Wednesday, April 19, 2023

भूनंदनवन काश्मीर

 भूनंदनवन काश्मीर – पूर्वतयारी

यंदाच्या ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठे ट्रीपला जायचे याचा विचार बरेच दिवस डोक्यात घोळत होता. २००८ साली काश्मीरला जायचे अगदी ठरलेच होते, पण काही कारणास्तव ऐनवेळी ती ट्रीप रद्द करावी लागली होती. तेव्हापासून काश्मीरला कधी जायला मिळेल ह्याची संधी शोधत होतो. मागच्या वर्षी उत्तराखंडची ट्रीप केली आणि हिमालय भलताच आवडला. तेव्हा यंदा काश्मीर करता येईल काय याची चाचपणी सुरु केली. आता काश्मीर म्हणले की आपल्या मनात ज्या प्राथमिक शंका येतात, खरेतर तशीच सुरुवात झाली. म्हणजे, तिथले वातावरण कसे असेल, सुरक्षित असेल ना वगैरे वगैरे. प्रश्न काश्मीरचा होता, म्हणुन स्वतःचे स्वतः प्लॅन करून जावे का केसरी/वीणा वर्ल्ड वगैरे बरोबर जावे हे काही ठरेना. आणि ह्यातच खूप वेळ गेला. केसरी/वीणा वर्ल्ड कडून माहितीपत्रक आणले तसेच इंटरनेटवर देखिल माहिती बघत होतो. त्यावरून बरेच लोक स्वतःचे स्वतः प्लॅन करून तिथे जातात हे कळत होते. पण आमच्या ट्रीपचे काय करावे हे कळत नव्हते. शेवटी ठरवले की ही ट्रीप आपली आपणच करायची. एकुण १०दिवस व ९रात्री असा भरगच्च कार्यक्रम ठरवला. तो खालीलप्रमाणे:

श्रीनगर -> दूधपथरी -> युसमर्ग -> पहलगाम -> गुलमर्ग -> सोनमर्ग -> गान्देरबल -> मानसबल -> श्रीनगर -> परतीचा प्रवास

श्रीनगर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आमच्या ९ रात्रींपैकी तब्बल ६ रात्री आम्ही श्रीनगर मध्ये राहणार होतो. उर्वरीत रात्री गुलमर्ग, पहलगाम व अजुन एका ठिकाणी घालवणार होतो. मूळ प्लॅनमध्ये दूधपाथरी नव्हते. पण आंतरजालावरील माहितीनुसार हे एक छान ठिकाण आहे असे कळले होते म्हणुन त्याचादेखिल समावेश केला. केसरी/वीणा च्या प्लॅनमधे दूधपथरी/युसमर्ग/मानसबल असे काहीही नसते. पण आता आमचे आम्ही जाणार असल्याने आम्हाला जे आणि जसे पहायचे होते तसे करु शकत होतो. श्रीनगरमधे एक रात्र साधरणपणे हाऊसबोटमधे घालवतात. पण आम्हाला हाऊसबोटचे विशेष आकर्षण नसल्याने आम्ही आमच्या सर्व मुक्कामांसाठी हॉटेलच निवडले होते. गुलमर्ग व सोनमर्ग येथे बर्फ असतो. तिथे उबदार कपड्यांची आवश्यकता असते. पण, तिथेच जॅकेट, गमबूट्स, ग्लोव्ह्स हे सगळे भाड्याने मिळते. ते सगळे इथुन घेउन जायची आवश्यकता नाही.

अशा प्रकारे सगळी तयारी करुन आम्ही आमच्या काश्मीर ट्रीपसाठी सज्ज झालो.
ह्या ट्रीपचे प्रवासी – मी, बायको व आमचा सहा वर्षाचा मुलगा.

भूनंदनवन काश्मीर – आगमन

प्रचंड उत्सुकतेने आमचा काश्मीर प्रवास सुरु झाला. दिल्लीवरून निघताना विमानतळावर जेव्हा गेटपाशी विमानाची वाट पाहत थांबलो होतो तेव्हादेखिल आजुबाजूला कोणकोण आहे, त्यातले आमच्यासारखे पर्यटक किती, त्यात मराठी कुटुंबे आहेत का, मूळचे काश्मीरी कोणी आहेत का, वगैरे निरीक्षणे चालली होती. विमान जेव्हा काश्मीर भागात पोचले तेव्हा मात्र बाहेर दिसणारे द्रुश्य अत्यंत विलोभनीय होते. चहुबाजूने बर्फाच्छादित पर्वतरांगांमधिल काश्मीर खोरे फार म्हणजे फारच सुंदर दिसत होते. त्याचे वर्णन करणे थोडे कठीण आहे पण मी प्रयत्न करतो. कल्पना करा की तुमचे विमान दिल्ली-पंजाबच्या मैदानी भागाकडून उत्तरेकडे चालले आहे. हिमालयाच्या पीरपांजाळ पर्वतरांगांमधून तुम्ही थोडे पुढे आल्यावर तुम्हाला एक मोठ्ठा हिरवागार मैदानी भाग दिसतो. त्यात उंचच उंच गर्द झाडी आहे, शेतीचे पट्टे आहेत, रंगीबेरंगी घरे आहेत, मधुन मधुन दिसणार्‍या वळणे वळणे घेत चाललेल्या नद्या आहेत. त्या नदीच्या पाण्यावरुन परावर्तीत होणारा सूर्यप्रकाश चुकवताना तुम्ही आजुबाजूला बघता. तुम्हाला दिसते की तो खोर्‍याचा भाग चहुबाजूने बर्फाच्छादीत पर्वतांनी वेढलेला आहे आणि तुमचे विमान सावकाश गोल फेर्‍या मारत हळुहळु खाली उतरत आहे. अश्यावेळी खरेतर वैमानिकाला “Statue!!” म्हणायची परवानगी असायला हवी होती. म्हणजे तो देखावा तुम्ही मनसोक्‍त पाहू शकला असता आणि नंतर कॅमेर्‍यात उतरवू शकला असता. पण ह्यातले मी काही करू शकलो नाही. एक मात्र आहे की जसजसे तुम्ही खोर्‍यात उतरू लागता तसतसे तुम्ही काश्मीरच्या प्रेमात पडू लागता!!
यथावकाश आमचे विमान व्यवस्थित खाली उतरले. धावपट्टी तसेच आजुबाजूला बंकर्स व सैन्य दिसत होते. अर्थात हे अपेक्षितच होते. एका वेगळ्या ठिकाणी आल्याचे जाणवत होते. विमानतळावर व्हरांडा, मुख्य दालन व जागोजागी लाकडी कलाकुसरीची कामे केलेली होती. विमानतळ तसे सामन्यच होते. सामान घेईपर्यंत आमच्या ड्रायव्हरचा फोन आला. बाहेर गेल्यावर पाहतो तर जो आम्हाला घ्यायला आला होता तो एक धिप्पाड, उंचपुरा तरुण होता. त्याचे नाव सोहैल होते. कोरलेली दाढी, स्पाईक्स केलेले केस, टी-शर्ट जीन्स परिधान केलेला सोहैल कोणा मॉडेलपेक्षा कमी दिसत नव्हता. हा खरेच ड्रायव्हर असेल? विश्वासच बसत नव्हता. (त्याला ‘ड्रायव्हर’ म्हणुन संबोधणे बरोबर वाटत नाही म्हणुन उर्वरीत लेखात ‘सोहैल' असाच उल्लेख केला आहे.)
काश्मीरमध्ये गेल्यावर काय काय करायचे आणि काय काय नाही हे आम्ही आधीच ठरवले होते. ‘दहशतवाद, सैन्य व राजकारण' हे विषय कटाक्षाने टाळायचे हे नक्की ठरवले होते. सोहैलशी बोलताना देखिल ही काळजी घ्यायची होती. काश्मीरबद्दल प्रचंड कुतुहल असल्याने विमानतळावरुन निघाल्यावर नजर सगळीकडे भिरभिरत होती. घरे, दुकाने, शाळा पाहता पाहता आम्ही मुख्य शहराकडे चाललो होतो. वाटेत रेल्वेमार्ग आडवा आला तेव्हा सहज सोहैलला विचारले “कश्मीरमे रेल्वे है?” माझ्या माहितीनुसार जम्मू-उधमपूर-कटरा पर्यंतच रेल्वे आहे आणि पुढचे काम अजुन चालू आहे. सोहैल म्हणाला “हां हां बिलकूल है| लेकिन अभी वो जम्मूसे जुडी नही है| अभी सिर्फ कश्मीर के कुछ गांवो के बीच चलती है|” नंतर सहज विचारले की “यहां पे ICICI ATM होंगे?” तेव्हा सोहैलने उत्तर दिले की “जो जो आपको आपके शहर मे मिलता है वो सब आपको श्रीनगर मे मिलेगा|” हे एकदम सदाशिव पेठेत मिळणार्‍या उत्तरासारखे टोकदार उत्तर होते. सोहैलच्या या उत्तरातून त्याला काय सांगायचय ते मला चांगलेच समजले. त्यामुळे असे प्रश्न त्याला परत विचारायचे नाही हे तत्क्षणी ठरवून टाकले. कारमधुन बाहेर काय काय दिसते ते बघत बसलो.
श्रीनगर हे इतर शहरांसारखेच आहे. बरीचशी घरे बैठी अथवा एक-दोन मजली होती. रस्त्यावर बरेच ट्राफिक होते. ठीकठीकाणी होमलोन्सच्या जाहीराती लागलेल्या होत्या. पुण्या-मुंबईसारख्या उंच इमारती तर दिसत नव्हत्या मग एवढ्या होमलोन्सच्या जाहीराती का बरे असतील असा प्रश्न पडला खरे. पण सोहैलला विचारण्याचे टाळले. घरे मात्र मस्त होती. छान रंगवलेली, सजवलेली टुमदार अशी घरे होती. मी व बायको त्याचीच चर्चा करत असताना सोहैलनेच सांगीतले की इथे इमारती उभारायला सुरुवात केली होती पण काश्मीरी लोकांना स्वत:च्या जागेत बांधलेल्या घरात रहायला आवडते त्यामुळे ह्या होमलोन्सच्या योजना फारशा यशस्वी झाल्या नाहीत. वाटेत एक उड्डाणपुल लागला तसेच अजुन एके ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असलेले दिसले. म्हणजे विकासकामे सुरु होती तर. पण जाणवण्यासारखी एक प्रमुख गोष्ट होती ती म्हणजे रस्त्यावर व शहरात दिसणारा सैन्याचा वावर. दर थोड्या अंतरावर शस्त्रधारी सैनिक हमखास दिसत होता/होते.
मुख्य शहर खूपच गजबजलेले होते. सोहैलेने बोळाबोळातून गाडी काढत आम्हाला आमच्या मुक्कामाच्या स्थळी पोहोचवले. हे हॉटेल रहिवासी भागात होते. हॉटेल नुकतेच बांधलेले असावे. सगळ्या गोष्टी नविन व फ्रेश दिसत होत्या. फक्‍त एक होते की रहिवासी भागात असल्यामुळे हॉटेलला काही चांगले व्ह्यू नव्हते. हॉटेलला पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली होती. नंतर आम्ही विश्रांती घेणे पसंत केले.
काश्मीरमधला आमचा पहिला दिवस तर नक्कीच चांगला गेला. 

भूनंदनवन काश्मीर – भाग २ (दूधपथरी)

काश्मीरमधे आम्ही सर्वप्रथम भेट दिली ती ‘दूधपथरी’ला. खरेतर दूधपथरीबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हते. Tripadvisor Forumsवर वाचता वाचता ह्या ठिकाणाबद्दल कळाले होते. एकुण माहिती चांगली वाटल्यामुळे इकडे जायचे ठरवले. दूधपथरी श्रीनगरच्या साधारण दक्षिणेला ४२किमीवर बडगाम जिल्ह्यात असलेले एक थंड हवेचे (!) ठिकाण आहे. पर्यटकांमध्ये फारसे परिचित नसल्यामुळे इथे फारशी गर्दी नसते. जे लोक येतात ते एक तर स्थानिक असतात किंवा ज्यांना माहिती आहे असेच. त्यामुळे इथे गर्दीचा त्रास नाही. सोहैल तर स्वत: आजपर्यंत कधी दूधपथरीला गेलेलाच नव्हता. त्याला रस्तादेखिल माहिती नव्हता. दोन-तीन ठिकाणी विचारत विचारत आम्ही दूधपथरीला पोहोचलो.

1

दूधपथरीचा भाग हा वनखात्याच्या संरक्षित क्षेत्रात येतो. बराचसा भाग हा घाटरस्ता, जंगलातून जाणारा रस्ता असा आहे. वळणावळणाचे रस्ते आजुबाजूला चिनार, पाईन, देवदारच्या झाडांची दाटी, दूरवर दिसणारे बर्फाच्छादित डोंगर असा एकदम छान रस्ता आहे. अधुनमधुन मेंढपाळ त्यांच्या मोठ्या कळपाला घेऊन जाताना दिसत होते.

2

3

4

दूधपथरीचा शब्दश: अर्थ “दूधाची दरी” (“Valley of Milk”) असा आहे. इथे जी एक नदी वाहते तिचे दगडगोट्यांवरुन खळाळणारे पाणी अगदी दूधासारखे दिसते. त्यावरुन हे नाव पडले असावे.

5

6

दूधपथरी ही पीरपांजाळ पर्वतरांगांमधे असलेली एक बाऊलच्या आकाराची दरी आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे दूरवर पसरलेली गवताळ कुरणे, दरीतुन खळाळत वाहणारी व दूधासारखे भासेल असे पाणी असणारी नदी, त्याच्यामागे असलेले बर्फाच्छादित डोंगर आणि डोंगरउतारावर पसरलेली पाईन, देवदार, फ्रिस आदी झाडांची दाटी. निसर्गाचे अत्यंत विलोभनीय व नेत्रसु्खद दर्शन इथुन घडते. दूरवर पसरलेले कुरण पाहुन निसर्गाने जणु काही हिरवागार गालिचाच अंथरला आहे की काय असे तुम्हाला नक्कीच वाटेल. कुरणावर बसण्यासाठी ठिकठिकाणी बाकडी ठेवलेली आहेत. तुम्ही इथे कितीही वेळ बसला तरी तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. इथे मेंढपाळ त्यांच्या कळपाला चरायला घेउन येतात. वेळ एकदम निवांत जातो.

7

8

अर्थात हे फक्‍त उन्हाळ्यातच पहायला मिळेल कारण हिवाळ्यात हा सर्व भाग बर्फाने व्यापून जातो. इथे घोडेवाल्यांचा थोडा त्रास आहे पण तो तुम्ही काश्मीरमधे कुठेही गेला तरी असतोच. कुरणांवरुन तुम्ही थोडे पुढे दरीत उतरला की तिथे नदी आहे. पात्रात भरपुर दगडगोटे आहेत. नदीचे पाणी पाय गारठून जातील एवढे गार आहे. नदीचे पात्र ओलांडून पलिकडे तुम्ही डोंगरावर छोटेखानी ट्रेकला जाऊ शकता. फक्‍त घोडेवाल्यांच्या वर्णनाला भुलू नका कारण तिकडे पहायला फार काही नाही. घोडेवाले काहीच्या काही वर्णन करुन घोड्यावरुन फेरी मारायला लावतात, तुमचा पिच्छा सोडत नाहीत.

8

9

10

11

12

13

14

20

बाकी, दूधपथरी अजुन पर्यटनस्थळ म्हणुन पूर्णपणे विकसित झाले नसल्याने इथे फार काही सोयी नाहीत. इथे काश्मीरी ग्रामीण पद्धतीची थोडी घरे पहायला मिळतात. कमी ऊंचीची, पूर्णपणे मातीचे छप्पर असलेली ही घरे नक्कीच वेगळी जाणवतात. थंडीच्या दिवसात मातीचे घर असल्याने उबदार राहते. वनखात्याने सशुल्क स्वच्छताग्रुहाची व्यवस्था केलेली आहे पण रेस्तरों वगैरे मात्र वनखात्याच्या हद्दीबाहेर आहे.

16
काश्मीरी ग्रामीण पद्धतीचे मातीचे घर

आम्ही काश्मीरमधे भेट दिलेले हे पहिले ठिकाण नक्कीच अतिव सुंदर होते. सोहैलला देखिल हे ठिकाण भलतेच आवडले. त्याने पुढच्या वेळेस तंबू घेउन येउन रात्र त्या कुरणावर घालवायचा प्लॅनसु्द्धा बनवला! सोहैलने त्याच्या खास शैलीत आम्हाला सांगुन टाकले की “मान लिजीये की, अगर आपको ये जगह पसंद आई है तो इसके आगे आपको युसमर्ग और गुलमर्ग कुछ भी नही लगेगा.” तिथुन निघेपर्यंत २ वाजले होते. सोहैलला एखाद्या veg restaurantपाशी थांबायला सांगीतले. सोहैल म्हणाला अशा ठिकाणी veg restaurant मिळणे अवघड आहे कारण काश्मीरमधे खूप कमी लोक veg खातात. सुदैवाने आम्हाला लगेचच एक veg restaurant सापडले. सोहैलला आमच्याबरोबर जेवायला बोलावले तर त्याने अदबीने नकार दिला. तो म्हणाला “मान लिजीये की, कश्मीरी लोग बाहर खाना पसंद नही करते| अगर वो कहीं बाहर घुमने जायेंगे तो भी वो घरसे खाना बनाके लेके जायेंगे| मै भी मेरा टिफीन लेके आया हूं|” खरेतर, आमच्या नजरेतुन हे सुटलेले नव्हते. दूधपथरीमधे अशी बरीच कुटुंबे दिसली होती की जी आपल्याबरोबर खाण्याचे सगळे घेउन आलेले होते आणि त्या कुरणांवर मस्त चादर अंथरून एकत्र खात बसले होते. सोहैलच्या ह्या माहितीमुळे त्यामागचे कारण देखिल कळाले.
तुम्ही जर कधी काश्मीरला भेट दिली तर दूधपथरीला आवर्जून जा!

17

संध्याकाळी श्रीनगरला हॉटेलला पोहोचल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. कारण अंधार पडायला बराच वेळ होता. मग आम्ही जवळच असलेल्या ‘जेहलम व्ह्यू पार्क'मधे चालत गेलो. ही बाग जेहलम नदीच्या काठावर आहे. बाग छोटीशीच आहे पण जेहलम नदी इथुन खूप छान दिसते.

18
जेहलम व्ह्यू पार्क

भूनंदनवन काश्मीर – भाग ३ (चरार-ए-शरीफ़ – पाखेरपोरा – युसमर्ग)

काश्मीरमधे आमची पुढची भेट चरार-ए-शरीफ व युसमर्गला होती. तसेच, इथे ‘असीम' ह्या पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेतर्फे, जी काश्मीरमधील युवकांसाठी कामे करते, पाखेरपोरा गावात एक बिस्कीट उत्पादन युनिट चालवले जाते. त्यालासुद्धा भेट देणार होतो. चरार-ए-शरीफ व युसमर्ग ही ठिकाणेसुद्धा सहसा पर्यटन कंपन्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत नसतात. ही ठिकाणेसुद्धा श्रीनगरच्या दक्षिणेला बडगाम जिल्ह्यातच आहेत. इकडे जाणारा रस्तादेखिल दूधपथरीसारखाच छान होता. प्रथम आम्ही चरार-ए-शरीफला गेलो. इथे एक अंदाजे ६०० वर्षे जुना ऐतिहासिक दर्गा आहे.

1
(आंतरजालावरुन साभार)

शेख नुरुद्दीन नुरानी, जे ‘आलमदार-ए-काश्मीर’ म्हणुन ओळखले जातात, यांची कबर इथे आहे. मुख्य भागात फक्‍त पुरुषांनाच प्रवेश होता. महिलांना बाजूच्या प्रवेशद्वारातून फक्‍त जाळीतून पहायची सोय केलेली होती. दर्ग्यात अंतर्गत भागात तसेच छतावर खूप छान लाकडी कलाकुसर केलेली होती. बाकी तिथे काय करायचे असते काय नाही हे माहित नसल्याने तिथे जास्त रेंगाळलो नाही व लगेच बाहेर पडलो. बाहेर आल्यावर एक विचित्र प्रकार दिसला. एक माणुस एक मोठे पातेले घेउन एका जाळीच्या खोलीत गेला. तो जसा तिथे गेला तशी तिथे माणसे जमा होऊ लागली. तो त्या पातेल्यात जे होते ते त्यांना वाटू लागला. आम्हाला वाटले की प्रसाद असावा म्हणुन नीट पाहिले तर तो मांसाचे तुकडे वाटत होता. त्याने जसे ते वाटायला सुरुवात केली तशी लोकांची झुंबडच उडाली. काही स्त्रीया तर अगदी गळे काढुन त्याला ते त्यांना द्यायला सांगत होत्या. हे सगळेच फार विचित्र वाटत होते. बरोबर लहान मुलगा असल्याने आम्ही तिथुन लगेच काढता पाय घेतला.

इथुन पुढे आम्ही पाखेरपोराला गेलो, जिथे मुश्ताक़ व हिलाल आमची वाट बघत होते.

‘असीम’च्या काश्मीरमधल्या सामाजिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे रोजगार निर्मीती हा देखिल आहे. उद्देश हा की युवकांना अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होतील व ते चुकीच्या मार्गाकडे आकर्षित होणार नाहीत. ह्या बेकरी प्रकल्पात ते सफरचंद व अक्रोड वापरून बिस्कीट (Apple-Walnut Biscuits) तयार करतात. काश्मीरमधे असीमचे असे २-३ प्रकल्प आहेत. मुश्ताक़ व हिलाल हे साधारण पंचविशीतील युवक असीमशी जोडले गेलेले असुन पाखेरपोरामधे हा प्रकल्प चालवतात. मुश्ताक़च्या घरी आमची दुपारच्या जेवणाची सोयदेखिल केलेली होती.

पाखेरपोरा हे युसमर्गच्या मार्गावरचे एक छोटेसे गाव आहे. मुश्ताक़ व हिलाल आम्हाला मुख्य चौकातच भेटले त्यामुळे त्यांचे घर शोधायला फारसे कष्ट पडले नाहीत.

पाखेरपोरा हे इतर कुठल्याही एखाद्या छोट्या गावासारखे गाव होते. एक-दोन मुख्य रस्ते सोडले तर बाकी सारे कच्चेच रस्ते होते. छोटी छोटी टुमदार घरे. मुश्ताक़चे देखिल एक स्वतंत्र ‘वाडा’सद्रुश्य घर होते. घरात गेल्यावर मुश्ताक़ आम्हाला दिवाणखान्यात घेउन गेला. दिवाणखाना एका छानश्या वॉलपेपरने सजवला होता. पूर्ण दिवाणखान्यात एक छानसे कार्पेट घातलेले होते. पण बसायला मात्र सोफा किंवा खुर्ची असे काही नव्हते. जमीनीवरच बैठक मारून बसायचे. गेल्यावर ओळख वगैरे झाली इकडच्या-तिकडच्या गप्पा करुन आम्ही त्यांचा बिस्कीट प्रकल्प पहायला गेलो. त्यांच्या घराच्या आवारातच एक खोलीत त्यांनी हा छोटेखानी प्रकल्प थाटला होता. मुश्ताक़ व हिलालने बिस्कीट बनवायची सगळी प्रक्रिया दाखवली व नमुना म्हणुन एक-दोन बिस्कीटे खायला दिली. ही चवीला साधारण कयानी बेकरीमधे मिळणार्‍या श्रुजबेरी बिस्कीटांसारखी लागत होती.

जेवायला वेळ होता म्हणुन पुन्हा गप्पा मारत बसलो. ‘असीम'शी कसे जोडले गेले ते त्यांनी सांगीतले. ‘असीम'तर्फे गावात अजुन काय काय उपक्रम चालू आहेत हे पण त्यांनी सांगीतले. मुश्ताक़ हा M.A. (Political Science) तर हिलाल M.A. (English) शिकलेला होता. त्या दोघांची घरची शेती आहे. नोकरीचे विचारले तर दोघांनाही नोकरी नव्हती. बेकरी, शेती व आली तर मनरेगाची कामे असे त्यांचे उद्योग होते. बोलता बोलता मुश्ताक़ने विचारले “कैसा लगा आपको कश्मीर?” आम्ही “बहोत सुंदर" असे उत्तरलो. त्यावर त्याने विचारले “क्या सोचते हो आप कश्मीरके बारे मे?” त्याच्या प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आला. ज्या विषयाकडे आम्हाला जायचे नव्हते तिकडेच घेउन जाणारा हा प्रश्न होता. “जैसा भारतके किसी दुसरे शहरमे या टुरिस्ट प्लेसमे होता है वैसा ही है यहांपे. कोई फर्क नहीं” असे मी सोईस्कर उत्तर दिले. पण मुश्ताकला त्यावर अजुन बोलायचे होते. मुश्ताक़ थोडा संवेदनशील वाटला. त्याच्या बोलण्यातुन तिथली परीस्थिती कळत होती. रोजगाराच्या संधी नाहीत, दहशतवादामुळे बिघडलेले वातावरण, कुठले नविन उद्योग/कंपनी तिथे येत नाही, अफ्स्पाचा त्यांना होणारा त्रास असे बरेच काहीकाही तो सांगू लागला. घरातून बाहेर पडताना न चूकता कुठलेतरी ओळखपत्र बरोबर असावेच लागते. संध्याकाळनंतर कोणी ओळखपत्राशिवाय पोलिस/सैनिक यांना सापडला तर त्याचे काय होईल सांगता येत नाही. दोघांनीही आपापल्या पाकीटात तीन-तीन ओळखपत्रे ठेवलेली होती. बोलताना तो बराच भावूक झाला होता. एक जाणवत होते की त्याला मुख्य प्रवाहात सामील व्हायची इच्छा तर आहे, पण संधी उपलब्ध नाही. त्याच्या म्हणण्यानुसार तिथले तरुण ह्याच कारणामुळे अस्वस्थ आहेत. निष्क्रीय सरकार, बेरोजगारी अशाने तरुणांच्या हातात काम नाही व अशातलेच काही तरुण चुकीच्या मार्गाकडे वळतात/वळवले जातात. “असीम" त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देत आहे व त्यांना मुख्य प्रवाहाचा हिस्सा बनायला मदत करत आहे.

नंतर जेवण केले. जेवणाच्या आधी हात धुवायला त्यांनी खास काश्मीरी आदरातिथ्यानुसार “तश्त-ए-नारी” आणले.

2
(आंतरजालावरुन साभार)

जेवणात राजमा-पनीर मसाला-भात असे होते. जेवण ठीकठाक होते. ह्या सगळ्यात एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटली नाही ती म्हणजे घरातल्या बायका आमच्या समोर येत नव्हत्या. किचनमधुनच ह्या मुलांमार्फत निरोप, खाणे-पिणे पाठवणे चालू होते. जेवणानंतर आम्ही त्यांचे शेत पहायला गेलो. मुश्ताक़ची सफरचंद-अक्रोड-पेअरची शेती होती. भरपूर झाडे होती आणि मुश्ताक़च्या सांगण्यानुसार आपल्या धान्याच्या शेतीपेक्षा ह्या फळांच्या शेतीत जास्त कष्ट पडतात. असो. मुश्ताक़ने एक अभिप्राय वही बनवली होती. त्यात आम्ही आमचा अभिप्राय नोंदवून तिथुन निघालो. सोहैलने विचारले की जेवण कसे होते? आम्ही ठीकच होते असे सांगीतल्यावर तो हसला आणि त्याच्या नेहमीच्या शैलीत म्हणाला “मान लिजीए, आपको व्हेज खाना मिला यही बहोत है| कश्मीरमे सिर्फ व्हेज खाना कभी बनता ही नहीं हैं| अगर कोई मेहमान बोले की उसको व्हेज खाना है तो घर की औरत सोच मे पड जाती है के क्या बनाऊं|” भाताबद्दलपण त्याने जे सांगीतले ते आम्हाला माहिती नव्हते. तो म्हणला की “यहां पे हर डिश चावलके साथ ही खाई जाती है| रोटी बनती नहीं है|” आमच्यासाठी ही नविन माहिती होती. माझ्या अंदाजानुसार उत्तरेकडे जेवणात रोटीच असणार. पण काश्मीर अपवाद निघाला. सोहैलच्या माहितीनुसार काश्मीरचे मुख्य पीक हे तांदुळ आहे. त्यामुळे भात हा जेवणाचा अविभाज्य भाग आहे.

तिथुन आम्ही युसमर्गला गेलो. युसमर्गचा शब्दशः अर्थ ‘येशूचे कुरण' (Meadow of Jesus). इथले स्थानिक लोक मानतात की येशू काश्मीरमधे जेव्हा आला होता तेव्हा त्याने इथे वास्तव्य केले होते. युसमर्ग हे साधारण दुधपथरीसारखेच होते. पण दुधपथरीएवढे मनमोहक नव्हते. (सोहैलचे म्हणणे बरोबर होते ) युसमर्गलादेखिल दुरवर कुरण पसरलेले होते. त्याच्या आजुबाजूला मस्त देवदार, पाईनची झाडे होती. खरेतर, दुधपथरी व युसमर्ग एका डोंगररांगेने विभागलेले आहेत. काही लोक युसमर्ग ते दुधपथरी असा ट्रेक देखिल करतात. युसमर्गलापण घोडेवाल्यांनी खूप त्रास दिला. जिथे जाउ तिथे मागे-मागे येत होते. पाखेरपोरामधे जरा उशीर झाल्याने, तसेच मुलगा कंटाळलेला असल्याने आम्ही युसमर्गमधे जास्त फिरलो नाही. कुरणावरच निवांत फिरलो.

3

4

5

6

7

8

9

10

11
युसमर्ग डॅम

12
युसमर्ग डॅम

संध्याकाळी श्रीनगरला परत आल्यावर मस्त काश्मीर स्पेशल गरमागरम ‘काहवा' पिला. छान होता एकदम. काश्मीरमधला दुसरा दिवसपण छानच गेला. काही नविन पहायला तसेच अनुभवायला मिळाले. काश्मीरी लोकजीवन जरा जवळून पाहता आहे.

भूनंदनवन काश्मीर – भाग ४ (पहलगाम)

आज पहलगामला जायचे होते. श्रीनगरपासून साधारण ३-४ तास लागतील असे सोहैलने सांगीतले होते म्हणुन सकाळी लवकरच निघालो. पहिले दोन दिवस श्रीनगरच्या एकाच दिशेला आमचा प्रवास झाला होता पण आज जरा वेगळ्या दिशेला जात असल्याने श्रीनगरचा दुसरा भाग पहायला मिळाला. वाटेत प्रथम आम्ही पाम्पोर भागातून गेलो. हा भाग केशरच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पण केशर साधारण ऑगस्टमधे येत असल्याने सद्ध्या शेतात काही पहाण्यासारखे नव्हते. पाम्पोरमधे सुक्यामेव्याची बाजारपेठदेखिल आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बरीच दुकाने दिसत होती. सोहैलने त्याच्या ओळखीच्या दुकानापाशी गाडी थांबवली. त्याच्या म्हणण्यानुसार त्या दुकानात सर्वात चांगल्या दर्जाचा सुकामेवा मिळतो. बाकी ठिकाणी फसवणू्क होण्याची शक्यता असते. गरजेपुरतीच खरेदी करावी असे ठरवून दुकानात गेलो. पण दुकान चांगले होते. प्रत्येक गोष्टीची चव घेऊन मगच खरेदी करा असे त्यांनी आम्हाला सांगीतले. आम्ही मात्र जेवढे पाहिजे तेवढेच आणि आवश्यक तेवढेच घेतले. केशर-अक्रोड-बदाम-काह्वा-काश्मीरी सौंफ-वाळवलेले ब्लॅकबेरी असा माफक(!) माल घेऊन आम्ही तिथुन काढता पाय घेतला. पुढे आम्ही ‘अवंतीपुरा'ला भेट दिली. इथे जुन्या काळातील मंदिराचे अवशेष जतन केले आहेत. पहलगामच्या वाटेवर भेट द्यायला नक्कीच चांगली जागा आहे. इथुन जेहलम नदी मस्त वळण घेत पुढे श्रीनगरला जाते. पुढे वाटेत बरेच क्रिकेट बॅट बनवणारे कारखाने दिसले.

1
अवंतीपुरा अवशेष

2

3

4

5

6
अवंतीपुरा अवशेष

7

8
मस्त वळण घेत जाणारी जेहलम नदी

9
मस्त वळण घेत जाणारी जेहलम नदी

पहलगामचा रस्तादेखिल छानच आहे. मधे एक Apple Orchid म्हणुन पट्टा लागला जिथे रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदाची झाडे होती. थोड्याच वेळात आम्ही पहलगामच्या खोर्‍यात पोचलो. इथे आपले स्वागत ‘लीदर' नदी करते. पहलगाममध्येच उगम पावणारी ही पहलगामची मुख्य नदी पहलगाम-अनंतनागमार्गे पुढे जेहलमला मिळते. नदीचे मोठे पात्र, खळाळत वाहणारी लीदर नदी आणि आजुबाजूला असलेले हिरवेगार डोंगर असे इथले एकुणच द्रुश्य खूप छान आहे. नदीपात्रात उतरता येते. पाणी एकदम पाय गोठवून टाकणारे. मग लीदर नदीच्या कडेकडेनेच पहलगाम गावात पोहोचलो.

11
पहलगाममध्ये आपले स्वागत

पहलगाममधे आम्ही एक रात्रच राहणार होतो. आणि इथे बघण्यासाठी खूप काही आहे. मग सोहैललाच विचारून प्लॅन बनवला. पहलगाम खूप उंचावर व डोंगराळ भागात असल्याने इथले हवामान खूपच लहरी आहे. कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. अर्थात, स्थानिक लोकांना ह्याचा व्यवस्थित अंदाज असतो. त्यानुसारच आम्ही पहिल्या दिवशी अडू, बेताब व चंदनवाडी करायचे ठरवले. ह्या तीनही ठिकाणी बाहेरच्या गाड्या जाउन देत नाही. स्थानिक नियमांनुसार स्थलदर्शनासाठी तिथलीच गाडी भाड्याने घ्यावी लागते. आम्ही एक गाडी बूक केली. थोड्याच वेळात एक थोडेसे वयस्कर काका त्यांची गाडी घेउन हॉटेलवर आले. ते येईपर्यंत वातावरण खूपच ढगाळ झाले होते. एवढे की कधीपण पाऊस सुरू होईल. त्या काकांना आम्ही आमची शंका बोलून दाखवली. पण त्या अनुभवी काकांनी ढगांकडे बघुन सांगीतले की “ये तो काले बादल नहीं हैं| तो कोई बारीश नही होगी| और होगी तो भी हल्कीसी बूंदाबांदी होगी| आप बेफ़िक्र होकर चलीये|” त्यांचे म्हणणे खरे ठरले हे वेगळे सांगायची गरज नाही.

काका एकदम गप्पीष्ट होते. गाडीत ८०-९०च्या दशकातली नदीम-श्रवण, आनंद-मिलींद, कुमार सानू टाईप गाणी लावलेली होती. (आठवा ती दीवाना-साजन-मीरा का मोहन वगैरे चित्रपटगीते). त्यांचा बोलायचा लहेजा व काही शब्द थोडे राजस्थानी वाटले. त्यांना त्याबद्दल विचारले तर त्यांनी सांगीतले की ते ‘गुज्जर' आहेत. फार पूर्वी त्यांचे पूर्वज इकडे रहायला आले. त्या भागात बरेच गुज्जर आहेत अशी माहितीदेखिल त्यांनी पुरवली.

प्रथम आम्ही ‘चंदनवाडी’ला गेलो. चंदनवाडी पहलगामपासून १६किमी अंतरावर आहे. इथे अमरनाथ यात्रेचा बेस कॅंप आहे. पहलगाममार्गे जाणारे यात्रेकरू इथुन खर्‍या अर्थाने आपली अमरनाथ यात्रा सुरू करतात. चंदनवाडीचा रस्ता पूर्णपणे घाटरस्ताच आहे तसाच बराच धोकादायकदेखिल आहे. वेडीवाकडी वळणे, तीव्र चढ, बाजूला खोल दरी असा एकुणच भारी रस्ता आहे. पहलगामपासुन चंदनवाडीपर्यंत ‘शीषनाग' नदी आपल्याला साथ देते. ह्या नदीचा उगम चंदनवाडीच्या एका हिमनदीतून होतो. चंदनवाडीला वाहतुकीचा रस्ता संपतो. इथुन पुढे बर्फाच्छादित डोंगर आणि त्यामधुन अमरनाथकडे जाणारी पायवाट. उन्हाळा सुरू झाला असला तरी चंदनवाडीला चांगलेच बर्फ होते. पब्लिक मस्त बर्फात खेळत होतं. डोंगरावरून बर्फातून ‘स्लेज' सूसाट खाली येत होत्या. आम्हीदेखिल तिथे थोडे बर्फात खेळलो. नंतर शीषनाग नदीच्या प्रवाहापाशी गेलो. हा प्रवाह बर्फाच्या डोंगराखालून येऊन इथे प्रकट झाला होता. पाणी भयानक गार होते. नदी एकदम खळाळत चालली होती. उथळ पात्र आणि उतार ह्यामुळे प्रवाहाला चांगलाच वेग होता. ही नदी पुढे पहलगामला ‘लीदर' नदीला मिळते. बाकी चंदनवाडीमधे विशेष पहाण्यासारखे काही नाही.
10
चंदनवाडी

12
चंदनवाडी

13
बर्फ वितळून तयार होत असलेला नदीचा प्रवाह

14
चंदनवाडी

15
चंदनवाडी रस्ता

इथुन पुढे आम्ही ‘हज़ान व्हॅली’ला गेलो जी ‘बेताब' चित्रपटाच्या इथे झालेल्या शूटींगमुळे ‘बेताब व्हॅली’ म्हणुन देखिल ओळखली जाते.

16
हज़ान व्हॅली

बेताब व्हॅली ही डोंगरांच्या मधोमध असलेली एक मोठी बाग आहे. शीषनाग नदीच्या प्रवाहात एक मोठे नैसर्गिक बेट आहे ज्यावर ही बाग तयार केली आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथे लॅण्डस्केपिंग केलेले आहे. गवताचे लांबलचक पट्टे, भरपूर झाडे, व्यवस्थित आखलेल्या पायवाटा, नदीवर ठिकठिकाणी उभारलेले छोटे-छोटे पुल, लहान मुलांना खेळायला भरपूर झोपाळे-घसरगुंड्या वगैरे. आणि हे सगळे निसर्गाच्या सान्निध्यात. खूप छान वेळ जातो इथे. त्यामुळे पहलगामला आल्यास न चुकता ह्या ठिकाणाला भेट द्यावी.

17
बेताब व्हॅली

18
बेताब व्हॅली

19
बेताब व्हॅली

20
बेताब व्हॅली

इथुन पुढे आम्ही अडू व्हॅलीकडे निघालो. चंदनवाडी व बेताब व्हॅली पहलगामच्या एका बाजूला तर अडू व्हॅली एकदम विरुद्ध बाजूला आहे. त्यामुळे बेताबवरुन पहलगामला येऊन अडूकडे निघालो. खरेतर संध्याकाळ झालेली होती आणि लवकरच अंधार पडणार होता. त्यामुळे तिकडे वेळेत पोहोचणार का ही शंका होती. पण ड्रायव्हर काका निवांत होते. अडूचा रस्ता चंदनवाडीपेक्षा जास्त अवघड होता. त्यात तो अरुंददेखिल होता. म्हणजे समोरुन गाडी आली तर दोन्ही गाड्यांना अगदी अटीतटीने गाडी काढावी लागत होती. अडू पहलगामपासून १२किमी अंतरावर आहे. अडूचा रस्ता नितांत सुंदर आहे. हिरवेगार तसेच बर्फाच्छादीत उंचच उंच डोंगर, दरीतून खळाळत वाहणारी नदी, अधुन-मधुन दिसणारी छोटी-छोटी घरे.

21
अडू व्हॅली

अडू गाव एक छोटेखानी गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. कुठल्याही दिशेला पाहीले तरी मस्त हिरवेगार अथवा बर्फाच्छादित डोंगर दिसतात. इथुन बरेच ट्रेक सुरु होतात. मुख्य ‘कोल्होई ग्लेशियर'चा ट्रेक. लांब पल्ल्याचा ‘सोनमर्ग'चा ट्रेकदेखिल इथुन सुरु होतो. त्यामुळे इथे बर्‍याच ट्रेकर्सचे बेस कॅम्प दिसतात. एकुणच खूप छान जागा आहे त्यामुळे पहलगामला आल्यास न चुकता इकडे येणे.
22
अडू गाव

23
अडू गाव

24
अडू गाव

परत येताना ड्रायव्हर काका गप्पा मारत होते. गेली बरीच वर्षे ते इथे गाडी चालवत आहेत. त्यांचे अनंतनागला घर आहे. त्यांचा मोठा मुलगा MBBS झाला होता तसेच एक मुलगी देखिल उच्चशिक्षण घेत होती. त्यांच्या घरी एक-दोन लहान मुले असल्याने आमचा छोकरा पाहुन ते आमच्या मागेच लागले की त्यांच्या घरी चला. म्हणाले की “कहां ये होटेल का खाना खाते हो| हमारे घर आईये, बच्चे खेलेंगे और आपको बढिया खाना मिलेगा|” आम्ही नम्र नकार दिला आणि परत हॉटेलवर आलो.

पहलगामच्या दुसर्‍या दिवशी सकाळच्या वेळात आम्ही पहलगामच्या जवळपासची ठिकाणे पाहिली. ज्यात कनिमार्ग, धबधबा, डब्यान, काश्मीर व्हॅली, बैसरन इत्यादी ठिकाणी भेट दिली. ह्या सर्व ठिकाणी घोड्यावरूनच जाता येते. घोडेवाल्यांचे दर ठरलेले असतात पण जर तुम्हाला घासाघीस करता येत असेल तर खुशाल न लाजता जितकी जमेल तितकी घासाघीस करावी. अर्थात, हे तत्त्व काश्मीरमधे सरकारी दुकाने सोडता इतर सर्व ठिकाणी लागू होते. आम्हीदेखिल मजबूत घासाघीस करुन तिघांसाठी तीन घोडे ठरवले. वर सांगीतलेली ठिकाणे पहायला साधारण तीन तास लागतात. त्यातले दोन तास हे घोड्यावर बसुन फिरण्यातच जातात. तसेच, ह्या सर्व ठिकाणांचा रस्ता हा डोंगरावरुन जाणारी ‘घोड्यांची पायवाट' आहे. तीव्र चढ, तीव्र उतार, खाचखळगे, चिखल ह्या सगळ्यातून घोडा त्याच्या कुवतीनुसार मार्गक्रमण करतो. तो त्याच्या पाठीवर कोण बसले आहे ह्याचा जरादेखिल विचार करत नाही. पैसे त्याच्या मालकाला मिळणार असतात. त्यामुळे, पाठीवर बसलेला माणुस पडला तरी घोड्याच्या ‘बा’ चे काही जाणार नसते. सांगण्याचा उद्देश हाच की ह्या सगळ्याचा विचार करुन ही ठिकाणे बघायला जाणे. एकदा डोंगरावर गेले की घोडा किंवा स्वतः चाली-चाली करणे हे दोनच पर्याय आहेत. इतर कुठलेही वाहतुकीचे साधन ह्या ठिकाणी उपलब्ध नाही. तर, आमची रपेट सुरु झाली. माझा घोडा त्याचे रंग दाखवू लागला. त्याला दुसरा कुठला घोडा त्याच्या पुढे गेलेला बिलकुल आवडत नसे. कोणी घोडा जरा जरी ओव्हरटेक करून पुढे गेला की हा पठ्ठा येनकेन प्रकारे, प्रसंगी धक्काबुक्की करून त्या घोड्याच्या पुढे जात असे. त्यामुळे मला पूर्णवेळ अत्यंत सावधपणे बसावे लागत होते. कौतुक माझ्या मुलाचे होते. पूर्णवेळ तो घोड्यावर एकटा बसला आणि चढ असो वा उतार, त्याने व्यवस्थित बॅलन्स केले, पडला नाही कुठे. तर, ही सर्व ठिकाणे बघण्यासारखी आहेत. ‘बैसरन'ला स्थानिक लोक ‘मिनी स्वित्झर्लॅंड' म्हणतात आणि प्रत्यक्षात देखिल ती जागा नितांत सुंदर आहे. अर्थात, टूर कंपनीबरोबर गेल्यास ते ही ठिकाणे दाखवत नाहीत हे लक्षात घ्यावे. त्यांच्या कार्यक्रम पत्रीकेत अडू-चंदनवाडी-बेताब एवढेच असते. अजुन इकडे ‘तुलीयॉं तलाव' ही एक खूप छान जागा आहे असे कळले होते. पण तो तलाव बराच लांब असल्याने वेळेअभावी आम्ही तिकडे गेलो नाहे.

24
कनिमार्ग

25
वॉटरफॉल पॉईंट

26
डब्यान

27
डब्यान

28
डब्यान

29
काश्मीर व्हॅली

29
काश्मीर व्हॅली

30
बैसरन

31
बैसरन

32
बैसरन

33
बैसरन

पहलगामचे स्थलदर्शन संपवून आम्ही परत श्रीनगरकडे वळालो. संध्याकाळी श्रीनगरला पोहोचलो. पुढच्या दिवशी काश्मीरची ‘स्नो-कॅपिटल’ गुलमर्गला जायचे होते.







No comments:

Post a Comment

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...