Saturday, July 9, 2022

चीनची मराठी माहिती

   चीन :
      चीनचे प्रजासत्ताक अथवा ‘चुंग-ह्‌वा-जन्-मिन्-कुंग-हो-क्वॉ ’. आशिया खंडातील सर्वांत मोठा व प्राचीन देश. क्षेत्रफळ (तैवान सोडून) सु. ९५,६१,००० (१९६७) चौ. किमी. लोकसंख्या ७८,६०,५८,००० (१९७२ संयुक्त राष्ट्रे अंदाज). चीनचा पूर्वपश्चिम विस्तार सु. ७३° पू. ते १३५° पू. सु. ४,८०० किमी. व दक्षिणोत्तर विस्तार सु. १८° २०′ उ. ते ५३° ५२′ उ. सु. ४,००० किमी. आहे. चीनच्या मँचुरिया, इनर मंगोलिया, सिंक्यांग-ऊईगुर, तैवान व तिबेट या विभागांस मिळून बाह्य चीन किंवा महाचीन व बाकीच्या प्रदेशास मुख्य चीन असे संबोधण्याची परंपरा आहे. राजकीय दृष्ट्या तैवान-व्यतिरिक्त सर्व विभाग चिनी प्रजासत्ताकात समाविष्ट आहेत. तथापि तैवान आपलाच एक भाग असल्याचे चीन मानतो. १९४९ पासून तैवान हा चीनपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
      चीनच्या उत्तरेस मंगोलिया प्रजासत्ताक व रशिया, ईशान्येस रशिया व उत्तर कोरिया, पूर्वेस पीत व पूर्व चिनी समुद्र, दक्षिणेस दक्षिण चिनी समुद्र, उत्तर व्हिएटनाम, लाओस, ब्रह्मदेश, भारत, भूतान, नेपाळ आणि पश्चिमेस भारत, अफगाणिस्तान व रशिया हे देश आहेत. चीनचे समुद्र आणि पश्चिम पॅसिफिक यांदरम्यान कूरील, जपान, रिऊक्यू, तैवान, फिलिपीन्स या बेटांची रांग आहे.
        देशाची भूरचना, प्राकृतिक स्वरूप व हवामान यांतील विविधता, विशिष्ट प्रकारचे सांस्कृतिक जीवन व अनेक बाबतीत शेजारच्या देशांपेक्षा दिसून येणारे वेगळेपण, यांमुळे चीन हे एक उपखंडच आहे असे यथार्थतेने म्हणता येते.
हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना म्हणूनही ओळखला जातो. चीन जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, ज्याने अवघ्या 30 वर्षात चीनचे रूपांतर केले. चीनच्या लोकांच्या मेहनतीने आज चीन जगातील एक बळकट अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो.
 






 
देश    चीन (China)
राजधानी    बीजिंग (Beijing)
सर्वात मोठे शहर    शांघाय (Shanghai)
अधिकृत भाषा    चिनी
लोकसंख्या    139.77 करोड (2019)
क्षेत्रफळ    9.597 मिलियन वर्ग किलोमीटर
राष्ट्रीय चलन    रेन्मिन्बी (CNY))
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक    +86
प्रजासत्ताक दिन    1 ऑक्टोबर 1949

चीन देशाविषयी रोचक तथ्य 

1.भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. गेल्या एक दशकात चीनचा आर्थिक विकास USA पेक्षा ७ टक्क्यांनी वाढला आहे. जर आपण विकासाबद्दल बोललो तर सर्वांच्या मनात अमेरिकेचं नाव येतं. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये चीनने अमेरिकेपेक्षा सात टक्के जास्त विकास केला आहे.चीन आशिया महाद्वीप मधील सर्वात मोठा देश आहे.  आणि चीनच्या सीमेला भारत, अफगाणिस्तान, भूतान, कझाकस्तान, बर्मा, उत्तर कोरिया, पाकिस्तान, किर्गिस्तान, मंगोलिया, नेपाल, ताजिकिस्तान आणि व्हिएतनाम हे देश आहेत.
2. जागतिक स्तरावर 85% कृत्रिम ख्रिसमस ट्री आणि 80 टक्के खेळणी चीन मध्ये बनवली जातात.
3. चीनी लोक प्रत्येक सेकंदाला 50,000 सिगारेट पितात. चीन जगातील सर्वात जास्त प्रदूषित देश आहे.  चीनमध्ये एअर पोल्युशन च्या कारणामुळे दररोज चार हजार लोकांचा मृत्यू होतो. चीनच्या बिजिंग शहरात इतकं पोल्युशन आहे की श्वास घेतल्यानंतर होणार नुकसान हे एकवीस सिग्रेट पिण्याच्या नुकसाना बरोबर आहे.
4. जगभरात अंडी पाण्यात उकळली जातात तर चीनमध्ये अंडी हि मुलांच्या मूत्रामध्ये उकळली जातात.
5. जगातील सर्वात जुना कागदाचा तुकडा चीन मध्ये आढळतो हा इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातला आहे. हा कागदाचा तुकडा खूप मजबूत आहे आणि याचा उपयोग कपडे तयार करण्यासाठी सुद्धा केला जायचा.
6. चीन मध्ये 3000 बीसी पूर्व पासून रेशीम निर्मिती करण्यात येत आहे. रोमन लोकांनी चीन चे नाव ‘सैरिका’ ठेवले होते म्हणजे “रेशीमच्या देशात’. चीनी लोकांनी रेशीमच्या किड्यांपासून रेशीम बनवण्याची कृती सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आणि ह्या पद्धतीने जो कोणी रेशीम तयार करेल त्याला ठार मारण्यात यायचे.
7 चीनच्या “एक मूल” धोरणामुळे मुलींच्या संख्येत खूप कमतरता आली आहे. चीन मध्ये मुले हि मुलींपेक्षा ३ कोटी २० लाखनी जास्त असून भविष्यात अनेक मुलांना लग्नासाठी मुली भेटणार नाहीत.

8. चीन मध्ये स्वादिष्ट खाद्य म्हणून दरवर्षी ४० लाख मांजरी खाल्ल्या जातात.सर्व देशांचे आपलं असं एक स्वादिष्ट जेवण असतं.  कोणता देश पिझ्झा खातो तर कोणता बर्गर खातो, कोणता देश चिकन खातो. परंतु चीन मधील लोक स्वादिष्ट जेवन म्हणून काही वेगळेच खातात. चीनमधील लोक स्वादिष्ट जेवण म्हणून दरवर्षी चाळीस लाखापेक्षा जास्त मांजर खातात. अजीब आहे ना.
9. द वर्ल्ड हे सर्वात मोठे शॉपिंग मॉल चीन मध्ये असून 2005 पर्यंत ते 99 टक्के रिक्त होते.
10. 2030 मध्ये चीनच्या शहरांची लोकसंख्या इतकी असेल की जगातील तिसरा सर्वात मोठा लोकसंख्येचा देश अमेरिकाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक असेल.जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीनचा हिस्सा पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त आहे. सध्या चीनची लोकसंख्या 1.42 अरब आहे. पूर्ण जगाच्या लोकसंख्येमध्ये चीनचा हिस्सा 18.4 टक्के आहे. त्यानंतर भारत 17.7% सह दुसऱ्या नंबर वर आहे. चीन मधील लोकांची सरासरी आयुर्मर्यादा ही 38 वर्ष आहे.
जरी अमेरिकेची नॅशनल लैंग्वेज इंग्लिश असली तरीही चीनमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त इंग्लिश मध्ये बोलली जाते.
11. इटली मध्ये ख्रिश्चन धर्माचा जन्म झाला होता. पण चीन मध्ये 5 करोड, 40 दशलक्ष ख्रिस्ती राहतात.आणि इटलीमध्ये फक्त 4 करोड 74 दशलक्ष ख्रिस्ती लोक राहतात.
12. चीनमध्ये श्रीमंत लोक स्वतः ऐवजी दुसऱ्यांना तुरुंगात पाठवू शकतात.चीनमधील एखाद्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागले असेल तर तो व्यक्ती आपल्या जागी दुसऱ्या कोणाला तरी पैसे देउन तुरुंगात पाठवू शकतो. आणि जर तुरूंगात जाणारा व्यक्ती टेक्नोलॉजी बद्दल जाणत असेल तर त्याने कोणत्याही वस्तूची निर्मिती केली तर त्याची शिक्षा कमी होऊ शकते.
13. चीन येथे सर्वाधिक जुळी मुले जन्माला येतात.
14. जर आपण चीन आणि उर्वरित जगास वेगळे मानून मूल्यमापन केले तर जगात जितक्या लोकांना मृत्यूची शिक्षा दिली जाते त्यापेक्षा ३ टक्के अधिक लोकांना चीन मध्ये मृत्यूची शिक्षा दिली जाते. चीनच्या आर्मी ट्रेनिंग मध्ये आपल्या युनिफॉर्मच्या कॉलर वर पिन लावली जाते. जेणेकरून लोक आपली मान खाली करू नये. नजर चुकीने सुद्धा आराम करण्यासाठी मान खाली घेतली तर पिन मानेला टोचेल.
15. चीन मध्ये आत्महत्येच्या इतक्या घटना आहेत की नदीतुन मृत शरीर काढण्याची सुद्धा नोकरी तुम्हाला मिळू शकते.
16. चीनची भाषा चीनी हि जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून इंग्रजी हि दुसरा क्रमांकावर आणि आपली हिंदी हि तिसऱ्या क्रमांकावर आहे.
17. 2008 मध्ये चीन हा असा तिसरा देश बनला ज्याने यशस्वीरित्या मनुष्यास अंतरिक्षामध्ये पाठवले. प्रथम रशियाने पाठविले होते आणि नंतर अमेरिकाने. 27 सप्टेंबर, 2008 मध्ये झई झीगांग(Zhai Zhigang) हे पहिले चिनी अंतराळवीर बनले ज्यांनी अंतराळात प्रवेश केला. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची पायरसी करण्यामध्ये चीन जगातील पहिल्या नंबरचा देश आहे. चीनमध्ये जवळजवळ 78% कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पायरेटेड होतात.

18. चीनची भिंत हि मानवाद्वारे बनवलेली सर्वात मोठी कलाकृती असून हि अंतराळातून सुद्धा दिसते. त्याची लांबी 8,848 किलोमीटर आहे.
19. जगातील प्रत्येक पाचवा मनुष्य चिनी आहे.चीनमध्ये दर 30 सेकंदाला एक लहान मूल जन्माला येत.
20. टॉयलेट कागदाचा शोध इसवी सन १३०० मध्ये चीन मध्ये लागला. पण ते फक्त राज घराण्यातील लोकांद्वारे वापरले जायचे.
21. चीनमध्येच कागद, दिशासूचक यंत्र, बंदुकीच्या दारूचा शोध लागला.जगातील सर्वात जुना कागदाचा तुकडा चीन मध्ये आहे.
22. 3,000 वर्षे पूर्वी चिनी लोकांनी पतंगाचा शोध लावला. ते याचा वापर युद्धात शत्रूला घाबरवण्यासाठी करायचे तसेच मनोरंजनासाठी सुद्धा याचा उपयोग केला जायचा.
23. चीनमध्ये, वर्ष 2009 पासून फेसबुक आणि ट्विटर वर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आणि येथील लोक google सुद्धा वापरत नाही, चीनचा स्वतःचा search engine आहे ज्याचे नाव आहे Baidu. चीन मधून शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या दहा विद्यार्थ्यांमधील सात विद्यार्थी हे चीनला कधीच परत येत नाहीत. म्हणजेच ते दुसऱ्या देशाचे स्थायिक होतात.
24. अनेक इतिहासकारांचे असे म्हणणे आहे कि फुटबॉलचा शोध 1000 पूर्व मध्ये चीन मध्ये लागला होता.
25. चीनमध्ये सर्वात जास्त लोकांचा आवडता छंद तिकिट गोळा करणे हाच आहे.
26. इसवी सन 103 मध्ये जेहन हॅन्ग या खगोलशास्त्रज्ञाने एक अश्या यंत्राचा शोध लावला ज्याने भूकंपाचे मूल्यमापन करता येत होते.
27. चीनच्या लोकांनीच आईस-क्रीम आणि नूडल्स सारख्या अनेक पक्वानांचा शोध लावला.
28. चीन मधील एक सरकारी कर्मचारी सु गीत यांनी इ.स. 1088 ते 1092 मध्ये प्रथम एक घड्याळ तयार केले जे वेळेसह ताऱ्यांची स्थिती सुद्धा सांगत असे.

29. चीन मध्ये प्राकृतिक गॅसचा वापर इसवी सनाच्या ४ शतक आधीपासून उष्णतेच्या स्रोतासाठी केला जायचा.
30 दुसऱ्या शतकाच्या पूर्वीपासून चिनी लोकांना हे माहिती होते कि मानवी शरीरात रक्त हे सारखे फिरत असते. हि गोष्ट युरोप मध्ये १७व्या शतकापर्यंत माहिती नव्हती. युरोप मध्ये विल्यम हार्वे यांनी (1578-1657) ह्या रक्ताच्या चक्राचा शोध लावला.
31. धनुष्य बाणाच्या शोध सुद्धा चीन मध्ये सर्वात आधी लागला होता.

32. चीनच्या शांघाय शहरामध्ये लाल रंगाची कार वापरणे कायद्यांच्या विरुद्ध आहे.
३३.पूर्ण जगामध्ये जितके डुक्कर आहेत त्यातील अर्धे डुक्कर हे फक्त चीन मध्ये आहेत.
३४.  2010 मध्ये चीनच्या संघाई शहरात शंभर किलोमीटर लांब ट्रॅफिक जाम झालं होतं. ज्याला क्लियर करण्यासाठी जवळजवळ बारा दिवस लागले होते.
आहोत. China information in Marathiचीन 
भूशास्त्रीय रचना : 
      चीनमधील भूमिस्वरूपे, पश्चिमेकडील तिबेटिया, उत्तरेकडील गोबिया आणि पूर्वेकडील कॅथेशिया या अतिप्राचीन प्रस्तर ढालींवर आधारलेली आहेत. ढाली रूपांतरीत प्रस्तरांच्या बनलेल्या असून त्या अतिशय मजबूत, अनम्य आणि अचल आहेत. या प्रस्तर ढालींचा बराचसा भाग नव्याने तयार झालेल्या खडकांखाली आज झाकलेला आढळतो. या भागातील समुद्रसपाटी जेव्हा जेव्हा वाढली, तेव्हा तेव्हा समुद्राचे पाणी वर निर्देशिलेल्या प्रस्तर ढालींच्या सखल भागांत पसरून तेथे चुनखडक, वाळूचे खडक, शैल इ. स्तरित खडकांची रचना झाली. मात्र पाणी ओसरून गेल्यावर नवीन स्तरित खडक जमिनीच्या पृष्ठभागावर दिसू लागले. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून दलदल तयार झाली अशा भागांत विशेषतः उत्तेरस, जंगले वाढीस लागली आणि त्यांवर कार्बोनिफेरस काळात समुद्राचे पाणी पुन्हा पसरल्यावर नविन स्तरित खडकांची मांडणी होऊ लागली. याच भागात पूर्वीची नैसर्गिक वनस्पती स्तरित खडकांखाली गाडली गेल्याने, दगडी कोळशाचे साठे तयार झाले. याप्रमाणे भूशास्त्रीय काळात अनेक वेळा चीनच्या प्राचीन प्रस्तर भूमीच्या सखल भागात सभोवतालच्या समुद्राचे पाणी शिरून पसरले आणि कालांतराने ओसरले. मात्र ते ओसरताना त्या ठिकाणी नवीन खडक मागे राहिले.

     मध्यजीव महाकल्पात चीनमध्ये मोठ्या गिरिजनक हालचाली झाल्या. त्यांना यिन शान हालचाली असे म्हणतात. त्यामुळे चीनच्या पूर्व भागातील स्तरित खडकांचे थर दुमडले जाऊन वली पर्वत तयार झाले. या वली पर्वतांतील भूचापांची अक्षीय दिशा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे आहे, म्हणजेच ते चीनच्या पूर्व किनाऱ्याशी समांतर आहेत. दोन भूचापांमध्ये त्यांना समांतर अशा भूद्रोणी तयार होऊन त्या सखल भागांत काही ठिकाणी आज मैदानी प्रदेश दिसून येतात. चीनच्या पूर्व भागात भूचाप व भूद्रोणी यांच्या लागोपाठ पाच रांगा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ समांतर गेलेल्या आढळतात. यांपैकी अतिपूर्वेकडील भूचापाचा अक्ष चीनच्या पूर्व किनाऱ्याच्या पट्टीवरील जजिआंग-फूक्येन पठारावरून ईशान्येस दक्षिण कोरियापर्यंत गेला आहे. याच भूचापाचा काही भाग खाली खचून त्या ठिकाणी पीत समुद्र तयार झालेला आहे. या भूचाप अक्षाच्या पश्चिमेस दुसऱ्या भूचापाचा अक्ष शँटुंग द्विपकल्पातून ईशान्येस लिआउनिंगपर्यंत गेलेला आहे. पूर्वेकडील भूचापांच्या दोन रांगांमध्ये भूद्रोणी तयार झाली असून त्यात यांगत्सीकिअँग (किअँग = नदी) व सिक्यांग नद्यांचे त्रिभुज प्रदेश व गान नदीचे खोरे बनले आहे. शँटुंगपासून लिआउनिगंपर्यंत पसरलेल्या या भूचापाचा अक्ष सलग नसून तो मध्येच खंडित झालेला आहे. याच भूचापाच्या पश्चिमेस आणखी तिसरा भूचाप पसरला असून त्याच्या अक्षाची दिशाही नैर्ऋत्येकडून ईशान्येकडेच गेलेली आहे. या भूचापाच्या प्रदेशांत जॉर्ज पर्वत, ताइ-हांग-शान (शान = पर्वत) आणि ग्रेट खिंगन पर्वत तयार झाले आहेत व त्यांच्या पूर्वेकडील भूद्रोणीमध्ये मँचुरियाचे मध्यवर्ती सखल मैदान, ह्‌वांग (हो) नदीचा त्रिभुज प्रदेश व यांगत्सी नदीचे मध्यवर्ती खोरे तयार झाले आहे.
      पूर्व चीनमधील पर्वतश्रेण्यांच्या व नद्यांच्या दिशांवर या गिरिजनक हालचालींचा परिणाम घडून आला आहे. लक्षावधी वर्षांच्या कालखंडात या ठिकाणच्या पर्वतांची झीज होऊन ते उंचीने लहान, कमी ओबडधोबड व काही भागांत पठाराच्या स्वरूपात आज दिसून येतात.
      तृतीयक महाकल्पाच्या प्रारंभी चीनच्या अंतर्भागात पुन्हा गिरिजनक हालचाली होऊन गोबिया व तिबेटिया यांच्या दरम्यान पसरलेले स्तरित खडकांचे थर दुमडले गेले व त्यामुळे त्या भागात वली पर्वत तयार झाले. या भागातील पर्वतश्रेण्यांची दिशा मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. दक्षिण चिनी समुद्रापासून ते उत्तरेस सायबीरियाच्या सरहद्दीपर्यंत (१) दक्षिणेकडील नानलिंग (नानशान) पर्वत (२) त्याच्या उत्तरेकडील, ह्‌वांग हो आणि यांगत्सीकिअँग यांच्या खोऱ्यांदरम्यानची, कुनलुनची शाखा चिनलिंग पर्वतश्रेणी (३) तिच्या उत्तरेस व गोबी वाळवंटाच्या दक्षिणेस इनर मंगोलियातून गेलेली डाचेंग आणि यिन शान पर्वतश्रेणी (४) या श्रेणीला समांतर पण गोबी वाळवटांच्या उत्तरेला टॅन-उ-ओला, खांगाई आणि गेंटे पर्वतश्रेण्या या चार पर्वतश्रेण्या पूर्व-पश्चिम पसरल्या आहेत.
      चीनमधील सर्वाधिक गुंतागुंतीच्या पर्वतश्रेण्या तिबेटच्या चारी बाजूंस निर्माण झालेल्या आहेत. तिबेटच्या दक्षिणेस हिमालय पर्वत व उत्तरेस कुनलुन आणि तिएनशान असे मोठमोठाले पर्वत तयार झाले आहेत. त्याची सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. तिबेटच्या पूर्वेकडील पर्वतरांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या असून त्या सेचवान प्रांतापर्यंत दक्षिणेस गेल्या आहेत. चीनच्या अंतर्भागात पर्वत निर्मितीच्या हालचाली अजूनही चालू आहेत, हे कान्सू प्रांतात (इ.स. १९२० व १९२७) व शेन्सी प्रांताच्या मध्यभागात (इ.स. १५५६) झालेल्या मोठ्या भूकंपांवरून सहज लक्षात येते.

भूरचना :

       (१) मुख्य चीनच्या पश्चिम भागात सेचवान आणि युनान या प्रांतांच्या पश्चिम सरहद्दीवर ४,५०० मी. पेक्षाही अधिक उंचीच्या पर्वतश्रेण्या आहेत. या सर्व श्रेण्या मिन्या कांग्वा येथे एकमेकींशी येऊन मिळतात. या ठिकाणी पर्वतश्रेण्यांची उंची ७,५९० मी. वर गेलेली आढळते. या पर्वतप्रदेशास सेचवानी आल्प्स असे म्हणतात. या पर्वतप्रदेशातून पूर्वेकडे काही पर्वतांच्या रांगा व पठारे पसरली आहेत. चिनलिंग पर्वताची श्रेणी यांपैकीच एक होय.
      (२) मुख्य चीनच्या पूर्व भागात, समुद्र किनाऱ्यास लागून, उंचवट्याचे प्रदेश आहेत. हाँगकाँगपासून उत्तरेस सीखोटे आलीन पर्वतापर्यंत (रशियाच्या वर्चस्वाखालील व मँचुरियाच्या पूर्वेकडील पर्वतश्रेण्या) हे उंचवट्याचे प्रदेश पसरले असून ते अतिप्राचीन ‘कॅथेशिया’ या प्रस्तर ढालीचे अवशेष आहेत. हे अवशेष सलग नाहीत. ते जजिआंगफूक्येन येथील उंचवट्याचे प्रदेश या सदरात मोडतात. दीर्घकाळ झीज झाल्यामुळे यांची उंचीही फारशी नाही. उदा., शँटुंग द्वीपकल्पातील पवित्र ताइशान या पर्वताच्या सर्वांत उंच शिखराची उंची फक्त १,५०० मी. आहे.
       (३) वरील (१) व (२) यांच्या दरम्यान अनेक सखल प्रदेश आहेत. त्यांत उत्तर चीनचे मोठे मैदान, यांगत्सीकिअँग नदीच्या खोऱ्यातील मध्यवर्ती मैदान, सिक्यांग आणि गान नद्यांच्या खोऱ्याचा समावेश होतो.
बाह्य चीनमध्ये तिबेट, सिक्यांग-ऊईगुर, इनर मंगोलिया व मँचुरिया यांचा समावेश होतो. चारी बाजूंनी पर्वतश्रेण्यांनी वेढलेला तिबेट हा पठारी प्रदेश आहे.
     (अ) तिबेटच्या पश्चिमेस पामीरचे पठार आहे. तेथून पर्वतश्रेण्या चारी बाजूंस पसरल्या आहेत. त्यांत २,४०० किमी. लांब पसरलेल्या हिमालयाची गणना होते.
 (आ) दक्षिण तिबेटचा प्रदेश अनेक पर्वत-दऱ्या मिळून झाला आहे. दक्षिणेस त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदी व तिच्या उत्तरेस नीएन चेन टांगला पर्वतश्रेणी आहे. या पर्वतश्रेणीच्या उत्तरेस ४,८०० मी. उंचीचा वाळवंटी व पर्वतीय प्रदेश लागतो. अनेक खाऱ्या व गोड्या पाण्याची सरोवरे या भागात आहेत.
 (इ) उत्तर तिबेटचा प्रदेश कुनलुन व त्याच्या उत्तरेला आस्तिन ता या दोन पर्वतश्रेण्यांनी बनलेला आहे. दोन्ही पर्वतश्रेण्यांत ६,००० मी. पेक्षा अधिक उंचीची शिखरे आहेत. या दोन पर्वतश्रेण्यांच्या दरम्यान त्साइदाम (२,७४३ मी. उंचीवर) व कोकोनॉर (३,१५० मी. उंचीवर) या नावांचे सखल प्रदेश आहेत. कोकोनॉर हे तिबेटमधील सर्वांत मोठे सरोवर होय.
  (ई) पूर्व तिबेटमध्ये (९५° पू.च्या पूर्वेस) वायव्येकडून आग्नेयीस उंच पर्वतश्रेण्या पसरलेल्या असून नद्यांनी त्या श्रेण्यांना समांतर अशा खोल घळ्या तयार केल्या आहेत. ह्‌वांग, यांगत्सी, मेकाँग व सॅल्वीन नद्या याच भागातून वाहतात. याच प्रदेशातील अतिपूर्वेकडच्या पर्वतश्रेणीला सेचवानी आल्प्स असे म्हणतात.
   पामीरमधून निघालेली तिएनशान पर्वतश्रेणी मध्य आशियातून चीनच्या सिंक्यांग-ऊईगुर प्रदेशात येते. या प्रदेशात तिची लांबी १,६०० किमी. भरेल. ६००० मी. पेक्षाही अधिक उंचीची शिखरे या पर्वतावर आहेत. या पर्वतश्रेणीच्या दक्षिणेस तारीम आणि उत्तरेस झुंगेरियाचा सखल प्रदेश आहे.
     चीनच्या वायव्य दिशेस मंगोलिया-सिंक्यांगचा उंचवट्याचा प्रदेश लागतो. त्यातील सखल भागात मरुप्रदेश तयार झाले आहेत. त्यांपैकीच एक गोबीचे वाळवंट होय. त्याची दक्षिण कडाच फक्त चीनमधून जाते. ह्‌वांग हो नदीने तयार केलेल्या वळणाच्या प्रदेशात ऑर्‌डॉसचा मैदानी प्रदेश आहे. अल्ताई आणि तिएनशान पर्वतांमध्ये झुंगेरियाचा मैदानी प्रदेश आहे. मंगोलियातून या मार्गाने रशियाच्या वर्चस्वाखालील मध्य आशियात जाता येते. तिएनशान आणि आस्तीन ता या पर्वतश्रेण्यांदरम्यान ताक्लामाकान नावाचा वाळवंटी प्रदेश लागतो. आशियातील सर्वांत रुक्ष व ओसाड असा हा प्रदेश होय. याच्या उत्तरेस तारीमचे खोरे असून ईशान्येस तुर्फान नावाचा खोलगट प्रदेश आहे. त्याची पातळी काही भागांत समुद्रसपाटीखाली १३० मी. आहे.

      चीनच्या उत्तरेस मंगोलियाच्या सरहद्दीवर उंचवट्याचा प्रदेश चंद्रकोरीसारखा पसरला आहे. या प्रदेशाची उंची पश्चिमेला फारच कमी व पूर्वेस वाढत गेली आहे. या प्रदेशाच्या उंच भागालाच ग्रेट खिंगन (शिंगान) पर्वत म्हणतात. ह्‌वांग हो नदीच्या पश्चिमेस ३,००० मी. उंचीचा आलशान पर्वत आहे. मंगोलियाच्या सरहद्दीवर उंचवट्याच्या प्रदेशाचा बराचसा भाग लोएस मातीच्या टेकड्यांनी बनलेला आहे. ऑर्‌डॉस मैदानातून येथे वाहून आणलेल्या बारीक वाळू-कणांमुळे या टेकड्या तयार झाल्या आहेत. या लोएस टेकड्यांमधील काही मैदानी भाग नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेला आहे.
       मँचुरियाचा मध्यवर्ती भाग मैदानी असून त्याच्या सभोवती पर्वतांच्या रांगा व उंचवट्यांचे प्रदेश आहेत. मात्र या उंचवट्याच्या प्रदेशातील काही भाग सखल असल्याने त्या मार्गांनी मँचुरियातून पश्चिमेस मंगोलियास, उत्तरेस सुंगारी नदीच्या खोऱ्यातून सायबीरियास व दक्षिणेस किनारपट्टीच्या सखल मैदानातून ह्‌वांग हो नदीच्या मैदानी प्रदेशास जाता येते. मँचुरियाच्या या मध्यवर्ती मैदानाच्या उत्तर भागातून सुंगारी नदी वाहते व दक्षिण भागातून लिआओ हो नदी वाहते.
     उत्तर चीनमधील व मँचुरियामधील प्राचीन कठीण खडक ह्‌वांग होच्या मध्य खोऱ्यातील लोएस प्रदेश तिएनशान, कुनलुन व हिमालय यांसारखे उत्तुंग अर्वाचीन पर्वत तुर्फानसारखा जगातील अत्यंत खोलगट प्रदेशांपैकी एक प्रदेश ग्वांगसे व ग्वेजोसारखे कार्स्ट प्रदेश ह्‌वांग हो व यांगत्सीसारख्या जगप्रसिद्ध नद्या व त्यांच्या खालच्या टप्प्यांतील पुराखाली जाणारे विस्तीर्ण जलोढ प्रदेश तिबेटसारखे उंच पठार आणि सिक्यांगसारखा विस्तीर्ण मरुप्रदेश अशी विलक्षण विविधता चीनच्या भूप्रदेशात आढळून येते.

नद्या, सरोवरे, किनारा : -

    चीनमधील सर्व मोठ्या नद्या पूर्वेस पॅसिफिक महासागरास मिळतात. मात्र मंगोलिया, सिंक्यांग आणि तिबेट या भागांतील सु. २·५ लक्ष चौ. किमी. क्षेत्र अंतर्गत जलोत्सारणाचे आहे.
   मँचुरियाच्या उत्तर आणि पूर्व सरहद्दींवरून अमूर व तिची उपनदी उसुरी या वाहतात. अमूर ४,३२० किमी. लांब असून तिला चिनी प्रदेशातून सुंगारी येऊन मिळते. या तिन्ही नद्या जलवाहतुकीस उपयुक्त आहेत. दक्षिण मँचुरियात लिआओ हो ही नदी वाहते.
   उत्तर चीनमधील सर्वांत महत्त्वाची नदी ह्‌वांग हो ही होय. तिची एकूण लांबी ४,६४० किमी. असून तिला फेन हो आणि वे हो (वे श्वे) या महत्त्वाच्या उपनद्या मिळतात. नदीच्या त्रिभुज प्रदेशात जमिनीच्या उताराचे प्रमाण प्रत्येक किमी. अंतरास १५ सेंमी. इतके कमी असल्याने तो प्रदेश अतिसपाट बनला आहे. त्यामुळे नदीबरोबर आलेला गाळ या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पसरतो. त्याचा परिणाम पुष्कळ वेळा नदीचा मार्ग बदलण्यात होतो व त्यामुळे खूप नुकसान होते म्हणून तिला ‘अश्रूंची नदी’ हे नाव मिळाले आहे.

 

    यांगत्सीकिअँग नदीची लांबी ५,४८८ किमी. असून लांबीच्या दृष्टीने तिचा जगात सहावा क्रम लागतो. मुखापासून ९३६ किमी. हांगजोपर्यंत मोठ्या जहाजांस व द्रुतवाहांचे वरील बाजूस लहान जहाजांस ती वाहतुकीस उपयुक्त आहे. यालुंग, मिन, जीआलिंग, हान या उत्तरेकडील व शीआंग आणि गान या तिच्या दक्षिणेकडील प्रमुख उपनद्या होत. शेवटच्या दोन तुंगतिंग आणि पोयांग या सरोवरातून वाहत जाऊन यांगत्सी नदीला मिळतात. त्यामुळे तिच्या पुराचे जादा पाणी पूरकाळात आपोआपच या सरोवरात साठवले जाते व पूरधोका टळतो. सिक्यांग ही दक्षिण चीनमधील नदी होय. ती हाँगकाँगच्या पश्चिमेस चिनी समुद्राला मिळते. ती वूजोपर्यंत मोठ्या जहाजांस व त्यापुढे लहान जहाजांस उपयोगी आहे.
 



     आग्नेय मध्य भागात तुंगतिंग व पोयांग, पूर्व भागात ताई व हुंगत्से, चिंगहाई किंवा कोकोनॉर, लॉपनॉर ही तिबेट आणि सिक्यांग-ऊईगुरमधील अनेक लहानमोठी सरोवरे चीनमध्ये आहेत. चीनला एकूण ११,००० किमी. लांबीचा समुद्रकिनारा प्राप्त झाला असून त्या जवळपास लहान मोठी ३,४०० बेटे आहेत. 

 हवामान :

      या देशात सामान्यतः मोसमी हवामान आढळते. मात्र देशाचा विस्तार फार मोठा असल्याने या हवामानाचे स्वरूप सर्वत्र अगदी सारखे नाही. चीनचा बराचसा प्रदेश कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे समशीतोष्ण मोसमी हवामान आढळते, तर कर्कवृत्ताच्या दक्षिणेस (दक्षिण चीनमध्ये) उष्ण मोसमी हवामान असते.
    हिवाळ्यात (नोव्हेंबर ते मार्च) या देशात खंडांतर्गत प्रदेशाकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर दिसून येतो. या वेळी आशिया खंडाच्या अंतर्भागात प्रत्यावर्ते निर्माण होतात व ती पूर्वेकडे आणि आग्नेयीकडे सरकू लागतात. या प्रत्यावर्ताबरोबर वाहणाऱ्या शीत वाऱ्याचा जोर फार मोठा असतो. गोबी वाळवंटावरून येताना ते धुळीचे लोट बरोबर आणतात. त्यामुळे दृश्यता कमी होऊन चिनी समुद्रावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हे वारे उत्तर चीनमध्ये वायव्येकडून वाहतात, तर मध्य चीन व दक्षिण चीनमध्ये त्यांच्या वाहण्याची दिशा अनुक्रमे उत्तरेकडून व ईशान्येकडून असते.
     हे शीत वारे जवळजवळ एकाच दिशेने सतत वाहत राहिल्याने चीनमधील तपमान बरेच घटते. तपमानातील हा बदल चिनलिंग पर्वताच्या उत्तरेस म्हणजे उत्तर चीन व मँचुरियात फार जाणवतो. या वेळी उत्तर चीनमध्ये तपमान ०° से. पेक्षा कमी असते व उत्तर मँचुरियात ते -१८° सें.असते. या भागात हिवाळा प्रदीर्घ व कडक असतो. कधी कधी नद्या व पोयांगसारखी सरोवरे आणि चिहली आखातातील समुद्राचे पाणीही गोठते. मँचुरियात बर्फही पडते. या ऋतूत दक्षिणेकडून उत्तरेकडे तपमान कमी कमी होत गेलेले आढळते. व अंतर्भागापेक्षा समुद्रकिनाऱ्याजवळ तपमान सौम्य असते. जानेवारी महिन्यात पूर्व किनाऱ्यावर पीकिंग ५·६° सें., शांघाय ३·३° सें. व हाँगकाँग (फेब्रुवारी) १४·५° सें. असे तपमान आढळते.
      चिनलिंग पर्वताच्या दक्षिणेस तपमान ०° सें. पेक्षा अधिक असते. कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना या पर्वताचा अडथळा होतो. तथापि असा अडथळा समुद्रकाठच्या मैदानी प्रदेशात नसल्याने तेथे उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांपासून संरक्षण मिळत नाही. यामुळे यांगत्सी नदीच्या खोऱ्यात जानेवारी महिन्यातील तपमान शांघाय (समुद्रकाठी ) ३·३° से., हांगजो (९३६ किमी. अंतरावर) ४·४° से. व चंगडू (रेड बेसीन) ६·७° से. आढळते.
        मार्च महिन्यानंतर आशियातील जास्त वायुभाराचे केंद्र हळूहळू नाहीसे होते. एप्रिल आणि मे महिन्यात वाऱ्यांचा वेग मंदावतो व त्यांची दिशाही बदलू लागते. अशा वेळी सेचवान क्षेत्रातून किंवा आणखी पश्चिमेकडून येणारी काही सौम्य आवर्ते यांगत्सी नदीच्या खोऱ्यात येतात व तेथे आणि दक्षिण चीनमध्ये पाऊस देतात. जून महिन्याच्या अखेरीस ही परिस्थिती पालटते.
     उन्हाळ्यात (जून ते सप्टेंबर) आशियाच्या अंतर्भागात कमी वायुभाराचे केंद्र निर्माण होते. या वेळी चीनच्या सर्व भागांत तपमान वाढते आणि सर्वत्र ते जवळजवळ सारखेच असते. उदा. जुलै महिन्यात पीकिंग २६° से., शांघाय २६·७° से. व हाँगकाँग २७·७°से.
     या वेळी चीनच्या दक्षिण व आग्नेय भागांकडून अंतर्भागांकडे वारे वाहू लागतात. हे वारे समुद्रावरून येत असल्याने दमट असतात व चीनला पाऊस देतात. या वाऱ्यांचा जोर हिवाळी वाऱ्यांइतका मोठा नसतो. शिवाय त्यांच्या वाहण्याच्या दिशाही हिवाळी वाऱ्यांइतकी स्थिर नसते, तरी पण चीनच्या फार मोठ्या भागात ते पाऊस देतात. त्याच्यामुळे मिळणाऱ्या पावसाचे प्रमाण सी नदीच्या त्रिभूज प्रदेशात सर्वांत जास्त, म्हणजे २०० सेंमी. असते. उत्तरेकडे व पश्चिमेकडे ते प्रमाण कमी होत जाते. यांगत्सी नदीच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण १०० सेंमी. ते २०० सेंमी. असते, उत्तर चीनमध्ये ते ६५ सेंमी. ते १०० सेंमी. आणि मँचुरियात ते ५० सेंमी. ते १०० सेंमी. पर्यंत आढळते. या वेळी पुष्कळ नद्यांना पूर येतात. उन्हाळ्याच्या अखेरीस पूर्व चिनी समुद्रावरून उष्ण कटिबंधीय वादळे (टायफून) कधी कधी चीनच्या आग्नेय भागात प्रवेश करतात व मुसळधार पाऊस देतात. या वादळांमुळे पुष्कळसे नुकसानही होते.
     इनर मंगोलियात आणि सिंक्यांगमध्ये उन्हाळा उष्ण व हिवाळा अतिथंड व दीर्घ असतो. पाऊस फारच थोडा पडतो. उंच पर्वतावर मात्र पावसाचे प्रमाण बरेच असते. समुद्रसपाटीपासून फार उंचावर असल्याने तिबेटमध्ये तपमान कमी असते. पाऊसही कमीच पडतो.

वनस्पती व प्राणी : -

 चीनमध्ये वनस्पतींच्या सु. २५,००० आणि जमिनीवरील पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सु. १,८०० जाती आढळतात. ईशान्येकडील अरण्यांत लार्च, फर, स्प्रूस, स्थानिक पाइन, बर्च, ॲस्पेन इ. सूचिपर्णी व रुंंदपर्णी वृक्ष आढळतात. या भागातील विशेष प्राणी म्हणजे चिनी मूस, रेनडिअर, हिमससा, आर्क्टिक खोकड, लेमिंग व मोठ्या शिंगांच्या विविध प्रकारच्या मेंढ्या होत. याच्या दक्षिणेस व चीनच्या उत्तर भागात ओक, मॅपल, लिंडेन, बर्च, एल्म, ॲश, अक्रोड, पाइन, जुनिपर, इ. वृक्ष आहेत व हरिण, अस्वल या बरोबरच सेबल, आर्मिन, मिंक, मार्टेन, खोकड, ऑटर इ. फरधारी प्राणी सापडतात. पीकिंगच्या उत्तरेस माकडेही आहेत. यांगत्सीच्या खोऱ्यात विपुल वनसंपत्ती आहे. गिंगो, विशिष्ट जातीचे पाइन, हॉर्सचेस्टनट, बीच, ॲश, मॅग्नोलिया, टुपेलो, ट्युलिप, ससाफ्रा या व अन्य वनस्पती आणि उपोष्ण कटिबंधीय अनेक प्राण्यांबरोबरच मोठा व छोटा पंडा हे विशिष्ट प्राणी आहेत. दक्षिण भागात सदाहरित ओक, पाइन व बांबू व मॅग्नोलिया, चहा, कापूर, विच्‌हॅझेल या वर्गातील वनस्पती आहेत. आर्द्र, सखल प्रदेशात वर्षावने आहेत. 




 
 
दक्षिण भागात माकडांच्या अनेक जाती, वाघ, चित्ता, रानटी हत्ती, मगरी, इ. प्राणी व मोरासारखे सुंदर पक्षी व इतर अनेक उष्ण कटिबंधीय पशुपक्षी आहेत. पश्चिम भागात विस्तीर्ण तृणप्रदेश असून तेथे पर्वतभागात स्प्रूस, लार्च, जुनिपर, बर्च, एल्म, पॉप्लर इ. वृक्ष मधूनमधून आढळतात. महोका, व हसणारा कस्तूर सर्व पर्वतप्रदेशात आहेत. तृणप्रदेशात उंदीर, कांगारू, घुशी, इ. बिलवासी प्राणी विपुल आहेत. खास चीनमध्येच फक्त आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे वल्ह्यासारखे पर असणारे मोठे मासे, मोठा सॅलॅमँडर, ॲलिगेटर, ताकिज हे होत. कार्पमासा व मार्जारमत्स्य मूळचे चीनमधीलच असावेत. सिंक्यांगच्या अल्ताई पर्वतभागात जगातील रानघोड्यांची एकमेव उरलेली जात आहे आणि तारीम खोऱ्यात रानटी उंटही आढळतात. मंगोलिया-सिक्यांग विभागात मरुप्रदेशीय विरळ वनस्पती व प्राणी दिसतात. या विभागात स्थलांतरी वालुकागिरी दिसतात.

खनिज संपत्ती : -

       चीनमध्ये विविध प्रकारची खनिजे आढळतात पण काही अपवाद सोडल्यास त्या खनिजांचे साठे लहान असून ते निरनिराळ्या भागांत विखुरलेले आहेत.
चीनमध्ये दगडी कोळसा विपुल प्रमाणात आढळतो. त्यापैकी ३/४ साठे शान्सी आणि शेन्सी या प्रांतांतच आहेत. दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी ३/४ साठे बिट्यूमिनस जातीच्या कोळशाचे व उरलेले अँथ्रासाइट जातीच्या कोळशाचे आहेत. पोलाद तयार करण्यास आवश्यक अशा कोकिंग जातीच्या कोळशाचा साठा अदमासे ५०० कोटी मेट्रिक टन आहे. अशा प्रकारच्या चांगल्या जातीचा कोळसा मँचुरिया आणि सेचवान प्रांतांत आढळतो.
      पोलाद तयार करण्यास आवश्यक ती खनिजे या देशात आढळतात. अशुद्ध लोखंडाचे एकूण साठे ५६० कोटी टनांइतके असून ते जवळजवळ सर्व प्रांतांतून विखुरलेले आहेत. त्यांपैकी काही कोकिंग जातीच्या कोळशाच्या साठ्याजवळ आढळतात. हे साठे मँचुरियात, तसेच हुपे प्रांतात डायेजवळ आहेत.
     पोलाद तयार करण्यात आवश्यक अशा इतर खनिजांचे उत्पादनही चीनमध्ये होते. उदा. दरवर्षी मँगॅनीजचे (मंगल) उत्पादन ३ कोटी टनांपर्यंत होते. अँटिमनीच्या जागतिक उत्पादनाच्या ७५% उत्पादन हूनान, युनान, ग्वांगटुंग, सेचवान आणि ग्वांगसे प्रांतांत होते. टंगस्टनही फार मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र निकेल आणि मॉलिब्डिनम धातूंचा साठा पुरेसा नाही.
      चीनच्या पश्चिमेस आणि नैर्ऋत्य भागात तांबे आढळते पण उत्पादन फारच कमी आहे. शँटुंग, मँचुरिया, कान्सू आणि युनान प्रांतांत बॉक्साइटचे साठे आहेत पण उत्पादन गरजेपेक्षा कमी आहे. तसेच सोने, चांदी, शिसे, जस्त, कोबाल्ट, कथील व पारा यांचे उत्पादनही फार थोडे आहे. खतासाठी लागणारे नायट्रेट, फॉस्फेट आणि पोटॅश इ. क्षार कमी प्रमाणात आढळतात.
     चीनला सर्वांत जास्त तुटवडा खनिज तेलाचा वाटतो. सिंक्यांग प्रांतात खनिज तेलाचे बरेच मोठे साठे आहेत, असे समजले जाते. अलीकडे मँचुरियाच्या मध्यवर्ती भागात खनिज तेलाचे साठे आढळले आहेत. खनिज तेलाचे वार्षिक उत्पादन देशाच्या गरजेच्या केवळ १/१० एवढेच आहे.

इतिहास :

     चीनच्या प्रागितिहासाविषयी उत्खननाद्वारे बरीच माहिती मिळते. सु. पाच लक्ष वर्षांपूर्वी त्याच्या उत्तर भागामध्ये मानवसदृश प्राणी राहत होते. मानवशास्त्रज्ञांनी त्यांना ‘सिनॅन्‌थ्रोपस’ म्हणजे ‘पीकिंग मानव’ हे नाव दिले. हे आदिमानव कुटुंबवत्सल असावेत असे तज्ञांचे म्हणणे आहे, मात्र ते गटागटाने राहत असल्याचे आढळत नाही. त्यांना पायावर ताठ उभे राहून चालता येत होते. दगड, हाडे, शिंगे इत्यादींपासून त्यांनी तयार केलेली आयुधे व अन्य वस्तू यांचे अवशेष चीनच्या निरनिराळ्या भागांत सापडतात. त्यांना अग्नीही प्रज्वलित करता येत असे. पूर्व आशियात असणाऱ्या मानवांत आढळणारी अनेक वैशिष्ट्ये यांच्यात स्पष्ट दिसत असल्याने आजच्या मंगोल (मंगोलियन) लोकांचे हे आद्यपूर्वज समजण्यास हरकत नाही.

      ह्यानंतर हजारो वर्षांनी पीकिंग मानवापेक्षा जास्त प्रगत मानव प्राणी उत्तर चीन, मंगोलिया, मँचुरिया, सायबीरिया, इ. प्रदेशांत राहू लागला. हा प्राणी गटागटाने नदीकाठी वस्ती करीत असे व कंदमुळे पाने व मासे खाऊन राही. भूपृष्ठावरील लोहातील लाल भुकटी तो रंगासाठी वापरी. मातीची ओबडधोबड भांडी त्याला करता येत. लाल, काळी आणि राखी रंगांची ही भांडी ज्या ठिकाणी सापडली आहेत, त्यांवरून या संस्कृतींना यांग-शाव, लुंग-शान अशी नावे दिली आहेत. दगडी पात्याचे फावडे हे शेतीचे अवजार तो वापरी. धनुष्यबाण हे त्याचे आत्मरक्षणाचे व आक्रमणाचे एकमेव शस्त्र होते. डुक्कर हा प्राणी त्याने माणसाळविला होता. कालांतराने कुत्रा व घोडा हे प्राणी तो पाळू लागला. तृणधान्ये, क्वचित गहू, तांदूळ यांसारखी पिके तो काढू लागला. शिकार व मच्छीमारी यांवरही त्याची उपजीविका अवलंबून असे. पोकळ पायाच्या तिपाईवर निरनिराळ्या आकारांची भांडी ठेऊन खालील विस्तवाने भांड्यांतील पदार्थ शिजविण्याची युक्ती त्याला माहीत झाली होती. झाडांच्या साली, जनावरांची कातडी इत्यादींची वस्त्रे तो वापरी. शिंपल्यांचे दागिनेही त्याला करता येत. विविध प्रकारच्या भांड्यांवर एक किंवा अनेक रंगात चित्रेही तो काढू लागला.

चिनी हस्तिदंती शिल्पे, १७ वे शतक
चिनी हस्तिदंती शिल्पे, १७ वे शतक
प्राचीन राडवाड्यातील हत्तीची शिल्पाकृती, पीकिंग (फॉरबिडन सिटी)
प्राचीन राडवाड्यातील हत्तीची शिल्पाकृती, पीकिंग (फॉरबिडन सिटी)
ली गार्डनमधील पॅगोडा, वूशी, जिआंनसू प्रात.
ली गार्डनमधील पॅगोडा, वूशी, जिआंनसू प्रात.
पीकिंगचे प्राचीन महाद्वार
पीकिंगचे प्राचीन महाद्वार
अश्मशवपेटिकेवरील चिनी ड्रॅगनचे शिल्पांकन, इ. स. २१२.
अश्मशवपेटिकेवरील चिनी ड्रॅगनचे शिल्पांकन, इ. स. २१२.
चीनची अजस्त्र भिंत
चीनची अजस्त्र भिंत

भातकापणीचे दृश्य शाऊशान.
भातकापणीचे दृश्य शाऊशान.
चहामळ्याचे दृश्य, हांगजो.
चहामळ्याचे दृश्य, हांगजो.
चुंगकिंग येथील आधुनिक क्रीडागार
चुंगकिंग येथील आधुनिक क्रीडागार
पोलाद कारखान्यातील एक दृश्य, शांघाय
पोलाद कारखान्यातील एक दृश्य, शांघाय
पारंपारिक वेषातील चीनी स्त्रिया
पारंपारिक वेषातील चीनी स्त्रिया
रेशीम गिरणीतील एक दृश्य, नानकिंग.
रेशीम गिरणीतील एक दृश्य, नानकिंग.
 

      आणखी काही शतकांत हल्लीच्या शॅंंटुंगपासून हूनान या प्रांतापर्यंत या मानवाच्या अनेक वसाहती स्थापन झाल्या. वसाहतींभोवती मातीचे तट बांधून हे लोक आत्मरक्षण करू लागले. शिकार व मच्छीमारीबरोबर डुक्कर, कुत्रा, शेळ्यामेंढ्या, घोडा, गाय इ. पशुसंवर्धनाची जोड त्याने शेतीला दिली. प्राण्यांच्या हाडांपासून चाकू, खुरपी, कोयता इ. हत्यारे व तऱ्हेतऱ्हेचे अलंकारही तो घडवू लागला. काळ्या रंगाची चमकदार भांडी व खेळणी करण्यात तर त्याने विशेष कौशल्य संपादन केले होते.



  प्राचीन काळ : -

     ऐतिहासिक आख्यायिकांप्रमाणे चिनी संस्कृतीचा आद्य संस्थापक फू सी, कृषिविद्येचा जनक शन-नूंग, प्रसिद्ध योद्धा व मुत्सद्दी सम्राट हुआंगती व रेशीम उत्पादिका लै ज ह्यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी चीनमधील लोकजीवन विविध प्रकारे समृद्ध केले. हुआंगतीनंतर कित्येक वर्षांनी सम्राट याव आणि त्याचा महामंत्री श्वुन यांनी राज्यकारभाराची घडी नीट बसविली व यू याने अनेक पाटबंधारे योजना कार्यान्वित केल्या. अशी आख्यायिका आहे. वरील घटना इ.स.पू. २३५६ ते २२०६ ह्या काळातील असाव्यात. त्यानंतर सु. पाचशे वर्षे म्हणजे इ.स.पू. २२०६ ते १७६६ -काहींच्या मते इ.स.पू. १९९४ ते १५२३ – स्या वंशाचे राज्य चीनच्या काही भागांवर होते. स्याकाळात अनेक नगरराज्ये अस्तित्वात होती. तत्कालीन लष्करप्रमुख रथ वापरीत, तसेच ब्रॉंंझची शस्त्रास्त्रे उपयोगात आणीत. शेती व रेशीम उत्पादनात या काळात पुष्कळ प्रगती झाली. लेखनकलेचाही उदय झाला. स्या राजांनी जमीनवितरण, करपद्धती वगैरेंची व्यवस्था लावली व मद्याच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक नियम केले. या काळात लोक शांग डि या श्रेष्ठ स्वर्गदेवतेची पूजाअर्चा करीत. स्या वंशातील आठवा राजा ह्‌वाय हा क्रूर व दुष्ट होता. शांगचा राजपुत्र थांग याने इ.स.पू. १७६६ मध्ये – काहींच्या मते १५२३ मध्ये – ह्‌वाय सत्ता उलथून पाडली व शांग वंशाचे राज्य स्थापन केले. या घराण्याचे राज्य इ.स.पू. ११२२ पर्यंत – काहींच्या मते १०२८ पर्यंत – टिकले.
        स्या कारकीर्दीबद्दल प्रत्यक्ष पुरावा नसला, तरी नंतरच्या शांगकाळाच्या सुरुवातीस दिसून येणाऱ्या विकसित व समृद्ध जीवनावरून स्याकालीन प्रगतीची कल्पना करता येते.
      पुरातत्त्ववेत्त्यांनी केलेल्या उत्खननांत, विशेषतः उत्तर हूनान प्रांतात व अन्यत्रही, शांगकालीन इमारतींचे अवशेष, अनेक शस्त्रास्त्रे, ब्राँझची पूजेची भांडी, शस्त्रांच्या मुठी, हाडे, आता नष्ट झालेल्या एका जातीच्या कासवाची कवचे व त्यावरील कोरीव लेखांचे त्रोटक भाग उपलब्ध झाले आहेत. त्यांवरून शांगकालीन जीवनाची बरीच कल्पना येते. हाडांवर कोरलेल्या लेखांत प्राचीन राजांची एक यादी आहे. ती इ.स.पू. चौथ्या शतकात बांबूवर लिहिलेल्या अधिकृत यादीशी पूर्णतः मिळतीजुळती आहे.

        शांग राजांनी सु. १,८०० नगरराज्ये जिंकून घेतल्याचे नमूद केले आहे. त्यांची शेजारच्या राजांशी वारंवार युद्धे होत असत. अनेकदा झालेल्या आक्रमणामुळे त्यांना कित्येकदा राजधानीचे स्थलांतरही करावे लागले. इ.स.पू. १३०० च्या सुमारास एका शांग राजाने अर्वाचीन आन्‌यांगच्या परिसरात वसविलेल्या नव्या राजधानीच्या अवशेषावरून तत्कालीन शासकीय इमारती, राजवाडे, मंदिरे व पूर्वजांच्या समाध्या इत्यादींची चांगली कल्पना येते.



     शांगकाळात पुरोहितवर्गाचे वर्चस्व होते. राजाला पूर्वजपूजेच्या बाबतीत या वर्गावर अवलंबून रहावे लागे. मृत जनावरांच्या खांद्यांची रूंद व पातळ हाडे विस्तवावर तापविली म्हणजे त्यावर उमटणाऱ्या चिरांवरून भविष्यकथनाची पद्धती या पुरोहितांना साध्य होती. त्यांच्या मदतीने यज्ञयागही होत व त्यात बोकड, डुक्कर, कुत्रा, गाय, बैल, क्वचित घोडा यांचा बळी देत. नरबळीचेही काही उल्लेख सापडतात.
      शांगकाळात शेती, मातीची तशीच ब्राँझची भांडी आणि विविध शस्त्रास्त्रे करण्यात पुष्कळच प्रगती झाली होती. लेखनकला विकसित होऊन उच्चार व वस्तू या दोहोंचाही बोध होणारी सु. २,५०० चित्राक्षरे प्रचारात आली. अनेक बोलभाषाही निरनिराळ्या भागांत विकास पावल्या. शांगकाळात कालगणनातंत्रही पुष्कळ प्रगत झाले होते. [→ कालगणना, ऐतिहासिक].
     करवसुली व शासकीय खर्च, सार्वजनिक बांधकाम व शहरसंरक्षण, पाटबंधाऱ्यांची देखभाल इ. विभाग व त्यांवरील अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्याचे प्रशासनकार्य सुव्यवस्थित चाले. युद्ध, शिकार इ. बाबतीत राजाकडे पुढारीपण असून अडचणीच्या प्रसंगी तो पूर्वजपूजा करून त्याचे मार्गदर्शन कौल लावून प्राप्त करून घेई.
       समाजात अमीरउमराव व पुरोहित यांचा श्रेष्ठ वर्ग व गुलाम, शेतकरी-कामकऱ्यांचा कनिष्ठ वर्ग असे दोन वर्ग असून कनिष्ठ वर्ग शेतीवर राबून अमीरउमरांवांवर सर्वस्वी अवलंबून असे. कुदळी, फावडी इ. शेतीची अवजारे अजूनही दगडाच्या पात्यांचीच असत. शेतीला क्वचित पशुपालनाची जोड देत. बहुसंख्य लोक गुहांत किंवा झोपड्यांत राहत. राजधानीसारख्या शहरातील जीवन जास्त गुंतागुंतीचे होते. व्यापारी वर्गाव्यतिरिक्त विणकर, बुरूड, कुंभार आणि धातू, लाकूड, हाडे इत्यादींवर खोदकाम करणारे स्वतंत्र व्यवसायिक शहरात दिसू लागले होते.
     कालांतराने शांग सत्तेस उतरती कळा लागली. पश्चिमेकडील जौ टोळ्यांच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱ्यांना त्यांना पायबंद घालता आला नाही. शेवटी इ.स.पू. ११२२ मध्ये – काहींच्या मते १०२७ मध्ये – जौ टोळ्यांनी शांगची राजधानी उद्‌ध्वस्त करून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली.
     जौसत्ता इ.स.पू. ११२२ ते २२१ – काहींच्या मते १०२७ ते २२५ पर्यंत – म्हणजे चीनच्या इतिहासात सर्वांत जास्त काळ टिकली. जौ हे मेंढपाळी भटके जीवन जगणारे साधारण रानटी लोक होते पण आपण प्राचीन चिनी राजवंशाचेच आहोत, असे जाहीर करून त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न केला. शांगकालीन वास्तुकला, पंचाग, लेखनकला आणि कित्येक धर्मसमजुती आत्मसात केल्याने जौ सत्तेच्या स्थापनेमुळे तत्कालीन चिनी जीवनास खंड पडला नाही. मात्र या कालखंडात चीनच्या समाजजीवनातील अनेक परंपरा व चालीरीती दृढ झाल्या आणि राजकीय संस्था स्थिरावल्या. त्यामुळे जौ राजवटीला चीनच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे.
जौ राजवटीच्या पूर्वार्धात म्हणजे इ.स.पू. ७७१ पर्यंत चीनवर प्रत्यक्ष जौ या राजघराण्याची सत्ता होती पण उत्तरार्धात जौ सत्ता नाममात्र राहून देशाच्या निरनिराळ्या भागांत अनेक राज्ये स्थापन झाली, विकास पावली व लयास गेली.


   जौ राज्याचा संस्थापक वन वांग (राजा वन) व त्याचा मुलगा वू वांग (राजा वू) यांना आदर्श प्रशासक मानतात. वू वांगने हल्लीच्या शान्सी प्रांतातील चांगान शहराजवळ आपली राजधानी वसविली व पूर्वीच्या शांग घराण्याकडे लहानसे मांडलिक राज्य ठेवून बाकीच्या मुलखावर आपल्या नातेवाइकांना प्रशासक म्हणून नेमले. वू वांगनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा छंग वांग (राजा छंग) गादीवर बसला व त्याचा चुलता जौ गुंग म्हणजे सरदार जौ हा राज्यपालक म्हणून कारभार पाहू लागला. जौ गुंग शूर योद्धा व कुशल प्रशासक होता. त्याने जौ राज्याची भक्कम पायावर उभारणी केली. नंतरचे जौ राजे जाव वांग व मू वांग यांनी जौ राज्याचा पुष्कळच विस्तार केला व जौ राज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.
    जौ राज्याचे स्वरूप सरंजामी होते. राज्याच्या निरनिराळ्या भागांवर राजघराण्याचे नातेवाईक, दिवंगत कर्तबगार सेनापतींचे आणि मंत्र्यांचे वंशज मांडलिक म्हणून राज्य करीत. हळूहळू अनेक मांडलिक शिरजोर झाले आणि केंद्रसत्ता दुर्बल झाली. स्युआन वांग ह्या कर्तबगार राजाने कोलमडणारी जौ सत्ता टिकविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मुलगा यू वांग हा अतिशय दुबळा असून स्त्रीलंपट होता. त्याच्या सासऱ्याने त्याच्यावर स्वारी केली व यू वांगला ठार मारले. यानंतर चांगान येथून राजधानी पूर्वेकडे लोयांग येथे हलविण्यात आली. तेव्हापासून पश्चिम जौ सत्तेचा अंत होऊन पूर्व जौकालखंडाला सुरूवात झाली. मात्र खरी जौ सत्ता संपुष्टात येऊन निरनिराळ्या मांडलिकांना मान्यता देणे, धार्मिक व राजकीय समारंभांत मिरविणे एवढीच औपचारिक कामे जौ राजवंशाकडे राहिली. या नाममात्र जौ सत्तेखालील मांडलिकांत सु. दोन शतके संघर्ष झाला व त्यातून ईशान्य भागात शँटुंग आणि होपे प्रांतांत म्हणजे हल्लीच्या शान्सी या प्रांतात जिन, पश्चिम भागात म्हणजे हल्लीच्या शान्सी प्रांताच्या च्यीन या भागात सुंग व दक्षिणेकडील होपे प्रांतात छू, ही तीन प्रबल राज्ये उदयास आली. यानंतरचा काळ ह्या तीन राज्यांतील तंटेबखेडे व तज्जन्य लहानमोठ्या युद्धांनी भरलेला असल्याने चिनी इतिहासकार याला संघर्षयुग असेच नाव देतात. या काळात मूळ जौ राजांची वांग ही बिरूदावलीही कित्येक मांडलिकांनी स्वतःला लावून घेतली. शेवटी इ.स.पू. तिसऱ्या शतकाच्या मध्यावर च्यीन राजाने नान वांग बिरुदावली वापरणाऱ्या शेवटच्या जौ राजाचा पराभव करून त्याच्या राज्याचा पश्चिम भाग व सम्राट यूपासून वापरात असलेली आभूषणे हिसकावून घेतली. त्यानंतर एका जौ वंशजाने राज्याच्या पूर्व भागावर काही वर्षे राज्य केले पण इ.स.पू. २४९ मध्ये त्याचाही पराभव झाला व या नाममात्र जौ साम्राज्याचा अंत झाला.
     जौकाळ म्हणजे चीनच्या इतिहासातील सरंजामी युग, सम्राट हा देशाचा राजकीय नेता व धर्मप्रमुख असून देशाचा मध्यवर्ती भाग त्याच्या प्रशासनाखाली होता. त्याच्या प्रत्यक्ष अखत्यारीतील मुलखाभोवती, पाच गोल पट्ट्यांत राजकुटुंबातील व्यक्ती, विवाहसंबंधामुळे झालेले आप्तस्वकीय व अन्य विश्वासू सरदार यांची सरंजामी मांडलिक राज्ये होती. या मांडलिकांना मध्यवर्ती सत्तेला वार्षिक खंडणी द्यावी लागे व ठराविक फौज केंद्रशासनाच्या सेवेसाठी ठेवावी लागे. आपापल्या राज्यात मात्र त्यांना सर्वाधिकार असत. राज्याच्या निरनिराळ्या भागांत वारंवार दौरे काढून सम्राट मांडलिकांवर वचक ठेवी. शिवाय प्रत्येक मांडलिकास ठराविक वेळी सम्राटाच्या दरबारी उपस्थित रहावे लागे. सम्राट धर्मप्रमुख असल्याने पंचांगानुसार सण, उत्सव, पूजाअर्चा, यज्ञयाग इत्यादींची व्यवस्था करण्याचा खास अधिकार त्यालाच होता. धार्मिक संस्कार, विधिनियम, राजसेवकांच्या आचरणाचे नियम आणि राजनैतिक शिष्टाचार यांची स्वतंत्र संहिताच तयार केली असून या संहिता-संग्रहाला ली म्हणत. या लीमध्ये सरंजामी मांडलिकांचे हक्क व त्यांची कर्तव्य यांची सविस्तर नोंद असल्याने त्याचे स्वरूप काहीसे हल्लीच्या संविधानासारखे होते. केंद्रीय प्रशासनात सम्राटाला साहाय्य करण्यासाठी महामंत्री आणि कृषी, अर्थ, संरक्षण इ. खात्यांच्या सहा अन्य मंत्र्यांचे मंडळ असे.

    शांगकाळाप्रमाणे जौकाळातही शासक व शासित हे समाजाचे दोन प्रमुख वर्ग होते. शासकवर्गात स्वतः सम्राटाव्यतिरिक्त वर उल्लेखिलेले सरंजामदार होते. त्यांना देशातील जमीन जहागीर म्हणून दिलेली असून सर्व राजकीय सत्ता त्यांच्या हाती होती. वरिष्ठ सरकारी नोकऱ्या सरदारांनाच मिळत व लष्कराचे नेतृत्वही तेच करीत. या सरदारांना कुलनामे असून सम्राटाप्रमाणे ते आपापल्या मुलखात पूर्वजपूजा, पूजाअर्चादी पुरोहितकार्ये करीत. पूजाविधी आणि अन्य समारंभाचे तंत्र, गायन, तिरंदाजी, रथनियंत्रण, गणित, लेखन या सहा कलांचे खास शिक्षण स्वतंत्र विद्यालयांतून सरदारपुत्रांना मिळे व सभ्य समाजाचे रीतिरिवाज त्यांना आत्मसात करावे लागत. सर्व जहागीरदार विलासात व डामडौलात राहत. मोठ्या कुटुंबाना समाजात मानमान्यता आणि महत्त्व असल्याने पुत्रपौत्रांची संख्या वाढविण्यासाठी सामान्यतः सर्वच जहागीरदार विवाहित पत्नीव्यतिरिक्त अनेक उपस्त्रिया ठेवीत.
     या समाजात सामान्यांना कोणतेच हक्क नव्हते, ते गुलामच होते. बड्या जमीनदारांकडे मोलमजुरी करणे किंवा त्यांच्या जमिनी कसणे, पायदळात शिपाईगिरी करणे किंवा लष्करातील हलकी कामे करणे, एवढेच व्यवसाय त्यांना करता येत. पूर्वजपूजेचा किंवा अन्य धार्मिक संस्कारांचा त्यांना अधिकार नव्हता. सरंजामदारांच्या जमिनी कसल्या, तरी उत्पन्नाचा नाममात्र भागच त्यांना मिळे. सर्व जमीन सम्राटाच्या मालकीची समजत. आपल्या जमिनीच्या काही भाग तो सरंजामदारांना देई व या सर्व जमिनीवर कष्टाची कामे गुलामांना करावी लागत. त्यांना दरवर्षी एकच जमीन कसावयास मिळेल असेही नव्हते. याशिवाय इतर कष्टाची कामे त्यांनाच मोफत करावी लागत. एकंदरीत जौ कालीन समाजाचे स्वरूप एखाद्या कुटुंबासारखे होते. सम्राट हा या कुटुंबाचा कर्ता असून सर्व मालमत्ता त्याचीच समजत. सर्वांना त्याच्या आज्ञेनुसार काम करावे लागे. कुटुंबातील कर्त्या मुलाप्रमाणे सरदार व मांडलिक यांना अधिकार असत. बाकीच्या कनिष्ठ समाजघटकांना कष्टाची कामे करून, मिळेल त्यात संतोषाने रहावे लागे.
   जौयुगातील शेवटची काही शतके बेबंदशाहीची गेली, तरी सांस्कृतिक दृष्ट्या जौयुगात प्रगती झाली. कुंचला, शाई इ. लेखनसाहित्यात या काळात पुष्कळच सुधारणा झाल्या. कवड्यांऐवजी धातूची नाणी प्रचारात आली. त्यामुळे व्यापार सुलभ झाला. ब्राँझ मागे पडून लोखंड व्यवहारात येऊ लागले व हातोडा, कोयता, करवत, आर (पोगर), छिन्नी इ. लोखंडी अवजारे वापरात आली. नांगरटीसाठी बैलांचा वापर होऊ लागल्याने कृषिउत्पादन वाढले. गाढव, खेचर, उंट हे प्राणी ओझी वाहण्याकरिता वापरीत. नव्या प्रकारच्या तरवारी तसेच दस्त्यावर बसविलेले धनुष्य (क्रॉस बो) प्रचारात आल्याने लष्कराची आक्रमक शक्ती वाढली. घोडदळ वाढल्यामुळे विजारी आणि नव्या प्रकारची पादत्राणे वापरात आली. विज्ञान क्षेत्रातही प्रगती झाली. छायायंत्र, पाणघड्याळ ह्या कालमापन यंत्रांचा शोध लागला. ग्रह गणितावरून वर्षाचे ३६५·२५ दिवस असतात, हे चिन्यांना उमगून आले. लाखकाम, सोन्याचे तारकाम, ब्राँझ धातूच्या भांड्यावरील सोन्याचांदीच्या मिनेगारीचे सुंदर नक्षीकाम, पिलू ह्या उपरत्नाच्या सुबक मूर्ती इत्यादीवरून तत्कालीन चिनी समाजाच्या सुसंस्कृतर सिकतेची व आर्थिक समृद्धीची बरीच कल्पना येते. जौयुगाच्या सुरुवातीला उत्तर चीनपुरतीच मर्यादित असलेली चिनी संस्कृती या युगाच्या शेवटी दक्षिणेकडे यांगत्सी नदीच्या खोऱ्यापलीकडेही पोहचली. हा विस्तार होत असताना जौ समाजाचा इतर मानवघटकांशी संबंध येऊन आजचा संमिश्र चिनी समाज उत्क्रांत झाला. 

जौयुगात चीनमध्ये अनेक विख्यात तत्त्वचिंतक झाले. त्यांनी नवे राजकीय सिद्धांत आणि सामाजिक विचार प्रस्तृत केले. एवढ्या थोड्या काळात इतके तत्त्वचिंतक चीनच्या इतिहासात पुन्हा निर्माण झाले नाहीत. ⇨कन्फ्यूशस (खुंग-फू-ज) हा या विद्वानांत श्रेष्ठ होय. जन्मभर त्याने प्राचीन ग्रंथांचे संकलन आणि संपादन केले. त्याने संकलित केलेले इतिहास, धार्मिक संस्कार व आचारविचार, काव्य व संगीत इ. पाच ग्रंथ व त्याच्या शिष्यांनी एकत्रित केलेले त्यांचे विचार यांचे चार खंड म्हणजे भावी काळातील चिनी समाजविकासाचा आलेखच होय. मंग-ज (आचार्य मंग) ह्या कन्फ्यूशसच्या प्रख्यात शिष्याने त्याच्या शिकवणुकीतील उदार व प्रगतिवादी विचारांवर विशेष भर देऊन सामाजिक समता व राजकीय लोकशाही यांचा पुरस्कार केला. सामाजिक आणि राजकीय स्थैर्य माणसाच्या आर्थिक सुस्थितीवर अवलंबून असते. सोपी करपद्धती, शेतीवर भर व सार्वत्रिक शिक्षणप्रसार यांनी समाजाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते म्हणून शासनसंस्थेने ही उद्दीष्टे साध्य करण्याचे सतत प्रयत्न करावे, असे त्याचे म्हणणे होते.
     मो – डि हा कन्फ्यूशसचा समकालीन. धार्मिक भक्तिभाव व सामाजिक सेवा यांवर त्याचा विशेष भर होता. तो शांततावादी होता. आक्रमक युद्धे निःशस्त्रीकरणानेच टाळता येतील, हा आता सर्वमान्य झालेला पण आचरणात येऊ न शकलेला विचार त्याने दोन हजार वर्षांपूर्वी मांडला.
       लाव् ज (आचार्य लाव) हा ख्रि.पू. सहाव्या शतकातील एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ. तो धार्मिक विचारात गूढवादी व राजकीय विचारात अराजकवादी होता. दाव-द-जिंग  म्हणजे मार्ग आणि धर्मसूत्र. ह्या ग्रंथात शस्त्रास्त्रवाढीने युद्धे व युद्धांनी राज्यात बेबंदशाही माजते, तसेच कायदे आणि नियम वाढले म्हणजे समाजात अधिक गुन्हेगारी वाढते, असे मत प्रतिपादून त्याने शासनविरहित समाज निसर्गाशी एकरूप झाल्यानेच माणसाला सुखप्राप्ती होईल, असे सुचविले आहे.
       लाव् ज नंतर तीन शतकांनी राज्यसंस्थेला सर्वस्व मानणाऱ्या काही तत्त्वज्ञांनी ईश्वरी सत्ता, नैतिक आचारविचार, निसर्गनियम इत्यादींना काही महत्त्व नसून सार्वभौम सत्तेने केलेल्या नियमांनुसार समाजाचे नियंत्रण झाले पाहिजे, असे सांगून अनिर्बंध हुकूमशाहीचा पुरस्कार केला. यांच्यापैकी एका गटाने शेतीच्या सामूहिकीकरणासारख्या उपायांनी राज्यामध्ये आर्थिक स्वयंपूर्णता साधावी असे प्रतिपादन केले, तर दुसऱ्या गटाने व्यापार व उत्पादन साधने राज्यसंस्थेच्या संपूर्ण नियंत्रणाखाली ठेऊन आर्थिक विषमतेला प्रतिबंध करावा असे सुचविले. ह्या विधिवादी विचारवंतापैकी ली स्स, हान फैज, वै यांग किंवा गुंग स्वुनयांग यांनी याच तत्त्वांच्या आधारे च्यीन साम्राज्याची उभारणी केली.
       याशिवाय मनुष्य सर्वथा दैवाधीन असल्याने प्रत्येकाने इतरांचा विचार न करता मिळेल तेवढे सुख उपभोगावे, अशी काहीशी चार्वाकवादी विचारसरणी मांडणारा यांग-जू, तर्कशास्त्रीय विचारांचा पुरस्कार करणारी ह्‌वै-ज व गुंग-स्वुन-लुंग यांनी स्थापन केलेली दुसरी शाखा ह्या मो-डि याच्या शिष्य शाखा. परस्परविरोधी अनेक विचार या काळात सर्वत्र फैलावल्याने चीनच्या इतिहासात विचारक्षेत्रातील सुवर्णकाल असे उत्तर जौकाळाचे वर्णन येते, ते यथार्थ वाटते.
      जौयुगात चिनी भाषेचा विकास झाला व चिनी साहित्यात मोलाची भर पडली. लाकडावर किंवा बांबूवर शाईने लिहिलेल्या व यज्ञयाग प्रसंगी म्हणावयाच्या प्रार्थना, पूर्वजपूजेच्या निमित्ताने नृत्यप्रसंगी म्हणावयाची गीते व संवाद, अनेक प्रकारची लोकगीते इ. जौकालीन साहित्य उपलब्ध आहे. त्याशिवाय कन्फ्यूशसने संकलित केलेली अनेक पुस्तके (ही आख्यायिका आहे, याला पुरावा नाही.), काही ज्योतिषविषयक ग्रंथ, इतिहास व राजनीतिशास्त्रावरील पुस्तके इत्यादींवरून तत्कालीन चिनी साहित्य दर्जेदार असल्याचे दिसते.
   पहिले चिनी साम्राज्य :-
     जौकाळच्या शेवटी प्रबल मांडलिक संस्थानांपैकी च्यीन महत्त्वाचे राज्य होय. हे रानटी लोकांचे मागासलेले राज्य आहे, असे समजून इतर संस्थानिक त्याला तुच्छ लेखीत पण च्यीन राज्यातील लोकांनी हळूहळू जवळपासच्या राज्यातील चालीरीती आत्मसात केल्याने त्यांची गणनाही सुसंस्कृत गटात होऊ लागली. वै-यांग आणि गुंग-स्वुंग-यांग म्हणजे प्रख्यात शंग-यांग आणि ली-स्स यांचा भर कायदे व नियम यांवर होता. त्यांनी शेतीवर भर दिल्यामुळे च्यीन राज्य कार्यक्षम प्रशासनासाठी ख्यातनाम झाले होते. शिस्तबद्ध आणि अद्यायावत शस्त्रास्त्रांनी सज्ज सेना – विशेषतः घोडदळ – बाळगून च्यीन राजांनी आसपासची राज्ये जिंकून घेण्याचा सपाटा चालविला. विविध उपायांनी त्यांनी कृषिउत्पादन वाढविले व सैन्याला अखंड धान्यपुरवठा व्हावा, म्हणून हल्लीच्या कैफेग (काय-फंग) शहराजवळ प्रचंड धान्य गुदामे उभारली. तसेच नवे नवे प्रांत जिंकीत असताना पिछाडीच्या प्रदेशात बंडे होऊ नयेत, म्हणून अनेक विभागांतील वस्ती श्येन्यांग या राजधानीला हलविण्यात आली.


      इ.स.पू. २४७ मध्ये जंग हा अल्पवयीन मुलगा च्यीनच्या गादीवर बसला. हा मुलगा म्हणजे पुढे विख्यात झालेला ⇨शिर-ह्‌वांग-टी (शृ-ह्‌वांग-डि, इ.स.पू. २४९  – २१०) हा प्रथम सम्राट होय. इ.स.पू. २४७ ते २३४, इ.स.पू. २३४ ते २२१ व इ.स.पू. २२१ ते २१० असे त्याच्या कारकीर्दीचे तीन भाग पडतात. इ.स.पू. २३४ मध्ये वयात येताच विस्तारवादी धोरण स्वीकारून त्याने अल्पावधीत चीनमधील लहानमोठी राज्ये पादाक्रांत केली आणि च्यीन राज्याचे चीनच्या साम्राज्यात रूपांतर केले. बहुतकरून च्यीन या शब्दावरून चीन हे नाव देशास मिळाले असावे. इ.स.पू. २२१ पर्यंत झालेल्या राज्यविस्तारास समाधान न मानता पुढील ११ वर्षांत त्याने सेचवान, शान्सी, फूक्येन, ग्वांगटुंग,ग्वांगसे, टाँकिन वगैरे प्रदेश चिनी साम्राज्यास जोडले. देशाच्या वायव्य भागातील स्यूंग नू ह्या रानटी टोळीचा समाचार घेतला. कोरिया व जपानमध्ये चिनी वसाहती स्थापन करण्याकरिता आवश्यक ते आरमारही उभारले आणि साम्राज्य टिकविण्यासाठी कार्यक्षम प्रशासन प्रस्थापित करून सीमारक्षणाचीही योग्य ती दखल घेतली.
      च्यीन राज्याचा विस्तार होत असता सरंजामी मांडलिकांवर अवलंबून असणाऱ्या विकेंद्रित प्रशासनपद्धतीतील दोष च्यीन सरदार मू स्याव, शंग यांग व महामंत्री ली-स्स यांना दिसून आले होते. साहजिकच सरंजामशाही नष्ट करून अनियंत्रित केंद्रसत्ता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट शिर-ह्‌वांग-टीने स्वीकारले. तदनुसार साम्राज्याचे एकशेचाळीस प्रांत (ज्यून) व प्रांताचे जिल्हे (स्यन) पाडण्यात येऊन प्रत्येकावर केंद्रसत्तेला जबाबदार असलेला विविध श्रेणींचा अंमलदारवर्ग नेमण्यात आला. केंद्रीय प्रशासनाचीही खातेवार विभागणी करून प्रत्येक खात्यावर जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. स्वतः सम्राट आपल्या मंत्रिमंडळाच्या सहाय्याने या अवाढव्य साम्राज्याचा कारभार पाही आणि साम्राज्यभर सतत फिरत राहून प्रांतिक अधिकाऱ्यांवर वचक ठेवी.
      सरंजामदारांच्या जमिनी जप्त करून त्याने जमीनदारांना व शेतकऱ्यांना शेतीचे मालकी हक्क बहाल केले व सरंजामदारांची शस्त्रास्त्रेही जप्त करून त्यांतील धातू उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी वापरला, तसेच धान्य व शस्त्रास्त्रांची प्रचंड कोठारे बांधण्यात आली. व्यापार व्यवहारावर कडक नियंत्रणे ठेवून व उत्पादन साधने सरकारी मालकीची करून बाजारभाव स्थिर ठेवण्यात आले. कृषिउत्पादनासाठी सर्वत्र कालवे खणण्यात आले. वाहतूक सुलभ व्हावी आणि सैन्याच्या हालचाली व्यवस्थित व्हाव्यात म्हणून राजधानी इतर शहरांशी पक्या सडकांनी जोडली. सर्वत्र संरक्षण तट, इमारती, राजवाडे, इ. वास्तू बांधण्यात आल्या. या योजनांना लागणारा मजूरवर्ग उपलब्ध व्हावा. म्हणून प्रांताप्रांतातून नागरिकांचे जबरदस्तीने स्थलांतर करण्यात आले. या विकासयोजनांवर कमी वेतनावर काम करण्याची सक्ती करण्यात आली. देशाचे एकीकरण घडवून आणण्यासाठी सर्वत्र एकाच प्रकारच्या सांस्कृतिक संस्था असाव्यात देशभर सर्वमान्य नाण्यांतच विनिमय व्यवहार व्हावेत, सर्वत्र एकाच प्रकारची वजने, मापे, शेतीची अवजारे असावीत. एवढेच नव्हे तर गाडीच्या चाकाचे आंसही सर्वत्र एकाच मापाचे असावेत, असे ठरविण्यात आले.
 महामंत्री ली-स्सच्या मदतीने शिर-ह्‌वांग-टीने चिनी लिपी सोपी करून तीमधेच लेखन व्हावे, असा कायदा केला. बांबूच्या लगद्याचा कागद व केसांचे कुंचले यांचा लेखनासाठी उपयोग याच काळात होऊ लागला.
     ईशान्येकडून आणि उत्तरेकडून वारंवार होणाऱ्या रानटी टोळ्यांच्या स्वाऱ्यांपासून देशाचे रक्षण व्हावे, म्हणून इ.स.पू. चौथ्या शतकापासून अस्तित्वात असलेले प्रचंड तट जोडून शिर-ह्‌वांग-टीने या तटाच्या बुरूजांवर ठिकठिकाणी संरक्षक चौक्या बसविल्या. चीनच्या प्रचंड भितींचा निर्माता म्हणून शिर-ह्‌वांग-टीचा गौरवाने उल्लेख करतात.
     प्रचलित राज्यव्यवस्था आणि तिला आधारभूत असलेली कायद्यावर भर देणारी विचारसरणी कायमची रूजावी व विरोधी विचार प्रसृत होऊन टीकाकारांना चालू राजवटीविरुद्ध लोकमत तयार करण्याची संधी मिळू नये, म्हणून शिर-ह्‌वांग-टीने कृषी, वैद्यक, ज्योतिष, वनस्पतीशास्त्र वगैरे विषयांवरील ग्रंथ व मध्यवर्ती शासकीय ग्रंथालयातील ग्रंथ सोडून बाकीच्या विषयांवरील ग्रंथ नष्ट करण्याचा हुकूम सोडला. या हुकूमाची अत्यंत कडकपणे अंमलबजावणी झाली.
    शिर-ह्‌वांग-टी धार्मिक वृत्तीचा होता. त्याने यज्ञयागादी कृत्ये व रूढ झालेल्या चार देवतांची पूजाअर्चा चालू ठेवली. तो इ.स.पू. २१० मध्ये मृत्यू पावला. महामंत्री ली-स्स याने याच्या निधनाची बातमी गुप्त ठेऊन त्याचे शव राजधानीला आणले. लवकरच ली-स्स व एक खोजा जाव गाव यांनी संगनमत करून शिर-ह्‌वांग-टीच्या वडील मुलास बाजूला ठेऊन धाकटा पुत्र हू हाय यास दुसरा सम्राट म्हणून गादीवर बसविले.
      शिर-ह्‌वांग-टीच्या ग्रंथविरोधी धोरणामुळे चिडलेला बुद्धिजीवी वर्ग, अनिर्बंध केंद्रीय शासनपद्धतीमुळे दुखावलेले सरंजामदार, वेठबिगारीमुळे त्रस्त झालेले शेतकरी व मजूर, सतत चालणाऱ्या मुलूखगिरीमुळे घरादारापासून वर्षांनुवर्षे दूर राहणारे सैनिक आणि करांच्या बोजाखाली भरडले जाणारे सामान्य प्रजाजन इत्यादींना त्याच्या निधनाने हायसे वाटले. या सर्वांच्या साम्राज्यविरोधी कारवायांना दुर्बल व विलासी हू हायला तोंड देता आले नाही व शिर-ह्‌वांग-टीच्या नंतर अवघ्या तीन वर्षांत चीनचे पहिले साम्राज्य रसातळाला गेले.
       एक भाषा व लिपी, समान कायदेकानू सर्वमान्य चलनव्यवस्था, कार्यक्षम नोकरशाही, शस्त्रास्त्रसज्ज सेना आणि आरमार, विविध कृषिविकास योजना, सुरक्षित वाहतूक व्यवस्था व सरंजामदारांचे निर्मूलन इ. गोष्टी अल्पावधीत साध्य करून शिर-ह्‌वांग-टीने चीनच्या भावी प्रगतीची दिशा दाखविली. ह्या त्याच्या अमोल देशसेवेमुळे विरोधी ग्रंथ जाळण्यासारखी त्याची दृष्कृत्येही आधुनिक चिनी इतिहासकारांनी माफ केली.
      हान (पश्चिमी ) साम्राज्य : (इ.स.पू. २०२ ते इ.स.९). च्यीन सम्राट हू हायच्या मृत्यूनंतर पाच वर्षे अंधाधुंदी माजली. तेव्हा प्रचलीत अराजकाचा फायदा घेऊन ल्यौ जी किंवा हान-गाव-जू ह्या शिपाई पेशातून वर चढलेल्या लष्करी अधिकाऱ्याने चीनमध्ये स्वतःची सत्ता स्थापन केली. हान वंशातील ह्या पहिल्या सम्राटाने शिर-ह्‌वांग-टीच्या प्रशासनव्यवस्थेत फारसा बदल केला नाही. पण आपल्या आप्तेष्टांना जहागिऱ्या देऊन त्याचे च्यीनकाळामधील सरंजामशाही-विरोधी धोरण बदलेले. कालांतराने हे सरंजामदार शिरजोर झाले. तेव्हा पित्याच्या निधनानंतर त्याचा सरंजाम सर्व मुलांत वाटून सरंमजामदारांची सत्ता कमी करण्याचे धोरण स्वीकारले.

     शासकीय अधिकारी निवडताना हान-गाव-जू याला कन्फ्यूशस पंथीयांना नेमावे लागले कारण त्यांना राजकारणाचा आणि राज्य नियंत्रणाचा अनुभव होता. राजपुत्र तसेच अधिकारी वर्ग यांच्या पुत्रपौत्रांच्या शिक्षकांत कन्फ्यूशस पंथीयांचाच भरणा असल्याने चीनच्या भावी प्रशासनव्यवस्थेवर कन्फ्यूशच्या सिद्धांतांचा ठसा उमटला. च्यीन काळातील कायदेपंथाचा या सिद्धांतावर परिणाम होऊन एक नवीन राज्यशासक-कन्फ्यूशस पंथ निर्माण झाला. कान्सू प्रांतातील यूए-जृ, मंगोलियातील स्युंग नू, मँचुरियातील तुंगूस इ. चीनच्या भिंतीच्या परिसरातील टोळ्यांच्या बंडाळ्यांना हान राज्यकर्त्यांना सतत तोंड द्यावे लागले. लष्करी कारवाईने स्युंग नू टोळीवर जरब बसविण्याचा प्रयत्न फसल्यावर हान-गाव-जूने संपत्तीचे आमिष दाखवून तिच्याशी तह केला, तर त्याचा वंशज प्रसिद्ध सम्राट वू टिने स्युंग-जू व यूए-जृ या टोळ्यांत भांडणे लावून चीनवरील संकट टाळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळेच चीनचे लष्कर सॉग्डियाना, बॅक्ट्रिया (सध्याचे अफगाणिस्तान) इ. रोमन साम्राज्याच्या परिसरातील प्रदेशांपर्यंत पोहोचले आणि पश्चिम आशियातील काही प्रदेशांवर चीनची सत्ता प्रस्थापित झाली. यामुळेच चीनचे मुत्सद्दी व लष्कर यांचा रोमनांशी काही काळ संबंध आला.
       हान-गाव-जू इ.स.पू. १९५ मध्ये निधन पावला. नंतर त्याची प्रथम पत्नी लू हिच्या भाच्यांनी एकामागून एक अज्ञान मुलगे गादीवर बसवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मृत्यूनंतर हान-गाव-जूचा दुसरा मुलगा वन डि गादीवर बसला. तो कर्तबगार होता. लूच्या कारभारामुळे बिघडलेली प्रशासनाची घडी त्याने पुन्हा नीट बसविली. त्याने व नंतरचा सम्राट चिंग याने विविध उपायांनी सरंजामदारांची सत्ता कमी केली.
      पश्चिमी हान सम्राज्यातील सर्वांत कर्तबगार सेनानी सम्राट वू टि (इ.स.पू. १४० – इ.स.पू. ८७) याने आक्रमक धोरण स्वीकारून साम्राज्याचा विस्तार केला. या कामी त्याचा सेनापती ली ग्वांग्-ली व मुत्सद्दी जांग च्यन ह्यांचे त्यास फार साहाय्य झाले. वू टिने कोरियात मोठी चिनी वसाहत स्थापन केली. या वसाहतीमुळेच कालांतराने चिनी संस्कृतीचा जपानमध्ये प्रसार होणे सुलभ झाले.

        सतत चालणाऱ्या युद्धामुळे शासकीय खर्च बेसुमार वाढला, तसेच मोठ्या जमीनदारांच्या जमिनीवर शेतसारा पन्नास टक्क्यांनी कमी केल्यामुळे व सीमेवरील लष्कराला बक्षीस म्हणून पाच कोटी ग्रॅम सोने वाटल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा देशातील वाहनांवर व व्यापारी नौकांवर कर बसविण्यात आला. एवढ्यानेही न भागल्यामुळे लष्करी व मुलकी अधिकाऱ्यांच्या जागा लिलावाने देण्यास सुरूवात झाली. मीठ, लोखंड, मद्ये, यांचे उत्पादन व वितरणाचे अधिकार सरकारने स्वतःकडे घेतले. चलनाचे अवमूल्यन करून खासगी टांकसाळी बंद केल्या. धान्यधुन्याचे सट्टे बंद होऊन भावनियंत्रणासाठी स्वतंत्र मंडळ नेमले. अमीर-उमरावांकडून जबरीने देणग्या उकळल्या आणि नव्या नेमणुकांच्या सनदासाठी भारी रकमा तो वसूल करू लागला. व्यापारी आणि अन्य व्यावसायिकांच्या संपत्तीची मोजदात करून त्यांची त्याने अनुक्रमे, ९·५० व ४·७५ टक्के संपत्ती जप्त केली.
    वरील उपायांनी, तसेच वू टिच्या कारकीर्दीच्या शेवटी मांडलिकांच्या खंडणीत खूप भर पडल्यामुळे आर्थिक स्थिती पुष्कळच सावरली. तथापि शासनातील भ्रष्टाचार व अकार्यक्षम अधिकारी यांमुळे अंदाधुंदी माजली आणि वू टिच्या निधनानंतर पश्चिम हान सत्ता संपुष्टात आली. शेवटी शेवटी हान कुटुंबातील एक राजमातेचा भाचा वांग मांग याचे दरबारात महत्त्व वाढले व गादीवर कोणीही असला, तरी खरी सत्ता वांग मांगचीच अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेरीस इ.स. ९ मध्ये शेवटच्या हानवंशीय अज्ञान सम्राटास पदच्युत करून आपल्या अनुयायांच्या आग्रहामुळे आपण राजपदाचा स्वीकार करीत आहोत, असा बहाणा करून वांग मांग गादीवर आला व चीनमध्ये स्यीन (म्हणजे नवी) वंशाची राजवट सुरू झाली
  वांग मांगचे राज्य केवळ चौदा वर्षे टिकले. गादीवर येण्याच्या पूर्वीच विद्वत्ता, औदार्य, शौर्य, व प्रशासनकुशलता आदी गुणांबद्दल त्याची ख्याती होती. गादीवर येताच त्याने शेतजमिनीची खरेदी –विक्री बंद केली आणि बड्या जमीनदारांकडे असलेल्या जादा जमिनी भूमिहीनांना कसण्यासाठी दिल्या. जमीनदारांना असलेली सारामुक्ती रद्द करून पडिक जमिनीवर तिप्पट शेतसारा वसूल करण्याचा आदेश दिला. गुलामगिरी नष्ट करून मुक्त गुलामांना नोकऱ्या दिल्या. लोखंड, मीठ तसेच शिकार, मच्छीमारी व चलनावरील शासकीय भत्ता पुन्हा चालू केला व मद्यव्यवसायाचे तसेच खाणींचे व जंगलांचे राष्ट्रीयीकरण केले. चलनाचे अवमूल्यन करून नवी नाणी प्रचारात आणली. बाजारभाव नेमून दिले व आवश्यक वस्तूंचे राखीव साठे ठेवले. अंत्यविधी, यज्ञयागादी धार्मिक कृत्ये यांसाठी बिनव्याजी आणि उद्योगधंद्यांना माफक व्याजाने शासनातर्फे कर्जे देण्याची व्यवस्था केली. सर्व व्यावसायिकांवर उत्पन्नाच्या १/११ कर बसविला व आर्थिक मंदीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांना वेतनकपात स्वीकारण्यास उद्युक्त केले. विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे वसतिगृहे बांधली प्राचीन साहित्याच्या अभ्यासास उत्तेजन मिळाल्याने ल्यौ स्यीनसारख्या विद्वानांना अनेक प्राचीन ग्रंथांचे संपादन करता आले. कन्फ्यूशसच्या पंथाबद्दल वांग मांगला विशेष आदर असल्याने तत्पंथीयांचा शासकीय सेवेत सुलभतेने प्रवेश होऊ लागला.
     वांग मांगच्या सुधारणांना प्रस्थापित हितसंबंधियांचा कडवा विरोध असल्याने त्याला त्यांपैकी काहींवरील उदा., जमिनीच्या व गुलांमांच्या खरेदी-विक्रीवरील निर्बंध रद्द करावे लागले. मात्र गुलामगिरीला आळा घालण्यासाठी त्याने गुलामांच्या संख्येनुसार मालकांवर जबर कर बसविला.
    अकार्यक्षम, स्वार्थी आणि भ्रष्टाचारी नोकरशाहीमुळे वांग मांगच्या आर्थिक सुधारणांना अपेक्षित यश लाभले नाही व शासनाचा वचक नाहीसा झाला. भांडवलदार व जमीनदार यांच्या शासनविरोधी कारवायांनीही तो त्रस्त झाला. त्यात ह्‌वांग हो (पीत-नदी) नदीचा प्रवाह बदलल्यामुळे आलेल्या पुरात लाखो लोक बेघर झाले व समाजात गुन्हेगारी वाढली, विविध निर्बंध, करांचा बोजा, आवश्यक वस्तूंची टंचाई इत्यादींमुळे जनतेत असंतोष पसरला. लष्करी दुर्बलतेमुळे सीमेलगतच्या टोळ्यांंनी स्वातंत्र्य पुकारले. सार्वत्रिक असंतोषामुळे राज्यात सर्वत्र बंडाळी माजली व एका सामान्य शिपायाने वांंग मांगला ठार केले.
उत्तरकालीन हान वंश : (२५ – २२०). वांग मांगच्या मृत्यूनंतर गादीसाठी चाललेल्या संघर्षात पूर्वीच्या हान राजाचा एक नातेवाईक ग्वांग वू डि यशस्वी झाला. चांगान येथून राजधानी हलवून त्याने ती पूर्वेकडे लोयांग येथे नेली. त्याच्या तीसपस्तीस वर्षांच्या कारकीर्दीत चीनमध्ये शांतता प्रस्थापित झाली व हैनान, टाँकिन, अनाम, युनान वगैर प्रांत पुन्हा जिंकले. त्याने पश्चिमेकडील तारीम खोऱ्याच्या परिसरातील लहान लहान राज्ये जिंकून घेतली व नवस्थापित कुशाण राजाकडून खंडणी वसूल केली. दक्षिण मँचुरिया व कोरिया हानकाळात चीनच्या साम्राज्यात होते. हिंदुस्थान, इराण, सिरिया व रोमन साम्राज्यातील विविध देशांशी या काळात व्यापार चालू झाला.


      तथापि पहिल्या शतकाच्या अखेरीस खरी सत्ता राजस्त्रियांचे आप्तेष्ट, राजवाड्यातील खोजे आणि मोठे जमीनदार यांच्या हाती जाऊन त्यांनी एकमेकांविरूद्ध केलेल्या कारस्थानांनी जिकडेतिकडे बेबंदशाही माजली. कालांतराने निरनिराळ्या श्रीमंत व बलाढ्य लष्करी अधिकाऱ्यांत सत्तास्पर्धा सुरू झाली व तीतून दुंग-जौ या सेनापतीच्या हाती राज्याची सूत्रे गेली. पण लोयांग येथे आपली सत्ता टिकविणे अशक्य वाटल्याने त्याने राजासह चांगान येथे प्रयाण केले व लोयांग शहर उद्‌ध्वस्त करून टाकले. पण यामुळे शहरातील राजवाडे, मंदिरे, शासकीय इमारती, दप्तरखात्यातील लाखो कागदपत्रे आदी नष्ट झाल्याने चीनची सांस्कृतिक हानी झाली. हान राजांच्या कबरी व त्यांची स्मारकेही उद्‌ध्वस्त करून त्यांतील अगणित संपत्तीची लूट केली. सर्वत्र लष्करी अधिकाऱ्यांची बंडे होऊन चीनमध्ये इतस्ततः परस्परविरोधी लष्कराच्या छावण्या दिसू लागल्या. शेवटी १९२ मध्ये दुंग-जौ याचा खून झाला व एक बंडखोर सरदार त्साव त्साव सर्वाधिकारी म्हणून कामभार पाहू लागला. तो २२० मध्ये मृत्यू पावल्यावर त्याचा मुलगा त्साव फै याने राजाला पदच्युत करून स्वतःच गादी बळकावली.
         चिनी संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने या काळाला विशेष महत्त्व आहे. साहित्यशिल्पगायनादी कला, विज्ञान, उद्योगधंदे, क्रीडा वगैरे सर्व क्षेत्रात या काळात महत्त्वाची भर पडली. कन्फ्यूशसचा नीतिधर्म या युगात चांगलाच रूजला पण ताओ तत्त्वज्ञानाचा परिणाम होऊन कन्फ्यूशनच्या मूळ तत्त्वात आता फेरफार झाले होते. देशाच्या प्रशासनात मुख्यतः कन्फ्यूशसवाद्यांचा भरणा असल्याने व शासकीय सेवा प्रवेश परीक्षेसाठी कन्फ्यूशसच्या ग्रंथांचा अभ्यास आवश्यक असल्याने चीनचे शासन कित्येक शतके कन्फ्यूशस पंथीयांच्याच हाती राहिले. कन्फ्यूशसप्रणीत कर्मकांडाच्या प्रसाराबरोबर राजाचीही प्रतिष्ठा वाढली व साहजिकच राज्यसंस्थेचा या पंथाला सतत पाठिंबा मिळत गेला. भूतकालीन पुरुषश्रेष्ठांच्या पूजेचा प्रघात याच काळात रूढ झाला आणि सरकार दरबारीही मान्यता पावला. बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रवेश हान युगातच झाला आणि कालांतराने याचे चीनच्या जीवनावर दूरगामी परिणाम झाले.
      हान साम्राज्याच्या विस्ताराबरोबर व्यापार वाढला व ग्रीस, रोम, हिंदुस्थान वगैरे देशांशी चिन्यांचा परिचय होऊन त्याचा त्यांच्या जीवनावर पुष्कळ परिणाम झाला. रेशीम, कातडी, फर, लवंग, औषधी वनस्पती यांची निर्यात व काच, हिरे, माणिक वगैरेंची आयात या काळात पुष्कळ झाली. निरनिराळ्या देशांतल्या वनस्पतींची लागवड चीनमध्ये होऊ लागली व वैद्यक, गणित, ज्योतिष आदी शास्त्रांतील नव्या नव्या कल्पना तिबेट, इराण, हिंदुस्थान, ग्रीस वगैरे देशांतून चीनमध्ये पसरल्या.

    हानयुग हे चिनी साहित्याच्या विकासाचे युग होते, लाकडाचे ठोकळे व बांबूच्या पट्ट्यांऐवजी रेशमी कापडाचा लेखनासाठी उपयोग होई पण पुढे बौद्ध भिक्षूंनी शोध लावलेला कागद प्रचारात येऊन ग्रंथांच्या प्रती करणे सुलभ झाले. ऐतिहासिक आठवणींचा लेखक शृ जि चिनी इतिहासकारांचा प्रपितामह स्स-मा च्यन, त्याचे काम पुढे चालविणारा वान् व्याव, त्याचा मुलगा बान् गू व मुलगी बान् जाव यांचे लिखाण याच काळात झाले. बान् जाव कवयित्री, निबंधकार व कादंबरीकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. इ.स.पू. २०० पासून चिनी शब्दकोशाच्या कार्यालाही सुरूवात झाली व इ.स.पू. १०० मध्ये श्वो-वन-ज्ये-ज  हा पहिला प्रसिद्ध शब्दकोश प्रकाशित झाला. इ.स.पू पहिल्या शतकात अनेक तज्ञ संपादकांनी चिनी ग्रंथांची पहिली सूची तयार केली. तीत ६७७ ग्रंथांचा उल्लेख आहे. या काळात विविध काव्यप्रकार, भूगोल, धर्मशास्त्रावरील टीकाग्रंथ इ. अनेक प्रकारच्या ग्रंथांनी चिनी साहित्य समृद्ध झाले.
     फी-फा (चिनी वीणा) हे एक तंतू वाद्य आणि बांबूवर बसविलेल्या चौदा तारांचे झिथर ह्या वाद्यांची भर पडून चिनी संगीत या काळात समृद्ध झाले.
चिनी विज्ञानातही काही महत्त्वाचे शोध लागले. छायायंत्र, छायाशंकू, पाणघड्याळ इ. यंत्रे सर्वत्र वापरात आली. तत्कालीन ज्योतिर्विदांनी पंचांग सुधारणेचे काम हाती घेतले. त्यांनी दिवसाचे शंभर भाग पाडले. २८ नक्षत्रे, विषुवदिन व अयनदिन निश्चित करून वर्षात ३६५ ३८५/१५३५ दिवस असतात असे गणित मांडले. तथापि १६४४ साली एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाने त्यात सुधारणा केली व त्याला राजमान्यता मिळाली. या शास्त्रज्ञांनी तयार केलेले पंचांग चीनमध्ये १९२७ पर्यंत व्यवहारात होते. चिनी शास्त्रज्ञांनी क्रांतिवृत्ते आणि त्यांचा कल यांचे निरीक्षण करणारी यंत्रे तयार केली. इ.स.पू. २८ पासून त्यांनी सूर्यावरील डागांची नोंद घेतलेली दिसते. १३२ मध्ये एका शास्त्रज्ञाने भूकंपनोंदयंत्र तयार केले. एकंदरीत चिनी शास्त्रज्ञांचा भर प्रत्यक्ष निरीक्षण व चिकित्सक वृत्ती यांवर असल्याने तत्कालीन यूरोपीय देशांपेक्षा चिनी विज्ञान पुष्कळच पुढे गेले होते.
       वास्तुकला, मूर्तिकला व चित्रकला पुष्कळच प्रगत असल्याचे तत्कालीन चकचकीत मृदापात्रे व चिनी मातीची भांडी यांच्या अवशेषांवरून आणि उपलब्ध ग्रंथांतील वर्णनांवरून दिसते. शेतीविषयक सुधारणाही आढळतात. नांगरट, पेरणी, खुरपणी इत्यादींसंबंधी शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी शासकीय तज्ञ होते. कमी पाण्यात टिकून राहणारा तांदूळ, एकाच शेतात दोन पूरक पिके घेणे, बांबू, फळझाडे, भाजीपाला इत्यादींसाठी टेकड्यांच्या उतारांचा उपयोग करणे इ. विविध प्रयोग होऊन चीनच्या कृषी उत्पादनात या काळात पुष्कळ वाढ झाली. कोंबडा व अन्य प्राण्यांच्या झुंजी, कुत्र्यांच्या शर्यती, तिरंदाजी, मासेमारी व शिकार, निरनिराळ्या कसरती, रथांच्या शर्यती, पायचेंडू, सस्सीखेच, संगीत व नृत्य, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ इ. क्रीडा आणि करमणुकीचे प्रकार तत्कालीन चीनमध्ये रूढ होते.
      एकंदरीत या काळात सर्व क्षेत्रांत चीनने प्रगती केल्यामुळे पुढे चिनी लोक हान पुत्र म्हणवून घेऊ लागले. अजूनही चिनी लोक स्वतःला हान आणि चिनी भाषेला हान भाषा असे म्हणतात.
       हान साम्राज्याच्या अस्तानंतर अंतर्गत यादवीत वै राज्याच्या महामंत्र्यांचा मुलगा स्स-मायेन याने फायदा घेतला. २६५ मध्ये त्याने वैच्या राजाला पदच्युत करून राज्य बळकाविले आणि २८० साली वू राज्यही गिळंकृत करून ज्यीन साम्राज्याची स्थापना केली. यापूर्वीच शू राज्य वै राज्यात विलीन झाले होते. स्स-मायेन कर्तबगार होता पण ह्यानंतर गादीवर आलेले राजे दुर्बल निघाले व ३१७ मध्ये या ज्यीन राज्याचा व त्यापासून वेगळ्या झालेल्या राज्याचा ४२० मध्ये अस्त झाला.
        यानंतर चीन दक्षिण आणि उत्तर असा विभागला गेला. दक्षिणी राज्याची राजधानी नान-जिंग (दक्षिण राजधानी)  = नानकिंग येथे असून ही राज्ये चिनी लोकांची होती परंतु उत्तरेकडील राज्ये मात्र तुर्की, मंगोल व पश्चिमेकडील तिबेटी वंशीयांची होती. या सर्व मानव गटांना चिनी लोक रानटी समजत पण हळूहळू ह्या रानटी लोकांनी चिनी संस्कृती आत्मसात केली. ज्यीन राज्याच्या अस्तानंतर सु. पंचवीस लहानमोठी राज्ये स्थापन झाली, विस्तारली आणि नष्ट झाली. यांवरून या काळातील यादवीची आणि बेबंदशाहीची कल्पना येते. या परिस्थितीचा फायदा फक्त श्रीमंत जमीनदार वर्गाला मिळाला. ते शिरजोर आणि जुलमी झाले. खरी सत्ता या जमीनदारांचीच अशी या वेळी स्थिती होती.

       बौद्धांचे अनेक विचार व त्यांच्या समजुती यांचा ताओ पंथावर पुष्कळ प्रभाव पडला व उभयतांच्या मिलाफाने सामान्य चिनी माणसात अनेक नवे आचारविचार रूढ झाले. राजकीय बेबंदशाहीच्या या काळात बौद्धांची व ताओ पंथीयांची अनेक प्रार्थनास्थळे विकास पावली व पुरोहितांची श्रेणीवार संघटना कार्य करू लागली. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर मूळ बौद्ध ग्रंथाचा अभ्यास करण्याची इच्छाही प्रबळ झाली व २०० ते ६५० च्या दरम्यान सु. ऐंशी धर्मजिज्ञासू निरनिराळ्या मार्गांनी हिंदुस्थान यात्रा करून आले. यांच्यापैकी फाहियान (फा-स्यन), ह्यूएनत्संग (स्युआन् जांग) यांसारख्यांच्या प्रवासवृत्तांवरून तत्कालीन चिनी व भारतीय समाजांची माहिती मिळते.
       या चार शतकांत सांस्कृतिक विकासाची गती मंदावली परंतु भारत-चीन संबंधांमुळे भारतीय संगीताचा चिनी संगीतावर प्रभाव पडला व अनेक संस्कृत शब्द चिनी भाषेत अपभ्रंश होऊन रूढ झाले. चिनी किमयागारांच्या चिकाटीच्या प्रयोगामुळे अनेक औषधी वनस्पतींचा व रंगांचा शोध लागला. धातुविज्ञानात पुष्कळ प्रगती झाली व शोभेची दारू सर्वत्र वापरात आली. रहाटगाडगे, हातगाडी, मेणा, खेळण्याचे फासे, चहा इत्यादींचा या काळातच चिनी समाजात प्रवेश झाला.
       स्वै वंश : (५८९ – ६१८). चारशे वर्षांच्या बेबंदशाहीनंतर स्वै राज्याचा संस्थापक, उत्तरेकडील एका राज्याचा मंत्री यांग ज्यन याने चीनचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित केले. तो गाव जू किंवा स्वै वन डि या नावाने प्रसिद्ध आहे. बालपणी एका बौद्धधर्मी दाईने त्याला सांभाळले. याची पत्नीही बौद्धधर्मी होती. साहजिकच गादीवर आल्यावर याने बौद्ध धर्माला उत्तेजन दिले. स्वै वन डि व त्याचा मुलगा यांग ग्वांग् उर्फ यांग डि (पित्याचा खून करून यांग डि गादीवर आला असे म्हणतात) याने चीनी साम्राज्याचा विस्तार केला. अनाम काबीज करून तेथे चिनी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या कालखंडात कोरियावर तीन स्वाऱ्या झाल्या. मँचुरिया, सिक्यांग आदी प्रदेशांवरही चिनी सेना पाठविण्यात आल्या.



      वन डिने जुन्या चांगान शहराजवळ नवे शहर वसविले. योजनापूर्वक वसविलेले हे पहिले चिनी शहर होय. उद्‌ध्वस्त लोयांग शहरही पुन्हा वसविण्यात आले. यांगत्सीच्या काठावर आधुनिक यांगजोजवळ यांग डिने तिसरे राजधानीचे शहर वसविले. याच काळातील राजकालव्याची दुरुस्ती व विस्तार करवून शिवाय तीन नवे कालवे खोदविले. त्याने कृषिउत्पादन वाढीस व व्यापारवृद्धीस मदत झाली. स्वै शासकांनी विद्याप्रसाराकडे विशेष लक्ष दिले. बौद्ध धर्मास मिळालेल्या आश्रयामुळे सर्वत्र बौद्ध मंदिरे बांधण्यात येऊन त्यांत बुद्ध मूर्तींंची प्रतिस्थापना केली. शासकीय सेवा परीक्षा पद्धतीत सुधारणा करून सर्वत्र केंद्रीय सत्तेस जबाबदार अधिकऱ्यांची नियुक्ती झाली. डळमळीत अर्थकारणामुळे सर्वत्र असंतोष फैलावला आणि बंडाळी माजली. ६१८ मध्ये यांग डिचा खून झाला. त्यानंतर त्याचे दोन नातू लागोपाठ गादीवर आले परंतु त्यांपैकी पहिल्याचा खून झाला आणि दुसऱ्याला राजत्याग करणे भाग पडले व लवकरच थांग सरदार ली युआन याने गादी बळकावली.
थांग वंश : (६१८ – ९०६).
         या वंशाचा संस्थापक ली युआन याने आपला मुलगा ली शृ-मीन याच्या मदतीने सर्व विरोधकांचा निकाल लावला आणि देशातील दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. शेत जमिनी बड्या जमीनदारांच्या हाती केंद्रित होऊ नयेत, म्हणून लहान जमिनींच्या विक्रीवर निर्बंध घातले. शेवटी राज्य ली शृ-मीनच्या स्वाधीन करून ६१८ मध्ये ली युआन निवृत्त झाला. ली शृ-मीनची आई तुर्की होती. ली शृ-मीनला थांग थाय-जुंग, या नावानेही ओळखतात. थाय-जुंग, गाव-जू हे सर्व किताब राजाच्या मृत्यूनंतर दिले गेले. तो योद्धा व कुशल प्रशासक होता. लष्करात त्याने अनेक सुधारणा करून सैन्य विशेषतः घोडदळ, नवीन शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. साम्राज्याच्या उत्तर व पश्चिम भागांतील बंडखोर तुर्की टोळ्यांविरूद्ध त्याने आक्रमक धोरण स्वीकारले. चीनच्या भिंतीपलीकडे जाऊन सामदामादी सर्व उपायांनी त्याने तुर्की मुलूख चिनी साम्राज्यास जोडला आणि त्या मुलखात तो स्वतःला खान म्हणवून घेऊ लागला. त्यानंतर त्याने पश्चिमेकडील तुर्की टोळ्यांचा बंदोबस्त केला आणि त्यांच्यापैकीच उइघर टोळीवर गोबी वाळवंटाच्या परिसरातील मुलखाच्या बंदोबस्ताचे काम सोपविले. पूर्व मंगोलीया आणि दक्षिण मँचुरियातील खोतांनी मंगोलांनाही शरणागती पतकरावयास लावली. तारीम खोऱ्यातील काही टोळ्यांनी थांग सत्तेचे मांडलिकत्व स्वीकारले. कॅश्‌गार, यार्कंद, बूखारा, समरकंद येथील सत्ताधीशांनीही चिनी अधिराज्य मान्य केले. याच काळात चीन-तिबेट संघर्ष सुरू झाला. त्यात तिबेटची पीछेहाट झाली. त्यानंतर चिनी राज्यकन्येचा तिबेटच्या राजाशी विवाह झाला. आणि चिनी रीतीरिवाज व बौद्ध धर्म यांचा तिबेटी लोकांनी स्वीकार केला. थांग थाय-जुंगच्या कारकीर्दीत हिंदुस्थान व आग्नेय आशियातील कित्येक देशांना चिनी राजदूतांनी भेटी दिल्या. थांग थाय-जुंगने उत्तर कोरियावरही स्वारी केली, पण तीत त्याचा पराभव झाला.
ग्वान् यीन् देवतेचे चित्र, सु. १० वे शतक.
ग्वान् यीन् देवतेचे चित्र, सु. १० वे शतक.
मातीचा अलंकृत कुंभ इ. स. सु. ७ वे - ९ वे शतक.
मातीचा अलंकृत कुंभ इ. स. सु. ७ वे - ९ वे शतक.
घुबडाची ब्राँझ मूर्ती, इ. स. पू. सु. १४००.
घुबडाची ब्राँझ मूर्ती, इ. स. पू. सु. १४००.
नूतनवर्षारंभीच्या लोकोत्सवातील दृश्य
नूतनवर्षारंभीच्या लोकोत्सवातील दृश्य
प्राचीन फांगश्येन लेणीपरिसरातील वैरोचन बुद्धमूर्ती (उंची सु. १६ मी.), लुंगमन, इ. स. पू. ६७२.
प्राचीन फांगश्येन लेणीपरिसरातील वैरोचन बुद्धमूर्ती (उंची सु. १६ मी.), लुंगमन, इ. स. पू. ६७२.
प्राचीन राजवाडा, पीकिंग (फॉरबिडन सिटी)
प्राचीन राजवाडा, पीकिंग (फॉरबिडन सिटी)
           थांग राजांनी स्वैकालीन राज्यव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. तथापि राज्यव्यवस्थेची विस्कळित घडी ठीक बसविली आणि कित्येक नवीन राज्यसंस्था निर्माण केल्या. या सर्व संस्थाचा आदर्श पुढील संस्थानी गिरवला. या मंडळात निरनिराळ्या मंत्रालयांचे प्रतिनिधी व काही प्रतिष्ठित गृहस्थ असत. शासकीय सल्लागार मंडळाशी चर्चा करून सम्राट निर्णय घेई.


       साम्राज्याचे १० दाव म्हणजे विभाग, दावचे जौ म्हणजे जिल्हे व जौ चे स्यन म्हणजे उपजिल्हे पाडून प्रत्येकावर मध्यवर्ती सरकारला जबाबदार असलेले अधिकारी नेमत. याशिवाय दुष्काळ, आकस्मित जलप्रलय वगैरेंची राजधानीला विनाविलंब माहिती देण्यासाठी स्वतंत्र आयुक्त नेमलेले असत. साम्राज्यातील विविध जमातींच्या मुलखांवर संबंधित जमातींतील प्रमुख व्यक्तींचीच अधिकारपदावर नियुक्ती होई पण त्यांना चिनी शासकीय हुद्दे दिले जात.
      थांग थाय-जुंगने शेतीला उत्तेजन दिले. दुष्काळात गरिबांना अन्न मिळावे आणि शेतकऱ्यांना बी-बियाण्याचा पुरवठा व्हावा, म्हणून ठिकठिकाणी धान्याची शासकीय कोठारे बांधण्यात आली.
        शासकीय सेवाकार्यास विद्याविभूषित उच्च अधिकारी वर्ग लाभावा, म्हणून थांग थाय-जुंगने चांगान येथे विद्यापीठ स्थापन केले. त्यात साहित्य, इतिहास, विधी, गणित, इ. विषय शिकविले जात. उच्च शिक्षणास विद्यार्थी सतत यावेत, म्हणून प्रांतोप्रांतीही विद्यालये स्थापन केली. चांगान विद्यापीठात पदवीधरांची एक यादी ठेवीत. त्यातील अनुक्रमानुसार पदवीधरांना नोकऱ्या देत. सुसंघटित शिक्षणपद्धतीमुळे परदेशाचे विद्यार्थीही चीनमध्ये विद्याभ्यासास येत. त्यामुळे आसपासच्या देशांत चिनी संस्कृतीचा प्रसार होई.
     थांग थाय जुंगने चिनी कायद्यांची नवी संहिता तयार केली आणि चीनमध्ये स्थायिक झालेल्या परदेशीयांबाबत अनेक नियम केले.


     थांग थाय-जुंगनंतर त्याचा मुलगा गाव जुंग (६४९ – ८३) गादीवर बसला. गादीवर येताच त्याने कोरियाचा काही भाग जिंकून घेतला व पश्चिमेकडे ऑक्सस नदीपर्यंतचा मुलूख चिनी साम्राज्यास जोडला व त्यामुळे नवोदित अरबी साम्राज्यप्रसाराला काही काळ पायबंद बसला परंतु लवकरच नुकताच जिंकलेला कोरियातील मुलूख त्याने गमावला. तिबेटी लोकांनीही तारीम खोऱ्यात आपले बस्तान पुन्हा बसविले व मंगोलियातील तुर्की टोळ्यांनीही गाव जुंगला त्रस्त केले. गाव जुंगने हान काळात प्रचलित असलेल्या फंग व शान या पूजाअर्चा पुन्हा सुरू केल्या. त्याने बौद्ध धर्माच्या प्रसाराला मदत केली आणि अनेक बौद्ध मठ बांधले.
कालांतराने गाव जुंग राजा सम्राज्ञी वू हिच्या तंत्राने वागू लागला. तिने गाव जुंगच्या पत्नीचा खून करविला आणि राज्यकारभाराची सूत्रे स्वतःकडे घेतली. गाव जुंगच्या मृत्यूनंतर तिने त्याच्या दोन मुलांना बाजूस सारून स्वतःच्या जौ वंशाची स्थापना केली व आपल्या मर्जीतील पुरुषांच्या मदतीने राज्यकारभार चालविला. शेवटी ७०५ मध्ये काही असंतुष्ट सरदारांनी तिला पदच्युत केले व गाव जुंगच्या एका मुलास गादीवर बसविले. हा मुलगा अगदीच दुर्बळ होता व सर्व सत्ता त्याच्या पत्नीच्याच हाती होती. शेवटी ७१२ मध्ये राजास पदच्युत करून स्युआन जुंग ऊर्फ मिंग ह्‌वांग हा गादीवर बसला. त्याने ७५६ पर्यंत राज्य केले. त्याने तुर्की, तिबेटी व अरब लोकांचा पराभव करून चिनी साम्राज्याचा पुन्हा विस्तार केला. परंतु ७५१ मध्ये अरबांनी त्याचा निर्णायक पराभव केल्याने साम्राज्याच्या पश्चिम भागातील बराच मुलूख त्यास सोडावा लागला. आपल्या कारकीर्दीच्या शेवटी मिंग ह्‌वांग मंत्री ली लीन फू व रखेली यांग ग्वै-फै यांच्या तंत्राने वागू लागला. या दोघांच्या स्वार्थी कारवायांनी सर्वत्र असंतोष पसरला व राज्यात अनेक बंडे झाली. त्यांपैकी आन लु-शान ह्या तुर्की बंडखोराने तर सम्राटपदही धारण केले. पुढे आन लु-शानचा वध झाला व थांग सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली. पण साम्राज्यास पूर्वीचे वैभव आणि स्थिरता लाभली नाही. राज्यभर बंडे उद्‌भवली आणि बंडखोरांवर विजय मिळणाऱ्या सेनापतींना स्वतंत्र जहागिऱ्या देऊन त्यांच्या मदतीने साम्राज्य सावरून धरण्याचा उपक्रम सुरू झाला. शेवटी ९०७ मध्ये जू वन ह्या सरदाराने शेवटच्या थांग राजाला पदभ्रष्ट करून ल्यांग राजवंशाची स्थापना केल्याने थांग साम्राज्य अस्तास गेले.
       ख्रिस्ती धर्म, विशेषतः नेस्टोरियन पंथ, इस्लाम, मॅनिकेझम, इ. धर्म ह्या काळात चीनमध्ये पसरू लागले. थांग युगात कन्फ्यूशस पंथ व बौद्ध धर्म यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. थांग सम्राटांचे उदार धार्मिक धोरण व बौद्ध धर्माला मिळणारा त्यांचा आश्रय यांना कन्फ्यूशस पंथी चिनी नोकरशाहीचा विरोध होता. करमुक्ती व लष्करी सेवेतून सूट ह्या बौद्धधर्मींयांना मिळणाऱ्या सवलती यांच्या डोळ्यात खुपणे साहजिक होते. बौद्ध मठांची संघटना, त्यांची शासनव्यवस्था म्हणजे राज्यसंस्थेच्या अधिकारावरील आक्रमण असे कन्फ्यूशस पंथीयांना वाटे आणि बौद्ध धर्मीयांच्या सवलती रद्द करण्याची ते सतत मागणी करीत. शेवटी मिंग ह्‌वांगच्या मृत्यूनंतर त्यांच्या या प्रयत्नास यश आले. परिणामतः सु. अडीच लक्ष भिक्षु-भिक्षुणींना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला व बौद्धधर्मीयांवर लक्ष ठेवण्याचे काम एका खास खात्याकडे सोपविण्यात आले.
     थांग साम्राज्याच्या किंबहुना सर्वच चिनी साम्राज्यांच्या विघटनाच्या कारणापैंकी कन्फ्यूशस पंथी नोकरशाहीच्या स्वार्थी कारवाया हे एक आहे. नोकरशाहीत बड्या जमीनदारांच्या आप्तेष्टांचा भरणा असे. कारण नोकरशाहीत प्रवेश मिळविण्यासाठी लागणाऱ्या शिक्षणाचा खर्च यांनाच परवडण्यासारखा असे. व्यापारी, जमीनदार व सरकारी अधिकारी यांच्या युतीमुळे प्रशासनात भ्रष्टाचार माजे, सामान्य नागरिकांत असंतोष पसरे व राज्यक्रांतीला पोषक वातावरण नेहमीच तयार होई.

        सांस्कृतिक-दृष्ट्या थांगकाळ अतीव वैभवाचा होता आणि याचा चिनी लोकांना अजूनही अभिमान आहे. या काळात जपान, कोरिया इ. देशांत चिनी राज्यपद्धत आणि संस्कृती रुजली व गणित, ज्योतिष, वैद्यक, वगैरे विषयांत चिन्यांनी पुष्कळ प्रगती केली. साम्राज्यविस्ताराबरोबर व्यापारवृद्धी होऊन देशाच्या वैभवात भर पडली. रेशीम, चिनी मातीची सुबक व डौलदार घाटाची भांडी आणि अन्य कलात्मक वस्तू देशोदेशी निर्यात होऊन त्या बदली हस्तिदंत, सुवासिक पदार्थ, तांबे, गव्याची शिंगे, कासवाची कवची इ. चीनमध्ये आयात होऊ लागली तसेच इतर देशांतून द्राक्षापासून दारू (इराणकडून) आणि उसापासून साखर करण्याचे तंत्र चिन्यांनी उचलले. पालक, लसूण, वाटाणा, मोहरी ही पिके आणि प्रकाशीय भिंगे चीनमध्ये ज्ञात झाली. या काळात वास्तुशिल्पाला बहर आला. सर्वश्रेष्ठ चिनी निसर्गचित्रकार वू दावस्युआन, त्याचा मित्र वांग वै, प्रसिद्ध अश्वचित्रकार हान गाने ली, युवानचा नातू ली सू सन लीस्स-स्युन व पणतू ली जाव-दाव तसेच धार्मिक व ऐतिहासिक विषयांवर चित्रे काढणारे येन ली-द, येन ली-नब बंधू, हे थांगयुगीन चित्रकार विख्यात आहेत. विविध विषयांतील निबंध, धर्मग्रंथ, ज्ञानकोश वगैरेवरून तत्कालीन साहित्यातील प्रगती दिसते. मुद्रणकलेचाही या काळात विकास झाला. जगाला ज्ञात असलेला आद्य मुद्रीत ग्रंथ वज्रसूत्र  याच काळातील आहे.
     थांगकाळ म्हणजे चिनी काव्याचे सुवर्णयुग. प्रासादिक, अकृत्रिम व आटोपशीर रचना ही या काळातील काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये सु. पन्नास हजार कवितांवरून तसे म्हणता येते. तत्कालीन सु. तीन हजार प्रसिद्ध कवींत ली बाय किंवा ली बो आणि दू फू हे मिंग ह्‌वानच्या दरबारातील श्रेष्ठ कवी मानले जातात.
अराजकांचे अर्धशतक : (९०७ – ६०).
          थांग साम्राज्यानंतर अराजक माजले. दरोडेखोरांच्या टोळ्या देशभर धुडगूस घालू लागल्या आणि त्यामुळे सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. थांग सत्तेच्या अस्तानंतर सु. अर्ध्या शतकात हल्यांग, होव थांग, ह जिन, ल्यौ जृ-युआन व होव जौ ही पाच घराणी उत्तर चीनमध्ये उदयास आली व लयास गेली. ह्यांपैकी बहुतेक घराणी तुर्क, मंगोल वगैरे परदेशी जमातींची होती. दक्षिण चीन हा दहा संस्थानांत विभागला होता. यांपैकी काही संस्थानिक स्वतःला वांग (राजा) व काही डि (सम्राट) म्हणवीत.
      विघटित स्थिती व अकार्यक्षम प्रशासन यांमुळे शासनाचा वचक कोठेच राहिला नाही. शिवाय नैसर्गिक आपत्तींची या बेबंदशाहीला मदतच झाली. या अराजक काळात जमीनदारांची प्रतिष्ठा वाढली. श्रीमंतांचे चोचले वाढले. बौद्ध धर्माची पकड ढिली झाली. वू युए वगैरे काही राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्माला आश्रय दिला, म्हणून तो कसाबसा चीनमध्ये टिकून राहिला.
       मुद्रणकलेचा प्रसार बौद्ध भिक्षूंनी बौद्धधर्मीय सूत्रे जनतेत प्रसृत करण्यासाठी केला. या अराजकाच्या काळात मुद्रणकला मात्र चीनभर पसरली. या काळात मुद्रीत झालेले कन्फ्यूशसचे ग्रंथ, ताओ पंथीयांची पुस्तके, त्रिपिटकासारख्या बौद्ध धर्मावरील पुस्तकांच्या शेकडो उपलब्ध प्रतींवरून तत्कालीन मुद्रणाप्रसाराची कल्पना येते. येथूनच मुद्रणकला जपान, कोरिया इ. देशात पसरली व त्या त्या देशात चिनी संस्कृतीचा प्रभाव वाढला.
     सुंग घराणे : (९६० – १२७९).
       जौकाळातील सेनापती जाव स्वांग यीन याने गेल्या अर्धशतकाच्या बेबंदशाहीचा अंत केला. आपल्या लष्कराच्या आग्रहावरून थाय-जू (आद्य पुरुष) हे नाव धारण करून तो गादीवर बसला व चीनमध्ये सुंग घराण्याची राजवट चालू झाली. ११२६ ते ११३५ हा रुर्जन (रुर्जड) टोळीच्या ताब्यात राजधानी असल्याचा काळ सोडून सुंग सत्ता १२६९ पर्यंत टिकली. सुंग थाय-जू (९६० – ७६) याने दहा राज्यांपैंकी बरीच जिंकून सुंग सत्तेचा विस्तार केला व प्रशासनाची घडी नीट बसविली. प्रांतांची स्वायत्तता कमी करून त्याने केंद्रसत्तेला जबाबदार असलेल्या नोकरशाहीच्या हाती राज्यकारभार सोपविला. लष्करी अधिकाऱ्यांना शासनात लुडबुड करू दिली नाही. त्याने कन्फ्यूशसप्रणीत शिक्षणपद्धतीला उत्तेजन दिले व पूर्वीच्या पद्धतीनुसार शासकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच सेवा कार्यात घेण्याची प्रथा पाडली.
      सुंग थाय-जूनंतर त्याचा भाऊ थाय जुंग (९७६ – ९७) व त्याचा वारस जन जुंग (९९७ – १०२२) यांनी सुंग साम्राज्याचा पुष्कळ विस्तार केला परंतु देशाच्या उत्तर व ईशान्य भागांतील खोतान, रुर्जन व तुंगूस, वायव्य भागातील तांगुट व मंगोल तसेच दक्षिणेकडे नान जाव टोळ्यांच्या स्वाऱ्यांनी सुंग सत्ता त्रस्त झाली. शेवटी सम्राट जन जुंगने खोतानांना दरवर्षी सु. ३,००० किग्रॅ. चांदी व दोन लक्ष रेशमाचे तागे खंडणी देण्याचे कबूल केले. पुढे अशाच प्रकारे त्याला तागुंट सत्तेलाही खंडणी द्यावी लागली. कालांतराने सम्राट ह्‌वै जुंग खोतानाविरुद्ध बंड करणाऱ्या रुर्जनांना लष्करी साहाय्य करू लागला व खोतांनाना अशा प्रकारे शह देण्याचा त्याने प्रयत्न केला, तेव्हा खोतानांची पीछेहाट झाली पण रुर्जन शिरजोर झाले. ह्‌वै जुंगच्या मुलाने त्यांना थोपविण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी रुर्जनांनी राजधानी व्यन ल्यांग काबीज केली व राजकुटुंबास कैद केले. पण एवढ्याने सुंग राजवटीचा अंत झाला नाही. ह्‌वै जुंगचा एक मुलगा गाव जुंग रुर्जनांच्या कैदेतून निसटला व त्याने हल्लीच्या हांगजोजवळ लिन-आन येथे दक्षिणी सुंग सत्तेची स्थापना केली, तरीही सुंग-रुर्जन संघर्ष चालूच राहिला. स्वतः गाव जुंग विलासात मग्न राहू लागला पण त्याचा सेनापती यो फैने रुर्जनाविरुद्ध लढा चालू ठेवला. यो फैचे आक्रमक धोरण शांततावादी महामंत्री जिन ग्वैला पसंत नव्हते. त्याच्या सल्ल्यानुसार गाव जुंगने यो फैला फाशी दिले व रुर्जनांशी तह केला. या तहाने ह्‌वाय नदीच्या उत्तरेकडील सर्व मुलूख व भली मोठी वार्षिक खंडणी रुर्जनांना मिळाली. यानंतरही उत्तर व दक्षिण चीनमध्ये निरनिराळ्या टोळ्यांतील संघर्ष चालूच राहिला. या संघर्षातूनच पुढे चीनमध्ये मंगोल साम्राज्याचा उदय झाला.
      सुंग घराण्याच्या इतिहासात सम्राट शन-जुंगचा महामंत्री वांग आन शृ याला मानाचे स्थान द्यावे लागते. सामान्य नागरिकांच्या देशभक्तीला आणि राजनिष्ठेला आवाहन केल्याशिवाय व भाडोत्री धंदेवाईक लष्करावर अवलंबून न राहता राष्ट्रीय वृत्तीचे नागरिक दल उभारल्याशिवाय देशाला शांतता लाभणारी नाही, हे जाणून वांग आन-शृने व्यावहारिक पण क्रांतिकारक सुधारणांची एक योजना आखली, ही ‘स्यीन फा’ म्हणजे नवे कायदे या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.
       शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी वांगने शेतसारा कमी केला व पैशाऐवजी धान्यरूपाने तो सरकारात भरण्याची सवलत दिली. शेतसारा चुकविता येऊ नये व न्याय्य सारा आकारला जावा, म्हणून जमीनीची तपासणी केली. ठिकठिकाणी धान्य कोठारे बांधून बी-बीयाणाची व्यवस्था केली. प्रांतोप्रांतीच्या अधिकाऱ्यांकडे धान्य विकण्याचे अधिकार दिले. त्यामुळे भाव स्थिर राहण्यास मदत झाली. वेठबिगार बंद करून संपत्तीच्या प्रमाणात कर लावण्याचे तत्वही स्वीकारण्यात आले. एका खास आयोगाद्वारे सर्व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला, त्यामुळे अनावश्यक चलन फुगवटा किंवा चलन संकोच होणार नाही. अशी दक्षता घेतली तेव्हा भ्रष्टाचाराला आळा बसला.

      भाडोत्री लष्कर कमी करून सर्वत्र नागरिक दले उभारली व स्थानिक संरक्षणाची व्यवस्था त्यांच्याकडे सोपविली. प्रत्येक कुटुंबामधून एक तरूण सैन्यात भरती करून घेऊन त्यास लष्करी शिक्षण दिले. अशा प्रकारे सुरक्षादल उभे केले. लष्कराला घोडदळाची आवश्यकता आहे, म्हणून एक घोडा प्रत्येक कुटुंबाला उपलब्ध झालाच पाहिजे, असा कायदा केला. त्यामुळे नवे घोडदळ तयार झाले. प्रशासनासाठी चांगला सेवक वर्ग निर्माण व्हावा, म्हणून सेवापरिक्षा सुरू केल्या. त्यांत व्यवहारज्ञानाला आवाहन करणाऱ्या मार्मिक प्रश्नपत्रिका कटाक्षाने काढाव्यात, अशा सूचना सर्व परिक्षकांना दिल्या होत्या. या परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांसाठी योग्य विद्यालये स्थापन केली, वांग आन-शृंने सार्वत्रिक निःशुल्क शिक्षणाचा पुरस्कार केला.
      वरील सुधारणांना सावकार, व्यापारी, जुन्या पिढीतील शासकीय सेवक आदी प्रस्थापित हितसंबंधियांनी आणि वांगच्या विरुद्ध असलेल्या मंत्र्यांनी कसून विरोध केला व वांग आन-शृविरुद्ध अनेक कट रचले. परिणामतः १०७५ मध्ये त्याला त्यागपत्र देणे भाग पाडले. पुढे त्याचा शत्रू इतिहासकार स्स-मा ग्वांग याच्या शिफारशीवरून वांग आन-शृच्या सर्वच सुधारणा रद्द केल्या. वांग आन-शृ अधिकारपदावर असेतोपर्यंत देशात शांतता व सुव्यवस्था होती, धान्यधुन्य स्वस्त व मुबलक होते व सामान्य प्रजाजन सुखी होते, असे तत्कालीन कागद पत्रांवरून दिसते.
सुंगकाळात कन्फ्यूशस पंथाचा खूप प्रसार झाला. पण ताओमत व बौद्ध धर्म ह्यांच्या प्रभावाने बाह्य जगापासून अलिप्त राहून आत्मचिंतनाद्वारे विश्वाची गूढ तत्त्वे उकलण्याची धडपड, आध्यात्मिक विषयांत गोडी व आकस्मिक दिव्य दृष्टीने ज्ञानप्राप्ती वगैरे तत्त्वांचा कन्फ्यूशसवाद्यांनी या काळात स्वीकार केला. सुंगकाळानंतर हू युआन, स्वुन फू, औयांग स्यौ, शाव यांग, जू स्यी वगैरे तत्त्ववेत्त्यांच्या प्रचाराने या नवकन्फ्यूशस पंथांचा चीनंमध्ये सर्वत्र स्वीकार झाला. यामुळे चीनी तत्त्वज्ञानामध्ये आध्यात्मिक विचाराचा प्रवेश झाला. तत्पूर्वी कन्फ्यूशसवाद हा फक्त नीतितत्त्वावर आधारलेला होता. ताओमताच्या प्रभावाने हे नवकन्फ्यूशसवादी तत्त्वविवेचक सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांत शासनाचा हस्तक्षेप नसावा, असे मत प्रतिपादन करू लागले. त्यामुळे भांडवलदार-जमीनदार यांचे वर्चस्व वाढण्यास मदत झाली. तसेच नवकन्फ्यूशसवाद्यांनी संशोधनाचे क्षेत्र नीतिशास्त्रापुरतेच मर्यादीत असावे, असा प्रचार केल्याने विज्ञान व तंत्र या विद्यांची पीछेहाट झाली. प्राचीन आचारविचारांना व परंपरांना अवास्तव महत्त्व दिल्याने नवे प्रयोग व नवे उपक्रम त्याज्य ठरले व समाजाची प्रगती खुंटली.

     सुंगकाळात काव्य, निबंध व इतिहास यांना बहर आला. स्स-मा ग्वांगच्या ज जृ थुंग् ज्यन्  ह्या इतिहासग्रंथात इ.स.पू. पाचव्या शतकापासून इ.स. ९८० पर्यंतच्या पाच राजवंशांचा इतिहास असून तत्कालीन इतिहासग्रंथांत त्यास अग्रस्थान देतात. जंग च्याव हा त्या काळातील दुसरा ख्यातनाम इतिहासकार. त्याचा थुंग् जृ  हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय चिनी इतिहासाच्या निरनिराळ्या कालखंडावर व विशेष प्रसंगांवर अनेक लहानमोठी पुस्तके लिहिली गेली आहेत.
      प्रसिद्ध प्राचीन ग्रंथाच्या आधारे निरनिराळ्या विषयांची माहिती एकत्र करून ज्ञानकोश संपादित करण्याचे दोन विख्यात प्रयत्न या काळात झाले. पैकी थाय्-फींग-यू लानचे हजार खंड असून त्यासाठी सातशेवर ग्रंथांचा आधार घेतल्याचे नमूद केले आहे. सू शृ हा तत्कालीन कवी, प्रख्यात तत्वज्ञानी व कला टीकाकारही होता. ज्योतिष, वैद्यक, वनस्पतीशास्त्र, गणित इ. विषयांवरही काही चांगले ग्रंथ या काळात प्रसिद्ध झाले. देवी काढण्याची प्रथा हा या काळातील एक महान वैद्यकीय शोध होता.
   होकायंत्र, बंदुकीच्या दारूचा युद्धात उपयोग व ठशांचा लाकडी ग्रंथमुद्रणात उपयोग, हे ह्या काळातील प्रसिद्ध वैज्ञानिक शोध होत. दगडावर कोरलेले नकाशे, गणित करण्याची गोटीचौकट, फरशीची जमीन, बैठकीच्या खुर्च्या इ. या काळात प्रचारात आल्या, पत्ते, फासे, सोंगट्यांचा खेळ इ. क्रीडाप्रकारही याच वेळी रूढ झाले.
      चिनी मातीची रंगीत सुबक भांडी तसेच निसर्ग चित्रकला यांमुळे सुंगकाळाचा सुवर्णयुग असा गौरव होतो. उंच पर्वतशिखरे,जलप्रवाह, धुके व्याप्त डोंगर, हिरवीगार रानेवने इत्यादींच्या चित्रांवरून तसेच पाने, फुले, विविध प्राणी यांच्या नाजुक रेखाटनांवरून या काळातील ग्वो जुंग, ग्वो स्यी, ली लूंग-म्यन, मी फै, स्या ग्वै, मा युआन इ. चित्रकारांच्या रंगमिश्रणाची व रेषातंत्रातील बिनचूकपणाची कल्पना येते.
        या काळाच्या पूर्वीपासूनच चीनवर खोतान, तांगुट आणि रुर्जन लोकांच्या स्वाऱ्या होऊ लागल्या होत्या. सुंग सत्तेला या टोळ्याशी सतत मुकाबला करावा लागला. यांच्याशी सतत चालणाऱ्या संघर्षामुळे सुंग सत्ता अखेर खिळखिळी झाली व मंगोलांच्या आक्रमणाला बळी पडली. कालांतराने ह्या टोळ्या चिनी समाजात मिसळून गेल्या आणि चिनी जीवनावर त्यांचा काही प्रभाव पडला. साधारण सातव्या-आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत चीनच्या विविध भागांत यांची राज्ये होती.


        चौथ्या शतकात खोतान लोक स्यन-फी नावाने ओळखले जात. ह्या खोतान टोळ्यांनी आग्नेय मंगोलियातून पुढे सरकून दहाव्या शतकाच्या पूर्वार्धात ल्यावदुंग विभागात आपले राज्य स्थापन केले. खोतानांच्या ह्या ल्याव राज्याचा सुंग सत्तेशी संघर्ष झाला व शेवटी सुंग सम्राटांनी वार्षिक खंडणी देऊन यांच्याशी तह केला. खोतांनाच्या स्वतःच्या दोन लिप्या प्रचारात होत्या. पण पुढे त्यांनी चिनी रीतीभाती व शासनपद्धतीचा स्वीकार केला. खोतानांचे राज्य एके काळी जृ लीच्या आखातापासून मध्ये आशियातील थ्‌यन शान पर्वतापर्यंत पसरले होते. यांच्या सभोवती बोहाय, रूर्जन, तांगुट वगैरे जमातींची राज्ये होती. कोरिया, जपान, अरबस्तान यांच्याशी यांचा संबंध होता. विविध टोळ्यांशी झालेल्या संघर्षाने ल्याव राज्य खिळखिळे झाले व १२११ मध्ये ⇨चंगीझखानाने ते नष्ट केले.
        सुंग राज्यकर्त्यांना तांगुट ह्या तिबेटी टोळीनेही कित्येक वर्षे सताविले. तांगुट ही काहीशी भटकी जमात होती. दहाव्या शतकाच्या शेवटी शेवटी हल्लीच्या कान्सू प्रांतातील त्यांच्या राज्याला खोतानांनी मान्यता दिली. ते स्वतःला स्या म्हणवून घेऊ लागले आणि निंगस्या येथे त्यांनी आपली राजधानी स्थापन केली. खोतानांप्रमाणे यांचाही सुंग सत्तेशी संघर्ष झाला व मध्य आशियातील उइघर टोळ्यांच्या मदतीने सुंग राजांनी तांगुटांचा पराभव केला, तरी त्यांची सत्ता नष्ट झाली नाही. त्यांचा खोतानांशीही संघर्ष झाला. तांगुट लोक मुख्यतः बौद्धधर्मी असले, तरी चिन्यांमुळे त्यांपैकी काहींनी कन्फ्यूशस पंथाचा स्वीकार केला. तांगुटांची स्वतंत्र बोली व स्वतंत्र लिपी होती. त्रिपिटिक  व अन्य बौद्ध ग्रंथ, कन्फ्यूशसचे काही ग्रंथ, तसेच काही ताओमताची पुस्तके इ. तांगुट साहित्य मुद्रित रूपात आजही उपलब्ध आहे. तांगुट लोकांत चिनी, तिबेटी व तार्तार लोकांचे बरेच मिश्रण होते. तेराव्या शतकाच्या प्रारंभी चंगीझखानाच्या स्वाऱ्यांनी तांगुट राजे त्रस्त झाले आणि कालांतराने तांगुटांचे राज्य मंगोलांनी नष्ट केले.
       तुंगुस जमातीपैकी रुर्जन उत्तर चीनच्या काही भागांत आपले बस्तान बसविले होते. हे लोक मूळ सायबीरियात अमूर नदीच्या परिसरातील असून सातव्या शतकापासून त्यांचे चीनशी दळणवळण होते. पुढे त्यांची काही लहान राज्ये अस्तित्वात आली व त्यांनी खोतानांचे मांडलिकत्व स्वीकारले. काही काळाने त्यांनी खोतानांचे वर्चस्व झुगारून दिले व त्यांचा राजा स्वतःला सम्राट म्हणवून घेऊ लागला. त्यांचे साम्राज्य जिन म्हणजे सुवर्ण ह्या नावाने प्रसिद्ध आहे. खोतानांमुळे रूर्जन लोक सुंग सत्तेवरच उलटले व सुंग राजांना ह्यांचे मांडलिकत्वही स्वीकारावे लागले. रूर्जनांनी स्वतःची संस्कृती व शासन पद्धती न सोडताही बौद्ध धर्म, नेस्टोरिअन ख्रिश्चन पंथ व कन्फ्यूशसच्या विचारांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला पण कालांतराने त्यांनी चिनी संस्कृती आत्मसात केली. व तेही चिनी समाजात एकरूप झाले.
मंगोल सत्तेचा उदय व विस्तार : युआन वंश (१२६० – १३६८).
      सुंगांचा तांगुट व रूर्जन टोळ्यांशी संघर्ष चालू असतानाच आशिया व यूरोपमध्ये मंगोलांच्या स्वाऱ्या सूरू झाल्या व मंगोल सत्तेच्या उदयाने दोन्ही खंडांत मोठीच राजकीय उलथापालथ झाली. मंगोलियाच्या उत्तरेला बैकल सरोवराच्या परिसरात मंगोलांच्या अनेक टोळ्या होत्या. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या टोळ्यांनी चंगीझखानाचे नेतृत्व स्वीकारले व किराईट, खोतानादी लोकांचा पराभव करून हल्लीच्या मंगोलियावर तो विश्व सम्राट म्हणून राज्य करू लागला. थोड्याच दिवसांत उइघर व कार्लुक जमातींनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले आणि हल्लीच्या ऊलान बाटोरच्या परिसरात काराकोरम ह्या आपल्या राजधानीतून तो राज्यकारभार करू लागला. लवकरच तांगुटांचे स्यी-स्या राज्य जिंकून आणि रूर्जनांचा पराभव करून त्याचे सुंगच्या चिनी साम्राज्यावर आक्रमण केले.
 

    
      चंगीझच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याचे तीन मुलगे आणि एक पुतण्या यांच्यात विभागले गेले पण लवकरच ॲगदायखानाची प्रमुख म्हणून निवड झाली व चीन जिंकण्याच्या मंगोलांच्या प्रयत्नांना गती मिळाली. ॲगदायनंतर चंगीझचे नातू मंगू व ⇨ कूब्लाईखान  यांनी सुंग सत्ता खिळखिळी करून टाकली. मात्र मंगूच्या मृत्यूनंतर सुंग राजाने मंगोलांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांना वार्षिक खंडणी देण्याचे मान्य करताच कूब्लाईने त्यांच्याशी ताबडतोब तह केला व तो आपल्या मंगोल-स्पर्धकांचा समाचार घेण्यास मोकळा झाला. १२६४ मध्ये आपल्या विरोधकांचा पराभव करून कूब्लाई मंगोलांचा प्रमुख झाला व चीन जिंकण्याचे काम त्याने पुन्हा हाती घेतले. सुंग लष्कराने कित्येक वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही मंगोल आक्रमणाला दाद दिली नाही पण हळूहळू त्यांची पीछेहाट होत गेली व १२७९ मध्ये सुंगांच्या सेनापतीने सम्राटासह समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली व चीनवर युआन (म्हणजे प्रथम किंवा आदी) वंशाची सत्ता स्थापन झाली. रशियापासून चीनच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या कूब्लाईची राजधानी खान बालिक म्हणजे हल्लीचे पीकिंग येथे होती.
       कूब्लाईखान १२९४ मध्ये निधन पावला. त्यानंतर मंगोल साम्राज्य सु. पाऊणशे वर्षे टिकले व त्या अवधीत नऊ सम्राट गादीवर आले. प्रचंड साम्राज्याचा डोलारा सांभाळण्याची यांपैकी कोणातच कुवत नव्हती. देशोदेशींची संस्कृती व चालीरीती स्वीकारल्यामुळे मंगोलांच्या सांस्कृतिक एकतेला तडे गेले. ते इराणादी मध्य आशियाई देशांत इस्लामधर्मी व चीनमध्ये बौद्धधर्मी किंवा कन्फ्यूशस पंथी झाले. वाहतूक व दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, अवाढव्य लष्करी खर्च, तज्जन्य चलन फुगवटा, विशेषतः कागदी चलनांचा फुगवटा व वाढती महागाई, बेसुमार करवाढ इत्यादींमुळे सर्वत्र असंतोष पसरला व त्यामुळे मंगोल साम्राज्य खिळखिळे झाले. गुप्तसंघटनांच्या प्रेरणेने चीनमध्ये बंडाळी माजली. अनेक बंडखोरांपैकी जू युआन-जांग ह्या हलाखीतून स्वत:च्या कर्तबगारीने वर आलेल्या व बौद्ध भिक्षू असलेल्या एका चिनी बंडखोराने १२३६ मध्ये पीकिंग काबीज करून मिंग वंशाची स्थापना केली.



        मंगोलकाळात चिनी व्यापारी व तंत्रज्ञांचा दूरदूरच्या देशांत संचार होऊ लागल्याने चिनी लोकांना आशिया-यूरोप खंडांतील देशांची माहिती झाली आणि त्यांची विचारक्षितिजे विस्तारली. उलट इटली, रशिया, अरबस्तान आदी अनेक देशांतील व्यापारी चीनमध्ये स्थानिक झाले व त्यांमार्फत चिनी जीवनातील अनेक वैशिष्ट्यांची माहिती जगभर पसरली. चीनमधील मुद्रित कागदी चलन, रुंद वृक्षाच्छादित राजमार्ग, रात्री रस्त्यावर गस्त घालण्यासाठी सोय, भुयारी गटारे, मोठमोठी शिडाची जहाजे, उंच पूल इ. गोष्टी यूरोपातील लोकांना नवलाईच्या वाटल्याने मार्को पोलोने नमूद केले आहे. उलट मार्को पोलोचा एक समकालीन प्रवासी नेस्टोरिअन पंथी रब्बान कौमा चीनमधून यूरोपात गेला. त्याच्या रोजनिशीवरून आशियाई लोकांना तत्कालीन यूरोप कसा दिसला हे त्याच्या पॅरिस, बॉर्दो, रोम वगैरे शहरांच्या वर्णनांवरून आणि फ्रान्सचा चौथा फिलिप, इंग्लंडचा पहिला एडवर्ड व चौथा पोप निकोलस यांच्या मुलाखतींच्या हकीगतीवरून दिसून येते.
        मंगोलकाळात चीनमधून रेशीम व चिनी मातीची भांडी यांची निर्यात व त्या बदल्यात मसाल्याचे पदार्थ, मोती, विविध रत्ने व तलम कापड यांची आयात होई.
    मंगोलांच्या उदार धार्मिक धोरणामुळे इस्लाम, ख्रिस्ती – विशेषत: नेस्टोरिअन व रोमन कॅथलिक पंथ – इत्यादींचा चीनमध्ये प्रसार झाला. १२६९ कूब्लाईखानाने मार्को पोलोच्या वडिलांमार्फत पोपला पत्र पाठवून शंभर ख्रिस्ती धर्मप्रसारक व शंभर वैज्ञानिकांना चीनमध्ये पाठविण्याची विनंती केली होती. पोपला ही मागणी पूर्ण करता आली नाही. पुढे कूब्लाईने फॅग्स-पा या तिबेटी बौद्ध भिक्षूला त्याच्या पंथाचा मंगोल लोकांत प्रचार करण्याचे आवाहन केले व फॅग्स-पाच्या प्रयत्नाने हजारो मंगोलांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
        मंगोलकाळात चीनचा अनेक देशांशी संबंध आला. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होण्यास आणि चित्रशिल्पादी कलाप्रकारांत नव्या प्रवृत्तींचा शिरकाव होण्यास पुष्कळ वाव मिळाला. काही तत्कालीन चित्रकारांनी थांगकाळाच्या तंत्राचा अवलंब केला, तर काहींवर इराणी तंत्राचा प्रभाव पडला. मूर्तिकारांनी भारतीय बौद्ध कलाकारांचा आदर्श समोर ठेवला व चिनी मातीच्या भांड्यात इराणी घाट लोकप्रिय झाला.
      नाटक व कादंबरी या साहित्यप्रकारांत महत्त्वाची भर पडली. सान्-ग्वो-जृ येन्-ई  म्हणजे (तीन राज्यांची रोमांचकारी कथा) कादंबरीमय त्रिराज्ये यांसारख्या प्रदीर्घ कादंबऱ्या त्यांतील चुरचुरीत राजकीय टीका, उपहास या गुणांमुळे आजही लोकप्रिय आहेत. 
 मिंग घराणे :  (१३६८ – १६४४) :-
         याचा संस्थापक जू युआन-जांगची कारकीर्द (१३६८ – ९८) हूंग वू म्हणजे जयशाली या नावाने ओळखली जाते. पीकिंग जिंकल्यावर सेनापती स्यू दाच्या मदतीने त्याने शान्सी  व शेन्सी (सेचवान) हे प्रांत जिंकून सर्व चीन आपल्या ताब्यात घेतला. दक्षिण मँचुरियाही चिनी साम्राज्यास जोडण्यात आला. कोरिया, रीऊक्यू बेटे तसेच हल्लीच्या सिक्यांग भागातील कित्येक मंगोल टोळ्यांनी चीनचे अधिराज्य मान्य केले आणि ब्रह्मदेशातील काही राज्ये, नेपाळ इत्यादींनी आपले वकील चीनला पाठवून मिंग सत्तेशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. जपानी चाचे चीनच्या किनारी प्रदेशात सतत लुटालूट करीत. त्यांचा बंदोबस्त करण्यात मात्र हूंग वूला विशेष यश आले नाही.
       जू युआन-जांग कर्तबगार प्रशासक होता. थांगकालीन कायदेकानूंवर आधारलेली एक नवी विधिसंहिता त्याने अंमलात आणली. राजधानीसाठी त्याने नवे शहर वसविले. तेच आजचे नानकिंग. त्याने पूर्वीच्या प्रांतरचनेत बदल केला नाही. परंतु प्रांतांचे विभागवार गट पाडून प्रत्येक गटातील प्रांतांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी एकेका राजपुत्राची नेमणूक केली. गटाधिकाऱ्याना वांग ही संज्ञा असे. जू युआन-जांगने महामंत्रिपद रद्द करून राज्यकारभार ने-ग म्हणजे महासचिवाच्या मदतीने चालू केला, काही प्रयोगांनंतर शासकीय सेवापरीक्षा त्याने पुन्हा चालू केल्या आणि पुढील काळात ह्या परीक्षांना साचेबंद स्वरूप प्राप्त झाले. बौद्ध धर्माच्या बाबतीत त्याने उदार धोरण स्वीकारले पण कन्फ्यूशस पंथास राजाश्रय चालूच होता व प्रांतोप्रांतीच्या विद्यालयांत कन्फ्यूशसच्या ग्रंथांचे अध्ययन व्हावे, असा आदेश दिला. तसेच कन्फ्यूशस पंथाला मान्य असलेले पूर्वकालीन धार्मिक सण, उत्सव, संस्कार चालू केले.
       जू युआन-जांगने शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे विशेष प्रयत्न केले व त्यासाठी अनेक पूरनियंत्रणयोजना कार्यान्वित केल्या. कालवे, सरोवरे, राजरस्ते यांच्या दुरुस्तीची व्यवस्था केल्याने शेतीउत्पादन वाढले व व्यापारास उत्तेजन मिळाले. पूर्वप्रथेनुसार प्रांतोप्रांती धान्याचे साठे ठेवल्याने टंचाईकाळातही बाजारभाव स्थिर राहून सामान्य लोकांना धान्य मिळत राहिले.


       जू युआन-जांगच्या निधनानंतर त्याच्या इच्छेनुसार त्याचा नातू जू युन-वन गादीवर बसला परंतु त्याचे व त्याच्या चुलत्याचे पटले नाही. जू युआन-जांगचा चौथा मुलगा जू डिने आपल्या पुतण्याविरूद्ध बंड पुकारल्याने चीनमध्ये चार वर्षे यादवी माजली. जू डिने नानकिंग काबीज केले. त्या वेळी जू युन-वन बेपत्ता झाला. त्याचे पुढे काय झाले हा चीनच्या इतिहासातील एक कूटप्रश्न आहे. नानकिंग काबीज केल्या वर जू डि गादीवर बसला (१४०३ – २४). त्याची कारकीर्द युंग् ल (निरंतर सुखकाल) या नावाने ज्ञात आहे. आक्रमक परराष्ट्रीय धोरण व कार्यक्षम प्रशासनामुळे युंग् ल काळात मिंग सत्तेची भरभराट झाली. याच्या कारकीर्दीत जपानचा प्रसिद्ध शोगुन योशिमित्सू याने जपानी चाच्यांच्या स्वाऱ्यांना पायबंद घातला व मिंग सम्राटांचे अधिराज्यही मान्य केले. या कारकीर्दीत अनामचा बराच भाग पुन्हा चीनच्या साम्राज्यास जोडण्यात आला, तसेच नेपाळने चीनच्या अधिराज्यास आणि ब्रह्मदेशातील संस्थानिकांनी चीनच्या वर्चस्वास मान्यता दिली. जू डिने तिबेटशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले.
         जू डिने आरमाराच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. प्रसिद्ध दर्यासारंग जंग ह ह्याच्या नेतृत्वाखाली युंग् ल काळात चिनी आरमाराने व्हिएटनाम, जावा, सुमात्रा, बोर्निओ, कंबोडिया, थायलंड, भारत, सीलोन (श्रीलंका), एडन व आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील काही देशांना भेटी दिल्या. यांपैकी काहींनी चीनला आपले वकील पाठविले व काहींनी चीनच्या अधिराज्यासही मान्यता दिली जंग हच्या धाडसी सागरपर्यटनामुळे चीनची प्रतिष्ठा वाढली व व्यापारास उत्तेजन मिळाले. चिनी नौकाशिल्पांतही विशेष प्रगती झाली परंतु जू डिनंतरच्या शासकांनी समुद्रपर्यटनाचे धोरण एकाएकी पूर्णपणे बदलले. चिन्यांच्या परदेशगमनास कायद्याने बंदी घालण्यात आली व चीनच्या नाविक दलाचा जितक्या वेगाने विस्तार झाला, तितक्याच वेगाने त्याचा नाशही झाला.
      जू डिने नानकिंग येथून राजधानी हालवून पीकिंगला नेली. युद्धाने उद्ध्वस्त झालेले प्रांत पुन्हा वसविण्याकडे त्याने विशेष लक्ष दिले. त्याचा स्वत:चा कल बौद्ध धर्माकडे असला, तरी त्याने कित्येक भिक्षूंना गृहस्थाश्रम स्वीकारावयास लावून त्यांच्या संख्येवर मर्यादा घातली. पित्याच्या वेळचे कन्फ्यूशस पंथ आणि शासकीय-सेवापरीक्षेसंबंधीचे धोरणच त्याने पुढे चालविले.
        युंग् ल राजवटीनंतर मिंग साम्राज्य सु. सव्वादोनशे वर्षे टिकले पण हळूहळू त्याचा दरारा कमी झाला व अनाम वगैरे प्रांत स्वतंत्र झाले. जू डिनंतर चीन-जपान संबंधही बिघडले आणि चीनच्या विरोधास न जुमानता जपानच्या शोगुन हिडेयोशीने कोरियावर स्वारी केली व कोरियाच्या मदतीस गेलेल्या चिनी सैन्याचा धुव्वा उडविला. मिंग साम्राज्याच्या अवनतीच्या काळात वान ली (१५७३ – १६२०) यानेच काय ते दीर्घकाल राज्य केले. तो स्वत: दुर्बल होता पण त्याचा मंत्री कर्तबगार असल्याने तो असेपर्यंत काही काळ शासनाचा काहीतरी वचक राहिला. त्याच्या मृत्यूनंतर दरबारातील पक्षोपक्षांच्या भांडणांना ऊत आला आणि शासनात सतत वाढणाऱ्या खोज्यांच्या प्रभावाने कित्येक कर्तबगार अधिकाऱ्यांना आपापल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या. मिंग वंशाचा शेवटचा राजा ज्वांग-ल्ये डि (१६२८ – ४४) याच्या कारकीर्दीत तर दरबारात तंटे व देशात बंडाळी यांचा कहर झाला. अंतर्गत यादवी व भ्रष्टाचार यांनी खिळखिळे झालेले मिंग साम्राज्य चीनच्या ईशान्य भागात उदयास आलेल्या मांचू टोळ्यांच्या स्वाऱ्यांपुढे टिकले नाही.


    मिंगकालीन चिन्यांचे गृहोपयोगी वस्तू, कापड, गालिचे, हस्तदंतावरील नक्षीकाम, पिलूसारख्या रत्नांवरील कोरीव काम इ. दुय्यम कलांतील तंत्रकौशल्य वाखाणण्यासारखे आहे. या काळातील चिनी मातीची सुबक भांडी, तसेच विशिष्ट प्रकारची मिनेकारी भांडी इत्यादींना यूरोपीय देशांतही खूप मागणी होती.
     मिंगकालीन चित्रकलेत मौलिकतेचा अभाव दिसतो. हूंग वू राजवटीत नानकिंग येथे चित्रकला अकादमीची स्थापना झाली व या काळात चित्रकलेचा एक कोशही प्रसिद्ध झाला परंतु तत्कालीन चित्रकारांनी थांग व सुंगकालीन तंत्रांचे व विषयांचेही अनुकरण केल्याने त्यांच्या कलाकृतींत जिवंतपणा फारसा आढळत नाही. या काळातील मूर्तिशिल्प व वास्तुशिल्प मात्र दर्जेदार आहे. चीनच्या प्रचंड भिंतीचा जीर्णोद्धार याच काळात झाला.
      मिंगयुगात विविध कोश, काव्य, नाटक, कादंबरी, निबंध इ. साहित्य-प्रकारांना बहर आला. जलद मुद्रणाच्या वाढत्या सोयीमुळे लेखक-प्रकाशकांना उत्तेजन मिळून साहित्यनिर्मितीचा वेग वाढण्यास मदत झाली. पूर्वकालीन दंतकथा आणि आख्यायिका यांवर आधारित दर्जेदार कादंबऱ्या, हे या काळातील साहित्याचे खास वैशिष्ट्य होते. स्यू स्या-खचे प्रख्यात प्रवासवृत्त, स्थानिक इतिहास-भूगोलाची पुस्तके, युद्धशास्त्र, विधीशास्त्र, कृषिशास्त्र, भाषाशास्त्र इत्यादींवरील ग्रंथ, ली शृ-जनचा बन-त्साव गांग मु  हा औषधी संग्रहावरील ग्रंथ, मे यिंग जोचा ३३,१७९ चिनी चित्राक्षरे असलेला पण चिनी शब्दमूलांची संख्या केवळ २१४ असावीत. असे प्रतिपादन असलेला त्स ह्‌वै हा  व अन्य शब्दकोश, वांग जि आणि वांग स्स-ई यांचा सान-त्साय  थू-ह्‌वै  हा कोश तसेच माव युआन-ई  व बै-जृ  चिह  हा युद्धशास्त्र व भूगोल-विषयक कोश, सुंग यिंग स्यींगचा थ्‌यन-गुंग खाय-वू  हा औद्योगिक कोश व जू डिच्या आज्ञेने रचिलेला खंडात्मक प्रचंड विश्वकोश इत्यादींवरून मिंगकालीन साहित्याच्या समृद्धतेची यथार्थ कल्पना येते. मिंगकाळाच्या शेवटी यूरोपीय धर्मोपदेशक चीनमध्ये आले आणि त्यांनी हळूहळू राजदरबारात प्रवेश करून मोठ्या पदाच्या नोकऱ्या मिळविल्या. विशेषतः  ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली कारण ते सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इ. गोष्टी अचूक गणित करून सांगत. या धर्मोपदेशकांनी चिनी लोकांना तोफा करण्याचे तंत्रही शिकवले. 
मांचू ऊर्फ च्यिंग् साम्राज्य : (१६४४ – १९१२) :-
       सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात रूर्जनांपैकी मांचू टोळीचा म्होरक्या नुरहाचि याने मँचुरियात मूकडेन (शन-यांग्) येथे आपले राज्य स्थापन केले व कालांतराने उत्तर चीनचा काही भागही मांचू राज्यात समाविष्ट झाला. १६४४ मध्ये ली ज-छंग या बंडखोराविरूद्ध मिंग शासनाला मदत करण्यास पीकिंगपर्यंत पोहोचलेल्या मांचू सैन्याने मिंग सत्ताही उलथून पाडली व चीन मांचू अंमलाखाली गेला.






       मांचू राजवटीच्या २६८ वर्षांच्या कालखंडाचे १६४४ ते १८४२ आणि १८४२ ते १९१२ असे दोन भाग पडतात. पहिल्या भागातील एकूण सहा सम्राटांपैकी खांग स्यी (१६६१ – १७२३) व च्यन लूंग (१७३६ – ९६) ह्या दोन कारकीर्दींनीच एकशे बावीस वर्षे व्यापली. मांचूंची पहिली सु. चाळीस वर्षे दक्षिणेकडील सरंजामदारांची बंडाळी शमविण्यात व मिंग सत्तेचा समर्थक आरमारी डाकू जन छन-गुंगच्या मुलाच्या चाचेगिरीला पायाबंद घालण्यात गेली. यानंतर तैवान बेट चीनला मिळाले चीनच्या ईशान्य, उत्तर आणि वायव्य सीमांवरील खाल्खा, काल्मुक व एलेथ इ. मंगोल टोळ्यांनी चीनच्या अधिराज्यास मान्यता दिली आणि तिबेटवरही चीनचे राजकीय वर्चस्व स्थापन झाले. खांग स्यी सम्राटाने माकाऊ बेटावरील पोर्तुगीज वसाहतींना चीनचे स्वामित्व मान्य करावयास लावले, रशियाशी मैत्रीचा तह केला व जेझुइट धर्मप्रचारकांशी सलोख्याचे संबंध ठेवले परंतु पुढे जेझुइट आणि त्यानंतर आलेल्या डोमिनिकन पंथांमध्ये तंटे सुरू झाले. त्यात पोपची रदबदली व्हावी असे ठरले पण खांग स्यीने त्यांना चीनच्या कायदेकानूंशी विसंगत असलेली पोपची फर्माने चिनी ख्रिस्ती धर्मीयांवर लादू दिली नाहीत. चौथ्या मांचू सम्राटाच्या च्यन लूंग कारकीर्दीत तारीम खोऱ्यातील खोतान वगैरे शहरे जिंकण्यात येऊन त्यांचा नवा सिक्यांग (म्हणजे नवी सरहद्द) प्रांत बनविण्यात आला. तिबेटातील बंडाळी मोडून दलाई लामाचे प्रशासन मांचू प्रतिनिधींच्या (आम्बान) देखरेखीखाली चालावे, अशी व्यवस्था करण्यात आली. नेपाळ, ब्रह्मदेश या राज्यांनी चीनच्या अधिराज्यास मान्यता दिली. चीनच्या दक्षिण व नैर्ऋत्य भागांतील आदिवासींची बंडाळी शमवून ग्वांगसे, ग्वेजो, युनान, सेचवान इ. प्रांतांत मोठमोठ्या चिनी व मांचू लष्करी वसाहती वसविल्या. एकंदरीत च्यन लूंग काळात मांचू राजवट वैभवाच्या शिखरावर पोहचली पण याच कारकीर्दीच्या उत्तरार्धात बाय ल्यन ज्यावसारख्या गुप्त संघटनांची व पश्चिमेकडे इस्लामी जमातींची बंडे सुरू होऊन मांचू सत्तेला उतरती कळा लागली. १८२० मध्ये च्यन लूंगचा नातू दाव ग्वांग गादीवर बसला. याच्या कारकीर्दीच्या अखेरीस पाश्चात्त्य देशांशी प्रत्यक्ष युद्धच उद्‌भवले आणि चीनच्या इतिहासातील अशांत युगास व साम्राज्याच्या ओहोटीस सुरूवात झाली.
मांचू राजांनी मिंगकालीन प्रशासनव्यवस्थेत व अर्थकारणात महात्त्वाचे फेरबदल केले नाहीत, तसेच चिनी समाजरचना बदलण्याचा खटाटोपही त्यांनी केला नाही. प्रशासनव्यवस्थेत मोक्याच्या जागी मांचू व चिनी यांना समान संख्येने नेमण्याचे धोरण ठेविले चिन्यांच्या मदतीशिवाय प्रशासन चालविणे दुरापास्त होईल, हे ओळखून मांचूंनी चिनी भाषा व चालीरीतींचा बव्हंशी स्वीकार करून त्यांचे सहकार्य मिळविले मात्र मांचू राजवट ही परकी आहे, याचा चिनी समाजाला कधीच विसर पडला नाही आणि संधी मिळताच ही राजवट उलथून पाडण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
         मांचू राजवटीची पहिली दीड-दोनशे वर्षे फारच उत्कर्षाची गेली. चीनचा विस्तार सर्वांत जास्त याच काळात झाला. अफूच्या वाढत्या प्रसारामुळे पुढे चीनला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. चहा, रेशीम, मांजरपाट कापड, कागद, पंखे, गृहसजावटीच्या वस्तू, चिनी मातीची भांडी, लाखेच्या वस्तू, दुय्यम रत्ने इ. चिनी मालाला सर्वत्र मागणी असल्याने चीनचा व्यापार या काळात भरभराटीत होता. सोन्या-चांदीचा ओघ चीन व अन्य पौर्वात्य देशांत होत असल्याची तक्रार यूरोपात होऊ लागली. चिनी मातीची भांडी, तपकीर ठेवण्याच्या काचेच्या सुबक बाटल्या इ. मांचूकालीन वस्तू सुबक असत पण इतर कलांच्या बाबतीत जुन्याच तंत्रांचे अनुकरण झालेले दिसते. खांग स्सी व च्यन लूंग या कारकीर्दी सोडल्या, तर मांचू काळात साहित्यिकांना फारसे उत्तेजन मिळाले नाही.
         जिंग् ह्‌वा युआन  ही कादंबरी व दा थुंग्  हा ग्रंथ यांतील आर्दश समाजाचे काल्पनिक चित्र हृद्य आहे. फू सुंग लिंगचा ल्याव्-जाय जृ-ई  हा लघुकथा संग्रह आजही लोकप्रिय आहे. 
 पाश्चात्यांचे आगमन : १८२० ते १९११ ह्या काळात पाच सम्राट होऊन गेले. हे सर्वच दुर्बल होते. १८६१ पासून १९०८ पर्यंत चीनचा कारभार सम्राट थुंग जृची आई त्स स्यी हिच्या तंत्राने चाले. या काळात चीनला बिकट आर्थिक व राजकीय समस्यांना तोंड द्यावे लागले. अंतर्गत यादवी व बाह्य आक्रमणे यांमुळे शासनाच्या लष्करी खर्चात अतोनात वाढ झाली. तसेच वाढती लोकसंख्या, अनिश्चित कृषिउत्पादन, दुष्काळ व महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, परंपरागत उद्योगधंद्यांची पीछेहाट इत्यादींमुळेही चीनची आर्थिक स्थिती अतिशय खालावली. ह्या अवनतीच्या काळातही चीनमध्ये राष्ट्रवादाचे बी रुजले परंतु चिनी राष्ट्रवाद्यांना परक्या मांचू राजवटीबरोबरच इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जपान इ. पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांच्या आक्रमणांशी मुकाबला करावा लागला. या दुहेरी संघर्षातूनच १९११ ची राज्यक्रांती होऊन चिनी साम्राज्याचा अंत झाला आणि चीनच्या इतिहासातील नव्या युगास सुरुवात झाली.
        तत्पूर्वी मांचू सत्ता दुर्बल होत चालल्याचे दिसू लागताच उत्तरेकडून रशिया व जपान आणि दक्षिणेकडून व पूर्वेकडून इंग्लंड, फ्रान्स यांचे दडपण चीनवर वाढत होते व त्यांतून अनेक उग्र संघर्ष निर्माण झाले. रशिया व जपानविरुद्ध चीन आणि इंग्लंड, फ्रान्स इ. पाश्चात्त्य राष्ट्रे विरुद्ध चीन असे संघर्ष झाले.
       रशियाने साम्राज्यविस्ताराचे आक्रमक धोरण सोळाव्या शतकापासून अंगीकारले. चीनच्या विरोधास न जुमानता अमुर नदीच्या खोऱ्यात त्याने अनेक लहानलहान वसाहती व ठाणी स्थापन केली होती. तेव्हा संधी मिळताच १६८५ मध्ये चीनने रशियाचे अल्बाझील हे ठाणे काबीज केले आणि तेथील रशियन सैनिकांना कैद करून पीकिंगला पाठविले. परंतु उभय पक्षांना युद्ध नको असल्याने चार वर्षांनी न्येरचिन्स्कच्या तहाने रशिया-चीनची सरहद्द निश्चित केली व रशियाला काही व्यापारी सवलती मिळाल्या. पुढे १७२७, १७६८ व १७९२ मध्ये या तहाच्या धर्तीवर रशिया-चीनचे आणखी तह झाले. यांतून मर्यादित राजनैतिक व व्यापारी संबंध नमूद होण्यापलीकडे विशेष काही निष्पन्न झाले नाही. कालांतराने दुसऱ्या अफूच्या युद्धातील चीनच्या पराभवाचा फायदा घेऊनच १८५८ मध्ये रशियाने ऐगूनचा तह चीनवर लादला. या तहाने अमूर नदीच्या उत्तरेकडील सर्व मुलूख रशियाला मिळाला व उसुरी नदीच्या पूर्वेकडील मुलूख रशिया-चीनच्या संयुक्त शासनाखाली असावा असे ठरले. नंतर दोन वर्षांनी या तहात दुरुस्ती होऊन उसुरीच्या पूर्वेकडील मुलूख रशियाला मिळाला व अशा प्रकारे कोरियाच्या उत्तरेकडील आशिया खंडाचा सर्व पूर्व किनारा रशियाच्या अंमलाखाली आला.
         जपानी राज्यकर्त्यांनी आक्रमक विस्तारवादी धोरण स्वीकारले. जपानने चीनकडून ल्यौ-च्यौ (रिऊक्यू) बेटे बळकावली. परिणामत: कोरियातील राजकीय हक्कांवरून व जपानी कारस्थानामुळे उभयतांत कुरबुरी झाल्या आणि त्याचे पर्यवसान १८९४ च्या चीन-जपान युद्धात झाले. तेव्हा सुरू झालेला चीन-जपान संघर्ष दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत चालला.
        माकाऊ बेटावर पोर्तुगीजांची वसाहत स्थापन झाली. त्या सुमारास इतर यूरोपीय देशांचे लक्ष चीनकडे वेधले. पैकी चीनशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इंग्रजांची एक आरमारी तुकडी १६३७ मध्ये कँटनला पोहोचली. परंतु चिनी अधिकाऱ्यांनी या बोटी अडविताच इंग्रजांनी तोफांचा भडिमार करून त्यांना मागे हटविले व बोटीवरील मालाची विक्री करून इंग्रज तुकडी परतली. तेव्हापासूनच अन्य पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे इंग्रजांबद्दलही चिनी शासकांचे मत प्रतिकूल होते. तरीही १७९३ मध्ये अर्ल ऑफ मॅकार्लनी हा ब्रिटिश राजदूत पीकिंगला पोहचला, तेव्हा इंग्लंडहून खंडणी आणणारा राजदूत म्हणून सम्राटाने त्याची भेट घेतली, पण इंग्लंडला कोणत्याही सवलती मिळाल्या नाहीत. त्यानंतर १८१६ मध्ये लॉर्ड ॲम्हर्स्ट ह्या वकिलाची तर सम्राटाने भेटही घेतली नाही पण दरम्यान काही प्रमाणात इंग्रजांना चीनशी व्यापार सुरू झाला होता व शिवाय अफूच्या आयातीवरील चिनी निर्बंधांकडे दुर्लक्ष करून चोरट्या मार्गाने लाखो रूपयांची अफू चीनमध्ये खपू लागली होती.
        ब्रिटिशांचे व चिन्यांचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते. पुढे तर त्याचे पर्यवसान १८३९ – ४२ व १८५६ – ६० च्या ⇨ अफूच्या युद्धांत झाले. या युद्धातील चीनच्या पराभवाने सर्व यूरोपीय देशांना आणि अमेरिकेला फायदे झाले. प्रत्येकाने चीनकडून हव्या त्या सवलती मिळविल्या परिणामत: चीनचे राजकारण पाश्चात्यांच्या इच्छेनुसार चालू लागले व देशाची अर्थव्यवस्था पाश्चात्यांच्या हिताची होऊन चीनचे उद्योगधंदे डबघाईला आले तसेच ख्रिस्ती मिशनऱ्यांना उत्तेजन मिळून चीनमध्ये कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथांचा झपाट्याने प्रसार झाला. मुख्य म्हणजे या युद्धानंतर इंग्लंडला चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर अफू विकता येऊ लागली.
   सम्राट दाव ग्वांगच्या कारकीर्दीच्या अखेरीस चीनच्या अंतर्गत दुर्बलतेमुळे पाश्चात्त्यांचे फावले हे खरेच पण पाश्चात्त्यांच्या आक्रमक हालचालींचा चीनच्या प्रशासनव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊन मांचू साम्राज्याचा ऱ्हास झाला.
        एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वीपासून अनेक यूरोपीय देशांशी संबंध येऊन पाश्चात्य संस्कृतीचा चिनी समाजाला परिचय होऊ लागला होता व कित्येक बाबतींत पाश्चात्त्य देश चीनच्या पुढे असल्याचे दिसून आले होते. सुरुवातीला पाश्चात्त्य शस्त्रास्त्रे विकत घेऊन किंवा निर्माण करून त्यांना थोपवून धरावे, असा एक विचारप्रवाह होता. परंतु पाश्चात्त्य राष्ट्रांची शक्ती नुसती शस्त्रांत नसून ती त्यांच्या विद्येत आहे, हे चीनला लवकरच उमगले. साहजिकच पाश्चात्त्य विद्याकलांचा काही प्रमाणात स्वीकार करण्यानेच आपली उन्नती होऊ शकेल, असे कित्येकांना वाटू लागले. परंतु या विचारसरणीला परंपरावादी चिन्यांचा व काही मांचू राज्यकर्त्यांचाही विरोध होता. तेव्हा या विरोधास न जुमानता चीनचे आधुनिकीकरण करू पाहणारा एक पक्ष अस्तित्वात आला व या गटाने मांचू शासनाविरूद्ध चळवळ करण्यास प्रारंभ केला. याच काळात चीनच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होऊन शेतजमिनीवरील ताण वाढला व त्यामुळे कृषिउत्पादन तर घटलेच पण श्रीमंत जमीनदारांच्या हातात जमिनी जाऊन भूमिहीन शेतमजुरांच्या संख्येत बेसुमार वाढ होऊन बेकारी व गरिबीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली. शासनातील भ्रष्टाचाराने ही परिस्थिती जास्तच बिकट झाली. या बिकट आर्थिक समस्यांमुळे मांचू राजवटीविरुद्ध सुरू झालेल्या राजकीय चळवळींचा जोर वाढला व त्यातूनच १८४८–  १८६५ चे ⇨ ताइपिंग (थायफिंग) बंड  तसेच १८५६ – ७३ ची युनान, सिंक्यांग वगैरे भागांतील मुसलमानांची तीन बंडे व त्याच काळातील न्यन ह्या गुप्त संघटनेचे बंड इ. उग्र उठाव झाले. हे बंड शमविण्याच्या कामी जंग ग्वो फान, जो जुंग-थांग इ. निष्ठावंत चिनी अधिकाऱ्यांनी परिश्रम केले. परंतु मांचू राजवट टिकून राहण्यातच आपला फायदा आहे, हे ओळखून यूरोपीय राष्ट्रांनी चिनी शासनाला केलेल्या लष्करी साहाय्यामुळे चीनमध्ये नवी राजवट स्थापन करण्याचा ताइपिंग बंडखोरांचा प्रयत्न काही अंशाने फसला.
        पाश्चात्त्य पद्धतीच्या राजकीय व लष्करी सुधारणा अंमलात आणल्याशिवाय व शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल केल्याशिवाय या अराजकतेतून देश मुक्त होणार नाही, या विचारसरणीचा जांग जृ-दुंग, खांग यव-वै, सन-यत्-सेन वगैरेंनी पुरस्कार केला. पण राजपालक सम्राज्ञी त्स स्यीला हे विचार मान्य नव्हते तरीही हळूहळू सम्राट ग्वांग स्यूला वरील मते पटली व १८९८ च्या उन्हाळ्यात खांग यव-वैच्या साहाय्याने त्याने विविध राजकीय, आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सुधारणा अंमलात आणल्या. सुधारणांचे शंभर दिवस म्हणून हा काळ चीनच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. वरील सुधारणांना प्रतिक्रियावादी प्रस्थापित हितसंबंधियांचा व त्स स्यीचा साहजिकच विरोध असल्याने स्वत: सम्राट व त्स स्यी यांत उघड संघर्ष सुरू झाला. तेव्हा आपल्या विरुद्ध शिजलेल्या एका कटाचा सुगावा लागताच त्स स्यीने सम्राटाला कैद केले. अनेक सुधारकांना फाशी दिले व सम्राटाने अंमलात आणलेल्या सर्व सुधारणा रद्द करून चीनचे प्रशासन पुन्हा पारंपारिक पद्धतीने चालू केले पण हे होत असता पाश्चात्त्यांच्या आक्रमणास तोंड देण्यासाठी थ्वान नावाचे संरक्षक दल उभारण्यात आले. या दलात राष्ट्रीय वृत्तीच्या लढाऊ तरुणांचा मोठा भरणा होता. पाश्चात्त्यांचा विध्वंस झाल्याशिवाय देश संकटमुक्त होणार नाही, अशा समजुतीने या गटामार्फत पाश्चात्त्य व्यापारी, शिक्षणसंस्था, मिशनरी तसेच ख्रिस्ती धर्मी चिनी लोक व पाश्चात्त्यांना सवलती देणारी मांचू राजवट यांविरूद्ध अनेक लहानमोठ्या दंगली झाल्या व यांतूनच इतिहासप्रसिद्ध ⇨बॉक्सर बंड  उद्‌भवले, बॉक्सर बंड शमल्यानंतर त्स स्यीने चिनी लष्करात व शिक्षणपद्धतीत काही सुधारणा केल्या पण त्यांनी सन-यत्-सेनच्या राष्ट्रीय पक्षाचे समाधान झाले नाही. चीनमध्ये लवकरच संसदीय-पद्धतीचे शासन स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा झाली. या घोषणेनुसार राष्ट्रीय संसदेच्या स्थापनेची पूर्वतयारी चालू असतानाच १४ व १५ नोव्हेंबर १९०८ रोजी अनुक्रमे सम्राट ग्वांग स्यू व राज्यपालक त्स स्यी दोघे निधन पावले व नवा सम्राट फू यि हा अल्पवयी असल्याने त्याचा पिता छुन ह्याने राज्यपालक म्हणून पूर्वी ठरल्याप्रमाणे प्रांतीय विधिमंडळाची अधिवेशने भरविली. तदनुसार संसदीय लोकशाहीची कृती होण्यापूर्वीच १० ऑक्टोबर १९११ रोजी क्रांती झाली. क्रांतिकारकांनी अनेक प्रांतांत आपले हातपाय पसरले व १ जानेवारी १९१२ रोजी नानकिंग येथे ⇨ सन-यत्-सेनच्या (१८६६ – १९२५) नेतृत्वाखाली चिनी प्रजासत्ताकाची स्थापना झाली. उलट मांचू सरकारात दिवसेंदिवस युआन शृ-खायचे महत्त्व वाढले. त्याने मात्र आपल्या सम्राटाबरोबर प्रतारणा केली. शेवटी त्याच्या सल्ल्यानुसार १२ नोव्हेंबर १९१२ रोजी सम्राट फू यिने सिंहासन सोडले व मंत्री म्हणून नवे प्रजासत्ताक संघटित करण्याचे कार्य युआनवर सोपविण्यात आले. अशा रीतीने चीनमध्ये दोन प्रजासत्ताक राज्ये अस्तित्वात आली. पण देशात शांतता व ऐक्य रहावे, म्हणून सन-यत्-सेनने अध्यक्षपद सोडले व नानकिंगच्या प्रजासत्ताकाने युआन शृ-खायची अध्यक्षपदी निवड केली. २,५०० वर्षे चीनमध्ये अस्तित्वात असलेली राजेशाही नष्ट होऊन नव्या चिनी प्रजासत्ताकाचे शासन सुरू झाले.
        मांचू राजवटीचे उच्चाटन हे चिनी राष्ट्रवाद्यांचे उद्दिष्ट १९११ च्या क्रांतीने साध्य झाले तथापि लोकशाही शासन, आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि परकीय आक्रमकांपासून मुक्तता, ही महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्याची कामगिरी नवस्थापित प्रजासत्ताकाला करावयाची होती. धूर्त, स्वार्थी व लोकशाहीविरोधी युआन शृ-खायची नेतेपदी निवडणूक ही त्या दृष्टीने निरर्थक होती, हे लवकरच स्पष्ट झाले. सत्तेवर येताच मोठ्या कौशल्याने त्याने स्वत:ची राष्ट्राध्यक्षपदी निवड करविली व संसदेच्या संविधान समितीने तयार केलेला संविधानाचा मसुदा त्याज्य ठरवून त्याने संसदेच्या दोन्ही सभागृहांतील शेकडो सभासदांची हकालपट्टी केली व विरोधी क्वोमिंतांग (ग्वोमिनदांग) पक्ष बरखास्त करून तो हुकूमशाहासारखा वागू लागला. लष्कराचा व प्रांतीय लष्करी राज्यपालांचा पाठिंबा, पाश्चात्त्य राष्ट्रांची मान्यता व त्यांची आर्थिक मदत, यांमुळे त्याला विरोधकांचे फारसे भय वाटेनासे झाले. लवकरच राजेशाहीची पुन्हा स्थापना व्हावी, या कल्पनेस त्याने एका राष्ट्रीय मेळाव्याची मान्यता मिळविली. १९१६ च्या नववर्षदिनी स्वत:ला राज्याभिषेक करण्याच्या तयारीस तो लागला पण तो फारसा यशस्वी झाला नाही. यानंतर लवकरच तो मृत्यू पावला. युआननंतर उपाध्यक्ष ली युआन-हूंग हा अध्यक्ष आणि युआनद्वारा पूर्वीच नियुक्त झालेला द्वान च्यी-र्‌वै महामंत्री हे कारभार पाहू लागले परंतु चीनच्या निरनिराळ्या भागांत लष्करी राज्यपालांचा कारभार चालू झाला. या लष्करशाहांच्या आपापसांतील भांडणांमुळे देशात यादवी युद्ध सुरू झाले. दक्षिण चीनमध्ये कँटनला सन-यत्-सेनच्या नेतृत्वाखाली दुसरे राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यात आले. या शासनाने उत्तर भागातील लष्करी राजवटींना लष्करी मान्यता दिली नाही पण सन-यत्-सेनलाही दक्षिणेतील अधिकाऱ्यांवर अवलंबून रहावे लागल्याने दोन्ही विभागांतील सामान्य जनतेचे हाल होत राहिले. 
    अशा परिस्थितीत इंग्लंड-रशियादी देश पहिल्या महायुद्धात गुंतले आहेत, हे पाहून जपानने जपानी लष्करी व मुलकी सल्लागार नेमावेत, चीनचे आरक्षक दल चीन- जपानच्या संयुक्त अधिकारात असावे इ. एकवीस मागण्या सादर करून चीनला पेचात पकडले. चीनच्या प्रादेशिक अखंडत्वास बाध येईल वा सर्व राष्ट्रांना चीनमध्ये व्यापारासाठी मुक्तद्वार असावे, या धोरणाशी विसंगत असेल अशा कोणत्याही करारास अमेरिकेची मान्यता मिळणार नाही, असा इशारा मिळाला. असे असूनही जपानने दक्षिण मँचुरिया आणि चीनच्या हद्दीमधील इतर मंगोलियात व रशियाने उत्तर मँचुरिया आणि आउटर मंगोलियात विशेष हक्क मिळविले. इतकेच नव्हे, तर व्हर्सायच्या तहाने चीनच्या शँटुंग प्रांतातील जर्मनीला असलेले हक्क व सर्व जर्मन संपत्ती जपानला बहाल करण्यात आल्याने चीनमध्ये जपानी मालावर बहिष्कार घालण्यासाठी चळवळ फोफावली. याचा काहीसा परिणाम होऊन १९२२ च्या वॉशिंग्टन परिषदेचे निर्णय व नऊ राष्ट्रांच्या करारानुसार चीनला शँटुंगमधील बरेच हक्क व अन्य काही सवलती मिळाल्या. पण यानंतर आठदहा वर्षांतच जपानने मँचुरियावर आक्रमण केले व चीन-जपान संघर्षाच्या नव्या पर्वास प्रारंभ झाला.
        १९२० नंतरच्या दहा वर्षांत चीनच्या उद्योगधंद्यांचा बराच विकास झाला. हू शृसारख्या लेखकांच्या प्रयत्नामुळे चिनी जनतेत आधुनिक कल्पनांचा प्रसार झाला आणि स्त्रीदास्यविमोचनासारख्या सामाजिक व श्रमिक संघटनांसारख्या व्यावसायिक चळवळी सुरू झाल्या. सन-यत्-सेनचे राजकीय विचार याच काळात प्रसृत झाले. पण सन-यत्-सेनचे कँटन येथील राष्ट्रीय सरकार व लष्करशाहीच्या तंत्राने चालणारे पीकिंगचे शासन यांच्यातील संघर्ष मिटला नाही. उलट पीकिंग सरकारला इंग्लंड, फ्रान्स इ. देशांची मान्यता होती. त्यामुळे कँटन सरकारची स्थिती बिकट होती. पीकिंग जिंकून चीनचे एकीकरण करण्यासाठी आवश्यक तेवढे लष्कर उभारण्यासाठी अमेरिका, कॅनडा इ. देशांकडून प्रशिक्षित व अनुभवी लष्करी अधिकारी मिळविण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तो फसल्यामुळे शेवटी तो नाइलाजाने रशियाकडे वळला. रशियाने सुरुवातीस अडॉल्यव्ह यॉव्ह्ये व नंतर म्यिखएल बरड्येन आणि मानवेंद्रनाथ रॉय यांस चीनमध्ये पाठविले व त्यांच्या प्रयत्नाने उभय देशांत स्नेहाचे संबंध प्रस्थापित झाले. अनेक रशियन लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार चिनी शासनाची व क्वोमिंतांग पक्षाची पुनर्रचना करण्यात आली व रशियात खास लष्करी शिक्षण घेतलेल्या ⇨ चँग कै-शेकची व्हांपोआ (ह्‌वांग्-फू) लष्करी अकादमीचा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या प्रयत्नाने चिनी लष्कराला आधुनिक युद्धतंत्राचे खास शिक्षण मिळू लागले. क्वोमितांग पक्षही केवळ बुद्धिवाद्यांचा पक्ष न राहता शेतकरी-कामकरी-कारागीर इ. गांजलेल्यांचा पक्ष झाला. मात्र चीनमध्ये एकता प्रस्थापित झाल्याशिवाय पाश्चात्त्य राष्ट्रांच्या व सरंजामी शक्तींच्या कचाट्यातून देशाची प्रगती होणार नाही, हे जाणून सन-यत्-सेनने एकतेसाठी प्रयत्न चालूच ठेविले. सन-यत्-सेन १९२५ मध्ये निधन पावला आणि चीनच्या राजकारणाला नवे वळण लागले.
        सन-यत्-सेनच्या मृत्यूनंतर क्वोमिंतांग पक्षातील कम्युनिस्टांच्या पाठिंब्यामुळे चँग कै-शेकची सरसेनापतिपदी व वांग जिंग-वैची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. पण राष्ट्रवादाच्या बुरख्याखाली कम्युनिस्ट सर्व सत्तास्थाने बळकाविण्याचे राजकारण खेळत असल्याचे अंदाज बांधून चँग त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या उद्योगास लागला. संधी मिळताच वांग जिंग-वैला बाजूस सारून त्याने आपल्या एका स्नेह्याची क्वोमिंतांगच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आणि कम्युनिस्टांच्याच साहाय्याने हुनान, जिआंगसी, जजिआंग इ. प्रांत आपल्या अधिकाराखाली आणले. यानंतर पक्षांतील वाढत्या मतभेदांना कंटाळून अधिकारपद सोडून चँग जपानला गेला. परंतु क्वोमिंतांगचा कारभार नीट चालेना, तेव्हा चँगची पुन्हा सरसेनापतिपदी नेमणूक करण्यात आली व तो चीनला परतला. चीनला परतल्यावर लवकरच त्याने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. या कामी प्रसिद्ध अधिकोष-व्यवसायी चँगचा मेहुणा टी. व्ही. सूंग याने त्यास फार मदत केली. त्याच्या रशियाविरोधी धोरणामुळे इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका वगैरे देशांचेही त्यास साहाय्य मिळाले व क्वोमिंतांग पक्षाचा नेता म्हणून चँग चीनचा प्रमुख झाला. परंतु पक्षातील उजव्या गटाच्या धोरणानुसार कित्येक मजूर पुढारी, विद्यापीठातील विद्यार्थी इत्यादींना त्याने तुरुंगात डांबल्यामुळे डावे गट त्याच्या विरुद्ध गेले व पुरेसे लष्करी सामर्थ्य नसल्यामुळे प्रांताप्रांतांतील लष्करी सरंजामदारांवरही नियंत्रण ठेवणे कठीण झाले. साहजिकच अंतर्गत एकतेचे सन-यत्-सेनचे उद्दिष्ट असाध्यच राहिले व लोकशाहीचा पुरस्कार करता करता उजव्या हुकूमशाहीचा आविष्कार दाखविणाऱ्या चँगच्या धोरणाविरुद्ध कौशल्याने प्रचार करून कम्युनिस्टांनी दक्षिण चीनच्या एका डोंगराळ प्रदेशात (जिआंगसी) स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यश मिळविले.
         चँग कै-शेक अधिकारपदावर आल्यानंतर काही महिन्यांतच जपानने मॅंचुरियावर स्वारी केली व तेथपासून चीन-जपान संघर्षाच्या अंतिम पर्वास सुरुवात झाली. कम्युनिस्टांचा संपूर्ण नि:पात करून अंतर्गत यादवी मिटल्याशिवाय जपानचा पराभव करणे शक्य होणार नाही, अशा समजुतीने चँगने जपानी आक्रमणाला नाममात्र विरोध चालू ठेवून कम्युनिस्टांची ससेहोलपट चालविली. परंतु माओ-त्से-तुंगच्या नेतृत्वाखाली गनिमी काव्याचा अवलंब करून अनेक नद्या-नाले, डोंगर-दऱ्याखोऱ्या ओलांडून कम्युनिस्ट सैन्याने ३६८ दिवसांत सु. १२,००० किमी. अंतर कापले व उत्तर शेन्सी प्रांतात आपले बस्तान बसविले. तेथून चँग कै-शेक व जपानविरुद्ध लढा चालू ठेविला. शेवटी १९३८ मध्ये चँगला कम्युनिस्टांशी तडजोड करून जपानशी मुकाबला करावा लागला. क्वोमिंतांग व कम्युनिस्ट यांत युती होऊनही चीनमध्ये जपानचीच सरशी चालू होती. कारण या युतीनंतरसुद्धा चँगने कम्युनिस्टविरोधी धोरण सुरूच ठेवले. पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि आशिया खंडाच्या राजकारणात अमूलाग्र बदल घडले.
      इंग्लंड-अमेरिकेची थोडीफार मदत चीनला मिळू लागली. डिसेंबर १९४३ च्या कैरो बैठकीत अध्यक्ष रुझव्हेल्ट व विंस्टन चर्चिल यांनी जपानने गिळंकृत केलेला फॉर्मोसा, मँचुरिया वगैरे मुलूख चीनला परत देण्याचे अभिवचन दिले आणि पुढे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत चीनला रोधाधिकारही मिळाला. १९४५ च्या याल्टा परिषदेत रशियाने जपानविरूद्ध युद्धांत भाग घ्यावा, म्हणून आउटर मंगोलिया, मँचुरिया, सॅकालिन व कूरील बेटे इ. चीनला महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रदेशांत रशियाला काही हक्क व सवलती देण्यास इंग्लंड-अमेरिकेची संमती मिळावी तीही रशियाने चीनची, म्हणजे चँग कै-शेकची मान्यता मिळवावी या अटीवरच. तदनुसार ऑगस्ट १९४५ च्या रशिया-चीनच्या मित्रत्वाच्या तहाने रशियाला हव्या त्या सवलती मिळाल्या. या सवलतींच्या मोबदल्यात रशियाने चीनच्या अंतर्गत भांडणात तटस्थ राहण्याचे मान्य केले आणि क्वोमिंतांग सरकारला लष्करी साहाय्य देण्याचेही कबूल केले. युद्धोत्तर काळात चीनमध्ये दुर्बल क्वोमिंतांग पक्ष अधिकारावर असणे रशियाच्या हिताचे वाटल्याने किंवा चिनी कम्युनिस्टांच्या खऱ्या ताकदीची तपशीलवार माहिती नसल्याने स्टालिनने चँग कै-शेकशी तडजोड केली असणे शक्य आहे. उलट कम्युनिस्ट व क्वोमिंतांग यांच्यात तडजोड घडवून आणण्यात अपयश आल्यावर चीनमध्ये साम्यवादाची ताकद वाढू नये, म्हणून अमेरिकेने क्वोमिंतांग सरकाला विविध प्रकारे साहाय्य करण्याचे धोरण स्वीकारले. परंतु भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व सामान्य जनतेची सहानुभूती गमाविलेल्या क्वोमिंतांग पक्षाचा माओत्से-तुंगवादी कडव्या कम्युनिस्टांपुढे टिकाव लागला नाही व पूर्ण पराभव पावून चँग कै-शेकने चीनमधून संपूर्ण माघार घेतली आणि तैवान बेटावर आपल्या राष्ट्रीय चिनी शासनाची स्थापना केली (१९४९) आणि अमेरिकेच्या मदतीने चीनमधील कम्युनिस्ट राजवट उलथून पाडण्याचे त्याचे प्रयत्न सुरू झाले. यामुळे अखंड चीनचे दोन स्वतंत्र भाग पडले. ते म्हणजे लाल चीन व फॉर्मोसा (तैवान) होत. लाल चीन पूर्णत: कम्युनिस्टांच्या अंमलाखाली गेला व फॉर्मोसा चँग कै-शेकच्या हुकूमशाही अंमलाखाली आला. 

  आधुनिक काळ : -

   चँग क-शेकचा पराभव करून ३ फेब्रुवारी १९४९ रोजी कम्युनिस्टांनी पीकिंगमध्ये प्रवेशमध्ये प्रवेश केला आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली चीनच्या प्रजासत्ताकाचा कारभार सुरू झाला. प्रजासत्ताकाच्या सुरूवातीच्या काळात चीनचा कारभार विविध पक्षोपपक्षांच्या प्रतिनिधींनी मान्य केलेल्या तत्त्वांनुसार चाले व ह्या काळात नव्या शासनाची घडी बसविण्यात आली. पुढे सप्टेंबर १९५४ मध्ये नवे संविधान मान्य होऊन चीनचे शासन कम्युनिस्टांच्या तंत्रानुसार चालू लागले व तेव्हापासून त्यांनी प्रभावी प्रचारतंत्र, काही प्रमाणात दडपशाही, असीम परिश्रम इत्यादींच्या बळावर नवचीननिर्मितीचे कार्य झपाट्याने चालविले.
         जमीनदारी, अज्ञान आणि गरिबी व तज्जन्य उपासमार व रोगराई हे शतकानुशतके चीनचे प्रमुख प्रश्न होते. तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट शासकांनी साहजिकच शिक्षणप्रसार, रोगनिर्मूलन, कृषिविकास व औद्योगिकीकरणाच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. सामाजिक सुधारणा व सांस्कृतिक विकासाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले नाही. सर्व प्रजाजनांस पोटभर अन्न पुरविण्यासाठी सरंजामदारी नष्ट करून जमिनीच्या फेरवाटणीचा कार्यक्रम १९४९ मध्ये हाती घेण्यात आला मात्र एवढ्याने न भागल्याने क्रमाक्रमाने सामूहिकीकरण, सहकारी शेती व १९५८ मध्ये सर्व जमिनीचे सामाजिकरण करण्यात येऊन कम्यूनमार्फत कृषिउत्पादनादी कार्ये होऊ लागली. दुष्काळ, महापूर यांसारख्या अनेक आपत्तींपुढे न नमता अनेक उपायांनी कृषिउत्पादनात वाढ करण्यात आल्याने चीनची अन्नसमस्या काहीशी समाधानकारक झाली. अन्न समस्येप्रमाणेच नागरिकांचे आरोग्य सुधारण्याकडेही लक्ष पुरविण्यात आल्याने क्षय, उपदंशादी रोगांच्या प्रसाराला आळा बसला. पाश्चात्त्यांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी चिनी ख्रिस्त्यांनी आपापल्या प्रार्थना मंदिरांची जबाबदारी उचलली व केवळ चिनी धर्मगुरूच नेमावेत, असे धोरण केल्याने परदेशी मिशनऱ्यांना चीन सोडावा लागला.
        कम्युनिस्ट राजवटीची पहिली चार वर्षे आर्थिक स्थिरता साधण्यात खर्ची पडली. जीवनोपयोगी पदार्थांचे दुर्भिक्ष्य, अमाप चलन फुगवटा व तज्जन्य बेसुमार महागाई यांमुळे चीनचे आर्थिक जीवन पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. त्यात सुधारणा करण्यासाठी परदेशी व्यापाऱ्यांवर जबर कर बसवून चीनमध्ये त्यांना व्यवसाय करणे अशक्य केले व देशाच्या बँक व्यवसायाची पुनर्रचना केली, तसेच दळणवळण व वाहतूकव्यवस्थेत सुधारणा करून अंतर्गत व परदेशी व्यापारावर अनेक शासकीय नियंत्रणे लादण्यात येऊन आर्थिक स्थैर्य साधण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर १९५३ मध्ये चीनची पहिली व १९५८ मध्ये दुसरी पंचवार्षिक योजना कार्यान्वित झाली. पहिल्या योजनेच्या काळात मध्यमवर्गीय भांडवलदारांचे राष्ट्रीयीकरण करण्यात येऊन लाचलुचपत, करचुकारपणा, राष्ट्रीय मालमत्तेचे अपहरण वगैरे दुष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्यासाठी विशेष उपाय योजण्यात आले. पहिल्या योजनेपैकी २११ प्रकल्प रशियाच्या साहाय्याने कार्यान्वित झाले. १९६० पर्यंतच्या काळात सु. दहा हजार रशियन तंत्रज्ञ चीनच्या विविध प्रकल्पांवर खपत होते. तसेच सु. आठ हजार चिनी कामगारांना या काळात रशियात प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या योजनेच्या एकूण गुंतवणुकीचा दहावा हिस्सा म्हणजे आजच्या दराने सु. पंधरा अब्ज रूपयांची मदत कर्जरूपाने रशियाकडून मिळाली. या योजनेची अनेक उद्दिष्ट्ये साध्य झाली, पण कृषिउत्पादनातील अपुरी वाढ व अवास्तव केंद्रीकरण हे प्रमुख दोष उत्पन्न झाले कारण या योजनेच्या सुरुवातीस एका उडीने प्रगतीचा मोठा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. या काळातील प्रगतीच्या घोडदौडीची आकर्षक जाहिरातही खूप झाली. पण पुढे प्रत्यक्षात मात्र मानवी शक्तीचा अयोग्य उपयोग, शेतीकडे दुर्लक्ष, गलथानपणा, उधळपट्टी इ. दोष असल्याने प्रयत्नांच्या मानाने यशप्राप्ती झाली नाही, असे जाहीर करण्यात आले. यानंतर कम्यूनच्या संघटनेत अनेक फेरबदल करून बड्या कारखानदारीकडे दुर्लक्ष न करता कृषीमधील असमतोल पुष्कळच कमी केला.
       शिक्षणप्रसाराशिवाय प्रगती नाही, हे आजच्या चिनी नेत्यांनी ओळखले. तसेच नुसत्या पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकांवर विशेष भर दिला व निरनिराळ्या क्षेत्रांत कम्युनिस्ट विचारसरणीने भारलेली व तांत्रिक दृष्ट्या कार्यक्षम अशी नवी पिढी तयार होईल, याकडे कटाक्षाने लक्ष पुरविले.
       शतकानुशतके कन्फ्यूशसच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला व पाश्चात्त्यांच्या संपर्काने भांबावलेला परंपरावादी चिनी समाज संपूर्णत: बदलून माओप्रणीत समाजवादी तत्त्वज्ञान अंगी मुरलेला नवा समाज निर्माण करण्यासाठी चीनमधील कुटुंबपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचे कम्युनिस्टांनी ठरविले व त्याचा प्रभावी उपाय म्हणून स्त्रीदास्यविमोचनाचा कार्यक्रम त्यांनी आखला. स्त्रियांवरील परंपरागत बंधने नष्ट करून त्यांना पुरूषांच्या बरोबरीने सर्व हक्क बहाल करण्यात आले. त्यामुळे राष्ट्र विकासाच्या सर्वच क्षेत्रांत स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीने कार्य करताना चीनमध्ये सर्वत्र दिसतात. तसेच आजच्या चिनी स्त्रिया माओवादी विचारप्रणालीने भारलेल्या असल्याने भावी पिढ्यांवर ह्याच विचारसरणीचा प्रभाव राहील, असे चिनी शासकांना साहजिकच वाटते.
  नवसमाजनिर्मितीच्या कार्यास साहित्यादी कलांचीही मदत व्हावी, म्हणून कलावंतांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. मात्र ती कलाकृती कम्युनिस्टांच्या निकषावर तपासून घेण्याची दक्षता घेण्यात शासनकर्ते विसरले नाहीत. पुढे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सफलतेने उत्तेजित होऊन माओने विविध नवीन विचारांच्या आविष्काराने आवाहन केले. परंतु परिणामत: तोपर्यंत गप्प बसलेल्या टीकाकारांनी व विरोधकांनी प्रचलित कम्युनिस्ट शासनातील व विचारप्रणालीतील दोष स्पष्टपणे दाखविण्यास सुरुवात करताच, विचारस्वातंत्र्याचा हा प्रयोग ताबडतोब थांबविला.
          ऑगस्ट १९५८ मध्ये हाती घेण्यात आलेली कम्यूनच्या स्थापनेची चळवळ म्हणजे माओवादी समाजाचे आदर्श ग्रामीण स्वरूप होय. अनेक खेडी व सामूहिक शेती संघ, उद्योग व शासन यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे कम्यून. प्रत्येक कम्यून एक छोटे लोकशाही संस्थानच आहे. यात शेती, धान्यवाटप, पगार वगैरे जनमताने चालावेत अशी सोय आहे. चीनविरोधी काही लोकांनी कम्यून म्हणजे मोठे तुरुंग आहेत. अशी टीका केलेली दिसते. उलट मानवी शक्तीचा कौशल्याने उपयोग करून नियोजनपूर्वक देशाचे उत्पन्न वाढवून सुखी, वर्गविहीन समाजनिर्मीतीचा हा महान प्रयोग आहे, असे प्रतिपादन कम्यूनचे समर्थक नेहमी करतात. कम्यूनमुळे शासनकार्याचे विकेंद्रीकरण होऊन, विशिष्ट क्षेत्राच्या परिस्थितीनुसार उद्योगधंदांचा व शेतीचा विकास होण्यास मदत झाली यात संशय नाही.
        गेल्या काही वर्षांच्या चीनच्या इतिहासातील प्रमुख घटना म्हणजे तेथील सांस्कृतिक क्रांतीचा महान प्रयोग. जुने विचार, जुनी संस्कृती, जुन्या चालीरीती यांतील त्याज्य गोष्टी संपूर्णत: नष्ट करणे व साहित्यादी कलाक्षेत्रात दिसून येणारे भांडवलशाही संस्कृतीचे अवशेष नाहीसे करून नवा वर्गविहीन समाज सजविणे, हा या क्रांतीचा उद्देश असल्याचे तिचा उद्‌गाता माओ-त्से-तुंग व त्याचे समर्थक सांगत असले, तरी चिनी कम्युनिस्ट पक्षातील माओच्या विरोधकांचा समाचार घेणे, हाही या आंदोलनाचा प्रमुख हेतू होता, असे त्याच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.
         लिन ब्याव, छन बो-दा, चौ एन-लाय व माओची पत्नी ज्यांग च्यींग यांची पक्षाच्या प्रमुख पुढाऱ्यांत गणना होते. त्यामुळे माओचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित झाले. पुढे ऑक्टोबर १९६८ अखेर ल्यव शावच्यीला स्थानभ्रष्ट करण्यात येऊन दुंग बी-वू याची हंगामी राष्ट्रध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर एप्रिल १९६९ मध्ये लिन ब्यावला अधिकृत रीत्या माओचा वारसा ठरविण्यात आले. अशा रीतीने सांस्कृतिक क्रांतीच्या अखेरीस चिनी फेरवाद्यांची पीछेहाट होऊन माओवादाचा विजय झाला. तथापि लिन ब्याव आणि माओ-त्से-तुंग यांच्यात मतभेद होऊन लिनने माओविरुद्ध कट केला, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. तो उघडकीस आल्यामुळे लिन एका विमानात बसून रशियाच्या बाजूला पळाला पण ते विमान कोसळून तो त्यात निधन पावला असे नंतर प्रसिद्ध करण्यात आले. 

चौ एन-लाय 
  गेल्या पंचवीस वर्षांचा चीनच्या परराष्ट्रनीतीचा इतिहासही तेथील अंतर्गत घटनांइतकाच गुंतागुंतीचा आहे. चिनी प्रजासत्ताकाच्या स्थापनेमुळे जगातील साम्यवादी राष्ट्रगटांची ताकद बरीचशी वाढली आणि जागतिक राजकारणावर महत्त्वाचे परिणाम झाले.
        प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासूनच त्याला रशिया व अन्य साम्यवादी राष्ट्रांची मान्यता मिळाली. त्यानंतर लवकरच भारतासारख्या तटस्थ देशांनीही नव्या चिनी राजवटीला मान्यता दिली आणि तैवानऐवजी कम्युनिस्ट चीनला संयुक्त राष्ट्रांत मान्यता व स्थान मिळावे असे प्रयत्न रशिया, भारत वगैरे देशांनी सतत केले. शेवटी १९७१ साली चीनला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला.
       साम्यवादी आणि भांडवलशाही राष्ट्रांच्या विरोधी गटांतील संघर्ष हे महायुद्धानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील जागतिक राजकारणाचे मुख्य सूत्र होते. या संघर्षात चीन रशियाच्या बाजूला असणेही अपेक्षितच होते. प्रजासत्ताकाच्या प्रारंभकाळात चीन-रशियातील विविध करारांनुसार रशियाने चीनला बरेच आर्थिक साहाय्य दिले, अनेक तंत्रज्ञ पुरविले, तसेच चिनी युवकांना रशियात शिक्षण दिले. एकंदरीत चिनी प्रजासत्ताकाच्या भक्कम पायावर उभारणी करण्यात रशियाचे अमोल साहाय्य झाले. साहजिकच परराष्ट्रीय राजकारणात चीन रशियाच्या बाजूला राहिला. कोरियन युद्धात चीनने उत्तर कोरियाची बाजू खंबीरपणे घेतल्यानेही चीन-रशिया मैत्री दृढ झाली. परंतु तैवानविरुद्ध व अमेरिकेच्या सातव्या आरमाराविरुद्ध रशियाने चीनला मदत न दिल्याने १९५८ पासून उभयपक्षांतील मित्रत्वाचे संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर रशियाने चीनबरोबर केलेला अण्वस्त्राचा करार मोडल्यामुळे उभयतांतील संबंध अधिक दुरावले. अल्बेनिया-रशिया वादात चीनने अल्बेनियाचे सर्मथन केले. त्याहीपुढे जाऊन रशियाशी होणारा व्यापार कमी करून चीनने कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया इ. देशांकडून प्रचंड प्रमाणावर धान्य खरेदी केले. सोव्हिएट रशियात ख्रुश्चॉव्ह सर्वसत्ताधीश होऊन त्याने स्टालिनवाद निर्मूलनाचे जे धोरण स्वीकारले, तेव्हापासून रशियन चीन नेत्यांत वैचारिक व धोरणविषयक मतभेद तीव्र झाले. भारत-चीन संघर्ष आणि क्यूबात रशियाने ठेवलेल्या क्षेपणास्त्रांच्या प्रश्नावर रशिया व अमेरिका यांच्यात निर्माण झालेला तणाव या प्रश्नांनी त्या मतभेदांचा स्फोट होऊ लागला. रशिया, अमेरिका व अन्य भांडवलदार राष्ट्रे यांच्याशी जे सहअस्तित्वाचे धोरण स्वीकारले, त्याला त्या वेळी माओ-त्से-तुंगचा कडवा विरोध होता. निरनिराळ्या देशांच्या कम्युनिस्ट पक्षांच्या वार्षिक अधिवेशनांत चिनी व रशियन प्रतिनिधी हे नीतिविषयक वाद उघडपणे लढवू लागले. जगातील अन्य कम्युनिस्ट पक्षांपैकी फक्त अल्बेनियाच्या पक्षानेच चीनच्या भूमिकेचे समर्थन केले. चीन व रशिया यांच्यातील तीव्र स्पर्धा साम्यवादी जगात सुरू झाल्यामुळे साम्यवादी गटाची एकजूट दुभंगली. याशिवाय उत्तर सीमेबाबत उभय देशांत तंटा आहेच. या तंट्याचे १९६९ साली लढाईत रूपांतर झाले. सध्या दोन्ही देश एकमेकाविरुद्ध सज्ज आहेत.
      अमेरिकेने १९७१ साली आपला चीनविरोधी पवित्रा बदलला आणि १९७२ साली अध्यक्ष निक्सन यांनी पीकिंगला भेट देऊन चीन-अमेरिका समझोता घडवून आणला. चीननेसुद्धा एका वेळी  एकच वैरी असावा, या राजनीतीनुसार अमेरिकेशी सलोखा करण्यास सुरुवात केली. तथापि अमेरिकेच्या साम्राज्यशाही धोरणाबद्दल चीन-अमेरिका संघर्ष कायमच आहे. परंतु आज अमेरिकच्या साहाय्याने चीनला संयुक्त राष्ट्र या संघटनेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व रोधाधिकारही मिळाला आहे. त्यामुळे तैवानच्या प्रश्नाचे महत्त्व कमी झाले. अमेरिकेने आशियातून आपले सर्व लष्करी तळ व शस्त्रदले काढून घ्यावीत, ही भूमिका चीनने आता सोडली आहे.
      निरनिराळ्या देशांमध्ये शांततेचे स्नेहाचे संबंध असावेत परंतु नवसाम्राज्यवाद वा नव-वसाहतवाद यांविरूद्ध सतत संघर्ष केला पाहिजे व अशा प्रकारे लढणाऱ्या शक्तींना लष्करी साहाय्य करण्याचा आपला हक्क आहे, असे आपले धोरण चीनने घोषित केले. त्यामुळे विशेषतः आग्नेय आशियातील काही देशांशी असलेल्या चीनच्या संबंधात तणाव निर्माण झाले. १९५५ च्या बांडुंग परिषदेत चीनने पंचशीलचा पुरस्कार केला. हे पंचशील १९५४ साली झालेल्या भारत-चीन करारात प्रथम ग्रथित करण्यात आले होते. त्यानंतर चीनने निरनिराळ्या देशांशी केलेले मैत्रीचे करार पंचशीलवर आधारित आहेत.
      भारताशी चीनचे संबंध काही काळ स्नेहाचे व सहकार्याचे होते. चीनने तिबेट व्यापल्यानंतर त्याला प्रथम धक्का बसला. तिबेटमध्ये चीनविरुद्ध उठाव होऊन दलाई लामांना भारतात आश्रय देण्यात आल्याने चीनने भारतावर प्रखर टीका केली. अखेर अक्साई चीनच्या प्रश्नावर ऑक्टोबर १९६२ मध्ये भारत-चीन यांत लढाईच झाली. तेव्हापासून दोन्ही देशांचे राजनैतिक संबंध कायम असूनही मैत्रीचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले नाहीत. १९६५ व १९७१ च्या भारत-पाक संघर्षाच्यावेळी चीनने पाकिस्तानचा पाठपुरावा केला. अगदी १९७४ मध्ये सिक्कीमला भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आले तेव्हा पुन्हा एकदा चीनने भारतावर विस्तारवादाचा आरोप केला. रशियाच्या शक्तीला काटशह म्हणून चीनचे अमेरिकेशी संबंध सुधारले.
       १९६५ च्या सांस्कृतिक क्रांतीनंतर चीनचे काही कम्युनिस्ट व कम्युनिस्टेतर देशांशी संबंध बिघडले. तथापि अल्बेनिया, उत्तर कोरिया व व्हिएटनाम यांच्याशी मात्र चीनचे संबंध सलोख्याचे राहिले. १९६८ अखेरपर्यंत भांडवलशाही व साम्राज्यवादी अमेरिका, फेरवादी रशिया, अलिप्ततावादी भारत यांना विरोध करण्याचे चीनचे उद्दिष्ट होते, असे त्याच्या एकूण परराष्ट्रीय धोरणावरून दिसते. परंतु १९७० पासून चीनने हे धोरण बदलले असून कॅनडा-अमेरिका यांच्याशी त्याने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तसेच भारताशी असलेले संबंधही सुधारण्याच्या मार्गावर आहेत, हे भारताने चीनमध्ये राजदूताची नेमणूक केली (१९७६) व ती चीननेही मान्य केली यांवरून दिसून येते. चीनने अलीकडे म्हणजे १८ डिसेंबर १९७४ मध्ये नवीन संविधान तयार केले असून त्यानुसार राष्ट्राध्यक्षाचे पद रद्द करण्यात आले आहे. त्याऐवजी पक्षप्रमुख हाच सर्वश्रेष्ठ सत्ताधारी व सर्व सेनादलांचा प्रमुख केला आहे. संविधानात सहजीवनाच्या तत्त्वावर भर दिला असला, तरी परराष्ट्रीय राजकारणात अनेक फेरबदल सुचविले असून रशियाविरोधी धोरण अद्यापि कायम आहे. या सर्वांवरून चीनच्या एकूण धोरणात बदल झाल्याचे सूचित होत असले, तरी आजचा चीन म्हणजे जगाला बुचकळ्यात टाकणारा एक कूट प्रश्न आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे. 
राजकीय स्थिती :
       चँग कै-शेकच्या राष्ट्रीय सरकारचा पराभव करून १ ऑक्टोबर १९४९ रोजी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने देशाचे शासन स्वत:कडे घेतले व राजकीय स्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेल्या चिनी जनतेच्या परिषदेने सप्टेंबर १९४९ मध्ये स्वीकृत केलेल्या तत्त्वानुसार शेष चीनच्या शासनाची घडी बसविण्यात आली. त्यानंतर माओ-त्से-तुंगच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यावर विविध संघटना, राजनीतिशास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी व जनतेचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा व विचारविनिमय होऊन १५ सप्टेंबर १९५४ रोजी चिनी जनतेच्या सार्वभौम प्रजासत्ताक राज्याच्या संविधानास मान्यता देण्यात आली. १९५४ ते १९७४ या वीस वर्षांत चीनचे प्रशासन ह्या संविधानानुसार चालत होते. १९७४ मध्ये राष्ट्रीय जनता काँग्रेसने नवीन संविधान स्वीकारून त्यास मान्यता दिली. हे संविधान तयार करण्यास सु. पाच वर्षांचा कालावधी लागला. चीनचा असा दावा आहे की, या संविधानात सर्व समाजवादी तत्त्वे एकवटलेली असून त्यात प्रसंगोपात्त लवचिकता ठेवली आहे. चीनचे प्रजासत्ताक राज्य म्हणजे जनतेच्या संमतीवर आधारलेली हुकूमशाही असून शांततेच्या मार्गाने पिळवणूक व दारिद्र्य नाहीसे करून सुखी व समृद्ध समाजवादी राष्ट्र निर्माण करण्यासाठी संविधान, ही वरील उद्दिष्टपूर्तीची पहिली पायरी आहे. प्रचलित संक्रमणावस्थेतून क्रमाक्रमाने व शांततेच्या मार्गाने समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य करण्यासाठी सदर संविधानाद्वारा निर्मित शासनसंस्था कटिबद्ध असल्याची ग्वाही संविधानाच्या उद्देशिकेत दिलेली आहे. 

 चीन, माओ आणि शी जिनपिंग

यांग जिशेंग यांच्या  World Turned Upside Down या  नव्या  पुस्तकाची दखल पश्चिमी देशातली माध्यमं सध्या घेत आहेत. या पुस्तकात लेखकानं माओच्या १९६६ ते १९७६ च्या दरम्यान झालेल्या सांस्कृतीक क्रांतीवर सविस्तर लिहिलं आहे.

 

माओच्या राजकीय जीवनात तीन मोठी पर्वं झाली. पहिलं पर्व लाँग मार्च. या काळात माओनं कम्युनिस्ट पार्टी चीनमधे रुजवली आणि यथावकाश माओ सत्ताधारी झाला.
     दुसरं पर्व आकाशउडीचं, झटपट आर्थिक विकासाचा प्रयत्न.
     माओचं डोकं अजबच म्हणायचं. चिनी समाज माओला पूर्ण बदलायचा होता. बदल चुटकीसरशी होऊ शकतात असं माओला वाटत असावं. त्यामुळं दुसऱ्या पर्वात माओनं चीनचं रूपांतर आर्थिक महाशक्तीत करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं १९५८ ते ६२ या काळात आकाशउडी घ्यायचं ठरवलं. चिमण्या धान्य खातात म्हणून चिमण्यांचा नायनाट केला.
       चिमण्या नाहिशा झाल्या, दोन वर्षं शेतातली पिकं चिमण्यापासून वाचली. पण तिसऱ्या वर्षी टोळधाड आली. टोळांना खायला चिमण्या शिल्लक नसल्यानं टोळांनी चीनभरची पिकं नष्ट केली. चीनमधे महाभयंकर दुष्काळ पडला.
    उद्योग चालवण्यासाठी पोलाद हवं. गावागावातल्या लोकांनी आपल्या घरातल्या लोखंडाच्या वस्तू आणून गावातल्या भट्टीत टाकायच्या आणि त्यातून पोलाद करायचं अशी चक्रम कल्पना. पोलाद करायचं तर त्यात एक विज्ञान, तंत्रज्ञान गुंतलेलं आहे वगैरे गोष्टींशी माओला घेणं नव्हतं. प्रोफेसर, तंत्रज्ञ, वैज्ञानिकांना काही कळत नाही, सारं काही आपल्याला आणि खेड्यातल्या सामान्य माणसाला कळतं अशी माओची धारणा. घराघरातली भांडीकुंडीही नाहिशी झाली.

यांग जिशेंग

यांग जिशेंग

असला वेडचापपणा म्हणजे आकाशउडी होती. त्या उडीत पावणेचार कोटी माणसं मेली. हे दुसरं पर्व महाग पडलं. लोकंही नाराज झाले. पक्षात माओला विरोध होऊ लागला. हा विरोध मोडून काढण्यासाठी माओनं तिसरं पर्व मांडलं.
       हे तिसरं पर्व म्हणजेच सांस्कृतीक क्रांती. माओनं आपल्या विरोधकांचा काटा काढायचं ठरवलं. मध्यमवर्गी, सुखवस्तू,बुद्धीजीवी, तंत्रज्ञ, डॉक्टर इत्यादी सर्व मंडळी शोषक आहेत आणि समाजाची वाट लावत आहेत असं माओनं ठरवलं. या वर्गातल्या लोकांना धडा शिकवायचा. प्राध्यापक इत्यादींना रस्ते तयार करायला लावायचे, खड्डे तयार करायला सांगायचे असं माओनं ठरवलं. लाखो शाळकरी मुलांना त्यांने या कामी कामाला लावलं.
       मुलांनी माओचं रेड बुक हातात घेऊन वरील बूर्ज्वा आणि समाजविरोधी लोकांना घराबाहेर काढलं. त्यांच्या गळ्यात ते समाजविरोधी असल्याचे बोर्ड टांगले. त्यांना कुदळी फावड्यांनी धोपटलं. जाहीरपणे त्यांची अवहेलना केली. प्रसंगी मुलानी आपल्या आई वडिलांनाही मारलं. समाजहितविरोधी ठरवल्या गेलेल्या माणसांची बायकामुलंही अवहेलनेतून सुटली नाहीत. छोटी छोटी मुलंही अमानुष वागत होती. छोट्या मुलांना त्यांना फाडून मारल्याच्याही घटना घडल्या.
     अनेक गावांत प्रेतांचा खच झाला आणि तो शेवटी नदीत पोचला. नद्या फुगलेल्या प्रेतानी भरल्या.

माओ

माओ

प्रकरण हाताबाहेर गेलं. तेव्हां सैन्याला हिंसा रोखण्यासाठी रस्त्यावर पाठवण्यात आलं. माओनंच तशी आज्ञा दिली की सैन्यानं माओला आटोक्यात आणण्यासाठी सैनिक पाठवले ते कळत नाही. पण परिणाम असा की सैन्य आणि रेड गार्ड्स यांच्यातच जुंपली. देश यादवीच्या उंबरठ्यावर होता.
      घसरणीलाही एक मर्यादा असते, गाडं कुठं तरी थांबतंच. १५ लाख माणसांचा बळी घेऊन सांस्कृतीक क्रांती थांबली. माओला कसंबसं आवरण्यात आलं. पण प्रश्न होता की १५ लाख बळींचं खापर माओवर फोडायचं की नाही. पण तसं करणं म्हणजे माओ आपलाच नेता असल्यानं आपणही त्यात सहगुन्हेगार होतो असं मान्य करण्यासारखं होतं. त्यांनी वाट काढली. सांस्कृतीक क्रांतीचा हेतू चांगला होता, चांडाळ चौकडीनं क्रांतीची वाट लावली असं पसरवण्यात आलं. माओची पत्नी व इतर तीन जणांना सांस्कृतीक क्रांतीचा गैरवापर करण्यासाठी जबाबदार ठरवण्यात आलं.
झालं. माओची सुटका झाली.
        यांग जिशेंग यांनी आकाशउडीचा इतिहास २००८ साली टूंबस्टोन या पुस्तकात लिहिला. पुस्तक हाँगकाँगमधे प्रसिद्ध झालं. पुस्तकावर लगेच बंदी घालण्यात आली. पुस्तकाच्या भूमिगत प्रती चीनमधे पोचल्या, लोकांनी त्या लपवून छपवून वाचल्या.
त्यानंतर २०१६ साली लेखकानं प्रस्तुत पुस्तक रचलं. ते संपादित होऊन इंग्रजीत २०२०साली प्रसिद्ध झालं.
        प्रस्तुत पुस्तकात लेखक चीनमधील माओची कारकीर्द सुरु होते तिथपासून चीनचा एक धावता धांडोळा घेतो. सांस्कृतीक क्रांतीपूर्व स्थिती, क्रांतीच्या काळात काय काय घडलं ते पुस्तकात मांडण्यात आलं आहे. सरकार, लष्कर, पक्ष, माओच्या जवळची माणसं आणि माओ यांच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची जोडणी पुस्तकात आहेत. माओची अधिकृत वचनं, आदेश, पक्षात झालेले निर्णय इत्यादींचे पुरावे लेखकानं मांडले आहेत. माओची कारकीर्द, कम्युनिस्ट पक्षाची काम करण्याची पद्धत इत्यादींचा अभ्यास करणाऱ्यांना संदर्भ म्हणून उपयोगी पडेल अशी माहिती पुस्तकात आहे.
       लेखकाचा जन्म १९४० सालचा. लेखक बीजिंगमधेच रहातात. आकाशउडी आणि सांस्कृतीक क्रांती, दोन्ही लेखकानं अनुभवल्या आहेत. लेखक पत्रकार होते, कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यही होते. दोन्ही काळात माओनं काही वावगं केलं असं लेखकाला वाटलं नाही. लेखक म्हणतो की १९८९ मधल्या  तिएनानमेन आंदोलनानंतर त्याचे डोळे उघडले. कम्युनिस्ट पार्टी-सरकार लोकांना स्वातंत्र्य कसं नाकारतं याचा अर्थ लेखकाला तिएनाममेन चौकातल्या दडपशाही नंतर समजला. तिथून लेखकानं पुस्तकं लिहायला घेतली.
        पुस्तकाच्या शेवटी लेखक लिहितो की चीनमधे विषमता, आर्थिक प्रश्न सुरवातीपासून होते, आजही आहेत. आजही लाखापेक्षा जास्त छोटीमोठी आंदोलनं होत असतात आणि सरकार ती दडपत असतं. राज्यकारभारात नागरिकाला स्थान नाही, नागरिकाला विचाराचं स्वातंत्र्य नाही, धोरणं ठरवण्यात सहभाग नाही ही चीनमधली गोची आहे. घटनात्मक लोकशाही नाही, ही चीनमधली खरी अडचण आहे आणि ती अडचण केव्हां दूर होईल याची लेखक वाट पहातोय.
     सत्ता हाती आल्यानंतर आकाशउडीच्या काळात पावणेचार कोटी माणसं माओनं मरू दिली, हवं तर मारली असं म्हणा. परंतू सांस्कृतीक क्रांतीच्या काळात दीड कोटी माणसं मात्र मारलीच. ते साल होतं १९७६. सांस्कृतीक क्रांतीच्या काळात शी जिन पिंग यांच्या वडिलाना, ते माओचे निकटचे सहकारी होते, माओनं छळलं. शी जिन पिंगनी ते सहन केलं, बंड केलं नाही, वेळोवेळी माओचं गुणगानच केलं.
        माओचा कार्यकाळ संपल्यानंतर देंग यांचा कार्यकाळ सुरु झाला. त्या वेळी शी जिन पिंग हे पक्षाचे पुढारी होते.
     देंग यांच्या काळात चीनची आर्थिक प्रगती झाली पण तरुणांना स्वातंत्र्य हवं होतं, लोकशाही हवी होती. विषमता शिल्लक होती, आर्थिक प्रश्न आणि असंतोषही होता. त्यातूनच १९८९ साली तिएनेमान घडलं. पण त्या प्रकरणात देंगनी ” फक्त दहा हजार ” माणसं मारली.
 म्हणजे प्रगतीच म्हणायची.

शी जिन पिंग

शी जिन पिंग

२०१५ पासून शी जिन पिंग यांच्या कारकीर्दीत विषमता आणि आर्थिक प्रश्न शिल्लक आहेत आणि असंतोष वेळोवेळी उफाळून येतोय. चीनमधे आलबेल नाहीये. तरूण मुलांना आर्थिक विकासाबरोबरच स्वातंत्र्य हवंय. त्यांच्या परीनं सोशल मिडियाचा वापर करून ते संघटित रहातात, त्यांचं म्हणणं मांडत असतात. शी जिन पिंग त्यांना आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करतात.
      राजकीय, आर्थिक विषयाच्या हिशोबात चीनमधे कम्युनिझम शिल्लक नाही. सरकारच्या नियंत्रणातली मुक्त व्यवस्था असं चीनमधल्या राजकीय-आर्थिक व्यवस्थेचं वर्णन करता येईल. सत्तेची पकड, सत्तेवर एका माणसाची पकड, सत्तेपुढं समाजानं वाकलेलं रहायचं अशी परंपरा चीनच्या समाजात दिसते. त्यात फरक पडलेला दिसत नाही, विरोधकांच्या वाट्याला येणारं क्रौर्य मात्र कमी झाल्याचं दिसतंय
    हाँगकाँगमधल्या लोकांची स्वातंत्र्याची मागणी शी जिन पिंग मान्य करत नाहीत. परंतू तिथं शी जिन पिंग यांनी नरसंहार केलेला नाही, तुलनेनं लोकांचा छळ कमी झालाय, तुलनेनं खूपच कमी माणसं त्यांनी तुरुंगात ढकललीयत.त्यामुळं लेखकाला आशादायी रहायला जागा आहे.

भारत-चीन संबंध :-

‘जागतिक राजकारणात एकवेळेस आपण आपल्या शत्रूची किंवा मित्राची निवड करू शकू, मात्र शेजाऱ्याची निवड करणे शक्य नाही’ असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात असेही म्हटले जाते की ‘कोणताही देश दुसऱ्या देशाचा स्थायी शत्रू किंवा स्थायी मित्र नसतो. प्रत्येकाचे राष्ट्रीय हित तेवढे स्थायी असते’. ही दोन्ही विधाने भारत आणि चीन संबंधांबाबत महत्वाची आहेत. दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत हे वास्तव ना बदलता येणारे आहे, ना दुर्लक्षित करण्याजोगे आहे. दोन्ही देशांचे हित वेळोवेळी एकमेकांच्या आड येणार हे सुद्धा खरे आहे; त्याचप्रमाणे, जागतिक स्तरावर काही क्षेत्रांमध्ये अनेक पातळ्यांवर द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांचे हित साध्य होणे शक्य आहे. याचा अर्थ, सद्द स्थितीत द्विपक्षीय संबंधांबाबत भारत आणि चीनकडे दोन पर्याय आहेत. एक, काही बाबतीत राष्ट्रीय हित एकमेकांच्या आड येत असल्यामुळे एकमेकांशी पूर्ण शत्रुत्व पत्करायचे; किंवा दोन, ज्या क्षेत्रांमध्ये सहकार्य आवश्यक व शक्य आहे तिथे परस्परांची साथ द्यायची, मात्र ज्या मुद्द्यांवर राष्ट्रीय हित एकमेकांच्या आड येते आहे तिथे आपापली भूमिका कायम ठेवायची. यातला पहिला पर्याय साधा-सोपा आहे, तर दुसरा पर्याय क्लिष्ट संबंधांचा आहे. दोन पैकी एका देशाने जरी पहिला – म्हणजे पूर्ण शत्रुत्वाचा मार्ग – निवडला तर दुसऱ्या देशाकडे काही पर्याय उरणारा नाही. डोकलामचा गंभीर पेचप्रसंग ज्या पद्धतीने निवळला, तो तोडगा तात्पुरता जरी असला तरी, त्यातून दोन्ही देशांना सध्या पहिला पर्याय नको आहे हे स्पष्ट झाले आहे.

चीनमध्ये समाजवादी गणराज्याची स्थापना झाल्यानंतर काही अंशी चिनी साम्यवादी पक्षाच्या न्युनगंडामुळे आणि बहुतांशी पाश्चिमात्य देशांनी पुकारलेल्या असहयोगाने, माओ त्से-तुंगच्या कारकिर्दीत चीनचे अनेक देशांशी असलेले परराष्ट्र धोरण पहिल्या पर्यायावर आधारीत होते. सन १९६२ च्या युद्धानंतर भारताचे चीन विषयक धोरण सुद्धा पहिल्या पर्यायावर, म्हणजे संपूर्ण शत्रुत्वाच्या भावनेवर, आधारीत होते. मात्र, सन १९८० च्या दशकात दोन्ही देशांना शत्रुत्वाच्या धोरणाच्या वांझोटेपणाची खात्री पटली आणि जसे-जसे चीनचे जगातील सर्व देशांशी संबंध सुधारलेत, भारत-चीन संबंधांना सुद्धा सहकार्याचे धुमारे फुटलेत. हा सर्व इतिहास ताजा असल्यामुळे दोन्ही देशांनी क्लिष्ट संबंधांना, म्हणजे वर उल्लेखलेल्या दुसऱ्या पर्यायाला, प्राधान्य देणे अपेक्षित आहे.

भारत-चीन संबंधांचा ऐतिहासिक आढावा

चिनी साम्राज्याचा विस्तार दर्शवणारे नकाशे

शांग साम्राज्य (c.1600-1046 BCE)

भारताप्रमाणे चीनची गणना जगातील सर्वाधिक पुरातन संस्कृतींच्या माहेरघरांमध्ये होते. इतर पुरातन संस्कृतींच्या तुलनेत या दोन्ही देशांतील समाजांनी आपापल्या संस्कृतींचे सातत्याने जतन केले आहे. पाश्चिमात्य जगतात पुरातन संस्कृती लयास जाऊन नव्या सभ्यतांचा झालेला उदय हे परस्परांपासून तुटलेले दोन संपूर्ण वेगळे कालखंड आहेत. मात्र भारत आणि चीनच्या समाजांतील संस्कृतींच्या संदर्भात अशी रेषा ओढणे शक्य नाही. अशा या एकमेकांच्या शेजारी असलेल्या दोन सभ्यातांदरम्यान प्राचीन काळापासून ते आतापर्यंत एकतर घनिष्ट संबंध प्रस्थापित व्हायला हवे होते किव्हा प्रचंड शत्रुत्व निर्माण होऊन भीषण युद्धे व्हायला हवी होती. मात्र, सन १९६२ च्या एक महिने चाललेल्या एकतर्फी आक्रमणाचा अपवाद वगळता दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध शस्त्रे उगारलेली नाहीत. या उलट, चीन व जपान या शेजारी देशांदरम्यान शतकानुशतके वैमनस्य असून त्याची परिणीती अत्यंत भीषण युद्धांमध्ये झाली आहे. याचप्रमाणे, द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत युरोपातील राष्ट्रांदरम्यान असलेल्या कमालीच्या शत्रुत्वामुळे युरोपला शतकानुशतके युद्धांना सामोरे जावे लागले आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत भारत आणि चीन दरम्यान मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्याच्या शक्यता वारंवार पुढे आल्या आहेत. कधी कधी दोन्ही देशांतील सहकार्य आकारास सुद्धा आले आहे आणि तसे होत असतांनाच ते अचानक संपुष्टात आले आहे.

हैन साम्राज्य (206 BC–220 AD)
युआन साम्राज्य (1271AD –1368AD)

प्राचीन काळात दोन्ही देशांमध्ये घनिष्ट संबंध होते हे सर्वश्रुत आहे. मात्र ते अचानक खंडीत झालेत आणि कित्येक शतके – नव्हे तब्बल दिड ते दोन सहस्त्रके – दोन्ही प्रदेश एकमेकांशिवाय जागतिक स्तरावर आपापले महत्व टिकवून होते. प्राचीन काळात प्रस्थापित झालेले शैक्षणिक, व्यापारी व अध्यात्मिक संबंध पुढे का टिकू शकले नाहीत याबाबत आपण फक्त काही कयास बांधू शकतो. एक तर, प्राचीन काळात ज्या वेळी दोन्ही देशांदरम्यान अत्यंत मैत्रीचे संबंध होते, त्यावेळी भारतात मौर्य साम्राज्याने एक व्यवस्था निर्माण केली होती आणि चीनचे साम्राज्य आज दिसते तेवढे मोठे नव्हते. आजच्या चीनच्या तुलनेत ते अर्धे सुद्धा नसावे. कालांतराने दोन्ही देशांमध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली असतांना त्यांच्यातील संबंध खंडीत झाले. म्हणजे, मौर्य साम्राज्यानंतर भारतातील शासन व्यवस्था विभागली गेली, त्यातून काही अंशी अराजक व छोट्या छोट्या राज्यांची स्थापना झाली. याउलट, चिनी साम्राज्याचा विस्तार होऊन संपूर्ण चीनमध्ये एक व्यवस्था कायम झाली. या परिस्थितीचा आणि दोन्ही देशांतील संबंध खंडीत होण्याचा एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध जोडणे शक्य नसले तरी दोन बाबींचा परिणाम नक्कीच झाला असणार. एक, सम्राट अशोकानंतर भारतात बौद्ध धर्माला उतरती कळा आली आणि राजाश्रायातून चीनसह पूर्व आशियात होणारा बौद्ध भिक्खू व अभ्यासकांचा विहार बंद झाला. दुसरीकडे, चिनी साम्राज्याच्या विस्ताराने व व्यवस्था प्रस्थापित झाल्याने चिनी समाज अधिकाधिक आत्मकेंद्री झाला.

या काळात चीनमध्ये ‘मध्यवर्ती साम्राज्य’ (Middle Kingdom) ही संकल्पना विकसित झाली. यानुसार, जगातील सर्वाधिक प्रगत, प्रगल्भ व संपन्न सभ्यता चीनमध्ये अस्तित्वात असून या सभ्यतेबाहेरचे जग रानटी किव्हा निम्नरानटी असल्याची भावना चीनमध्ये पसरली. अशा असंस्कृत व असभ्य लोकांशी संपर्क ठेवण्याची आवश्यकता नाही असे मानले जाऊ लागले. या मानसिकतेमुळे महाकाय हिमालयाला पार करून भारतात येण्याची चिनी अभ्यासकांची जिद्द विसावली. याचा अर्थ, चिनी लोक दुसरीकडे कुठेच जात नव्हते असा नाही. विशेषत:, चिनी व्यापारी एकीकडे समुद्री मार्गे आग्नेय आशिया, हिंद महासागरातून दक्षिण भारतातील (केरळ) काही ठिकाणे व पूर्व आफ्रिका किनाऱ्यावर संचार करत होते. दुसरीकडे, चिनी व्यापाऱ्यांनी मध्य आशिया व पश्चिम आशियातील महत्वाच्या व्यापारी शहरांशी नियमित व्यापार करण्यास सुरुवात केली होती. या प्रदेशांमध्ये भारतीय व्यापाऱ्यांचा सुद्धा संचार होता आणि दोन्ही देशांतील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत होती. पुढे या व्यापारावरील चिनी व भारतीय व्यापाऱ्यांची केवळ सद्दीच संपली नाही तर व्यापाराचे मार्ग व नियम सुद्धा बदललेत. याला कारणीभूत होते युरोपीय व्यापारी, ज्यांनी समुद्री मार्गांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत भारत व चीनशी स्वत:च्या अटींवर व्यापार करण्यास सुरुवात केली. व्यापारासाठी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवण्याची पद्धत सुद्धा युरोपीय व्यापाऱ्यांनी अंमलात आणली. यानंतर दोन्ही देशांमध्ये व्यापार झाला तो मुख्यत: ब्रिटीश राजवटीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी!

चिंग साम्राज्य (1636AD – 1912AD)

आधुनिक काळातील संबंधांची सुरुवात

ब्रिटीशांच्या माध्यमातून झालेल्या व्यापारातून भारत व चीन या दोन्ही देशांचे शोषणच अधिक झाले, तसेच या व्यापाराचा दोन्ही देशांमध्ये संबंध पुनर्स्थापित होण्यास फायदा झाला नाही. हळू-हळू दोन्ही देशांमध्ये युरोपीय शक्तींद्वारे होणाऱ्या शोषणाने असंतोष जागृत होऊ लागला आणि पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर तो शिगेला पोहोचला. पहिल्या महायुद्धानंतर भारतात ब्रिटीशांच्या विरुद्ध तीव्र नाराजी पसरली होती, कारण ब्रिटिशांनी युद्धादरम्यान भारतीयांना दिलेली राजकीय सुधारांची आश्वासने पाळली नव्हती. याचप्रमाणे, पहिल्या महायुद्धानंतर झालेल्या करारात चीनला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याची भावना पसरून चिनी तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. युरोपीय वसाहतवादी शक्तींविरुद्धच्या या समान धाग्यामुळे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय नेतृत्वाने परास्परांशी संपर्क प्रस्थापित केला होता. चीनमध्ये सन १९११ मध्येच गणराज्याची स्थापना झाली होती आणि तिथल्या लोकशाहीवादी पक्षाच्या नेतृत्वाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यावा म्हणून खुद्द जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केले होते. चीनच्या तत्कालीन सत्ताधारी कोमिन्तांग पक्षाने भारताच्या स्वातंत्र्याचे समर्थन सुद्धा केले होते. याच काळात रवींद्रनाथ टागोर दोनदा चीनमध्ये वास्तव्याला गेले होते. टागोरांच्या कविता, त्यांचे साहित्य, त्यांच्या कलाकृती यांनी चीनमधील अभिजन वर्ग भारावला होता. टागोरांनी त्यांच्या शांती निकेतन मध्ये ‘चीना भवन’ ची स्थापना करत भारतातील चिनी भाषा व चिनी साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासाचा पाया रचला होता. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात दोन्ही देशांतील वाढते राजकीय व सांस्कृतिक संबंध एका वैचारिक नाळेने जोडले गेले होते. यानंतरच्या शतकात द्विपक्षीय संबंधांमध्ये उलथापालथ झाली असली तरी दोन्ही देशांमध्ये स्वतंत्रपणे हे विचार खोलवर रुजलेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत दोन्ही देशांच्या परराष्ट्र धोरणाचा अंतस्थ व दूरस्थ हेतू याच विचारांनी प्रभावीत झालेला आहे. ही वैचारिक चौकट पुढील प्रमाणे आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होण्याआधी हे दोन्ही देश संपन्न होते, स्वयंपूर्ण होते आणि जागतिक व्यापारात आघाडीवर होते. औद्योगिक क्रांतीच्या गरजा पुरवण्यासाठी युरोपीय देशांनी वसाहतवादी धोरण अंमलात आणले आणि हे दोन्ही देश दरिद्री झालेत. आता युरोपीय देशांच्या वसाहतवादी लुटीच्या धोरणांना थांबवत पुन्हा एकदा भारत व चीन या आशियाई देशांना संपन्नतेच्या मार्गावर आणण्याचे समान उद्दिष्ट दोन्ही देशांतील नेत्यांना सापडले होते. दोन्ही देशांचे राष्ट्रीय हित साधण्यासाठी द्विपक्षीय संबंधांची आवश्यकता अधोरेखित करणारा हा विचार आहे.  भारत-चीन संबंधांमध्ये नव्याने प्रस्थापित झालेल्या या चौकटीची निकड अद्यापही कायम आहे. किंबहुना, अलीकडच्या काळात अमेरिकेसह पाश्चिमात्य जगात उमटत असलेल्या जागतिकीकरण-विरोधी सुरांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय भूमिका अधिक महत्वाची ठरते. जागतिकीकरण किव्हा राष्ट्रवाद यापैकी जेव्हा जे आपल्या फायद्याचे ठरेल तेव्हा ते वापरायचे असा पाश्चिमात्य देशांचा हेका आहे. जागतिकीकरण, राष्ट्रवाद, लोकशाही इत्यादी संकल्पना पाश्चिमात्य देशांनी केवळ आणि केवळ स्वत:चे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी वापरल्या आहेत. ही बाब भारत व चीनच्या राजकीय नेतृत्वाला १०० वर्षे आधीच उमजली होती आणि दोन्ही देशांतील राजकीय सहकार्याची कळी उमलायला लागली होती. या वातावरणात सन १९३१ मध्ये जपानने चीनवर भीषण आक्रमण केल्यावर भारतीय राष्ट्रीय आंदोलनाने चीनला संपूर्ण राजकीय पाठिंबा आणि शक्यतोपरी मदत देऊ केली होती. याच प्रक्रियेत डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या नेतृत्वात एक वैद्यकीय पथक चीनमध्ये पाठवण्यात आले होते. डॉ कोटणीस आणि त्यांच्या पथकाने अहोरात्र केलेल्या कार्याने संपूर्ण चिनी समाज भारावून गेला होता. आज सुद्धा डॉ कोटणीस यांच्याबद्दल सर्वसामान्य चिनी माणसाला प्रचंड आदर व आपुलकी वाटते. चिनी लोकांची सेवा करत असतांनाच डॉ कोटणीस कालवश झाले होते. सन १९३० च्या दशकात दोन्ही देशांतील सहकार्य एवढ्या उंच पातळीवर पोहोचले असतांना परत एकदा द्वितीय विश्वयुद्धामुळे त्यात खंड पडला.

अधिकृत संबंधांची स्थापना आणि विश्वासाचा अभाव

द्वितीय विश्वयुद्धात ब्रिटीश साम्राज्याची कुठल्याही प्रकारे मदत न करता महायुद्धापासून अलिप्त राहण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने घेतला होता. द्वितीय विश्वयुद्धात जपान ने ब्रिटीशांच्या विरुद्ध आघाडी उघडल्यामुळे साहजिकच चीनचे कोमिन्तांग सरकार मित्र राष्ट्रांच्या गटात सहभागी झाले होते. मात्र मित्र राष्ट्रांना मदत न करण्याचे धोरण राष्ट्रीय आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्याच्या विचारातून केले असल्याने द्वितीय विश्वयुद्ध सुरु झाल्यांनतर चीनशी असलेल्या संबंधांमध्ये कमतरता आली. हा दोन्ही देशांमधील राजकीय उलथापालथीचा काळ होता. भारताचे स्वातंत्र्य व फाळणी आणि चीनमधील यादवी व समाजवादी गणराज्याची स्थापना या दोन्ही घटना सन १९४० च्या दशकात घडल्या होत्या. यातून सावरलेल्या राजकीय नेतृत्वाने दोन्ही देशांदरम्यान तत्काळ राजनीय संबंध प्रस्थापित केले आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण चीनमधले संपूर्ण राजकीय नेतृत्व नवे होते. ज्या राजकीय नेतृत्वाशी नेहरूंच्या पुढाकाराने राष्ट्रीय आंदोलनाने संबंध प्रस्थापित केले होते, ते नेतृत्व तैवान बेटावर परागंदा झाले होते.

१ नोव्हेंबर १९४९ रोजी बिजिंग शहरात माओ त्से तुंग ने पीपल्स लिबरेशन आर्मीसह प्रवेश करेपर्यंत चीनमध्ये समाजवादी क्रांती होऊ घातली आहे याची बाह्य जगाला फारशी कल्पना नव्हती. अमेरिकेत तर ‘चीन कुणी गमावला? यावर राजकीय वाद  उभा राहिला होता. चीनमध्ये समाजवादी सरकारच्या स्थापनेच्या फक्त ४ वर्षे आधी अमेरिका आणि ब्रिटेनने चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देऊ केले होते. त्यावेळी चीनमध्ये अधिकृतरीत्या कोमिन्तांग पक्षाचे सरकार होते. त्या सरकारचे पानिपत होत तिथे साम्यवादी पक्षाची सत्ता येऊ घातल्याची शंका जरी अमेरिका व ब्रिटेनला आली असती, तर त्यांनी चीनला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देऊ केले नसते; किव्हा, कोमिन्तंग सरकारच्या बाजूने हस्तक्षेप करत समाजवादी क्रांती थोपवून धरली असती. सन १९१७ च्या रशियातील बोल्शेविक क्रांती नंतर जगात कुठेही, विशेषत: युरोपमध्ये, मार्क्सवादी तत्वज्ञानावर आधारीत पक्षांची सत्ता स्थापन होऊ नये याची भांडवली देशांनी पुरेपूर काळजी घेतली होती. अगदी, हिटलरचे लांगूलचालन करत जर्मनीतील ज्यूंच्या नरसंहाराकडे दुर्लक्ष सुद्धा केले होते. द्वितीय विश्वयुद्ध संपल्यानंतरच्या काळात ग्रीस आणि तुर्कस्थान या देशांमध्ये साम्यवादी आंदोलनाने जोर पकडल्याचे लक्षात आल्यावर अमेरिकेने त्या देशांतील सरकारांना शक्य ती मदत केली होती. असे असतांना, मित्र राष्ट्रांपैकी एक असलेल्या चीनमधील साम्यवादी पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचा थांगपत्ता नसणे, ही अमेरिका व ब्रिटेनसाठी लाजिरवाणी बाब होती. यातून सावरासावर करण्यासाठी भांडवली देशांच्या गटाने क्रांतीला बंडाळी ठरवले आणि चीनच्या समाजवादी गणराज्यावर बहिष्कार टाकला. भारताने मात्र चीनच्या समाजवादी गणराज्याला मान्यता देत तत्काळ द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले. चीनसारख्या विशाल देशाला वाळीत टाकण्याऐवजी त्याला जागतिक समुदायात सहभागी करून घ्यावे आणि जागतिक संस्थांच्या माध्यमातून चीनच्या आंतरराष्ट्रीय वागणुकीवर अंकुश ठेवावा ही भारताची भूमिका होती. आंतरराष्ट्रीय परस्परावलंबन आणि जागतिक संस्थांमध्ये गुंतलेले हितसंबंध यांचा कोणत्याही देशाच्या वागणुकीवर परिणाम होऊ शकतो ही नेहरूंनी स्विकारलेली मांडणी अगदी योग्य होती हे डोकलाम पेचप्रसंग ज्या पद्धतीने निवळला त्यावरून सिद्ध झाले आहे. डोकलाम इथे पुढील कित्येक महिने सैन्याचे ठाण मांडून ठेवण्याची भारत व चीन या दोन्ही देशांची क्षमता असून सुद्धा तिथून सैन्याची माघार घेण्यासाठी दोन्ही देश तयार झाले. डोकलामच्या तणावाचा द्विपक्षीय सहकार्यावर विपरीत परिणाम होऊ नये याबाबत दोन्ही देशांना असलेली काळजी हे याचे मुख्य कारण आहे.

कटू काळाची सुरुवात

सन १९५० आणि १९६० च्या दशकात भांडवली देशांनी चीनला एकाकी पाडल्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागले होते; अमेरिका आणि कोरियासारख्या भांडवली देशांना (कोरियन युद्ध), भारताला (सन १९६२ चे युद्ध), सोविएत संघाला (सन १९६९ च्या चीन-सोविएत सीमेवरील चकमकी) आणि खुद्द चीनमधील लोकांना (चुकीची आर्थिक धोरणे, दुष्काळ, सांस्कृतिक क्रांतीतील अतिरेक, इत्यादी)!

सन १९६२ च्या युद्धानंतरची स्थिती

याचा अर्थ या काळात चीनचे नेतृत्व एका निष्पाप बालकाप्रमाणे होते, ज्यांनी काही चुका केल्या नाहीत किव्हा ज्यांचे हेतू चुकीचे नव्हते असे मुळीच नाही. विशेषत:, भारताद्वारे दलाई लामा आणि त्यांच्या समर्थकांना देण्यात आलेल्या आश्रयाकडे चीनने त्याच्या अंतर्गत प्रकरणातील ढवळाढवळ समजणे पूर्णपणे चुकीचे होते. भारताने दलाई लामांना शरण देत दोन्ही देशांनी अभिमानाने अधोरेखित केलेल्या पंचशील तत्वांचे उल्लंघन केल्याची चीनची भावना झाली, जी आजगायत कायमं आहे. पाश्चिमात्य देशांनी फूस लावल्याने भारत हा तिबेट प्रश्नी हस्तक्षेप करत असल्याचे मत बनवत चीनने भारताला वसाहतवादी शक्तींचे दुय्यम भागीदार किव्हा हस्तक मानले. तिबेट प्रश्नी भारताची प्रगल्भ भूमिका चीनला कळलीच नाही. पाश्चिमात्य देशांना चीनला अस्थिर करण्यासाठी तिबेटचा मुद्दा वापरायचा होता हे खरे होते आणि आजही खरे आहे. यासाठी भारताचा उपयोग करण्याची अमेरिका व ब्रिटेनची सुरुवातीपासून इच्छा आहे. मात्र भारताने कधी या देशांच्या हेतूंना भिक घातली नाही. सन १९८० च्या दशकात ज्याप्रमाणे अमेरिकेने पाकिस्तानचा उपयोग अफगाणिस्तानातील सोविएत वर्चस्व संपविण्यासाठी केला, त्याच पद्धतीने सन १९५० व १९६० च्या दशकात भारताचा वापर तिबेट मध्ये करण्याची अमेरिकेची अंतस्थ मंशा होती. मात्र आशियामध्ये, विशेषत: भारताच्या शेजारी कुठेही पाश्चिमात्य शक्तींचा हस्तक्षेप व प्रभाव नको हे भारताचे धोरण होते. त्यामुळे भारताने तिबेट प्रश्नी हस्तक्षेप न करता मानवीय भूमिकेतून दलाई लामा आणि त्यांच्या समर्थकांना भारतात स्थान दिले होते.  भारतासाठी तिबेटपेक्षा सीमाप्रश्न जास्त महत्वाचा होता, तर चीनसाठी सीमाप्रश्नापेक्षा तिबेट जास्त महत्वाचा होता. म्हणजे दोन्ही देशांचे प्राथमिक हित एकमेकांच्या आड येत नव्हते. तरी सुद्धा दोन्ही देशांची एकमेकांबद्दल चुकीची धारणा झाली. भारताला वाटले की चीन सीमाप्रश्नी महत्वाकांक्षी आहे आणि चीनला वाटले की तिबेटला स्वतंत्र करायच्या पाश्चिमात्य कटात भारत भागिदार आहे. या गैरसमजुतीतून प्रथमच द्विपक्षीय संबंधांत कटूतेची नवी चौकट तयार झाली, जी अद्याप कायम आहे. म्हणजे भारत-चीन संबंधांमध्ये आता एकमेकांना समांतर अशा दोन चौकटी तयार झाल्या होत्या. पहिली, पाश्चिमात्य वर्चस्व झुगारून लावत स्वत:च्या प्रतिष्ठेची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्नरत चौकट आणि दुसरी, तिबेट व सीमाप्रश्नी एकमेकांशी संघर्ष करणारी चौकट! तिबेट व सीमाप्रश्नीचे गैरसमज एकमेकांच्या आंतरिक राजकीय प्रक्रियांना न समजण्यातून सुद्धा उपजले होते. भारताच्या लोकशाही प्रक्रियेतील शेरेबाजी, भाषणबाजी आणि इतरांहून कठोरतम राष्ट्रवादी सिद्ध करण्याची प्रत्येकाची हौस या बाबी सन १९५० मध्ये चीनच्या आकलनशक्तीच्या बाहेरच्या होत्या. सन १९६०च्या दशकात आशियात वसाहतवाद-विरोधी आंदोलन तीव्र असतांना आणि नेहरू त्याच्या नेतृत्वस्थानी असतांना भारताशी असलेला सीमा-विवाद विकोपाला नेण्याचे चीनला कारण नव्हते. चीनचे जागतिक स्तरावरील एकाकीपण जेवढे पाश्चिमात्य राष्ट्रांनी लादले होते, तेवढेच ते चीनने स्वत:वर ओढवून घेतले होते. या काळात सर्वसामान्य चिनी माणूस ते माओ त्से-तुंग पर्यंत सर्वांच्या मनात दोन रुढींनी खोलवर घर केले होते. एक, सुमारे तीन हजार वर्षे संस्कृती व सभ्यतेचे माहेरघर असलेले चिनी साम्राज्य जगातील सर्वाधिक वैभवशाली राज्य होते (Middle Kingdom). दोन, पाश्चिमात्य वसाहतवादी देश आणि जपान व कोरिया सारख्या शेजाऱ्यांनी मिळून सुमारे एक शतकभर चीनचे लचके तोडलेत आणि वैभव लुटले. या रुढींमुळे, एकीकडे, गतवैभव पुन्हा मिळवण्याची जिद्द चीनमध्ये जागृत झाली, तर दुसरीकडे, जगातील इतर सर्व देश जणू चीनला लुटायला बसले आहेत या भितीने चीनला ग्रासले. या दुहेरी भावनेतून चीनच्या व्यवहारात आक्रस्ताळेपणा आला आणि त्यातून चीनने जागतिक समुदायापासून स्वत:ला दूर सारले. जागतिक व्यापार आणि आंतराराष्ट्रीय देवाणघेवाणी शिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही याची समाजवादी क्रांतीनंतर तब्बल तीन दशकांनी चीनला उपज आली.

काळी मांजर पांढरी मांजर

माओ त्से-तुंग नंतर चीनची सत्ता सूत्रे हाती घेणाऱ्या तेंग शिओपिंगने चीनच्या धोरणांमध्ये मुलभूत बदल केले. तेंग शिओपिंगने आर्थिक विकासासाठी अंतर्गत राजकीय स्थैर्य आणि बाह्य जगताशी मैत्रीपूर्ण संबंध हे सूत्र अंमलात आणले. सन १९७८ नंतर चीनचे जवळपास सर्व देशांशी संबंध प्रस्थापित झाले आणि सुधारलेत. या काळात अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे सभासदत्व चीनने मिळवले. चिनी समाजातील वर उल्लेखलेल्या दोन रुढींचा पगडा कमी करण्यासाठी तेंग शिओपिंगने सगळ्यांना श्रीमंत होण्यासाठी झटण्याचा उपदेश केला. याचबरोबर, सगळ्यांचे एकाच वेळी श्रीमंत होणे शक्य नसले, तरी आधी काही लोकांनी श्रीमंत होण्यास हरकत नसावी असा सबुरीचा सल्ला सुद्धा दिला. सन १९८० आणि सन १९९० च्या दशकात या श्रीमंत होण्याच्या आकांक्षेने चिनी माणूस अहोरात्र काम करू लागला. यातून खूप लोकं लखपती तर बरेच जन करोडपती झाले. माओ त्से-तुंग च्या काळातील साम्यवादी पक्षाची वर्ग संघर्षाची भाषा नाहीशी होत श्रीमंत होण्यासाठीच्या संघर्षांचे गुणगान सुरु झाले. साम्यवादी पक्षाच्या सरकारने राबवलेल्या आर्थिक सुधारणांच्या समर्थनार्थ तेंग शिओपिंगने काळ्या-पांढऱ्या मांजरीचा सिद्धांत मांडला. आर्थिक धोरणांचे मूळ उद्दिष्ट गरीबीचे निर्मुलन करणे आणि भौतिक सुबत्ता आणणे हे आहे. ते सरकारी अथवा सरकार नियंत्रित अर्थव्यवस्थेतून साध्य होत असेल तर त्यांवर अंमल करावा आणि खुल्या बाजारपेठच्या अथवा खाजगी भांडवली व्यवस्थेच्या माध्यमातून होऊ शकत असेल तर त्याला संधी द्यावी, असे तेंग चे मत होते. मांजर (म्हणजे अर्थव्यवस्था) काळी आहे की पांढरी हे महत्वाचे नाही, तर ती उंदीर पकडू शकते की नाही हे जास्त महत्वाचे आहे असे तेंगने सांगितले. तेंगच्या या स्पष्टवक्तेपणाने चिनी अर्थव्यवस्थेला एक निश्चित दिशा आणि उद्दिष्ट प्राप्त झाले. याचप्रमाणे, तेंगने चीनला राजकीय स्थैर्य प्रदान केले, ज्याचा सुखद अनुभव चिनी जनतेने पहिल्यांदाच घेतला. सन १९११ मध्ये चीनमध्ये राजेशाहीचे उच्चाटन करत लोकशाही गणराज्याची स्थापना झाली होती. मात्र तेव्हापासून ते माओच्या मृत्युनंतर त्याची पत्नी व तिच्या सहकाऱ्यांना (गैंग ऑफ फोर – चांडाळ चौकटी) फाशीची शिक्षा होईपर्यंत चीनचे राजकीय पटल संघर्षाने आणि अनिश्चिततेने भरलेले होते. तेंगने हे बदलण्याचा विडा उचलला. राजकीय स्थैर्याशिवाय गतीवान आर्थिक विकास शक्य होणार नाही याची तेंगला खात्री होती. तेंगच्या काळात, सन १९८९ च्या तिआनमेन चौकातील विद्यार्थ्यांच्या उग्र निदर्शनांचा आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईचा अपवाद वगळता चीनला राजकीय स्थैर्य मिळाले. राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता आल्याने चीनची संपन्नतेच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.

चीनला नव्याने प्राप्त होत असलेल्या वैभवाने दुसऱ्या कुणाला हानी होणार नाही याची ग्वाही देत तेंग शिओपिंगने चीनचा उदय शांततापूर्ण असेल याची वारंवार खात्री दिली. यापूर्वी जागतिक राजकारणात नव्या शक्तींच्या नावारूपाला येण्याने संघर्ष उदभवल्याची ठोस उदाहरणे असल्याने, नवसामर्थ्यशाली चीनचा धसका कुणी घेऊ नये यासाठी तेंग व त्याच्या उत्तराधिकाऱ्यानी शांततामय उदयाची आश्वासक भाषा वापरली. सन १९९७ मध्ये तेंगचा मृत्यू झाला असला तरी त्याने आखून दिलेली परिभाषा सन २०१२ पर्यंत कायम राहिली. तेंग शिओपिंगने प्रोत्साहन दिलेल्या जिआंग झेमिन आणि त्याचा उत्तराधिकारी हु जिंताव यांच्या कारकिर्दीत कमी-अधिक प्रमाणात हेच धोरण सुरु राहिले. या काळात चीनने आपल्या शेजारील १४ पैकी १२ राष्ट्रांशी असलेले सीमा-विवाद करारांच्या माध्यमातून मिटवले. भारत व भूतान या दोन देशांशी चीनला सीमावाद अद्याप सोडवता आलेला नाही. या काळात सीमावाद आणि दलाई लामांचे भारतातील वास्तव्य कायम असले तरी द्विपक्षीय संबंधांनी उंच भरारी घेतली. सन १९८८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या ऐतिहासिक चीन दौऱ्याने द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यास सुरुवात झाली आणि टप्प्या-टप्प्याने भारत-चीन संबंधांचे चार मजबूत खांब उभे राहिलेत. यातील पहिला खांब आहे उच्चस्तरीय राजकीय आणि राजनीय भेटीगाठींचा! आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना एका वर्षात जितके वेळा भेटतात, तेवढे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटत नसतील. दुसरा खांब आहे द्विपक्षीय व्यापाराचा, ज्याची वार्षिक उलाढाल आता  $७५ बिलियन पर्यंत पोहोचली आहे.  या वर्षीसाठी निर्धारित $१०० बिलियनच्या व्यापारी उलाढालीपर्यंत ही झेप पोहोचली नसली आणि चीनच्या इतर देशांशी असलेल्या व्यापाराच्या तुलनेत हा आकडा नगण्य असला, तरी सन १९८८ पूर्वीच्या स्थितीशी तुलना करता हे आशादायक चित्र आहे. चीनच्या भारतातील गुंतवणुकीत सुद्धा सातत्याने वाढ होते आहे. सन २०१५-१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत या गुंतवणुकीत चार पटींनी वाढ झाली आहे. द्विपक्षीय संबंधांचा तिसरा खांब आहे नियमित होणारी सीमाप्रश्नावरची चर्चा! राजीव गांधींच्या दौऱ्यानंतर नियमितपणे सुरु झालेल्या वाटाघाटींचे सन २००३ मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने विशेष प्रतिनिधींच्या वार्षिक चर्चेत रुपांतर केले. सन २००६ मध्ये दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींनी ‘सीमाप्रश्न सोडवण्यासाठीच्या राजकीय चौकटीवर’ हस्ताक्षर सुद्धा केले. तत्पूर्वी, सन १९९३ मध्ये नरसिंहराव सरकारने चीनशी केलेल्या एका कराराद्वारे दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य आणि लष्करी सामुग्री यांच्यात लक्षणीय कपात केली. भारत आणि चीनच्या संबंधांना आधार देणारा चौथा खांब आहे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या क्षेत्रातील देवाणघेवाणीचा! डोकलाम पेचप्रसंगात चीनने भारतीय भाविकांना नथूला खिंडीतून मानसरोवरला जाण्यास बंदी घालेपर्यंत या देवाणघेवाणीचा आलेख चढता होता. भारत-चीन संबंधांमध्ये एकमेकांच्या फायद्यासाठी मैत्रीची ही नवी (तिसरी) चौकट २० व्या शतकाच्या शेवटापासून उभी राहण्यास सुरुवात झाली. सन २००२ ते सन २०१२ हा भारत-चीन संबंधांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. या काळात वर उल्लेखलेले चारही खांब सशक्त तर झालेच, शिवाय भारत व चीनच्या सहकार्याने जागतिक पातळीवरील समीकरणे सुद्धा बदलायला लागली. या काळात दोन्ही देशांतील समन्वयाने ब्रिक्स आणि जी-२० चे गठन झाले. हवामान बदलाबाबतच्या जागतिक वाटाघाटीत दोन्ही देशांनी विकसित देशांना नामोहरम केले. एवढेच नाही, तर भारत-अमेरिका दरम्यानच्या नागरी अणु-कराराला चीनने अणु-पुरवठादार संघटनेत (एन.एस.जी.) विरोध न केल्याने मूर्त रूप देता आले. ‘जगामध्ये भारत व चीन या दोन्ही देशांच्या वाढीला भरपूर वाव असल्याने दोघांदरम्यान वादाऐवजी संवाद घडायला हवा’ असा आशावाद तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हु जिंताव यांनी वेळोवेळी वक्त केला होता. सन १९२० व १९३० च्या दशकात दोन्ही देशांच्या नेतृत्वाने जो आशावाद जागृत केला होता, त्याला अनुसरून भारत-चीन संबंध मनमोहन सिंग-हु जिंताव काळात बहरले होते. एकीकडे द्विपक्षीय वादाच्या मुद्द्यांवर एकमेकांशी चर्चा-संवाद सुरु ठेवायचा आणि दुसरीकडे शक्य तेवढ्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करायचे हे साधे सोपे धोरण सिंग-जिंताव द्वयींनी स्विकारले होते.

मनमोहन सिंगांची अष्टपैलू सप्तपदी

भारताच्या आर्थिक विकासापुढे जी आव्हाने उभी आहेत त्यातच भारत-चीन सहकार्याच्या संधी उपलब्ध असल्याचे डॉ मनमोहन सिंग यांचे मत होते. डॉ. सिंग यांनी द्वी-पक्षीय सहकार्याची ८ क्षेत्रे सूचित केली होती. ती पुढीलप्रमाणे: एक, भारताने नजीकच्या भविष्यात एकूण १ ट्रीलीयन डॉलर्सची गुंतवणूक पायाभूत सुविधांच्या विकासात करण्याची योजना आखली आहे. चीनचा पायाभूत सुविधांच्या विकासातील अनुभव बघता गुंतवणुकीच्या माध्यमातून भरीव सहकार्यास प्रचंड वाव आहे. दोन, दोन्ही देशांमध्ये शहरीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. शहरीकरणातून निर्माण होणारी आव्हाने आणि समस्या सोडवण्यासाठी दोन्ही देशातील योजनाकार, प्रशासक व उद्योजक यांनी एकत्र येऊन अनुभवांची व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे परस्पर हिताचे आहे. तीन, औद्योगिक उत्पादन हे चीनचे शक्तिस्थळ आहे तर सेवा क्षेत्रातील विकासात भारताने आघाडी घेतलेली आहे. कामगारांच्या कौशल्य विकासात भारताला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. या दृष्टीने औद्योगिक व सेवा क्षेत्रातील परस्पर सहकार्य दोन्ही देशांना हितकारक ठरणारे आहे. चार, दोन्ही देशांमध्ये उर्जेचा वापर सतत वाढत आहे. उर्जा गरजांची पूर्तता करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केल्यास कमी गुंतवणुकीत जास्त यश हाती येईल. विशेषत: अपारंपरिक उर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी तसेच तिसऱ्या देशाकडून मदत घेण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करू शकतात. पाच, वाढती लोकसंख्या, उद्योगांसाठी शेतजमिनीची आवश्यकता, सतत उंचावणारे राहणीमान आणि मुक्त अर्थव्यवस्थेतील किंमतीतील चढ-उतार यामुळे अन्न-सुरक्षा हा दोन्ही देशांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. याबाबतीत दोन्ही देश एकमेकांच्या अनुभवातून आणि एकमेकांकडे उपलब्ध तंत्रज्ञानातून लाभान्वित होऊ शकतात. सहा, मुक्त जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि नियामाधारीत जागतिक व्यापाराचा सर्वाधिक लाभ भारत आणि चीन ने उचलला आहे. मात्र, सन २००८-०९ च्या भांडवलशाही देशांतील आर्थिक संकटामुळे पाश्चिमात्य जगताचा कल संरक्षित अर्थव्यवस्थेकडे वळू लागला आहे. यातून क्षेत्रीय आर्थिक गटांना प्राधान्य देण्यात येत असले तरी त्यांचे मुक्त जागतिक अर्थव्यवस्थेत विलीनीकरण न करण्याचे धोरण अंमलात येत आहे. याउलट क्षेत्रीय आर्थिक गटांच्या विकासातून मुक्त अर्थव्यवस्थेस चालना देणे भारत आणि चीनच्या हिताचे आहे. ब्रिक्स च्या माध्यमातून दोन्ही देशांनी उचललेली पाउले आणखी पुढे नेणे गरजेचे आहे. सात, आर्थिक विकासातून गरिबी निर्मुलनास प्राधान्य देतांना हवामान बदलासंदर्भात जागतिक दबावाचा सामना एकत्रितपणे करणे संयुक्तिक आहे. दोन्ही देशांच्या प्राचीन संस्कृतींमध्ये पर्यावरणास मानाचे स्थान आहे. मात्र हवामान बदल थांबवण्याचा मोठा भार विकसित देशांना उचलावा लागणे नैतिक आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने संयुक्तिक आहे. त्यामुळे हवामान बदल थांबवण्यासाठी ‘सर्वांनी पण वेगवेगळ्या प्रमाणात जबाबदारी उचलण्याच्या’ तत्वाचा भारत आणि चीनने जोरदार पुरस्कार करणे क्रमप्राप्त आहे. आठ, शीत-युद्धोत्तर काळात साधारणपणे दोन्ही देशांच्या वाटेला आंतरराष्ट्रीय शांततेचा अनुभव आला आहे. मात्र आपापल्या सीमारेषेवरील तुलनात्मक शांतता कायम राखण्यासाठी दोन्ही देशांनी जोरकस प्रयत्न करणे आवश्यक आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय एकता आणि अखंडतेबाबतच्या समस्या कमी-अधिक प्रमाणात एक सारख्या आहेत – शेजारच्या देशातून उगम पावणाऱ्या दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेचा दोन्ही देशांना धोका आहे. तसेच पश्चिम आशियात शांतता नांदणे हे दोन्ही देशांच्या उर्जा गरजांची पूर्तता होण्यासाठी आवश्यक आहे. या दृष्टीने दोन्ही देशांनी समान आंतराराष्ट्रीय भूमिका विकसित केल्यास आर्थिक विकासासाठी आवश्यक शांततामय जागतिक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळू शकेल. भूखंडीय आशिया प्रमाणे सामुद्रिक आशिया-पैसिफिक क्षेत्रात सौहार्दाचे वातावरण टिकवणे दोन्ही देशांच्या आंतराराष्ट्रीय व्यापारासाठी हितावह आहे.

सहकार्याचे हे अष्टपैलू प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ सिंग यांनी द्विपक्षीय संबंधांची सात तत्वे अधोरेखित केली होती. एक, आजच्या काळानुसार पंचशीलची पुर्नव्याख्या करत परस्पर विश्वास, एकमेकांच्या कळीच्या मुद्द्यांबाबतची संवेदनशीलता आणि सर्व द्विपक्षीय तंटे चर्चा व वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याची कृतसंकल्पता यांवर भारत-चीन संबंध आधारलेले असावेत. दोन, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील शांतता कायम राखत सीमा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने दोन्ही देशांनी वेगाने वाटचाल करावी. तीन, दोन्ही देशांतील सामरिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी नद्यांचे अखंडीत प्रवाह तसेच व्यापारातील तुट यासारख्या मतभेदाच्या मुद्द्यांवर भारत व चीन दरम्यान सखोल चर्चा व्हावी. चार, दोन्ही देशांमधील अविश्वासाचे आणि गैर-समजुतीचे वातावरण दूर करण्यासाठी उच्च स्तरावरील संवाद व सल्ला मसलतीत सातत्य राखावे. पाच, जागतिक स्तरावर दोन्ही देशांच्या बहुतांश भूमिका समान असल्याने त्याच आधारे क्षेत्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यासपीठांमध्ये राजकीय, आर्थिक व संरक्षण बाबतीत सहकार्य करावे. सहा, आर्थिक बाबींसह सर्व क्षेत्रांमध्ये संबंध बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे. सात, दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये संपर्क आणि सहकार्य वृद्धिंगत करावेत. डॉ सिंग यांनी आपल्या अखेरच्या चीन दौऱ्यादरम्यान चीनच्या साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या प्रशिक्षण केंद्रात केलेल्या भाषणात या अष्टपैलू सप्तपदीची मांडणी केली होती. यावेळी चीनच्या साम्यवादी पक्षातील ५०० हून अधिक नेते हजर होते. द्वी-पक्षीय संबंधांची ही अष्टपैलू सप्तपदी मांडतांना डॉ सिंग यांनी चीनला नव्या युगाची जाणीव करुन दिली. या युगात शीत-युद्ध काळातील परस्परांची घेराबंदी करण्याचे सामरिक तत्वज्ञान अनुपयोगी असून जागतिक राजकारणात त्यास तिलांजली देण्याची गरज असल्याचे सांगितले. चीनच्या इतर शेजारी देशांशी भारताचे संबंध हे केवळ आपल्या आर्थिक विकासासाठी आहेत आणि कोणत्याही प्रकारे त्याद्वारे चीनची कोंडी करण्याच्या प्रयत्नात भारत सहभागी नाही. त्याचप्रकारे, चीन ने सुद्धा भारताच्या शेजारी देशांशी संबंध विकसित करतांना भारत-विरोधी कडबोळे तयार करण्याच्या प्रयत्न करू नये. एकमेकांच्या विरोधात आघाड्या उभारण्यात वेळ व क्षमता खर्च करण्यापेक्षा परस्पर सहकार्याने द्वी-पक्षीय संबंध विकसित करण्याचे लाभ कितीतरी जास्त आहेत. एकाचे जेवढे नुकसान तेवढाच दुसऱ्याचा लाभ हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील तत्व कालबाह्य झाले असून एकाच्या लाभातून दुसऱ्याचा सुद्धा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध झाले आहे, असे डॉ सिंग यांनी चीनच्या धोरणकर्त्यांना सांगितले होते.  २१ व्या शतकात भारत-चीन संबंधांचा नवा अध्याय सुरु झाल्यानंतर प्रथमच भारतीय नेतृत्वाने द्वी-पक्षीय संबंधांच्या दिशा आणि उद्देशांबद्दल पद्धतशीर मांडणी केली होती. डॉ मनमोहन सिंग यांच्या काळात आतापर्यंत उल्लेखलेल्या द्विपक्षीय संबंधांच्या तिन्ही चौकटी एकाच वेळी कार्यरत होत्या. पहिली चौकट – पाश्चिमात्य वर्चस्व झुगारण्याची; दुसरी चौकट – तिबेट व सीमाप्रश्नी एकमेकांशी संघर्ष करण्याची; आणि तिसरी चौकट – एकमेकांच्या फायद्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये देवाणघेवाण करण्याची!

मोदी काळात भारत-चीन संबंध

डॉ मनमोहन सिंग यांनी आखून दिलेल्या अष्टपैलू सप्तपदीचे दोन्ही देशांनी मन:पूर्वक पालन करण्याची गरज असतांना दोन्ही देशांच्या नेतृत्वाने त्याची मनसोक्त पायमल्ली करण्याचे मनावर घेतले असल्याचे चित्र मागील तीन वर्षांमध्ये उभे राहिले आहे. या मागची कारणे सखोल आहेत.

डोकलाम ची भू-राजकीय स्थिती

सन २०१४ मध्ये भारतात झालेल्या सत्तांतराचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होणे स्वाभाविक होते. सन २०१४ च्या निवडणुकीत, सन १९८५ नंतर प्रथमच एका पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाले. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे भारतीय राजकारणात उजव्या समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाला (भाजप) ७० वर्षांच्या लोकशाहीत पहिल्यांदाच बहुमत प्राप्त झाले. भाजपच्या परराष्ट्र धोरणात सुरुवातीपासून एक विरोधाभास आहे. भारताला गतकाळातील वैभव पुनश्च प्राप्त करून देत जागतिक महासत्ता बनवणे हे भाजपच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र पाश्चिमात्य देशांचा प्रभाव कमी झाल्याशिवाय भारताचे जागतिक स्तरावरील महत्व वाढणारे नाही, याची भाजपला जाणीव नाही. नेहरूंच्या गटनिरपेक्ष आंदोलनाचे हे प्रमुख सूत्र होते, ज्याला भाजपचा पूर्व अवतार असलेल्या जन संघाने नेहमीच विरोध केला होता. अमेरिका आणि पश्चिम युरोप हे भारताचे नैसर्गिक मित्र असल्याची उजव्या विचारसरणीची सुरुवातीपासून भूमिका होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भूमिकेचे रुपांतर धोरणात केले, ज्यात अमेरिकेच्या हितात भारताचे हित असल्याचा विश्वास केंद्रस्थानी आहे. एकमेकांच्या फायद्यावर आधारीत द्वी-पक्षीय मैत्रीच्या चौकटीबाहेर जाणारी ही भूमिका आहे. सन २०१४ पर्यंत भारत-अमेरिका मैत्री, ज्या मध्ये दोन्ही देशांतील नागरी अणु-सहकार्य करार, मलबार कवायती आणि शस्त्रास्त्र व्यापार आदींचा समावेश होता, द्वी-पक्षीय फायद्यावर आधारीत होती. भारताने बराक ओबामांच्या ‘पिवोट टू एशिया’ सारख्या चीनला आळा घालण्याच्या महत्वाकांक्षी योजनेत उघडपणे सहभागी होण्याचे कटाक्षाने टाळले होते. याचा भारताला फायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाला. एकीकडे अमेरीकेसोबतची मैत्री दृढ झाली, तर दुसरीकडे चीनशी असलेले संबंध सुधारलेत.  अणु-पुरवठादार गटाचा (एन.एस.जी.) सदस्य असलेल्या चीनने भारत-अमेरिका नागरी अणु-सहकार्य कराराविरुद्ध व्हेटो वापरला नाही, तसेच भारत व चीनच्या जागतिक स्तरावरील सहकार्याने ब्रिक्स व जी-२० या दोन अत्यंत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपिठांचे गठन झाले. द्वितीय विश्वयुद्धानंतर अस्तित्वात आलेले जी-७ चे व्यासपीठ आणि ब्रेटन वूड संस्थांच्या वर्चस्वाला ब्रिक्स व जी-२० व्यासपिठांनी निश्चितच छेद दिला आहे. मात्र सन २०१४ नंतर, अमेरिकेच्या नेतृत्वातील चीन-विरोधी आघाडीत सहभागी होण्याची मोदी सरकारची इच्छा लपून राहिलेली नाही. ही बाब चीनला, तसेच रशिया सारख्या भारताच्या परंपरागत मित्राला न कळण्याजोगे हे देश दुधखुळे नाहीत. परिणामी, रशियाने एकीकडे चीनशी असलेले संबंध अधिकच घट्ट केले आणि दुसरीकडे पाकिस्तानशी प्रथमच संरक्षण क्षेत्रात संबंध प्रस्थापित केले. याचप्रमाणे, चीनने पाकिस्तानशी असलेले संबंध वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवले आणि जागतिक स्तरावर भारत व पाकिस्तानला एकाच तराजूने तोलण्याचे प्रयत्न चालवले. उदाहरणार्थ, शांघाई कोऑपेरेशन ग्रुप चे भारताला सभासदत्व देतांना पाकिस्तानला सुद्धा या प्रतिष्ठीत संघटनेचे सदस्य केले. एन.एस.जी. मध्ये भारताला समाविष्ट करण्यासाठी नजीकच्या भविष्यात पाकिस्तानला सदस्यत्व देण्याची चर्चा चीनने सुरु केली. एकंदरीत, मागील काही वर्षांपासून भारत व चीन यांची जगभरात होत असलेली तुलना बदलत भारताला पाकिस्तानच्या रांगेत नेऊन बसवायचे आणि स्वत:ला आशियातील सर्वात मोठी शक्ती म्हणून प्रस्थापित करायचे धोरण चीनने अंमलात आणण्यास सुरुवात केली. भारत-चीन दरम्यान सातत्याने उत्पन्न होणाऱ्या तणावाची ही एक छटा आहे. चीनच्या आर्थिक विकासातून एकीकडे तिथल्या सत्ताधीशांमध्ये जागृत झालेला आत्मविश्वास आणि आर्थिक विकासातून पुढे आलेले विरोधाभास ही भारत-चीन संबंधांतील तणावाची दुसरी बाजू आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि परकीय गंगाजळीचा प्रचंड साठा यामुळे आपण भारत व इतर विकसनशील देशांच्या खूप पुढे गेलो असल्याचा विश्वास चिनी नेतृत्वात आला आहे. याचवेळी, चिनी अर्थव्यवस्थेतील दोन विसंगतीपूर्ण  बाबींची चिनी नेतृत्वाला चिंता आहे. एक, सिमेंट, स्टील, लोखंड, कोळसा उत्पादनातील प्रचंड क्षमता कुठे व कशाप्रकारे वापरायची हा अक्षप्रश्न चीनला पडला आहे. ही क्षमता जर वापरली नाही तर सध्याचे आर्थिक मंदीचे सावट अधिकच गडद होईल, कारण अनुपयोगातून बेरोजगारीत प्रचंड वाढ होईल. दुसरीकडे, आर्थिक विकासात पूर्वेकडील, म्हणजे समुद्र किनारा लाभलेल्या प्रांतांनी मोठी भरारी घेतली असली तरी वायव्य, ईशान्य व नैरूत्तेकडील प्रांत मागासलेलेच आहेत. या प्रांतांकडून चीनच्या केंद्रीय सरकारवर विकास घडवून आणण्यासाठी प्रचंड दबाव आहे. असे असतांना चीनमधील उत्पादनाची अतिरिक्त क्षमता वापरून या प्रांतांचा विकास का घडवल्या जात नाही, हा प्रश्न उभा राहतो. हे न होण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत. एक, कोळसा सोडला तर अन्य उर्जा स्त्रोत मुबलक प्रमाणात या प्रांतांपर्यंत पोहोचवणे खर्चिक काम आहे. दोन, आंतरराष्ट्रीय व्यापाराशी जोडलेले नसल्याने या प्रांतांमध्ये परकीय गुंतवणूक येण्याची आणि उद्योगांची भरभराट होण्याची शक्यता कमी आहे. तीन, चिनी उद्योग तत्काळ नफा दिसत नसेल तर मागासलेल्या भागात जाण्यास फार उत्सुक नाहीत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चीनच्या सरकारने अनेक वर्षांपासून वायव्येकडील प्रांतांना पाकिस्तान व अफगाणिस्तान मार्गे, ईशान्येकडील प्रांतांना रशिया मार्गे आणि नैरूत्तेकडील प्रांतांना भारत व म्यानमार मार्गे जागतिक व्यापाराशी जोडण्याचे प्रयत्न चालवले होते. या सर्व प्रयत्नांना एकत्रित करत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सन २०१३ मध्ये महत्वाकांशी ‘बेल्ट एंड रोड इनिशीएटीव’ (बी.आर.आय.) ची घोषणा केली.

बेल्ट एंड रोड महाप्रकल्प

या प्रकल्पाबाबत भारताला काही आक्षेप व शंका होत्या, मात्र पूर्ण विरोध नव्हता. सन २०१४ मध्ये भारतात सत्तांतर घडल्यानंतर परिस्थिती वेगाने बदलली. भारताचे परराष्ट्र धोरण अमेरिकी कक्षेत ओढले जात असल्याचा निष्कर्ष चीनने काढला आणि बी.आर.आय. बाबत अमेरिकी दबावामुळे भारताने सहकार्य थांबवल्याचे चीनचे आकलन होऊ लागले. यानंतर चीनने बी.आर.आय. मध्ये चीन पाकिस्तान आर्थिक महामार्गाचा (सीपेक) समावेश केला, ज्याने संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेली. सीपेक भारताचा दावा असलेल्या पण सध्या पाकिस्तानच्या प्रभावात असलेल्या गिलगीट-बाल्टीस्तान व पाकव्याप्त काश्मिरमधून जात असल्याने हा भारताच्या सार्वभौमित्वावर सरळ सरळ घाला आहे. साहजिकच भारताने संपूर्ण बी.आर.आय. वर बहिष्कार टाकला आणि भूतानला सुद्धा तसे करण्यास बाध्य केले. या मुद्द्यावर भारत-चीन संबंधांची घसरलेली गाडी लवकर रुळावर येण्याची चिन्हे नाहीत. गिलगीट-बाल्टीस्तान आणि काश्मिर प्रश्नी भारताची संवेदनशीलता चीनला ठाऊक नाही असे नाही. तरी सुद्धा चीनने भारताशी सल्लामसलत न करता या वादग्रस्त भागातून सीपेकची रचना केली.

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग (सीपेक)

बी.आर.आय. अंतर्गत चीनने बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ आणि मालदीव या सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मुलभूत संरचनेच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीची तयारी चालवली आहे. चीनकडे जमलेल्या परकीय गंगाजळीचा आणि उत्पादनातील अतिरिक्त क्षमतेचा वापर या देशांमध्ये चीनकडून करण्यात येत आहे. हे देश सुद्धा चीनचा वापर भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी करू इच्छितात. परिणामी, दक्षिण आशियात भारताला स्पर्धा निर्माण झाली आहे. शीतयुद्धाच्या काळात जी बाब भारताने चाणाक्षपणे टाळली होती, ज्यामुळे अमेरिका किंवा तत्कालीन सोविएत संघाचा या देशांमध्ये सामरिक प्रवेश होऊ शकला नव्हता, ते आता चीनच्या वाढत्या प्रभावामुळे घडते आहे.

इथे काही बाबी स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. एक, या देशांमध्ये होणारी चिनी गुंतवणूक ही चीनची स्वत:च्या अर्थव्यवस्थेला तारण्यासाठीची आवश्यकता आहे. तिचा उद्देश भारत-विरोधी नाही. मात्र, चीनद्वारे या देशांतील आपल्या आर्थिक प्रभावाचा वापर भविष्यात सामरिक  हेतूंसाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचप्रमाणे, या देशांचा चीनकडे वाढत असलेला कल म्हणजे त्यांचा भारताला असलेला विरोध नाही. हे देश भारत व चीनचा उपयोग स्वत:च्या जास्तीत जास्त आर्थिक फायद्यासाठी करू इच्छितात. याच प्रकारचे  धोरण भारताने शीत युद्धकाळात अमेरिका व सोविएत संघासंबंधी अंमलात आणले होते, तर डॉ मनमोहन सिंग यांच्या काळात अमेरिका व चीनच्या बाबतीत यशस्वीपणे राबवले होते. सन १९९०च्या दशकात भारताने दक्षिण आशियात ‘गुजराल सिद्धांत’ जर जोरकसपणे राबवला असता, तर या प्रदेशात भारताला स्पर्धाच तयार झाली नसती. छोट्या शेजारी राष्ट्रांना मोठ्या भावाच्या नात्याने सर्व ती मदत करायची पण त्यांच्या अंतर्गत  व्यवहारांमध्ये ढवळाढवळ करायची नाही, अश्या सोप्या सूटसुटीत गुजराल सिद्धांताची सर्वाधिक खिल्ली भाजपने उडवली होती. सन १९९८ मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ‘गुजराल सिद्धांत’ गुंडाळून ठेवला आणि त्याच काळात चीनने या सिद्धांतावर आपल्या पद्धतीने अंमल करण्यास सुरुवात केली.  यातून भारत-चीन संबंधांतील चौथी चौकट अस्थित्वात आली. या चौकटीत एकीकडे चीन भारताचा दक्षिण आशियातील प्रभाव कमी करण्यासाठी कार्यरत आहे, तर भारताने चीनच्या शेजारी देशांशी मैत्री वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. म्हणजे, आता द्विपक्षीय संबंधांच्या चार चौकटी तयार झाल्या आहेत. सन २०१३-१४ पर्यंत या चारही चौकटी एकत्रितपणे द्विपक्षीय संबंधांना प्रभावीत करत होत्या. पहिली चौकट– पाश्चिमात्य देशांचे जागतिक राजकारणातील वर्चस्व नाहीसे करण्याचे प्रयत्न करणारी; दुसरी चौकट – तिबेट व सीमा प्रश्नी एकमेकांशी भांडणारी; तिसरी चौकट – सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सबंध वाढवणारी; आणि चौथी चौकट – चीनचा दक्षिण आशियातील प्रभाव व भारताची चीनच्या शेजारी देशांशी असलेली मैत्री यांच्यात वाढ करणारी!

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली चौकट निकालात काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. म्हणजे, यापुढे भारताला पाश्चिमात्य देशांचा – विशेषत: अमेरिकेचा जागतिक प्रभाव कमी करण्यात स्वारस्य उरलेले नाही. याउलट, आपला कमी होणारा जागतिक दबदबा भारत व इतर देशांच्या मदतीने पुनर्स्थापित करण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना भारताचे समर्थन असणार आहे. या मोबदल्यात अमेरिकेने चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी मदत करावी अशी भारताची अपेक्षा आहे. याला अमेरिकी प्रशासनाकडून वरकरणी दुजोरा मिळत असला तरी अमेरिका-चीन आर्थिक संबंधांची व्याप्ती बघता हे वाटते तितके सोपे नाही. डोकलाम प्रश्नी अमेरिकेने स्पष्टपणे भारताची बाजू घेण्याऐवजी दोन्ही देशांना सबुरीचा सल्ला देत चर्चेत मार्ग काढण्याचा उपदेश दिला होता. अलीकडच्या काळात, ज्याप्रकारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांचा ‘पिवोट टू एशिया’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम अलगदपणे गुंडाळून ठेवला, ते बघता अमेरिकेवरील निर्भरता धोकादायक ठरू शकते. याशिवाय, भारताने पहिली चौकट पूर्णपणे मोडीत काढली तर रशिया व इराणसारख्या देशांबरोबर असलेल्या मित्रतेवर सावट येऊ शकते. डोकलाम चा प्रश्न भारताने ज्या आत्मविश्वासाने हाताळला, ते बघता भारताला अमेरिकेवर निर्भर असण्याची गरज नाही हेच दिसून येते. मुळात, आर्थिक प्रगतीपथावर असलेल्या भारताला पहिली चौकट मोडण्याची आवश्यकता जाणवू नये. यातून चीनचे आव्हान पेलण्याचा आत्मविश्वास भारतात नसल्याचा संदेश जागतिक समूहाला जाऊ शकतो.

करावे तरी काय?

२१ व्या शतकातील भारत व चीन दरम्यानच्या क्लिष्ट संबंधांमध्ये दोन बाबी उल्लेखनीय आहेत. एक, दोन्ही देशांदरम्यानची सिमारेषा/प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधूनमधून तणाव असला तरी शांतता नांदते आहे. सन १९८६-८७ नंतर सिमारेषा/प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बंदुकीची एकही गोळी चाललेली नाही हे ध्यानात ठेवावे लागेल. दोन, सन १९८८ नंतर दोन्ही देशांतील चर्चा-संवादात कधीही खंड पडलेला नाही. दोन्ही देशांतील राजकीय परिपक्वतेचे हे लक्षण आहे. या पार्श्वभूमीवर भारताला स्वत:चे हित जपत चीनशी असलेले संबंध सैरभैर होणार नाहीत यासाठी विविधांगी धोरण अंमलात आणावे लागेल. भारताच्या चीन धोरणाचे पैलू पुढील प्रमाणे असावयास हवे:

एक, भारताने दक्षिण आशियात ‘गुजराल सिद्धांताची’ नव्या परिप्रेक्षात पुनर्मांडणी करत चीनच्या शिरकावाला प्रतिबंध करण्यासाठी पाउले उचलावीत. दक्षिण आशियात भारताची ‘मृदू शक्ती’ आणि व्यापारी हितसंबंध चीनच्या तुलनेत खोलवर रुजलेले आहेत. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये दक्षिण आशियाई देशांशी संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचे पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत. यातून भारताचे तीन हेतू साध्य होतील. भारताचे शेजारी देशांशी असलेले संबंध सुधारतील, दक्षिण आशियात पाकिस्तान वेगळा पडेल आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला आपसूक प्रतिबंध बसेल.

दोन, बी.आर.आय. हा चीनसाठी कळीचा मुद्दा आहे. बी.आर आय. वर जाहीरपणे बहिष्कार टाकण्याऐवजी या मुद्द्यावर चीनशी वाटाघाटी सुरु ठेवण्यातून तात्कालिक हित साध्य करता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ, भारताच्या बी.आर.आय. मध्ये सहभागी होण्याची शक्यता दिसल्यास चीन एन.एस.जी. मध्ये भारत-विरोधी व्हेटो वापरणे थांबवू शकतो. या दृष्टीने राजनीय प्रयत्न करण्यास काहीच हरकत नसावी. त्याचप्रमाणे, भारताच्या बी.आर.आय.  सहभागासाठी चीन भारताशी सीपेक (चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग) संबंधी चर्चा करू शकतो. चीनने सीपेक संबंधी भारताशी चर्चा करणे हा पाकिस्तानला मोठा धक्का ठरू शकतो. एक तर, यामुळे चीन-पाकिस्तान संबंधांतील विश्वासाची दृढता कमी होऊन अनिश्चिततेची छोटेखानी पोकळी तयार होऊ शकते. शिवाय, गिलगित-बाल्तीस्थान आणि पाकव्याप्त काश्मिरवर असलेला भारताचा दावा चीनद्वारे अधोरेखित होऊ शकतो.

प्रस्तावित बांगलादेश-चीन-भारत-म्यानमार (बी.सी.आय.एम.) आर्थिक महामार्ग

तीन, चीनला प्रतिबंध घालण्याचा हेतू असलेल्या कोणत्याही सामरिक योजनेत आपण सहभागी होणार नाही असे भारताने ठामपणे प्रतिपादित करणे गरजेचे आहे. मात्र चीनवर वचक ठेवण्यासाठी भारताला इतर मित्र देशांची साखळी तयार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. सध्या चीनशी मधुर संबंध असलेल्या रशियाला चीनचे वाढते वर्चस्व दीर्घकाळात मानवणारे नाही. भारताने अमेरिकेशी अंतर राखण्यास सुरुवात केल्यास भारत-रशिया संबंध अधिक दृढ होत त्याला चीनवर अप्रत्यक्षपणे वचक बसवण्याची झालर प्राप्त होऊ शकते. याशिवाय, आशियातील जपान, दक्षिण कोरिया आणि विएतनाम या देशांशी भारताने सामरिक संबंध वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न करावयास हवे. सामरिक दृष्ट्या हे देश एकमेकांना तुल्यबळ असल्याने कोणत्याही एका देशाच्या नेतृत्वाऐवजी सामुहिक नेतृत्वाने चीनच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयोगात भारताने पुढाकार घ्यायला हवा. यातून भारत तीन उद्दिष्टे साध्य करू शकतो. एक तर, भारताच्या परंपरागत वसाहतवाद व नव-वसाहतवाद विरोधी परराष्ट्र धोरणाची २१ व्या शतकातील परिस्थितीनुसार भारताला पुनर्मांडणी करता येईल. यातून अमेरिकेच्या नेतृत्वातील पाश्चिमात्य देशांच्या आर्थिक व सामरिक वर्चस्ववादी धोरणांना दक्षिण आशिया, पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात मज्जाव करण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करता येईल. या प्रक्रियेला चीनचा विरोध नसेल, मात्र भारताने पुढाकार घेतल्याने चीनच्या आशियाच्या नेतृत्वस्थानी येण्याच्या महत्वाकांक्षेला खीळ बसेल. त्याचवेळी, अमेरिकेचा सहभाग नसल्याने चीनच्या असुरक्षिततेत भर पडून निर्माण होणाऱ्या त्याच्या आक्रस्ताळ वागण्याचा धोका नसेल.

चार, आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रभावीत करणाऱ्या समस्यांचे निरासन करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा. यासंबंधी आवश्यक ती अनुभवाची शिदोरी आणि विश्वासार्हता भारताकडे आहे. मात्र दूरदृष्टी व इच्छाशक्तीच्या अभावाने भारताने जागतिक शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये कृतीशील योगदान देणे थांबवले आहे किव्हा अमेरिकी नेतृत्वात दुय्यम भूमिका स्विकारणे मान्य केले आहे. म्यानमार मधील वांशिक संघर्षाचा फटका बसत असून सुद्धा त्या संघर्षाकडे पूर्णपणे कानाडोळा करणे अथवा अफगाणिस्तानात अमेरिकेच्या नेतृत्वातच शांतता प्रस्थापित होऊ शकते हे स्विकारणे ही याची ठळक उदाहरणे आहेत. भारताला स्वत:ला आशियात मोठी शक्ती म्हणून स्थापित करायचे असेल तर संघर्ष विराम आणि समस्येचे समाधान शोधण्यात भारताला मोठे योगदान द्यावे लागेल. चीनने या दिशेने अफगाणिस्तानात प्रयत्न सुरु केले आहेत हे बोलके आहे.

पाच, चीनशी असलेला सीमा-विवाद कसा सोडवावा याबाबत भारतात राष्ट्रीय मतैक्य घडवून आणणे आवश्यक आहे. चीनशी असलेला सीमा वाद तीन प्रकारे सुटू शकतो. पहिली आणि जवळपास अशक्य असलेली शक्यता म्हणजे भारताने युद्धात चीनचा संपूर्ण पराभव करत युद्धानंतरच्या करारात सीमा वाद सोडवून घ्यावा. दुसरी शक्यता म्हणजे नजीकच्या भविष्यात चीनमध्ये साम्यवादी पक्षाविरुद्ध असंतोष शिगेला पोहोचून एकीकडे चीनचे सरकार कमकुवत होणार आणि दुसरीकडे तिबेट सारखे प्रांत स्वतंत्र होणार. अशा परिस्थितीत भारताची सीमा चीनला न भिडता तिबेटला लागून असेल आणि आपसूकच भारत-चीन सीमावाद संपेल. ही शक्यता म्हणजे अगदीच भाबडा आशावाद नसला तरी नजीकच्या भविष्यात असे काही घडण्याची ठोस चिन्हे अद्याप दृष्टीपथात नाहीत. सीमावाद सोडवण्याचा तिसरा पर्याय म्हणजे दोन्ही देशांनी देवाणघेवाणीच्या तत्वावर आधारीत समंजस भूमिका घेत आणि एकमेकांच्या जनतेच्या भावनांचा आदर करत सीमावादावर तोडगा काढायचा. सन १९८८ पासून ते आजगायात दोन्ही देशांमधील सीमाप्रश्नावरची चर्चा याच भूमिकेवर आधारीत आहे. मात्र कुठलाही तोडगा हा देवाणघेवाणीच्या तत्वावर आधारीत असणार याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. सीमावादाच्या तोडग्यात भारताने काय टिकवावे, चीनकडून काय मिळवावे आणि चीनला काय देऊ करावे याबाबत कुठलाही अधिकृत प्रस्ताव कोणत्याही सरकारद्वारे अद्याप पुढे करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावर संरक्षण तज्ञ, परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यादरम्यान खुल्या मनाने व तथ्यांवर आधारीत चर्चा घडणे आवश्यक आहे. भारताचे चीन धोरण हे देशाच्या व्यापक परराष्ट्र धोरणाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. देशाचे परराष्ट्र धोरण आणि चीन विषयक धोरण यामध्ये विसंगती आल्यास त्याचा मोठा फटका भारताला बसेल. त्यामुळे, भारताने ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या’ मानसिकतेतून बाहेर येत चीन धोरणात दिर्घकालीन उद्दिष्टे निर्धारित करणे गरजेचे आहे.

चिनी लिपी

चिनी लिपी जगातील एकमेव प्रचलित चित्रलिपी आहे. जगातील सु. एकचतुर्थांश लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये आजही चित्रलिपी वापरात आहे. ही लिपी सु. चार हजार वर्षांइतकी प्राचीन आहे; परंतु लेखनपद्धतीतील बाह्यतः दिसणाऱ्या फरकांव्यक्तिरिक्त तिच्यामध्ये कोणताही फरक आढळून येत नाही. ही लिपी कल्पनाचित्रांच्या अवस्थेतून निश्चित वर्णांच्या अवस्थेमध्ये आजही आलेली नाही.
       चिनी लिपीच्या उत्पत्तीविषयी आज तरी कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. चीनमध्ये दोन हजार वर्षांपूर्वीच्या लिपीचे नमुने मात्र आजही अस्तित्वात आहेत. हाडाच्या तुकड्यांवर, कासवाच्या पाठींवर, पंचरसी धातूच्या भांड्यांवर, हत्यारांवर, खापरांवर ही प्राचीन चिनी अक्षरे आढळून येतात. हाडांवर, बांबूच्या तुकड्यांवर इ. नाशवंत वस्तूंवरही ही प्राचीन अक्षरे असल्यामुळे त्याबद्दल निश्चित स्वरूपाची विधाने करणे चुकीचे ठरेल. निरनिराळ्या कालखंडांतही चिनी लिपीचे स्वरूप थोडेफार बदलले आहे. स्थूलमानाने इ.स.पू. २००० ते इ.स. २०० पर्यंतच्या कालखंडातील चिनी लिपीचे स्वरूप सर्वसाधारणपणे सारखे होते. नंतर लेखन साहित्यात फरक झाल्यामुळे लिपीतही फरक झाला. बोरूने अक्षरे रंगविल्यामुळे अगर पंचरसी धातूच्या अणकुचीदार लेखणीने अक्षरे लिहिल्यामुळे हा फऱक पडलेला दिसून येतो. इ.स.पू. तिसऱ्या शतकानंतर चिनी अक्षरे कुंचल्याने काळ्या रंगात लिहिल्यामुळे चिनी लिपीत लक्षात येण्यासारखा फरक पडला आणि तिचे स्वरूप ईजिप्तमधील डेमॉटिक किंवा हिअरेटिक प्रकारच्या लिपिपद्धतीसारखे झाले.

चिनी चित्रवर्णचिनी चित्रवर्ण

  चीनमध्ये इ. स.१०५ मध्ये कागदाचा शोध लागला व त्यानंतर चिनी लिपी सध्याच्या प्रचलित लिपीचे स्वरूप घेऊ लागली.
       चिनी लिपी उभी, उजवीकडून डावीकडे लिहितात. ती सुरुवातीस संपूर्णपणे चित्रलिपी होती; उदा., माणूस, सूर्य, चंद्र इत्यादी. प्राचीन काळच्या चिनी भाषेत प्रत्येक शब्द एकावयवी असे. नामांच्या विभक्तीमुळे किंवा क्रियापदांच्या काळामुळे त्यांत रूपांतर होत नसे. असे शब्द लिहिताना प्रत्येक शब्दाला एक खूण किंवा चित्र जोडण्यात आले. या चित्रांचा व उच्चारांचा कायमचा संबंध निर्माणही झाला. परंतु त्यास मर्यादा पडली. एकाच शब्दाच्या उच्चारणभेदांमुळे त्याच्या अर्थाभिव्यक्तीतही भिन्नता आली. ध्वनिचित्रणामुळेही लिपी अधिक क्लिष्ट झाली. कल्पनाचित्रे मात्र अर्थवाही असल्यामुळे, त्यांच्याबाबतीत काहीच प्रश्न उद्‌भवला नाही. उदा., स्त्री चिन्ह दोन वेळा काढल्यास त्याचा अर्थ भांडण असा होतो. ऐकणे ही शब्दखूण व दरवाजाची खूण म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. उच्चारचिन्हांमुळे वाचकास चित्राचा नेमका अर्थ लक्षात घेण्यास मदत झाली. या उच्चारणचिन्हांमुळे लिपीने वेगळा आकार घेतला. हा वेगळा आकार घेतलेल्या लिपीस ‘ह्‌सिंग शेंग’ म्हणत. ह्या लिपीमुळे अर्थाभिव्यक्ती सुलभ झाली, तरी अक्षरसंख्या मात्र फार वाढली. उच्चारणचिन्हांच्या वाढीबरोबरच ते कोशांत ग्रथित करण्यात आले.
        सामान्यपणे प्रत्येक लिपीत प्रत्येक खुणेचे किंवा अक्षरांचे उच्चार कायमचे ठरलेले असतात; प्रत्येक उच्चार कोणत्या अक्षराने वा खुणेने लिहावयाचा हेही ठरलेले असते. चिनी लिपीत मात्र उच्चाराचा आणि खुणेचा संबंध नाही. प्रत्येक शब्दाला सर्वसाधारणपणे एक व प्रसंगी दोन किंवा तीनही खुणा तीत आहेत. अर्थ आणि उच्चारासह या सर्व खुणा शिकाव्या लागतात. कालानुरूप या लिपीमध्ये अक्षरखुणा बदललेल्या दिसून येतात. इ.स.पू. दुसऱ्या शतकात सु. २,५०० खुणा, इ.स.पू. तिसऱ्या शतकात ३,५०० खुणा तर दहाव्या शतकात ४४,००० खुणा चिनी लिपीत असल्याचे दिसून येते. आज सुशिक्षित चिनी माणसास सु. सात-आठ हजार खुणा अवगत असतात. साधारणपणे दोन-तीन हजार खुणा माहित असल्या, म्हणजे दैनंदिन व्यवहारापुरते भागते.
      चिनी लिपीबाबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यामधील खुणांचे किंवा चिन्हांचे कायम स्वरूप. दोन हजार वर्षांपूर्वी ज्या अर्थासाठी एखादी खूण वापरली जात होती, त्याच अर्थाने जवळ जवळ ती आजही वापरली जाते. तिच्या उच्चारात अनेक फेरफार झाले असले. तरी ती खूण आणि तिने अभिव्यक्त होणारा अर्थ हे आजही कायम आहेत. लेखानाची साधने बदलली, तरी ह्या खुणांचा मुळचा आकार ओळखणे आजही शक्य आहे.


  चिनी वाक्यचिनी वाक्यबोलभाषा व चिनी लिपीचा तसा प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे आणि देशातील मूठभर लोकांनीच ही लिपी जतन करून ठेवल्यामुळे तिचे मूळ स्वरूप आजही टिकून राहिले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतही बोलभाषा आणि लिहिण्याची भाषा ह्या वेगवेगळ्या लिहिल्या जात असत. सध्या चीनमध्ये बोलभाषाच लिहिली जात असल्यामुळे चिनी लिपीत बदल घडून आले आहेत. कित्येक जुने शब्द वापरातून नाहीसे झाले आहेत. त्यामुळे त्या खुणा आता प्रचलित नाहीत. बोलभाषेतील काही शब्दांना पूर्वी खुणा नव्हत्या. त्या नव्याने निर्माण करण्यात आल्या चिनी लिपी शिकण्यास फार कठीण असल्यामुळे साक्षरता प्रसारासाठी काही मुळाक्षरे निर्माण करण्याचे प्रयत्न चीनमध्ये झाले आणि आजही ते सुरू आहेत. काही अत्यंत किचकट खुणा सोप्या करण्याच्या प्रयत्नात यशही आले आहे. तथापि चिनी भाषा मुळाक्षरांच्या लिपीमध्ये लिहिण्यात बऱ्याच अडचणी अजूनही कायम आहेत. एक महत्त्वाची अडचण म्हणजे भाषेत एकाच उच्चाराचे असंख्य शब्द आहेत आणि ते वेगवेगळ्या खुणा वापरून लिहिले जातात. ते मुळाक्षर वापरून लिहिल्यास बऱ्याच वेळा अर्थ समजणे केवळ अशक्य होते. उदा. ‘शृ’ या शब्दाचे निदान शंभर तरी अर्थ होतात. ते सर्व वेगळ्या खुणांनी लिहितात.
         दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, सध्या एकच लिपी सर्व चीनमध्ये प्रचलित आहे. कारण लिपीमध्ये अर्थ लिहिला जातो. उच्चार नाही. त्यामुळे चीनच्या वेगवेगळ्या भागांत जरी एकमेकांचे भाषण एकमेकांना समजणे अशक्य असले, तरी लिपीच्या खुणांचा अर्थ सगळीकडे तोच असल्यामुळे लिखाण एकमेकांना समजणे सहज शक्य आहे. ही पद्धत बदलून भाषेतील उच्चार लिहिल्यास, हा फायदा नष्ट होईल आणि भाषावादास प्रोत्साहन मिळेल. जो पर्यंत सर्व चीनमध्ये एकच भाषा बोलली जात नाही, तोपर्यंत चिनी लिपी मुळाक्षरयुक्त करणे कठीण आहे.
         चिनी लिपी ही चित्रमय असल्यामुळे ती लिहिण्याची कला ही चित्रकलाही आहे. असे मानले जाते. सुसंस्कृत मनुष्याचे हस्ताक्षर हे सुंदर असलेच पाहिजे, असे तेथे समीकरण आहे. अजूनही चिनी नेते सुंदर हस्ताक्षर काढण्याचा सराव करतात.
       एके काळी चीनच्या आसपासच्या सर्व चिनी देशांत चिनी लिपीचा वापर केला जात असे. हळूहळू जपान व कोरियांमध्ये त्यांची स्वतःची लिपी प्रचारात आल्यावर चिनी लिपीचा वापर कमी झाला; तथापि अजूनही जपान व कोरियामध्ये व्यवहारातील चिनी शब्द चिनी लिपीमध्येच लिहिले जातात. त्यामुळे या भाषांमध्ये एक वाक्यात काही चिनी खुणा व उरलेले शब्द जपानी किंवा कोरियन लिपीत असे मिश्रण सर्रास आढळते [→जपानी लिपी] . व्हिएटनाममध्ये मात्र फ्रेंच सरकारने चिनी लिपीचे पूर्ण उच्चाटन केले आहे. आता ती भाषा लॅटिन अक्षरांत लिहिली जाते; तथापि या सर्व देशांत आजही चिनी लिपी चांगली अवगत असणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.

चिनी संविधान : -

      चीनच्या राष्ट्रीय जनता काँग्रेसच्या १३ ते १७ जानेवारी १९७५ मध्ये झालेल्या अधिवेशनात नवे संविधान स्वीकारण्यात आले. १९५४ मधील जुन्या संविधानात अनेक सुधारणा करून हे नवे संविधान तयार केले आहे. या नव्या संविधानात शासन व पक्ष यांच्या परस्परसंबंधांविषयी महत्त्वाच्या तरतुदी आहेत. त्यांनुसार राष्ट्राध्यक्षाचे पद काढून टाकले आहे. सेनादलांचे आधिपत्य पूर्वी राष्ट्राध्यक्षाकडे होते, ते आता पक्षाध्यक्षाकडे दिले आहे. याचा अर्थ सर्व लष्करी सत्ता शासनाऐवजी पक्षाने आपल्या ताब्यात घेतली, असा होतो. संविधानाच्या कलम २ आणि कलम १६ यांत कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणारी राष्ट्रीय जनता काँग्रेस ही चिनी सर्वोच्च सत्ताधारी संस्था आहे, असे नमूद केले आहे. ही तरतूद जुन्या संविधानात नव्हती. राष्ट्रीय जनता काँग्रेसला सादर करावयाचे अहवाल वा तिची सभेची विषयपत्रिका ही प्रथम पक्षाने मंजूर केली पाहिजे. राष्ट्रीय जनता काँग्रेस मंत्रिमंडळाची निवडणूकसुद्धा कम्युनिस्ट पक्षाच्या शिफारशीने करते. चीनमध्ये शासनसंस्थेवरील पक्षाच्या संपूर्ण नियंत्रणाला असे संविधानात्मक स्वरूप प्रथमच दिले आहे.
       विचारप्रणालीच्या दृष्टीने नव्या संविधानात एक खास तरतूद आहे. मार्क्सवाद-लेनिनवाद यांच्या बरोबरीने माओवादाचा मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून स्वीकार केला आहे, हा तो बदल होय.
       नव्या संविधानात घटकराज्यांसंबंधी केलेली तरतूदही प्रस्थापित साम्यवादी विचारसरणीपेक्षा भिन्न आहे. रशियातील स्टालिनप्रणीत संविधानात औपचारिकपणे का होईना, पण घटकराज्यांचा संघराज्यांपासून अलग होण्याचा हक्क नमूद केला होता. नव्या चिनी संविधानात घटकराज्यांची स्वायत्तता नाममात्र असून तो मूलभूत हक्क नाकारला आहे. चीनमध्ये प्रजासत्ताक हे केंद्रीभूत असून प्रादेशिक स्वायत्तता असलेले प्रदेश हे या प्रजासत्ताकाचे अविभाज्य भाग आहेत, अशी संविधानाच्या चौथ्या कलमात तरतूद आहे. तिबेट अथवा मंगोलिया यांना चिनी प्रजासत्ताकात आता वेगळे स्थान उरलेले नाही, असा याचा अर्थ होतो.
        आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीही १९५४ चे संविधान व नवे संविधान यांत महत्त्वाचा फरक आहे. जुन्या संविधानात रशियाशी असलेल्या अतूट मैत्रीचा निर्वाळा आहे. नव्या संविधानात मात्र रशियाचा खास उल्लेख नाही. फक्त सर्व समाजवादी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध वाढवू, असा मोघम उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय क्रांतीच्या अंतिम विजयाचा साम्यवादी आशावादही नव्या संविधानात नमूद केलेला नाही.
    चीनची राज्यव्यवस्था एकात्म असून प्रशासनाच्या सोयीसाठी चीनचे एकवीस प्रांत, पाच स्वायत्त प्रांत व तीन महानगरपालिका असे भाग पाडले आहेत. प्रत्येक प्रांताचे शासकीय विभाग आणि विभागाचे स्यन म्हणजे जिल्हे पाडले असून त्यांची संख्या २,०२३ आहे. प्रत्येक जिल्ह्याचे चू म्हणजे उपजिल्हे पाडले आहेत. अशा उपजिल्ह्यांची संख्या २०,००० वर आहे. एक किंवा अधिक खेडी मिळून स्यन हा सर्वात लहान प्रशासकीय भूभाग होतो. असे दोन लाखांच्या वर स्यन चीनमध्ये आहेत. वर उल्लेखिलेल्या जिल्ह्या-उपजिल्ह्यांव्यतिरिक्त चिनी मंगोलियातील ५८, तिबेटमधील ३८ व काही महत्त्वाची औद्योगिक शहरे आणि खाणींच्या परिसरांचे सु. १५० विशेष प्रशासकीय विभागही चीनमध्ये आहेत. पीकिंग व शांघाय शहरे केंद्रशासित असून बाकीची मोठी शहरे संबंधित प्रांतिक शासनाच्या आधीन आहेत. औद्योगिक शहरे व खाणींचे परिसर यांकडे केंद्रसरकारचे विशेष लक्ष असून आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या भूभागांना काही विशेष अधिकार बहाल केलेले आहेत.
    १९५८ साली चीनमध्ये सर्वत्र कम्यूनची संघटना अंमलात आली. प्राचीन चिनी समाजरचना आमूलाग्र बदलून त्या जागी सरकारी हुकूमांचे बिनतक्रार पालन करणाऱ्या कडव्या कम्युनिस्ट स्त्रीपुरुषांकरवी मूठभर पक्ष पुढाऱ्यांच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणारा नवा समाज स्थापन करण्याची चळवळ, असे या कम्यूनचे वर्णन चीनचे विरोधक करतात तर सहकारी पद्धतीने व परस्परसाहाय्याने स्थानिक परिस्थितीला अनुसरून कृषी, कारखानदारी आदी उद्योगांची पुनर्घटना करून उत्पादन वाढविणे व न्याय्य वितरण करणे, हे ह्या कम्यूनचे उद्दिष्ट असल्याचे चीनच्या समर्थकांचे म्हणणे आहे. सुरुवातीच्या एकदोन वर्षांत आलेल्या अनुभवावरून कम्यूनच्या संघटनेत वेळोवेळी पुष्कळ फेरबदल झाले. स्थानिक प्रशासनाचे जवळजवळ सर्व अधिकार या कम्यूनकडे असल्याने स्थानिक प्रश्न जलदगतीने सुटण्याला मदत होते हे खरे. चीनची पारंपरिक कुटुंबपद्धती बदलून कम्युनिस्ट विचारसरणीने भारलेला नवा समाज निर्माण करण्यात कम्यूनचा वाटा मोठा आहे. ह्या म्हणण्यात बरेच तथ्य आहे.
       चीन हा विभिन्न जातिजमातींचा देश आहे. मंगोल, हुई (मुसलमान), तिबेटी, तुर्की, म्याव, थी, ज्वांग, लोलो इ. अनेक अल्पसंख्य जमाती चीनच्या विविध प्रांतांत असून त्यांची एकूण लोकसंख्या साडेतीन कोटींवर आहे. या सर्व जमातींना आपापली भाषा, धर्म,रीतिरिवाज व संस्कृती टिकविण्याच्या व स्वत:चा आर्थिक विकास साधण्याच्या मूलभूत हक्कांस चिनी संविधानाने मान्यता दिलेली आहे. या हक्कांचा उपभोग सुलभतेने घेता यावा, म्हणून ज्या ज्या भौगोलिक विभागांत अशा जमाती मोठ्या संख्येने आहेत त्यांचे स्थानिक परिस्थितीस अनुसरून स्वायत्त शासकीय विभाग, स्वायत्त जिल्हे अथवा स्वायत्त उपजिल्हे पाडले असून त्यांच्या प्रशासनासाठी संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक मंडळे नेमण्यात आली आहेत व त्यांना आपापल्या विभागाचे सर्वसामान्य प्रशासन चालविणे, अर्थसंकल्पानुसार खर्च करणे, भाषा, संस्कृती इत्यादींच्या विकासासाठी कायदे करणे असे विविध अधिकार दिलेले आहेत. मात्र अशा स्वायत्त मंडळांनी मान्य केलेले नियम, कायदे इत्यादींची कार्यवाही केंद्रसरकारच्या अनुमतीशिवाय होऊ शकत नाही. एकंदरीत सर्व स्वायत्त विभाग तत्त्वत: आणि प्रत्यक्षातही पूर्णपणे केंद्राच्या अधिकारात आहेत. कोणत्याही स्वायत्त विभागाला विभक्त होण्याचा हक्क नाही. सर्व स्वायत्त विभागांत कम्युनिस्ट तत्त्वांचा प्रचार कसोशीने होत असून स्वायत्त विभागांच्या प्रशासनावर प्रत्यक्षात कम्युनिस्ट पक्ष, कार्यकर्ते, स्थानिक कम्युनिस्ट संघटना व जनता मुक्तिसेना यांची देखरेख असते. 

संरक्षण व्यवस्था :-

  चीनची संरक्षणविषयक संघटना माओ-त्से-तुंगच्या युद्ध, युद्धनीती व त्यांनुसार असलेली लोकसेना आणि लष्करी दले यासंबंधीच्या सिद्धांतावर आधारलेली आहे. माओच्या १९३६ – ३८ या काळातील भाषणांतून हे सिद्धांत मांडले गेले. माओचे हे सिद्धांत क्रांतियुद्ध व जपानी आक्रमणाविरुद्ध झालेले प्रदीर्घ युद्ध यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर अधिष्ठित आहेत. माओचा जनयुद्धाच्या तंत्रावर विश्वास आहे. शस्त्रास्त्रे व त्यांचे संपादन यांपेक्षा क्रांतीच्या राजकीय विचारप्रणालीने प्रभावित झालेल्या मनुष्यबळाला तो अधिक महत्त्व देतो. 

चीनची संरक्षण-संरचना पुढीलप्रमाणे दाखविता येईल : 

जनता काँग्रेस 

राष्ट्रीय संरक्षण मंडळ/ सैनिकी कार्यसमिती 

सर्वोच्च मुक्तिसेवा कार्यालय 

|

जनरल स्टाफ    राजकीय खाते     पार्श्व खाते     प्रादेशिक लष्करी शासन     लढाऊ व साहाय्यक सेनादले 

थोड्या बहुतेक फरकाने संरचना इतर देशांच्या लष्करी संरचनेसारखीच आहे. जानेवारी १९७५ मध्ये नव्याने प्रसृत करण्यात आलेल्या संविधानानुसार चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षाला सरसेनापतिपद देण्यात आले. पक्षाचा अध्यक्षच राष्ट्रीय संरक्षण मंडळाचा/ कार्यसमितीचा अध्यक्ष असतो. संरक्षणाच्या सर्व अंगोपांगावर मंडळ लक्ष देते. लष्करी संघटनेसाठी देशाचे ११ लष्करी विभाग करण्यात आले आहेत. राजकीय खाते सैनिकांना राजकीय म्हणजे साम्यवादाचे व क्रांतिप्रणालीचे शिक्षण देण्यासाठी आहे. सेनेच्या प्रत्येक स्तरात राजकीय अधिकारी असतात. कोणतेही लष्करी कार्य हे लष्करी व राजकीय अधिकारी यांच्या सहविचारानेच होते. सेनेवरील हे बिगर लष्करी नियंत्रण इतर साम्यवादी राष्ट्रांच्या पद्धतीप्रमाणे एक आहे. 

चिनी जनता मुक्तिसेना :

   जिजांगसी प्रांतात नानचांग येथे चिनी कम्युनिस्टांनी १ ऑगस्ट १९२७ रोजी लाल सेना स्थापन केली. चु तेह, हो लुंग व चौ एन्-लाय हे त्यासमयी उपस्थित होते. लाल सेनेला, १९३७ पासून ‘जनता मुक्तसेना’ नाव देण्यात आले. १९३७ ते १९४५ या काळात चँग कै-शेकच्या राष्ट्रीय सेनेने व जनता मुक्तिसेनेने एकत्रित होऊन जपानविरूद्ध चाललेल्या युद्धात भाग घेतला. यानंतर झालेल्या यादवी युद्धांत आणि चीनमध्ये साम्यवादी पक्ष्याची राजवट आणण्यात मुक्तिसेनेचा मोठा वाटा आहे.
     चिनी लष्करी तपशील १९७५ मध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पुढीलप्रमाणेआहे. दूरगामी सेनाबल :या सेनेची संघटना अण्वस्त्रांना हाताळण्यासाठी केली आहे. १,१०० ते ३,००० किमी. पल्ल्याची ८० प्रक्षेपणास्त्रे युद्धसज्ज आहेत. ६,००० किमी. पल्ल्याची आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्रे तयार आहेत. टियू १६ मध्यम बाँबर ६,००० किमी. पल्ला असलेले अणू/हैड्रोजन बाँब टाकण्यासाठी आहेत. दोनशे ते तीनशे अणुबाँब, हैड्रोजन बाँब तयार असावेत, असा अंदाज आहे.
भूसेना : 
    पारंपारिक पद्धतीने जनता युद्ध लढण्यासाठी भूसेना असून तिचे आधुनिकीकरण चालू आहे. १६२ लढाऊ डिव्हिजन (चिलखती, घोडदळ, छत्रीधारी, तोफखाना) पैकी १२५ पायदळ डिव्हिजन आहेत. यांशिवाय ४१ अभियांत्रिकी डिव्हिजन आहेत. ८,५०० मध्यम-भारी रणगाडे व १,५०० मध्यम-भारी रॉकेट तोफा आहेत. एकूण २८ ते ३० लक्ष सैनिक आहेत. वायुसेना :सैनिकसंख्या २·२५ लक्ष आहे. रशियन बनावटीची ३,१०० लढाऊ विमाने व बाँबर आहेत. ७०० एफ्-९ ही चिनी लढाऊ विमाने आहेत. हवाई संरक्षणासाठी प्रक्षेपणास्त्रे व तोफखानेही आहेत. नौसेना : २·३ लाख नौसैनिक आहेत. ५२ पाणबुड्या, ६ विनाशिका, १०० प्रक्षेपणाशास्त्रे, १५० मोटार टॉर्पिडो ३० सुरुंग आणि ३२० गनबोटी आहेत. नौसेना बचावात्मक धोरणाने उभारलेली असून ती किनारासंरक्षणास योग्य आहे. सरहद्दसंरक्षण दल : सरहद्दीच्या संरक्षणासाठी ३ लक्ष सैनिकांची सरहद्द संरक्षक दले आहेत. लोकसेनेत ६० लक्ष लोकसैनिक आहेत. यात दरवर्षी भर पडत असते. यांशिवाय मुलकी उत्पादन आणि रचना-कार्यासाठी ४० लक्ष कामगार आहेत. संरक्षणावर सु. १५ अब्ज डॉलर खर्च (१९७३) होत असावा. लोकसेना : प्रत्येक नागरिकाला सैनिक बनवून, कोठल्याही प्रतिगामी आक्रमणाला गनिमी रणतंत्राने तोंड देण्यासाठी तयार करणे, हे लोकसेनेचे कार्य आहे. लोकसेना जनता मुक्तिसेनेचे पूरक अंग आहे. प्रशिक्षण शाळा : प्रशिक्षण शाळा, विद्यालये वगैरेंचे शिक्षणक्रम आखणे, विषयाची निवड, उमेदवार आणि विद्यार्थ्यांची निवड राजकीय खाते करते. मार्क्स-लेनिन राजकीय अकादमी आणि राजकीय, प्रशासन व अर्थशास्त्र वगैरेंकरिता स्वतंत्र विद्यालये आहेत. एकंदर ऐंशीच्यावर प्रशिक्षणसंस्था आहेत. सैनिकी लोकशाही : साधे सैनिक व अधिकारी यांच्यातील वर्गकलह टाळण्यासाठी अधिकारश्रेण्या रद्द केल्या आहेत. कधीकधी अधिकाऱ्यांनी सैनिकांची व सैनिकांनी अधिकाऱ्यांची कामे करणे, कोठलेही लष्करी काम सैनिकी-अधिकारी यांच्या सहविचाराने आखणे व पार पाडणे, अशा प्रकारे सेनेत लोकशाही स्थापण्याचे प्रयत्न होत आहेत. सेना-जनता संबंध : क्रांतियुद्धाकरिता जनता आणि सेना यांमधील वर्गकलह टाळण्यासाठी, प्रत्यक्ष लष्करी सेवेव्यतिरिक्त प्रचारकार्य, शेतीसुधारणा, सामुदायिक शेतीची संघटना, रस्ते व पूल बांधणी इ. कामेही लष्कराला करावी लागतात. सांस्कृतिक क्रांतीमध्ये जनता मुक्तिसेनेचे महत्त्वाचे कार्य केले. १९६७ मध्ये माओ-त्से-तुंग यांनी जनता मुक्तिसेनेने पक्षातील क्रांतिकारक डाव्या गटाला मदत करावी, असे आवाहन केले होते. १९७१ साली सेनेच्या पक्षावर वरचष्मा होत आहे, या भावनेमुळे १९७४ च्या अखेरीस मुक्तिसेना पक्षाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली. वरिष्ठ सेनाधिकारी व कम्युनिस्ट पक्षनेते यांच्यात मधून मधून विचारसंघर्ष होत असतात. 

ॲटम बाँब व इतर अण्वस्त्रे : 

 चीनने अण्वस्त्रे आणि अणुबाँब बनविण्याचे धोरण १९५७ पासून स्वीकारले. १९६४ मध्ये चीनने पहिल्या अणुबाँबचा स्फोट केला. १९६६ मध्ये मार्गदर्शित क्षेपणास्त्र बनविले व १९६७ मध्ये हैड्रोजन बाँबचा स्फोट केला. १९६३ मध्ये झालेल्या अणुचाचणी-बंदी करारावर सही करण्यास चीनने नकार दिला. लॉप नॉर, बाओटो व लानजो येथे अण्वस्त्रे आणि बाँब बनविण्याची केंद्रे आहेत. चीनच्या एकूण संरक्षण खर्चापैकी सु. ३० टक्के खर्च अण्वस्त्रांवर केला जातो. अणुयुद्धामुळे भांडवलशाही, साम्रज्यशाही व फेरवादी विस्तारवाद यांचा नाश होऊन खऱ्या समाजवादाचा विजय होईल, असे माओ-त्से-तुंगचे मत आहे.
        ज्या देशांशी चीनचे सीमाविषयक वाद आहेत, त्या देशांबरोबर चीनचे संबंध चांगले नसून संबंधित सीमाभागात चीनने मोठ्या प्रमाणावर लष्कर ठेवले आहे. भारत व रशिया या दोन देशांबरोबर सीमाप्रश्नावर मर्यादित लढाया झाल्या, त्यामुळे या देशांच्या सीमांवर चिनी लष्काराचा विशेष बंदोबस्त आहे. तिबेटमध्ये सतत असंतोष धुमसत असल्यामुळे तेथेही चीनने मोठी लष्करी केंद्रे ठेवली आहेत. 
    सुधारलेल्या पण साम्राज्यवादी राष्ट्रांना क्रांतिकारक शक्तीचा घेराव घालणे व जनक्रांतियुद्ध पेटवून जगात चिनी धर्तीचा समाजवाद स्थापन करणे, हे चीनचे ध्येय आहे. अण्वस्त्रे निर्माण करून संभाव्य आक्रमकांत भीती निर्माण करणे, शक्य तो पारंपारिक व गनिमी युद्धतंत्राचा पुरस्कार करणे, लोकसेना तयार करून भावी अणुयुद्धानंतर अपरिहार्य ठरणाऱ्या पारंपरिक व जनता युद्धासाठी सज्ज राहणे, अशा ढोबळपणे चीनची लष्करी नीती आहे. लोकसेनाच परकी आक्रमणाला पायाबंद घालण्यास, प्रतिरोध करण्यास व आक्रमणाचा पराभव करण्यास समर्थ असते, असा चिनी कम्युनिस्टांचा ठाम सिद्धांत आहे. 
   अर्थिक स्थिती :-
       चीन हा कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीव्यवसाय वर्षानुवर्षे चालत आला आहे व चीनचे आर्थिक जीवन विकसित होत गेले आहे. एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ ७५% लोक कृषिव्यवसाय करीत. लागवडीस योग्य अशा भागातून लोकवस्ती अत्यंत दाट, शेते लहान आकाराची व शेतीची पद्धती बगीचा-स्वरूपाची असणे अपिरहार्य होते. परंपरागत वारसापद्धतीमुळे शेततुकडे लहान होत जात. १९३० मध्ये चिनी शेततुकड्याचे क्षेत्रफळ १·३० हे एवढेच होते. साधारणपणे उत्तरेस तुकडे मोठे आणि दक्षिणेस लहान होत परंतु जमीन सुपीक असल्याने गहू व तांदूळ ही मुख्य पिके व चहा, सोयाबीन, भाजीपाला, तंबाखू, भूईमूग, कापूस यांसारखी इतर पिके समाधानकारक असत. चीनच्या अर्थव्यवस्थेत नद्यांच्या नियंत्रणाला फार महत्त्व आहे, कारण दुष्काळांपासून व पुरांपासून संरक्षण व्हावे म्हणून असंख्य कालवे, बंधारे इत्यादींचा उपयोग शेतकऱ्यांना करावा लागतो. चीनची केवळ आठ टक्के जमीन जंगलाखाली आहे. वनसंपत्ती बेताचीच आहे.
       लोकसंख्या : -
     पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच चीनच्या लोकसंख्येत वाढ होऊ लागली. त्यापूर्वीच्या दोनशे वर्षांत अंतर्गत यादवी, अवर्षणे व दुष्काळ यांमुळे लोकसंख्येत भर पडली नव्हती. १४०० मध्ये चीनची लोकसंख्या १० कोटींहून कमी होती. १८०० पर्यंत ती सु. ४० कोटी झाली. १९३० च्या सुमारास ती ४५ ते ५० कोटींच्या आसपास होती. १९५३ मधील खानेसुमारीनुसार लोकसंख्या ५८ कोटी होती आणि तीपैकी ८७% ग्रामीण भागात होती (पुरुष ५१·८% व स्त्रिया ४८·२%). त्या सुमारास जननप्रमाण दर हजारी ३४, तर मृत्युप्रमाण दर हजारी ११ होते. बालमृत्यूंचे प्रमाण १९४९ मध्ये दर हजारी २०० होते, ते १९५६ मध्ये ८१ पर्यंत कमी झाले होते. प्रतिवर्षी लोकसंख्या शेकडा २·२ ने वाढत आहे, म्हणजे दरवर्षी तिच्यात १·५ कोटींची भर पडत आहे. १९७२ साली संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार चीनची लोकसंख्या ७८·६० कोटी होती.
         धान्योत्पादन : -
    लोकवस्ती दाट असली आणि शेततुकडे लहानलहान असले, तरी चिनी शेतकरी मेहनती असल्याने शेती उत्पादन वाढ होत असे. ओलिताखाली खाजगी व सरकारी प्रयत्नांनी अधिकाधिक जमीन येत गेली. प्रतिवर्षी एकाऐवजी दोन किंवा तीन पिके काढली जात. बी-बियाण्यांत सुधारणा करूनही उत्पादन वाढविण्यात येई. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस मात्र सर्व उपाय चालू ठेवनही धान्योत्पादनात फारशी भर पडणे अशक्य होत गेले व पिकांचे उत्पादन प्रतिवर्षी जेमतेम अर्ध्या टक्क्यानेच वाढू लागले. १९४९ मध्ये साम्यवाद्यांनी आपली सत्ता चीनमध्ये स्थापिली, तेव्हा शेतीव्यवसायाला नव्याने वळण लागले. अन्नधान्याचा बिकट प्रश्न सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. काही बाबतींत यश व काहींत अपशय अशा तऱ्हेने तो प्रश्न आता समाधानकारक रीतीने सोडविण्यात आला आहे. १९७१ साली चीनमध्ये २४·६ कोटी टन धान्य पिकविण्यात आले. १९७२ मध्ये एकूण धान्योत्पादन २४ कोटी टन झाले. दरसाल सु. ५० लक्ष टन धान्य आयात करावे लागत आहे.
          खनिज संपत्ती : -
        खनिज संपत्तीच्या बाबतीत चीनजवळ कोळसा व कच्चे लोखंड यांचे भरपूर साठे आहेत. कोळसा उत्पादन प्रतिवर्षी सु. ३०० ते ३५० दशलक्ष टन असावे. कच्च्या लोखंडाचे उत्पादन वर्षाला सु. ५० दशलक्ष टन असावे. कथील, शिसे, मँगॅनीज, बॉक्साइट, अँटिमनी व टंगस्टन इ. धातूंचेही आणि पेट्रोलचे भरपूर उत्पादन शक्य असले, तरी सध्या वार्षिक उत्पादन सु. २० दशलक्ष टन असावे. परंतु त्या मानाने तांबे आधुनिक औद्योगिकीकरणाच्या गरजांना अपुरे असावे असा अंदाज आहे. अणुशस्त्रांसाठी व वीजउत्पादनासाठी युरेनियमचा साठाही भरपूर असावा असा अंदाज आहे. सोने फार नाही, पण चांदीचा साठा पुरेसा असावा. जलविद्युत् उत्पादनात पुष्कळच वाढ करता येणे शक्य आहे. मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
उद्योगधंदे :
   १९२० पूर्वी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे कारखाने अस्तित्वात नव्हते. चीनमधील पुरातन उद्योगधंदे कलाकुसरीचे काम करणारे कारागीर घरगुती पद्धतीने चालवीत. त्यांना मोठाल्या कारखान्यांचे स्वरूप नव्हते. दरबारासाठी किंवा श्रीमंत उमराव कुटुंबांना वापरण्यासाठी लागणाऱ्या चैनीच्या वस्तू कारागीर तयार करीत. सामान्य लोकांना लागणारे कापड, फर्निचर व घरगुती वापराच्या वस्तू शेतकरी आपापल्या घरांतच बनवीत. सरकारी क्षेत्रात मीठ उत्पादनाचा व्यवसाय चाले व धातूंचे उत्पादनही अल्पप्रमाणात होत असे. शिवाय निरनिराळे कुटीरोद्योग खेडोपाडी चालत असत. विणकाम, बुरूडकाम, चिनी मातीची भांडी करणे इ. व्यवसाय अनेक कुटुंबांतूनच चालत. बराचसा व्यवहार देवघेवीच्या स्वरूपात असल्याने चिनी अर्थव्यवस्थेत पैशाच्या माध्यमाची फारशी गरज पडत नसे. १८८२ च्या नानकिंगच्या तहानुसार चीन पाश्चिमात्य व्यापारास खुला झाला. तदनंतर परकीय व्यापारी संस्था आणि वसाहती यांनी नफा मिळविण्याच्या उद्देशाने आपले आर्थिक व्यवहार चीनमध्ये सुरू केले व त्याचा परिणाम चीनच्या आर्थिक जीवनात महत्त्वाचे फेरबदल घडवून आणण्यात झाला. त्याच सुमारास प्रथमच मोठ्या प्रमाणावरील काम करणाऱ्या आधुनिक परकीय व्यापारी व औद्योगिक संस्था चीनमध्ये सुरू झाल्या. १८६० च्या पीकिंग तहामुळे आणि १८९५ मधील शिमोनोसेकीच्या तहामुळे चीनमधील आणखी काही बंदरे परकीय व्यापारास खुली झाली. त्यामुळे परकीय मालकीच्या अनेक कापडगिरण्या व इतर कारखाने शांघायसारख्या शहरांमधून निघाले. परकीय भांडवलाच्या साहाय्याने चीनमधील लोहमार्ग बांधले जाऊ लागले. उत्तर मंचुरियातही रशियाने आणि दक्षिण मँचुरियात जपानने लोहमार्ग बांधले पण १९११ मधील क्रांतीमुळे चीनमध्ये बराच गोंधळ माजला. आर्थिक धोरण आखणारी मध्यवर्ती अधिसत्ता नसल्यामुळे व परकीय भांडवलास धोका उत्पन्न झाल्यामुळे चीनचा आर्थिक विकास कुंठित झाला. १९२६-३० मध्ये चंग कै-शेकाच्या हातात सत्ता आल्यानंतरसुद्धा या स्थितीत फारसा फरक पडला नाही. राष्ट्राचे काही भाग स्थानिक लढाऊ उमरावांच्या ताब्यात होते. इतर काही उमराव काही भागांतून साम्यवादी सरकारला विरोध करू लागले. परकीयांच्या वर्चस्वास काबूत आणण्याजोगे सामर्थ्यही सरकारजवळ नव्हते. त्यामुळे परकीयांचे हक्क, खास सवलती, व्यापारी वसाहती इ. चालूच राहिल्या. १९३१ मध्ये जपानने मँचुरिया जिंकला व आपले आक्रमण धोरण चालूच ठेवले. १९३७ मध्ये चीन-जपान युद्ध जुंपले. ते थांबल्यावर एक वर्षाच्या आतच राष्ट्रीय सरकारला अंतर्गत यादवीस तोंड द्यावे लागले. या सर्व घडामोंडींमुळे चँग कै-शेकच्या सरकारला आपली सत्ता नीटपणे दृढ करता आली नाही. त्यांच्यामधील काही अधिकाऱ्यांचे स्वत:चेच कारखाने व व्यापारी व्यवसाय होते व त्यांच्या भांडवली साहाय्याखेरीज सरकारला ते चालविणे अशक्य होते. अधिकाऱ्यांचे सर्वस्व आणि त्यांच्यामधील विलक्षण भ्रष्टाचार यांमुळे मध्यवर्ती सरकारला कोठेही आर्थिक विकासाचे धोरण यशस्वीरीत्या अनुसरणे अशक्य होऊन बसले. शिवाय परकीयांना काबूत ठेवून त्यांच्या व्यापारी हालचाली नियंत्रित करण्याची हिंमत सरकारजवळ नव्हती. अशा अडचणींतूनही थोडीफार औद्योगिक प्रगती शक्य झाली. विशेषतः वाहतूक क्षेत्रात १९३७ पर्यंत चीनमध्ये ११,२०० किमी. लांबीचे लोहमार्ग झाले. प्रमुख शहरे विमानमार्गांनी जोडली गेली. पक्क्या रस्त्यांची लांबी दहा वर्षांत ३२,००० किमी. वरून १,२०,००० पर्यंत वाढविण्यात आली. शांघाय, तिन्‌त्सिन व हांगजो इ. शहरांतून आधुनिक व परकीय मालकीची व्यापरकेंद्रे सुरू झाली. परकीय बँकांचे व्यवहार सुरू झाले. चीनमध्ये औद्योगिक विकास कापड-गिरण्या, आगगाड्या इत्यादींसारख्या उद्योगधंद्यांतच झाला आणि त्यासाठीसुद्धा त्याला आयातीवर अवलंबून रहावे लागे. जपानने मात्र मँचुरियात कोळसा, लोखंड व पोलाद यांसारखे अवजड उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू केले. चीनमधील आधुनिक कारखान्यांपैकीच बरचसे कारखाने परकीयांच्या मालकीचे होते. 
  १९४९ च्या सुमाराची परिस्थिती :
       अंतर्गत यादवी, विलक्षण भ्रष्टाचार व लाचलुचपत, कम्युनिस्टांचा विरोध, जपानचे आक्रमक धोरण व परकीयांचे व्यापारी वर्चस्व इ. कारणांमुळे मध्यवर्ती सरकारला आर्थिक विकासाकडे लक्ष पुरविणे फारसे जमले नाही. म्हणून १९४९ मध्ये जेव्हा कम्युनिस्टांच्या हातात सत्ता आली, तेव्हा चीनचा बहुतेक भाग पुरातन काळातील चीनप्रमाणे मागासलेल्या स्थितीतच होता. शेतीसाठी आधुनिक तंत्रांचा वापर होत नसे. उद्योगधंदे कलाकुसरीच्या व्यवसायस्वरूपातच होते. काही आधुनिक उद्योग चिनी बंदरांमधून सुरू झाले होते. मँचुरियातील जपानी कारख्यान्यांची मोडतोड करून त्यांतील बरीचशी यंत्रसामग्री रशियात हलविण्यात आली होती. अशा परिस्थितीतून चीनचा आर्थिक विकास करण्याची जबाबदारी कम्युनिस्ट राजवटीकडे आली होती.
      कम्युनिस्टांचे शेतीविषयक धोरण :
        १९४९ मध्ये कम्युनिस्टांनी आपली सत्ता चीनवर स्थापिली, तेव्हा शेतीचा विकास कुंठित झाला होता. अडचणींतून मार्ग काढण्यासाठी कम्युनिस्ट राजवटीने दुहेरी धोरण आखले. एक तर, आपली राजकीय सत्ता दृढ करावयाची व दुसरे म्हणजे चीन-जपान युद्धकाळी (१९३७ – ४५) कमी झालेल्या कृषिउत्पादनाची वाढ करावयाची. पहिले उद्दिष्ट जमीन कायद्यांत सुधारणा करून साध्य होऊ शकले. १९४९ पूर्वी जवळजवळ निम्मी शेती अन्यत्रवासी जमीनमालकांकडे होती. ती जप्त करण्यात येऊन भूहीन व इतर शेतकऱ्यांना वाटण्यात आली. यामुळे देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास मदत झाली. हळूहळू शेतीउत्पादनातही वाढ होऊ लागली. कापूस, चहा, तंबाखू इ. पिकांच्या किंमती वाढवून त्यांच्या उत्पादनास उत्तेजन देण्यात आले. १९५५ मध्ये माओ-त्से-तुंगने आपली व आपल्या पक्षाची सत्ता दृढ व्हावी आणि पिकांचे उत्पादन वाढावे, यासाठी शेतीचे सामूहिकीकरण करून एक नाट्यपूर्ण पाऊल टाकले. चीनच्या ग्रामीण लोकसंख्येची सहकारी तत्त्वावर पुनर्रचना केली. तीमध्ये शंभर ते तीनशे कुटुंबांची मिळून एक सहकारी संस्था असे संघटन केले. प्रत्येक कुटुंबाकडे त्याचे राहते घर आणि शेताचा ५ टक्के एवढ्या क्षेत्रफळाचा तुकडा ठेवण्यात आला. इतर सर्व जमीन सहकारी संस्थांच्या सामूहिक मालकीची करण्यात आली. यामुळे शेतीच्या नवीन पद्धती अंमलात आणणे सोपे झाले. सामूहीकीकरणामुळे रस्ते व पाटबंधारे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात श्रमिक मिळविणे सोपे झाले. योग्य आर्थिक प्रोत्साहन देऊन शेतीउत्पादन कमी होणार नाही, अशी काळजी घेण्यात आली. इतके करूनही १९५६-५७ मध्ये शेतीउत्पादनात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नाही. १९५७ मध्ये चीनमधील राजकीय वातावरणात मोठे परिवर्तन झाले आणि शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी ग्रामीण जीवनाचे पुन्हा वेगळ्या प्रकारचे संघटन करण्याची गरज भासली. १९५८ मध्ये ही नवीन संघटना अंमलात आणली गेली. या पुनर्घटनेप्रमाणे पूर्वीची शेदोनशे कुटुंबांची एक सहकारी संस्था हे स्वरूप जाऊन त्याऐवजी ५ ते १० हजार कुटुंबांचा एक गट किंवा समूह (कम्यून) असे सु. २४,००० समूह करण्यात आले. अगदी सुरूवातीला समूहाला दिले जाणारे वेतन त्यातील सभासदांच्या उत्पादकतेनुसार न ठरविता त्यांच्या गरजांनुसार ठरविले जाई. यामुळे चिनी अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने साम्यवादी झाली, असे मानले जाऊ लागले. या पुनर्घटनेमुळे चिनी ग्रामीण समाज ताबडतोब बदलून जावा, अशी साम्यवाद्यांची अपेक्षा होती. त्यासाठी सामूहिक भोजनगृहे स्थापण्यात आली व सर्व श्रमिकांना त्यांतून फुकट जेवण मिळण्याची सोय झाली हेतू हा की, घरगुती कामातून मुक्त झालेल्या स्त्रियांनाही राष्ट्रीय विकासास हातभार लावता यावा. १९५८ व १९५९ मध्ये जनतेस सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणावर देण्यात आली. याचा परिणाम धान्योत्पादन कमी होण्यावर झाला. शिवाय पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे जो खाजगी जमिनीचा तुकडा ठेवला होता, त्यावरील उत्पादन त्याला खुल्या बाजारात विकता येई. यामुळे भाजीपाला व डुकरे यांचे उत्पादन बरेच होत असे. नवीन संघटनव्यवस्थेने ही खाजगी जमीन मालकीची सवलत काढून घेतल्याने भाजीपाला आणि डुकरांचे मांस यांचे उत्पादन खालावले. या चुका लक्षात येण्यास एक वर्ष लागले. नंतर ही परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा खाजगी जमिनीचे तुकडे देण्यात आले. १९५८ नंतर समूहांचा आकारही अवाढव्य न ठेवता लहान करण्यात आला. एकूण समूहांची संख्या २४,००० च्या ऐवजी ७४,००० पर्यंत वाढविण्यात आली.
       हे सर्व उपाय करूनही शेतीउत्पादन वाढण्याची चिन्हे दिसेनात. उलट वाईट हंगाम, अनावृष्टी आणि अनुचित शेतकी धोरण इ. कारणांमुळे उत्पादन कमी होऊ लागले. १९५७ मध्ये एकूण उत्पादन १८·५ कोटी टन होते, ते १९६० मध्ये १५ कोटी टनांपर्यंत घसरले. शेतीवरील अरिष्टांमुळे १९६० व १९६१ मध्ये समूह पद्धतीची थोडी पुनर्रचना करण्यात आली. १९६२ पर्यंत शेतीउत्पादनासंबंधी निर्णयाचे अधिकार समूहाकडून काढून घेऊन ६० ते ८० कुटुंबांच्या मिळून झालेल्या उत्पादनगटांकडे ते सोपविण्यात आले. केवळ संघटनात्मक फेरफार केल्याने शेतीउत्पादन वाढत नाही, याची जाणीव पीकिंग सरकारला झाली. पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनांमध्ये अवजड उद्योग व वाहतूक आणि दळणवळण यांना अग्रक्रम होता आणि शेती, जंगले व जलसंरक्षण यांना तिसरे स्थान होते. शेतीउत्पादन कमी झाल्यामुळे भांडवलविनियोग अवजड उद्योगांच्याऐवजी शेतीची उत्पादकता वाढवू शकणाऱ्या उद्योगांसाठी करणे आवश्यक झाले आहे, हे सरकारला पटले. खतांचे आणि शेतकी अवजारांचे उत्पादन वाढविणे आवश्यक झाले. धान्यपुरवठा कमी पडू लागल्यामुळे ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि फ्रान्स यांमधून चीनला १९६१ पासून मोठ्या प्रमाणावर धान्याची आयात करावी लागली. १९६५-६६ या काळात धान्योत्पादन २० कोटी टन झाले तरीसुद्धा लोकसंख्येतील वाढीमुळे धान्याची आयात करणे भाग पडले. सध्या उत्पादन साधारपणे २५ कोटी टन आहे. गव्हाची आयात अजूनही सुरू आहे पण तांदूळ निर्यात होतो. सध्या चीनची अन्न-परिस्थिती समाधानकारक आहे. चीनचे सध्याचे कृषिधोरण असे आहे : पूर व दुष्काळ ह्या पारंपरिक अरिष्टांचे मृदासंधारण, वनरोपण, जलसिंचन व जलनि:सारण प्रकल्प ह्यांच्या योगे निवारण करावयाचे आणि रासायनिक खते, जोरखते, कीटकनाशके आणि सुधारित बी-बियाणांच्या जाती यांचा वापर करून जमिनीची उच्च पैदास निर्माण करणे. पिकांचा अग्रक्रम: अन्नधान्ये, उद्योगांसाठी कच्चा माल (मुख्यतः कापूस), निर्यातीची पिके (विशेषतः गळिताची धान्ये). १९५२ च्या अखेरीस भूसुधारणा व १९५८ च्या अखेर जमिनीचे सामाजीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. १९७० साली अंदाजे २६·८० कोटी हे. जमिनीवर पीक काढण्यात आले. १९७२ मध्ये २·३० कोटी ट्रॅक्टर होते. अन्न व शेती संघटनेच्या अंदाजानुसार १९७१ साली देशात ६·३३ कोटी गुरे ७·१० कोटी मेंढ्या २७ कोटी डुकरे आणि घोडे, गाढवे व खेचरे २ कोटी होती. १९७० साली दूधउत्पादन ३२ लक्ष मे. टन, तर मांस उत्पादन ११३ लक्ष मे. टन होते.
       शासकीय आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व हे निश्चीत ठरविता येत नाही परंतु एकूण श्रमबलापैकी ६० ते ७० टक्के शेतीकामात गुंतले असावेत व कृषि उत्पादनाचा हिस्सा एकूण राष्ट्रीय उत्पादनात ३० टक्क्यांहून कमी असावा, असा अंदाज आहे. मात्र पाश्चिमात्य राष्ट्रांकडे निर्यात होणाऱ्या चिनी मालापैकी सु. ५० ते ६० टक्के पदार्थ कृषिजन्य असतात. 
    जंगल संपत्ती :
         देशातील १२० लक्ष हे. क्षेत्रफळ जंगलांनी व्यापलेले आहे. ‘टंग’ हा सर्वांत महत्त्वाचा वृक्षप्रकार होय. त्यापासून तेल काढतात. टंग वृक्ष विपुल प्रमाणात सेचवान प्रांतात आढळतात. १९४८-४९ मध्ये टंग तेलाचे उत्पादन १·१५ लक्ष मे. टन झाले होते. इमारती लाकडाचे उत्पादन १९५९ साली ४१२ लक्ष मे. टन होते. साग वृक्ष हा उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानतात. प्रतिवर्षी सु. १३ लक्ष हेक्टरांमध्ये वनरोपण करण्यात येते.
       औद्योगिक उत्पादन :
        औद्योगिक विकासाच्या बाबतीत परिस्थिती तितकशी निराशाजनक ठरली नाही. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस चीनमध्ये काही कारखाने निघू लागले. त्यांतून दारूगोळा व कापड यांचे उत्पादन होई परंतु अपुरे भांडवल व वारंवार होणारा सरकारी हस्तक्षेप यांमुळे कारखान्यांतून गैरव्यवस्था असे व त्यांतील बरेच डबघाईस येत. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस खाजगी कारखानदारांनी कापडाच्या व पिठाच्या गिरण्या आणि इतर उपभोग्य वस्तू तयार करणारे कारखाने उभारले होते. १९३० पर्यंत त्यांमध्ये जपानी मालकीच्या कारखान्यांचीही भर पडली होती. १९३९ मध्ये निम्मे कारखाने चिनी व निम्मे परकीय कंपन्यांचे होते. थोडेसे अवजड उद्योगही यांमध्ये होते परंतु बहुतेक पोलाद आणि अवजड यंत्रांचे कारखाने मँचुरियामध्ये जपान्यांच्या देखरेखेखाली उभारलेले होते. दुसऱ्या महायुद्धात रशियनांनी मँचुरियावर काही काळ ताबा मिळविला, तेव्हा या कारखान्यांची यंत्रसामग्री ते रशियात घेऊन गेले. १९४९ मध्ये चिनी कम्युनिस्ट राजवट सुरू झाली, तेव्हा त्यांच्याकडे शांघाय, तिनत्सिन येथील लहुउद्योग व मँचुरियातील उद्ध्वस्त अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने एवढेच होते. १९५० मध्ये कोरियन युद्धात भाग घ्यावा लागला, तरी चीनने १९५२ पर्यंत उद्योगांच्या खालावलेल्या परिस्थितीत काही सुधारणा घडवून आणली होती. प्रथम पंचवार्षिक योजनेचा (१९५३ – ५७) भर मुख्यत: पोलाद आणि यांत्रिक अवजारे या अवजड उद्योगांवर होता. त्यांच्यामुळे इतर उद्योगांच्या प्रगतीस तर मदत होईलच, शिवाय संरक्षणशक्तीही वाढेल अशी योजनाकारांची धारणा होती. या औद्योगिक प्रगतीसाठी चीन सरकारला १० हजार रशियनांवर आणि पूर्व यूरोपच्या तंत्रज्ञांवर अवलंबून रहावे लागले. भांडवल मात्र मुख्यतः चीननेच पुरविले. करांमध्ये वाढ करून विनियोगाचे प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० टक्क्यांपर्यंत नेण्यात आले. यापूर्वी असे प्रमाण फक्त युरोपीय देश, अमेरिका आणि जपान या राष्ट्रांनाच शक्य झाले होते. नवीन कारखान्यांत पुष्कळ वाढ झाली व एकूण औद्योगिक उत्पादन १९५२ ते १९५७ या काळात दुप्पट झाले. शेतीक्षेत्रातील प्रगती मंदावल्याने औद्योगिक विकासाचा हा वेग कायम राहणे शक्य नाही, हे उघड दिसत होते. पुढची मोठी झेप (गरुड भरारी द ग्रेट लीप फॉर्वर्ड) : १९५८ मध्ये तयार केलेली दुसरी पंचवार्षिक योजना टाकून देऊन १९५८-५९ ‘पुढची मोठी झेप’ (गरुड भरारी) ही चळवळ औद्योगिक आणि शेतकी क्षेत्रांत सुरू करण्यात आली. तिची उद्दिष्टे दोन होती : अवजड मोठे उद्योग तर वाढवावयाचेच, पण लघुउद्योग व शेती यांचा भरपूर विकास साधावयाचा (यालाच ‘दोन पायावर चालावयाचे धोरण’ असे म्हणतात). या धोरणाचा परिणाम म्हणजे पूर्वीचे काळजीपूर्वक नियोजित केलेले औद्योगिक विकासाचे धोरण बाजूला राहिले. राजकारणाचे वर्चस्व अर्थव्यवस्थेवर पडू लागले. औद्योगिक विकासाचे आकडे फुगवून सांगण्यात येऊ लागले आणि नियोजनाची कास धरून प्रगती करणे कठीण होऊन बसले. उत्पादनाची गरज आणि कच्च्या मालाचा पुरवठा आहे की नाही, हे न पाहता उत्पादनवाढीसाठी उत्पादनवाढ साधण्याचे प्रयत्न चालू झाले. लघुउद्योगांतही विद्यार्थी, शेतकरी व श्रमिक सामील झाले आणि लहान प्रमाणावर कमी दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन वाढवू लागले. १९५९ पर्यंत एकूण उत्पादन वाढले खरे पण त्यात समन्वय नव्हता, संतुलन नव्हते. १९६२ पर्यंत गाठावयाची उद्दिष्टे १३ उद्योगांनी १९५९ पर्यंतच गाठली होती पण ११ उद्योगधंद्यांना ते शक्य झाले नव्हते. १९६० साली अन्नाची परिस्थती फारच बिकट झाल्यामुळे त्या वर्षापासून वार्षिक योजनेमध्ये पुन्हा शेतीउत्पादनावर विशेष भर देण्यात आला व त्याचबरोबर ‘शेतकी हा अर्थव्यवस्थेचा पाया असून औद्योगिक क्षेत्र हे एक महत्त्वाचे अंग आहे’, अशी घोषणा झाली. १९५८ मध्ये ‘सर्व प्रयत्न लोखंड व पोलादासाठी’ हे घोषवाक्य होते, ते जाऊन १९६० अखेर ‘लोकांचे प्रयत्न शेतीसाठी’ हे घोषवाक्य बनले! अशा रीतीने ‘गरूड भरारी’ ही चळवळ संपुष्टात आली. या वेळीच चीन आणि रशिया यांच्या संबंधांत वितुष्ट आल्यामुळे १९६० मध्ये रशियाने आपले सर्व तंत्रज्ञ चीनमधून परत बोलाविले. त्यांच्यावर अवलंबून असणारे नवीन कारखाने बांधण्याचे स्थगित झाले. शेतीच्या मंद प्रगतीमुळे कारखान्यांना पुरेसा कच्चा माल मिळेनासा झाला व त्यांचे उत्पादनही त्यांच्या एकूण उत्पादनक्षमतेपेक्षा कितीतरी कमी होऊ लागले. १९६० मध्ये ही पुढची मोठी झेप फसल्याचे आढळले परंतु आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे थांबल्यामुळे प्रत्यक्षात उत्पादनाची पातळी किती खाली आली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. काहींच्या मते उत्पादन कारखान्यांच्या क्षमतेच्या मानाने निम्मेच होई, असा अंदाज आहे. १९६२ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाने आर्थिक धोरण बदलण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. नवीन धोरण अर्थव्यवस्थेच्या विकासास पोषक असले पाहिजे. त्यामध्ये अग्रक्रम शेतीला, नंतर लहुउद्योगांना व नंतरच अवजड उद्योगांना या विचारसरणीचा पुरस्कार करण्यात आला. शहरातील कामगारांना ग्रामीण भागात पाठविले पाहिजे, असेही सांगण्यात आले. ‘पुढची मोठी झेप’ हे धोरण फसल्यानंतर नियोजनपूर्व प्रगती करणे अशक्य झाले व वार्षिक तात्पुरत्या गरजांनुसार धोरणात बदल करणे आवश्यक होऊन बसले म्हणून चीनने आपली दुसरी पंचवार्षिक योजना (१९५८ – ६२) अधिकृत रीत्या प्रसिद्धच केली नाही व त्याऐवजी वार्षिक योजनांनीच काम भागविले. आकडेवारीच्या अभावी या काळातील औद्योगिक विकासाचे स्पष्ट चित्र काढता येणेही अशक्य झाले आहे. तरीसुद्धा १९६१ – ६५ या काळात औद्योगिक कारखान्यांची स्थिती सुधारली, असे आता सिद्ध झाले आहे. नवीन कारखाने फारसे न बांधता, होते ते सुधारण्याकडेच लक्ष पुरविले गेले. फक्त शेती व संरक्षण यांसाठी लागणाऱ्या मालाचे नवीन कारखाने काढण्यात आले. रशियाचे मैत्रीसंबंध दुरावल्यामुळे चीनला त्याच्याकडून शस्त्रास्त्राचा पुरवठा होईना, म्हणून शस्त्रास्त्रांचे कारखाने चीनला काढावे लागले. अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांच्या उत्पादनावर चीनने भर दिला. १९६४ मध्ये पहिल्या अणुबाँबचा व १९६७ मध्ये पहिल्या हैड्रोजन बाँबचा स्फोट केला. १९६६ मध्ये चीनमध्ये सु. ४० अणुभट्ट्या चालू होत्या. एप्रिल १९७० मध्ये चीनने आपला पहिला कृत्रिम उपग्रह यशस्वी रीत्या अवकाशात सोडला. पेट्रोलची गरज राष्ट्रीय उत्पादन वाढवून भागविण्यातही चीनने बरेच यश मिळविले. १९६५ मध्ये चीनचे औद्योगिक उत्पादन १९५७ मधील उत्पादनाच्या दुप्पट झाले होते. तिसरी पंचवार्षिक योजना १९६६ मध्ये सुरू होणार होती परंतु त्याच वर्षी चीनमध्ये सांस्कृतिक क्रांती अवतरली. १९६७ मध्ये रेडगार्ड्सच्या (हुंग वै बिंग) पाठिंब्याने तिचा प्रवेश कारखान्यांतही झाला व उत्पादनात खंड पडला.
  खनिज पदार्थांच्या बाबतीत चीनची स्थिती बरीच समाधानकारक आहे. बहुतेक प्रांतांत कोळसा उपलब्ध आहे. १९७३ साली देशात ७० प्रमुख कोळसा उत्पादन केंदे अधिककरून उत्तरेत होती. देशात कोळशाचा २६,२९४ कोटी मे. टन साठा असल्याचा अंदाज करण्यात येतो. कोळसा व लिग्नाइट यांचे एकूण उत्पादन १९७२ मध्ये जवळजवळ ३५ कोटी मे. टन झाले. शान्सी, शँटुंग, मँचुरिया, होपे आणि इतर भागांत कच्चे लोखंड मुबलक आहे. शान्सीमध्ये ३० कोटी मे. टन लोहखनिज असल्याचा अंदाज आहे. पोलादाचे सर्वांत मोठे कारखाने आनशान येथे असून त्यांची वार्षिक उत्पादनक्षमता १९७२ मध्ये जवळजवळ ६ दशलक्ष मे. टन होती. १९७२ मध्ये कच्च्या लोखंडाचे उत्पादन ७५ दशलक्ष मे. टन आणि पोलादाचे उत्पादन २३ दशलक्ष मे. टन झाले. लोहखनिजाचे प्रमुख साठे सु. १,९८४ कोटी मे. टन असल्याचा अंदाज आहे. वूहानजवळील डाये येथील लोहखनिज खाणी जगात लोखंड उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध समजतात. पोलाद निर्मितीची प्रमुख केंद्रे आनशान, वूहान व बाओटो ही आहेत. खनिज तेलाच्या उत्पादनात व शुद्धीकरणात चीनने बरीच प्रगती केली आहे. १९७२ मध्ये अशुद्ध तेलाचे उत्पादन ३० दशलक्ष मे. टनांपर्यंत वाढले होते. १९७३ व १९७४ मध्ये चीनच्या उत्तरेकडील डाचेंग भागात तेलाचे विपुल साठे उपलब्ध झाले व तेलाचे १९७४ मधील उत्पादन सु. ७० दशलक्ष मे. टन होते. ते तेल वाहून नेण्यासाठी उत्तरेकडील बंदरांना जोडणारा १,१५२ किमी. लांबीचा तेलनळ चीनने गेल्या तीन वर्षांत पूर्ण केला. या साठ्यांमुळे चीन तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून तेलाची निर्यात करण्यास सज्ज आहे. युनान प्रांतात सर्वांत मोठ्या तेलखाणी डाचेंग, युमेन व कारामाई येथे आहेत. प्रतिवर्षी तेल शुद्धीकरणक्षमता अंदाजे १२० लक्ष मे. टन आहे. अशुद्ध तेलसाठे सु. २७० कोटी टन आहेत. कँटन व शांघाय यांच्याजवळील खाणक्षेत्रांतून नैसर्गिक वायू उपलब्ध होतो. १९६७ साली नैसर्गिक वायूचे उत्पादन अंदाजे १०० कोटी घ. मी. झाले होते. कथील उत्पादन मुबलक होते. १९६७ मध्ये कथिलाचे उत्पादन जवळजवळ २०,००० मे. टन झाले. टंगस्टन या धातूच्या उत्पादनात चीनचा अखिल जगात पहिला क्रमांक लागतो. १९७२ मध्ये या धातूचे उत्पादनही १०,००० मे. टन होते. 

वर्ष

धातू

मे. टन

१९६७

बॉक्साइट

३,५०,००० 

१९६९

फॉस्फेट रॉक

११,००,०००

१९६९

मीठ

१५,००० 

१९६९

गंधक

१,३०,०००

१९६९

ॲस्बेस्टस 

१,६०,००० 

१९७२

ॲल्युमिनियम 

१,५०,००० 

१९७२

अँटिमनी

१४,००० 

१९७२

तांबे 

१,५०,००० 

१९७२

शिसे 

१,१०,००० 

१९७२

मँगॅनीज

१०,००,००० 

१९७२ 

जस्त 

१,२०,००० 

वूलफ्रॅमच्या (टंगस्टन खनिज) खाणी हूनान, ग्वांगटुंग व युनान प्रांतांत आहेत. इतर लोहेतर धातूंच्या बाबतीतही चीनमधील साठे समाधानकारक आहेत (पहा : वरील तक्ता). 

   औद्योगिक नियोजन : -
     कम्युनिस्ट राजवटीने १९४९ मध्ये सर्व परकीय कारखाने व सरकारी कारखाने प्रथम आपल्या ताब्यात घेतले. खाजगी कारखान्यांच्या मालांवरही नियंत्रणे बसविली. काही वर्षांपर्यंत अशी मिश्र अर्थव्यवस्था चालली परंतु १९५६ मध्ये बँका, घाऊक व्यापार व खाजगी कारखाने यांचे सामाजीकरण करण्यात आले. प्रत्येक उद्योगपतीच्या कारखान्याच्या मालमत्तेची किंमत सरकारने ठरविली आणि प्रतिवर्षी या किंमतीच्या पाच टक्के, अशी त्याला सरकारकडून भरपाई मिळू लागली. हा सामाजीकृत अर्थव्यवस्था चालविण्यासाठी चीनने रशियाच्या शासनयंत्रणेचे अनुकरण करून आवश्यक ती यंत्रणा उभारली. प्रत्येक कारखाना हा एक अलग घटक मानला गेला. त्याला आपला नफातोटा इतरांच्या नफ्यातोट्यांत मिळविता येईना. प्रत्येक कारखान्याचा व्यवस्थापक सरकारकडून नेमला जाई. कम्युनिस्ट पक्षाची एक समितीही प्रत्येक उद्योगसंस्थेवर देखरेख ठेवी. हे सर्व कारखाने पीकिंगमध्ये तयार केलेल्या योजनेबरहुकूम चालवावे लागत. १९५२ मध्ये योजना आयोग नेमण्यात आला होता. तो मासिक, वार्षिक व पंचवार्षिक योजना तयार करी. त्याने राष्ट्रीय उद्दिष्टांच्या चौकटीत उत्पादनाची उद्दिष्टे ठरविली व प्रत्येक उद्योगसंस्थेच्या उत्पादनाचे उद्दिष्टही निश्चित केले. कारखान्यात जास्तीत जास्त श्रमिक किती नेमावेत, उत्पादन परिव्यय कितपत कमी करावा, नफा किती घ्यावा, कच्चा माल व यंत्रे किती वापरावीत, हे प्रत्येक कारखान्यासाठी नियोजनाद्वारे ठरविण्यात येई. १९५५ ते ५७ पर्यंत ही पद्धती सुरळीत चालली, परंतु ती लघुउद्योगांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरली. या रशियन साच्याच्या पद्धतीतून सुटका करून घेण्याची प्रवृत्ती १९५८ मध्ये बळावली. राजकीय घडामोडीही मोठ्या प्रमाणावर झाल्या. ‘पुढची मोठी झेप’ हे धोरण अंगीकारण्यात आले. कारखान्याच्या व्यवस्थापकास हवे ते निर्णय घेण्यास पक्षाने मोकळीक दिली, फक्त ते निर्णय माओच्या विचारसरणीस पोषक असले पाहिजेत, एवढेच त्यांच्यावर बंधन होते. साहजिकच मध्यवर्ती नियोजनकार बाजूस टाकले गेले. किंमत यंत्रणाही उत्पादनास मार्गदर्शन करू शकत नव्हती. कारण बाजार यंत्रणाही अस्तित्वात नव्हती. मध्यवर्ती नियोजनाच्या अभावी कारखाने वाटेल ते उत्पादन काढू लागले. त्यातील काही अनावश्यक होते. आकडेवारीतही गोंधळ सुरू होऊन ती अविश्वसनीय बनली. ही दुरवस्था कशी सुधारावी याबद्दल चर्चा झाल्या. १९६१ पासून अवजड क्षेत्रातील मोठ्या संस्थांवर मध्यवर्ती नियोजन व लहुउद्योगांना विकेंद्रीकरणाचे फायदे, अशी परिस्थिती निर्माण झाली. दुसरी पंचवार्षिक योजना अशा तऱ्हेने अयशस्वी ठरली. तिसरी पंचवार्षिक योजना १९६६ मध्ये सुरू करण्यात आली पण सांस्कृतिक क्रांतीमुळे तिची अंमलबजावणी होऊ शकली नाही. १९७१ सालापासून चौथी योजना सुरू आहे, पण तिचाही तपशील प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. गेल्या दहा वर्षांत चीनने पुढील उद्योगांच्या विकासावर विशेष भर दिला : पोलाद, अभियांत्रिकी, रसायने (खते, प्लॅस्टिक व कृत्रिम धागे), वीजउत्पादन व कापड आणि कपडे.

      कुटिरोद्योग हा देशातील अतिशय जुना उद्योगप्रकार असून आजमितीसही तो प्रचलित आहे. सुती कापडउद्योग, काही रेशीम गिरण्या, पोलाद कारखाने, पिठाच्या गिरण्या व काड्यापेट्यांचे कारखाने ह्यांच्या स्थापनेपासून आधुनिक स्वरूपाच्या औद्योगिक विकासास प्रारंभ झाला पहिल्या योजनेत अवजड उद्योगधंद्यांच्या विकासावर भर देण्यात आला, परंतु सोव्हिएट रशियाकडून मदत येणे बंद झाले तेव्हा आणि ‘पुढची मोठी झेप’ फसल्यावर अवजड उद्योगांच्या विकासावर कमी प्रमाणात भर दिला जाऊ लागला. निर्मितिउद्योगांची वाढती क्षेत्रे पुढीलप्रमाणे : पोलाद, रसायने, सिमेंट, कृषिअवजारे व यंत्रे, प्लॅस्टिक वस्तू व ट्रकगाड्या. १९७० साली स्थानिक स्वरूपाचे लघुउद्योग स्थापन करण्याच्या धोरणाचा अंगीकार करण्यात आला. १९७२ साली २३० लक्ष मे. टन पोलाद उत्पादन झाले. गतवर्षी ते २१० लक्ष मे. टन होते. १९७२ मध्येच ११० ते १२० लक्ष मे. टन रासायनिक खतांचे उत्पादन झाले. १९७१ साली कृषिबाह्य कामगाराचे सरासरी वार्षिक वेतन ६५० युआन होते. १९७३ साली देशात निर्माण झालेल्या एकूण विजेपैकी ९०% वीज कोळशापासून निर्माण झाली. मध्य चीन व दक्षिण चीन या भागांत फार मोठी जलविद्युत्‌क्षमता आहे. १९६५ साली वीजनिर्मिती अंदाजे ३६ ते ४० हजार कि. वॉ. तास झाली. १९७० मध्ये वीजनिर्मिती सु. ७० हजार कि.वॉ. तासांपर्यंत वाढली होती.  
     सुरुवातीला रशियाप्रमाणे चीननेही विभेदक वेतनश्रेणींचे तत्त्व वेतनाच्या बाबतीत अवलंबिले. चिनी कारखान्यांतील अभियंत्याला अकुशल श्रमिकाच्या दसपट वेतन मिळे. कारागिरांमध्येही वेतनाच्या वेगवेगळ्या बऱ्याच श्रेणी असत. उत्पन्नांतील फरक कमी व्हावेत म्हणून उक्ती मजुरी पद्धतीऐवजी दैनिक व मासिक वेतनांवर भर दिला जाई. श्रमिकांची कार्यक्षमता वाढावी म्हणून रशियाप्रमाणे चीननेही वेगवेगळी प्रोत्साहने ठेवली. उदा., पदके, पीकिंगची सफर, माओशी मुलाखत इत्यादी. परंतु रशियाप्रमाणे कारखाना व्यवस्थापकाला पैशाच्या रूपात चीनने अधिलाभांश दिला नाही. १९४८ मध्ये स्थापन झालेला ‘ऑल चायना फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ हा महासंघ ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स’ शी संबद्ध आहे. देशातील २२ राष्ट्रीय औद्योगिक कामगार संघटना या महासंघाशी संबद्ध आहेत. सदस्यत्व ऐच्छिक आहे. महासंघाची सभासदसंख्या सु. १६० लक्ष आहे.
     चीनमधील शहरी जीवनमान ग्रामीण राहणीपेक्षा उच्च असल्यामुळे, ग्रामीण जनतेचा शहराकडे ओघ वळणे स्वाभाविक होते. तो फार वाढल्यास शेतीवर त्याचे दुष्परिणाम होतात आणि शहरावर त्याचा ताण पडतो, म्हणून तो थांबविण्याचे प्रयत्नही करण्यात आले. अकुशल कामगारांचे वेतन कमी करणे, शेतकऱ्यांस शहरात कायम वस्ती करून राहता येऊ नये म्हणून नियंत्रणे बसविणे, बेकार कामगारांना व विद्यार्थ्यांना शहरांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागांत पाठविणे इ. उपाय योजण्यात आले. १९६६ च्या सांस्कृतिक क्रांतीपासून वेतनांतील फरक कमी करण्याकडे कल आहे. ‘देशप्रेम हेच प्रोत्साहन’ ही घोषणा आहे. ‘पैशाचे प्रोत्साहन ही वाईट गोष्ट आहे’ असा प्रचार होत आहे.
     व्यापार :
    चीन एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस चांदी व अफू आयात करून रेशीम, चिनी मातीची भांडी व चहा निर्यात करीत असे. पुढे चांदी व अफूऐवजी कापडाची आयात वाढली. रेशीम, सोयाबीन, डुकराचे केस यांचीही निर्यात वाढली. चीनचा बहुतेक व्यापार अमेरिका, जपान व पश्चिम यूरोपशी चालत असे.
       कम्युनिस्ट राजवट १९४९ साली चीनमध्ये आल्यावर रशियाशी व पूर्व यूरोपशी चीनचा व्यापार वाढला. कोरियन युद्धामुळे संयुक्त राष्ट्रांनी, अमेरिकेच्या चिथावणीने, १९५० पासून व्यापारबंदी पुकारली. ती १९६९ अखेर काहीशी सैल केली व १९७२ मधील निक्सन-भेटीनंतर अमेरिकेच्या चीनविषयीच्या धोरणात फरक पडून चीन-अमेरिका व्यापार वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. १९५० – ५७ या काळात चीनने रशियाकडून यंत्रसामग्री व संरक्षण कारखान्यांना लागणाऱ्या मालाची आयात केली. १९६१ नंतर चीन व रशिया यांचे संबंध दुरावल्यामुळे चीनचा परराष्ट्रीय व्यापार खालावला. त्यात १९६६ नंतर सुधारणा होऊन रशियाच्या जागी जपान व पश्चिम यूरोप यांच्याशी चीनचा व्यापार वाढत आहे. आजमितीस चीनला मुख्यत्वे गहू, कापूस, रबर, रासायनिक खते, धातू व यंत्रसामग्री यांची आयात करावी लागते. आयात मुख्यतः जपान, पश्चिम जर्मनी, फ्रान्स व ग्रेट ब्रिटन यांच्याकडून होते. निर्यात मालामध्ये शेतमाल, कापड, खनिज धातू (वूलफ्रॅम व अँटिमनी) आणि चहा यांचे प्रमाण अधिक आहे. निर्यात माल मुख्येत्वे हाँगकाँग, जपान व ग्रेट ब्रिटन यांना जातो.
       विदेश व्यापार मंत्रालयाच्या अखत्याराखालील राष्ट्रीय निगमांमार्फत चीनचा परदेशांशी व्यापार चालतो. १९७३ साली अंदाजे एकूण व्यापार ८०० कोटी डॉलर होता. चीनच्या एकूण व्यापारापैकी ८०% व्यापार कम्युनिस्टेतर राष्ट्रांशी चालतो. १९५७ साली चीनचा रशियाबरोबर ५१२·९ कोटी रुबल एवढा व्यापार होता, तोच १९७० साली ४·२ कोटी रुबल एवढाच झाला. १९७२ मध्ये हा व्यापार २१·०६ कोटी रुबलपर्यंत वाढला. जपानचा चीनशी सर्वांहून अधिक प्रमाणात व्यापार चालतो (१९७२ साली ११० कोटी डॉ.). ग्रेट ब्रिटनचा हाँगकाँग, फ्रान्स व पश्चिम जर्मनी यांच्यानंतर (म्हणजे पाचवा) क्रम लागतो. १९७३ साली चीनचा अमेरिकेशी व्यापार सु. ७० कोटी डॉ. होता.
एकेकाळी चीनला आपल्या इच्छेविरुद्ध व्यापार करण्याची सक्ती करण्यात आली होती, ही भूतकाळातली घटना चीन अद्यापही विसरलेला नाही.
     आज पाश्चिमात्य देशांकडून चीनी बाजारपेठेला महत्त्व आहे, त्याची चीनला कदर असली तरी एकेकाळच्या भळभळत्या जखमेची ती आठवण असल्यासारखी भावना चीनी लोकांची आहे.
     अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या वाद सुरू आहे तो अमेरिकी उत्पादनांची बाजारपेठ बंद करून चीनी कंपन्यांनी अमेरिकेत व्यापार करावा की करू नये यावरून. तरीही व्यापारातला समतोल राखण्याचं पारडं कायम चीनच्याच बाजूने होतं असं नाही.
         सुमारे दीड शतकांपूर्वी व्यापारउदीम आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कटू आठवणी आजही बीजींगवासियंच्या मनात खोल रुतून बसल्या आहेत. या आठवणी आहेत त्या काळच्या जेव्हा चीनचा त्यांच्या स्वतःच्या व्यापारावर अगदी तीळमात्र वचक होता.
      अफूच्या व्यापारावरील प्रतिबंधाच्या मुद्द्यामुळे ब्रिटननं चीनवर हल्ला केला आणि अफूची युद्धं लढली गेली. या युद्धांचा सामना चीनला करावा लागला.
     पहिलं युद्ध 1839 साली छेडलं गेलं. त्यानंतरच्या दहा वर्षांत ब्रिटननं एका संस्थेची स्थापना केली- इंपिरियल मेरिटाइम कस्टम सर्व्हिस. ही संस्था चीनमध्ये आयात होणाऱ्या मालावर किती जकात द्यावा, हे ठरवण्याचं काम पाहायची.
रचनेप्रमाणे ही संस्था चीनी सरकारचा एक भाग होती, पण ती त्यावर वचक होता ब्रिटिश साम्राज्याचा. बीजिंगमधल्या मँडरीन लोकांकडून (स्थानिकांकडून) तिचा कारभार चालण्याऐवजी पोर्ट डाऊन येथून सगळी सूत्रं हलत होती.
     चीनच्या या कस्टम्स विभागाचे इन्सपॅक्टर जनरल म्हणून सर रॉबर्ट हर्ट नियुक्त झाले. हे ब्रिटिश अधिकारी पुढे शतकभर चीनमधले ब्रिटनचे मुत्सद्दी म्हणून ओळखले गेले. चीनी सरकारला पुरेशी उत्पन्न निर्मिती व्हावी, यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पण त्याकाळच्या आठवणी अजूनही चीनची झोप उडवतात.
        मींग साम्राज्याच्या काळात परिस्थिती आणखी वेगळी होती. पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला, ॲडमिरल झेंग यांनी सात भल्यामोठ्या आरमारी जहाजांच्या जोरावर दक्षिण-पूर्व आशिया, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीचा काही भाग या ठिकाणी व्यापारी सीमा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं यशस्वी घौडदौड केली होती आणि चीनी सामर्थ्याची जगाला प्रचिती दिली होती.
       काही अंशी चीनचा प्रभाव पाडण्याच्या हेतूनं झेंग यांनी सागरी सफर हाती घेतली होती. विविध देशांच्या सागरी सीमा ओलांडून आपल्या बलाढ्य नौका पाठवल्याचा सार्थ अभिमान इतरही अनेक साम्राज्य मिरवत होती, मात्र या सागरी सफारींचा आणखी एक फायदा असा होता. या सफारींमुळे अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्टी बीजिंगपर्यंत पोहोचत होत्या. चीनमध्ये पहिल्यांदा जिराफ आला तो याच सफारींमुळे. असे फायदे असले तरी व्यापार सर्वाधिक महत्त्वाचा आणि प्राधान्याचाही होता. विशेषः आशियातल्या इतर भागांपर्यंत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची गरज होती.त्यासाठी लागणारी धमक झेंग हे मध्ये होती, आणि त्यानं तसे केलंही, वेळ पडल्यावर श्रीलंकेच्या राजाशी दोन हात करत त्यानं एका राजाला धूळ चारली होती.
तरीही त्याची ही सफर म्हणजे राष्ट्रप्रणित सागरी मोहिमेचं विरळ उदाहरण मानावं लागेल. पुढील अनेक शतकांमध्ये चीननं सागरी सीमापार केलेला बहुतांशी व्यापार हा कागदोपत्री आला नाही.
        अर्थकारण : -
        चिनी चलनाला रेन्‌मिन्बी (Renminbi-RMB.)‘लोकांचे चलन’ (पीपल्स करन्सी) असे म्हणतात या चलनाच्या एककाला युआन (Yuan) ‘पीपल्स बँक डॉलर’ हे नाव असून एक युआन १० जिॲओ (Chio) मध्ये व एक जिॲओ १० फेनमध्ये (fen) विभागलेले आहेत.विदेश विनिमय दर पौंडास ४·६९ युआन व एका डॉलरला १·९८ युआन असा होता (एप्रिल १९७४). १०० युआन = २१·३२ पौंड = ५०·३५ डॉलर. चीनला अंतर्गत तसेच परदेशी कर्ज नसल्याचा केला जातो. सोने व परदेशी हुंडणावळ यांच्या स्वरूपात चीनचा राखीव निधी २०० कोटी डॉ. असल्याचा अंदाज करण्यात आला होता (१९७३). चीनला १९७३ साली संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय चलन निधी व जागतिक बँक या दोन संघटनांचे सदस्यत्व मिळाले.
         इतर साम्यवादी राष्ट्रांप्रमाणे चीनमधील वित्तसंस्था शासनाच्या मालकीच्या आहेत. राष्ट्राचे राजकोषीय व वित्तीय नियंत्रण चिनी जनता बँक व अर्थमंत्रालय यांच्याकडे आहे. १९५० मध्ये चीनमधील मध्यवर्ती बँक जाऊन तिच्या जागी चीन जनता बँक (पीपल्स बँक ऑफ चायना) आली आणि तिने हळूहळू खाजगी बँका ताब्यात घेतल्या. ही बँक पाश्चिमात्य देशांतील मध्यवर्ती व व्यापारी बँकांची कार्ये करते आणि जनतेची बचत बँक म्हणूनही तिला महत्त्व आहे. उद्योगसंस्था, शासकीय संस्था व इतर संस्था यांचे हिशेब, आय आणि व्यय यांची कामेही याच बँकेकडे आहेत. परकीय व्यापारासंबंधीचे वित्तव्यवहार बँक ऑफ चायनातर्फे मध्यवर्ती बँकेच्या देखरेखीखाली चालतात. अर्थमंत्रालयाचे कार्य कर गोळा करणे, वार्षिक अंदाजपत्रके तयार करणे व विनियोगासाठी रकमांचे वाटप करणे हे आहे. कृषीसाठी लागणारे अर्थसाहाय्य चीनची कृषी बँक पुरविते. ‘पीपल्स कन्स्ट्रक्शन बँक ऑफ चायना’ ही बँक काही विशेष प्रकल्पांना भांडवल पुरविते. यांशिवाय बऱ्याच परकीय बँकाही चीनमध्ये बँकव्यवहार करतात.
      चीन सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकांची माहिती उपलब्ध नाही, परंतु सरकारी उद्योगांचा नफा व कर या सरकारी उत्पन्नाच्या बाबी आहेत. ७० टक्के उत्पन्न सरकारी उद्योगांच्या नफ्यातून व ३० टक्के करांपासून होत असावे असा अंदाज आहे. सरकारी खर्चाविषयी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
        आर्थिक नियोजन : -
         चीनच्या अर्थव्यवस्थेवर शासनाचे संपूर्ण नियंत्रण आहे. खाजगी क्षेत्र जवळजवळ अस्तित्वातच नाही कारण खाजगी मालकीचे शेततुकडे व खाजगी कारागिरांनी चालविलेले काही कुटिरोद्योग यांखेरीज इतर सर्व उत्पादन सरकारी क्षेत्रात किंवा संयुक्त क्षेत्रात चालते. राष्ट्राचे आर्थिक धोरण आखणे, अल्पकालीन अथवा दीर्घकालीन योजनांची आखणी करून त्या अंमलात आणणे, विविध वस्तूंच्या उत्पादनाची उद्दिष्टे ठरविणे, कामगार संख्या व त्यांचे वेतनदर निश्चित करणे व वस्तुंच्या किंमती ठरविणे ही सर्व कामे शासनाकडेच असतात. विनियोगाचे सर्व अधिकारही शासनाच्या आधीन आहेत.  
अर्थव्यवस्थेवर इतके विस्तृत नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थातच चीनला भलीमोठी नोकरशाहीची यंत्रणा उभारावी लागली असून तिला समादेशाच्या साखळीने वरपासून खालपर्यंत जोडून टाकावे लागले आहे. सर्वांत वरिष्ठ प्राधिकरण म्हणजे राज्य परिषद (स्टेट कौन्सिल). मंत्री व साम्यवादी पक्षातील राजकीय पुढारी हे तिचे सभासद असतात. आर्थिक धोरण आखणे व ते अंमलात आणणे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक समित्या व आयोग असून त्यांवर परिषदेचे थेट नियंत्रण असते. त्यांपैकी महत्त्वाचे पुढीलप्रमाणे आहेत : राज्य नियोजन आयोग (स्टेट प्लॅनिंग कमिशन), राज्य आर्थिक आयोग (स्टेट इकॉनॉमिक कमिशन),राज्य भांडवल रचना आयोग (स्टेट कॅपिटल कंस्ट्रक्शन कमिशन), राज्य विज्ञान व तंत्रविद्याविषयक आयोग (स्टेट सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन) व कच्च्या मालाचा पुरवठा करणारे सर्वसाधारण केंद्र (जनरल ब्यूरो फॉर सप्लाय ऑफ रॉ मटीरिअल्स). दीर्घकालीन योजना आखण्याचे काम राज्य नियोजन आयोगाकडे आहे. वार्षिक नियोजन आणि उपलब्ध कच्च्या मालाचे वाटप करणे ही जबाबदारी राज्य आर्थिक आयोगाकडे आहे.
      निरनिराळ्या उद्योगसंस्थांवर सु. १४ आर्थिक मंत्रालयांचे नियंत्रण असते परंतु हे शासकीय वर्चस्व परिस्थितीप्रमाणे बदलत असते. १९५८ पर्यंत केंद्रीय नियंत्रण अतिशय काटेकोर असे पण त्यानंतर ते शिथिल करून सु. ८० टक्के उद्योगसंस्थांची देखरेख स्थानिक शासकीय केंद्रांकडे सोपविण्यात आली. १९६० नंतर केंद्रीकरणाचे प्रमाण पुन्हा वाढले परंतु १९६६ मधील सांस्कृतिक क्रांतीमुळे स्थानिक स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा वाढले. सध्या साधारणपणे मोठाले कारखाने मात्र केंद्रीय मंत्रालयांच्या थेट अखत्यारात असून लहान आणि मध्यम आकाराचे कारखाने स्थानिक क्रांतिकारी समित्यांकडे सोपविलेले आहेत. कृषिसमूहांच्या कामावर कृषिमंत्रालय व प्रादेशिक-शासकीय संस्था देखरेख करतात. उद्योगसंस्थांचे आर्थिक व इतर नियंत्रण संयुक्तपणे अर्थमंत्रालय व चीन जनता बँकेकडे सोपविण्यात आले आहे.
       राष्ट्रीय आर्थिक धोरण पंचवार्षिक योजनांच्या द्वारे अंमलात आणले जाते. राज्य नियोजन आयोग प्रमुख वस्तूंचे उत्पादन, विविध क्षेत्रांतील विनियोग वगैरे बाबींविषयी एक स्थूल योजना तयार करतो. योजनेचा आराखडा संबंधित मंत्रालयामार्फत स्थानिक नियोजन समित्यांकडे जातो. या समित्या संबंधित प्रदेश व उद्योगसंस्था यांच्याशी सल्लामसलत करून सविस्तर योजना आखतात आणि त्या केंद्रीय मंत्रालयांकडे व नियोजन प्राधिकरणांकडे पाठवितात. तेथे त्यांची काळजीपूर्वक छाननी व परस्परसंतुलन करण्यात येऊन नंतर अंतिम योजना तयार होते. तिला राज्य परिषदेची संमती मिळाली म्हणजे ती आर्थिक धोरणाची अधिकृत चौकट बनते. पहिली पंचवार्षिक योजना १९५३ – ५७ या वर्षांसाठी, तर १९७१ – ७५ साठी चौथी योजना अंमलात होती.
      वाहतूक व संदेशवाहन :-
       अर्थव्यवस्था, राष्ट्रैक्य व संरक्षणव्यवस्था यांवर वाहतुकीचे महत्त्वाचे परिणाम होत असल्यामुळे चीनने वाहतुकीवर विशेष भर दिला आहे. १९४९ नंतर वाहतूक धोरणात वेळोवेळी बदल करण्यात आले. १९४९ – ५२ पर्यंत चालू दळणवळण सुधारणे, संरक्षणास आवश्यक असलेल्या मार्गांना प्राधान्य देणे व राजकीय सत्ता दृढ करण्याच्या दृष्टीने वाहतूक धोरण ठेवणे यांवर लक्ष केंद्रित केले. नंतर पहिल्या योजनाकाळात (१९५३ – ५७) जुने मार्ग सुधारले व काही नवीन मार्ग बांधले. १९५८– ५९ मध्ये वाहतूक व्यवस्था औद्योगिक विकासास अपुरी असल्याचे दिसून आले, म्हणून प्रादेशिक मार्गात भर टाकण्याची जबाबदारी जनतेवर सोपविण्यात आली आणि बरेच लहान लोहमार्ग बांधले गेले. १९६३ नंतर ग्रामीण, डोंगराळ व जंगलमय भागांत लोहमार्ग बांधण्याचे धोरण अंमलात आले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दळणवळण सुधारावे म्हणून सागरी वाहतूक बरीच वाढविली. या सर्व धोरणांचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय उत्पादन तर वाढलेच शिवाय मध्यवर्ती शासनाला देशभर आपली सत्ता सुदृढ करण्यास मदत झाली.
         रेल्वेने अवजड माल मोठ्या प्रमाणावर दूरवर पोहोचविणे अधिक सोयीचे असल्याने चीनच्या विकासात रेल्वेमार्गांना विशेष महत्त्व आहे. चीनमधील एकूण मालवाहतुकीपैकी निम्मे व प्रवासी वाहतुकीपैकी सु. ४७ टक्के वाहतूक रेल्वेमार्गांनी होते. पहिल्या पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्के खर्च रेल्वेसाठी करण्यात आला. १९६० मध्ये हे प्रमाण १५ टक्के होते.
       चीनमध्ये लोहमार्गबांधणी १८७६ मध्ये सुरू झाली. १९४८ पर्यंत तेथे २४,१४० किमी. लांबीचे ५८ लोहमार्ग चालू होते. त्यांपैकी ४४ टक्के ईशान्य भागात, ३३ टक्के यांगत्सी नदीच्या उत्तरेस व २३ टक्के तिच्या दक्षिणेस होते. चीन–जपान युद्धात व नंतरच्या यादवी युद्धात झालेली लोहमार्गांची मोडतोड १९५२ पर्यंत भरून काढण्यात आली. पहिल्या योजनाकाळात ४,८२८ किमी.हून अधिक लांबीचे मार्ग नव्याने बांधण्यात आले व एकूण लोहमार्गांची लांबी ३१,३८२ किमी. झाली. १९५८ नंतर लोहमार्गांसंबंधीच्या धोरणामध्ये काही किरकोळ फेरफार झाले. पूर्वभागातील लोहमार्गांकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले व चालू लोहमार्गांवर सुधारणा करण्यात आल्या. काही मार्गांवर विजेची एंजिने वापरण्यात येऊ लागली. चीनचे सर्व लोहमार्ग सरकारी मालकीचे असून सरकारतर्फेच चालविले जातात. त्यांच्याशिवाय बरेचसे लहानलहान लोहमार्ग स्थानिक स्वरूपाचे असून ते सरकारी लोहमार्गांना पूरक आहेत. ते कमी खर्चात व अधिक लवकर बांधून होतात व कालांतराने त्यांच्या जागी सरकारी लोहमार्गांची सोय उपलब्ध होते. १९६२ मध्ये अशा मार्गांची लांबी ९,६५६ किमी. होती. १९६० नंतर वायव्य व नैर्ऋत्य भागांत लोहमार्गांची मोठ्या प्रमाणावर बांधणी करण्यात आली. या मार्गांवरून हलविला जाणारा माल १९७२ मध्ये ६२० दशलक्ष टन होता व त्यात मुख्यत: कोळसा, पोलाद, धान्ये व कापूस यांचा समावेश होता. १९७० च्या सुमारास चीनमध्ये १५ मुख्य लोहमार्ग होते. त्यांची लांबी सु. १९,३१२ किमी. होती. त्यांतील प्रमुख मार्ग – (१) उत्तर–दक्षिण लोहमार्ग : पीकिंग–कँटन (२,३०० किमी.) तिन्‌त्सिन–शांघन (१,५०० किमी.) बाउजी–चुंगकिंग (१,१७४ किमी.). (२) पूर्व–पश्चिम प्रमुख मार्ग : लुंगहाई लोहमार्ग लानजो–सिक्यांग, शांघाय–यू-इ-क्वान (व्हिएटनाम सीमेवर) आणि पीकिंग–लानजो. (३) मँचुरिया भागातील मार्ग : चांगचुन लोहमार्ग (२,३७० किमी.) दक्षिण मँचुरिया लोहमार्ग (१,१२० किमी.) पीकिंग–मूकडेन (शेनयांग) लोहमार्ग (१,३५० किमी.). १९६५ च्या सुमारास चीनमधील लोहमार्गांची एकूण लांबी ३५,४०५ किमी. होती.
       चीनमध्ये १९५३ अखेर रहदारीयोग्य रस्त्यांची एकूण लांबी १,२९,५५२ किमी. होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेअखेर २,५९,९०७ किमी. लांबीच्या रस्त्यांपैकी सु. १,३२,७७० किमी. रस्ते बारमहा रहदारीस खुले होते. तिबेटच्या पठारावर बांधण्यात आलेले तीन प्रमुख रस्ते ही चीनची या काळातील एक उल्लेखनीय कामगिरी मानण्यात येते. दुसऱ्या योजनेत रस्तेबांधणीवर अधिक जोर दिला गेला आणि कम्यूननी एका वर्षाच्या अवधीत १,६४,९५७ किमी. लांबीचे रस्ते बांधले. १९६० पर्यंत चीनमध्ये एकूण ५,३५,१०५ किमी. लांबीचे रस्ते होते आणि त्यांपैकी २,५५,०८० किमी. पक्के होते. १९६२ नंतर रस्ते वाहतुकीचा कृषिकार्यास विशेष उपयोग व्हावा याकडे लक्ष पुरविण्यात आले. रबरी धावांच्या गाड्या, सुधारित वाहने व सायकली यांच्या उत्पादनात आणि वापरात वाढ झाली. ग्रामीण भागात रस्ते बांधणीची जोरदार मोहीम पार पाडण्यात आल्याने खेड्यांतील मालाच्या बाजारपेठांत अधिक प्रमाणावर विक्री होऊ लागली. मालमोटारींची वाहतूकही बरीच वाढली. १९५९ मध्ये रस्तेवाहतूकीने १५५ दशलक्ष टन माल हलविण्यात आला. 
   रस्तेबांधणी मोठ्या प्रमाणावर हाती घेतली, त्याच वेळी पेट्रोल व मोटरगाड्या यांचे उत्पादनही वाढविण्यात आले. १९७० पर्यंत बहुतेक सर्व प्रांतांत ट्रक व तत्सम वाहने तयार करणारे लहान व मध्यम आकाराचे कारखाने सुरू झाले. चीनचे वैशिष्ट्य हे की, हे कारखाने सुरुवातीस मोटरदुरुस्ती करणारे होते व त्यांतूनच पुढे स्थानिक गरजांना अनुकूल अशी मोटरवाहने तयार करण्यास त्यांनी सुरुवात केली. शिवाय मोठ्या प्रमाणावरील शासकीय कारखाने विविध प्रकारची मोटरवाहने तयार करतात. त्यांचे वाटप शासनातर्फे सैन्याला आणि सरकारी कारखान्यांना केले जाते. देशाच्या विस्ताराच्या मानाने चीनमध्ये खाजगी मोटारी फारशा आढळत नाहीत. देशात १९६९ मध्ये ४,०९,००० ट्रक, ६०,००० मोटारी व ३०,००० बसगाड्या होत्या.
       लोहमार्ग व रस्ते बांधणे आणि त्यांना सुस्थितीत ठेवणे हे खर्चाचे काम असल्यामुळे जलवाहतुकीला चीनमध्ये फार महत्त्व आहे व म्हणून राष्ट्रीय पातळीवर जलमार्गांचे जाळे पसरविण्याचे धोरण चिनी सरकारने अनुसरले आहे. चीनला १,६४,९५७ किमी. लांबीचे अंतर्गत जलमार्ग उपलब्ध असून त्यांवरून बोटी मालाची व उतारूंची ने-आण करीत असतात. याशिवाय इमारती लाकूड व बांबू यांच्या वाहतुकीसाठी आणखीही काही मार्ग उपयोगात येतात. हे जलमार्ग मुख्यत: मध्य व दक्षिण चीनमध्ये आहेत. १९४९ मध्ये त्यांची लांबी फक्त ७४,०३० किमी. होती, ती १९५२ मध्ये ९४,९५१ किमी. आणि १९५७ अखेर १,४३,२३० किमी. पर्यंत वाढविण्यात आली. जलमार्गांतील गाळ उपसण्यासाठी व्यवस्था करणे, रात्री त्यांचा बोटींना उपयोग करता यावा म्हणून आवश्यक त्या सोयी करणे, धक्के बांधणे, नदीकाठची बंदरे सुधारणे, जलवाहतुकीच्या बोटी अधिक प्रमाणावर बांधणे इ. सुधारणांसाठी जनतेचे साहाय्य व श्रमदान मिळविण्यात आले. बहुतेक जलमार्ग भौगोलिक कारणांमुळे पूर्व-पश्चिम असे आहेत. उत्तर-दक्षिण असणारा जलमार्ग म्हणजे ग्रँड कालवा. चीनच्या मोठ्या भिंतीप्रमाणेच हा कालवाही एक मोठे आश्चर्य आहे. त्यामुळे कोळसा व धान्ये यांची उत्तर-दक्षिण वाहतूक सुकर झाली आहे.
       चीनचा किनारा १४,००१ किमी. लांबीचा असून त्यावर खोल पाण्याची सु. २० बंदरे आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक बारमहा वापरास खुली असतात. त्यांच्या देखरेखीचे काम दळणवळण मंत्रालयाकडे आहे. १९५० – ५९ या काळात जलवाहतूक विकासासाठी केलेल्या एकूण विनियोगापैकी ३० टक्के रक्कम बंदरांच्या विकासासाठी खर्च करण्यात आली. जुन्या बंदरांचा विस्तार करणे, त्यांतील सोयी वाढविणे व नवीन बंदरे बांधणे ही कामे पार पाडण्यात आली. बंदरावरील मालाची चढउतार करण्यासाठी यंत्रे बसविण्यात आली. जिज्यांग या बंदरात केलेल्या सुधारणांमुळे ते दक्षिण चीनमधील दुसरे मोठे बंदर होत आहे. उत्तरेकडील तिन्‌त्सिनकडून डांग-कू हे नवीन कृत्रिम बंदर आधुनिक सोयींनी सज्ज करून बांधण्यात आले. चीनच्या बंदरांमधून किनाऱ्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. त्यासाठी बोटींची संख्याही वाढविली आहे. अशा बोटींचा एकूण टनभार १९७१ मध्ये ११ लक्ष टन होता. १९६१ मध्ये चीनने सागरी वाहतुकीसाठी महासागर नौकानयन निगम स्थापिला. १९७३ मध्ये या निगमाच्या मालकीची २०० जहाजे मालाची व उतारूंची ने-आण करीत होती. डांग-कू, शांघाय, डायरेन, चिंगडाऊ, ह्‌वांग-पू व जिज्यांग या बंदरांतून परदेशी जाणाऱ्या बोटींचे मार्ग सुरू होतात. शांघाय हे एकोणिसाव्या शतकापासूनच चीनचे प्रमुख बंदर झाले आहे.
       चीनसारख्या विस्तृत व विविध प्रकारचा भूप्रदेश असणाऱ्या देशाला हवाई वाहतुकीचा विशेष उपयोग होत असतो. चीनमधील हवाई वाहतुकीचे दोन विभाग पडतात : नागरी हवाई वाहतूक व खास प्रयोजनार्थ हवाई वाहतूक.
            नागरी हवाई वाहतूक :
           १९५० पर्यंत आकस्मिक गरज भागविणारे विमानमार्ग पीकिंगहून तिन्‌त्सिन, कँटन व चुंगकिंग या शहरांना जात होते. १९५२ पर्यंत ९ विमानमार्गांनी २३ चिनी व परराष्ट्रीय शहरे जोडली गेली होती. त्या मार्गांची एकूण लांबी १३,०३६ किमी. हून अधिक होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेची पुढील उद्दिष्टे होती : हवाईमार्ग वाढविणे, पीकिंग व इतर प्रमुख शहरे आणि सीमाप्रांत यांमधील दुवे अधिक दृढ करणे, खास प्रयोजनाची हवाई वाहतूक वाढविणे, पीकिंगचा मध्यवर्ती विमानतळ बांधणे व मोठाली वाहतूक-विमाने तयार करणे. १९५७ पर्यंत पीकिंगशी ४२ शहरे आणि औद्योगिक क्षेत्रे जोडली गेली होती व एकूण हवाई मार्गांची लांबी २६,३९३ किमी. पर्यंत वाढली. चीनचे इतर ३० देशांशी हवाई वाहतुकीने दुवे जोडण्यात आले. १९५८ नंतर या प्रगतीला आणखी वेग आला व एकूण हवाई मार्गांची लांबी ३२,६६८ किमी. पर्यंत वाढली. पीकिंग एकूण ७२ शहरांना जोडले गेले. १९७० पर्यंत पर्वतमय प्रदेशातील व सीमाप्रांतातील दुर्गम भागांशी चीनमधील शहरांतून काही तासांतच विमानाने संपर्क साधता येणे शक्य झाले व वाहतुकीचा वेगही वाढविण्यात आला. एकूण ७५ हवाई मार्ग चालू असून त्यांची एकूण लांबी सु. ४५,०६१ किमी. आहे.
         सुरुवातीस चीनची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मॉस्कोमधून होत असे व तेथून सोव्हिएट विमानांनी इतर राष्ट्रांकडे माल व उतारू जात असत. चीन-रशिया संबंध बिघडल्यानंतर चीनने यूरोपीय राष्ट्रांशी थेट हवाई वाहतूक सुरू केली. हवाई मार्गांनी आता चीनमधून सोव्हिएट रशिया, कोरिया, मंगोलिया, व्हिएटनाम, ब्रह्मदेश, पाकिस्तान, कंबोडिया, इंडोनेशिया व फ्रान्स या देशांना जाता येते.
         खास प्रयोजनार्थ हवाई वाहतूक :
          ही १९५२ मध्ये सुरू झाली. जंगल विभागांचे आगीपासून संरक्षण करणे हे तिचे सुरुवातीचे कार्य होते. आता पूर्वेक्षण, फोटोद्वारा सर्वेक्षण, कृषीसाठी जंतुनाशक द्रव्यांचा वापर, मेंढ्या, रेशीम-किडे व मासे आणि सुधारित बियाणे यांची वाहतूक इ. कामासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. त्यासाठी देशाच्या निरनिराळ्या भागांत सु. १०० विमानतळ बांधण्यात आले आहेत. वेळप्रसंगी या विमानतळांचा उपयोग संरक्षण कार्यासाठी होऊ शकतो.
        टपाल व तार : १९६४ साली चीनमध्ये सु. ४४,००० डाकघरे व तारकचेऱ्या होत्या, यांशिवाय सु. ९०,००० टपालवाटपकेंद्रे होती. दूरध्वनी तारांची लांबी १९६० मध्ये १२,२५,५१२ किमी. होती. ग्रामीण जनता समूहांपैकी ९५ टक्के व उत्पादन ब्रिगेड कचेऱ्यांपैकी ६० टक्के कचेऱ्यांना दूरध्वनी दळणवळण उपलब्ध आहे. १९७० च्या सुमारास वर्तमानपत्रांचे व मासिकांचे सु. १९ दशलक्ष अंक व ५·५ दशलक्ष पत्रांचा दररोजचा बटवडा डाक कार्यालये करीत होती. १९७२ साली चीनमध्ये २ कोटी रेडिओ होते व दूरचित्रवाणी परवान्यांची संख्या २ लाख होती. १३ दूरचित्रवाणी केंद्रे व १२ प्रायोगिक केंद्रे होती.
        साम्यवादी राजवटीपुढील आर्थिक समस्या :
          चीनच्या साम्यवादी राजवटीला राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी जे प्रयत्न करावे लागले, त्यांच्या मुळाशी चीनची आर्थिक वस्तुस्थिती होती. राष्ट्राची प्रचंड लोकसंख्या व तिच्या वाढीचा वेग, एकूण क्षेत्रफळाशी लागवडीस योग्य असणाऱ्या जमिनीचे अत्यल्प प्रमाण व त्यामुळे शेतकऱ्याचे प्रतिडोई फारच कमी असलेले कृषिउत्पादन, बचतीची व भांडवल संचितीची कमतरता आणि तंत्रविद्येतील मागासलेपणामुळे परकीय तंत्रज्ञांवर अवलंबून राहण्याची गरज या चार घटकांमुळे चीनच्या आर्थिक विकासाच्या वेगावर मर्यादा पडणे साहजिक होते. म्हणूनच अद्यापही चीन हे विकसनशील राष्ट्रच मानले पाहिजे. या आर्थिक वस्तुस्थितीमुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांचे स्वरूप असे होते :
 (१) अर्थव्यवस्थेचा संतुलित विकास : चिनी अर्थव्यवस्थेचा संतुलित विकास शक्य तितक्या वेगाने घडावा हे चिनी आर्थिक नियोजनामागील जाहीर धोरण होते. जमीन कायद्यांत सुधारणा करून शांतता व एकछत्री सत्ता स्थापन झाल्यानंतर शेती व उद्योग यांचा एकाच वेळी विकास घडवून आणला पाहिजे, या नियोजनाच्या तत्त्वाचा चीनमध्ये पुरस्कार करण्यात आला. यालाच त्यांनी ‘दोन पायांवर चालणे’ असे नाव दिले. शेती व उद्योग या दोन्ही क्षेत्रांत संतुलित विकास झाल्याशिवाय आर्थिक प्रगती होऊ शकणार नाही, ही जाणीव या तत्त्वाच्या मुळाशी होती. परंतु प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी करताना विनियोगाचा अग्रक्रम कसा असावा. यासंबंधी अनेकदा वैचारिक गोंधळ झाल्याचे आढळते. राष्ट्रीय साधनसामग्री व तिच्या वाढीचा वेग मर्यादीत असल्यामुळे विनियोगाचा कार्यक्रम आखताना ओढाताण होणे साहजिकच आहे. औद्योगिक प्रकल्प हाती घ्यावे, तर शेतीसाठी साधनांचीही कमतरता भासे व शेतीचे उत्पादन कमी होई. शेतीउत्पादन कमी झाले म्हणजे धान्याची आयात करावी लागे व उद्योगधंद्यांना कच्च्या मालाची टंचाई भासे. तसे झाले म्हणजे, पुन्हा शेतीच्या विकासावर जोर द्यावयाचा तथापि तसे केल्यानंतर त्यांना पुरेशी खते व यंत्रसामग्री मिळावी म्हणून पुन्हा उद्योगांचे उत्पादन कसे वाढवावे, याची चिंता करावी लागे. अशा प्रकारचे धरसोडीचे आर्थिक धोरण चीनला अनुसरावे लागले.
      (२) लघुउद्योग व अवजड उद्योग : चिनी अर्थव्यवस्थेपुढील दुसरी समस्या म्हणजे लघुउद्योग आणि अवजड उद्योग यांमधील ओढाताण. उपभोग्य वस्तूंचे उत्पादन होता होईल तो लघुउद्योगांद्वारा वाढवून जनतेचे राहणीमान सुधारावे, असा चीनच्या धोरणामागील संकल्प होता. काही वेळा तर कुटिरोद्योगांच्या प्रोत्साहनाचे खूळ हास्यास्पद होईल इतक्या थरापर्यंत गेले. उदा., प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरामागील परसात लोखंड तयार करण्याची भट्टी तेवत ठेवून लोखंडाच्या उत्पादनास हातभार लावावा, असे प्रयत्नही उच्च पातळीवरून करण्यात आले. लघुउद्योगांची उत्पादनक्षमता आणि त्यांच्या मालाची गुणवत्ता बेताची असते व मोठ्या प्रमाणावरील अवजड उद्योगांचे उत्पादन वाढण्यास भांडवल विनियोग, तंत्रशास्त्राचे ज्ञान व आधुनिक व्यवस्थापनकौशल्य यांचा योग्य समन्वय आवश्यक असतो आणि त्यासाठी पुरेसा कालावधी लागतो, याची फारशी जाणीव चीनने केलेल्या सुरुवातीच्या प्रयत्नांत दिसून येत नाही.
       (३) नियोजन व विकेंद्रीकरण : आर्थिक विकासासाठी केंद्रीय नियोजनाची कास धरावी की उत्पादन वाढीसाठी विकेंद्रीकरणास प्रोत्साहन द्यावे, या बाबतीतही चिनी साम्यवाद्यांना निश्चित धोरण आखून त्याचा पाठपुरावा करणे कठीण झाले. रशियाचे अनुकरण करून अवजड उद्योगांच्या विकासावर त्यांनी भर दिला खरा, पण त्याचा परिणाम म्हणजे उत्पादनवाढ कशासाठी या प्रश्नाकडे मधूनमधून दुर्लक्ष झाले. केवळ उत्पादनवाढीसाठी उत्पादनावर भर दिला गेला व निरनिराळ्या औद्योगिक क्षेत्रांत परस्परपूरक असा जो समन्वय आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक होता, तो साधणे दुरापास्त झाले. ‘गरुड भरारी’ फसल्यानंतर काही काळ नियोजनाचा अंकुश बोथट झाला. दुसरी पंचवार्षिक योजना अंमलबजावणीपूर्वीच संपुष्टात आली. वारा येईल तशी पाठ फिरविता यावी म्हणून केवळ वार्षिक योजनाच आखल्या गेल्या. आता १९७० सालापासून पुन्हा विकेंद्रीकरणावर जोर देण्यात येत आहे.
      (४) व्यवस्थापन समस्या : चिनी औद्योगिक प्रगतीच्या आड आणखी एक समस्या उद्‌भवली व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य कारखान्यातील तंत्रज्ञांना द्यावे की त्यांच्यावर राजकीय पक्ष संघटनेचा अंकुश ठेवावा, हा एक कूटप्रश्न ठरला. प्रत्येक कारखान्यावर पक्षसंघटनेची देखरेख ठेवावयाची, एखाद्या पक्षसदस्याचे कारखान्याच्या व्यवस्थापनावर वर्चस्व स्थापावयाचे असे धोरण पक्षाच्या दृष्टीने योग्य वाटले, तरी ते राष्ट्रीय प्रगतीस विघातकच ठरले. एकतर, कारखान्यातील श्रमिकवर्ग व्यवस्थापकांऐवजी पक्षसदस्यांकडे आदेशासाठी पाहू लागला व दुसरे म्हणजे, व्यवस्थापकांनाही दैनिक व्यवस्थापनातून आपले अंग काढून घेऊन पक्षसदस्यांवर अंतिम जबाबदारी टाकणे सोपे झाले. साहजिकच कारखान्यांतील शिस्त शिथिल झाली व कार्यक्षमता अपेक्षेपेक्षा कमी होत गेली. श्रमिकांना प्रोत्साहन कसे द्यावे, यासंबंधीच्या धोरणातही वारंवार बदल करावे लागले. व्यवस्थापनाच्या बाबतीत पक्षसदस्यांपेक्षा तंत्रज्ञांवरच विशेष जबाबदारी टाकली पाहिजे, असे ठरून १९६२ पासून त्या दिशेने काही पावलेही टाकण्यात आली. परंतु सांस्कृतिक क्रांतीच्या काळात पुन्हा पक्षसदस्यांना प्राधान्य आले. सध्या पक्षसदस्याने तंत्रज्ञ व तंत्रज्ञाने पक्षसदस्य व्हावे, अशी विचारसारणी आहे.
       (५) रशियाची मदत : रशियाने चीनच्या विकासासाठी सुरुवातीस हरतऱ्हेने मदत केली. १९५० मध्ये एक व १९५४ मध्ये दुसरे, अशी दोन मोठी विकास-कर्जे रशियाने चीनला दिली. कर्जरूपाने शस्त्रास्त्रांचाही पुरवठा भरपूर केला विकास कर्जांचा उपयोग रशियाकडून यंत्रसामग्री व तंत्रकौशल्य विकत घेण्यासाठी करण्यात आला. याशिवाय रशियाने मोठ्या प्रमाणावर चीनमध्ये तंत्रज्ञांमार्फत कारखाने उभारून ते चीनला चालवावयास दिले. १९५० – ५८ या काळात असे एकूण २९१ औद्योगिक प्रकल्प रशियाने देऊ केले. त्यांपैकी १९६० अखेर १५४ प्रकल्प पूर्ण झाले होते व उरलेले १३७ प्रकल्प १९६७ अखेर पूर्ण व्हावयाचे होते. १९४९ – ५८ या काळात १०,८०० रशियन तंत्रज्ञ चीनमध्ये औद्योगिक कामगिरीवर राहून गेले. त्याच काळात रशियन यंत्रशाळा व विद्यापीठे यांमधून १४,००० चिनी विद्यार्थी शिकले व ३८,००० चिनी श्रमिकांनी रशियातील कारखान्यांतून उमेदवारी पतकरली. परंतु १९६० मध्ये चीन व रशिया यांचे राजकीय संबंध दुरावले व त्यामुळे रशियन मदतीचा ओघ संपुष्टात आला. रशियाने आपले तंत्रज्ञ चीनमधून परत बोलाविले. चीनमध्ये बांधल्या जात असलेल्या कारखान्यांचे नकाशे आणि प्रकल्पालेख त्यांनी रशियात परत तरी नेले किंवा फाडून टाकले. साहजिकच चिनी औद्योगिक विकास थंडावला. या दुरावलेल्या संबंधांचा परिणाम चीनच्या परराष्ट्रीय व्यापारावरही झाला. आपले रशियाबरोबरचे व्यापारसंबंध कमी करून चीनला इतर देशांशी संबंध जोडणे आवश्यक होऊन बसले. शिवाय रशियाची कर्जे ताबडतोब फेडण्याची जबाबदारी चीनवर येऊन पडली आणि ती त्याने लवकरच पार पाडली.
        वरील सर्व बिकट समस्यांना तोंड देण्याचे मार्ग चिनी अर्थव्यवस्था शोधीत आहे. शेतीचे आधुनिकीकरण व्हावे म्हणून यंत्रे, वीजशक्ती, रासायनिक खते व जलसिंचन यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेला श्रमिकवर्ग उपलब्ध करावयाचा, तर त्यासाठी शेतीउत्पादन वाढविणे आवश्यक आहे, हा धडा चीन आता शिकला आहे. अवजड उद्योगांनी आपली उत्पादनक्षमता पुरेपूर वापरावी. उत्पादनाचा दर्जा सुधारावा, त्याच्यात विविधता आणावी इकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. संरक्षणाच्या तयारीच्या दृष्टीने अवजड उद्योगांची वाढ चीनला अत्यंत महत्त्वाची वाटणे साहजिकच आहे. विकासास कालावधी लागतो, हा धडा चीनला पटला असावा कारण घाईने केलेल्या विकासापायी बरीच साधनसामग्री वाया जाते व जनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, हा अनुभव चीनला गेल्या पंचवीस वर्षांत आला आहे. 
    चीनची पाचवी पंचवार्षिक योजना डिसेंबर १९७५ अखेर संपत आहे. नियोजनाच्या कालावधीत चीनच्या कृषिउत्पादनात काहीशी प्रगती झाली असली, तरी प्रतिवर्षी २ टक्क्यांनी वाढणारी लोकसंख्या व दरसाल ६-७ दशलक्ष टन धान्याची करावी लागणारी आयात लक्षात घेता, कृषिउत्पादन अधिक वेगाने वाढणे चीनला आवश्यक का वाटते, हे समजू शकते. म्हणूनच पिकांची विविधता, दुहेरी किंवा तिहेरी लागवड, सुधारित बियाणे, खते व कीटकनाशक द्रव्ये यांचा अधिक प्रमाणात वापर इ. कार्यक्रमांवर विशेष भर देण्याची आवश्यकता चीनला अजूनही भासत आहे. औद्योगिक क्षेत्रात कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन बरेच वाढले असले, तरी कोळसा उत्पादन व रेल्वे वाहतूक या क्षेत्रांतील कामगिरी समाधानकारक आढळत नाही. कामगारांची गैरहजेरी व व्यवस्थापकीय अकार्यक्षमता यांमुळे काही उद्योगांची प्रगती कुंठित झाल्यासारखी वाटते. सध्या चीनच्या आर्थिक विकासाच्या आड येत असलेला एक प्रमुख घटक म्हणजे वाहतुकीची अपुरी साधने. चीनमध्ये आयात होत असलेल्या मालात मालमोटारी, वाहनांच्या कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री, दळणवळणास आवश्यक असणारी रेल्वे एंजिने, जहाजे आणि विमाने यांसारख्या साधनसामग्रीचे प्रमाण बरेच मोठे आहे. यावरून आर्थिक प्रगतीच्या आड येणारी वाहनांची कमतरता भरून काढण्याचे प्रयत्न चीन जागरूकपणे करीत असल्याचे दिसते. १९७५ च्या सुरुवातीस पीकिंग येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्पादनवाढीवर विशेष भर देण्यात आला. राज्य नियोजन आयोग व राज्य भांडवल उभारणी आयोग यांच्या प्रमुख असलेल्या मंत्र्यांना उप-प्रधानमंत्र्यांचा हुद्दा बहाल करण्यात आला. यावरून आणि प्रधानमंत्री चौ एन-लाय यांनी काँग्रेस पुढील भाषणात केलेल्या विधानांवरून पुढील दहा वर्षांत चीनचे आर्थिक आघाडीवरील उद्दिष्ट ‘स्थिर उत्पादनवाढ’ हेच असल्याचे दिसून येते. राजकीय क्रांतीवर अधिक भर दिला गेल्यामुळे चारही पंचवार्षिक योजनांमध्ये भरघोस आर्थिक विकास साध्य झाला नाही, याची जाणीव चीनच्या नेत्यांना झाली असून पुढील काही वर्षांत आर्थिक क्रांतीकडे विशेष लक्ष पुरविले जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.  
  लोक व समाजजीवन : -
          चीन हा जगातील एक प्राचीनतम देश असून त्यात मूळ एकाच मानववंशाच्या शाखोपशाखांच्या गटांचे राष्ट्र विकसित झाले, असे अलीकडच्या काळापर्यंत मानले जात असे. परंतु चीनमध्ये पीतवर्णी हानवंशीय (हान साम्राज्यावरून चिनी लोक स्वत:ला हानवंशीय मानतात) लोकांची फार मोठी संख्या असली तरी मंगोल, तुर्की इ. भिन्न मानववंशांतील लोक तसेच ‘ज्वांग’ (चुआंग), ‘व्है ई’ (लोलो), ‘म्याव’ (मिओ), ‘फू ई’, ‘थांइ’ (पूयी, थाय) इ. आदिवासी जमाती चीनमध्ये आहेत. त्यामुळे चीन हा अनेक मानवगटांचा आणि राष्ट्रीयत्वांचा देश आहे, असे यथार्थतेने म्हणता येते. चीनमध्ये हान गटाबाहेरील सु. ६ टक्के लोक आहेत.
     समाजरचना : -
         एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चीनमध्ये समाजापेक्षा कुटुंबाला व कुटुंबसमूहांना जास्त महत्त्व दिले जात असे. किंबहुना कुटुंबसंस्थेच्या आधारेच तेथे सर्व सामाजिक व राजकीय संस्थांचा विकास झाल्याचे दिसते. कन्फ्यूशसने दिलेल्या राजा-मंत्री, पिता-पुत्र, ज्येष्ठ-कनिष्ठ भाऊ, पति-पत्नी, मित्र-मित्र या पाच मुख्य मानवी संबंधांपैकी तीन कौटुंबिक आहेत, यावरूनही हे दिसून येते. कुटुंबाचे स्थैर्य व सुख हे माणसाचे सर्वांत महत्त्वाचे कर्तव्य मानले गेल्याने समष्टीच्या हिताची कल्पना चीनमध्ये विकास पावू शकली नाही आणि राष्ट्राची कल्पना रुजली नाही. एवढेच नव्हे, तर कुटुंबाच्या हितालाच प्राधान्य दिल्याने शासनव्यवहारात भ्रष्टाचार बोकाळला व अनेक राष्ट्रविघातक प्रवृत्तींना उत्तेजन मिळाले. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विकसित होऊ लागलेल्या राष्ट्रीय भावनेमुळे चीनमध्ये समष्टीकडे पाहण्याची वृत्ती मूळ धरू लागली. तसेच आधुनिक कारखानदारीचा विकास, शेतजमिनीवरील बेसुमार ताण, पाश्चात्त्य देशांतील व्यक्तिवादी विचारसरणीचा प्रभाव इ. कारणामुळे कुटुंबसस्थेचे महत्त्व हळूहळू कमी झाले. तसेच कुटुंबाची व्याप्तीही मर्यादित झाली. पूर्वी सर्व नातेवाईकांचा कुटुंबात समावेश असे पण नंतर आईबाप व मुले, फार तर आजा-आजी अशा सदस्यांची सुटसुटीत कुटुंबे दिसू लागली. कम्युनिस्ट क्रांतीनंतर कुटुंबसंस्थेचे महत्त्व पुष्कळच कमी झाले.
       चीनमध्ये जातिभेद नाही किंवा समाजाची श्रेष्ठकनिष्ठ गटांत परंपरेने वा कायद्याने विभागणी झालेली नाही मात्र आर्थिक स्थितीमुळे असे वर्ग पडतच. व्यवसायपरत्वे माणसांचे दोन गट पडले: बौद्धिक काम करणाऱ्या लोकांचा उच्च श्रेणीचा गट व शारीरिक काम करणाऱ्यांचा दुसरा. यांपैकी उच्च श्रेणीच्या गटात विद्वानांना प्रथम मान दिला जाई. समाज विद्वानांच्या मार्दर्शनाखाली असला म्हणजेच सुसंस्कृत होतो, असे चिनी लोक मानीत. त्यामुळे सम्राट, मातापिता यांच्या खालोखाल समाजात शिक्षकाला मान असे. शेतकरी, कारागीर हे शिक्षकांपेक्षा कमी दर्जाचे मानले जात. विद्वानांना सरकारी नोकरीत घेण्याची प्रथा असल्याने त्यांना साहजिकच विशेष महत्त्व दिले जाई. व्यापारी, नट, सामान्य मजूर, वेश्या इत्यादींना समाजात खालचे स्थान होते. चीनमध्ये गुलामगिरीही प्रचलित होती. घराघरांतून घरगुती कामासाठी स्त्रीगुलाम बाळगण्याची प्रथा होती. केवळ भिक्षावृत्तीवर राहणाऱ्यांचीही फार मोठी संख्या पूर्वी चीनमध्ये होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून या परिस्थितीत झपाट्याने बदल होऊ लागला. साम्यवादी राजवटीच्या पंचवीस वर्षांत चिनी समाजाचे पारंपरिक स्वरूप पार बदलून गेले आहे. सध्या चीनमध्ये वर्गकलहाला महत्त्व असल्यामुळे उच्च श्रेणीच्या गटाचे संपूर्ण उच्चाटन झाले आहे.
         स्त्रियांचे सामाजिक स्थान : -
       फार प्राचीन काळी चीनमध्ये मातृसत्ताक कुटुंबसंस्था प्रचलित होती परंतु हळूहळू समाजात पुरुषांचे महत्त्व वाढले आणि स्त्रियांचे कमी होत गेले. स्त्रियांना सन्मानाने वागवावे, असे सर्वसाधारण मत कन्फ्यूशसने मांडले होते. तरी शांत व सोशिक वृत्ती, आज्ञाधारकपणा, पाकशास्त्रातील नैपुण्य, सासुसासऱ्यांची सेवा इ. स्त्रीगुणांना प्राधान्य दिल्याने व स्त्रीने बालपणी पित्यावर, तरूणपणी पतीवर व पतिनिधनानंतर पुत्रावर अवलंबून असावे, हे कन्फ्यूशसचे विचार सर्वमान्य झाल्यावर स्त्रीच्या दास्यत्वाला नैतिक प्रतिष्ठा लाभली. बालविवाहाच्या प्रथेमुळेही स्त्रीस्वातंत्र्याचीच अधिक हानी झाली. आर्थिक परावलंबन, पुनर्विवाहाची (विशेषतः मध्यमवर्गात) व्यावहारिक अशक्यता इ. कारणांमुळे चिनी स्त्रिया पूर्णत: परतंत्र बनल्या. कायद्याने एकच पत्नी करण्याची पुरुषांना परवानगी असली, तरी उपस्त्रिया ठेवण्याच्या सर्वमान्य प्रघातामुळे स्त्रियांची स्थिती अनेक बाबतींत अनुकंपनीय झाली. पुत्रवती स्त्रीला समाजात मिळणारी प्रतिष्ठा व मातेला कुटुंबात मिळणारे मानाचे स्थान यांमुळे स्त्रीजीवन थोडेफार सुसह्य होई. एरव्ही त्यांची स्थिती सामान्यतः घरच्या अन्नावारी ठेवलेल्या गुलमांपेक्षा फारशी निराळी नव्हती. मात्र पातिव्रत्याबद्दल चिनी समाजात पराकाष्ठेचा आदरभाव होता. तसेच चारित्र्यवान विधवा स्त्रियांबद्दलही समाजाचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असे. स्त्री म्हणजे पुरुषाच्या हातातील बाहुली ही परिस्थिती मुख्यतः पांढरपेशा मध्यमवर्गात होती. परंतु शेतकरीवर्गावरही या मनोवृत्तीचा परिणाम झाल्यावाचून राहिला नाही.
    विसाव्या शतकाच्या प्रारंभी चीनमध्ये स्त्रीशिक्षणाला प्रारंभ झाला. काही स्त्रियांनी पाश्चिमात्य विद्येत प्रावीण्य मिळविले व राजकारण, समाजसेवा इ. क्षेत्रांत स्वुन यात-सन यांसारख्या स्त्रिया चमकू लागल्या. १९२७ पासून साम्यवादी चळवळीतही काही स्त्रिया प्रामुख्याने भाग घेऊ लागल्या. १९४९ च्या क्रांतीनंतर कायद्यानेच स्त्रीपुरुषांचा दर्जा समान ठरविण्यात आला असून सर्व व्यवसाय स्त्रियांना खुले झाले आहेत. त्यामुळे शिक्षण, राजकारण, उद्योगधंदे, अभियांत्रिकी, वैद्यक, नाट्यनृत्यादी कला इ. सर्वच क्षेत्रांत कर्तबगार स्त्रिया आढळू लागल्या आहेत. सध्या चीनच्या राष्ट्रीय लोकसभेमध्ये २२ टक्के स्त्री-सदस्य आहेत आणि मंत्रिमंडळात दोन स्त्रिया आहेत.
      स्वभाववैशिष्ट्ये :
       चिकाटी, तटस्थवृत्ती, खोडकरपणा, विनोदवृत्ती, परंपराप्रियता इ. चिनी स्वभावाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये प्रसिद्ध लेखक लिन यू-थांगने नमूद केली आहेत. चिनी लोक कष्टाळू, बुद्धिवान व कल्पक असून अंतःप्रेरणेनुसार वागण्याकडे त्यांचा कल असतो. कठोर तर्कवादापेक्षा ते व्यवहारी दृष्टिकोन पसंत करतात. आत्यंतिक बुद्धिवादी विचार चिनी माणसाला सहसा पटत नाहीत. परंपरेनुसार चीनमध्ये तडजोडीला महत्त्व असे पण आधुनिक चीनमध्ये त्याचे उच्चाटन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या मनातील विकार दाबून न ठेवता ते दुसऱ्यासमोर व्यक्त केले पाहिजेत, अशी कम्युनिस्ट राजवटीची शिकवणूक आहे.
       व्यक्तीची समाजातील वागणूक व सामाजिक रीतिरिवाज यांना चीनमध्ये विशेष महत्त्व दिले जात असे. या बाबतीतील परंपरा व नियम कन्फ्यूशसच्या ली जि  म्हणजे संस्कारपुस्तिकेत नमूद केलेले असून त्यांचे तंतोतंत पालन हे सुसंस्कृत व्यक्तीचे व्यवच्छेदक लक्षण मानले जात असे. शारीरिक दांडगाईचे वर्तन, मोठ्याने आरडाओरड करणे ही चिन्यांना असुसंस्कृतपणाची लक्षणे अजूनही वाटतात. तथापि साम्यवादी चीनमध्ये या सामाजिक शिष्टाचारांतही फरक होत चालला आहे.
       चिनी लोक पाकशास्त्रात विशेष कुशल मानले जातात. जगातील सर्व देशांत, किंबहुना सर्व प्रमुख शहरांत, चिनी उपाहारगृहे आहेत, यावरून त्याची साक्ष पटते. चीनमधील प्रत्येक प्रांताचा आहार वेगळा आहे. अनिश्चित धान्योत्पादन, वारंवार पडणारे दुष्काळ, आर्थिक हलाखी इ. कारणांमुळे अन्नाच्या बाबतीत चिनी लोक फारसा विधिनिषेध बाळगत नाहीत. ‘आम्ही आवडीने खेकडा व नाइलाजाने झाडाच्या साली खातो’, या लिन यू-थांगच्या उक्तीत चिन्यांची अन्नविषयक अभिरूची व अवस्था चांगल्या रीतीने सूचित झाली आहे. चीनमध्ये मांसाहार निषिद्ध नाही. सामान्य लोकांच्या आहारात किरकोळ भाज्या, विविध धान्ये व बटाटे, रताळी अशा भाज्यांचा अंतर्भाव असतो. सोयाबीनच्या दुधापासून केलेला एक प्रकारचा चक्का, बांबूचे कोवळे कोंब व भूछत्र किंवा कुत्र्याच्या छत्र्या यांना चिनी आहारात विशेष महत्त्व असून, त्यापासून विविध रुचकर पदार्थ तयार करण्यात येतात. जिनसंग वनस्पतींच्या मुळ्यांपासून तयार केलेले शक्तिवर्धक पदार्थही चीनमध्ये लोकप्रिय आहेत.
         मद्यादी पेयांना चीनमध्ये मज्जाव नाही तथापि चीनमध्ये दारुडे लोक आढळत नाहीत. तांदूळापासून केलेली दारू चीनमध्ये सर्वत्र प्रचारात असली, तरी दूध-साखरेशिवायचा कोरा चहा हे चीनचे राष्ट्रीय पेय होय. चहा केव्हाही प्यावा त्याचे दुष्परिणाम होत नाहीत, असे चिनी लोक मानतात. चहा पिण्याचे शास्त्र चीनमध्ये तयार झाले असून चहाच्या विविध जातींनुसार कपबशा, चहादाण्या वगैरे वापरण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष असतो. विशिष्ट प्रकारचे पाणी व त्याला योग्य अशी चहाची पाने यांची निवड चिनी लोक विशेष दक्षतेने करतात.
   धर्म : -
      प्राचीनतम काळातील चिनी लोकांच्या धार्मिक जीवनाची निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि ते जडप्राणवादी व पूर्वजपूजक असावेत. त्यांच्यात पुरोहितवर्गाचा उदय झाल्याचे दिसत नाही. कन्फ्यूशसच्या सामाजिक, धार्मिक, नैतिक व राजकीय विचारांचा चिनी समाजावर फार दूरगामी परिणाम झाला. कन्फ्यूशस आणि त्याचा अनुयायी मेन्शिअस यांच्या शिकवणीनुसार चिनी समाजाने आपली जीवनमूल्ये निश्चित केली. त्यांच्या विचारांचा विरोधक लाव ज याची अराजकतावादी मते व निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण यांचाही चिनी समाजावर एके काळी बराच पगडा होता. त्याचप्रमाणे हान फैज याच्या कायदेशीर हुकूमशाही विचारांचा प्रभावही चिनी समाजावर होता. ख्रिस्ती शकाच्या सुरुवातीस बौद्ध धर्माचा चीनमध्ये प्रवेश झाला व चिनी लोकांना खऱ्या अर्थाने धर्म मिळाला. त्यामुळे कन्फ्यूशस व ताओ या पंथातही पुष्कळ बदल झाले. मध्ययुगात इस्लाम धर्म व अर्वाचीन काळात ख्रिस्ती धर्म यांचाही चीनमध्ये प्रसार झाला. सध्या चीनमध्ये सु. १५ कोटी बौद्धधर्मी, ३ कोटी ताओपंथी, १ कोटी इस्लामधर्मी, ३० लक्ष रोमन कॅथलिक ख्रिस्ती व पन्नास हजारांवर प्रॉटेस्टंट खिश्चन लोक आहेत. १९४९ च्या साम्यवादी क्रांतीनंतर सर्व धर्मसंस्थांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. चीनमध्ये धर्मस्वातंत्र्य असले, तरी चिनी रोमन कॅथलिकांचा पोपशी काही संबध राहिलेला नाही. काही बौद्ध मंदिरे प्राचीन संस्कृतीची स्मारके म्हणून जतन करण्यात आली आहेत. सर्व धर्मसंस्था शासनाच्या कडक नियंत्रणाखाली आहेत. साम्यवादी क्रांतीनंतर चीनमध्ये मूलगामी स्वरूपाची सामाजिक स्थित्यंतरे झाली असून तेथील जीवनाचे संपूर्ण चित्रच बदलले आहे. त्यामुळे आजच्या चीनच्या समाजजीवनाची बारीक तपशीलवार माहिती देणे काहीसे कठीण असले, तरी स्थूलमानाने समाजजीवनाच्या अंगोपांगांची कल्पना देता येईल.
सण व समारंभ :
      चीन हा शेतकीप्रधान देश असल्यामुळे तेथील सण ग्रामीण जीवनाशी निगडित आहेत. चिनी पंचांग चांद्रमासावर आधारलेली आहे. सध्या जरी पाश्चिमात्य सौर पंचांगाप्रमाणे कालगणना होत असली, तरी चिनी सण अजूनही जुन्या पंचांगाप्रमाणे साजरे केले जातात.
        नववर्षदिन हा सर्वांत महत्त्वाचा चिनी सण असून तो २१ जानेवारी ते १९ फेब्रुवारीच्या दरम्यान येतो. गृहदेवता कुटुंबाच्या वर्षभरातील वर्तनाचा अहवाल स्वर्गात पेश करून वर्षअखेरीस परत येते, या कल्पनेमुळे तिच्या स्वागताची घरोघरी जंगी तयारी करण्यात येई. जुने कर्ज फेडल्याशिवाय कोणी नववर्षाचे स्वागत सहसा करीत नसे. साम्यवादी क्रांतीनंतरही नववर्षदिनाचे महत्त्व कमी झालेले नाही. फक्त त्यात धार्मिक अंश राहिलेला नाही. वर्षारंभापासून सु. चार दिवस भेटीगाठी, मेजवान्या इ. कार्यक्रमांच्या गर्दीत जातात व त्याचा शेवट दीपोत्सवाने होतो. ‘च्यींग मिंग’ हा वसंत ऋतूतील मुख्य सण पूर्वजपूजेचा निदर्शक म्हणून पूर्वी पाळण्यात येत असे. पूर्वजांची स्मारके स्वच्छ आणि सुशोभित करणे त्यांना नैवैद्य अर्पण करणे ह्या कार्यक्रमासमवेत मेजवान्या व वनविहार यांना त्या वेळी प्राधान्य असे. तथापि आता हा सण फक्त वसंतागमन म्हणून पाळला जातो. उत्तरायणाच्या शेवटी पाचव्या महिन्याच्या वद्य पंचमीला पावसासाठी प्रार्थना करण्याचा सण येत असे. ‘यिन’ व ‘यांग’ या सुष्ट व दुष्ट शक्तींना संतुष्ट करण्यासाठी तसेच सुबत्ता यावी, रोगराई होऊ नये म्हणून या वेळी घरे स्वच्छ केली जात असत. नौकाशर्यती हे या सणाचे खास आर्कषण असे. हा सण अजूनही हाँगकाँग, कोरिया, व्हिएटनाम येथील चिनी लोक पाळतात. सातव्या महिन्याच्या शुद्ध सप्तमीला अभिजित् आणि श्रवण यांच्या मीलनोत्सवाचा मुख्यतः स्त्रियांचा सण येतो. याच महिन्यात मृतांच्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवस पूर्वजपूजेचा म्हणून पाळण्यात येत असे. सध्या पूर्वजांच्या थडग्याबरोबर क्रांतिवीरांच्या समाधीवरही फुले वाहिली जातात. आठव्या महिन्याच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत सुगीचा उत्सव सर्वत्र साजरा होई. चंद्राचा वाढदिवस म्हणूनही हा साजरा होई. हा मुख्यतः बालकांचा सण समजण्यात येत असे. या उत्सवात चंद्राच्या आकाराची मिठाई खाण्याचा प्रघात होता. आठव्या महिन्याचा सत्ताविसावा दिवस कन्फ्यूशसचा वाढदिवस म्हणून साधारणतः सर्वत्र व मुख्यतः शाळांतून पूर्वी साजरा होई. नवव्या महिन्याच्या नवव्या दिवशी शिशिराच्या प्रारंभाचा सण येतो. थंडीवाऱ्यापासून संरक्षण म्हणून या दिवशी सर्व लोक सुरक्षित ठिकाणी वनभोजनास जात असत व करमणुकीत वेळ घालवीत असत. साम्यवादी सरकारने हा सण बंद केला आहे. दक्षिणायनाचे आगमन हा वर्षातील अखेरचा सण. पूर्वजपूजा आणि कौटुंबिक मेळावा हे ह्या सणाचे मुख्य उद्दिष्ट यांशिवाय कुटुंबातील व्यक्तीचे वाढदिवस, धार्मिक यात्रा, स्थानिक बाजाराचे दिवस हेही आनंदाने साजरे करण्याची सर्वत्र पद्धत होती.
        १९४९ साली साम्यवादी राजवटीने काही नवे सण सुरू केले. हे मात्र सौर पंचांगाप्रमाणे पाळले जातात. ते पुढीलप्रमाणे : (१) नवे वर्ष : हा सण जास्त करून शाळा, कारखाने, सरकारी कचेऱ्या यांत पाळला जातो. १ जानेवारीला चीनमधील दोन मुख्य वर्तमानपत्रे आणि एक मासिक गतवर्षाचा आढावा घेणारा आणि नवीन वर्षाचा अंदाज घेणारा महत्त्वाचा अग्रलेख प्रसिद्ध करतात. (२) स्त्रीदिन : हा आंतरराष्ट्रीय सण ८ मार्चला साजरा केला जातो. या दिवशी देशभर महिलामंडळाच्या सभा भरतात. (३) मेदिन किंवा कामगारदिन–१ मे : या दिवशी प्रचंड मिरवणुका निघतात. पूर्वी या दिवशी लष्करी संचलन होई परंतु सध्या ते बंद केलेले आहे. हा सण सध्या शहरांत निरनिराळ्या बागांमध्ये गाणी, नाच, नाटके इ. कार्यक्रमांनी साजरा केला जातो. (४) युवकदिन : हा सण ४ मे रोजी पाळला जातो. ४ मे १९१९ रोजी चिनी युवकांनी सुरू केलेल्या ‘४ मे चळवळी’ चा हा स्मारकदिन आहे. (५) बालदिन : हा १ जूनला पाळला जातो. सर्व शाळांमध्ये या दिवशी सभा भरतात. (६) सैनिकदिन : १ ऑगस्ट ही चिनी लाल सैन्य उभारण्याचा स्मारकदिन. याही दिवशी एक महत्त्वाचा अग्रलेख प्रसिद्ध होतो. (७) राष्ट्रदिन : १ ऑक्टोबर या दिवशी प्रत्येक प्रांताच्या मुख्य शहरात प्रचंड मिरवणुका निघत असत. तथापि १९७१ पासून शहरांतल्या बागांमध्ये चीनचे पुढारी नागरिकांबरोबर मिसळतात आणि नाच, गाणी इत्यादींमध्ये भाग घेतात. याही दिवशी पीकिंगमध्ये आतषबाजी केली जाते. आणि मुख्य वर्तमानपत्रांत सरकारी धोरणाबाबत महत्त्वाचा अग्रलेख प्रसिद्ध केला जातो.
      टोपी-संस्कार :
        पूर्वी चीनमध्ये मुलगा १४ वर्षांचा झाला, म्हणजे त्याला टोपी घालून तो वयात आला, असे जाहीर करण्याचा संस्कार होत असे. तथापि या शतकात त्याचे महत्त्व कमी होत जाऊन तो लुप्तप्राय झाला आहे.
     विवाहपद्धती :
       पारंपारिक चिनमध्ये बालविवाहाची प्रथा होती परंतु ती या शतकात हळूहळू बंद झाली. चिनी खेडी सर्वसाधारण एकाच आडनावाच्या कुटुबांची असल्यामुळे लग्ने एकाच खेड्यातील दोन कुटुंबांमध्ये होत नाहीत. पूर्वी लग्ने मध्यस्थामार्फत ठरविली जात असत परंतु आता नवीन सरकारने प्रेमविवाहांना उत्तेजन दिले आहे. तथापि खेड्यांमध्ये अजूनही मध्यस्थामार्फत लग्ने ठरविली जातात. सध्या लग्नाच्या वेळी मुलाचे वय साधारणपणे ३० आणि मुलीचे वय साधारणपणे २६ असावे, असे सरकारने ठरवून दिलेले आहे. यापूर्वी लग्न करण्याबाबत कायद्याची आडकाठी नाही, तरीसुद्धा सरकार व कम्युनिस्ट पक्ष त्याबाबतीत लक्ष देत असल्यामुळे हल्ली उशिरा लग्न करण्याचा प्रघात पडत आहे.
      पूर्वीच्या काळी शेतकरीवर्गात मुलाने वधूमूल्य देण्याची पद्धत होती पण ती आता कायद्याने बंद करण्यात आली आहे. पूर्वी लग्ने फारच खर्चाची असत. तथापि अधिक लग्नखर्च हा सर्व समाजाच्या हितास बाधक आहे, अशा सरकारी प्रचारामुळे लग्ने साध्या रीतीने करण्याचा प्रघात रूढ होत आहे.
       कम्युनिस्ट सरकारने १९५२ सालापासून घटस्फोटाचा कायदा सोपा केला आहे. तथापि घटस्फोट घेण्याला सरकार प्रोत्साहन देत नाही. पूर्वी मुलगा न झाल्यास पत्नीला काडीमोड देण्यास परवानगी होती ती आता नाही. सध्या मुलगा व मुलगी हे अगदी समान आहेत, ही शिकवण लहानपणापासून देण्यात येते. तथापि शेतकरी समाजामध्ये मुलाचे महत्त्व अजूनही टिकून आहे.
       अंत्यसंस्कार :
       चीनमध्ये सर्वसाधारणपणे मृताला पुरण्याची प्रथा आहे. मात्र साम्यवादी सरकारने शवाचे दहन करण्याची प्रथा सुरू केलेली आहे. पूर्वी अंत्यसंस्कारासाठी बराच खर्च होई. हा संस्कार आता साधा आणि अल्प खर्चाचा केलेला आहे.
    चीनच्या क्रांतिवीरींसाठी पीकिंग शहरांमध्ये खास ‘शहीद बाग’ बनविण्यात आलेली आहे.
 गुप्त संघटना : -
     चिनी समाजात पूर्वी गुप्त संघटनांचा फार सुळसुळाट होता. समाजात त्यांना मोठा मान असे व राजकारणावरही त्यांचा प्रभाव पडे. १९४० पूर्वी पन्नास टक्के चिनी पुरुष कोणत्या तरी गुप्त संघटनेचे सदस्य असत, असे म्हटले जाते. सर्वच संघटना गुप्त असलेल्याने त्यांचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही पण त्यांचे सभासद एकमेकांशी बंधुभावाने वागत, शिस्त कडक असे आणि संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा बिनतक्रार पाळल्या जात. ‘ग लाव् ह्‌वै’, ‘सान् ह ह्‌वै’ यांसारख्या महत्त्वाच्या गुप्त संघटनांनी कित्येकदा दंगे-धोपे घडवून आणल्याचे व बंडे केल्याचे दाखले आहेत. कोणत्या तरी संघटनेच्या पाठबळाशिवाय प्रशासनकार्यात किंवा इतर व्यवसायांतही सफलता मिळणे दुरापास्त असल्याने प्रत्येक व्यक्ती एखाद्या गुप्त संघटनेचे सदस्यत्व मिळवत असे. केवळ धार्मिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्याही अनेक गुप्त संघटना असत. मात्र या संघटनांचे कधी तरी राजवटीशी वितुष्ट येत असे त्यामुळे त्या मोडून काढण्याचे प्रत्येक राजवटीचे धोरण होते. हे धोरण १९४९ च्या क्रांतीनंतर फारच कडकपणे अमलात आणण्यात आले आणि त्यामुळे सध्या अशा संघटना अस्तित्वात नाहीत.
      शैक्षणिक स्थिती : -
       भारत, जपान, चीन या आशियाई देशांचा पाश्चिमात्य देशांशी संपर्क आल्यानंतरच त्या सर्वांनी आधुनिक शिक्षण-पद्धतीचा स्वीकार केला. भारताने १८३४ मध्ये, जपानने १८७२ मध्ये आणि चीनने अगदी उशिरा म्हणजे १९०१ मध्ये नवीन शिक्षणपद्धती सुरू केली. चीनने आपली शिक्षणपद्धती बदलली ती काहीशी अपरिहार्यच म्हणून. त्याचे मुख्य कारण म्हणजे हजार वर्षे चालत आलेली परंपरागत प्राचीन शिक्षणपद्धती होय. या पद्धतीचा त्याग करण्यास चिनी लोक साहजिकच तयार नव्हते.
     प्राचीन शिक्षणाचा एक आदर्श म्हणून चीनच्या शिक्षणपद्धतीचे वर्णन केले जाते. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा, जिल्ह्याच्या गावी माध्यमिक शाळा आणि प्रांताच्या मुख्य गावी उच्च शिक्षणसंस्था त्या वेळी चालू होत्या. धर्ममंदिराच्या किंवा श्रीमंत पांढरपेशा लोकांच्या आश्रयाने शाळा चालत असत. तत्त्वज्ञान, साहित्य, संगीत, वैद्यक, युद्धशास्त्र, चित्रकला, नीतिशास्त्र इ. विषय शिकविले जात. अध्ययनपद्धतीत पाठांतर आणि निबंधलेखन यांवर भर असे. सुसंघटित अशी परीक्षापद्धती होती. चार परीक्षा देऊन अखेर जे यशस्वी होत, त्यांना शासनात अधिकाराच्या जागा दिल्या जात. अधिकारी व्यक्ती विद्वान असलीच पाहिजे, अशी सर्वसाधारण धारणा होती. गरीब वा श्रीमंत शिक्षण घेऊन वरचा दर्जा मिळवू शके. विद्वानांना समाजात मान असे. चीनला या पद्धतीचा अभिमान होता. ही चिनीपद्धत इंग्लंडने स्वीकारून नागरी शासनातील उच्च परीक्षा सुरू केल्या.
    पाश्चिमात्य देशांबरोबर झालेल्या संघर्षांतून चीनला आधुनिक शिक्षणाची जाणीव झाली. आपल्या शिक्षणात बदल करायला हवा, असे त्यास १८४० नंतर वाटू लागले. काही सुधारणा झाल्या, पण चिनी विद्वानांच्या तीव्र विरोधामुळे शिक्षणपद्धतीची पुनर्घटना अशक्य होती. १९०३-०४ मध्ये पाश्चिमात्य देशांनी सक्ती केल्यामुळे काही फेरबदल झाले. १९०१–०५ च्या दरम्यान चिनी बादशाहाने जपानी-जर्मन पद्धतीची शिक्षणपद्धती सुरू केली. डॉ. सन्-यात-सेन यांनी राजसत्ता नाहीशी करून प्रजासत्ताक स्थापन केले व १९११ पासून स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकसत्ता इ. तत्त्वांवर आधारलेले शिक्षण सुरू झाले. प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर पुन्हा काही अंशी नवी शिक्षणपद्धती आली. पुन्हा १९२२ मध्ये चँग कै-शेकच्या राष्ट्रीय सरकारने दक्षिण चीनमध्ये नवी शिक्षणपद्धती सुरू केली. त्याला १९२८ मध्ये चँग कै-शेकच्या सरकारने राष्ट्रीय तत्वज्ञानाची वैचारिक जोड दिली. ही राष्ट्रीय शिक्षण पद्धती १९४९ पर्यंत अस्तित्वात होती. डॉ. सन-यत्-सेन या क्रांतिकारकाच्या विचारसरणीचा समावेश करून राष्ट्रीयत्व, लोकशाही आणि आर्थिक सत्ता अशा तीन ध्येयांवर अधिष्ठित असे शिक्षण एक पिढीभर चालू होते. चिनी शिक्षण अद्ययावत करण्याचा या काळात पुष्कळ प्रयत्न झाला. तथापि चीन-जपान युद्धामुळे हा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. मात्र १९४९ साली चीनमध्ये साम्यवादी राजवट आल्यानंतर एकूण शिक्षण पद्धतीत आमूलाग्र क्रांतिकारक बदल झाले.
         राष्ट्रीय पक्षाच्या सरकारने दृढमूल केलेल्या पद्धतीत सहा वर्षे प्राथमिक, सहा वर्षे माध्यमिक आणि चार वर्षे उच्च शिक्षण अशी रचना होती. प्राथमिक शिक्षणाला प्रारंभ सहाव्या वर्षी होई. सार्वत्रिक सक्तीचे प्राथमिक शिक्षण अंमलात आणण्याचे अनेक प्रयोग व प्रयत्न झाले परंतु दारिद्र्य, अशांतता व योजनांची अव्यवहार्यता यांमुळे ते यशस्वी झाले नाहीत. जेमतेम दोन तृतीयांश मुले शाळेशिवाय व एक तृतीयांश मुले शाळेत अशी स्थिती होती. माध्यमिक शिक्षणात तीन-तीन वर्षांचे दोन विभाग होते. विद्यार्थ्यांना तीन प्रकारचे अभ्यासक्रम दिले जात : बौद्धिक, औद्योगिक आणि शास्त्रीय. उच्च शिक्षणाकरिता महाविद्यालये आणि विद्यापीठे यांमध्ये चार वर्षानंतर पहिली पदवी मिळे. सर्व शिक्षणाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीयत्व, लोकशाही व आर्थिक क्षमता या त्रिसूत्री विचारप्रणालींचा समावेश असे. नवीन अध्यापनपद्धतींचा काही शाळांत उपयोग होत असला, तरी एकंदर भर जुन्या पद्धतींवर होता. परीक्षांना फार महत्व होते. शारीरिक शिक्षण, लष्करी शिक्षण, हस्तव्यवसाय व संगीतकला या विषयांकडे विशेष लक्ष दिले जाई. सारांश, एकंदर शिक्षणपद्धती प्रगतिपथावर होती. प्रौढांच्या शिक्षणाची मोहीम अनेक प्रांतात प्रचलित होती. डॉ. जेम्स येन यांच्या प्रयत्नाने व प्रेरणेने या क्षेत्रात चीनने खूपच प्रगती करून साक्षरतेचे प्रमाण शेकडा चाळीसपर्यंत वाढविले होते.
        दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर चीनमध्ये माओ-त्से-तुंगचा साम्यवादी पक्ष आणि चँग कै-शेकचा राष्ट्रीय पक्ष यांच्यात यादवी युद्ध होऊन साम्यवादी क्रांतिकारक पक्ष १९४९ साली अधिकारारूढ झाला. चँग कै-शेकने फॉर्मोसा किंवा तैवान या बेटात आपले सरकार स्थापन केले. चीनचे दोन भाग झाले. तैवानमधील शिक्षणपद्धती पुष्कळशी पूर्वीच्या राष्ट्रीय शिक्षणपद्धतीवर आधारलेली होती. चीनमध्ये साम्यवादी पद्धतीच्या शिक्षणाचा विकास होत आहे.
       नवीन राज्यपद्धती आल्याबरोबर तिने साम्यवादी समाजरचना शीघ्र काळात आणण्याच्या दृष्टीने शिक्षणात आमूलाग्र बदल केले व योजना आखल्या. या शिक्षणपद्धतीने वैचारिक आणि ध्येयात्मक दृष्टींनी महत्त्वाचे बदल केले. राजकीय शिक्षणाकरिता साम्यवादी विचारसरणीचा आबाल-वृद्धांत प्रचार, आर्थिक दृष्टीने शीघ्र औद्योगिक उत्पादन आणि कष्टाची सवय, सामाजिक क्रांतीकरिता भांडवलशाही समाज नष्ट करून कामगार-शेतकऱ्यांचा एकवर्गी समाज निर्माण करणे आणि लष्करी दृष्ट्या अधिकाधिक जनतेला हे शिक्षण देऊन क्रांतीचा विस्तार करण्यास कार्यक्षम बनविणे, भांडवलशाही, साम्राज्यवादी व वसाहतवादी देश, असे समाज व व्यक्ती यांच्याविषयी कडवट द्वेषाचे बीजारोपण करणे, अशा प्रकारची ध्येये आणि उद्दिष्टे नवीन शिक्षणाचा आधार बनली. नवीन शिक्षणपद्धतीला राष्ट्रीय, विज्ञाननिष्ठ आणि लोकाभिमुख असे त्रिविध स्वरूप देण्याचे नेत्यांनी ठरविले. मुख्य म्हणजे शिक्षण हे केवळ ज्ञानासाठी नसून समाजाच्या सेवेसाठी आहे, या तत्त्वावर सर्व शिक्षणपद्धती रचण्यात आली. सध्याचा चीन म्हणजे त्या दृष्टीने एक विद्यालयच असून सर्व जनता निरनिराळ्या पद्धतींनी अभ्यास करते.
        साम्यवादी शिक्षणपद्धती निर्माण करायची म्हणजे भांडवलशाहीच्या आणि व्यक्तिनिष्ठ तत्त्वज्ञानाच्या जुन्या पद्धती नामशेष केल्या पाहिजेत, या दृष्टीने सरकार वाटचाल करीत आहे. शिक्षणसुधारणेचे काम केवळ शिक्षणतज्ञांचे नसून साम्यवादी पक्षातील नेत्यांचेही आहे अभ्यासात आणि संशोधनात वैयक्तिक कामापेक्षा सामूहिक कामावर भर दिला पाहिजे शिक्षणसंस्थांनी स्थानिक साहित्यसामग्री व उपलब्ध मनुष्यबळ यांचा उपयोग करून स्वावलंबी बनले पाहिजे आणि खर्च कमी केला पाहिजे औद्योगिक उत्पादन आणि समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने त्वरीत उपयुक्त अशा गोष्टींवर भर दिला पाहिजे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक या सर्वांना बौद्धिक कामाबरोबरच कष्टाच्या कामाची सवय लावली पाहिजे आणि शिक्षणाचा दर्जा किंवा पातळी यांचे फार स्तोम माजविता कामा नये, अशा क्रांतिकारक विचारसरणीने शिक्षणाच्या पुनर्घटनेची कामे चालू झाली. शिक्षणपुनर्रचनेचा आणखी एक हेतू म्हणजे बुद्धीजीवी वर्ग आणि श्रमिक वर्ग यांच्यामधील भेद नष्ट करणे.
     प्रशासनाच्या दृष्टीने मध्यवर्ती, प्रांतिक आणि स्थानिक पातळ्यांवर वैचारिक मार्गदर्शनाचे काम साम्यवादी पक्षाकडे आले. शिक्षणाची रचना पूर्वीचीच राहिली पण तिच्यात शीघ्र परिणामाच्या दृष्टीने फेरबदल केले गेले. बारा वर्षांचा शालेय अभ्यासक्रम, अकरा वर्षांचा केला आणि तोही दहा किंवा नऊ वर्षांचा करावा की काय, याचा विचार सध्या चालू आहे. प्राथमिक शिक्षण सहा वर्षांऐवजी पाच वर्षांचे करण्यात आले असून ते सक्तीचे आहे. त्यात चिनी भाषा, गणित, भूगोल व इतिहास हे विषय शिकविण्यात येतात. १० वर्षांच्या पुढे एक परकीय भाषा शिकविण्यात येते व शक्य तो तीही इंग्रजी शिकविण्यात येते तर माध्यमिक शिक्षण सहा वर्षे, अशी रचना आहे. उच्च शिक्षण फारच कमी प्रमाणात दिले जाते. उच्च शिक्षण चार वर्षांचे आहे. या संस्थांच्या जोडीला नवीन संस्था निर्माण केल्या आहेत. त्यांचा उद्देश शेतकरी-कामगार वर्ग आणि पक्षाचे सभासद यांना प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक आणि उच्च शिक्षण अगदी थोड्या काळात देऊन क्रांतीला लागणारे नवे नेतृत्व झटपट निर्माण करणे हा आहे. सहा वर्षांखालील मुलांसाठी बालोद्यान सक्तीचे आहे. जुने शिक्षक, प्राध्यापक व संशोधक हे जुन्या बुरसटलेल्या विचारसरणीचे आहेत त्यांची जागा शक्य तितक्या लवकर नवीन पुढाऱ्यांनी घेतली, तरच क्रांतीचे खरे कार्य होईल असे साम्यवादी पक्षाला वाटते. जुन्या बुद्धिजीवी वर्गाविषयी तो साशंक आहे. या नवीन शिक्षणसंस्था म्हणजे (१) अर्धकाल किंवा अंशकाल शाळा, (२) सवडीच्या वेळात सकाळी किंवा संध्याकाळी भरणाऱ्या शाळा, (३) विशिष्ट विषयांचे लघु-अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था आणि (४) लोक विद्यापीठे या होत. प्रगतिशील देशांच्या दृष्टीने वरील संस्थांची कल्पना चांगली आहे. त्यांची संख्या भराभर वाढत आहे आणि त्यांतून अनेक सामान्य लोक शिक्षण घेऊन कामाला लागत आहेत. परंतु राजकीय प्रचार, शिक्षकांचा अभाव, साहित्यसामग्रीचा अभाव आणि चळवळीच्या कामाचा ताण यांमुळे या संस्थातून व्हावे तसे चांगले शिक्षण दिले जात नाही. कालांतराने सुधारणा व्हावी, हे स्वाभाविकच आहे पण विद्यापीठे आणि महाविद्यालये ही सांस्कृतिक क्रांतीच्या काळात (१९६७–६९) बंदच होती. १९७२ सालापासून काही विद्यापीठे सुरू करण्यात आली आहेत. उच्च शिक्षणपद्धती कशी असावी, याविषयी अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. साम्यवादी तत्वज्ञान, श्रमाची कामे, चळवळीची आणि प्रचाराची कामे इ. गोष्टींकडे लक्ष केंद्रित झाल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते हे खरे परंतु या नवीन पद्धतीमुळे शिक्षणाचा प्रचंड प्रसार व समानतेच्या कल्पनांचा विकास होतो, हेही तितकेच खरे आहे. सध्या उच्च शिक्षण फारच थोड्या प्रमाणात सुरू असल्यामुळे भावी पिढीला शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधक कोठून कसे मिळतील हा प्रश्नच आहे. सध्या कार्य करीत असलेले ज्येष्ठ संशोधक जुन्या जमान्यातील व यूरोप-अमेरिकेत शिकलेले आहेत. काही रशियात शिकलेले आहेत. सध्या फारच थोडे चिनी विद्यार्थी परदेशांत शिकत आहेत. शिक्षणाचा अर्धा खर्च केंद्र सरकार व उरलेला अर्धा खर्च स्थानिक सरकार वा कम्यून याच्यातर्फे करण्यात येतो. १३ वर्षांवरील सर्व मुलांनी कामाला प्रारंभ केलाच पाहिजे, असा दंडक असून ‘मिळवा आणि शिका’ या तत्वानुसार शिक्षण दिले जाते.
        चिनी शिक्षणपद्धतीमध्ये क्रांती जरी १९४९ पासून सुरू झाली, तरी शिक्षकवर्ग हा जुन्या जमान्यातील असल्यामुळे शाळांमध्ये मध्यमवर्गाच्या मुलांना सहज प्रवेश मिळे. त्यांना सर्व प्रकारच्या सवलती मिळत आणि इतर मुलांची हळसांड होई, या तऱ्हेचे दोष त्यांत निर्माण झाले. त्यामुळे बुद्धिजीवी आणि श्रमजीवी या दोन वर्गांमध्ये जी तफावत होती, ती लवकर कमी होण्याची लक्षणे दिसेनात. या दोषांचे निर्मूलन करण्यासाठी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात प्रथम सर्व शाळा बंद करण्यात आल्या. जुनी क्रमिक पुस्तके रद्द करून नवीन लिहिण्यात आली आणि शाळा पुन्हा उघडल्यावर प्रवेश मुख्यतः शेतकरी-कामकरी वर्गांच्या मुलांना देण्यात आला. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सध्या छोटे उद्योगधंदे चालविलेच पाहिजेत असा दंडक आहे. विद्यापीठात प्रवेश फक्त खेड्यापाड्यांतून लोकांनी निवड केलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळतो. ही निवड त्या व्यक्तीची राजकीय दृष्टी, सामाजिक कामाबद्दल कळकळ यांवर मुख्यतः अवलंबून असते. बुद्धीचा मुद्दा गौण मानला जातो. पदवी मिळाल्यावर पुन्हा खेडेगावी परत गेले पाहिजे, असा दंडक आहे. ही नवीन चिनी शिक्षणापद्धती इतकी जगावेगळी आहे की, ती कितपत यशस्वी होईल याचे भाकित करणे केवळ अशक्य आहे.
      चीनमध्ये सु. २४ तांत्रिक विद्यापीठे, २८ विद्यापीठे, ४२ राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथालये, ५० विविध प्रकारची वस्तुसंग्रहालये व वैद्यकीय, कृषी, वनविद्या वगैरे विषयांचे उच्च शिक्षण देणाऱ्या सु. १७८ संस्था आहेत (१९७१). या सर्व संस्थांच्या असंख्य शाखा व उपशाखा निरनिराळ्या जागी व निरनिराळ्या विषयांसाठी आहेत. केवळ तांत्रिक शिक्षणावर शैक्षणिक अर्थसंकल्पाच्या ३३% खर्च केला जातो. संध्याकाळचे रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांद्वारे दिलेले शिक्षण फारच लोकप्रिय आहे.
      चीनमध्ये महत्त्वाची व मोठ्या खपाची अशी सहा वृत्तपत्रे, पाच नियतकालिके आणि दोन वृत्तसंस्था असून परदेशांत त्याच्या फारच थोड्या प्रती पाठविल्या जातात. वृत्तपत्रे : (१) क्वांगमिंग रिबाओ (क्वांगमिंग डेली), पीकिंग. (२) लिबरेशन आर्मी डेली,  पीकिंग. पीपल्स लिबरेशन आर्मीचे मुखपत्र. (३) लिबरेशन डेली, शांघाय. (४) पीकिंग डेली, पीकिंग. (५) पीपल्स डेली (रेनमिन रिबाओ). चिनी कम्युनिस्ट पक्षाचे दैनिक मुखपत्र. कर्मचारी वर्ग संख्या दोनशे. त्यापैकी विदेश घटनातज्ञ ७० आहेत. खप ३४ लक्ष प्रती. नियतकालिके : (१)चायना पिक्टोरियल  हे पीकिंगहून प्रसिद्ध होणारे मासिक असून ते इंग्रजी धरून १६ भाषांत प्रकाशित होते. (२)चायना रिकन्स्ट्रक्टस  हे मासिक पीकिंगहून ‘चायना वेल्‌फेअर इन्स्टिट्यूट’ प्रसिद्ध करीत असून त्यामध्ये आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक घटनांची सचित्र माहिती दिली जाते ते पाच भाषांत प्रकाशित होते. (३)चायनीज लिटरेचर  या पीकिंगहून प्रकाशित होणाऱ्या मासिकात अभिजात व समकालीन चिनी वाङ्‌मयाचे इंग्रजी भाषेत अनुवाद केलेले असतात. (४) पीकिंग रिव्ह्यू  हे साप्ताहिक पीकिंगहून प्रसिद्ध होते. (५) रेड फ्लॅग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे मासिक मुखपत्र आहे.
        ‘न्यू चायना न्यूज एजन्सी’ व ‘चायना न्यूज सर्व्हिस’ अशा दोन वृत्तसंस्था चीनमध्ये असून देशातील मोठ्या शहरांतून व काही परदेशांच्या राजधान्यांमधून न्यू चायना न्यूज एजन्सीची कार्यालये आहेत. दुसरी वृत्तसंस्था ही पहिल्या वृत्तसंस्थेची दुय्यम संस्था असून चिनी विदेशी वृत्तपत्रे आणि मासिके यांना ती मार्गदर्शन करते. बल्गेरिया, फ्रान्स, चेकोस्लोव्हाकिया या देशांच्या वृत्तसंस्थांची तसेच रॉयटर्स व टास या वृत्तसंस्थांचीही कार्यालये चीनमध्ये आहेत.

     कला व क्रीडा :

          संक्षिप्त कलेतिहास : -
        इ. स. पू. ४००० ते २००० पर्यंतच्या कालखंडातील प्राचीन चिनी कलेत तीन सांस्कृतिक टप्पे दिसून येतात. त्यांपैकी यांग शाव संस्कृतीची काळसर आणि लाल रंगाची कलाकुसर केलेली मातीची भांडी प्रसिद्ध आहेत. यानंतरच्या लुंग शान या संस्कृतीमधील साधीच पण विविध आकारांची काळ्या मातीची भांडी उल्लेखनीय आहेत. या काळात भांड्यांवरील कलाकुसरीपेक्षा त्यांच्या आकाराला जास्त महत्त्व असल्याचे दिसते. हेच आकार व घाट त्यानंतरच्या शांग राजवटीमध्ये ब्राँझची भांडी घडविण्यासाठी वापरण्यात आले. अलीकडच्या उत्खननांत अशी भांडी बरीच सापडली आहेत. इतक्या सुंदर घाटाची भांडी शांग नंतरच्या काळात आढळून येत नाहीत. ही भांडी रोजच्या व्यवहारातील उपयोगाची नसून खास धार्मिक विधींसाठी बनविलेली असल्यामुळे त्यांच्या कलात्मक आकाराकडे जास्त लक्ष पुरविलेले दिसते. शांग काळात ब्राँझची शस्त्रास्त्रेही बनविली जाऊ लागली. त्यांवरही कलाकुसर आढळून येते. शस्त्रांच्या मुठी हरितमण्यासारख्या मौल्यवान रत्नांच्या बनविलेल्या असत. अशा रत्नांचे दागिने तसेच संगमरवराच्या मूर्ती इत्यादींची या काळात निर्मितीही होऊ लागली.
      जौ राजवटीत शांगची कलापरंपरा टिकून होती परंतु तिचा विकास मात्र झाला नाही. उलट भांडी थोडी बोजडच झाली आणि जौ घराण्याच्या ऱ्हासकाळात ब्राँझच्या भांड्यांचे व इतर कलावस्तूंचे उत्पादनही कमी होऊ लागले. त्यावेळी मांडलिकांमध्ये चढाओढ निर्माण झाल्यामुळे कलानिर्मिती जास्त भडक झाली. पाने, फुले, पशू, ड्रॅगन इत्यादींची चित्रे आता भांड्यांवर व इतर सजावटीवर दिसू लागली, तसेच दागिने आणि निरनिराळ्या प्रकारच्या मंजूषाही बनविण्यात येऊ लागल्या. याच काळात ब्राँझचे घासून चकचकीत केलेले आरसेही बनविण्यास सुरुवात झाली.
       यानंतरच्या हान राजवटीची कला विशेषतः तत्कालीन थडग्यांच्या अवशेषांत आढळून येते. श्रीमंतांच्या थडग्यांचे दगड कोरलेले असत व विटांच्या भिंतीवर चित्रे काढलेली असत. शवपेटीच्या आसपास प्राण्यांच्या आकृती, दागिने आणि इतर कलाकृती ठेवण्याची पद्धत होती. चिनी चित्रकलेचा उगम याच काळात झाला. तीत राजेलोकांच्या शिकारीचा खेळ, शेतकऱ्यांचे दैनंदिन आयुष्य यांची दृश्ये रंगविलेली आढळतात.
      हान राजवट कोलमडून पडल्यानंतर हान राजघराण्यातील लोकांनी दक्षिणेकडे पळ काढला व बरोबर नेलेल्या संपत्तीच्या जोरावर विलासी आयुष्य घालविले. याचा एक परिणाम म्हणजे कलाकृती केवळ कलेसाठी निर्माण होऊ लागल्या. चित्रकला, सुलेखन, काव्य इत्यादींना जोराची चालना मिळाली. गू रवाय-जृ (३४४–४०६), स्ये ह हे या वेळचे प्रसिद्ध चित्रकार.
      चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव तिसऱ्या शतकापासून जाणवू लागला. परिणामतः कलात्मक लेणी कोरण्याची कलाही चीनमध्ये आली. अशी लेणी दळणवळणाच्या मार्गांवर सर्वत्र विखुरलेली आढळून येतात. त्यांत जातक कथा, बुद्धाच्या आयुष्यातील इतर ठळक प्रसंग आणि त्यांचे पुतळे प्रामुख्याने आढळतात. पश्चिमेकडील देशांबरोबरच्या दळणवळणामुळे मध्य आशियातून मातीच्या भांड्यांवर झिलई देण्याची कला चिनी कारागीर शिकले व त्यातून चिनी मातीची भांडी हा एक नवा कलाप्रकार निर्माण झाला.
       थांग राजवट (६१८–९०६) चिनी कलेच्या विकासाचा सर्वोच्च बिंदू. साम्राज्याचा विस्तार, परदेशाशी दळणवळण, बौद्ध धर्माचा प्रसार आणि सुबत्ता या सर्व गोष्टी एकत्रित आल्यामुळे या काळात कलानिर्मितीला उधाण आले. मात्र ८४५ साली बौद्ध धर्माविरूद्ध प्रचंड मोहीम काढण्यात आल्यामुळे दुन ह्‌वांग ही एक गुंफा सोडल्यास बाकीच्या सर्व, भित्तिचित्रांनी सजविलेल्या, गुंफा नष्ट करण्यात आल्या. थांग काळी कलेला राजाश्रय मिळाला. विशेषतः स्युआन जुंग (७१३–७५५) या सम्राटाने आपल्या दरबारी चित्रकार, संगीतकार, कवी आणि विद्वान लोकांना आश्रय दिला. वांग व, वू दाव-जृ, जांग स्यू, ली जाव-दाव हे या काळचे प्रसिद्ध चित्रकार होत. या काळातील चित्रात घोड्यांच्या चित्रांना महत्त्व होते.
      चित्रकलेव्यतिरिक्त आरसे, निरनिराळ्या आकारांची चिनी मातीची भांडी, चांदीचे दागिने व भांडी, रेशमावरील भरतकाम, तऱ्हेतऱ्हेची सुबक खेळणी यांसाठी थांग राजवट प्रसिद्ध आहे. चिनी नक्षीकामावर परदेशी नक्षींचा ठसा आढळून येतो.
     थांगनंतरच्या काळात चीनवर रानटी टोळ्यांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या आणि त्यापैकी काही टोळ्यांनी आपली राज्ये स्थापन केली. त्यामुळे कलावंतांना मिळणारा राजाश्रय कमी झाला परंतु कला मात्र तग धरून राहिलीच. दुंग युआन व ली छंग हे या काळातील प्रसिद्ध चित्रकार. त्यांनी निसर्गचित्र हा चित्रप्रकार नव्याने निर्माण केला.
         यानंतरची सुंग राजवट (९६०–१२७९) रानटी टोळ्यांच्या वेढ्यांतच पार पडली व चीनचे परदेशांशी दळणवळण तुटले. त्यामुळे सुंग काळातील कला अंतर्मुख बनली. कलाकारांनी तोपर्यंत झालेल्या कलाविकासाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. कलेला राजाश्रय मात्र थांग काळाइतकाच, किंबहुना थोडा जास्तच, मिळाला. सुंग काळात चित्रकला व चिनी मातीची भांडी या कलाप्रकारांना अधिक महत्त्व आले. या काळचा सम्राट ह्‌वै जुंग (१०८२–११३५) हा स्वतःच एक प्रतिभावंत कलाकार होता. ली थांग, मू फू, मा युआन, स्या ग्वै, ल्यांग खाय, मू च्यी हे या काळचे प्रसिद्ध चित्रकार. चिनी मातीची भांडी ही मात्र वस्तुनिष्ठ कारागिरी म्हणावी लागेल. ही भांडी निरनिराळ्या भट्ट्यांत तयार केली जात. तांत्रिक दृष्ट्या या भांड्यांची बरोबरी करणारी भांडी पुन्हा निर्माण झाली नाहीत. पातळ पोत, नाजुकपणा आणि सुबकता ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये. भांड्यांचे आकार मुख्यत्वे फळांच्या आकारांचे असत व त्यांवर फुले, पक्षी, मासे हे भांड्यांच्याच रंगच्छटेत चित्रित केलेले असत. दिंग जव, रू जव, लूंग च्युआन, ज्यांग नींग या ठिकाणच्या भट्ट्या सर्वांत प्रसिद्ध मानल्या जातात. प्रत्येक भट्टीचे कलात्मक वेगळेपण तिच्या भांड्यांतून दिसून येई. सुंग काळातील कलाकृती जरी प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्या, तरी त्यांत नावीन्य असे आढळत नाही. सुंगनंतर चीनवर मंगोल वंशाचे राज्य आले. मात्र या परदेशी अंमलाखालीसुद्धा कलेचा विकास होत राहिला. जाव मंग-फू, च्यन स्युआन, नी जान, ह्‌वांग जुंग-वांग, वांग मंग, वू जन, हे या काळातील प्रसिद्ध चित्रकार. मंगोल राजवटीने चिनी मातीच्या भांड्यांच्या भट्ट्यांना राजाश्रय चालू ठेवला व त्यांचे उत्पादन वाढवले. चिनी भांडी परदेशी निर्यात केली जात. कोबाल्ट वापरून भांड्यांवर निळा रंग चढविण्याचे तंत्र याच काळात चिनी कारागीर शिकले.
         यानंतरची मिंग राजवट (१३६८–१६४४) चिनी होती. तिने पुन्हा थांग काळच्या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. पीकिंग ही राजधानी मंगोल राजवंशाने वसविली परंतु युंग ल (१४०३–२५) या प्रसिद्ध मिंग सम्राटाने तिचे चिनीकरण केले. त्याने नवीन राजवाडे, बागा मोठ्या प्रमाणावर बांधल्या. मिंग काळात चित्रकलेला राजाश्रय असला, तरी खासगी रीत्याही चित्रकलेचा विकास झाला. सू जव या शहरात षन जव या कलाकाराने एक नवीन संप्रदाय सुरू केला. वन जंग-मिंग हा त्याचा एक प्रसिद्ध शिष्य. दाय जिन या कलाकाराने मानवी जीवन चित्रित करण्यावर भर दिला. लाकडी शिल्पावर शेंदूरमिश्रित लाखेचे लेप लावून नक्षीकाम करण्याची कला सुंग काळात उदयास आली होती परंतु मिंग काळात तिचा खरा विकास झाला. ही लाखेची कलाकुसर पुढे खुर्च्या, टेबले, कपाटे यांवरही करण्यात येऊ लागली. मिंग काळात चिनी मातीची भांडी निरनिराळ्या रंगातही बनविण्यात येऊ लागली. मात्र या रंगीबेरंगी भांड्यांना साध्या पांढऱ्या-निळसर रंगाच्या भांड्यांइतके महत्त्व मिळाले नाही. त्यामुळे साधेपणा हे चिनी कलेचे वैशिष्ट्य टिकून राहिले.
      च्यिंग ही चीनमधील शेवटची राजवट. तीसुद्धा परदेशी वंशाची. असे असून सुद्धा चिनी कलेला मिळणारा राजाश्रय कमी झाला नाही. या मांचू राजवंशाने पीकिंग शहरात राजवाडे, देवळे, कमानी, बागा यांची प्रचंड प्रमाणावर उभारणी केली. या काळच्या राजवाड्यांवर व इतर वास्तूंवर विविधरंगी नक्षीकाम केलेले आहे. वांग ह्‌वै, वांग युआन-च्यी, हूंग रन, शृ थाव, बा दा षान-रन हे या काळचे प्रसिद्ध कलाकार. यांनी मुख्यतः निसर्गचित्रे रंगविली. याच काळात लाखेच्या कलाकृतीवर सोन्याचांदीचा वर्ख जडविण्याची कला उदयास आली. या वेळची चिनी मातीची भांडी तांत्रिक दृष्ट्या जरी सरस असली, तरी कलात्मक दृष्टीने त्यांना खास महत्त्व नाही. याची मुख्य कारणे दोन : एक म्हणजे, या काळात सर्व भट्ट्यांचे केंद्रीकरण करण्यात आले. दुसरे कारण म्हणजे, चिनी मातीच्या भांड्यांची पाश्चिमात्य देशांकडे प्रचंड प्रमाणात निर्यात होऊ लागली. त्यामुळे घाऊक उत्पादनावर जास्त भर देण्यात आला. च्यिंग राजवटीच्या अखेरीस पाश्चिमात्य देशांनी चीनवर चढाई सुरू केली. परिणामतः चिनी कलाक्षेत्रात नवीन विचारधारा निर्माण झाल्या. तथापि पारंपारिक कलेचा पुरस्कार करणारे कलावंतही या सुमारास पुढे आले. जाव ज्यी च्यन, स्यू गू, नी मो-गंग, याव मंग-फू, वू जिन-नूंग, रन बो-न्यन व ह्‌वांग बिन-हूंग हे त्यांपैकी काही प्रमुख कलावंत होत. १९११ सालच्या क्रांतीनंतर कित्येक चिनी कलाकार शिक्षणासाठी परदेशात गेले. त्यांनी पारंपारिक कला व पाश्चिमात्य कला यांच्यात समन्वय घडवून आणला. गाव ज्यन-फू, जनशृं-जंग, स्यू बै-हूंग हे या पंथातील कलावंत होत. च्यी वाय शृ याने एक तिसराच पंथ स्थापन केला. त्याची चित्रकला तांत्रिक दृष्ट्या पारंपारिक आहे मात्र चित्राचे विषय नवे आहेत. पारंपारिक चिनी चित्रकलेमध्ये निसर्गचित्र प्रामुख्याने आढळून येते. पण च्यी याच्या चित्रात मासे, बेडूक, झिंगे, एखादेच फूल हीच प्रामुख्याने आढळतात. लाखेची व चिनी मातीची भांडी यांचे उत्पादन चीनमध्ये अव्याहत सुरू राहिलेच परंतु व्यापार हा उत्पादनाचा मुख्य उद्देश बनल्यामुळे त्यातील कलाविकासाकडे दुर्लक्ष झाले.
      साम्यवादी क्रांतीनंतर कलेला पुन्हा राजाश्रय प्राप्त झाला आहे. तथापि कलावंतांना पूर्वीचे स्वातंत्र्य उरलेले नाही. कला ही जनतेच्या सेवेसाठी असली पाहिजे, श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी नाही, या अध्यक्ष माओ-त्से-तुंग यांच्या तत्त्वानुसार कलेचा विकास सुरू आहे. साम्यवादी राजवटीत पारंपारिक तंत्र कायम आहे फक्त चित्रांचे विषय बदलले आहेत. सध्या शेतकरी-कामकरी जीवन, औद्योगिक क्रांती हे महत्त्वाचे कलाविषय मानले जातात.

   वास्तुकला :

        चीनमध्ये कुठलीही इमारत तिच्या आसपासच्या निसर्गाचा एक अविभाज्य भाग मानली जाते. याशिवाय पूर्वी वास्तूच्या जमिनीचे शुभाशुभकारक गुणदोषही विचारात घेतले जात. सर्वसाधारणपणे इमारती दक्षिणोत्तर बांधल्या जात. त्याचप्रमाणे एकच प्रचंड इमारत न बांधता, अनेक छोट्या इमारतींचा समूह दक्षिणोत्तर दिशेने एकामागे एक बांधण्याचा प्रघात असे. प्रत्येक दोन इमारतींमध्ये एक चौक असे व या चौकाच्या पूर्व-पश्चिम बाजूंना दुय्यम दर्जाच्या इमारती असत.
       चीनमधील  सर्व इमारती अत्यंत साध्या रचनेच्या असत. तळाशी दगडांची किंवा विटांची फरशी, त्यावर खांबासाठी दगडी चबुतरे, त्यावर लाकडी खांब आणि त्यावर लाकडी छप्पर अशी सर्वसाधारण रचना असे. प्रत्येक खांबावर एकमेकांना जोडणाऱ्या तुळया असून त्यांवरच्या उतरत्या छपरावर निरनिराळ्या रंगांची चकचकीत कौले घालण्यात येत. घराचे सर्व वजन खांबांवर असल्यामुळे भिंती अरुंद असत. चिनी वास्तूंची सजावट म्हणजे खांब आणि छप्पर यांची सजावट. दोन इमारतींतील फरक खांबांची उंची आणि लहानमोठे छप्पर या बाबतींतच असे. फार पूर्वी इमारतींची छपरे खांबांच्या टोकापेक्षा बरीच खाली येत असत परंतु नंतर हळूहळू ती आखूड होऊ लागली आणि दर्शनी तुळया जास्त जास्त नक्षीदार होऊ लागल्या, तसेच छपरावरची कौले जास्त जास्त सुबक होऊ लागली. कौले उलटसुलट बसवून मध्ये नक्षीची कौले घालण्यात येत.
       चिनी शहरे पहिल्यापासूनच तटाच्या आतल्या बाजूला बांधण्याची प्रथा होती. इमारतींप्रमाणेच शहरांची रचनाही दक्षिणोत्तर असे. चिनी शहरे आपोआप वसलेली वा वाढलेली नसून ती मुद्दाम पूर्वनियोजित आखणी करून बांधलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक शहराचे दुसऱ्या शहराशी विलक्षण साम्य आहे. शहरांना मध्यबिंदू असा नाही. सर्वसाधारण शहररचना म्हणजे चार मुख्य दिशांना चार वेशी, त्यांना जोडणारे चार मुख्य रस्ते व त्यांना काटकोन करून जोडणारे दुय्यम रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा इमारती.
      सर्व शहरे अर्थातच नदी किंवा तळी यांच्या आसपास वसवलेली आहेत. शहराच्या आत बाजारपेठेच्या जागा ठरलेल्या असत. त्याचप्रमाणे निरनिराळे धंदे करणारे लोक शहराच्या निरनिराळ्या भागांत राहत असत. सरकारी कचेऱ्या आणि राजवाडे शहराच्या मध्यावर असत. मोठ्या शहरांत नाटकगृहे, खाणावळी, दुकाने यांचा भरणा असे. एवढेच नव्हे तर आगीचे बंबही असत.
       चीनमध्ये सार्वजनिक बागा जवळजवळ नव्हत्याच. सर्व बागा राजवाड्यांच्या परिसरात वा खाजगी घरांच्या परिसरात असत. सध्याच्या सार्वजनिक बागा मुळच्या राजवाड्याच्या परिसरातील बागा आहेत. या बागांच्या चारी बाजूंना राहण्याच्या खोल्या असत.
     चीनच्या उत्तर प्रांतात एकमजली घरे सर्वत्र दिसतात, तर मध्य चीन आणि दक्षिणेकडे दुमजली घरे बांधण्याची प्रथा होती. मात्र घरांचा साचा सर्वत्र सारखाच असे. लाल रंगाचा मुख्य दरवाजा, त्याच्या आत एक छोटी विटांची भिंत (भुताखेतांचा प्रवेश अवघड करण्यासाठी), नंतर पुन्हा बागेच्या चौकात प्रवेश देणारा दरवाजा, बागेच्या दुसऱ्या टोकाला मुख्य राहण्याची इमारत आणि तिच्या दोन्ही बाजूंना दुय्यम इमारती हा जवळजवळ ठरलेला साचा असे. घरमालक श्रीमंत असला, तर एकाऐवजी बागांचे दोन किंवा तीन चौक आणि त्यांच्या बाजूला इमारती असत. मालकाचे स्वतःचे निवासस्थान मुख्य दरवाज्यापासून शक्य तो दूर असे. घराच्या पिछाडीस नोकरांची घरे, स्वयंपाकघर इ. असत. इमारती जशा बाहेरून एकसारख्या दिसत, तशा आतूनही त्या एकसारख्याच असत.
        चिनी बागा मात्र इमारतींच्या अगदी उलट म्हणजे काटकोनविरहीत असत. घरातील बाग व शहराबाहेरील निसर्ग यांत शक्य ते साम्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असे. कृत्रिम टेकड्या, पाण्याचे कृत्रिम ओहोळ, त्यांवर पूल आणि दाट वनराईतून जाणाऱ्या छोट्या पायवाटा इत्यादींमुळे बागेत फिरणाऱ्याला आपण निसर्गाच्या अगदी जवळ आहोत असा प्रत्यय येई. बागेची रचना एका वेळी सर्व बाग कधीच दिसू नये, अशी केलेली असे. 
   चीनमधील सार्वजनिक इमारती म्हणजे शहरांच्या वेशीवरील बुरूज, अमीर-उमरावांची थडगी आणि देवळे. यांपैकी वेशीवरील बुरूज त्यांच्या प्रेक्षणीय छपरांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्ष थडग्यांच्या इमारतीत वास्तुसौंदर्य फारसे नाही तथापि थडग्यांचे प्रवेशद्वार अत्यंत भव्य व सुंदर असे.
      चिनी देवळे दोन प्रकारची असत :
       बौद्ध स्तूप आणि कन्फ्यूशस मंदिरे. स्तूप बांधण्याची कला भारतातून चीनमध्ये गेली परंतु ते दगडाचे न बांधता विटांचे किंवा लाकडांचे बांधले गेले. हळूहळू हे स्तूप जास्त मजल्यांचे आणि उंच बांधले जाऊ लागले आणि त्यांवर सुबक नक्षीकामही होऊ लागले. मात्र स्तूपांचा साचा शेवटपर्यंत फारसा बदलला नाही. कन्फ्यूशस मंदिरे सर्वसाधारण चिनी वास्तूंसारखीच, परंतु जास्त अलंकृत असत.
    आधुनिक काळात पश्चिमी स्थापत्य व वास्तुकला यांचा परिणाम झाल्याने जुन्या पद्धतीची लाकडी घरे बांधण्यात येत नाहीत. हल्ली विटा आणि सिमेंट यांची अनेक मजल्यांची घरे लोकप्रिय आहेत. मध्यंतरी रशियन इमारतींच्या धर्तीवर बऱ्याच सार्वजनिक इमारती बांधल्या गेल्या परंतु सध्या सिमेंटच्याच छपरांना थोडा बाक देऊन त्यांना चिनीपणा आणण्याचा प्रयत्न केला जातो.

      शिल्पकला :

        शवपेटीच्या आसपास ठेवण्याचे छोटेछोटे बाहुलीवजा पुतळे सोडले, तर चीनची स्वतःची अशी शिल्पकला अस्तित्वात नाही. शिल्प हा कलाप्रकार बौद्ध धर्माबरोबर चीनमध्ये आला व धर्मप्रसाराबरोबरच त्याची वाढ झाली.
    सुरुवातीला केलेल्या पुतळ्यांवर मध्य आशियातील शिल्पकलेची फार मोठी छाप असणे साहजिक होते. चौथ्या-पाचव्या शतकांतील भगवान बुद्धाचे पुतळे पद्मासन घातलेले आणि डोक्यावर मुकुट घातलेले असत. नंतर मात्र चिनी शिल्पकारांनी भगवान बुद्धाला चिनी स्वरूप द्यायला सुरुवात केली. चिनी बुद्ध उभा किंवा कमलासनावर बसलेला असतो आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सिंह असतात. उभ्या बुद्धाची अभयमुद्रा असते, तर बसलेल्या बुद्धाची ध्यानमुद्रा असते. काही पुतळ्यांत विरातकमुद्रा, धर्मचक्रमुद्रा किंवा भूमिस्पर्शमुद्राही दिसून येतात.
     चीनमध्ये भगवान बुद्धाच्या प्रतिमेपेक्षा बोधिसत्त्वांच्या प्रतिमा अधिक प्रमाणात आढळतात. या बोधिसत्त्वांचा पेहराव राजपुत्रांसारखा असतो व मस्तकावर फुलांचा मुकुट असतो. सुरुवातीला बोधिसत्त्व हा पुरुष आहे असे मानले जात असे परंतु कालपरत्वे, विशेषतः सुंग काळापासून, बोधिसत्त्वांचे पुतळे स्त्रीरूपी बनले [चिनीमध्ये ग्वान्-यीन् (क्वान्‌यिन्) आणि जपानीमध्ये कान्नोन हे ‘अवलोकितेश्वर’चे भाषांतर आहे]. स्त्रीरूपी बोधिसत्त्व नेहमी पाण्यातील एका खडकावर बसलेला दर्शविण्यात येतो. संसाराच्या सागरातून मनुष्यप्राण्याला पैलथडी पोहोचविणारी देवता, असा याचा प्रतीकात्मक अर्थ आहे. बोधिसत्त्वांच्या काही पुतळ्यांना अनेक हात व रावणासारखी अनेक मुखेही असतात. बौद्ध शिल्पाचे प्रसिद्ध नमुने म्हणजे युन गांग आणि लूंग-मन येथील गुहांत असलेले प्रचंड पुतळे. इतके प्रचंड पुतळे सहाव्या शतकानंतर पुन्हा कधी कोरले गेले नाहीत. या पुतळ्यांत भगवान बुद्धाच्या अंगावरील वस्त्र आणि चेहऱ्यावरचा भाव यांना विशेष महत्त्व दिलेले आढळते. यानंतरच्या काळात वस्त्रापेक्षा दागिन्यांना महत्त्व अधिक आले. बौद्ध शिल्पकलेचा परमोच्च विकास थांग काळात झाला. थांग काळातच मातीच्या व लाकडाच्या शिल्पाकृती बनविण्याची कला शिखरास पोहोचली. त्यानंतरच्या काळात बौद्ध धर्माचा ऱ्हास सुरू झाला व शिल्पकलेला राजाश्रय मिळेनासा झाला. त्यामुळे शिल्पकलेचा हळूहळू ऱ्हास होत गेला.
     ब्राँझची भांडी :
      प्राचीन काळी शांग वंशाच्या काळात धार्मिक विधींसाठी जी ब्राँझची भांडी बनवत, ती अद्यापही जगप्रसिद्ध आहेत. आजही सुबकपणा आणि घाट या बाबतींत ती अजोड मानली जातात. भांड्यांचा घाट आणि उपयोग विचारात घेता त्यांचे दोन वर्ग पडतात :
       (१) मांसाहारी किंवा शाकाहारी प्रसादाची भांडी : ‘दिंग्’ (तीन पायांची कढई) ‘ली’ (पोकळ तीन पाय असलेले पातेले) ‘स्यन्’ किंवा ‘येन्’ (तीन पायांवर बसवलेले तळाशी चाळणीवजा छिद्रे असलेले पातेले) ‘ग्वै’ (पसरट कपाच्या आकाराचे आणि दोन कान असलेले भांडे) आणि ‘दो’ (तसराळ्याच्या आकाराचे झाकण असलेले भांडे).
        (२) द्रवरूप प्रसादाची भांडी : ‘ज्वुन’ (गोल किंवा चौकोनी आकाराचा पेला) ‘गु’ (उंच व पसरट तोंडाचा मद्यचषक) ‘यव्’(कडी असलेले गोल आकाराचे झाकणाचे भांडे) ‘हू’ (अरुंद तोंडाचे व रुंद तळाचे भांडे) ‘ज्यूए’ (तीन निमुळत्या पायांवर उभा, दोन्ही बाजूंना चोची असलेला आणि कडांवर दोन लहान खुंट्या असलेला मद्यचषक) ‘ज्या’ (रुंद तोंडाचे, तीन पायांचे, कडांवर दोन खुंट्या असलेले भांडे) ‘ह्‌वांग’ (मद्य ओतण्याचा ‘कावळा’, याचे झाकण प्राण्याच्या आकृतीचे असते) ‘लै’ (दोन कानांची बरणी).
        वरील प्रकार व घाट यांत कालपरत्वे थोडा फार फरक पडत गेला, उदा., ‘दिंग्’ या भांड्यांचे पाय प्रथम सरळ असत, त्यांना हळूहळू बाक देण्यात येऊ लागला. काही प्रकारचे घाट (उदा., ज्युए, गु, ज्या) हळूहळू लोप पावले. काही नवीन प्रकार (उदा., ‘फान्’–तसराळे ‘यी’ –चार पायांचा ‘कावळा’) निर्माण झाले. तथापि इ. स. पू. १४ ते ११ या शतकांत भांड्यांचे जे घाट होते, त्यांत मोठे फेरफार झाले नाहीत.
      शांगकाळात ब्राँझ हा धातू अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे ही भांडी फक्त धार्मिक विधींसाठी वापरण्यात येत असत. त्यामुळे प्रत्येक भांड्यास जादूच्या उपकरणासारखे महत्त्व असे. प्रत्येक भांड्यांवर प्राण्यांचे मुखवटे असत. काही भांड्यावर प्राण्यांच्या पूर्णाकृती कोरलेल्या असत. त्याचबरोबर इतर भांड्यांवर भौमितिक आकृत्याही असत. या सर्व आकृत्यांचा अर्थ काय होता, हे अजूनही न उमगलेले कोडे आहे. शांगकाळात राजेलोकांना शिकारीचा नाद असल्याने त्यांनी या भांड्यांवर प्राणी कोरण्याचा प्रघात पाडला असावा, असा एक अंदाज आहे.

      चिनी मातीची भांडी :

        ही भांडी जगभर प्रसिद्ध आहेत. एक प्रकारची चिनी माती (केओलीन) १,३५०° से. या तपमानापर्यंत तापविली असता, ती काचेसारखी अर्धपारदर्शक होते. या गुणधर्माचा उपयोग करून चिनी कारागीर या मातीपासून सुबक भांडी बनवू लागले. नंतर या भांड्यांवर काचेसारख्या पदार्थांचे लेप चढविण्याची कलाही उदयास आली. लेप चढविण्याच्या मिश्रणात निरनिराळ्या खनिज पदार्थांचा उपयोग करून चिनी मातीच्या भांड्यांना वेगवेगळे रंग देण्यात येऊ लागले. भट्टीचे तपमान, मातीचे मिश्रण आणि लेप चढविण्याचे तंत्र यांत फेरफार करून चिनी मातीच्या भांड्यांचे वेगवेगळे प्रकार बनतात. काही भांड्यांवरील काचेचा लेप अगदी गुळगुळीत असतो, तर काही थरांना तपमान एकदम कमी करून सूक्ष्म भेगा निर्माण करण्यात येतात. काही भांडी एकदाच, तर काही दोन वेळा भाजली जातात. काही भांड्यांवरील चित्रे काचेच्या थराखाली असतात, तर काही लेप दिल्यावर काढली जातात.
      भांड्यांवरील नक्षीकाम करण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत : (१) वरून रंगाने काढलेली नक्षी आणि (२) भांड्यावरच कोरलेली नक्षी. वरून रंगाने काढलेली नक्षी निरनिराळ्या खनिज पदार्थांचे लेप चढवून संगमरवरासारखी केलेली असते किंवा रंगांचे पट्टे ओढूनही काढली जाते. मात्र हे रंग भट्टीत भांडे तापविल्यानंतरच पक्के होतात. भांड्यावर नक्षी कोरण्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात येत असे. जाळीची भांडी हे चिनी भांड्याचे एक खास वैशिष्ट्य आहे. मुळचे भांडे जाळीवजा करून ते काचेसारख्या पदार्थांच्या द्रवात बुडविण्यात येते. त्यानंतर ते भट्टीत भाजले असता भांड्यावर काचेचा पातळ थर चढतो व प्रकाशात धरले असता जाळी नजरेला येते.
      चीनमध्ये सुरुवातीला एकाच रंगाची भांडी जास्त लोकप्रिय होती. परंतु चौदाव्या शतकानंतर निरनिराळ्या रंगांच्या नक्षीकाम असलेल्या भांड्यांना जास्त महत्त्व येऊ लागले.
      गेल्या शतकाच्या उत्तरार्धात चीनमधील यादवी युद्धे, शत्रूचे आक्रमण व अमीर-उमरावांची कमी झालेली संख्या या कारणांमुळे चिनीमातीची भांडी करण्याची कला झपाट्याने मागे पडत चालली आहे. शिवाय भांड्यांची परदेशी निर्यात प्रचंड प्रमाणावर होत असल्याने बाजारू भांडी करण्याकडे कारखान्यांचा जास्त कल होता. त्यामुळे त्यांतील कलात्मकतेचा ऱ्हास होत गेला परंतु सध्याची कम्युनिस्ट राजवट या पारंपारिक कलेला पुन्हा उत्तेजन देत आहे.

        सुलेखन :

       चीनमध्ये लिहिण्याची कला साधारणपणे इ.स.पू. १५०० च्या आसपास निर्माण झाली असावी. सुरुवातीला जरी ही चित्रलिपीच्या स्वरूपात निर्माण झाली, तरी लवकरच लिपीमधील चित्रांचा अंश कमी होऊन अक्षरांचा घाट वेगळा होत गेला. ज्या माध्यमावर आणि ज्या उपकरणांच्या साहाय्याने लिखाण केले जात असे, त्यांनुसार अक्षरांचा घाटही बदलत असे. उदा., लाकडावर किंवा बांबूवर कोरलेली अक्षरे जास्त काटकोनी असत, तर रेशमी वस्त्रांवर कुंचल्याने लिहिलेली अक्षरे जास्त गोलाकार असत. सुलेखनाचे वेगवेगळे प्रकार यांतूनच पुढे निर्माण झाले आणि त्यांना कलेचा दर्जा प्राप्त झाला.
       इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत ‘गू-वन’ (प्राचीन लिपी) प्रचारात होती. तीतून पुढे ‘ली’ ही कारकुनांना लिहिण्यास सोपी अशी लिपी निर्माण झाली. तिच्यातच थोडे फेरफार होऊन ही लिपी शेवटी सरकारी कामासाठी सर्वमान्य झाली. नंतर हानकाळात सरकारी कामकाज फारच वाढल्यामुळे जलद लिहिण्यासाठी मराठीच्या मोडीसारखी एक ‘त्साव् शू’ (गवतासारखी अक्षरे) ही नवीन लिपी निर्माण झाली. हे सर्व लिपिप्रकार अजूनही प्रचारात आहेत.
        चीनमध्ये सुलेखनाला अजूनही विलक्षण महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीच्या पांडित्याची पारख अजूनही त्याच्या हस्ताक्षरावरून करण्यात येते. या कारणामुळे चीनच्या पुढाऱ्यांनी सुंदर हस्ताक्षराची कला अवगत करून घेतली आहे आणि प्रमुख पुढाऱ्यांची हस्ताक्षरे ठिकठिकाणी पहावयास मिळतात. उदा., चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या रन्-मिन्-बाव् (इं. शी. पीपल्स डेली) या दैनिकाचा मथळा अध्यक्ष माओ-त्से-तुंग यांच्या हस्ताक्षरात छापलेला आहे. चीनमध्ये एकूण हस्ताक्षराला चित्रकलेइतकेच महत्त्व आहे.
       चीनमध्ये आजकाल लिखाणासाठी आधुनिक साधनांचा जरी वापर होत असला, तरी कलाकृती या स्वरूपात केलेले लिखाण अजूनही कुंचल्याने केले जाते. या लिखाणासाठी वापरण्याची शाई अजूनही काजळीचा ठोकळा शिळेवर घासून काळजीपूर्वक तयार केली जाते. ती दाट वापरायची की पातळ वापरायची, हे कलाकार कुंचल्याच्या आणि कागदाच्या जाडीवरून आणि अक्षराच्या घाटावरून त्या त्या वेळी ठरवतो.
        कलाकृती निर्माण करण्यापूर्वी कलाकार सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून ठेवतो. प्रत्येक प्रसंगासाठी योग्य कवितेची वा मजकुराची निवड करण्यात येते आणि लिखाणासाठी साधने तयार करण्यात येतात. सर्व लिखाणाचे चित्र कलाकाराच्या मनात पूर्ण तयार झाल्यावर लेखन जलद दोन-तीन मिनिटांतच तयार होते. त्यात नैसर्गिकपणा, भावनापूर्णता आणि जोम हे गुण दिसले पाहिजेत, असा चिनी सुलेखनशास्त्राचा नियम आहे.
  तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत सुलेखनासाठी प्रसिद्ध असलेले अनेक कलाकार चीनमध्ये निर्माण झाले. त्यांपैकी सू जिंग याने उत्तरेकडील एका संप्रदायाची स्थापना केली. या पंथाचे अनुयायी जाड आणि बुटकी अक्षरे लिहितात. वांग स्यी-जृ आणि त्याचा मुलगा वांग स्यन-जृ यांनी दुसरा एक नाजुक हस्ताक्षरांचा संप्रदाय सुरू केला. थांगकाळात इतर कलांबरोबर सुलेखनकलेचाही विकास झाला. मात्र यात सू जिंगच्या पंथाचा प्रभाव जास्त होता. येन जन-च्यींग, ल्यव गुंग-च्युआन आणि छू स्वे ल्यांग हे या पंथाचे प्रसिद्ध कलाकार होत. सुंगकाळात सर्व कलेलाच एक प्रकारचा नाजुकपणा प्राप्त झाला. त्यामुळे वांग पिता-पुत्र यांच्या पंथाचे महत्त्व वाढले. सू दुंग-फो, मी फू, ह्‌वांग थांग-ज्यन आणि सम्राट ह्‌वै जुंग हे या पंथाचे कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. याच काळात सुलेखनशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले.
       वांग पिता-पुत्रांच्या सुलेखनाचा प्रभाव सुंग काळानंतरही टिकून राहिला. मंगोलकाळात जाव मंग-फू (हा चित्रकारही होता) आणि स्यन यू-शू हे त्याचे अनुयायी प्रसिद्धीला आले. मात्र त्यानंतरच्या मिंगकाळात स्यींग थूंग, वन जंग-मिंग आणि दुंग च्यी-छांग यांनी पुन्हा उत्तरेच्या जोमदार हस्ताक्षरपंथाला पुढे आणले. त्यांचा प्रभाव चीनमधल्या शेवटच्या च्यिंग राजवटीत टिकून राहिला. वू वै-ये आणि ल्यव युंग हे या काळातील प्रसिद्ध कलाकार होत.
       आधुनिक काळात चिनी सुलेखनावर एकाच पंथाचा प्रभाव आहे, असे म्हणता येत नाही. तथापि सध्या साम्यवादी शासनात जोम व स्फूर्ती या दोन गुणांना कलेत प्राधान्य असल्यामुळे सू जिंगच्या उत्तरेकडील पंथाचा प्रभाव जास्त दिसून येतो.

      चित्रकला :

        भांड्यांवर चित्रे कोरण्याची कला चीनमध्ये परंपरेने चालत आलेली होतीच. पुढे रेशमावर चित्रे काढण्याची कलाही चीनमध्ये उदयास आली. ऐतिहासिक उत्खननांमध्ये सापडलेले सर्वांत जुने रेशमी चित्र इ. स. पू. पाचव्या-चौथ्या शतकातील आहे.
      चिनी चित्र तीन वर्गांत विभागली जातात : (१) भिंतीवर टांगण्याची उभी चित्रे, (२) उलगडून पाहण्याची लांब चित्रे किंवा चित्रगुंडाळी, (३) पुस्तकात किंवा पंख्यावर काढण्यात येणारी लहान चित्रे. यांपैकी उलगडून पाहण्याची लांब चित्रे हे चिनी कलेचे खास वैशिष्ट्य आहे. गुंडाळलेले चित्र उजवीकडून डावीकडे उलगडले जाते व ते जसजसे उलगडले जाईल, तसतशी त्यातील चित्रकथा नजरेस येते. सर्व चित्र एकाच वेळी दृष्टीला पडू नये, अशी त्याची रचना असते.
        चिनी चित्रांमध्ये चित्र पाहणारी व्यक्ती त्या चित्रातच आहे, असे समजले जाते. दूरच्या गोष्टी अस्पष्ट आणि तपशिलांशिवाय दाखविल्या जातात. बहुतांशी चित्रे निसर्गदृश्येच असतात व ती एकाच रंगात काळ्या शाईने काढली जातात. फक्त शाई गडद किंवा फिकी असेल एवढाच फरक. क्वचित जर रंगाचा उपयोग केलाच, तर तो एखादीच गोष्ट उठावाने दाखविण्यासाठी.
       चिनी चित्रकाराचे वैशिष्ट्य त्याच्या कुंचला वापरण्याच्या पद्धतीवरून दिसते. चित्रकार प्रथम मनात सर्व चित्र तयार करतो आणि नंतर साधनसामग्री एकत्र करून अत्यंत जलद चित्र काढतो. एकदा काढलेल्या आकृतीला पुन्हा कुंचला लावायचा नाही, असा चिनी चित्रकलाशास्त्राचा दंडक आहे. चित्रकार आपल्या चित्रासाठी प्रत्यक्ष निसर्गदृश्याचा उपयोग कधीच करत नाहीत. निसर्गाचे चित्रकाराच्या मनातील चित्र चित्रित केले जाते व त्यात मनुष्याकृती अस्पष्ट व निसर्गाची भव्यता दाखविण्यासाठीच वापरण्यात येतात. निसर्ग व मानव यांचे तादात्म्य हे ताओपंथाचे तत्त्व सर्व चिनी चित्रकलेच्या मुळाशी आहे. त्याचप्रमाणे सुलेखनकला व चित्रकला ही दोन्ही एकाच कलेची दोन अंगे मानली गेल्यामुळे चित्रकला व पांडित्य यांचा समन्वय घडून चीनमधील विद्वान लोकच चित्रकार बनले. प्रसिद्ध कवी सू दुंग-फो हा श्रेष्ठ चित्रकारही झाला, हा केवळ योगायोग नव्हे. चीनमधील जवळजवळ सर्व चित्रकार पंडित, कवी आणि सरकारी अधिकारी होते. धंदेवाईक चित्रकार असा पेशा चीनमध्ये नाही. शिलामुद्रण तसेच काष्ठठसामुद्रण हे चिनी चित्रकलेचे गौण प्रकार मानले जातात.
        या प्रकारच्या छपाईचा विकास बौद्ध पंथीयांनी धर्मसूत्रे लोकप्रिय करण्यासाठी केला. गेल्या तीन-चारशे वर्षांत रंगीत छपाई करण्याची कला चीनमध्ये रूढ आहे, मात्र रंगीत चित्रे निसर्गदृश्यांची नसून पक्षी, फुले, मासे आणि व्यावहारिक वस्तू यांची असते.
         विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चिनी कलेवर पाश्चिमात्य कलेचा परिणाम झाला. साम्यवादी राजवट स्थापन झाल्यावर रशियन कलेचेही अनुकरण करण्यात आले. तथापि अगदी अलीकडच्या काळात चिनी कलेचे महत्त्व पुन्हा वाढलेले आहे. मात्र चित्रकलेचा मुख्य विषय निसर्गदृश्य न राहता चिनी जनतेचे क्रांतिकारी आयुष्य हा झालेला आहे. पारंपारिक चीनमध्ये कलेसाठी कला हे तत्व प्रभावी होते, तर आता जीवनासाठी कला हे तत्व राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
        संगीत : -
   चिनी संगीत सप्तसुरांवर आधारलेले नसून ते पाच सुरांवर आधारलेले आहे व त्यांचे आरोह आणि अवरोह यांची रचना पाच वेगवेगळ्या प्रकारांनी करण्यात येते. यांपैकी प्रत्येक पंचकाची पट्टी बारा सुरांमधील कोणत्याही पट्टीत बसविता येते. त्यामुळे एकंदर ६० स्वर निर्माण होतात.
        चीनमध्ये संगीत नाटक हा प्रकार सोडल्यास गायकी जवळजवळ नाहीच. वाद्यसंगीत हेच संगीताचे मुख्य अंग. चिनी वाद्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) तारवाद्ये : (अ) ‘च्यीन्’ : सात तारांचे लांब लाकडी पेटीच्या आकाराचे वाद्य. (आ) ‘स्स’ : १६ ते ५० तारा असलेला च्यीन् वाद्याचा एक प्रकार. (इ) ‘जंग्’ : १३ ते १६ तारा असलेला च्यीन् वाद्याचा दुसरा प्रकार. हा प्रकार जास्त लोकप्रिय आहे. (ई) ‘फी-फा’ : मुळचे परदेशी वाद्य. सारंगीच्या आकाराचे. (उ) ‘हू-च्यीन्’: चिनी व्हायोलिन. (ऊ) ‘अर्-हू’ ’: दोन तारी चिनी व्हायोलिन. (ए) ‘स्स-हू’: चार तारी चिनी व्हायोलिन. (२) सुषिर वाद्ये : ही सर्व वाद्ये वेळूची बनविलेली असतात. (अ) ‘च्यी ’: पाच रंध्रांची आडवी बासरी. (आ) ‘स्याव’ : नाजुक आवाजाची उभी धरण्याची बासरी. (इ) ‘षंग्’: १३ किंवा १७ वेळू बसविलेली पुंगी. प्रत्येक वेळूवर एक रंध्र असते. (ई) ‘ग्वान्’: एकाच वेळी दोन स्वरांत वाजणारी बासरी. (उ) ‘सो-ना’: शहनाई (सनई) या शब्दाचा अपभ्रंश. (३) आघातवाद्ये : याचे पुष्कळ प्रकार आहेत. बहुतांशी ही वाद्ये लाकूड किंवा ब्राँझ या धातूची बनविलेली असतात. यांचा उपयोग विशेषतः लोकसंगीतात होतो. (अ) ‘वो-जुंग’ किंवा ‘व्यन्-जुंग’ : १६ निरनिराळ्या स्वरांच्या घंटा लाकडाच्या चौकटीवर टांगलेल्या असतात. (आ) ‘ल्वो’: तास. (इ) ‘बो’ : झांज. (ई) ‘य-च्यींग्’, ‘ ब्यन्-च्यींग्’ आणि ‘फांग्-च्यींग’ : ही हरितमण्याच्या तुकड्यांनी बनविलेली असतात. प्रत्येक तुकडा वेगळ्या स्वराचा असतो व त्यांचा संच जलतरंगासारखा वापरला जातो. (उ) ‘फो-बान्’ व ‘मू-यू’ : ही वाद्ये लाकडाच्या तुकड्यांची बनविलेली असतात. (ऊ) ‘गू’ : तबला किंवा मृदंग. याचे अनेक प्रकार आहेत.
         क्रीडा :
        कन्फ्यूशसच्या वेळेपासून विद्यावंतांना समाजात विशेष मान दिला जात असल्याने व शिपाईपेशा कमी दर्जाचा मानला गेल्याने चीनमध्ये मैदानी खेळ दुर्लक्षित राहिले. तरीही तिरंदाजी, कुस्ती, मुष्टियुद्ध, शिकार इ. क्रीडाप्रकार बरेच लोकप्रिय होते. पोहणे, पतंग उडविणे, मासे धरणे हे चिनी लोकांचे आवडते छंद आहेत. मांचू काळात पोलोचाही बराच प्रचार होता. जुगाराची आवड सार्वत्रिक होती. सार्वजनिक चहागृहात गप्पा मारण्यात वेळ घालविणे, हा चिनी लोकांचा विशेष आवडीचा छंद होता. मद्याचे व्यसन चिनी लोकांत फारसे नसते. पण एकेकाळी अफूचे व्यसन फारच फैलावले होते. आता सरकारी प्रयत्नामुळे त्याचे उच्चाटन झाले आहे. तंबाखू ओढण्याचे व्यसन चीनमध्ये सार्वत्रिक असून संगीत, नाटक यांचा शोकही पूर्वापार आहे. अलीकडील काळात बोलपट पाहण्याचीही आवड सर्वत्र दिसते.
        साम्यवादी क्रांतीनंतर सर्व प्रकारच्या खेळांना चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे चीन खेळांच्या बाबतीत जवळजवळ पाश्चिमात्य देशांची बरोबरी करू शकतो. साप्ताहिक सुट्टीचा प्रघात पूर्वी चीनमध्ये नव्हता परंतु वर्षातील सण व उत्सव यांमुळे विश्रांती व करमणूक यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

   प्रेक्षणीय स्थळे : -

         लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील पहिला क्षेत्रफळदृष्ट्या रशिया व कॅनडाखालोखालचा समृद्ध प्राचीन संस्कृती व ४,००० वर्षांचा इतिहास असलेला कागद, मुद्रणकला, दारूगोळा, रेशीम, चिनी माती अशांची मानवाला देणगी देणारा निसर्ग तसेच लोक यांचे संग्रहालयस्वरूप भासणारा आणि दुसऱ्या महायुद्धानंतर एक प्रबळ राष्ट्र बनलेला हा खंडप्राय देश पर्यटकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असला, तरी तेथील नियंत्रणांमुळे व राजकीय परिस्थितीमुळे चीनला भेट देणाऱ्यांची संख्या सध्या तरी मर्यादित आहे. या खंडप्राय देशात १९६० साली लाखावर वस्ती असलेली शहरे १६० वर होती आणि दहा लाखांवर वस्ती असलेली ३२ हून अधिक होती. संयुक्त राष्ट्रांच्या १९७४ च्या अंदाजानुसार शांघाय हे जगातील सर्वांत जास्त लोकवस्तीचे शहर, तर पीकिंग चौथे होते. चीनमधील कॅंटन, चुंगकिंग, वूहू तिन्‌त्सिन, मूकडेन, आनशान, चिंगडाऊ, नानकिंग, हांगजो, फूजो इ. बहुतेक मोठी शहरे पूर्व भागातील समृद्ध प्रदेशात आहेत, गतवैभवाची साक्ष देणाऱ्या कित्येक वास्तू, वैशिष्ट्यपूर्ण पॅगोडा अद्यापही काही शहरांतून पहावयास मिळतात. प्राचीन रेशीममार्गावरील कॅश्गार, यार्कंद, खोतान, गार्टोक ही शहरे, तिबेटची राजधानी ल्हासा, मंगोलिया भागातील शहरे ही अद्यापही प्रवाशांना कुतुहलाचे विषय आहेत. पश्चिम चीनचा बराच मोठा भाग अद्यापही असमन्वेषितच असू त्यात अनेक डोंगररांगा, सरोवरे व रूक्ष प्रदेश आहेत. चौमो लुंगमा (एव्हरेस्ट) शिखराचा उत्तर भाग चीनमध्ये येतो. अश्रूंची नदी ह्‌वांग हो, त्सांगपो (ब्रह्मपुत्रेच्या चीनमधील भागाचे नाव), आशियातील सर्वात लांब नदी यांगत्सी, मॅंचुरियाचा औद्योगिक विभाग तसेच एकूण चिनी भूमीवरील राहणी आणि शेतीपद्धती या गोष्टी चीनबाहेरील लोकांना आकर्षून घेतात. जगातील आश्चर्यांपैकी चीनमधील ग्रॅंड कालवा व अजस्त्र चीनची भिंत ही समजली जातात. सु. १,९०० किमी. लांबीचा ग्रॅंड कालवा खोदण्यास इ.स. पू. पाचव्या शतकात सुरुवात झाली व इसवी सनाच्या सातव्या शतकात तो पूर्णत्वास गेला. यांगत्सी आणि पीत नद्यांना जोडणारा हा कालवा प्राचीन काळी अतिशयच उपयुक्त ठरला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर नवीन राजवटीने चीनमध्ये अशीच नावीन्यपूर्ण स्थित्यंतरे घडवून आणलेली असल्याने चीनमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना प्राचीन वैभवाबरोबरच या नवीन बदलांचेही आकर्षण वाटते. 


   रवींद्रनाथ टागोर आणि चीन यांचे वेगळे नाते होते. त्यांनी चीनमध्येही मोठे कार्य केले. त्यांच्या विपुल साहित्याचे चिनी भाषेत भाषांतर झालेले आहे आणि त्याचा आजही अभ्यास केला जातो. चिनी मंडळी त्यांच्या कवितांच्या आजही प्रेमात आहेत. या कविता त्यांना मनःशांती आणि आध्यात्मिक शक्ती देतात. भारत आणि चीन यांच्यादरम्यान सांस्कृतिक संवाद वाढीस लागण्यासाठी योगदान असलेला महान कवी आणि विचारवंत अशी चीनमध्ये त्यांची ख्याती आहे. १९१५मध्ये टागोर यांचे साहित्य चीनमध्ये पोहोचले. त्यांच्या लेखनाचा प्रभाव इतका जबरदस्त होता, की त्यांच्या लेखणीचा ठसा चीनमधल्या नव्या सांस्कृतिक चळवळीवर उमटला. चीनमधील आधुनिक लेखकांच्या लेखनावरही टागोर यांचा प्रभाव दिसून येतो. याबरोबरच चीन आणि भारत यांना जोडणारे आणखी एक नाव म्हणजे डॉ. कोटणीस. 
फेसबुक, गुगल यांचा अभाव, भाषेची अडचण, राजकीय मतभेद अशा अनेक कारणांनी चीन आपल्याला अत्यंत अनोळखी वाटतो. काहींना तो शत्रू वाटतो. बंद डब्याविषयी जशी उत्सुकता चाळवली जाते आणि तर्कवितर्कांना उधाण येते त्याप्रमाणे चीनच्याही बाबतीत काही अंशी होत असल्याचे वाटते. आपल्याकडच्या बऱ्याचशा वस्तू चीनमध्ये तयार होतात किंवा चीन आपल्याला भरपूर निर्यात करतो, यापलीकडे आपले चीनविषयीचे ज्ञान क्वचितच जाते. त्यामुळेच इंग्लंड, अमेरिका, रशिया, युरोप अशा देशांची आपल्याला जितकी माहिती आहे, तितकी चीनची नक्कीच नाही. तिथले प्रांत, पर्यटनस्थळे, वाहतूकव्यवस्था, शिक्षणपद्धती, संस्कृती याविषयी आपण फार गप्पा मारू शकत नाही. कारण त्या बंदिस्त असलेल्या भव्य देशामध्ये काय काय दडलेले आहे, हे आपल्याला नीटसे माहितीय कुठे?
आपल्याप्रमाणेच चिनी लोकही निरनिराळे सण साजरे करत असतात. आपल्याला गंमत वाटेल अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि रीती असणारे त्यांचे सण असतात. आपल्याला फार फार तर चिनी नववर्ष माहीत आहे किंवा लाल कंदील, आकाशात सोडले जाणारे दिवे आणि ड्रॅगन इतकेच माहीत आहे; पण त्यांच्या संस्कृतीमध्ये डोकावले तर आपल्याप्रमाणेच वेगवेगळे सण, त्यामागील भूमिका आणि ते साजरे करण्याची पद्धत लक्षात येईल. तसेच, आपल्या आणि त्यांच्या संस्कृतीतली अनेक प्रकारची समानताही लक्षात येईल. पूर्वजांना आदरांजली, माता-पित्याचे ऋण, वृद्धांची काळजी, निसर्गाची साथ, ऋतूंचे भान, खाद्यपदार्थांची रेलचेल, रोषणाई, घराची साफसफाई आणि त्यानंतर सजावट, नवीन कपड्यांची खरेदी, कुटुंबकबिल्याचे एकत्र जमणे, मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, लहानांना प्रेमाने भेटवस्तू आणि भरपूर आशीर्वाद देणे... अशा असंख्य गोष्टी त्यांच्याही संस्कृतीमध्ये आहेत.
उदाहरण द्यायचे तर, चीनमध्ये डबल नाइन्थ फेस्टिव्हल साजरा केला जातो. हा फेस्टिव्हल त्याच्या नावाप्रमाणे वर्षातल्या नवव्या महिन्याच्या नवव्या दिवशी साजरा होतो. या दिवशी पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते. पर्वतारोहण केले जाते. वाढदिवस साजरा करताना दीर्घ आयुष्याची मनोकामना करण्यासाठी भाताच्या लांबच्या लांब नूडल्स केल्या जातात. त्यांच्याकडे मूर्तिपूजा दिसून येत नाही; पण ते नास्तिकही नाहीत. त्यांच्याकडेही मंदिरे आहेत. शुभ-अशुभ या संकल्पना फार आहेत. जसे, ४ हा आकडा अशुभ मानला जातो, तर ८ हा आकडा शुभ मानतात. ४ नंबरची हॉटेलमधली खोली कमी पैशांतही मिळू शकते आणि ८ नंबरसाठी दुप्पट पैसे द्यावे लागू शकतात, इतक्या त्यांच्या भावना तीव्र आहेत.

मराठी मंडळ

    परदेशामध्ये मराठी किंवा महाराष्ट्र मंडळे कार्यरत आहेत, याचा बोलबाला खूप आहे. ही मंडळे भारतातले सण तिथे दणक्यात साजरे करतात. परदेशामध्ये आपल्या भूमीतले कोणी भेटले की मोठा आधार वाटतो. चीनमध्येही असे काही घडत असेल का, हाही अनेकांना पडणारा प्रश्न आहे. चीनमध्येही मराठी मंडळ आहे आणि तेही सक्रिय आहे. परदेशात गेल्यावर भारतीय जेवणाची आठवण आली तर कुठे ना कुठे भारतीय हॉटेल सापडते. तसेच चीनमध्येही घडते. विशेषतः दक्षिण चीनमध्ये भारतीय ढंगाची हॉटेल आहेत. भारतीयांना लागणारे जेवणाचे साहित्य, खाद्यपदार्थ विकणारी दुकानेही इथे आहेत. त्यांची संख्या इंग्लंड-अमेरिकेत आहे तितकी नसली, तरी ती आहेत हे मात्र नक्की.



शिकायला आलेले विद्यार्थी 

     अमेरिका, युरोप, इंग्लंड, गेली काही वर्षे रशिया, याबरोबरच चीनमध्येही जाऊन उच्च शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांच्याबरोबरच, कंपनीच्या कामानिमित्त वास्तव्य करणारे, व्यापारानिमित्त राहायला गेलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या करणारे, भारतीय कंपन्यांमध्ये किंवा बँकांमध्ये नोकरीला असलेले भारतीयही चीनमध्ये बहुसंख्य आहेत. हे प्रमाण इतर प्रसिद्ध देशांच्या तुलनेत कमी असेल; पण चीनमध्ये जाऊन आपण राहू शकतो, हे केवळ दिवास्वप्न नाही. राजकीय व सुरक्षेच्या कारणानेही भारतीयांना चीनमध्ये अडचणी येत नाहीत. चिनी लोक काहीही खातात, कसेही जगतात, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. पण, आपल्याला जे हवंय ते खाऊन चीनमध्येही राहता येते. 
      चीनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. चीनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २०१९ मध्ये २३ हजार होती आणि त्यातले वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी २१ हजार होते. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) चीनमध्ये घेतलेली मेडिकल डिग्री भारतात ग्राह्य धरण्यास सुरुवात केल्यापासून, म्हणजे २००३पासून चीनमधल्या वैद्यकीय विद्यापीठांमध्ये भारतीयांची संख्या विशेष वाढू लागली. २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये भारताने चीनमधील ४५ विद्यापीठे व महाविद्यालये येथून घेतलेल्या इंग्रजी भाषेतल्या पदव्यांना मान्यता दिली आहे. उत्तम सोयीसुविधा, प्रयोगशाळा व उपकरणे, तुलनेने कमी खर्च यामुळे चीनला जायची विद्यार्थ्यांची तयारी असते. 
     थोडक्यात, कोणत्याही देशाकडे किंवा दोन देशांच्या संबंधांकडे पाहण्याचे अनेक पैलू असू शकतात. खरी परिस्थिती आपल्यापर्यंत येणाऱ्या माहितीपेक्षाही वेगळी असू शकते. तसा दृष्टिकोन आपण विकसित करायला हवा. 

    नवी जागतिक व्यवस्थाही चीनकडून?

        कोव्हीड-१९ या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला आणि अल्पावधीत त्याचा संसर्ग संपूर्ण जगात झाला. परिणामी जगातील सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या काही महिने घरात बसून आहे. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला जोरदार फटका बसला आहे. कोव्हिड १९ नंतरचे जग वेगळे असेल, हे आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.  परंतु त्या जगातही अणुयुद्धाचा आणि जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा धोका असेलच. विषाणूवर विजय मिळवणे तुलनेने सहजशक्य आहे, परंतु या दोन संकटांचे निराकरण अवघड आहे, असे मत नोम चॉम्स्की या विचारवंताने जाहीरपणे मांडले आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी गरज आहे ती विविधतेला सामावून घेणार्‍या उन्नत आधुनिकतेची आणि मानवकेंद्री जागतिकीकरणाची.
     आधुनिकता आणि जागतिकीकरण सर्वांना हवे असले, तरी त्याला काटशह देणारी संकल्पना चीनमधून जन्माला येत आहे. ही संकल्पना आहे, सभ्यताधिष्ठीत राष्ट्राची म्हणजेच सिव्हिलायझेशन स्टेटची. ही संकल्पनाही कोरोनाच्या विषाणूसारखी अन्य देशांमध्ये पसरू शकते, हे नाकारता येणार नाही.
      कोणतेही राष्ट्र हे कल्पनेमध्ये असते. राष्ट्राला भूगोल नसतो. आपले कायदेकानून करण्याचा अधिकार प्राप्त झाला की राष्ट्राचे राष्ट्र-राज्य बनते. राष्ट्र-राज्यात शासन नावाची संस्था असते. विशिष्ट भूप्रदेशावरच या शासनाची सत्ता असते. म्हणून राष्ट्र-राज्याला भूगोल असतो. सीमा किंवा सरहद्दी असतात. सीमांचे रक्षण करणे ही राष्ट्र-राज्याची प्राथमिक जबाबदारी असते. राष्ट्र-राज्याच्या सीमांचा विस्तार करणे किंवा राष्ट्र-राज्याचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, लष्करी वर्चस्व निर्माण करणे हा शासनाचा अंगभूत धर्म असतो. या धर्माचे पालन कसे करायचे याची व्यूहरचना राष्ट्र-राज्याचा भूगोल निश्चित करतो.
      औद्योगीकरण, राष्ट्र-राज्यांची निर्मिती, भांडवलशाही (त्यासोबत लोकशाही आणि समाजवाद) या घडामोडी युरोपमध्ये ढोबळपणे एकाच वेळी घडल्या. उत्पादन, वितरण आणि उपभोग यांच्या व्यवस्था म्हणजेच अर्थव्यवस्था विकेंद्रीत होती त्या काळात राजकीय व्यवस्थाही विकेंद्रीत होती. तेथे राजा किंवा सम्राट होता, उमराव होते, सरदार होते. उमराव, सरदार यांच्याकडे आपआपल्या फौजा होत्या. मिलान, व्हेनिस यासारखी शहर-राज्ये होती. औद्योगीकरणामुळे उत्पादन, वितरण आणि उपभोग यांची केंद्रीय व्यवस्था अटळ झाली. उत्पादनात कित्येक पटींनी वाढ झाली. या उत्पादनांना बाजारपेठ गरजेची होती. त्यासाठी दूरदूरच्या प्रदेशातील बाजारपेठा ताब्यात ठेवणे गरजेचे झाले. वसाहती स्थापन करायच्या तर सैन्य गरजेचं होते. उमराव, सरदार यांच्याकडे सैन्याचे नियंत्रण ठेवून भागले नसते. कारण आता साम्राज्याचा विस्तार गरजेचा होता. अर्थव्यवस्थेप्रमाणेच राजकीय आणि लष्करी व्यवस्थेचे केंद्रीकरण गरजेचे होते. त्यामुळे राष्ट्र-राज्यांची निर्मिती अटळपणे झाली.
       राष्ट्र-राज्याला राज्यघटना हवी, स्वतंत्र कायदेकानून हवेत आणि त्यानुसार त्याचा कारभार चालायला हवा, हे सूत्र मान्य झाले. युरोपियन राष्ट्रांनी उत्पादनात, व्यापारात मुसंडी मारल्यामुळे ही संकल्पना जगाच्या कानाकोपर्‍यात पोचली. युरोपियन राष्ट्र-राज्यांच्या आपआपसातील स्पर्धेमुळे दोन महायुद्धे झाली. त्यानंतर नवीन राष्ट्र-राज्ये अस्तित्वात आली. आज सर्व जगाची विभागणी राष्ट्र-राज्यांमध्ये झाली आहे.
        अत्याधुनिक तंत्रज्ञान- विशेषतः माहिती-तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादीचा विकास, वित्त भांडवलशाहीमुळे शक्य झाला. आता बाजारपेठ जागतिक बनली. संपत्तीच्या निर्मितीत कित्येक पटींनी वाढ झाली. त्यामुळे राष्ट्र-राज्याची चौकट अडचणीची ठरू लागली. भांडवल, वस्तू आणि सेवा यांच्या चलनवलनावरचे राष्ट्र-राज्यांचे निर्बंध दूर करणे ही वित्त भांडवलाची, नव्या तंत्रज्ञानाची गरज होती. या प्रक्रियेलाच जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन म्हणतात.
       या जागतिकीकरणा आयात-निर्यात मुक्त झाली. एखाद्या उत्पादनाच्या आयातीवर निर्बंध घालायचे, तर त्याची संयुक्तिक कारणे जागतिक व्यापार संघटनेपुढे मांडणे प्रत्येक राष्ट्र-राज्याला सक्तीचे ठरले. आयात शुल्क किती आकारायचे या संबंधातही आंतरराष्ट्रीय कायदेकानून आहेत. त्यासंबंधात विवाद निर्माण झाल्यास त्यांच्या सोडवणुकीच्या व्यवस्थाही आहेत (त्या कितपत कार्यक्षम आहेत हा वेगळा विषय आहे).
जागतिकीकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटक कोणते?
जागतिकीकरणाचे घटक

    राष्ट्रीय पातळी     आंतरराष्ट्रीय पातळी
आर्थिक क्षेत्र     मुक्त बाजारपेठ, खाजगीकरण, कमी कर     मुक्त व्यापार, जागतिकीकरण, कमी जकात
राजकीय क्षेत्र     मुक्त निवडणुका, कायद्याचं राज्य, अल्पसंख्यांकांचे हक्क     शांततामय संबंध, बहुपक्षीय (तीन पेक्षा अधिक देश)सहकार्य, जागतिक कायदा आणि संघटना
वैयक्तीक क्षेत्र     निवडीचं स्वातंत्र्य, व्यक्तीवाद, विविधता, लिंगभाव समता     व्यक्तीसाठी सहजसाध्य दळणवळण आणि स्थलांतर

        उदारमतवादी विचारधारेचे म्हणणे असे की, वरील सहा घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. मुक्त बाजारपेठेसाठी मुक्त निवडणुका गरजेच्या आहेत. कारण, लोकशाही नसेल तर बाजारपेठ बेगडी भांडवलदार आणि सरकारी भ्रष्टाचार यांच्या आहारी जाईल. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आणि वैयक्तीक ग्राहकाचे स्वातंत्र्य हातात हात घालून असते. देशातील ३ ब्रँण्डसमधून निवड करायची की जगातल्या १०० ब्रँण्डसमधून? हा ग्राहकाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
       परंतु २००८ सालच्या मंदीनंतर प्रत्येक देश आपआपल्या संरक्षणासाठी पुढे सरसावला आहे. ट्रम्प यांना बाजारपेठ मुक्त हवीय पण मुक्त व्यापार नकोय, अमेरिकन बाजारपेठेत कोणत्या देशाच्या वस्तू याव्यात हे ठरवण्याचा अधिकार त्यांना हवा आहे. त्यासाठी बहुबक्षीय सहकार्याचे करार व मुक्त व्यापाराला बगल द्यायला हवी असे त्यांचे मत आहे. याउलट चीनचा मुक्त व्यापाराला पाठिंबा आहे. त्यावरच ‘चीनचा बेल्ट अँण्ड रोड इनिशिएटिव’ हा अतिमहत्वाकांक्षी प्रकल्प उभा आहे. पण चीनला मुक्त निवडणुका नको आहेत. कारण चीन नावचे राष्ट्र-राज्यच त्यामुळे नेस्तनाबूत होईल.
      या पेचातून मार्ग काढण्यासाठी सभ्यताधिष्ठीत राष्ट्र (सिव्हिलायझेशन-स्टेट) ही नवी संकल्पना मांडण्यात येत आहे. चीन हे राष्ट्र-राज्य नाही तर सभ्यताधिष्ठीत राष्ट्र आहे, अशी मांडणी केली जाते. ही सभ्यता अर्थातच चीनची आहे. त्यामुळे चिनी सभ्यतेच्या पचनी पडेल, चिनी सभ्यतेचा विकास होईल तीच सार्वत्रिक (युनिव्हर्सल) मूल्ये आम्ही स्वीकारू, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे लोकशाही, मानवी हक्क इत्यादी पाश्चात्य मूल्ये आमच्यावर लादण्याचे कारण नाही, असे कम्युनिस्ट चीनचे म्हणणे आहे.
       सिव्हिलायझेशन-स्टेट वा सभ्यताधिष्ठीत राष्ट्राची संकल्पना भारतातील हिंदुत्ववादी, अमेरिकेतील ट्रंम्पवादी, युरोपियन युनियनमधील राष्ट्रवादी, तुर्कस्तानमधील एर्डोगानवादी, रशियातील पुतिनवादी इत्यादी सर्वांना आकर्षित करते आहे. चीनमधील सभ्यताधिष्ठीत राज्याची संकल्पना, या लोलकामधून चीनचा इतिहास, संस्कृती, भौगोलिक राजकारण, अर्थकारण, भारत-चीन सीमावाद अशा अनेक घटकांचा वेध घेणे गरजेचे आहे.
    आपण आज ज्याला सर्वसाधारणपणे देश म्हणतो ती म्हणजेच राष्ट्र-राज्याची किंवा नेशन-स्टेटची संकल्पना. ही संकल्पना अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर आकाराला आली. या औद्योगिकीकरणाने वस्तुंच्या निर्मितीचा वेग अनेक पटींने वाढविला. त्याआधी युरोपातही वस्तुंचे उत्पादन गावा-खेड्यात आपापल्यापुरते, म्हणजेच विकेंद्रीत पद्धतीने होत असे. या मर्यादीत अर्थव्यवस्थेसाठी त्या-त्या भागापुरती सरंजामशाही राज्ययंत्रणा होती. सरदार, उमराव आपआपल्या प्रदेशात सैन्य बाळगून होते. लोकांच्या निष्ठा सरदार, उमराव यांच्या प्रती होत्या. पण, औद्योगिक क्रांतीने सारी गणिते बदलली.
         औद्योगिक क्रांतीनंतर गिरण्या आणि कारखान्यांमध्ये प्रचंड उत्पादन होऊ लागले. शहरीकरणाने वेग घेतला. अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण झाले. परिणामी राज्ययंत्रणाही केंद्रीभूत झाली. त्यातून राष्ट्र-राज्य ही संकल्पना आणि नवी रचना निर्माण झाली. आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी आणि अन्य देश पादाक्रांत करण्यासाठी राष्ट्र-राज्याने स्वतःचे सैन्य तयार केले. स्वतःचे सैन्य बाळगण्याचे सरदार, उमराव यांचे विशेषाधिकार संपुष्टात आले. राष्ट्र-राज्य ही राजकीय रचना १९ व्या शतकात लोकप्रिय झाली. एक वंश, एक धर्म वा एक भाषा या आधारावर राष्ट्र-राज्यांची निर्मिती झाली. या रचनेत वैविध्याला वाव नव्हता. या नव्या रचनेच्या आधारे दोन महायुद्धे झाली. या महायुद्धांनंतर शीतयुद्धाच्या अंतापर्यंत म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत युरोप (अमेरिकेसह) जगाच्या केंद्रस्थानी होता.
       जागतिकीकरणानंतर (वस्तू, सेवा आणि भांडवल यांचा अनिर्बंध संचार) म्हणजे वित्त भांडवलशाहीच्या वर्चस्वाच्या काळात जगाचे केंद्र आशिया खंडात सरकले. वित्त भांडवलाने बहुराष्ट्रीय कंपन्यांची पुरवठा मूल्य साखळी आमूलाग्र बदलली. एका देशातील कच्चा माल दुसऱ्याच देशात प्रक्रियेसाठी जाऊ लागला, पुढच्या प्रक्रियेसाठी तिसऱ्या देशात, तर पक्क्या मालाची बाजारपेठ चौथ्या देशात, अशी आर्थिक व्यवस्था आकाराला येऊ लागली. बांगलादेशात सूतगिरण्या नाहीत, कापडाचे कारखाने नाहीत, परंतु तयार कपड्यांचे कारखाने आहेत. हे कपडे अमेरिका-युरोपच्या बाजारपेठेत विकले जातात. कंप्युटर्स, प्रोसेसर्स, मोबाईल फोन आणि अन्य उच्च तंत्रज्ञानाच्या उत्पादनांची पुरवठा मूल्य साखळी अनेक देशांना कवेत घेणारी बनली. या कारणामुळे राष्ट्र-राज्य या रचनेला तडे जाऊ लागले.
         अमेरिकन कंपन्या चीनमध्ये उत्पादन करू लागल्या. जगाचे आर्थिक-राजकीय केंद्र युरोप-अमेरिकेतून आशिया खंडात सरकले. खडे सैन्य हेच राष्ट्र-राज्याचे एकमेव लक्षण शिल्लक राहील, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नजरेच्या टप्प्यात आली. एक धर्म, एक वंश, एक भाषा यावर आधारित राष्ट्रांना आपल्या हितसंबंधांचे रक्षण करणे अवघड बनू लागले. कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण जागतिक व्यापार संघटनेकडे गेले. जागतिकीकरणाने राष्ट्र-राज्याची संकल्पना खिळखिळी केल्यानंतर, ती जागा कोणती नवी व्यवस्था घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.
          ही नवी व्यवस्था राष्ट्रातील विविधतेला, सभ्यतेला सामावून घेणारी रचना असेल. सिव्हिलायझेशन स्टेट किंवा सभ्यताधिष्ठीत राष्ट्र ही याच पद्धतीची मांडणी आहे. या संकल्पनेवर उभी असललेली सभ्यताधिष्ठीत राष्ट्रे या नव्या रचनेत मुसंडी मारतील, अशी मांडणी केली जाऊ लागली आहे. म्हणूनच असेच सभ्यताधिष्ठीत राष्ट्र असल्याने महाशक्ती म्हणून चीनचा उदय होतो आहे, अशी मांडणी मार्टीन जाक्स या फ्रेंच विचारवंताने केली आहे.
         चीनसोबतच अमेरिका, रशिया, तुर्कस्तान, भारत ही सभ्यताधिष्ठीत राष्ट्रे आहेत असेही मानले जाऊ लागले. १९ वे शतक राष्ट्र-राज्यांचे होते तर २१ वे शतक सभ्यताधिष्ठीत राष्ट्रांचे असेल हे संभाषित राजनैतिक वर्तुळात लोकप्रिय होऊ लागले. (सिव्हिलायझेशन स्टेट म्हणताना य़ेथे स्टेट म्हणजे वस्तुतः शासनसंस्था अभिप्रेत आहे. परंतु हा शब्द मराठीत रुळलेला नसल्याने राष्ट्र हा शब्द वापरला आहे. त्यामुळे राष्ट्र-राज्य आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र यातील फरकही स्पष्ट होतो).
         ‘व्हेन चायना रुल्स द वर्ल्डः द एन्ड ऑफ वेस्टर्न वर्ल्ड अँण्ड द बर्थ ऑफ अ न्यू वर्ल्ड ऑर्डर’ हे मार्टीन जाक्स यांचे पुस्तक २००९ साली प्रकाशित झाले. राष्ट्र-राज्य म्हणून चीनचा इतिहास शे-दिडशे वर्षांचा आहे परंतु सभ्यताधिष्ठीत राष्ट्र (शासन) म्हणून चीनचा इतिहास हजारो वर्षांचा आहे, अशी मांडणी त्यांनी केली. चीनचा अभ्यास करण्याच्या पाश्चात्य दृष्टिकोनाला त्यांनी आव्हान दिले आहे. पाश्चात्य देशांतील राज्यकर्ते, आर्थिक-राजकीय निर्णयांवर प्रभाव टाकणारे मुत्सद्दी, या विषयांचा अभ्यास करणारे थिंक टँक्स वा अभ्यासकांचे गट हा मार्टिन जाक्स यांचा प्राथमिक वाचक होता आणि आहे.
         चीन हे एक कम्युनिस्ट राष्ट्र आहे. तिथे कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही आहे. माओ झेडाँगच्या कम्युनिस्ट विचारधारेपासून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने फारकत घेतली आहे. ही प्रक्रिया कशी घडली, का घडली याचा शोध अनेक अभ्यासक आणि विद्वान घेत असतात. राजनैतिक वर्तुळात मात्र कम्युनिझमपेक्षा चीनच्या आर्थिक-राजकीय धोरणांचा, सामरिक नीतीचा, कार्यक्रमांचा आणि जगाच्या राजकीय पटलावर काय परिणाम होईल, याचा वेध घेतला जातो. कारण त्यानुसार विविध देशांना आपआपली राजकीय धोरणे, सामरिक नीती निश्चित करायची असते. राजनैतिक वर्तुळातील अभ्यास आपआपल्या देशाचे भू-राजकीय आणि आर्थिक हितसंबंध डोळ्यापुढे ठेवून केला जातो.
         २०१२ सालच्या जुलै महिन्यात मुंबईच्या एशियाटिक सोसायटीने मार्टिन जाक्स यांच्या पुस्तकावर चर्चा आयोजित केली होती. बीबीसीचे भारतातील प्रख्यात पत्रकार मार्क टुली, फिनान्शिअल टाइम्स या वर्तमानपत्राच्या मुंबई ब्युरोचे प्रमुख जेम्स क्रॅबट्री यांनी मार्टिन जाक्स यांची मुलाखत घेतली. चिनी अस्मिता वा ओळख, पाश्चात्य देश आणि भारताचे चीनबाबतचे आकलन आणि नजिकच्या भविष्य काळात आशिया खंडाच्या आणि जगाच्या अर्थकारणात चीनची भूमिका काय असेल, त्याचे परराष्ट्र धोरणांवर काय परिणाम होतील या विषयावर ही चर्चा झाली.
       शासनाचे क्षेत्र अधिकाधिक मर्यादीत असणे लोकहितासाठी आवश्यक आहे, अशी पाश्चात्य विचार परंपरेची धारणा आहे. याउलट चीनी समाज व संस्कृतीची धारणा आहे. तिथे शासनाकडे कुटुंबप्रमुख म्हणून पाहिले जाते, शासन आणि समाज यांच्यातील संबंधांचे चीनी सभ्यतेचे आकलन पाश्चात्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, याकडे मार्टिन जाक्स यांनी लक्ष वेधले. चिनी सभ्यतेचा आविष्कार आणि मूर्त स्वरुप म्हणून चिनी समाज शासनाकडे पाहातो. हा दृष्टिकोन किंवा धारणा पाश्चात्य विचार परंपरेतून समजून घेता येत नाही. चिनी शासन आणि समाजाचे आकलन सभ्यताधिष्ठीत शासन या संकल्पनेद्वारेच होऊ शकते. कारण, एकात्म समाजाची जडण-घडण शासनामार्फतच शक्य आहे अशी चिनी राजकारण्यांची धारणा आहे, असा दावा जाक्स यांनी केला.
        १९९७ साली हाँगकाँग चीनकडे हस्तांतरित झाल्यानंतर एका देशात दोन राजकीय रचना अस्तित्वात असू शकतात, हे स्वीकारण्याची लवचिकता चिनी शासनाने दाखवली. भविष्यात तैवानही चीनमध्ये याच कारणामुळे सामील होईल, असा दावाही जाक्स यांनी केला. चीनची सार्वभौमता तैवानने मान्य केली तर तैवानमधील बहुपक्षीय पद्धत, प्रौढ मताधिकार एवढंच नाही तर काही प्रमाणात तैवानच्या सैन्यदलांनाही स्वायत्तता देण्याची तयारी चिनी शासन दाखवू शकेल, कारण सार्वभौमतेचे चीनच्या संस्कृतीचे आकलन पाश्चात्य परंपरेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे, सार्वभौमता वेगळी आणि राजकीय व्यवस्था वेगळी अशी धारणा चिनी सभ्यतेत व परंपरेत आहे, या आशयाची मांडणी जाक्स यांनी सदर चर्चेत केली.
      शासन हा चिनी समाज-संस्कृतीचा दुखरा कोपरा आहे, अशी अनेक अमेरिकन आणि भारतीयांची समजूत आहे. चीनमध्ये एकाधिकारशाही आहे त्यामुळे दडपशाही करणारी संस्था म्हणून चीनमधील शासनाकडे पाहिले जाते. अशा शासनाच्या विरोधात जनता बंड करेल, अशी अनेकांची समजूत आहे. युरोपियन विचारपरंपरेतून आधुनिकतेचा विचार करणाऱ्यांच्या अशा समजूती असतात. चीनमधील जनतेचे शासनाबद्दलचे आकलन पूर्णपणे वेगळे आहे. कारण चीनमधील शासनाच्या नेतृत्वाखाली घडलेल्या अभूतपूर्व आर्थिक परिवर्तनाला मानवी इतिहासात तोड नाही. आधुनिकता म्हणजे पाश्चात्यिकरण (वेस्टर्नायझेशन) अशी सर्वसामान्य मान्यता आहे. परंतु पूर्व आशियात असे घडलेले नाही, असेही जाक्स यांनी नोंदवले. या कारणामुळेच भविष्यातील जगात महाशक्ती म्हणून चीनची जडण-घडण करण्याची क्षमता चिनी कम्युनिस्ट पक्षाकडे असा निर्वाळा जाक्स यांनी दिला.
       मार्टिन जाक्स यांनी मांडलेल्या सभ्यताधिष्ठीत राज्य (सिव्हिलायझेशन स्टेट) या संकल्पनेचा विस्तार झान वेईवेई या चिनी अभ्यासकाने केला आहे. चीनमधील फुदान विद्यापीठातील या प्राध्यापकांचा ‘द चायना वेव्हः राइज ऑफ सिव्हिलायझेशन स्टेट’ हा ग्रंथ २०१२ साली प्रसिद्ध झाला. झान वेईवेई यांनी चिनी प्रतिमानाची वा चायनीज मॉडेलची सात वैशिष्ट्यं सांगितली आहेत.
        १. चिनी लोक व्यवहारवादी आहेत, पोथीनिष्ठ नाहीत. वस्तुस्थितीकडून सत्याकडे जाणे, हे चीनमधील सुधारणांचे सूत्र आहे. अंमलबजावणीतूनच सत्याची परिक्षा होते अशी चिनी धारणा आहे. मानवी सभ्यतेचा अभ्यास गरजेचा असतो, त्यामुळे मनुष्य जातीने कोणत्या क्षेत्रात काय कर्तबगारी केली आहे हे समजते. चिनी समाज आणि चिनी देश यांच्याशी मेळ बसणाऱ्या जगातील सर्व सभ्यतांमधील सत्व आत्मसात करायचे, असा चिनी लोकांचा खाक्या आहे. आधुनिक होण्यासाठी विकसनशील देशांना सोविएत रशियाचे मॉडेल उपयोगाचे नाही, किंवा पाश्चात्य मॉडेलही कुचकामी आहे हे ध्यानी आल्यावर चीनने आपला स्वतंत्र मार्ग—वैशिष्ट्यपूर्ण चिनी समाजवाद, विकसित केला.
        पाश्चात्य देशांमध्ये सुधारणांची सुरुवात राज्यघटनेत दुरुस्ती करून होते, त्यानंतर कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल केले जातात. या सगळ्यानंतर कृती वा अंमलबजावणी केली जाते. चीनमध्ये आधी संशोधन केले जाते त्यानंतर एक छोटा पथदर्शी प्रकल्प राबवला जातो, हा प्रकल्प यशस्वी झाला की, त्यानुसार कायदे-कानून यामध्ये बदल केले जातात आणि राज्यघटनेमध्ये सर्वात शेवटी बदल केला जातो. या कारणामुळे चीनमध्ये धक्कादायक बदल घडत नाहीत. चीन कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा राजकीय सापळ्यात अडकत नाही. संपूर्ण खासगीकरण, आर्थिक पेचप्रसंग, विकृत लोकशाहीकरण हे सापळे आहेत असेही झान वेईवेई नमूद करतात.
       २. चीनचा इतिहास वेगळा आहे. एकात्म चिनी साम्राज्याचा इतिहास दोन हजार वर्षांचा आहे. चिनी साम्राज्याचा विस्तार एवढा प्रचंड होता की, शासनाला कोणत्याही एका घटकाचे प्रतिनिधीत्व करणे वा हितसंबंध सांभाळणे शक्य नव्हते. संपूर्ण समाजाची जबाबदारी घेणे शासनाला भाग होते. विकसनशील देशांमधील शासन दुर्बळ होते. गुन्नर मिर्दाल या अर्थतज्ज्ञाने त्यासाठी ‘सॉफ्ट स्टेट’ किंवा सौम्य शासन अशी संज्ञा वापरली. कारण विविध हितसंबंधी गटांनी शासनाचे अपहरण केलेले होते. त्यामुळे या देशांचे आधुनिकीकरण अवघड बाब बनली आणि त्या देशांतील जनतेचे जीवनमान उंचावले नाही.
        चीनच्या सरकारने हा प्रश्न मार्गी लावला नाही तर कायमचा सोडवला. गेल्या काही दशकांमध्ये चीनने मानवी इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक आणि सामाजिक क्रांती घडवली. हे सर्व चिनी शासनाच्या नेतृत्वाखाली घडलं आणि आज चीन एक महाशक्ती समजली जाते आहे.
       ३. चीनची लोकसंख्या प्रचंड आहे आणि दरडोई संसाधने मर्यादीत आहेत. त्याशिवाय चीनचा आकारही प्रचंड आहे. प्रादेशिक संस्कृतींची गुंतागुंत आहे. त्यामुळे या अंतर्विरोधांचे रुपांतर संघर्षात होऊन, या देशाला अस्थिरतेचा शाप लागला असता. परंतु चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या भक्कम नेतृत्वामुळे चिनी जनतेची केवळ एकजूट टिकून राहिली. स्थैर्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. त्यातून चीनची प्रचंड मोठी बाजारपेठ निर्माण झाली. त्यामुळे सोविएत रशियासारख्या चीनच्या चिरफळ्या करण्याचे पाश्चात्यांचे मनसुबे कधीही फलद्रूप होणार नाहीत.
       वैशिष्ट्यपूर्ण चिनी सभ्यतेमुळे हे शक्य होते. जो पर्यंत चीनमध्ये राजकीय स्थैर्य आणि खुली धोरणे राहातील तोवर चिनी लोकांच्या जीवनमानात वाढ होईल. चिनी सभ्यतेत काटकसर आणि कठोर श्रमांची परंपरा आहे.
    ४. सामान्य लोकांच्या जीवनमानात वाढ करणे, हे चिनी शासनाचे उद्दिष्ट असते. या संदर्भात झान वेईवेई प्राचीन चिनी शहाणीवेचा दाखला देतात– लोक हा देशाचा पाया असतात आणि पाया भक्कम होण्यासाठी शांतता गरजेची असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्याला चिनी सरकार सर्वोच्च प्राधान्य देते. या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे दडपण देशाची बाजारपेठ खुली करताना चीन सरकारवर होते, असेही ते नमूद करतात. लोकाभिमुख विचार करणे हा चिनी सरकारच्या धोरणांचा कणा असतो. दारिद्र्य निर्मूलन आणि लोकांच्या जीवनमानात वाढ हे चीनमध्ये मूलभूत हक्क समजले जातात. चीनने ७४० दशलक्ष लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले याकडेही ते लक्ष वेधतात. जगामध्ये आजही एक अब्जाहून अधिक लोकसंख्या दारिद्र्यात आहे आणि पाश्चात्य मॉडेल हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे.
         ५. दगडांना पाय लावत नदी पार करायची असते, या चिनी म्हणीचा हवाला देऊन झांग सांगतात की, चीनमध्ये सावकाश सुधारणा होतात. देशाची लोकसंख्या आणि आकार प्रचंड आहे. परिस्थिती गुंतागुंतीची आहे. निर्णय घेण्यासाठी सत्वर अचूक माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातून मिळणे दरखेपेस शक्य होईलच असे नाही. त्यामुळे अनेक छोट्या गटांना विविध प्रयोग करायला, प्रोत्साहन देण्याची नीती चिनी सरकार अवलंबते. जो प्रयोग यशस्वी होईल त्याचे सार्वत्रिकीकरण केले जाते. चीनची बाजारपेठ खुली करण्यासाठी, समुद्र किनाऱ्यालगच्या प्रदेशात चार ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन्स’ची स्थापना करण्यात आली. त्याच्या यशानंतर हा प्रयोग टप्प्या टप्प्याने संपूर्ण देशात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र निर्णय घेतल्यानंतर झपाट्याने चार ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ उभे करण्यात आले. यातून चिनी मॉडेलची कार्यक्षमता दिसते.
        ६ संमिश्र अर्थव्यवस्था हे चिनी मॉडेलचे वैशिष्ट्ये आहे. चीनमध्ये सध्या समाजवादी बाजारपेठेची अर्थव्यवस्था (सोशॅलिस्ट मार्केट इकॉनॉमी) आहे असे झांग सांगतात. शासन पुरस्कृत अर्थव्यवस्था आणि खाजगी भांडवलांची अर्थव्यवस्था या दोन अदृश्य हातांनी तिची उभारणी करण्यात आलीय. चिनीमधील आर्थिक सुधारणांच्या चौथ्या दशकात खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून झालेलं कर संकलन ५० टक्के होते, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात खाजगी कंपन्यांचा वाटा ६० टक्क्यांपेक्षा अधिक होता आणि इनोव्हेशन्स वा नाविन्यपूर्ण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा वाटा जवळपास ७० टक्के होता. २०१६ साली ऑक्सफर्ड विद्यापीठात चिनी मॉडेल या विषयावर व्याख्यान देताना, प्रा. झांग म्हणाले अलिबाबा या ऑनलाईन खरेदी-विक्री पोर्टलची उलाढाल २०१६ मध्ये १२०.७ बिलीयन युवान होती. भारतातील सर्व ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा अधिक उलाढाल एका चिनी कंपनीची होती. अलिबाबाच्या या खासगी कंपनीच्या यशामध्ये महामार्ग, अति वेगवान रेल्वेचे जाळे, टेलिकम्युनिकेशन नेटवर्क या सार्वजनिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
     ७. चीनने आपल्या सीमा, बंदरे आणि नद्या व्यापारासाठी खुल्या केल्या. ज्याला मेनलँण्ड चायना म्हणतात तो मोक्याचा प्रदेशही खुला केला. यापूर्वी चीनचे धोरण बंद दरवाजाचे होते. परंतु खुलेकरणाचे धोरण अवलंबताना चीनने पाश्चात्य देशांचे अंधानुकरण केले नाही. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर विविध देशातील वस्तू, सेवा, संस्कृतींना आपल्या देशाची दारे उघडली. त्यामुळे चिनी संस्कृती अधिक विकसित होते आहे. चिनी सभ्यता त्यामुळेच जगाला फार मोठे योगदान देऊ शकते.
        प्रा. झान वेईवेई ह्यांच्या पुस्तकाचा प्राथमिक वाचक चिनी होता आणि चीनमध्ये हे पुस्तक विलक्षण लोकप्रिय झाले. प्रा. झान वेईवेई हे चिनी सरकारचे समर्थक मानले जातात. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग त्यांच्या प्रत्येक भाषणात वैशिष्ट्यपूर्ण चिनी संस्कृतीचा आवर्जून उल्लेख करतात. सिव्हिलायझेशन-स्टेट वा सभ्यताधिष्ठीत राष्ट्राच्या संकल्पनेला भारतातही प्रतिसाद मिळतो आहे.
      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय राज्यघटनेची निर्भत्सना करताना पाश्चात्य विचारांच्या प्रभावाकडे लक्ष वेधले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने भारतीय संस्कृतीचा (म्हणजे हिंदू धर्माचा) पुरस्कार केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी समाजवादासारख्या पाश्चात्य कल्पनांच्या आधारे देशाच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम हाती घेतला, अशी टीका केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरूंवर आजही आगपाखड करत असतात. केवळ भारतच नाही तर रशिया, अमेरिका, तुर्कस्तान या देशांमध्येही सभ्यताधिष्ठीत राष्ट्र या संकल्पनेला लोकांचा पाठिंबा मिळताना दिसतो. पुतीन, डोनाल्ड ट्रंम्प, एर्डोगान ह्यांना आपआपल्या देशात जनमताचा आधार आहे.
       प्रत्येक देशाच्या सभ्यतेनुसार त्या त्या देशाच्या राजकीय रचना साकार झाल्या पाहिजेत, मानवी हक्क, लोकशाही यांचा आशय त्या त्या देशाच्या सभ्यतेनुसार निश्चित झाला पाहिजे, असे या मांडणीत अनुस्यूत आहे. जे समूह देशाच्या पायाभूत संस्कृतीचा भाग नाहीत, त्यांना दुय्यम नागरिकत्व मिळणे त्यामुळे अटळ ठरते. अल्पसंख्यांक समूहांच्या अधिकारांना सभ्यताधिष्ठीत राष्ट्रात स्थान नसते. उघ्यूर (शिंगजियान), तिबेट, युवान, इनर मंगोलिया या प्रांतातील लोक वांशिकदृष्ट्या चिनी नाहीत, त्यांचा धर्मही वेगळा आहे. चीनमधील राष्ट्रवाद असो की कम्युनिझम, प्रामुख्याने हान वंशियांच्या वर्चस्वाचा पुरस्कार करणारा आहे. सभ्यताधिष्ठीत राष्ट्राची संकल्पना आणि व्यवहार उदारमतवादी मूल्यांच्या विरोधातला आहे.
         चीन आणि भारत या देशांमध्ये हजारो वर्षांच्या संस्कृतीचे सातत्य आहे. त्याची कारणे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलात आहेत. चीनची सामारिक, आर्थिक आणि राजकीय नीती निश्चित करण्यात भूगोलाचा मोठा वाटा आहे.

चीन अजूनही स्वतःला कम्युनिस्ट म्हणवतो पण शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा साम्राज्य विस्तार सुरू झाला आहे. त्यामुळे कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म होतो आहे.

चीन,भारत-चीन,विश्ववेध,सभ्यताधिष्ठीतराष्ट्र
  
    कोणत्याही भूभागाच्या इतिहासावर तेथील भूगोलाचा फार मोठा प्रभाव असतो. किंबहुना भूगोलातील रचनाच तेथील इतिहासाला आकार देतात, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज जागतिक महासत्ता म्हणून अमेरिकाच्याही तोंडात फेस आणणाऱ्या चीनचा इतिहासही असाच भूगोलाने घडविलेला आहे. भारताचा सख्खा शेजारी आणि भूराजकीयदृष्ट्या अंत्यत महत्त्वाचा देश असलेल्या चीनचा हा भूगोल आणि त्यावर उभा असलेला इतिहास आपल्याला व्यवस्थित माहिती असणे आवश्यक आहे.
         यांगत्से आणि व्हांगह किंवा पीत नदी या चीनमधील दोन महत्त्वाच्या नद्या. या दोन नद्यांच्या पुरांवर नियंत्रण मिळवणे, या नद्यांच्या क्षमतांचा म्हणजेच पिण्याचे पाणी, मासेमारी, पाटबंधारे व उद्योगांना पाणी पुरवठा, जलविद्युत, वाहतूक, पर्यटन, इत्यादी, पूर्ण विकास साधणे आणि या दोन नद्यांच्या खोर्‍यातील हान वंशियांचे ऐक्य सिद्ध करणे, हे कायमच चीन साम्राज्याची उद्दिष्ट्ये राहिली आहेत.
       या हान वंशियांच्या सुखासाठी, सुरक्षिततेसाठी जी बिगर हान क्षेत्रे आहेत, मग ती जमीनीवर असो, गोड्या पाण्याच्या जागा असो किंवा समुद्र (तिबेट, शिंगजिआन, मंगोलिया, कोरिया, दक्षिण चिनी समुद्र, प्रशांत महासागर, इत्यादी) हे आपल्या वर्चस्वाखाली आणणे हा चिनी साम्राज्याचा इतिहास राहिला आहे. अगदी इसवीसनपूर्व काळापासून आज एकविसाव्या शतकापर्यंतचा हा इतिहास अनेक चढ-उतारांचा आहे. आता एकविसाव्या शतकात तर या इतिहासाने कळसाध्याय गाठला आहे.
        चिनी भूगोल अभ्यासक हू ह्यूयोंग यांनी १९३४ साली चिनी लोकसंख्येची विभागणी करणारी एक काल्पनिक रेषा चीनच्या नकाशावर काढली. पीत नदी आणि यांगत्से या दोन नद्यांच्या खोर्‍यांचा हा प्रदेश आहे. आजच्या चीनच्या ईशान्येकडील हेहो शहरापासून नैऋत्येच्या तोंगचॉन शहरापर्यंत काढलेल्या या रेषेच्या पश्चिमेकडे चीनचा एकूण ६४ टक्के भूभाग आहे, मात्र तेथील लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ४ टक्के आहे. या रेषेच्या पूर्वेकडील चीनचा भूभाग केवळ ३६ टक्के आहे. पण या प्रदेशातील चीनची लोकसंख्या ९६ टक्के आहे. एवढी स्पष्ट मांडणी हा भूगोल अभ्यासक आपल्याला उलगडून दाखवतो. ही ९६ टक्के लोकसंख्या अर्थातच शंभर टक्के हान वंशीयांची होती. इसवीसनपूर्व काळापासून आजवर त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. या रेषेच्या पश्चिमेकडील प्रदेशात हान वंशीयांची लोकसंख्या गेल्या सत्तर वर्षांत वाढली आहे.

   आपण चीनचा नकाशा पाहिला की कळते की, आपल्या मोजमापानुसार चीन हा जगातला तिसरा किंवा चौथा किंवा पाचवा सर्वात मोठा देश आहे. पश्चिमेला तिबेटचे पठार आहे. सुमारे २५ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला हा प्रदेश समुद्र सपाटीपासून १३००० ते १५००० फूट उंचीवर आहे.  तिबेटच्या दक्षिणेला आणि पश्चिमेला जगातील सर्वात उंच पर्वत रांग असलेला हिमालय आहे. तिबेटमध्ये सुमारे सात हजार हिमनद्या आहेत. सिंधू, सतलुज, ब्रह्मपुत्रा, हाँगहे वा पीतनदी, यांगत्से, मेकाँग, इरावंडी या प्रमुख नद्यांचे उगम तिबेटमध्ये आहेत. डोंगराळ आणि गवताळ प्रदेशातील लोकसंख्या कमालीची विरळ आहे. तिथे शेती शक्य नाही.
        तिबेटी लोकांच्या आहारात त्यामुळे वनस्पतींचे प्रमाण नसल्यात जमा आहे. अन्नधान्य त्यांना इतर प्रदेशातून आणावे लागते. याक, शेळ्यामेंढ्या, घोडे यांचे कळप म्हणजे तिबेटी लोकांचे अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. माणसे ज्या वनस्पती खाऊ शकत नाहीत, त्याचे भक्षण करून हे प्राणी त्याचे रुपांतर माणसांना खाण्यायोग्य मांस व दूध यामध्ये करतात. तसेच माणसाला लोकर आणि कातडीही देतात.
        तिबेटच्या उत्तरेला शिंगजीयान वा उघ्यूर आहे. भारताचा अक्साई चीन हा प्रदेश याच प्रांतात येतो. मंगोलिया, रशिया, कझाकस्तान, किरगीझीस्तान, ताजिकीस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या सरहद्दींना भिडणारा हा प्रदेश आहे. ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) याच प्रदेशातून जातो. काराकोरम, कुलुन आणि तिआनशान या तीन उत्तुंग पर्वतरांगांच्यामध्ये असणारे टाक्लमकान वाळवंट याच प्रदेशात आहे. सुमारे सोळा लाख चौरस किलोमीटरच्या या प्रदेशात लोकवस्ती कमालीची विरळ आहे.
     चीनच्या उत्तरेला मंगोलिया आहे. त्यापैकी इनर मंगोलिया हा तर चीनचाच प्रांत आहे. गोबीचे वाळवंट इथे आहे. सुमारे बारा लाख चौरस किलोमीटरच्या या प्रदेशातही लोकसंख्या विरळ आहे. गोबीचे वाळवंट आणि तिबेटचे पठार यांच्यामधून म्हणजे सध्याच्या शिंगजीयान प्रांतातून प्राचीन रेशीम मार्ग जायचा. चीनच्या नैऋत्येला म्यानमार, लाओस आणि विएतनाम यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. हा प्रदेश डोंगराळ आणि घनदाट जंगलांचा आहे. चीनच्या दक्षिणेला समुद्र आहे तर पूर्वेला प्रशांत महासागर.
पश्चिम, वायव्य आणि उत्तर या तीन दिशांकडून चीनवर आक्रमण होणे जवळपास अशक्य होते. कारण हे प्रदेश वैराण आणि दुर्गम होते आणि आजही आहेत. प्राचीन काळात वा आधुनिक काळातही या प्रदेशातून सैन्याला आगेकूच करणे अतिशय अवघड आहे. कारण रसद केव्हाही तोडता येणे शक्य आहे.
      प्राचीन वा मध्ययुगीन काळात चीनला जाणे आणि तिथून परतणे ही बाब अशक्य नव्हती, परंतु अवघड आणि दुस्तर होती. व्यापार होता परंतु त्याची गती संथ होती. व्हांगह आणि यांगत्से नद्यांच्या खोर्‍यातील कृषी संस्कृतीवर आधारलेल्या संपन्न चीनचा जगातील विविध संस्कृतींशी, रोम वा भारत वा अन्य कोणत्याही, थेट संबंध आला नाही. तेथील ज्ञान-विज्ञान, विचार चीनपर्यंत पोचले नाहीत. त्यामुळे चीनमध्ये हजारो वर्षांपासून संस्कृतीचे सातत्य दिसून येते.
      चहा, रेशीम, कागद, चिनीमातीची भांडी, दारुगोळा, छपाई, चलनी नोटा, होकायंत्र, होडीचे सुकाणू ते जहाजबांधणी, असे अनेक शोध व्हांगह आणि यांगत्से या नदीच्या खोर्‍यातील कृषी संस्कृतीने लावले. इतर कोणत्याही प्रगत संस्कृतीकडून देवाण-घेवाण न करता चिनी लोकांचा परकियांवर कमालीचा अविश्वास होता. त्यामुळे चहा असो की रेशीम वा चिनीमातीची भांडी यांच्या निर्मितीचे तंत्र काही शतके त्यांनी गोपनीय ठेवले होते. गुप्तता पाळण्याची चीनी सवय ही म्हणूनच ऐतिहासिक ठरते.
चीनचे अश्रू आणि संस्कृतीचा पाळणा
      चीन राष्ट्राच्या निर्मितीला व्हांगह हे वा पीत नदी कारणीभूत ठरली, असे लोकप्रिय जागतिक इतिहासकार युवाल हरारी नोंदवतात. व्हांगह वा पीत नदीचा उगम तिबेटमध्ये आहे. तिथून ती पूर्वेला वाहात जाते. ही नदी प्रचंड प्रमाणात गाळ घेऊन वाहते, त्यामुळे तिचा प्रवाह अनेक ठिकाणी अडत असे. अनेक ठिकाणी ही नदी प्रवाह बदलत असे आणि प्रचंड पूर येई. म्हणून तर या नदीला चीनचे अश्रू असेही म्हणतात (आपल्या देशातील कोसी नदीची इथे आठवण होते). या नदीच्या महापुरात आणि दुष्काळात आजवर लक्षावधी लोक ठार झाले आहेत. या नदीच्या किनार्‍याने अनेक जमाती होत्या. पण नदीच्या प्रलयंकारी पुरांवर नियंत्रण मिळवणे त्यांना शक्य नव्हते. कारण प्रत्येक जमात नदीच्या एका छोट्या तुकड्यावर नियंत्रण ठेवून होती.
        संपूर्ण नदीला गवसणी घालणारी उपाययोजना केल्याशिवाय या पुरांपासून संरक्षण मिळणे शक्य नव्हते. या जमातींमध्ये संघर्ष होते पण अतिशय गुंतागुंतीच्या संघर्ष आणि सहकार्याच्या प्रक्रियेतून या सर्व जमाती एकत्र यायला सुरुवात झाली. म्हणून तर या नदीला चिनी संस्कृतीचा पाळणा म्हटले जाते. यथावकाश त्यातून चीन या राष्ट्राची निर्मिती झाली. इसवीसन पूर्व काळात. कारण या नदीच्या पुरावर संपूर्ण नाही परंतु थोडेबहुत नियंत्रण मिळवण्यात राज्यकर्त्यांना यश मिळाले.
      बंधारे आणि पाणीसाठ्यांची एक व्यवस्था त्यांनी निर्माण केली. तिच्या देखभालीची यंत्रणा उभारली. त्यामुळे या नदीच्या खोर्‍यातील अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली, माशांचे उत्पादन वाढले, राज्याचा महसूल वाढला. राज्य समृद्ध आणि संपन्न झाले. गुलामी होती, विषमता होती, अन्याय होता पण जास्तीत जास्त लोकांचे अधिकाधिक भले झाले. म्हणून तर या राज्यावर उत्तरेकडून हल्ले होऊ लागले. लुटालूट करण्यासाठी.

  चीनच्या भिंतीची गोष्ट

       या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी लांबलचक भिंत वा तट बांधण्याचा प्रकल्प राज्यकर्त्यांनी हाती घेतला. पिढ्यानपिढ्या ही भिंत बांधण्याचे काम सुरू होते. राजे बदलले, राजघराणी बदलली पण भिंत बांधण्याचे काम सुरूच राहिले. हे काम सातत्याने सुरू राहावे एवढी सुबत्ता आणि स्थैर्य तेथे नांदत होते. शेती आणि व्यापार करणारे “सुसंस्कृत” हान भिंतीच्या अल्याड तर “रानटी” पशुपालक टोळ्या भिंतीच्या पल्याड अशी वाटणी या भिंतीने केली.
       ची हु आंग डी हा चीनचा पहिला सम्राट. वयाच्या तेराव्या वर्षी तो राजा झाला. व्हांगह आणि यांगत्से नदीच्या खोर्‍यातील सात राजांचा निर्णायक पराभव करून त्याने स्वतःला सम्राट घोषित केले. साम्राज्याचा कारभार चालवण्याची केंद्रीय पद्धत त्याने निर्माण केली. त्यापूर्वी विविध उमराव आपआपले सैन्य बाळगायचे. या सम्राटाने सैन्य पूर्णपणे आपल्या अधिकाराखाली आणले. राज्यकारभार चालवण्यासाठी गुणवान माणसे हवीत, जमात, घराणे यांच्याशी बांधिलकी असणारे उमराव, अधिकारी दूर करण्यासाठी या सम्राटाने लेखी परिक्षा आणि मुलाखतींची पद्धत अंमलात आणली.
        त्यावेळच्या चीनमध्ये अनेक भाषा बोलल्या जात. त्यामुळे साम्राज्याला तडे जाऊ शकतात हे हेरून या सम्राटाने चीनी भाषेचे आणि लिपीचे प्रमाणीकरण केले. वजने, मापे, चलन यांचेही प्रमाणीकरण केले. त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली. व्हांगह नदीला बांध घालून, कालवे काढून पूर आणि दुष्काळावर नियंत्रण मिळवले. नवे युद्धतंत्र विकसित केले. शेती आणि उद्योगांचा विकास केला.
         चीनची जगप्रसिद्ध भिंत बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यानेच हाती घेतला. आधीच्या राजांनी आपआपल्या राज्यांच्या संरक्षणासाठी तटबंदी उभारल्या होत्या. परंतु मंगोल टोळ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी हजारो किलोमीटरची भिंत बांधण्याचा प्रकल्प या सम्राटाने हाती घेतला. चेंगीज खानाने उत्तरपूर्वेकडून चीनवर आक्रमण केले. चीनची जगप्रसिद्ध भिंत त्याला रोखू शकली नाही. विसाव्या शतकात याच मार्गाने जपाननेही चीनवर आक्रमण केले आणि चीन पराजित झाला. भिंतीचा उपयोग झाला नाही पण पहिला सम्राट किती दूरदर्शी होता ही बाब मात्र भिंतीवरून अधोरेखित होते.
       ही भिंत बांधण्याच्या कामावर त्यावेळच्या चीनमधील एक पंचमांश लोकसंख्या राबत होती. वयाच्या १४ व्या वर्षी ची हु आंग डी चा राज्याभिषेक झाला. सम्राट म्हणून स्वतःला घोषित करण्याच्या आधीपासूनच त्याने आपली कबर बांधण्याचे काम हाती घेतले. मेल्यानंतरही आपली चतुरंगी सेना, दास, दासी, नर्तिका आपल्यासोबत असाव्यात म्हणून मातीचे पूर्णाकृती पुतळे आणि अन्य शिल्पांसाठी त्याने हजारो कारागीर कामाला लावले. साम्राज्य स्थिर होताना काही दशके त्याच्या कबरीचे वा स्मृतीस्थळाचे वा परलोकाच्या उभारणीचे कार्य गुप्तपणे सुरू होते. कारागीरांना घरी जाण्याची मुभा नव्हती. ते आजारी पडले वा जखमी झाले वा मेले तर त्यांची प्रेते तिथेच पुरली जात. या सम्राटाने अमर होण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी एक खास औषधी बनवण्यात आली. पण त्याचा परिणाम नेमका उलट झाला. ते औषध प्याल्यावर या सम्राटाचा मृत्यू झाला.
       ची हु आंग डी याने स्वतःला सम्राट घोषित करताना चीन या राजघराण्याची घोषणा केली. त्यानेच चिनी साम्राज्याचा पाया घातला. हे सर्व घडलं इसवीसनपूर्व २२१ मध्ये. पण त्याच्याकारभाराला प्रजा विटली होती. त्याच्या मृत्यूनंतर प्रजेने बंड केले आणि हान घराणे सिहांसनावर आरुढ झाले.

china-wall-marathipizza01

१. चीनची ही विशाल भिंत ७ व्या शतकामध्ये म्हणजेच २८०० वर्षापूर्वी बनवण्यास सुरुवात झाली होती आणि या भिंतीला पूर्ण करण्यासाठी जवळपास २००० वर्ष लागली होती.

या प्रसिद्ध भिंतीच्या निर्मितीची सुरुवात राजा किन शिहुआंगने केली होती.

२. एकेकाळी या भिंतीला अनेक नावे देण्यात आली होती. जसे की, रमपंत, पर्पल फ्रॉट्रीयर, अर्थ ड्रॅगन वगैरे वगैरे!

मात्र १९ व्या शतकामध्ये या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ चायना हे नाव देण्यात आले, जे अखेर अजरामर झाले.

China Wall.Inmarathi2

३. या भिंतीचे काही भाग एकमेकांशी जोडलेले नाहीत. जर या भिंतीचे सर्व भाग एकमेकांना जोडले तर या भिंतीची एकूण लांबी ८८४८ किलोमीटर एवढी असेल.
 ४. एका दाव्यानुसार ही भिंत बनवताना तब्बल  २० ते ३० लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले होते.
५. चीनची भिंत एवढी रुंद आहे की त्यावर एकाचवेळी ५ घोडे आणि १० लोक पायी जाऊ शकतात.

china-wall-marathipizza02

६. खरं तर चीनची भिंत शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी बनवण्यात आली होती. पण तिचा उपयोग कित्येक शतकांपर्यंत व्यापारासाठी केला गेला होता.
७. जेव्हा भिंतीची निर्मिती करण्यात येत होती, तेव्हा कोणाच्याही हातून चूक झाली तर त्या व्यक्तिला/कामगाराला त्याच भिंतीच्या खाली गाडले जात असे.
    म्हणून या भिंतीला जगातील सर्वात मोठे कब्रस्तान देखील म्हटले जाते.

China Wall.Inmarathi

८. १२११ मध्ये ज्या प्रकारे चंगेज खानने ही भिंत तोडून चीनवर आक्रमण केले होते. त्याच प्रकारचा प्रयत्न अनेक आक्रमणकाऱ्यांनी केला आणि चीनवर हल्ला केला होता.

changez-khan-statue-marathipizza

९. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी या भिंतीमध्ये असंख्य निरीक्षण मिनारे बनवण्यात आली आहेत.

१०. चीनची भिंत बनवताना, या भिंतीच्या दगडांना जोडण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला गेला होता.

china-wall-marathipizza03

११. भारतातील कुंभलगढची भिंत जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे, पण चीनच्या भिंतीपेक्षा ही भिंत कित्येक पटीने छोटी आहे. या भिंतीची एकूण लांबी ३६ किलोमीटर एवढी आहे.

१२. चीनी भाषेमध्ये या भिंतीला ‘वान ली छांग छंग’ म्हणतात.

१३. जवळपास १ कोटी पर्यटक दरवर्षी या भिंतीला भेट देण्यासाठी येतात.

China Wall.Inmarathi1

१४. चीनची भिंत ही एकच अशी मानवनिर्मित वास्तू आहे, जी अवकाशातून देखील स्पष्टपणे पाहता येते.

१५. चीनच्या भिंतीची कमाल उंची १४ मीटर म्हणजेच ४६ फुट इतकी आहे.

china-wall-marathipizza04

केवळ वाचण्यापेक्षा अश्या या महाकाय वास्तूला स्वत: अनुभवण्यात देखील अवर्णनीय आनंद आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास चीनच्या या भिंतीवर फेरफटका मारण्यास विसरू नका!

चीनमधील धारणा :-
      गौतम बुद्ध आणि कन्फ्युशिअस (इसवीसनपूर्व ५५१ ते ४७९) हे समकालीन होते. या काळात चीनमध्ये म्हणजे व्हांगह आणि यांगत्से नदीच्या खोर्‍यात अंदाधुंदी माजली होती. अनेक छोटे-मोठे राजे सरंजामदार यांची सत्ता होती. त्यांच्या आपआपसांमधील युद्धामुळे राजकीय-सामाजिक व्यवस्था खिळखिळी झाली होती. राजकीय, सामाजिक, नैतिक अधःपतनाच्या काळात सदगुणी होणे शक्य आहे, असा कन्फ्युशिअसचा ठाम विश्वास होता. या परिस्थितीत सदगुणी कसे होता येईल, या प्रश्नाच्या उत्तराचा शोध तो घेऊ लागला. त्याच्या काळात ताओ वा डाओ दर्शन लोकप्रिय होते. या दर्शनाची धारणा अशी होती की मानवी समाज ही एक कृत्रिम व्यवस्था आहे. आनंदी राहायचे असेल तर निसर्गानुकूल व्यवहारांची कास धरायला हवी. निसर्गाशी एकरुप झाल्यानेच माणूस आनंदी होऊ शकतो. कन्फ्युशिअसला हे मान्य नव्हते. माणूस म्हणजे प्राणी किंवा पक्षी किंवा झाडे नाही, असे तो म्हणत असे.
       त्यावेळच्या चीनमध्ये सर्वशक्तीशाली देवाची कल्पना नव्हती. दोन नैसर्गिक शक्ती असतात अशी मान्यता होती. एक शक्ती म्हणजे ड्रॅगन. ही शक्ती स्वर्गाची आहे तर दुसरी शक्ती आहे भूमीची. या दोन शक्तींमध्ये समतोल साधणे, मेळ घालणे यामध्ये मानवी जीवनाचे साफल्य आहे, अशी मान्यता होती. या दर्शनानेही कन्फ्युशिअसचे समाधान झाले नाही. कारण त्यामधून सदगुणी होण्याचा मार्ग दिसत नाही, राजकीय-सामाजिक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाही, असे त्याचे म्हणणे होते.
        कन्फ्युशिअसने चिनी इतिहासाचा अभ्यास केला. कधीतरी प्राचीन काळात असं सुवर्णयुग होते की ज्यामध्ये राजकीय आणि सामाजिक व्यवस्था उत्तम होत्या. त्या राज्यात सदगुणांचा परिपोष होत असे. त्यामुळे सुख, समाधान आणि शांती नांदत होती. आनंद सर्वत्र भरून राहिलेला होता. ती व्यवस्था पुन्हा निर्माण करायला हवी, अशी कन्फ्युशिअसची धारणा होती. ही व्यवस्था निर्माण करायची तर सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेची उतरंड अशी हवी, की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्थानाची, त्यास्थानाबरोबर येणार्‍या कर्तव्यांची आणि जबाबदार्‍यांची जाणीव असेल. दडपशाही नाही तर परस्पर समजुतीने समाजाचे राजकीय व सामाजिक व्यवहार होतील. यामध्ये कर्मकांड किंवा विधींची भूमिका निर्णायक असते. कारण शुद्ध हेतूने, निर्मळ मनाने विधी पार पाडले तर चारित्र्य निर्मिती होते, अशीही कन्फ्युशिअसची धारणा होती.
       कुटुंब हे मॉडेल तसे आहे असे तो सांगत असे. कुटुंबामध्ये पती-पत्नी, पिता-पुत्र, लहान-थोर अशी अनेक नाती असतात. नात्यांची उतरंड असते. प्रत्येकाला आपले स्थान माहीत असते. त्या स्थानानुसार प्रत्येक व्यक्तीचे हक्क, कर्तव्ये आणि जबाबदार्‍या निश्चित होतात. त्या पार पाडल्याने कुटुंब आनंदी, सुखी होते. अशा कुटुंबाचा आधार प्रेम असतो. हे मॉडेल समाजाच्या राजकीय-सामाजिक व्यवस्थेला लागू करायला हवे, असे दर्शन किंवा तत्वज्ञान कन्फ्युशिअसने मांडले.

पुन्हा एकदा कन्फ्युशिअसकडे
      सम्राटाला साक्षात स्वर्गातून सत्ता मिळाली आहे. सत्ता गाजवायचा त्यांना अधिकार आहे. मात्र सम्राटाचा प्रजेशी असणारा व्यवहार पिता-पुत्रांसारखा हवा. आपल्या मुलांप्रमाणे राजाने प्रजेचा सांभाळ करायला हवा. राजाने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली, प्रजेवर अन्याय, अत्याचार केले तर स्वर्ग त्याला धडा शिकवतो. महापूर येतात, दुष्काळ पडतात. कन्फ्युशिअस व्हांगह वापीत नदीच्या खोर्‍यातला होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये महापूर आणि दुष्काळाचे संदर्भ देतो. जुलमी राजाच्या विरोधात प्रजा बंड करते, तो प्रजेचा अधिकार आहे असेही कन्फ्युशिअस बजावतो.
      माणूस जन्मतःच सदगुणी नसतो. शिक्षणाने तो सदगुणी बनतो. त्यामुळे स्थिर, समतोल, शाश्वत आणि आनंदी सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करायची तर शिक्षण अपरिहार्य आहे. शिक्षण घेतलेल्या शहाण्या माणसांच्या सल्ल्यानुसार राजाने राज्यकारभार करायला हवा, असे कन्फ्युशिअस सांगतो. कन्फ्युशिअसला अनेक शिष्य मिळाले. काही शिष्योत्तम सरकारी अंमलदारही झाले. परंतु कन्फ्युशिअसला राजाश्रय मिळाला नाही. आपल्याला स्वामी मिळणे आता शक्य नाही, असे वृद्ध कन्फ्युशिअस म्हणत असे.  वयाच्या ७३ व्या वर्षी कन्फ्युशिअसचे निधन झाले.
       चीन पहिल्या सम्राटाच्या मृत्यूनंतर हान घराण्याने सत्ता हाती घेतली. प्रजेवर जुलूम-जबरदस्ती केली तर प्रजा बंड करते, ह्या कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीला त्यामुळे दुजोरा मिळाला. कन्फ्युशिअसचे महत्व हान सम्राटांच्या ध्यानी आले. निष्ठा, इमान, प्रामाणिकपणा ही मूल्ये जनतेमध्ये रुजवायची तर कन्फ्युशिअसच्या शिकवणीनुसार राज्यकारभाराची घडी बसवण्याचा निर्णय नव्या सम्राटाने घेतला. सरकारी अधिकार्‍यांना कन्फ्युशिअसच्या विचारधनाचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला. त्यासाठी शाळा काढण्यात आल्या. शिक्षण, विधी किंवा कर्मकांड आणि सदगुण यांना महत्व प्राप्त झाले. समतोल आणि मेळ साधण्यामध्ये कला, साहित्य, संगीत यांना अनन्यसाधारण महत्व आहे अशी कन्फ्युशिअसची शिकवण होती. म्हणून कला-साहित्याला उत्तेजन देण्याचे धोरण राज्यव्यवस्थेने स्वीकारले.
        कन्फ्युशिअस हा चीनमधील राजेशाहीचा धर्म बनला. संपूर्ण चीनमध्ये एक भाषा, एक चलन, वजने-मापांचे प्रमाणीकरण, सरकारी अंमलदार आणि नोकर यांच्यासाठी प्रशिक्षणाची एक व्यवस्था आणि प्रस्थापित राजकीय-सामाजिक घडीला मान्यता देणारे कन्फ्युशिअसचे दर्शन हे सर्व चीनमध्ये इसवीसनपूर्व काळात घडले. थेट विसाव्या शतकातपर्यंतही घडी कायम राहीली होती.
      कन्फ्युशिअसचं दर्शन वस्तुतः शेती संस्कृतीचे दर्शन आहे. हंटिग-गॅदरींग म्णजे शिकार-संकलन यातून जे उत्पादन मिळते त्यापेक्षा दहापट उत्पादन प्राथमिक तंत्राने केलेल्या शेतीतून मिळते. शेती संस्कृती हा एक सापळा आहे. शेती करायला लागल्यावर समूहाची लोकसंख्या वाढते. बहुसंख्य लोक शेतीमध्ये गुंततात. कारण उर्वरित लोकांसाठी अन्नोत्पादन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. शेतीमध्ये गुंतलेल्या लोकांना पिढ्यानपिढ्या केवळ शेतीच करावी लागते. कारण एकदा का अधिक उत्पादनाची चटक समाजाला लागली की तो समजा शिकार-संकलन अवस्थेतील सोप्या समाजसंस्कृतीकडे परतणं शक्य नसते.
       शिकार-संकलन स्थितीत प्रत्येक व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य असते. समूहात अधिक समता असते. परंतु शेती संस्कृतीत बहुसंख्य लोकांना रात्रंदिन राबावे लागते. त्यासाठी विषमता आणि विषमतेला मान्यता देणार्‍या तत्वज्ञानाची, दर्शनाची शेती संस्कृतीला गरज असते. विषमतेचे समर्थन करणे, विषमतेला दार्शनिक मान्यता देणे ही शेती संस्कृतीची गरज असते. म्हणून चीनमध्ये कन्फ्युशिअसच्या विचारधारेला राजाश्रय मिळाला.
       १९११ मध्ये चीनमध्ये क्रांती झाली. सम्राटाची सत्ता उलथून टाकण्यात आली. लोकशाहीची मागणी करणार्‍या तरुणांनी कन्फ्युशिअसचा धिक्कार केला. १९५० च्या दशकात माओ झेडाँगच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट क्रांतीने कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीवर हल्ला चढवला. लाल सैनिकांनी कन्फ्युशिअसचे पुतळे फोडले, मंदिरे तोडली, ग्रंथ जाळून टाकले. त्याची कबर तोडली. पण, २१ व्या शतकामध्ये पारंपारिक चिनी म्हणजे कन्फ्युशिअसच्या शिक्षणविचारावर आधारीत हजारो शाळा चीनमध्ये सुरु झाल्या आहेत. चीन अजूनही स्वतःला कम्युनिस्ट म्हणवतो पण शी जिन पिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनचा साम्राज्य विस्तार सुरू झाला आहे.
      बेल्ट अँण्ड रोड इनिशीएटिव्ह या चीनच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट तेच आहे. त्यामुळे कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म होतो आहे. कारण चिनी कम्युनिस्ट पक्ष आज साम्राज्यवादाचे प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळेच सिव्हिलायझेशन-स्टेट वा सभ्यताधिष्ठीत राष्ट्र ही संकल्पना चिनी मानसाची पकड घेत आहे. हे सभ्यताधिष्ठीत राष्ट्र अर्थातच चीनमधील हान वंशीयांचे आहे. या सभ्यताधिष्ठीत राष्ट्राची मदार निर्यातीवर आहे कारण चीन जगाचा कारखाना बनला आहे.

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...