Left Behind Series, Appointment with Death, The Eagle in the Sand, The Red Sea Sharks, The Adventures of Tintin series मधले १९ वे पुस्तक, The Moon Goddess and Son, Last Act in Palmyra, Chasing Vermeer, इत्यादी.
* चित्रपट अथवा टीव्ही मालिका : Indiana Jones and the Last Crusade, Arabian Nights, Passion in the Desert, Mortal Kombat: Annihilation, Sinbad and the Eye of the Tiger, The Mummy Returns, Transformers: Revenge of the Fallen, An Idiot Abroad, इत्यादी.
* व्हिडिओ खेळ : Spy Hunter (2001), King's Quest V, Lego Indiana Jones, Sonic Unleashed, Knights of the Temple: Infernal Crusade and Civilization V.
* संगीत व्हिडिओ : Sisters of Mercy चा Dominion/Mother Russia आणि Urban Species चा Spiritual Love.
पेत्रा आणि लॉरेन्स ऑफ अरेबिया
लॉरेन्स ऑफ अरेबियाची प्रसिद्ध कथा पेत्राच्या परिसरात घडली आहे. पहिल्या महायुद्धात १९१७ च्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटिश सैन्याला ऑटोमन साम्राज्याचा यशस्वी विरोध होत होता. तेव्हा गाझा पट्टीतील त्याचा विरोध कमी करण्यासाठी टॉमस एडवर्ड लॉरेन्स नावाच्या ब्रिटिश ऑफिसरच्या चिथावणीने पेत्रा परिसरातल्या अरब आणि सिरियन नागरिकांनी ऑटोमन सत्तेविरुद्ध उठाव केला. या उठावातले विशेष म्हणजे, स्थानिक पुढारी शेख खालीली याच्या पत्नीच्या नेतृत्वाखाली स्थानिक अरबी स्त्रियांनीही त्यात भाग घेतला होता. या उठावाला ब्रिटिश सैन्यानेही मदत केली आणि ऑटोमन सैन्याचे बरेच नुकसान करण्यात यश मिळवले होते.
इतक्या नावाजलेल्या जागेबाबतचे आकर्षण तिच्या जवळपास पोचल्याने शिगेवर आले होते. पण तेथे पोहोचेपर्यंत रात्र होत आली होती आणि दिवसभराच्या दगदगीने सर्वजण थकले होते. त्यामुळे गरमागरम शॉवर घेऊन आधुनिक पेत्रा गावात एक फेरी मारून आणि रात्रीचे जेवण घेऊन झोपणे पसंत केले. या मागे मार्गदर्शकाने दिलेली "उद्या भरपूर चालायची आणि डोंगर चढायची तयारी ठेवा" ही धमकीही कारणीभूत होतीच म्हणा !
===================================================================
ताणलेल्या उत्सुकतेपोटी सकाळ जरा लवकरच उजाडली ! सगळेजण न्याहारीच्या खोलीत जमा झाले. खडतर दिवसाला तोंड देण्याची तयारी म्हणून तवा कबाब-रोटी, ऑम्लेट-ब्रेड, फूल-खुब्ज, फळांचा रस, फळे आणि कॉफी अशी सज्जड न्याहारी करून पेत्रा दरीवर चढाई करायला आम्ही तयार झालो.
पेत्राचा नकाशा (जालावरून साभार)
आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतशी आमच्या फौजेला इतर पर्यटकांची कुमक मिळत गेली. आधुनिक पेत्रा शहरापासून पेत्रा दरीकडे जाणार्या रस्त्यावर तेलावर चालणार्या गाड्यांना बंदी आहे. केवळ घोड्यांनी ओढलेल्या गाड्यांनी अथवा चालत जावे लागते. हा एक किलोमीटर लांबीचा पायी प्रवासही या भटकंतीतले लक्षात राहणारे आकर्षण होते. शहरापासून डोंगरापर्यंत असलेल्या थोडाश्या सपाट भूभागावरून चालत जाताना बाजूच्या डोंगरउतारावरची कलाकारी आपल्याला पेत्रा काय दाखवणार याची पुसट पूर्वकल्पना देऊ लागली होती...
पेत्राच्या दिशेने पदयात्रा : ०१
.
पेत्राच्या दिशेने पदयात्रा : ०२ : कड्यात कोरलेले आणि इजिप्शियन / ग्रीक ओबेलिस्कने सजवलेले थडगे
थोड्याच वेळात आम्ही खुब्था नावाच्या डोंगराच्या संपूर्ण उंचीला दुभागणार्या सीक (Siq) नावाच्या एका अरुंद घळीच्या तोंडाशी पोहोचलो. येथूनच पेत्रा आपला चमत्कार उलगडून दाखवायला सुरुवात करते. या एक किलोमीटर लांब, ८० मीटर उंच आणि काही मीटर (काही ठिकाणी अगदी फक्त ८-१० मीटरच) रुंद घळीतून चालत जाणे हा एक विस्मयकारक आणि सुंदर अनुभव आहे...
सीक घळ : ०१ : तोंड
या घळीचे अरुंद तोंड हीच पेत्राची आक्रमकांविरुद्ध असलेली पहिली संरक्षक फळी होती. जणू काही किल्ल्याचा १०-१५ मीटर रुंद आणि ८० मीटर उंच नैसर्गिक दरवाजा ! या दरवाज्यातून आत गेल्यावर थोड्याच वेळात मध्येच एका ठिकाणी घळ बर्यापैकी रुंद होऊन एक छोटेसे पटांगण झालेले दिसले. तेथे रोमन सैनिक आमच्या मनोरंजनासाठी त्यांची पुरातन कवायत करत होते...
सीक घळ : ०२ : रोमन सैनिक
तेथून पुढे घळ परत अरुंद झाली. नैसर्गिक झीजेमुळे दोन्ही बाजूंच्या कड्यांच्या कातळांवर चित्रविचित्र आकार तयार झालेले आहेत. या सौंदर्यपूर्ण नैसर्गिक कलाकृतींकडे पाहत आमची वाटचाल पुढे सुरू होती. त्यातच भर म्हणून वर येऊ लागलेल्या सूर्याची किरणे घळीत प्रवेश करू लागली होती. खनिजांनी समृद्ध कातळांवर सूर्यकिरणे पडली की तेथे रंगांचे खेळ सुरू होत होते. तो रंग आणि आकारांचा खेळ बघत आम्ही पुढे जात होतो...
...
सीक घळ : ०३ व ०४
.
सीक घळ : ०५
.
सीक घळ : ०६
.
सीक घळ : ०७
.
सीक घळ : ०८
नाबातियन अनेक देव मानणारे मूर्तिपूजक होते. नाबातियन देवतांच्या कातळात कोरलेल्या मूर्तीचे अवशेष मधून मधून दिसत होते...
सीक घळ : ९ : कड्यात कोरलेल्या मखरातले नाबातियन देवतेच्या मूर्तीचे अवशेष
एका ठिकाणी घळीच्या मध्यावर असलेल्या एका मोठ्या कातळात मुख्य नाबातियन देवाची व त्याच्या पत्नीची मूर्ती असलेले, अगदी आपल्या गावाच्या वेशीवर असते तसेच, एक देऊळ कोरलेले होते...
सीक घळ : १० : गाववेशीवरचे नाबातियन मंदिर (मखरातील मोठा चौकोन मुख्य देवाच्या आणि त्याच्या शेजारचा छोटा चौकोन त्याच्या पत्नीच्या मूर्तीचे अवशेष आहेत)
.
सीक घळ : ११ : गणेशाच्या आकाराचा नैसर्गिक खडक
.
सीक घळ : १२ : हत्तीच्या डोक्याचा आकार
या निसर्गाच्या कवतिकाने चकीत होत पुढे पुढे जात असतानाच नकळत संपणार्या घळीच्या चिरेतून उन्हाच्या तिरिपेत चमकणारा एक भव्य आकार पुढे आला. बराच काळ मनात कोरला गेलेला तो आकार इतक्या नाट्यपूर्ण प्रकारे अचानक समोर आला की मी थोडासा स्तब्ध झालो आणि जवळ जवळ ओरडलोच, "ट्रेझरी... ट्रेझरी (खजिना... खजिना) !!"...
पेत्रा दरी : ०१ : खजिन्याचे पहिले दर्शन
अंदाजे ५० मीटर चालून गेल्यावर घळीतून बाहेर पडून पेत्रा दरीतल्या एका फुटबॉल मैदानाइतक्या मोठ्या मोकळ्या जागेत प्रवेश केल्यावर ती जगप्रसिद्ध वास्तू पूर्णपणे दिसू लागली...
पेत्रा दरी : ०२ : खजिना
अगोदर फोटोत बघितलेले असूनही, घळ संपून पेत्रा दरीत शिरताना अचानक पुढे येणारे हे स्थापत्य मनावर आश्चर्यकारक छाप पाडते. २००० वर्षांपूर्वी शहराला भेट देणार्या लोकांच्या मनावर त्याच्या भव्यतेचा आणि कलाकुसरीचा प्रचंड प्रभाव पडत असणार हे निश्चित ! पेत्राला भेट देणार्या व्यापार्यांसाठी अशी जगावेगळी वास्तू मोठे आकर्षण असणार हे नक्की. त्यांनी केलेले या जागेचे वर्णन पेत्राच्या जाहिरातीचे प्रभावी साधन झाले असल्यास नवल नाही. व्यापाराला चर्चेतून झालेल्या जाहिरातीपेक्षा (माउथ पब्लिसिटी / वर्ड ऑफ माउथ) जास्त उपयोगी जाहिरात ती काय ?!
ट्रेझरीची इमारत म्हणजे पेत्रा दरीच्या उभ्या कड्यातल्या वालुकाश्मात कोरून काढलेला एक मोठा दिवाणखाना आणि त्याच्या प्रत्येक बाजूला एक अश्या दोन मोठ्या खोल्या आहेत. तिच्या दर्शनी भागाच्या वर मध्यात असलेल्या कलशासारख्या दगडी आकारात नाबातियन किंवा इजिप्शियन राजांनी खजिना साठवून ठेवला असावा असा लोकांत समज होता. त्यामुळे त्या कलशावर गोळीबार करून तो फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. भरीव दगडाने बनलेला असल्याने तो कलश फुटला नाही पण त्याला बरीच हानी मात्र पोचली.
ही वास्तू नक्की कशासाठी बांधली होती याबाबत पुरातत्त्व शास्त्रज्ञांना बराच काळ मोठे कोडे पडले होते. तिच्या भव्यतेमुळे आणि नगराच्या वेशीजवळच्या स्थानामुळे ही इमारत व्यापारी कर जमा करण्यासाठी आणि साठवण्यासाठी बनवलेली खजिन्याची इमारत (ट्रेझरी) असावी असा सुरुवातीचा समज होता. त्यावरून तिचे नाव ट्रेझरी (खजिन्याची इमारत) असे ठेवले गेले. नंतर आधुनिक उपकरणे वापरून भूगर्भ चाचणी केल्यावर त्या इमारतीखाली अजून काही खोल्या असल्याचे आढळले. उत्खनन केल्यावर तेथे मिळालेल्या अस्थी, त्यांच्याबरोबर पुरलेले इतर सामान आणि शिलालेख यांच्या साहाय्याने ती इमारत म्हणजे नाबातियन राजा अरेतास याचे थडगे असल्याचे समजले. राजघराण्यातल्या इतर व्यक्तींसाठीही हे भव्य थडगे वापरले गेले होते. मात्र तरीही त्या इमारतीला "खजानेह् किंवा ट्रेझरी" हे नाव चिकटले ते आजतागायत कायम राहिले आहे.
पेत्रा दरी : ०३ : खजिन्यासमोरचे पटांगण आणि सीक घळ
मात्र या शोधाने पेत्रा दरीच्या कातळांत कोरून काढलेल्या अनेक कोरीव इमारतींचा अर्थ लागला... ती सगळी थडगी होती ! त्या काळाची उघड्यावर बांधलेली सर्व दगड-माती-लाकडाची घरे अनेक भूकंपांनी आणि निसर्गाच्या मार्याने नष्ट झाली आहेत. थोडक्यात, आता उरलेले पेत्रा शहर म्हणजे शेकडो, वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलींच्या थडग्यांची नगरी आहे !! मृत माणसाच्या राजकिय-सामाजिक स्थानाप्रमाणे आणि आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्याचे थडगे किती मोठे आणि किती कलापूर्ण असावे हे ठरत होते.
पेत्रा म्हणजे नाबातियन लोकांच्या स्थापत्यकलेचे, रसिकतेचे आणि सधनतेचे एक विशाल खुले संग्रहालय आहे. त्यातिल काही भाग...
पेत्रा दरी : ०४ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी
.
पेत्रा दरी : ०५ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी
.
पेत्रा दरी : ०६ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी
.
पेत्रा दरी : ०७ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी
.
पेत्रा दरी : ०८ : पेत्रा दरीच्या कड्यांतील थडगी
दरीतून चालत पुढे गेल्यावर नाबातियन लोकांनी बांधलेले ३,००० प्रेक्षक बसू शकतील इतके मोठे रोमन शैलीतले थिएटर दिसले...
पेत्रा दरी : ०८ : रोमन शैलीतले थिएटर
पुढे जाताना राजवाडा, मंदिर, ओबेलिस्क, प्राण्याचे बली देण्याच्या वेदी आणि कोलोनेडवाल्या रस्त्यांचे अनेक भग्न अवशेष दिसत होते... ...
पेत्रा दरी : ०९ : भग्नावशेष
.
पेत्रा दरी : १० : जीर्णोद्धार केल्यानंतर आता दिसणारे मंदिर व त्याचा परिसर (जालावरून साभार)
दरीच्या मध्यातच एका स्थानिकाचे दुकान-कम-रेस्तराँ होते तेथे अल्पोपहार घेतला. नंतरचा दरीच्या दुसर्या टोकापर्यंतचा प्रवास करण्यासाठी स्वतःचे पाय, खेचर व उंट असे तीन पर्याय होते. पाय आणि वेळ वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पसंतीचा दुसरा किंवा तिसरा पर्याय निवडला. मी उंटाची सफारी निवडली...
पेत्रा दरी : १२ : उंटाची सवारी
दरीच्या शेवटाला असलेल्या डोंगरावर असलेल्या आकर्षणाला, अद् दायर मोनास्टरीला, जायला डोंगराचा उभा चढ आणि ८०० पायर्या चढून जावे लागते. त्या चढणीवर उंट चढू शकत नाही. त्यामुळे नाईलाजाने आतापर्यंत आम्ही प्रेमात पडलेल्या सवारीला सोडून खेचरावर बसावे लागले. या अरुंद रस्त्याचा बराच भाग तुटक्या कड्याच्या बाजूने किंवा खोल दरीच्या बाजूने जातो. खडबडीत रस्त्यावरून आणि तुटलेल्या दगडी पायर्यांवरून खेचरांचेही पाय मधूनच घसरत होते. जीव मुठीत घेऊन तोल सांभाळत केलेला हा प्रवास नक्कीच कायम स्मरणात राहील ! ...
पेत्रा दरी : १३ : अद् दायर मोनास्टरीकडे
.
पेत्रा दरी : १४ : अद् दायर मोनास्टरीकडे
पण मोनास्टरीजवळ पोचल्यावर हा सर्व त्रास सुसह्य वाटला. डोंगरावर असलेल्या एका प्रशस्त पटांगणास लागून असलेल्या कड्यात कोरून काढलेल्या या मोनास्टरीचे स्थापत्य खजिन्याच्या स्थापत्याच्या तोडीस तोड असेच आहे...
पेत्रा दरी : १५ : अद् दायर मोनास्टरी
पटांगणाच्या विरुद्ध दिशेला एक रेस्तराँ आहे. तेथे सर्वांनी कोरडे पडलेले घसे शीतपेयांनी ओले करून घेतले. तेथून जवळच असलेल्या सर्वात उंच टेकडीवरच्या एका तंबूवर "द बेस्ट व्ह्यू इन पेत्रा" असा फलक बघितला...
पेत्रा दरी : १६ : "द बेस्ट व्ह्यू इन पेत्रा" टेकडी
आता इतके दूर आल्यानंतर तो संदेश पाहून तेथे जावेच लागले. तेथे जाण्यासाठी पाय हाच एक पर्याय होता. पण टेकडीवर पोचल्यावर थकवा दूर होईल असे मोनास्टरीचे आणि परिसराचे विहंगम दर्शन झाले...
पेत्रा दरी : १७ : टेकडीवरून दिसणारी मोनास्टरी आणि परिसर
टेकडीवरचा तंबू एका स्थानिक बदू (भटका अरब) चा होता. त्या तंबूत त्याने आपले भेटवस्तूंचे दुकान ठाकले होते. "पाणी हवे काय?" असे म्हणत एकदम घरगुती पद्धतीने स्वागत करून त्याने प्रत्येकाची "कोठून आलात?" अशी विचारपूस केली. मी भारतीय आहे असे म्हणताच त्याला एकदम प्रेमाचे भरते येऊन गळाभेट झाली (सर्वसाधारण, आणि विशेषतः बदू लोकांत भारतियांबद्दल आस्था दिसली. शहरात मात्र तसे काही खास जाणवले नाही.)...
पेत्रा दरी : १८ : टेकडीवरच्या तंबूतले स्वागत
त्या तंबूत जणू आंतरराष्टीय सभा भरली होती... तेथे भारत (मी), सौदी अरेबिया, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, स्पेन आणि चक्क इझ्रेलचे नागरिक होते !! अरब आणि इझ्रेली लोकांना इतक्या सौहार्दपूर्ण वातावरणात उच्चस्तरीय (टेकडीवर हो !) खलबते करतानाच नव्हे तर अरबी बदू संगीतावर एकत्र ठुमका मारताना पाहायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते...
पेत्रा दरी : १९ : टेकडीवरच्या तंबूतले नृत्य
परतीचा पेत्रा दरीतल्या रेस्तराँपर्यंतचा प्रवास पायीच केला. रेस्तराँमध्ये पोटोबा केला आणि थोडा विसावा घेतला. ज्यांच्या पायात अजूनही त्राण आहे त्यांनी दरीच्या टेकड्यांवर चढाई करून तिथले स्थापत्य जवळून पाहायला हरकत नाही, असे मार्गदर्शक म्हणाला. त्याचा फायदा घेऊन माझ्यासारखे काही मावळे हर हर महादेव म्हणत पेत्रा दरीचे कडे सर करायला निघाले. त्या मोहिमेत सापडलेली काही लूट...
पेत्रा दरी : २० : परतीचा फेरफटका : नैसर्गिक कलाकारी
.
पेत्रा दरी : २१ : परतीचा फेरफटका : न्यायगृह (हॉल ऑफ जस्टिस)
.
पेत्रा दरी : २२ : परतीचा फेरफटका : न्यायगृह (हॉल ऑफ जस्टिस)
.
पेत्रा दरी : २३ : परतीचा फेरफटका
.
पेत्रा दरी : २४ : परतीचा फेरफटका
कड्यांमधल्या गुहांतून भटकताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. शेवटी मावळतीला जाणार्या सूर्यमहाराजांनी त्यांची किरणे आवरत घेत त्यांच्या कामाची वेळ संपली असे जाहीर करायला सुरुवात केली. अजून दरीचा उरलेला एक किलोमीटर आणि सीक घळीचा एक किलोमीटर चालायचे आहे हे ध्यानात येऊन आमची मोहीम आवरती घेणे भाग पडले.
===================================================================
पेत्रामघ्ये घडलेल्या लक्षात राहण्याजोग्या दोन घटना:
पेत्रामधले बॉलीवूड
पेत्रा दरीत फिरताना एक १०-१२ वर्षांची बदू फेरीवाली मुलगी दरीतल्या फोटोंचा अल्बम घ्या म्हणून मागे लागली. फिरताना डिजीटल कॅमेर्याच्या कृपेने मीच दिवसाला १००-२०० फोटो काढत असतो ! म्हणून मी असे फोटो विकत घेत नाही. १०-१२ मीटर पाठलाग करूनही मी दाद देत नाही हे पाहिल्यावर तिने धावत येऊन समोर उभे राहून मला थांबायला भाग पाडले आणि अचानक "दिलीप कुमार, अमिताभ बच्चन..... शाहरुख खान, हृतीक रोशन, अक्षय कुमार..." अशी १५-२० नावे अरबी ठसक्यात धडधडा म्हणून दाखवली. त्या धक्क्यातून सावरायला मला जरासा वेळ लागणारच ना ! पण त्यामुळे तिला मी अजूनही बधत नाही असे वाटले असावे, कारण तिने एक-दोन हिंदी गाण्यांचे मोडकेतोडके तुकडे म्हटले. आतापर्यंत बॉलीवूडचा गंधही नसलेल्या माझ्या काही सहकार्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते ! मुकाट्याने (आणि बर्याचशा खुशीने) तिने सांगितलेली किंमत देऊन अल्बम खरेदी केला !
बदूशी लग्न (Married to a Bedouin)
Marguerite van Geldermalsen नावाची न्यूझीलंडची नर्स १९७८ मध्ये पेत्रा दरीत पर्यटक म्हणून आली असता तिथल्या एका गुहेत जन्मलेल्या आणि तेथेच राहिल्या-वाढलेल्या महंमद अब्दुल्लाच्या प्रेमात पडली. त्यांचे लग्न झाले. १९८५ मध्ये बदूंचे दरीबाहेरच्या गावात विस्थापन करेपर्यंत ती महंमदबरोबर त्याच्या २००० वर्षे वयाच्या गुहेत राहत होती. त्यांच्या तीन मुलांपैकी पहिल्या दोघांचा जन्म त्याच गुहेत झाला. मार्गेराईटने आपल्या आयुष्याच्या त्या कालखंडासंबंद्धी "Married to a Bedouin" या नावाने पुस्तक लिहिले आहे.
ती दरीत राहणार्या बदूंसाठी अनौपचारिक नर्स म्हणून काम करत असे. तिने दरीत एक भेटवस्तूंचे दुकान थाटले होते, आता ते न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेऊन आलेला तिचा एक मुलगा चालवतो. आमच्या मार्गदर्शकाने त्याची ओळख करून दिली तेव्हाचा हा फोटो...
मार्गदर्शक खमीस आणि मार्गेराईटच्या मुलाबरोबर
पुढच्या दिवशी सकाळी पेत्राहून आमचा प्रवास "वादी रम"च्या दिशेने सुरू झाला. अरबी भाषेत वादी म्हणजे दरी किंवा नदीचे (बहुतेक वेळेस कोरडे झालेले) पात्र. संपूर्ण अरबस्थान अनेक कोरड्या वाद्यांनी भरलेले आहे. फार पूर्वी कोरड्या पडलेल्या नद्यांची पात्रे किंवा आता क्वचितच पडणार्या पावसाच्या वेगाने वाहणार्या पाण्याच्या प्रवाहाने बनलेले वाळूचे आणि वालुकाश्माचे भूस्तरीय आकार असे त्यांचे स्वरूप असते. काही वाद्या जुन्या काळापासून प्रसिद्ध आहेत. ज्या वेळेस आजच्यासारखी वाहतुकीची व्यवस्था नव्हती तेव्हा व्यापाराचे आणि धार्मिक प्रवासांचे मार्ग या वाद्यांतून जात असत. प्राचीन काळी पाण्याने समृद्ध असलेल्या वाद्यांच्या काठी वस्ती होती. त्यातले एक मोठ्या राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे "वादी पेत्रा उर्फ पेत्रा व्हॅली उर्फ पेत्रा दरी" हे एका मोठ्या नाबातियन साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते, तेथूनच आजचा प्रवास सुरू झाला होता.
पेत्राच्या जवळच असलेली "वादी रम" तिच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि चित्रविचित्र नैसर्गिक भूस्तरीय रचनांमुळे एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण झाली आहे. या दरीचे नाव तिथल्या रम् नावाच्या जॉर्डनमधल्या सर्वात उंच डोंगरावरून (जबल रम्) पडले आहे. प्राचीन काळात इथे प्रचलित असलेल्या अरेमिक भाषेत रम् म्हणजे उंच आणि अरबीत जबल म्हणजे पर्वत / डोंगर.
या दरीचे अजून एक आकर्षण म्हणजे तिचे "लॉरेन्स ऑफ अरेबिया" शी असलेले नाते. पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या लॉरेन्सच्या कहाण्या या दरीत आणि तिच्या आसपासच्या प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर घटलेल्या आहेत.
वादी रमला चंद्रदरी (वादी कमर उर्फ Valley of the Moon) असेही संबोधले जाते. ही जॉर्डनमधली क्षेत्रफळाने सर्वात मोठी (७२० चौ किमी) आणि समुद्रसपाटीपेक्षा बर्याच वर (सर्वात उंच ठिकाण समुद्रसपाटीपेक्षा १७०० मीटर) असलेली दरी आहे. वादी रम पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केलेली आहे. या दरीतले वाळवंट आणि त्यांत विखुरलेले वालुकाश्मांचे असंख्य नैसर्गिक आकार पाहत भटकायला (ट्रेकिंग करायला), गिर्यारोहण करायला, उंटांवरून किंवा चारचाकीतून सफर करायला आणि येथे असलेल्या पर्यटक छावण्यांत रात्रीची वस्ती करण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
सकाळची न्याहारी आटपून आमची वादी रमच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. वादीच्या परिसरात शिरल्याबरोबर लगेच वादी रमचे आकर्षण असणारे वाळवंट आणि वालुकाश्मांचे आकार दिसायला सुरुवात झाली...
वादी रम : ०१
.
वादी रम : ०२
.
वादी रम : ०३
तासाभराच्या सफरीनंतर आम्ही आमच्या पर्यटक छावणीत पोहोचलो. चारी बाजूंनी अथांग वाळवंट, त्यात मध्येच वर आलेल्या एका नैसर्गिक कोरीवकामाने सजलेल्या डोंगराच्या काटकोनी बेचक्यांत ही छावणी होती. खजुरांच्या झावळ्यांनी शाकारलेले दोन-तीन सार्वजनिक वापरासाठीचे मंडप होते आणि त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक-दोन-तीन पर्यटक राहू शकतील असे अनेक आकारांचे तंबू होते. छावणीच्या दुसर्या टोकाला सार्वजनिक स्वच्छतालये होती. एकंदरीत, वाळवंटात रात्र घालवण्याचा अनुभव पर्यटकांना देण्याची ही छान सोय होती असे म्हणायला हरकत नाही.
वादी रम : ०४
आपापल्या तंबूंत सामान टाकून आम्ही सगळे मध्यवर्ती मंडपात पाय पसरून खिनभर आराम करायला बसलो. चहा-कॉफीपान झाले. संध्याकाळच्या खाण्यापिण्याची ऑर्डर देऊन झाले. मग उरलेला वेळ कारणी लावायला ४ X ४ गाडीने वादी रमच्या वाळवंटाची सफर करायला निघालो. दर वळणावर वाळवंटाची वेगवेगळी रुपे आणि वाळूच्या माराने घासून बनलेले डोंगरांचे विचित्र आकार दिसत होते. वाळू आणि टेकड्यांवर उनसावल्यांनी चालवलेले खेळ त्या आकारांची मजा अजूनच रंगीबेरंगी करत होते...
वादी रम : ०५
.
वादी रम : ०६
.
वादी रम : ०७
.
वाटेत एका ठिकाणी अरॅमिक भाषेतले प्राचीन प्रस्तरलेखन आणि प्राचीन प्रस्तरचित्रे (Petroglyph) पाहायला मिळाली...
वादी रम : ०८ : अरॅमिक भाषेतले प्राचीन प्रस्तरलेखन
.
वादी रम : ०९ : प्राचीन प्रस्तरचित्रे
.
आमचा बदू (वाळवंटात राहणारे भटका अरब) वाटाड्या जरा जास्तच चलाख निघाला. त्याने वाळवंटात बराच फेरफटका मारवला, (त्याच्या फायद्याच्या) भर वाळवंटातल्या भेटवस्तूंच्या दुकानात नेऊन वेळ खाल्ला आणि "आता परतायला हवे" असे म्हणायला लागला. "पण अजून एक फार महत्त्वाचे आकर्षण राहिले आहे त्याचे काय ?" असे म्हटल्यावर "आता उशीर झाला, तेथे जाऊन यायला ४-५ तास लागतील आणि मग परतायला खूप रात्र होईल." असे कारण सांगू लागला. मग आम्ही पण जोर लावून धरला आणि अम्मानमधल्या पर्यटक कंपनीच्या मॅनेजरला फोन लावला (मोबाईल की जय हो !)... परिणामी आम्ही जगप्रसिद्ध लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या घराकडे निघालो.
लवकरच आमचा लढा लॉरेन्स इतकाच यशस्वी झाल्याचे ध्यानात आले ! कारण पोहोचायलाच दोन तास लागतील असे म्हणणार्या बदूने आम्हाला अर्ध्या पाऊण तासातच लॉरेन्सच्या घरापर्यंत पोहोचवले !
हीच ती दोन डोंगरांच्या बेचक्यांतली जागा जिला लॉरेन्सने त्याच्या ब्रिटिश साम्राज्याला मदत करणार्या ऑटोमान साम्राज्याविरुद्धच्या लढ्याच्या वेळी घर बनवले होते...
वादी रम : १० : लॉरेन्स ऑफ अरेबियाने वस्ती केलेले ठिकाण
आता त्या जागेत वादी रमच्या विकासासाठी काम करणार्या संस्थेचे कार्यालय आणि कार्यशाळा आहेत. त्या जागेपुढे असलेल्या एका वालुकाश्माच्या शीळेवर लॉरेन्स आणि त्याच्याबरोबरीने ऑटोमान साम्राज्यापासून स्वतंत्र होण्यासाठी संघर्ष करणारा अमीर (राजपुत्र) अब्दुल्ला यांचे चेहरे कोरलेले आहेत. हा राजपुत्र अब्दुल्ला पुढे कैरो कॉन्फ़रन्सच्या अन्वये ट्रान्सजॉर्डनचा आणि नंतर स्वतंत्र जॉर्डनचा पहिला राजा झाला.
वादी रम : ११ : लॉरेन्सबरोबरची अस्मादिकांची भेट
.
वादी रम : १२ : राजपुत्र अब्दुल्लाचे वालुकाश्मावरचे कोरीव चित्र
.
लॉरेन्सच्या निवासस्थानाच्या जागेला भेट देण्याच्या यशस्वी मोहिमेचा आनंद मनात घोळवत आम्ही परत निघालो. रमत गमत परतूनही अगदी योग्य वेळेवर रम् वाळवंटातला सूर्यास्ताचा नजारा बघण्याच्या जागेकडे पोहोचलो...
वादी रम : १३ : सूर्यास्त ०१
.
सूर्यास्त बघायला एका मोक्याच्या टेकडीवर चढाई करून मस्तपैकी जागा पटकावली. टेकडीवरून थोड्या दूरवर आमची रात्री वस्ती करायची छावणी दिसत होती. म्हणून "लवकर चला, लवकर चला." अशी भुणभूण करणार्या बदूला सुट्टी देऊन सूर्यास्त झाल्यावर चालत परतू असे ठरवले.
आता आम्ही आमच्या वेळाचे राजे होतो... उच्चासनावरून आजूबाजूच्या जागेचे निरीक्षण सुरू केले...
वादी रम : १४ : सूर्यास्त ०२
.
वादी रम : १५ : सूर्यास्त ०३
.
वादी रम : १६ : सूर्यास्त ०४
.
सूर्यास्त झाल्यावर प्रकाश झपाट्याने कमी होऊ लागला. टेकडीवरून जवळ दिसणारी छावणी वाळूत पाय रुतणार्या वाटेने जाताना वाटते तितकी जवळ नाही हे लवकरच ध्यानात आले ! टेकडीच्या उंचीवरून जमिनीच्या सपाटीवर आल्यावर छावणीही दिसेनाशी झाली होती. अर्ध्या एक तासाने नक्की छावणीच्या दिशेने चाललो आहे की विरुद्ध असा प्रश्न पडायला लागला ! आता काय करावे ? दूरदूरवर एखादा माणूस किंवा दिवाही दिसत नव्हता. जवळच्या टेकडीवर चढून परत आपल्या छावणीच्या दिशेचा अंदाज घ्यावा असा विचार झाला. तेवढ्यात, अचानक त्या अंधारात एका टेकडीमागून एक बदू चार उंट घेऊन अवतरला आणि उंटाची सफारी करा म्हणून मागे लागला ! त्याच्याशी वाटाघाटी करून "आमच्या छावणीकडे नेणारी उंटाची सफारी" अश्या डबल बेनेफिट स्कीमवाला यशस्वी करार केला आणि काळजीचे रुपांतर मजेशीर सफारीत झाल्याने निर्धास्त झालो...
वादी रम : १७ : उंटाची सफारी
.
छावणीत परतलो तेव्हा बर्यापैकी काळोख झालेला होता. हात-तोंड घुवून ताजेतवाने होऊन संध्याकाळच्या कार्यक्रमाची वाट पाहत मंडपात हातपाय पसरून आराम करू लागलो.
थोड्याच वेळात संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी छावणीच्या कर्मचार्यांची लगबग सुरू झाली. खाणेपिणे, छावणीच्या विस्तवाभोवती नाचणे, उत्तररात्र ओलांडून जाईपर्यंत गप्पा-गोष्टी-विनोद, इत्यादी कार्यक्रम पूर्वी ठरवल्याप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाले. शेवटी रात्री दोन वाजता बंदिस्त तंबूत जावून झोपण्यापेक्षा हवेशीर उघड्या मंडपातच ताणून दिली.
(क्रमशः )
तिथले वातावरण पाहता शिलालेख आणि प्रस्तरचित्रांचे वय ठरवायचा प्रयत्न कोणी केला नसेल असं वाटतंय. वादी शब्द चांगलाच ओळखीचा आहे. (हिंदी सिनेमांमुळे) वादियाँ मेरा दामन कोण विसरेल!हे बदु म्हणजे बदाउनी लोकांचे जवळचे का? की तेच ते?
हे शिलालेख थामुदिक कालखंडातले (इ स पूर्व ४ थे शतक ते इ स ४ थे शतक) असावेत असे समजले जाते. अरामिक आता लुप्त झालेली भाषा आहे.
बदू (इंग्लिश्मध्ये bedouin) हा अरबस्तानातल्या भटक्या अरब जमातींसाठी वापरला जाणारा अरबी शब्द आहे.
बदूला किती शेपट्या लावल्यात त्या! एन्ग्लिश इस अ वेर्य फुन्न्य लन्गुअगे.
मूळ अरबी शब्द "बदू, badw, بَدْو" आणि त्याचे अनेकवचन "बदविन, badawiyyīn/badawiyyūn, بَدَوِيُّون" असे आहे. भाषाअशिक्षित गोर्यांनी उच्चारला कठीण वाटणार्या शब्दाचे नेहमीप्रमाणेच अपभ्रंश केलेला आहे.
उघड्यावरच्या छावणीत सकाळ जरा लवकरच फटफटली. बाकीच्या पर्यटकांची गर्दी होण्याअगोदर सामायिक स्वच्छतागृहातली सकाळची कामे आटपून मस्त न्याहारी आटपून घेतली आणि निघायला वेळ असल्याने छावणीच्या परिसरात फेरफटका मारायला निघालो. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात ते वाळवंट अजूनच वेगळे दिसत होते.
तेथे जमलेल्या पर्यटकांच्या गर्दीचा व्यवसायासाठी कल्पक उपयोग करून एकजण तेथे मोटोराईझ्ड हँग ग्लायडरच्या साहाय्याने वादी रमचे विहंगम दर्शन घडवीत होता...
वादी रम : मोटोराइझ्ड हँग ग्लायडर (जालावरून साभार)
ही २०-३० मिनीटांची हवाई सफारी घ्यावी असे प्रकर्षाने वाटले होते. पण एका वेळेस चालक फक्त एकच प्रवासी घेऊन उड्डाण करू शकतो आणि सफारींच्या ११ वाजेपर्यंतच्या जागा राखीव झाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या नाराजीने तिला फाटा द्यावा लागला.
अजून थोडा वेळ आजूबाजूचा पायी फेरफटका मारून आम्ही अकाबाच्या दिशेने निघालो. थोडा प्रवास केल्यावर चातुर्याचे सात स्तंभ (सेव्हन पिलर्स ऑफ विसडम) या नावाचा वादी रममधला एक प्रसिद्ध वालुकाश्माकार समोर आला...
वादी रम : चातुर्याचे सात स्तंभ
लॉरेन्स ऑफ अरेबियाने त्याच्या मोहिमेनंतर लिहिलेल्या पुस्तकाचे नाव "The Seven Pillars of Wisdom" असे ठेवले होते. त्याच्या स्मरणार्थ १९८० मध्ये या वालुकाश्माकाराला हे नाव दिलेले आहे. परंतू लॉरेन्सच्या पुस्तकातल्या सात स्तंभांचा या वालुकाश्माकाराशी काहीच संबंध नाही.
लवकरच वादीतून बाहेर पडून आम्ही अकाबाकडे जाणार्या रस्त्याला लागलो. भारतापेक्षा गरीब असलेल्या जॉर्डनसारख्या देशातल्या दूरदराजच्या भर वाळवंटात असलेला जागतिक दर्जाचा रस्ता प्रवासी म्हणून सुखावत असला तरी आपल्या भारतात असे रस्ते कधी होणार असा खिन्न करणारा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही...
अकाबाकडे जाणारा रस्ता
तासाभराच्या प्रवासानंतर लोकवस्तीच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि अकाबा जवळ आल्याची खात्री पटली...
अकाबा शहराच्या हद्दीवरची घरे
जसजसे शहराच्या जवळ जाऊ लागलो तसतसे त्याचे आधुनिक रूप दिसू लागले...
अकाबाच्या आधुनिक वस्तीची सुरुवात
===================================================================
अकाबा
रक्त समुद्राचे उत्तरेकडील टोक इजिप्तच्या सायनाई व्दीपकल्पाने दुभागलेले आहे. त्यातल्या पश्चिमेकडील भागाला सुवेझचे आखात म्हणतात व त्याच्या उत्तर टोकावरून भूमध्य समुद्राला जोडणारा सुवेझ कालवा सुरू होतो. तर पूर्वेकडील भागाला आकाबाचे आखात म्हणतात.
आफ्रिका आणि आशियातील समुद्री व्यापारावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेवर सुमारे इ स पूर्व ४,००० पासून वस्ती आहे. अर्थातच, इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. सर्वप्रथम येथे एडोमाईट जमातीची वस्ती होती, त्यानंतर इ स पूर्व पहिल्या शतकात अरब नाबातियन मोठ्या संख्येने आले. वादी रममध्ये आपण पाहिलेले अरॅमिक भाषेतले शिलालेख याच नाबातियन लोकांनी लिहिलेले आहेत.
रोमन काळ या शहराचा प्राचीन सुवर्णकाळ होता. या काळात ख्रिश्चन असलेला हा भूभाग इस्लामच्या उदय व प्रसारामुळे मुस्लिम झाला. नंतर ऑटोमान साम्राज्याचा भाग झाला, पहिल्या महायुद्धानंतर ट्रान्सजॉर्डन म्हणून पाश्चात्त्य ताकदींच्या ताब्यात राहिला व अखेर स्वतंत्र आधुनिक जॉर्डनचा भाग झाला हा इतिहास आपण अगोदर पाहिला आहेच.
अकाबा हे अकाबाच्या आखाताच्या किनारपट्टीवरचे सर्वात मोठे शहर, जॉर्डनचे एकुलते एक बंदर आणि अकाबा गव्हर्नरेटचे मुख्यालय आहे. जॉर्डनमधल्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये त्याची गणना होते. प्रवाळाने (कोरल) आणि इतर सागरी जीवांनी समृद्ध, स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा असल्याने तेथे वाळू, सूर्य, समुद्रसफारी, डायव्हिंग आणि सर्वसाधारण 'जीवाचा अकाबा करायला' आलेल्या पर्यटकांची गर्दी असते. त्यांच्या सोयीसाठी येथे अनेक आलिशान हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांसाठीही अकाबाची निवड केली जाते.
आकाबाच्या आखाताचा बहुतांश पूर्व किनारा सौदी अरेबियात येतो तर बहुतांश पश्चिम किनारा इजिप्तच्या सायनाई भागात येतो. आखाताच्या अगदी उत्तर टोकावर जेमतेम २०-२५ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा जॉर्डनच्या हद्दीत आणि १० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा इझ्रेलच्या हद्दीत आहे. त्यामुळे, आकाबाच्या आखाताच्या पूर्व किनार्याने प्रवास केला तर उत्तरेकडे जात प्रथम आपण सौदी अरेबियातून जॉर्डनमध्ये प्रवेश करू आणि केवळ वीसएक किमी गेल्यावर जॉर्डनमधले अकाबा शहर ओलांडून इझ्रेलमधील ऐलात शहरात शिरू, त्यानंतर दक्षिणेकडे वळून फक्त दहाएक किमी ओलांडले की इजिप्तच्या हद्दीत गेलेले असू... एकूण चार देशांच्या सीमा येथे इतक्या जवळ जवळ आहेत ! आकाबाच्या किनार्यावरून जॉर्डन-इझ्रेल सीमाभाग, इझ्रेलमधील ऐलात शहर आणि इझ्रेल-इजिप्त सीमेवरील चौकीच्या इमारतीचा तांबड्या रंगाचा ठिपका दिसतो.
.
अकाबा : ०१ : अकाबा परिसराचे नकाशे (मूळ नकाशे जालावरून साभार)
खरं तर आंतरराष्ट्रीय सीमा एका वस्तीमधून गेल्यामुळे अकाबा आणि ऐलात ही दोन वेगळी शहरे झालेली आहेत. बायबलमध्ये अकाबा परिसराचा उल्लेख "राजा सॉलोमनने एलोथमधील एदॉम या शहराच्या जवळील एझिऑन गेबर (Ezion-Geber, which is near Eloth in Edom) या जागी समुद्रसफरीसाठी जहाजे बनवली." असा येतो. या संदर्भावरून इझ्रेलमधील आधुनिक वस्तीचे नाव ऐलात (Eilat) असे ठेवलेले आहे.
जॉर्डन आणि इझ्रेल यांचे संबंध खूप मैत्रीचे नसले तरी तणावाचे नसल्याने एकमेकाला लागून असलेली अकाबा आणि ऐलात ही दोन्ही शहरे त्या त्या देशांची उत्तम प्रकारची आंतरराष्ट्रीय बंदरे व पर्यटनस्थळे म्हणून विकसीत केली गेलेली आहेत. ऐलात बंदरामुळे इझ्रेलला पूर्वेकडील देशांशी सुवेझ कालव्याची मदत न घेता समुद्री दळणवळ करणे शक्य झाले आहे.
===================================================================
सकाळची भरपेट न्याहारी झालेली असल्याने आराम न करताच लगेच शहराची सफर करण्याचे ठरले. अकाबा शहर मोठ्या काळजीपूर्वक जॉर्डनची पर्यटन जाहिरात व्हावी असे देखणे बनवलेले आहे, हे लगेचच जाणवते...
अकाबा : ०२ : अकाबा शहराचे विहंगम दृश्य जालावरून साभार
.
अकाबा : ०३ : शहराचा फेरफटका
.
अकाबा : ०४ : शहराचा फेरफटका
.
अकाबा : ०५ : शहराचा फेरफटका
.
शहराच्या भटकंतीनंतर अकाबाच्या आखाताची सफर करायला निघालो. १९९७ सालापासून जॉडनच्या हद्दीतील अकाबाच्या आखाताचा दक्षिणेकडील ७ किमी भाग "अकाबा मरीन पार्क" म्हणून संरक्षीत केलेला आहे. तेथे किनारपट्टीवर पादचारी मार्ग, पर्यटक छावण्या, चारचाकी पार्किंग्ज, स्वच्छतागृहे, बोटी उभ्या करण्यासाठी खास व्यवस्था आणि पर्यटकांसाठी माहिती/शिक्षण केंद्रे अश्या अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन सागर व सागरी जीवन सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
प्रवाळ पाहण्यासाठी काचेचा तळ असलेल्या अनेक आकारांच्या, सोयींच्या आणि काही तासांपासून दिवसभरापर्यंत बोटी भाड्याने मिळतात. आम्ही वेळेच्या अभावामुळे दोन तास फेरफटका मारून आणणारा पर्याय स्वीकारला. कडकडीत उन्ह, बोटीचा जाड काचेचा तळ आणि पाणी यामुळे बोटीतून प्रवाळांचे फोटो चांगले येत नाहीत (आपण जी चित्रे मासिकात/जालावर पाहतो ती पाण्याखाली, जवळून, खास कॅमेर्यांनी काढलेली आणि नंतर प्रोसेसिंग केलेली असतात; त्यामुळे ती खूप स्पष्ट व रंगतदार दिसतात).
समुद्रसफरीचे काही फोटो...
अकाबा : ०६ : आखातात फार पूर्वी बुडालेल्या बोटीचे अवशेष
.
अकाबा : ०७ : आखातातील प्रवाळ
.
अकाबा : ०८ : आखातातील प्रवाळ
.
अकाबा : ९ : बोटीतून दिसणारे अकाबा शहर
.
अकाबा : १० : अकाबा बंदरातला झेंडा
अकाबा बंदरात जगातला पाचव्या क्रमांकाच्या १३० मीटर उंचीचा झेंडा आहे. हा हुसेन शरीफ याने अरब भूमी स्वतंत्र करण्याच्या लढ्यात वापरला होता. या लढ्याचे पर्यवसान पुढे स्वतंत्र जॉर्डनच्या निर्मितीत झाले.
अकाबा : ११ : राजे हुसेन फार्महाउस
राजे हुसेन म्हणजे साद्द्याचे राजे अब्दुल्ला याचे पिताश्री. या फार्महाउसची डावीकडची हद्द म्हणजेच जॉर्डन-इझ्रेल आंतरराष्ट्रिय सीमारेखा आहे !
.
अकाबा : १२ : ऐलात बंदर
जॉर्डन आणि इझ्रेलची सागरी सीमा या आखाताच्या मध्यातून जाते. तेथे सीमा दर्शक तरंगते आकार (buoy) आहेत. त्या आकारांपासून पन्नासएक मीटरवर चालकाने बोट थांबवली आणि अजून पुढे गेल्यास आम्ही आक्रमक आहोत असे समजून इझ्रेलकडून गोळीबार केला जाईल असे सांगितले !
अकाबा : १३ : ऐलात शहर आणि आखातातली जॉर्डन-इझ्रेल जलसीमा
पलीकडील किनारपट्टीवर ऐलात हे नवीनच वसवलेले आधुनिक इझ्रेली शहर दिसत होते. पाण्यात पांढरे-तांबडे पट्टे असलेल्या खांबांसारखे तरंगते आकार दिसते आहेत ते जॉर्डन-इझ्रेल सागरी सीमा दाखवतात. त्यांपलीकडे इझ्रेलच्या सीमासुरक्षादलाची एक छोटी बोट उभी आहे. मधून मधून मोठ्या बोटींची गस्तही चालू होती.
जलसफर संपवून किनार्यावर आल्यावर भुकेची जाणीव झाली आणि एक मस्त रेस्तराँ शोधून पोटोबा आटपून घेतला. परत शहरात एक छोटा फेरफटका मारून 'धनिकांचे क्रीडांगण' आणि 'समुद्रकिनार्यावरचे मरुस्थल' समजल्या जाणार्या अकाबाचा निरोप घेऊन आम्ही मृतसमुद्राच्या दिशेने निघालो.
(क्रमशः )
जॉर्डनला भेट देण्यासाठी माझ्या मनात जी दोन मोठी आकर्षणे होती ती म्हणजे पेत्रा दरी आणि मृत समुद्र होती. इतर सर्व ठिकाणे बोनस होती. पेत्रा दरी बघून झाली होती. त्यामुळे आता मृत समुद्राच्या दिशेने कूच करताना तो कधी दृष्टिपथात येईल याबद्दल मनात खूपच उत्सुकता दाटून आली होती. अडीच तीन तासांच्या साधारण २०० किमी प्रवासानंतर गाडी मृत समुद्राच्या पूर्व किनार्याने धावू लागली आणि जरा हायसे वाटले. मात्र खाली उतरून समुद्राच्या पाण्यात शिरायला अजून अर्धा पाऊण तास लागेल असे मार्गदर्शकाने सांगितले आणि जरासे हिरमुसले व्हायला झाले!
मृत समुद्राचे प्रथम दर्शन
===================================================================
मृत समुद्र
सद्या ५० X १५ किमी आकाराचा असलेल्या (हा आकार हळू हळू कमी होत आहे) मृत सागर अनेक अर्थांनी एक आश्चर्य आहे. त्यातले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेल्या क्षारांमुळे अतीघन असलेल्या त्याच्या पाण्यात माणूस हातपाय न हालवतासुद्धा तरंगू शकतो ! किंबहुना या समुद्रात बुडून मरणे प्रयत्न करूनही शक्य नाही !!
या समुद्राच्या पाण्याची दरवर्षी काही मीटरने कमी कमी होत जाणारी पातळी हे एक फार मोठे पर्यावरण संकट आहे. त्यामुळे हा समुद्र नष्ट होण्यापासून कसा वाचवता येईल यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहे. इतर बाबतीत बरेच मतभेद असले तरी जॉर्डन, इझ्रेल आणि लेबॅनॉन या देशांचे याबाबतीत एकमत आहे. जागतिक बँक या संबंद्धींच्या प्रकल्पांना आर्थिक साहाय्य करत आहे.
मृत सागराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत
१. मृत समुद्राची समुद्रसपाटी सर्वसाधारण समुद्रसपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे आणि ती अजून खाली जात आहे. कारण त्याचा रक्त समुद्रापासून संपर्क तुटलेला आहे आणि त्याला पाण्याचा पुरवठा करणार्या जॉर्डन नदी व इतर लहान नद्या त्याला जितके पाणी पुरवतात त्यापेक्षा जास्त पाणी बाष्पीभवन होऊन हवेत जाते.
२. समुद्रसपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली असलेला मृत समुद्राचा किनारा ही पाण्याने न झाकलेली पृथ्वीवरील सर्वात खोल जागा आहे.
३. मृत समुद्राच्या पाण्याची खोली ३०६ मीटर आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात जास्त खोल लवणसागर / लवणतलाव आहे.
४. त्याच्या पाण्यात ३४.२% क्षार आहेत. हे प्रमाण सर्वसाधारण समुद्रात असलेल्या ३.५% क्षारांपेक्षा ९ पटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच त्याच्या पाण्यात हातपाय न हालवता माणूस तरंगू शकतो! क्षारांच्या अतिरेकी प्रमाणामुळे मृत समुद्राला लवणसागर (Salt Sea) असेही म्हटले जाते.
५. क्षारांच्या अतिरेकी प्रमाणामुळे या समुद्रात एकही प्रकारची वनस्पती अथवा प्राणी जिवंत राहू शकत नाही. यावरूनच याचे मृत समुद्र हे नाव पडले आहे.
६. अनेक प्रकारचे क्षार असलेल्या मृत समुद्राची माती अंगाला लावून समुद्रात अंघोळ केल्याने बरेच कातडीचे रोग बरे होतात असा समज आहे. येथे येणार्या पर्यटकांत हे एक महत्त्वाचे आकर्षण असते. तसेच ही माती वापरून बनवलेली अनेक सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गुणधर्मांचे दावे असलेली उत्पादने जगभर विकली जातात.
७. मृत समुद्राच्या इझ्रेली किनार्यावरचा "हायवे ९०" हा जगातला सर्वात खोलवर (सर्वसाधारण समुद्रसपाटीच्या ३९३ मीटर खाली) असलेला रस्ता आहे.
.
१९६० ते २००७ सालापर्यंत मृत समुद्राचा कमी कमी होत गेलेला आकार.
समुद्राच्या कोरड्या झालेल्या दक्षिण टोकात आता समुद्राचे पाणी पाटाने आणून मिठागरे चालवली जातात. (जालावरून साभार)
.
मृत समुद्राच्या किनार्यावरील एका हॉटेलच्या कर्मचार्यांनी बनवलेला तरंगता आकार (जालावरून साभार)
===================================================================
मृतसमुद्र जॉर्डन व इझ्रेल या दोन देशांच्या मध्ये आहे. त्यामुळे त्याच्या पूर्व किनार्यावर जॉर्डनमध्ये व पश्चिम किनार्यावर इझ्रेलमध्ये अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. ती मृत समुद्रात तरंगण्याची मजा उपभोगणे, त्यातली क्षारयुक्त औषधी समजली जाणारी माती अंगाला लावून आपले कांती सतेज करणे / कातडीचे रोग बरे करणे आणि या आगळ्यावेगळ्या जागतिक कीर्तीच्या आकर्षणाला भेट देणे अश्या अनेक कारणांसाठी जगभरातून येणार्या पर्यटकांनी सदैव गजबजलेली असतात.
पर्यटकांची गर्दी टाळून मृत समुद्राचे डोळा भरून दर्शन घेता यावे यासाठी मुख्य थांब्यावर पोहोचण्यापूर्वी मार्गदर्शकाने एक मोक्याचे ठिकाण पाहून गाडी थांबवली...
मृत समुद्र : ०१ : किनार्यावर जमलेले क्षार
.
मृत समुद्र : ०२ : किनारपट्टीवरच्या वालुकाश्मांचे आकर्षक आकार
.
अर्ध्या तासाच्या सफरीनंतर आले एकदाचे आमचे समुद्रात उतरण्यासाठी राखीव केलेले रिसॉर्ट ! सगळेजण पटापट गाडीतून उतरून कपडे बदलण्याच्या खोल्यांमध्ये शिरले आणि पोहण्याचे पोशाख घालून समुद्राकडे निघाले. कधी एकदा त्या पाण्यात शिरतो आणि तरंगतो असे झाले होते ! समुद्रानेही अजिबात निराशा न करता अगदी गुढघाभरापेक्षा कमी पाण्यातही आरामात आपल्या पाठीवर तरंगत ठेवले...
मृत समुद्र : ०३
.
मृत समुद्र : ०४
.
तेथे आलोच आहोत तर इतर पर्यटकांबरोबर मृत समुद्राची माती (भाळी नाही तर) सर्वांगाला चोपडून परत एकदा समुद्रस्नान केले...
मृत समुद्र : ०४ : मृत्तीकास्नान
.
या समुद्रात पोहायला... नाही नाही... तरंगायला जरी मजा येत असली तरी एक कडक पथ्य मात्र न चुकता पाळायला लागते... ते म्हणजे त्याच्या पाण्याचा एकही थेंब डोळ्यात जाऊ न देणे ! क्षारांनी संपृक्त असलेले हे पाणी डोळ्यांची किती जळजळ करते हे ते अनुभवल्याशिवाय कळणे कठीण आहे (हे स्वानुभवावरून सांगत आहे)!!! ते पाणी नाकतोंडात गेले तरी बर्यापैकी तारांबळ उडते !
समुद्रात तरंगून झाल्यावर शॉवर घेऊन समुद्रकिन्यार्यावरच असलेल्या गोड्या पाण्याच्या तलावात डुंबण्याची सोय केलेली होती. तो तलाव फारच मोक्याच्या ठिकाणी होता. समुद्रकिनार्यावर गोड्या पाण्यात पोहत असतानाच समुद्राच्या पलीकडच्या इझ्रेलच्या किनार्यावरच्या डोंगरावर होणारा सूर्यास्ताचा नजाराही बघायला मिळाला. असा अनोखा प्रसंग दिसणारी ठिकाणे जगात (असलीच तर) फारच विरळ असावीत...
मृत समुद्र : ०४ : सूर्यास्त
.
मनसोक्त डुंबून झाल्यावर आमची गाडी परत अम्मानच्या दिशेने धावू लागली आणि आम्ही सर्वजण डुलक्या घेऊ लागलो. अम्मानला आल्यावर सर्वप्रथम नेहमीच्या प्रथेप्रमाणे गरम गरम शॉवर घेतला आणि जॉर्डनमधली शेवटची संध्याकाळ साजरी करायला ताजेतवाने झालो. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करताना केलेल्या चौकशीत असे कळले की आमच्याच हॉटेलमध्ये रोज रात्री जेवण-संगीत-नृत्य असा लोकप्रिय कार्यक्रम होतो. मग काय त्यातल्या जागा राखून ठेवल्या आणि थोडा वेळ आजूबाजूच्या रस्त्यांवरून फेरफटका मारला.
फिरताना एक जॉर्डेनियन लग्नाची वरात बघायला मिळाली. तिची ही चित्रफीत...
जॉर्डेनियन लग्नातली वरात
अम्मानच्या शेवटच्या रात्री अनपेक्षितपणे सापडलेल्या मैफिलित अरबी संगीत आणि नृत्याच्या सोबतीने चवदार जेवणाचा आस्वाग घेताना रात्रीचे बारा-साडेबारा कसे वाजले ते कळलेच नाही. दुसर्या दिवशी सकाळी साडेनऊची परतीची बस पकडायची होती म्हणून नाईलाजाने खोलीवर परतलो. दिवसभराच्या शिणाने निद्रादेवी कधी प्रसन्न झाली ते कळलेसुद्धा नाही.
===================================================================
परतीची कथा
दुसर्या दिवशी सगळेजण लवकरच आवरून भरपेट न्याहारी करून बसच्या वेळेच्या अर्धा तास अगोदरच नऊ वाजता थांब्यावर पोहोचलो. तेथे चौकशी केली तर कळले की ती बस साडेआठलाच निघून गेली होती ! ते का असे विचारले तर एक नाही अनेक समज दिल्याप्रमाणे उत्तरे मिळाली ती अशी:
१. अशी वेळ बदलणे हा आमचा हक्क आहे हे तिकिटाच्या मागे (बारीक अक्षरात अरबीत) लिहिलेले आहे ते पहा.
२. राखीव जागा असल्या तरी त्या कमीत कमी २४ तास अगोदर रिकन्फर्मेशन करणे आवश्यक असते. तेही तिकिटाच्या मागे (बारीक अक्षरात अरबीत) लिहिलेले आहे ते पहा. तुम्ही रिकन्फर्मेशन केले नाहीत.
३. रिकन्फर्मेशन केले असतेत तर तुम्हाला बदललेली वेळ आम्ही सांगितली असती नाही का ?
बसच्या राखीव तिकिटांसाठीही इतकी बंधने असतील याची आमच्या सौदी व्यवस्थापकालाही कल्पना नव्हती अथवा शंका आली नव्हती. बसेस आधुनिक असल्या तरी जॉर्डन-सौदी मधला सरकारी व्यवहार भारतापेक्षा फार वेगळा नाही हे पाहून "ड्वाळे पाणाव्ले" !
पण दु:खात सुख इतकेच की "बसचे तिकीट त्याच प्रकारच्या दुसर्या बसला चालेल किंवा न वापरल्यास त्याचे पैसे परत मिळतील" असे कळले. पण लगेचच त्या प्रकाराची बस दिवसाला एकच आहे आणि पुढच्या आठवडाभरापेक्षा जास्त वेळेचे पूर्ण आरक्षण झाले आहे अशी खुशखबरही हसत हसत दिली गेली ! तिथली सरकारी विनोदबुद्धीही आपल्याशी स्पर्धा करणारी आहे याची पुरेपूर खात्री पटली.
मग आम्ही इतर काही व्यवस्था होते काय याची चौकशी सुरू केली. थोड्याच वेळात आम्हाला कळून चुकले की अम्मान-दम्माम असा १७०० किमी आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे खाजगी वाहन मिळणे शक्य नाही. आम्हा सर्वांनाच एका दिवसानंतर कामावर हजर होणे आवश्यक होते. त्यामुळे हा प्रवास तुकड्यातुकड्यात करण्याला पर्याय नाही असे ठरले. अम्मानपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत (अल् हादिथा सीमाचौकी) जायला जरा घासाघीस करून का होईना पण एक खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर टाईपचा टॅक्सीवाला मिळाला आणि हायसे वाटले. परतीच्या प्रवासाला सुरुवात तर झाली, पुढचे पुढे पाहू असे म्हणून आम्ही निघालो...
नकाश्यात दाखविलेल्या मार्गानेच पण उलट दिशेने परतीचा प्रवास (मूळ नकाशा जालावरून साभार)
या सगळ्या गडबडीत अल् हादिथा सीमाचौकीपर्यंत दुपार टळून गेली होती. सीमारक्षकांनी त्याचे सोपस्कार त्याच्या खाक्याप्रमाणे संथपणे केले आणि सीमारेषेवर एक तास खर्च झाला. पण नशिबाने इतर काही समस्या उभी राहिली नाही.
सौदी अरेबियात सीमेवरच्या बस स्टँडवर चौकशी केली तर असे कळले की तेथून दम्मामला जाणारी बस मिळणे शक्य नाही. तीच गत खाजगी गाड्यांची, साधारण १४०० किमीचा आणि फक्त एका दिशेचा प्रवास करायला खाजगी गाडी मिळणे म्हणजे दिवास्वप्न हे अर्ध्या तासांच्या शोधानंतर घ्यानात आले. मग सीमारेखा ते सौदी अरेबियातले जवळांत जवळचे जरा मोठे असलेले शहर "अरार" या अंतरासाठी एक खाजगी गाडी मिळाली त्यांत सर्वजण कोंबून कोंबून बसवले आणि प्रवास पुढे चालू झाला.
अरारच्या बस थांब्यावर आम्हाला पोचवून चालक ताबडतोप माघारी फिरला. थांब्याच्या आत जाऊन चौकशी केली तेव्हा कळले की आरारमधून दोन वेगवेगळे मार्ग जातात आणि त्यावर दोन स्वतंत्र बस थांबे आहेत... आणि टॅक्सीवाल्याने आम्हाला चुकीच्या थांब्यावर उतरवले होते ! परत बाहेर येऊन खाजगी वाहन शोधून योग्य थांब्यावर जाणे आले. अरार तसे काही फार मोठे ठिकाण नाही त्यामुळे जी एकच टॅक्सी (ती टॅक्सी आहे हा तिच्या चालकाचा दावा होता. आमचा त्यावर अजिबात विश्वास बसला नाही. पण म्हणतात ना की, अडला नारायण... ) मिळाली त्यात आम्ही सहा, आणखी दोन-तीन पाशिदरं आणि आमच्या सगळ्यांच्या सामानाने खचाखच भरलेली, दोरीने बांधलेली अर्धवट उघडी गाडीची ट्रंक असा आमचा गोतावळा त्या दुसर्या थांब्याच्या दिशेने धावू लागला. "हॉर्नशिवाय इतर सर्व काही वाजणार्या" गाड्यांच्या कथा खूप ऐकल्या आहेत, पण अशी गाडी प्रथम पाहतच नव्हतो तर चक्क अनुभवत होतो ! अर्थात या माझ्या सांगण्यात एक चूक आहे... त्या गाडीचा हॉर्न वाजत होता आणि चालक ते सगळ्यांना कळावे याची पुरेपूर काळजी घेत होता !
दुसरा बस थांबा बर्यापैकी मोठा होता. त्या बरोबरच तेथे त्याच्या आकाराला साजेशी प्रवाशाची गर्दी उसळलेली होती. आमच्या टूर व्यवस्थापकाने कसेबसे स्थानकातल्या व्यवस्थापकाला गाठून आमची रडकथा सांगितली. शिवाय त्या कथेत आम्ही सर्व दम्माममधल्या स्पेशियालिस्ट हॉस्पिटलमध्ये काम करतो हे पण मोठ्या खुबीने सांगितले. स्थानक व्यवस्थापकाने आम्हा सर्वांना एकदा न्याहाळले. तो आमच्या हुच्च पार्श्वभूमीने प्रभावित झाला की त्याला आमचे अवतार बघून दया आली हे नक्की कळले नाही पण त्याने "तुमच्या न वापरलेल्या तिकिटांच्या बदल्यात तडक दम्मामकडे जाणार्या संध्याकाळच्या आरामबसची तिकिटे देतो, पण आतापर्यंत स्वखर्चाने केलेल्या प्रवासाचे पैसे परत मिळणार नाहीत." असे सांगितले. अगोदरच १०-१२ तास चांगलीच वरात निघाल्याने त्याचे हे शब्द आम्हाला वरदानापेक्षा कमी नव्हते. त्याचे आभार मानून आम्ही नविन तिकीटे ताब्यात घेतली. या "सगळ्या धावपळीत तुम्ही माझी बरीच आबाळ केलेली आहे" अशी तक्रार पोटोबा बराच वेळ करत होता तिकडे आता लक्ष गेले. ताबडतोप थांब्यावरचेच एक बर्यापैकी क्षुधाशांती भवन शोधून पोटोबाचे समाधान केले आणि बसायला एक चांगली जागा शोधून बसची वाट पाहू लागलो.
बस वेळेवर सुटली आणि पुढे काही समस्या न येता तिच्या निर्धारीत वेळेवर दुसर्या दिवशी सकाळी नऊला दम्मामला पोहोचली. अश्या तर्हेने एक वेगळा अनुभव जमेला बांधून आम्ही जवळ जवळ १२ तास उशीरा, थकले भागलेले पण सुरक्षितपणे पोहोचलो... हुश्श!
(समाप्त)
जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस
![]() |
जॉर्डनचे स्थान व त्याचे शेजारी |
अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट
![]() |
अम्मानमधील रोमन थिएटर - फोटो आंतरजालावरून साभार |
![]() |
अम्मान शहरातील एक रस्ता |
अजलूनच्या वाटेवर साचलेला बर्फ |
किल्ल्यावरचा निरीक्षण मनोरा |
अजलूनच्या किल्ल्यातील प्रकाशयोजना |
अजलूनच्या किल्ल्याचे ढासळलेले बाह्यांग |
किल्ल्याच्या सज्ज्यावरून दिसणारे दृश्य |
सज्ज्यावर ऊन खात बसलेले मांजर |
पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश
जेराशमध्ये सापडलेले भग्नावशेष |
उत्खननात सापडलेले असंख्य खांब |
आर्च ऑफ हेड्रीयन |
आर्च ऑफ हेड्रीयन वरील सुरेख कोरीवकाम |
ओवल फोरम |
शहरातली प्रशस्त मार्गिका व बाजूचे खांब |
खांबांवरील पाना-फुलांची नक्षी |
प्राचीन शहराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे आधुनिक शहर |
मोझॅक सिटी मदाबा आणि माउंट नेबो
जेरुसलेमचा नकाशा दाखवणारा मोझॅक |
वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक - नक्षीकाम |
वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक - दैनंदिन जीवन |
वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक - भूमितीय रचना |
मोझॅक निर्मिती कार्यशाळा |
माउंट नेबो वरून दिसणारे जॉर्डन नदीचे खोरे |
'प्रॉमिस्ड लँड' |
मृत समुद्र
![]() |
मृत समुद्राचे स्थान |
अम्मान बीचवरून दिसणारा निळाशार मृत समुद्र |
किनाऱ्यावर जमलेले मिठाचे थर |
मृत समुद्रात तरंगणारे पर्यटक |
मृत समुद्रावरचा रम्य सूर्यास्त |
अद्भुतनगरी पेट्रा
पेट्रामधील भग्नावशेष |
'सिक' |
'सिक' च्या कपारीतून दिसलेले दृश्य |
'अल खजनेह' च्या प्रवेशद्वारावरील कोरीवकाम |
ग्रीक मंदिराचे भग्नावशेष |
मंगळभूमी वादी रम
वादी रमचे विलोभनीय भूदृष्य |
मंगळभूमीवर प्रवेश |
वाळवंटातली धूळवाट |
बारीक रेतीची टेकडी |
अश्मसेतू |
वादी रम मधला अविस्मरणीय सूर्यास्त |
अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या प्रभेत तळपणारे डोंगर |
कॅम्पमधली रम्य संध्याकाळ |
वाळूतला ओव्हन |
अशा रौद्र सौंदर्याला अलविदा करताना मन भरून आले होते |
No comments:
Post a Comment