Tuesday, May 28, 2024

मनमोहक बाली

 

इंडोनेशिया

इंडोनेशिया हा एक जगावेगळा देश आहे... ५० लाख चौ किमी पाण्याच्या क्षेत्रात सर्व मिळून २० लाख चौ किमी जमिनीचे क्षेत्रफळ असलेल्या १७,००० पेक्षा जास्त बेटांनी तो बनलेला आहे.

त्यातले सर्वात मोठे बोर्निओ नावाचे ७,४३,३३० चौ किमी क्षेत्रफळाचे आणि दोन कोटी लोकवस्ती असलेले जगातले तीन क्रमांकाचे बेट आहे तर अनेक लहान बेटे म्हणजे केवळ समुद्राच्या पाण्यातून जेमतेम काही सेंटिमीटर वर डोके काढणारी प्रवाळ बेटे आहेत.

इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या आचे प्रांताची (तोच तो, जो २६ डिसेंबर २००४ ला तेथे झालेल्या भूकंपामुळे आणि भारतच नव्हे आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे कुप्रसिद्ध झालेला भूभाग) सीमा भारतातील निकोबार बेटसमूहापासून केवळ २०० किलोमीटरच्या आसपास आहे तर पूर्वेकडच्या पापुआ या प्रांताची सीमा रेखांशांत पाहिली तर जपानच्या पूर्व सीमेच्या बरोबरीने उभी आहे ! हे पूर्वपश्चिम अंतर साधारण ५००० किमी चे आहे आणि त्यामुळे या देशात तीन स्थानीक प्रमाणवेळा आहेत.

इंडोनेशियाच्या उत्तरेला असलेल्या समुद्रापलीकडे ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन, दोन कोरिया, जपान, इत्यादी देशांची साखळी आहे; तर दक्षिणेकडे भारतीय महासागर आणि ऑस्ट्रेलिया खंडाचा जवळ जवळ दोन तृतियांश भाग आहे. इतका या देशाचा पूर्व ते पश्चिम आवाका आहे !


इंडोनेशिया (मूळ नकाशा जालावरून साभार)

३३ प्रांतांत विभागलेल्या या देशाची २४ कोटी लोकसंख्या जगातील तीन क्रमांकाची आहे. जगातील एका देशातील सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या (२१ कोटी) या देशात आहे.

अश्या या वैशिष्ट्यपूर्ण देशात अजून एक जगप्रसिद्ध विशेष आहे... त्याचा एक छोट्या आणि इतर काही अगदी छोट्या बेटांनी बनलेला बाली प्रांत. या बाली प्रांताचे वैशिष्ट्य नीट समजण्यासाठी आपल्याला इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि भैगोलिक जडणघडणीचा थोडासा परिचय आवश्यक आहे.

चीन आणि भारत व भारतापलीकडील आफ्रिका-मध्यपूर्वेतील देशांबरोबरच्या प्राचीन जलव्यापाराच्या मार्गाचा मोठा आणि मोक्याचा भाग इंडोनेशियाच्या ताब्यातल्या पाण्यातून जात असे. त्यामुळे सातव्या शतकापासून इंडोनेशियातील साम्राज्यांचे या व्यापारात अनन्यसाधारण महत्त्व होते. व्यापाराबरोबर प्रथम हिंदू, नंतर बौद्ध आणि शेवटी मुस्लिम धर्माचा प्रसार येथे झाला.

सातव्या शतकात हिंदू असलेल्या प्रबळ दर्यावर्दी श्रीविजय साम्राज्याच्या ताब्यात हा व्यापार होता. आठव्या शतकात शेतीने समृद्ध झालेल्या हिंदू मातरम् आणि बौद्ध शैलेन्द्र घराण्यांची सत्ता तेथे होती. मातरम् सम्राटांनी प्रम्बानन देवळांची तर शैलेंद्र सम्राटांनी जगातील सर्वात मोठ्या बोरोबुदूरच्या स्तूपाची रचना केली. तेराव्या शतकाच्या शेवटाला उत्तर जावामध्ये गजमद नावाच्या राजाने हिंदू महापहित साम्राज्य स्थापन केले. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व भूभागावर या साम्राज्याचा विस्तार झाला होता.

तेराव्या शतकात सुमात्रा बेटाच्या पश्चिमोत्तर टोकाला सुरुवात होऊन सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक सर्व इंडोनेशिया मुस्लीमबहुल झाला होता. याला एकच अपवाद म्हणजे बाली बेट, जे आजतागायत हिंदूबहुल आहे. इजिप्तमधिल चर्चमध्ये असलेल्या बाराव्या शतकातील लिखाणांत सुमात्राच्या पश्चिमोत्तर टोकावरील बारूस येथे चर्च असल्याचा उल्लेख आहे. इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्म मुख्यतः पोर्तुगिज आणि डच वसाहतवाद्यांनी आणला. त्यांचा धर्म जरी तेथे प्रबळ झाला नाही तरी इंडोनेशियाला साडेतीनशे वर्षे वसाहतवादाच्या खोड्यात जखडून ठेवण्यात मात्र डच सफल झाले.

मुस्लिमबहुल असला, रोमन लिपी अंगिकारली असली आणि देशात एकूण ७४२ भाषा व उपभाषा असल्या तरी सर्वमान्य इंडोनेशियन भाषेवर प्राचीन भारतीय संस्कार अजूनही बऱ्यापैकी टिकले आहेत. या देशाचे बोधवाक्य "Bhinneka Tunggal Ika (भिन्नेका तुंगाल इका)" म्हणजेच " अनेक, परंतु एक" किंवा "युनिटी इन डायव्हर्सिटी" असे आहे. त्यांच्या एका राष्ट्रपतिंचे नाव सुकार्नोपुत्री (सुकार्नोची मुलगी) असे होते. या भाषेत बरेच संस्कृत शब्द मूळ रूपात आणि अपभ्रंशित रूपात दिसतात. इथले चलन रुपिया आहे. एक भारतीय रुपया म्हणजे साधारण २०० इंडोनेशियन रुपिया.


गणेशाचे चित्र असलेली २०,००० इंडोनेशियन रुपियाची नोट (जालावरून साभार)

भारतिय नागरिकांना इंडोनेशियाच्या विमानतळावर अथवा बंदरावर पोहोचल्यावर ३० दिवसांचा पर्यटक "व्हिसा ऑन अरायव्हल" मिळतो. त्यासाठीच्या आवश्यक अटींची इंडोनेशियाच्या सरकारी संस्थळावरची माहिती खालीलप्रमाणे:
१. आगमनाच्या तारखेपासून कमीत कमी ६ महिने वैध असलेले पारपत्र.
२. परतीचे तिकीट
३. रोख व्हिसा फी: USD 25
टीपः व्हिसाचे नियम बदलू शकतात. प्रवासापूर्वी एंबॅसीत अथवा त्यांच्या संस्थळावर चौकशी करून त्यावेळेचे नियम माहीत करून घेणे आवश्यक आहे, हेवेसांन.

बाली

इंडिनेशीयाच्या बाली प्रांताचे अनेक विशेष आहेत, त्यातील काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे:

१. बालीच्या चाळीस लाख लोकसंख्येपैकी ८५% जनता हिंदू आहे.

२. इंडोनेशियाच्या पर्यटन व्यवसायाच्या उत्पन्नात या छोट्या बेटाचा सिंहाचा वाटा आहे.

३. बाली बेट त्याचे नैसगिक सौंदर्य, सुंदर सागरकिनारे, प्रवाळ बेटे, प्राचीन हिंदू मंदिरे, पारंपरिक नृत्यकला, दगड-लाकूड-कातडे-धातूंवरची कलाकुसर यामुळे जगातल्या सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये गणले जाते...


बाली (जालावरून साभार)

बालीमधिल मानवी वसाहतीची सुरुवात दक्षिणपूर्व आशियातील आणि ओशियानियातील लोकांच्या स्थलांतराने झाली असावी असे पुरातत्वशास्त्रिय पुरावे दर्शवितात. बालीच्या लोकांमधिल Y-क्रोमोसोम्सपैकी ८४% ऑस्ट्रेनेशियन वंशाचे, १२% भारतीय वंशाचे आणि २% मेलॅनेशियन वंशापासून आलेले आहेत. प्राचीन बालीत पाशुपत, भैरव, शिव शिदान्त (शिव सिद्धान्त), वैष्णव, बोधा, ब्रह्म, रेसी (ऋषी), सोरा, गाणपत्य असे नऊ हिंदू संप्रदाय होते. सद्या बाली हिंदूंत सुद्रा (शुद्र), वेसिया (वैश्य), क्सत्रियास (क्षत्रिय) आणि ब्राच्मन (ब्राम्हण) अश्या चार जाती मानल्या जातात. मात्र या जातींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार भारतापेक्षा खूपच जास्त सहजपणे होतात.

बालीत घराच्या आवारात देव आणि पूर्वजांच्या नावाने देवळे बांधण्याची प्रथा आहे. त्यामुळे या छोट्या बेटावर सार्वजनिक आणि घराशेजारची अशी सर्व मिळून २०,००० च्या आसपास देवळे (पुरा) आहेत. यावरून त्याला "हजार देवळांचे बेट (Island of a Thousand Puras)" आणि "देवांचे बेट (Island of the Gods)" अशी नावे पडली आहेत.

पहिल्या शतकापासून बाली संस्कृतीवर मुख्यतः भारतीय आणि काही प्रमाणात चीनच्या संस्कृतीची छाप आहे. इ स ९१४ मध्ये श्री केसरी वर्मदेव याने स्थापन केलेल्या ब्लांजोंग स्तंभावर आणि इतर अनेक शिलालेखातही "बालीव्दीप" हे नाव आढळते. याच काळात येथे "सुबक" या नावाच्या गुंतागुंतीच्या जलसिंचन प्रणालीवर आधारलेली भातशेती सुरू झाली. या काळातल्या रीतीभातींची छाप आजही तेथिल जनजीवनात जिवंत आहे.

जावामधील हिंदू महापहित साम्राज्याने (१२९३ - १५२०) इ स १३४३ मध्ये बालीवर आधिपत्य स्थापन केले. हे साम्राज्य विलयाला जाऊन मुस्लिम प्रभाव वाढायला लागल्यावर आपल्या मूळ संस्कृतीची जपणूक करण्यासाठी तेथील हिंदू बुद्धिमंत, धर्मोपदेशक, कलाकार इत्यादींनी बालीमध्ये स्थलांतर केले. सर्व बाजूंनी मुस्लिम संस्कृतीने वेढले गेल्यामुळे या बेटाची भारताशी असलेली सांस्कृतिक नाळ ५०० वर्षांपूर्वी तुटली. त्यामुळे तिथल्या आणि भारतातल्या आताच्या हिंदू संस्कृतींत बराच फरक पडला आहे. बालीतला हिंदू धर्म एकेश्वरी आहे, मुख्य देव "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" असून इतर सर्व (विष्णू, शिव, इ) देव त्याचीच रुपे / अवतार समजले जातात. अचिंत्यची मूर्ती नसते. त्याऐवजी एका रिकाम्या सिंहासनाची स्थापना केली जाते. त्याभोवती पोलेंग नावाचे पांढऱ्या-काळ्या चौकड्यांचे वस्त्र लुंगीसारखे गुंडाळले जाते आणि त्यावर तेदुंग नावाची नक्षीदार छत्री असते. या सिंहासनावर देवांना अर्पिलेला प्रसाद व फुले ठेवली जातात. धर्माचरणामध्ये हिंदू देवांबरोबरच बुद्ध, पुर्वज, पंचमहाभूते आणि निसर्ग यांनाही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचीही अशीच देवळे बांधली जातात. त्यामुळे एकाच आवारात शेजारी शेजारी पाच-दहा सिंहासने असणे बालीत एक सामान्य गोष्ट आहे...


"अचिंत्य"चे सिंहासन

अचिंत्यची मूर्ती नसली तरी त्याची कसर बालीच्या कसलेल्या कारागीरांनी देवळातील आणि घरांतील अनेक कोरीवकामांनी आणि इतर कलाकृतींनी भरून काढली आहे.

मनमोहक निसर्गसौंदर्याने भरलेल्या या देशात पर्यटक वर्षभर गर्दी करतात. ते जेवढे बालीच्या समुद्रकिनाऱ्यांची आणि प्रवाळ बेटांची मजा उपभोगायला येतात तेवढेच ते बालीचे ज्वालामुखी व हिरवाईने नटलेले नैसर्गिक सौंदर्य; सुंदर देवळे व आकर्षक सांस्कृतिक वारसा; आणि कसलेल्या कारागिरांच्या कलाकुसरीने नटलेल्या कलावस्तू यांनी आकर्षित होऊन येतात.

बालीला २०१० मध्ये Travel and Leisure कडून जगातले सर्वोत्तम बेट हा किताब मिळाला आहे. २०११ मध्ये BBC Travel ने बालीला ग्रीस खालोखाल जगातले दुसरे सुंदर बेट म्हणून नावाजलेले आहे. भारतीय संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या या बेटाला दरवर्षी ८० लाखांवर पर्यटक भेट देतात. मात्र त्यांत भारतीयांची संख्या नगण्य असते. परदेशी पर्यटकांत मुख्यतः ऑस्ट्रेलिया, फ्रांस, चीन, जर्मनी आणि अमेरिकन नागरिकांचा भरणा असतो.

एलिझाबेथ गिलबर्टच्या या अमेरिकन लेखिकेच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारलेल्या Eat, Pray, Love या प्रसिद्ध (No. 1 spot on the New York Times paperback nonfiction best-seller list) कादंबरीत तिच्या इटली (जिथे तिने भरपूर पास्ता खाल्ला), भारत (जिथे तिने देवाची खूप आराधना केली) आणि बालीतल्या (मीच सगळे सांगायला पाहिजे काय?... कादंबरी वाचा किंवा चित्रपट पहा ;) ) वास्तव्याचे वर्णन आहे. त्या कादंबरीवर बेतलेला त्याच नावाचा जुलिया रॉबर्ट्सने एलिझाबेथचे काम केलेला चलत्चित्रपटही खूप गाजला होता.

चला तर, जाऊया या देवांच्या बेटाच्या सफरीवर...

===================================================================

बालीसंबधी माहिती फार पूर्वी वाचली आणि तेव्हापासून तेथे जायची उत्सुकता लागली होती. त्यामुळे जेव्हा विमान बाली बेटाजवळ पोहोचले तशी ती शिगेला पोहोचली. जसजसे विमान खाली येऊ लागले आणि राजधानी देनपसारचे दर्शन होऊ लागले तसे बाली आपल्या प्रसिद्धीला जागणार आहे याची खात्री पटू लागली...


बालीचे प्रथमदर्शन : ०१ : देनपसारचे विहंगम दृश्य


बालीचे प्रथमदर्शन : ०२ : देनपसारचे विहंगम दृश्य


बालीचे प्रथमदर्शन : ०३ : देनपसारचे विहंगम दृश्य

.देनपसारच्या बंदारा आय गुस्ति एंगुरा राय लक्षनकन (Bandara I Gusti Ngurah Rai Laksanakan) आंतरराष्ट्रीय विमानतळाची इमारत बालीच्या पारंपरिक शैलीत बांधलेली आहे...

बालीचे प्रथमदर्शन : ०४ : देनपसारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमानतळाबाहेर आमचा मार्गदर्शक पारंपरिक वेषात वाट पाहत उभा होता. त्याचे नाव आय गुस्ती पुतु कार्तिक (I Gusti Putu Kartika) त्याच्या नावातला "आय" म्हणजे कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा आणि "गुस्ती" हा शब्द तो बालीच्या राजघराण्यातील असल्याचे निदर्शक आहे. कार्तिक शिक्षणक्षेत्रात नोकरी करतो आणि मार्गदर्शकाचे काम स्वतःची आवड व अधिक उत्पन्नाचे एक साधन म्हणून करत असतो. त्याच्या हसर्‍या आणि खेळकर स्वभावाने आमचे बालीतील वास्तव्य फारच मजेत गेले...


आमचा मार्गदर्शक कार्तिक, त्याच्या नेहमीच्या स्मितहास्यासह

विमानतळाच्या आवाराच्या बाहेर पडता पडता हे बालीतले पारंपरिक व्दार दिसले...

बालीचे पारंपरिक व्दार

हे व्दार म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आणि त्यातून पुढे गेल्यावर देवलोक (आणि शुभ काळ) सुरू होतो असा इथे समज आहे. त्यामुळे सर्व देवळांच्या, मोठ्या इमारतींच्या आणि मोठ्या खाजगी घरांच्या आवारांचे मुख्य व्दार याच शैलीत बांधलेले असते.

देनपसार इतक्या वेगाने वाढत आहे की तेथील रस्ते आता खूपच अपुरे पडू लागले आहेत हे काही मिनिटांतच ध्यानात आले...


बालीचा रस्ता

आणि काही वर्षात ते इतर आधुनिक शहरांसारखे काँक्रीटचे जंगल बनून आपले नैसर्गिक सौंदर्य हरवून बसेल की काय अशी भिती वाटली.

पुरी सरोन या देनपसारच्या सेमिनयाक नावाच्या उपनगरातील हॉटेलमध्ये पोचलो. पारंपरिक कोरीवकामाने आणि सुंदर पुष्परचनेने सजलेला स्वागतकक्ष पाहून मन प्रसन्न झाले...


पुरी सरोन, सेमिनयाक : स्वागतकक्ष

हॉटेलचे आवारही सुंदर होते. एका बागेत अनेक लहानमोठ्या इमारतींत राहायची व्यवस्था होती...


पुरी सरोन, सेमिनयाक : आवाराचे प्रथमदर्शन

मात्र जेव्हा आम्हाला दिलेली खोली पाहिली तेव्हा निराशा झाली. खोलीचे एकंदरीत रूपरंग काही ठीक वाटले नाही. शिवाय आम्ही बुक केलेल्या स्तरापेक्षा ती खूपच कमी दर्जाची होती. परत रिसेप्शनवर येऊन तक्रार केली. तेथील कर्मचार्‍यांनी असमर्थता व्यक्त करून मॅनेजरशी बोला असे सांगितले. मॅनेजरशी पंधरा मिनिटे चर्चा होऊनही काही उपाय निघत नाही असे बघून, "आमच्या भारतातल्या टूर कंपनीशी बोलतो. योग्य खोली दिल्याशिवाय इथे राहणार नाही." असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर मॅनेजरची वागणूक जरा नरमाईची झाला. तो आत जाऊन कोणाशीतरी चर्चा करून परत आला आणि म्हणाला, "दुसर्‍या खोल्या दाखवतो. त्यातली पसंत करा." या तोडग्यामधून एक बागेकडे व्हरांडा असणारी खोली पसंत पडली आणि मॅनेजर व आम्ही दोघांनीही हुश्श म्हटले !

आम्ही दोन एक तासाने सुरू होणार्‍या भटकंतीआधी थोडा आराम करायला आडवे झालो !

(क्रमशः )

 इंडोनिशिया, व्हियेतनाम आणि थायलंडला जायला व्हिसा लागतोच का?

की, ऑन अरायव्हल विसा मिळू शकतो?

 या देशांच्या व्हिसाची सद्याची अवस्था अशी आहे:
१: इंडोनेशिया: व्हिसा ऑन अरायव्हल
२. व्हिएतनामः ऑनलाईन व्हिसा
३. थायलंडः स्थानिक देशाच्या एंबॅसीतून व्हिसा घेणे आवश्यक

मला वाटतं त्या साठि तुमच्या पारपत्राची कॉपी, एक फोटो आणि १००० भात (थायी चलन) आवश्यक आहे. तसंहि बहुतेक पर्यटक त्यांच्या देशाच्या एंबसीतुन व्हिसा घेउन आल्यामुळे ह्या ऑन अराव्हयल व्हिसाच्या काउंटरवर फार कमी गर्दि असते. सहकुटुंब एकदा नक्कि थायलंडला भेट द्या. फार स्वस्तात टुर होते. खासकरुन पुखेत तर फारच सुंदर आहे. मी ह्या भटकंती वरचे काहि फोटो टाकले होते अर्थात ते नुसते फोटो आणि माफक वर्णन आहे. एक्का साहेबांसारखा काय आपला अभ्यास नाहि. त्या सफरीचे अजुन दोन भाग टाकायचे आहेत. बघु कधी मुहुर्त निघतोय ते.

थायलंडला पण ओन अरायव्हल विसा मिळतो (साधारण १८००/- रु खर्च होतो आणि ३० मिनिटात काम होते (डायरेक्ट फुकेत ला गेलात तर १५ मिनिटात पण काम होते )

ताजेतवाने होऊन हॉटेलच्या स्वागतकक्षात आलो. कार्तिक तयारच होता. आम्ही फेरफटक्यासाठी बाहेर पडलो. पाच मिनिटांचा प्रवास झाला असेल नसेल, या कलाकृती दिसल्या आणि थांबून फोटो काढल्याशिवाय राहवले नाही...


एका प्रवेशव्दाराजवळच्या कलाकृती


गरूडावर आरूढ विष्णू


असुर

या प्रकाराची शिल्पे सर्व बालीभर सतत दिसतात. मंदिरांची, रिसॉर्ट्सची आणि मोठ्या इमारतींची आवारे व व्दारे तसेच सर्व मोठे चौक तेथील आखीव रेखीव आणि सौंदर्यपूर्ण शिल्पांनी सजवलेले आहेत. एक विशेष म्हणजे उघड्यावरची दगडी शिल्पे घासून पुसून साफ न करता त्यांच्यावर नैसर्गिकपणे वाढलेले शेवाळ तसेच ठेवले जाते. हाच प्रकार देवळातल्या देवांच्या सिंहासनांच्या बाबतीतही असतो.

अजून एक विशेष म्हणजे बालीत केवळ देवांचेच पुतळे आहेत असे नाही. तितकेच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त संखेने देवळांच्या आणि इमारतींच्या व्दारांचे संरक्षण करणार्‍या असुराचे पुतळे आहेत. म्हणजे सुर विरुद्ध असुर असा संघर्ष दिसण्यापेक्षा हे एक प्रकारचे सुरासूर सहजीवन असल्यासारखेच दिसते ! मात्र असुरांच्या पुतळ्यांना देवळाच्या आवारांत अथवा चौकाच्या मध्यभागातले मानाचे स्थान मिळत नाही. या सर्व मूर्तींचे आकार त्यांच्या वापराप्रमाणे लहानमोठे असतात... १५-२० सेंटिमीटर उंचीच्या इमारतींच्या आतल्या शोभेच्या मूर्तींपासून ते उघड्या आकाशाखालच्या दोन किंवा जास्त मीटर उंचीच्या मूर्ती दिसतात.

घरात ठेवण्यासाठी बनविलेल्या मूर्तींसाठी दगडाशिवाय लाकूड, कातडे आणि वेगवेगळ्या धातूंचाही वापर केला जातो. अश्या प्रत्येक माध्यमावर प्रावीण्य असलेल्या कलाकारांची वेगवेगळी गावे आहेत. त्यांना भेट देणे हे बाली पर्यटनातील एक आकर्षण आहे. यातील काही प्रसिद्ध गावांना आपण आपल्या भटकंतीत भेट देणार आहोत.

पुरा उलुवातु (उलुवातु मंदिर)

बालीच्या दक्षिणेला अंड्याच्या आकाराचा एक छोटा भूभाग जिंबारन नावाच्या जमिनीच्या चिंचोळ्या पट्टीने मुख्य बेटाला जोडलेला आहे. हे दोन्ही भूभाग मिळून बुखित व्दीपकल्प बनलेले आहे. बुखितच्या पूर्व टोकावर भारतीय महासागराच्या किनार्‍यावर पुरा उलुवातु उर्फ उलुवातु मंदिर आहे.

हे मंदिर बाली बेटाच्या किनार्‍यांवर असलेल्या मुख्य नऊ दिशादर्शक मंदिरांपैकी एक आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा एंपू कुतुरान नावाच्या जावातल्या एका ऋषीने अकराव्या शतकात जीर्णोद्धार केला. त्यानंतर १४८९ मध्ये पूर्व जावावरून आलेल्या डांग ह्यांग निरर्थ या नावाच्या ऋषीने तेथे पद्मासन देवळांची स्थापना केली. याच ऋषीने बालीतील देवळांत पद्मासन (निराकार "संघयांग विदी वसा" किंवा "अचिंत्य" या देवासाठी कलापूर्ण दगडी कोरीवकाम असलेले कमलासन) स्थापन करण्याची प्रथा पाडली. निरर्थ ऋषीला उलुवातुमध्ये मोक्षप्राप्ती झाली असे सांगितले जाते. बालीत जागोजागी असलेल्या पद्मासनांना धार्मिक महत्त्व तर आहेच. पण त्यांच्यावरील कलापूर्ण कोरीवकामांमुळे ती कलाकृती म्हणूनही प्रेक्षणीय आहेत...

...

...
पद्मासनांचे विविध प्रकार

उलुवातु मंदिराच्या आवारात शिरण्यापूर्वी मार्गदर्शक आपल्याला तेथे असलेल्या वानसेनेपासून सावध राहण्याचा इशारा देतो. आजूबाजूला घोटाळत राहून पर्यटकांच्या हातातल्या खाण्यापिण्याच्या वस्तू, कॅमेरे, पर्स, चष्मे, इत्यादी एखाद्या कसलेल्या पाकिटमाराच्या सफाईने काढून घेऊन झाडाच्या टोकावर पळून जाण्यात ही सेना पटाईत आहे...


वानरसेना

बालीतील देवळांच्या अंतर्भागात फक्त हिंदूंनाच आणि तेही केवळ पूजेअर्चेसाठीच प्रवेश मिळतो. बालीतील मंदिरांच्या आवारात प्रवेश करण्याअगोदर आपली वेशभूषा देवळाच्या पावित्र्याला साजेशी असणे आवश्यक असते. अपुरे कपडे परिधान केलेल्या पर्यटकांसाठी देवळाच्या व्दाराबाहेर निळ्या-किरमिजी, भगव्या किंवा पिवळ्या रंगाची लुंगीसारखी वस्त्रे (सरोंग) मोफत वापरायला मिळतात...

अंगभर कपडे असल्याने (आणि कार्तिकने अभिमानाने "हे हिंदू आहेत" असे सांगितल्यानेही असावे !) आम्हाला एक पिवळी फीत कमरपट्ट्यासारखी बांधली तरी पुरे असे सांगितले गेले.

देवळाच्या जवळपास गेल्यावर जमीन एकाएकी ७० मीटर खाली कोसळते आणि आपण एका उंच आणि लांबच लांब नागमोडी कड्याच्या टोकावर पोहोचलो आहोत हे ध्यानात येते...


मंदिराजवळचा कडा, सफेद वाळूचा किनारा आणि त्याच्या पायथ्याला धडका देणारा भारतीय दुग्ध-महासागर

हजारो वर्षांपासून समुद्र, वारा आणि पावसाच्या आघातांनी या चुनखडीच्या दगडांनी बनलेल्या किनार्‍याच्या होणार्‍या झिजेचा हा परिणाम आहे. मात्र यामुळे त्या कड्याच्या टोकावरचे हे मंदिर एक नेत्रदीपक स्थळ झाले आहे.

येथील चुनखडीच्या खडकांची झीज होऊन बनलेले पांढर्‍याशुभ्र वाळूचे सुंदर किनारे आणि खवळलेल्या भारतीय महासागरातील सर्फिंगसाठी योग्य अश्या लाटा हे सुद्धा पाश्चिमात्य पर्यटकांना खेचणारे महत्त्वाचे विशेष आहेत.

या मंदिराच्या मुख्य व्दाराच्या बाजूला संरक्षक म्हणून गणेशमूर्ती आहेत...


व्दारपाल गणेश


अजून एक गणेशमूर्ती आणि इतर कोरीवकाम

हिंदू असल्याचा (आणि कार्तिकच्या वशिल्याचा) फायदा आम्हाला बर्‍याच ठिकाणी देवळांत नेहमीपेक्षा जरा जास्त खुला प्रवेश मिळण्यासाठी झाला. मंदिरात अनेक कोरीवकामांचे नमुने आहेत. त्यापैकी काही खाली देत आहे...


असुर व्दारपाल


अंतःपुराचे व्दार


मंदिराच्या चौथर्‍याचा वाहक आणि रक्षक


खांबावरचे कोरीवकाम


दगडी खिडकीवरचे कोरीवकाम

मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांलगत बर्‍याच लांबीपर्यंत पायवाटा बनवलेल्या आहेत. उसळणार्‍या सागराचे दर्शन घेत पायवाटेवरून बरेच अंतर कापल्यानंतर मंदिर असलेल्या पूर्ण कड्यासकट मंदिराचे मनमोहक दर्शन होते...


कड्यालगत असलेली एक पायवाट


पायवाटेवरून दूरवरून दिसणारे उलुवातु मंदिर आणि त्याचा कडा

हजारो वर्षे निसर्गाचा आघात झेलत झिजत जाणारा हा भूभाग आता फारच अस्थिर आणि धोक्याचा होऊ लागला आहे. मंदिर असलेला कडा झिजून अगदी मंदिराच्या आवाराला टेकला आहे. पुढच्या काही वर्षांत / दशकांत तो तुटून मंदिराला धोका होऊ शकतो...


मंदिराच्या कुसापर्यंत झीजलेला कडा


समुद्रात गिळंकृत होत जाणारा किनारा

बालीतल्या मोठ्या मंदिरांपैकी एक नसले तरी कड्याच्या टोकावर बसलेले उलुवातु मंदिर उंच खडे कडे, कड्यांच्या लगत असलेल्या लांबच लांब पायवाटांवरून चालताना होणारे मंदिराचे आणि सागराचे मनमोहक दर्शन, आणि कड्यांवरून दिसणारा सूर्यास्त अशा अनेक कारणांनी एक कायम लक्षात राहणारे स्थळ बनले आहे.

===================================================================

केचक नृत्यनाट्य

उलुवातु मंदिराला संध्याकाळी भेट देण्याने अजून एक मोठा उद्देश सफल होतो. तो म्हणजे तेथे होणार्‍या केचक नृत्यनाट्याचा कार्यक्रम पाहणे.

मंदिराशेजारच्या एका खड्या कड्याच्या टोकावर, वर मोकळे आकाश, मागे अथांग हिंदी महासागर आणि मावळतीला जाणारा सूर्य अशी जगावेगळी "नेपथ्य आणि प्रकाशयोजना" असलेल्या खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम सादर केला जातो!...


केचकचा खुला रंगमंच

पूर्वी रोगाच्या साथीपासून गावाचे रक्षण करण्यासाठी केल्या जाणार्‍या "संघयांग" या धार्मिक कर्मकांडाची केचक ही सुधारलेली आवृत्ती आहे. त्यात रामायणाचे काही भाग (वायांग वोंग) सादर केले जातात. ५०,००० ओळींच्या मूळ बाली रामायणाच्या संहितेचा काही भाग पर्यटकांसाठी सादर केल्या जाणार्‍या या कार्यक्रमात दाखवला जातो.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असे की यात वाद्ये वापरली जात नाहीत. त्याऐवजी एक ७० सहाय्यक कलाकारांचा ताफा तोंडाने "चकं-चकं, चकं-चकं" असा आवाज काढून पार्श्वसंगीत देतो. या जगावेगळ्या वाद्यसमुहाला तोंडाने विशिष्ट आवाज काढून मार्गदर्शन करणारा एक दिग्दर्शक असतो. या पार्श्वसंगीतामुळेच या नृत्याला केचक हे नाव पडले आहे. ही मंडळी नाट्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांत जंगलातली झाडे, लक्षमणरेखा, गरूडाचे साथी, रावणाचे साथी, वानरसेना, इत्यादी बनून नाटकातल्या सहकलाकारांचे आणि "प्रॉपर्टी"चेही काम करतात...


खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहाचा एक भाग


व्दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात


सहकलाकार + वाद्यवृंद : एकावर एक फुकट ;)


वनवासात सीता आणि राम


सुवर्णमृगाच्या रूपातला मारीच दैत्य आणि राम


सीता लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जायला सांगते


सीताहरण


जटायूवध


राम-लक्ष्मणाचा शोक


'आनोमान'चे (हनुमानाचे) आगमन


अशोकवनातील सीता


हनुमानाच्या मर्कटलीला


अशोकवनातील सीता-हनुमान भेट

या नाटकात सूर्याची फार फार महत्त्वाची भूमिका असते... योग्य "टायमिंग" साधून तो "एक्झिट घेतो" आणि नाट्याचा पुढचा प्रवेश सुकर होतो...


सूर्याने योग्य टायमिंग साधून घेतलेला एक्झिट

सुर्याजीरावांच्या एक्झिटने झालेल्या अंधारातील पुढच्या प्रवेशात रावणाचे सेवक "आनोमान" च्या शेपटीला आग लावतात आणि मग तो लंकादहनाचे तांडव सुरू करतो...

मग राम रावणवध करून सीतेची सुटका करतो. सरतेशेवटी, प्रेक्षकांनी केलेला टाळ्यांच्या कडकडाटाचा सत्कार स्वीकारायला सर्व कलाकार रंगमंचावर येतात. आठवण म्हणून प्रेक्षकांना कलाकारांबरोबर फोटो काढता येतात...

तिकिटाचे ४०,००० रुपिया (२०० भारतीय रुपये) व्याजासकट दामदुपटीने वसूल होतात असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. हा जगावेगळा रामायणाचा प्रयोग पाहिल्याशिवाय बालीची भेट पुरी होऊच शकत नाही.

केचक नृत्याची चित्रफीत (जालावरून साभार)...

("Kecak Dance" हे शब्द वापरून यु ट्युब विचारणा केल्यास अजून बरेच व्हिडिओ सापडतील.)

मुख्य कलाकारांचे आकर्षक पोशाख; "चकं-चकं-चकं-चकं" आवाजाचं पार्श्वसंगीत; महासागर व कड्याचे नैसर्गिक नेपथ्य; आणि प्रत्यक्ष सूर्यमहाराजांचा नेपथ्ययोजनेत सहभाग यांनी समृद्ध केलेला हा अनोखा नृत्यनाट्यप्रयोग ! रामायणाची कथा माहीत नसलेल्या पर्यटकांनाही तो पाहून एक अनोख्या अनुभूतीचा अनुभव नक्कीच येत असणार.

परतताना जंबारनच्या समुद्रकिनार्‍यावरील एका हॉटेलमध्ये जेवणाला थांबलो. त्याच्या स्वागतकक्षात ही गणेशमूर्ती होती...

समुद्राच्या लाटांपासून दोन हाताच्या अंतरावर असलेल्या वाळूवर टाकलेल्या टेबलांवर बालीच्या समुद्रान्नाची चव घेताना आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मनात होते.

(क्रमशः )

तिथले द्वारपालांचे चेहरे हे मला सिंहमुखाशी साधर्म्य असलेले वाटत आहेत. कदाचित इथल्या किर्तीमुखांवरून प्रेरणा घेऊन अशी शिल्पे घडवली जात असावीत.

आमच्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरची ही कोरीव दगडी खिडकी बघा. किती सारखी. :)

a

 दक्षिणपूर्व आशियाच्या सगळ्याच देशांवर भारतिय संस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे. हे केवळ विचारांचे आदानप्रदान किंवा व्यापारी संबद्ध नव्हते तर त्याकाळात तेथे जाऊन धर्म, राजसत्तेचा आणि कलेचा वारसा घेऊन जाणार्‍या दर्यावर्दी भारतियांचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्या देशांतील सर्व धर्मांना छेद देत जाणारा लोकजीवनात असलेला रामायण-महाभारताचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव असेच नाही तर तिथल्या जनतेत असलेले १०-१५% भारतीय Y-क्रोमोसोम्स हा पण त्या वस्तुस्थितीचा ठाम शास्त्रिय पुरावा आहे.

या सर्व गोष्टी त्या देशांत, अगदी सद्या मुस्लीम असलेल्या देशांमध्येसुद्धा, ऐतिहासिक वारसा म्हणून सहजपणे आणि अभिमानाने सांगितल्या जातात आणि संग्रहालयांत जपून ठेवल्या जातात. स्वार्थी राजकारण, स्वतःबद्दलची कमीपणाची भावना (लो सेल्फ एस्टीम) किंवा तद्दन अज्ञान यामुळे भारतात दुर्दैवाने अगदी याविरुद्ध अवस्था आहे !

पंधराव्या शतकापासून भारतात व तेथे झालेल्या मुस्लीम आक्रमणांमुळे आणि नंतर पाश्चिमात्य वसाहतवादामुळे ही प्रक्रिया खंडली. वसाहतवाद संपल्यावर बदललेल्या समिकरणांमुळे ती प्रक्रिया पुनःस्थापीत करण्यात कोणालाच रस राहिला नव्हता. तरीसुद्धा तेथिल जनमानसावरचा तो ठसा अजूनही कायम आहे हे विशेष.

कालच्या अर्ध्या दिवसाच्या फेरीच्या अनुभवानेच बाली पर्यटकांचे इतके आवडते ठिकाण का आहे हा प्रश्नच निकालात निघाला होता. त्यामुळे सकाळी न्याहारी वगैरे करून तयार होऊन उत्सुकतेने लॉबीत पोहोचलो. कार्तिक त्याचा हसरा चेहरा आणि खेळकर स्वभाव घेऊन आमची वाट पाहत होता. तेव्हा वेळ न घालवता त्वरीत बाहेर पडलो.

शहराच्या बाहेर पडलो आणि बाली तिचे सौंदर्य मोकळेपणे उलगडू लागली. बालीला निसर्गाने हिरवेगार डोंगर, दाट झाडी, लहान-मोठी तळी यांच्या रूपाने सौंदर्य भरभरून दिले आहे. लोकांनीही त्या सौंदर्याची नीट जपणूक करून वर त्यात आपल्या कलाकृतींची आणि सणसमारंभांची भर घालून ते अधिक खुलवले आहे. गावां-शहरांतील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा लक्षणीय आहे.

वातावरण ढगाळ आणि कुंद होते. पण शहर मागे पडल्या पडल्या हिरवी झाडी व भाताची शेते असलेला परिसर सुरू झाला आणि मनावरचे तरी मळभ दूर झाले...

बराच भाग अगदी जंगलातून चाललो आहे असे वाटावे असाच होता. मात्र रस्त्यावरची दुचाकी वाहने लोकवस्तीपासून फार दूर नसल्याची जाणीव करून देत होती...

मधून मधून छोटी पण स्वच्छ आणि नीटनेटकी गावे लागत होती...

तर मधूनच डोंगरउतारावरची हिरवाई आणि भातशेतीची खाचरे मन मोहून टाकत होती...

तास-दीड तासाच्या नयनरम्य प्रवासानंतर आम्ही आमच्या आजच्या पहिल्या आणि एका खास आकर्षणाजवळ, बेसाकी गावाजवळ, पोहोचलो...


बेसाकी गावातली पारंपरिक घरे


घराच्या आवारातली देवांची आणि पूर्वजांची देवळे

पुरा बेसाकीला बालीतल्या सर्व मंदिरांची माता समजले जाते. असे हे महामंदिर पाहण्याअगोदर बालीतील मंदिरांबद्दल थोडीशी सर्वसाधारण माहिती घेणे मनोरंजक आणि उपयोगी होईल. शिवाय ही माहिती आपल्याला पुढच्या सफरीतील इतर मंदिरे व स्थळे नीट समजून घ्यायलाही उपयोगी पडेल.

बालीतील मंदिरे

बालीतील मंदिरांची रचना इतर ठिकाणच्या बंदिस्त खोल्यांच्या मंदिरांसारखी नसते, तर उघड्या आकाशाखालील कूस असलेले एक आवार अशी असते. बेसाकीसारखे मोठे मंदिर असल्यास त्यातल्या अनेक उपमंदिरांची आवारे एकमेकाला अनेक कोरीव व्दारांनी जोडलेली असतात.

प्रकार:

बालीत मंदिरांच्या स्थानावरून त्यांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात :

१. पुरा काह्यांगन जगद् (Pura kahyangan jagad): ही मंदिरे पर्वतांच्या अथवा ज्वालामुखींच्या उतारावर बांधलेली आहेत. पर्वत आणि विषेशत: ज्वालामुखी यांना बाली हिंदू धर्मात असलेल्या उच्च स्थानामुळे या मंदिरांचा दर्जा सर्वात वरचा आहे. पुरा बेसाखी या प्रकारातले सर्वोच्च मंदिर आहे.

२. पुरा सेगारा (Pura segara): ही मंदिरे सागरकिनार्‍यावर बांधलेली आहेत.

३. पुरा देसा (Pura desa): ही मंदिरे बेटाच्या (देशाच्या) अंतर्भागात सपाटीवर बांधलेली आहेत.

४. पुरा तिर्ता (Pura tirta): ही मंदिरे पाण्याचा स्रोत (झरा, नदी, तळे, इ) असलेल्या (म्हणजे तीर्थाच्या) ठिकाणी बांधलेली आहेत. या मंदिरांच्या पुजार्‍यांना शेतीकरिता पाणीवाटप करण्यासाठी बनवलेल्या "सुबक" नावाच्या प्राचीन जलनियोजन व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असते. ही प्राचीन धार्मिक-सामाजिक-आर्थिक व्यवस्था अजूनही बालीच्या काही विभागांत व्यवस्थितपणे चालू आहे !

रचना:

मंदिरांची रचना सर्वसाधारणपणे पवित्र त्रिमंडल सूत्रावर बेतलेली असते:

१. निस्तामंडल उर्फ जबा पिसान: या सर्वात बाहेरच्या आणि कमी उंचीच्या आवारात सुशोभित बाग असते. तेथे मंदिरांतील समारंभांची तयारी करण्यासाठी लागणारी जागा राखीव ठेवलेली असते. धार्मिक समारंभातील नृत्य इत्यादी कार्यक्रमांसाठीही ही जागा वापरली जाते.

२. मद्यमंडल उर्फ जबा तेंगा: हे मध्यभागातील आवार भाविकांनी करण्याच्या धार्मिक विधींसाठी वापरले जाते. तेथे मंदिराचा मुदपाकखाना, भाविकांना पुजार्‍यांशी संवाद करण्यासाठीची जागा आणि मंदिराची वाद्ये ठेवण्याची जागा असते.

३. उतममंडल उर्फ जेरो: हे आवार मंदिराचा सर्वात पवित्र आणि सर्वात उंचीवरचा भाग असतो. तेथे अचिंत्यचे पद्मासन, पॅगोडासारखे एकावर एक अनेक छपरे असलेले "पेलिंग्गी मेरू" नावाचे मनोरे आणि वेदपठणासाठी राखीव जागा असते.

व्दारे:

बाली स्थापत्यकलेत मंदिरांची मुख्यतः दोन प्रकारची व्दारे असतात :

१. चंडी बेंतार (Candi bentar) म्हणजे दुभंगलेले व्दार. बालीत हे सतत दिसत राहते कारण मंदिराच्या सर्वात बाहेरच्या निस्तमंडलात प्रवेश करण्याच्या मार्गावर ते असते.

२. कोरी अगुंग किंवा पदुरक्ष (kori agung or Paduraksa) प्रकारचे व्दार मध्यमंडल आणि उत्तममंडलाला जोडते. वर छप्पर असलेल्या या व्दारावरचे कोरीवकाम आणि रंगरंगोटी अतिशय कलापूर्ण असते. 


कोरी अगुंग

दारांच्या रचनेची आणि जागांची ही पद्धत मंदिरांप्रमाणेच राजेरजवाड्यांच्या (आणि आता श्रीमंतांच्या) महालांसाठीही वापरली जाते.

अगुंग पर्वतावरची मंदिरमाता पुरा बेसाकी

पुरा बेसाकी हे बालीतील सर्वात पवित्र आणि आकाराने सर्वात मोठे मंदिर आहे. याला बालीतील सर्व मंदिरांची माता समजले जाते. या मंदिराचे बेसाकी हे नाव ज्याचा समुद्रमंथनात दोरीसारखा उपयोग केला होता त्या सर्पराज बासुकी (वासुकी) याच्या नावावरून पडले आहे.

हे मंदिर सर्वप्रथम केव्हा स्थापित केले गेले याबाबत नक्की माहिती नाही. पण "पुरा पेनातरान अगुंग" या त्याच्या मुख्य भागातील दगडी चौथर्‍याच्या मेगॅलिथिक पिरॅमिडसारख्या रचनेवरून ते मंदिर कमीतकमी २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असावे असे मत आहे. बालीतील धर्मग्रंथांप्रमाणे बालीत हिंदू धर्म सर्वप्रथम मार्कंडेय आणि अगस्ती ऋषींनी आणला. त्यापेकी मार्कंडेय ऋषींनी बेसाकीच्या प्राचीन मंदिराला हिंदू मंदिर बनवले असे मानले जाते. पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते. पंधराव्या शतकामध्ये बालीमधिल गेलगेल या हिंदू राजघराण्याने त्याला राजमंदिराचा दर्जा दिला.

हे मंदिर बालीतील सर्वात उंच (३०३१ मीटर) आणि सर्वात पवित्र अश्या अगुंग पर्वताच्या (गुनुंग अगुंगच्या) दक्षिणपश्चिम उतारावर १००० मीटर उंचीवर वसलेले आहे. बाली पुराणे व लोककथांप्रमाणे अगुंग पर्वत ही विश्वाचा मध्य समजल्या जाणार्‍या मेरू पर्वताची प्रतिकृती आहे. काहींच्या मते "मेरू पर्वताचे पामीरचे पठार -> भारत -> पूर्व जावा -> पश्चिम जावा असे विस्थापन होताना अगुंग पर्वत हा त्याचा बालीमध्ये पडलेला एक तुकडा आहे". तर इतर काहींच्या मते "तो हिंदूंनी बालीत येताना बरोबर आणलेला मेरूचा तुकडा आहे". पर्वत आपल्या जागेवरून हलून / हलवून हजारो किलोमीटर दूर जाणे / नेणे हे वास्तवात शक्य नाही. त्यामुळे, ही कथा बहुतेक "दूरवर स्थलांतरीत होणार्‍या लोकांनी स्वतःची संस्कृती / मायभूमीची मूठभर माती बरोबर आणणे आणि ती नवीन जागेत रुजविणे / जागेच्या मातीत मिसळणे" या कृतीचे प्रतिकात्मक रूप असावे. ते काहीही असले तरी अगुंग पर्वताचे बालीच्या धर्मात आणि समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. (समुद्रमंथन : मानवाचे प्राचीन जलप्रवास या लेखात मी "मेरू हे प्राचीन काळातील समुद्रप्रवासाच्या आणि म्हणूनच सांस्कृतिक-व्यापारी-आर्थिक-राजकीय-दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्राचे नाव असावे आणि त्या केंद्राची जागा काळाबरोबर बदलणार्‍या वस्तुस्थितीबरोबर बदलत गेली असावी." या कल्पनेच्या बाजूचे काही पुरावे मांडले होते. या केंद्राची नंतर पुराणांत आणि लोककथांत विश्वाचे केंद्र अशी "सुधारून वाढवलेली" आवृत्ती झाली असावी.)

अगुंग पर्वत त्याच्या उंचीमुळे पश्चिमेकडील समुद्रावरून आलेले ढग पूर्णपणे रोखून धरतो. त्यामुळे पुरा बेसाकी असलेला त्याचा दक्षिणपश्चिम उतार वर्षभर ढगांनी वेढलेला, थंड आणि हिरवागार असतो, तर त्याचा उत्तरेकडील उतार बाष्पाअभावी कोरडा आणि रखरखीत असतो. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १७०० लोक मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी लाव्हाचा ओघ मंदिरापासून केवळ काही मीटर दुरून गेला आणि (बालीकरांच्या मते दैवी चमत्कारामुळे) मंदिराला अजिबात धोका पोहोचला नाही.

बालीचे धार्मिक वर्ष २१० दिवसांचे असते. अश्या प्रत्येक वर्षात या मंदिरात कमीत कमी सत्तर मोठे सणसमारंभ साजरे केले जातात !

पर्वताच्या पायथ्याजवळ गाडीतून पायउतार होऊन चालू लागताच आजूबाजूचा सुंदर असलेला आणि "सुंदर राखलेला" परिसर आपले लक्ष वेधून घेतो...


पुरा बेसाकीकडे जाणार्‍या रस्त्यावर टिपलेले एक दृश्य

हे मंदिर म्हणजे "पुरा पेनातरान अगुंग" या मुख्य मंदिरासकट एकमेकाला लागून असलेल्या (बालीतील वेगवेगळ्या हिंदू संप्रदायांचे प्रतिनिधित्व करणार्‍या) २३ उपमंदिरांचे संकुल आहे. ह्या मंदिराची रचना "मंडल" प्रकारची आहे. या रचनेत पर्वताच्या उतारावर पिरॅमिडसारखे खालून वरपर्यंत सहा स्तर आहेत. मंदिराला दुभागणार्‍या एका मध्य आसाच्या दोन्ही बाजूला असलेल्या आवारांत उपमंदिरे आहेत. आवारांच्या बाजूंनीही वरखाली जाण्यासाठी पायर्‍या आहेत. मुख्य आसाभोवती दोन्ही बाजूंना समान असणारी रचना नैसर्गिक आणि आध्यात्मिक समतोलाचे निदर्शक समजली जाते. पूजनीय समजला जाणार्‍या अगुंग पर्वताच्या उतारावर असल्याने या रचनेला आपोआपच पावित्र्याची झालर आली आहे. मंदिराच्या सर्वोच्च स्तरावरून फक्त आजूबाजूचा परिसरच नाही तर बालीभोवतीचा समुद्रही दृष्टिक्षेपात येतो.

हे सर्व मंदिरसंकुल पाहायचा आध्यात्मिक आणि पर्यटन आनंद घेण्यासाठी शेकडो पायर्‍यांचा चढ-उतार करायची तयारी ठेवायला लागते हा आधिभौतिक मुद्दाही आतापर्यंत तुमच्या ध्यानात आला असेलच !

चला तर असे हे एकमेवाव्दितीय मंदिर पाहायला...


पुरा बेसाकीचा आराखडा


पुरा बेसाकीचे प्रथमदर्शन

...
...
पुरा बेसाकीचे काही संरक्षक

.सर्वात खालच्या पहिल्याच स्तरावर जाण्यासाठी असलेल्या असंख्य पाहिर्‍या सुरुवातीलाच छातीवर दडपण आणतात ! त्या आपल्याला दुभंगलेल्या मेरुपर्वताच्या रूपातील चंडी बेंतार प्रकारच्या सर्वात बाहेरच्या मुख्यद्वारापर्यंत घेऊन जातात...

 


पुरा बेसाकी : पहिल्या स्तरावरच्या मुख्य चंडी बेंतार प्रकारच्या व्दाराकडे नेणार्‍या पायर्‍या

मदिराच्या दोन्ही बाजूने सहाही स्तरांवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. त्यांच्यावरून वर जाताना उपमंदिरांची बाहेरच्या बाजूची चंडी बेंतार व्दारे लागतात. प्रत्येक दोन स्तरांमधिल उंचीच्या फरकात पिरॅमिडच्या पायर्‍यांसारखी पण त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीची कलापूर्ण रचना आहे. या रचनेत अनेक ठिकाणी झाडेझुडुपे आणि फुलझाडे लावून सुंदर बागा केल्या आहेत...


पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधली पायर्‍या-पायर्‍यांची आकर्षक रचना


पुरा बेसाखीतील दोन स्तरांमधल्या रचनेतील बागा आणि बाहेरून दिसणारी उंच कोरीव पद्मासने आणि व्दारे


पुरा बेसाकीच्या उतममंडलात प्रवेश करण्यासाठी असलेले कोरी अगुंग (जालावरून साभार)

सर्वात उंच असलेल्या उतममंडलातील पद्मासनांवर देवाला वाहिलेला प्रसाद व फुले ठेवतात, तर मोकळ्या आवाराचा उपयोग भाविकांना बसून प्रार्थना करण्यासाठी व प्रवचन ऐकण्यासाठी होतो. येथे मेरू पर्वताचे रूपक असलेली पॅगोडासारख्या वर वर लहान होत जाणार्‍या छपरांच्या अनेक मजली इमारती असतात. त्यांची छपरे गवताच्या खास प्रकारच्या रचनेने बनविलेली असतात...


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०१


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०२ : पॅगोडासारखे दिसणारे मनोरे (पेलिंग्गी मेरू)


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०३


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०४


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०५

पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०६


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०७ : पुजारी मंडळींच्या नावाची यादी... मोबाईल फोन नंबर सकट


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०८ : मंदिरातली खास बालीनीज वाद्ये


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ०९ : पार्श्वभूमीवर दिसणारा पर्वतराज अगुंग... क्षणभर ढगाआडून डोकावून दर्शन देताना


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १० : अचिंत्यची पद्मासने


पुरा बेसाकीचा अंतर्भाग : ११

पुरा बेसाकीचा अंतर्भाग : १२

या देवळाच्या अंतर्भागातली दृश्ये जेवढी अनवट आहेत, तेवढेच एक किलोमीटर उंचीवरून दिसणारे परिसराचे दृश्य नयनरम्य आहे. हे महादेवूळ, ज्वालामुखीसह असलेला अगुंग पर्वत, हिरवाईने नटलेला परिसर; सगळे मनाला भारून टाकते. हजारेक वर्षांपूर्वी भारतातून येथे स्थलांतरीत होणार्‍या आणि या भूमीत मुळे रोवून प्रतिकूल परिस्थितीत अजूनही आपला धर्म आणि संस्कृती केवळ जतन करणार्‍याच नाही तर दर दिवशी अभिमानाने साजरा करणार्‍या बालीच्या जनतेबद्दल मनात काय भावना येतात हे सांगणे कठीण आहे !

केवळ वेळेचे बंधन पाळायला हवे म्हणून जड पावलांनी गाडीच्या दिशेने निघणे भाग पडले.

(क्रमशः )

 इतकी प्रशस्त देवळे आहेत म्हटल्यावर येथील लग्नकार्ये देवळांमध्येच होत असावीत का? असा प्रश्न पडला. साहेब, आता तुम्ही एक पुस्तक छापायचे मनावर घ्याच! आम्ही ते नक्की विकत घेऊ.

 मला बालीतले लग्न बघण्याची संधी मिळाली नाही, पण तो विधी मोठा रंगीबेरंगी आणि चित्ताकर्षक असतो असे वाचून-ऐकून आहे.

त्यामुळे सद्या बालीनीज लग्नसमारंभाची काही चित्रे पाहूनच समाधान करून घेणे भाग आहे :( (सर्व चित्रे जालावरून साभार)

मुख्य समारंभ...
.

रुखवत...
...

करवल्या...

वरात...
.

पाश्चिमात्यही बालीत हा विधी करवून घ्यायला येतात...
.

बाली लग्न करण्यासाठीचे आणि दुसर्‍यांदा लग्नाच्या आणाभाका पुन्हा घेण्यासाठीचे (रिन्युअल ऑफ वाव्ज) एक जानेमाने आंररराष्ट्रिय ठिकाण बनले आहे. हे समारंभ देऊळ, बौद्धमंदिर, रिसॉर्ट, खास व्हिला, चर्च, इ हवे तिथे करता येतात. हे काम करणार्‍या बर्‍याच कंत्राटी कंपन्या तेथे आहेत.

देवळात कोणताही विधी करायला हिंदू असणे जरूरीचे असते. पुरा बेसाखी अथवा इतर मोठी मंदिरे बडेजावासह केलेल्या समारंभाना वापरता येत नाहीत.

गाडी रस्त्याला लागली आणि बालीच्या नयनरम्य निसर्गातून आमचा प्रवास सुरू झाला. आजच्या सहलीत अनेक छोटे मोठे रोचक थांबे होते. शिवाय प्रवासातल्या अनेक निनावी जागाही इतक्या सुंदर होत्या की डोळ्यांना आणि कॅमेर्‍याला मेजवानीच होती. इथे कार्तिकचा नेहमीचा अनुभव कामाला आला असणार, कारण आम्ही काही म्हणण्याच्या आधी "पाहिजे तेथे फोटो काढायला खुशाल गाडी थांबवायला सांगा" असे त्यानेच सांगून टाकले !

किंतामणी

अगुंग पर्वताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या बातूर पर्वतावर बालीतील दुसरा महत्त्वाचा जिवंत ज्वालामुखी आहे. हल्लीच्या काळात म्हणजे १८०४ आणि १९६८ सालीही या ज्वालामुखीतून लाव्हाचा उद्रेक झाला होता. त्याच्या २३ ते २८ हजार वर्षांपूर्वी झालेल्या उद्रेकाने बनलेल्या प्रचंड विवरात १० X १३ किलोमीटर आकाराचे बातूर तळे आणि त्या तळ्याकाठी वसलेली प्राचीन पार्श्वभूमी असलेली अनेक गावे आहेत. हा किंतामणी नावाचा भाग त्याचा "स्फोटक" इतिहास, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि प्राचीन संस्कृती यामुळे बालीतील एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण बनले आहे. येथील पर्वतराजीत अनेक सुंदर पर्वतारोहण (ट्रेक) करण्याचे मार्ग आहेत. त्यातले काही तर अगदी बातूर पर्वतशिखरावरील ज्वालामुखीच्या मुखापर्यंत घेऊन जातात. इ स २०१२ मध्ये UNESCO ने या प्रभागाला Global Geopark Network मध्ये स्थान दिले आहे.

अनेक आकर्षणे व अपुरा वेळा यामुळे या भागाचा मध्ये मध्ये फोटोथांबे घेत चारचाकीनेच धावता दौरा केला...

या रस्त्यावरून पुढच्या थांब्याकडे जाताना अनेक पारंपरिक बालीनीज घरे दिसत होती...


बातूर पर्वत आणि बातूर तळे


बातूर पर्वताच्या उतारावर आणि बातूर तळ्याच्या काठी वसलेल्या गावांचे विहंगम दृश्य

पुरा तिर्ता एंपुल

तंपाक सिरिंग गावाजवळचे हे मंदिर इ स ९६२ मध्ये वर्मदेव राजघराण्यातील राजा इंद्रजयसिंह याने स्थापन केले एका मोठ्या झर्‍याच्या ठिकाणी बांधले. एका दंतकथेप्रमाणे मयदानव नावाच्या असुराने देवांच्या सेनेवर विषप्रयोग केला आणि इंद्राने त्या सैनिकांना या झर्‍याची निर्मिती करून त्याच्या पवित्र पाण्याने परत जिवंत केले. त्यामुळे लोक या पवित्र तीर्थावर डुबकी घेऊन पुण्य कमावायला आणि रोगमुक्तीसाठी येतात. मंदिराच्या आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शिलालेखांप्रमाणे या जागेचे नाव वेगवेगळ्या काळांत "तिर्ता री ऐर हांपुल", "तिर्ता हांपुल" व "तिर्ता एंपुल" असे बदलत गेले आहे. त्यातल्या पहिल्या नावाचा अर्थ "जमिनीतून बाहेर येणारे पाणी" असा आहे.


मंदिराच्या आवारात शिरल्या शिरल्या खुद्द देवांचा राजा इंद्र आपले स्वागत करतो......

इथले दुभंगव्दार इंद्राच्या नावाला शोभेल असे भव्य आणि कोरीवकामाने भरलेले आहे. त्याच्या मागे दिसणारा मंदिराचा हिरवागार परिसर मन प्रसन्न करतो...

आत शिरल्या शिरल्या एका बाजूने बालीनीज ढबीत हिंदी गाणी ऐकू आली. त्या बाजूला पाहिले तर एक बाली महिला गात होती. आश्चर्याने थांबून ऐकू लागलो तर तिने धडाधड आठ-दहा गाण्यांचे मुखडे म्हणून दाखवले. हे सगळे केवळ भारतीय लोक (आम्ही) दिसल्याने गमतीने चालले होते. आमचा फोटो काढा असे म्हणून खरंच फोटो काढताना मात्र बाईसाहेबांनी चेहरा झाकून घेतला...

हिंदी चित्रपट आणि गाणी बालीत खूप लोकप्रिय आहेत याचे प्रत्यय पुढेही येत राहिले.

देवळाच्या आवारात शिव, विष्णू, ब्रम्हा, बातूर पर्वत आणि इंद्राची देवळे आहेत. भाविकांना आराम करण्यासाठी एक मोठा सुंदर सजावट केलेला मंडप आहे...


मंडप


पुरा तिर्ता एंपुलचे कोरी अगुंग


पुरा तिर्ता एंपुलमधिल अजून दोन कलापूर्ण व्दारे

इथले सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे इथले कोई माश्यांनी भरलेले कुंड आणि त्यात झर्‍याचे पवित्र पाणी सोडणार्‍या (आपल्याकडे गोमुखे असतात तशा) बारा झरण्या. भाविक प्रथम देवळात जाऊन पूजा करतात आणि मग कुंडात उतरून स्नान आणि प्रार्थना करतात. इथले पाणी (गंगाजलासारखे) बाटल्यांत भरून घरी नेण्याचीही प्रथा आहे...


पवित्र कुंड

देवळाचा संपूर्ण परिसर वृक्षराजीने व वाहत्या पाण्याच्या झर्‍यांनी समृद्ध आणि मन प्रसन्न करणारा आहे...

देवळाचा परिसर अनेक सुंदर दगडी, लाकडी कलाकृतींनी आणि नयनरम्य रंगरंगोटीने भरलेला आहे. त्यातले काही नमुने आपण पाहूया...

 काय बघू आणि काय नको असे होते. कॅमेर्‍याला ह्या मंदिरात जराशीही फुरसत मिळत नाही. इतक्या सुंदर कलाकृती असलेल्या मंदिरात संरक्षक नाहीत असे कसे होईल ? त्यातले हे दोन नमुने..



येथील परिसराला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. त्यामुळे या मंदिरातली मानवी कलाकुसर बघणे हा जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच आनंद आपली नजर मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गावर गेल्यावर होतो. या देवळाशेजारी १९५४ मध्ये इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षाने (सुकार्नो) आपली सुटी व्यतीत करण्यासाठी एक प्रशस्त बंगला बांधलेला आहे...

बंगल्याचे दोन टेकड्यांवरील दोन भाग जोडण्यासाठी एक खाजगी पूल आहे !...

आजकाल हा बंगला देशाच्या खास पाहुण्यांच्या पर्यटनासाठी वापरला जातो.

हे होते बालीतील अजून एक ठिकाण, जिथून पाय निघणे कठीण होत होते. नाईलाजाने आमचा पुढचा प्रवास सुरू करावा लागला. निसर्गरम्य परिसरातून आमचा रस्ता कधी छोट्या गावातून जात होता...

तर कधी केवळ काही शाकारलेली घरे आणि भाताची खाचरे असलेल्या ग्रामीण भागातून जात होता...

(क्रमशः )

गोआ गजा

उबुद नावाच्या गावाजवळ एक ९ व्या शतकात खोदलेली गोआ गजा (गजगुहा; गोआ = गुहा, गजा = गज) नावाची गुहा आहे. ही जागा पूर्वी ऋषिमुनी तपश्चर्येसाठी वापरत असत. या गुहेच्या मुखाभोवतीच्या खडकांत असुर आणि भयानक प्राण्यांचे मुखवटे कोरलेले आहेत. त्यातले मुख्य शिल्प हत्तीसारखे दिसते अश्या कल्पनेवरून या गुहेचे नाव पडले आहे. देशवर्णन नावाच्या इ स १३६५ मध्ये लिहिलेल्या एका जावानीज कवितेत या जागेचे वर्णन केलेले आहे. १९५० साली केलेल्या उत्खननात येथे अनेक धार्मिक स्नानकुंडे सापडली आहेत. १९९५ मध्ये या जागेला UNESCO World Heritage च्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.

चला तर, मारूया चक्कर या सांस्कृतिक महत्त्व असलेल्या अजून एका निसर्गरम्य ठिकाणाची...


भाविकांना आराम करण्यासाठी मंडप


एक स्नानाचे कुंड


गजगुहेचे मुख


गुहेतली गणेशमूर्ती


गुहेतली तीन शिवलिंगे

अशी गणेशमूर्ती आणि शिवलिंगे हे बालीतील प्रार्थनास्थळांमध्ये अपवादात्मक आहे. कदाचित ही गुहा मंदिर नसून ध्यानधारणेचे ठिकाण असल्यामुळे तसे असावे.


उत्खनन केलेली पण वापरात नसलेली काही कुंडे आणि पलीकडे दिसणारा मंडप


एका मंदिराचे शिखर

गुहेपलीकडे असलेल्या एका उतारावर आणि त्यावरुन उतरून उतरलेल्या दरीत सुंदर बाग तयार केली आहे. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिक स्थळ न राहता फिरायला जाण्यासाठीचे पर्यटन स्थळही बनले आहे...

बागेतला एक वृक्षराज त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांच्या जाळ्यासकट...

 अजून एक सरोंग नेसलेला वृक्षराज...

एका काळी या जागेवर बौद्धमंदिर बांधण्याचे प्रयत्न केले गेले, पण दर वेळेस ते मंदिर बांधत असतानाच कोसळल्यामुळे ते प्रयत्न सोडून देण्यात आले. त्या प्रयत्नांची खूण असलेले भग्नावशेष आजही तेथे दिसतात...


भग्न बौद्धमंदिराचे अवशेष

 

बाहेर पडताना बालीनीज कलाकुसरीची झलक दाखविणारे हे दुकान दिसले...

बालीच्या अंतर्भागातली, विशेषतः: उबुद आणि आजूबाजूच्या डोंगराळ भागातली, सफर म्हणजे डोळ्यांना केवळ मेजवानीच... कोंकणाची हमखास आठवण करून देणारी...


वाटेतल्या एका चौकातले शिल्प

बालीतील निसर्ग व समाजजीवन एकमेकाला इतके पूरक आहेत आणि एकमेकात अकृत्रिमरीत्या इतके बेमालूम मिसळून गेलेले आहेत की एकदा शहरी भागांच्या बाहेर पडलो की त्यांना वेगळे करणे शक्य होत नाही... लोक जंगलात-निसर्गात राहतात की जंगलाने-निसर्गाने लोकवस्त्यांत शिरकाव केला आहे हा प्रश्न पडावा अशीच काहीशी अवस्था आहे.


याचाच प्रत्यय देणारे हे रेस्तराँ...


रेस्तराँचे प्रवेशव्दार

रेस्तराँचा परिसर

स्वागतकक्ष

आणि ही जेवणाच्या खोलीची जिवंत नैसर्गिक पार्श्वभूमी !...

अश्या ठिकाणी जेवायचे विसरायला होईल, तर जेवणाचे फोटो काढायला विसरलो (खरोखरच विसरलो !) तर त्यात आश्चर्य वाटू नये !




जेवणानंतरचा सगळा वेळ बालीच्या मानवनिर्मित कलाकुसरींसाठी प्रसिद्ध असलेल्या काही गावांना भेट देण्यासाठी राखून ठेवलेला होता. यातली तीन जरा जास्त प्रसिद्ध आहेत. उबुद चित्रकारांचे; मास लाकडावरचे कोरीवकाम करणार्‍या कलाकारांचे; तर चेलुक धातूकाम करणार्‍या (विशेषतः: चांदी आणि सोन्याचे दागिने घडविणार्‍या) कलाकारांचे गाव आहे. या प्रत्येक गावात त्या त्या प्रकारच्या कलाकारांची दुकाने आणि प्रदर्शने आहेतच, पण त्यांच्या कार्यशाळांत जाऊन त्यांचे चाललेले कामही जवळून पाहता येते.

मास येथील एका प्रदर्शनातल्या काही कलाकृती...


मुखवटे


बाहुल्या


गरूडावर बसलेला विष्णू आणि ड्रॅगन



गणेश आणि सरस्वती

 या प्रदर्शनातून बाहेर पडता पडताच पावूस सुरू झाला होता आणि पुढे त्याचा जोर वाढतच राहिला. उबुदमधिल एका चित्रप्रदर्शनापर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस धो धो पडायला सुरुवात झाली होती. खूप पावसाने वीजही गेली होती (भारताची आठवण झाली !). "आता काय पर्यटक येणार?" असा विचार करून प्रदर्शनाचा व्यवस्थापक त्याला कुलूप लावून निघून गेला होता. पण कार्तिकने त्याचे कौशल्य वापरून शेजारच्या घरातून व्यवस्थापकाला शोधून आणून प्रदर्शन उघडायला लावले. विजेच्या येण्या-जाण्याच्या खेळात हे चित्रांचे प्रदर्शन आम्ही बघितले.

ही त्याची थोडीशी झलक...


प्रदर्शनातून बाहेर पडलो तरी पावसाचा जोर कमी होण्याचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने चेलूकला जाण्याचा विचार सोडून हॉटेलवर परतलो.

(क्रमश: )

आजची सकाळ जराशी आळसावलेली होती. कारण आज बालीतला गालुंगन नावाचा एक मुख्य सण होता आणि त्यानिमित्त कार्तिकला देवळात जायचे होते. त्यासाठी सकाळी अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत सुट्टी मागितली होती. बालीतल्या सर्वात मोठ्या सणासाठी मागितलेल्या दोनतीन तासांच्या मोकळिकेला नाही म्हणणे कठीण होते. त्यानेही उरलेल्या वेळाचे नीट नियोजन करून ठरवलेली सगळी आकर्षणे पुरी करण्याचे आश्वासन दिले होते.

तरीसुद्धा सहलीवर असताना सकाळी उशीरापर्यंत नुसते झोपून राहणे जरा कठीणच होते. जराशी उशीराच न्याहारी केली तरी दोन एक तास जमेला होते. त्यामुळे रिसॉर्टच्या आवारात आणि आजूबाजूला फेरी मारायला बाहेर पडलो.

तेव्हा केलेल्या कॅमेऱ्याच्या क्लिकक्लिकाटीपैकी काही...


रिसॉर्ट : ०१


रिसॉर्ट : ०२


रिसॉर्ट : ०३


रिसॉर्ट : ०४


रिसॉर्ट : ०५


रिसॉर्ट : ०६


रिसॉर्ट : ०७ : रक्षक


रिसॉर्ट : ०८ : जवळच्या रस्त्यावर आम्हाला धनुष्यबाण विकत घेण्याची गळ घालणारा एक फेरीवाला

फिरायला निघण्या अगोदर आपण जरा गालुंगन या बालीच्या सर्वात मोठ्या सणाची माहिती घेऊया.

गालुंगन

बालीची पारंपरिक दिनदर्शिका २१० दिवसाची आहे. गालुंगन हा बालीचा सर्वात महत्त्वाचा सण अर्थातच दर २१० दिवसांनी येतो. या सणात धर्माचा अधर्माविरुद्ध झालेला विजय साजरा केला जातो. तसेच या सणात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर भेटीस येतात असा समज आहे. या सणात मुख्य देव अचिंत्य याची आणि पूर्वजांच्या आत्म्यांची यथासांग पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण केला जातो. संपूर्ण बालीमध्ये हा सण आपल्याकडच्या दिवाळीसारखा मोठ्या थाटामाटाने साजरा जातो. मुख्य दिवसाच्या तीन दिवस अगोदरपासून ते अकरा दिवस नंतरपर्यंत काहीना काही समारंभ साजरे केले जातात. त्यांचे वेळापत्रक असे असते:

३ दिवस अगोदर : पेन्येकेबान : केळ्याच्या खास पदार्थांचा नैवेद्य
२ दिवस अगोदर : पेन्याजान : जाजा नावाच्या केकसारख्या दिसणार्‍या तळलेल्या भाताच्या पदार्थाचा नैवेद्य
आणि धार्मिक पठण
१ दिवस अगोदर : पेनांपहान : डुक्कर आणि कासवांचा बळी देऊन त्यांच्या मांसाची मेजवानी
मुख्य दिवस : गालुंगन : वाजतगाजत फुले व प्रसाद घेऊन देवळात जाऊन पूजा आणि प्रार्थना
१ दिवस नंतर : मानिस गालुंगन : नातेवाइकांच्या भेटीगाठी
१० दिवस नंतर : कुनिंगन : प्रार्थना आणि पुजा. या दिवशी पितरे स्वर्गात परततात.
११ दिवस नंतर : मानिस कुनिंगन : मौजमजा आणि करमणूकीचे कार्यक्रम

लोक गटागटाने आणि काही वेळेस मोठ्या समारंभाने देवळांत जाताना दिसतात. काहीजण त्यांचे खास ठेवीतले पारंपरिक पोशाख घालून फिरत असतात. एकंदरीत सर्व बालीभर आनंदाचे वातावरण असते.

या सणाचा एक भाग म्हणून आपल्याकडे दसर्‍याला उभारल्या जातात तश्या पण त्यापेक्षा बर्‍याच वेगळ्या आणि खूपच जास्त कलाकुसर असलेल्या "पेंजोर" नावाच्या बांबूच्या गुढ्या घरोघरी चढाओढीने उभारल्या जातात. पेंजोरमध्ये देव व पितरांसाठी प्रसाद व फुले ठेवण्यासाठी खास व्यवस्था असते. श्री जय कुसुनु या बाली धर्मग्रंथाप्रमाणे पेंजोर हे पवित्र अगुंग पर्वताचे प्रतीक आहे. जंगलाने झाकलेले पर्वत पाणी साठवतात आणि ते नद्यांच्या रूपाने वर्षभर मानवाला देतात. म्हणून पेंजोर हे पर्वतांप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचे प्रतीकही समजले जाते.

असा हा काहीसा आपल्याकडच्या गुढीपाडवा आणि पितृपक्षाचा संगम असलेला बालीचा सण आम्हाला अनपेक्षितपणे बंपर बोनस म्हणून पाहायला मिळाला !

===================================================================

चला, इतक्यात साडेअकरा वाजले देखील, कार्तिक पण आला आणि आपली फिरायला जायची वेळ झाली...

बाहेर पडल्या पडल्या या पहिल्या पेंजोरने दर्शन दिले... आणि असे दर्शन दिले म्हणून सांगू... गाडी थांबवून फोटो काढावाच लागला...


पेंजोर : गुढी हा शब्द खूप तोकडा आहे हे वाटायला लावणारी बालीची गुढी

सगळी बाली गालुंगन साजरी करत होती. सगळीकडे सोहळ्याचे वातावरण होते. दारोदारी पेंजोर... वेगवेगळ्या कलाकुसरीने सजलेल्या... सगळ्या एकमेकांशी स्पर्धा करत होत्या... कोणतीही एक पेंजोर दुसरीसारखी नव्हती...

......

......

......

शहराबाहेर पडल्यावर दिसणार्‍या निखळ निसर्गसौंदर्याला अजून जास्त झळाळी देणे शक्य आहे का ?...

खरेच शक्य आहे का ?...

हा प्रश्न मनात येण्याअगोदरच मधून मधून समोर आलेल्या गावांच्या दर्शनाने त्याचे उत्तर आपोआप मिळाले...

घरांशेजारी असणारी देवळेही आज रंगीबेरंगी कपड्यांनी आणि सरोंगनी सजवलेली दिसत होती...

काही घरांसमोर कुटुंबातले सदस्य कोंडाळे करून बहुतेक, "आपली पेंजोर शेजार्‍यांच्या पेंजोरपेक्षा वरचढ दिसायला अजून काय करायला पाहिजे बरे?" असे खलबत करत होते...

डोक्यावर प्रसाद व पूजेच्या साहित्याच्या टोपल्या घेऊन महिलावर्ग लगबगीने देवळांकडे निघाला होता...

पुरुषही मजेत गप्पा मारत देवळाच्या दिशेने रमतगमत निघाले होते. वाटेतले फुलाफळांचे दुकानदार त्यांना अडवून व्यवसायाची पर्वणी साधून घेत होते...

स्थानिक सांस्कृतिक मंडळांचे सदस्य त्यांचे पारंपरिक गणवेश पेहरून, छत्रचामरांसह, वाद्ये वाजवत मिरवणुकीने देवळाकडे निघाले होते...

साहजिकपणे या सगळ्या सोहळ्यात मुलांचा उत्साह ओसंडून चाललेला होता...

एक आजोबा कडेवर घेतलेल्या नातवाला व्हरांड्यात उभे राहून कौतूकाने हा सगळा सोहळा दाखवत होते...

बालीमध्ये देवांना आणि पितरांना बांबूच्या आणि केळीच्या पानांच्या बनवलेल्या पसरट परड्यांमध्ये ठेऊन प्रसाद आणि फुले वाहतात...

अनपेक्षितपणे पुढे आलेल्या या सर्वात मोठ्या सणाने बालीची आठवण सुंदर कोरीवकामासारखी मनावर कायमची कोरून ठेवली आहे.

अश्या सोहळ्याची हवा पर्यटकांना लागणार नाही तर मग अजून काय होणार? वाटेत एका ठिकाणी थांबून आम्हीही स्थानिक टोप्या खरेदी केल्या आणि त्या घालून अस्सल बालीकर बनून गालुंगनच्या सोहळ्यात सामील झालो...


श्री इस्पीकचा एक्का बालीकर ;)

(क्रमश: )

पुरा उलुन दानू ब्रतान

हे बालीतील प्रमुख शैव मंदिर समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर असलेल्या ब्रतान सरोवराच्या काठावर वसलेले आहे. तेथील अकरा मजली पॅगोडासारखी इमारत (पेलिंग्गी) शिवपार्वतीच्या नावे बांधलेली आहे. या मंदिरात एक बौद्धमूर्तीही आहे. बालीच्या संस्कृतीतील जलदेवता दानूचेही मंदिर तेथे आहे आणि यावरून या मंदिराचे नाव पडले आहे. हे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान तर आहेच, पण तसेच ते बालीच्या प्राचीन सुबक जलव्यवस्थेचे एक महत्त्वाचे केंद्रही आहे. १२०० मीटर उंचीवर असल्याने येथे वर्षभर थंड वातावरण असते आणि उष्ण कटिबंधात असल्याने अचानक धुवांधार पाऊस पडून ते केव्हाही अधिकच थंडगार होऊ शकते.

नेहमीच्या परंपरेप्रमाणे येथे असलेले दुभंगलेले मेरुव्दार आपले स्वागत करते...

चला तर मंदिराच्या आवारात फेरफटका मारू या...


बाहेरच्या आवारातली देवळे

.


भाविकांच्या आरामासाठी मंडप


मंदिराच्या अंतर्भागातील देवळे

आवारात थोडा वेळ फिरून झाले नाही तोच पाऊस सुरू झाला...


पुरा उलुन दानू ब्रतानचे कोरी अगुंग

आजूबाजूच्या पर्वतांवर आणि ब्रतान तलावावर तरंगणार्‍या ढगांच्यामुळे इथले वातावरण नेहमीच गुढगंभीर भासते. हा परिसर इतका सुंदर आहे की इथे येणारा पर्यटक, मग तो आस्तिक असो वा नास्तिक, नक्कीच भारून जातो. पूर्वीच्या काळी या मंदिराची पॅगोडासारखी दिसणारी (पेलिंग्गी) इमारत मूळ भूभागाला जोडून असलेल्या जमिनीवर होती. पण जमिनीची झीज होऊन तो भूभाग किनारपट्टीपासून वेगळा झाल्याने आता ती इमारत सरोवरातील एका छोट्या बेटावर आहे...


सरोवरातल्या बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी

सरोवराकाठच्या देवळाच्या परिसरात बालीच्या परंपरेला अनुसरून सुंदर बाग केलेली आहे...

जरी पाय निघायला तयार नव्हते तरी पावसामुळे तेथून निघणे भाग पडले.

वाटेत डोंगराळ प्रदेशातल्या एका रेस्तराँमध्ये जेवण घेतले. बाली जितकी तिच्या चवदार जेवणासाठी लक्षात राहिली आहे त्यापेक्षा जास्त तेथील रेस्तराँच्या जेवणाच्या कक्षांच्या एकाहून एक वरचढ मनमोहक नैसर्गिक पार्श्वभूमींमुळे लक्षात राहिली आहे. वानगीदाखल दरीच्या टोकावर असलेल्या इथल्या रेस्तराँच्या भोजनकक्षातून दिसणारा हा निसर्गाचा (अजून एक) नजारा पहा...

पुरा तमान आयुन

पोटपूजा आटोपून आम्ही बालीच्या मध्यभागातले पुरा तमान आयुन हे बालीच्या राजघराण्याचे मंदिर पाहायला निघालो. हे मंदिर इ स १६३४ मध्ये मेंगवी राजघराण्यातील राजाने बांधले. राजमंदिर असल्याने अर्थातच हे मंदिर आखीवरेखीव पण तरीही निसर्गाला कोठेही उगाचच कृत्रिमतेचा स्पर्श न होवू देत बांधलेले आहे. हे मंदिर नदीत असलेल्या एका बेटावर आहे. या सर्व मंदिरसंकुलाची बांधणी भवसागरात तरंगणार्‍या पवित्र मेरू पर्वताचे प्रतीक म्हणून केलेली आहे. बेटावर मंदिराच्या चारी बाजूला पाण्याने भरलेला खंदक आहे. पिरॅमिडसारखे एका वर एक बागांचे चौथरे आहेत आणि त्यातल्या सर्वात वरच्या चौथर्‍यावर मंदिराचा मुख्य भाग आहे. त्यामुळे याचे "पुरा तमान आयुन" म्हणजेच "पाण्यात असलेल्या बागेतले मंदिर" हे नाव सार्थ होते.

आम्ही गेलो तेव्हा सतत पडणार्‍या पावसामुळे मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचा एक भाग खचला होता. नशिबाने अर्धा रस्ता चांगल्या अवस्थेत असल्याने बाली पोलिसांच्या देखरेखीखाली मंदिराकडे जाणारी पायी वाहतूक चालू होती. पाऊस बर्‍यापैकी हजेरी लावत असला तरी बालीकारांची गालुंगन निमित्ताने मंदिराकडे जाणारी गर्दी काही कमी नव्हती. आम्हीही त्या गर्दीत मिसळून गेलो.

नदीवरचा पूल पार करून आम्ही मंदिर असलेल्या बेटावर पोहोचलो...

मंदिराच्या भोवतालच्या खंदकावरचा छोट्या पुलाच्या टोकालाच देवळाचे सर्वात बाहेरचे मेरू पर्वताचे रूपक असलेले चंडी बेंतार प्रकारचे व्दार लागते...

चंडी बेंतार द्वारातून आत गेल्याबरोबर आपण मंदिराच्या भव्य प्रांगणात प्रवेश करतो...

चला मारूया फेरी या देवळाच्या आवारात...


मंदिराचे बाहेरचे आवार


कोरी अगुंग (मंदिराच्या अंतर्भागाचे प्रवेशव्दार)


मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०१


मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०२


मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०३


मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०४


मंदिराच्या अंतर्भागाची फेरी : ०५


मंदिराच्या बाजूच्या गावातले एक कारंजे

सगळीकडे उत्सवाचे वातावरण होते. देवळाबाहेर गालुंगन निमित्त अगदी भारतात असावी अशी यात्रा भरली होती...


पुरा उलुन दानू ब्रतान जवळची गालुंगन यात्रा

पुरा ताना लोत

बालीच्या खवळलेल्या समुद्रकिनार्‍याजवळ 'ताना लोत' नावाचा एक खडक आहे. त्यावर 'पुरा ताना लोत' हे बालीतील अतीपवित्र मानले गेलेल्यांपैकी एक मंदिर आहे.

या मंदिरच्या स्थापनेमागे एक मनोरंजक कथा आहे. सोळाव्या शतकात बारथा (Baratha, Bharatha, भरत) नावाचा एक रक्षकाचे काम करणारा माणूस या किनापट्टीवर फिरायला आला असताना या बेटाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि तेथेच राहू लागला. तो जवळपासच्या कोळी लोकांच्या नजरेस पडला आणि ते त्याला अन्न, फळे, इ देऊ लागले. ही कथा ऐकून तेथे आलेल्या निरर्थ नावाच्या ऋषींनाही ती जागा खूप आवडली आणि त्यांनी त्या बेटावर एक रात्र वस्ती केली. नंतर त्यांनी कोळ्यांना तेथे समुद्रदेवतेचे मंदिर बांधायला सांगितले. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या महत्त्वाबरोबरच या मंदिरासंबद्धीत दंतकथांमध्येही अर्थातच भर पडत गेली आहे. त्यातल्या काही म्हणजे या देवळाभोवती विषारी समुद्रसर्पांचा सतत पहारा असतो आणि निरर्थ ऋषींच्या वस्त्रापासून तयार झालेला एक महाकाय सर्पराज या मंदिराचे रक्षण करतो.

बालीभोवतीच्या समुद्रात बेटावर अथवा समुद्रकिनार्‍यावर एकूण सात मंदिरे आहेत. या मंदिरांच्या जागा अश्या आहेत की कोणत्याही एका मंदिरातून त्याच्या दोन्ही बाजूंची मंदिरे डोळ्याने दिसू शकतात. अश्या रितीने बालीच्या संपूर्ण किनार्‍यावर लक्ष ठेवण्यास या सात मंदिरांच्या माळेचा प्राचीन काळापासून उपयोग होत आहे. म्हणजे या मंदिरांनी प्राचीन काळापासून बालीच्या केवळ धार्मिक जीवनातच नव्हे तर संरक्षण व्यवस्थेमध्येही मोलाची कामगिरी बजावली आहे.

खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या सतत होणार्‍या भडिमारामुळे ताना लोत बेटाच्या खडकाची सतत झीज होत असते. १९८० मध्ये जपानी सरकारने दिलेल्या १३ कोटी अमेरिकन डॉलरच्या मदतीतून या बेटाची आणि बालीतील इतर महत्त्वाच्या स्थळांची डागडुजी करण्यात आली. ताना लोत बेटाच्या आता दिसणार्‍या खडकाचा जवळ जवळ एक त्रितियांश भाग या प्रकल्पात जीर्णोद्धार केलेल्या कृत्रिम खडकाने बनलेला आहे !

त्याच्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे, वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे आणि सौंदर्यपूर्ण परिसरामुळे हे मंदिर बालीतील प्रमुख पर्यटक स्थळांपैकी एक झाले आहे. चला तर या फेरफटका मारायला या मनोहारी मंदिराचा...

मंदिराच्या वाटेवर हा आधुनिक बाली शिल्पकलेचा नमुना आपले स्वागत करतो...


मंदिराच्या वाटेवरचे एक आधुनिक कलाकुसरीचा नमुना असलेले प्रवेशव्दार


मंदिराच्या वाटेवरचे एक आधुनिक कलाकुसरीचा नमुना असलेले प्रवेशद्वार : जवळून


मंदिराचे मेरूद्वार


मंदिराचे समुद्रकिनार्‍यावरील पूजास्थान आणि पुजारी (ब्राच्मन)


समुद्रातले मुख्य मंदिर : ०१


समुद्रातले मुख्य मंदिर : ०२


समुद्रातले मुख्य मंदिर : ०३

सुरक्षेच्या कारणासाठी बेटावरच्या मूळ मंदिराला भेट देता येत नाही याबद्दल खूप वाईट वाटले. पण त्याचे दुरून झालेले दर्शनही काही कमी मोहक नव्हते.

या ठिकाणाला संध्याकाळी भेट दिल्यास तिथला नयनरम्य सूर्यास्तही पाहता येतो. तिन्ही बाजूंनी खवळलेला हिंदी महासागर, त्याच्या लाटांच्या सतत मार्‍याला तोंड देत निर्धाराने उभे असलेले बेट, अंधुक संधीप्रकाशात दिसणारे गूढगंभिर मंदिर आणि दूरवर समुद्रात डुबकी मारणारा सूर्य... केवळ अवर्णनीय देखावा...


पुरा तान लोत जवळचा सूर्यास्त

मंदिराच्या शेजारीच एक पंचतारांकित रिसॉर्ट आहे. तेथेही काँक्रिटच्या मनोर्‍यांचा अट्टहास न करता बालीच्या पार्श्वभूमीला साजेश्या इमारती बांधल्या आहेत...

मंदिराच्या बाजूच्या एका रेस्तराँच्या बाहेर हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे दिसले...

किनारपट्टीने पायवाटेवरून फिरून मंदिराला अनेक कोनांतून आणि मावळत्या सूर्याच्या अनेक छटांत पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. शेवटी तो सोन्याचा गोळा समुद्रात पूर्णपणे बुडून गेल्यावर झालेला काळोखच आपल्याला धक्के मारून तेथून बाहेर काढतो.

(क्रमश: )

बेटावरची अकरा मजल्यांची पेलिंग्गी पाहून माऊंट मेरु चे २००० वर्षापुर्वीचे एक चित्र जे हुबेहुब पार्टिकल अ‍ॅक्सलरेटरचे ब्लु प्रिंट सारखेच असल्याचे आठवले.
Mount Meru

पार्टिकल अ‍ॅक्सलरेटर

 चवथ्या दिवसाची सकाळ जरा उत्सुकतेतच उजाडली. कारण आज बालीचे पारंपरिक बारोंग लोकनाट्य बघायला जायचे होते. दोन दिवसापूर्वी पारंपरिक केचक नृत्यनाट्याने चकीत केले होते. म्हणून उत्सुकता अधिकच वाढली होती.

न्याहरी घ्यायला गेलो तर तेथे टेबलावर उभा असलेला हा गरूडराज समोर आला...

बाहेर पडून प्रवास सुरू झाला. सर्वसाधारण रस्त्यावरून जातानाही बालीचे निसर्गाशी असलेले निरागस नाते सतत पुढे येत राहिले...

बारोंग लोकनाट्य

बारोंग नाटकाच्या रंगमंदिरावर पोहोचलो. त्याच्या आवारातून फिरताना बालीच्या कलाकुसरीचे काही नमुने दिसले...

आम्ही वेळेवर पोहोचलो होतो. अगदी रोजच्या वापरातल्या वस्तू वापरून आणि सर्वसाधारण घराच्या अंगणात उभारला आहे असे वाटणारा पण तरीही आकर्षक दिसणारा रंगमंच होता. हळूहळू प्रेक्षकगण जमा होऊ लागला होता...

थोड्याच वेळात वाद्यवृंदही आपल्या जागेवर स्थानापन्न झाला. गंमत म्हणजे त्यांचा बसण्याच्या जागेला एक खराखुरा वृक्ष ढुशी देत होता. निसर्गाशी समरसता असून, असून नक्की किती असू शकेल याचा आपला अंदाज बाली पदोपदी सुखकारक रितीने चुकीचा ठरवत राहते ! ...

बालीच्या पौराणिक कथांत बारोंग हा सत्प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारा काहीसा सिंहासारखा दिसणारा दैवी प्राणी आहे. त्याविरुद्ध दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणारी रांगदा ही असुरांची राणी आहे. बारोंगमध्ये या दोन प्रवृत्तींचा चाललेला अनादी आणि अनंत झगडा नाटकाच्या रूपात प्रदर्शित केला जातो. कथेत रंग भरायला बारोंगच्या साथीला दोन माकडे असतात आणि रांगदाच्या बरोबर दोन राक्षसी दासी असतात. हे सर्व नाट्य राजा, राणी आणि राजपुत्र यांच्या जीवनात रांगदाने चालवलेली असुरी ढवळाढवळ आणि बारोंगची त्याना होणारी मदत या मुख्य सुत्रावर बेतलेले आहे. त्यामध्ये "राजावर मुलाचा बळी देण्याची वेळ येणे", "राजपुत्राच्या शिवभक्तीमुळे ऐन वेळेला शिवाने प्रकट होऊन त्याचे रक्षण करणे", इत्यादी भारतियांना सहजसाम्य वाटणारे प्रसंग आहेत. बालिनीज भाषेमध्ये होणारे हे लोकनाट्य प्रेक्षकांना नीट समजावे म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलेली त्याच्या संहितेची प्रत दिलेली असते. शिवाय मधून मधून इंग्लिशमध्ये केल्या जाणार्‍या टिप्पणीने लोकनाट्य समजायला काही अडचण पडत नाही. आकर्षक रंगीबेरंगी वेष, सुंदर नेपथ्य आणि मधून मधून असलेल्या विनोदी विरंगुळ्यामुळे हे लोकनाट्य बघायला खूप मजा येते.

चला तर, बघूया या लोकनाट्यातील काही क्षणचित्रे...


बारोंग

या लोकनाट्याचे मला वाटलेले विशेष म्हणजे जरी त्याची कथा चांगल्या-वाईटाच्या झगड्याबद्दल असली तरी ती "चांगल्याचा विजय, वाईटाचा पराजय आणि मग सगळे आलबेल" अश्या नेहमीच्या बाळबोध कल्पनाविलासाने संपत नाही. रांगदाला त्याच्या वाईट वागण्याचा पश्चात्ताप होतो आणि त्याचा बारोंगच्या हाती वध होतो... पण रांगदाचा एक सेवक त्याची जागा घेतो आणि चांगल्या-वाईटाचा झगडा अनंत कालासाठी चालूच राहतो अश्या वास्तविक संदेशाबरोबर हे लोकनाट्य संपते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या लोकनाट्यातील ही प्रगल्भता चकित करून जाते !

बाली सफारी पार्क

बारोंग लोकनाट्याची मजा मनात घोळवत बालीच्या नयनरम्य परिसरातून आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाकडे सुरू झाला. सफारी पार्क म्हणजे प्राणिसंग्रहालयापेक्षा जास्त काय असू शकते अश्या विचाराने रुपरेखेत हा कार्यक्रम आम्ही जरासा मागेच सरकवला होता. पण नंतर तो चुकवला नाही त्याबद्दल स्वत:चे आणि कार्तिकचे आभार मानले. शिवाय पार्कच्या आवारात असलेल्या बालीतल्या एका खास आकर्षणामुळे ती भेट फारच संस्मरणीय झाली ते वेगळे. ते खास आकर्षण पुढच्या भागात येईलच. बाली सफारी पार्कचे संपूर्ण नाव "बाली सफारी आणि मरीन पार्क" असे आहे... "मरीन" भाग केवळ नावापुरताच आहे, पण सफारी भाग मात्र जागतिक तोडीचा आहे.

येथे प्राणिसंग्रहालयाबरोबरच संपूर्ण कुटुंबासह मजेत वेळ घालविण्यासाठी अनेक मनोरंजक क्रीडाविभाग, जलक्रीडा विभाग, प्राण्यांबरोबर खेळ / सफारीसाठी विभाग, प्राणिनाट्यमंच, राहण्याची सोय असणार्‍या झोपड्या / बंगले आणि या सगळ्याची मजा घेत असताना लागणार्‍या भुकेची चमचमीत सोय पाहणारी अनेक रेस्तराँ आहेत.

इथल्या प्राणिसंग्रहालयाचा विशेष म्हणजे इथे प्राणी विशाल जंगलसदृश्य भागांत आरामात मोकळे राहतात आणि त्यांना बघायला येणार्‍या पर्यटकांना बंदिस्त बसमधून फिरून त्यांचे दर्शन करावे लागते. जगभरचे प्राणी येथे त्यांच्या मूळ स्थानाच्या खंडांची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागात राहतात. मार्गदर्शकासह असलेली बससेवा आपल्याला सगळ्या प्राणिसंगहालयाचा फेरफटका मारून आणते. एक भाग प्राण्यांची खास प्रदर्शने आणि प्राण्यांवर बसून करण्याच्या सफारीसाठी राखून ठेवलेला आहे. रात्रीच्या, शैक्षणिक आणि प्राणिसंरक्षणासंबद्धी खास सफारीही असतात. एकंदरीत केवळ "प्राणिसंग्रहालयाची चक्कर" असे नसून "दिवसभर प्राणी-पक्षांच्या सहवासात मजेत दिवस घालवायचे आणि त्याबरोबरच काही माहितीची शिदोरी बरोबर घेऊन परतायचे ठिकाण" असे या पार्कचे स्वरूप आहे.

चला तर फेरफटका मारायला या सफारी पार्कमध्ये. सर्वात प्रथम आम्ही प्राणिनाट्यगृहाकडे मोर्चा वळवला...


प्राणी-पक्षी-नाट्यगृह


सर्पकन्या


ओरांगउटान आणि त्याची मैत्रीण


खास मैत्रिणीने सांगितल्यावर त्या ओरांगउटानने मिनीटाभरात अख्खा नारळ सोलून दिला तर नवल काय !


सुमात्राच्या हत्तींचे खेळ


पांढरा वाघ


अस्वल


सुमात्राचे वाघोबा


हिप्पो


विल्डsबीस्ट / नू


आरामात निगुतीने बसून पावसाचा आनंद लुटणारे सिंहकुटुंब


वेगवेगळ्या रंगांचे जिराफ


झेब्रा


तीनरंगी झेब्रा


आफ्रिकन खिल्लार

"पुरा सफारी" या नावाप्रमाणेच या पार्कच्या एका भागात हिंदू उपासना करण्यासाठी मंदिर आहे...


पुरा सफारीचे कोरी अगुंग

सफारी पार्कच्या संस्थळावरील चलत्चित्रफीत...


बाली पार्कमधल्या गणेश पार्क नावाच्या विभागात "बाली थिएटर" आहे. त्याच्या प्रवेशव्दाराजवळ कला आणि शास्त्र यांच्या देवतेची (हे त्यांचे वर्णन आहे) ८ मीटर उंचीची बैठी मूर्ती आहे...


गणेश पार्कच्या प्रवेशव्दाराजवळील गणेशमूर्ती

बाली थिएटरमध्ये असलेल्या भव्य मंचावर "बाली अगुंग" नावाचे महानाट्य सादर केले जाते. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ...

(क्रमश: )

बाली सफारी पार्कची खरी मजा घ्यायची तर पार्कमधील हॉटेलमध्ये दोनतीन दिवस राहून रात्रीची सफारी आणि बाली थिएटरमधील कार्यक्रमासह सगळी आकर्षणे पाहायला हवीत. पण आमच्या रूपरेखेत ते बसण्यासारखे नव्हते. शिवाय हा पार्क आणि त्यातल्या बाली थिएटरचा तर आमच्या भारतीय सहल कंपनीला पत्ताच नव्हता ! ऐन वेळेला आमच्या प्रवासाच्या रूपरेखेत या गोष्टी सामावून घेण्याच्या आमच्या इच्छेला पुरी करण्याचे श्रेय आमच्या मार्गदर्शकाला, कार्तिकला, जाते.

महानाट्य बाली अगुंग

"बाली अगुंग" या नाट्यामध्ये बालीचा इतिहास व दंतकथा यावर बेतलेल्या नाटकसंहितेचे नृत्य, संगीत, बालीच्या कठपुतळी बाहुल्या, चित्ताकर्षक वेशभूषा आणि जागतिक दर्जाचे नेपथ्य व प्रकाशयोजना वापरून अवर्णनीय सादरीकरण केले जाते.

स्वागतकक्ष

१२०० प्रेक्षकांना बसण्याची आरामदायी सोय असलेल्या या रंगमंदिराचा स्वागतकक्ष आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून त्याचा उपयोग छोटेमोठे स्वागतसमारंभ करण्यास तसेच नाटकांच्या अगोदर आणि मध्यांतरात प्रेक्षकांना धक्काबुक्की न करता आरामात पेयपान-अल्पोपाहाराचा आस्वाद घेता येईल इतका मोठा आहे. त्याला लागून असलेली बाग मनोहर आहे असे बालीत सांगणे म्हणजे व्दिरुक्तीच होईल...

......
स्वागतकक्ष : ०१ व ०२ (जालावरून साभार)

......
स्वागतकक्ष : ०३ व ०४ (जालावरून साभार)


स्वागतकक्षातला ड्रॅगन

रंगमंच

येथील रंगमंच ८० मीटर लांब, ४० मीटर रुंद आहे. याच्या उंचीबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे ती १५-२० मीटर किंवा जास्त असावी....


विशाल रंगमंच (जालावरून साभार)

रंगमंचावर वेगवेगळे आश्चर्यकारक देखावे निर्माण करण्यासाठी असलेल्या अनेक साधनांत ५०० किलोपर्यंतच्या वजनाच्या हालत्या-सरकत्या देखाव्यांतील वस्तू चपळाईने हालवण्यासाठी अनेक कायमस्वरूपाच्या यांत्रिक व्यवस्था, धुके-धूर तयार करणारी यंत्रे, वेगवेगळ्या ७५ दिव्यांची यंत्रणा, सायक्लोरामा, बॅकड्रॉप फ्रेम्स, उत्कृष्ट ध्वनीयंत्रणा, इ चा त्यात समावेश आहे. जमीन दुभंगून अचानक वर येणार्‍या व्यक्ती-वस्तूंच्यासाठी रंगमंचाच्या तळात तीन खास छुपे दरवाजे आहेत.

खास उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे रंगमंचासमोर पूर्ण लांबीचा आणि ४-५ मीटर रुंदीचा पाण्याने भरलेला खंदक आहे. त्याचा उपयोग काही प्रवेशांत गावाच्या नदीतीरावरचे प्रसंग व खर्‍याखुर्‍या नौकांसह नौकाविहाराचे प्रसंग रंगविण्यास केला जातो.

कलाकार

येथे होणार्‍या बाली अगुंग नावाच्या महानाट्याचा प्रयोगात १५० मानवी कलाकार, बालीच्या पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांचे कलाकार, हत्ती आणि इतर प्राणी काम करतात

कथा

लोकप्रिय राजा श्री जयपंगुस (११७९-११८१) आणि त्याची कांग चिंग वी ही चिनी वंशाची राणी यांची प्रेमकथा बालीचे महाकाव्य समजले जाते. ही मूळ कथावस्तू बालीच्या निसर्गाच्या, संस्कृतीच्या, सामान्य जनजीवनाच्या आणि नेत्रदीपक राजेशाही झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कलात्मक रितीने सादर केली जाते. अनेक भव्य, चित्ताकर्षक आणि स्वप्नवत प्रवेशांनी हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवते आणि अनेकदा आश्चर्याने आ वासायला लावते.

बाली प्राचीन काळापासून त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच ते जलव्यापाराचे महत्वाचे केंद्रही होते.
बालीचा राजा श्री जयपंगुस बालीला भेट देणार्‍या एका चिनी व्यापार्‍याच्या कांग चिंग वी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नाटकातला चिनी जहाजाचा बालीच्या बंदरात प्रवेश आणि राजेशाही लग्नसमारंभ आपल्याला त्या काळाचे खरे दर्शन देऊन जातात. राजा राणीसाठी खास नगरी उभारतो आणि तेथे राजधानी हलवतो. मात्र त्यांच्या सुखी प्रेमकथेला गालबोट लागते. अनेक वर्षे जाऊनही राज्याला वारस मिळत नाही. निराश झालेला राजा मोठ्या जलपर्यटनास बाहेर पडतो. त्याचे जहाज प्रचंड वादळात सापडते आणि तो विचित्र प्राण्यांनी भरलेल्या एका अनोळखी जादुई बेटावर जाऊन पडतो. तेथे तो मन:शांतीसाठी तपस्या करू लागतो. जलदेवता दानूच्या आगमनाने त्याची तपश्चर्या भंग होते. देवी दानूच्या प्रेमात पडून राजा तिच्याशी लग्न करतो आणि तेथेच राहू लागतो. त्यांना एक मुलगा होतो.

अनेक वर्षे वाट पाहून राणी (कांग चिंग वी) राजाच्या शोधाला बाहेर पडते. तिला राजा आणि दानू त्यांच्या मुलासह सापडतात. राणी रागावून तिच्या सैनिकांना त्यांच्यावर हल्ला करायला सांगते... त्यांत अनेक विचित्र प्राणी आणि नैसर्गिक आपत्ती त्यांचे योगदान मिळून युद्ध अधिकच भिषण होते. राजाच्या पूर्वायुष्याचे सर्व सत्य पुढे आल्याने रागावून आपली दैवी ताकद वापरून देवी दानू राजा आणि राणीचे दगडी पुतळ्यांत रूपांतर करते. मात्र त्यानंतर तिचा राग शांत झाल्यावर बालीच्या लोकांची विनंती मान्य करून ती राजपुत्राला गादीवर बसवून राज्यकारभार सुरू करते.

अशी ही काहिशी ऐतिहासिक आणि काहिशी दंतकथा असलेली पण बालीच्या सामाजिक-धार्मिक-सांकृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली कहाणी आहे. राजा-राणीचे आत्मे "बारोंग लादुंग" नावाच्या सिंहासारख्या दिसणार्‍या पवित्र दैवी प्राण्याच्या रूपात आजही बालीचे रक्षण करत असल्याची बालीच्या लोकांना खात्री आहे. राजा, राणी आणि देवी दानू हे बालीत आजही वरिष्ठ देवतांपैकी मानले जातात. बालीमध्ये दरवर्षी (२१० दिवसातून एकदा) बारोंग लादुंगची मिरवणूक काढली जाते. देवी दानू बातूर सरोवराची जलदेवता आणि सुपीकतेची व धनधान्याची देवता मानली जाते.

रंगमंदिरात फोटो काढायला मनाई आहे. परंतू या महानाट्याच्या जालावरून साभार जमा केलेल्यांपैकी काही फोटो येथे दिल्याशिवाय राहवत नाही. त्यांच्यावरून ह्या नाट्याची पूर्ण कल्पना येणार नाही. पण त्याचे शब्दात वर्णन करणे कसे शक्य नाही याची थोडीशी कल्पना जरूर येईल.

कलाकारांचे पोशाख


कलाकारांचे पोशाख

......
राजा, त्याच्या उजवीकडे राणी वी आणि डावीकडे देवी दानू.....................राजा आणि राणी


जलदेवता दानू

नाटकातील क्षणचित्रे


राजाचा दरबार


चिनी व्यापारी आणि त्याच्या मुलीचे आगमन


राजा त्याच्या प्रेयसीचे स्वागत करताना... दोन खर्‍या हत्तींच्या सलामीसह


विवाहानंतरचा राजदरबार


समुद्रप्रवासात आलेल्या वादळात विचित्र जलचरांशी सामना करणारा राजा


अनोळखी बेटावरील विचित्र प्राण्यांशी सामना करणारा राजा


देवी दानूचे आगमन : ०१


देवी दानूचे आगमन : ०२


देवी दानू, राजपुत्र, पांढर्‍या कपड्यातले राजाराणीचे आत्मे आणि जनता... नवीन राज्यकारभाराची सुरुवात... पार्श्वभूमीवर पवित्र बातूर पर्वत

या महानाट्याचा सोहळा पाहणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो. बालीला जाऊन तो न अनुभवणे कल्पनेपलीकडचे आहे.

इतर काही थोडेसे... इकडचे तिकडचे

बालीच्या शिल्पकलेचे अजून काही नमुने

......
दोन खास संरक्षक असुर

......
राम .......................................................कुंभकर्ण

बाली अजून काही गोष्टींकरिता जगप्रसिद्ध आहे. अपुर्‍या वेळेमुळे त्या सर्व बघणे शक्य नव्हते अथवा त्या बघण्यासाठीची वेळ जुळून आली नाही. पण त्यांच्या उल्लेखाशिवाय बालीचे वर्णन अपुरे राहील म्हणून त्यांचा थोडक्यात उल्लेख...

बारोंगची मिरवणूक


(जालावरून साभार)

दहनविधी

हा सोहळा अर्थातच सुखकारक नाही आणि त्याकरिता बालीला प्रवासाला कोणीही जात नाही. पण कर्मधर्मसंयोगाने जर कोण्या खास माणसाच्या संदर्भात हा सोहळा बघायला मिळाला तर तो एक जगावेगळा अनुभव नक्कीच असेल...


(जालावरून साभार)

बालीचे समुद्रकिनारे

बाली सुंदर आणि सर्फिंगसाठी जगप्रसिद्ध असलेले समुद्रकिनारे आणि समुद्रकिनार्‍यावरील रिसॉर्ट यासाठीही प्रसिद्ध आहे. अपुर्‍या वेळेमुळे माझ्या सहलीच्या प्राधान्यक्रमात ते बरेच खाली असल्यामुळे मी त्यांना काट दिली होती. पण वेळ आणि आवड असल्यास यांचा आनंद जरूर घ्यावा...

......
(चित्रे जालावरून साभार)

इनमिन चार दिवसांचा सहवास... पण, विमान उडाले आणि बाली सोडताना मनात सहजच वियोगाचे दु:ख साठले होते...

बाली हे इंडोनेशियाच्या १७०० पेक्षा जास्त बेटांपैकी तुलनेने एक लहान बेट. पण ते जागतीक स्तराच्या आकर्षणांच्या यादीमध्ये खूप वरच्या ठिकाणी आहे. खरी बाली बघायची असली तर, तिची सहल करायची नसते... पूर्णपणे झोकून देऊन, बालीनीज बनून, बाली अनुभवायची असते. मग बाली तुमच्या मनात कायमचे घर करून राहते... सतत आठवत राहते... परतण्यासाठी सतत खुणावत राहते !

(समाप्त)

 

बाली पर्यटन दृष्ट्या सुधारलेले आहे. तेथे स्वस्तापासून ते पंचतारांकित हॉटेल-रिसॉर्ट्स आणि वाहतूकव्यवस्था उपलबध आहे. त्यामुळे होणारा खर्च प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे बराच कमी-जास्त होऊ शकतो. स्थानिक आकर्षणांची संख्या आणि राहण्याचे दिवस इ. प्रमाणे खर्च वरखाली होतो हेवेसान. विमानप्रवासाचा खर्चही सहल करण्याच्या वेळेप्रमाणे बराच बदलू शकतो. शिवाय तुमच्या ठरवलेल्या वेळेस खास ऑफर्स चालू असल्यास खर्चात बरीच बचत होऊ शकते.

सुदैवाने, आपल्या इच्छेप्रमाणे (वेळ, दिवस, हॉटेल, इ) सहल केल्यास किती खर्च होईल ते प्रत्येकाने जालावरून शोधून काठणे सहज शक्य आहे. माझ्या माहितीची काही संस्थळे खाली देत आहे...

yatra.com

MakeMyTrip.com

windmillholidays.in

बाली टुरीझमच्या या संस्थळाला जरूर भेट द्या.

जालावर अजूनही बरीच संस्थळे सापडू शकतील. निर्णय पक्का करण्याअगोदर त्यांच्यवरही जरूर नजर टाका.

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...