Wednesday, October 21, 2020

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

 सकाळी सात वाजता उठून आवरल्यावर बेल बॉय च्या हातात सामान सोपवून सात पन्नासला खाली येऊन चहा पिण्यासाठी इनहाउस रेस्टॉरंट मध्ये शिरलो. पाचेक मिनिटांत खालिद ब्रेड घेऊन येईलच तेव्हा ब्रेकफास्ट करूनच निघा असे हमादाने सुचवले पण साडेआठची बस असल्याने तिथेच बसून नाश्ता करणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्याने तो पार्सल देण्याची तयारी दर्शवली.
आठ वाजता मोहम्मद आणि खालिद एकाचवेळी हॉटेलवर पोचले. हमादाने पार्सल दिलेला ब्रेकफास्ट बॉक्स घेउन आम्ही ‘गो बस’ च्या ऑफिसला जायला निघालो. दहा मिनिटांत त्याठिकाणी पोचलो आणि सामान बसच्या साईड डिकी मध्ये ठेऊन मोहम्मदचा निरोप घेतला आणि माझ्या सीट वर येऊन बसलो.
बस छान होती, लांब लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने सीटस आरामदायक होत्या आणि विमानातल्या सारखीच छोट्या स्क्रीन्सवर मनोरंजनाची आणि छोटेखानी टॉयलेटची सोय होती. सर्व प्रवासी आपापल्या सीटस वर स्थानापन्न झाल्यावर आठ पस्तीसला आमचा हूरघाडाच्या दिशेने ३०१ कि.मी.चा प्रवास सुरु झाला.
Map लुक्झोर मधून बाहेर पडल्यावर २५-३० कि.मी. पर्यंतचा प्रवास डाव्या बाजूला कालवा आणि हिरव्यागार शेतांच्या सोबतीने झाल्यावर पुढचा हूरघाडा पर्यंतचा सगळा प्रवास रखरखीत वाळवंट आणि उघडे बोडके डोंगर बघत बघत झाला.
Scene1
Scene2
 Scene3
Scene4
Scene5
Scene6
सुमारे दोनशे कि.मी. अंतर कापल्यावर साडे अकराला एका हॉटेलवर बस थांबली. मला पार्सल दिलेला नाश्ता मी खाऊन झाला होता म्हणून केवळ चहा पिऊन परत जागेवर येऊन बसलो. बाकीची प्रवासी मंडळी चहा-नाश्ता करून परत आल्यावर बारा वाजता पुढचा प्रवास सुरु झाला.
एक वाजता हूरघाडाची हद्द सुरु होते त्याठिकाणी पोलीस चेक-पोस्टवर तपासणीसाठी बस थांबली. डिकी मध्ये ठेवलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची तपासणी पूर्ण होऊन, तिथून निघण्यासाठी लागलेला जवळपास पाउण तासाचा वेळ मात्र बाहेरच्या कडक उन्हात खाली उतरून परिसर न्याहाळणे जिकीरीचे असल्याने, बस मधेच बसून राहायला लागल्याने फारच कंटाळवाणा गेला.
अखेर दोन वाजून दहा मिनिटांनी हूरघाडा ह्या तांबड्या समुद्राच्या (Red Sea) किनाऱ्यावर असलेल्या शहरातील गो बसच्या टर्मिनल वर पोचलो.
तिथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या फोर सिझन्स ह्या हॉटेलपर्यंत पोचवण्यासाठी टॅक्सीवाले अवाच्या सव्वा भाडे सांगत होते, हॉटेलवर फोन करून विचारले तर तिथल्या व्यक्तीने २० पाउंडस पेक्षा जास्ती भाडे देऊ नका असे सांगितले. शेवटी हो-नाही करत थॉमस नावाचा एक वयस्कर टॅक्सीवाला ३० पाउंडस मध्ये येण्यास तयार झाला पण त्याला ईतर टॅक्सीवाल्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
मला हॉटेलवर सोडून निघताना थॉमसने त्याचा फोन नंबर दिला आणि इथे स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या अशा पर्यटकांना लुबाडणाऱ्या वागणुकीने आमच्या शहराचे नाव खराब होत असल्याची हळहळ व्यक्त करून, कुठेही फिरायचे झाल्यास मला फोन करा मी वाजवी भाड्यात तुम्हाला फिरवून आणीन असे सांगितले.
रिसेप्शन काउंटर वर पोचलो तर तिथे कोणीच नव्हते. मुस्तफा नावाच्या पँट्रिची व्यवस्था बघणाऱ्या तरुणाने तत्परता दाखवून घरी जेवायला गेलेल्या मालक / व्यवस्थापक मोहम्मदला फोन करून माझ्या आगमनाची वर्दी दिली. त्यांच्यात अरेबिक मध्ये काय संभाषण झाले मला कळले नाही, पण मोहम्मद येईपर्यंत माझा खोळंबा न करता त्याने पहिल्या मजल्यावरची तीन बेड्स असलेली एक मोठी रूम मला देऊन फॉर्म वगैरे भरण्याची प्रक्रिया मोहम्मद आल्यावर पूर्ण करा असे सांगितले.
तीस पस्तीस वर्षे जुनी इमारत असलेल्या ह्या हॉटेल मधली ही रूम चांगली मोठी होती. फ्रीज, टी.व्ही., ए.सी. अशा सर्व सुविधा होत्या पण भिंतींचा रंग जुना झाल्याने ती थोडी डल वाटत होती. अर्थात माझे हुरघाडाला येण्याचे प्रयोजन फक्त रेड सी मध्ये डायव्हिंग अथवा स्नोर्केलींग करणे एवढेच होते आणि केवळ दोन रात्री झोपण्या पुरताच तिचा वापर करायचा असल्याने विशेष फरक पडत नव्हता, पण जे पर्यटक फिरायला आणि आराम करायला म्हणून चार दिवस ते आठवडाभरा साठी येतात त्यांना कदाचित ही रूम आवडली नसती.
फ्रेश झाल्यावर कडकडून भूक लागली असल्याने काहीतरी खाण्यासाठी परत खाली उतरलो. ह्या हॉटेलमध्ये पण फक्त सकाळी ब्रेकफास्ट आणि दिवसभर चहा, कॉफी आणि शीत पेयेच मिळत असल्याने रस्ता ओलांडून समोर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये आलो. मेनू कार्ड वर बरेच बीफचे पदार्थ दिसत असल्याने थाई फूड सेक्शन मध्ये दिसलेल्या एग नुडल्स ची ऑर्डर दिली. चवीला गोडसर लागणारा तो पदार्थ खाऊन भूक शांत झाल्यावर परत हॉटेलवर आलो.
त्यावेळी मालक मोहम्मद आला होता. फॉर्म वगैरे भरून झाल्यावर मग त्याच्याकडे डायव्हिंग आणि स्नोर्केलींगच्या टूर विषयी चौकशी केली असता त्याने दिवसभर चालणाऱ्या त्या टूर मध्ये समाविष्ट असलेली ठिकाणे, लागणारा वेळ, किंमत अशी इत्यंभूत माहिती दिली.
सकाळी आठ वाजता पिक-अप, नंतर यॉटने जीफ्टून आयलंडला (Giftun Island) भेट, त्यानंतर प्रवाळाची बेटे (Coral Reef) असलेल्या तीन ठिकाणी स्नोर्केलींग करून संध्याकाळी पाच वाजता हॉटेलवर परत असा दुपारचे जेवण समाविष्ट असलेला हा कार्यक्रम चांगला वाटल्याने मी ती टूर बुक केली आणि साडे तीनला रूमवर परतलो.
अर्धा-पाउण तास झोप काढून झाल्यावर टी.व्ही. वर सुरु असलेल चार्ली चॅप्लिनचा ‘द ग्रेट डीक्टेटर’ बघून साडे सहाला समुद्र किनाऱ्यावर भटकंती करायला बाहेर पडलो.
हुरघाडाचा संपूर्ण किनारा हॉटेल्स आणि रिसोर्ट्सनी व्यापलेला असल्याने जवळपास सगळे बीच हे प्रायव्हेट बीच आहेत. दोन हॉटेल्सच्या मधून मधून दिसणारा समुद्र बघत बघत एक चांगलीच लांब फेरी मारून मी परत माझ्या हॉटेलजवळ आलो.
beach
साडे सात वाजले होते एवढ्या लवकर जेवण्याची इच्छा नसल्याने मग शहराच्या मध्यवर्ती भागात थोडावेळ भटकंती केली आणि मग साडेआठला माझ्या हॉटेल जवळच असलेल्या सनसेट कॅफे मध्ये मिडीयम पिझ्झा खाल्ल्यावर एक कॅपुचीनो पिऊन रूमवर आलो.
सकाळच्या टूरवर जाताना बरोबर न्यायचे सामान छोट्या सॅक मध्ये भरून झाल्यावर बायकोशी व्हॉट्सॲप वर गप्पा सुरु झाल्या. तिची कॉन्फरंस आज संपल्याने स्कॉटलंड मधला तिचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्या दुपारी तिची परतीची फ्लाईट असल्याने ती माझ्या दोन दिवस आधीच घरी पोचणार होती.
माझी उद्याची टूर संध्याकाळी पाच वाजता संपणार होती आणि परवा म्हणजे ११ मार्चला मी हुरघाडाहून कैरोला जायला निघणार होतो. परंतु ‘गो बस’ ची हुरघाडा ते कैरो सर्व्हिस असून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत त्यांच्या बस असल्याचे समजले होते. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमात थोडा बदल केला आणि माझा फोन बंद असल्याने मी करू शकत नसलेले बसचे ऑनलाईन तिकीट बुक करण्याचे काम सौभाग्यवतींचे इंटरनॅशनल रोमिंग ॲक्टिव्ह असल्याने मग तिच्याकडून करून घेतले.
रात्री १ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सातला कैरोला पोचणाऱ्या बसचे तिकीट तिने बुक केले आणि सॉफ्ट कॉपी मला ईमेल वर पाठवली. त्यानंतर माय हॉटेल कैरोच्या मेहमूदला फोन करून माझ्या परवा तिथे पोचण्याच्या बदललेल्या वेळेची माहिती त्याला दिली आणि अकराच्या सुमारास सकाळी सातचा अलार्म लाऊन झोपलो.

*****

सात चाळीसला तयार होऊन नाश्ता करण्यासाठी खाली उतरलो. मुस्तफाने आणून दिलेला ठराविक कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट खाऊन संपायच्या आतच पिक-अप साठी ड्रायव्हर आल्याची सूचना द्यायला मोहम्मद तिथे आला. नाश्ता झाल्यावर बाहेर पडून व्हॅन मध्ये येऊन बसलो.
पुढच्या एका हॉटेलमधून जर्मन माय लेक आणि आमची वाट बघत थांबलेला जिमी नावाचा गाईड आणि प्रोफेशनल फोटोग्राफर मोहम्मद अशा चार जणांना घेऊन पाच-सात मिनिटांत दोन कि.मी. वर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या यॉट ऑपरेटरच्या ऑफिस वर आम्ही पोचलो.
ऑफिसमध्ये स्नोर्केलींग साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मापाच्या फिन्स आणि मास्कच्या ढिगाऱ्यातून आपापल्या मापाच्या वस्तू निवडण्यात दहा मिनिटे गेल्यावर थोड्या खोल समुद्रात उभ्या असणाऱ्या यॉट पर्यंत नेणाऱ्या मोटरबोटीत आम्ही बसलो.
Yatch योगायोगाने माझ्या हॉटेलचेच फोर सिझन हे नाव असलेली ती यॉट मस्त होती. आमच्या आधी तिच्यावर चौदा पर्यटक स्वार झाल्याचे तिथे पोचल्यावर समजले. त्यातला मोहम्मद नावाचा अलेक्झांड्रीयाहून आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरशी माझी गट्टी जमली. आणखीन चार पर्यटक आम्हाला येऊन मिळाल्यावर नउ वाजता जीफ्टून आयलंडला जाण्यासाठीचा आमचा दीड तासाचा प्रवास सुरु झाला.
नावालाच तांबडा समुद्र असलेल्या ह्या समुद्राच्या पाण्याच्या निळ्या, हिरव्या, मोरपिशी अशा विविध छटा बघत यॉटच्या वरती घिरट्या घालत आमचा पाठलाग करणाऱ्या सीगल पक्षांच्या सोबतीने प्रवास झकास चालू होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बोटीतून प्रवास करताना मला होणारा मळमळण्याचा त्रास ह्यावेळी बिलकुल जाणवत नव्हता.
Red Sea
 Red Sea
यॉटच्या वर उडणारे सीगल पक्षी.
 Red Sea
 Red Sea
 Red Sea
 Red Sea
जीफ्टून आयलंड

जीफ्टून आयलंड जवळ आल्यावर पुन्हा मोटरबोटीने आम्हाला बेटावर पोचवण्यात आले. सुंदर निळ्याशार समुद्रातले हे बेट फारच विलोभनीय दिसत होते. इथला किनारा पोहण्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जात असल्याने आमचे बरेच सहप्रवासी तासभर समुद्रात डुंबत होते. मी आणि मोहम्मदने पाण्यात न उतरता बेटावरच एक फेरफटका मारून झाल्यावर, किनाऱ्यावरच्या वाळूवर बसून सहप्रवाशांना डुंबताना बघण्यात छान वेळ गेला.

Me जवळपास दोन तास जीफ्टून आयलंडवर व्यतीत केल्यावर साडे बाराला आम्ही यॉटवर परतलो. जिमीने सगळ्यांना कोका कोला प्यायला दिला. अर्धा तास प्रवास केल्यावर एके ठिकाणी स्नोर्केलींग साठी यॉटचा नांगर टाकण्यात आला. काचे सारखे स्वच्छ निळे पाणी बघुनच आज तरी पाण्याखाली आपल्या सभोवती पोहणारे मासे आणि ईतर जलचर बघायला मिळतील याची खात्री पटली. या आधी देवबाग-तारकर्ली आणि मालवण ह्या दोन्ही ठिकाणी केलेल्या स्नोर्केलींग मध्ये गढूळ पाण्यामुळे अक्षरशः पाण्याखालचे काहीही दिसले नव्हते.
अंगावर लाईफ जॅकेट, चेहऱ्यावर मास्क आणि पायात फिन्स चढवून जय्यत तयारीनिशी यॉटची स्टीलची शिडी धरून पाण्यात उतरलो.
Underwater
यॉटवर आपटून परत येणाऱ्या लाटांमुळे सारखे गटांगळ्या खायला होत होते. माझी अडचण लक्षात आल्यावर जवळच पोहत बाकीच्यांना मार्गदर्शन करणारा गाईड जिमी माझ्याजवळ आला आणि माझा हात धरून यॉटपासून थोडं दूर खोल पाण्यात घेऊन गेला. श्वास घेण्यासाठी मास्कला जोडलेले नळकांडे तोंडात घट्ट धरून डोके पाण्याखाली नेले, आणि खाली दिसणारी लांबच लांब अंतरावर पसरलेली रंगीबेरंगी प्रवाळाची बेटे, सभोवती झुंडीने पोहणारे शेकडो लहान आणि मध्यम आकाराचे मासे, असे दृश्य बघून हरखूनच गेलो. एक दोन कासवेही दिसली.
सोनी एकस्पिरीया Z3 ह्या वॉटरप्रुफ फोनने यॉटच्या शिडीला धरून पाण्याखाली काढलेले काही फोटो.
Underwater
 Underwater
 Underwater अर्धा तास चाललेल्या ह्या सत्रातला बराचसा वेळ पाण्याच्या वर आणि अधून मधून बुडी मारण्यात घालवल्यावर परत यॉटवर आलो. वॉशरूम मध्ये जाऊन अंग कोरडे करून आल्यावर सुद्धा, सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीने कुडकुडायला होत होतं. पाण्यात न उतरलेल्या मंडळींचे जेवण चालू होतं. गरमा गरम बटाट्याची रस्सा भाजी आणि खुबुस खाल्ल्यावर जरा शरीरात उब निर्माण झाली. भात मात्र कणीचा असल्याने मी नाही घेतला.
सगळ्यात शेवटी पाण्याबाहेर आलेल्या मंडळींचे जेवण संपायच्या आतच आम्ही दुसऱ्या स्नोर्केलींग पॉईंटवर पोचलो. सुरवातीला परत भिजल्यावर थंडीने कुडकुडायला होईल म्हणून मी उतरायचे टाळत होतो, पण मोहम्मद आणि जीमिच्या आग्रहाखातर उतरलो.
इथे पाणी जास्त खोल होते त्यामुळे माझ्यासारख्या जेमतेम पोहता येणाऱ्याचा फार वेळ टिकाव लागणे मुश्कील असल्याने १०-१५ मिनिटांतच पाण्याबाहेर येणारा मी एकटाच नव्हतो. माझ्या आधी हौशीने पाण्यात उतरलेली बरचशी मंडळी माझ्या आधीच यॉटवर परत आलेली होती. पुन्हा एकदा अंग कोरडे करून कपडे बदलले. आता थंडी एवढी वाजत होती कि फोटो सुद्धा काढता येत नव्हता, अक्षरशः हुडहुडी भरली होती. कान आणि डोके झाकून सन डेकवर येऊन बसल्यावर थोड्या वेळानी कुडकुडणे बंद झाले.
तिसऱ्या स्नोर्केलींग पॉईंटवर मात्र खोली ३० मीटर्स पेक्षा अधिक असल्याने फक्त पट्टीच्या पोह्णाऱ्यांनीच समुद्रात थेट उड्याच मारल्या. त्यात मोहम्मदचाही समावेश होता.
diving
diving
मोहम्मद.

पाण्यात उतरलेली मंडळी परत आल्यावर सगळ्यांना चहा आणि ओरिओ बिस्किट्स देण्यात आली आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
खोल पाण्यातल्या यॉट पासून मोटरबोटीने किनाऱ्यावर उतरलो तेव्हा सव्वा पाच झाले होते. माझ्या हॉटेलच्या दिशेला ज्यांची हॉटेल्स होती असे मी धरून ५ पर्यटक जमल्यावर मला हॉटेलवर ड्रॉप करेपर्यंत पावणे सहा वाजले.
रात्री एक वाजता कैरोला जाण्यासाठी बस असल्याने प्रवासात झोप होईल नाही होईल ह्याची शाश्वती नसल्याने साडे नउ पर्यंत झोप काढल्यावर काल रात्रीच्याच कॅफे मध्ये जाऊन मिडीयम पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड खाल्ले आणि २ डाळिंबाच्या ज्युसचे कॅन्स पार्सल घेऊन रूमवर परतलो.
बाल्कनीत वाळत घातलेले आजचे समुद्रात ओले झालेले कपडे सुकल्यावर काढून आणून पुढचे २ दिवस लागणारे कपडे आणि वस्तू वेगळ्या करून सामानाची बांधाबांध केली. बस टर्मिनल फार लांब नसल्याने बारा-सव्वाबाराला निघून चालण्यासारखं होतं. तो पर्यंत वेळ घालवण्यासाठी टी.व्ही. लावला, पण काहीच बघण्यालायक नसल्याने शेवटी बस टर्मिनलवर टाईमपास करू असा विचार करून पावणे बाराला खाली उतरलो. चेक आउट केल्यावर हॉटेलच्याच कर्मचाऱ्याने २० पाउंडस भाड्यात ठरवलेल्या टॅक्सीने टर्मिनलवर गो बसच्या ऑफिसमध्ये पोचलो. ऑनलाईन बुकिंगचा मेल दाखवून काउंटर वरच्या व्यक्ती कडून छापील तिकीट घेऊन प्रशस्त वेटिंग हॉल मध्ये येऊन बसलो.
बारा पाच झाले होते, बस सुटायची वेळ व्हायला अजून जवळपास १ तास होता. LED स्क्रीन्स वर चालू असलेल्या कार्टून फिल्म्स बघत असताना बारा चाळीसला गो बस चा कर्मचारी एक वाजताच्या कैरोला जाणाऱ्या बसच्या प्रवाशांना बोलवायला आला.
मागच्या बाजूला असणाऱ्या भव्य प्रांगणात उभ्या असलेल्या बसच्या डिकीत सामान ठेवल्यावर आत येऊन स्थानपन्न झालो. एक वाजून दहा मिनिटांनी बस सुटली आणि हुरघाडा ते कैरो ह्या ४६० कि.मी. अंतराच्या प्रवासाला सुरुवात झाली.
पहाटे चार वाजता हायवे वरच्या जफराना हाउस नावाच्या फूड कोर्टवर चहा-पाण्यासाठी बस थांबली.


पंधरा वीस मिनिटांनी फूड कोर्टवरून निघाल्यावर मात्र अधे मधे कुठेही न थांबता सकाळी सहा पंचावान्नला तेहरीर चौकातल्या फ्लायओव्हर खाली असलेल्या गो बस टर्मिनलवर पोचलो. बस मधून बाहेर पडताच पुन्हा अप्पर ईजिप्त आणि लोअर ईजिप्तच्या तापमानातला फरक जाणवला. कैरोची हवा चांगलीच थंड होती.
बस टर्मिनलपासून माझं हॉटेल अगदीच जवळ असल्याने सामान घेऊन चालत चालत रस्ता ओलांडून माय हॉटेलवर आलो. परवा रात्री फोन करून आधीच कळवले असल्याने मेहमूदने रूम तयार ठेवली होती. सामान रुममध्ये ठेवल्यावर कॉमन रुममध्ये बसून चहा पीत आमच्या गप्पा चालू असताना आणखीन एक व्यक्ती तिथे हजर झाली.
ती व्यक्ती म्हणजे कालच इटलीहून आलेला, मेहमूद आणि अहमदचा तिसरा भागीदार आणि ह्या हॉटेलचा मूळ मालक सईद हनाफी होता. ईजिप्शियन आणि इटालियन असे दुहेरी नागरिकत्व असलेला आणि कुटुंबासह कायमस्वरूपी इटलीमध्ये वास्तव्य करणारा सईद वरचेवर ईजिप्तला येऊन जाऊन असतो, त्याच्या अनुपस्थितीत मेहमूद आणि अहमद हॉटेलची व्यवस्था सांभाळतात. हसतमुख, वागण्या बोलण्यात कुठलाही गर्व किंवा स्वतःबद्दलचा अहंगंड नसलेला आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या सईदचे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते.
आठ वाजता मानलने तिघांसाठी नाश्ता आणून दिला. नाश्ता झाल्यावर अजून एक चहा पिऊन मेहमूद आणि सईदचा निरोप घेऊन मी रात्रभर जागरण झाल्याने झोपण्यासाठी रूमवर आलो. गेल्या अकरा दिवसांत शुगर क्युब्सच्या जागी आलेली थोडी जाडसर साखर एवढाच काय तो बदल सोडला तर इथल्या व्यवस्थेत दुसरा काही बदल झालेला आढळला नाही.

*****

चार वाजता रूमची डोअर बेल वाजली. उठून दरवाजा उघडला तर अहमद त्यांच्यासाठी पार्सलची ऑर्डर देताना माझ्यासाठी पण काही खायला मागवायचंय का ते विचारायला आला होता. ईजिप्त मधल्या वास्तव्यात पहिल्या रात्री खाल्ल्यावर आवडल्या मुळे पुढे जवळपास रोजच माझ्या आहारातला महत्वाचा घटक ठरलेले १ फलाफेल सँडविच आणि १ फ्राईड पोटॅटो सँडविच माझ्यासाठी मागवायला सांगितले.
मस्त झोप झाल्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा शीण निघून गेला होता. पार्सल येण्यासाठी २०-२५ मिनिटे तरी लागणार होती. तेवढ्या वेळात अंघोळ वागैरे उरकल्यावर तयारी करून बाहेर पडलो. कॉमन रुममध्ये अहमद, सईद, रिसेप्शनीस्ट मे आणि मानल ह्यांच्यात हॉटेलच्या दैनंदिन कामकाजातल्या समस्यांविषयी चर्चा चालू होती. पाचेक मिनिटांत सँडविचेसचे पार्सल घेऊन डीलेव्हरी बॉय आला.
कॉमन रुमच्या आतल्या भागात असलेल्या मोठ्या डायनिंग टेबलवर सगळ्यांनी एकत्र बसून, मी दुपारचे जेवण म्हणून आणि बाकीच्यांनी संध्याकाळचा नाश्ता म्हणून ती सँडविचेसचे खाल्ली.
कॉमन रूम
मी, रिसेप्शनीस्ट ‘मे’ आणि सईद.
कॉमन रूम.
मी, अहमद आणि सईद.

आज माझा ईजिप्त मधला शेवटचा दिवस असल्याने काही सोव्हेनियर्स वगैरे घ्यायची होती. अशा वस्तुंच एक दुकान हॉटेलच्याच बिल्डींग मध्ये तळमजल्यावर होतं आणि तिथे वस्तूंच्या किमती वाजवी असल्याचे अहमदनी सांगितले असल्याने किरकोळ खरेदी करण्यासाठी खाली उतरलो. काही खास ईजिप्शियन स्टाईलची कि-चेन्स, पेन्स आणि अंगठ्या खरेदी करून मग थोडा वेळ नाईलच्या किनाऱ्यावर भटकून तिथल्या एका बेंचवर जाऊन बसलो. अंधार पडल्यावर तिथून उठून तेहरीर चौकात एक फेरी मारली आणि साडे आठ वाजता मॅक डोनाल्डस मध्ये थोडीशी पोटपूजा करून हॉटेलवर परत आलो.
उद्या संध्याकाळी चार पंचावन्नची परतीची फ्लाईट असल्याने समानाचं फायनल पॅकींग करायला सकाळी वेळ मिळणार होता, त्यामुळे बाकी काही न करता दहा वाजता सरळ झोपून गेलो.
सकाळी सहा वाजता वाजणाऱ्या चर्चच्या घंटेने झोप चाळवली गेली होती पण तिकडे दुर्लक्ष करून आज चांगलं साडे आठ वाजेपर्यंत झोपण्यात यश आले.
ब्रश करून बाहेर पडलो आणि कॉमन रुममध्ये बसून चहा-नाश्ता आणि पुन्हा चहा झाल्यावर मेहमूदला सांगून मला एअरपोर्टला जाण्यासाठी कार बुक करून घेतली आणि तयारी करण्यासाठी रुममध्ये परतलो. पॅकींगचं तसं काही विशेष काम नव्हतं पण पॉवरबँक वगैरे सारख्या वस्तू ज्या कार्गो मध्ये टाकण्यास प्रतिबंध असल्याने त्या वेगळ्या करून काही सामान इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून कार्गो आणि केबिन लगेजच्या वेगवेगळ्या अशा बॅग्ज भरून तयार केल्या. मग अंघोळ वगैरे झाल्यावर तयारी करून साडे अकरा वाजता सामाना सहित कॉमनरूम मध्ये आलो.
निघायला अजून एक तास बाकी होता. तेवढा वेळ सईद आणि मेह्मुद्शी बोलण्यात कसा गेला समजलेच नाही. साडेबारा वाजता माझ्या अलेक्झांड्रीया टूर साठी आलेला मोहम्मदच आज मला एअरपोर्टवर सोडण्यासाठी हजर झाल्यावर सईद, मेहमूद, मे आणि मानलचा निरोप घेऊन आम्ही खाली उतरलो.
अपेक्षेप्रमाणे रस्त्यात भरपूर ट्राफिक लागल्याने एअरपोर्टला पोहोचे पर्यंत पावणे दोन वाजले. त्यानंतर सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन वगैरे सोपस्कार पार पाडून भरपूर लांब असलेल्या बोर्डिंग गेट पाशी पोचलो.
Me फ्लाईट वेळेवर होती. सव्वा चार वाजता बोर्डिंग सुरु झाले आणि नियोजित वेळेवर म्हणजे चार पंचावान्नला विमानाने कैरोहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.
लांबवर दिसणारा १९३ कि.मी लांबीच्या सुएझ कालवा विमानच्या खिडकीतून बघताना फार विलोभनीय वाटत होता. येताना सारखेच जातानाही विमानात दिलेले खाद्यपदार्थ दर्जेदार होते. इन-फ्लाईट एन्टरटेनमेंट ठीकठाक होती. पाच तास वीस मिनिटांचा असलेला हवाई प्रवास वेळेतील फरकामुळे मध्यरात्री पावणेदोन वाजता विमानाचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग झाल्यावर संपुष्टात आला. त्यानंतर बाहेर पडून ओला बुक करून पहाटे सव्वाचारला घरी पोहोचलो.
लहानपणापासून आकर्षित करणाऱ्या ह्या देशातली, बघण्यासाठी नक्की केलेली सर्व ठिकाणे जमिनीवरून, आकाशातून आणि पाण्याखालून पाहता आल्याचे अलौकिक समाधान, अनेक नवीन मित्र-मैत्रिणी, माहिती आणि अनुभव अशी ह्या ईजिप्त भेटीची फलप्राप्ती आहे.
पावलो पावली भेटलेल्या सुस्वभावी आणि मैत्रीपूर्ण लोकांमुळे कुठलाही कटू प्रसंग न घडता केवळ चांगल्या आणि चांगल्याच आठवणींमुळे माझ्यासाठी हि सोलोट्रीप कायम अविस्मरणीय रहाणार आहे.

*****

हि दीर्घ लेखमाला वाचणाऱ्या, प्रतिसादा द्वारे, शंका विचारणाऱ्या, मौल्यवान सूचना देणाऱ्या आणि ती आवडल्याचे आवर्जून कळवून, लिहिते राहण्यासाठी माझा हुरूप वाढवणाऱ्या सर्व मिपाकरांचे मन:पूर्वक आभार.
टीप: वाचकांपैकी कुणाला ईजिप्तला जाण्याची इच्छा असेल आणि कुठलीही अतिरिक्त माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या माझ्या Email Id वर नि:संकोचपणे संपर्क करू शकता.
email
समाप्त

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

 पहाटे पावणे पाचला उठून तयारी झाल्यावर पाच पंचवीसला मी खाली उतरून रिसेप्शन हॉल मध्ये येऊन बसलो. बरोब्बर ठरलेल्या वेळेवर किंवा ५-१० मिनिटे आधीच पिकअप साठी येण्याच्या परंपरेचे पालन करत साडेपाचला एक्सलंट एअर बलून कंपनीचा प्रतिनिधी वईल अहमद आणि ड्रायव्हर हजर झाले.
पुढच्या दोन हॉटेल्स मधून तीन चीनी तरुण आणि एक मुळचे भारतीय पण नोकरीच्या निमित्ताने दक्षिण सुदान मध्ये वास्तव्यास असलेले पंजाबी दांपत्य अशा आणखीन पाच पर्यटकांना पिकअप केल्यावर पाच पंचावान्नला आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मोटरबोटिंच्या धक्क्यावर पोचलो.
कुकीज, स्लाईस केक आणि कॉफी असा अल्पोपहार बोटीत करून झाल्यावर सूर्योदय होत असताना आम्ही पश्चिम किनाऱ्यावर उतरलो.
Sunrise किनाऱ्यापासून फ्लाईंग पॉईंट पर्यंत दुसऱ्या व्हॅनने पोचल्यावर कॅप्टन ‘अदेल अब्देल’ यांनी एकंदरीत प्रवासाचे स्वरूप, अंदाजे लागणारा वेळ आणि सुरक्षेसंबंधी उपायांची माहिती दिली. त्यानंतर काहीवेळाने लुक्झोर एअरपोर्टच्या नियंत्रण कक्षाकडून वायरलेस संचावर उड्डाणासाठी परवानगी मिळाली आणि आमच्या बलूनने अलगदपणे जमिनीशी फारकत घेतली.
पुरातत्व खात्याशी संबंधित संस्थेने मे १९८२ मध्ये कॅलिफोर्निया मधील एका कंपनीकडून व्हॅली ऑफ द किंग्स, व्हॅली ऑफ क्वीन्स तसेच परिसरातील ईतर प्राचीन मंदिरे आणि वास्तूंचे सर्वेक्षण, छायाचित्रण आणि अद्ययावत नकाशा तयार करण्याच्या उद्देशाने दोन बलून्स भाड्याने घेऊन पहिल्यांदा लुक्झोर वेस्ट बँक वर उड्डाण केले होते. ह्या कामात चांगले यश मिळाल्याने संस्थेने त्यातला एक बलून विकत घेऊन त्याच्या मदतीने काही अदृश्य झालेली ठिकाणेही शोधून काढली. अशाप्रकारे एका विशिष्ठ हेतूने ह्या ठिकाणी सुरु झालेल्या बलून फ्लाईटस, पुढच्या काळात अनेक बलून कंपन्यांनी प्रवासी सेवा देण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या आहेत.
मंद वेगात सुरु असलेला हवाई प्रवास चांगल्या हवामानामुळे आल्हाददायक वाटत होता. एका बाजूला थोडी लांबवर दिसणारी नाईल नदी, तिच्या किनाऱ्याला लागून दिसणारी हिरवीगार शेतं आणि शेतकऱ्यांची घरे तर दुसऱ्या बाजूला वाळवंट, टेकड्या आणि डोंगर. मध्ये दिसणारे हाबू टेम्पल, प्राचीन वर्कमन्स व्हिलेज चे अवशेष, हॅतशेपस्युत टेम्पल, फ्रेंच पुरातत्व संशोधकांची वसाहत, अमेनहोटेप III चा राजवाडा आणि मंदिर व तुतअंखअमुन च्या मंदिराचे भग्नावशेष तसेच डोंगरात लांबवर दिसणारी व्हॅली ऑफ द क्वीन्स, जमिनीवरून ट्रक मधून आमचा पाठलाग करणारा बलून कंपनीचा ग्राउंड स्टाफ आणि आमची व्हॅन अशा सगळ्या गोष्टी ५०० ते ६०० मीटर्सच्या उंचीवरून बघायला मस्त वाटत होते.
       बलून कंपनीच्या व्हीडीओग्राफरने चित्रित केलेला २२ मिनिटांचा आणि मी चित्रित केलेले काही व्हीडीओज एकत्रित करून त्यांचा एक आठ मिनिटे आणि चाळीस सेकंदांचा संक्षिप्त व्हीडीओ खाली देत आहे.

कधीच संपू नये असे वाटणारा हा प्रवास सुमारे पन्नास मिनिटांनी संपुष्टात आला आणि बलूनची बास्केट जमिनीवर टेकली. इतकावेळ आमच्या सहित उंच आकाशात दिमाखात भ्रमण करणारा तो महाकाय बलून त्यातली हवा काढण्यात आल्यावर मलूल होऊन खाली कोसळताना बघणे मात्र नक्कीच सुखावह नव्हते. बलून कंपनीचा ग्राउंड स्टाफ बलूनची घडी करून तो ट्रक मध्ये चढवण्यात गुंतलेला असताना पावणे आठ वाजता आम्ही व्हॅन मध्ये बसून परतीच्या प्रवासाला निघालो. मला वेस्ट बँक वरची पुढची टूर करायची असल्याने कुठे उतरवायचे ह्याची सूचना हुसेनने वईल अहमदला फोन करून दिली होती, त्याप्रमाणे मला पश्चिम किनाऱ्यावरच्या ‘कॉलोसी ऑफ मेमनोन’ (Colossi of Memnon) च्या समोर सोडून बाकीची मंडळी निघून गेली.
‘कॉलोसी ऑफ मेमनोन’ म्हणजे ई.स.पूर्व चौदाव्या शतकात ह्याठिकाणी बांधलेल्या परंतु आता फक्त अवशेष रुपात उरलेल्या अमेनहोटेप III च्या मंदिराच्या प्रवेशद्वारा बाहेर स्थापन केलेले, १८ मीटर्स (६० फुट) उंचीचे आणि प्रत्येकी ७०० टन वजनाचे, सिंहासनावर बसलेल्या अमेनहोटेप III चे बरीच पडझड झालेले दोन अवाढव्य दगडी पुतळे. उत्खननात सापडलेले पुतळ्यांचे उर्वरित भाग त्यांना पुन्हा जोडण्याचे काम सुरु आहे. वेस्ट बँक वरच्या साईट सीईंग मधला पहिला थांबा असलेल्या ह्या ठिकाणी इमाद आणि ईतर मंडळी साडेआठ वाजता पोहोचे पर्यंत हे दोन भव्य पुतळे बघण्यात वेळ छान गेला.
Collossi1
Collossi2 पावणे नऊ वाजता तिथून निघून पाच-सात मिनिटांत जवळच असलेल्या हाबू टेम्पलला आम्ही पोचलो. कैरोहून आलेले ३ ईजिप्शियन युवक, २ स्पॅनिश बहिणी, एक कोरीयन विद्यार्थी, एक आर्जेन्टिनाचा, एक जपानचा आणि मी असे चार एकटे प्रवासी, गाईड इमाद आणि ड्रायव्हर रहीम असा एकूण ११ जणांचा ग्रुप होता. इमादने तिकीट खिडकीवर जाऊन आमची प्रत्येकी ६० पाउंडस ची तिकिटे आणली आणि आम्ही सुरक्षा तपासणी पार पाडून मंदिरात प्रवेश केला.
entry habu
प्राचीन काळी अमुन देवाचे प्रकट स्थान मानले जाणारे आणि ‘मेदिनेत हाबू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या स्थानावर हॅतशेपस्युत आणि थुतमोस III ह्या आधीच्या फॅरोहनी बांधलेल्या अमुनच्या मंदिर परिसरात ई.स.पूर्व बाराव्या शतकात विसाव्या राजवंशातला दुसरा फॅरोह रॅमसेस III ह्याने अबू सिंबेल येथील रॅमसेस II च्या मंदिरावरून प्रेरणा घेऊन स्वतःचे स्मारक म्हणून बांधलेले हे मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. भूमध्य समुद्रातून बोटींनी येऊन राज्यावर हल्ला करणाऱ्या समुद्री लोकांशी (Sea People) झालेल्या युद्धात विजय मिळवल्यावर त्या युद्धात रथावर आरूढ होऊन लढतानाची प्रसंग चित्रे आणि त्या युद्धाचे वर्णन बाह्य भिंतींवर कोरलेले आहे. तसेच अंतर्भागातील भिंती, खांबांवर आणि छतावर अत्यंत सुंदर रंगीत शिल्पे आहेत.
   हे भव्य मंदिर पाहून आम्ही पावणे दहा वाजता इथून सात कि.मी. अंतरावर असलेली व्हॅली ऑफ द किंग्स बघण्यासाठी निघालो.
मृत्यू पश्चात ममी तयार करून मृतदेहाचे जतन करण्यासाठी अति प्राचीन काळी मृताचा अनंतकालीन निवारा म्हणून मस्तबा बांधले जात होते. त्यानंतर ई.स.पु. २७ व्या शतकात मस्तबा पेक्षा आकाराने भव्य आणि सुरक्षित म्हणून पिरॅमिडस बांधायला सुरुवात झाली.
मस्तबा आणि पिरॅमिड दोन्ही पद्धतीत शवपेट्या आणि मृताला अर्पण केलेल्या वस्तू भूमिगत खोल्यांमध्ये ठेवल्या जात असल्या तरी वरचे जमिनीवरील बांधकाम दृश्य स्वरुपात असे. त्यामुळे त्यांना खिंडार पाडून किंवा भुयार खणून आतला ऐवज लुटण्याच्या अनेक घटना त्याकाळी सुद्धा घडत होत्या.
अशा लुटमारीच्या प्रकारांना आळा घालून मृताचा अनंतकालीन निवारा सुरक्षित ठेवण्यासाठी पुढच्या काळात म्हणजे ई.स.पु. सोळाव्या ते अकराव्या व्या शतकात, अठरा, एकोणीस आणि विसाव्या राजवंशातील फॅरोह आणि त्यांच्या परिवारा साठी आजच्या लुक्झोर पण त्याकाळी थीब्ज नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजधानीच्या शहरात नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या पर्वत रांगांमध्ये खडकात भूमिगत टोंब खोदण्यास सुरुवात झाली. राजांसाठी असलेली दफनभूमी ‘व्हॅली ऑफ द किंग्स’ तर राण्यांसाठी असलेली दफनभूमी ‘व्हॅली ऑफ द क्वीन्स’ म्हणून ओळखली जाते.
दहाच्या सुमारास व्हॅली ऑफ द किंग्सच्या पर्यटक केंद्रात पोचलो. ह्या पर्यटक केंद्राचा भव्य असा वातानुकुलीत हॉल फार छान आहे. प्रवेश केल्यावर समोरच जपानने भेट दिलेले व्हॅली ऑफ द किंग्सचे काचेचे मॉडेल प्रेक्षणीय आहे. तसेच भिंतींवर फ्रेम करून लावलेले अनेक जुने फोटो माहितीदायक आहेत.
Model
आम्ही हॉलचे निरीक्षण करत असताना इमादने आमची तीन टोंब बघण्यासाठी असलेली प्रत्येकी १६० पाउंडसची आणि आत जाण्यासाठी तेथे असलेल्या दोन डब्यांच्या छोट्या ट्राम ची प्रत्येकी ५ पाउंडस किमतीची तिकिटे काढून आणली.

Entry VK

Tram
Tram 2
व्हॅली ऑफ द किंग्स मध्ये आतापर्यंत एकूण ६२ लहान-मोठे टोंब सापडले असून त्याना KV 1 ते KV 62 असे क्रमांक दिले आहेत. त्यापैकी ३८ टोंब हे कुठल्या फॅरोहचे अथवा त्याच्या परिवारातील व्यक्तींचे आहेत ह्याची ओळख पटली आहे तर अजूनही बऱ्याचशा टोंबची ओळख पटलेली नाहीये. काही एकच खोली असलेले अगदीच लहान आकाराचे टोंब देखील आहेत पण त्यांना क्रमांक दिले नाहीयेत, ते A, B, C वगैरे अक्षरांनी ओळखले जातात.
व्हॅली ऑफ द किंग्स मधील टोंब चा नकाशा.
Map

ओळख पटलेल्या टोंब मध्ये इतिहासात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या हॅतशेपस्युत, अमेनहोटेप III, थुतमोस III सेटी I, रॅमसेस II, रॅमसेस III सारख्या पराक्रमी आणि कर्तबगार फॅरोहचे तसेच वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी सिंहासनावर बसवण्यात आलेल्या आणि १९ व्या वर्षी अकाली निधन पावलेल्या अल्पायुषी बाल फॅरोह ‘तुतअंखअमुन’ आणि त्याच्या मृत्यू नंतर स्वतः फॅरोह झालेला त्याचा प्रमुख सल्लागार ‘आय’ (Ay) ह्यांचे टोंब आहेत.
ईजिप्तचे नाव निघाले कि सर्वात पहिले पिरॅमिडस, स्फिंक्स, नाईल नदी आणि तुतअंखअमुन (ज्याचा उच्चार तुतंखअमुन / तुतनखामून / तुतनखमून / तुतनखामेन आणि आणखीही काही वेगळ्या प्रकारे केला जातो.) ह्या गोष्टी आठवतात. परंतु तुतअंखअमुन हे नाव जगप्रसिद्ध झाले ते १९२२ साली हॉवर्ड कार्टर नावाच्या इंग्रज पुरातत्व शास्त्रज्ञाने त्याच्या न लुटल्या गेलेल्या टोंबचा शोध लावल्या नंतर, पुढची १० वर्षे त्यात सापडत गेलेल्या अतिशय मूल्यवान वस्तूंमुळे. आता त्याच्या टोंब मध्ये त्याची जीर्ण अवस्थेतली ममी सोडून बाकी काही ठेवलं नाहीये. एकूण ५३९८ वस्तू त्याच्या टोंब (KV 62) मध्ये सापडल्या ज्यात त्याचा ११ किलो सोन्याचा ममी मास्क, सोन्याचे आवरण चढवलेली त्याच्या ममी ची पेटी, खेळणी, मुर्त्या, पुतळे, वाद्ये, लाकडी पेटारे, खुर्च्या, सिंहासन, वाईन, भांडी, कपडे, पादत्राणे, हत्यारे आणि शाही दागिने, अशा अनेक गोष्टींचा समावेश असून त्यातल्या काही सध्याच्या कैरो मधल्या ईजिप्शियन म्युझियम मध्ये बघायला मिळतात तर उर्वरित वस्तू २०१८ अखेरपर्यंत सुरु होणाऱ्या गिझा मधील नवीन ग्रँड ईजिप्शियन म्युझियम (GEM) मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
       याठिकाणी ६२ बघण्यायोग्य टोंब असले तरी ते सगळे रोज बघण्यासाठी खुले नसतात, रोटेशन पद्धतीने काही खुले तर काही बंद ठेवले जातात. साधारण एन्ट्री तिकिटावर त्या दिवशी खुल्या असलेल्या टोंब पैकी कुठलेही तीन टोंब बघता येतात अपवाद ‘सेटी I’, ‘रॅमसेस VI’, ‘तुतअंखअमुन’ आणि ‘आय’ ह्यांचे टोंब. ते बघण्यासाठी भरमसाठ किमतीची वेगळी तिकिटे काढावी लागतात. तुतअंखअमुनचा टोंब बघण्यासाठी तर १००० पाउंडसचे तिकीट होते. पण ह्याचा अर्थ असा नाही कि हे टोंब फारच सुंदर किंवा त्यातल्या वस्तू खूप मूल्यवान आहेत म्हणून त्यांची प्रवेश फी वेगळी आहे, तर त्या टोंबची अवस्था विशेष चांगली नसल्याने त्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या नियंत्रित करून पर्यटक आणि टोंब दोघांच्या सुरक्षेसाठी योजलेला तो एक उपाय आहे. शक्यतो पुरातत्व शास्त्रज्ञ, त्या शाखेचे विद्यार्थी आणि अपवादाने एखाद दुसरा पर्यटक त्याठिकाणी जातात.
     आकाराने लहान मोठे असले तरी जवळपास सर्व टोंबची रचना सारखीच आहे. खाली उतरत जाणारा जिना, त्यापुढे दोन्ही बाजूला काही खोल्या असलेली एक सरळ किंवा डाव्या उजव्या बाजूला वळलेल्या अनेक लांब उताराच्या मार्गिका, मध्ये मध्ये अनेक खोल खंदक, अर्पण केलेल्या वस्तू ठेवण्यासाठी खोल्या आणि सर्वात शेवटच्या खोलीत ममी ठेवण्यासाठी दगडी शवपेटी. काही टोंब मधल्या सर्व मार्गिका, खोल्यांच्या भिंती आणि छतावर सुंदर रंगीत कोरीव काम आणि देवी-देवांची चित्रे रंगवली आहेत तर काहींच्या फक्त शेवटच्या शवपेटी असलेल्या खोल्याच सुशोभित केल्या आहेत.
    KV 5 हा रॅमसेस II च्या मुलांच्या दफनासाठी खोदलेला टोंब इथला सर्वात मोठा टोंब आहे. अनेक मार्गिका आणि १३० खोल्या आत्तापर्यंत आढळून आल्या आहेत पण त्यांची संख्या अजून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते.
     गाईडना टोंबच्या आत प्रवेश नसल्याने इमादने आम्हाला कुठले कुठले टोंब बघता येतील याविषयी माहिती दिली आणि बघून झाल्यावर पुन्हा पर्यटक केंद्रात एकत्र भेटण्याची सूचना देऊन तो निघून गेला.
      त्यादिवशी आम्हाला रॅमसेस II चा १३ वा मुलगा फॅरोह मेरेनटाह (Merenptah) चा KV 8, रॅमसेस IX चा KV 6 आणि अद्ज्ञात व्यक्तीचा KV 56 हा छोटा टोंब बघता आला. तिघांतल्या KV 8 टोंबची अबू सिंबेलला भेटलेल्या ‘कॉस्वे’ कडून नंतर मिळवलेली काही छायाचित्रे खाली देत आहे. सगळ्या टोंब मध्ये फोटोग्राफी निषिद्ध आहे, साध्यावेशातले सुरक्षा रक्षक फोन किंवा कॅमेरा हातात दिसला कि लगेच तो आत ठेवायला सांगतात परंतु त्याने कशीतरी ती काढण्यात यश मिळवले होते.
Tomb

Tomb 
दगडी शवपेटी आणि तिचे आतले झाकण.
Tomb 
शवपेटीचे बाहेरचे झाकण. ह्याच्या खाली आरसा लावला आहे . आतल्या झाकणावर जशी वरच्या बाजूला फॅरोह ची आकृती कोरली आहे अगदी तशीच ह्या झाकणाच्या आत ती खोलगट आकारात कोरली आहे जेणेकरून दोन्ही झाकणे एकात एक घट्ट बसतील.

Tomb

Tomb

Tomb 
भिंती , छत आणि मार्गिकेची सजावट
तिन्ही टोंब बघून बाराच्या सुमारास सगळे ग्रुप मेम्बर्स पर्यटक केंद्राच्या हॉल मध्ये जमल्यावर त्या छोट्या ट्रामने आम्ही हॅतशेपस्युत टेम्पलला जायला निघालो. तिथे पोचल्यावर इमाद आमची प्रत्येकी ८० पाउंडस किमतीची तिकिटे घेऊन आला.
Entry Hatshepsut


Hatshepsut-1
प्राचीन ईजिप्तच्या पुरुषप्रधान संस्कृतीत आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने आणि सुशासनाने इतिहासात स्वतःचा ठसा उमटवणारी अठराव्या राजवंशातली महिला फॅरोह हॅतशेपस्युत हिने ई.स.पूर्व १४७३ ते १४५८ ह्या तिच्या शासन काळात स्वतःचे स्मारक म्हणून हे मंदिर बांधले. लांबून हे मंदिर बघताना ते डोंगरात कोरल्या सारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते कोरलेले नसून बांधलेले आहे. हॅतशेपस्युत अमुन देवाची उपासना करतानाची अनेक भित्तीशिल्पे या मंदिरात होती.
हॅतशेपस्युतच्या मृत्युनंतर फॅरोह झालेला तिचा सावत्र मुलगा थुतमोस III ह्याने तिच्याविषयी असलेल्या पराकोटीच्या द्वेषातून हॅतशेपस्युतचे नाव इतिहासातून मिटवून टाकण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याचा फटका ह्या मंदिरालाही बसला. तिच्या मुर्त्या, कर्तुश आणि शिल्पांची त्याने विटंबना केली. त्याच्या मनातला हॅतशेपस्युत बद्दलचा द्वेष सोडला तर इतिहासात त्याचीही एक पराक्रमी आणि कर्तबगार फॅरोह म्हणूनच नोंद झाली आहे.
पुढच्या काळात फॅरोह आखेनातेन (Akhenaten) म्हणजे तुतअंखअमुन चे पिता ह्यांनी एकेश्वरवादी भूमिका स्विकारून ‘अतेन’ सोडून ईतर कुठल्याही देवांची उपासना करण्यावर बंदी आणली. ह्या मंदिरात अमुन देवाची शिल्पे असल्याने त्यांच्या आदेशाने त्या शिल्पांची नासधूस केली गेली. (तुतअंखअमुन फॅरोह झाल्यावर त्याने सल्लागार ‘आय’ (Ay) च्या सल्ल्याने हि बंदी उठवली आणि प्रजेत वाढलेला असंतोष दूर केला. तसेच त्याचे मुळचे नाव तुतअंखअतेन होते त्यातील ‘अतेन’ देवाचे नाव काढून ‘अमुन’ देवाचे नाव जोडले आणि ते बदलून तुतअंखअमुन असे केले.)
ई.स. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर मग रोमन लोकांनी उरलेल्या शिल्पांची विटंबना करून ह्या मंदिराचा चर्च म्हणून वापर करायला सुरुवात केली होती.
हॅतशेपस्युतच्या मंदिराचे काही फोटोज.
तीन वेळा मानवी अत्याचारांचा सामना केलेले हे दुमजली मंदिर १८९१ सालापासून सतत उत्खनन आणि रिस्टोरेशनचे काम सुरु असल्याने आज जवळपास सगळेच नव्याने बांधले गेले आहे.
रिस्टोरेशन होण्या पूर्वीचा मंदिराचा फोटो.
Hatshepsut
एक वाजता हे मंदिर बघून ट्रामने समोरच्या पार्किंग लॉट मध्ये आल्यावर व्हॅन मध्ये बसून आम्ही पुढचे ठिकाण अलाबस्टर फॅक्टरीला भेट देण्यासाठी निघालो.
Hatshepsut-1
संगमरवरा सारखा दिसणारा आणि तीन रंगात मिळणाऱ्या अलाबस्टर दगडापासून हाताने वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा कारखाना आणि त्यांची विक्री करणारे शोरूम असे त्या फॅक्टरीचे स्वरूप होते.
आत गेल्यावर मस्त थंडगार करकाडे पेय देऊन आमचे स्वागत केले गेले. इतकावेळ कडक उन्हात फिरल्यावर ते स्वादिष्ट पेय प्यायल्यावर जीवाला शांती लाभली.
अगदी बोटभर उंचीच्या अलाबस्टर दगडापासून बनवलेल्या मूर्तींपासून दीड-दोन फुटांच्या लँप शेड पर्यंत शेकडो सुंदर पण प्रचंड महाग वस्तू तेथे विक्रीसाठी ठेवल्या होत्या. आमच्या ग्रुपमधील कोणीही काहीही खरेदी न करता तिथून बाहेर पडलो आणि दोन वाजता पूर्व किनाऱ्यावर जाण्यासाठी असलेल्या बोटींच्या धक्क्या जवळच्या क्रोकोडाईल रेस्टॉरंट मध्ये दुपारचे जेवण करण्यासाठी आलो. ईजिप्शियन युवकांना लगेच कैरोला जाण्यासाठी निघायचे असल्याने ते तिघे जेवणासाठी न थांबता मोटरबोटीत बसून निघून गेले.
ईस्टर जवळ आल्यावर इथले बरेच ख्रिस्चन लोकं काही दिवस शाकाहार करतात म्हणून ह्या रेस्टॉरंट मध्ये त्यादिवशी बटाट्याची रस्सा भाजी आणि खुबुस असा शाकाहारी मेनू उपलब्ध होता. अर्थात इमाद ख्रिस्चन असल्याने त्यानेच हि माहिती मला दिल्यावर मग आम्ही दोघांनी तेच पदार्थ मागवून खाल्ले आणि बाकीच्या मंडळींनी बुफे लंचचा आस्वाद घेतला.
जेवण झाल्यावर बाहेर पडल्यावर सगळ्यांचा आळीपाळीने ग्रुप फोटो काढण्याचा कार्यक्रम पार पडला. दोन मोहम्मद आणि एक अहमद असे तिघे ईजिप्शियन, दर १५-२० मिनिटांनी दोन सिगरेट पेटवून त्यातली एक ‘जेड’ ला देणारी ‘क्लारा’ ह्या दोघी स्पॅनिश बहिणी, बॉब मार्ले चा भक्त म्हणता येईल एवढा निस्सीम चाहता जपानी ‘ईचीरो’, शांत मितभाषी कोरीयन ‘जुम’, दिसायला साधासुधा पण खूप बडबड्या अर्जेन्टिनाचा ‘थॉमस’. ग्रुप मध्ये सगळी अशी उत्साही मंडळी असल्याने आजची वेस्ट बँक वरची टूर खूप छान झाली होती.
group
मी, जेड, क्लारा, गाईड इमाद, ड्रायव्हर रहीम, आणि जुम पाठीमागे मागे हात उंचावलेला ईचीरो आणि त्याच्या शेजारी थॉमस

चालत सगळे जण समोरच्या धक्क्यावर आलो आणि बोटीत बसून पूर्व किनाऱ्यावर पोचलो. तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्हॅन मधून सव्वा तीनला मला माझ्या हॉटेलवर सोडून बाकीची मंडळी ईस्ट बँक वरची टूर करण्यासाठी निघून गेली. रूमवर आल्यावर उद्या हुरघाडाला प्रस्थान करायचं असल्याने पहिले सामानाची आवरा आवर करायला घेतली. दोन्ही बॅग्ज भरून तयार केल्यावर लोळत पडलो असताना साडे चारच्या आसपास झोप लागली. साडेपाचला जाग आली ती मोहम्मदचा फोन आल्याने. कशी झाली टूर वगैरे चौकशी झाल्यावर तो सहा वाजता हॉटेलवर येत असल्याचे त्याने सांगितले.
आज उन्हात फारच भटकंती झाल्याने परत आंघोळ करून तयारी केली आणि सहा वाजता मोहम्मद हॉटेलवर पोचल्याचे सांगणारा त्याचा फोन आल्यावर खाली उतरलो.
आता एक महत्वाचे काम उरकायचे होते. उद्या सकाळी हुरघाडाला जाण्यासाठी ‘गो बस’ चे तिकीट बुक करायचे होते. ऑनलाईन बुक करण्याचा प्रयत्न केला होता पण माझा भारतातला फोन नंबर इथे बंद होता त्यामुळे बँकेचा OTP येत नसल्याने ते शक्य झाले नाही. लुक्झोर स्टेशन जवळ असलेल्या ‘गो बस’ च्या ऑफिस मध्ये मोहम्मद मला घेऊन गेला आणि मी सकाळी साडे-आठच्या बसचे तिकीट काढले.
आता काहीच काम नसल्याने एके ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही चालत मार्केट मध्ये थोडावेळ फिरलो. साडेसात पर्यंत उगाच इकडे तिकडे भटकून वेळ घालवल्यावर रात्रीच्या जेवणासाठी गुगलवर शोधून ठेवलेल्या ‘टेस्ट ऑफ इंडिया & अरेबिया’ नावाच्या भारतीय जेवण मिळणाऱ्या रेस्टॉरंटच्या दिशेने आम्ही निघालो.
‘रसेल’ नावाच्या ब्रिटीश नागरिकाच्या मालकीचे, छान सजावट केलेले हे रेस्टॉरंट काही महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या अकाली मृत्युनंतर आता बिशो नावाचा व्यवस्थापक आणि अहमद नावाचा शेफ मिळून चालवत होते. ‘सक्कारा’ नावाची ईजिप्शियन बीअर ऑर्डर करून ती आरामात बसून संपवल्यावर पनीर टिक्का मसाला, बटर नान, दाल तडका आणि जीरा राईस हे पदार्थ थोडे मसालेदार बनवण्याची खास सूचना शेफ अहमदला दिली. जेवण अप्रतिम बनले होते, अहमदने दाल तडका मध्ये हिरव्या मिरच्या सढळ हस्ते वापरल्या होत्या. दोनच घास खाल्ल्यावर मोहम्मदच्या नाका-डोळ्यात पाणी आले. तुम्ही भारतीय लोकं कसे काय एवढे तिखट खाता, आम्ही अरब जर असं जेवण चार दिवस जेवलो तर मरून जाऊ वगैरे त्याची बडबड चालू होती. अखेर हाय हुय करीत त्याचे जेवण संपल्यावर आईस्क्रिम खाऊन आम्ही तिथून निघालो तेव्हा नऊ वाजत आले होते.
सव्वा नऊला मला हॉटेलवर सोडल्यावर सकाळी आठला मला ‘गो बस’च्या ऑफिसवर सोडण्यासाठी येतो असे सांगून मोहम्मद माझा निरोप घेऊन घरी निघून गेला.
रूमवर आल्यावर थोडावेळ बायकोशी व्हॉट्सॲप वर गप्पा मारून दिवसभरातले निवडक फोटो वगैरे पाठवून झाल्यावर साडे दहा च्या सुमारास झोपलो.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

 रात्री लवकर झोपलो असल्याने सकाळी जाग पण लवकरच आली. फोन वर वेळ बघितली तर सात वीस झाले होते. आज फक्त आरामच करायचा असल्याने एवढ्या लवकर उठून काय करायचे म्हणून परत झोपायचा थोडा प्रयत्न केला, पण झोप काही लागली नाही. ह्या हॉटेलमध्ये पण ब्रेकफास्ट सकाळी आठलाच सुरु होत असल्याने सव्वा आठला तळमजल्यावर असलेल्या इन-हाउस रेस्टॉरंट मध्ये पोचलो.
हमादा नावाचा एक आफ्रिकन वंशाचा तरुण आणि त्याच्या मदतीला दुपारचं कॉलेज सांभाळून सकाळ-संध्याकाळ इथे पार्ट टाईम नोकरी करणारा खालिद नावाचा मुलगा ह्या रेस्टॉरंटची व्यवस्था बघत होते. हमादाने आणलेला नाश्ता करत असताना खालिद शेजारी उभा राहून माझ्याशी गप्पा मारत होता. किती दिवस मुक्काम आहे आणि इथे काय काय बघणार आहात वगैरे चौकशा केल्यावर त्याच्या वयाला साजेश्या ठिकाणी, म्हणजे नाईट क्लबला जरूर भेट देण्याची त्याने शिफारस केली आणि आणि जायचं असल्यास माझ्याबरोबर येण्याची तयारीही दर्शवली.
रेस्टॉरंटच्या मागे असलेल्या हॉटेलच्याच स्विमिंग पूल मध्ये काही पर्यटकांची दंगामस्ती चालू होती. मी पण तिथे जाऊन थोडावेळ डुंबावं अशी सूचना खालीदने केली पण आज मी कुठेच बाहेर जाणार नसल्याने आत्ता नं जाता संध्याकाळी जाईन असे त्याला सांगून तिथून निघालो आणि परत रूममध्ये आलो.
आत्तापर्यंत ईजिप्त मध्ये वास्तव्य केलेल्या कैरो आणि अस्वान मधल्या हॉटेल्सपेक्षा, छान मोठी रूम, किंग साईझ बेड, प्रशस्त बाथरूम, नाश्ता व जेवण मिळणारं इन-हाउस रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल अशा सर्व सोयी-सुविधांनी हे हॉटेल परिपूर्ण होते.
संपूर्ण दिवस मोकळा असल्याने इथेही अस्वान प्रमाणेच मस्तपैकी बाथटब मध्ये पडून राहून शाही स्नान वगैरे झाल्यावर ११:०० वाजता माहरुसला फोन केला. त्याने किती वाजता प्रतिनिधी पाठवू अशी विचारणा केली. मी आज दिवसभर रूमवरच थांबणार असल्याने कधीही प्रतिनिधी पाठव असे त्याला सांगितल्यावर, १२:०० वाजता हुसेन नावाच्या व्यक्तीला पाठवत असल्याचे त्याने सांगितले.
वेळ घालवण्यासाठी टी.व्ही. वर लागलेला ‘किल-बिल’ हा रक्तरंजित हाणामारीचा चित्रपट पहात असताना ११:५५ ला हुसेनचा तो खाली रिसेप्शन हॉल मध्ये माझी वाट बघत असल्याचे सांगणारा फोन आला.
खाली येऊन त्याला भेटल्यावर त्याने माझ्याकडे उपलब्ध असलेला वेळ आणि मी भेट देण्यासाठी नक्की केलेल्या ठिकाणां बद्दल विचारले. मला ईस्ना टेम्पल, लुक्झोर टेम्पल, कर्नाक टेम्पल, व्हॅली ऑफ किंग्स, हॅतशेपस्युत टेम्पल, हाबू टेम्पल आणि हॉट एअर बलून फ्लाईट करायची असल्याचे त्याला सांगितले.
उद्या सकाळी म्हणजे, ७ मार्चला टॅक्सी किंवा टूरिस्ट कारने इथून जवळपास साठ कि.मी. वर असलेले ईस्ना टेम्पल बघून बारा-साडे बारा पर्यंत परत येऊन, दुपारचे जेवण आणि थोडावेळ आराम केल्यावर तीन वाजताची ईस्ट बँक वरची कर्नाक टेम्पल आणि लुक्झोर टेम्पलचा समावेश असलेली हाफ डे सीट-इन-कोच टूर करावी.
त्यानंतर परवा म्हणजे ८ मार्चला पहाटे साडे पाच वाजता निघून हॉट एअर बलून फ्लाईट झाल्यावर हाबू टेम्पल, व्हॅली ऑफ किंग्स आणि हॅतशेपस्युत टेम्पलचा समावेश असलेली सकाळची हाफ डे सीट-इन-कोच टूर करावी असा कार्यक्रम हुसेनने तयार करून दिला.
माझ्या निवडीच्या सर्व गोष्टींचा समावेश असलेला हा कार्यक्रम मला पटला, आणि मी त्याला ईस्ना टेम्पल साठी त्याने सांगितलेला प्रायव्हेट टूरचा रेट अवाजवी वाटल्याने ती सोडून. बलून फ्लाईट आणि दोन्ही हाफ डे टूर साठीचे माझे बुकिंग कन्फर्म करण्यास सांगितले.
निघताना हुसेनने त्याचा एक मित्र नोकरी सांभाळून फावल्या वेळेत स्वतःची टॅक्सी चालवत असून तो तुम्हाला कमी भाड्यात ईस्ना टेम्पलला नेऊन आणू शकेल, जर तुमची इच्छा असेल तर त्याला फोन करून विचारुया का? अशी विचारणा केली. मी होकार दिल्यावर त्याने मोहम्मद नावाच्या त्याच्या मित्राला फोन केला आणि त्याला हॉटेलवर येण्यास सांगितले.
मोहम्मदला इथे पोचण्यासाठी १०-१५ मिनिटे लागणार असल्याने हुसेनच्या सूचनेनुसार तोपर्यंत वेळ काढण्यासाठी हॉटेलसमोर असलेल्या शिशा पार्लर मध्ये जाऊन बसलो. माझा चहा आणि हुसेनचा हुक्का संपत आला असताना पांढऱ्या आणि निळ्या रंगाची थोडी जुनाट टॅक्सी घेऊन मोहम्मद हॉटेलबाहेर पोचलेला दिसल्यावर हुसेनने त्याला हाक मारून पार्लर मध्ये बोलावले.
दिसायला थोडाफार, पण आवाज मात्र हुबेहूब आपल्या नसिरुद्दीन शाह सारखा असलेला हा मोहम्मद, कष्टाळू माणूस होता. लुक्झोर एअरपोर्ट वर ईजिप्त एअरचा ग्राउंड स्टाफ म्हणून कार्यरत असलेला हा गडी, बायको आणि चार मुले असे सहाजणांचे कुटुंब चालवताना अतिरिक्त कमाई करण्यासाठी फावल्या वेळात, त्याच्या वडलांच्या निधनानंतर त्यांची टॅक्सी चालवत होता. त्याने सांगितलेले भाडे वाजवी असल्याने त्याच्याबरोबर ईस्ना टेम्पलला जाण्याचे नक्की केले. सध्या त्याची रात्रपाळी सुरु असल्याने उद्या सकाळी आठ वाजता ड्युटी संपवून तो थेट साडे आठला मला पिक-अप करायला येणार होता.
ठरलेल्या दराच्या अर्धी रक्कम हुसेनला ॲडव्हांस देऊन त्या दोघांचा निरोप घेऊन मी रूमवर परतलो. टी.व्ही. बघत ऑफिसच्या इमेल्सना उत्तरे देत थोडावेळ घालवून अडीच वाजता रूम सर्व्हिसला फोन करून हक्का नुडल्स मागवून खाल्ले आणि मग साडे चार वाजेपर्यंत झोप काढल्यावर खाली स्विमिंग पूलमध्ये जायला निघालो.
कमाल खोली चार फुट असल्याने माझ्यासारख्या कामचलाऊ पोहता येणाऱ्यांसाठी आदर्श अशा त्या स्विमिंग पूलमध्ये तास-सव्वा तास डुंबण्यात गेल्यावर रूमवर येऊन शॉवर घेतला. आइस एज: कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आणि डाय हार्ड असे कितीही वेळा बघितले तरी कंटाळा न येणारे दोन पिक्चर्स पाठोपाठ बघताना साडे नउ वाजता चीज पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड मागवून खाल्ले आणि पिक्चर संपल्यावर सकाळी सव्वा सात चा अलार्म लाऊन साडे दहाच्या आसपास झोपलो.


*****





सकाळी सव्वा सातला उठून तयार होऊन आठ वाजता नाश्ता करण्यासाठी खाली उतरलो. नाश्ता झाल्यावर चहा पीत असताना आठ पंचवीसला मोहम्मदचा तो हॉटेलच्या बाहेर उभा असल्याचे सांगणारा फोन आला. चहा संपवून बाहेर पडल्यावर गाडीत जाऊन बसलो आणि ईस्ना टेम्पलच्या दिशेने ६० कि.मी. चा प्रवास सुरु झाला.

Map

लुक्झोर मधून बाहेर पडल्यावर शेतीबहूल भागातून प्रवास करत नाईल वरचा एक भला मोठा पूल पार करून १० वाजता आम्ही ईस्ना शहरात पोचलो. पुलाच्या खाली ५-६ क्रुझ शिप्स उभी होती.
प्राचीन काळात ईजिप्त आणि सुदान मध्ये उंटांवर माल लादून खुश्कीच्या मार्गाने ये-जा करणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांच्या तांड्यांसाठी विश्रांती थांबा म्हणून ईस्ना (एस्ना) हे छोटे शहर प्रसिध्द होते. नाईल मधून लुक्झोर ते अस्वान दरम्यान प्रवास करणाऱ्या क्रुझ शिप्स साठी क्रॉसिंग पॉईंट याठिकाणी असल्याने सगळी क्रुझ शिप्स इथे नांगर टाकून पुढचा मार्ग मोकळा मिळण्यासाठी सिग्नलची वाट पहात थांबतात.
मंदिराच्या अगदी जवळ गाडी नेणे शक्य नसल्याने थोडे आधीच मी खाली उतरून प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत निघालो. मोहम्मद मी परत येईपर्यंत जिथे गाडी लावली होती तिथे समोरच असलेल्या शिशा पार्लर मध्ये थांबणार होता. ५० पाउंडसचे तिकीट काढून सुमारे तीस फुट खाली मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या उतरायला लागलो.


Esna entry ticket




Esna 1




esna2




ई.स.पूर्व पंधराव्या शतकात याठिकाणी बांधून ख्नुम ला समर्पित केलेल्या अतिप्राचीन मंदिराचा टॉलेमिक राजवटीत तिसऱ्या शतकापर्यंत विस्तार केला गेला. हजारो वर्षात आलेल्या पूर व भूकंपांमुळे वाळू आणि स्वतःच्याच अवषेशांखाली गाडले गेलेल्या ह्या मंदिराचा ९ मीटर खोल उत्खनन करून मोकळा केलेला, २४ खांब असलेला टॉलेमिक राजवटीत बांधलेला भव्य सभामंडपच फक्त बघायला मिळतो. (बाकीच्या भागावर घरे आणि मोठ्या इमारती उभ्या आहेत.)
एलिफंटाईन आयलंडवरचे ख्नुम देवाचे मंदिर नष्ट झाले असले तरी ईस्नाचे त्याचे मंदिर मात्र खूपच सुस्थितीत आहे. २४ खांबांवर कोरलेली रंगीत पाना-फुलांची नक्षी, हायरोग्लीफिक लिपीतला मजकूर, छत आणि भिंतींवरील रंगीत शिल्पे अतिशय प्रेक्षणीय आहेत. हजारो वर्षांपूर्वी वापरलेले रंग अजूनही टिकून आहेत हे बघून आश्चर्य वाटते.
ईस्ना येथील ख्नुम मंदिराची काही छायाचित्रे.


मंदिर बघून पावणे अकराला मोहम्मद थांबलेल्या शिशा पार्लर मध्ये आलो आणि चहा पिऊन तिथून परत लुक्झोरला जाण्यासाठी आम्ही निघालो. आज रात्रपाळीला जाऊन आल्यावर उद्या आणि परवा त्याला सुट्टी असल्याने पुढचे दोन दिवस लुक्झोर मध्ये भटकंती करायला तो आणि त्याची टॅक्सी माझ्या दिमतीस हजर असल्याची माहिती मोहम्मदने दिली.


Me & Mohammad
मी आणि मोहम्मद.



रस्त्यात एके ठिकाणी १ फलाफेल आणि १ फ्राईड पोटॅटो सँडविच पार्सल घेतल्यावर साडेबाराला मला हॉटेलवर सोडून नाईट शिफ्ट संपल्यावर ईजिप्त एअरच्या गणवेषातच आलेला मोहम्मद उद्या संध्याकाळी भेटू असे सांगून झोपायला घरी निघून गेला. रूमवर येऊन फ्रेश झाल्यावर सँडविचेस खाऊन थोडावेळ टी.व्ही. बघत लोळत पडलो असताना हुसेनचा फोन आला. कशी झाली ईस्नाची टूर वगैरे विचारून झाल्यावर दुपारी तीन वाजता पिक-अप असल्याची आठवण करून देऊन संध्याकाळी जमलं तर भेटतो म्हणाला.
दीड वाजून गेला होता त्यामुळे आता झोपण्यात काही अर्थ नव्हता म्हणून व्हॉट्सॲप, फेसबुकवर थोडावेळ आणि भरपूर जमा झालेले लाईफस संपवत कॅन्डी क्रश खेळत पावणे तीन पर्यंत टाईमपास केला आणि मग तयारीला लागलो.
बरोब्बर तीन वाजता रिसेप्शन वरून पिक-अप साठी ड्रायव्हर आला असल्याचे सांगणारा फोन आला आणि मी खाली उतरलो.
ड्रायव्हर अहमद नावाचा म्हातारा माणूस होता. पहिला पिक-अप माझा झाल्यावर पुढे तीन वेगवेगळ्या हॉटेल्स मधून एक चीनी, एक थाई आणि एक फिलिपिनो जोडपे अशा सहा पर्यटकांना सामावून घेत कर्नाक टेम्पलच्या दिशेने आम्ही निघालो.
साडेतीनला कर्नाक टेम्पलच्या प्रवेशद्वारापाशी आमची वाट बघत उभा असलेला इमाद नावाचा ईजिप्तोलॉजीस्ट गाईड व्हॅनमध्ये येऊन बसला. गाडीची तपासणी पार पाडून आम्ही २०० एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या भल्या मोठ्या मंदिर संकुलात प्रवेश केला. पार्किंग लॉट मध्ये पोचल्यावर जवळच्या तिकीट काउंटरवर जाऊन इमाद आमच्या सात जणांची तिकिटे घेऊन आला. इथे प्रत्येकी १२० पाउंडस एन्ट्री फी होती.


Karnak Entry Ticket

ई.स.पूर्व विसाव्या शतकात बाराव्या राजवंशाचा दुसरा फॅरोह सेनुसरेत I पासून या ठिकाणी मंदिरे बांधण्याची सुरु झालेली परंपरा टॉलेमिक राजवटी पर्यंत दोन हजार वर्षे चालू होती. प्राचीन काळी सोळा लहान मोठ्या मंदिरांचा समावेश असलेल्या ह्या संकुलामुळे हा परिसर मंदिरांचे शहर म्हणून ओळखला जात असे.


karnak1




karnak2




karnak3




karnak4


मुख्यत्वे ‘अमुन रा’ देवाच्या मंदिरासाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्या मंदिर संकुलात ‘मुट’ आणि ‘मोन्तु’ ची मंदिरे आहेत, तसेच फॅरोह अमेनहोटेप-४ चे बांधल्यानंतर लगेचच जाणीवपूर्वक पाडून टाकलेले मंदिर देखील आहे परंतु हे मंदिर पर्यटकांना बघण्यासाठी सध्यातरी खुले नाहीये.
अनेक गोपुरे आणि ओबिलीस्कचा समावेश असलेल्या ह्या संकुलातील अमुन रा च्या मंदिराचा फॅरोह सेटी I आणि फॅरोह रॅमसेस II ह्या पिता पुत्रांनी बांधलेला १३४ खांबी, ५४००० चौरस फुट आकाराचा कालौघात छप्पर नष्ट झालेला विशाल सभामंडप खूपच प्रेक्षणीय आहे. सभामंडपाच्या मागे एक मोठे तळे असून ते फार पवित्र मानले जात होते.
प्राचीन काळी शेतीचा हंगाम संपल्यावर थकलेल्या जमिनीला पुन्हा उर्जा प्राप्त होऊन पुढच्या हंगामात भरघोस पिकोत्पादन मिळावे म्हणून दरवर्षी सत्तावीस दिवस चालणारा ‘ओपेत’ नावाचा उत्सव साजरा करण्याची ह्या मंदिरात प्रथा होती.
अमुन रा च्या मूर्तीला पवित्र तळ्यातील पाण्याने अंघोळ घालून नवीन वस्त्रे आणि सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सुशोभित करून तिची बोटीच्या आकाराच्या पालखीतून इथून अडीच कि.मी. अंतरावरच्या लुक्झोर मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली जात असे.


कर्नाक मंदिराची काही छायाचित्रे.





प्राचीन काळी कर्नाक टेम्पल आणि लुक्झोर टेम्पल ला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मानवी शिराचे हजारो स्फिंक्स होते म्हणून हा रस्ता पुढच्या काळात स्फिंक्स अव्हेन्यू म्हणून ओळखला जात होता. हजारोंपैकी खूपच थोडे स्फिंक्स आता या रस्त्यावर उरले असून बऱ्याचशा भागावर इमारती आणि घरे उभी राहिली होती. पुरातत्व खात्यातर्फे हि नंतरची झालेली बांधकामे पाडून टाकण्यात आली असून त्या संपूर्ण रस्त्यावर उत्खननाचे काम सुरु आहे. सुमारे ८५० प्राचीन स्फिंक्सचे अवशेष सापडले असून हा रस्ता पुन्हा दुतर्फा स्फिंक्स बसवून पूर्वी सारखाच करण्याची ईजिप्त सरकारची योजना आहे.


पाच वाजता हे मंदिर पाहून आम्ही पुन्हा गाडीजवळ आलो आणि लुक्झोर टेम्पलच्या दिशेने प्रवास सुरु झाला.दहा मिनिटांत लुक्झोर टेम्पलला पोचल्यावर इमाद आमची प्रत्येकी १०० पाउंडस किमतीची तिकिटे घेऊन आला आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला.


Luxor Entry Ticket


अठराव्या राजवंशातला फॅरोह अमेनहोटेप III ह्याने बांधायला सुरुवात केलेल्या लुक्झोर मंदिराचा पुढे तुत-अंख-अमुन आणि रॅमसेस II ने विस्तार केला. ईजिप्त मधल्या अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरांपैकी एक असलेले लुक्झोर टेम्पल एका गोष्टीसाठी इतरांपेक्षा वेगळे आहे. बाकीची मंदिरे हि एकतर कुठल्यातरी देवाला अथवा फॅरोह ला समर्पित केलेली किंवा कुठल्यातरी फॅरोहचे अंत्यसंस्कार मंदिर म्हणून ओळखली जातात पण लुक्झोर मंदिर हे नवीन फॅरोहच्या राज्याभिषेकासाठी बांधलेले होते. ह्या मंदिरात नवीन राजाने मुकुट परिधान करून राज्याची सूत्रे हाती घेण्याची परंपरा होती.


Luxor 1


ओपेत उत्सवात मिरवणूक काढून आणलेली अमुन रा ची मूर्ती थोड्या वेळासाठी ह्या मंदिरात ठेवली जात असे आणि फॅरोह उत्सवासाठी जमलेल्या प्रजाजनांना याठिकाणी मेजवानी देत असे. चौथ्या शतकात रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर ह्या मंदिरातला आतला भाग चर्च म्हणून वापरला जात होता. तिथल्या भिंतीवर रंगवलेली काही चित्रे प्रेक्षणीय आहेत.
त्यानंतर मुस्लीम राजवटीत डाव्या बाजूच्या काही भागाचे मशिदीत रुपांतर केले गेले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पूर्वी दोन ओबिलीस्क होते त्यातला एक आजही मूळ ठिकाणी उभा आहे तर दुसरा आता पॅरिस मधल्या ‘प्लेस डी ला कॉनकॉर्ड’ (Place de la Concorde) चौकात उभारला आहे.


लुक्झोर मंदिराची काही छायाचित्रे.





इमाद्च्या मार्गदर्शनाखाली, बयानी आणि कॅरेन ह्या अभ्यासू फिलिपिनो जोडप्याच्या साथीने हि दोन्ही मंदिरे बघायला मजा आली. इमाद्ची गाईड करण्याची पद्धत छान होती. आधी तो सगळ्या वस्तू आणि वास्तूंची संपूर्ण माहिती द्यायचा आणि नंतर फोटो काढण्यासाठी मोकळा वेळ द्यायचा. नशिबाने माझ्या उद्याच्या वेस्ट बँक टूरवर सुद्धा गाईड म्हणून इमादच येणार असल्याचे त्याने सांगितल्यावर मला जरा जास्त आनंद झाला.


Luxor 2
मी, बयानी आणि कॅरेन.


हे मंदिर पाहून बाहेर पडल्यावर परत जाताना आधी तिन्ही जोडप्यांना त्यांच्या हॉटेलवर सोडल्यावर शेवटी सात वाजता मला माझ्या हॉटेलवर सोडून इमाद आणि अहमद निघून गेले.
रूमवर येऊन टी.व्ही. बघत बसलो असताना हुसेनचा फोन आला. काहीतरी काम निघाल्याने तो आत्ता येऊ शकत नसून उद्या सकाळी हॉट एअर बलून फ्लाईट साठी साडेपाचला पिक-अप असून त्यावेळेस तयार राहण्याची सूचना त्याने दिली.
उद्या सकाळी फारच लवकर उठायचे असल्याने रूम सर्व्हिसला फोन करून ऑम्लेट ब्रेड मागवून खाल्ला आणि पहाटे पावणे पाचचा अलार्म लाऊन साडेनऊ च्या सुमारास पहिल्यांदाच अनुभवायची असलेल्या बलून फ्लाईटच्या कल्पना करता करता झोपून गेलो.

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...