पहिला भाग आज प्रकाशित करत आहे. ह्या भागात फक्त काही चित्रे आणि संवाद ....
मी राहायला असलेल्या अतिमहागड्या रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर कलात्मक अक्षरात लिहिलेली पाटी :-
In this peaceful heaven, made from Kanuhura are:-
- The steps from your villa down to the water
- The child’s play desk overlooking white beach sand
- The mahogany clasp on your Heidi Klein bikini
- The old chess set at the Handhuvaru bar
(मी - ओक्के, कानुहुरा म्हणजे लाकूडच ना ?)
* * *
या या या ... तुमची बोट येण्याचीच वाट पाहत होते. थोडं बाहेरच थांबा, हा कलिंगड कापते आणि मग आमच्या ह्या बेटावर तुमचे 'ऑफिशियल' स्वागत करते. नाहीतर उगाच वादळ यायचे...
(मी - !)
* * *
सर, तुमच्या शरीराचे वजन ८ किलो जास्त आहे. त्या हनीमाधू बेटावर फार लोक जात नाहीत ना, म्हणून विमान छोटे ४ सीटचे आहे. ह्या विमानात तुम्हाला घेतले तर आम्हाला फातिमाऐवजी कोणी कमी वजनाची अटेंडंट घ्यावी लागेल. बघते मी, प्लिज वेट.
(मी - !!)
* * *
अरे आज नळाला पाणी नाही, काय चाललंय काय? लेट मी टॉक टू द गव्हर्मेंट. थांब, तुझ्या समोरच सरकारची खरडपट्टी काढतो. .... अगं आथिया, तुझं ते डिपार्टमेंट काय करतंय, झोपा काढताय काय तुम्ही मालेची लोकं ?
(मी - !!! )
* * *
अरे ये ना माझ्या साईट ला, अलीची बोट पाठवतो तुझ्यासाठी. मस्त मोठे बेट बनवतोय आम्ही समुद्रात. माझे ३ ड्रेझर आणि इंडोनेशियातली पूर्ण टीम आली आहे. रात्री तिथेच मुक्कामी राहू आणि पार्टी करू कामगारांसोबत.
(मी - ?)
* * *
ही माझी नॉर्वेजियन बायको, माझ्या ७ मुलांची प्रेमळ आई. पण हिचं अन माझ्या आईचं काही पटत नाही रे...एकमेकींची भाषा अजिबात येत नाही तरी रोज भांडतात. वैताग नुसता.
(मी - ??)
* * *
ओळख करून देतो सर - हे माझे ७ भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि हे ६ माझ्यापेक्षा लहान. ही आम्हा ‘सर्वांची’ आई. हे ‘या सर्वांचे’ बाबा. माझ्या ‘एकट्याचे’ बाबा वेगळे आहेत पण ते दुसऱ्या बेटावर राहतात......
(मी - बापरे !)
* * *
हॅलो हॅलो ... खासदारसाहेब, माझ्या सुनेच्या डेलिव्हरीची वेळ जवळ आली. लवकर तुमची बोट पाठवा, हॉस्पिटलला न्यायचेय. मागच्या वेळी केला तसा उशीर करू नका नाहीतर बोटीतच बाळाचा जन्म होईल. आता पहाटेचे २ वाजलेत, ३च्या आधी बोट पोहचेल असे बघा.
(मी - ….. )
* * *
तुम्ही विदेशी टुरिस्ट लोकं, तुम्ही मजा करणार. सिंगल माल्ट काय, वाईन काय, बिअर काय... आम्ही पडलो अल्लाह के बंदे. पण काय करू, रसूल पाक बघतोय रे वरून, नको मला वाईन...... बरं दे थोडी - पण चहाच्या मोठ्या कपात दे, उगाच कोणी बघितले तर मला त्रास आणि तुलाही.
(मी - वा ! )
* * *
नाही, माझी गन काही तुझ्या हाती देता येणार नाही. कोणी पाहिले तर नोकरी जाईल माझी. मालदीवमध्ये आता सरकारी नोकऱ्या मिळणे किती कठीण आहे ते तुला माहित आहे ना ?
(मी - ….. )
* * *
दगडांचा हा ढीग म्हणतोस? अरे माझे आजोबा लहान असल्यापासून तो तसाच आहे. त्याच्याखाली बुद्धमंदिर आहे बहुतेक. जेंव्हा आमच्या ह्या लामू बेटावरच्या सर्व लोकांनी धर्म बदलला तेंव्हा ते मंदिर न तोडता त्यावर दगड रचण्याची आज्ञा आमच्या राधूननी दिली होती असे जुने लोक सांगतात ....
(मी :- !!!! तुमचा राधून म्हणजे राजा ना ?)
* * *
आमच्या देशाच्या प्रेसिडेंट नाशिदनी खोल समुद्रात पाण्याखाली कॅबिनेट मिटिंग घेतली गेल्या महिन्यात. सगळ्या जगातून पत्रकार आले होते कव्हर करायला. तुम्ही बघितला का तो सोहळा टी व्ही वर ?
(मी :- !!!!!)
* * *
हो, गेल्या सुनामीच्या वेळी हे नवे बेट तयार झाले समुद्रात. आता त्यावर आम्ही मत्स्योत्पादने निर्यात करण्यासाठी एक सेंटर बांधणार आहोत. पैसे बहुतेक ब्रिटिश सरकार देईल...
(मी:- वा !)
* * *
सुखातला जीव दुःखात घातला मी हे मंत्रिपद स्वीकारून, किती कटकट. बाहेरदेशी प्राध्यापकी करत होतो तेच बरे होते. तरी बरं मला राजकारणात काही इंटरेस्ट नाही ते.
(मी:- क्काय ?)
* * *
मी शक्य तेंव्हा येते ह्या गान बेटावर. माझे बाबा ब्रिटिश नेव्हीत असतांना इथे काही वर्षे होते. १९५७ मध्ये रॉयल नेव्हीने हा एयरबेस आमच्या ब्रिटिश रॉयल एरफोर्सला दिला तेंव्हा ते बेस कमांडिंग ऑफिसर होते इथे. लास्ट नेव्ही मॅन टू कमांड धिस स्मॉल ब्रिटिश बेस. माय होल फॅमिली फील्स सो कनेक्टेड टू मालदिव्स.
(मी :- कॅन अंडरस्टॅंड यंग ओल्ड लेडी ! )
* * *
आता कोणीच बोलत नाही त्याबद्दल, पण आमची एक पिढी बरबाद झाली हो ड्रगच्या व्यसनामुळे. मी त्यातून पूर्णपणे बाहेर पडलोय. आता ड्रगविरुद्धचे कायदे फार म्हणजे फारच कडक आहेत. तेच बरं आहे. आता खरे आव्हान म्हणजे धार्मिक कट्टरतेचे, पण त्याबद्दल जास्त बोलायची सोय नाही.
(मी :- काय बोलू ?)
* * *
तुमचे ते इंडियन दीडशहाणे लोक, आमच्या लोकांना सारखी अक्कल शिकवायला बघतात. अरे मी सुद्धा जग फिरलोय. माझ्यासारखी अशी राजेशाही बोट तुमच्या इंडियात काय स्वीडनमध्येही कोणाकडे नसेल.
(मी - ….. )
* * *
हे बघा, हे सुंदर ऑडिटोरियम आम्हाला चीनच्या सरकारने फुकट बांधून दिले, तेही फक्त ३ महिन्यात. आता ही कॉन्फरन्स संपली की फार कमी वापर होईल याचा. पण चिनी मॅनेजर राहील इथे, आजन्म.
(मी - ….. )
* * *
आई खूप आजारी आहे हो. इथल्या इंदिरा हॉस्पिटलचे डॉक्टर करून झाले. आता भारतात नेत आहे, शेवटी आम्हा मालदीवच्या लोकांना खरी मदत तुमच्याच देशात मिळते.
(मी - ….. )
* * *
टेंडरसाठीची सर्व कागदपत्रे तयार आहेत, आकडे रुफिया आणि डॉलर्समध्ये बरोबर भरले आहेत. आता तुम्ही मला चांगला मुहूर्त सुचवा, म्हणजे लतीफ हे बिड डॉक्युमेंट मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करायला घेईल. चांगल्या मुहूर्तावर सुरवात झाली तर काम माझ्या कंपनीला मिळेलच.
(मी :- अरे देवा ! )
* * *
चहा तर संपवा हो, थांबेल ते विमान तुमच्यासाठी, फोन केला आहे मी कंट्रोलरूमला.....
(मी - !!!!! )
* * *
हो, मलाच मालदीवचा शाहरुख खान म्हणतात. माझे सगळे सिनेमे सुपरहिट असतात. आजही 'धी' वर दाखवतील माझा हिट सिनेमा, त्यातली गाणी तुला पटकन ओळखता येतील. सेम टू सेम शाहरुख सारखी बसवली आहेत - सीन बाय सीन.
(मी - ….. क क क .....क्या बात है ! )
* * *
संसदेत आज थोडी मारामारी झाली म्हणून फाटला हा शर्ट. फार काही लागले नाही. चला आता आपल्या प्रोजेक्टच्या चर्चेला सुरवात करू या.
(मी - घरोघरी मातीच्या चुली )
* * *
हायो धुआ सलाम
भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला श्रीलंकेजवळ ११९० मोजलेल्या आणि बाकी काही उथळ आणि आकाराने फारच लहान असल्यामुळे मोजता न येऊ शकणाऱ्या अश्या काही प्रवाळ (कोरल) बेटांचा समूह म्हणजे मालदीव हा आपला शेजारी देश. अलौकिक निसर्गसौंदर्याचे दान भरभरून मिळालेला. तुमच्यापैकी ज्यांनी मालदीवला भेट दिली असेल त्यांना पृथ्वीतलावर हिरवा आणि निळा असे दोनच रंग आहेत असा भास होईल हे नक्की.
आकारमान आणि लोकसंख्या बघता मालदीव हा सार्क समूहातील सर्वात छोटा देश. उत्तर दक्षिण सीमा सरळ रेषेत मोजली तर देशाची लांबी एका टोकापासून शेवटल्या बेटापर्यंत जवळपास ८२० किलोमीटर आणि पूर्व पश्चिम रुंदी सुमारे १३० किलोमीटर ! म्हणायला देशाच्या ताब्यात असलेले क्षेत्र साधारण ९०,००० वर्ग किलोमीटर (तुलनेसाठी म्हणून - साधारण १० कोंकण किंवा २ केरळ मावतील इतके) पण त्यात जमीन अगदीच नावाला. देशभर विखुरलेली पूर्ण जमीन मोजली तर ३०० स्वेअर किलोमीटर पेक्षा कमीच भरेल - म्हणजे मुंबई शहराच्या निम्मी पण नाही. समुद्रच सगळीकडे. त्यात दक्षिणेकडची 'गान' सारखी काही मोठी बेटे तर पार विषुववृत्ताच्या खाली आहेत. ‘मोठे’ बेट ही संकल्पना सुद्धा मालदीवमध्ये वेगळी आहे. म्हणजे मोठ्यात मोठे ‘भव्य’ बेट लांबीला ८ किलोमीटर एवढेच. देशाची लोकसंख्या ४ लाखांच्या आत-बाहेर.
आपल्या भूगोलाच्या पुस्तकांमध्ये अनेक भारतीय शहरांबद्दल अमके शहर समुद्रसपाटीपासून २००-४०० मीटर उंचीवर असे आपण वाचलेले असते. हे ‘काही शे मीटर’ प्रकरण आपल्याला एवढे अंगवळणी पडले असते की अख्खा मालदीव हा देश समुद्रसपाटीपासून फारफार तर १ मीटरच वर असल्याचे पचनी पडणे सोपे नाही. काही बेटे तर चक्क 'समुद्रसपाटीपासून खाली' ह्या वर्णनाला साजेशी आहेत.
मालदीवच्या भूमीवर सगळीकडे एक शब्द सारखा कानावर पडतो - ‘अटॉल.’ सगळा देशच दूर दूर विखुरलेल्या उथळ प्रवाळ बेटांपासून बनलेला. काही बेटांना तर नावही नाही. ते शक्यही नाही म्हणा, शेकड्यांनी असलेल्या ह्या बेटांची नावं लक्षात तरी कशी ठेवणार? त्यामुळे व्यवस्थापनाच्या सोयीसाठी मालदीवच्या भूभागाला काही 'अटॉल' मध्ये विभागलेले आहे. अटॉल म्हणजे प्रवाळ पट्ट्याच्या / कोरल रीफच्या लहान मोठ्या बेटांच्या साखळ्या किंवा समुच्चय.
थिलाधूमथी (हा अलीफू), हा धालू, वावू , नूनू , रा, बा, लाव्हीयानी, काफ़ू (माले), अलिफ-अलिफ, अरी/अलिफ धाल, मीमू, फाफू, धालू, था, लामू, हूवधू, द्यावीयानी, शावीयानी, सिनू अशी ऐकायला खूप गोड आणि संगीतमय वाटणाऱ्या नावानी हे अटॉल ओळखल्या जातात. असे एकूण २६ अटॉल आहेत.
प्रत्येक अटॉल मध्ये अनेक बेटे आहेत, पण बहुतेक बेटे निर्जन. मानवी वस्ती असलेली बेटे फार कमी आहेत. बेटांची नावे तर त्याहून मजेदार.
हीथा धू
कुमुन धू
हनिमा धू
ईश धू
फे धू
काढ धू
काढेध धू
कूड धू
धरावान धू
(स्वगत - स्वच्छतेचा काय तो सोस. हे धू आणि ते धू.... कितीदा आणि काय धुवायचे ते तरी कोणी सांगणार का ?)
खुद्द राजधानीचे शहर असलेले माले म्हणजे 5.8 स्क्वे कि मी चे छोटेखानी बेट. अगदी पायी फिरायचे ठरवले तरी अर्ध्या तासात पूर्ण शहर पालथे घालता येते. मालदीव मध्ये फक्त माले बेटावरच बहुमजली इमारती बांधायला परवानगी आहे आणि देशाची साधारण अर्धी लोकसंख्या माले शहरात दाटीवाटीने राहते. मालेच्या अगदी जवळ दुसऱ्या हुलहुले बेटावर देशातला मोठा आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्याजवळच हुलहूमाले नावाचे एक छोटे रहिवासी बेट, आणखी एका बेटावर पेट्रोल / डिझेल साठवणुकीची सोय आणि अजून एका जवळच्याच बेटावर कचरा विल्हेवाटीची व्यवस्था असे राजधानी माले शहराचे साधारण स्वरूप.
देशात लहानमोठे मिळून 6 विमानतळ (खरेतर छोटी विमाने उतरू शकतील अश्या धावपट्ट्याच) आहेत पण मालदीवमध्ये खरी मजा ‘सी प्लेन’ ची. ही छोटी विमाने पाण्यावर उतरू शकतात म्हणून यांना हवाईपट्टी किंवा हवाई तळाची फारशी गरज नसते. तसेही अथांग समुद्रात विमान असो की बोट, दिवस असो की रात्र, मदत जीपीएसचीच. नाहीतर मार्ग भटकणे अगदी साहजिक कारण लक्षात ठेवायला काही खाणाखुणा जवळपास नाहीतच. आकाशातून काय आणि पाण्यातून काय एक बेट दुसऱ्यापेक्षा फार वेगळे दिसत नाही.
मालदीवला पहिल्यांदाच जाणाऱ्या माझ्या सर्व मित्रमंडळाला माझा एक आग्रही सल्ला असतो - वेळेच्या काही तास आधी चेक-इन करा, हवं तर विमान कंपनीच्या कर्मचार्यांशी वाद घाला, काहीही करा, पण कसेही करून विमानात खिडकीची जागा मिळवा. आणि मग माले विमानतळ जवळ आल्याची घोषणा होताच खिडकीबाहेर बघा.... निळ्याशार समुद्रात हिरवी-निळी- फिक्कट हिरवी - फिक्कट निळी- गडद निळी- अझूर - ऍक्वा - सी ब्लू - ओशन ब्लू, मरीन ब्लू.... तुम्हाला माहित असलेल्या प्रत्येक भाषेतील निळ्या रंगाची वर्णन एकत्र केली तरी कमी पडतील अश्या असंख्य रंगछटा असलेले पाणी आणि त्यात ती पांढऱ्याशुभ्र वाळूची ठिपक्याएवढी बेटं. ही प्रवाळ बेटं आकाशातून बघितली की डोळे निवतील आणि पृथ्वीग्रहावर जन्म घेतल्याचा आनंद मनात उचंबळून येईल.
मालेच्या वेलाना आंतराष्ट्रीय विमानतळाच्या पिटुकल्या धावपट्टीचे दर्शन होईल आणि जमिनीवर उतरतांना विमान थोडेही घरंगळले तर पार समुद्रातच जाईल अशी भीती दाटून येईल.
बाहेर पडल्यावर सगळीकडे टॅक्सी स्टॅन्ड ऐवजी तुम्हाला तुमच्या पुढील गंतव्य स्थानी पोचवायला आलेल्या बोटी आणि सी प्लेन दिसतील. आणि मालदीवचे वेगळेपण तुमच्या लागलीच लक्षात येईल.
प्रत्येक देशाचा एक 'क्लेम टू फेम' असतो. मालदीवची मिजास आहे तेथील राजेशाही पर्यटन व्यवसायामुळे. जगभरातील गर्भश्रीमंत लोकांमध्ये मधुचंद्रासाठी सर्वोत्तम देश म्हणून मालदीवचे नाव प्रसिद्ध आहे. समुद्रावरील निवांत सुंदर बेटे तर आहेतच पण ‘समुद्राखालील’ असामान्य सुंदर जागांमुळे हौशी समुद्रखेळांसाठीही दरवर्षी शेकडो पर्यटक मालदीवला भेट देतात. श्रीमंत हॉलीवूडकर, ब्रिटिश आणि अन्य युरोपियन पर्यटक तर वर्षानुवर्षे हिवाळी सुट्टी साजरी करायला येत आहेत. एकूणच पर्यटन हे मालदीवच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे आणि त्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटकांच्या धनावर अवलंबून आहे.
मालदीव 'एक बेट - एक रिसॉर्ट' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा बहुदा पहिलाच देश. संपूर्ण देशालाच निसर्गसौंदर्याचे भरभरून दान मिळाले आहे. त्यातील सर्वोत्तम बेटे रिसॉर्ट साठी निवडण्यात आली आहेत. संपूर्ण बेट त्या रिसॉर्टच्या खाजगी मालकीचे आणि तेथे पर्यटकांसाठी हात जोडून उभ्या असलेल्या पंच-सप्ततारांकित सुविधा-सेवा. भर समुद्रात उभारलेले सी व्हिला, बेटावर पोचण्यासाठी सी प्लेन किंवा अत्याधुनिक यॉट, आंतरराष्ट्रीय चवींचे उत्तमोत्तम जेवण-खाण देणारी अनेक उपाहारगृहे, साहसी समुद्री खेळांसाठी सुसज्ज टर्मिनल्स आणि अर्थातच स्पा. सगळे प्रचंड महाग.
आणि हो, राजधानी माले आणि अन्य मानवी वस्ती असलेल्या बेटांवर मद्यपानास पूर्णपणे बंदी असली तरी विदेशी पर्यटकांसाठी असलेल्या खाजगी रिसॉर्टमध्ये अशी बंदी नाही. मालेच्या विमानतळावर उतरल्याबरोबर तुम्हाला स्वतःकडे असलेल्या मद्याचा सर्व साठा तेथील कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करावा लागतो, पुढे नेता येत नाही. माले ह्या राजधानीच्या बेटावर आणि अन्य वस्ती असलेल्या कुठल्याही बेटावर अर्थातच मद्यपान करता येत नाही, तो अतिगंभीर गुन्हा आहे.
मोहम्मद शफिक नावाच्या स्थानिक वास्तुशात्रज्ञाने काही इटालियन तज्ञ मंडळींच्या साहाय्याने डिझाईन केलेले 'कुरुंबा' हे मालदीवमधले आद्य रिसॉर्ट. स्थानिक भाषेत कुरुंबा म्हणजे नारळ. ह्या बेटाचा नैसर्गिक आकार एखाद्या नारळासारखा आहे, त्यामुळे कुरुंबा हे नाव. हे सुरु झाले १९७२ मध्ये. त्याआधी अनेक युरोपिअन तज्ञ मंडळींनी प्रत्यक्ष पाहणी करून ही जागा काही पर्यटनासाठी फारशी योग्य नाही असाच अहवाल दिला होता. पण तत्कालीन सरकारची मदत, काही उद्यमशील मंडळीचा उत्साह आणि तुटपुंज्या भांडवलावर सुरु झालेले हे रिसॉर्ट पुढे बरेच विस्तारले, पंचतारांकित झाले आणि आजही आपला राजेशाही आब राखून आहे.
विलक्षण सुंदर, स्वच्छ-नितळ, हिरव्या-निळ्या रंगाच्या निरनिराळ्या छटा ल्यालेल्या निरनिराळ्या कोरल बेटांवर अगदी निवांत पण जागतिक दर्जाच्या सोई-सुविधा असलेले शंभर तरी रिसॉर्ट आता मालदीवमध्ये आहेत.
जगात धनिकांची कमी नाही आणि हौसेला मोल नाही, त्यामुळे मालदीवला येण्याऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. जेमतेम चार लाख वस्तीच्या मालदीवला गेल्यावर्षी १२ लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली. मालदीव आपला शेजारी देश असला आणि पर्यटनासाठी जगभर विख्यात असला तरी भारतीय पर्यटकांची संख्या फार नाही. भरपूर प्रसिद्धी करून २०१६ हे 'व्हिझिट मालदीव' वर्ष म्हणून साजरे केले तेंव्हाही ह्या देशात आलेल्या एकूण पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटक फक्त ६८०० इतके कमी.
प्रयत्नपूर्वक श्रीमंत आणि अति-श्रीमंतांचे पर्यटनस्थळ असे मालदीवचे ब्रॅण्डिंग असल्यामुळे सर्व काही प्रचंड महाग. माझे मत विचाराल तर मालदीवच्या ह्या पंच-सप्ततारांकित जगात काही दिवस राहून आल्यावर न्यूयॉर्क हे बऱ्यापैकी स्वस्त शहर आहे असे आपण आत्मविश्वासाने म्हणू शकतो :-)
* * *
पण हे झुळझुळीत - श्रीमंत - रंगीत - आल्हाददायी चित्र पर्यटकांच्या मालदीवचे. सगळाच देश तसा नाही, बराच वेगळा आहे. त्याला इतिहास आहे, स्वतःची वेगळी दुर्मिळ-दुर्लभ भाषा आहे. स्वतःची ठळक सांस्कृतिक ओळख आहे. ते सगळे पुढल्या भागात.
* * *
थोडे अवांतर :
मालदीवच्या भूमीवर 'अटॉल' सारखेच अजून काही शब्द पुन्हा-पुन्हा कानावर पडतात. तेच ह्या लेखाचे शीर्षक आहे.
हायो धुआ = शुभेच्छा, तथास्तु ;
सलाम = नमस्कार
मास..अहारू... गारुनु.... - मालदीव
जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात. पुढील पिढ्यांसाठी असा विस्मृत ठेवा वेचण्याची ठिकाणे म्हणजे सामान्यतः देवळे - धार्मिक उपासनेच्या जागा, राज्यकर्त्यांचे किल्ले - महाल, थोरामोठ्यांची समाधीस्थळे वगैरे.
पण काही समाज आणि संस्कृती थोड्या वेगळ्या असतात - आपल्या शेजारच्या मालदीव बेटांवर नांदणारी प्राचीन संस्कृतीही अशीच - वेगळी आणि त्या सम तीच. (तिला थोडीफार साथ भारताच्या ताब्यातला लक्षद्वीप बेटांवरच्या संस्कृतीची) ह्या समाजाचे जीवनच वेगळे. अथांग समुद्रात ठिपक्याएवढी काही बेटे आणि त्यापैकी काही मोजक्या बेटांवर मानवी वस्ती. माणसे साधी. गरजा कमी. राज्यकर्ते म्हणावे तर तीही अगदी साधी माणसे - कोणत्याही बाह्य भपक्याशिवाय साधे सोपे जीवन व्यतीत करणारी. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमुळे, साधनांच्या दुर्लभतेमुळे आणि बिनभरवश्याच्या हवामानामुळे असेल कदाचित पण मोठे महाल-किल्ले नाहीत की भव्य समाधी स्थळे नाहीत.
खोल समुद्रात पिटुकल्या बेटांवर बिन-भरवशाचे, कमी गरजांचे आणि म्हणून स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी कर्मकांडांचे महत्व नगण्य. त्यामुळे धर्माचे आखीव रेखीव नियम-कानू फारसे अपील न होणारे. त्यामुळेच की काय मोठी भव्य धर्मस्थळे पण नाहीत.
माले शहराच्या मधोमध असलेली प्राचीन हुकुरू मिस्की (जामी मस्जिद)
पूर्वापार सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. 'सारा समुंदर मेरे पास है - एक बूंद पानी मेरी प्यास है' अशी अवस्था. प्यायचे पाणी फक्त आकाशातून पडणारे, ते साठवायचे आणि वर्षभर वापरायचे. म्हणायला सोपे पण प्रवाळ बेटांवर ही साठवणूक कठीण. थोड्याफार गोड्या पाण्याच्या विहिरी, पण त्यातील पाणी संपायला किंवा खारट व्हायला फार काळ जावा लागत नाही. त्यामुळे लोकांनी मुक्काम सारखा ह्या बेटावरून त्या बेटावर हलवणेही नवे नाही. त्यामुळे आहे त्या साधनांत काही धर्मस्थळे-इमारती बांधल्या तरी पुढे त्यांचा वापर आणि जतन होईलच याची खात्री नाही.
* * *
मालदीवचे प्राचीन नाव 'माला-द्वीप'. मालदीवचे भारतीय मुख्य भूमीशी आणि श्रीलंकेशी संबंध शेकडो वर्षांपासून आहेत. मालदीवच्या दोन्ही शेजाऱ्यांच्या, म्हणजे पूर्व किंवा दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांना पश्चिमेच्या समुद्रमार्गानी कोठल्याही दुसऱ्या देशाकडे जहाजे हाकायची तर मालदीवची बेटे हाच मार्गातला पहिला थांबा. त्यामुळे ह्या भूमीचे महत्व अनन्यसाधारण होते (आजही आहे,पण त्याबद्दल नंतर). नेहमीचा व्यापारी मार्ग असल्यामुळे भेटीगाठी, व्यापारी देवाण देवाण, सांस्कृतिक संबंध वर्षानुवर्षे आहेत.
पार चौथ्या शतकापासून भारताच्या ओरिसा प्रातांतील व्यापारी ह्या मार्गावर व्यापारासाठी ये-जा करत असावेत. कलिंग सम्राटांच्या प्रदीर्घ राजवटीत भारतातून पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात व्यापारी दले आधी श्रीलंका आणि मग मालदीवला पोचलीत. समुद्रमार्गे पूर्वेकडे येणारे आफ्रिकन आणि अरब व्यापारी मालदीवला एक थांबा घेत असल्यामुळे देशोदेशीच्या व्यापाऱ्यांमध्ये परस्पर व्यापार आणि करार करण्यासाठी ही भूमी प्रसिद्ध झाली.
* * *
मालदीवच्या इतिहासात डोकावायचे म्हणावे तर मुख्य मुद्दा खात्रीशीर पुराव्यांच्या दुर्मिळतेचा आहे. मुळात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा कमी आहेत. स्थानिक भाषेतील हस्तलिखिते किंवा उत्खननात सापडलेले पुरावे दुर्मिळ आहेत आणि जे आहेत ते बऱ्याच अलीकडच्या काळातील आहेत. त्यामुळे लोकश्रुती, विदेशी प्रवाश्यांची प्रवासवर्णने, त्यांनी बनवलेले नकाशे आणि स्वतःच्या मायदेशी लिहिलेली पत्रे एव्हढाच ऐवज हाताशी उरतो. त्यावरून थोडेफार निष्कर्ष काढता येतात. सबळ पुराव्याअभावी हे निष्कर्ष विवादाला कारणही होतात :-)
मालदीवच्या उत्तरेला वर असलेल्या लक्षद्वीप बेटांचे रहिवासी मूळचे केरळ प्रांतातले दर्यावर्दी आहेत हे बऱ्यापैकी मान्य मत आहे. त्यामुळे भारतातील मल्याळी आणि तमिळ दर्यावर्दी आणि कोळी लोक हे बहुदा मालदीवचे आद्य रहिवासी असावेत. स्थानिक प्राचीन जमातींमध्ये काही प्रमाणात आढळून येणारी मातृसत्ताक कुटुंबे त्यांच्या मल्याळी पूर्वजांची साक्ष पटवतात. अरबस्तानातील आणि श्रीलंकेच्या व्यापाऱ्यांपैकी काही मंडळी वस्ती करती झाली असावीत असे आडाखे बांधता येतात.
पाचव्या शतकात पाली भाषेत लिहिलेल्या 'महावंश' ग्रंथात मालदीवच्या राज्यकर्त्यांबद्दल पहिला लेखी उल्लेख सापडतो. पूर्व भारतातून मगध राज्याचा परागंदा राजा / राजपुत्र 'विजय' आधी श्रीलंका आणि पुढे मालदीवला आपले नवे राज्य स्थापन करता झाला असे उल्लेख आहेत. पण लिहिणाऱ्यांनी हे 'असे मी ऐकून आहे' अश्या प्रस्तावनेसह लिहिले आहे, त्यामुळे नेमका कालखंड ठरवता येणं कठीण आहे.
१२ व्या शतकात इस्लामच्या आगमनापूर्वी जवळपास १३०० वर्षे बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता, हे मात्र बहुमान्य मत.
बुद्धकाळाच्या आधी स्थानिक लोक सूर्यपूजक होते, स्वतःला 'आदित्यकुलीन' म्हणवून घेत. मालदीवच्या राजाला 'राधून' (राजनचा अपभ्रंश वाटतोय ना?) आणि त्याच्या पत्नीला 'रानींन' (राणी?) किंवा रातीन संबोधतात. 'आदीत्ता' वंशीय सूर्योपासक राधून मालदीव बेटांवर शासन करतात. काही बेटांवर 'रानीन' म्हणजे स्त्री शासक आहेत - काही राधून 'होमा' (सोम?) वंशीय आहेत असे पुसट उल्लेख विदेशी व्यापाऱ्यांच्या पत्रात मिळतात. दामहार नावाची आदित्यकुलीन राणी माले येथे ठाणे करून मालदीव बेटांवर राज्य करते, तिला आम्ही प्रवासी कर आणि नजराणा देतो असा उल्लेख अरब व्यापाऱ्यांनी स्वतःच्या राज्यकर्त्याना पाठवलेल्या पत्रात आहे. पण या पत्रांवर तारीख नाही !
मालदीवच्या इतिहासाचे जे थोडेफार संशोधन झाले आहे आणि उत्खननात जे पुरावे मिळाले आहेत त्याआधारे साधारण सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेप्रमाणे मालदीवमध्येही बौद्ध धर्म रुजला आणि पुढे अनेक शतकांपर्यंत बुद्ध धर्माचा प्रभाव मालदीवच्या संस्कृतीवर होता हे ठरवता येते. त्याकाळचे काही राज्यकर्ते स्वतःला ‘सिंहपुत्र’ म्हणवत - बहुदा श्रीलंकेच्या सिंहली राज्यांच्या प्रभावामुळे.
नव्याने झालेल्या उत्खननात बुद्धमताचा प्रभाव दाखवणाऱ्या खाणाखुणा सापडतात. बुद्धधर्माच्या अहिंसक शिकवणीमुळे बहुतेक प्राचीन धर्मस्थळे जमिनीखाली पुरली आहेत, तोडफोड करून पूर्णतः नष्ट केलेली नाहीत. (पण आता हे बदलतंय - २०१२ मध्ये काही स्थानिक माथेफिरूंनी मालेच्या राष्ट्रीय संग्रहालयात घुसून तिथे जतन केलेला ६ ते १२ व्या शतकातील दुर्मिळ बौद्ध अवशेषांचा अमूल्य ठेवा ठेचून नष्ट केला - मूर्तिपूजा इस्लामला मंजूर नाही म्हणून !)
काही उत्खननात मंडलाकार बुद्ध मंदिरांचे - स्तूपांचे जोते असावेत अश्या खुणा सापडतात.
एक मात्र आहे, मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध असलेल्या इस्लाम धर्माचा पूर्ण स्वीकार केल्यानंतर अनेक शतकं उलटली तरी आजही मालदीवचे लोक कुठल्याही मूर्तीला किंवा शिल्पाला 'बुधू'च म्हणतात.
* * *
मालदीवची प्रमुख भाषा 'धिवेही'. भाषा-अभ्यासकांच्या मते ही इंडो-आर्यन गटातील एक प्राचीन भाषा. लिपी वेगळी असली तरी व्याकरण, शब्द, शब्दांचे उच्चार, वाक्यरचनेची पद्धत सगळेच श्रीलंकेच्या सिंहली भाषेला जवळीक साधणारे. त्यामुळे माझ्या श्रीलंकन मित्रांना धिवेही बोलायला आले नाही तरी ऐकलेले बरेचसे समजते पण वाचता येत नाही कारण वेगळी लिपी ! परत धिवही भाषा अरेबिक प्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यामुळेही थोडा संभ्रम.
धिवेही भाषेची झलक.
इराणच्या बसरा खाडीत मिळणारे नैसर्गिक मोती म्हणजे जगभरातल्या राजे-महाराजे आणि श्रीमंतांच्या जिव्हाळ्याचा विषय. भारत, चीन, बर्मा आणि थायलंड ह्या मोत्यांची फार मोठी बाजारपेठ. त्यामुळे अरब व्यापारी अगदी दहाव्या शतकाच्या पूर्वीपासून इराणच्या खाडीतून हे मोती घेऊन मोठ्या प्रमाणावर श्रीलंका, भारत आणि पलीकडे आग्नेय आशियात जात. त्यांचा पहिला थांबा हूवधू, माले किंवा गान बेटावर असे. त्यामुळे की काय इस्लामिक सत्ता स्थापन होण्याच्या बरेच आधी मालदीवमध्ये व्यापाराची अधिकृत भाषा अरेबिक होती. पर्शियन किंवा उर्दू सारख्या भारतीय उपखंडात स्थिरावलेल्या भाषांचा फारसा वावर ह्या भागात दिसून येत नाही. धिवेही भाषा अरेबिक लिपीत लिहिल्या जाण्याचे हे ही एक कारण असू शकेल.
'लोमाफानू' - धिवेही भाषेत लिहिलेले ताम्रपट्टिकांचे पुस्तक. - १२ वे शतक.
सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.
* * *
थोडे अवांतर:
आपल्या बोलण्या-लिहिण्यात येणारे हे 'कवडी' प्रकरण बरेच रोचक आहे. चलन म्हणून प्राचीन भारत, ब्रम्हदेश आणि श्रीलंकेत कवड्या वापरल्या जात. कवड्या चलन म्हणून वापरण्याचा फार मोठा कालखंड भारत आणि शेजारी देशांनी अनुभवला आहे.
साधारण हिशेब : -
३ फुटक्या कवड्या = १ कवडी
१० कवड्या = १ दमडी
२ दमडी = १ धेला
१.५ पाई = १ धेला
३ पाई = १ पैसा
४ पैसे = १ आणा
१६ आणे = १ रुपया
स्थानिक चलनांची नावे वेगळी असली तरी थोड्याफार फरकाने आजूबाजूच्या देशांमध्ये प्रमाण असेच होते. (जुन्या लोकांकडून 'पै-न-पै' ची वसुली, 'आणेवारी', 'दीड-दमडी' ची ऐपत, 'पाई-पाई' चुका दूंगा असे डायलॉग सुद्धा ऐकले असतील तुमच्यापैकी काहींनी)
मालदीव हा हा देश भारतीयांना माहित असण्याचे आणि तेथे आपल्या दर्यावर्दी व्यापाऱ्यांची विशेष ये-जा असण्याचे एक खास कारण होते - ते म्हणजे तेथे असलेला कवड्यांच्या प्रचंड साठा ! चलन म्हणून आपल्याकडे ज्या कवड्या वापरल्या जात, त्या कवड्या मालदीवमध्ये अगदी 'कवडीमोलाने' मिळत. होडीभर अन्नधान्याच्या बदल्यात होडीभर कवड्या असा साधा सोपा हिशेब. त्यामुळे ही पाचूची बेटे भारतीय व्यापाऱ्यांसाठी अगदी सोन्याची खाण होती.
मालदीवचा 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण
मालदीवमधल्या काही कट्टर इस्लामधर्मीय लोकांच्या मते इस्लामच्या आगमनापूर्वी सगळीकडे 'जाहिलिया' काळ म्हणजे अज्ञान-अनागोंदीचे वातावरण होते. त्यामुळे त्याआधीचा इतिहास हा काही फारसा महत्वाचा नाही. पण तसे अर्थातच नाही. काळाच्या ओघात मालदीवच्या सांस्कृतिक मुख्य धारेला वेगवेगळ्या धर्म-वंश-जमातीच्या लोकसंस्कृतींचे प्रवाह येऊन मिळाले आहेत. तसेही धर्म आणि संस्कृती एकमेकांत गुंफली गेली तरी स्वतःचा वेगळा सुवास जपणारी फुले आहेत - एकमेकांना पूरक असली तरी एकमेकांचा पर्याय नाहीत.
म्हणून मालदीवमध्ये इस्लामच्या प्रचार- प्रसाराची चर्चा करण्यापूर्वी ह्या दुर्लक्षित मूळ घटकांबद्दल थोडेसे :-
ऐतिहासिक नोंद असलेले मालदीवचे सर्वात पुरातन रहिवासी म्हणजे 'गिरावरू' (उच्चारी - तीवरु) या जमातीचे राजधानी मालेजवळील तत्कालीन 'गिरावरू' नावाच्या बेटावर राहणारे लोक. इस्लामपूर्व मालदीवमध्ये त्यांची भाषा, संस्कृती आणि चालीरीती अन्य स्थानिकांपेक्षा वेगळ्या होत्या. हे लोक भारतातील तामिळनाडूच्या किनारी भागातून आले असावेत असे एक मत आहे. पुढे ह्या लोकांना सक्तीने दुसऱ्या 'हुलहुले' नावाच्या बेटावर वसवण्यात आले. आज ह्याच हुलहुले बेटावर मालदीवचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मालदीवच्या सुलतानाला आणि मालेतील त्याच्या दरबाऱ्यांना ह्या लोकांचे आणि त्यांच्या वेगळेपणाचे खूप आकर्षण होते, विशेषतः त्यांच्या स्त्रियांची वस्त्रे आणि आभूषणे अगदी वेगळी असल्यामुळे तो सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. काहीसे आपल्याकडच्या लमाण/बंजारा बांधवांसारखे.
पारंपारिक वेशात गिरावरू स्त्रिया
ह्या गिरावरू लोकांबद्दल मला माझ्या एका स्थानिक मैत्रिणीच्या वयोवृद्ध आजीने एक वेगळीच गोष्ट सांगितली. जुन्याकाळी ह्या लोकांचे जसे आकर्षण होते तसे त्यांच्याबद्दल रागही होता. ह्यांना म्हणे बेडूक ह्या प्राण्याची किळस होती. त्याच कारणाने अन्य लोक त्यांच्यावर मुद्दाम बेडकांची पिल्ले फेकत, त्यांना त्रास देण्यासाठी. आणिक एक वेगळेपण म्हणजे मालदीवमध्ये वसलेल्या पुरातन जमातींपैकी फक्त ह्याच जमातीमध्ये घटस्फोट घ्यायची मुभा नव्हती. आता ह्या जमातीचे लोक मुख्य धारेत (!) मिसळून गेले आहेत आणि पूर्णपणे मालेच्या शहरी जीवनात समरसून जगताहेत. त्यांची वेगळी भाषा-संस्कृती आता अर्थातच नाश पावली आहे. अगदी काही वृद्ध लोक सोडले तर खुद्द मालदीवमध्ये कोणी तुम्हाला यांच्याबद्दल फार काही सांगू शकणार नाही.
मालदीवची दुसरी एक अति-प्राचीन रहिवासी जमात म्हणजे हूवधू अटॉलवर राहणारी जमात. त्यांच्या राजधानीच्या शहराचे पुरातन नाव 'सुवा दीपा' किंवा सुवादीव (शुभ द्वीप?). त्यांची स्वतःची भाषा आहे, मुख्य धिवेही भाषेपेक्षा बरीच वेगळी - हूवधू भास ('भास' हा शब्द इथे वाचून संस्कृतमध्ये 'भाषा' हा बोध सहज होतो). ह्या लोकांचा माले आणि मालदीवच्या अन्य द्वीपवासीयांशी संबंध फार कमी आला. त्यामुळे की काय, त्यांच्या प्रथा-परंपरा आणि चालीरीती श्रीलंकेतील सिंहली लोकांशी जवळीक असलेल्या आहेत. मालदीवमध्ये अन्य कोणालाही नसलेला एक विशेष अधिकार ह्या जमातीच्या नेत्याला आहे - ह्या जमातीच्या प्रमुखाला स्वतःचा ध्वज आहे, त्याच्या मालकीच्या सर्व बोटींवर (त्यांच्या हूवधू भाषेत होड्यांना 'ओडी' असा शब्द आहे, मला गमतीशीर वाटला) आणि अटॉल मधल्या अनेक इमारतींवर तो फडकावण्याची मुभा आहे. आश्चर्य म्हणजे हा ध्वज दिसायला नेपाळच्या प्राचीन ध्वजासारखा आहे.
ह्या हूवधू अटॉलच्या मध्यावर एक नांदते बेट आहे - देवधू नावाचे. मालदीवचे अनेक सुलतान ह्या देवधू बेटाला स्वतःचे आद्य स्थान म्हणवत. त्यामुळे की काय आजही मालदीवच्या अनेक पावरबाज घराण्यांमध्ये, श्रीमंत व्यापारी, समाजातील मानांकित आणि राजकारणी लोकांमध्ये आपले मूळ स्थान हे देवधू असल्याचे सांगण्याची 'फ्याशन' आहे, इतका त्याचा मान.
ह्या हूवधू लोकांची वेगळेपणाची भावना मात्र प्रखर आहे. आधी भारतीय समुद्रात सगळ्या भूमीवर आणि समुद्रावर ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे हूवधू, कराची, कोलंबो, कोचीन आणि तुतिकोरिन बंदरांमध्ये नियमित व्यापार आणि संपर्क होता, त्याला सीमेचे कुंपण नव्हते. पण ब्रिटिश गेले आणि स्थिती बदलली. ब्रिटिशांनी मालदीव सोडले आणि मालेतील स्थानिक सरकारला व्यापार आणि करविषयक धोरण ठरवण्याचे अधिकार मिळाले. त्यांनी हूवधूच्या सागरी व्यापारात लुडबुड सुरु करताच हूवधूच्या लोकांनी आजूबाजूचे काही अन्य अटॉल मिळून एक वेगळा देश स्थापण्याचे आंदोलन जोरात सुरु केले - सुवादीव रिपब्लिक नावाने. त्यांना बराच पाठिंबाही मिळाला. मालदीव स्वतंत्र राष्ट्र म्हणून आकारास येत असतांना १९५९ मध्ये हे लोक स्वतःला वेगळे राष्ट्र घोषित करते झाले होते.
वेगळ्या सुवादीव रिपब्लिक या अल्पजीवी राष्ट्राचा ध्वज
पुढे सहा-सात वर्षे बऱ्याच जाळपोळी - राजकीय हत्या - सैनिक कारवाई - वाटाघाटी इत्यादी होऊन बरेच उशिराने म्हणजे १९६६ मध्ये हे लोक मालेतील मध्यवर्ती सरकारच्या अधिपत्याखाली आले. आता तिथे काही वेगळेपण जाणवत नाही पण वेळोवेळी होणाऱ्या उत्खनन आणि संशोधनात त्यांच्या वेगळ्या संस्कृतीचे पुरावे सापडतात. स्थानिक कारभारात आता त्यांना बऱ्यापैकी स्वायत्तता आहे.
* * *
मालदीवमधे इस्लाम - एक आढावा
मालदीवमध्ये इस्लामचा प्रवेश आणि वाटचाल समजून घ्यायची झाली तर भारतीय उपखंडाच्या इतिहासात थोडे मागे जावे आणि आजूबाजूच्या भूमीवर काय काय आणि कसे कसे घडले त्याकडे एक कटाक्ष टाकावा.
अरब व्यापारांनी श्रीलंकेत थोडीफार वस्ती करायला सुरवात केली ती ८ व्या शतकाच्या शेवटी शेवटी. त्यांच्यासोबत त्यांचा धर्म आला, स्थानिक लोकांशी झालेल्या संकरामुळे इस्लामचे अनुयायी वाढले. सातव्या शतकात मालदीवच्या बाजूच्या लक्षद्वीप बेटांवर इस्लामी संत-धर्मप्रचारक उबेदुल्लाह स्थायिक झाले. त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकांपैकी काही इस्लामचे अनुयायी झाले. सातव्याच शतकात मुहम्मद बिन कासिमने सिंधच्या राजा दाहीर ला आऱोरच्या युद्धात हरवून त्याच्या ताब्यातला प्रदेश इस्लामच्या पूर्ण प्रभावाखाली आणला होता. ह्यात आजच्या पाकिस्तानातील आणि अफगाणिस्तानातील काही बुद्ध धर्मावलंबी प्रदेशही होते. सिंधच्या कराची बंदरातून मालदीवला जहाजे नियमित जात, पण तेथील इस्लामिक धर्मप्रचारक काही मालदीवला गेले नाहीत.
आठव्या शतकात आपल्याकडे केरळच्या मलबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अरब व्यापारी वसले. ह्या श्रीमंत व्यापारांच्या प्रभावा-आग्रहामुळे चेरामन पेरुमल सारखे काही स्थानिक राजे इस्लाम धर्मानुयायी झाले. त्यामुळे इस्लामी धर्म-प्रचाराला गती आणि धन - प्रतिष्ठा प्राप्त झाली. पुढे काही वर्षातच त्यांच्यापैकी काही मलबारी-अरबी लोक मालदीवमध्येही राहायला आले, त्यांच्यासोबत इस्लामिक धर्माचरण मालदीवच्या काही बेटांवर प्रवेशले.
पण हे सर्व झाले तरी मालदीवच्या बहुसंख्य लोकांनी धर्म बदलला नाही, तिथे बुद्ध धर्मच प्रभावी होता. मालदीवमध्ये इस्लाम स्वीकृत व्हायला आणि रुजायला बराच काळ जावा लागला - सिंध, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये इस्लामच्या आगमनाच्या सुमारे ५००-६०० वर्षानंतर थेट ११९३ मध्ये मालदीवच्या राधून नी इस्लाम कुबूल करेपर्यंत.
थिमुगे-होमा वंशाच्या ह्या राधूनचे नाव रासगेफानू-महाराधून 'धोवेमी'. त्याला इस्लामची दीक्षा कोणी दिली ह्याबद्दल थोडा संभ्रम आहे. दोन नावे प्रमुखतः घेतली जातात, पहिले मोरोक्को येथून आलेले सुन्नी संत - अबू अल बरकत आणि दुसरे इराणहून आलेले धर्मप्रचारक योसुफ शमसुद्दीन तबरीझ.
दोघांचीही स्मृतिस्थळे माले शहराच्या हुकुरू मिस्की मशिदीनजीक बांधलेली आहेत.
(अलीकडच्या काळापर्यंत भारत-पाकिस्तान-श्रीलंका-बांगलादेश प्रमाणेच ह्या मजारींवर दुवा मागण्याचे आणि उर्स साजरे करण्याचे कार्यक्रम होत असत. जहाल विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे आता बंद पडले आहेत.)
मालदीवच्या राजाच्या धर्मपरिवर्तनाला हिंसक घटनांची पार्श्वभूमी नाही. पुढे हा राधून 'सुलतान मोहम्मद अल-अदिल -धर्मवंथ रासगेफानू’ - म्हणजे दयाळू राजा म्हणून प्रसिद्धी पावला. लवकरच सुलतानाने स्वतः सर्व मोठ्या बेटांवर प्रत्यक्ष जाऊन जनतेला इस्लामची दीक्षा दिली.
आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे ह्या लोकांनी बौद्ध धर्माची अहिंसेची शिकवण मनापासून स्वीकारली असल्याकारणाने बहुतेक बुध्दविहार आणि मंदिरे तोडफोड न करता त्यावर दगड-माती रचण्यात आली.
त्यापुढे ८४ वेगवेगळ्या सुलतानानीं मालदीवच्या बेटांवर राज्य केले आणि ह्यामध्ये बऱ्याच स्त्री शासक सुद्धा आहेत.
बुद्धविहाराची झाली मशीद - लामू बेटावरील एक प्राचीन मशीद
राजा आणि सर्व प्रजेने बौद्ध धर्म टाकून इस्लाम स्वीकारला तरी मालदीव मध्ये धार्मिक वातावरण कट्टर नव्हते. उदा: १९४३ मध्ये पदच्युत झालेला शेवटचा सुलतान नुरुद्दीन दुसरा याची पदवी बघा - 'कुलसुद्धा सर्वरसासथुरा आयुध भवनाकीरथी महाराधून (कुलशुद्ध सर्व-शास्त्र आयुध भुवन कीर्ती महा राजन). हे इस्लाम स्वीकारल्याचे शेकडो वर्षानंतर !
मुळातच स्वच्छंदी- साधी सोपी माणसं इथं असल्यामुळे येथील धर्म आणि धार्मिक वातावरण बरेचसे मुक्त - भारतीय उपखंडातील सूफी मतासारखे - स्थानीय प्रथापरंपरांना सामावून घेणारे, इथल्या लोकांप्रमाणेच थोडे अघळपघळ होते.
धर्माचरण बरेच ऐच्छिक होते. समाजात स्त्रियांचे मानाचे स्थान आणि त्यांचा राजकारणात, अर्थार्जनात आणि एकूणच सामाजिक कार्यात मुक्त आणि ठळक सहभाग, एकपत्नित्व, बुरखा पद्धतीचा अभाव, नृत्य-गायनादी कलांना असलेली प्रतिष्ठा असे थोडे वेगळे वातावरण इथे होते.
बोडू-बेरू वर हाताची थाप पडली - नृत्यमग्न तरुणींचा समूह.
भारतातल्या केरळ भागातून येऊन वसलेल्या काही लोकांमुळे असेल पण बरीच कुटुंबे मातृसत्ताक पद्धतीचीही होती. त्या प्रभावामुळे अनेक बेटांवर स्थानिक सरकारच्या प्रमुखपदी स्त्रिया असणे आणि मालदीवच्या सर्वोच्च शासक 'सुलताना' असणे नवीन नव्हते. स्त्रियांनी प्रार्थनेसाठी मशिदीत जाणे अगदीच सामान्य बाब होती.
भुताखेतांवर विश्वास असलेले, पीर - मजार - चादर - नवस - दुआ - मिरवणुका - उरूस असे सगळे 'गैर-इस्लामी' आणि 'जाहिल' रीती-रिवाज पाळणारे लोक बहुसंख्य होते, पण त्यात भाबडेपणा जास्त होता. अगदी १००% मुस्लिमधर्मीय जनता असली तरी साधारण सार्वजनिक जीवन बऱ्यापैकी मोकळे-ढाकळे आणि पुढारलेले होते.
पण हे सगळे झपाट्याने बदलते आहे. गेल्या एक-दोन दशकातच सौदी अरेबिया आणि पाकिस्तानसमर्थित सलाफी-वहाबी जहाल मतांच्या प्रचारकांनी आणि मौलवींनी मालदीवला धार्मिक कट्टरतेकडे ढकलले आहे. त्याबद्दल पुढे.
सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.
थोडे अवांतर:
मागच्या भागाच्या शीर्षकामधे धिवेही भाषेत महिने, वर्षे आणि शतकं झालीत, मग आठवड्याचे सर्व दिवस नकोत?
हे घ्या -
आधीतथा - रविवार (त चा उच्चार हलन्त - आदित्य)
होमा - सोमवार (स' ला 'ह' म्हणायचं)
अंगारा - मंगळवार (अंगारकी आठवली, राईट ?)
बुधा - बुधवार (सोप्प आहे हे)
बुरासफथी - गुरुवार (बृहस्पतीवार, बरोबर ?)
हुकुरू - शुक्रवार (तेच ते, 'स' ला 'ह' म्हणायचं)
होनीहिरू - शनिवार (हे जमलं हो आता)
मालदीवमध्ये 'बिधेयसी' सत्ता आणि इस्लामची वाटचाल
मालदीवच्या इतिहासाची नाळ भारताप्रमाणेच श्रीलंकेशीही जोडलेली आहे. इतिहासात श्रीलंकेत घडणाऱ्या घटना, तेथील राज्यकर्ते आणि व्यापारी इत्यादींची मालदीवच्या स्थानिक बाबींमध्ये बरीच दखल असावी असे आढळते. मागील भागात सांगितल्या प्रमाणे ११९३ मध्ये मालदीवच्या धेवोमी महाराधूनने इस्लाम स्वीकारल्या नंतर मालदीवकर सुलतानांच्या अंतर्गत चढाओढी आणि त्यांच्यातल्या वेगवेगळ्या राजवंशांचे सत्तेवर येणे-जाणे सोडले तर मालदीवमध्ये स्थानिक लोकांचे शासन पुढची काही शतके विनाअडथळा सुरु राहिले.
वास्को-द-गामा ने भारतीय भूमीवर पाऊल ठेवले ते १४९८ साली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून (किंवा गलबतावर गलबत ठेवून म्हणू हवे तर) पोर्तुगीझ व्यापारी मोठ्या प्रमाणात हिंद महासागरात समुद्रवाऱ्या करू लागले. पुढे त्यात फ्रेंच, डच आणि इंग्रज व्यापाऱ्यांचीही भर पडली. इथल्या सुबत्तेच्या कहाण्या ते स्वतःच्या मायदेशी कळवीत होते. त्यामुळे आशियात आणि मुख्यतः भारतीय उपखंडात साम्र्याज्यविस्तार करण्याचे डोहाळे ह्या सर्व परकीय सत्ताधीशांना लागले. ह्यात पोर्तुगीझ सत्ता जास्त आक्रमक होती. त्याचा परिपाक म्हणून पंधराव्या शतकाच्या आरंभी पोर्तुगीझ सैन्याने सिलोन (श्रीलंका) आणि भारतातले गोवा ताब्यात घेतले. मालदीव बेटे त्यांच्या नेहमीच्या व्यापारी मार्गावर होती. त्यामुळे तत्कालीन सिलोनमध्ये पोर्तुगीझ सत्ता प्रबळ होताच मालदीव त्यांच्या ताब्यात यायला फार वेळ लागला नाही. १५५८ ते १५७३ अशी १५ वर्षे मालदीव पोर्तुगीझ अंमलाखाली होते. पण गोव्यातून पाठवण्यात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी गोव्याप्रमाणेच मालदीवमध्ये बळजबरीने धर्मपरिवर्तनचा सपाटा लावला. त्यांच्या एका अल्पवयीन सुलतानाला, हसनला, ख्रिस्ती केले. हे स्थानिक लोकांना पसंत पडले नाही आणि लवकरच सुलतान मोहम्मद अझीमच्या नेतृत्वाखाली जनतेने हिंसक प्रतिकार करून व्यापारी आणि धर्मगुरुंसकट सर्व पोर्तुगीझ लोकांना मालदीवमधून पिटाळून लावले, पोर्तुगिझांचे शासन उलथून टाकले. मालदीवमध्ये आजही हा दिवस विजयोत्सवाच्या रूपाने 'गौमी धुवस'' म्हणजे राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा होतो - आणि ह्या घटनेची आठवण म्हणून विजयी सुलतान महोम्मद 'गाझी' यांच्या महालाला एक स्मारक / संग्रहालय म्हणून जतन केले आहे.
(आणि हो, ख्रिस्ती झालेल्या मालदीवच्या सुलतानाला आणि पुढे त्याच्या वंशजांना गोव्यातील पोर्तुगीझ व्हॉइसरॉयने इनामे वगैरे देऊन गोव्यातच ठेवून घेतले.)
पुढे अनेक वर्षे मालदीवच्या सुलतानांनी स्वशासन अनुभवल्यानंतर भारतीय उपखंडातील बहुतेक भूभागाप्रमाणे मालदीव ब्रिटिशांच्या अंमलाखाली आले ते १८८७ साली. तोवर भारतात १८५७ च्या उठावाला २० वर्षे झाली होती आणि ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरावली होती. भारतीय उपखंडात त्यावेळच्या ब्रिटिश अमलाखालील एकूण भूमीवर नजर टाकली तर ह्या टिकलीएवढ्या देशाकडे खरे तर त्यांचे लक्षही जायला नको. पण ब्रिटिशांना मालदीवच्या बेटांचे व्यापारी आणि भू-राजकीय महत्व आधीपासून माहित होते. म्हणून त्यांनी स्थानीय राजकारणात लक्ष घालायला सुरवात केली आणि हळूहळू मालदीवच्या सुलतानाच्या दरबारात स्वतःचे स्थान बळकट केले. ह्या दूरदृष्टीचा मोठा फायदा ब्रिटिशांना पुढे दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी झाला. कराची, सिंगापूर आणि भारतातील भूमीवरून उडणाऱ्या विमानांच्या आणि हिंदमहासागरातील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गान बेटावरील तळाची मदत झाली.
गान बेटावरचा ब्रिटिश तळ
हिंदू सैनिकांवर मानाने अग्निसंस्कार आणि अन्य सैनिकांना दफन केल्याचा तपशील - इंग्रजी, हिंदी आणि धिवेही भाषेत - महायुद्धाचे स्मारक, अड्डू अटॉल, मालदीव.
हिंद महासागरातील हा सामरिक महत्वाचा लष्करी तळ मालदीवच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील अनेक वर्षे ब्रिटिश ताब्यातच होता. पुढे ब्रिटिशांनी हा तळ मालदीवला सोपवल्यानंतर यावर अनेक देशांचा डोळा होता. अफगाणिस्तानात क्रांती होउन रशियन सैन्य तेथे स्थिरावले तेंव्हा रशियन सत्तेने (तत्कालीन USSR) हा तळ आम्हाला वापरायला किंवा विकत द्याल का अशी विचारणा मालदीवला केली. सुदैवाने तसे काही घडले नाही आणि मालदीव तत्कालीन जागतिक कोल्ड-वॉरमधला प्यादा होण्यापासून बचावले.
मालदीवच्या सुलतानाला मांडलिक करून ब्रिटिशांनी हिंदमहासागरातून जाणान्या महत्वाच्या सागरी मार्गांवरचा आणि व्यापारावरचा स्वतःचा वचक कायम ठेवला तो थेट १९६५ साली मालदीव पूर्ण स्वतंत्र होईपर्यंत.
स्वतंत्र मालदीवचा राष्ट्रध्वज
२६ जुलै १९६५ रोजी ७७ वर्षांच्या प्रदीर्घ ब्रिटिश मांडलिकत्वातून मालदीव स्वतंत्र झाले. त्याआधीच सुलतानांची सद्दी संपत आली होती, नव्या नेत्यांच्या उदय झाला होता. स्वतंत्र मालदीवमध्ये सुलतानी राजवट संपवून आधी संसदीय पद्धतीचे आणि दोनच वर्षात अध्यक्षीय पद्धतीचे स्थानिक सरकार कायम करण्यात आले. इब्राहिम नासिर १९६८ ते १९७८ अशी दहा वर्षे स्वतंत्र मालदीव सरकारच्या प्रमुखपदी होते. ते सत्तेवर आल्या-आल्याच स्वीकारण्यात आलेल्या देशाच्या नवीन राज्यघटनेत मालदीव हे 'इस्लामिक राष्ट्र' घोषित करण्यात आले. पण अर्वाचीन मालदीवच्या एकूणच जडणघडणीत सर्वात मोठे योगदान जर कोणा नेत्याचे असेल तर ते ११ नोव्हेंबर १९७८ ला राष्ट्रपती पदावर आरूढ झालेल्या मौमून अब्दुल गय्यूम यांचे.
स्वतंत्र मालदीवचे तिसरे राष्ट्रपती मौमून अब्दुल गय्यूम
गय्यूम यांनी १९७८ ते २००८ अशी ३० वर्षे मालदीववर अनभिषिक्त सम्राटासारखे एकछत्री राज्य केले. तीन दशके हा काही थोडा थोडका कालावधी नाही. मोकळ्याढाकळ्या ‘जाहिलिया’ मालदीवची 'इस्लामिक रिपब्लिक' ही ओळख ठाशीव होण्यामागे गय्यूम यांचे मोठे योगदान आहे.
भारताच्या आगेमागे स्वतंत्र झालेल्या एशियातील जवळपास सर्व देशांचे प्रमुख राष्ट्रनेते ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटिश पद्धतीचे शिक्षण घेतलेले आहेत. मालदीवमध्येही अशीच परिस्थिती होती. गय्युम यांचे तसे नव्हते, त्यांचे वेगळेपण म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षांपासून ते ३१ वर्षांपर्यंतचा व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा काळ त्यांनी इजिप्तमध्ये घालवला. तिथल्या धार्मिक विचारांचा आणि इस्लामिक शिक्षणाचा त्यांच्या विचारसरणीवर बराच प्रभाव पडला असावा. कैरोच्या अल-अझहर विद्यापीठातून पदवी घेऊन ते मालेला परतले तेंव्हा राजकारणात पडून पुढच्या ७-८ वर्षात ते राष्ट्राध्यक्ष होतील असॆ कोणालाच वाटले नव्हते. १९७८ मध्ये राष्ट्राध्यक्षपदी आरूढ झाल्यानंतर पुढची सलग तीस वर्षे मालदीवच्या आर्थिक - राजकीय - सामाजिक जडणघडणीबरोबरच इस्लाम विषयक ओळखीचे निर्माण, संचालन आणि नियमन गय्यूम यांनीच केले असे म्हणता येते.
त्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला मालदीवमध्ये धार्मिक वातावरण मोकळेढाकळेच होते. स्त्रियांना बुरखा सक्ती वगैरे तर नव्हतीच, उलट बॅडमिंटन, टेनिस आणि पोहण्याच्या शर्यतीत स्त्रिया हिरीरीने भाग घेत इतपत पुढारलेले वातावरण होते.
राष्ट्रपती गय्यूम यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित स्त्री समुदाय - वर्ष १९७९ - खुद्द राष्ट्राध्यक्ष भेटीला आले असतांनासुद्धा एकाही स्त्रीच्या शरीरावर बुरखा तर सोडाच डोक्यावर चादर / स्कार्फ सुद्धा नाही.
भारतीय उपखंडात पाश्चात्य जगाच्या ‘आधुनिक’ 'नव्या’ आणि पुढारलेपणाच्या कल्पना बव्हंशी राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या प्रभावाने आल्या. भारतात सतीप्रथा-जातिप्रथा निर्मूलन, स्त्रियांना शिक्षण अश्या बऱ्याच सामाजिक सुधारणांमध्ये राज्यकर्त्यांचा आणि स्थानिकांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या उच्चशिक्षणाचा मोठा वाटा होता हे नाकारण्यासारखे नाही. असे काही आधुनिक बदलांचे वारे मालदीवला मात्र पोचले नाही. त्याऐवजी सत्तरीच्या दशकात मालदीवमध्ये पाश्चात्य संस्कृतीचे वेगळे रूप बघायला मिळाले ते ब्रिटिश-युरोपीय उन्मुक्त पर्यटकांमुळे. १९७२ मध्ये आस्ते कदम सुरवात झाल्यानंतर मालदीवच्या बेटांवर विदेशी पर्यटकांचा ओघ सुरु झाला. मालदीवच्या निसर्ग सौंदर्यामुळे गोव्याप्रमाणेच तेथे जिप्सी - फ्लॉवर पॉवर ब्रिगेडची ये-जा वाढली. त्या पर्यटकांसोबत त्यांची स्वच्छंदी संस्कृती आली. मालदीव हा काही श्रीमंत देश नव्हता, निसर्गसौंदर्य सोडले तर धनप्राप्ती करता येईल असे काहीच त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे पर्यटकांचा पैसा सगळ्यांनाच हवाहवासा होता. पर्यटकांच्या उघड स्वैर वागण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले, उलट अधिक पर्यटक कसे येतील याकडे लक्ष दिले. ह्याचा एक परिणाम म्हणजे स्थानिक लोकांपैकी काही कट्टर मंडळींना हे सगळे कसे गैर-इस्लामिक आहे आणि शासन कसे संस्कृती आणि इस्लाम बुडवायला निघाले आहे असा प्रचार करायची नामी संधी मिळाली.
इस्लामच्या तथाकथित बुडण्याच्या प्रचाराला उतारा म्हणून अरब देशांकडून भेट मिळालेल्या पैश्यातून मालदीवमधील जुन्या मशिदींचा जीर्णोद्धार आणि मालेमध्ये नवीन भव्य मशिदी, इस्लामिक अभ्यासकेंद्र इत्यादींची निर्मिती करण्यात आली. इस्लामिक धर्मशिक्षणासाठी स्थानिक तरुणांना सौदी आणि पाकिस्तानस्थित इस्लामिक धर्मपीठांनी उदारहस्ते शिष्यवृत्ती द्यायला सुरवात केली. इस्लामिक प्रचार-शिक्षणासाठी मिळालेल्या अश्या मदतीमुळे पुढे मालदीवमधे इस्लामच्या अरबस्तानातल्या सलाफी-वहाबी विचारांसाठी पूरक मनोभूमी तयार होण्यास मदत झाली.
स्थानीय जनतेचा ह्या पर्यटकांशी फार संबंध येऊन 'संस्कृती' बुडू नये म्हणून वस्ती असलेल्या बेटांवर विदेशी पर्यटक जाणार नाहीत ह्याकडे शासनाने लक्ष घातले. (स्वगत- सर्वत्र समुद्र असलेल्या ह्या देशातही 'संस्कृती'ला पोहायला शिकवणे अवघडच का असावे?) एव्हाना पर्यटकांसाठी वेगवेगळ्या बेटांवर बरेच रिसॉर्ट्स सुरु झाले होते. विदेशी पर्यटक आणि स्थानिकांसाठी वेगवेगळे कायदे आणि आचारसंहिता अमलात आली. स्थानिकांचा विदेशी लोकांशी कमीत कमी संपर्क यावा असे नियम करण्यात आले. विदेशी पर्यटक शक्यतो चार्टर्ड विमानांनी येऊन थेट रिसॉर्टला जातील अशी व्यवस्था करण्यात आली.
मालदीवच्या भूमीवर इस्लामिक कट्टरतेचे वारे जोमदार झाले १९९० च्या दशकापासून. तोवर पर्यटन आणि मत्स्य-निर्यातीच्या व्यवसायातून सरकार आणि जनतेकडे समृद्धीचा ओघ सुरु झाला होता. गय्युम ह्यांची एकाधिकारशाही मालदीवमध्ये स्थिरावली होती, म्हणजे म्हणायला ते लोकशाही मार्गाने निवडलेले नेते होते पण अनेक वर्षे राष्ट्रपतीपदाच्या प्रत्येक निवडणुकीत ते एकमेव उमेदवार असत. त्यामुळे जनतेकडे त्यांना मत द्यायचे किंवा द्यायचे नाही असे दोन पर्याय (!) उपलब्ध होते. त्यांनी सर्व राजकीय विरोधकांना थोपवून धरले होते आणि मालदीववर त्यांचा एकछत्री अंमल होता. पुसटसा पण राजकीय विरोध त्यांना मंजूर नव्हता. १९८० ते १९९० च्या दरम्यान त्यांच्या विरोधकांनी त्यांचे सरकार उलथून टाकण्याचे २-३ प्रयत्न केले, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. खरेतर गय्युम यांनी स्वतःला राजकीय आव्हान देऊ शकेल असा कोणी नेता निर्माण होणार नाही याकडे पूर्ण लक्ष दिले होते.
यावरून एक आठवलं 1988 साली गयूम यांच्या एका विरोधकाने श्रीलंके मधील लिट्टे च्या अतिरेक्यांची मदत घेऊन सत्ता उलटवण्याचा सशस्त्र प्रयत्न केला. त्यावेळी गयूम यांनी राजीव गांधी कडे मदत मागितली आणि भारतीय लष्कराने वेगाने कारवाई करत operation cactus राबवून मालदीव आणि पर्यायाने गयूम सरकार च सरंक्षण केलं. भारत मालदीव संबंधातील हे मनाचं पान आहे.
एकाचवेळी स्वैर-उन्मुक्त पर्यटकांना पूर्ण सूट एकीकडे तर दुसरीकडे स्थानिक जनतेवर अरब पद्धतीच्या इस्लामिक विचारांचा मारा असे दोन ठळक वेगळे प्रवाह मालदीवमध्ये तयार झाले होते. स्त्रियांनी अंगभर काळा बुरखा घालावा आणि पुरुषांनी पाच वेळा नमाज पढण्यासाठी जावे याकरता काही धर्मगुरूंचा प्रचार जोरात सुरु झाला.
राष्ट्रपती अब्दुल गय्यूम सुरवातीला कट्टर इस्लामिक मताचे विरोधक होते. धार्मिक कट्टरतेच्या आव्हानाचा परामर्श घेत त्यांनी कट्टरतेचा प्रचार करणाऱ्या काही मौलवींना अटक करून तुरुंगात खितपत तर ठेवलेच, वर महिलांवर बुरखा/डोके ‘न’ झाकण्याची सक्ती करणारे आदेश काढले होते. कट्टरवाद्यांनी आणि मौलवींनी आदळआपट केली तरी गय्यूम सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांना जाब विचारणारे असे कोणीच नव्हते.
पुढे १९९७ मध्ये गय्यूम यांनी एक घटनादुरुस्ती करून सर्व इस्लामिक विषयांची अंतिम व्याख्या करण्याचे सर्वोच्च अधिकार राष्टपतींकडे - पर्यायाने स्वतः कडे घेतले. ह्या कृतीतून त्यांना स्वतःचे आधीच मजबूत असलेले राजकीय स्थान अधिक बळकट करायचे होते हे उघड आहे. या कृतीला सौदी-पाकिस्तानातून धर्मशिक्षण घेऊन आलेल्या कट्टरपंथी मौलवींनी कडाडून विरोध केला. त्याला गय्युमविरोधकांची साथ मिळाली आणि 'अदालत पार्टी' ह्या जहालमतवादी पक्षाचा जन्म झाला. तेंव्हापासून आजवर ह्या पक्षाच्या विचारधारेने मालदीवच्या राजकीय-सामाजिक जीवनात इस्लामिक कट्टरतावाद पसरवण्याची एकही संधी वाया घालवलेली नाही. मालदीवला 'जाहिलिया' गैर इस्लामिक जीवनपद्धतीतून पूर्णपणे मुक्त करून 'खऱ्या' इस्लामची स्थापना करणे हे अनेकांचे जीवनध्येय बनले.
पुढे २००४ मध्ये आलेल्या सुनामीने मालदीवच्या बेटांचे भरपूर नुकसान तर केलेच, आणिक मालदीवच्या समाजविश्वात एक दुसरी सुनामी आणली. देशात झालेल्या प्रचंड नुकसानीत मदत करायला म्हणून सौदी आणि अन्य देशांचे जे अनेक 'समाजसेवक' मालदीवमध्ये प्रवेश करते झाले त्यांनी मालदीवच्या समाजाची वीण उसवण्याचे काम केले. भोळ्या देशवासीयांच्या मनावर ही सुनामी अल्लाहच्या कोपामुळे आली आहे आणि त्याचे कारण इस्लामच्या मूळ शिकवणीपासून मालदीवच्या लोकांनी घेतलेली फारकत हेच आहे असे बिंबवण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. ह्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वच राजकीय नेते - पुढारी - धर्मगुरुंमध्ये आपणच कसे ‘खऱ्या’ इस्लामचे पाईक आणि तारणहार आहोत हे दर्शविण्याची चढाओढ सुरु झाली. ती दिवसेंदिवस वाढतच आहे.
सद्यस्थितीत मालदीवसमोर राजकीय अस्थिरता आणि कट्टरतावाद्यांचे वाढते प्रस्थ असे दुहेरी आव्हान आहे. नियतीचे फासे असे की अदालत पार्टीने आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्या गय्युम यांचे सावत्र भाऊ अब्दुल्ला यामीन आज मालदीवचे राष्ट्रपती आहेत आणि अदालत पार्टी त्यांच्यासोबत मालदीवच्या सरकारात सामील आहे.
आज मानवी वस्ती असलेल्या प्रत्येक बेटावर मिस्की म्हणजे मशीद आहे. एकट्या माले शहरात नव्या जुन्या मिळून ३० मशिदी आहेत. महिलांसाठी वेगळ्या मशिदी आहेत.
विलूफुशी ग्रँड मिस्की - विलूफुशी बेटावरील मालदीवमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद.
मालदीवमध्ये असलेल्या एकूण ७२४ मशिदींपैकी २६६ महिलांसाठी आहेत, त्यातही बऱ्यापैकी उपस्थिती असते.
धर्माचरणात सामान्य जनतेची रुची (!) वाढत आहे. इतकी की काहींनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये न पाठवता घरीच इस्लामिक शिक्षण देण्याचा घाट घातला आहे. मालेच्या रस्त्यांवर साधारण १० टक्के स्त्रिया पूर्ण बुरखा तर बहुसंख्य स्त्रिया चादर/स्कार्फ घातलेल्या दिसू लागल्या आहेत. हज यात्रेला उत्सुक लोकांची संख्या एकाएकी वाढली आहे.
मालदीवच्या धार्मिक कट्टरतेकडे सुरु झालेला प्रवास हा त्या देशात आणि भारतासारख्या आजूबाजूच्या देशात अस्थिरता निर्माण करणार हे दिसू लागले आहे.
सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.
* * *
थोडे अवांतर :-
मालदीवमध्ये समुद्राखाली तसेच जमिनीवर जैव-वैविध्याची अगदी आगळी-वेगळी रूपे बघायला मिळतात. जलचर-भूचर प्राणी, पक्षी, झाडेझुडपे वेगळी आहेत, काही तर सुदूर आफ्रिकेच्या किनाऱ्यांशी साधर्म्य दाखवणारी. वटवाघुळे भरपूर आहेत, मांजरी आणि उंदीर आहेत पण माकडे नाहीत. कुत्री नाहीत - जंगली, भटकी, पाळीव -कुठलीच कुत्री नाहीत. वृक्षराजींची वेगळी रेंज आहे, भारत किंवा श्रीलंकेपेक्षा वेगळी झाडे - फुले - झुडपे. ह्यात निसर्गतः उगवलेले काटेरी निवडुंग / 'कॅक्टस' कुठेच दिसत नाही. पण भारत-मालदीव सुदीर्घ संबंधातील एका महत्वाच्या वळणावर एका 'कॅक्टस'नी एक अनोखी भूमिका पार पाडली आहे. त्याबद्दल पुढे.
बेबे-कोक्को, ऑपरेशन कॅक्टस आणि भारत-मालदीव
आजचे माले शहर
* * *
वर्ष १९८८ आणि स्थळ श्रीलंकेचा उत्तर किनारा.
उमामहेश्वरन उर्फ मुकुंदनला आता स्वतंत्र तामिळ इलमसाठी 'संघर्ष' सुरु करून दहा वर्षे होत आली होती. त्याच्या 'पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तामिळ इलम'(प्लॉट) ह्या संघटनेला श्रीलंकेत वेलुपल्ली प्रभाकरनच्या लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (लिट्टे) आणि अन्य काही संघटनांनी केंव्हाच मागे टाकलं होतं. श्रीलंकेचे लष्कर त्याच्या मागावर होते, त्यांना आता भारतीय शांतीसेनेचे (IPKF) सत्तर हजार जवान येऊन मिळाले होते. त्यामुळे युद्ध तर सोडाच, त्याचे श्रीलंकेत लपून राहणे पण अवघड होत होते. शस्त्र खरेदी थांबली होती आणि त्याच्याकडचे पैसे संपत आले होते. प्रभावक्षेत्र आटले तरी त्याचे मित्रमंडळ मात्र भारदस्त होते - तामिळनाडूतील जहाल तामिळ अस्मिता असलेले विचारवंत-राजकारणी-धनिक, मालदीवमधले अंमली पदार्थांचे व्यापारी आणि गुंड, श्रीलंका आणि मालदीवमधले काही श्रीमंत व्यापारी, जाफना आणि अन्य श्रीलंकन शहरातील कॉलेजवयीन विद्यार्थी, श्रीलंकेतील कसिनोचे मालक... त्याची रेंज अफाट होती. त्यात एक श्रीमंत मालदीवकर होता अब्दुल्ला लुतफी. ह्या लुतफीचे राष्ट्रपती गय्यूम यांच्याशी वाकडे होते आणि गय्यूम यांना धडा शिकवणे हे त्याचे जीवनध्येय होते. त्यानी उमामहेश्वरनला मालदीव हा देशच ताब्यात घेण्याची योजना सुचवली. भारतीय शांती सेना आणि श्रीलंकेच्या सैन्याच्या पाठलागाला कंटाळलेल्या उमामहेश्वरनला ही योजना पसंत न पडती तरच नवल.
उमामहेश्वरनकडे असलेली एक विशेष योग्यता म्हणजे स्वतंत्र तामिळ इलमच्या भानगडीत पडण्यापूर्वी तो श्रीलंका लँड सर्वे ब्युरोमध्ये सर्वे इंजिनियर होता. त्याला नकाशे तयार करण्याचा आणि ते वाचण्याचा बराच सराव होता. भारत, लेबनॉन आणि सिरीयात त्याने सैनिकी-गोरिल्ला युद्धाचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. लंकेत बँका लुटणे, अंमली पदार्थांचा छुपा व्यापार, अपहरण- खंडणी वसूल करणे असा बराच ‘अनुभव’ त्याला होता. त्याने स्वतःच्या विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेऊन मालदीववर चढाई करण्याचा बेत नक्की केला. मोहीम फत्ते झाल्यानंतर लुतफी मालदीवचा राष्ट्रपती आणि उमामहेश्वरनला मालदीवमध्ये राहून श्रीलंकेविरुद्ध 'संघर्ष' करण्यासाठी सर्व सूट अशी विभागणी ठरली. मालदीवकडे ना सैन्य होते ना आरमार. सुरक्षेसाठी माले बेटावर काही पोलीस आणि अक्ख्या देशाच्या सुरक्षेसाठी नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसचे एकूण २००० सैनिक हीच काय ती सुरक्षा. उमामहेश्वरनचा प्रियकर वसंत उर्फ वासंथी ह्या मोहिमेचा नेता नियुक्त झाला. दिशादर्शन करण्यासाठी आणि मालदीवची आतल्या गोटातील सर्व खबरबात देण्यासाठी मालदीवकर अब्दुल्ला लुतफी आणि त्याचा मित्र सगर नासिर सोबत होतेच.
३ नोव्हेंबरच्या १९८८ च्या पहाटे ४.३० वाजता सुमारे १५० जणांच्या सशस्त्र टोळीने माले शहरात घुसून एकदोन ग्रेनेड आणि काही बंदुकीच्या फैरी एव्हढ्या भांडवलावर बेसावध सुरक्षारक्षकांना हुसकावून लावले आणि अवघ्या काही मिनिटातच राष्ट्रपतींचे कार्यालय, सचिवालय, मालदीव रेडिओ, टेलिव्हिजन स्टुडिओ, पोलीस मुख्यालय आणि राष्ट्रपतींचे निवासस्थान अशी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन शांत-निवांत मालदीवमध्ये खळबळ माजवली.
मालदीव सरकारचे मुख्यालय - माले
झालेल्या गदारोळात राष्ट्रपती गय्यूम मात्र तेथून निसटले आणि त्यांनी अमेरिका, ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया आणि भारताच्या सरकारप्रमुखांना फोनवर संपर्क साधून तातडीची मदत मागितली. नवी दिल्लीत पंतप्रधान राजीव गांधींना त्यांनी फोन केला तेंव्हा पहाटेचे ५.३० वाजले होते. राजीव गांधींनी चपळाईने हालचाली करत भारतीय सैन्यप्रमुखांना पाचारण केले आणि त्यातून जन्मले ते 'ऑपरेशन कॅक्टस' - भारताच्या सैन्य इतिहासातील मानाचे पान !
* * *
भारतीय लष्कराची 50 इंडिपेंडंट पॅराशूट ब्रिगेड ही शांतीकालीन सैन्य तुकडी / 'पीस टाईम ऑपरेशन फोर्स' मानली जाते. लष्कराच्या आग्रा तळावर ह्या ब्रिगेडचे मुख्यालय आहे. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदत पोहचवणे/अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, अन्य तुकड्यांच्या सैनिकांना प्रशिक्षण देणे आणि लष्करी समारंभात चित्ताकर्षक प्रात्यक्षिके सादर करणे असे कामाचे साधारण स्वरूप असलेल्या ह्या ब्रिगेडला तातडीची लष्करी हालचाल थोडी नवीन होती. दिल्लीतून आदेश मिळाल्याच्या काही तासातच पॅराशूट ब्रिगेड, भूदल आणि वायुदलाच्या सैनिकांसह सर्व लष्करी तयारीनिशी ‘फ्रेंडली वन’ आणि ‘फ्रेंडली टू’ असे कोडवर्ड असलेल्या IL-76 जातीच्या दोन लढाऊ विमानांनी ‘'छत्री माता की जय' च्या जयघोषात आग्रा सोडले. त्यात असलेल्या जवानांना आपण श्रीलंकेत IPKF ह्या भारतीय शांतीसेनेला मदत करायला जात आहोत असे सांगण्यात आले होते.
फोटो - अवाढव्य IL -७६ इलुशीन विमान - बाहेरून
फोटो - अवाढव्य IL -७६ इलुशीन विमान - आतून
आर्मी टास्क फोर्स कमांडर ब्रिगेडियर फारोक 'बुल' बलसारा यांनी ह्या १८०० जवानांचे नेतृत्व केले. लष्करी गणवेशधारी हवाईदल आणि सैन्यदलाचे अधिकारी आणि सैनिक खच्चून भरलेल्या ह्या विमानात साध्या कपड्यातील एकच 'सिव्हिलिअन' व्यक्ती होती ती म्हणजे खुद्द श्री ए. के. बॅनर्जी, भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त! २००० किलोमीटरचा सलग प्रवास करून ही विमाने मालेच्या पिटुकल्या विमानतळावर उतरली तोवर सूर्य मावळला होता. माले शहराची सर्व बाजूने नाकाबंदी करून भारतीय सैनिक बोटींनी माले बेटावर उतरले आणि काही तासात सर्व आस्थापनांवर ताबा मिळवून त्यांनी राष्ट्रपती गय्यूम यांची सुखरूप स्थळी रवानगी केली. श्रीलंका टोळीतील बहुतेक लोक ठार झाले, काहींना अटक झाली, काहींनी पळ काढला. उठावकर्त्या लुतफीसकट बोटींमधून पळ काढलेल्या श्रीलंका टोळीला भारतीय नौदलाच्या बोटींनी पाठलाग करून जिवंत पकडले. एकही भारतीय सैनिक न गमावता ऑपरेशन कॅक्टस पार पडले.
पहाटे ५.३० वाजता राष्ट्राध्यक्ष गय्यूम यांचा मदतीची विनंती करणारा फोन पंतप्रधान राजीव गांधींना आला आणि त्याच रात्री उशिरा सर्व आलबेल होऊन गय्यूम यांनी सूत्रे पुन्हा ताब्यात घेतल्याचा फोन राजीव यांना केला यातच भारतीय सैन्यदलाचे यश दिसून येते.
ऑपरेशन कॅक्टसला खूप आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रोनॉल्ड रीगन यांनी तर स्वतः पंतप्रधान राजीव गांधींना फोन करून भारतीय सैन्याची, त्यांच्या चपळतेची आणि अचूक सैन्य-कारवाईची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि शेजारी देशांसाठी धावून जात हिंदमहासागरात सुरक्षा आणि शांती कायम ठेवण्यासाठी करत असलेल्या नेतृत्वाबद्दल भारताची पाठ थोपटली.
श्रीलंकेत शांतीसेना म्हणून केलेल्या आणि यूनो इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी केलेल्या सैन्य कारवाया वगळता भारतीय सैन्याच्या तीनही शाखांनी उत्कृष्ट समन्वय राखत परदेशी भूमीवर खुलेआम पार पाडलेले हे बहुधा एकमेव सैनिक अभियान. त्यात मालदीव शत्रूराष्ट्रही नव्हते, त्यामुळे हे अभियान विशेष ठरले.
ऑपरेशन कॅक्टसच्या सन्मानार्थ बांधलेले स्मारक, माले - मालदीव.
ऑपरेशन कॅक्टसच्या अंताला बहुतेक भारतीय सैनिक मालेमधून हटवण्यात आले पण सुमारे ५०० भारतीय सैनिक जवळपास १ वर्ष मालदीवमध्येच ठेवण्यात आले होते. हे स्थानिकांपैकी कोणालाच रुचले नाही, पण पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी धाक म्हणून हे करणे राष्ट्रपती गय्यूम आणि भारतीय धुरिणांना आवश्यक वाटले असावे.
भारतीय सैन्याचे भरपूर कौतुक झाले तरी मोहीम संपल्यानंतर त्यातील त्रुटींचे योग्य ते मंथनही झाले. जुलै १९८७ पासून श्रीलंकेत भारतीय शांती सेना - IPKF चे लाखभर सुसज्ज खडे सैन्य असूनही भारतीय सैन्याला आणि त्यांच्या गुप्तचरांना श्रीलंकेच्या तामिळ आतंकवाद्यांच्या ह्या मोठ्या कटाची चाहूलही लागू नये हे भूषणावह नव्हते. श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याला भारतीय सैन्याचा खासा विळखा असतांना ह्या सशस्त्र टोळीच्या बोटी बिनबोभाट निसटणे ही शरमेची बाब होती. आग्र्यातून आणवलेल्या मोठ्या वजनी तोफा विमानतळ ते माले बेट असे समुद्रातून वाहून नेणे अशक्य असल्यामुळे कुचकामी ठरल्या. दाट मानवी वस्ती असलेल्या माले शहरात त्या वापरताही आल्या नसत्याच. नंतर मोहीम-प्रमुख ब्रिगेडियर 'बुल' बलसारा यांनी कबूल केल्याप्रमाणे 'इंटेलिजन्स वॉज व्हेरी स्कँटी' - आमच्याकडे मालदिवबद्दल फारशी माहिती नव्हती - ही अधू बाजूही समोर आली. आग्र्यावरून उडायला तयार असलेल्या लष्करी विमानांकडे माले विमानतळाचा अचूक नकाशा सुद्धा नव्हता ! मोहिमेच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यासाठी होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला (त्यावेळी दिल्लीतच असल्यामुळे) मालदीवमध्ये भारताचे तत्कालीन राजदूत श्री. ए. के. बॅनर्जी उपस्थित होते. भारतीय सैन्य वापरत असलेला माले विमानतळाचा नकाशा ठार चुकीचा आहे हे श्री. बॅनर्जी यांनीच लक्षात आणून दिले. एवढेच नाही तर स्वतः कॉकपिटमध्ये बसून ह्या विमानांना माले विमानतळावर उतरण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्यथा ही विमाने ब्रिटिश जमान्यातील जुन्या नकाश्याबरहुकूम मालेपासून शेकडो किलोमीटर दूर गान बेटावर उतरली असती आणि सगळे मुसळ केरात गेले असते !
स्वतःला शाबासकी मिळत असतानाच उठाव घडवून आणणाऱ्या टोळीने केलेल्या मूर्खपणाची जाणीव भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना होती. जर त्या टोळीनी माले विमानतळ आणि संपर्क यंत्रणा आधी स्वतःच्या ताब्यात घेतल्या असत्या तर काय परिस्थिती ओढवली असती याचे भान होते.
पण ह्या प्रसंगाचा फायदा दोन्ही देशांना झाला. भारतीय सामरिक सज्जतेच्या तोकड्या बाजू समोर आल्यामुळे सुधारणा करण्यास सुरुवात झाली. ८६-८७ मध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल सुंदरजी आणि पंतप्रधान राजीव गांधी प्रणित 'ऑपरेशन ब्रासट्रॅक्स' मध्ये वायुदल, नौदल आणि भूदलाचे मिळून सहा -सात लाख सैन्यानी जय्यत सैन्य-अभ्यास केला होता. नौदलाने लढाऊ जहाजे अगदी कराची बंदराच्या / कोरांगी खाडीच्या मारक टप्प्यात नेली होती. लगोलग पुढच्याच वर्षी हे ऑपरेशन कॅक्टस यशस्वीरीत्या पार पडले. त्यामुळे भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढला.
ऑपरेशन कॅक्टसने भारत आणि मालदीवच्या संबंधांना, विशेषतः सुरक्षा आणि सामरिक बंधांना घट्ट केले. ऑपरेशन कॅक्टस घडल्यानंतर मालदीवच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी (अर्थात अघोषित) स्वतःकडे घेत भारताने मालदीवमध्ये स्वतःचे स्थान बळकट केले. त्यानंतर आजवर कधीही तसा प्रसंग पुन्हा घडला नाही त्याअर्थी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली जात आहे असे म्हणता येते. मालदीवला भारताचे खात्रीशीर सुरक्षाकवच तर मिळालेच वर जगभर प्रसिद्धी मिळून पर्यटकांचा ओघ वाढला.
मरिना जेट्टी, माले.
ह्या मोहिमेमुळे छोट्या देशांच्या सुरक्षा आणि संप्रभुतेचा मुद्दाही ऐरणीवर आला. १००-१५० गुंड एकत्र येतात काय आणि एका स्वतंत्र देशाच्या सर्व यंत्रणा ताब्यात घेतात काय, सर्व लहान देशांसाठी हे प्रकरण म्हणजे सावधतेचा एक इशारा ठरले.
* * *
आज भारत-मालदीव सुरक्षा संबंध घनिष्ट आणि परस्परहिताचे आहेत. मालदीवला तटरक्षक दल स्थापन करायला योग्य ती मदत केल्यानंतर (हा मात्र संन्याश्याचे लग्न असा प्रकार होता) १९९१ पासून भारत-मालदीव तटरक्षक दलांची संयुक्त कवायत 'दोस्ती' दर दोन वर्षात एकदा अशी होऊ लागली आहे.
लवकरच 'दोस्ती'त श्रीलंकेलाही सामील करण्यात आले आणि ही कवायत त्रिपक्षीय झाली. ही पद्धत आजही सुरु आहे. ह्यामुळे हिंदमहासागरातील सागरी चाचेगिरी, लुटारू आणि गुन्हेगारांचे एकमेकांच्या देशात पलायन रोखणे, समुद्रात दुर्घटनाग्रस्त जहाजांसाठी मदत / आपत्तीनिवारण इत्यादी कामात सुसूत्रता येऊन परस्पर विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
भारतीय तटरक्षक / नौदलाच्या नौका
पुढे अस्तित्वात आलेल्या भारत-मालदीव सुरक्षा करारानुसार आता मालदीवच्या सर्व २६ अटॉलवर तीव्र क्षमतेची टेहळणी यंत्रे लावण्यात आली आहेत आणि ही यंत्रणा भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या मध्यवर्ती यंत्रणेशी जोडण्यात आलेली आहे. (काही वर्षांपूर्वी सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका आणि भारतीय किनाऱ्यांवरही असेच रडार लावण्यात आले आहेत आणि त्यांना दिल्लीतील भारतीय नियंत्रण संस्थेच्या यंत्रणेला जोडण्यात आले आहे.)
आज मालदीवचे जवळपास सर्व सुरक्षा रक्षक भारतीय संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेले आहेत. दरवर्षी नेमाने होणाऱ्या भारत-मालदीव सैनिकांच्या संयुक्त 'ईकुवेरीन' कवायती असोत अथवा भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांच्या नेमाने घडणाऱ्या 'सदिच्छा' भेटी असोत, मालदीवच्या संरक्षणासाठी भारत भक्कमपणे उभा आहे हे मालदीवच्या शासकांना माहिती आहे आणि ह्याचा व्यत्यासही.
भारतीय तटरक्षक / नौदलाच्या नौका
सर्व नकाशे आणि बहुतेक चित्रे जालावरून साभार.
* * *
थोडे अवांतर:
बेबे-कोक्को आणि भारत मालदीव संबंध - हे काय शीर्षक ?
सांगतो.
धिवेही भाषेत ‘भाऊ’ असा शब्द नाही - बेबे म्हणजे मोठा भाऊ आणि कोक्को म्हणजे लहान भाऊ असे स्पष्ट वेगळे शब्द आहेत. :-) आता मालदीव तर काही मोठा भाऊ होऊ शकत नाही. पण गेली तीसेक वर्ष मालदीवच्या 'बेबे'पदावर सुस्थापित भारताला बाजूला सारून भारताच्या अन्य शेजाऱ्यांप्रमाणे मालदीवचा नवा बेबे होण्याची चीनची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी ड्रॅगनचे प्रयत्नही जोरात आहेत. दोन-दोन 'बेबे' असले तर जास्त फायदा होईल असा विचार लहान भाऊ करत असावा. त्याबद्दल पुढे.
* * *
काहींनी उमामहेश्वरन आणि अन्य कटकर्त्यांचे पुढे काय झाले असे विचारले आहे, त्यांच्यासाठी हे अधिकचे पाल्हाळ :-
लुतफीला आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली. भारताच्या आग्रहावरून राष्ट्रपती गय्यूम यांनी ही शिक्षा कमी करून जन्मठेप कायम केली. नंतर पुढे आलेल्या माहितीनुसार ह्या आक्रमणकर्त्यांपैकी बहुतेक लोक भारतात लष्करी प्रशिक्षण घेतले होते! हे म्हणजे 'तुम्ही ने दर्द दिया है तुम्ही दवा देना' असे झाले. उमामहेश्वरन १६ जुलै १९८९ रोजी श्रीलंकेतून अचानक गायब झाला. त्याच्या मित्रांनी त्याचे अपहरण झाले असल्याची तक्रार नोंदवली. काही दिवसानंतर एकेदिवशी पहाटे श्रीलंकेतील मालदीवच्या दूतावासासमोर त्याचा बंदुकीच्या गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह सापडला. हत्या कोणी केली त्याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही आणि कोलंबोच्या पोलिसांनी काही दिवसांनी सर्व तपास थांबवला.
राय रुफिया आणि ड्रॅगनची मिठी
आकारमान आणि लोकसंख्या बघता मालदीव हा अगदीच पिटुकला देश. गर्भश्रीमंत सौंदर्यप्रेमी पर्यटक सोडले तर इतर कोणाच्या खिजगिणतीतही नसला तरी आश्चर्य वाटू नये असा. पण तसे नाही. जगाशी आणि जागतिक संस्थांशी मालदीवचा व्यापक संपर्क आहे. शेजारी देश म्हणून भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे निवासी राजदूतावास राजधानी मालेत आहेत. क्षेत्रीय बाहुबली आणि उगवती महासत्ता म्हणून चीन आणि ह्या व्यतिरिक्त जपान आणि सौदी अरेबिया यांनीही आपले राजदूत मालदीवला नियुक्त केले आहेत. जवळपास ७० देशांच्या भारत किंवा श्रीलंकेतल्या राजदूतांना मालदीवची अतिरिक्त जबाबदारी दिलेली असते, त्यामुळे ते येऊन जाऊन असतात. मालदीवमध्ये सगळ्याच देशांना का एवढी रुची ? त्याचे उत्तर मालदीवच्या भौगोलिक स्थानात आहे. भारतीय महासागरातील मालदीवचे भौगोलिक स्थान असे की भारतच काय पूर्व आशियातील सर्वच तेल-पिपासु देशांसाठी हा देश फार महत्वाचा आहे. जगतातील सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन (SLOCs) - सागरी मार्गाच्या जाळ्यातील अनन्यसाधारण महत्व असलेला दीपस्तंभच जणू. अरब जगातून सागरी मार्गाने पूर्वेकडे जवळपास सर्व देशांना जाणारे सगळेच कच्चे तेल मालदीवच्या समुद्रातून जाते. ह्या एकाच मुद्द्यावरून मालदीवचे भूराजकीय आणि सामरिक महत्व लक्षात येते.
* * *
जुलै १९६५ मध्ये मालदीव स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला तेंव्हा ब्रिटन आणि श्रीलंके पाठोपाठ मालदीवला सर्वप्रथम स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा देश भारतच होता. १९७२ मध्ये माले शहरात भारतीय दूतावास उघडले. (मालदीवचे निवासी राजदूतावास दिल्लीत उघडायला मात्र २००४ साल उजाडावे लागले. त्याआधी मालदीवचे श्रीलंकेतील राजदूतच भारतातले काम बघत असत.)
मालेतील भारतीय राजदूतावास - १
मालेतील भारतीय राजदूतावास - २
पुढील काही वर्षात नवीन शासनाशी वाटाघाटी करून भारत मालदीव सागरी सीमा निश्चित करण्यात आली. त्यावेळी बेटांची मोजणी करण्याची यंत्रणा तोकडी होती. त्यामुळे ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ ठरली. काही बेटांच्या मालकीवरून वाद झाले पण ते नाजूक हातांनी सोडवण्यात यश आले.
सगळीकडे समुद्र असल्यामुळे आणि जमीन फार कमी असल्यामुळे मालदीवकरांच्या लेखी जमिनीचे महत्व प्रचंड आहे. इतके की ऐतिहासिक काळापासून सुलतान / शासन / सरकार सोडून अन्य कोणाला आजही तिथे जमिनीचे मालक होता येत नाही. (सरकार भाडेपट्टीनी देऊ शकतं, देतं सुद्धा) त्यामुळे जमिनीच्या छोट्या तुकड्याच्या मालकीसाठीही मालदीवचे शासक फार काटेकोर होते. भारतातील मिनीकॉय बेटं आमचीच आहेत असा त्याचा दावा होता. त्यामुळे भारताशी मिनीकॉय बेटांबद्दल थोडा वाद झाला. मिनीकॉयच्या स्थानिक लोकांची भाषा-संस्कृती मालदिवसारखी होती, मिनीकॉयचे उल्लेख मालदीवकरांच्या ऐतिहासिक दस्तावेजात होते, त्यामुळे दावा अगदीच अस्थानी नव्हता. ही बेटं भारताच्या लक्षद्वीप आणि मालदीवच्या थुराकूनु बेटाच्या मधे आहेत, फार काही मोठी नाहीत.
मिनीकॉय बेटे - लक्षद्वीप, भारत
भारताची बाजू सांगायची तर भारत स्वतंत्र झाल्याच्या ९ वर्षांनंतरही मिनीकॉयच्या दीपगृहावरील डौलाने फडकणारा युनियन जॅक उतरला नव्हता ! सरकारी यंत्रणेपैकी तेथे कुणीच जात नव्हते खरेतर. दीपगृहाच्या चौकीदाराला भारत स्वतंत्र झाल्याची आणि भारताचा नवीन तिरंगा ध्वज चलनात आल्याची काही खबरच नव्हती (!). शेवटी १९५६ मधे दीपगृह बांधणाऱ्या ब्रिटिश कंपनीने दीपगृहाच्या डागडुजीसाठी पाठवलेल्या पथकाला हे लक्षात आले आणि त्यांनी सन्मानाने त्यांचा ध्वज उतरवून परत नेला.
मिनीकॉय दीपगृह 1 - लक्षद्वीप, भारत.
मिनीकॉय दीपगृह 2 - लक्षद्वीप, भारत.
(स्थानिक भाषा आणि लिपीवर मालदीवच्या धिवेही भाषेचा प्रभाव स्पष्ट दिसतो.)
भारत स्वतंत्र होतांना अडचणीच्या प्रांतांमध्ये सार्वमत आजमावण्याची सूचना चलनात होती. भारतात मुख्यभूमीत नाही पण लक्षद्वीप समूहातल्या मिनीकॉय बेटांसाठी खरोखरीच सार्वमत घेण्यात आले ! स्थानिक जनतेला 'भारतात सामील व्हायचे आहे का' असा प्रश्न विचारून त्याचे हो किंवा नाही असे उत्तर विचारण्यात आले. बहुसंख्य जनतेने हो म्हणल्यानंतरच मिनीकॉय बेटे भारतात सामील करण्यात आली. अधूनमधून 'आमची मिनीकॉय बेटे तुम्ही बळकावली' असा विषय येतो पण फार ताणला जात नाही कारण भारताकडून सार्वमताची प्रक्रिया अगदी पारदर्शी होती, चोखपणे पार पाडण्यात आली होती.
* * *
मालदीवच्या संरक्षणासाठी भारताच्या मदतीबद्दल आपण मागच्या भागात वाचले. त्याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात सुद्धा भारतीय योगदान भरपूर आहे. सुरवात झाली ती मालदीवच्या शिक्षण क्षेत्राची घडी बसवण्यापासून. मालदीवमध्ये सत्तरीच्या दशकात सुरु झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या पहिल्यावहिल्या शाळेपासून ते उच्चशिक्षणासाठी भारतीय संस्थांमध्ये प्रवेश आणि शिष्यवृत्तीपर्यंत भारतीय सरकारची मदत मालदीवच्या शिक्षणक्षेत्रात पावलोपावली दिसून येते. आधुनिक इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रत्येक मोठ्या अटॉलवर शाळा आणि तेथे लागणारे शिक्षक हे बहुतांशी भारताने पुरवलेले आहेत. आजही भारतीय शिक्षकांना मालदीवमध्ये मोठी मागणी आहे, त्यांना मान आहे. मालदीवमध्ये असलेल्या एकूण शिक्षकांपैकी ३० टक्के शिक्षक भारतीय आहेत.
एका शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या भारतीय शिक्षिका, अड्डू अटॉल, मालदीव
रुग्णसेवेसाठी मालेचे सुसज्ज इंदिरा गांधी रुग्णालय असो की तंत्रशिक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्त्या, कमी व्याजाचे कर्ज, व्यावसायिक प्रशिक्षण अशी भरघोस मदत भारताकडून मालदीवकरांना सातत्याने लाभत आली आहे. भारतीय स्टेट बँक ही १९७४ पासून मालदीवच्या पर्यटन आणि मत्स्यव्यवसायाला पतपुरवठा करीत आहे. अनेक व्यवसाय आणि रिसॉर्ट उभे करण्यात बँकेचा वाटा आहे. घरबांधणीसाठी भारतीय मदत आहेच. भारतीय कंपन्यांनी मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, विशेषतः पर्यटन आणि घरबांधणी क्षेत्रात. स्थानिक आस्थापनांमध्ये भारतीय तज्ञ डॉक्टर्स, तंत्रज्ञ, शिक्षक, व्यवस्थापक आणि अभियंते यांची संख्या मोठी आहे. वेळोवेळी आर्थिक मदत, अल्पव्याजी-बिनव्याजी कर्ज, वस्तुरूपात मदत, संस्थात्मक सक्षमीकरणासाठीची मदत अशी अनेक हातांनी भारतीय मदत होत असतेच, त्याची जाणीव स्थानिक राज्यकर्ते आणि जनतेला आहे. त्यामुळे भारताकडे आदराने, मैत्रीदृष्टीने पाहिले जाते.
* * *
गेली काही वर्षे भारताच्या अन्य शेजाऱ्यांप्रमाणे मालदीवमध्येही चिनी वावर वाढला आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये चीन ने मालदीव मध्ये स्वतःचे दूतावास थाटात सुरु केले आणि मालदीवमध्ये ड्रॅगनपर्वाची सुरवात झाली. अनेक चिनी कंपन्यांनी स्थानिक कंपन्या, हॉटेल, बांधकाम व्यवसाय ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करायला सुरवात केली ती ह्याच वेळेस.
मालेमध्ये चिनी दूतावासाच्या उदघाटनचा सोहळा - ६ नोव्हेंबर २०११
मालदीवचे अर्थकारण आजही पर्यटनक्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ७०% स्थानिक जनतेचे नोकरी-व्यवसाय ह्या एकाच क्षेत्रावर चालतात. पूर्वी ब्रिटिश आणि रशियन पर्यटकांचे आकडे मोठे होते, गेल्या ४-५ वर्षात ती जागा चिनी पर्यटकांनी पटकावली आहे. गेली चार-पाच वर्षे मालदीवमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या बघितली तर चिनी पर्यटक एकूण पर्यटकांच्या ५०% चा आकडा पार करतांना दिसताहेत. शेजारी असूनही भारतीय पर्यटकसंख्या जेमतेमच.
चीनच्या साहाय्याने अनेक मोठे प्रकल्प इथे उभे राहात आहेत. आजवर माले विमानतळ आणि माले शहर ह्या दोन बेटांवर फेरी बोटींनीच वाहतूक होते. आता ह्या दोन बेटांमध्ये चीन-मालदीव मैत्री पूल बांधून त्यांना रस्त्यानी जोडायचा प्रकल्प मंजूर झाला आहे. सर्व खर्च चीन सरकार देणार आहे. जानेवारी २०१६ पासून ह्या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे.
भारतीय कंपनी जीएमआर कडून काढून घेतलेले माले विमानतळाच्या विस्तारीकरणाचे कंत्राट आता चिनी कंपन्यांना मिळाले असून त्यासाठी मालदीवला सुमारे ५० कोटी डॉलर्सची विशेष मदत चीन सरकार देत आहे. प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे.
चीनच्या 'समुद्री रेशीममार्ग' ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्यासाठी २०१४ पासून चीनकडून मालदीवला देण्यात येणाऱ्या मदतीत सातत्याने वाढ होत आहे. अनेक प्रकल्पांना सवलतीच्या दराने वित्तपुरवठा, चीन सरकारकडून भेट म्हणून मिळणारे अनेक प्रकल्प अशी आतिषबाजी सुरु आहे. मालदीवमध्ये असलेल्या जमिनीच्या दुर्भिक्षामुळे तेथिल संविधानात कोठल्याही विदेशी सरकार किंवा कंपनीला जमीन विकण्यास कडक बंदी आहे. हवे असल्यास सरकार जमीन भाडेपट्ट्यावर देऊ शकते, पण बऱ्याच अति-शर्तीनंतर. चीनच्या विनंतीवरून नुकतेच संविधान संशोधन करून १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुणवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्या / सरकारे यांना जमीन विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. ह्याचा फायदा फक्त चिनी कंपन्यांना मिळावा यासाठी ड्रॅगन आग्रही आहे हे ओघानेच आले.
आज मालदीवच्या डोक्यावरील एकूण कर्जात तीन चतुर्थांश कर्ज एकट्या चीनचे आहे. कर्जाव्यतिरिक्त अन्य 'मदत' आहेच. पूर्वापार भारताकडून होणारी आर्थिक मदत ह्या चिनी धनवर्षावाच्या पासंगालाही पुरणारी नाही.
नवीन नोकऱ्या-धंदा येतोय चीन कडून, त्यांच्या प्रकल्पांमुळे. नवीन गुंतवणूक येतेय ती बहुतेक चीन आणि काही प्रमाणात सौदी अरेबियामधून. त्यामुळे नवीन पिढीला ‘राय रुफिया’ची म्हणजे 'लाल' रुफियाची भुरळ पडणे स्वाभाविक म्हणता येते. आता भारतीय आणि चिनी कंपन्यांमध्ये कंत्राटांबद्दल स्पर्धा आहे, सध्या चीनला अधिकचे झुकते माप मिळते असे म्हणता येईल. हिंदी आणि मल्याळी सिनेमा आणि टीव्ही मालिका, भारतीय भोजन, भारतात पर्यटन आणि खरेदी, भारतीय वस्त्रांच्या-दागिन्यांच्या फ्याशन अश्या गोष्टी स्थानिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्या आणि भारत-मालदीव मैत्रीचे गुणगान यथावत असले तरी भारताचे तेजोवलय मंदावतांना दिसते आहे.
* * *
बातम्या - टेलिव्हिजन - वृत्तपत्रे यातून आपण देशोदेशीच्या प्रमुखांच्या भेटींचे उत्सव, भव्य आगत-स्वागत, पोषाखी लष्करी तुकड्यांच्या मानवंदना, महत्वाच्या समाधीस्थळी वाहिलेली पुष्पचक्रे, करारमदार सही करण्याचे समारंभ, भाषणे, सन्मानभोज असे प्रसंग बघतो, त्याबद्दल वाचतो. हे फार वरवरचे असते. ते म्हणतात ना - नो वन इज ऍन एनिमी ऑन कॉफी टेबल. कोणीही विदेशी पाहुणा आपल्या यजमानाबद्दल वाईट बोलत नाही, सभ्यतेचा आणि शिष्टाचाराचा संकेतच आहे तो. पण सर्व राष्ट्रे, जागतिक संस्था यांचे एकमेकांशी संबंध हे एका भक्कम मेरूभोवती फिरणाऱ्या वासुकीसारखे आहेत. हा मेरू आहे स्वार्थाचा ! मंथनातून अमृत निघो वा हलाहल, दोन देशांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांची मजबुती आणि उपयोगिता स्वार्थाच्या जगन्मान्य कसोटीवरच तपासली जाते. मग हा स्वार्थ आर्थिक असो, सैद्धांतिक असो वा रणनैतिक. 'मला यात काय मिळेल' हा प्रथम विचार घेऊन प्रत्येक देश पुढे पाऊल टाकतो. ह्यात चुकीचे अर्थातच काही नाही. त्यामुळे मालदीव काय आणि भारताचे अन्य शेजारी काय, प्रत्येक लहानमोठा देश सदैव स्वार्थ बघणार हे निश्चित.
सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक
आधीच्या भागांमधून आणि त्यावरील प्रतिसादांमधून मालदीवमधल्या सद्यस्थितीबद्दल बरेच सांगून झाले आहे. सध्या मालदीवमधल्या प्रचंड राजकीय उलाढालींमुळे दुसरे 'कॅक्टस' घडेल की काय अशी स्थिती आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र आहेतच. याचवर्षी आपल्या अन्य काही शेजारी देशांप्रमाणे मालदीवमध्येही सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्याही प्रसारमाध्यमे कव्हर करतील, त्यात मी आणिक वेगळे काय सांगणार? खरेतर सध्या मालदीवमध्ये घडणाऱ्या घटनांनी मनाला वाईट वाटते आहे. सर्व संबंधितांना योग्य ती उपरती होऊन सगळे स्थिरस्थावर होईल आणि मालदीवकर उज्ज्वल भविष्याकडे यशस्वी वाटचाल करतील अश्या शुभेच्छा देऊन ह्या लेखमालेतील हा शेवटचा लेख.
स्वपत्नीच्या स्वागतासाठी माले विमानतळाला जातांना लेखक - अर्थात कॅमेऱ्याच्या मागे :-)
* * *
तर आता मालदिवबद्दल काही गमतीशीर तर काही गंभीर विषयांबद्दल थोडक्यात, ही रंजक रोचक तथ्ये :-
‘The lowest-lying nation on Earth’ / मालदीव हा जगात समुद्रसपाटीपासूनची उंची सर्वात कमी असलेला हा देश. संपूर्ण देशच समुद्रसपाटीपासून जेमतेम मीटरभर उंच असल्यामुळे वाढत्या समुद्रपातळीचा धोका भरपूर आहे. ४०-५० वर्षानंतर कदाचित संपूर्ण देश सागराने गिळला असेल अशी शक्यता जागतिक पर्यावरणतज्ञ वर्तवतात. ह्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी मालदीवचे तत्कालीन राष्ट्रपती नाशीद यांनी वर्ष २००९ मध्ये एक धमाल युक्ती केली - खोल समुद्रात पाण्याखाली कॅबिनेट बैठक घेऊन तीत जगाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले. सर्व मंत्र्यांनी पाण्याखालीच चर्चा (!) करून त्या प्रस्तावावर सह्या पण केल्या ! एखाद्या देशाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक खोल समुद्रात पाण्याखाली होण्याचा हा एकमेवाद्वितीय सोहळा जगातील एक आश्चर्य ठरला.
पाण्याखाली मालदीवच्या राष्ट्रपतींची कॅबिनेट बैठक - १, १७ ऑक्टोबर २००९ गिरीफुशी, मालदीव.
पाण्याखाली मालदीवच्या राष्ट्रपतींची कॅबिनेट बैठक - २, १७ ऑक्टोबर २००९ गिरीफुशी, मालदीव.
मागच्या दशकात आलेल्या सुनामीची दहशत आहेच. आता खरोखरीच देश पाण्याखाली गेला तर त्याला उपाय म्हणून मालदीव स्वतःच्या नागरिकांसाठी जगात अन्यत्र जागा ‘विकत’ घेण्याचे नियोजन करीत आहे. त्यासाठी एक फंड स्थापन करण्यात आला असून सरकार त्यात दरवर्षी जमेल तशी भर टाकत आहे.
सुनामीचे स्मारक, माले, मालदीव
* * *
मालदीवच्या बेटांवर जन्म झाला म्हणून कोणालाही आपोआप मालदीवचे नागरिकत्व मिळत नाही. त्यासाठी आई किंवा वडील यापैकी एकानी मालदीवचे नागरिक असणे ही पूर्वअट आहे. मालदीवच्या नागरिक स्त्रीला अपत्यासाठी नागरिकत्व मिळवतांना त्याच्या पित्याचे नाव, ओळख, धर्म, देश, लग्न झाल्याचा दाखला असे काहीच विचारले जात नाही. अशी सोय पुरुषांसाठी नाही. कोण्या मालदिवकराशी लग्न केले म्हणून विदेशी व्यक्तीला नागरिकत्व अर्थातच मिळत नाही.
* * *
अमाप निसर्गसौंदर्याबद्दल मालदीव प्रसिद्ध आहेच, पण जगातील प्रतिमाणशी सर्वात जास्त कचरा निर्माण करणारा देश म्हणूनही प्रसिद्ध आहे. मालदीवमध्ये फारसे काही पिकत नाही. जगण्यासाठी लागणाऱ्या जवळपास सर्व वस्तू जगभरातून समुद्रमार्गे आयात होत असल्यामुळे प्लास्टिक, धातू, लाकूड आणि अन्य वेष्टनांचा प्रचंड मोठा कचरा ह्या बेटांवर निर्माण होतो. भारताकडून अर्थातच भरपूर आयात होते. अन्न-धान्य, फळे-भाजीपाला याबरोबर भारतातून सर्वात मोठी आयात होते ती सिमेंट आणि बांधकाम साहित्याची. भारत मात्र मालदीवमधून आयात करतो फक्त एक वस्तू - कचरा ! हो, पर्यटक आणि स्थानिकांच्या वापरामुळे उदंड झालेले लोखंड-अल्युमिनियम वगैरे भंगार विकत घेऊन भारतातील कारखान्यांना विकले जाते.
* * *
जगातील सर्वात जास्त घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत मालदीवचा नंबर बहुदा पहिला आहे. परस्पर संमतीने घटस्फोट होतो, कोणतेही कारण विचारल्या जात नाही. फक्त सरकारी कागदपत्रात तशी नोंद करावी लागते. बहुतेकवेळी तलाक महिला देतात, हे जरा वेगळे आहे. घटस्फोटित महिलांना कोणत्याही सामाजिक भेदभावाला सामोरे जावे लागत नाही, इतकेच नाही तर आधीच्या लग्नापासून झालेल्या सर्व अपत्यांची जबाबदारी घेण्याची लेखी हमी घेतल्याशिवाय घटस्फोटित महिला नवीन लग्न करत नाहीत. गेल्यावर्षीच्या सरकारी अंदाजानुसार तिशीच्या वर वय असलेल्या सुमारे ४० टक्के मालदीवकर महिलांनी दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घटस्फोट घेतला आहे ! जोडप्याने एकमेकांना घटस्फोट देऊन पुन्हा एकमेकांशीच लग्न केल्याचे अनेक किस्से दिसतात. हा प्रकार इतक्यांदा होतो की त्यासाठी एक विशेष कायदा करण्यात आला आहे. ह्या कायद्याप्रमाणे असा पुनर्विवाह जास्तीत जास्त चारदा करता येतो.
* * *
एकत्र कुटुंबपद्धती भारतीय उपखंडात सर्वत्र बघायला मिळते. मालदीवमध्ये मात्र लग्न झालेले जोडपे आणि त्यांची मुले असे छोटे कुटुंब पसंत केले जाते. ९० टक्के अशी एकल कुटुंबे आहेत. मुलींसाठी लग्नाचे वय १५ वर्षे आहे, मुलांसाठी १८, पण इतक्या कमी वयात कोणीच लग्न करीत नाही. बहुपत्नीत्व कायद्याने गुन्हा नाही पण पूर्वापार ती पद्धत समाजात नाही. आजघडीला मालदीवमध्ये फक्त ४९ पुरुषांना दोन बायका आहेत.
* * *
देशातली सर्व जमीन कागदोपत्री सरकारच्याच मालकीची आहे, कोणाही व्यक्तीकडे जमिनीची व्यक्तिगत मालकी नाही. सामान्य नागरिकांना घर बांधण्यासाठी किंवा नारळ/इतर फळझाडे लावण्यासाठी सरकार जमीन भाडेपट्ट्याने देते. बहुतेकदा हा भाडेकरार ९९ वर्षे कालावधी आणि १ रुफिया भाडे असा असतो.
* * *
देशाचा आधिकारीक धर्म इस्लाम आहे आणि प्रत्येक नागरिकाला इस्लाम स्वीकारला असणे बंधनकारक आहे. धर्मांतरास परवानगी नाही, धर्मांतर कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. धार्मिक बाबतीत शरियाच्या मूळ सिद्धांतांवर आधारित इस्लामिक कायदे आहेत. कामकाजाची भाषा इंग्रजी आणि व्यापार-व्यवहाराचे कायदे ब्रिटिश लॉ / भारताप्रमाणेच.
* * *
मालदीवच्या कस्टम्स नियमाप्रमाणे पूजा करण्यासाठी कोठल्याही मूर्ती किंवा तसबिरी देशात आणायला बंदी आहे. दागिने, कीचेन, गृहसजावटीसाठी आणि अश्याच अन्य कारणासाठी आणलेली चित्रे-मूर्ती-तसबिरींवर अशी बंदी नाही. मद्य आणि पोर्क आणण्यावर मात्र सरसकट पूर्ण बंदी आहे. ह्या वस्तू प्रवाश्यांच्या सामानात असल्यास विमानतळावर अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्याव्या लागतात, परत मिळण्याची खात्री नसते.
* * *
माले आणि स्थानिक लोक राहत असलेल्या अन्य सर्व बेटांवर मद्यपानास कडक बंदी आहे, तो मोठाच गुन्हा मानल्या जातो. सरकारने ही बंदी घालण्यामागे कारणही तसेच गंभीर आहे, ते असे :-
सत्तरीच्या दशकात श्रीलंकेतून येणाऱ्या बोटी आणि मजुरांनी मालदीवला हेरोइनची पहिली ओळख करून दिल्याचे म्हणतात. हा हा म्हणता हा विषवृक्ष तिथे फैलावला. त्याला कसलेही नियंत्रण उरले नाही आणि जवळपास ४० टक्के मालदीववासी तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडले. यात तरुणींची संख्याही लक्षणीय होती. पुढे पुढे तर अगदी १२-१३ वर्षाची कोवळी मुले हेरोइनची विक्री आणि सेवन करतांना दिसू लागली. शिक्षण आणि समाजजागृतीचाही आनंदच होता, त्यामुळे बहुतांशी पालकांना ह्या व्यसनाच्या गंभीर परिणामाची पुरेशी जाणीव नव्हती. तिथले सरकार ह्या प्रकारच्या विरोधात होते खरे पण व्यसनाला आळा घालण्याचे सरकारचे प्रयत्न मात्र फारच तोकडे होते. समाजातील काही सजग घटकांनी प्रयत्न करावे तर त्यांची लुडबुड सरकार आणि देशातील शक्तिशाली इस्लामिक कट्टर गटाला पसंत नव्हती. मुख्य कारण म्हणजे असा काही प्रकार आपल्या देशात चालतो हे बाहेर जगाला कळले तर अब्रू जाईल आणि पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होईल ही भीती. त्यात देशाच्या कडक धार्मिक नियमाप्रमाणे १८ वर्षाखालील मुलामुलींना लैंगिक तसेच अंमली पदार्थांविषयीचे शिक्षण देणे वर्ज्य ! जगभरात सगळीकडे 'सरकारी' पद्धत जवळपास सारखीच असते. त्याप्रमाणे मालदीवमध्येही अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांसाठी 'व्यसनमुक्ती केंद्र' स्थापन झाले, एका निर्जन बेटावर. काही दिवस झाले की कोठल्याही 'आफ्टर केअर' शिवाय ह्या रोग्यांची रवानगी परत त्यांच्या घरी. शेकडो मित्र व्यसनाधीन असतांना हे उपचार घेऊन आलेले तरुण पुन्हा ड्रग्सना पुन्हा बळी पडणार नाहीत याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे तरुण आणि मुले अशी एक पूर्ण पिढी ह्या व्यसनामुळे वाया गेली.
ह्यातून सरकारने घेतलेला धडा म्हणजे सरसकट सर्व व्यसनांवर लावलेली बंदी. अंमली पदार्थ बाळगल्यास मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी शिक्षा आहे. मद्य बाळगल्यास २५ वर्षे पर्यंत कैद होऊ शकते. धुम्रपानावर कायद्याने बंदी नाही, पण ते करू नये म्हणून जनजागृती केली जाते. कडक कायद्यांमुळे व्यसनाधीनतेला आळा घालण्यात मालदीव बरेच यशस्वी ठरले आहे.
* * *
स्थानिक तरुणांमधे बाईक रेसिंग चे वेड प्रचंड आहे. माले शहराच्या प्रचंड गजबजाट असलेल्या रस्त्यांवर ते शक्यच नाही पण शहरात एक चौपाटीवजा जागेत एक छोटा रस्ता ह्यासाठी राखीव आहे. तेथे रोज काही तरुण बाईक स्टंट करत दुधाची तहान ताकावर भागवत असतात. धूम -१-२-३-४ सारखे भारतीय चित्रपट खूप लोकप्रिय आहेत. भारतात होणाऱ्या बाईक आणि कार रेसच्या लेह सर्किट, हिमालय, बुद्ध सर्किट सारख्या आयोजनांचे जबरदस्त वेड आहे, त्यांचे पास मिळवण्यासाठी मला दरवर्षी ह्या तरुण मित्रांकडून आर्जवे असतात. फुटबॉलचे चाहते खूप आहेत. कागदाचे मोठे पतंग तयार करणे आणि उडवणे हा तर राष्ट्रीय कर्तव्य असल्यासारखा महत्वाचा खेळ :-)
* * *
प्रत्येक मालदीवकराचे एक टोपणनाव असतेच. म्हणून 'जॉनी' शाहिद, 'रिको' मूसा, 'इशू' सुलेमान, 'लैला' अथिया, 'मुधु' मोहम्मद, 'बोटमॅन' अली अशी मजेशीर नावे कानावर पडतात. दोस्तमंडळी, परिवार आणि समर्थक त्यांना त्या टोपणनावाने संबोधतात. उदा. भूतपूर्व राष्ट्रपती नाशीद त्यांच्या समर्थकांमध्ये 'अन्नी' ह्याच नावाने प्रसिद्ध आहेत.
* * *
मालदीवला अध्यक्षीय लोकशाही प्रणाली आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशी जोडी निवडणूक लढते. जनता पक्षाला मत न देता व्यक्तीला देते आणि प्रत्यक्ष जनतेतून निवडलेली व्यक्ती अध्यक्ष होते. अध्यक्ष आपले मंत्रिमंडळ एकहाती निवडतात. राष्ट्राध्यक्ष किंवा मंत्री होण्यासाठी स्त्री/पुरुष असणे (तृतीयपंथींना बंदी आहे) आणि मालदीवचा सज्ञानवयीन नागरिक असणे पुरेसे आहे. ह्या सर्व मंत्रीगणांना मालदीवच्या लोकसभेची म्हणजे मजलिसची मान्यता मिळावी लागते. खासदार आणि मंत्री एकाचवेळी होता येत नाही. (आपल्याकडे भारतात मंत्री होण्यासाठी खासदार असणे अटळ आहे). मजलिस हे संसदेचे एकच सभागृह आहे - म्हणजे भारतासारखी राज्यसभा नाही, सर्व ७७ प्रतिनिधी जनतेतून थेट निवडून येतात. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि खासदारांचा कार्यकाळ ५ वर्षे. मंत्र्यांचा कार्याकल मात्र राष्ट्राध्यक्षांच्या मर्जीवर.
इंडियन हाधिया १ - मालदीवला भारताकडून मिळालेली भेट: मजलिसची इमारत. माले, मालदीव
इंडियन हाधिया २ - मालदीवला भारताकडून मिळालेली भेट: मजलिसची इमारत. माले, मालदीव
* * *
पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वेशभूषेत स्थानिक पारंपरिक 'लिबास'चा वापर जास्त दिसतो. गडद लाल कुर्त्यासारखे वस्त्र आणि कमरेखाली काळ्या / चंदेरी रंगाची लुंगी घातलेल्या आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया/मुली लग्न किंवा परंपरागत सणांच्यावेळी हमखास दिसतात.
लाल लिबास ल्यालेल्या लुब्धसुंदऱ्या - मालदीव
पुरुष सुद्धा चंदेरी पट्ट्यांची काळी लुंगी आणि वर पांढरा/काळा शर्ट अश्या वेशात असतात. अन्यवेळी मात्र बहुतेक स्त्रीपुरुष पाश्चात्य पद्धतीचे आधुनिक कपडे घातलेले दिसतात.
* * *
ईद आणि शबेबरात सारखे सण दणक्यात साजरे होतात. ख्रिसमस आणि ३१ डिसेम्बरला वर्षसमाप्तीचे उत्सवही जोरात असतात. स्थानिक भारतीय एकत्र येऊन होळी-दिवाळी मजेत साजरी करतात आणि त्या पार्ट्यांना आमंत्रण मिळावे म्हणून स्थानिकांमध्ये अहमहमिका असते. मूर्तीपूजेला मात्र बंदी आहे. देशात शिया मुस्लिम एकही नसल्यामुळे मोहरम - मार्सिया - ताजिया वगैरे नसते. निरीश्वरवादाचेही ह्या देशाला प्रचंड वावडे आहे.
* * *
‘समुद्राखालील’ असामान्य सुंदर जागांमुळे हौशी समुद्रखेळांसाठी दरवर्षी शेकडो पर्यटक मालदीवला भेट देतात. त्यासाठी थोडा सराव, थोडे धाडस लागते. मालदीवमध्ये सर्रास उपलब्ध असलेल्या 'ग्लास बॉटम बोट' मधून आपण सागरतळाशी असलेली अलौकिक सृष्टी बघू शकतो. त्याहीपेक्षा पाणबुडीच घेतली तर? सर्वसामान्य माणसांना पाणबुडीने प्रवासाची संधी कमी मिळते. मालदीवमध्ये मात्र तुम्हाला जर्मन बांधणीच्या प्रवासी पाणबुडीत सुमारे ३० मीटर पाण्याखाली जाऊन सागरतळाच्या निसर्गाचे अद्भुत रूप बघता येईल. हजारो विविधरंगी मासे, पाण्याखालची रंगीबेरंगी कोरल सृष्टी आणि शार्कसारखे जीव पाणबुडीच्या पारदर्शी भागातून बघता येतील. अद्भुतरम्य अनुभव असतो पण अर्थात प्रचंड महाग !
प्रवासी पाणबुडी - आतून. मालदीव.
* * *
गेली काही वर्षे इसिसच्या आणि अन्य जिहादी गटांच्या नादी लागून मालदीवमधून 'बेपत्ता' होणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. जगभरातील तुरुंग जिहादी संघटना आणि माफिया लोकांमध्ये नवीन भरतीसाठीच्या जागा म्हणून प्रसिद्ध आहेतच, मालदीव त्याला अपवाद नाही. अल-कायदा आणि अन्य जहाल संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेलेल्या तरुणांना वर्ष-दोनवर्ष शिक्षा होऊन ते मोकळे सुटल्याची अनेक उदाहरणे दिसतात. तुरुंगात करमणूक म्हणून फक्त धार्मिक साहित्य/टीव्ही कार्यक्रम असल्यामुळे जिहादी गटांचे काम आणखी सोपे होते.
* * *
मालदीवमधे बांगलादेशी कामगारांची संख्या डोळ्यात भरण्याजोगी आहे, सुमारे पन्नास हजार ! स्थानिक मंडळी ज्या कामाला नाक मुरडतात ती कामे करण्यासाठी ही बांगलादेशी कामगारांची फौज तेथे आहे. बहुतेक बांगलादेशीयांकडे कामाचा परवाना, ओळखपत्र वगैरे नाही. समानधर्मी असले तरी स्थानिकांमध्ये ह्या बांगलादेशी मंडळींच्या 'चुकीच्या' धर्माचरणाबद्दल, स्थानिक लोकांच्या नोकऱ्या पळवल्याबद्दल आणि एकूणच उथळ वागणुकीबद्दल कुजबुज असते. आपल्याला कधीही हाकलून लावले जाईल हे बांगलादेशी कामगारांना माहित आहे.
* * *
इझ्राएलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून सर्वप्रथम मान्यता देणाऱ्या मोजक्याच 'इस्लामिक' देशांमध्ये मालदीवचा समावेश होतो.
* * *
मालदीवचा आधिकारिक नकाशा तयार करण्याचे काम आणि जीपीएस यंत्रणेद्वारे मालदीवच्या सर्व बेटांचे मोजमाप भारतीय संस्थांनी केले आहे. मालदीवच्या GPS प्रणालीचे संचालन भारताकडून होते.
* * *
देशात तांदूळ कुठेही पिकत नसला तरी भात हे मालदीवच्या जनतेचे प्रमुख अन्न आहे. शतकानुशतके ते कायम आयात केले जात आहे. सकाळच्या न्याहरीसाठी स्थानिकांचा आवडीचा प्रकार म्हणजे मास हुनी आणि रोशी. वेगवेगळ्या प्रकारचे ताजे/सुके मासे आणि त्याचे कालवण, खारवलेले मांस, भाज्या, भात आणि रोशी असे जेवण असते. भजी, कोशिंबिरी असतातच. टुना आणि शार्क मासे मुबलक / विशेष प्रिय आहेत.
मालदीवकरांचे कलिंगड प्रेम हे अगदी जपान्यांना मात देईल असे आहे. जवळपास दररोज एकदातरी, अनेकदा न्याहारी, दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण अश्या सर्व मेजवान्यांमध्ये कलिंगडाचा रस किंवा कलिंगड असतो.
जेवल्यानंतर सुपारी, लवंग आणि चुना लावलेले पान खाण्याची पद्धत आहे. पानाला ‘फोह’ म्हणतात आणि फोहला कोणी नाही म्हणत नाही. गुडगुडा म्हणजे हुक्का धूम्रपानासाठी प्रचलित आहे.
भारतीय पंजाबी पद्धतीच्या जेवणाचे चाहते भरपूर आहेत, हैदराबादी बिर्यानी आणि तंदुरी नान घरी करता येणं ही सुग्रणपणची सर्वमान्य सर्वोच्च पातळी आहे :-)
* * *
जुन्या हिंदी चित्रपटांचे चाहते सर्वत्र आहेत, लता आणि मुकेशची गाणी तोंडपाठ असलेले अनेकजण आहेत. बहुतेक सर्व प्रसिद्ध हिंदी फिल्मी गाण्यांचे धिवेही व्हर्जन ऐकायला मिळतेच. नव्या पिढीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ यांचे प्रचंड आकर्षण आहे.
* * *
माले हे राजधानीचे शहर सोडले तर इतर बेटांवर असलेली लोकं एकमेकांची नातेवाईक मंडळीच आहेत. पिढ्यानपिढ्या एकाच जागी राहिलेल्या लोकांचे एकमेकांशी घनिष्ट संबंध आहेत. म्हणून एका घरचा पाहुणा सगळ्याच बेटवासियांचा पाहुणा असतो. पाहुण्यांचे स्वागत ताजे नारळपाणी देऊन आणि कलिंगड कापून करण्याची प्रथा आहे.
मालदीवच्या लोकप्रिय स्वागतिका - कलिंगडाच्या फोडी आणि नारळपाणी
* * *
मालदीवमध्ये प्राथमिक शाळेत 'कार्यानुभवाचा' तास म्हणजे पाण्यात खेळणे ! शाळेपासून समुद्र हमखास काही मीटरवर असतो. शिक्षक लहान मुलांना पोहणे, वेगवेगळे समुद्री जीवजंतू आणि मासे ओळखणे अश्या गोष्टी शिकवायला समुद्रात घेऊन जातात. मालदीवमध्ये राहून समुद्रात पोहता न येणे म्हणजे जस्ट नॉट अलाऊड :-)
एका शाळेतील लहानग्यांचा 'कार्यानुभवाचा' तास. लामू, मालदीव.
* * *
लेखमालेत अन्यत्र लिहिल्याप्रमाणे मालदीव हे ४ लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे एकधर्मीय, एकभाषक राष्ट्र आहे. शेकडो वर्षे जपलेला सांस्कृतिक एकजिनसीपणाही आहे. असे असतांना खरेतर जनतेत एकोपा आणि भातृभाव तीव्र असायला हवा. तसे दिसत नाही, हा छोटासा समाज अनेक शकलांमध्ये विभागलेला दिसतो. ज्या देशात सर्व लोकांचा धर्म, इतिहास, संस्कृती, भाषा एकच असेल त्या देशात सगळेकाही सुरळीत आणि सोपे होईल / होते असा बहुतेक लोकांचा समज असतो. तो खरा असेल तर अश्या 'यूनिकलर' देशांमध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने राहायला हवे. तसे खरंच आहे का असा प्रश्न मनात घेऊन आज जगाच्या नकाश्यावर एक नजर टाकली तर काय दिसेल? वस्तुस्थिती अनेकदा वेगळी दिसेल असे माझे मत, तुमचे मत काय ?
ह्या लेखमालेमुळे आपल्या दोन शेजारी देशांबद्दल थोडेफार सांगता आले आणि ते बऱ्याच वाचकांना आवडले ह्याचा आनंद वाटतो. सर्व मिपाकर वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार.
समाप्त.
===============================================================================
* * *
लेखाच्या शीर्षकात, लेखात आणि प्रतिक्रियांमध्ये वापरलेल्या सर्व धिवेही शब्दांचे अर्थ:
कानुहुरा = लाकूड
राधून = राजा
रुफिया = मालदीवचे चलन
कुरुंबा = नारळ
हायो धुआ = शुभेच्छा, तथास्तु
हाधिया = भेटवस्तू, नजराणा
सलाम = नमस्कार
मानीकुफानू = महोदय, सन्माननीय व्यक्ती
मिस्की = मस्जिद
रानींन / रातीन = राणी
आदीत्ता / आधित्ता = आदित्य, सूर्य
होमा = सोम, चंद्र
बुधू = बुद्ध
लोमाफानू = ताम्रपट्टिका
मास = महिना / महिने
अहारु = वर्ष / वर्षे
गारुनु = शतक / शतके
जाहिल = मूर्ख / अज्ञानी
जाहिलिया = अज्ञानाचा/ मूर्खपणाचा (धार्मिक अर्थ - इस्लामपूर्व काळ)
भास = भाषा
ओडी = होडी
रासगेफानू = राजपुरुष / राजा
महाराधून = महाराजा
राय = लाल
फेही = हिरवा
आधीतथा = रविवार
होमा = सोमवार
अंगारा = मंगळवार
बुधा = बुधवार
बुरासफथी = गुरुवार
हुकुरू = शुक्रवार
होनीहिरू = शनिवार
बिधेयसी = विदेशी
गौमी = राष्ट्रीय / कौमी
धुवस = दिवस
बोडा बेरू = मोठा ढोल
बेबे = मोठा भाऊ
कोक्को = लहान भाऊ
ईकुवेरीन = मित्र
रोशी = रोटी / चपाती
हुनी = कालवण
* * *
लेखमालेसाठी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी (अपूर्ण): -
• The Island States of the Indian Ocean: A View from the South Pacific – By R. V. Cole
• Maldives :- Government and Policies - By Mr. Verinder Grover
• The Maldives : Islamic Republic, Tropical Autocracy - By J. J. Robinson
• The Maldive Islanders: Culture of Ancient Ocean Kingdom – By Xavier Romero-Frias (English Edition)
• Operation Cactus - By Squadron Leader (Rtd) A. K. Chordia
• Operation Cactus: India’s 1988 intervention in the Maldives - By Mr. David Brewster
• Maldive Papers - By Mr. Satyabrata Pal, Member - NHRC
• India’s Relations With Her Neighbours – By Mr. Ramesh Trivedi
• Security and Security Building in the Indian Ocean – By Desmond Ball and Paul Dibb - Canberra Strategic and Defence Studies Centre Series
• The Maldives: Development and Socio-Economic Tensions - By South East Asian Economic Review- Various.
• The Maldives: An Introductory Economic Report 2010 - By World Bank
• India, Sri Lanka and the Tamil crisis 1976-1994: An International Perspective – By Alan J. Bullion
• The Maldives: The Politics of the Western Indian Ocean Islands - By Adney M. and W. K. Carr
• International Tourism and the Economic Importance of the Maldives - By J. L. Kaminarides and H. Hoogendonk
• The Republic of Maldives, 1980 – By H. A. Maniku
• A Guide to the Languages of Maldives – by Oxford University Press Ver 1.0
• The Maldive Islands; Monograph on the History, Archaeology and Epigraphy = By H. C. P. Bell (Edited Reprint by Council for Linguistic and Historical Research, Maldives)
• The Maldive Islanders: A Study of the Popular Culture of an Ancient Ocean Kingdom - By Xavier Romero-Frias (Reprint)
• Faiythoora monthly magazine and other papers published by the National Council for Linguistic and Historical Research, Male (Traslations, Multiple)