चीनी दुतावासाच्या संस्थळावर application form व इतर सर्व माहिती आहे. फॉर्म डाऊनलोड करता येतो... दर देशाप्रमाणे थोडा फरक असतो असे दिसले, शिवाय version numbers होते. तेव्हा ज्या देशातल्या चीनी दुतावासात अर्ज करणार त्याच दुतावासाच्या संस्थळवरुन माहिती व फोर्म घेणे हिताचे आहे. तसेच खूप अगोदर माहिती जमा केली असल्यास जाण्याचे नक्की ठरल्यावर परत एकदा दुतावासाच्या संस्थळावर फेरी मारून सर्व ठीक असल्याची खात्री करून घ्या.
नंतरचाही अनुभव चांगला होता. मूळ ईटिनेररीमध्ये मी बरेच फेरफार केले, अर्थात त्यामुळे खिशावर दडपण आले. पण विचार असा की आपण काय परतपरत चीनला थोडेच जाणार, एकदा काय करायचे ते करून घ्या. तरीसुद्धा तिबेट राहिलेच. तेथील राजकीय परिस्थितीमुळे परदेशी प्रवाश्यांकरीता भेटीचे नियम कडक आहेत. कमीतकमी ५ जण, तेही एकाच देशाचे, एकाच ग्रुपने, एकाच वेळी आगमन-निर्गमन करणारे असल्याशिवाय तिबेटचे स्पेशल परमिट मिळत नाही. त्यामुळे थोडा नाराज झालो. पण इतर सर्व मनासारखे (अगदी गुरुवार,शनीवारला शाकाहारी जेवण, व्हेजिटेबल तेलातले, फिश ऑइल न वापरण्याची जबाबदारी गाईड घेईल, वगैरे !) ठरल्याने बरे वाटले.
शेवटी अशी ठरली ईटिनेररी:
बायजींग - शियान - लिजीयांग - शांग्रीला -गुइलीन - यांगशुओ - चेंगदु - चोंगचिंग - यांगत्से नदीवर क्रूझ -यिचांग - शांघाई.
काय गंमत असते पहा. हा काही माझा पहिला परदेश प्रवास नव्हता, पण चीन म्हटल्यावर जरा धाकधूकच वाटली ! शिवाय चाललो आहोत पण कम्युनिस्टांनी काही गैरसमजुतीने अडकवले तर काय असा एक विचारही मनाला चाटून गेला !!! पण मुळातच मर्द मराठा असल्याने असल्या विचारांना फारसा थारा न देता पुढील तयारीला लागलो. चिनी लोकानांही याची कुणकुण लागली असावी कारण सर्व काम फारच सहजपणे होऊन आठवड्याभरात व्हिसा हाती आला. नंतर मात्र प्रवासाचा दिवस कधी येईल असे झाले.
शेवटी तो दिवस उजाडला आणि दम्माम, सौदि अरेबिया - दुबई - बायजींग असा प्रवास Emiratesने सुरू झाला. दम्माम ते दुबई प्रवास ठीक झाला, झाला परंतु खरा दणका दिला दुबई विमानतळाने. साधारणपणे दुबई विमानतळ आंतरराष्टीय दर्जाची सेवा देतो असा माझा सर्वसाधारण अनुभव आहे. पण तेथे check-in करायला गेल्यावर हवाईसुंदरीने गोड हसून सांगितले की तुमची window seatबदलून तुम्हाला aisle seat देण्यात आली आहे. दरवेळेस, दर रूटच्या किमान पहिल्या प्रवासाला मला खिडकीजवळची सीट हवी असते म्हणून मी जवळजवळ तीन आठवडे अगोदर ती बुक केली होती. आणि ही बया मला हसत सांगतेय की माझी सीट बदलली? ते सुद्धा साडेसहा तासांच्या long haul प्रवासाला! माझ्यातला मर्द मराठा परत जागा झाला. जरा (नाही बरीच)हुज्जत घातली. मी ऐकतच नाही हे बघितल्यावर तिने "सुपरवायझरला बोलवते मग बघा" अशी धमकी दिली. मी म्हणलो, "बोलवच". मग सुपरवायझरने मला असंख्य कारणे सांगितली आणि मीही त्याला एमिरेटसच्या फ्लाईट मगॅझीनमधली त्याच्याच CEO ची quality, customer care, etc. वरची वचने ऐकवली. काही वेळाने त्याच्या ध्यानात आले की हा काही ऐकणार्यातला नाही. शिवाय विमानाला दोन अडीच तास होते, दम्मामहूनच माझे लगेज थ्रू-चेकइन झाले होते आणि माझ्या online seat reservation चे एमेरिटसने केलेले confirmation माझ्या मोबाइलवर होते, त्यामुळे आपला गड पक्का होता. शेवटी त्याने कुठेतरी एक फोन करून माझी मूळ सीट मला देऊ केली. हे प्रकरण दुबईला झाल्याने इतका बाणेदारपणा जमला. दम्मामला हे जमणे कठीण होते. असो, याचा मला प्रवासात किती फायदा झाला ह्याची थोडीबहुत कल्पना विमानातून काढलेल्या फोटोंवरून येईलच. A-380 मधून १० किमी वरून उडताना डोळ्यांना जे हिमालय, तिबेट आणि चीनचे दर्शन झाले ते वर्णनातीत होते. A-380 मधून उडण्याची ही माझी पाहिलीच वेळ आणि तीही बहुदा विमानबदलामुळे, ही आणखी एक अनपेक्षित आनंदाची बाजू.
विमानाचा मार्ग
.
बलुचिस्तान
.
काश्मीर
आणि येथून पुढे बलवन्त हिमगिरीचे अचाट रुपडे असे काही सुरू झाले की डोळा
मावेनासे झाले आणि केवळ नशिबात होते म्हणून कधी नाही ते दुबईला घातलेल्या
हुज्जतीचे चीज झाल्याचे वाटले.
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०१
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०२
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०३
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०४
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०५
.
बलवन्त हिमगिरी (The mighty Himalayas) ०६
इथून पुढे तिबेटचे रखरखीत पठार सुरू झाले. जगातले सर्वात उंच पठार. जणू जगाची पाठच.
तिबेट ०१
.
तिबेट ०२
मेनलँड चीन सुरू... बहुतेक झिन्जियान्गचा वाळवन्टी भाग असावा.
चिनी वाळवंट
विमान वेळेवर पोहोचले. विमानतळावर चोख व्यवस्था होती. सर्व कामे शिस्तीत झाली. इमिग्रेशन ऑफिसर हसून वेलकमपण म्हणाला. चला मनावरची चीनची उरलीसुरली भीती पळून गेली. मार्गदर्शक नावाची पाटी घेऊन उभा होता. चिनी ढबीचे पण सहज समजेल असे इंग्लिश बोलत होता. टुरचा पूर्णं मूड जमला. इंग्लिश बोलणारा मार्गदर्शक ही चीनमध्ये luxury नसून अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे नंतर सततच्या अनुभवाने समजत गेले. अगदी बायजींग व शान्घाईसारख्या शहरांतही स्टार्ड हॉटेलच्या स्टाफमध्ये एखादाच / एखादीच कामचलाऊ इंग्लिश बोलू शकतो/ते. अन्यथा sign language वर भागवावे लागते. कधी कधी ते ही कसे तोकडे पडते आणि कशी मजा होते(आता मजा वाटते, त्या वेळी तसे वाटले नाही !) ते पुढे कधितरी येईलच.
बायजींग मध्ये दूषित वातावरणामुळे सर्व वर्षभर केव्हाही धुके असू शकते. बायजींग ऑलिंपिकच्या वेळेस याचा फार गाजावाजा झाला होता हे आठवत असेलच. विमानतळावरून हॉटेलवर जाताना याचा प्रत्यय आला. शिवाय आंतरजाल माझ्या बायजींगमधील ४ दिवसांत सतत ढग व पाऊस दाखवत होते. परंतू वरूणराजाशी आमचा थोडाबहुत वशिला आहे. आजपर्यन्त त्यांनी आमची सहल कधीच खराब होऊ दिली नाही. तेव्हा त्यांची आठवण काढून बाकी सर्व नशिबावर सोपवले.
जगप्रसिद्ध बायजींग धुके
हॉटेलवर आल्यावर प्रथम शॉवर घेतला आणि ChaoYang Acrobatic Show बघायला बाहेर पडलो. तिकिटे आंतरजालावरून बुक केली होती. The China Guide (www.thechinaguide.com)नावाची एक एजन्सी हे काम करते, शिवाय तिकिटे छापील किंमतीच्या १५-२०% स्वस्त देते. थिएटरवर एजन्सीचा/ची गाईड तुम्हाला भेटतो/ते, तेथेच पैसे द्यायचे आणि तिकीट घ्यायचे... आंतरजालावर फक्त बुकिंग करायचे. फारच सोयीचा व्यवहार. मी तीन रात्रींच्या वेगवेगळ्या तीन शोंची तिकिटे अशीच बुक केली होती. चीनमध्ये जिथे जाल तिथे छान शोज आहेत. पर्यटन व्यवसाय उत्तम रीतीने डेव्हलप केला आहे हे वारंवार जाणवते.
बायजींग मध्ये आवर्जून बघावा असा शो म्हणजे ChoYang Acrobatic Show (ChaoYang Theater, 36, Dongsanhuan North Road.Phone; 010 65068116. Time: 7:15 - 9:15 pm. Tickets: 180 to 880 RMB (Chinese Yuan). 1 yuan = approx 9 INR.)
शो इतका छान होता आणि त्याची CD पण विकत मिळते म्हटल्यावर फोटोकडे दुर्लक्ष झाले नाही तरच नवल. त्यामुळे हे फक्त नमुन्यादाखलचे फोटो. मात्र पुढील भागांतील outdoor फोटो ही कसर पुरेपूर भरून काढतील अशी अपेक्षा आहे. या शोमधील सर्वच कलाकार नावाजलेले असून अनेक जागतिक स्तरावरची बक्षिसे त्यांनी पटकावलेली आहेत.
.
.
.
.
(क्रमशः)
बायजींगचा पहिला दिवस
बायजींगमधल्या भटकंतीचा पहिला थांबा तियानआनमेन हॉटेलपासून पायी ५ मिनिटावरच होता. टूर मॅनेजरने सर्व टूरभर हॉटेल्स अशीच मोक्याच्या ठिकाणची निवडली होती.) तियानआनमेन म्हणजे स्वर्गीय शांततेचे द्वार (Gate of Heavenly Peace). हा सम्राटाच्या राजमहालाचा म्हणजेच Forbidden City चा मुख्य दरवाजा. Forbidden City म्हणजे चीनच्या सम्राटाचा राजवाडा, यांत एका ठराविक इमारतीनंतर मोठ्या सरदारांनाही प्रवेश निषिद्ध होता. सामान्य जनतेलातर त्याच्या मुख्य दरवाजाच्या आत येण्यासही मनाई होती. त्यामुळेच या राजवाड्याला Forbidden City असे ओळखले जाते. हा राजप्रासाद इतका मोठा आहे की त्यात एकावेळी ९,९९९ लोक राहत असत. कारण ९,९९९ कारण हा आकडा त्या काळी शुभ आणि सत्तेचे प्रतीक समजला जात असे . चीनमध्ये या राजवाड्यात राहणाऱ्यात केवळ सम्राटच फक्त पुरुष असे, शिवाय एक सम्राज्ञी आणि इतर सर्व नपुंसक (Eunuch) असत. नपुंसक परंपरा हा चीनच्या क्रूर सम्राट संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. या प्रथेची सुरुवात पराजित सैन्यातील सैनिकांना शिक्षा म्हणून झाली. काही वेळेस अत्याचारी लोकांनाही ही शिक्षा होई.परतू सम्राटाच्या सेवेत असणारे केवळ Forbidden City मध्ये कामगार किंवा गुलाम म्हणून काम करण्यासाठी त्यांच्या मर्जीविरुद्ध व जबरदस्तीने eunuch बनवले जात. बायजींगच्या मिग राजघराण्याच्या पदरी ७०,००० नपुंसक होते. काही नपुंसक राजदरबारी उच्चपदस्थही होते. एकजण तर जनरलच्या पदापर्यंतही पोचला होता. अधिक माहिती आंतरजालावर आहे(http://en.wikipedia.org/wiki/Eunuch#China).
Forbidden City मध्ये शिरण्याआधी कुप्रसिद्ध तियानआनमेन चौक दिसतो (हाच चौक जेथे ४ जून १९८९ ला लोकशाही हक्कांकरता निदर्शन करणाऱ्या लोकांना गोळ्या घालून मारण्यात आले होते). तियानआनमेन व तियानआनमेन चौक हे चीनमधील सर्वात महत्त्वाच्या स्थळांपैकी आहेत. चीनच्या राष्ट्रीय दिनाचे संचलन येथेच होते.तियानआनमेन चौकाची अधिक माहिती येथे मिळेल: http://en.wikipedia.org/wiki/Tiananmen_Square_protests_of_1989). तियानआनमेन चौकाच्या तीन बाजूंस महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत व एका बाजूस तियानआनमेन म्हणजेच Forbidden City चे प्रवेशद्वार आहे.
तियानआनमेन चौक
तियानआनमेन (Gate of Heavenly Peace / Main Gate of the Forbidden City)
तियानआनमेनमधून Forbidden City मध्ये प्रवेश केला की समजते की या राजवाड्यास city का म्हणतात ते. अगदी शहर नाही तरी एकाद्या उपनगराएवढा याचा विस्तार आहे. चीनसारख्या अगडबंब साम्राज्याचा गाडा चालवण्यास आवश्यक त्या सर्व इमारती या एकाच जागी आहेत. एक खास इमारत सम्राटाच्या रोजनिशीसाठी राखून ठेवलेली होती. रोजचा अहवाल लिहून संध्याकाळी तो सीलबंद करून येथे ठेवला जात असे. या प्रथेमुळे हजारो वर्षांचा चीनचा इतिहास आजही उपलब्ध आहे. Forbidden City च्या चारी बाजूंनी ५ ते ६ मीटर उंच भिंत आहे. मात्र पाणी असलेला खंदक फक्त मागच्या बाजूसच आहे (का ते गाइडला माहीत नव्हते).
असो, असे म्हणतात की एक चित्र १,००० शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असते...
Forbidden City ०१
.
Forbidden City ०२
.
Forbidden City ०३
.
Forbidden City ०४
.
Forbidden City ०५
.
Forbidden City ०६
.
Forbidden City ०७
.
Forbidden City ०८: या इमारतीत सम्राटांच्या रोजनिश्या जपून ठेवलेल्या होत्या.
.
Forbidden City ०९: ड्रॅगनचा रस्ता, फक्त सम्राटासाठीच राखीव रस्ता.
चीनमध्ये ड्रॅगन हे सम्राटाचे चिन्ह समजले जात होते. इतर कोणासही ते चिन्ह वापरण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे कम्युनिस्ट सत्ता सुरू झाल्यावर त्यांनी ड्रॅगनला काही काळ वाळीत टाकले होते. पण आता ते एक मनोरंजनाचे साधन झाले आहे. बरेच सर्वसामान्य चिनी अजूनही ड्रॅगनला शुभ मानतात. घरामध्ये मोक्याच्या जागी आणि विशेषतः घरावर त्याचे स्थान असते.
Forbidden City १०: राजदरबार आणि सिंहासन
.
Forbidden City ११: सम्राटाचे शयनगृह
(क्रमशः)
Forbidden City बघण्यात सकाळचे जवळजवळ ३ तास गेले. तरीसुद्धा जरा अजून वेळ असता तर सगळ्या इमारती, त्यांच्यावरची कलाकुसर नीट बघता आली असती असे वाटत राहिले.
हे सम्राटाच्या प्रासादाबाहेरचे धूपदान... सम्राटाच्या मोठेपणाला साजेशे !
त्याचा आकार पाहून "पूर्वी इथे फार डास होते का ?" असे विचारल्यावर मार्गदर्शिका शांतपणे म्हणाली, "त्याबद्दल काही माहिती नाही" आणि आमचा बार फुसका निघाला. अर्थात हे संभाषण इंग्रजीतून चालले होते आणि सोप्या इंग्रजीतूनच व सरळ भाषेतच बोलावे ह्याचा प्रत्यय आला व परत परत येत राहिला. याला आश्चर्यकारक अपवाद म्हणजे युन्नान(लिजीयांग, शांग्रीला) सारखा दूरदराज डोंगराळ भाग आणि यांगत्से क्रूझमधील स्थानिक ट्रायबल [आपल्याकडे यांना अनुसूचित जाती-जमाती म्हणतात आणि चीनमध्ये अल्पसंख्याक(minorities) म्हणतात]. जास्त माहिती तेथे पोचल्यावर येईलच.
खालचा फोटो आहे संरक्षक सिंहांचा. हे चीनमध्ये जागोजागी खाजगी व व्यावसायिक इमारतींसमोर दिसतात. हे नेहमी जोडीनेच असतात. नराच्या पंज्याखाली पृथ्वीचा गोल असतो... याचा अर्थ मालकपुरुष जगभरातून संपत्ती गोळा करून आणेल. मादीच्या पंज्याखाली छावा असतो... याचा अर्थ मालकाची स्त्री ती सर्व संपत्ती सांभाळून ठेवील व घरातल्या मुलाबाळांचा नीट सांभाळ करेल. सर्वसाधारण चिनी हा असले संकेत, भूतखेत इत्यादीवर शेकडो वर्षांपासून प्रचंड विश्वास ठेवून आहे. ६०-६५ वर्षांचा कम्युनिझम आणि माओचीसमाजीक क्रांती याबाबतीत फार फरक करू शकलेली नाही. अगदी सरकारी-व्यापारी इमारतींपुढेसुद्धा हे सिंह असतात!
हे आहेत Forbidden City मधले सम्राटाचे सिंह.
अरे हो. खरी गंमत राहिलीच. सिंह हा प्राणी चीनमध्ये सापडत नाही आणि आमच्या मार्गदर्शिकेच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी कघीही नव्हता. हा भारतीय संस्कृतीचा प्रभाव म्हणून फक्त चिन्हाच्या स्वरूपात चीनमध्ये आला आणि राजघराण्यांमध्ये मानाचे स्थान पटकावून बसला... इतका की ड्रॅगनचे तोंड खूपदा सापाऐवजी सिंहासारखेच होते... विशेषतः राजघराण्याशीसंबंधित असेल तेव्हा.
Forbidden City मधून बाहेर पडून चिनी फूट मसाज करवून घेऊन स्वर्गमंदिर (Temple of Heaven) बघायला गेलो. हे १४२० साली मिंग राजघराण्याने बांधले. याचा मिंग व नंतर चींगराजघराणी अगदी १९व्या शतकाच्या सुरुवातीस राज्यक्रांती होऊन साम्राज्य लयाला जाईपर्यंत शांतता व उत्तम पीकपाणी व्हावे म्हणून पूजापाठासाठी नियमित उपयोग करीत असत.
.
.
.
खऱ्या प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा तर होतीच पण त्याबरोबर प्राण्यांचे पुतळे बनवून ते अर्पण करण्याची प्रथाही होती.
इमारतीच्या बाहेर व आतील नक्षीदार कलाकुसर बघण्यासारखी आहे.
येथून पुढे पोटपूजा करून रेशीम बनवण्याचा कारखाना (Silk Factory) बघायला निघालो. Silk factory ही तुम्हाला आवर्जून (जबरदस्तीने) दर शहरात बघावीच लागते. यात रेशीम हे चीनचे पूर्वपरंपरांगत अभिमानपूर्ण निर्यातचिन्ह आहे हे जेव्हढे खरे आहे तेव्हडाच मार्गदर्शकाचे कमिशन हाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. शिवाय सर्व रेशीम ऊद्योग कम्युनिस्ट सरकारच्या ताब्यात आहे, तेव्हा त्यांना वगळून पुढे जाणे मार्गदर्शकाला तसे अशक्यच आहे म्हणा ! रेशीम कसे बनवले जाते याची माहिती मात्र छान मिळाली. फक्त ती ५-६ वेळा न मिळता फक्त एकदाच मिळाली असती तर बरे झाले असते !
रेशमाच्या कोशामध्ये प्रत्येक कीटक एकच सलग धागा बनवतो. दोन कीटक असलेल्या मोठ्या कोशामध्ये दोन धागे एकमेकात गुंफलेले असतात त्यामुळे त्यांचा उपयोग ते रेशीम ओढून-ताणून फक्त रजई बनविण्यासाठीच होतो. या कामासाठीही खास कसबी कामगार लागतात. एकच कीटक असलेल्या छोट्या कोशांचा उपयोग धागा बनवून तलम वस्त्रे बनवण्यास होतो. मूळ धागा इतका तलम (thin) असतो की खालील यंत्र वापरून ८ कोशांतील ८ धाग्यांना गुंफून एक धागा बनवतात व नंतरच अश्यातऱ्हेने बनलेला जाड (!!!) धागा वस्त्रे बनविण्यासाठी वापरात येतो.
आणि ही आहेत काही रेशमाची उत्पादने:
.
.
पुढचा प्रवास ग्रीष्ममहालाच्या (Summer Palace) दिशेने सुरू झाला. हा महाल शहरापासून साधारण ३० मिनिटे दूर एका तलावात आहे. एकूण आवार साधारण २.९ चौ. किमी आहे. त्यातील ३/४ भाग मानवनिर्मित "कुनमींग" नावाच्या तलावाने व्यापलेला आहे आणि १/४ भागावर राजमहाल व मंदिर आहे. तलाव खणताना निघालेल्या मातीचाच उपयोगLongevity Hill बनवण्यास केला गेला आणि त्यावर ते मंदिर बांधले. हा महाल एका सम्राटाने त्याच्या आईसाठी बांधला होता. ती जहाल स्वभावामुळे Dragon Lady म्हणून प्रसिद्ध होती. मंदिराकडे जाण्यासाठी पूल आहे पण साधारपणे ३०-४५ मिनिटे चालावे लागते. त्यामुळे आमच्या ग्रुपने बोटीने जाणे पसंत केले. खास सजवलेल्या टूरिस्ट बोटीने १० मिनीटांत जाता येते. शिवाय बोटींगची मजा घेता येते ती वेगळीच!
.
ग्रीष्ममहाल (Summer Palace)
.
देवळाच्या आवारांत एक ७५० मीटर लांबीचा Covered Walking Track बनवलेला आहे... ड्रॅगनलेडी त्यावरून पालखीत बसून रोज संध्याकाळी फेर्या मारीत असे !!! हा मार्ग मात्र त्याच्यावरच्या रंगरंगोटीमुळे बघण्यासारखा आहे. शिवाय त्याच्यावरून तुम्ही "स्वतःच्या पायाने" फेर्या मारू शकता !
हाच तो मार्ग...
.
हा एक सद्य चिनी कलाकुसरीचा नमुना
आणि हा चिनी विनोदबुद्धीचा नमुना (कॉमरेड ओबामा) !
या तलावात बहुदा जगातील एकमेव संगमरवरी बोट आहे. अर्थातच ही बोट तलावात कधीच तरंगू शकली नाही. ड्रॅगनलेडी मात्र रोज संध्याकाळी त्या बोटीमध्ये बसून चहा पीतपीत तळ्याची मजा बघत बसत असे.
हा होता आमचा टुरच्या या भागातील बहुराष्ट्रीय ग्रुप: अमेरिकन, कॅनेडियन, इंडोनेशिअन, कोरियन, जर्मन, इटालियन आणि भारतीय (मी).
संध्याकाळी हॉटेलवर परतल्यावर शॉवर घेऊन त्वरित निघालो. ७:३० चा Red Theater वर The Legend of King Fu हा शो बघायला.
बायजींगमध्ये अजिबात न चुकवाव्या अशा गोष्टींच्या यादीमध्ये या शोचा बराच वरचा नंबर लागेल. कुंगफूच्या वेगवेगळ्या करामती एका कथानकाच्या आधाराने मोठ्या नाट्यमय प्रकारे प्रदर्शित करतात. भलामोठा रंगमंच आणि जागतिक कीर्तीचे कुंगफूचे उस्ताद... ९० मिनिटे कधी संपली ते कळले नाही. या शोमघ्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे पण संपुर्ण शोची सीडी विकत मिळते. मात्र शो संपल्यावर कलाकारांबरोबर फोटो काढून घेता येतो...
(क्रमशः)
आजचा बायजींगमधला तिसरा दिवस. सकाळी साडेआठला सज्जड न्याहारी चोपून झाली. लॉबीत आलो आणि पेपर चाळू लागलो तेवढ्यात गाईड माझ्या नांवाचा पुकारा करत आली. चीनमध्ये काही अपवाद वगळता कमीत कमी गाईड मंडळी दिलेली वेळ पाळत होती. टूरमध्येही त्यांची वागणूक नम्र आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी होती. कडक भाषा अथवा उर्मटपण नावालाही दिसला नाही. उलट बुद्धाचा देश म्हणून भारताबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये जराशी जवळीक व आदरच दिसला. (आवांतरः गौतम बुद्धाला चीनमध्ये शाक्यमुनी असे संबोधतात. चीनमध्ये १०० पेक्षा जास्त ज्ञानी लोक होऊन गेले आणि त्यांनाही 'बुद्धा'च म्हणतात... पुण्यातल्या असंख्य मारुती-गणपतींप्रमाणे त्यांना मेडिसिन बुद्धा, लाफींग बुद्धा, एवढेच काय पण एक लेडी बुद्धा ही आहे.) असो.
आजचा दिवस मिग राजघराण्याची थडगी बघण्याने सुरू झाला. ही जागा बाय़जींग पासून साधारणपणे ७५ किमी वर आहे. साधारणपणे एक दीड तास प्रवास होता. ५०० वर्षांच्या कारकीर्दीत बरीच थडगी जमा झाली आहेत परंतू बघण्यासारखे असे फार नाही. एकच "चांगलींग थडगे" जरासे बरे आहे. हे थडगे बायजींगचा पहिला मिंग सम्राट योंगले (Yongle) व त्याची संमाज्ञी शू (Xu) यांचे आहे. प्रशस्त आवार, एक छोटेसे प्रदर्शन, स्वर्गाचा दरवाजा आणि न खोदलेले अजूनही जमिनीखालीच असलेले थडगे एवढेच.
(आवांतरः इंग्लिश 'X' चा उच्चार चिनी भाषेत 'श' असा होतो. उदा: Xu = शू; Xian = शिआन; ई.)
थडग्याकडे जाणारा ड्रॅगनमार्ग
सम्राट योंगले. त्याच्यासमोर चिनी लोकांनी त्याला वाहिलेल्या पैशाची रास आहे.
सम्राटाचा सोन्याचा राजमुकुट
सम्राटाने वापरलेली सोन्याची भांडी
हा स्वर्गाचा दरवाजा. याच्या पलीकडे सम्राटाचे थडगे आहे. या दरवाज्यातून जाताना आणि परत येताना पुरुषांनी डावा व महिलांनी उजवा पाय पहिला टाकून जायचे असते आणि परतताना त्याच्या उलट करायचे असते. शिवाय जाता येताना एक चिनी भाषेतला मंत्रही म्हणायचा असतो. नाहीतर तुमचा आत्मा कुठेतरी मध्येच अडकून पडेल अशी भीती गाइडने घातली होती ! ते ऐकून आमच्या ग्रुपमधील निम्म्या लोकांनी दरवाज्याच्या बाहेरून जाणे पसंत केले !! बघा, केवळ भारतीय व चिनीच अंधविश्वासू असतात असे नाही, वेळ आली की पुढारलेले म्हणणारी पाश्चात्त्य मंडळीही कच खाते !!!
थडग्याच्या प्रवेशद्वारा समोर धूपदाने व एका बांबूला 'wish lists' बांधलेल्या होत्या. एका विशिष्टप्रकारे विणलेला लाल धाग्याचा गोफ आणि त्याच्यामध्ये गुंफलेला एक प्लास्टीकचा तुकडा-- तुमचे नांव किंवा इच्छा लिहिण्यासाठी-- असे 'wish list' चे स्वरूप असते. ती बांबूला बांधून प्रार्थना केली की इच्छा पुरी होते असा समज आहे.
.
परत बायजींगला पोहोचेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. चिनी रेस्तरॉ चांगलीच लक्षात राहतील. प्रशस्त आवारे, प्रशस्त डायनिंग हॉल्स आणि तत्पर सेवा. फक्त इंग्रजीच्या नावाने ठणठणाट ! त्यामुळे आमचा गाईड ही आमची अत्यावश्यक लाईफलाईन होती. गाईडपण तत्परतेने वेटर मंडळींना आमच्या सर्व मागण्या समजावून देऊन मगच स्वतःच्या पोटोबाकडे लक्ष देत होते. शिवाय मध्ये मध्ये येऊन सगळे ठीकठाक आहे की नाही हे विचारून जात होते.
चिनी हॉटेलची (रेस्तराँची) टेबले गोल, साधारणपणे ८ ते १० लोक बसू शकतील अशी असतात. टेबलाच्या मध्यभागी एक गोल फिरकी असते. वेटर सर्व पदार्थ आणून त्या फिरकीवर ठेवतात. ती फिरकी फिरवून आपल्याला हवा तो पदार्थ समोर आणायचा आणि आपल्या छोट्याशा वाटग्यात वाढून घ्यायचा आणि चॉपस्टीक्सने खायचा असा शिरस्ता आहे. इटुकल्या वाटग्यातून चॉपस्टीक्सने खाणे म्हणजे उपासमारीला आमंत्रण देणे होय हे ओळखून अस्मादिकांनी पहिल्या दिवसापासूनच सुरुवातीसच मोठी प्लेट आणि काटेचमचे मागून घ्यायला सुरुवात केली. ही जगावेगळी मागणी वेटरमंडळींच्या पटकन लक्षात येत नसे, त्यामुळे गाईडकरवी त्याच्या जेवणास जाण्यापूर्वी ही सोय करून घेणे जरूरीचे असते. मोठ्या प्लेटचा अजून एक फायदा म्हणजे असंख्य उष्ट्या चॉपस्टीक्स फिरकीवरच्या डीशेशमध्ये बुडण्याअगोदर आपल्याला हवे ते हवे तेवढे आपल्या प्लेटमध्ये घेता येते !
रेस्तराँचे प्रवेशद्वार... पवित्र सिंहांसकट.
आणि सुशोभित प्रवेशमार्ग
.
फिरकीवाले टेबल
हॉटेलमधला चिनी देव...
आणि त्याच्या भोवतीची आरास
जेवणानंतर आमचा प्रवास जगप्रसिद्ध चीनच्या महाभित्तीकेच्या (The Great Wall of China) दिशेने सुरू झाला. पूर्व चीनला निसर्गाचे देणे भरभरून आहे. जागोजागी अनेक रानटी फुले उमलली होती.
.
उत्तरेच्या टोळ्यांकडून होण्यार्या सतत आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी चिनी राजे-रजवाडे-सम्राट हजारो वर्षे (इसवीसनाच्या दोन शतकापूर्वीपासून) छोट्यामोठ्या भिंती बांधत असत. नंतर मिग राजघराण्याने त्या सर्वांना जोडण्याची योजना काढून एक सलग भिंत केली. तरीसुद्धा अनेक भाग विस्कळीतपणे अस्ताव्यस्त पसरलेले आहेत. सगळ्या भिंतींची (भिंत + नद्या, डोंगर, इ. इतर नैसर्गिक अडथळे) लांबी २१,००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतू सलग आणि मानवनिर्मित भिंतीची लांबी ८,८५० किमी मोजली गेली आहे. प्राचीन काळातला हा एवढा अजस्त्र उपक्रम (project) स्तिमित करतो.
तासदीडतासांच्या बसच्या प्रवासानंतर बदालींगला पोहोचलो. येथे सर्वात उत्तम अवस्थेत राहिलेला आणि सर्वात जास्त प्रसिद्धी पावलेला भिंतीचा भाग आहे. शेवटचा प्रवास पायाने तासाभरात किंवा १० मिनिटात केबल कारने जाता येते. बदालींग येथील भिंतीवरून दोन्हीं बाजूना ८-१० किमी चलता येते. भिंत बरीच उंचसखल भा॑गांतून जाते त्यामुळे बरीच दमछाक होते. पण भिंत आणि आजूबाजूचा डोंगराळ भाग प्रेक्षणीय आहे. निसर्गाचे विराट रूप आणि माणसाची स्वरक्षणासाठी अगदी एका टोकाची प्रचंड कारवाई थक्क करते. असे समजले जाते की चीनच्या इतिहासावर त्याच्या भूगोलाचा प्रचंड प्रभाव आहे. हा एक फार मोठा विषय आहे. पुढे त्याचा अनेक ठिकाणी उल्लेख येईलच.
.
भिंतीचे पहिले दर्शन
आणि मग बधावी तिकडे, नजरेसमोर व नजरेच्या पार टप्प्यापलीकडे अगडबंब सापासारखी वळणावळणाने पसरलेली भिंतच भिंत.
.
.
.
.
.
.
.
बायजींग शहर
बायजींग शहर खूपच आखीव रेखीव आहे. सर्व मुख्य रस्त्यांना प्रत्येक बाजूला ३ तर काही ठिकाणी ४ किंवा जास्त लेन्स + दोन्ही बाजूस प्रत्येकी २ लेन्सचे सर्विस रोड + प्रशस्त फुटपाथ आहेत. जवळ जवळ सर्वच रस्त्यांचे विभाजक हिरवळ व बहरलेल्या फुलझाडांनी सजवलेले आहेत. कोठेही वाळलेली हिरवळ अथवा मरतुकडेली / अर्धमेली फुलझाडे दिसली नाही. मुख्य म्हणजे हाच नजारा चीनच्या सर्व मुख्य शहरांत आणि इतर लहान शहरांतही (आपल्याकडील जिल्ह्याची ठिकाणे म्हणता येईल अशी ठिकाणे) दिसला. एकंदरीत मनापासून, लक्ष देऊन काम केलेले आहे, देशाची 'इमेज' आणि कोठेतरी आपण केलेल्या कामाबद्दल अभिमान वाटावा असे काम केले आहे असे सतत जाणवत गेले. अर्थात याला सर्वसामान्य जनतेचाही पुरेपूर हातभार आहे. ज्याबाबतीत आपण सिंगापूरची सतत (योग्यच) स्तुती करत असतो तो स्वच्छतेचा गुणधर्म सर्वसामान्य चिनी जनतेतही भरपूर प्रमाणात आहे. कोठेही कचर्याचे ढीग, अथवा बेजबाबदारपणे टाकलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या / चॉकलेट्सचे रॅपर्स, इ. दिसत नव्हते.
परंतू याची दुसरी बाजूही आहे. मार्गदर्शक मंडळींशी जरा चांगली ओळख झाली आणि ते जरा बोलते झाले की बरीच 'अंदरकी बात' बाहेर येऊ लागते. त्यांच्यामते हा म्हणजे राजकारणी (कम्युनिस्ट) लोकांनी बनवलेला चीनचा दाखवायचा चेहरा. चीनचा उरलेला ८०% भाग मात्र अजूनही खूपच मागासलेला आहे. याची प्रचिती (आणि चित्रे) पुढील भागांत येतीलच. पण मला मात्र सतत वाटत राहिले की चीनने आतापर्यंत किमान ६०-८० शहरे अमेरिका-युरोपच्या तोडीची-- किंबहुना त्यांपेक्षा वरचढच-- (हे माझे मत ऐकीव अथवा पुस्तकी नाही, प्रत्यक्षदर्शी स्वानुभवाचे आहे.) बनवली आहेत; हा सुवर्णक्षण भारतीय नागरिकाच्या आयुष्यात आणण्याची सत्बुद्धी आपल्या नेत्यांना (आणि हा प्रश्न नेत्यांना विचारण्याची बुद्धी जनतेला) केव्हा होईल? बायजींग आणि इतर मुख्य शहरांची सुधारणा बायजींग ऑलिंपिकसाठी युद्धपातळीवर केली गेली असे जेव्हा ऐकले तेव्हा तर माझ्या मनात CWG आठवण जागी झाली. चीनमध्येही भ्रष्टाचाराचा ड्रॅगन आहेच अशी कबुली नुकत्याच झालेल्या त्यांच्या दशकी राष्ट्रीय असेंब्लीमध्ये खुद्द मावळत्या व उगवत्या राष्ट्रपतींनी दिली. पण तरीही केवळ भ्रष्टाचार हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे असा चिनी नेत्यांचा मानस आहे असे न वाटाण्याइतपत सुधारणा जागोजागी जाणवत राहिली आणि अस्वस्थ करीत राहिली.
असो, हे बघा काही फोटो बायजींगचे...
.
.
.
.
.
.
.
या रस्त्यावर जी LED sign दिसते आहे ती या आणि त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकची अवस्था त्यांच्या रंगावरून दर्शवित आहे. सर्व मोठ्या शहरांत ही व्यवस्था आहे.
बायजींग शहरातील काही नजरेत भरलेली ठिकाणे:
.
.
बायजींगमध्ये टॅक्सी इतका त्रास देईल असे वाटले नव्हते. पहिले तर चालकांना सहसा इंग्रजी येत नाही.. अगदी थोड्या प्रमाणांत ज्यांना इंग्रजी येते तेही इंग्रजी न समजण्याचे नाटक करतात. एकूण हेतू एकच... परदेशी गिर्हाईकाच्या चिनी भाषेच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेऊन त्याला लुटणे ! सर्व चांगली हॉटेल्स चिनीमध्ये त्यांच्या पत्त्याची व 'Please take me to xxx hotel at so and so address' असे छापलेली कार्डं ठेवतात त्यांचा खूप उपयोग होतो. तसेच माझ्या टूर मॅनेजरने पाठविलेल्या माहितीपत्रकामध्येही सर्व हॉटेलांबद्दल अशी वाक्ये लिहून पाठवली होती, ती मी माझ्या मोबाइलवर आणली होतीच. ही तयारी हॉटेलवर एकटे परतताना खूप उपयोगी पडते. कार्ड टॅक्सी चालकाला दाखवायचे (बोलण्यात काहीही अर्थ नसतोच !) आणि त्याच्या होकारार्थी मान हालवण्याची वाट बघायची. बायजींगमध्ये टॅक्सी आवश्यकतेपेक्षा कमी आहेत. गर्दीच्या वेळेस टॅक्सी मिळण्यासाठी पदरी बरेच पुण्य असावे लागते. जवळचे गिर्हाईक नाकारणे आणि मीटरपेक्षा जास्त पैशांकरिता घासाघीस करणे ही केवळ मुंबईच्या टॅक्सीवाल्यांची अथवा पुण्याच्या रिक्शावाल्यांची मक्तेदारी नसून बायजींगमध्येही ती आम गोष्ट आहे. घासाघीस करताना भाषेचा अडथळा innovartive प्रकाराने सोडवला जातो. चालकाकडे calculator असतो, तो त्यावर त्याचा आकडा दाखवतो, मग आपण आपला आकडा टंकायचा... जमले तर जमले नाहीतर दूसर्या calculator च्या शोधात निघायचे. टॅक्सीवाल्यांचा हा त्रास मात्र इतर कुठल्याही ठिकाणी झाला नाही... शिआन-शांघाईमध्ये सगळे टॅक्सीवाले अगदी सज्जनपणे हात केला की थांबत होते, मीटर टाकून योग्य तेच भाडे आकारत होते आणि सुटे पैसे करत होते. असाच अनुभव त्यांनाही आला असे पुढे प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशांनीही सांगितले.
संध्याकाळी प्रसिद्ध 'पेकींग ऑपेरा' बघायचा बेत होता. पहिल्या दिवसाच्या टॅक्सी पकडण्याच्या अनुभवानंतर मी माझ्या हॉटेलच्या बेलबॉयला आपल्या गटात सामील करून घेतले होते. दरवेळी ५-१० युवान दिले की तो अगदी टॅक्सी पकडून आणून माझ्या नियोजित स्थळाच पत्ता चालकाला पूर्णपणे समजला आहे याची खात्री करून घेऊन मगच मला आत बसवत असे.
पेकींग ऑपेरा म्हणजे काहीसे आपले संगीत नाटक. चिनी पद्धतीला साजेसे रेशमी रंगीबेरंगी आकर्षक पोशाख बघण्यासारखे असतात. पूर्वापार गाजलेले तीनचार अंक/प्रवेश दाखवितात. संपूर्ण नाटक दाखवत नाहीत हे काहीसे आपल्या पथ्यावरच पडते कारण पूर्ण संभाषण आणि गाणे एवढ्या चिरक्या आवाजात आणखी वरच्या पट्टीत असते की काही विचारू नका. त्यामुळे वाचकांनी हा प्रकार आपापल्या जबाबदारीवर पहावा. बायजींगचा पेकींग ऑपेरा हा सर्वोत्तम समजला जातो. राजेरजवाड्यांच्या काळांत भरभराटीत असलेली ही कला आता फक्त काही नवश्रीमंत शौकीन मंडळींच्या व पर्यटन व्यवसायासाठीच्या त्याच्या महत्त्वामुळे सरकारी आश्रयावर जगून आहे. पूर्वी फक्त राजे-सरदार-सरंजामांसाठी असलेली हा प्रकार आपल्यालाही बघायला मिळतो म्हणून शोला आलेली चिनी आम जनता खूश दिसली.
चेहर्याची रंगरंगोटी करताना पेकींग ऑपेराचा मुख्य नट.
आणि ही आहे मुख्य नायिका
Farewell my concubine या नाटकातले एक दृश्य
'तलवार नृत्य' या नाटकातले एक दृश्य
ऑपेरातले अजून एक दृश्य
प्रियकर सरदार लढाईवर जाऊन लई दीस झाले म्हणून विरहाने तळमळणारी त्याची concubine, तिच्या दासी आणि eunuchs.
तीच concubine... दु:खाने "पिऊन फॅस" झालेली... आणि तिला सांभाळणारा तिचा दासगण
जाताना टॅक्सीची व्यवस्था बेलबॉयकरवी करता येते येताना मात्रा आपण आपल्या जबाबदारीवर टॅक्सीवाल्याशी लढा द्यावा लागतो. शो संपून रस्त्यावर येईपर्यंत १० वाजले होते. पाऊसही बर्यापेकी पडत होता. म्हणजे टॅक्सीवाल्यांची पर्वणीच. पहिलेतर थांबायलाच तयार नव्हते. थांबलेले पत्त्याचे कार्ड बघून मान आडवी हलवून नकार व्यक्त करत होते. एक स्कूटर रिक्शावाला मागे लागला होता. पण रिक्शाचे रुपडे पाहून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. रिक्शाला मीटरही नव्हते. १५-२० मिनिटाने ध्यानात आले की जर हापण निघून गेला तर परिस्थिती कठीण होईल. तेव्हा त्याला खुणेनेच विचारले, 'किती घेणार?' त्याने पंजा पसरून ५ असे दाखवले . जरा आश्चर्य वाटले कारण येताना मी ६० युवानं मोजले होते. त्याच्याही नजरेस माझ्या नजरेवरचा अविश्वास आला असावा. कारण त्याने calculator बाहेर काढला आणि ५० टंकून दाखविले. म्हटले चला आता दुसरा काही उपाय दिसत नाही शिवाय हा पैसेही ठीकच आकारतोय. आमची सवारी निघाली.
चिनमघ्ये सायकलींकरिता वेगळ्या लेन सर्व शहरभर असतात. स्कूटर रिक्शावाले बेधडक या लेनमधून गाडी दौडवतात. साधारणपणे सायकल व रिक्शा यांच्याकरिता रहदारीचे नियम नसल्यासारखे दिसते. त्यांनी इकडेतिकडे पाहून लाल दिव्यामधून गेले तरी कोणाला फारसे बिघडले असे वाटत नाही. हे सर्व रस्त्याच्या बाजूला उभे राहून बघणे वेगळे आणि स्वतः अशा एका धीट वाहनात बसून प्रवास करणे वेगळे ! रिक्शावाल्याने ज्या आवेशाने रिक्शा उडावयाला सुरुवात केली की मला त्याला आवरावे असे वाटू लागले. आणि मी तसा प्रयत्न केलाही... त्याची खाणाखुणेची प्रतिक्रिया होती: 'No problem, enjoy the trip !' म्हटले ठीक आहे काढूया थोडे 'Beijing by night' चे फोटो.
अचानक तो एका छोट्या गल्लीत घुसला... माझ्या आश्चर्यपूर्ण सातवार्यांवर त्याची खाणाखुणेची तीच जुनी प्रतिक्रिया होती: 'No problem, enjoy the trip !' नंतर तो अजून एका छोट्या आणि अंधार्या गल्लीत शिरला. मग मात्र मी खाणाखुणेची भाषा सोडून सरळ इंग्रजीतून मोठ्याने हा रस्ता चुकीचा आहे, मी येताना वेगळ्याच रस्त्याने आलो होतो असे म्हणू लागलो. इतके सगळे झाल्यावर भाऊसाहेब मोडक्यातोडक्या इंग्रजीतून म्हणाले: short cut, short cut... hotel near, hotel near. जरा बरे वाटले, आणि अर्थात आता त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा वेगळा काही पर्यायही नव्हता. आजूबाजूला बघितले तर जुनीपुराणी वस्ती होती. लाल रंगाचे दरवाजे सोडले तर भारतातलीच एखादी जुनी वस्ती दिसत होती. पण हे सर्व भर बायजींगच्या मध्यावर असेल यावर विश्वास बसत नाही. नंतर केलेल्या संशोधनातून कळले की असे बरेच चिनी मावळे आपापले गढ चिनी 'लॅण्ड माफीया' विरुद्ध लढवत आहेत. इतका वेळ विसरलेला माझ्यातला प्रवासी जागा झाला, कॅमेरा बाहेर आला.
.
.
.
मी फोटो काढतो असे बघितल्यावर तो 'थांबू काय?'; 'अजून शेजारच्या रस्त्यावर खूप जुनी घरे आहेत' असं मोडके इंग्लिश + खुणांनी सांगू लागला. पण आजूबाजूची परिस्थिती व रात्रीची वेळ पाहून मोडके इंग्लिश + खुणांनीच 'नको बाबा. हॉटेलकडेच चल' म्हणून सांगितले. हॉटेल खरच जवळच होते आणि सगळे मिळून दहाएक मिनिटात पोहोचलोही. थोडक्यात थियेटरवर जाताना टॅक्सीवाल्याने चांगल्या रस्त्यावरून पण २५-३० मिनिटे घुमवत चक्क ६० युवानपर्यंत बील फुगवले होते !
हॉटेलवर पोचल्यावर रिक्शातून खाली उतरून त्याला ठरलेले ५० युवान देऊ लागले तर तो म्हणू लागला: five hundred... five hundred. मी उडलोच आणि जोराने म्हणालो: Are you mad? हे किती जोराने म्हणालो याची कल्पना जेव्हा आजूबाजूचे दोनचार लोक काय झाले म्हणून चमकून बघायला लागले तेव्हाच कळले. रिक्शावाल्यालाही ते कळले असावे. तोही माझ्या हातातले ५० युवान घेऊन हसत हसत 'no problem... no problem असं म्हणू लागला.
आमच्यात युद्धसंधी झाल्याने त्याच्या हाती कॅमेरा देऊन माझा एक रिक्शात बसलेला फोटो काढ म्हणालो...
नंतरच्या प्रवासात एका अमेरिकन जोडप्याला व अबू धाबीत काम करणार्या एका भारतीयालाही बायजींग रिक्शावाल्यांचा असाच अनुभव आला असे कळले. घासाघीस करून त्यांनी शेवटी १५० - २०० युवानवर तडजोड केल्याचे सांगितले. त्यामानाने माझा अनुभव विनोदी प्रकारात मोडला असेच म्हणावे लागेल. तेव्हा बायजींग टॅक्सीवाल्यांपासून व विशेषतः रिक्शावाल्यांपासून सावधान!
(क्रमशः)
आज बायजींगमधला चौथा दिवस. दुपारी सव्वातीनला शियानचे विमान पकडायचे होते. गाईड बारा वाजता येईन म्हणाला होता. न्याहरी नऊ वाजता आटपली. नुसते लोळत पडण्यापेक्षा जरा हॉटेलच्या आजूबाजूस फेरफटका मारावे असे ठरवून बाहेर पडलो. हॉटेलच्या गल्लीतून बाहेर पडून एका प्रशस्त रस्त्यावर आलो. हा रस्ता जरा मजेशीर वाटला. कारण एका बाजूला पारंपरिक चिनी ठेवणीची दुकाने होती.
.
तर दुसरी बाजू आधुनिक संपन्न चीनचे दर्शन घडवीत होती.
.
चिनी व्यवसायाचे ठिकाण म्हटले म्हणजे भाग्य खेचून आणणारा सिंह दरवाज्यात पाहिजेच. असा दरारा असलेल्या व समृद्धीचे प्रतीक असलेल्या या राजाच्या काही खास रूपाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. एक खास जगावेगळा सिंह... चितळाची शिंगे व खूर आणि बोकडाची दाढी धारण केलेला.
चारपाच मिनिटेच चाललो असेन तर एकदम एवढी हिरवळ व झाडी आजूबाजूला सुरू झाली की फुटपाथावर चालतोय की एखाद्या बागेतून चालतोय असा संभ्रम पडला.
.
.
.
.
मी स्वतः त्यावरून चालत नसतो तर हा मध्यवस्तीतल्या चारपदरी रस्त्याचा फुटपाथ आहे ह्यावर विश्वास बसणे कठीण गेले असते. पाचेक मिनिटे पुढे चाललो असेन तर फुटपाथ एका छोट्याशा पटांगणासारख्या मोकळ्या जागेला मिळाला. तेथे बरेच नागरिक जमा होऊन काही कार्यक्रम चालू होता. मीही बघ्यांच्या गर्दीत मिसळलो. खास गुलाबी कपडे परिधान करून बर्याच चिनी काकू-मावशा-आजी चिनी पद्धतीचा नाच करीत होत्या. नंतर पुढे प्रवासात कळले की ह्याला "ताई ची" म्हणतात आणि हा एक चिनी व्यायामप्रकार आहे. (अवांतर याचा मराठी 'ताई'शी कोणताही संबंघ नाही :)) .) सबंध चीनभर सकाळ संध्याकाळ चिनी लोक हा व्यायाम सार्वजनिक बागांत करताना दिसतात. विशेषतः वयस्कर मंडळी असतात, अगदी ७०-८० वर्षांचे चिरतरुण आजीआजोबा मोठ्या कौशल्याने सर्व हालचाली करतात.... तरुण फारच क्वचित दिसतात.
काय चालले आहे याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण पांचव्या-सहाव्या चेहर्यावरसुद्धा "काय वेड्यासारखी मंगळावरची भाषा बोलतोयस ? जरा शहाण्या माणसासारखी चिनी भाषा बोल ना." असे भाव होते. पण प्रयत्न सोडला नाही. शेवटी तिथे ड्यूटीवर असलेल्या गार्डला माझी दया आली. तो इंग्रजीची मोडतोड करीत माझी मदत करू लागला. आमचे बरेचसे विनोदी संभाषण ऐकून एका मावशीबाईंनाही इंग्रजीवर अत्याचार करण्याचा मोह आवरला नाही. सर्वसाधारण चिनी माणसाचा स्वभाव तसा मनमिळाऊ आणि मैत्रिपूर्ण आहे. पण भाषेच्या अडथळ्यावर अडकून कशी विकेट जाते याचा प्रत्यय संपूर्ण प्रवासात सतत येत राहिला. असो. शेवटी येवढे कळले की रस्त्याशेजारच्या कॉलनीचा वार्षिक "community day" साजरा होत होता. ताई ची संपल्यावर एक कॉमरेड आणि कॉमरेडीण आले आणि त्यांनी भाषणे ठोकली.
ओ की ठो कळत नव्हते पण एवढी मजा आली की ३० एक मिनिटं कार्यक्रम बघत होतो. नंतर गार्डबरोबर फोटोचा कार्यक्रम झाला. चीनमध्ये चिनी तोंडवळा नसलेली माणसे अत्यंत विरळा. अगदी एवढा अगडबंब देश (भारताच्या जवळजवळ तीनपट क्षेत्रफळ), भारतापेक्षा १०-१५ कोटी जास्त लोकसंख्या, खूप मोठा पर्यटन व्यवसाय पण परदेशी प्रवाशांचे प्रमाण अगदी नगण्य म्हणजे ३-५%. चिनी (मंगोलॉईड) नसलेली चेहेरपट्टी एकदम विरळा. त्यामुळेच बहुदा बर्याचदा थोडीशी ओळख झाली की लगेच फोटो काढू म्हणतात. हा दस्तूरखुद्दांचा त्याच गार्डबरोबरचा फोटो.
आमच्या ग्रेट वॉलच्या ग्रुपमध्ये एक उंचापुरा (अर्थातच) गोरागोमटा इटालियन तरुण होता त्याला तर चारपाच वेळेस चिनी पोरींनी फोटो काढायला घेरले होते. तोही मजेत लगेच हो म्हणून तयार. पण दर वेळेस त्याच्या बरोबर असलेल्या त्याच्या मैत्रिणीच चेहरा मजेशीर होई.
नंतर थोडे पुढे गेल्यावर फूट्पाथची (बागेची) रुंदी जरा कमी झाली आणि बाजूचा सर्विस रोड व कॉलनी दिसू लागली.
एवढे ऐश्वर्य पाहिले आणि त्याचे गालबोटही दिसले... हा त्या बागेतल्या पाण्यात सकाळची अंघोळ आटपून घेणारा बेघर बायजींगकर.
याला इंग्लिशमध्ये एक चपखल वचन आहे: "Starvation in the midst of plenty !"
हॉटेलच्या एका बाजूचा फेरफटका संपवून दुसरी बाजू पकडली तर दोनच मिनिटात एक मोठी बाग दिसली आणि आठवले की गाईडने सांगितले होते की तुमच्या हॉटेलच्या शेजारची सम्राटाची बाग (Imperial Garden) जरूर पहा. मी चक्क विसरलो होतो की ! जर योगायोगाने येथे आलो नसतो तर केवढी मोठी चूक झाली असती याची आत शिरताक्षणीच जाणीव झाली.
.
.
.
.तो लाल गोलाकार पूल आहे तिथे हिवाळ्यात अतिशय थंड अश्या पाण्यात
पोहण्याच्या स्पर्धा होतात. आजूबाजूला बर्फ, पाण्याच्या कडेला काचेसारखे
तयार झालेले बर्फाचे पापुद्रे यात नुसती उडी घेण्याचे धाडस होत नाही. परंतु
असे धाडस करणा-यांचे पूलावर चार गरम कपड्यांवर कातडी जॅकेट घालून उभे
असलेले लोक खूप कौतुक कर तात.
तायची च्या ही स्पर्धा होतात. वयाप्रमाणे गट करून बक्षिसे होतात. ब-याच बागेत, फुटपाथवर फुकट शिकवले जाते. लहान मुलांपेक्षा यात वयस्कर जास्त पहायला मिळाले.
आम्ही ज्या ठिकाणी रहात होतो तिथे जिम मधिल शिक्षक सकाळी बाहेर मोकळ्या
हवेत शिकवायचे. मला त्या मधिल पाय-या विसरायलाच व्हायच्या. ते सर "मै वंती"
म्हणजे नो प्रोब्लेम असे म्हणून हसायचे.
ते शांत म्युझिक मला फार आवडायचे. नंतर नंतर तायची छानसे जमायला लागले होते.
आता त्यापैकी काहिच येत नाही. शिवाय आठवणी !!!!!!
.
.
.
.
गंमत अशी की ही बाग आणि बाजूची घरे यांच्यामध्ये भिंत सोडा पण एकाधे साधे कुंपणही नव्हते. शेजारच्या घरांचे दरवाजे बागेत ऊघडत होते आणि काही गल्ल्या सरळ बागेला येऊन मिळत होत्या!
.
.
बाग बघायला आलेल्या प्रवाशांची वर्दळ तर होतीच पण विशेष म्हणजे बाजूच्या घरांतील लोकही आरामात आपल्या घराचीच बाग असल्यासारखे तिचा उपयोग करत होते. बायका झाडाच्या सावलीत बसून शिवणकाम / भरतकाम करता करता शिळोप्याच्या गप्पा मारत होत्या, पुरुष पेपर वाचत बसले होते. पोरं उंडारत होती.
.
एवढे असून विशेष म्हणजे बागेत एकही गार्ड अथवा माळी दिसत नव्हता. तरीसुद्धा कमालीची स्वच्छता आणि टापटीप होती. बेपर्वाईने फेकून दिलेला एक कागदाचा कपटा किंवा कोठे कचर्याचा ढीग दिसला नाही, ना कुठल्या फुलझाडाची नासाडी, ना मरतुकडी फुलझाडे अथवा झाडाच्या बुंध्यावर कोरलेली नावें. बागेत फिरताना साडेअकरा केव्हा वाजते ते कळले देखील नाही आणि गडबडीत हॉटेलकडे निघालो. गाईड बरोबर बारा वाजता विमानतळावर सोडण्यासाठी आला आणि हॉटेलला बायबाय करून शियानला जाण्यास निघालो.
विमान घावपट्टीवर असताना घेतलेला बायजींग विमानतळाला बायबाय करतानाचा फोटो...
आणि हा विमानाने हवेत झेप घेतल्यावर बायजींग शहराचा...
पूर्व व दक्षिण चीन डोंगरदर्यांनी भरलेला भूभाग आहे. सपाट जमीन मधूनमधूनच दिसते. त्यामुळे हा भाग असंख्य नद्या-उपनद्यांनी सिंचलेला सुपीक आणि हिरवागार दिसत होता. बायजींग ते शियान संपूर्ण प्रवासात हेच चित्र दिसत होते.
.
.
असंख्य लहानमोठी धरणे चीनने केलेल्या भौतिक प्रगतीची साक्ष देत होती...
.
शेकडो किमी लांबीचा डोळ्यांच्या सीमेपर्यंत केवळ वळ्यावळ्यांचा भूभाग इतर कोठे बघितला नव्हता ! असं म्हणतात की चीनच्या इतिहासावर त्याच्या या भूगोलाचा फार मोठा परिणाम झाला आहे. पण ते पुढे केव्हा तरी.
.
मधूनच एखाद्या दरीत छोटी वस्ती किंवा एखादे मोठे शहर दिसत होते.
मधूनच अगडबंब यांगत्से नदी आणि तिच्या उपनद्या सापासारख्या वळसे घेते धावताना दिसत होत्या.
.
बायजींग-शियान हे अंतर १०३५ किमी आहे. पण चिनी निसर्गाचे हे विहंगम रूप पाहताना दीड तास भुर्रकन जाऊन शियानला विमान उतरू लागल्याची घोषणा झाली सुद्धा ! हॉटेलवर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. शॉवर घेऊन जेवण करे पर्यंत ९ वाजत आले होते. खोलीवर येऊन ऊद्याच्या भरगच्च कार्यक्रमाचा बिछान्यावर पडून विचार करता करता केव्हा डोळा लागला ते कळलेही नाही.
(क्रमशः)
शियान चीनच्या महत्त्वाच्या प्राचीन शहरांपैकी आणि एकत्रित चीनच्या चार पैकी पहिली राजधानी आहे. ह्या शहराचा इतिहास सध्याच्या माहितीप्रमाणे जवळजवळ ३१०० वर्षे जुना आहे. इसवीसनाच्या ११०० वर्षे अगोदर झाऊ राजघराण्याने (Zhou Dynasty) सघ्याच्या शियानच्या आसपास आपली राजधानी स्थापली आणि तिचे नांव फेन्घाओ असे ठेवले.
इसवीसनपूर्व ३१०० ते २११ पर्यंत सध्याच्या चीनचा भूभाग अनेक छोट्यामोठ्या, एकमेकांशी सतत लढाया करणाऱ्या राजे आणि सरदारांच्या मध्ये विभागलेला होता. हा कालखंड काहीसा प्रमाणित इतिहास आणि बराचसा अतिरंजित लोककथांमध्ये (mythology) जिवंत आहे. यातला इसवीसनपूर्व ४०३ ते २२१ हा भाग Warring States Period म्हणून ओळखला जातो. २२१ मध्ये चीन (Qin) राजघाण्याचा पहिला सम्राट "चीन शी हुआंग" (याच्या नांवाचा अर्थ 'चीनचा पहिला सम्राट' असाच आहे) याने चीनचा जवळजवळ सर्व भूभाग एकछत्री सत्तेखाली आणला. त्याने झियानयांग येथे आपली राजधानी वसवली. हे ठिकाण सध्याच्या आधुनिक शियानच्या उत्तरपश्चिम भागात होते. याच चीन सम्राटाच्या व त्याच्या राजघराण्याच्या नांवावरून या देशाचे चीन हे नांव पडले ते आजतागायत टिकून आहे. शिवाय शियानचे जगप्रसिद्ध मातीचे सैनिक आणि घोडे बनवणारा सम्राट तो हाच.
याच्या राजवटीच्या काळात जगप्रसिद्ध रेशीममार्ग (Silk Route) या प्राचीन काळातील सर्वात लांब आणि सर्वात श्रीमंत व्यापारी मार्गाची सुरुवात झाली. चीनला त्या काळाची व्यापारी महासत्ता बनवण्याचे मुख्य श्रेय या रेशीममार्गालाच आहे. हा मार्ग शियानला सुरू होऊन त्याच्या अनेक ऊपमार्गांनी त्या काळात माहीत असलेल्या सर्व जगाला चीनशी जोडत होता. याच मार्गावरून शेकडो वर्षे व्यापाराबरोबर आचारविचार, धर्म आणि राजसत्तांचा प्रभावही प्रवास करत राहिले आणि आशिया, युरोप व आफ्रिकेच्या जडणघडणीवर प्रभाव पाडीत राहिले ते अगदी युरोपियन वसाहतवादाचा उदय होऊन त्याने जगावर आपले वर्चस्व कायम करेपर्यंत.
रेशीममार्ग (Silk Route)
प्राचीन काळात या शहराला चांगआन या नांवाने ओळखत असत. १३६८ मध्ये मिंग राजघराण्याने हे नाव बदलून शियान असे केले ते आजतागायत आहे. परंतू आजही या शहराचे नागरिक चांगाआनच्या नांवाची आणि व वैभवशाली इतिहासाची मोठ्या आस्थेने जपणूक करून आहेत. त्या काळचे साहित्य, संगीत आणि नृत्य यांची झलक नंतर येणार्या प्रकाशचित्रांमधून बघायला मिळेलच.
===================================================================
शिआनच्या सफरीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात छान न्याहारीने झाली. आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आठ वाजता लॉबीमध्ये येऊन गाईडची वाट पाहू लागलो. साडेआठ वाजले तरी गाईडचे दर्शन नाही. एअरपोर्ट वरून हॉटेलवर पोहोचवणार्या गाईडने सांगितले होते की आज दुसरा गाईड सहलीचे प्रबंधन करणार आहे. वाटले या दोघांमध्ये काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. मला न घेताच टूर निघाली की काय? आता आजचा दिवस खराब होतो की काय? अनेक प्रश्न मनात उभे राहीले. ईटिनेररी बाहेर काढली, त्यात पाहून शिआनमधील लोकल एजण्टचा नंबर लावला. नशिबाने पलीकडून बोलण्यार्या व्यक्तीला बर्यापैकी इंग्लिश येत होते. त्याच्याकडून कळले की सहल आठऐवजी अकरा वाजता सुरू होईल. मग अगोदर फोन करून हे का सांगितले नाहीस असे विचारले तर मख्खपणे म्हणाला की "विसरलोच की !" (Oh ! I forgot !). नशीब तो समोर नव्हता नाहीतर चिनी दूरदर्शन व वृत्तपत्रांमध्ये Warring States Period परत सुरू झाल्याची बातमी आली असती. हे सर्व चालू असताना अजून एक गोष्ट ध्यानात आली की आजच्या सहलीमध्ये बरीच ठिकाणे आहेत आणि सहल तीन तास उशीरा सुरू झाली तर त्यामधली काही गाळली जातील किंवा नुसती धावपळीत बघायला लागतील... मग परत लांबलचक संवाद झाला आणि ध्यानात आले की त्याने सकाळचा शिलालेखसंग्रहालयाला भेट देण्याचा पहिला कार्यक्रम बाद करून टाकला होता ! म्हणे हा कार्यक्रम तुमच्या इंग्लिश ईटिनेररीमध्ये आहे पण आमच्या चिनी भाषेतील ईटिनेररीमध्ये नाही ! आतापर्यंत माझ्या ध्यानात आले की "मग स्थानिक प्रबंधक म्हणून तुम्ही काय xx xxx होतात?" हेही या महाशयांना विचारण्यात अर्थ नाही. सरळ माझ्या गुईलीनमधील मुख्य टूर मॅनेजरला फोन लावला. छोट्याश्या वादावादीनंतर मी एक उपाय सुचवला की मी स्वतः टॅक्सी करून शिलालेखसंग्रहालय बघून हॉटेलवर टूर सुरू होण्याच्या वेळेपर्यंत परत येईन. मात्र यामुळे माझा होणारा टॅक्सी व संग्रहालयाचे प्रवेशमुल्य असा १०० युवानचा खर्च स्थानिक गाईडकरवी परत करावा कारण माझ्या ईटिनेररीप्रमाणे मी तो अगोदरच भरलेला आहे. टूर मॅनेजरला ही कल्पना मान्य झाली आणि जरादेखील उशीर न करता हॉटेलच्या काउंटरवरच्या एका इंग्लिश समजणार्या बाबाकडून टॅक्सीवाल्यासाठी चीनीमध्ये संग्रहालयाचा पत्ता लिहून घेतला आणि निघालो.
आवांतरः
१. चायना हायलाइटची ईटिनेररी आतापर्यंत मी बघितलेल्या ईटिनेररीमध्ये
सर्वोत्तम होती. सर्वच ईटिनेररींमध्ये असणाऱ्या नेहमीच्या गोष्टी (क्रमवार
ठिकाणे, त्यांच्या माहिती सकट, इ.) होत्याच पण प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक
एजंटचे नांव, पत्ता व फोन नंबर्सही होते. शिवाय सर्व हॉटेलच्या नांवांवर
टिचकी मारून त्या त्या हॉटेलच्या बुकिंग संस्थळावर जाऊन हॉटेलमधील सर्व
सोयीसवलती (वायफाय आहे की नाही, शिवाय ते चकटफू आहे की नाही, इ. सकट) व
त्यांचे दरपत्रकही सहल सुरू होण्याच्या अगोदरपासून बघायची सोयही होती.
२. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टूर पॅकेजमध्ये १०० युवानच्या कार्डसकट एक
मोबाईल चीनच्या संपूर्ण वास्तव्यात वापरण्यासाठी दिला होता. ही व्यवस्था
इतर कोणत्याही ठिकाणी पाहिली नव्हती आणि तिचा उपयोग किती अमूल्य होता हे
सांगण्याचीही फार गरज नाही. विशेषतः वर सांगितलेल्या फोनाफोनीकरता तर ही
लाईफलाईनच होती. या फोनचा स्थानिक गाईडशी संपर्कात राहण्यासाठी व
जागोजागींच्या संध्याकाळच्या शोंचे प्रबंधन करण्यासाठी फार मदत झाली.
शियान ही चीनच्या शांक्षी राज्याची राजधानी आणि चीनच्या १३ मेगॅसिटिजपैकी एक आहे. शिलालेखसंग्रहालयाकडे जाताजाता झालेले हे नीटनेटक्या, स्वछ आणि सुंदर शियानचे दर्शन.
.
संग्रहालयाचे नांव आहे "Xi'an Beilin Museum" or "Forest of Stone Steles Museum". या ठिकाणी पहिले एक कन्फ्युशिअसचे मंदिर होते. १०४७ साली साँगराज घराण्याने त्याचे नूतनीकरण करून तेथे चीनच्या अनेक भागांतून जमा केलेल्या लेख, चित्रे इतकेच काय पण छोटेखानी दगडी पुस्तके कोरलेल्या ३००० शिलांचे संग्रहालय बनवले. या संग्रहालयातील जमिनीत उभ्या केलेल्या शिलांवरूनच त्याचे नांव शिलांचे जंगल उर्फ Forest of Stone Steles असे पडले.
आजमितीस येथे चार हजारच्या आसपास शिला आहेत. ह्या शिला नुसते कलाकृतींचे नमुने म्हणूनच महत्त्वाच्या नसून त्यांच्यावर चीनचा इतिहास व चिनी भाषेची दोन हजारापेक्षा जास्त काळाची वाटचाल नोंदवलेली आहे. आजमितीला येथे ४००० पेक्षा जास्त शिला आहेत. सर्वात जुनी शिला इसवीसनापूर्वी २०६ वर्षे एवढी जुनी आहे. जरी त्या शिलांवर नोंदविलेली चिनी अक्षरे समजली नाही तरी ९०० वर्षांपूर्वी असा दूरदर्शी आणि कलात्मक विचार करणारा शासक चीनमध्ये होऊन गेला आणि त्यानंतरच्या पिढ्यांनी त्याच्या कर्तृत्वाची आजपर्यंत जपणूक केली आहे हा विचारच चकीत करणारा आहे.
चीनमधली प्रेक्षणीय स्थळे प्रेक्षणीय ठेवण्यात जेवढी काळजी घेतली आहे तेवढेच लक्ष त्यांच्या इमारती व आवारे प्रशस्त, नीटनेटकी, स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यावर दिल्याचे प्रकर्षाने जाणविते. मुख्य म्हणजे ही सर्व व्यवस्था चिनी सरकार अथवा स्थानिक राज्यसरकारेच करतात. स्वच्छता, नीटनेटकेपण आणि आकर्षकता याबाबतीत सरकारी इमारती खाजगी इमारतींशी स्पर्धा करताना दिसतात.
हे आहे Forest of Stone Steles Museum चे आवार...
.
.
.
हे काही शिलांचे नमुने...
शिलालेख : "त्या शिलेवर काय लिहिले आहे?" असे विचारल्यास उत्तर न देण्याचे हक्क राखून ठेवलेले आहेत ! +D !!
.
.
.
चित्रलेख
इमारतींचा आराखडा (Building plan)
शहराचा आराखडा (Map of a city / town)
एका व्यापार्याने काढवून घेतलेले त्याचे चित्र (आजकालच्या पोर्ट्रेट पेंटिंग / छायाचित्रांचा दगडी पणजोबा !)
धार्मिक चित्र
शिलांचे अशा रीतीने कागदावर काढलेले ठसे चिनी नागरिक मोठ्या आस्थेने विकत धेऊन जाताना दिसले.
केवळ याच नव्हे तर चीनभरच्या संग्रहालयांत प्राचीन चीनवरचा भारतीय प्रभाव व संस्कृतप्रचुर नांवे प्रकर्षाने आढळून येतात, त्यांची काही उदाहरणे पाहू या.
हा आहे देवराजा (एक प्रकारचा सरदार, सरंजाम)
अकाल वैद्यराजा
मंजुश्री बोधीसत्व
त्रिलोकविजय
अजून खूप काही बघण्यासारखे आहे. पण ही झलक कल्पना येण्यास पुरेशी आहे.
सकाळी सकाळी घातलेल्या वादाने झालेला सहलीचा रसभंग पुरेपूर भरून निघाला होता. साडेअकरावाजता हॉटेलवर पोहोचायचे म्हणून अकरा वाजता संग्रहालयातून बाहेर पडलो तर हा फळविक्रेता समोरच दिसला. त्याला थोडा राजाश्रय देऊन लगेच टॅक्सी पकडली. चीनमध्ये खूप प्रकारची आणि चवदार फळे मिळतात.
हॉटेलवर पोचलो तेवढ्यात स्थानिक गाईडचा फोन आला की बायजींगवरून रेल्वेने येणारे दोन प्रवासी आमच्या शियान शहराच्या टूरमध्ये होते, ते रेल्वेला उशीर झाल्याने १२ ते १ वाजेपर्यंत उशीरा पोहोचतील आणि मगच टूर सुरू होईल. आम्ही सगळे मिळून तीनच लोक या टूरमध्ये होतो. त्यामुळे टूर रद्द करण्याचाही त्याचा विचार चालू होता. परत वादावादी… थोडी गाईडशी, थोडी टूर मॅनेजरशी. पण यावेळी त्यांच्याही लक्षात आले की हे जरा जास्तच होतेय. त्यामुळे सकाळचा टूरचा भाग माझ्या एकट्याबरोबर करावा व इतर दोघे दुपारच्या जेवणानंतर टूरमध्ये सामील होतील असा तोडगा सर्वमान्य झाला. हुश्श !
मग फार वेळ न लावता निघालो. सुरुवात केली शियानच्या नगारखान्याच्या (Drum Tower) दर्शनाने. यातील नगार्याच्या आवाजाने शियान नगराची पहाट होत असे.
थोडेसे पुढे गेल्यावर एक वेगळ्याच वस्तीत शिरलो. तिथल्या लोकांची चेहेरपट्टी पूर्णपणे चिनी (मंगोलियन) नव्हती किबहुना बरीचशी मध्य आशियन होती. रेशीममार्गावरून अनेक देशांचे लोक व्यापारानिमित्त शियानला आले. त्यांतील काही मध्य आशियातील मुस्लिम लोकांनी शियानला आपले घर बनवून तेथेच वस्ती केली. त्यांना हुई लोक (Hui people) म्हणून ओळखतात. त्यांची घरे व दुकाने यांची रचना सर्वसामान्य चिनी इमारतींपेक्षा वेगळी होती. चीनमधून एकदम वेगळ्याच देशात गेल्यासारखे वाटले. हा भाग शियानचा हुई क्वार्टर म्हणून ओळखला जातो.
.
येथे एक ७४२ साली बांधलेली १२००+ वर्षे जुनी मशीद आहे. तिच्या बांधणीत चिनी व इस्लामी संस्कृतींचा संगम दिसतो.
.
या मशीदीच्या छपरावर चक्क अनेक ड्रॅगनमहाराज विराजमान झालेले आहेत !
तेथून बाहेर पडतो तोच शियानचे घंटाघर (Bell Tower) दिसले. याच्या घंटेच्या आवाजाने शियानचा दिवस संपल्याची घोषणा होत असे.
नंतर आम्ही शियानची शहरभिंत पाहायला जुन्या शियानच्या सीमेवर गेलो. ह्या भिंतीची निर्मिती सर्वप्रथम तांग राजघराण्याच्या काळात (इ ६१८ - ९०७) केली गेली. त्यानंतर आलेल्या शियानच्या अनेक शासकांनी शियानच्या व्यापाराचे आणि संपत्तीचे रक्षण करण्यासाठी तिच्यात वेळोवेळी बरीच भर घालून तिला अधिकाधिक मजबूत बनवले. मिंग घराण्याच्या (इ १३६८ - १६४४) पहिल्या सम्राटाने तिच्या लांबीत भर घालून तिला लक्षणीय पद्धतीने अधिक मजबूत केली. या भिंतीची लांबी १३.७ किमी, उंची १२ मीटर व रुंदी बुंध्याला १५-१८ मीटर तर वरच्या टोकाला १२-१४ मीटर आहे. भिंतीच्या सभोवती खोल पाण्याचा खंदक आहे. या भिंतीला जगातील प्राचीन आणि विशाल सैनिकी संरक्षण प्रणालींपैकी एक समजले जाते (one of the largest ancient military defensive systems in the world). त्या काळी एवढी मजबूत भिंत तोडणारी अस्त्रे नव्हती. त्यामुळे या भिंतीने चिनी राजधानीचे आणि रेशिममार्गाच्या उगमस्थानाचे शेकडो वर्षे यशस्वीपणे रक्षण केले.
या भिंतीला एकूण १८ दरवाजे आहेत. भिंतीकडे जाताना घेतलेले तिच्या दक्षिण दरवाज्याचे छायाचित्र.
आणि हे आतून भिंतीवरून घेतलेले त्याच दरवाज्याचे छायाचित्र.
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक प्रशस्त मैदान आहे.
भिंतीवर चढल्यावरच भिंतीच्या अवाढव्यतेची खरी कल्पना येते. या भिंतीवरच्या रस्त्यावरून एका बाजूला एक असे ४ -५ रथ धावू शकत असत.
.
भिंतीवर ९६ मनोरे आहेत. दर दोन मनोऱ्यामधले अंतर १२० मीटर आहे, कारण त्या काळी बाणाने साधारण ६० मीटरपर्यंत अचूक मारा करता येत असे. त्यामुळे मनोऱ्याच्या संरक्षणात बसून सैनिकांना आक्रमकांपासून शहराचे रक्षण करता येत असे.
हा दक्षिण दरवाज्यावरचा मनोरा. त्याच्या बाजूला भिंतीवरच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनावरून भिंतीच्या आकारमानाची कल्पना यावी.
भिंतीच्या आतल्या बाजूच्या जुन्या शियानमध्ये प्राचीन वारसा कटाक्षाने जपला जातो व फक्त जुन्या शैलीची घरे बांधण्यास परवानगी आहे.
भिंतीबाहेरचे नवीनं शियान मात्र पाश्चिमात्य शहरांशी स्पर्धा करताना दिसते.
भिंतीवरचा फेरफटका आटपून आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि आमच्या मागे राहिलेल्या दोन मंडळींना घेऊन जंगली हंसमंदीराच्या (Wild Goose Pagoda) दिशेने कूच केले. वाटेत त्या अमेरिकन दांपत्याच्या तोंडून त्यांची चिनी रेल्वेने केलेली हालत सविस्तरपणे कळली. रेल्वे उशीरा सुटणे, वाटेतच तास दोनतास गाडीने बसकण मारणे व हे सर्व रात्रीच्या प्रवासात आणि नवख्या देशात झाल्याने त्याची काय मन:स्थिती झाली असेल याची कल्पनाच करवत नव्हती. शिवाय प्रवास रात्रीचा असल्याने झोपेचे खोबरे झाले ते वेगळेच. हे सगळे कोणालातरी सांगून मनातला सगळा राग थोडासातरी हलका करण्याची त्याची धडपड चालली होती. मीही त्यांच्या सांगणे ऐकत सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे काय करू शकणार? पण दु:खात सुख असे की मलाही टूर मॅनेजरने बायजींग-शियान प्रवास रेल्वेने करून बचत करण्याची सूचना केली होती. पण एकंदरीत लांबचे अंतर, दुसर्या वर्गातील अपुर्या सोयी व पहिल्या वर्गाचे जास्तीचे भाडे असा सर्व विचार करून मी विमानानेच प्रवास करणे पसंत केले होते. त्यामुळे नंतर खरंच योग्य निर्णय घेतला की खर्च कमी करण्याची संधी गमावली असे वाटत राहिले होते. पण त्या दांपत्याची कहाणी ऐकून ती रुखरुख निघून गेली.
चीनमध्ये दोन प्रकारचे लोहमार्ग आहेत. एक जवळजवळ भारतीय रेल्वेच्या वयाचा, प्रतीचा आणि तेवढ्याच बर्यावाईट प्रकारे चलवलेला. या मार्गावरून प्रवास स्वस्त पण कधीकधी वरच्या उदाहरणाप्रमाणे महागात पडू शकतो. परंतु याच बरोबर चिनी सरकार देशभर नवीनं बुलेट रेल्वेचे जाळे ज्या वेगाने पसरावीत आहे त्याने पाश्चिमात्य देशही चकीत झाले आहेत. यांचा प्रवास थोडा महाग पण वेगवान आणि आरामदायक असतो. यातील एका बुलेट रेल्वेमधून प्रवास करायला मिळाला त्याबद्दल माहिती प्रकाशचित्रांसह पुढे येईलच.
Wild Goose Pagoda तांग राजघराण्याच्या काळात इ ६५२ मघ्ये बांधला गेला. याला पाच मजले होते आणि भिंती मातीच्या होत्या त्यामुळे काही काळाने तो पडल्यावर इ ७०४ मध्ये सम्राज्ञी वू झेतीआन हिने त्याचा जीर्णोद्धार करून त्याच जागेवर १० मजली इमारत उभी केली. त्यानंतर इ १५५६ मध्ये मोठ्या भूकंपात इमारतीची पडझड होऊन ती थोडीशी पश्चिमेकडे झुकली. त्यामुळे तिचे तीन मजले कमी केले गेले व आता फक्त ७ मजली इमारत उभी आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या इमारतीची एवढी कहाणी मी का सांगतो आहे? त्याचे कारण असे आहे.
तुम्ही कदाचित Xuanzang हे नांव ऐकले असेल नसेल (मीही एकले नव्हते) पण शालेय इतिहासात ह्यु एन संग या भारतात येऊन गेलेल्या चिनी प्रवाशाचे नांव खचीतच वाचले असेल. ही दोन्ही नांवे एकाच माणसाची आहेत. हा नुसता प्रवासीच नव्हता तर एक बुद्धधर्माचा मोठा अभ्यासक बुद्धभिख्खू आणि भाषांतरकारही होता. चीनमध्ये त्या काळी अर्धवट आणि चुकीचे अर्थ लावलेले बुद्धाचे तत्वज्ञान प्रचारात होते कारण भारतातून चीनमध्ये येईपर्यंत सर्व ग्रथसंपदा अपभ्रंशित झालेली होती. या गोष्टीचा ह्यु एन संगला तिटकारा होता. त्याने तांग राजघराण्याच्या ताईझोंग या सम्राटाची मदत घेऊन भारताच्या प्रवासाला सुरुवात केली आणि (आताच्या) ताजीजिकीस्तान व अफगाणीस्तानमार्गे भारतात आला . एकूण १७ वर्षांच्या या प्रवासात आलेले सर्व अनुभव त्याने मोठ्या बारकाईने लिहून ठेवले. तसेच त्याने अनेक बौद्ध धर्मग्रंथ (सुत्रे) आणि मूर्ती जमा करून त्या चीनमध्ये नेल्या. Wild Goose Pagoda ची उभारणी ह्यु एन संगने बरोबर आणलेल्या या खजिन्याला सन्मानाने आणि सुरक्षित ठेवण्यासाठी केली गेली. आजही ह्यु एन संग ला त्याच्या संस्कृतप्रचुर "त्रीपीटक" या नावानेही ओळखले जाते असे गाईडने मोठ्या आस्थेने सांगितले. ह्यु एन संगने लिहिलेल्या भारताच्या मूळ प्रवासवर्णनावर आधारीत अनेक कथा, कादंबर्या व नाटके चीनमध्ये अजूनही प्रचलित आहेत.
पॅगोड्यातली ग्रंथसंपदा आता जास्त सुरक्षेसाठी संग्रहालयांत हलवली आहे. पण बर्याचशा मुर्ती मात्र तेथेच आहेत.
.
.
.
प्रवेशमुल्य देऊन पॅगोड्यामध्ये वरच्या मजल्यापर्यंत जाता येते. आम्ही फक्त सहाच मजले चढू शकलो कारण सातव्या मजल्याची डागडुजी चालू होती. पण सहाव्या मजल्यावरून झालेले शियानचे चौफेर दर्शनही खूप मनोहारी होते. हे चार दिशांचे चार फोटो.
.
.
.
आजच्या दिवसाची सुरुवात त्रासदायक झाली होती पण नंतरचा दिवस खूपच छान गेला. पण अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम बाकी होता. नशिबाने सकाळच्या गोंधळात Sun Lido Theater मधील तांग राजघराण्याच्या शो (Tang Dynasty Show) ची तिकिटे काढायला विसरलो नव्हतो. शॉवर घेऊन त्वरित तिकडे कूच केले. तांग राजवटीचा काळ हा खूप समृद्धीचा आणि भरभराटीचा होत. या काळात चीनमध्ये संगीत, नृत्य, पेहेराव व खानपानाच्या अनेक शैली प्रगत झाल्या. या कार्यक्रमामध्ये ते सर्व इतक्या उत्तम रितीने सादर केले आहे की दीड तास आपल्याला प्राचीन चीनमध्ये फेरफटका मारून आल्यासारखे वाटते. स्टेजच्या दोन्ही बाजूस LED screens वर इंग्लिशमधून कार्यक्रमात काय चालले आहेत याचा सारांश दाखवत असल्याने जरा जास्त मजा आली. कार्यक्रम जेवणासहित बुक केला होता कारण हे थिएटर खास चिनी मोदकांच्या (dumplings) जेवणासाठी प्रसिद्ध आहे. गरमागरम चिनी मोदकांचे असंख्य प्रकार बधायला आणि खायला मिळतात. वाफाळणारे मोदक बांबूच्या टोपल्यांतून आणून अगदी अगत्याने वाढतात. मी भारतीय आहे आणि मी गोमांस खात नाही असे सांगितल्यावर मुख्य स्वागतिकेने प्रत्येक मोदकांत काय आहे हे सांगून गोमांसवाले मोदक यात नाहीत असे अगदी दरवेळेस वाढताना सांगितले. शिवाय माझ्या टेबलावरच्या बाजूच्या चिनी मंडळींनाही सांगून मी नजरचुकीने गोमांस खाऊ नये याची अगत्याने व्यवस्था केली... इतकी की मला कसंसंच होईल एवढी!
हे काही चिनी मोदकाचे नमुने. यांच्या आतमध्ये अनेक प्रकारचे चवदार मांसाहारी अथवा शाकाहारी सारण असते.
.
जेवण संपल्यावर शो सुरू झाला. रंग आणि पोशाखांची कल्पना शब्दांनी येणे कठीण आहे. फोटोच थोडीबहुत झलक दाखवू शकतील.
.
सम्राज्ञीचे आगमन
सम्राटाचे आगमन
चांगआन चे संगीत
तांग सैनिकांचे नृत्य. यात नाचाबरोबर सैनिकांना व्यायामही व्हावा अशी याची रचना आहे.
काही प्रसिद्ध प्राचीन कवितांवर आधारीत नृत्ये.
.
.
.
.
तलवार नृत्य
सर्वांचे संरक्षण करणारा व जगाचे चालन करणार्या सहस्त्रबाहू रक्षकाचे नृत्य
.
.
.
The Imperial Feather Dance
.
Moonlit view of Kujiang
.
अजून काही दृश्ये
.
.
कार्यक्रमाचा संपूर्ण कलाकार समूह
शियानमध्ये गेल्यावर न चुकता बघावा असा हा कार्यक्रम. तो आपल्याला प्राचीन चीनची स्वप्नसफर करून आणतो.
कार्यक्रमाच्या फोटोंमध्ये एक गोष्ट लक्षात आली कां? तांग काळात चिनी स्त्रिया (निदान राजघराण्यातल्या आणि सरदारघराण्यातल्या) कपाळावर तांबडी टिकली लावीत असत ! प्राचीन चीनमध्ये इतर काही ठिकाणीही ही प्रथा असल्याचे आढळले.
(क्रमशः)
आज शियांनमध्ये फिरण्याचा दुसरा दिवस. चीनमध्ये जाण्याची ओढ ज्यांच्यामुळे वाटत होती त्यातील एक फार महत्त्वाची गोष्ट आज पाहायला जायचे होते.
चीन राजघराण्याचा आणि एकत्रित चीनचा पहिला सम्राट चीन शी हुआंग (Qin Shi Huang) याच्या कर्तृत्वाची आपण मागच्या भागात थोडी चर्चा केली आहेच. याच सम्राटाने मेल्यानंतरही आपल्या दिमतीला सैन्य असावे म्हणून आपल्या थडग्यात पुरण्यासाठी भाजलेल्या मातीचे हजारो सैनिकांचे पुतळे बनवले. ते नंतर त्याच्याबरोबर, इ पूर्व २१० / २०९ साली, थडग्यात पुरले गेले. १९७४ साली शियान पासून ३५ किमी वर विहीर खोदताना काही शेतकऱ्यांना काही पुतळे सापडले व नंतर सरकारने ही जमीन ताब्यात घेऊन उत्खननाचे कामे सुरू केले आणि त्यांच्या हाती एक पुतळ्यांचे भांडारच लागले !
विशेष म्हणजे हे पुतळे साच्यांच्या साहाय्याने न बनवता प्रत्येक पुतळा हा खरोखरच सम्राटाच्या सैन्यात काम करीत असलेल्या वेगवेगळ्या सैनिकाला पुढे ठेवून बनवलेला आहे. त्यामुळे कोणतेही दोन पुतळे एकसारखे नाहीत. अजूनही त्या ठिकाणी उत्खनन चालू आहे. पुतळे मातीचे असल्याने काम फारच कौशल्याने आणि संथगतीने करावे लागते. आतापर्यंत मिळालेले आणि विशिष्ट तंत्रांनी बांधलेल्या अंदाजावरून येथे एकूण ८००० सैनिक, ५२० घोड्यांसकट १३० रथ आणि १५० घोडदळाचे घोडे आहेत. या प्रकाराचा येवढा अजस्त्र उपक्रम आजवर जगात परत झाला नाही. चीनमधल्या प्राचीन अवशेषामध्ये या आकर्षणाचा पहिला क्रमांक मानला जातो. प्रत्यक्ष दर्शन केल्यावर खूप जणांची प्रतिक्रिया अशीच होती की: "या एका स्थळाच्या भेटीने चीनची सहल यशस्वी झाली." तरी बरे आजपर्यंत फक्त निम्मे ते २/३ पुतळेच खोदून काढले आहेत. शिवाय सम्राटाच्या मूळ थडग्याला तर हातही लावलेला नाही. कारण तेथे राजप्रासाद, बागबगीचे यांच्याबरोबर पार्याने भरलेल्या नद्या व तलाव आहेत. पार्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास न करता हे थडगे कसे खोदायचे हे अजूनही शात्रज्ञांना उमगले नाही. चला तर मातीच्या सैनिकाचे सैन्य बघायला.
येथे जाण्यापूर्वी आपल्याला हे सैनिक कसे बनवले असतील याची कल्पना येण्यासाठी एका मातीचे पुतळे बनवण्याच्या कारखान्यात नेतात. तेथे पुतळा बनवणे, त्याला भट्टीत भाजणे आणि मग रंगवणे या साऱ्या प्रक्रिया बघायला मिळतात.
.
.
नंतर अर्थात "अर्थकारण" सुरू होऊन कारखान्याच्या शोरूमची एका चक्कर होते. खरेदी करावयाची नसली तरी बरीच कलाकुसरीची कामे बघायला मिळतात.
.
तेथून पुढे मातीच्या सैन्याकडे निघालो. हे आहे उत्खनन क्षेत्राचे आवार.
हा आहे संपूर्ण उत्खनन क्षेत्राचे मॉडेल. यात जी बसक्या पिरॅमिडसारखी टेकडी आहे तेथे सम्राटाचे अजून न खोदलेले थडगे आहे. त्याच्यासमोर जे दोन आयत आहेत त्या ठिकाणांना सध्ध्या बरेच उत्खनन झाले आहे. इतर सर्व पांढरे ठिपके नंतरच्या सम्राटांची छोट्या थडग्यांच्या जागा दर्शवितात.
ह्या उत्खनन क्षेत्राचे एका वेगळेपण असे की जेथे या मूर्ती सापडल्या त्या सगळ्या क्षेत्राभोवती भिंत बांधून वर छप्पर टाकले आहे. अशा रीतीने सर्वच उत्खननक्षेत्र एका भल्यामोठ्या इमारतीनेच सुरक्षित केले आहे. उत्खनन केलेल्या प्रत्येक तुकड्याची शास्त्रीय पद्धतीने नोंदणी करून त्याच इमारतीतील एका मोकळ्या जागेवर त्याची साफसूफ करून मूर्तीची जुळणी करतात. आणि पूर्णं मूर्ती बनली की तिला तीच्या मूळच्याच जागेवर परत प्रस्थापित करतात. आपण हे सर्व इमारतीच्या भिंतींना लागून बांधलेल्या कट्ट्यावरून चारी बाजूंनी फिरून पाहू शकतो. या कल्पक आयोजनामुळे थडग्याची रचना व त्यांतील सैनिकांच्या मूर्तींची मांडणी अगदी मूळ जागेवर व मूळ स्वरूपात दिसते.
.
.
या जागेवर जमा केलेले तुकडे जोडून मूर्ती बनवल्या जातात.
.
.
आणि हे घोडे
प्रत्येक मूर्तीचा चेहरा, उंची व पेहराव (युनिफॉर्म) हे प्रत्यक्ष सैनिकांबरहुकूम बनवले असल्याने स्पष्टपणे वेगवेगळे दिसतात.
सहलीचा पुढचा टप्पा एका छोट्या शॉपिंग एरिया व उपाहारगृहातून आहे. त्याच्या प्रवेशद्वाराजवळ एका दुकानात ज्या चार जणांच्या शेतांत हे भांडार सापडले त्यापैकी एक शेतकरी बसला होता. वर भिंतीवर त्याचे चित्र आहे आणि खाली तो स्वतः: बसला आहे. त्याच्या दुकानातून १०० युवानचे माहितीपुस्तक विकत घेतले की त्यावर सही करून देत होता. याला चिनी कम्युनिस्ट कॅपिटॅलीझमचे उत्त्तम उदाहरण म्हणता येईल !
पहिल्या मोठ्या उत्खनन क्षेत्राजवळ अजून एक लहान उत्खनन क्षेत्र आहे. त्यामध्ये सैन्याची मुख्य छावणी (Head Quarter) आहे हे त्यातील मांडणीवरून व मूर्तींच्या अधिकाररपद दाखवणाऱ्या पोशाखावरून ओळखता येते.
शेजारीच एक प्रदर्शन आहे. त्यात पूर्णावस्थेत सापडलेल्या व काही विशेष महत्त्व असलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
बसलेला धनुर्धर
बाण मारण्याच्या तयारीत असलेला धनुर्धर
अधिकारी
सेनापती
मूर्ती इतक्या बारकाईने बनवल्या आहेत की प्रत्येकाची केशरचनाही स्पष्ट दिसते.
उत्तम अवस्थेत सापडलेला संपूर्ण रथ
संग्रहालयातून बाहेर पडलो तर चीनच्या अख्ख्या सफरीत ही एकच म्हातारी बाई भीक मागताना दिसली.
आजच्या दिवसात बानपो या नावाच्या एका जागेलाही भेट दिली. येथेही उत्खननात सापडलेले ६००० वर्षांपूर्वीचे खेडे आहे. तेही त्याच्या सभोवती एका मोठी इमारत बांधून सुरक्षित ठेवले आहे. ही पुरातन वस्तू जतन करण्याची पद्धत वेगळी आणि खरोखरच innovative आहे.
हे त्या ६००० वर्षांपूर्वीच खेड्याचे काही अवशेष
.
आणि ते खेडे त्या काळी कसे दिसत असावे याचा संशोधाकांचा अंदाज.
परत येईपर्यंत बराच वेळ झाला. रात्रीचा शो बघायला उशिरा नको म्हणून त्वरित हॉटेलाच्या रेस्तरॉ मध्ये गेलो. वेटरने एक भले मोठे मेन्यु कार्ड आणून दिले... संपूर्ण चिनी भाषेतले. नशिबाने दर पानावर पदार्थांचे मोठे मोठे फोटो होते. पण एकाही पदार्थांची ओळख पटेना. त्या दिवशी गुरुवार होता. म्हणजे मांसाहार वर्ज्य. इंग्लिश समजणारी एकही व्यक्ती रेस्तरॉमध्ये नव्हती. वेटरमण्डळींशी खाणाखुणांची बरीच झुंज झाली. पण काही फायदा झाला नाही. शेवटी केवळ चित्रे बघून एक कोबीचा पदार्थ, एक वांग्याचा पदार्थ आणि भात सांगितला. भाताचे ठीक होते पण कोबी फक्त व्हिनेगार आणि लाल मिरच्यांमध्ये मुरवलेली होती. वांग्यांची भाजी म्हणजे बोट बोट लांब लाल मिरच्यांच्या भाजीत नमुन्यादाखल काही वांग्याच्या फोडी होत्या. दोन घास घेतले तेव्हाच ध्यानात आले की काही खरे नाही. भूकतर सॉलिड लागली होती आणि शोची वेळ जवळ येत होती. परत दुसरे काही मागविण्यासाठी वेळ नव्हता. जबरदस्तीने जेमतेम निम्मे पदार्थ खाऊन बाहेर पडलो.
चीनबाहेर म्हणजे भारतात किंवा अगदी पाश्चिमात्य देशांतही जे पदार्थ चिनी खासियत म्हणून प्रचंड प्रमाणात खपवले जातात त्यातला एकही पदार्थ चीनमध्ये पाहायला मिळाला नाही !
रात्री "The Great Chang'an " हा शो बघितला पण थिएटरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने या मनोहर कार्यक्रमाचे फोटो नाहीत ह्याचा खेद आहे. पण चिंता नको. चीनमध्ये जागोजागी एकाहून एक सरस कार्यक्रम आहेत. पुढे त्यांचे फोटो येतीलच.
(क्रमशः)
जुने लिजीआंग... पृथ्वीवरचे नंदनवन (दायान)
आजचा सफरीचा सातवा दिवस. सकाळी ७.३५ चे विमान पकडून लिजीयांगकडे प्रयाण केले. शियान-लिजीयांग हे अंतर विमानाने १६१० किमी आहे आणि उडून जायला २ तास ४० मिनिटे लागतात. नेहमीप्रमाणे विमानातली खिडकीजवळची खुर्ची मागून घेतली. विमानतळावरच्या चेक-ईन काउंटरवरच्या बहुतेक मंडळींना बर्यापैकी इंग्लिश येते, शिवाय गाईडही बरोबर असल्याने माझा विमानाची खिडकीजवळची खुर्ची पकडण्याचा छंद मी सर्व चीनभर पुरा केला. चिनी मंडळींनीही त्याला हसतमुखाने साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार !
लिजीआंग हे चीनच्या युन्नान (Yunnan) राज्यात आहे. युन्नान चीनच्या दक्षिण-पश्चिम टोकाला आहे. वरून ब्रम्हदेशाला थोडासा वळसा घालून तिबेटमार्गे युन्नानच्या आणि आपल्या अरुणाचल प्रदेशाच्या सीमांमघ्ये फारतर १०० एक किमीचे अंतर आहे. अर्थात हा भाग अत्यंत दुर्गम आहे व हे दोन भाग जोडणारे रस्ते नाहीत. तरीही भारताच्या सीमेच्या इतके जवळ आणि तेही वाकड्या वाटेने आल्याची कल्पना मजेची वाटली. युन्नान म्हणजे हिमालय पर्वताचे ब्रम्हदेशातून निघून चीनमध्ये शिरलेले पूर्वेचे टोक. हिमालयाचे सौंदर्य या भागात ओसंडून वाहत असले तरीसुद्धा हे शेवटचे टोक असल्याने पर्वतराजींची उंची ३००० मीटरच्या वर जात नाही तसेच असंख्य डोंगरदर्यांमुळे एक प्रकारचे प्रेशर कुकरसारखी परिस्थिती होते व हवामान तीन चार बर्फाळ महिने सोडले तर इतर वेळी गुलाबी थंडीचेच असते. उत्तम हवामान व भरपूर पाणी यामुळे हे राज्य वनस्पतीच्या विविधतेने बहरलेले आहे. चीनमधल्या ३०,००० पेक्षा जास्त वनस्पतींपैकी १७,००० पेक्षा जास्त या एकट्या राज्यात आहेत.
खालील नकाशा आंतरजालावरून साभार घेतलेला आहे.
नजर लागेल असा निसर्ग, प्राचीन महत्त्वाची ठिकाणे आणि स्थानिक जमातींचे समृद्ध लोकजीवन यामुळे हे राज्य UNESCO World Heritage Sites नी भरलेले आहे. त्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना आपण भेट देणार आहोत. चला तर करूया आपण सफर या पृथ्वीवरच्या स्वर्गाची.
===================================================================
लिजीयांगला विमान उतरतानाच दिसलेल्या या नेहमीच्या चिनी छपरांपेक्षा वेगळी छपरे असलेल्या घरांनी आणि गर्द हिरवागार परिसराने आतापर्यंत पाहिलेल्यापेक्षा काहीतरी वेगळे बघायला मिळणार याची जाणीव करून दिली.
साधारणपणे ३० ते ४० मिनिटाच्या चारचाकीच्या प्रवासानंतर आपण विमानतळावरून जुने लिजीयांग गावाच्या (Lijiang Old Town) सीमेवर पोहोचतो. येथून पुढे वाहनांना बंदी आहे. फक्त तुमचे पाय आणि घोड्यांचे खूर यानाच लिजीयांगच्या रस्त्यावरून चालण्यास परवानगी आहे.
हे लिजीयांगचे पहिले दर्शन
या रस्त्यावरून पाचएक मिनीटात चालत हॉटेलवर पोहोचलो.
मधूनमधून किंचित रिमझीम पावूस चालू होता, छान गुलाबी थंडी होती. म्हटले, वा ! प्रवासाचा मूड तर उत्तम जमलाय ! हॉटेलवर अकरा वाजताच पोहोचल्याने चेक-ईनची वेळ अजून झालेली नव्हती. गाईड म्हणाली उगाच इथे थांबण्यापेक्षा जेवून घ्या म्हणजे आपल्याला फिरायला जास्त वेळ मिळेल. मग तुमच्या ईटिनेररिमध्ये आहेत त्यापेक्षा अजून काही महत्चाची ठिकाणे मी तुम्हाला दाखवू शकेन. जास्त ठिकाणांचे दर्शन म्हटल्यासरशी मी मनात म्हटले की, "नेकी और पुछ पुछ ! ये तो अपुनका वीक पाईंन्ट हाय !!" सामान हॉटेलच्या सुपूर्द कले आणि बाहेर पडलो.
(आवांतरः टूरमध्ये येथून पुढे दहा दिवस स्थानिक लोकांना खास प्रशिक्षण देऊन बनविलेले गाईड होते. सर्वसाधारणपणे असे गाईड खूपच मनमिळाऊ होते व त्यांचा कल फक्त इटिनेररीलाच चिकटून राहण्यापेक्षा आपल्या गावांतील जास्तीतजास्त ठिकाणे दाखवण्याकडे होता. शिवाय तिथले स्थानिक असल्याने त्यांच्याकडून सखोल आणि विश्वासू माहिती मिळाल्याने सहलीत अजूनच जास्त मजा आली.)
लिजीयांगमध्ये नाशी (Naxi) अल्पसंख्य जमातीची वस्ती प्रामुख्याने आहे. गाईडही त्याच जमातीची होती. तर मग तिच्या खास शिफारशीने आम्ही एका नाशी उपाहारगृहात गेलो.
तिच्याच शिफारशीने एक खास स्थानिक पदार्थ मागवला. एका मोठ्या बाऊलमध्ये एकदम पातळ वाफाळणारे शेवयांचे सूप (clear noodle soup ) व त्याच्याबरोबर बीन स्प्राऊट्स, ऊलपात, एक प्रकारची उकडलेली चिनी पालेभाजी, फोडलेले अंडे, एक पोर्कची स्लाईस व एका बाऊलमध्ये जास्तीच्या शेवया. ज्याने त्याने आपापल्या चवीप्रमाणे पदार्थ एकत्र करून खायचे असते. गाईडने सर्व पदार्थ एकदम सुपात टाकले आणि म्हणाली असेच छान लागते. मग काय आम्हीही हर हर महादेव (मनातल्यामनात) म्हणून तिचे अनुकरण केले. सूप खरंच चवदार झाले होते.
पहाटे विमान पकडायचे असल्याने शियानच्या हॉटेलमधली न्याहरी चुकली होती, विमानातही थातूरमातूरच खाणे झाले होते. त्यामुळे त्या नवीन प्रकारच्या पोटभर सुपाने छान तरतरी आली आणि आम्ही नव्या जोमाने लिजीयांगची सफर करायला तयार झालो. सहलीला जाताना थोडे बहुत संशोधन करून नेहमीची मळलेली वाट सोडून जरा वेगळे काहीतरी बघायची माझी सवय बर्याचदा एकदम अनपेक्षित आनंद देऊन जाते. पुढचे सहा दिवस हे त्याचे उत्तम उदाहरण होईल. लिजीयांगच्या रस्त्यावरून चालतानाच हळूहळू त्याचे सौंदर्य नजरेत भरू लागले.
लिजीयांग हे गांव ८०० वर्ष जुने आहे. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली जलव्यवस्था हे लिजीयांगचे एक विशेष आहे. गावाच्या उत्तरेला एक ब्लॅक ड्रॅगन पूल नांवाचा डोंगरांतून वाहणार्या पाण्यापासून तयार झालेला तलाव आहे. तेथून एका ओढ्याने पाणी गावाच्या मुख्य चौकापर्यंत येते. चौकामधल्या दोन रहाटगाडग्यांच्या मदतीने हे पाणी सर्व गांवभर छोट्या ओहोळांनी फिरवले जाते. ही आहे लिजीयांगची प्राचीन काळापासून आजतागायत चालू असलेली २४ तास वाहत्या पाण्याची व्यवस्था !
ही आहेत मुख्य चौकातील दोन रहाटगाडगी.
त्यांच्याशेजारी आहे नाशी जमातीचे चिन्ह. चिन्हात मध्यभागी बेडूक असून त्याच्या सभोवती गोलाकारात नाशी लोकांच्या जीवनात महत्त्वाचे असलेले १२ प्राणी आहेत. जणू काही नाशी राशीचक्रच !
चौकातून पुढे एक दोनतीनशे वर्षे जुने पारंपरिक नाशी घर बघायला गेलो. संपूर्ण घर सागवान व शिसूचे बनवल्यासारखे दिसले. प्रत्येक लाकडी दरवाजा आणि भिंत अप्रतिम कोरीवकामाने सजलेली होती.
एका भिंतीवर मालकाच्या पूर्वजाचे ८०-९० वर्षे जुने फोटो दिसले.
त्या घरातून बाहेर पडून लिजीयांगचा फेरफटका परत सुरू केला. एखादे गांव सुंदर सुंदर म्हणजे किती सुंदर असू शकते हे जुन्या लिजीयांगला भेट दिल्याशिवाय कळणे कठीण आहे. हे फोटो आहेत जुन्या लिजीयांगच्या दायान या उपनगराचे.
फोटोत जे फुगे दिसताहेत ते आदल्या दिवशी नाशी जमातीचा व्हॅलेंटाईन डे सारखा एक सण होता त्याकरिता होते. पण इतर नैसर्गिक सौंदर्य मात्र नेहमीचेच आहे असे गाईडने सांगितले.
प्राचीन काळापासून लिजीयांग हे चहा व तंबाखूच्या व्यापाराचे एक मोठे ठिकाण आहे. पूर्वी नाशी पुरुष खेचरांवर चहा व तंबाखू लादून हिमालयातील दुर्गम मार्गाने तिबेटमध्ये ल्हासा येथे नेऊन विकत असत. या व्यापाराला जाऊन यायला सहा महिने लागत असत. त्यामुळे नाशी जमातीत स्त्रियांनी शेतकाम करणे, भरतकाम करणे आणि घर सांभाळणे तर पुरुषांनी ल्हासावारी करून व्यापार सांभाळणे अशी कामाची विभागणी सर्वमान्य झाली होती ती तो खडतर प्रवास थांबला तरी चालू आहे. बहुतेक कामे स्त्रियाच करतात व पुरूष जमलेतर व्यापार नाहीतर आळस करतात असा नाराजीचा सूर स्त्री गाइडकडून ऐकला. नाशी या शब्दाचा अर्थ सावळा असा आहे. सतत उन्हातान्हात काम करावे लागल्याने इथल्या बर्याच लोकांचा वर्ण काहीसा सावळा आहे आणि त्यावरूनच त्या समाजाला नाशी हे नांव पडले आहे.
ज्या चौकांतून व्यापारी आपली उलाढाल करीत असत व सामानाने लादलेली खेचरे घेऊन ल्हासाकडे रवाना होत असत तो हा चौक. सद्द्या त्याचा उपयोग फिरून फिरून थकलेल्या प्रवाशांना खिनभर बूड टेकवायला होतो.
तेथून पुढे आम्ही लिजीयांगच्या मध्यभागी असलेल्या सिंहटेकडीवर (Lion Hill) गेलो. या टेकडीवर एक छोटासा पण टुमदार आणि कलाकुसरीने समृद्ध असा सहा मजली पॅगोडा आहे.
पॅगोड्यावरून सर्व गावाचे मनोहर दर्शन होते. पूर्वेकडे विशिष्ट कौलारू घरे असलेले जुने लिजीयांग तर पश्चिमेकडे नवीन आधुनिक लिजीयांग दिसते. तसेच जर आकाश निरभ्र असेल तर 'जेड ड्रॅगन स्नो पर्वत' नांवाच्या नाशी समाजाने पवित्र मानलेल्या पर्वतचेही दर्शन होते. या पर्वताशी निगडित अनेक नाशी दंतकथा, कविता, नृत्ये आणि नाटके आहेत.
पॅगोडातून जुन्या काळच्या लिजीयांगच्या गव्हर्नरचे राजभवन दिसते. तेथे आत जायला परवानगी नाही पण झूम वापरून या वैशिष्ट्यपूर्ण घराची छबी कैद करून टाकली.
पॅगोड्यावरून खाली उतरताना ध्यानात आले की अरे टेकडीच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहताना काय पाहू आणि काय नको असे होऊन टेकडीवरच्या पॅगोडाच्या सभोवती असलेल्या बागेकडे लक्षच गेले नव्हते !
बागेत थोडासा फेरफटका मारत असताना तेथल्या एका मोराने केकावलीसह नृत्य करून अस्मादिकांचे स्वागत केले !
नंतर हॉटेलवर परत येऊन खोली ताब्यात घेतली. गाईड तासाभराने येते, उरलेल्या वेळात अजून काही ठिकाणे बघता येतील असे म्हणाली. हॉटेल फारच छान होते. एका प्राचीन इमारतीचा जीर्णोद्धार करून संपूर्ण ओकच्या लाकडाने बनवलेली दुमजली इमारत होती पण आत मात्र उत्तम आघुनिक सुविधा होत्या... त्या प्राचीन नव्हत्या ! हा हॉटेलचा प्रवेशमार्ग.
मस्त शॉवर, कॉफी आटपून ताजातवाना झालो तेवढ्यात बरोबर एक तासाने गाईड परत आली आणि आमची पुढची भटकंती सुरू झाली. ही भेट होती ब्लॅक ड्रॅगन पूल म्हणजे अगोदर ज्याचा उल्लेख लिजीयांगच्या पाणीपुरवठ्याबद्दल लिहिताना केला होता ते सरोवर. गावाच्या पाणीपुरवठ्यासारख्या शास्त्रीय आणि रुक्ष व्यवस्थेतही आनंददायक सौंदर्य आणण्याचा चिनी माणसाचा सोस जागोजागी दिसून आला. हा तलाव हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. या सहलीची सुरुवात गावापासून तलावापर्यंतच्या अर्धा एक तासाभराच्या सुंदर रस्त्याने होते.
तलावाचा परिसर बागा, एक छोटा सफेद संगमरवरी पूल, छोट्या छोट्या चिनी धाटणीच्या इमारती आणि हे सौंदर्य आरामात बसून डोळ्यांनी टिपून घेता येईल अशी जागोजागी केलेली आरामदायक बसण्याची सोय यामुळे दिवसाचा सगळा शीण दूर झाला.
तेथे एक ड्रॅगन गॉड (Longshen) मंदिर आहे. त्यालाही धावती भेट दिली.
परतताना एका छोटेखानी नाशी संग्रहालयाला भेट दिली. त्याच्या आवारात नाशी संस्कृतीचे प्रतीक असलेले बेडूक व १२ प्राण्यांचे वर्तूळ नदीत सापडणार्या छोट्या लंबगोल हिरव्या आणि पांढर्या दगडांचा उपयोग करून बनवले होते.
शिवाय ही एकाच झाडाच्या खोडापासून बनवलेली कलाकृती बघितली. जवळून निरखून पाहिले तर या लाकडी शिल्पात कितीतरी प्राणी व पक्षी लपलेले दिसतात !
परत येईपर्यंत बर्याच चालण्यामुळे थोडा शीण आला होता म्हणून लिजीयांगच्या प्रसिद्ध चहाभवनामध्ये गेलो. ही इमारतही बधण्यासारखी आहे. येथून वर पायर्या चढून गेल्यावर पहिल्या मजल्यावर ते चहाभवन आहे.
येथे लिजीयांगचा जगप्रसिद्ध चहा पारंपरिक पद्धतीने कसा बनवतात त्याचे प्रात्यक्षिक पाहून तो बनवलेला चहाही प्यायलो.
चहाची झाडे साधारणपणे एक मीटरभर (थोडेसे जमा-उणे) उंचीची झुडुपे असतात हे सर्वश्रुत आहेच. पण त्याबरोबर लिजीयांगमध्ये एक खास प्रकारचा प्युएर टी (Puer Tea) बनतो. याची झाडे बरीच उंच म्हणजे साधारपणे नीलगिरीच्या मध्यम आकाराच्या झाडाएवढी उंच वाढतात. एक खास प्रकारची प्रक्रिया करून व दाब देऊन चहाच्या पानाचे वेगवेगळ्या प्रकारचे गठ्ठे बनवतात. या प्रकारे हा चहा अगदी पंधरावीस वर्षेही टिकतो असा स्वागतिकेचा दावा होता. एक छोटा तुकडा तोडून त्याला गरम पाण्यात एक मिनिटभर ठेवून चहा तयार होतो. त्याच चहाच्या तुकड्याचा वीस ते तीस वेळा असाच उपयोग केला तरी चहाची चव तीच राहते असाही तिने दावा केला. आम्ही तीन वेळेपर्यंतच अनुभव घेतला आणि कॉफीचे शौकीन असल्याने व संध्याकाळचे जेवण आटोपून रात्रीचा शोही बघायचा असल्याने तेथून पुढे निघालो.
आता आम्ही मोर्चा वळवला एका खास पारंपरिक नाशी रेस्तरॉकडे.
हे त्याचे प्रवेशद्वार.
नेहमीसारखेच मोठ्या चित्रांचे चिनी मेन्युकार्ड पुढे आले.
पण गाईड बरोबर असल्याने आज चिंता नव्हती ! काय खायचे हे ठरल्यानंतर फिश टँकजवळ जाऊन हा मासा निवडला.
स्वयंपाक्याने त्याचे अनेक प्रकार बनवले... मध्यल्या मांसल भागाची सुशीसारखी नाशी डीश, फ्राईड फिश स्कीन हा एक नवीनच पदार्थ, डोके व शेपटाच्या भागापासून चवदार सूप, आणि हो, माशाचे सारण भरलेल्या डंपलींग सारख्या पण तळलेल्या करंज्या. मस्त बेत होता.
खास नाशी पद्धतीचे खाणे झाल्याने आणि विशेष म्हणजे ते चवदार असल्याने मजा आली. येथून पुढे नाशी लोकांच्या पारंपरिक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम बघायला निघालो. या ऑर्केस्ट्राने जगभर खूप ठिकाणी प्रयोग केले आहेत... अगदी न्युयॉर्कमध्ये युनोमध्येही. परतू नवीन नाशी पिढीला या संगीतात आता फार रस राहिला नाही, त्यामुळे या वादक-गायक संघाचे अॅव्हरेज वय साठीच्या आसपास आहे ! खूप जणांचे वय अगदी ८० पेक्षा जास्त आहे. पण ते अजूनही जोमाने हा कार्यक्रम रोज सादर करतात हे विशेष.
ही आहे त्या कार्यक्रमाच्या रंगमंचाची खास नाशी पद्धतीने केलेली सजावट.
आणि हा संपूर्ण कलावंत संच कार्यक्रम सादर करत असतानाचा फोटो.
संपूर्ण कलावंतांचा संच त्यांच्या रंगीबेरंगी पोशाखासह बधायला छान वाटते. एकंदरीत सर्व चिनी संगीत हे वरच्या पट्टीत व चिरक्या आवाजात गायले जाते त्यामुळे एक अनुभव म्हणून ठीक आहे पण परत परत ऐकायला आवडेल असे वाटत नाही. त्याविरुद्ध त्यांचे नृत्याचे बहुतेक सगळेच कार्यक्रम रंगीबेरंगी कलात्मक आकर्षक पोशाख, उत्तम नाचपद्धती आणि सुंदर निर्देशन यामुळे खुपच बहारदार वाटले... पुन्हा प्रसंग आल्यास जरूर बघावे असे.
थोडी आवांतर माहिती: खालच्या चित्रात एका वादिकेने दुपट्ट्यासारखे वस्त्र पुढे गाठ मारून मागे नेले आहे. ही नाशी लोकप्रथा आहे हे सांगण्याची की ही स्त्री विवाहित आहे. अविवाहित स्त्रिया तेच वस्त्र तसेच पण गाठ न मारता वापरतात. अर्थात सद्द्याची विशीपंचविशीची पिढी सर्रास शर्ट-पँट-जीन असे पाश्चात्त्य पोशाखच वापरू लागली आहे.
(क्रमशः)
सहलीचा आठवा दिवस उजाडला. आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर गोष्टी बघायच्या आहेत असे गाइडने म्हटले होते त्यांमुळे उत्सुकता बरीच ताणली गेली होती. त्यामुळे जरा लवकरच उठून अंघोळ व न्याहारी आटपून तयार होतो न होतो तोच गाइड हजर. इटिनेररीप्रमाणे आज लिजीयांगाची उरलेली दोन उपनगरे पाहायची होती... शुहे आणि बैशा.
शुहे हे लिजीयांगच्या एका टोकाला असल्याने पायपीट वाचविण्यासाठी प्रथम चारचाकीने गावाला वळसा घालून मग शुहे मध्ये पायी प्रवेश केला. जोपर्यंत गाडीत होतो तोपर्यंत एका खेड्यापेक्षा काही खास वेगळे दिसत नव्हते. पण थोडेसे अंतर पायी गेल्यावर गावात शिरणाऱ्या पुलाजवळ आलो आणि शुहे आपले रूपरंग उघडे करू लागले.
.
.
आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसे शुहे आपल्या सौंदर्याचा एकेक पदर उलगडून दाखवू लागले.
हे शुहेमधले रस्ते
.
.
.
.
या वरच्या दोन रस्त्यांच्या बाजूला जे भोकाभोकाचे खांब आहेत ते पूर्वी व्यापारी आपले घोडे बांधून ठेवायला वापरत असत. आता लोखंडी घोडे रस्त्यांच्या बाजूला उभे आहेत !
.
.
गावातला एक पूल
ही आहेत काही रेस्तराँची प्रवेशद्वारे
.
हमरस्त्याच्या बाजूचे एक रेस्तराँ
काही खाजगी घरे
.
.
एक छोटा मॉल
भाजीबाजार
अजून काही शब्दांच्या पकडीत न येणारे...
........................
.
.
परतीच्या रस्त्यात चीनमधला पहिला चिखलाने भरलेला रस्ता बघितला. फक्त ५० एक मीटर लांबीचा ! शिवाय गाडीत असल्याने निर्धास्त होतो.
काय गंमत आहे नाही कां? चीनमध्ये रस्त्यात चिखल दिसणे ही फोटो काढ्ण्याइतकी विशेष गोष्ट वाटली ! कारण अख्ख्या जुन्या लिजीयांगमध्ये रीपरीपणार्या पावसात दोन दिवस हिंडलो पण बुटांना अजिबात चिखल लागला नव्हता.
तेथून पुढे बैशा या लिजीयांगच्या तिसर्या उपनगरात गेलो. हे उपनगर प्राचीन काळी लिजीयांग प्रांताची राजधानी होते. तेथला एका वाडा त्यातील उमरावाने बनवून घेतलेल्या काहीशे वर्षे जुन्या भित्तिचित्रांमुळे प्रसिद्ध आहे. वाड्याचे प्रवेशद्वार व आवार छान होते पण काही काळापूर्वी लागलेल्या आगीत चित्रांचे बरेच नुकसान झाले आहे. शिवाय फ्लॅशने नुकसान होऊ नये म्हणून चित्रांचे फोटो काढण्यास मनाई होती.
पुढे एक छोटे खेडेगाव लागले.
ते नाशींच्या बाटिकासारख्या दिसणार्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. त्या कलेचे काही नमुने
........................
.
जरा पुढे गेल्यावर पूर्वीच्या काळी राजेरजवाड्यांसाठी रेशमाचे भरतकाम करणार्या एका खानदानी कुटुंबाला भेट दिली. अनेक अप्रतिम रेशमी भरतकामाचे नमुने पाहायला मिळाले. सगळ्या कलाकृती काचेच्या फ्रेममध्ये असल्याने दिव्यांची प्रतिबिंबे फोटोत आली आहेत त्याबद्दल दिलगीर आहे.
........................
.
हे भिंतभर मोठे असलेले भरतकाम सगळ्या कुटुंबाने मिळून एकूण सहा महिने खपून बनवले आहे.
ही पुढची कलाकृती एकदम मन मोहून गेली. सर्वसाधारणपणे मी फिरताना खरेदी करत नाही. पण हे भरतकाम पाहून मोह आवरला नाही.
हे आवारातले ऑर्किड कॅमेर्याला फार आवडले.
येथे लिजीयांगची गावाची सफर संपली आणि लिजीयांग जवळच्या दोंगबा नावाच्या दरीत एक खास "Impression Lijiang" नावाचा शो बघायला निघालो. जागतिक कीर्तीच्या Zhang Yimou या चिनी दिग्दर्शकाने याचे आयोजन केले आहे. झांगने The Flowers of War, House of Flying Daggers, Raise the Red Lantern, इत्यादी आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरवलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या कार्यक्रमात लिजीयांगच्या १० वेगवेगळ्या जमातींतील ५०० पुरुष-स्त्रिया काम करतात आणि लिजीयांगच्या समाजजीवनाचे दर्शन घडवितात. या शोचे प्रचंड उघडे थिएटर (open air theater) दोगबा दरीत अश्या तर्हेने बांधले आहे की खुद्द जेड ड्रॅगन पर्वत याच्या मागच्या पडद्याचे काम करतो. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय या थिएटरच्या भव्यतेची कल्पना करणे कठीण आहे.
ही आहेत त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे...
.
.
.
.
.
.
पुढचे आकर्षण होते Yunshanping on Jade Snow Mountain म्हणजे जेड पर्वतावरील स्प्रूस वृक्षांच्या जंगलामधील गवताचे मैदान (meadow). साधारणपणे ४५ मिनिटाच्या चारचाकी प्रवासानंतर आपण जेड स्नो पर्वताच्या पायथ्याशी पोहोचतो. तेथून केबल कार आपल्याला ३२४० मीटर उंचीवरील जंगलात नेते. तेथे धुके आणि तुरळक पावसामध्ये उंच स्प्रूस वृक्षांच्या जंगलात फिरत फिरत
आपण एकदम एका विस्तीर्ण गवताळ मैदानावर पोहोचतो.
हिरव्यागार मैदानावर चिमुकल्या पांढर्या-पिवळ्या फुलांचे शिंतोडे उडवलेले दिसत होते.
परतण्याचा विचार करत होतो तोच धो धो पावूस सुरू झाला त्यामुळे चालत परतण्याचा विचार सोडून सरळ सरकारी इलेक्ट्रिक बस पकडून आमच्या चारचाकीपर्यंत आलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. वाटेत याक मंडळींचे दर्शन झाले.
आज रात्री Lishui Jinsha Singing & Dancing Show बघितला. हा लिजीयांगमधील नाशी व इतर जमातींच्या जीवनावर आणि त्याच्या लोककथांवर आधारीत संगीत व नृत्याचा फारच बहारदार कार्यक्रम होता. ही आहेत त्यातली काही क्षणचित्रे.
.
.
.
.
.
.
.
.
या पृथ्वीवरच्या नंदनवनातले दोन दिवस कसे भुरकन उडून गेले ते कळलेच नाही. उद्या निघायचे आहे खुद्द पृथ्वीवरचा स्वर्ग बघायला, तो आता अजून किती मनोहर असेल याचा विचार करताना केव्हा झोप आली ते कळलेच नाही.
(क्रमशः)
आजचा प्रवासाचा नऊवा दिवस. आज लिजीयांग ते शांग्रीला हा चार तासांचा चार चाकीचा प्रवास करायचा होता व वाटेत 'यांगत्से नदीचे पहिले वळण' व 'लीपींग टायगर गॉर्ज' हे दोन प्रेक्षणीय थांबे होते. वाहनचालक तुम्हाला घेऊन जाईल व अर्ध्या वाटेवर शांग्रीलाची गाईड येऊन भेटेल असे सांगून लिजीयांगच्या गाईडने निरोप घेतला. वाहनचालकाची दोन दिवसांची ओळख होतीच (त्याचं नांव होतं 'ख'). भला माणूस होता पण त्याचे इंग्लिशचे आणि माझे चिनी भाषेचे ज्ञान एकाच स्तरावरचे होते -- म्हणजे शून्य होते! पण दोन दिवसांत आमच्या खाणाखुणा एकमेकाला समजू लागल्या होत्या. शिवाय प्रश्न फक्त दोन तासांचाच होता. आमची गाडी पृथ्वीवरच्या स्वर्गाच्या दिशेने धावू लागली.
विसाव्या शतकाच्या दुसर्या भागापासून शांग्रीला हा विभाग देचेन (Deqen) अथवा Xamgyi'nyilha या नांवाने ओळखला जात असे. परंतू २००१ पासून चिनी सरकारने टूरिझम वाढवायच्या उद्देशाने त्याचे शांग्रीला या नावाने परत बारसे केले. शांग्रीला हे नांव ठेवण्याचे कारण असे की १९३३ साली जेम्स हिल्टन नावाच्या लेखकाने 'Lost Horizon' नावाची कादंबरी प्रसिद्ध केली. तिची कहाणी काहीशी अशी: १९३१ साली ब्रिटिश लोकांनी भरलेल्या एका विमानाचे अपहरण होते व नंतर त्याला हिमालयाच्या दुर्गम भागांत क्रॅशलँडींग करावे लागते. त्यातून वाचलेले चार जण एका जवळच्या लामासरीमध्ये आसरा घेतात. या भागाचे वैशिष्ट्य असे की इथे राहणारे लोक फारच हळूहळू वृद्ध होत असतात, आजारी पडत नाहीत, इ. इ.... म्हणजे जवळजवळ जणू स्वर्गातल्या वातावरणात राहतात असे दाखवले आहे. स्थानिक खांपा तिबेटी लोकांच्या मते शांग्रीला हे नांव "Shambala," (म्हणजे तिबेटी भाषेमध्ये "स्वर्ग") चे अपभ्रंशित इंग्लिश रूप आहे. शांग्रीला जिल्ह्यात तिबेटी वंशाचे लोक बहुसंख्य आहेत.
ही कादंबरी इतकी गाजली की तिच्यावर त्याच नांवचे दोन प्रसिद्ध चित्रपट, एक ब्रॉडवे म्युझीकल (जे फारसे चालले नाही), बी. बी. सी. वर बारा तासांची सीरियल, इ. इ. होऊन शांग्रीला हे नांव जगप्रसिद्ध झाले. त्यानंतर अजून बर्याच जणांनी शांग्रीलावर बरेच काही लिहिले, दाखवले. शांग्रीला ही जागा आपल्या देशातच असल्याचा दावा नेपाळने ही केला. त्यामुळे या सर्व प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी चीनने कादंबरीतील शांग्रीलाच्या वर्णनाशी मिळता जुळता असलेल्या या युन्नानमधल्या प्रदेशाचे नामकरण शांग्रीला असे करून शिवाय त्यातल्या काही भागाला युनेस्कोमान्य हेरिटेज साईट करवून त्या नांवावरचा आपला हक्क बळकट केला आहे.
===================================================================
तर ख आणि मी दोघेच चारचाकीने निघालो. आजूबाजूचा परिसर पाहून हा दोन गावांतला प्रवास नसून एखाद्या प्रेक्षणीय स्थळामधला फेरफटका आहे असे सारखे वाटत होते. 'ख' ही कसलेला टूर वाहनचालक निघाला. खाणाखुणांनी म्हणाला की कुठे फोटो काढायचा असेल तेव्हा थांबायला सांगा. एकदोन ठिकाणे सोडून थांबायचा मोह आवरला आणि बरेचसे फोटो चालत्या गाडीतूनच काढले... नाहीतर चार ऐवजी आठ तास लागले असते शांग्रीलाला पोहोचायला!
.
वाटेत एक बुद्धमंदीर लागले.
.
डोंगराच्या अगदी कड्यावर असलेले निर्जन प्रदेशातले ते एकाकी मंदिर, पलीकडचा खोल कडा, प्रचंड धुक्यानं वेढली हिरवाई, धुके आणि ढगांनी काढलेली नक्षी आणि त्यातून मधूनच डोकावणार्या पर्वतराजी... हे सगळे एकदम वेगळ्याच जगात घेऊन गेले... जणू स्वर्गाची दारे किलकिली होऊ लागली होती!!!
.
.
या सर्व निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत पुढची सफर सुरू केली. मधूनच छोटी छोटी खेडी, त्याच्याबाजूची शेती, पलीकडचे उत्तुंग पर्वत आणि मधूनच नजरेला येणार्या नद्या... जणू काही एका अगडबंब कॅनव्हासवर एखाद्या कसबी चित्रकाराने काढलेले लांबच लांब चित्र पाहत चललोय!
.
.
.
.
मधूनच एखाद्या गावातून रस्ता जात होता आणि चीनच्या प्रचंड प्रगतीमध्ये अजून सामील न झालेल्या अंतर्गत चीनचा मुखडाही समोर येत होता. चिनी अक्षराच्या पाट्या सोडल्या तर एखाद्या भारतीय खेड्याचेच रूपरंग दिसत होते...
पण हा देखावा क्वचितच दिसत होता. हा हा म्हणता यांगत्सेनदीच्या पहिल्या वळणावर पोहोचलो. यांगत्से (या शब्दाचा अर्थ 'लांब नदी' असा आहे) ही जगातली लांबीने तीन नंबरची, आशिया खंडातली सर्वात लांब आणि चीनमधील सर्वात जास्त नावाजलेली / गौरवलेली नदी आहे. ही नदी आणि तिच्या उपनद्या चीनच्या १/३ भागांवर (म्हणजे जवळजवळ भारताच्या पूर्ण क्षेत्रफळा येवढ्या भागावर) पडलेला पाऊस वाहून नेतात. येवढा मोठा आवाका या एकट्या नदीचा आहे. प्राचीन काळापासून चीनच्या जडणघडणीत, वाहतुकीत, व्यापारात आणि एकंदरीत सांस्कृतिक वाढीस यांगत्सेने मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे साहजिकच यांगत्से असंख्य चिनी कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके, इ. मध्ये अगदी नायिकेचे किंवा निदान इतर महत्त्वाचे स्थानतरी पटकावून आहे.
यांगत्सेच्या पहिल्या वळणाचे आणि त्याच्या आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसराचे विहंगम दर्शन करता यावे यासाठी तेथे एक पांचसहामजली मनोरा बनविला आहे. त्याच्यावरून घेतलेले हे काही फोटो. मनोर्याच्या वरच्या २५ मी लांबीरुंदीच्या प्लॅटफॉर्म वरून चारीबाजूचा मनमोहक परिसर बधायला खूप मजा आली. एका टेकडीला जवळजवळ ३०० अशांचा वळसा घालून जाणारी तुडुंब भरून संथ वाहणारी यांगत्सेमाई, तिच्या पाण्यावर बहरलेले खोरे, आजूबाजूचा चौफेरे हिरवागार गालिचा, त्यांत मधूनच दिसणार्या कौलारू घरांची खेड्यांनी, काही नवीन बांधकाम असलेली छोट्या गावांनी व मधून मधून असलेल्या शेतांनी काढलेले भरतकाम आणि या सगळ्याला आडव्यातिडव्या विभागणार्या असंख्य टेकड्या आणि पर्वतराजी. हे सगळे किती नजरेत सामावून घेतले तरी समाधान होत नव्हते.
.
.
.
नंतर खाली आल्यावर हा खास दुर्मिळ पांढरा याक दिसला.
हर हर महादेव म्हणत त्याच्यावर स्वारी करण्याची हौस १० युवान मोजून पुरी केली!
आणि परत मार्गस्थ झालो. वाटेत हे गांव लागले. निरखून पाहिले तर ध्यानात येईल की इथले रस्त्यावरचे सगळे दिवे सौरऊर्जेवर चालतात! येथून पुढे जवळजवळ सर्व शांग्रीला जिल्ह्यात हेच दिसले. अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात चीन इतर सर्व देशांपेक्षा खूप पुढे आहे हे वाचून होतो, त्याचे हे एक उदाहरण.
पुढे गेल्यावर यांगत्सेच्या तीरावर ही एक आकर्षक इमारत दिसली. 'ख' ला विचारून पाहिले, पण येथे आमची खुणेची भाषा तोकडी पडली. तो फाडफाड चिनी भाषेत काहीतरी म्हणाला पण अर्थातच मला काही समजले नाही!थोड्या वेळाने तेथे पोचलो तर कळले की ते शांग्रीला जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि प्रवेशमुल्य वसूल करण्याचे स्थान होते.
.
ही इमारत म्हणजे एखाद्या सर्वसामान्य उपयोगाच्या वास्तूमध्ये जीव फुंकून लोकांना आश्चर्याने कसे आ वासायला लावावयाचे याचा एक उत्तम नमुना आहे! याबाबतीत चिनी मंडळी अगदी जगावेगळी वरचढ आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी वास्तू अवाढव्य-भव्य करून मोठेपणा ठसवण्याकडे जास्त कल असतो. पण चिनी लोक त्यांच्या बांधकामांत भव्यतेबरोबर कलाकुसर, रसिकतापूर्ण मांडणी आणि रंगांची उधळण अशा रितीने पेश करतात की आश्चर्याबरोबर आनंदाचीही अनुभूती होते. एखादे सुंदर निसर्ग चित्र आपल्याला वारंवार पाहण्याची इच्छा होते आणि दरवेळेचे पाहणे एक अनामिक आनंद देऊन जाते; पण असेच एखाद्या उत्तुंग-भव्य सिमेंट-काँक्रीटच्या इमारतीच्या चित्राबाबत होत नाही... असाच काहीसा हा फरक आहे.
अन मग आपल्याकडच्या परिस्थितीची आठवण होणे अपरिहार्य होते... "एक आडवा बांबू टाकून सर्व वाहने अडवली जातील याची पूर्ण काळजी महत्त्वाची, कारण गल्ला ठीकठाक जमा झाला पाहिजे! बाकी कामगार लोकांना एका टपरीपेक्षा जास्त छप्पर देऊन त्यांच्या सवयी बिघडवायचे पाप आपण कधीच करणार नाही. आणि प्रवाशांचं काय हो ?ते काय सोयीसवलती मागायलाच टपलेले आहेत. त्यांच्या अपेक्षा आम्ही का पुर्या कराव्या? आम्हाला काय दुसरी कामे नाहीत काय? तेव्हा बघू त्यांच्याकडे फुरसत झाली तर!" असो.
हा त्या प्रवेशद्वाराजवळचा झेप घेणारा वाघोबा.
त्याच्यासारख्याच प्रचंड टाकदीची बेभान झेप घेणारा 'लीपींग टायगर गॉर्ज' नांवाचा यांगत्सेचा प्रवाह थोडा पुढे आहे. हा वाघोबा त्याचे मानचिन्ह. उजवीकडे खोल दरीत वाहणारी यांगत्से आणि डावीकडे ऊंचच ऊंच कडा अशा रस्त्यावरून जाताना भारतीय हिमालयातल्या सफरींची आठवण जागी झाली.
आवांतरःचिनी भाषेत फ्रेंच भाषेप्रमाणेच विशेषण
नामानंतर येते असे दिसते. शिवाय चिनी मंडळीचे इंग्लिश अगाध असल्याने ते
बर्याच वेळा शब्दशः भाषांतर करताना दिसतात. उदा: ते "टायगर लीपींग गॉर्ज"
असे लिहितात ... लीपींग टायगर गॉर्ज असे नाही. चिनी इंग्लिशची काही
सचित्र उदाहरणे पुढे येतीलच. सर्वसाधारण चिनी माणसाला इंग्लिश वाचता येत
नाही आणि अधिकारी मंडळींनाही अगदी सार्वजनिक जागांवरील इंग्लिशच
चुकांबद्दलसुद्धा फारशी फिकीर आहे असे वाटले नाही. वाचताना विचित्र वाटू
नये म्हणून मी पहिले विशेषण व नंतर नाम; उदा: लीपींग टायगर गॉर्ज असेच
लिहिले आहे. आंतरजालावर व चीनच्या प्रत्यक्ष भेटीत मात्र ते "टायगर लीपींग
गॉर्ज" असेच दिसेल.
प्रवेशद्वारावर शांग्रीलाच्या गाईडने स्वागत केले. भारतीय चेहरा बघून ती म्हणाली: "नमस्कार!" मी अर्थातच उडलो. ती तिबेटी वंशाची होती. चौकशी केल्यावर कळले की तिचा नवरा ल्हासाचा तिबेटी आहे आणि तो नऊ वर्षे दिल्लीत राहिला होता. तिनेही पाच वर्षे दिल्लीत एका गेस्टहाउसमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे तिला जुजुबी हिंदी येत होते. इंग्लीश मात्र उत्तम बोलत होती. आता ते दांपत्य शांग्रीलात स्थायिक झाले आहे. पुढचे दोन दिवस आमचे संभाषण अर्थातच 'हिंग्लीश' मध्येच झाले!
थोड्या वेळाने लीपींग टायगर गॉर्ज पाहण्याचे प्रेक्षणीय स्थळ आले आणि पायउतार झालो. यांगत्से तिबेटमध्ये Gelandandong glacier lake येथे उगम पावते, दक्षिणपूर्वेकडे वाहत येऊन युन्नानमध्ये शिरते आणि नंतर चीनच्या अनेक राज्यांतून प्रवास करत चीनच्या पूर्वकिनार्यावर शांघाईजवळ समुद्राला मिळते.
हे त्या प्रेक्षणीय स्थळावरच्या इमारतीचे दुरून झालेले दर्शन. निर्मनुष्य डोंगरदरीत प्रशस्त स्वागतकक्ष, उपाहारगृह, "स्वच्छ" स्वच्छतागृह आणि भरपूर मोठे आखीव-रेखीव पार्किंग. "Customer is King." हे भांडवलशाहीचे बोधवाक्य कम्युनिस्ट चीन सतत कसोशीने अमलात आणताना दिसत होता!
युन्नानमधला, विशेषतः लीपींग टायगर गॉर्जच्या भागातला यांगत्सेचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि ताकदवर आहे. प्रबळ यांगत्सेची ताकद प्रवाश्यांना प्रवाहाच्या अगदी जवळ जाऊन पण पूर्ण सुरक्षितपणे बघता यावी म्हणून खास लाकडी जीने, ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म्स, वैशिष्ट्यपूर्ण पूल, इ. इ. व्यवस्था केलेल्या आहेत. चला तर जवळून भेटूया आपण यांगत्सेमाईला.
स्वागतकक्षापासून साधारणपणे ६०० पाहिर्या उतरून खाली जायला लागते. उत्तम लाकडी जिना आहे. वरून अंदाज येत नाही पण जसजसे आपण खाली जातो तसे हळूहळू यांगत्सेचे रूप बदलत जाते.
हे अर्धे अंतर उतरल्यावर यांगत्सेचे सौम्य दिसणारे रूप
येथे तिबेटी भाषेमध्ये "ओम नमो शंबाला (शांग्रीला)" असे लिहिले आहे असे गाईडने सगीतल्यासारखे पुसटसे आठवते. आता नक्की आठवत नाही. तिबेटी लिपी आणि देवनागरीमध्ये थोडेसे साघर्म्य दिसले.
जसजसे खाली जाऊ तसतसे यांगत्सेचे रूप जास्त जास्त रौद्र होऊ लागते.
या ठिकाणीतर पाणी चाळीस टनी ट्रकला कागदाच्या बोटीसारखा चोळामोळा करीत वाहून नेईल असे वाटत होते. टक लावून पाण्याच्या प्रवाहाकडे पाहिले तर छातीवर एक प्रकारचे दडपण वाटावे इतका वेगवान आणि प्रबळ प्रवाह होता.
.
खाली उतरण्याचा लाकडी जिना आणि ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म.
मधूनच एकदा भारताच्या सिंहाने चीनच्या वाघाला सहज तळहातावर उचलून धरले होते!
अवखळ आणि प्रबळ नदी नदी म्हणजे फार काय असणार या आमच्या तिरकस प्रश्नाला लीपींग टायगर गॉर्जने चांगलाच पण सुखद दणका दिला होता! लवकर निघायला मन करत नव्हते पण शांग्रीलाही खुणावत होती... निघावे तर लागलेच.
वाटेवरच्या या गांवात दुपारचे जेवण घ्यायला थांबलो.
तिबेटी जेवणाचा थाट
शाकाहारी मंडळींसाठी खुशखबर: येथे निम्म्यापेक्षा जास्त पदार्थ शाकाहारी होते. तिबेटी मसाले वापरून बनवलेले जेवण छान चवदार होते. शिवाय शांग्रीला जिल्ह्यातील फळे जरा जास्तच चवदार लागली आणि बायजींग-शियानच्या तुलनेने स्वस्तही होती.
चवथ्या मजल्यावरच्या जेवणाच्या जागेवरून दिसणारे सभोवतालचे सौंदर्य पाहत जेवण झाले आणि निसर्गाने आजूबाजूला उधळलेले सौंदर्य पाहत पुढे निघालो .
.
मध्येच एक प्रेक्षणीय थांबा घेतला.
.
.
तेथे "बा" जमातीची एक सुंदरी त्यांचा पारंपरिक पोशाख पेहरून फोटोसाठी उभी होती. १० युवान देऊन फोटो काढले.
मला वाटले की दहाबारा वर्षांची मुलगी असेल पण गाईडने तिला विचारून सांगितले की तिचे वय सोळाच्यावर आहे आणि तिचे लग्नही झाले आहे!
एक तासाभराने शांग्रीला गावाची सुरुवात झाल्याचे तिबेटी पद्धतीच्या मोठ्या इमारतींनी जाहीर करण्यास सुरुवात केली.
.
.
शांग्रीलाची माध्यमिक शाळा.
हॉटेलवर पोहोचेपर्यंत चार वाजले होते. गाईड म्हणाली की आज संध्याकाळी काही कार्यक्रम नाही. मोकळा वेळ आहे. जरा आराम करा. उद्या खूप चालायचे आहे. मस्तपैकी शॉवर घेतला आणि तरतरीत झालो. आता कसला आराम करणार? इतक्या दूर शांग्रीलाला काय आराम करायला आलो आहे काय? असा विचार करून हॉटेलच्या बाहेर पडलो. हॉटेल नव्या शांग्रीलात होते. हॉटेलवर येताना जवळच एका चौकातून जुन्या शांग्रीलात शिरणारा रस्ता गाईडने दाखवला होता. त्या दिशेने निघालो. जुन्या शांग्रीलात शिरलो तर एका अप्रतिम गावाची आणि सुखद धक्क्यांची मालिका सुरू झाली!
घरे, त्याचे दरवाजे-खिडक्या, इतकेच काय पण दर्शनी भिंतीही कोरीवकामाने व रंगकामाने इतक्या सजवलेल्या होत्या की रस्त्यावरून जाण्यार्या इतरांनीच माझा धक्का लागू नये याची काळजी घेतली असणार... माझे तिकडे अजिबात लक्ष नव्हते.
.....................
.
.
.
.
.
.
स्वर्गात प्रवेश तर केला तर स्वर्गातल्या पुलाने (किंवा देवेन्द्राच्या धनुष्याने म्हणा) ही जवळजवळ जमिनीला टेकून दर्शन दिले.
.
मध्येच अचानक कोणीतरी मोठ्याने म्हणाला, "कैसा है साब?" मी चमकून पाहिले तर एक सायकलरिक्षावाला हसून हात हलवत मी जागा होऊन "ठीकठाक. आप कैसे हो?" हे म्हणण्याच्या आत पुढे निघून गेलाही. आज दुसर्या माणसाकडून हिंदी ऐकली होती! नक्की कळत नव्हते की चकीत होऊ की गंमत वाटून घेऊ? पण आजचा खरा दणका तर पुढेच होता.
अजून पन्नास एक मीटर पुढे आलो असेन. एका रेस्तराँसमोर थक्क होऊन थबकलोच!
डोळे चोळायची वेळ होती. चीनमध्ये देवनागरीत "भाष्कर रेस्टो" उपाहारगृहाची पाटी? तेवढ्यात आतून खानसाम्याचे कपडे व टोपी घातलेला एक गृहस्थ "कैसा है साब? आओ साब चाय पिओ." म्हणत बाहेर आला.
हातमिळवणी झाली. थोड्या गप्पा झाल्या. माणूस एकदम नंबरी दिलखुलास, बोलका आणि आपुलकीने भरलेला. नाटकीपणा अथवा व्यापारीपणा नावालाही नाही. म्हटले, चहा नको, भूक मरेल. त्यापेक्षा मी जरा तासभर गांवात हिंडून येतो आणि मग मला तुझे खास पदार्थ करून वाढ. तोही म्हणाला, "जरूर आओ साब. खूश करके छोडेगा." मला काय? तेच हवे होते. दर ठिकाणी फिरताना कमीतकमी एकदा तरी संध्याकाळचे जेवण हॉटेलबाहेर चवीकरता नावाजलेल्या रेस्तराँमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आज तर ते रेस्तराँच मला आमंत्रण देते होते! रेस्तराँ काही हायफाय नव्हते पण ठीकठाक, स्वच्छ व टापटीप होते. स्वच्छता आणि चव या मूळ अटींची पूर्तता झाली की मग बाकीकडे मी दुर्लक्ष करायला तयार असतो.
.
संध्याकाळी "भाष्कर रेस्टो"चाच पाहुणचार घेतला हे सांगायला नकोच.चवदार जेवण, तितक्याच चवदार गप्पांबरोबर आणि अगदी घरच्या जिव्हाळ्याने झाले. माणूस रसिक दिसला. रेस्तराँमध्ये एक छोटेखानी ग्रंथालय आहे. मोकळा वेळ असेल तर या, मस्त चहा आणि खायला काही चटपटीत देईन. खुशाल हवा तेवढा वेळ वाचत बसा म्हणाला!
भास्कर नेपाळी आहे, भारतातही काही काळ होता. नंतर नेपाळातून ल्हासाला गेला आणि एका तिबेटी मुलीशी लग्न केले आणि आता दोघे शांग्रीलामध्ये स्थायिक झाले आहेत. भास्कर स्वतः कसबी खानसामा आहे. अगदी दक्षिणेच्या मसाला दोसा पासून उत्तरेच्या मुघलाई पर्यंत अनेक प्रकार तो बनवतो. सौ. भास्कर सुद्धा रेस्टो चालवायला बरोबरीने झटत असतात. हे शांग्रीलातले एक चवीसाठी प्रसिद्ध रेस्तराँ आहे हे नंतर कळले. बोलता बोलता भास्करने त्याच्या गेस्टबुकांतील भारत, अमेरिका, जपान, जर्मनी, बेल्जीयम, इंग्लंण्ड, अशा अनेक देशांच्या पाहुण्यांच्या दीड-दोनशे शेर्यांचा सज्जड लेखी पुरावाही दाखवला. गंमत म्हणजे यातील काही शेर्यांत अमुक पदार्थ भारतात खाल्ला त्यापेक्षा येथे जास्त चवदार होता असे लिहिलेले होते... आणि असे शेरे लिहिणार्यात केवळ परदेशी नाही तर दोनतीन भारतीय नांवेही होती, आता बोला!!!
हे असे काही होईल हे स्वप्नातही बघणे कठीण होते. असे प्रसंगच फिरण्यातली गोडी मनामध्ये दगडावरच्या सुबक कोरीवकामासारखी कायम जतन करून ठेवतात.
हा भास्कर दांपत्याबरोबरचा फोटो.
शाकाहारी मंडळींसाठी खास खुशखबर : भास्कर शाकाहारी जेवणही उत्तम बनवतो. आणि लंचपॅक ही त्याची खासियत आहे. युरोपियन ट्रेकर्सही त्याच्याकडून शाकाहारी लंचपॅक्स बनवून घेतात असे कळले.
आवांतरः भास्कर रेस्टोच्या वरच्या मजल्यावर राहण्यासाठी खोल्याही आहेत. गडबडीत त्या कशा आहेत ते पाहायचे राहून गेले. परंतु तेथून काही पाश्चात्त्य मंडळी खाली उतरताना दिसली यावरून ठीकच असाव्यात. खालील बिझिनेस कार्डवरील ईमेल / फोनवरून अघिक माहिती मिळू शकेल.
भास्करला परत येतो असे सांगून शांग्रीलाचा फेरफटका परत चालू केला. जसजसा गावाच्या आतल्या भागात गेलो तशी भारताशी जवळीक जाहीर करणारी अनेक दुकाने / रेस्तराँ दिसली.
.
एका मॉलचे प्रवेशद्वार.
.
अजून एक हिंदी बोलणारा नेपाळी व्यापारी केसांगने हाक मारून थोडे संभाषण केले. हा बंगळुरूला पाचसहा वर्षे राहून तेथून बीए करून नेपाळला गेला. तेथून शांग्रीलाला आला आणि आता येथे व्यापार करतो. त्याच्या दुकानासमोरचा हा फोटो.
नंतर गाईडने सांगितले की इथे हिंदी सिनेमा आणि गाण्यांच्या सीडी-डीव्हीडी अत्यंत लोकप्रिय आहेत. तिबेटी-नेपाळी लोकांना भारताबद्दल आत्मीयात आहे हे तर जगजाहीर आहेच. पण त्यांनी ती भावना शांग्रीलासारख्या चीनमधल्या एका दूर पहाडी प्रदेशातही नेली आहे हे पाहून चकीत होण्यापेक्षाही अधिक काही अनामिक भावना दाटून आली. हॉटेलवर जाताना एक वेगळाच आनंद वाटत होता... तो शब्दात सांगणे कठीण आहे.
चला स्वर्गाचा दरवाज्याने तर बरेच काही दाखवले. उद्या प्रत्यक्ष स्वर्ग काय रूपाने पुढे येईल याचा विचार करतच झोपेच्या आधीनं झालो.
(क्रमशः)
सहलीचा दहावा दिवस उजाडला. आजचा पहिला कार्यक्रम होता पुडाकुओ राष्ट्रीय उद्यानाला भेट. या जागेची प्रसिद्धी पृथ्वीवरची जगातली सर्वात सुंदर नैसर्गीक जागा म्हणून आहे त्यामुळे मनांत खूपच उत्सुकता होती हे सांगायला नकोच. पण आतापर्यंत एवढे सुंदर प्रदेश पाहिले, आता अजून काय बघणार अशी उत्सुकताही मनांत दाटून राहिली होती. गडबडीने पण छानपैकी न्याहारी आटपली कारण राष्ट्रीय उद्यान म्हणजे आंत खाणेपिणे नाही, कचरा करणे नाही आणि अगदी झाडाची मोडलेली काडीही उचलायची नाही वगैरे नियम माहीत होते. शिवाय गाइडने खूप चालायची तयारी ठेवा असे सांगितले होते. म्हणजे शरीराच्या गाडीत पुरेसे पेट्रोल असणे जरूर होते.
पुडाकुओ अथवा पुदात्सो राष्ट्रीय उद्यान (Pudacuo / Pudatso National Park) शांग्रीला जिल्ह्यामधील २,००० चौरस किमी जागा व्यापून आहे. २५ जून २००७ पासून याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नैसर्गिक राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. यात प्राचीन काळापासून फारसे मानवी संसर्गात न आलेले एक जंगल आहे. शिवाय त्यांत बिटा व शुडू नांवाची दोन सरोवरे आहेत. हे सर्व उद्यान समुद्रसपाटीच्या साधारणपणे ३.५ किमी वर आहे. चीनमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींच्या नमुन्यांपैकी २० टक्के या प्राचीन जंगलांत सापडतात एवढे समृद्ध हे जंगल आहे. शांग्रीलापासून तासाभराच्या चारचाकीच्या प्रवासानंतर आपण उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो.
तेथून उद्यानाची बस आपल्याला १३ किमी दूर मुख्य जंगलाच्या सुरुवातीस नेऊन सोडते. येथून हे विशाल उद्यान बघण्यासाठी बस, बोट व पायी चालणे असे तीन पर्याय आहेत. गाइडबरोबर चर्चा केल्यावर असे कळले की सगळा प्रवास पायाने केला तर ६ ते ८ तास लागतील शिवाय कमीतकमी १२ ते १५ किमी चालावे लागेल. मग गाइडशी चर्चा करून असा बेत केला की प्रथम ३ किमी चालत जायचे कारण हा भाग अगदी जवळून फारच सुंदर दिसतो. नंतर दहा एक किमी बसने सफर करायची. परतीच्या वाटेवर बोटीने बिटा सरोवराची चक्कर मारत यायचे आणि शेवटचे दीडदोन किमी परत पायी चालायचे. हे सर्व साधारण साडेतीन चार तासांत होईल व चालताना वाटेवर हवा तेवढा वेळ आपल्याला आवडलेल्या जागांवर थांबून निसर्ग डोळ्यांनी पिऊन घेता येईल आणि फोटोत कैदही करून आणता येईल.
गाइडने पाणी बरोबर घेतल्याची खबरदारी घेतली आणि आम्ही चालू लागलो. येथून पुढे फक्त पाणी (तेही स्वतःजवळचे कारण येथून पुढे उपाहारगृहांना बंदी आहे) पिता येणारा होते. खाण्याचे पदार्थ नेण्यास व विशेषत: ते जंगलातल्या प्राण्यांना देण्यास बंदी आहे. मुख्य म्हणजे सर्व सहलभर वनरक्षक अभावानेच आढळले, तरीसुद्धा या कायद्याचे उल्लंघन करणारा एकही प्रवासी आढळला नाही... अगदी लहान मुले जमेस धरूनही. जागोजागी साधारणपणे २-३ किमी वर स्वच्छ स्वच्छतागृहे होती त्यामुळे इतर काही कारणानेही जंगलाची स्वच्छता खराब करण्याची कोणाला आवश्यकता वाटण्याची शक्यता नव्हती.
या पुलावरून आम्ही मंतरलेल्या चैत्रबनात प्रवेश केला आणि निसर्गाच्या कवेत केव्हा सामावून गेलो ते कळलेसुद्धा नाही.
.
.
सकाळची वेळ, अजून धुके पूर्णपणे निवळले नव्हते. समोर शांत सरोवर, पलीकडे लांबच लांब हिरवळ, त्या पलीकडे हळूहळू उंचावत जाणारे डोंगर, डोंगरांच्यावरचे घनदाट सूचिपर्णी वृक्षांचे दाट प्राचीन जंगल आणि या सर्वांवर भरून राहिलेली शांतता. सगळे प्रवासी शांतपणे हे सर्व पाहत पाहत पुढे तरंगत जात होते. चार चिनी मंडळी जमली की रेस्तरॉमधला होणारा गलबला आता माझ्या चांगला ओळखीचा झाला होता. पण येथे मात्र सर्व शांतपणे सृष्टीसौंदर्य पाहण्यात दंग झालेले होते. फारतर 'हे बघ, ते बघ' अश्या अर्थाची हलकी कुजबूज ऐकू येत होती.
.
.
या वनांत पायी चालणार्या प्रवाशांची पादत्राणे ओल्या मातीने खराब होऊ नये याकरिता सर्व जंगलभर लाकडी मार्ग बनवलेले आहेत. मुख्य म्हणजे एवढा पाऊस व सतत असणारा मातीचा ओलसरपणा असे असूनही ते मार्ग उत्तम अवस्थेत ठेवलेले आहेत...एकाही ठिकाणी मोडक्या अथवा उचकलेल्या फळीची अनवस्था दिसली नाही !
.
एका बाजूला होते संथ, शांत, धीरगंभीर सरोवर आणि त्याच्या काठापासून लाकडी मार्गापर्यंत पसरलेला हिरवागार गालिचा...
.
.
त्या गालिच्यावर उडवलेल्या रंगांच्या शिंतोड्यांसारखी दिसणारी असंख्य प्रकारांची व रंगांची रानफुलांची नक्षी...
.
.
.
.
.
आणि मधूनच दिसणारे व प्रवाशांची फिकीर न करता शांतपणे चरणारे रानटी घोड्यांचे कळप.
तर दुसर्या बाजूला प्राचीन "स्पॅनिश दाढीधारी" सूचिपर्णी वृक्षांचे जंगल (Spanish Bearderd Forest)! दुरून पाहिल्यास या झाडांना अगदी चिनी चित्रपटातील म्हातार्या 'कुंगफू मास्टर'च्या दाढीसारखी मोठी पांढरी दाढी आल्यासारखे दिसते. ही दाढी म्हणजे वृक्षांवर वाढणारे एका प्रकारचे Moss आहे.
.
मधूनच काही ठिकाणी भडक लाल-नारंगी रंगाची पाने नजिकच्या भविष्यात येणाऱ्या पानगळीची नांदी देत होती.
.
पूर्ण भरात असताना पानगळीचा मोसम अशी रंगांची उधळण करतो. (पुढिल दोन चित्रे आंतरजालावरून साभार)
This photo of Pudacuo National Park is courtesy of TripAdvisor
This photo of Pudacuo National Park is courtesy of TripAdvisor
पायी फिरताना टिपलेली अजून काही प्रकाशचित्रे...
.
.
.
.
.
फिरता फिरता तीन किमी कसे संपले ते कळलेही नाही. उद्यानाच्या आतल्या मार्गावरून उद्यानाच्या बसेस सतत फेर्या मारत असतात. कोणत्याही मधल्या थांब्यावर प्रवासी चढू-उतरू शकतात. आम्हीही एका थांब्यावर बस पकडली आणि पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू केला.
प्रथम थोडावेळ जंगलातून प्रवास झाल्यावर एक विशाल कुरण लागले. चारी बाजूंनी दाट झाडी, मध्ये ते कुरण, त्यांतून वाहणारे झरे, मधूनच चरणार्या गुरांचा कळप आणि एखादे वन्य जमातीचे घर असा चित्रपट चालू झाला. काही शतके एक वन्य जमात येथे राहत असल्याने त्यांनाच फक्त उद्यानाच्या या भागात राहायला परवानगी दिलेली आहे.
.
.
.
.
आता तिसर्या भागात हेच जंगल पण बोटीने जरा दुरून पाण्यावरून बघायचे होते.
तेच डोंगर, तेच जंगल, तेच वृक्ष आणि तीच हिरवळ... परंतु पाण्यावरून थोडे दुरून ते दृश्य जरा अधिकच मनोहर दिसत होते.
.
.
.
.
हा प्रवास जरा लवकरच संपला असे वाटले, पण बोटीला परतायचे असल्याने नाइलाजाने उतरायला लागले. येथून पुढे चवथा पुन्हा चालायचा टप्पा सुरू झाला. इथल्या गवताळ कुरणावर निसर्गाने जरा जास्तच रंग शिंपडलेले होते !
.
जागोजागी मोक्याच्या ठिकाणी प्रवाश्यांना आरामात बसून निसर्गसौंदर्याचा आनंद घेता यावा यासाठी सोय केलेली होती.
आजपर्यंत खूप जंगले पाहिली. पण इतके भारून टाकणारे हे पहिलेच. श्रीकृष्ण गायी चरायला न्यायचा ते पुराणकाळातले नंदनवन असेच होते का? हा एक प्रश्न अचानक मनात चमकून गेला.
.
पाय निघत नव्हता. पण परत फिरणे भाग होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या तिबेटी घरांचे फोटो काढीत शांग्रीलाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. नवीनंच आलेल्या सुबत्तेमुळे बर्याच घरांचे नूतनीकरण चालू होते. एका वर्षाभरात या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक आकर्षक तिबेटी घरे दिसतील आणि कदाचित ही जागाही एक प्रवासी आकर्षण होईल असे दिसते.
.
.
.
पुढचा थांबा जेवणाकरिता होता. "येथे एक छान तिबेटी रेस्तरॉ आहे, चालेल का?" असे गाइडने विचारले. कालचा तिबेटी जेवणाचा अनुभव चांगला होता त्यामुळे लगेच होकार दिला. जेवण तर छान होतेच पण रेस्तरॉमधील नक्षीदार रंगरंगोटीही बघण्यासारखी होती.
.
.
.
पुढे जायचे होते सोंगझानलीन लामासरी बघायला. ही युन्नानमधली सर्वात मोठी लामासरी आहे. ३३.३ हेक्टर क्षेत्रफळावरच्या या बौद्धमठाची रचना ल्हासामधील पोताला पॅलेस (तिबेटी बौद्ध संप्रदायाचे मुख्य, सर्वात मोठे व सर्वात पुज्य ठिकाण) डोळ्यासमोर ठेवून केली आहे. त्यामुळे या जागेला भेट देऊन तिबेट भेटीची कमतरता काही अंशी भरून निघणार होती.
हे आहे लामासरीला घेऊन जाणार्या बसचे तिकिटघर.
.
आणि हा चिनी इंग्लीशचा नमुना.
त्यांना म्हणायचे आहे की "बसमध्ये कचरा करू नका / बस स्वच्छ ठेवा"... पण लिहीले आहे की "बसमध्ये सतत स्वच्छता करत रहा" !
लामासरीचे दूरून घेतेलेले एक मनोहर चित्र.
जसजसे आपण लामासरीच्या जवळ जाऊ लागतो तसे तिच्या भव्यतेची कल्पना येऊ लागते. हे आहे मुख्य प्रवेशदार.
.
तेथून पुढे चढण लागते व नंतर पायर्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लामासरीत राहणार्या बौद्धभिक्षुंची घरे आहेत. प्रवेशद्वाराच्या आंत घर बांधायला अगदी छोटीशी जागा मिळणे हाही एक फार मोठा बहुमान समजला जातो. मात्र हे घर भिक्षूला स्वतःच्या कष्टाने बांधायला लागते. फारफारतर अगदी जवळचे नातेवाईक मदत करू शकतात, पण दाम देऊन काम करवून घेण्यास सक्त मनाई आहे. तसेच घरचा कितीही मोठा अथवा श्रीमंत असला तरी येथे येताना बौद्धभिख्खूला सर्वसंगपरित्याग करूनच यावे लागते.
टेकडीवरच्या विस्तीर्ण आवारात लामासरीच्या अनेक भव्य मुख्य इमारती आहेत.
.
.
आणि त्या अर्थातच तिबेटी कलाकुसरीने आणि मनोहर रंगांनी नुसत्या भरभरून ओसंडणार्या आहेत.
.
.
लामासरीच्या आवारातून शांग्रीला नगरीचे व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
.
लामासरीचा पॅनोरॅमीक फोटो
हॉटेलवर परतेपर्यंत चार वाजले होते. शॉवर व कॉफी आटपून ताजातवाना झालो. पाच वाजता गाइड परत आली...आणि संध्याकाळच्या भरगच्च कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम जुन्या शांग्रीलाच्या चौकांकडे मोर्चा वळवला. कारण तेथे संध्याकाळी स्थानिक लोक एक मोठे रिंगण करून तिबेटी संगीताच्या तालावर नृत्य करतात ते बघायचे होते. हा कार्यक्रम दोन ठिकाणी होतो... प्रथम नविन मोनॅस्टरीच्या (आज वेळ नसल्याने आपण ह्या मोनॅस्टरीला उद्या भेट देऊ) प्रशस्त प्रांगणात गेलो. सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संगीताच्या तालावर तिबेटी नाचाची पावले टाकत होती. काटेकोर नाच करण्यापेक्षा मजा घेण्यावर जास्त भर होता. नागरिक आग्रहाने प्रवाशांना सामील होण्यास आमंत्रण करत होते. चीनच्या सुदूर प्रदेशांतून आलेल्या चिनी लोकांची तिबेटी नाच करताना होणार्या त्रेधातिरपिटीची मजा बघे आणि ते स्वत:ही घेताना दिसत होते !
दुसरा थांबा घेण्यासाठी शांग्रीलाच्या गल्लीबोळांतून निघालो....
आणि जुन्या शांग्रीला बाजारपेठेतील चौकात पोहोचलो. तेथे नाचगाणे तर चालू होतेच...
पण तिबेटी फास्टफूडचीही व्यवस्था होती. डोळ्यांबरोबर जिभेचेही चोचले पुरवले गेले ! +D
हे सगळे होईपर्यंत सात वाजत आले होते. साडेसातचा "ड्रीम शांग्रीला शो" बघायला निघालो. त्या कार्यक्रमाची गाइडने खूप स्तुती केली होती पण तेथे असे राजेशाही स्वागत होईल असे सांगीतले नव्हते !
.
या कार्यक्रमात शांग्रीलाच्या लोककलांची अत्यंत बहारदार पद्धतीने ओळख झाली.
याक नृत्य
ही शांग्रीलाची प्रसिद्ध गायिका (जणू तिथली लता मंगेशकर !), आपल्या धारदार, खणखणीत व गोड पहाडी आवाजाने तिने सर्व प्रेक्षागृह हलवून सोडले.
ह्या प्रसिद्ध गायकाच्या नावावर अनेक लोकप्रिय अल्बम्स आहेत. त्याच्या मधूर आवाजाला उपस्थित रसिकांचा पुरेपूर प्रतिसाद मिळला नसता तर आश्चर्य वाटले असते.
गाण्यांचे शब्द समजत नव्हते पण कान नक्कीच खूश होत होते.
कार्यक्रमाची अजून काही दृश्ये...
.
.
.
.
ड्रीम शांग्रीला कार्यक्रम त्याच्या नावाला पुरेपूर जागला... हे शांग्रीलातले स्वप्न कायमचेच स्मरणात राहील !
(क्रमशः)
सहलीचा अकरावा दिवस उजाडला. गुईलीनला जाणारे विमान सुटण्याची वेळ दुपारी दोन वाजताची होती. गाइडच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलवरून बारा वाजता निघाले तरी चालण्यासारखे होते. म्हणजे न्याहारीनंतर चांगले अडीच तीन तास मोकळे होते. काल फिरताना बघितलेली शांग्रीलाची टेकडीवरची लामासरी इटिनेररीमध्ये नसल्याने राहिली होती. लांबून तर इमारत छान दिसत होती. आतापर्यंत शांग्रीलाचे सगळे रस्ते पाठ झाले होते त्यामुळे एकटाच बाहेर पडलो आणि लामासरीच्या दिशेने चालू लागलो.
लामासरीच्या आवारात शिरलो आणि हॉटेलमध्ये लोळत न पडण्याचा निर्णय केल्याचा आनंद झाला. कारण नाहीतर एका प्रेक्षणीय स्थळ बघायचे राहिले असते. शांग्रीलात सगळेच इतके सुंदर आहे आणि शिवाय सोंगझानलीन लामासरी सारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणामुळे ह्या लामासरीचा नंबर इटिनेररीत आला नव्हता असे दिसते !
ही लामासरी शांग्रीलाच्या एका टोकाला एका टेकडीवर बांधलेली आहे. ही सोंगझानलीन लामासरीच्या सात वर्षे अगोदर १६६७ साली बांधलेली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे एक मोठा उत्सव असतो. त्यांत इथल्या स्थानिक देवतेचे ८.५ मी X ५.२ मी आकाराचे एक रेशमाच्या भरतकामाचे चित्र बनवतात आणि भक्तांच्या दर्शनासाठी ठेवतात. शांग्रीलातही गांवदेवतेचा उत्सव सण साजरा करतात हे ऐकून मजा वाटली.
या लामासरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे गोल फिरणारे भलेमोठे धम्मचक्र. हे शांग्रीलात फिरताना बऱ्याच लांबूनही दिसते. मी याच्यावरूनच या लामासरीचा माग काढत काढत येथे आलो होतो !
साधारण १००-१५० मीटरचा चढ आहे. पण वर आल्यावर आजूबाजूचे मनोहर दृश्य पाहून सगळा शीण नाहीसा होतो. आवारात फिरता फिरता लामासरीच्या लामा जानसेन याची ओळख झाली त्यांनीही भारतीय चेहरा बघून अगत्याने कोठून आलो वगैरे चौकशी केली. त्यांचे भारतात काही काळ वास्तव्य होते त्यामुळे थोडे हिंदी आणि बरेचसे इंग्लिशमध्ये संभाषण झाले. नंतर मुख्य इमारतीशेजारच्या छोट्या पठारावरच्या भव्य धम्मचक्राकडे गेलो. टेकडीखालून भासते त्यापेक्षा हे चक्र बरेच मोठे आहे.
सोनेरी रंगाच्या चक्रावर बौद्ध धर्माची चिन्हे तर होतीच पण तेथील जनजीवन, कला आणि इतिहास याचेही चित्रण होते. हे प्रचंड चक्र फिरविण्यासाठी कमीतकमी वीसएक जण लागतात !
मी बराच वेळ फक्त फोटो काढतो आहे याचे निरीक्षण केल्यावर या आजीबाईंनी मला अक्षरशः हाताला धरून चक्र फिरवायला हातभार लावायला भाग पाडले !
सकाळच्या वेळेचे सोने झाले असे म्हणत टेकडीच्या पायऱ्या उतरून खाली आलो तर लामासरीच्या प्रांगणातले हे खास युन्नान तिबेटी पोशाखांचे दुकान समोर आले.
.
हे लोक त्यांच्या निसर्गासारखेच रंगीबेरंगी व मोहक नक्षीचे कपडे वापरतात. अगदी रोजच्या कपड्यांतही गुलाबी, लाल, निळा आणि पिवळा या रंगांचा कलापूर्ण वापर सर्रास दिसतो.
रमत गमत परत हॉटेलकडे निघालो. वाटेत भाजीवाले आपल्याकडल्यासारखेच रस्त्याच्या कडेला दुकान लावून बसले होते. रसरशीत ताजी भाजी बघून फोटो काढले... आता ते शाकाहारी मिपाकरांना दाखवून खूश करीन म्हणतो ! +D
.
.
हॉटेलवर येईपर्यंत साडेअकरा वाजले होते. तयारी करून ताबडतोप विमानतळाकडे प्रयाण केले. आज ८६० किमीचा विमानप्रवास होता. प्रथम शांग्रीला ते युन्नानची राजधानी कुनमिंग हे तासाभराचे उड्डाण, तेथे दोन तास थांबा घेऊन व विमान बदलून परत सव्वा तास उड्डाण असे करत संध्याकाळी साडेसहाला गुईलीनला पोहोचलो.
गुईलीन म्हणजे आमच्या टूर कंपनीचे शहर. येथे जरा खास खातीरदारी होईल असा होरा मनांत होता. पण विमानतळातून बाहेर पडलो तर जरा निराशाच झाली. लिजीयांग-शांग्रीलामध्ये दिमतीला चकचकीत ऐसपैस SUV होती, इथेतर एक छोटी सिडान आणि तीही बऱ्यापैकी म्हातारी ! शिवाय तिचे अंतरंगही जरासे कळकटच वाटत होते. पण साडेसहा तासांच्या प्रवासानंतर हॉटेलवर जाऊन एक वट्ट शॉवर घेण्याची प्रबळ इच्छा होती. शिवाय विमानतळावर गाईड काय करू शकला असता म्हणा. सगळे निर्णय तर टूर मॅनेजर घेते. तेव्हा पहिले हॉटेल गाठूया आणि नंतरच काय ते बोलू असे ठरवले. मात्र एक किरकोळ निषेध नोंदवून गाडीत बसलो. विमानतळापासून शहर ४५ मिनिटंच अंतरावर आहे. तीसएक मिनिटे चालल्यानंतर गाडी खोकला झाल्यासारखे आवाज करू लागली आणि चालकाने गाडी सफाईने सर्विस रोडावर घेताघेताच बंद पडली ! चालक खाली उतरून टॅक्सीला हात करू लागला. गाईड वरमून "गाडी मी ठरवीत नाही. ऑफिसमधूनच ते ठरते." वगैरे सारवासारवीची भाषा करू लागला. त्याला म्हटले, "ठीक आहे तुला दोष देत नाही पण आता हॉटेलमध्ये पोचल्यावर मी टूर मॅनेजरशी बोलू. तेव्हा मात्र हे सगळे सांग, तेथे सारवासारवी नको". त्याला दोष देत नाही म्हटल्यावर त्याची कळी जरा खुलली, म्हणाला, " हे सर्व जरूर सांगेन आणि चांगल्या गाडीची शिफारसही करेन."
हॉटेल मुख्य रस्त्यावर छान जागी होते. लॉबी आकर्षक होती. पण खोल्यांची स्थिती काही बरी वाटली नाही. एक कुबट दर्प आणि सिगारेटचा वास पॅसेजमध्ये भरून राहिला होता. खोलीमध्ये शिरलो, तिचे रूपही बरे वाटले नाही. आता खूप झाले... टूर मॅनेजरला फोन लावला आणि तुझ्याच शहरात कशी अवस्था आहे ते गाईडच्या तोंडीच ऐक म्हणून गाईडच्या हाती फोन दिला. त्यांचे चिनीमध्ये संभाषण झाले, मग फोन हॉटेल मॅनेजरच्या हाती गेला. परत ३-४ मिनिटे संभाषण. मग फोन माझ्या हाती आणि एक सवाल मला, "सर काय म्हणणं आहे तुमचं?" आता माझा रागाचा पारा चढायला लागला होता. तो ताब्यात ठेवत म्हणालो, "टूर बुक करताना स्वच्छता आणि टापटीप हे माझे निकष मी सर्वप्रथम सांगितले होते आणि तू कबूल केले होतेस. आता त्याची पूर्तता कर. अजून काय?" एवढ्यावरून आणि नकळत झालेल्या तिखट आवाजावरून तिला माझ्या मन:स्थितीची कल्पना आली असावी. पण कसलेली टूर मॅनेजरच ती. हॉटेल मॅनेजरला सांगून अजून दोन मजले हिंडवून खोल्या दाखवून घेतल्या.
एवढे झाल्यावर मात्र मी तिला परत फोन करून म्हटले, "तुझा माझ्या व गाईडच्या बोलण्यावर विश्वास नाही असे दिसते आहे. हे तुझेच गाव आहे. स्वतः इथे येऊन खात्री कर आणि मग बोल. तू म्हणशील तसे करू." ही मात्रा लागू पडली, पाच मिनिटात फोन करते म्हणाली. शब्द दिल्याप्रमाणे गाईडला फोन आला आणि आम्ही आमच्या बॅग घेऊन बाहेर पडलो. दुसरे हॉटेल मात्र खूपच छान निघाले... परत फोन आलाच तर आभाराचा यावा असे... गुईलीन ब्राव्हो हॉटेल. गुईलीनला भेट दिलीत तर येथे जरूर राहा.
प्रवासाच्या श्रमाने आणि टूर कंपनीने दिलेल्या धक्क्यांनी वैतागून कसेबसे जेवण केले आणि फारसा विचार न करता ताणून दिली.
===================================================================
सकाळी जाग आली आणि सहजच खिडकीकडे नजर गेली. कोणत्याही नवीन ठिकाणी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर त्याच्या खिडकीतून आजूबाजूचा परिसर न्याहाळणे हा माझा छंद आहे... अगदी विमानात खिडकीजवळची जागा पकडण्यासारखाच. कारण जरा उंचीवरून त्या शहराची जरा वेगळी आणि काहीशी पारदर्शक ओळख होते. कालच्या सगळ्या गडबडीत हे खिडकी प्रकरण राहूनच गेले होते. सहजच पावले खिडकीकडे वळली आणि हे गुईलीनच्या पहाटेचे प्रसन्न दर्शन झाले...
सूर्यमहाराज अजूनही गुलाबी थंडीमध्ये धुक्याची रजई चेहऱ्यावरून पूर्णपणे काढायला तयार नव्हते. त्या अर्धप्रकाशीत वातावरणात हॉटेलजवळचे शांत तळे, त्याच्या काठावरची हिरवीगार वनराई आणि त्यांत पक्षांची चाललेली सकाळची लगबग व चिवचिवाट ! गुईलीनची आजची ओळख भावली. सहलीचा मूड पुन्हा जुळून येऊ लागला.
गुईलीनचा अर्थ गुई (Sweet Osmanthus) नावाच्या सुगंधी वृक्षांचे जंगल. अर्थातच गुई वृक्ष या नगरीत जागोजागी आहेत अगदी त्या शहराच्या चिनी नावातही... 桂林. ह्या शहराची सुरुवात ली नावाच्या नदीच्या काठावर इ. पू. ३१४ साली एका वस्तीच्या स्वरूपात झाली. तेव्हापासून आजतागायत चीनच्या अनेक सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक स्थित्यंतरांत या शहराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे १९८१ सालापासून या शहराची गणना चीनच्या नैसर्गिक सौंदर्य व सांस्कृतिक ठेवा असलेल्या केवळ चार शहरांच्या गटामध्ये केली गेली. या गटातील इतर तीन शहरे आहेत बायजींग, हांगझू व सुजू. या चार शहरांत त्यांच्या पूर्वांपार ठेव्यांचे व निसर्गसौंदर्याचे रक्षण करण्याला प्राथमिकता आहे... आर्थिक-व्यापारी गोष्टींसह इतर सर्व दुय्यम मानावे असा कडक नियम आहे. हा नियम केवळ पुस्तकी न राहून त्याचे कसोशीने पालन केले जाते आहे हे ही शहरे फिरताना सगळीकडे स्पष्ट जाणवते.
आवांतरः यातले बायजींग शहर आपण अगोदरच पाहिले आहे, गुईलीन
(त्याच्या जगप्रसिद्ध यांगशुओ काऊंटीसह) आज-नी-उद्या पाहणार आहोत व इतर दोन
पुढच्या भांगांत येतीलच.
आजची पहिली भेट होती जिआंगतू (Jiangtou) नावाच्या गावाला. गुईलीनच्या बाहेर पडलो आणि शहराबाहेरच्या चीनचे दर्शन सुरू झाले.
.
.
जिआंगतू गावाची ख्याती अशी की चिनी साम्राज्यांचे अनेक पंतप्रधान या एका गावांतले होते. प्राचीनकाळी येथे शिक्षणाला इतके महत्त्व होते की ज्या कागदावर काहीही लिहिलेले आहे असा कागद जमिनीवर फेकायला मनाई होती... कारण तो पायाखाली येऊन लिखाणाचा अपमान होईल! नको असलेले पण लिखाणकाम केलेले कागद जाळून नष्ट करायला बांधलेली एक खास दाहिनी या गावात अजून जपून ठेवलेली आहे.
गावात फिरल्यावर मात्र भ्रमनिरास झाला. जिआंगतू गावाची "एक जुने खेडेगाव, जुन्या काळातल्या अनेक विद्वान पंतप्रधानांचे जुनेपुराणे वाडे आणि बर्यापैकी निसर्ग" एवढीच ओळख पुरे आहे. बऱ्याचशा वाड्यांची सांस्कृतिक क्रांतीच्या काळात मोडतोडही केली गेली होती त्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.
.
.
.
.
एखाद्या चिनी इतिहासाच्या संशोधकाला ह्या गावाला भेट द्यायला आवडेल. पण माझ्यासारख्या प्रवाशाला येथे आणण्यात काही अर्थ नाही असा एक छोटासा निषेध नोंदवून गाईडला पुढच्या ठिकाणी चलायला सांगितले.
गुईलीन शहरात खूप (गुई आणि इतर प्रकारची ) झाडे तर आहेतच पण भर शहरात बऱ्याच सुळक्यासारख्या उंच टेकड्याही आहेत. मुख्य म्हणजे वर सांगितलेला १९८१ चा कायदा येण्याअगोदर, या निसर्गाच्या अजूब्यांना जमिनीच्या किंमती आकाशाला भिडत असतानाही आधुनिकीकरणाच्या नावाखाली जमीनदोस्त केले गेले नाही हे विशेष. यातली ली नदीकाठची एक टेकडी तांग राजेशाहीमधल्या (इ. ६१८ - ९०७) एका प्रसिद्ध सेनानी 'फुबो' च्या नावाने ओळखली जाते. २०० मीटर उंचीच्या या सुळक्यावरून ली नदी व गुईलीन परिसराचे विहंगम दृश्य दिसते. वर चढताना अनेक स्तरांवर छोट्या गुहा आहेत आणि त्या प्रत्येक गुहेच्या मागे काही ना काही ऐतिहासिक घटना दडलेली आहे आणि गुहांत त्या घटनांशी निगडित पुतळे व कोरीवकामे आहेत. टेकडीच्या टोकावर फुबोचे मंदिर आहे.
.
.
.
गुईलीन आणि परिसरातील डोंगर व टेकड्या चुनखडीच्या खडकांनी बनलेल्या आहेत. पावसाच्या पाण्याने व नदीच्या प्रवाहाने होणाऱ्या लाखो वर्षांच्या झिजेमुळे त्यांचे चित्रविचित्र आकारांत रूपांतर झालेले आहेत. या भागात दिसणाऱ्या विचित्र निसर्गाचे हे सोपे कारण... पण त्याची विलक्षण प्रेक्षणीयता मात्र जगात इतरत्र कोठेही आढळत नाही... आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तर चीनच्या इतर भागांमध्येही नाही. याचा उत्तम अनुभव आपल्याला यांगशुओला जाताना येईल.
पुढचा थांबा, हत्तीच्या सोंडेची टेकडी (Elephant Trunk Hill), अशाच प्रकारच्या एका निसर्गाकृतीचे उदाहरण आहे. या टेकडीची ली नदीच्या प्रवाहाने अशी झीज झाली आहे की जरा दुरून पाहिले तर एक हत्ती सोंडेने नदीतले पाणी पीत आहे असे दिसते.
बाजूला एक सुंदर बाग आहे आणि नदीच्या पाण्यात रेस्तरॉ आहेत ! फिरून दमल्यावर संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून निवांत खाणेपिणे करायला मस्त जागा आहे.
.
चुनखडीच्या खडकांची झीज ही जशी डोंगराचे बाह्यरूप बदलते तसेच काही ठिकाणी तो आतून पोखरून (विरघळवून) त्याच्या पोटांत एक प्रचंड गुहा निर्माण करते. अशा गुहेत वरून टपकणारा पाण्याचा थेंब जर वरच्यावर सुकला तर त्यातल्या कॅल्शियमच्या क्षाराचा एक सूक्ष्म थर छतावर साठतो. असे हजारो-लाखो वर्षे सतत चालू राहून छतापासून लोंबणारा लवणस्तंभ (stalactite) बनतो. जेव्हा क्षारयुक्त पाण्याचे थेंब खाली पडून सुकतात तेव्हा हजारो-लाखो वर्षांनी जमिनीवरून छताकडे जाणारा स्तंभ (stalagmite) तयार होतो. कधीकधी हे दोन स्तंभ एकमेकास भेटून छतापासून जमिनीपर्यंत सलग स्तंभही तयार होतो (Stalacto-stalagmite). अशीच एक गुहा गुईलीन जवळच्या टेकडीत आहे. तिचे नाव आहे: वेताच्या बासरीची गुहा (Reed Flute cave). ली नदीने पोखरलेल्या या टेकडीशेजारीच असलेल्या बासरी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या वेताच्या बेटांवरून या गुहेचे नाव पडले आहे. २४० मीटर लांबीच्या या गुहेत लवणस्तंभांचे असंख्य आकार तयार झाले आहेत. त्यांना चिनी मंडळींनी कल्पकता वापरून Crystal Palace, Dragon Pagoda, Virgin Forest, Flower and Fruit Mountain, इ. नावे दिली आहेत. शिवाय या आकारांवर रंगीबेरंगी प्रकाशझोत सोडून त्यांचे सौंदर्य अजून खुलवले आहे. या गुहेला आतापर्यंत २०० च्यावर राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांनी भेट दिल्याचे एका पाटीवर नमूद करून ठेवलेले होते.
Stalactites
.
एखाद्या शहराच्या skyline सारखी दिसणारी रचना (stalagmites)
Stalacto-stalagmite
हा लवणस्तंभ एवढा पातळ आहे की त्याच्यातून पलीकडच्या दिव्याचा उजेड आरपार जातो.
याच गुहेत असलेले एक कासव. हे ५०० वर्षे वयाचे असल्याचा त्यांचा दावा होता. खरे खोटे चिनी देवालाच माहीत !
यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम होता "Two Rivers and Four Lakes Cruise". गुईलीनच्या हद्दीतून दोन (ली व ताओहुआ / Peach Blossom) नद्या वाहतात आणि शिवाय रोंग (Banyan Tree), शान (Chinese Fir), गुई (Osmanthus Tree), व मुलाँग (Wooden Dragon) हे चार तलाव आहेत. या सर्वांना कालव्यांनी जोडलेले आहे. या सर्व जलप्रणालीच्या काठांवर सुंदर बागबगीचे, स्मृतीस्तंभ इ. प्रेक्षणीय गोष्टी बनवल्या आहेत. या सर्वांवर रात्री मनमोहक रंगाची बरसात करणारे दिवे वापरून प्रकाशझोत सोडतात. शिवाय काठांवर जागोजागी रंगमंच उभारून गुईलीनच्या कलेचे आणि इतिहासाचे प्रदर्शन केले जाते. त्याचबरोबर आजूबाजूच्या इमारतींवरही रोषणाई केलेली असते. या जलप्रणालीवरचे सर्व पूल पाच एक वर्षांपूर्वी नव्याने बांधले आहेत. त्यांत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व होते ते त्यांच्या पूर्वरूपात परत बांधले पण इतर पूल जगभरच्या प्रसिद्ध (लंडन ब्रिज, गोल्डन गेट ब्रिज, इ.) पुलाच्या छोट्या प्रतिकृतीच्या स्वरूपात बनवले आहेत. हे सर्व आपण चालत फेरफटका मारतही पाहू शकतो. पण खास बनवलेल्या बोटीने हे सर्व बघत फिरण्याची मजा काही औरच असते.
क्रूझकडे जाताना टिपलेले गुईलीनचे नाईटलाईफ...
क्रूझमधली काही क्षणचित्रे... (बोटीच्या हालचालीमुळे, रात्रीच्या वेळेमुळे आणि प्रकाशाच्या झगमगाटीमुळे चित्रे तितकीशी स्पष्ट आली नाहीत याबद्दल दिलगीर आहे).
.....................
.
.
.
.
दुसर्या दिवशी जायचे होते जगातल्या सर्वात जास्त विचित्र आकाराच्या
डोंगरांच्या भागात. आतापर्यंत बघितले त्यापेक्षा काय वेगळे आश्चर्य बघायला
मिळेल याची कल्पना करणे सोडून दिले होते. कारण आतापर्यंत तरी दर वेळेस
कल्पना तोकडी पडली होती! शिवाय आज बरेच पायी फिरणेही झाले होते. सरळ
निद्रादेवीच्या अधीन झालो.
र्या
(क्रमशः)
सहलीचा अकरावा दिवस उजाडला. गुईलीनला जाणारे विमान सुटण्याची वेळ दुपारी दोन वाजताची होती. गाइडच्या म्हणण्याप्रमाणे हॉटेलवरून बारा वाजता निघाले तरी चालण्यासारखे होते. म्हणजे न्याहारीनंतर चांगले अडीच तीन तास मोकळे होते. काल फिरताना बघितलेली शांग्रीलाची टेकडीवरची लामासरी इटिनेररीमध्ये नसल्याने राहिली होती. लांबून तर इमारत छान दिसत होती. आतापर्यंत शांग्रीलाचे सगळे रस्ते पाठ झाले होते त्यामुळे एकटाच बाहेर पडलो आणि लामासरीच्या दिशेने चालू लागलो.
लामासरीच्या आवारात शिरलो आणि हॉटेलमध्ये लोळत न पडण्याचा निर्णय केल्याचा आनंद झाला. कारण नाहीतर एका प्रेक्षणीय स्थळ बघायचे राहिले असते. शांग्रीलात सगळेच इतके सुंदर आहे आणि शिवाय सोंगझानलीन लामासरी सारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणामुळे ह्या लामासरीचा नंबर इटिनेररीत आला नव्हता असे दिसते !
ही लामासरी शांग्रीलाच्या एका टोकाला एका टेकडीवर बांधलेली आहे. ही सोंगझानलीन लामासरीच्या सात वर्षे अगोदर १६६७ साली बांधलेली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे एक मोठा उत्सव असतो. त्यांत इथल्या स्थानिक देवतेचे ८.५ मी X ५.२ मी आकाराचे एक रेशमाच्या भरतकामाचे चित्र बनवतात आणि भक्तांच्या दर्शनासाठी ठेवतात. शांग्रीलातही गांवदेवतेचा उत्सव सण साजरा करतात हे ऐकून मजा वाटली.
या लामासरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे तिचे गोल फिरणारे भलेमोठे धम्मचक्र. हे शांग्रीलात फिरताना बऱ्याच लांबूनही दिसते. मी याच्यावरूनच या लामासरीचा माग काढत काढत येथे आलो होतो !
साधारण १००-१५० मीटरचा चढ आहे. पण वर आल्यावर आजूबाजूचे मनोहर दृश्य पाहून सगळा शीण नाहीसा होतो. आवारात फिरता फिरता लामासरीच्या लामा जानसेन याची ओळख झाली त्यांनीही भारतीय चेहरा बघून अगत्याने कोठून आलो वगैरे चौकशी केली. त्यांचे भारतात काही काळ वास्तव्य होते त्यामुळे थोडे हिंदी आणि बरेचसे इंग्लिशमध्ये संभाषण झाले. नंतर मुख्य इमारतीशेजारच्या छोट्या पठारावरच्या भव्य धम्मचक्राकडे गेलो. टेकडीखालून भासते त्यापेक्षा हे चक्र बरेच मोठे आहे.
सोनेरी रंगाच्या चक्रावर बौद्ध धर्माची चिन्हे तर होतीच पण तेथील जनजीवन, कला आणि इतिहास याचेही चित्रण होते. हे प्रचंड चक्र फिरविण्यासाठी कमीतकमी वीसएक जण लागतात !
मी बराच वेळ फक्त फोटो काढतो आहे याचे निरीक्षण केल्यावर या आजीबाईंनी मला अक्षरशः हाताला धरून चक्र फिरवायला हातभार लावायला भाग पाडले !
सकाळच्या वेळेचे सोने झाले असे म्हणत टेकडीच्या पायऱ्या उतरून खाली आलो तर लामासरीच्या प्रांगणातले हे खास युन्नान तिबेटी पोशाखांचे दुकान समोर आले.
.
हे लोक त्यांच्या निसर्गासारखेच रंगीबेरंगी व मोहक नक्षीचे कपडे वापरतात. अगदी रोजच्या कपड्यांतही गुलाबी, लाल, निळा आणि पिवळा या रंगांचा कलापूर्ण वापर सर्रास दिसतो.
रमत गमत परत हॉटेलकडे निघालो. वाटेत भाजीवाले आपल्याकडल्यासारखेच रस्त्याच्या कडेला दुकान लावून बसले होते. रसरशीत ताजी भाजी बघून फोटो काढले... आता ते शाकाहारी मिपाकरांना दाखवून खूश करीन म्हणतो ! +D
.
.
हॉटेलवर येईपर्यंत साडेअकरा वाजले होते. तयारी करून ताबडतोप विमानतळाकडे प्रयाण केले. आज ८६० किमीचा विमानप्रवास होता. प्रथम शांग्रीला ते युन्नानची राजधानी कुनमिंग हे तासाभराचे उड्डाण, तेथे दोन तास थांबा घेऊन व विमान बदलून परत सव्वा तास उड्डाण असे करत संध्याकाळी साडेसहाला गुईलीनला पोहोचलो.
गुईलीन म्हणजे आमच्या टूर कंपनीचे शहर. येथे जरा खास खातीरदारी होईल असा होरा मनांत होता. पण विमानतळातून बाहेर पडलो तर जरा निराशाच झाली. लिजीयांग-शांग्रीलामध्ये दिमतीला चकचकीत ऐसपैस SUV होती, इथेतर एक छोटी सिडान आणि तीही बऱ्यापैकी म्हातारी ! शिवाय तिचे अंतरंगही जरासे कळकटच वाटत होते. पण साडेसहा तासांच्या प्रवासानंतर हॉटेलवर जाऊन एक वट्ट शॉवर घेण्याची प्रबळ इच्छा होती. शिवाय विमानतळावर गाईड काय करू शकला असता म्हणा. सगळे निर्णय तर टूर मॅनेजर घेते. तेव्हा पहिले हॉटेल गाठूया आणि नंतरच काय ते बोलू असे ठरवले. मात्र एक किरकोळ निषेध नोंदवून गाडीत बसलो. विमानतळापासून शहर ४५ मिनिटंच अंतरावर आहे. तीसएक मिनिटे चालल्यानंतर गाडी खोकला झाल्यासारखे आवाज करू लागली आणि चालकाने गाडी सफाईने सर्विस रोडावर घेताघेताच बंद पडली ! चालक खाली उतरून टॅक्सीला हात करू लागला. गाईड वरमून "गाडी मी ठरवीत नाही. ऑफिसमधूनच ते ठरते." वगैरे सारवासारवीची भाषा करू लागला. त्याला म्हटले, "ठीक आहे तुला दोष देत नाही पण आता हॉटेलमध्ये पोचल्यावर मी टूर मॅनेजरशी बोलू. तेव्हा मात्र हे सगळे सांग, तेथे सारवासारवी नको". त्याला दोष देत नाही म्हटल्यावर त्याची कळी जरा खुलली, म्हणाला, " हे सर्व जरूर सांगेन आणि चांगल्या गाडीची शिफारसही करेन."
हॉटेल मुख्य रस्त्यावर छान जागी होते. लॉबी आकर्षक होती. पण खोल्यांची स्थिती काही बरी वाटली नाही. एक कुबट दर्प आणि सिगारेटचा वास पॅसेजमध्ये भरून राहिला होता. खोलीमध्ये शिरलो, तिचे रूपही बरे वाटले नाही. आता खूप झाले... टूर मॅनेजरला फोन लावला आणि तुझ्याच शहरात कशी अवस्था आहे ते गाईडच्या तोंडीच ऐक म्हणून गाईडच्या हाती फोन दिला. त्यांचे चिनीमध्ये संभाषण झाले, मग फोन हॉटेल मॅनेजरच्या हाती गेला. परत ३-४ मिनिटे संभाषण. मग फोन माझ्या हाती आणि एक सवाल मला, "सर काय म्हणणं आहे तुमचं?" आता माझा रागाचा पारा चढायला लागला होता. तो ताब्यात ठेवत म्हणालो, "टूर बुक करताना स्वच्छता आणि टापटीप हे माझे निकष मी सर्वप्रथम सांगितले होते आणि तू कबूल केले होतेस. आता त्याची पूर्तता कर. अजून काय?" एवढ्यावरून आणि नकळत झालेल्या तिखट आवाजावरून तिला माझ्या मन:स्थितीची कल्पना आली असावी. पण कसलेली टूर मॅनेजरच ती. हॉटेल मॅनेजरला सांगून अजून दोन मजले हिंडवून खोल्या दाखवून घेतल्या.
एवढे झाल्यावर मात्र मी तिला परत फोन करून म्हटले, "तुझा माझ्या व गाईडच्या बोलण्यावर विश्वास नाही असे दिसते आहे. हे तुझेच गाव आहे. स्वतः इथे येऊन खात्री कर आणि मग बोल. तू म्हणशील तसे करू." ही मात्रा लागू पडली, पाच मिनिटात फोन करते म्हणाली. शब्द दिल्याप्रमाणे गाईडला फोन आला आणि आम्ही आमच्या बॅग घेऊन बाहेर पडलो. दुसरे हॉटेल मात्र खूपच छान निघाले... परत फोन आलाच तर आभाराचा यावा असे... गुईलीन ब्राव्हो हॉटेल. गुईलीनला भेट दिलीत तर येथे जरूर राहा.
प्रवासाच्या श्रमाने आणि टूर कंपनीने दिलेल्या धक्क्यांनी वैतागून कसेबसे जेवण केले आणि फारसा विचार न करता ताणून दिली.
===================================================================
सकाळी जाग आली आणि सहजच खिडकीकडे नजर गेली. कोणत्याही नवीन ठिकाणी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर त्याच्या खिडकीतून आजूबाजूचा परिसर न्याहाळणे हा माझा छंद आहे... अगदी विमानात खिडकीजवळची जागा पकडण्यासारखाच. कारण जरा उंचीवरून त्या शहराची जरा वेगळी आणि काहीशी पारदर्शक ओळख होते. कालच्या सगळ्या गडबडीत हे खिडकी प्रकरण राहूनच गेले होते. सहजच पावले खिडकीकडे वळली आणि हे गुईलीनच्या पहाटेचे प्रसन्न दर्शन झाले...
सूर्यमहाराज अजूनही गुलाबी थंडीमध्ये धुक्याची रजई चेहऱ्यावरून पूर्णपणे काढायला तयार नव्हते. त्या अर्धप्रकाशीत वातावरणात हॉटेलजवळचे शांत तळे, त्याच्या काठावरची हिरवीगार वनराई आणि त्यांत पक्षांची चाललेली सकाळची लगबग व चिवचिवाट ! गुईलीनची आजची ओळख भावली. सहलीचा मूड पुन्हा जुळून येऊ लागला.
गुईलीनचा अर्थ गुई (Sweet Osmanthus) नावाच्या सुगंधी वृक्षांचे जंगल. अर्थातच गुई वृक्ष या नगरीत जागोजागी आहेत अगदी त्या शहराच्या चिनी नावातही... 桂林. ह्या शहराची सुरुवात ली नावाच्या नदीच्या काठावर इ. पू. ३१४ साली एका वस्तीच्या स्वरूपात झाली. तेव्हापासून आजतागायत चीनच्या अनेक सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक स्थित्यंतरांत या शहराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे १९८१ सालापासून या शहराची गणना चीनच्या नैसर्गिक सौंदर्य व सांस्कृतिक ठेवा असलेल्या केवळ चार शहरांच्या गटामध्ये केली गेली. या गटातील इतर तीन शहरे आहेत बायजींग, हांगझू व सुजू. या चार शहरांत त्यांच्या पूर्वांपार ठेव्यांचे व निसर्गसौंदर्याचे रक्षण करण्याला प्राथमिकता आहे... आर्थिक-व्यापारी गोष्टींसह इतर सर्व दुय्यम मानावे असा कडक नियम आहे. हा नियम केवळ पुस्तकी न राहून त्याचे कसोशीने पालन केले जाते आहे हे ही शहरे फिरताना सगळीकडे स्पष्ट जाणवते.
आवांतरः यातले बायजींग शहर आपण अगोदरच पाहिले आहे, गुईलीन
(त्याच्या जगप्रसिद्ध यांगशुओ काऊंटीसह) आज-नी-उद्या पाहणार आहोत व इतर दोन
पुढच्या भांगांत येतीलच.
आजची पहिली भेट होती जिआंगतू (Jiangtou) नावाच्या गावाला. गुईलीनच्या बाहेर पडलो आणि शहराबाहेरच्या चीनचे दर्शन सुरू झाले.
.
.
जिआंगतू गावाची ख्याती अशी की चिनी साम्राज्यांचे अनेक पंतप्रधान या एका गावांतले होते. प्राचीनकाळी येथे शिक्षणाला इतके महत्त्व होते की ज्या कागदावर काहीही लिहिलेले आहे असा कागद जमिनीवर फेकायला मनाई होती... कारण तो पायाखाली येऊन लिखाणाचा अपमान होईल! नको असलेले पण लिखाणकाम केलेले कागद जाळून नष्ट करायला बांधलेली एक खास दाहिनी या गावात अजून जपून ठेवलेली आहे.
गावात फिरल्यावर मात्र भ्रमनिरास झाला. जिआंगतू गावाची "एक जुने खेडेगाव, जुन्या काळातल्या अनेक विद्वान पंतप्रधानांचे जुनेपुराणे वाडे आणि बर्यापैकी निसर्ग" एवढीच ओळख पुरे आहे. बऱ्याचशा वाड्यांची सांस्कृतिक क्रांतीच्या काळात मोडतोडही केली गेली होती त्याच्या खाणाखुणा जागोजागी दिसतात.
.
.
.
.
एखाद्या चिनी इतिहासाच्या संशोधकाला ह्या गावाला भेट द्यायला आवडेल. पण माझ्यासारख्या प्रवाशाला येथे आणण्यात काही अर्थ नाही असा एक छोटासा निषेध नोंदवून गाईडला पुढच्या ठिकाणी चलायला सांगितले.
गुईलीन शहरात खूप (गुई आणि इतर प्रकारची ) झाडे तर आहेतच पण भर शहरात बऱ्याच सुळक्यासारख्या उंच टेकड्याही आहेत. मुख्य म्हणजे वर सांगितलेला १९८१ चा कायदा येण्याअगोदर, या निसर्गाच्या अजूब्यांना जमिनीच्या किंमती आकाशाला भिडत असतानाही आधुनिकीकरणाच्या नावाखाली जमीनदोस्त केले गेले नाही हे विशेष. यातली ली नदीकाठची एक टेकडी तांग राजेशाहीमधल्या (इ. ६१८ - ९०७) एका प्रसिद्ध सेनानी 'फुबो' च्या नावाने ओळखली जाते. २०० मीटर उंचीच्या या सुळक्यावरून ली नदी व गुईलीन परिसराचे विहंगम दृश्य दिसते. वर चढताना अनेक स्तरांवर छोट्या गुहा आहेत आणि त्या प्रत्येक गुहेच्या मागे काही ना काही ऐतिहासिक घटना दडलेली आहे आणि गुहांत त्या घटनांशी निगडित पुतळे व कोरीवकामे आहेत. टेकडीच्या टोकावर फुबोचे मंदिर आहे.
.
.
.
गुईलीन आणि परिसरातील डोंगर व टेकड्या चुनखडीच्या खडकांनी बनलेल्या आहेत. पावसाच्या पाण्याने व नदीच्या प्रवाहाने होणाऱ्या लाखो वर्षांच्या झिजेमुळे त्यांचे चित्रविचित्र आकारांत रूपांतर झालेले आहेत. या भागात दिसणाऱ्या विचित्र निसर्गाचे हे सोपे कारण... पण त्याची विलक्षण प्रेक्षणीयता मात्र जगात इतरत्र कोठेही आढळत नाही... आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तर चीनच्या इतर भागांमध्येही नाही. याचा उत्तम अनुभव आपल्याला यांगशुओला जाताना येईल.
पुढचा थांबा, हत्तीच्या सोंडेची टेकडी (Elephant Trunk Hill), अशाच प्रकारच्या एका निसर्गाकृतीचे उदाहरण आहे. या टेकडीची ली नदीच्या प्रवाहाने अशी झीज झाली आहे की जरा दुरून पाहिले तर एक हत्ती सोंडेने नदीतले पाणी पीत आहे असे दिसते.
बाजूला एक सुंदर बाग आहे आणि नदीच्या पाण्यात रेस्तरॉ आहेत ! फिरून दमल्यावर संध्याकाळी नदीच्या पाण्यात पाय सोडून निवांत खाणेपिणे करायला मस्त जागा आहे.
.
चुनखडीच्या खडकांची झीज ही जशी डोंगराचे बाह्यरूप बदलते तसेच काही ठिकाणी तो आतून पोखरून (विरघळवून) त्याच्या पोटांत एक प्रचंड गुहा निर्माण करते. अशा गुहेत वरून टपकणारा पाण्याचा थेंब जर वरच्यावर सुकला तर त्यातल्या कॅल्शियमच्या क्षाराचा एक सूक्ष्म थर छतावर साठतो. असे हजारो-लाखो वर्षे सतत चालू राहून छतापासून लोंबणारा लवणस्तंभ (stalactite) बनतो. जेव्हा क्षारयुक्त पाण्याचे थेंब खाली पडून सुकतात तेव्हा हजारो-लाखो वर्षांनी जमिनीवरून छताकडे जाणारा स्तंभ (stalagmite) तयार होतो. कधीकधी हे दोन स्तंभ एकमेकास भेटून छतापासून जमिनीपर्यंत सलग स्तंभही तयार होतो (Stalacto-stalagmite). अशीच एक गुहा गुईलीन जवळच्या टेकडीत आहे. तिचे नाव आहे: वेताच्या बासरीची गुहा (Reed Flute cave). ली नदीने पोखरलेल्या या टेकडीशेजारीच असलेल्या बासरी बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या वेताच्या बेटांवरून या गुहेचे नाव पडले आहे. २४० मीटर लांबीच्या या गुहेत लवणस्तंभांचे असंख्य आकार तयार झाले आहेत. त्यांना चिनी मंडळींनी कल्पकता वापरून Crystal Palace, Dragon Pagoda, Virgin Forest, Flower and Fruit Mountain, इ. नावे दिली आहेत. शिवाय या आकारांवर रंगीबेरंगी प्रकाशझोत सोडून त्यांचे सौंदर्य अजून खुलवले आहे. या गुहेला आतापर्यंत २०० च्यावर राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांनी भेट दिल्याचे एका पाटीवर नमूद करून ठेवलेले होते.
Stalactites
.
एखाद्या शहराच्या skyline सारखी दिसणारी रचना (stalagmites)
Stalacto-stalagmite
हा लवणस्तंभ एवढा पातळ आहे की त्याच्यातून पलीकडच्या दिव्याचा उजेड आरपार जातो.
याच गुहेत असलेले एक कासव. हे ५०० वर्षे वयाचे असल्याचा त्यांचा दावा होता. खरे खोटे चिनी देवालाच माहीत !
यानंतर संध्याकाळचा कार्यक्रम होता "Two Rivers and Four Lakes Cruise". गुईलीनच्या हद्दीतून दोन (ली व ताओहुआ / Peach Blossom) नद्या वाहतात आणि शिवाय रोंग (Banyan Tree), शान (Chinese Fir), गुई (Osmanthus Tree), व मुलाँग (Wooden Dragon) हे चार तलाव आहेत. या सर्वांना कालव्यांनी जोडलेले आहे. या सर्व जलप्रणालीच्या काठांवर सुंदर बागबगीचे, स्मृतीस्तंभ इ. प्रेक्षणीय गोष्टी बनवल्या आहेत. या सर्वांवर रात्री मनमोहक रंगाची बरसात करणारे दिवे वापरून प्रकाशझोत सोडतात. शिवाय काठांवर जागोजागी रंगमंच उभारून गुईलीनच्या कलेचे आणि इतिहासाचे प्रदर्शन केले जाते. त्याचबरोबर आजूबाजूच्या इमारतींवरही रोषणाई केलेली असते. या जलप्रणालीवरचे सर्व पूल पाच एक वर्षांपूर्वी नव्याने बांधले आहेत. त्यांत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व होते ते त्यांच्या पूर्वरूपात परत बांधले पण इतर पूल जगभरच्या प्रसिद्ध (लंडन ब्रिज, गोल्डन गेट ब्रिज, इ.) पुलाच्या छोट्या प्रतिकृतीच्या स्वरूपात बनवले आहेत. हे सर्व आपण चालत फेरफटका मारतही पाहू शकतो. पण खास बनवलेल्या बोटीने हे सर्व बघत फिरण्याची मजा काही औरच असते.
क्रूझकडे जाताना टिपलेले गुईलीनचे नाईटलाईफ...
क्रूझमधली काही क्षणचित्रे... (बोटीच्या हालचालीमुळे, रात्रीच्या वेळेमुळे आणि प्रकाशाच्या झगमगाटीमुळे चित्रे तितकीशी स्पष्ट आली नाहीत याबद्दल दिलगीर आहे).
.....................
.
.
.
.
दुसर्या दिवशी जायचे होते जगातल्या सर्वात जास्त विचित्र आकाराच्या
डोंगरांच्या भागात. आतापर्यंत बघितले त्यापेक्षा काय वेगळे आश्चर्य बघायला
मिळेल याची कल्पना करणे सोडून दिले होते. कारण आतापर्यंत तरी दर वेळेस
कल्पना तोकडी पडली होती! शिवाय आज बरेच पायी फिरणेही झाले होते. सरळ
निद्रादेवीच्या अधीन झालो.
र्या
(क्रमशः)
आज सहलीचा चौदावा दिवस. न्याहारीकरता चवथ्या मजल्यावरच्या रेस्तरॉमध्ये आलो. डायनिंग हॉलची एक बाजू संपूर्ण काचेची होती. सकाळचा नजारा जरा नीट बघवा म्हणून काचेचाच दरवाजा ढकलून छोटेखानी टेरेसवर आलो आणि वेगळ्याच यांगशुओचे दर्शन झाले. अजूनही धुक्यात बुडालेल्या चित्रविचित्र टेकड्या, गर्द झाडीत बसलेली घरे, थोडेसे दूर असलेले तळे, अजून निर्मनुष्य असलेले रस्ते आणि हॉटेलसमोरचे छोटे पटांगण...काल बघितलेल्या गर्दीने भरलेल्या यागशुओपेक्षा हे चित्र वेगळे होते.
न्याहारी करून लॉबीत आलो. आज सकाळी एका खेडेगावाला भेट द्यायची होती. हे नेहमीचे प्राचीन गाव वगैरे नव्हते. यांगशुओ जवळचे ऐशान नावाचे छोटेसे खेडे होते. मी त्याचे नाव अगोदर ऐकले नव्हते आणि गुईलीन शेजारच्या खेडेगावात जसा भ्रननिरास झाला तसा इथे होऊ नये असे काहीसे भाव माझ्या बोलण्या-चालण्यात आले असावेत. कारण गाइड स्वतःहून म्हणाला की या वेळेस तसं काही होणार नाही याची खात्री बाळगा. प्रसिद्ध नसलेले खरेखुरे चिनी गाव पाहण्याची मलाही उत्सुकता होतीच.
आज कारमधून नाही तर ओपन एअर मिनी बसमधून जायचे होते. येवढ्या लांब नावाचे हे वाहन म्हणजे काय प्रकरण आहे ते लवकरच कळले.
ही बस या भागातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे... साधारण आपल्याकडच्या १०-१२ सीटच्या रिक्शासारखी. आमचा ऐशानच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पाच मिनिटात आम्ही यांगशुओ गावाच्या बाहेर पडलो. नीटस, चकचकीत रंगीत घरे, गुळगुळीत आखीवरेखीव रस्ते मागे पडले होते आणि एका वेगळ्या जगाची सुरुवात होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस शेतजमीन आणि बांबूची बेटे दिसायला लागली. नऊ वाजले होते तरी अजून धुके कमी झाले नव्हते. तरीसुद्धा त्यातून डोकावत जवळच्या टेकड्या त्यांचे वेगवेगळे आकार दाखवीत खुणावत होत्या.
.
जरा पुढे गेल्यावर एक छोटीशी वस्ती लागली. आधुनिक चारचाकी सोडल्यातर भारताच्या खेडेगावांची आठवण झाली.
.
वाटेत एक नदी लागली आणि दृश्य पाहून गाडी थांबवायला सांगितली. नदीचे नितळ स्वच्छ पाणी, दोन्ही काठांवर गर्द हिरवी झाडी आणि कपडे धुणाऱ्या स्त्रिया. चित्रातली नदी अजून किती वेगळी असते? भारतापेक्षा येथे फरक म्हणजे स्त्रिया शर्ट-पँट घालून होत्या आणि झाडी जरा जास्त मनमोहक वाटली.
जसे ऐशान जवळ येऊ लागले तसे यांगशुओ काउंटीचे सौंदर्य परत खुलायला लागले. भाजीपाल्याची लागवड आणि भातशेती दिसायला लागली.... आश्चर्याची गोष्ट अशी की एखाद्या शेतात भात कापून माळणीसाठी रचून ठेवलेले होते तर पालीकडल्या शेतात नुकतीच लावणी झालेली दिसत होती ! आणि अर्थातच सगळीकडे पार्श्वभूमीवर एकापेक्षा एक विचित्र आकाराच्या टेकड्या होत्याच.
.
.
थोड्याच वेळात गाडी एका बर्या दिसणार्या घरासमोर उभी राहिली. गाइड म्हणाला, "चला तुम्हाला चिनी खेडेगावातले पारंपरिक घर दाखवतो."
गाडीतून उतरतो तर घराच्या अंगणाच्या कोपऱ्यात एक वृद्ध बाई खाली बसून काहीतरी जाळताना दिसली. गाईडकडून कळले की कर्मधर्मसंयोगाने तो पूर्वजांच्या स्मरणाचा दिवस होता. गाईडला म्हणालो, "जे चालले आहे त्यात खंड पाडू नकोस. सगळा कार्यक्रम यथासांग पार पडू दे." यात जेवढा त्या स्त्रीला त्रास न देण्याचा विचार होता तेवढाच तो चाललेला सोहळा बघायची अचानक आलेली संधी सोडायची नव्हती हा विचारही होता !
एका बांबूच्या मोठ्या टोपलीवर बांबूचीच परात आणि परातीत तीन वाडग्यांत भात, तीन छोट्या कपांत चहा, एका बशीत डुकराच्या मांसाचा तुकडा, पाण्याची बाटली, एक चिलीम, तंबाखूची पिशवी आणि चिनी फटाक्यांच्या माळा होत्या. आजीबाई कसले तरी पेपर जाळीत होत्या.. त्यांना पेपर मनी म्हणतात. असे जेवण, चहा, पाणी व तंबाखू अर्पण केला आणि खास ठसे उमटवलेले पैशाचे कागद जाळले म्हणजे हे सर्व पूर्वजांना ते जेथे कोठे असतील तेथे मिळते अशी समजूत आहे. शेवटी फटाके वाजवले आणि जेवण कावळ्यांना न देता घरात परत नेले. थोडाफार फरक सोडला तर ही आपल्याकडची सर्वपित्री अमावास्याच !
आजीचं नाव ली फुंग यींग. वय वर्षे ७५+. सडपातळ आणि एकदम टुणटुणीत. हसरा चेहरा आणि मायाळू स्वभाव. मनमोकळेपणाने हसून स्वागत केलं आणि बरोबर फिरून आपलं सगळं घर दाखवलं. घर तसे काही फार मोठे नव्हते पण आजूबाजूच्या घरांपेक्षा थोडे मोठे दिसत होते. बाहेर बांबूच्या टोपल्या, टोप्या आणि इतर बरेच सामान आडव्या बांबूंवर टांगून ठेवलेले होते.
घराबाहेरच्या अंगणात जरा उंचावर दगडी पिंडीसारख्या आकारावर एक दगडी जाते होते. हे कशाला असे विचारल्यावर आजीने त्याचा सोयाबीनचे दूध काढायला कसा उपयोग करतात ते प्रात्यक्षिकासह दाखवले. आम्हीही थोडाबहुत हात चालविण्याचा प्रयत्न केला. नवीन पिढीतल्या गाईडच्या आणि माझ्या कौशल्यात फार फरक नव्हता +D ! पण ७५+ वयाच्या आजीने ते जाते असे काय चालवले की आम्हा दोघांना लाज वाटावी.
मग आजीने घरात यायचे आमंत्रण दिले आणि खेड्यातील चिनी घर कसे असते ते दिसले. मोजक्याच जुन्या लाकडी वस्तू... एक बाकडे, दोन आरामखुर्च्या आणि आजी एकटीच राहत असल्याने वापरात नसलेल्या व एका बाजूला एकमेकावर रचलेल्या लाकडी खुर्च्या. त्याचा विरुद्ध बाजूच्या भिंतीलगत एक अर्ध्या उंचीची कॅबिनेट, तिच्यावर फ्लॅट स्क्रीन टीव्ही, त्याच्या दोन्ही बाजूनं जरासे वर भिंतीवर चाओ-माओ यांचे फोटो. एका बाजूला पोर्टेबल पंखा आणि वॉटर कूलर-डिस्पेनसर. एका टेबलावर लोणच्यासारख्या पदार्थांनी भरलेल्या काही बरण्या आणि असेच छोटेमोठे समान होते. मुलांनी भेट दिलेला नवा फ्रीज एका कोपऱ्यात दिमाखाने उभा होता. बाजूच्या एका लहान खोलीत झोपण्यासाठी एक लाकडी पलंग होता. झाले, आजीच्या सामानाची यादी संपली.
.
.
.
आजोबा फार पूर्वीच निवर्तले होते. दोन्ही मुलांची लग्ने होऊन ती फार दिवसापासून शहरातच राहत असतात आणि वर्षांतून एकाद्या वेळेस आजीला भेटायला येतात. हीच परिस्थिती चीनमध्ये बहुतेक खेड्यांची आहे. तरुण शहरात काम शोधण्यासाठी जातात आणि खेड्यात बहुतेक वृद्ध लोकच बहुसंख्येने उरतात. जसे आपल्या कोंकण आणि मुंबईचे आहे तसेच समीकरण चिनी खेडी आणि शहरांचे आहे.
बाकाच्या मागच्या भिंतीवर चिकटवलेली नातवंडांनी काढलेली चित्रे आणि दुसऱ्या एका भिंतीवर चिकटवलेल्या नातवंडांच्या शाळा व हायस्कूलच्या सर्टिफिकेट्सच्या प्रती आजीने मोठ्या अभिमानाने दाखवल्या तेव्हा शब्द कळले नाही तरी आजीचा जरासा कातर झालेला आवाज कानांना जाणवला.
.
मुख्य घराच्या बाजूलाच दोन छोट्या इमारती होत्या. त्यांतली एक म्हणजे आजीचे स्वयंपाकघर. बैठकीच्या खोलीत डामडौल नसला तरी एक प्रकारची टापटीप होती, स्वच्छता तर होतीच होती. त्यामानाने इथे अस्ताव्यस्तपणा जाणवला, स्वच्छताही तितकीशी दिसली नाही.
त्याच इमारतीच्या दुसर्या खोलीत आजी तिच्या पाळलेल्या डुकरांसाठी खाणे बनवते... डुकरांना शिजवलेले जेवण देतात ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकली !
आणि हे ते आरामात पहुडलेले भाग्यवान प्राणी ! त्यांच्या गुबगुबीत शरीरांकडे बघूनच दिसते आहे आजी त्याची किती काळजी करत असणार ते !
सगळी फेरी मारून झाल्यावर आजीने आग्रहाने घरात परत बोलवले आणि बस म्हणाली. आग्रह करूनही मी ऐकत नाही म्हटल्यावर गाइडकरवी एक पेअर सोलून जबरदस्तीने खायला भाग पाडले. ली आजी कायमचीच स्मरणात राहील. कोण कुठची हजारो किमीवरची आजी, पण एका तासाभराच्या सहवासात तिने मला माझ्या स्वता:च्या आजीची केवळ आठवणच करून दिली असे नाही तर जणू माझ्या आजीच्या सहवासाचेच सुख मिळाल्याच्या भावनेनेच मनात घर केले. जड अंतःकरणाने ली आजीचा निरोप घेतला.
परत येताना निसर्गसौंदर्य जरा अजून उजळ दिसत होते... कारण घुक्याचा पडदा हळूहळू दूर होऊ लागला होता. परत तीच नदी लागली पण आता पुलाच्या दुसर्या बाजूचा जाताना निर्मनुष्य दिसलेला घाट चाकरमान्यांनी गजबजला होता. आपापली "चारबांबी" काढून लोक उद्योगघंद्याला निघाले होते.
यांगशुओला परतलो ते एका शाळेत नांव दाखल करायलाच ! आमच्या गुरुचे नाव होते, मास्टर यांग दोंग बू. आज तीन विषयांचा अभ्यास करायचा होता. त्यांनी या तीनही विषयांत त्यांनी विद्यापीठातून मास्टरची पदवी मिळवलेली आहे.
पहिला विषय होता, चिनी कॅलिग्राफी. आजचा धडा होता १ ते ९ पर्यंत चिनी आकडे गिरवायचे...
नंतर चिनी रंगकामाचे धडे घेतले. परंपरागत बांबू आणि पांडा यांचे चित्र चिनी पद्धतीचे ब्रशांचे फटकारे मारत काढायला शिकलो...
आणि नंतर जवळच्या एका सार्वजनिक बागेत जाऊन 'ताई ची' चे शिक्षण घेतले...
हे सगळे होईपर्यंत एक वाजला. पोटात कावळे ओरडू लागले होते. पोटपूजा आटपून दोन वाजता चारचाकीने गुईलीनला निघालो. तेथून साडेसहा वाजताचे चेंगदूला जाणारे विमान पकडायचे होते. गुईलीन ते चेंगदू हे अंतर १,००० किमी आहे आणि उड्डाण पावणेदोन तासाचे आहे. हॉटेलवर पोचायला साडेनऊ-दहा वाजले.
===================================================================
पंधरावा दिवस "पांडा" चे शहर चेंगदू मध्ये उगवला. चेंगदू सिचुआन या चीनच्या दक्षिणपश्चिम भागातल्या राज्याची राजधानी आहे. हे शहर चीनच महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रापैकी एक आहेच पण ते जायंट पांडाचे शहर म्हणूनही जगप्रसिद्ध आहे. या शहराच्या उत्तरेला १० किमी वर हे २,००,००० हेक्टर क्षेत्रफळाचे प्रशस्त "पांडा पैदास आणि संशोधन केंद्र" केंद्र आहे. आज पहिला कार्यक्रम त्याला भेट देण्याचा होता.
पांडा मुख्यतः दोन प्रकारचे आहेत. पहिला जास्त प्रसिद्ध जायंट पांडा हा एक अस्वलाचा प्रकार आहे. गुबगुबीत गोलमटोल पांढरे शरीर, त्याच्यावरचे भलेमोठे काळे ठिपके आणि डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे यामुळे त्याची एक गोड दिसणारा प्राणी अशी ख्याती झाली आहे. त्यातच वॉल्ट डिस्ने पिक्चर्सने त्याला फिल्म, कार्टुन्स आणि खेळण्यांच्या माध्यमातून बरीच प्रसिद्धी दिली. हा एक नष्ट होऊ घातलेला प्राणी असून जगात सर्व मिळून केवळ ३,००० च्या आसपासच जायंट पांडा आहेत. त्यातील ९०% पेक्षा जास्त एकट्या चीनमध्ये आहेत. चेंगदूमधल्या संशोधन केंद्रात पांडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
जायंट पांडा हा एक बराच आळशी प्राणी असून दिवसाचा बहुतेक वेळ झोपण्यात आणि लोळण्यात घालवतो. याचे ९९% खाणे म्हणजे बांबूची कोवळी पाने. केंद्राच्या आवारात फिरून बर्याच जायंट पाडांच्या जागेपणीच्या आणि निद्रावस्थेतील लीला पाहिल्या.
.
.
.
नंतर केंद्रामध्ये जाऊन पांडावरचा एक महितीपट बघितला. पांडा एवढा आळशी प्राणी आहे की त्याची नैसर्गीक पैदास खूप कमी आहे आणि त्यामुळेच त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. या पांडा पैदास केंद्रात कृत्रिम पद्धतींचा वापर करून त्यांची पैदास वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण पांडामध्ये कृत्रिम पैदास करणेही इतर प्राण्यांच्या मानाने फार कठीण आहे. इतके की येथे दर पिलाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो ! नंतर ते जीवित राहावे म्हणून त्याची अनेक महिने खूप काळजी घ्यावी लागते. नशिबाने एक महिन्यापूर्वी एका पिलाचा जन्म झाला होता. इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले ते पिलू पाहिले.
नंतर साधारण ५०० मीटरवर असलेल्या तांबड्या पांडाच्या विभागात गेलो. हा एक तपकिरी रंगाच्या मांजरासारखा दिसणारा रॅक्कून, स्कंक अथवा विझल च्या प्रकारातील प्राणी आहे. म्हणजे जायंट आणि तांबड्या पाडांमध्ये नाव सोडून दुसरे साम्य अथवा नाते नाही ! हा प्राणी फक्त बांबूच खातो. याच्या भागात याला प्रवाशांकरिता बनवलेल्या लाकडी मार्गावरून चालायची परवानगी आहे... आणि तिचा तो न घाबरता फायदा घेतो. उलट "त्याच्यापासून कमीतकमी दोन मीटर दूर राहा, त्याला त्रास देऊ नका नाहीतर चिडलेल्या मांजरासारखा हल्ला करेल." अश्या प्रवाशांनाच दिलेल्या धमकीच्या पाट्या जागोजागी आहेत !
.
ह्या केंद्राच्या आवारत फिरताना नेहमीसारखीच चिनी सौदर्यदृष्टीची चमकही बघायला मिळते. केंद्राचे आवार एखाद्या बागेला लाजवेल असे होते. केंद्रामधली हिरवाई, वेगवेगळी सुंदर फुले, तलाव, कोई मासे आणि मनमोहक काळे राजहंस... केंद्र बघता बघता आपण कितीतरी चाललो याची जाणीव होऊन देत नाहीत.
.
.
.
.
तेथून पुढे पोटोबाचा कार्यक्रम होता.आज शनिवार असल्याने पुढे काय वाढून ठेवले आहे ही काळजी होतीच! पण गाइड चांगला कसलेला खेळाडू होता. थेट स्वयंपाकघरात शिरून खानसाम्याला पकडून तिळाच्या तेलातले शुद्ध शाकाहारी जेवण बनवून आणले! मसाले कमी प्रमाणात असले तरी भाज्या चवदार होत्या.
पुढचा थांबा होता चेंगदूचे सानशिंगदुई संग्रहालय. यात चेंगदूच्या परिसरातल्या थ्री स्टार पाईल्स नावाच्या तीन टेकड्यांच्या खाली सापडलेले इ. पू. ५००० ते पहिले शू राजघराणे (इ. पू. ११०० ते ७११) या विशाल काळातील अश्मयुगातील वस्तूंपासून ते माती, ब्राँझ आणि सोन्याचा वस्तूपर्यंत अनेक वस्तू आहेत.
जीवनवृक्ष
हा ब्राँझचा मुखवटा हे या संग्रहालयाचे मानचिन्ह आहे... विशेष म्हणजे तो चेहरा चिनी (मंगोलियन) नाही शिवाय नाक मोठे आणि उभे आहे (बसके नाही)! हा कोण हे एक न सुटलेले कोडे आहे. कदाचित माझ्यासारखा काही हजार वर्षांपुर्वी चीन बघायला गेलेला प्रवासी असावा +D !
नेहमीप्रमाणेच याही संग्रहालयाचे आवार इतके आकर्षक होते की त्याचे काही फोटो बघितल्या शिवाय विश्वास बसणे कठीण आहे. (खास सूचना: ही बाग नाही, संग्रहालयाचे आवार आहे!)
.
.
हॉटेलवर आलो तर हे माझी वाट पाहत होते... फळांची बशी आणि माफीनामा. सकाळी वॉश बेसिनमध्ये ब्लॉक झाले होते आणि एसीमधून पाणी गळत होते. ते दुरुस्त करण्यात जरा उशीर झाला होता. सहलीचा खोळंबा होऊ नये म्हणून आग्रह करून खोली बदलून घेऊन घाईघाईने निघालो होतो. हे फिरण्याच्या नादात आतापर्यंत विसरूनही गेलो होतो. पण सकाळच्या थोड्याश्या त्रासाबद्दल हॉटेलच्या मॅनेजर बाईंनी ही अशी दिलगिरी व्यक्त केली होती. चिनी व्यवस्थापनाचा आणि फळांचाही नमुना दिसावा म्हणून हा खास फोटो.
आज खूप चालणे झाले होते पण दमायला वेळ नव्हता. प्रवासाच्या शिणावर माझा नेहमीचा उतारा वापरला... सचैल शॉवर आणि गरमागरम कॉफी... आणि निघालो चेंगदूचा रात्रीचा शो पाहायला. थियेटर चेंगदूच्या ओल्ड क्वार्टर्स मध्ये होते. नव्या चेंगदूमधील काँक्रिटच्या जंगलापेक्षा खूप वेगळ्या रंगीत जगात आलो.
.
.
हा पॅगोडा एका चौकात एकांड्या शिलेदारासारखा उभा होता.
चेंगदूच्या शोमधील काही क्षणचित्रे
.
.
.
.
हे चित्र थिएटरच्या रंगभवनात होते... गाईड काही नीट सांगू शकला नाही. अगदी कालीमातेचेच वाटते !
चला आजचा दिवस संपला. उद्या बसलेल्या बुद्धाचे जगातील सर्वात उंच एकाश्म शिल्प बघायला लेशानला जायचे होते. दीडदोन तास चारचाकीचा प्रवास आहे आणि जरा लवकर निघालो तर गर्दी होण्याअगोदर शिल्प जास्त नीट बघता येईल असे गाइड म्हणाला. होकार दिला आणि त्याचा निरोप घेतला.
(क्रमशः)
सहलीचा सोळावा दिवस उजाडला. लवकरच सगळे आटपून लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील भव्य बुद्धमूर्ती बघण्यास निघालो.
ही बुद्धमूर्ती तांग राजघराण्याच्या काळात (इ. ६१८ - ९०७) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही ७१ मीटर उंच मूर्ती ही बसलेल्या अवस्थेतील बुद्धाची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Site चा दर्जा मिळाला आहे.
या मूर्तीची कथा मोठी रोचक आहे. वर सांगितलेल्या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते आणि त्यामुळे त्यांच्या संगमाच्या ठिकाणी जहाजे नेहमी दुर्घटनाग्रस्त होत असत. हैतांग नावाच्या बौद्धभिख्खूने स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धाच्या नजरेसमोर राहून या आपत्ती टळतील. सरकारी पाठिंब्याने व हैतांगच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ. ७१३ ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. त्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगने स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि तो त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागला. काही काळाने त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने या प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पुरा केला. गंमत अशी की एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले !
आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. त्यात पावसाच्या पाण्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले गेले आणि छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले गेले. नंतर युवान राजघराण्याच्या शेवटाला मंगोल आक्रमकांनी या छताची मोडतोड केली आणि सोने माणके लुटून नेली. तेव्हापासून ही मूर्ती ऊनपावसाचा मारा सहन करत उघड्यावरच आहे. आजूबाजूच्या प्रदूषणाचाही प्रभाव तिच्यावर पडू लागला आहे.
चेंगदूहून येथे पोहोचायला चारचाकीने दीड तास लागला. मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत... आणि अर्थातच त्यांच्याशी निगडित इतिहास, लोककथा व दंतकथा.
प्रथम त्या क्षेत्राचे भव्य प्रवेशद्वार आपले स्वागत करते.
टेकडी चढायला सुरुवात करताच हा जंगलचा राजा तुम्हाला धाक घालायचा प्रयत्न करतो.
सबंध रस्ताभर अनेक बऱ्या स्थितीतली आणि पडझड झालेली कोरीवकामे दिसतात. टेकडीच्या माथ्यावर येऊन कोरून काढलेल्या कपारीच्या टोकाला पोहोचलो की बुद्धाचे भव्य मस्तक दिसू लागते.
मूर्तीच्या उजव्या हाताच्या बाजूच्या कड्यामधून एक वेळेस एक माणूस खाली उतरू शकेल (एक दोन ठिकाणी फार तर ३- ४) असा चिंचोळा नऊ वळणांचा नागमोडी मार्ग आहे. त्याच्यावरून खाली उतरता उतरता संपूर्ण मूर्तीचे डोक्यापासून पायापर्यंत दर्शन घेता येते.
.
...........................
.
.
संपूर्ण मार्गावर कड्याच्या भिंतीवर कोरीवकाम केले आहे. शेकडो वर्षांच्या ऊनपावसाच्या माऱ्याने त्याचातील बऱ्याच शिल्पांची हानी झाली आहे. पण काही अजूनही सुबकपणा टिकवून राहिली आहेत.
पूर्ण खाली उतरल्यावरच मूर्तीच्या भव्यपणाची खरी कल्पना येते. त्या तांबड्या पाटीजवळ दिसतोय तो मूर्तीच्या उजव्या पायाचा अंगठा आहे.
परतीचा रस्ता प्रथम कड्यातून खोदलेल्या एका छोट्या बोगद्यातून पलीकडच्या बाजूस जातो आणि मग डोंगर चढून जायला पायर्या सुरू होतात.
टेकडीच्या माथ्यावर परत आल्यावर हैतांग भिख्खूची गुहा लागते. तिच्या समोर हैतांगचा पुतळा आहे.
त्यानंतर एक बुद्धाचे देऊळ लागते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे लोक तेथे उदबत्त्या आणि दीपप्रज्वलन करून पुजा करत होते.
देवळाच्या दरवाज्यावरचे कोरीवकाम लक्षवेधक होते.
...........................
डोंगर चढून-उतरून बराच व्यायाम झाला होता. जेवणाची वेळही झाली होती. लेशान शहरात जाऊन पोटपूजा केली. आता परत बुद्धदर्शन करायचे होते पण या वेळी ते नद्यांच्या संगमात उभ्या राहिलेल्या बोटीतून करायचे होते. नदीच्या वेगाने वाहणार्या पाण्यात बोटीचा कप्तान मोठ्या कौशल्याने बोट एका जागेवर रोखून धरतो आणि प्रवाशांना पूर्ण बुद्धमूर्तीचे त्याच्या दोन्ही बाजूंच्या व्दारपालांसकट दर्शन होते--- आणि तेही अगदी मान या कानापासून त्या कानापर्यंत न हलवता !! आणि अर्थातच ही फोटो काढण्याचीही उत्तम संधी असते!
हॉटेलवर परते पर्यंत चार वाजले होते. नंतरचा वेळ मोकळा होता. जरा हॉटेलच्या आसपासच्या रस्त्यांवरून फेरी मारली आणि लवकरच जेवण करून झोपी गेलो.
===================================================================
आज सकाळी जरा आराम होता. नेहमी फिरणे साधारण आठ साडेआठला सुरू होत होते. आज चोंगचिंगला जाण्याकरिता पावणेदहाला हॉटेलवरून निघायचे होते. जरा उशीरापर्यंत ताणून दिली. रमत गमत सकाळची तयारी आणि न्याहारी केली. गाईड आल्यावर निघालो आणि गाडी आम्हाला एका देखण्या इमारतीकडे घेऊन आली.
कसली मस्त इमारत आहे नाही का... विमानतळाची... अर्र.. नाही नाही... रेल्वे स्टेशनची? विश्वास बसत नसेल तर हे वेळापत्रक पहा. पहिल्या रकान्याच्या शीर्षकात "Train Number" असे स्पष्ट लिहिलेले आहे !
आत शिरलो आणि थक्क झालो. अनेक छान छान रेल्वे स्थानके बघितली आहेत पण विमानतळाच्या थोबाडीत मारेल असे रेल्वे स्थानक प्रथमच पाहत होतो.
.
अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जायलासुद्धा विमानासारखी गेट्स होती ! विमानासारखेच वेळ झाल्याशिवाय आणि तिकीट असल्याशिवाय आत सोडत नव्हते.
गाईड म्हणाला प्लॅटफॉर्मवर तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही कारण ही बुलेट ट्रेन आहे... बुलेट ट्रेन ???!!! टूर गाईडने दिलेले सर्व रेल्वेचे पर्याय मी नाकारले होते... केवळ हा सोडून आणि तोही प्रवास फक्त अडीच तासाचा आहे असं म्हणाली म्हणून ! पण आमच्या सगळ्या चर्चेत हा प्रवास बुलेट ट्रेनचा आहे हे ती कधीच म्हणाली नव्हती. सुखद आश्चर्याचा धक्का का काय म्हणतात तो हाच ! कारण आजपर्यंत बुलेट ट्रेनबद्दल ऐकले, वाचले होते पण तिने प्रवास करण्याचा योग आला नव्हता. दिल खूश हुवा ! त्वरित गाईडला बरोबर घेऊन मॅक आणि कोस्टा कॅफेला राजाश्रय दिला. तोपर्यंत गाडीची वेळ झाली होती. गेटमधून खाली प्लॅटफॉर्मवर आलो. एवढा निर्मनुष्य रेल्वे प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच बघितला. स्वच्छता कर्मचारी गाडी चकाचक करत होते.
माझी पहिली बुलेट ट्रेन सफर त्यामुळे मुलांना पहिल्यांदा रेल्वेत बसताना होतो तसाच आनंद झाला होता ! दोन्ही बाजूला फक्त दोन दोन आरामदायक खुर्च्या; बाहेरचा सगळा नजारा पाहण्यासाठी मोठ्या काचांच्या खिडक्या; सतत बदलती माहिती देणाऱ्या LED पाट्या... अगदी अदलाबदल करीत चिनी/इंग्लिश माहितीसकट. प्रथमदर्शनीच सकारात्मक मत झाले.
.
.
प्रत्येकजण आपापल्या सीटवर विराजमान झाले. दहा मिनिटात गाडी सुरू झाली आणि हा हा म्हणता पाच सहा मिनिटात गाडीने १९६ किमी प्रती तास वेग पकडला !
घासून पुसून चकचकीत केलेल्या रेल्वेच्या डब्यात कोणी 'चुकार बाळा'ने जर काही कचरा केला-- अगदी छोटासा चॉकलेटचा कागद टाकला तरी-- चौकस नजर ठेवून त्वरित आपली आयुधे घेऊन धावून येऊन तो कचरा डबाबंद करणारी ललना होती.
नंतर एक रेल-सुंदरी "लंच घेणार का?" असा पुकारा करीत आली !
पण अरे देवा, रेल्वेत खिडकीजवळची जागा बुक करायला सांगायला विसरलो होतो ! माझ्या शेजारच्या खिडकीजवळच्या खुर्चीवर एक वीस-बावीस वर्षाचा तरुण बसला होता. न राहवून त्याला जागा बदलण्यासाठी विनंती केली. त्याने नकार दिला :-(. रेल्वे जसजशी पुढे जाऊ लागली तसे चिनी निसर्गाचे रूपरंग दिसायला लागले. विमानातून उडताना जो वळ्यांवळ्यांचा डोंगरांचा प्रदेश पाहिला होता तो जमिनीवरून प्रवास करताना दिसायला लागला होता... न संपणार्या एकामागोमाग एक येणार्या डोंगर आणि दर्या. न राहवून मी कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या खुर्चीवरून जमेल तसे फोटो काढू लागलो. शेजारच्या तरुणाला माझी दया आली असावी, त्याने स्वतःहून जागा बदलायची तयारी दाखवली ! त्याला कामचलाऊ इंग्लिश येते होते त्यामुळे आमचे थोडेबहुत बोलणे झाले. तो चोंगचिंगच्या एका विद्यापीठात विद्यार्थी होता आणि सुट्टीवरून परत चालला होता.
त्या तरुणाच्या सौजन्याने खिडकीजवळ बसून काढलेले हे चीनच्या डोंगराळ भागांचे काही फोटो.
.
.
हिरवागार निसर्ग, टेकड्या आणि दर्या; मधूनच दिसणारी खेडेगावे, एकादे एकांडे घर, शेते, नद्या नाले आणि तलाव... सर्व दिसता दिसता पटकन नजरेआड होत होते. गगनचुंबी इमारतींनी चोंगचिंग आल्याचे जाहीर करायला सुरुवात केली आणि ध्यानात आले की अडीच तासाचा प्रवास संपला होता. थोड्या नाखुशीने खाली उतरलो.
बायजींगच्या केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या चार महानगरपालिकांपैकी चोंगचिंग एक आहे. साधारणपणे आपल्याकडच्या केंद्रशासित प्रदेशांसारखी (उदा. पाँडिचेरी, दीव व दमण, इ.) ही व्यवस्था आहे. चोंगचिंग हे चीनमधील (आणि जगातील) सर्वाधिक लोकसंखेचे शहर आहे. यांगत्से आणि जियालींग नद्यांच्या संगमावर वसलेल्या व ८२,४०० चौ किमी क्षेत्रफळाच्या या शहराची लोकसंख्या २.७ पासून ३.५ कोटीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. ३,००० वर्षांचा इतिहास असलेल्या या शहराचे नामकरण Jiangzhou, Yuzhou व Gongzhou असे होत होत शेवटी ८०० वर्षांपूर्वी ते चोंगचिंग (Chongqing) असे झाले ते आजपर्यंत कायम आहे. चीन राजघराण्याच्या काळापासून (इ. पू. २२१ - २०६) हे शहर एक मुख्य प्रशासकीय व सांस्कृतिक केंद्र आहे आणि ते चीनच्या औद्योगीकरणात महत्त्वाचे योगदान देत आहे.
आम्ही पहिला मोर्चा वळवला चोंगचिंगच्या भव्य पिपल्स असेंब्ली हॉलकडे. चीनमधला हा सर्वात मोठा असेंब्ली हॉल आहे असे गाईड म्हणाला. चिनी शैलीत बांधलेली ही आकर्षक वास्तू कामकाज चालू नसल्याने पर्यटकांना खुली होती. त्याचा फायदा घेऊन सर्व इमारत फिरून पाहता आली. अगदी मुख्य सभागृहात जाऊन खुर्चीवर बसूनही घेतले. ह्या ६५ मीटर उंच इमारतीतील मुख्य सभागृहात ४,००० खुर्च्या आहेत.
.
.
.
.
असेंब्ली हॉलसमोरच थ्री गॉर्जेस संग्रहालय आहे. येथे चीनचे जगप्रसिद्ध थ्री गॉर्जेस धरण आणि त्याच्या परिसरातील इतिहास आणि भूगोलाशी संबद्धीत माहिती व वस्तू संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. हे संग्रहालय बघायला अख्खा दिवसही कमी पडेल त्यामुळे फक्त महत्त्वाचे विभाग पाहिले.
राजघराण्यातल्या चिनी स्त्रियांकरिता पालखी
चियांग कै-शेक आणि माओ झेडांग यांचे एकत्रित दुर्मिळ छायाचित्र
एक पारंपरिक "हनीमून स्वीट"
मंजुश्री बोधिसत्व.........................आणि................................मारिची
................
संग्रहालयातून निघालो आणि या प्रचंड महानगरीचे दर्शन घेत जवळच्या सिचिकू नावाच्या प्राचीन गावाला भेट द्यायला गेलो.
हे सिचिकूचे प्रवेशद्वार आणि इतर काही फोटो
.
.
नुकत्याच झालेल्या पावसाने यांगत्सेला पूर येऊन नदीकाठच्या अनेक इमारती पाण्याखाली गेल्या होत्या. ह्या पाठमोर्या बसलेल्या स्त्रीचे रेस्तरॉं संपूर्ण पाण्याखाली गेल्याने ती एका स्टूलावर बसून विमनस्कपणे पुराच्या पाण्याकडे बघत होती.
वाटेत बरीच पारंपरिक चिनी फास्ट फूड दुकाने लागली पण फार धाडसी न बनता गाइडच्या सल्ल्याने रेस्तरॉं निवडले.
जेवण झाल्यावर चोंगचिंगच्या धक्क्यावर यांगत्से क्रूझची बोट पकडायला जायचे होते. पण गाइडला फोन आला की यांगत्सेला आलेल्या पुरामुळे बोट चोंगचीगपासून एक तासाभराच्या अंतरावरच्या बंदरावर थांबली आहे. गाईड म्हणाला काळजीचे कारण नाही, क्रूझ कंपनीने बसची सोय केली आहे. मी तुम्हाला बसमघ्ये बसवूनच मग तुमचा निरोप घेईन.
बोटीवर पोचेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. प्लेझर क्रूझ आणि क्रूझ बोटींबद्दल वाचले होते. पण क्रूझ शीपमधून तीन चार दिवसाचा प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ असल्याने मनात बरीच उत्सुकता होती. दुरूनच त्या सहा मजली तरंगत्या हॉटेलचे दर्शन झाले आणि केव्हा एकदा बोटीत पाय टाकतो असे झाले.
(क्रमशः)
सेंचुरी स्काय हे १२६.८ मी. लांबीचे ६ मजली ८,०४० टनी क्रूझ शिप आहे. त्याच्यावरच्या १५३ केबीन्समध्ये ३०६ प्रवाशांची व्यवस्था आहे. नदीच्या क्रूझसाठी हे बर्या पैकी मोठे जहाज आहे.
(अवांतर नदीवरच्या क्रूझ जहाजांच्या मानाने समुद्रातली क्रूझ जहाजे खूपच मोठी असतात... उदा. ओयासिस वर्गाचे समुद्री क्रूझ जहाज २,२५,०००+ टनी, ३६०+ मी. लांब, पाण्यावर ७२+ मी. उंच, १६+ मजली असून एका वेळेस ६,०००+ प्रवाशांची राहण्याची व्यवस्था करू शकते.)
सेंचुरी स्कायच्या यांगत्से नदीवरील "चोंगचिंग ते यिचांग" सफरीचा नकाशा.
बाहेरून रात्रीच्या अंधारात जहाज काही छाप पडावी असे आकर्षक वाटले नाही. पण जहाजात पाय ठेवला आणि हळूहळू मत बदलू लागले. सेंचुरी स्कायने त्याच्या जाहिरातीतील सर्व गोष्टींची पूर्तता केली होती. बर्यापैकी प्रशस्त लॉबी, तत्पर सेवा...
सुसज्ज खोल्या आणि मला विशेष आवडलेली सोय म्हणजे दर खोलीला असलेली खाजगी बाल्कनी... तिच्यात एका खुर्चीवर बसून दुसरीवर तंगड्या ठेवून नदीची आणि बाजूने पळणार्या किनार्यावरची मजा पाहायला !
आणि हे आमच्या टूर कंपनीचे खास स्वागत. त्या फळांत डाव्या बाजूला जे लाल रंगाचे फळ आहे त्याचे नाव आहे ड्रॅगनफ्रूट. दिसायला आकर्षक असते पण चवीला इतके खास नाही, थोडे मीठ टाकून बरे लागते. हे फळ सर्व दूरपूर्व व दक्षिणपूर्व देशांत भरपूर प्रमाणात मिळते आणि फार आवडीने खाल्ले जाते.
सामान खोलीत टाकल्यावर प्रथम सगळ्या बोटीवर एक फेरी मारली तेव्हाच जरा बरे वाटले +D !
लॉबी (दुसरा मजला) तून दिसणार्या तिसर्या व चवथ्या मजल्याच्या गॅलर्या
प्रशस्त जेवणाचा हॉल
दर मजल्यावर आरामात बसून गप्पा मारायची व्यवस्था असलेल्या अनेक जागा (लाउंजेस)
जिमखाना
डान्स फ्लोअर
सगळ्यात वरचे सन डेक् वगैरे भाग रात्र असल्याने अंधारात होते, ते उद्या बघू असे म्हणून खोलीवर परत आलो. साडेदहा वाजत आले होते. थोडा वेळ बाल्कनीत बसून मागे जाण्यार्या किनार्यावरच्या प्रकाशित इमारतींचे आकार आणि मधूनच भोंगा वाजवत पुढेमागे जाणार्या जहाजांची गंमत एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने बघत राहिलो. मग मात्र दिवसभराच्या भागदौडीच्या थकव्याने जांभया यायला सुरुवात झाली. नाइलाजाने खोलीत आलो आणि केव्हा झोप लागली ते कळले सुद्धा नाही.
===================================================================
सकाळी जाग आली आणि पावले आपोआप बाल्कनीकडे गेली. भल्या मोठ्या यांगत्से मध्ये आम्हाला इतर बर्याच क्रूझ बोटींची सोबत होती.
दूरवर पसरलेल्या सकाळच्या धुक्यातून एक शहर दिसत होते.
जवळच किनार्यावरच्या डोंगरावरची हिरवीगार झाडी आणि त्यातून डोकावणारी चिनी शैलीतली टुमदार घरे खुणावत होती.
टूर कंपनीच्या इटिनेररीप्रमाणे आज शिबाओझाई पॅगोडा पाहण्यासाठी एकच ३ तासाची किनारपट्टीवरची फेरी होती. त्याच्या आधारे मी असा अंदाज केला होता की खूप दिवसांच्या धावपळीनंतर आज मस्तपैकी बराच वेळ लोळून आणि बाल्कनीत आरामात बसून घालवता येईल. पण क्रूझ कंपनीचा बेत वेगळाच होता ! त्यांनी त्यांची दर दिवसाची अनेक कार्यक्रमांची भर घातलेली वेगळी इटीनेररी खोलीत ठेवली होती. नवीनं कार्यक्रमांतला एक किनार्यावरच्या पर्यटनाचा पर्याय सोडला तर बाकी सर्व बोटीवरच आणि विनामूल्य होते. झाले आमच्या आराम करायच्या बेताची पुरी वाट लागली... पण अर्थात त्याचे दु:ख होण्यापेक्षा सुखच वाटले. आता आलोच आहोत चीन बघायला तर सगळे टिक् मार्क्स पुरे होऊ दे असे म्हणून नंतर तो एकुलता एक पर्यायसुद्धा पैसे भरून बुक करून टाकला !
पटापट सर्व आटपून न्याहारीसाठी गेलो. जेवणाच्या हॉलच्या दरवाज्यात स्वागतिका प्रत्येक प्रवाशाच्या नावाने टेबलावरच्या राखून ठेवलेल्या जागेची माहिती व खास ओळखपत्र देत होती. ते ओळखपत्र फक्त बोटीवरून किनार्यावरच्या पर्यटनाला जाता येताना वापरण्यासाठी होते. बोटीच्या आत सर्व कार्यक्रमांसाठी आणि सार्वजनिक उपयोगाच्या जागा वापरायला सर्व परवशांना पूर्ण मोकळीक होती.
न्याहारीसाठी जहाजाच्या स्टाफने जरा कल्पकता वापरून इंग्लिश येणार्या परदेशी प्रवाशांची जवळ जवळच दोन टेबलांवर व्यवस्था केली होती. शिवाय आमच्या या गटाला किनार्यावरच्या पर्यटनाला दर वेळेला इंग्लिश बोलणारे गाईड दिले. त्यामुळे पुढचे काही दिवस भाषेची अजिबात अडचण तर आली नाहीच पण बर्याच दिवसांनी मोकळेपणाने गप्पा मारायला साथीदारही मिळाले. अमेरिकेत शिकायला गेलेली आणि तेथेच प्रेमात पडून लग्न केलेली चिनी मुलगी आपल्या आईवडीलांच्या आग्रहाखातर चिनी पद्धतीने परत लग्न करायला नवरा आणि त्याच्या चार नातेवाइकांसकट चीनमध्ये आली होती. ते सर्व आता परतण्यापूर्वी जिवाचे चीन करीत फिरत होते. दोन वयस्क ब्रिटिश जोडपी होती. त्यांत एक फारच वरच्या नाकाचे होते. पण दुसरे, कर्मधर्मसंयोगाने माझ्या टेबलावरचे जोडपे, दिलखुलास होते. शिवाय एक सहा जणांचा गट डोमिनीकन रिपब्लिक (वेस्ट इंडीज मधले एक बेट) मधून आलेला होता. आमचा मस्त ग्रुप जमला होता. त्यामुळे क्रूझचे दिवस खेळीमेळीत आणि जरा जास्तच मजेत गेले.
न्याहारीनंतर जहाजाच्या डॉक्टरने चिनी औषधपद्धतीवर एक भाषण दिले आणि ताई ची, अक्युपंक्चर व अक्युप्रेशरचे प्रात्यक्षिक दाखवले.
.
नंतर जहाजात हिंडायला आणि खरेदीसाठी अर्धा तास मोकळा होता. त्यानंतर एका जलसुंदरीने स्कार्फ कसे वापरावे याचे वेगवेगळे पंचवीसच्या आसपास प्रकार दाखवले. ती इतक्या सफाईने पटापट स्कार्फच्या घड्या करून अथवा गाठी मारून आकर्षक आकार बनवत होती की सगळे बघतच राहिले !
नंतर कळले की चिनी कॉलेजमधून बॅचलर स्तराची टूरिझमची खास पदवी मिळते. त्यांत हे आणि नंतरच्या दिवसांत बघितलेले बरेच काही शिकवले जाते. चीन पर्यटनव्यवसाय किती गंभीरतापूर्वक विकसीत करीत आहे त्याचे हे द्योतक आहे. सध्यातरी चीनमधील प्रवाशांत फक्त ५% परदेशी प्रवासी असतात. ती संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतू चीनच्या १३०+ कोटी लोकसंख्येपैकी२०% टक्के लोक जरी त्यांच्या देशातल्या देशात हिंडूफिरू लागले तरी दरसाल प्रवाशांची सख्या २६ कोटीवर जाईल! अर्थातच सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात पर्यटनव्यवसाय चीनचे GDP वाढवायला आणि रोजगार निर्मितीसाठी फार मोठे योगदान देऊ शकेल. चिनी सरकार याबाबतीत जागरूक असल्याचे दर पर्यटनस्थळावर प्रकर्षाने जाणवत होते.
मध्ये थोडा मोकळा वेळ होता त्यांत सगळ्यात वरच्या मजल्यावरचे सन डेक पाहून आलो. अर्थात नैसर्गिक टॅन असल्याने या सोईचा मला तसा उपयोग नव्हता... पण ती बघण्याचा टिक् मार्क करणे जरूर होते +D !
.
नंतर दुपारचे जेवण झाले आणि आम्ही शिबाओझाई पॅगोडा बघायला बाहेर पडलो. बोटीपासून साधारण वीस मिनिटे चालल्यावर पॅगोडाच्या क्षेत्राचे पहिले द्वार लागले.
मग दुसरे...
आणि शेवटी तिसरे... एका झुलत्या पुलाच्या सुरुवातीचे...
हा पूल आपल्याला आता एका बेटासारख्या जागेत असलेल्या पॅगोडामध्ये घेऊन जातो. यांगत्से नदीवरचे थ्री गोर्जेस डॅम हे महाकाय धरण बांधण्या अगोदर ह्या २०० मीटर उंच सुळक्यावर बांधलेल्या पॅगोडाचा पायथा नदीकिनारी होता आणि पायी चालत जाऊन लोकांना सुळक्यावर चढून गेल्यावर पॅगोड्यात प्रवेश करता येत होता. पण धरणामुळे पाण्याची पातळी वाढल्याने आता या पॅगोड्याच्या पायासभोवती एक संरक्षक धरण बांधून त्याचे पायापासून वरपर्यंतच्या सर्व भागाचे संरक्षण केले आहे. हा झुलता पूल आता परवशांना त्या धरणाच्या भिंतीवर नेतो आणि भिंतीवरचा रस्ता तडक पॅगोड्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जातो. धरणाच्या पाण्यात बुडण्यापासून वाचवून एक प्राचीन वास्तू जशीच्या तशी, आहे त्याच जागेवर जतन करून ठेवण्याच्या या कल्पक धडपडीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. शिवाय ही वास्तू जपल्यामुळे येथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे हाही एक मोठा फायदा झाला आहे. थ्री गॉर्जेस धरणामुळे धोक्यात आलेल्या अशा अनेक पुरातन जागा कल्पकतेने जतन करून पर्यटनाकरिता विकसित केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे सर्व ठिकाणी गाईडचे काम कटाक्षाने स्थानिक लोकांतील प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या तरुण-तरुणींनाच दिलेले आहे. आणखी एक विशेष गोष्ट अशी की लिजियांग-शांग्रीला सारखेच ह्या सर्व स्थानिक जमातींच्या (minorities) गाईडांचे इंग्लिश शहरी गाईडांपेक्षा खूपच चांगले आणि चिनी लकबींविना (without Chinese accent) होते !
शिबाओझाई म्हणजे Stone Treasure Fortress. हा पॅगोडा चिंग राजघराण्याच्या काळात इ. १७५० मध्ये बांधला गेला. एका ९० अंशात उभ्या कड्याच्या टोकावर बांधलेली हि ५६ मी. उंचीची आणि १२ मजल्याची इमारत पूर्णपणे लाकडी आहे. कुठल्याही प्रकारचा धातूचा उपयोग (अगदी एक खिळासुद्धा) या पूर्ण इमारतीच्या बांधकामात केलेला नाही. यातले १० मजले थ्री किंगडम्स काळातील (इ. २२०-२६५) १० लोकप्रिय जनरल्सच्या नावे आहेत, तर एक स्थानिक प्राचीन कवी आणि एक प्रसिद्ध विद्वानाच्या नावे आहे. त्या त्या प्रसिद्ध लोकांशी निगडित वस्तू व मूर्ती प्रत्येक मजल्यावर जतन करून ठेवलेल्या आहेत.
उभा कडा, त्यावरचा पॅगोडा, त्याभोवतीचे धरण आणि झुलता पूल यांचा दुरून घेतलेला फोटो.
पूल ओलांडून गेल्यावर धरण व कड्याचा पायथा दिसतो.
आणि त्याबरोबरच ज्या कड्याला टेकून पॅगोडा बांधला आहे तोही दिसतो.
अजून ५०-७५ मीटर चालून गेले की पूर्ण पॅगोडा दृष्टिपथात येतो.
नंतर पॅगोड्याचा दर्शनी भाग दिसायला लागतो.
पुढून ध्यानात येत नाही पण पॅगोड्याच्या आत फिरताना कळते की या पॅगोड्याची आतली भिंत कड्याने बनलेली आहे आणि पॅगोड्याचा भार जमीन उचलत नाही तर कड्याच्या कपार्यांत घुसवलेली लाकडे ते काम करीत आहेत !
.
पॅगोड्याच्या मागे अजून काही मंदिरे आहेत त्यांत अजून काही जनरल्सच्या आणि चिनी देवांच्या मूर्ती आहेत.
.
.
पॅगोड्यावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते...
हा आहे झुलता पूल ज्याच्यावरून चालत आम्ही पॅगोड्यावर आलो.
आणि ही आहे सेंचुरी स्काय बोट
परत आल्यावर चिनी चहापानाचे (Chinese tea ceremony) चे प्रात्यक्षिक झाले आणि चक्क अन्नाच्या हॉटेलमध्ये जशी 'मद्रास कोफी' उलट्या कप / पेल्यात देतात तसा चिनी चहा मिळाला. "अन्ना"चा प्रभाव केवळ आखाती राष्ट्रांवरच नाही तर प्राचीन चीनवरही होता याचा सज्जड पुरावा मिळाला. चिनी भाषा येत नव्हती आणि बायजींगमध्ये आपला वशिला नाही, नाहीतर "तुमच्या त्या उत्खननांत जरा नीट शोधा. आमच्या अन्नाचे एखादे 'मॅड्रास कोफी शॉप' जरूर मिळेल" असा फुकटचा सल्ला दिला असता !
परत येऊन जरासा आराम करतोय तेवढ्यातच बोटीच्या कप्तानाने आपल्या करिता स्वागत समारंभ योजला (Captains’ welcome party) आहे त्याला यावे अशी घोषणा झाली. बोटीच्या कप्तानाने सर्व वरिष्ठ अधिकार्यांसमवेत मंचावर येऊन सर्व प्रवाशांचे स्वागत केले. बोटीबद्दल थोडी माहिती दिली आणि संध्याकाळच्या या पार्टीची मजा घ्या म्हणून ते सर्व प्रवाशांत सामील झाले.
.
त्यानंतर वेलकम बॉल डान्स झाला.
रात्रीचे जेवण झाल्यावर बोटीच्या सर्व कर्मचार्यांनी मिळून एक विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम (staff cabaret) सादर केला. त्याची काही क्षणचित्रे...
.....................
.
.
.
.
.
टाळ्या वाजवून प्रवाशांचे हात दुखू नयेत म्हणून खास क्लॅपर्स आणि विशेष पसंती दाखवायला फ़्लोरोसंट ट्यूब्ज दिल्या होत्या +D!
नंतर प्रवाशांनाही रंगमंचावर नाचायला बोलवून धमाल उडवून दिली.
दिवसभर अशी सुखद धावपळ करायला लागल्यावर निद्रादेवीने खेचूनच खोलीत नेले. उद्या वेळेत जाग आली नाही तर खुशाल दरवाजा तोडून मला उठवा असा निरोप बोटीच्या रिसेप्शनमध्ये ठेवून गुडुप झालो.
(क्रमशः)
सफरीच्या एकोणीसाव्या दिवशीची सकाळ जरा गडबडीची होती. कारण आज किनारपट्टीवरून फेरफटका मारून करायच्या दोन सहली होत्या. पहिली सहल तर सकाळी ७:३० लाच सुरू होणार होती. म्हणजे त्या अगोदर न्याहारी वगैरे करून तयार होणे भाग होते. सेंचुरी स्कायवाल्यांनी नको नको म्हणाल अशी गच्च इटिनेररी बनवली होती. पण आम्हीही मागे न राहता त्यांचा एकही कार्यक्रम न चुकवण्याचा पण केला होता ! सगळे आटपून ७:२० लाच लॉबीमध्ये हजर झालो. आमचा बहुतेक सगळा इंग्लिश बोलणारा गट जमा झाला होता. उरलेल्यांना आमच्यातल्या उत्साही मंडळींनी फोनाफोनी करून हलवले. तरी दोनएक मंडळी गळलीच. शेवटी फार उशीर नको म्हणून जमलेले सर्व गाइडच्या आधिपत्याखाली सफेद सम्राटाच्या शहरावर (व्हाईट एंपरर सिटी) स्वारी करायला निघालो.
बोट फेंगी नावाच्या गावाला थांबली होती. बोटीवरून तराफ्यांवर उतरलो तर समोर उंच किनार्यावर जायला दोन एस्कॅलेटर्स ! एस्कॅलेटर असलेला घाट प्रथमच पाहिला.
घाट चढून गेल्यावर थोडे उजवीकडे चालल्यावर फेंगी गावाचे जुन्या घाटावरचे प्रवेश्द्वार दिसते. नविन एस्कॅलेटरवाला घाट बांधल्यामुळे आता जुन्या घाटाचा उपयोग फक्त प्रवाश्यांनी फोटो काढण्यापुरता आहे. पण याचा आकार व बांधणी बघून फेंगी बंदराच्या गतवैभवाची कल्पना येते.
गोंगशून शू नावाच्या एका सरदाराने पश्चिम हान राजघराण्याच्या (ई.पू. २०६तेई. २४) शेवटच्या काळात बंडाळी करून आपले स्वतंत्र राज्य स्थापले आणि स्वतःला शू जमातीचा राजा म्हणून घोषित केले. त्या सुमारास फेंगीजवळच्या बायदी नावाच्या पर्वताच्या कड्याच्या आधारे वर जाणार्या पांढर्या धुक्यामध्ये त्याला ड्रॅगनचा आकार दिसला. त्यावरून त्याने स्वतःला पांढरा सम्राट आणि त्या डोंगरावर वसवलेल्या त्याच्या राजधानीचे पांढर्या सम्राटाचे शहर (व्हाईट एंपरर सिटी) असे नामकरण केले.
आता या राजधानीच्या ठिकाणी फक्त एक मंदिरांचा समूह उरला आहे... आणि त्यांच्याशी जोडलेल्या लोककहाण्या. मात्र यांगत्सेच्या काठावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेचे सामरिक व राजकीय महत्त्व चिनी इतिहासात फार मोठे होते. यांगत्सेच्या खोर्यातील अनेक महत्त्वाच्या लढाया या जागेच्या आसपास झाल्या. पर्वतावरून नदी आणि तिच्या परिसराचे छान विहंगम दृश्य दिसते. पूर्वीचे खूप उंच डोंगर व कडे आता थ्री गॉर्जेस धरणाच्या पाणीसाठ्यामुळे जरासे कमी ऊंचीचे दिसतात. बायदीचा बराचसा परिसर पाण्याखाली गेला आहे. देवळांची जागाही तीन बाजूंनी पाण्याने वेढली गेली आहे.
फेंगीहून व्हाईट एंपरर सिटीच्या प्रवेशद्वारापर्यंत बसने साधारण २५-३० मिनिटात पोचलो.
ह्या प्रवेशद्वारापासून पाण्याने वेढलेल्या मंदिर समुहापर्यंत जायला एक जुन्या पद्धतीचा लाकडी पूल आहे.
शहराच्या आवारात सर्वप्रथम सम्राटाचा नाही तर एक झुगे लिआंग नावाच्या त्याच्या एका जनरलचा पुतळा आपले स्वागत करतो... असे का याचे कारण थोडे पुढे गेल्यावर समजेल.
वाटेत एक चिनी इंग्लिशचा एक नमुना दिसला
याचे सुगम इंग्लीश भाषांतर आहे, "Keep off the grass".
डोंगराच्या चढणीच्या अर्ध्यावर गेल्यावर यांगत्सेचा कुतांग पास हा चिंचोळा प्रवाहमार्ग दिसू लागतो. या खिंडीसारख्या जागेच्या सौंदर्याचे वर्णन चिनी कवितांत फार प्राचीन काळापासून केले गेले आहे. सध्या धरणामुळे पाण्याची पातळी जवळ जवळ १५०+ मीटरने वर आली आहे तरीसुद्धा ९० अंशातल्या कड्यांच्या मधल्या चिंचोळ्या दरीतून वाहणारा यांगत्सेचा ओघ स्तिमित करतो. जेव्हा धरण नव्हते तेव्हा १५० मीटर अधिक उंचीचे ते कडे आणि त्यातून वाहणारा यांगत्सेचा खळाळता ओघ नक्कीच जास्त चमत्कारपूर्ण दिसत असणार. शेकडो वर्षे त्यावर अनेक प्रसिद्ध कविता केल्या गेल्या आहेत.
कुतांग पासच्या चित्राला १० युवानच्या नोटेवर स्थान मिळाले आहे.
नंतर बोट याच मार्गावरून पुढे जाणार होती तेव्हा कुतांग पास आणि त्याच्या पुढचा नयनमनोहारी भाग जवळून बघायची संधी होती.
डोंगरमाथ्यावर गेल्यावर किल्ल्याच्या दरवाज्यासारखे पण कलापूर्ण सजावट केलेले शहराचे प्रवेशव्दार दिसते.
शेजारच्या झाडीतून सम्राटाचा ड्रॅगन "कोण आहे रे तिकडे" अशी डरकाळी फोडताना दिसतो.
ही जागा जुन्या राजधानीची अवशेष यापेक्षा फारच वेगळ्या कारणामुळे सर्वसामान्य चिनी मनात मानाचे स्थान पटकावून बसलेली आहे. शू राजघराण्यातला एक लिऊ बेई नावाचा राजा शेजारच्या वू राज्याबरोबर झालेल्या लढाईत हरला. तशात तो आजारी पडला. राजाची दोन मुलेही लहान होती. तेव्हा याच जागेवर त्याने मरण्यापूर्वी आपला पंतप्रधान झुगे लिआंग याच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवला अणि असेही सांगितले की जर ह्या मुलांपैकी एकही राजा बनण्यास पात्र ठरू शकला नाही तर झुगेने स्वतः राजसत्ता ग्रहण करावी. झुगेने साम्राज्याची काळजी तर उत्तम प्रकारे वाहिलीच पण राजपुत्रांना राज्यकारभाराचे उत्तम शिक्षण देऊन त्यातल्या मोठ्याचा योग्य वयात येताच राज्याभिषेक केला. त्याच्या अशा अलौकीक स्वामिभक्ती व प्रमाणिकपणामुळे आजही या परिसरातले झुगेचे शिल्प असलेले मंदिर हे सर्वात जास्त पूजनीय समजले जाते. त्या मंदिरातले हे वरील प्रसंगाचे शिल्प... मृत्युशैय्येवर असलेल्या राजाजवळ पंखा घेऊन उभा आहे तो पंतप्रधान जनरल झुगे लिआंग आणि त्यांच्या समोर ते दोन लहान राजपुत्र गुढग्यावर बसून आदर प्रदर्शीत करत झुकलेले आहेत.
आता जरा तिकडे गेलो होतोच तर दोन चिनी जनरल्सच्या आग्रहाखातर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना दोन युक्तीच्या गोष्टी सांगून आलो +D !
देवळांच्या परिसरातले बैलावर आरूढ झालेल्या युवतीचे शिल्प.
परत येताना वाटेत एक चिनी स्पेशियालिटी स्टोअर लागले… अर्थातच फार धाडस न करता पुढे निघालो...
बोटीवर परत येऊन अर्धा तास झाला असेल तेवढ्यात घोषणा झाली की सिचुआन राज्याची प्रसिद्ध पाककृती "हॉट पॉट" चे प्रात्यक्षीक बोटीचा खानसामा पाचव्या डेकवर करणार आहे. गाईडने हॉट पॉट ची बरीच स्तुती केली होती तेव्हा त्याबाबत कुतुहल होतेच. हा केवळ येथील लोकांचा एक आवडता पदार्थच नाही तर पडसे-खोकल्यावरचा रामबाण उपायही समजला जातो. डेकवर पोचलो तर बल्लवाचार्य सगळी सामग्री घेऊन तयार होते.
एका बशीत काही चिकनचे तुकडे आणि काकडी, गाजर, कांदा वगैरे भाज्याचे मोठे तुकडे ठेवलेले होते. तर दुसर्या बाजूला लसूण आणि मिठाची भांडी सोडून इतर पाच भांड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मिरची असलेले मसाले होते. खानसाम्याने ते सर्व मसाले पाचसहा डाव तेलामध्ये चांगले परतून घेतले आणि मग त्यांत सगळ्या भाज्या एकावेळेसच टाकल्या आणि थोडे पाणी टाकून एक उकळी आणली. हा... काय तिखट सूप बनले आहे इतके जनता म्हणते इतक्यात खानसाम्याने ते सर्व एका मोठ्या पातेल्यात ओतले. टेबलाच्या एका बाजूवर मसाल्याच्या १०-१५ पिशव्या ठेवल्या होत्या. एवढ्या सगळ्या पिशव्या नक्कीच जाहिरात करायला असाव्या ठेवलेल्या आहेत असा माझा कयास होता.
... पण खानसामा एक एक पिशवी जशी पातेल्यात रिकामी करायला लागला तसतसे सगळ्यांना ते सूप न पिताच नाकातोंडातून धूर येणे म्हणजे काय याचा प्रत्यय येऊ लागला +D ! हे आहे त्या पाकृ चे अंतिम देयक (final product).
अर्थातच खानसाम्याने "सर जरा घ्या दोन घोट चाखायला" असे म्हणण्याच्या अगोदर तेथून बाहेर पडलो. आणि ते फायद्याचेच झाले, कारण बोट कुतांग गॉर्जच्या नयनमनोहर प्रवेशव्दाराजवळ पोचली होती. जे कडे अगोदर एका पर्वतावर उभे राहून पाहिले होते ते जवळून नदीतून सफर करताना कसे दिसतात हे पाहण्याची उत्कंठा होतीच.
हे आहे कुतांग गॉर्जचे प्रवेशद्वार.
दरीतून वेगाने वाहणार्या यांगत्सेच्या नागमोडी प्रवाहाच्या बाजूला असंख्य वेडेवाकडे पसरलेले ऊंच कडे आहेत. कित्येकदा तर प्रवाह इतका चिंचोळा होतो आणि बहुतेक बोट पुढे जाऊ शकणार नाही किंवा नक्कीच पुढून येणार्या बोटीला घासेल असे वाटते.
पण बोटींचे कप्तान एकमेकाला भोंग्यांच्या आवाजाचे इशारे देत मोठ्या कौशल्याने बोटी पुढे काढत होते. डोंगरांच्या रांगातून मध्येच अचानक एखादे निसर्गरम्य परिसरात बसलेले गाव दिसत होते...
तर कधी या सर्व निसर्गात उठून दिसणारे आणि चिनच्या सांपत्तीक स्थितीची आणि विकासाची जाहिरात करणारे शहर दिसत होते.
तास-दीडतासाने बोट बादोंग नावाच्या बंदरात उभी राहिली.
येथून आमची शेनाँग नावाच्या यांगत्सेच्या उपनदीची सफर सुरू होणार होती. या सफरीत अगदी लहान आकाराच्या पाण्याच्या ओधातून पण पहिल्या एवढ्याच ऊंच दर्यांमधून प्रवास करायचा होता. प्रथम आमच्या बोटीवरून आम्ही एका मध्यम आकाराच्या बोटीवर गेलो. जसजशी बोट पुढेपुढे जाऊ लागली तसे कडे जवळ येऊ लागले आणि त्यांची टोके बघताना प्रवाश्यांच्या टोप्या खाली पडू लागल्या !
एका कड्यावर असलेल्या घळीकडे इशारा करून गाईडने या भागाचे विशेष असलेल्या "टांगत्या शवपेट्या" (hanging coffins) दाखवल्या. प्राचीन काळात या भागांत राहणार्या जमातीतील राजे, जनरल अथवा इतर फार सन्माननीय लोकांच्या शवांना प्रथम इतरांसारखेच पुरत असत. पण दोनतीन वर्षांनंतर त्यांच्या अस्थी ऊकरून काढून त्या एका सुंदर लाकडी शवपेटीत ठेवत असत आणि ती शवपेटी एका शेकडो मीटर ऊंच कड्याच्या घळीत लाकडांच्या मदतीने टांगून ठेवत असत. शेकडो / हजारो वर्षे ही प्रथा पाळली जात होती. अश्या शेकडो शवपेट्या शेनाँग नदीच्या काठावर जमा झाल्या होत्या. अलिकडच्या काळात धरणामुळे नदीची ऊंची वाढल्याने आणि अनेक आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने या शवपेट्यांच्या चोरीचे प्रमाण वाढले तेव्हा उरलेल्या बहुतेक पेट्या संग्रहालयात हलवल्या आहेत. प्रवाश्यांना मूळ जागी बघता याव्या यासाठी दोनतीन जागी मात्र तेथेच ठेवल्या आहेत. त्यातली ही एक जागा...
थ्री गॉर्जेस धरण बांधण्यापुर्वी या कड्यांची ऊंची आता दिसते त्यापेक्षा साधारण १५० मीटर जास्त होती. ह्या इतक्या जड आणि अनेक शतके शाबूत राहणार्या शवपेट्या कशा बनवल्या जात असत आणि इतक्या ऊंचीवर चढवून कश्या टांगल्या जात असत हे गुढ अजुनही उकललेले नाही.
दुर्गम भागांतही चालेली विकासाची कामे मधूनच दिसत होती.
साधारण ४५ मिनीटांनी एक नदीच्या मध्यात बांधलेले बोटींग स्टेशन आले
आम्ही पायउतार होऊन स्टेशनच्या पलिकडे गेलो तेथे वल्ह्यांनी चालवायच्या लहान आकाराच्या होड्या आमची वाट पहात होत्या.
अगदी वीस वर्षे अगोदर पर्यंत या होड्या या परिसरात माणसांची आणि सामानाची वहातूक करण्याचे दळणवळणाचे मुख्य साधन होत्या. येथून पुढे आम्हाला त्या काळाचा अनुभव घ्यायचा होता.
आमची गाईड स्थानिक तुजीया जमातीची होती. तिने आजूबाजूच्या भागांत राहणार्या लोकांच्या चालीरीती आणि कहाण्या तिच्या खास विनोदी शैलीत सागून सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. तिचे मूळ स्थानिक नाव होते "माऊ" म्हणून "मला इंग्लिशमध्ये किट्टी म्हणालात तरी चालेल" असे म्हणाली. तिचे इंग्लिशही उत्तम होते... इतके चांगले की ब्रिटीश प्रवाश्यांनी "इंग्लिश कुठे शिकलीस?" असे विचारले ! तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने कोणताही कोर्स वगैरे न करता गेल्या काही वर्षात प्रवाश्यांबरोबर बोलून भाषा आत्मसात केली होती !
धरण बांधण्यापुर्वी नदीच्या शेवटच्या भागात शेनाँगचा प्रवाह फार उथळ आणि खळखळता होता. इतका की त्यातून होड्या वल्हवणे शक्य नव्हते. काही जण काठावरून बांबूच्या दोरीने होडी ओढत असत आणि बाकीचेही बोटीतून उतरून बोटीला (आपण बंद पडलेल्या चारचाकीला जसे ढकलतो तसे) ढकलत असत. शेकडो वर्षे ही पद्धत वापरुन व्यापारउदीम व वाहतूक केली गेली. सहाजीकच या पद्धतीवर आधारलेल्या अनेक लोककथा आणि कविता आहेत. सध्या या भागात पाण्याची पातळी १०० मीटरपेक्षा जास्त वर आल्याने त्या संबद्धीचे प्रात्यक्षीक जुन्या काळातील लोकांना सहन करव्या लागणार्या कष्टांची नीट कल्पना देत नाही.
हे संग्रहालयातले एक शिल्प वस्तुस्थितीच्या जवळपास आहे. बांबूची दोरी ओढताना कपडे अंगाला घासून कातडीला इजा होत असे म्हणून हे काम सम्पूर्ण नग्न होऊन करत असत !
परत येताना पुर्वीचाच प्रवास उलट दिशेने करत असताना म्याऊने एक लोकगीत तिच्या सुंदर आवाजात गावून दाखवले. जवळजवळ तीन तास चालेल्या या सफरीचा वेळ कसा संपला ते कळलेच नाही. बोटीवर परतताना बादोंग शहराचे झालेले हे दर्शन.
आज बोटीवर परतल्यावर चिनी ड्रॅगन्सनी शीतपेय देऊन जरा जोरातच स्वागत केले कारण आज कॅप्तानाची निरोपाची मेजवानी (captain’s farewell dinner) होती.
आतापर्यंत नेहमी बुफे जेवण होते पण आज अगदी राजेशाही पद्धतीने बसून "सिक्स कोर्स डिनर" होते. खानसाम्यांनी त्याच्या कौशल्याची चुणूक दाखवत मस्त पदार्थ केले होते. एका स्वागतिकेने टेबलावर येऊन तुमच्यासाठी रोस्ट बीफ ऐवजी रोस्ट पेकींग डक किंवा माश्याचा एखादा पदार्थ यातले काय हवे असे विचारले. अर्थातच मी डक पसंत केले... मांसाहारी असलात तर हा चिनी पदार्थ जरून खाऊन पहा. हा मला आवडलेल्या पदार्थांपैकी एक आहे. सेंचुरी स्कायने त्यांच्या व्यावसायीक कौशल्याची अजून एक चुणूक दाखवली... जेवणाच्या सुरुवातीला एक घोषणा करून हॉलमधले सगळे दिवे बंद केले. आम्ही सर्व आता काय होते याची चर्चा करू लागलो तेवढ्यातच ट्रॉलीवरून एक मोठा केक आणला, दोन स्त्री प्रवाश्यांना आमंत्रित केले आणि मोठ्या संगीताच्या तालावर जाहीर केले की आज त्या दोघींचा वाढदिवस आहे तर सर्वांनीच त्यांचे अभिनंदन करावे. मग अर्थातच "हॅपी बर्थ डे टू यू" हे गाणे झाले. सर्व प्रवाश्यांनी उस्फुर्तपणे बोटीच्या स्टाफच्या आवाजात आवाज मिळवून ते गाणे गायले नसते तरच आश्चर्य ! त्यातली एक स्त्री तर रडायलाच लागली, म्हणाली, "आजपर्यंत माझा वाढदिवस कोणीच साजरा केला नव्हता. आता कितीही समृद्धी आली आणि कितीही वाढदिवस साजेरे केले तरी हा सोहळा मी कधिही विसरणे शक्य नाही." या एका प्रसंगाने कप्तानाच्या पार्टीचा रंगच बदलून टाकला.
आज सेंचुरी स्कायने बरीच भागंभाग करवली होती, त्यातच खास मेजवानी... जेवण अगदी अंगावर आले ! खोलीवर येऊन उद्याच्या थ्री गॉर्जेस धरणाच्या भेटीची आणि महानगरी शांघाईची स्वप्ने पाहत झोपी गेलो.
संपुर्ण प्रवासात कोणत्याही प्रकारची सरकारी किंवा इतर कोणाचीही दखल जाणवली नाही. चिनमध्ये काय अनुभव येईल याबद्दल तुमच्या प्रमाणेच माझ्या मनातही बर्याच चिंता होत्या. पण प्रत्यक्ष, अगदी पहिल्या दिवसापासून, ज्या सहजतेने इतर कोठल्याही देशात-- अगदी पाश्चिमात्य देशात-- वावरतो तसे फिरलो. भाषेची अडचण सोडली तर इतर कुठलाच त्रास अजिबात झाला नाही... तोही इंग्लिश बोलणार्या गाईडमुळे आणि चिनी भाषेत लिहून घेतलेल्या मार्गदर्शक माहितीमुळे अगदी नगण्यच झाला.
मुख्य म्हणजे हेरगिरीवाल्या इंग्लिश सिनेमात जे परदेशी लोकांच्या मागे हेरे वैग्रे लावलेले असतात तो एखादा तरी बघावा अशी इछा होती पण शोधाशोध करून देखील कोठेच सापडला नाही ;) . शिवाय सर्व गाईड ज्या सहजतेने संभाषण करत होते त्यावरून असे हेर आजूबाजूला नसावेत या माझ्या मताला बळकटीच मिळाली. चिनी आणि परदेशी प्रवाश्यांनी फोटो काढणे सर्वथा प्रवाशांवरच अवलंबून होते आणि त्यात इतर कोणाचा कघीच हस्तक्षेप झाला नाही... किंवा त्याची कोणाला फारशी फिकीर आहे असे दिसले नाही.
मात्र तिबेट भेटीवर कडक निर्बंध आणि कायदे आहेत. त्याबद्दल पहिल्या भागात लिहीले आहेच.
सर्वसामान्य चिनी माणसाबद्दलचे अनेक गैरसमज दूर झाले. भारत-चीन राजकारणाची सर्वसामान्य चिनी माणसाला फारशी माहिती किवा फिकीर आहे असे जाणवले नाही.
(क्रमशः)
कप्तानाच्या पार्टीनंतर गाढ झोप लागली नसती तरच आश्चर्य होते. त्यांत एका गोष्टीकडे जरा दुर्लक्ष झाले... ते म्हणजे बोट धरण ओलांडून जातानाचा अनुभव. हे धरण इतके आवाढव्य आहे की याच्यावरच्या आणि खालच्या अशा दोन्ही बाजूस बोटीने प्रवासी व सामानाची वाहतूक होते. नदीच्या पाण्यातली धरणाच्या दोन्ही बाजूची वाहतूक सलगपणे एकाच बोटीतून होण्यासाठी या धरणाच्या बाजूला प्रत्येकी पाच कृत्रिम तळ्यांच्या दोन उतरंडी बांधल्या आहेत... एक बोटींना वर जायला आणि दुसरी खाली उतरायला. यांना शिप-लॉक्स म्हणतात. वरून येताना धरणाच्या पाण्याकडचे दार उघडून बोटी सगळ्यात वरच्या तळ्यात घेतात व ते दार बंद करतात. नंतर त्या तळ्यातले पाणी कमी करून त्याची उंची दोन क्रमांकाच्या तळ्याच्या पाण्याइतकी झाली की त्या दोन तळ्यांच्या मधील दार उघडून बोटी दोन क्रमांकाच्या तळ्यात नेतात. हाच प्रकार परत-परत करत पाचव्या तळ्यातून बोटी नदीच्या धरणाच्या खालच्या भागातील प्रवाहात सोडतात. एका वेळेस चार ते सहा बोटींची अशी वाहतूक करतात. याच्या विरुद्ध कृती करून दुसर्या उतरंडीवरून बोटी धरणाच्या खालून वर नेतात. एका दिशेने जायला अंदाजे ३०-४० मिनिटे लागतात. या प्रकारे १०,००० टन वजनाच्या बोटी समुद्रकिनार्यावरील शांघाई शहरापासून नदीच्या मार्गाने २,४०० किमी दूर चोंगचिंग पर्यंत प्रवासी व मालाची वाहतूक करू शकतात.
आमची बोट रात्री शिप-लॉक्स वापरून धरण उतरून खाली जाणार होती आणि हा जगावेगळा अनुभव बोटीत बसून घ्यायची संधी म्हणजे माझ्याकरिता पर्वणीच होती. पण हे करण्यासाठी धरणाजवळ बोटींची रांग लागली होती आणि नक्की किती वाजता नंबर लागेल ते सांगता येत नाही असे रिसेप्शनने सांगितले. जेवण इतके अंगावर आले होते की केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. पहाटे एक वाजता मोठ्या खाड्खाड् अश्या आवाजांनी जाग आली आणि काय झाले ते बघायला बाल्कनीत गेलो आणि पाहतो तर काय, आमची बोट शिप-लॉकमध्ये होती ! नशिबाने शेवटच्या शिप-लॉकचा अनुभव मिळाला. नाहीतर ही संधी चुकल्याची रुखरुख सतत मनात राहिली असती.
रात्री बोटीतून शिप-लॉकमध्ये असताना घेतलेले फोटो. दूरवर वरच्या आणि खालच्या शिप-लॉकची दारे दिसत आहेत.
.....................
ही शिप-लॉकस् नंतर धरणाच्या भेटीत परत नीट बघायला मिळणार होती... मात्र शिप-लॉकच्या बाहेरून. बोट धरणाच्या खालच्या बाजूस नदीत आल्यावर थोडावेळ रात्रीची मजा पाहत वेळ काढला आणि परत झोपी गेलो.
सकाळी उठलो आणि नेहमीच्या सवयीने पावले आपोआपच बाल्कनीकडे गेली. सकाळच्या धुक्यात पुढच्या हिरव्या डोंगरामागे सुंदर पांढर्या ढगांची सुंदर नक्षी दिसली.
नंतर धुके कमी होऊन स्पष्ट दिसायला लागल्यावर कळले की तो सरळसोट, जणू अगदी एखाद्या पडद्यासारखा उभा तासून काढलेला पांढर्या रंगाचा कडा आहे. चीनचा निसर्ग चकीत करण्याची एकही संधी सोडत नव्हता...
न्याहारी करून त्रिवेणी धरण (Three Gorges Dam) बघायला निघालो. हे धरण आकारमानाने जगातले दोन क्रमांकाचे पण वीजनिर्मितीत प्रथम क्रमांकाचे आहे( ब्राझीलमधील इताइपू धरण आकारमानाने जगातले प्रथम क्रमांकाचे पण वीजनिर्मितीत दुसर्या क्रमांकाचे आहे). या धरणाची कल्पना प्रथम सन यात सेन याने १९१९ साली मांडली. त्यानंतर चीनच्या पहिल्या राज्यक्रांतीनंतर सत्तेत आलेल्या चिअँग कै-शेकच्या नॅशनॅलिस्ट सरकारने १९३२ साली याचा आराखडा बनवण्यास सुरुवात केली. पुढे १९३९ मध्ये जपानने चीनबरोबरच्या लढाईत यिचांगपर्यंतचा भूभाग व्यापला व लढाईत पूर्ण विजय होणार असे गृहीत धरून ओतानी प्लॅन नावाचा या धरणाचा पूर्ण आराखडा बनवला. परंतू दुसर्या महायुद्धात पराभव झाल्याने जपानला आपले बेत तसेच सोडून परत जायला लागले. त्यानंतर नॅशनॅलिस्ट सरकारने अमेरिकेच्या मदतीने हा प्रकल्प परत हाती घेतला. १९४७ साली सुरू झालेल्या चिनी यादवीयुद्धाने हे काम परत बंद पडले. १९४९ साली कम्युनिस्ट सत्तेत आल्यानंतर माओ झेडाँग च्या पुढाकाराने हे काम परत सुरू करण्यात आले. परंतू या वेळेसही "ग्रेट लीप फॉरवर्ड", "कल्चरल रिव्हॉल्यूशन" इ. अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडत गेला. १९८० पासून या धरणाची कल्पना परत जोर धरू लागली आणि सरते शेवटी १९९२ साली नॅशनल पीपल्स काँग्रेस या चीनच्या सर्वोच्च कार्यकारिणीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. हे धरण बांधण्यास डिसेंबर १९९४ मध्ये सुरुवात झाली आणि जुलै २०१२ पर्यंत मुख्य धरण आणि शिप-लॉक्स बांधून झाली... हुश्य... या सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की मी हे सगळे सोपस्कार संपल्यावर म्हणजे योग्य वेळी तेथे पोचलो होतो म्हणायचे :)!
तरीसुद्धा अजून एक गोष्ट पूर्ण होणे बाकी आहे, ती म्हणजे ३,००० टनापर्यंतच्या बोटींना वर खाली नेण्याकरिता लिफ्ट ! या लिफ्टमुळे बोटी फक्त १० मिनिटात धरणाच्या वर / खाली जाऊ शकतील व सध्या धरणाच्या दोन्ही बाजूला होणारा ट्रॅफिक जॅम बर्याच प्रमाणात कमी होईल. प्रकल्पाच्या या भागात बर्याच तांत्रिक अडचणी आल्या आहेत व आतापर्यंत काही पर्याय अर्धवट सोडून दिले गेले आहेत. आता एक नवीन पर्याय विकसित होत आहे आणि सगळे निर्वेधपणे पार पडले तर ही लिफ्ट २०१४ पर्यंत वापरास खुली होईल.
हे धरण पूर्णपणे काँक्रीटने बांधलेले असून २,३३५ मीटर लांब, समुद्र सापटीपासून १८५ मीटर उंच असून पूर्ण भरल्यावर यातील पाण्याची उंची १७५ मीटर भरते. नदीच्या वरच्या व खालच्या प्रवाहाच्या उंचीत साधारण ११० मीटरचा फरक आहे. धरणाने अडवलेल्या पाण्याचा विस्तार (backwater) ६६० किमी लांब व १.१२ किमी रुंद आहे. हे धरण २२,५०० मेगॅवॅट वीज निर्माण करते. या अगडबंब धरणाचे स्थान माझ्या मस्ट सी यादीत फार वरचे होते. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता.
धरणाच्या स्थानावर जायला क्रूझ कंपनीने बसचा बंदोबस्त केलेला होता. या धरणाच्या बांधकामाकरिता आलेले बरेच लोक इथेच स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकरिता नवीन वस्त्या बांधल्या आहेत त्या दिसत होत्या.
अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर बसमधून सर्वप्रथम शिप-लॉक्स् चे दर्शन झाले.
.
धरणाच्या बाजूला एक निरीक्षण टेकडी विकसीत केली आहे. टेकडीच्या माथ्यावर पोचायला एका मागोमाग एक असे एकूण चार एस्कॅलेटर्स वापरून जावे लागते. त्यातला हा पहिला.
टेकडीवरच्या टेरेससारख्या भागावरून चारी बाजूंचे विहंगम दर्शन होते. एका बाजूला धरणाचे मॉडेल ठेवलेली इमारत आणि तिचे आखीव रेखीव आवार दिसते.
तर दुसर्या बाजूला अजूनही धुक्याने वेढलेल्या संपूर्ण धरणाचे दर्शन होते... त्याच्या अलीकडे बोटींच्या लिफ्टचे बांधकामाचे चालू असलेले दिसत आहे.
धरणापासून जरा दूर, एक पर्वत कोरून बनवलेली शिप-लॉक्स् आणि त्यांच्यातल्या बोटी दिसतात.
.
टेकडीवरून खाली उतरून धरणाची प्रतिकृती ठेवलेल्या कक्षांत गेलो. धरणाच्या वरच्या बाजूने धेतलेले हे प्रतिकृतीचे छायाचित्र. उजवीकडे धरण, मध्ये चिंचोळा बोटींच्या लिफ्ट्चा भाग आणि डावीकडे शिप-लॉक्स् दिसत आहेत.
टेकडीच्या दुसर्या बाजूला खाली उतरून जायला पायर्या आहेत... त्या परतीच्या मार्गाकडे नेतात. जर तुम्हाला धरण जवळून बघायचे असले तर विजेवर चालणार्या बसचे तिकीट काढायला लागते.
बसस्टॉपकडे जाताना हा सगळा परिसर इतका चकाचक का आहे त्याचे गुपित कळले... थोडासा पाऊस पडून झाडाच्या कुंड्यांवर चिखलाचे दोन थेंब उडाले होते, पण तेथील सफाईकाम करणार्या बाईला तेही ताबडतोप साफ केल्याशिवाय राहवले नाही.
बसचा मार्ग अगदी धरणाच्या पाण्याच्या जवळून जातो. प्रथम सगळ्यात वरच्या शिप-लोक मध्ये शिरणारी जहाजे दिसली...
मग जलसाठ्याच्या बाजूने धरण
व शेवटी बोटींच्या लिफ्टचे चाललेले काम दिसले...
धरणाचा फेरफटका संपवून परत बंदरावर आलो तर तेथे बोटींची जत्रा लागली होती. आमच्या बोटीत जायला तीन बोटी पार करून जायला लागले.
आतापर्यंत धुके बरेच निवळले होते. पहाटे पाहिलेला डोंगर आणि कडा सुस्पष्ट होऊन एकामागोमाग चार डोंगर व कडे दिसायला लागले होते. हा त्याचा माझ्या खोलीतून परत टिपलेला फोटो.
आता वेळ होती सेंचुरी स्कायला टाटा करायची. या बोटीतले चार दिवस हिंडण्या फिरण्यात आणि बोटीवरच्या कार्यक्रमांत कसे भुर्रकन उडून गेले ते समजलेच नाही. आता आमचा प्रवाशांचा बनलेला गटही विखरून जो तो आपापल्या पुढच्या गंतंव्याकडे निघणार होता. सामान गोळा करून बाहेर पडायची वेळ झाली तेव्हा अगदी कॉलेजच्या होस्टेलची रूम सोडताना वाटल्या होत्या तशाच काहीश्या भावना दाटून आल्या. लॉबीमध्ये आल्यावर अगदी जवळच्या मित्रांना सोडून जात असतानाची आलिंगने वगैरे झाली. म्हणजे एकंदरीत मला एकट्यालाच काही तसे वाटत नसल्याची खात्री पटली !
यिचांग शहराकडे जातानाची बसची सफर यांगत्सेच्या खोर्याचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून घेत घेत झाली. इतके दिवस यांगत्सेमाईच्या अंगाखांद्यावर झुलणार्या बोटीवरून तिला बघत होतो. आता तिला असे दुरून पाहताना कसेसेच होत होते...
.
.
बसस्टॅंडवर गाइड आली होती. खरंतर आजचे तिचे काम होते फक्त मला जेवू घालून विमानतळावर पोहोचवायचे. पण ती म्हणाली विमानाला भरपूर वेळ आहे. तुमची इच्छा असली तर माझे गाव फिरून बघू मग विमानतळावर एक छान रेस्तराँ आहे त्यामध्ये जेवण घेऊन तुम्ही चेक-इन करू शकाल. चला गाडी चांगली दोन तास शहरभर फिरवली.
यिचांग हे मध्यम आकाराचे पण नीट नेटके आणि स्वच्छ शहर आहे. आतापर्यंत इथल्या गावा-शहरात एखादा तरी उकिरडा दिसावा यासाठी चाललेला निष्फळ प्रयत्न सोडून देण्याइतपत मी शहाणा झालो होतो. :) ! तेव्हा गाईडने आत्मीयतेने दाखवलेले तिचे शहर बघायला जरा जास्तच मजा आली.
.
.
.
अर्धा तास फेंग शुई चा क्लास केला. चिनी "इंग्रिस" आणि तेही खास चिनी लकबीत बोलणार्या ललनेने बरेच काही सांगितले... पण तिला एखादी गोष्ट परत सांग असे म्हणण्याची "सिन्सीयरगिरी" अजिबात केली नाही. भिती ही की न जाणो, तीच मला नीट समजले की नाही म्हणून खात्री करायला एखादा प्रश्न विचारायची ;) !
आता मी चायना रिटर्नड् फेंग शुई मास्टर आहे, समजलात काय महाराजा ;) !
===================================================================
यिचांग ते शांघाई हे १,१११ किमी अंतर उडून जायला दीड तास लागतात. संध्याकाळी पाच वाजता शांधाईला पोचणार होतो. उडताना दिसणार्या खालच्या डोंगरदर्या आणि त्यातून दिसणारे यांगत्से आणि तिच्या उपनद्यांचे नागमोडी प्रवाह पाहताना दीड तास संपले हे कळले महानगरी शांघाई आल्याचे जाहीर करणार्या जिलब्यांसारख्या गुंतागुंतीच्या उड्डाणपुलांमुळे...
नंतर दिसू लागली एक आखीव रेखीव देखणी नगरी...
.
.
.
विमानतळावरून हॉटेलवर जाताना गाईडबरोबर पुढच्या दिवसांच्या कार्यक्रमाची उजळणी केली आणि मग माझे रात्रीच्या कार्यक्रमांचे बेत सांगून त्यांची तिकिटे बुक करायला सांगितले... त्यातला आज रात्रीचा कार्यक्रम म्हणजे शांघाईच्या बंडची बोटीतून रात्रीची सफर. नऊ वाजता पूर्ण अंधार झाला म्हणजे ही सफर जास्त मजेची होते तेव्हा मी साडेआठला परत येतो असे सांगून गाईड मला हॉटेलवर सोडून परत गेला.
मीही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मस्त शॉवर घेऊन थोडे खाऊन साडेआठला लॉबीत आलो. गाईड वाटच पाहत होता. टॅक्सी करून आम्ही बंडवर पोचलो. तिकीट काढून देऊन तो परत गेला आणि मी बोटीवर चढलो.
बंड म्हणजे शांघाईजवळ यांगत्से समुद्राला मिळते ती खाडी. या खाडीच्या दोन्ही काठांवर शांघाईच्या अनेक प्रसिद्ध इमारती आहेत. खरे तर ही सहल मी कोणताच पर्याय चुकवायचा नाही म्हणूनच केवळ करणार होतो. शिवाय सगळी संध्याकाळ हॉटेलच्या रूममध्ये लोळण्यात फुकट घालविण्यातही काही अर्थ नव्हता. पण बोट धक्क्यातून बाहेर पडली आणि शांघाई नावाची मोहनगरी तिचे रात्रीचे रंग उधळून दाखवू लागली.
.
.
काठावर अशी एकही इमारत नव्हती की जिच्यावर दिव्यांची कलापूर्ण सजावट नव्हती...
.
.
.
..................
पर्ल टीव्ही टॉवर
शांघाई सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी सेंटर
अनेक बोटीही लखलखत्या दिव्यांनी नटून सजून प्रवाशांचे स्वागत करत लाजत मुरडत इकडून तिकडे फेर्या मारत होत्या...
.
.
.
जेवण नसलेल्या नव्वद मिनिटाच्या सफरीत वेळ कसा जाईल या विवंचनेत बोटीच्या पायर्या चढणार्या मला जेव्हा "प्रवाश्यांनी कृपया खाली उतरावे" अशी घोषणा झाली तेव्हा बोटीच्या घड्याळात काहीतरी गडबड आहे असे वाटले. पण माझे घड्याळही त्यांना फितूर झालेले होते... तेही ९० मिनिटे संपली असे म्हणत होते ! मोठ्या नाखुशीने बोटीतून उतरलो.
रस्त्यावर हात केलेली पहिली टॅक्सी थांबली. हॉटेलमधून आठवणीने आणलेले पत्त्याचे कार्ड बघून चालकाने पटकन मान हालवली आणि बरोबर हॉटेलवर आणून सोडले. बरोबर मीटरप्रमाणेच पैसे घेतले. बायजींगच्या टॅक्सीवाल्यांचा संसर्ग शांघाईच्या टॅक्सीवाल्यांना अजून तरी झालेला दिसत नाही. कारण पुढे तीन दिवस असाच सौजन्यपूर्ण व्यवहार अनुभवला.
शांघाईची ओळख तर फार सुंदर झाली होती. आता उद्यापासून पुढचे दिवस शांघाई तिच्या कीर्तीला जागून अजून नवनवी आश्चर्ये दाखवो अशी इच्छा मनाशी धरून झोपेची आराधना करू लागलो.
(क्रमशः)
शांघाई बद्दल बरेच काही ऐकले होते. "मुंबईची शांघाई करू" वगैरे सारख्या गाजलेल्या वक्तव्यांनी नावाजलेली ही शांघाई शांघाई आहे तरी कशी असे कुतूहल फार दिवसांपासून मनात होते. त्यामुळे सहलीचा एकविसावा दिवस बर्याच उत्सुकतेत उजाडला. अर्थात बिछान्यातून उठल्यावर दिवसाचा पहिला थांबा म्हणजे खोलीची बाल्कनी हे ठरलेलेच होते...
ढगाळलेले आकाश, किंचित धुके आणि बर्यापैकी सूर्यप्रकाश असतानेचे हे दिवसा केलेले पहिले शांघाई अवलोकन...
उत्तुंग इमारतींपासून...
...ते अगदी मध्यमवर्गीय वस्तीपर्यंत.
जरा उंचीवरून बघितला की कुठल्याही नगरीचे एक विलोभनीय रूप तर दिसतेच पण बर्याचदा डंखवण्यासाठी लावलेल्या मेकअपमागचा चेहराही दिसतो.
आज शांघाईची सहल करायची होती. निघताना गाईडने हॉटेलच्या रिसेप्शनमधून छत्री घ्यायला सांगितले. उन्हाळ्याच्या दिवसात शांघाईमध्ये बहुदा रोजच पाऊस पडतो... विशेषतः दुपारी दोन ते चारच्या दरम्यान. तेव्हा छत्री ही एक आवश्यक गोष्ट आहे. हॉटेल्स फक्त डिपॉझिट घेऊन तात्पुरत्या वापरासाठी छत्री मोफत देतात.
पहिला थांबा होत जुने शांघाई. जरी या जागेला जुने शांघाई म्हणत असले तरी फक्त जागाच जुनी आहे. घरे, रस्ते वगैरे सगळे नवे आहे! सम्राटाच्या काळात काही पाश्चात्त्य राष्ट्रांना शांघाई गावाबाहेरच्या जमिनी करारपट्टीवर वापरायला दिल्या होत्या... त्यातल्या काही व्यापारी करारांवर तर काही युद्धात झालेल्या तहांच्या करारांमुळे दिल्या होत्या. आता करारांची मुदत संपल्यानंतर त्या सर्व एक एक करत चीनने परत ताब्यात घेतल्या आहेत. या बाबतीत १९९७ मध्ये हाँगकाँगचे जगभर गाजलेले उदाहरण आठवत असेलच. शांघाई हे शहर यांगत्सेच्या त्रिभुज प्रदेशावर वसलेले प्राचीन शहर आहे. अर्थातच ते शेकडो वर्षांपासून एक मुख्य प्रशासकीय केंद्र असण्याबरोबर एक जागतिक स्तराचे व्यापारी बंदरही आहे. त्यामुळे चीनमध्ये पाश्चात्त्य सत्तांचा शिरकाव या बंदरातून होणे स्वाभाविक होते. प्रसिद्ध अफुयुद्धात मिळवलेल्या विजयामुळे झालेल्या नानकिंग तहात इ. १८४२ मध्ये ब्रिटिशांना सर्वप्रथम शांघाईमध्ये आंतरराष्ट्रीय वसाहत स्थापण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर अनेक पाश्चात्त्य सत्तांनीही चीनमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली. त्यात इंग्रजांबरोबर फ्रेंच व अमेरिकन महत्त्वाचे होते. याचा एक फायदा असा झाला की शांघाई आशिया-पॅसिफिक भागाचे आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे अग्रगण्य केंद्र बनले.
त्यानंतर १९४९ साली कम्युनिस्टांनी चीनमध्ये सत्ता हस्तगत केल्यावर त्यांनी फक्त समाजवादी देशांशी व्यापारउदीम करण्यावर भर दिला. त्यामुळे शांघाईचे आंतरराष्ट्रीय व्यापारातले महत्त्व कमी झाले. मात्र १९९० च्या दशकात डेंग शियाओपिंग ने सुरू केलेल्या व्यापारी उदारीकरणाच्या लाटेत प्रचंड प्रमाणात विकासाची कामे केली गेली आणि त्यामुळे शांघाई परत एकदा जागतिक कीर्तीचे वित्त, व्यापार आणि परदेशी गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. ते एवढे की सध्याची शांघाईची गगनचुंबी इमारतींनी तयार झालेली लिजियाझुइ आकाशरेखा (Lujiazui skyline) ही आकाशरेखांमधील "जागतिक शो पीस" समजली जाते. तिचे रात्रीचे दर्शन आपण या आधीच्या भागात घेतले आहेच. पण तिच्या दिवसाच्या नयनमनोहर दर्शनाच्या अनेक छटाही पुढे येतीलच.
पाश्चात्त्य देशांना वापरण्यास दिलेल्या जमिनींना कन्सेशन्स असे संबोधत असत. आजही चिनी भाषेत वेगळी नावे असली तरी या भागांना इंग्लिशमध्ये कन्सेशन्स असेच संबोधले जाते. बहुतेक कन्सेशन्समधील जुन्या इमारती नष्ट झाल्या होत्या किंवा मोडकळीला आल्या होत्या. व्यापारी उदारीकरणाच्या काळात त्यांच्या जागी आता मौजमजा व पर्यटन डोळ्यासमोर ठेवून तशाच युरोपियन पद्धतीच्या इमारती बांधून त्या काळाचे वातावरण निर्माण केले आहे. दिवसा फिरून मजा बघायला आणि रात्री खाण्यापिण्याची धमाल करायला आलेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक लोकांनी ही जागा सतत गजबजून गेलेली असते. तर चला जाऊया त्यातले सर्वात जास्त प्रेक्षणीय फ्रेंच कनेक्शन.... अर्रर्र.. कन्सेशन ;) बघायला...
अगदी जुन्या पॅरिससारखे वातावरण निर्माण केले आहे...
तसेच जुन्या काळचे छोटे चौक आणि त्यांच्या मध्यातील सुंदर कारंजी आणि शिल्पे...
अरुंद गल्ल्या आणि त्याच्यातली जुनी नावाजलेली रेस्तराँ...
.
इथली फेरी आपल्याला पॅरिसच्या एखाद्या सुंदर गल्लीत घेऊन जाते.
मध्येच एक दगडी इमारत लागते. चिनी कम्युनिझमच्या दृष्टीने या इमारतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे...
येथे माओ झेडाँगच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांची पहिली बैठक झाली होती. त्या काळी चीनमध्ये नॅशनॅलिस्ट सरकार होते आणि कम्युनिस्ट त्यांची सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात होते. या बैठकीचा सुगावा फ्रेंच कन्सेशनच्या पोलिसांना लागला आणि त्यांनी छापा घातला. मात्र कम्युनिस्ट त्याअगोदरच तेथून पळून गेल्याने बचावले. नाहीतर चीनचा गेल्या साठ-सत्तर वर्षांचा इतिहास फार वेगळा असता !
तेथूनच थोडे चालून पुढे गेलो की Xintiandi (नवीन स्वर्ग आणि पृथ्वी) नावाचा विभाग सुरू होतो. हा भाग म्हणजे एक प्राचीन शैलीत बांधलेल्या चिनी इमारतींचे प्रदर्शनच आहे...
.
.
.
मात्र त्या इमारतींच्या आत सर्व प्रकारच्या आधुनिक सुखसोयीने परिपूर्ण दुकाने आणि रेस्तरॉं आहेत! या असल्या इमारतींमध्ये मॅकडोनाल्ड, केएफसी, स्टारबक्स, इ जगप्रसिद्ध नावांची रेलेचेल बघून खूप करमणूक झाली !
एका कोपर्यातून हे "काल-आज-उद्या" चे झालेले मनोहर दर्शन...
या चित्रात सर्वात जवळ चीनच्या भूतकालातील इमारती दिसताहेत; त्या इमारतींच्या गर्दीतून दूरवर एक भोक असलेली इमारत दिसते आहे, ते आहे शांघाई जागतिक वित्त केंद्र (Shanghai World Financial Center) जी आजच्या घडीला उंचीमध्ये चीनमधली एक क्रमांकाची व जगातली दोन क्रमांकाची इमारत आहे; आणि तिच्या पुढच्या बाजूला बांधकाम चालू असलेली (क्रेन्स असलेली) इमारत नजिकच्या भविष्यात चीनमधली सर्वात उंच इमारत असणार आहे !
असेच फिरत जरा पुढे गेले म्हणजे आपण यु युवान (हिला नुसते 'यु' अशा संक्षिप्त नावानेही ओळखतात) बागेत पोहोचतो. जुन्या काळी चिनी राजघराण्यात अधिकार्याची नोकरी मिळवण्यासाठी "इंपेरिअल परीक्षा" उत्तीर्ण व्हावी लागत असे. एका वरिष्ठ अधिकार्याचा पान युंदुआन नावाचा मुलगा या परीक्षेत नापास झाला (आवांतर: म्हणजे त्या काळी ह्या परीक्षेत वशिलेबाजी चालत नव्हती असे दिसते :) !) तेव्हा त्याने फावल्या वेळेचा उद्योग म्हणून १५५९ साली ही बाग आपल्या पिताश्रींना निवृत्तीच्या काळात राहण्यासाठी भेट म्हणून बनवायला सुरुवात केली. पण नंतर त्याची सिचुआन प्रांताचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाल्याने हे काम १५७७ पर्यंत १८ वर्षे बंद होते. त्यानंतर जेव्हा ही बाग बांधून पूर्णं झाली तेव्हा ती शांघाईमधली सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित बाग गणली गेली. मात्र तिच्यावर झालेल्या खर्चाने पान कुटुंब मात्र कफल्लक झाले! त्यानंतर बागेची मालकी बर्याचदा बदलली. शांघाई जवळच्या बर्याच युद्धांत तिला छावणीचे केंद्र म्हणूनही वापरण्यात आले. युद्धांत आणि दुर्लक्ष केल्यामुळे तिचे बरेच नुकसानही झाले. सरते शेवटी शांघाई प्रशासनाने १९५६ ते १९६१ या काळात जीर्णोद्धार करून ही बाग १९६१ मध्ये जनतेसाठी खुली केली. १९८२ मध्ये तिला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जाही दिला गेला.
पाच एकरांवर पसरलेली ही बाग चिनी लोकांची सौदर्यदृष्टी आणि त्यांचे निसर्गावरचे प्रेम यांचे अप्रतिम उदाहरण आहे. पण तसेच दोन वृद्ध माणसांच्या राहण्याच्या जागेवर केलेल्या संपत्तीच्या उधळपट्टीच्या अतिरेकाचेही उत्तम उदाहरण आहे ! ऋतुमानाला अनुसरून लावलेल्या वृक्षराजी आणि त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यास मोक्याच्या जागी बांधलेल्या खोल्या, निरीक्षण मंच (pavilions) आणि मनोरे; स्वतंत्र आणि एकमेकाला जोडलेले अनेक आकाराचे आणि पाणवनस्पतींनी भरलेले तलाव; कलात्मक पद्धतीने केलेली फुलझाडांची लागवड; आणि या सगळ्यावर कळस म्हणजे असंख्य चमत्कृतीपूर्ण आकाराचे दगड या सगळ्यांनी ही बाग जगप्रसिद्ध बनली आहे ! कुटुंबाचे दिवाळे काढले म्हणून पान युंदुआनला मूर्ख म्हणावे की एक जगावेगळी चमत्कृतीपूर्ण देखणी बाग बनवली म्हणून त्याचा उदोउदो करावा असा यक्षप्रश्न पडतो !
ही त्या बागेची आणि ती बसून बघण्याची मजा घेण्यासाठी बनलेल्या निरीक्षण मंच व मनोर्यांची चित्रे...
.
.
.
.
महत्त्वाची चिनी इमारत म्हणजे सुखशांतीच्या हमीसाठी ड्रॅगन हवेच
ह्या खालच्या चित्रातला मधला दगड संपूर्णपणे जेडचा आहे.
एक दिवाणखाना ...
आणि हे आहेत गृहसंकुलांतल्या खोल्यांना जोडणारे मार्ग...
.
........................
दगडावरच्या कोरीवकामाची कलाकुसर...
छान होते हे छोटेसे घर म्हाताराम्हातारीला राहायला रिटायर झाल्यावर, नाही का ? ;)
बागेच्या बाहेर पडलो आणि एका दुकानात हा चिनी विनोदबुद्धीचा एक उत्तम नमुना दिसला ! "माओ आणि ओबा माओ" दोघेही चिनी कॉमरेडच्या टोप्या घालून :) !
जेवायला जाता जाता शांघाई बंडवर एक थांबा घेतला. पण 'ढग मेघांनी आक्रमीले' आणि थोड्याच वेळात सुरू झालेल्या धुवांधार पावसाने प्रवासीजन इमारतींच्या आसर्याला पळाले. गाईडच्या सांगण्यावरून घेतलेल्या छत्रीची काही पत्रास चालणार नाही अशी मुसळधार वर्षा झाली. पण गाईड म्हणाली, "घाबरायचे कारण नाही अर्ध्या एक तासात सगळे ठीक होईल. सहल खराब होणार नाही. तेवढ्यात आपण जेवून घेऊ." तिने मोबाईल वापरून चालकाला बस आमच्या जवळ आणायला सांगितली आणि आम्ही धावतपळत बसमध्ये चढलो. त्याअगोदर बंड च्या काठावरून काढलेले हे शांघाईच्या जगप्रसिद्ध लिजिआझुइ आकाशरेखेचे विलोभनीय चित्र.
जेवण आटपून बाहेर आलो तो काय, खरंच आकाश बरेचसे उजळले होते आणि पाऊस तर एकदमच थांबला होता. बसमध्ये बसून शांघई म्युझियम बघायला गेलो. संग्रहालयाचा परिसर आणि स्वागतकक्ष यांचे रूप "संग्रहालय कमी आणि पंचतारांकित हॉटेल जास्त" असे आहे. वानगीदाखल ही काही चित्रे...
.
.
या संग्रहालयात पाच मजल्यांवर आणि एकूण ३९,२०० चौ मीटर क्षेत्रफळाचे अकरा विशाल स्थायी कक्ष (galleries) आणि तीन खास प्रसंगोचित कक्ष आहेत. ते बघायला राखलेल्या दीड तासांचे ताणून दोन तास केले तरी बर्याच ठिकाणी फक्त भोज्ज्याला शिवून आलो असे वाटले. सगळे नीट बघायचे असेल तर कमीतकमी दोन दिवस (१२ तास) तरी जरूर लागतील.
विस्तारभयास्तव येथे फक्त निवडक चित्रे देत आहे...
जेडच्या कोरीवकामाचा प्राचीन नमुना...
फर्निचर
लाकडी खुर्च्यांचे कालपूर्ण नमुने...
आशियातल्या (सध्याच्या पाकिस्तान व अफगाणिस्तान व इराणच्या उत्तरेकडील भाग) कुशाण राज्यांच्या नाण्यावर शिवमुद्रा होती ही माहिती दिसली.
चिनी मातीच्या सुरया...
........................
बुद्धमूर्ती...
........................
जमातींचे वेष
........................
संग्रहालयातून गाईडने आम्हाला जवळजवळ ओढूनच बाहेर कारण नाहीतर पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम बिघडला असता. बस मग आम्हाला शांघाईच्या जगपसिद्ध जेड बुद्धमंदीराकडे घेऊन गेली.
अठराव्या शतकाच्या शेवटी हुइ जेन नावाचा एक बुद्धभिख्खू तिबेटच्या यात्रेवर गेला आणि परततीच्या प्रवासात काही काळ त्याने ब्रम्हदेशात वस्ती केली. तेथे त्याला चेन जुन्पू नावाच्या ब्रम्हदेशात स्थायिक झालेल्या चिनी गृहस्थाने जेडच्या पाच मोठ्या बुद्धमूर्ती भेट दिल्या. हुई त्यांतल्या फक्त दोन मूर्ती शांघाईला आणू शकला. या मूर्तीसाठी १८८२ साली या मंदिराची स्थापना झाली. त्यांतली मुख्य बसलेल्या अवस्थेतील १९० सेंमी उंच बुद्धमूर्ती अगेट व पाचूने मढवलेली आहे. तर दुसरी ९६ सेंमी लांबीची मूर्ती एका बाजूवर पहुडलेल्या निर्वाण अवस्थेतली आहे. या दोन्ही मूर्तीचे फोटो काढण्यास मनाई आहे. पण या मंदिरात निर्वाण अवस्थेतील मूर्तीची ४ मीटर लांब मोठी संगमरवरी प्रतिकृती ठेवली आहे तिचा फोटो काढता येतो.
या मंदिरात इतरही अनेक कलापूर्ण वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी काहींचे फोटो...
........................
हे भव्य मंदिर आणि त्याच्या अनेक विभागांत फक्त मूर्ती आणि अनमोल वस्तूच नव्हे तर त्यापेक्षा अधिक मौल्यवान किंबहुना अनमोलच असे समजले जाणारे ७,००० पेक्षा जास्त दाझांग सूत्राचे ग्रंथ ठेवले आहेत. एकंदर मंदिराचा परिसर आणि त्याच्यातील प्राचीन वस्तू पाहून कोणीही भारावून जाईल.
आजच्या दिवसाची सफर संपली होती. रात्री "ERA - Intersection of Time" नावाचा शो पाहिला. चिनी अॅक्रोबॅटीक्सचे टेक्नॉलॉजीचा कल्पक उपयोग करून कलापूर्ण दर्शन करण्याचा हा जगातला पहिलाच प्रयोग आहे आणि तो अत्यंत यशस्वीही झालेला आहे. मात्र फ्लॅशमुळे नेपथ्य व प्रकाशयोजनेला येणार्या अडथळ्यामुळे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे फोटो देऊ शकत नाही याबद्दल दिलगीर आहे. पण शांघाईला गेल्यास चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे.
आजचा दिवस खरंच खूप मजेत गेला. काय बघू काय नको असे झाले होते. पण उद्या तर चीनच्या सर्वोत्तम चार प्राचीन खजिन्यापैकी उरलेली दोन स्थाने बघायची होती. त्यामुळे उद्या अजून काय आश्चर्यकारक बघायला मिळेल याचा विचार करतच झोपी गेलो.
बगीच्यांचे गाव सुझू आणि पूर्वेचे व्हेनिस झोउझुआंग
सहलीचा बाविसावा दिवस बर्याच उत्सुकतेने उजाडला. सुझू बद्दल शियानच्या सहप्रवाशांनी बरीच उत्सुकता जागवली होती. Water Town झोउझुआंग बद्दलही चांगले बोलले गेले होते. माझ्या इटिनेररीमध्ये झोउझुआंगचा समावेश नव्हता. पण उद्याचा पूर्ण वेळ माझ्या मनात काय येईल ते बघायला मोकळा ठेवला होता. तेव्हा आज जरा जास्त माहिती काढून उद्या जमल्यास तेथे जाऊ असा विचार केला होता.
सुझू शांघाईपासून १०० किमी वर आहे. बसने साधारण दीड तासाचा प्रवास होता. जसजसे शांघाईपासून दूर जाऊ लागलो तसे चारचाकींची संख्या कमी होत गेली आणि दुचाक्यांची संख्या वाढत गेली. गावाच्या सीमा सुरू झाल्या झाल्या एक उड्डाणपूल लागला. पुलावरच रस्त्याच्या दोन लेन अडवून दोन रांगांत दुचाक्या उभ्या केलेल्या पाहून "आपल्या गल्लीत" आल्यासारखे वाटले +D.
जरा पुढे गेल्यावर उभ्या दुचाक्यांच्या गर्दीत भाजीविक्यांनी त्यांची दुकाने थाटलेली दिसली आणि चीन भारताचा खरा शेजारी असल्याचा पुरावाच मिळाला ;)
सुझूची स्थापना इ. पू. ५१४ ला झाली. यांगत्सेच्या दक्षिणेचा सर्वच भाग बगिच्यांकरिता प्रसिद्ध आहेच पण त्यांत सुझूमधील बगिचे सर्वोत्तम समजले जातात. या एका गावात जवळजवळ ६० बागा आहेत. पण त्यांच्या संख्येपेक्षा त्याच्या सौंदर्यपूर्ण मांडणीमुळे सुझू जास्त प्रसिद्ध आहे. या रसिक वातावरणात चीनचे अनेक नावाजलेले चित्रकार, कवी व कॅलिग्राफीचे कलाकार होऊन गेले यात आश्चर्य ते काय?
गाइडने सर्वात जास्त लोकप्रिय असलेले दोन बगिचे पाहू असे सांगितले. अर्ध्या दिवसाच्या सहलीत सगळ्या बागा पाहणे तर शक्य नव्हते. तेव्हा अर्थातच ते सगळ्यांनी मान्य केले. अगोदर आम्ही "विनम्र प्रशासकाची बाग" (The Humble Administrator's Garden) बघायला गेलो. वांग शियानचेन नावाच्या सरकारी अधिकार्याने निवृत्त झाल्यावर राहण्यासाठी व भाजीपाल्यासाठी ही खाजगी बाग बांधल्याने तिला हे नाव पडले आहे. एक जुने मंदिर, तळे, चित्रविचित्र आकाराचे दगड आणि छोटेसे जंगल याचा इतका सौंदर्यपूर्ण वापर केला आहे की ही चीनमधील चार सर्वोत्तम बागांपैकी एक गणली जाते. १५०९ मध्ये बांधलेल्या अंदाजे १३ एकरावर पसरलेली ही बाग World Cultural Heritage Site दर्जाची जागा आहे. मिंग राजघराण्याच्या काळात बांधल्यामुळे अर्थातच मिंग वास्तुशिल्पकलेचा पगडा हिच्या बांधणीवर आहे.
बागेतली काही विशेष स्थळे
.
.
.
.
.
.
फर्निचर व शोभेच्या वस्तू
.
नंतर चालत पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेली दुसरी बाग बघायला गेलो. ही बाग एका विद्यार्थ्याने आपल्या गुरुला भेट देण्याकरिता बांधली. या बागेच्या दर्शनी भागात चिंग आणि मिंग राजघराण्याच्या काळातील वास्तू व शोभावस्तू आहेत.
.
खास खिडक्या आणि त्यातून दिसणार्या बागेची रचना फारच कलापूर्ण आहे.
...........................
.
या बागेत चित्रविचित्र आकाराच्या दगडांच्या अनेक रचना आहेत.
बागेची अजून काही चित्रे
.
.
.
ही बाग बघून झाल्यावर वाटेत पोटपूजा आटपली आणि एका रेशीम कारखान्याला भेट दिली. त्यांत रेशमाच्या कापडावर काढलेली काही सुंदर चित्रे खूपच मनात भरली.
.
...........................
माझी सहल संपली होती. गाईड म्हणाली, "आता आम्ही Water Town बघायला निघणार आहोत. चायना हायलाइटने तुमच्याकरता फक्त सुझू टूर बुक केली आहे. पण तुम्हाला Water Town सुद्धा बघायचे आहे का?" अर्थातच आयती चालून आलेली संधी मी थोडीच सोडणार? हो म्हणून मी पैसे काढायला खिशात हात घातला तर ती म्हणाली, "नो चार्ज, सहलीचा हा भाग तुमच्याकरिता आमच्या कंपनीची भेट (on the house) आहे !" अशा तर्हेने स्थानिक टूर कंपनीच्या सौजन्याने आमची झोउझुआंग बघण्याची इच्छा पुरी झाली +D. धन्यवाद जाहीर करून आनंदाने सहल पुढे चालू केली.
झोउझुआंग सुझूपासून ३० किमी दूर आहे. १२४ एकरांवर वसलेल्या या गावात चौदाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत बांधल्या गेलेल्या मिंग आणि चिंग राजघराण्यांच्या काळातल्या अनेक इमारती जतन करून ठेवलेल्या आहेत. हे गाव एका मोठ्या कालव्याने वेढलेले आहे आणि सबंध गावात मानवनिर्मित कालव्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे या गावाचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे या गावातील त्यांतील अरुंद रस्त्यांपेक्षा जास्त पाण्याच्या कालव्यांतून इटालियन व्हेनिसमधील गोंडोलासारख्या होड्यांतून होणारी वाहतूक. यामुळेच या शहराला पूर्वेकडचे व्हेनिस असेही म्हटले जाते.
या गावाची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे डुकराचे गोड मांस (sweat pork). गावात शिरताच एका दुकानात हा पदार्थ दिसला.
गावातील कालव्यांचे काही फोटो
.
.
...........................
गोंडोलाने या गावातील इमारती आणि वेगवेगळ्या १४ पुलांचे मजेदार दर्शन करता येते. थोडा वेळ पायी फिरल्यावर आम्ही गोंडोलाने झोउझुआंगची सफर केली. त्यावेळी काढलेली काही कालव्यांची नयनरम्य चित्रे...
वरच्या पुलाचा एक फोटो एका चिनी वंशाच्या अमेरिकन नागरिक असलेल्या प्रवाशाने अमेरिकेतील सान दिएगो येथील एका मासिकात प्रसिद्ध केला... आणि काही काळातच झोउझुआंग पूर्वेचे व्हेनिस म्हणून जगप्रसिद्ध झाले !
.
.
.
.
झोउझुआंगचा मुख्य चौक !
अरुंद कालव्यातून चालक सफाईने गोंडोला वलव्हत होते... बर्याचदा गोंडोला एकमेकाच्या इतक्या जवळून जात असत की शेजारच्या गोंडोलातील प्रवाशांशी आरामात हस्तांदोलन करता यावे !
गोंडोलाची सफर संपल्यावर, जुन्या शैलीतली अनेक सुंदर घरे बघायला गावात थोडावेळ पायी फेरी मारली.
परत येईपर्यंत सहा वाजले होते. रात्री व्हाईट मॅग्नोलिया थिएटरमध्ये शो बघायला गेलो. शोमध्ये फोटो काढायला बंदी असल्याने या सुंदर कार्यक्रमाचे फोटो नाहीत याबद्दल दिलगीर आहे. आता इतके अॅक्रोबॅटीक कार्यक्रम पाहिल्यावर या कार्यक्रमात काय फार वेगळे नसणार असा माझा कयास या कार्यक्रमानेही पार मोडीत काढला. आतापर्यंतचा प्रत्येक ठिकाणचा कार्यक्रम... मग तो कसरतीचा असो किंवा नृत्याचा असो... आपले वैशिष्ट्य राखून होता. कसरतीच्या अथवा नृत्याच्या एकाही प्रकाराची पुनरावृत्ती अख्ख्या चीनभर बघायला मिळाली नाही, हे विशेष आश्चर्यकारक होते !
आज चायना हायलाइटची इटिनेररी संपली. उद्याचा दिवस शांघाईमधला राखीव दिवस म्हणून ठेवला होता. टूर बुकिंग कन्फर्म झाल्यावर अजून काही आकर्षणांची यादी केली होती. आता त्यांना कशी भेट द्यावी याचा विचार करत झोपी गेलो.
शांघाईची मुक्तसफर आणि परतीच्या वाटेवर
शांघाईबद्दल इतके काही ऐकून होतो तर इटीनेररीपेक्षा जास्त काहीतरी बघण्यासारखे असेलच आणि ते राहिले म्हणून नंतर हळहळ वाटेल असा विचार करून एक दिवस पूर्णपणे मोकळा ठेवला होता. हा दिवस स्वतःच फिरून घालवायचा असे ठरवले होते. त्यामागे इतके दिवस चीनमध्ये फिरल्यावर शांघाईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महानगरात फिरायला काहीच अडचण येणार नाही हा कयास होता. आतापर्यंतच्या चीनच्या अनुभवावरून या अंदाजावरचा माझा विश्वास चांगलाच डळमळीत झाला होता. तीन दिवसांच्या तीन गाईडना अजून एका दिवसाकरिता गाईड मिळेल का ही सतत विचारणा करत होतो. पण इंग्लिश बोलणार्या गाइडची शांघाईसारख्या मोठ्या शहरामध्येही एवढी चणचण आहे की काहीही सोय होऊ शकली नाही. सरते शेवटी हर हर महादेव म्हणत एकट्यानेच शांघाईवर स्वारी करायचे ठरवले. काय काय बघायचे त्या स्थळांच्या यादीची लांबी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत गेली होती :-). तिची एक व्यावहारिक लघुसूची (practical shortlist) बनवली, गूगल नकाश्यावर स्थळांच्या जागा बघून एक साधारण क्रमणमार्ग ठरवला आणि हॉटेलबाहेर पडलो.
हॉटेलच्या दाराजवळच पुढे काय वाढून ठेवले आहे याची नांदी झाली :). मोठ्या आशेने दरवाज्यावरच्या बेलबॉयला विचारले की "ईस्ट नानजिंग रोडला कसे जायचे? टॅक्सीने किती वेळ लागेल?"... तर त्याच्या चेहर्यावर केवळ गोंधळ. मग विचारले, "सबवे, सबवे ?" तरीसुद्धा तोच चेहरा. तेवढ्यात त्याचा सहकारी मदतीला धावून आला आणि त्याने "जर चालत जायची इच्छा असेल तर ५-१० मिनिटात पोचाल असे म्हणून थोडे मार्गदशन केले. म्हटले चला चालत गेलो तर शांघाई जरा जवळून बघता येईल. त्याने सांगितलेल्या रस्त्यावरून सांगितलेली सारी वळणे घेतली तरी ईस्ट नानजिंग रोडचा सुगावा लागेना. रस्त्यावर पाच जणांना विचारायचा प्रयत्न केला पण सर्वांच्या चेहर्यावर तेच भाव, "ही मंगळावरची अगम्य भाषा सोडून जरा चिनीमध्ये विचारलेत तर नक्की मदत करेन." नशिबाने सहाव्या प्रयत्नाला इंग्लिश समजणारा चिनी माणूस मिळाला पण तोही शांघाईमध्ये नवखा होता. त्याने बरोबर रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पाठवले ! पण नंतर ते त्याच्या ध्यानात आल्यावर रस्त्याच्या पलीकडून आरडा ओरडा करून परत बरोबर दिशा दाखवली. त्या वेळेपर्यंत मलाही रस्त्याची पाटी दिसली होती आणि तिकडे जाणारा निम्नमार्ग (underpass) ही दिसला होता. आनंदाच्या भरात मीही तेवढ्याच जोराने ओरडून त्याचे आभार मानले.
ईस्ट नानजिंग रोड कडे नेणारा एक मार्ग.
वाटेत एक सिंह-ड्रॅगन भेटला त्याला न घाबरता कॅमेर्याने 'शूट' केले आणि पुढे निघालो.
नानजिंग रोड १८४५ साली रहदारीस खुला झाला तेव्हा त्या काळाच्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या रस्त्यासारखाच सामान्य रस्ता होता. परंतू २००० सालच्या उदारीकरणाच्या काळात त्याचा पूर्ण कायापालट करून त्याचे जगातील सर्वात लांब (६ किमी) शॉपिंग मॉलमध्ये रूपांतर केले गेले. या रस्त्यावर सर्व जगप्रसिद्ध ब्रँडची दुकाने आहेत. शॉपिंगबरोबर खाण्यापिण्याची ब्रंडेड स्टोअर्स आहेत. या रस्त्याचा पूर्वेकडचा हिस्सा म्हणजेच ईस्ट नानजिंग रोड हा केवळ पादचार्यांकरिता राखीव आहे. फक्त प्रवाशांकरिता सोय म्हणून ठेवलेल्या टायरवाल्या रंगीबेरंगी ट्रेन्स सोडून इतर कोणतेही वाहन याच्यावरून नेण्यास बंदी आहे. हा रस्ता चिनी आणि परदेशी या दोन्ही प्रवाशांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
.
थोडा वेळ या रस्त्यावर फिरून घेतले आणि त्याच्याच नावाचे सबवे (भूमिगत रेल्वेला येथे सबवे म्हणतात) स्टेशन शोधू लागलो पण काही केल्या ते सापडेना. शेवटी एका इंग्लिश जाणणार्या ललनेने जवळ असलेला अंडरपास दाखवून रस्त्याखाली जायला सांगितले आणि शेवटी ते सापडले. तिकीट काढायला मशीनजवळ गेलो. तेथे इंग्लिशमध्ये सूचना असलेली काही मशीने दिसली म्हणून खूश झालो. त्यांचा उपयोग करू लागलो तर ध्यानात आले की सूचना इंग्लिशमध्ये पण सर्व स्टेशनांची नांवे चिनी लिपीत होती !!! काही कळेना. मग शेवटी स्टेशनवरच्या एका गार्डला पकडले, त्याने दुसर्याला आणि त्याने तिसर्याला असे करत इंग्लिश समजणार्या गार्डपर्यंत पोहोचलो. तिसर्याने मला पाहिजे ते म्हणजे "शांघाई सायन्स व टेक्नॉलॉजी म्युझियम" स्टेशनचे तिकीट काढून दिले (हुश्श !) आणि आम्ही शांघाई सबवे पकडायला निघालो.
९८,००० चौ मीटर क्षेत्रफळाचे शांघाई सायन्स व टेक्नॉलॉजी म्युझियम हे एक विशाल संग्रहालय बनविण्यासाठी ३,२०० कोटी रुपये खर्च आला आहे. यात तेरा मुख्य कक्ष आणि शास्त्रीय विषयावरच्या फिल्म्स दाखवणारी ४ सिनेमा थिएटर्स आहेत (IMAX 3D Theater, IMAX Dome Theater, IWERKS Theater and Space Theater). अक्षयकुमारच्या 'चांदनी चौक टू चायना' चे काही भाग या संग्रहालयात चित्रित केले गेले आहेत. हे संग्रहालय नीट पाहायला एक दिवससुद्धा पुरा पडणार नाही हे लगेच ध्यानात आले त्यामुळे माहितीपत्रकावर ठराविक कक्षांवर खुणा करून तेच बघायचे ठरवले.
संग्रहालयाचा दर्शनी भाग
.
एव्हिएशन
प्राणिशास्त्र
जंगले
.....................
डायनॉसॉर्स
शियान मधल्या सहप्रवाशांकडून शांघाईमधल्या "लॉस्ट हेवन" या रेस्तरॉची खूप स्तुती ऐकली होती आणि त्यांच्याकडून त्याचा पत्ता व फोन नंबरही घेतला होता. दुपारचे जेवण तेथे घ्यायचे ठरवले होते. फोन करून जागा बुक करूनच जा असे सहप्रवाशांनी सांगितले होते. ऐनवेळेस ध्यानात आले की टॅक्सीचालकाला दाखवण्यासाठी चिनीमध्ये लिहून आणलेला पत्त्याचा कागद हॉटेलवरच राहिला होता. नशिबाने फोन नंबर मी माझ्याजवळच्या इटिनेररीच्या कागदावरपण लिहून घेतला होता. परत इंग्लिश जाणणार्या माणसाची शोधाशोध सुरू केली. शेवटी संग्रहालयाचा एक अधिकारी सापडला. त्याच्या समोर रेस्तरॉला फोन करून रिसेप्शनवरच्या ललनेला हॉटेलचा पत्ता त्या अधिकार्याला सांगायला सांगून तो कागदावर लिहवून घेतला. तिला म्हटले की आता लंचला येऊ शकतो का तर म्हणाली टॅक्सीने एक तास तरी लागेल आणि तोपर्यंत हॉटेल बंद होईल. मग संध्याकाळी साडेपाचचे बुकिंग मिळाले. चायना हायलाईट्सने दिलेल्या मोबाइलचा हा अजून एक सदुपयोग झाला !
संग्रहालयाच्या बाहेर पडलो तर हा फणसवाला समोर दिसला.
भूक तर लागली होती. संध्याकाळचे जेवण लवकरच साडेपाचला करायचे होते. आता आपल्याला पसंत येणारे रेस्तरॉ शोधण्याच्या प्रयोगात अजून वेळ घालवण्यापेक्षा यालाच राजाश्रय देऊया असा विचार केला. फणस हे माझ्या आवडीचे फळ आणि ते चवदारही होते. त्यामुळे मजेने भरपेट फणसाचे गरे खाल्ले आणि सबवे स्टेशनवर गेलो.
पुढचा थांबा पुडाँग होता. पुडाँग म्हणजे शांघाईचं मॅनहॅटन... अगोदरच्या भागांत जी सुंदर आकाशरेखा बंडच्या काठावर उभी राहून बघितली होती ती पुडाँगमधल्या गगनचुंबी इमारतींनी बनवलेली आहे. सबवेच्या दोन क्रमांकाच्या मार्गावरील लुजियाझुई (Lujiazui) स्टेशनवर उतरले तर पुडाँगमधील बहुतेक सर्व प्रेक्षणीय स्थळे पायी फिरून बघता येतात. तिकिटाच्या मशीनमध्ये स्टेशन्सची नावे चिनी मधून असूनदेखील आतापर्यंत मी लुजियाझुई स्टेशनचे तिकीट कोणाच्याही मदतीशिवाय काढण्याइतका तरबेज झालो होतो :).
लुजियाझुई स्टेशनला पोहोचलो आणि बाहेर जायला लागलो. कुठल्याही दिशेने गेलो तरी छोट्या छोट्या दुकानांच्या शॉपिंग कांप्लेक्समध्येच घुसत होतो?! तीन चार वेळा प्लॅटफॉर्मवर मागे येऊन परत शोधण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही.चक्रव्यूहामध्ये अडकल्यावर अभिमन्यूला काय वाटले असेल त्याचा साक्षात अनुभव चिनी सबवेने दिला ! शेवटी अभिमान बाजूला ठेवून दुकानदारांना विचारायला सुरुवात केली. एका दुकानदाराने या सगळ्या दुकानांच्या चक्रव्यूहात लपलेला एक जवळचा मार्ग दाखवला आणि एका मिनिटात "जमिनीवर" आलो. याच अनुभवाची चुणूक संग्रहालयाच्या स्टेशनवर आली होती, पण लुजियाझुईला तोड नाही. अशा भुलभुलैयापूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रकार सर्वसाधारणपणे सर्व शांघाईभरच्या सबवे स्टेशन्सवर आहे. नवीन प्रवाशाला घोळात घालून जास्तीतजास्त वेळ दुकानाच्या गर्दीत फिरवत ठेवले तर त्याला काही ना काही विकत घेण्याची इच्छा होईलच असा एक मानसशास्त्रीय डाव यामागे असावा असा मला दाट संशय आहे ;).
जमिनीखालून वर आलो तर दोन वाजत आले होते आणि शांघाईच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आकाश ढगांनी नुसते भरून गेले होते. Shanghai World Financial Centre Tower या चीनमधली सर्वात उंच आणि जगातली दोन क्रमांकाच्या इमारतीवरून शांघाई नगरीचे सिंहावलोकन करायचा बेत होता. पण थेंब थेंब पडणारा पाऊस मुसळधार होणार याची स्पष्ट लक्षणे दिसायला लागली होती...
मग बेत बदलला आणि जवळच असलेल्या 'डोंगफांग मिंगझू' (Oriental Pearl TV Tower) कडे धाव घेतली.
धो धो पाऊस सुरू होण्यापूर्वी टॉवरच्या दारातून आत घुसलो. बाहेरून फक्त टॉवरसारखी दिसणारी ही वास्तू एक भलीमोठी इमारत आहे हे आत गेल्यावरच कळते... आत शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्तराँ, इत्यादीसह एक मोठा मॉलच आहे.
.
जवळ जवळ ३० जणांना घेऊन एका महाकाय लिफ्टने आम्हाला एका मिनिटापेक्षा कमी वेळात २६३ मीटर उंच टॉवरच्या सर्वात वरच्या गोलात पोहोचवले. येथे एक निरीक्षण गॅलरी आहे. पण एवढे ढग गोळा झाले होते की आजूबाजूचे काहीही धड दिसत नव्हते...
.....................
.
.
अर्धा पाऊण तास वाट बधून नाराजीने खाली जाणारी लिफ्ट पकडायला खालच्या मजल्यावर आलो. लिफ्टच्या रांगेत उभे असताना सहज बाजूला बघितले तर काहीजण काचेवर उभे असलेले दिसले. आणि एकदम आठवले की या टॉवरच्या खालच्या गोलात काचेची जमीन असलेला एक निरीक्षण मजला आहे. रांग सोडून तेथे गेलो... आणि या टॉवरवर आल्याचे सार्थक झाले ! या मजल्याची बाहेरच्या बाजूची ७५% जमीन काचेची आहे. २५९ मीटर (पाव किलोमीटरपेक्षा थोडे जास्तच !) उंचीवरच्या पूर्ण पारदर्शक काचेच्या जमिनीवर उभे राहणे हा एक थरारक अनुभव आहे ! सुरुवातीला त्या काचेवर एकच पाय ठेवला तरी खाली पडल्याचा भास होतो. बरीच माणसे बाजूच्या २५% लाकडी भागावरूनच चालून फक्त काचेतून डोकावून समाधान मानत होती. पण एकदा भीड चेपली आणि पहिल्यांदा रेलिंगला धरून आणि नंतर मोकळ्या हातांनी चालण्याचा धीर झाला की केवळ "हवेत चालणे" म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव येतो ! माझ्याकरता या दिवसाचा हा परमोच्च बिंदू होता !!! मोजल्या नाही पण त्या मजल्यावर काचेवरून मी मनोर्याभोवती दहापेक्षा जास्तच फेर्या मारल्या असतील. तरी पुरे समाधान झाले नाही !
.
.
काही मोठी माणसे काचेवर जायला घाबरत होती तर काही बाप माणसे मजेत काचेवरून रांगत होती... अगदी टोकापर्यंत जाऊन "व्ही फॉर व्हिक्टरी" पण करत होती ;)
.
आणखी दुधात साखर म्हणजे हे सगळे होईपर्यंत चार वाजत आले होते आणि शांघाईचे ढग त्यांच्या प्रथेप्रमाणे कमी होऊ लागले. आजूबाजूच्या इमारती नजरेस येऊ लागल्या होत्या... फिनान्शियल सेंटरवर जाण्याचा बेत रहित करून येथेच जास्त वेळ घालवायचा निर्णय घेतला कारण फिनान्शियल सेंटर जास्त उंच असले तरी पर्ल टॉवर बंडच्या बाजूलाच असल्याने त्याच्यावरून आजूबाजूचे दृश्य जास्त चांगले दिसते. शिवाय बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीत अगोदरच जाऊन आल्याने उंचीपेक्षा दृष्टीसौंदर्य मला जास्त महत्त्वाचे वाटत होते.
टॉवरशेजारचा एक भलामोठा चौक आणि त्यावर पादचार्यांसाठी रस्ते ओलांडून जायला बनवलेला गोलाकार मार्ग...
बंड चे मनोहर दर्शन
.
पर्ल टॉवरच्या पायथ्याजवळचा परिसर
नंतर खाली उतरताना मधल्या काही मजल्यांवर थांबून जरा एका वेगळ्या कोनातून इमारती व बंड पाहायला मिळतात.
.
.
मी बघितलेला जगातला सगळ्यात मोठा आरसा +D!
टॉवर उतरून येईपर्यंत चार वाजून गेले होते. लॉस्ट हेवनच्या रिसेप्शनिस्टने टॅक्सीने पोचायला एक तास लागेल असे सांगितले होते. म्हणून इतर कुठे न जाता सरळ टॅक्सीवाल्याला पत्त्याचा कागद दाखवला आणि रेस्तराँच्या दिशेने निघालो. बरोबर ७ मिनिटात त्याने टॅक्सी थांबवली आणि एका कसलीच वाणिज्य पाटी नसलेल्या इमारतीकडे बोट दाखवले. मी मनात म्हटले "परत भाषेचा घोळ झालेला दिसतोय!" मी नाही म्हणण्याच्या अनेक खाणाखुणांचा प्रयोग टॅक्सीचालकावर प्रयत्न केला पण तो ऐकेच ना ! शेवटी खाली उतरून (पटकन निघून गेला तर अजून पंचाईत म्हणून पैसे दिले नव्हते +D) इमारतीजवळ जाऊन बघितले आणि खरंच "Lost Heaven" नावाची एक छोटी पाटी गेटवर होती. काचेच्या दरवाज्यातून रेस्तराँचे रिसेप्शन दिसत होते. परत जाऊन टॅक्सीचे बिल चुकते केले आणि रेस्तराँमध्ये प्रवेश केला.
पण आत सगळी सामसूम. जरा आवाज दिला तर आतून एक ललना आली आणि स्वागत करून म्हणाली रेस्तरॉ उघडायला अजून वेळ आहे. मी विचारले की मी दुपारी फोन करून बुकिंग केले तेव्हा कोण बोलत होते. वहीतल्या यादीत माझे नाव बघून म्हणाली मीच होते. संग्रहालयापासून इथे यायला मला फारफार तर १५ मिनिटे लागली असती, पर्ल टॉवरवरून तर फक्त सातच मिनिटेच लागली, मग तू एक तास लागेल असे का सांगितलेस असे विचारले तर म्हणाली, "मी शांघाईची नाही. हुन्नानमधली (१,००० किमी किंवा जास्त दूरचा प्रांत) आहे. मला टॉवर, संग्रहालयच काय पण शांघाईतलं इतर काहीच माहीत नाही. मी आपलं तुम्ही उशीरा येऊ नये म्हणून एक तास सांगितला. आता मी काय बोलणार? मनातल्या मनात कपाळाला हात लावला. हिला जर बरोबर माहिती असती तर माझे दुपारचे जेवण इथे झाले असते आणि मला फिनान्शियल सेंटर बघायला व मॅगलेव्ह रेल्वेचा प्रवास करायला पुरेसा वेळ मिळाला असता.
मॅगलेव्ह (मॅग्नेटीक लेव्हिटेशन) म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या बळावर हवेत तरंगती राहून २०० किमी प्रतीतास जाणारी रेल्वे. जगात शांघाई या एकमेव ठिकाणी ही सर्वसामान्य माणसांना तिकीट काढून प्रवास करण्यास खुली आहे. हे प्रकरण व्यापारी तत्त्वावर फायदेशीर होऊ शकत नाही हे ध्यानात आल्यामुळे मॅगलेव्ह जगात इतर कोठेच प्रायोगिक अवस्थेच्या पुढे गेलेली नाही. चीननेही केवळ आपल्या भौतिकशास्त्रातील प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठीच हा तोट्यातला व्यवहार चालू ठेवला आहे. त्यामुळे फिनान्शियल सेंटरची भेट चुकल्याचे मला इतके वाईट वाटले नाही पण मॅगलेव्हचा प्रवास चुकल्याची रुखरुख अजूनही आहे. असो.
तासभर काय करायचे म्हणून बियर मागवून रेस्तरॉमधले फोटो काढून वेळ घालवायला सुरुवात केली. हरवलेला स्वर्ग (लॉस्ट हेवन) प्रथमदर्शनी छाप पडावा असाच आहे.
सजावट करण्यात काही कमी सोडली नव्हती... सगळीकडे खर्या फुलांची नयनमनोहर आरास होती... स्वागतकक्षात असे असणे स्वाभाविक होते...
.
पण हात धुण्याच्या बेसिनच्या रचनेत फुलांकरिता खास जागा होती...
खुर्च्या टेबले आणि रेस्तरॉचे अंतरंग फर्निचर आणि कलाकुसर तिबेटी ढंगातली होती...
.
जेवण तिबेटी पद्धतीचे आणि अर्थातच उत्तम होते. 'हरवलेला स्वर्ग' शियानमधल्या सहप्रवाशांनी केलेल्या स्तुतीला पात्र होता. तृप्त होऊन आणि रिसेप्शनमधल्या ललनेला माफ करून (अजून करणार तरी काय म्हणा +D) परत हॉटेलवर आलो. दिवसभराच्या घोळांनी थकवा तर आला होताच पण उद्या सकाळी ७.१५ चे विमान पकडायचे होते म्हणून लवकरच झोपी गेलो.
===================================================================
शांघाई विमानतळ मोठा आहे आणि देशोदेशींच्या विमानांची गर्दी झाली होती असे सांगितले तर त्यात नवीनं काहीच नाही. पण एक गोष्ट जी सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही ती दिसली म्हणून कॅमेर्याने टिपली.... शांघाईचा पुडाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ अगदी समुद्रकिनार्याला लागून आहे आणि विमानतळावर उभ्या विमानांना पाण्यातल्या जहाजांची पार्श्वभूमी लाभली होती !
शांघाईला शेवटचा रामराम करून विमानाने आकाशात भरारी घेतली आणि अचानक आठवण झाली की अरे आज चोविसावा दिवस ! नवनवीन मनोहर नजारे पहाता पहाता तेवीस दिवस कसे भुर्रकन उडून गेले. आता परत चाललोय याचे नाही म्हटले तरी थोडेसे दु:ख झाले नसते तरच आश्चर्य होते !
जागा अर्थातच खिडकीजवळची होती ! पण वरूणराजाने ढगांची एवढी पखरण करून ठेवली होती की विमान हवेतून न उडता दुधसागरातून तरंगत चालले आहे असेच वाटत होते. ब्रह्मदेशावरून जाताना जरासा ढगांचा पडदा दूर झाला आणि हिमालयाच्या सरळसोट उत्तर-दक्षिण पर्वतरांगांचे दर्शन झाले. या भागात पर्वतांची उंची कमी असल्याने आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने ते हिरवेगार दिसत होते.
परत भारतावरून जाताना बदमाश ढगांनी मातृभूमीचे दर्शन होऊ दिले नाही :(. काही वेळाने ओळखीचा भूभाग दिसला... चला दुबई आली.
दुबईत चार तास थांबून पुढचे विमान पकडायचे होते. पण दुबईच्या टर्मिनल-३ मध्ये चार तास घालवणे तसे फारसे कठीण नाही. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत रमत गमत एकदोन फेर्या मारून आणि ड्यूटी फ्री शॉपिंग एरियात (काहीही खरेदी न करता) विंडो शॉपिंग करत तीन चार तास सहज जातात. दुबई हा खाडी देशांतील सर्वात महत्त्वाचा एअर हब असल्याने हे अनेकदा (नाईलाजाने) करावे लागलेले आहे. दुबईचे टर्मिनल-३ मात्र खूप छान बनवलेले आहे.
.
विमानाने दुबईची जमीन सोडून आकाशात भरारी घेतली तेव्हा पहिल्यांदा दुबईचं हे विहंगम दृश्य दिसलं...
...आणि थोड्याच वेळात संघ्याकाळच्या धूसर प्रकाशात दुबईच्या आकाशरेखेचं दर्शन झालं... जगातील सर्वात उंच इमारत "बुर्ज खलिफा" ने इतर ७०-८० मजली इमारतींना एकदम खुजे करून सोडलं होतं !
विमानाने खाडीवर भरारी घेतली आणि मानवनिर्मित पाम बेटे मागे जाऊ लागली...
आता एक लांबलचक स्वप्नसफर संपून उद्यापासून रोजची घावपळ सुरू होणार हे नाईलाजानं मान्य करावंच लागलं :(
(समाप्त)
http://www.misalpav.com/node/23759