Monday, June 6, 2022

अंटार्क्टिका : सफर एका अनोख्या विश्वाची

 अंटार्क्टिका... अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या सात खंडांपैकी एक खंड. भारतासारखे जवळजवळ पाच देश मावतील एवढा हा प्रचंड मोठा प्रदेश. या खंडाचे एकूण क्षेत्रफळ १,४०,००,००० वर्ग किलोमीटर इतके आहे. या खंडाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा खंड चारही बाजुंनी संपुर्णपणे पाण्याने वेढलेला आहे आणि यावर फक्त आणि फक्त बर्फाचं साम्राज्य आहे. याच खंडावर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव देखील आहे. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान असणारा प्रदेश म्हणून अंटार्क्टिका प्रसिद्ध आहे. वास्तवात अंटार्क्टिका म्हणजे एक मोठं - महाकाय बेटच आहे. चारही बाजुंनी पाण्यानी वेढलेलं. हो पण इथे जमीन आणि पाण्याचं नातं फार वेगळं आहे. हिवाळ्यामध्ये तापमान सतत उणे असल्यामुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यापासुन एक ते दीड हजार किलोमीटर पर्यंत गोठतं आणि ते जमिनीचाच एक भाग होऊन जातं. यामुळे अंटार्क्टिकाचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट होऊन जाते. पुन्हा मग जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ वितळुन पुन्हा त्याचे पाण्यात रुपांतर होते.



अंटार्क्टिकाचा भौगोलिक नकाशा

अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्यात दक्षिण ध्रुवावर तब्बल सहा महिने आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने एकसारखा अंधार असतो. त्याचप्रकारे उन्हाळ्यात दक्षिण ध्रुवावर बाकीचे सहा महिने आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने एकसारखा उजेड असतो. पृथ्वी तिच्या अक्षापासुन २३.५ अंश झुकलेली असल्यामुळं उन्हाळ्यातसुद्धा सुर्य प्रकाश इथे कमी पोहोचतो तसंच जो काही प्रकाश या जमिनीवर म्हणजेच बर्फावर पडतो तो पुन्हा आकाशाकडे परावर्तित केला जातो. त्यामुळे इथे बर्फ वितळण्याचं प्रमाण हे बर्फ तयार होण्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटींनी कमी आहे आणि म्हणूनच बर्फाचा थर साल दरसाल वाढला गेला आहे. हा बर्फाचा थर सरासरी दोन किलोमीटर एवढा आहे. काही ठिकाणी तर हा थर साडेचार किलोमीटर पर्यंत आढळून आला आहे. अंटार्क्टिकामध्ये किती प्रमाणात बर्फ आहे हे जर उदाहरणासहित सांगायचं झालं तर समजा, जर हा पुर्ण बर्फ भारतावर आणुन टाकला तर संपुर्ण भारताची उंची तब्बल ११ किलोमीटरने वाढेल म्हणजे भारतातील कुठलंही ठिकाण हे सद्यस्थितीचे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच होईल.

हे महाद्वीप जवळपास गोलाकार आहे पण सर्व ठिकाणी पठारासारखं सपाट नाही. जसजसे आपण किनाऱ्याकडुनदक्षिण ध्रुवाकडे सरकत जातो तसतशी याची उंची वाढत जाते. अंटार्क्टिकाच्या पुर्व भागात १००० किलोमीटर व्यासाच्या वर्तुळामध्ये विस्तीर्ण असे एक पठार पसरलेले आहे, ज्याची सरासरी उंची ३००० मीटर म्हणजेच जवळजवळ १०००० फुट इतकी आहे. भारतामध्ये जसं उंच शिखर आहे कांचनगंगा, महाराष्ट्रात जसं उंच शिखर आहे कळसुबाई तसंच अंटार्क्टिकामध्ये असणाऱ्या सर्वात उंच शिखराचे नाव आहे 'विंसन पर्वत'. या विंसन पर्वताची उंची ४८९२ मीटर इतकी आहे. तर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव २८३० मीटर उंचीवर आहे. जगात असणाऱ्या बेटांची उंची हि सरासरी ५०० ते ७०० मीटर आहे. त्याप्रमाणात अंटार्क्टिकाची सरासरी उंची २३०० मीटर इतकी आहे आणि म्हणूनच अंटार्क्टिका जगातील सर्वात उंच महाद्वीप आहे. हो पण हेही खरं आहे की अंटार्क्टिकाची उंची हि फक्त इथे असलेल्या बर्फामुळेच आहे.



चारही बाजुंनी पाण्याने वेढलेलं महाद्वीप - अंटार्क्टिका

अंटार्क्टिकामध्ये उणे तापमान ही सर्वसाधारण व नित्याची बाब आहे. उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात तापमान सरासरी ० ते ५ किंवा ७ अंश सेल्सियसपर्यंत जाते पण हेच तापमान हिवाळ्यात -४० अंश सेल्सियस पर्यंत जाऊन पोहोचते. आतल्या भागात म्हणजेच पठारी आणि पर्वतीय क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये तापमान -२० ते -३५ अंशसेल्सियस इतके असते तर हेच तापमान हिवाळ्यात -७० ते -८० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचते. जगामध्ये कुठल्याही जागी सर्वात कमी तापमानाची जर नोंद झालेली असेल तर ती झाली आहे अंटार्क्टिकामध्येच. सन १९८३ मध्ये रशियाच्या 'वोस्तोक' नावाच्या संशोधन केंद्रामध्ये जगातील सर्वात कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आणि ते तापमान होतं -८९ अंश सेल्सियस. एवढ्या थंड तापमानामुळे हवेमध्ये पाण्याचं फार कमी असते, सर्व पाणी बर्फ बनुन खाली पडते. पठारी भागात हा बर्फ फार कमी प्रमाणात पडतो, वर्षभरात साधारणत: १० सेंटिमीटर इतकाच. 


अंटार्क्टिका मधील बर्फाच्छादित जमीन


अंटार्क्टिका हे महाकाय वादळांसाठी परिचित आहे. इथे जेवढी थंडी धोकादायक तेवढेच वेगाने धावणारे वारेसुद्धा धोकादायक आहे. या वाऱ्यांना जमिनीवर कशाचाच अडथळा होत नाही. हि वादळं आकाराने एक-एक हजार किलोमीटर एवढी प्रचंड मोठीसुद्धा असतात. या जोराने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान जरी स्थिर असले तरी थंडीची तीव्रता दुपटीने वाढते. अंटार्क्टिकामध्ये काही संशोधन केंद्रामध्ये वाऱ्याचा वेग प्रति ताशी ३०० किलोमीटर नोंदविला गेला आहे. सर्वात जास्त वाऱ्याचा वेग हा जुलै १९७२ मध्ये फ्रान्स देशाच्या संशोधन केंद्रावर नोंदविला गेला आहे. त्यावेळी आलेल्या वादळी वाऱ्याचा वेग होता प्रति ताशी ३२७ किलोमीटर. हे वेगाने वाहणाऱ्या वारे आणि वाऱ्याबरोबर उडणारा बर्फ एवढे प्रचंड असतात की दगडांचा पण त्यांच्यासमोर निभाव लागत नाही. हे वारे अक्षरश: दगडांमध्ये छिद्र करतात आणि काही छिद्र तर आरपारही होऊन जातात.



सततच्या वाऱ्याच्या माऱ्यामुळे छिद्र पडलेला एक दगड

पृथ्वीवर असणाऱ्या उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर म्हणजेच अंटार्क्टिका मध्ये आकाशात एक नैसर्गिक लालसर आणि हिरवट प्रकाश दिसतो. त्याला आपण ध्रुवीय प्रकाश किंवा मेरुज्योती म्हणू. इंग्रजी मध्ये याला अरोरा(Aurora) असं म्हणतात. उत्तर ध्रुवावरील या प्रकाशाला सुमेरु ज्योती (इंग्रजी शब्द : Aurora Borealis) असं म्हणतात तर दक्षिण ध्रुवावरील या प्रकाशाला कुमेरु ज्योती (इंग्रजी शब्द : Aurora Australis) असं म्हणतात. अंटार्क्टिका आणि प्रदूषण यांचा काहीही संबंध नाही, इथे कुठल्याही प्रकारचे वायुप्रदूषण किंवा धुळ नाही. त्यामुळेच अंटार्क्टिका हे अंतराळ निरीक्षणासाठी पृथ्वीवरिल सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.



 कुमेरु ज्योती (Aurora Australis)

इथे कुठल्याही प्रकारची झाडे, वनस्पती नाहीत. ३-४ प्रकारचे पक्षी आढळतात पण तेसुद्धाफक्त समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात. अंटार्क्टिकाची खासियत म्हणजे इथे वास्तव्यास असलेले पेंग्विन पक्षी. पेंग्विन हे समुद्र आणि समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशातच वास्तव्य करतात. पेंग्विन पक्ष्यांच्या एकूण ७ जाती येथे आढळुन येतात. 


 पेंग्विन प्रजातीचा पक्षी - एडेली पेंग्विन

भारताकडुन अंटार्क्टिकामध्ये दोन संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. 'मैत्री' हे केंद्र सन १९८९ पासुन कार्यरत आहे आणि 'भारती' हे आधुनिक सोयी-सुविधांनी अद्ययावत असे संशोधन केंद्र सन २०१२ पासुन कार्यरत आहे.


भारताचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - मैत्री


भारताचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - भारती


अंटार्क्टिकामध्ये स्थायिक मनुष्यवस्ती अशी नाहीच. कारण जगालाच या खंडाची ओळख अवघ्या २०० वर्षांपुर्वी झालीय. त्याआधी माणसाने हा प्रदेश कधीच पाहिला नव्हता. तसं पाहिलं तर अंटार्क्टिकाला स्वतःची अशी लोकसंख्या नाहीच. तसेच इथं कुठली आदिवासी जमात देखिल अस्तित्वात नाही. सद्यस्थिती पाहता इथल्या उन्हाळ्यात सर्व देशांचे मिळुन ४००० लोक संशोधनासाठी कार्यरत असतात आणि हिवाळ्यामध्ये हीच संख्या १००० वर येऊन पोचते. इथे जगातील विविध देशांकडून फक्त वैज्ञानिक संशोधन चालू असते, त्यासाठी विविध देशांचे शास्त्रज्ञ इथे वास्त्याव्यास असतात आणि ते देखील एक ते दीड वर्ष कालावधीसाठीच. 

तर असा आहे अंटार्क्टिका खंड. पृथ्वीवर असलेलं एक वेगळं जग...! 

एक गणेशोत्सोव 'अंटार्क्टिका' मधला


गणेशोत्सव सातासमुद्रापार केव्हाच पोचला आहे. पण अंटार्क्टिकावरही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाऊ शकतो, याची कल्पनाच कोणी केली नसेल. अशाच मी अनुभवलेल्या गणेशोत्सवाची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे.

त्या आधी अंटार्क्टिका म्हणजे काय आहे, हे थोडंसं जाणून घेऊया.
अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वीवर असणाऱ्या सात खंडांपैकी एक खंड. या खंडाचे वैशिष्ठ्य म्हणजे हा खंड चारही बाजुंनी संपुर्णपणे पाण्याने वेढलेला आहे आणि यावर फक्त आणि फक्त बर्फाचं साम्राज्य आहे. याच खंडावर पृथ्वीचा भौगोलिक दक्षिण ध्रुव देखील आहे. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान असणारा प्रदेश म्हणून अंटार्क्टिका प्रसिद्ध आहे. भारत सरकारद्वारे येथे दरवर्षी वैज्ञानिक संशोधन मोहिमा राबविल्या जातात. या अशा ठिकाणी वर्षभर राहण्याची व काम करण्याची संधी मला मिळाली ही गणपती बाप्पाचीच कृपा म्हणावी.

अंटार्क्टिका खंड

भारताचे अंटार्क्टिकामधील वैज्ञानिक संशोधन केंद्र - भारती

सन २०१६. घरापासून १२००० हजार किलोमीटर दूर सर्वबाजूने समुद्राने वेढलेल्या बर्फाने आच्छादलेल्या महाकाय बेटावर रहायला येऊन जवळजवळ ८-९ महिने झाले होते. रोजची कामे करुन दिवस काढायचे काम सुरु होते. या दिवसात सूर्य केवळ ३-४ तासच दिसत असे. काम नसताना सहकाऱ्यांशी गप्पा मारत वेळ घालवणं या सारखा विरंगुळा इथे नव्हता. अशातच एकेदिवशी सहका-यांबरोबर गप्पा मारताना एकजण म्हणाला, “अरे आता गणेशोत्सव १५ दिवसांवर आलाय. आपल्याकडे जोरात तयारी सुरु झाली असेल ना?” त्यावर मी म्हणालो, “हो ना रे, आपल्याला आता या सगळ्याची यावर्षी मजा घेता येणार नाही.” असं म्हणत दोघेही चुकचुकलो. पण मनात मात्र गणेशोत्सवाचाच विचार घोळत राहिला. दरवर्षीप्रमाणे गणपतीची आरास, पूजा-अर्चा, नैवेद्य हे सगळं यंदा करता येणार नाही, याची हूरहूर मनाला होत होती. लहानपणापासून घरातील गौरी-गणपतीची आरास करण्यायपासून ते पूजा-अर्चा करेपर्यंत दहा दिवस कसे जायचे ते समजायचे नाही.  दोन दिवस याच विचारात गेले. जुन्या आठवणी डोळ्यासमोरुन तरळून गेल्या.

विचार करता करता सरतेशेवटी मनाने पक्कं केलंच की, यंदा छोट्या प्रमाणात का होईना पण गणेशोतसव साजरा करायचाच. त्यासाठी सर्वप्रथम एका सहका-याशी चर्चा केली. त्यानेही माझ्या कल्पनेस होकार दर्शवला. मग काय, लागलो आम्ही तयारीला.

संशोधन केंद्रात “प्रार्थनागृह" नावाची खोली होती. इथे मोहीमेतील सर्व जातीधर्माचे सदस्य प्रार्थना करु शकत असत. आम्ही दर मंगळवारी सामुहिक आरतीचे आयोजन करत असू. म्हणून गणेशोत्सवासाठी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यासाठी याच प्रार्थनागृहाची निवड केली. या प्रार्थनागृहात फार आधी कुणी एका गणेशभक्ताने सुंदर अशी सुबक गणेशाची लहानशी मूर्ती आणून ठेवली होती. ही छानशी मूर्ती गणेशोत्सवाच्या काळात स्थानापन्न करायची असे आम्ही ठरवले.

प्रार्थना गृह

गणपतीच्या मूर्तीची निवड करून झाल्यावर आम्ही आमचा मोर्चा आरास करण्याकडे वळविला. आपल्याकडे गणेशोत्सव म्हटलं की गणपती समोरील आरास ही देखील तितकीच महत्वाची असते. गणेशोत्सव काळात आराशीला एक प्रकारचं भक्ती-भावनेचं वलय असते.

ज्याठिकाणी  खाण्यापिण्याचं, दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारं सामान हे वर्षातून एकदाच यायचं तिथे आम्हाला आराशीचं सामान मिळणे ही अशक्य गोष्ट होती. तरीदेखील काहीतरी आरास करायचीच ही भावना स्वस्थ बसू देत नव्हती. असंच एकेदिवशी विचार करत असताना माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर न्याहाळत नजर गेली तर समोर नजर जाईपर्यंत बर्फच बर्फ दिसला. नुकताच बर्फ पडून गेल्यामुळे (Snow Fall) बाहेरची शुभ्रता डोळ्याला सहन होत नव्हती. हे दृश्य बघताना मनात विचार आला, इतके दिवस कितीतरी वर्षांनुवर्षे हा प्रदेश बर्फाच्छादित आहे. ना इथे मनुष्यवस्ती आहे, ना इथल्या भूभागावर कुठल्याही प्रकारची झाडे आहेत. इथे कुठल्याही प्रकारचा भूचर प्राणी वास्तव्यास नाही. समुद्रातील मासे, इतर जलचर आणि पेंग्वीन पक्षी हीच इथली जैवविविधता. यातील पेंग्वीन पक्षी हे समुद्रकिना-यावर, आमच्या केंद्राजवळ ‘शतपावली करण्यासाठी येत असत. म्हणून मग ठरवलं की, आराशीचा विषय (Theme) हा अंटार्क्टिकाच असेल.

जरी आम्ही बर्फाच्छादित प्रदेशात राहत असलो तरी केंद्रामध्ये बाहेरचा बर्फ आराशीसाठी आणणं शक्य नव्हतं, कारण केंद्रामध्ये १५ ते २० डिग्री सेल्सिअस तापमान हिटरद्वारे कायम राखण्यात येते. म्हणून बर्फाच्या जागी कापूस वापरुन बर्फाच्छादित भूभाग तयार केला. त्यावर चार-पाच पेंग्वीन्स फिरताना दिसावेत यासाठी पेंग्वीन्सचे फोटो प्रिंट करुन पुठ्ठ्यावर चिकटवले. अजून चारपाच पुठठे घेऊन गणपतीस सिंहासनारुढ करण्यासाठी सिंहासन बनविले. त्यामागे अंटार्क्टिकाचा अंतराळातून घेतलेला फोटो चिकटवला आणि इतर छोटी मोठी सजावट करुन आराशीचे काम पूर्ण केले.

अखेर गणेशचतुर्थीचा दिवस उजाडला. आदल्यादिवशीच तेथील आचा-याला (आचारी दिल्लीचा रहिवासी असल्याने) महाराष्ट्रीय पद्धतीने मोदक कसे बनवायचे याची कल्पना देऊन ठेवली होती. केंद्रामध्ये सर्व सहका-यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सर्वजण पारंपारिक पोषाख घालून तयार झाले होते. मोदकाचा वास संपूर्ण केंद्रामध्ये दरवळत होता.

श्रीगणेशाचे आगमण केंद्राबाहेरून प्रार्थनागृहापर्यंत करण्यासाठी छोट्याशा मिरवणुकीचे आयोजन केले. प्रार्थनाघरातून कोणी पखवाद घेतले, कोणी ताशा घेतला, कोणी खंजिरी घेतली, तर कोणी टाळ घेतले. सर्वजण गणेशमूर्ती घेऊन केंद्राबाहेर बर्फामध्ये गेलो. गणेशमूर्ती माझ्याच हातात असल्यामुळे अनवाणी पायानेच बर्फात गेलो. तिथून केंद्राकडे वाजत गाजत गणपती बाप्पा आगमनस्थ झाला. संपूर्ण केंद्रात एकच जल्लोषाचे वातावरण झाले. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया", "एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार" असे जयघोष केंद्रात घुमू लागले. काही हौशी सदस्य या वाद्यांच्या तालावर नाचू लागले. उत्साह पार पराकोटीला गेला.

बर्फातून श्री गणेशाच्या आगमनाच्या मिरवणुकीची सुरुवात

केंद्राच्या दरवाज्यात गणरायाचे औंक्षण

पारंपरिक वाद्यांच्या वापर करून बाप्पाची मिरवणूक 

जवळपास अर्ध्या पाऊण तासाच्या मिरवणुकीनंतर वाजतगाजत गणपती बाप्पा प्रार्थनागृहाजवळ आले. मी पुढे होऊन आणखी चार जणांना हात लावण्यास सांगून गणपतीस स्थानापन्न केले. सर्व सदस्यांमध्ये उत्तरेकडील हिंदी भाषिक सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे आरती सुरु केली. “जय गणेश जय गणेश जय गणेश देवा I माता जाकी पार्वती पिता महादेवा II” यानंतर “ सुखहर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपाजयाची..... 

अंटार्क्टिकाचीच आरास असलेला अंटार्क्टिकामधील गणपती

मोदकांचा नैवेद्य बाप्पाचरणी ठेवून मनोभावे नमस्कार केला. सर्व सदस्यांनी एक एक करत गणरायाचे दर्शन घेतले. सर्वांनी मोदकरूपी नैवेद्य प्राशन केला. सर्वजण हर्षोल्हासात दिसत होते. गणपतीला पूजेसाठी कुठलीही ताजी फुले नाही, हार नाही, ना अगरबत्ती, ना धूप, ना दिवा... तरीही बाप्पाने हे सर्व गोड मानून घेतले असावे. बाप्पाच्या आगमनाने आनंद गगनात मावत नव्हता. विशेष म्हणजे कुठल्याही भौगोलिक परिस्थितीमुळे गणेशभक्तीत खंड पडला नव्हता. यामुळे एक आत्मिक समाधान लाभले होते.

तिथुन पुढे रोज एक एक सदस्यांना आरतीचा मान देऊन सकाळ संध्याकाळ आरती केली जात होती. सर्वच जण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले असल्यामुळे नवीन नवीन चाली रूढींची, परंपरांची ओळख होत होती. आपापल्या भाषेत संध्याकाळच्या आरतीच्या वेळी प्रत्येक जण गणरायाचं नामस्मरण करत होता.  नैवेद्यासाठी कधी शिरा तर कधी जिलेबी तर कधी लाडू असे पदार्थ केले जात होते. श्रीगणेशाची मनोभावे पूजा होत होती. अशा प्रकारे जो तो आपापल्या परीने गणेशोत्सवात भाग घेत होता.

अखेर तोही दिवस उजाडलाच.. अनंतचतुर्दशी.. प्रत्येक गणेशभक्ताचा गणेशोत्सोवातील नावडता दिवस. आज गणपतीला निरोप द्यावा लागणार होता. यावेळी मात्र आम्हाला विसर्जन मिरवणूक काढता येणार नव्हती. केंद्र प्रमुखांनी तशी परवानगी नाकारली होती. इतके दिवस खूप उत्साहाचे वातावरण होते पण आता जड अंत:करणाने गणरायाला निरोप द्यायचा होता. आमच्यातील एका तेलुगू भाषिक ज्येष्ठ सदस्याच्या सांगण्यावरून आम्ही आकाराने छोटी हळदीची मूर्ती मुख्य मूर्तीबरोबर स्थानापन्न केली होती. तीच छोटी मूर्ती आम्ही एका बादलीत पाणी घेऊन विसर्जित केली, कारण बाहेर होता तो केवळ बर्फच !

प्रवास अंटार्क्टिकाचा


शनिवार, २१ नोव्हेंबर २०१५. केप टाऊन शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आम्ही मुक्कामास होतो. सकाळी सहा वाजता हॉटेलमधल्या खोलीमध्ये सामानाची आवराआवर करून झाली होती. उशीर झाल्यामुळे कसंबसं एकदाचं आवरून मी आणि माझा सहकारी मित्र सर्व सामान घेऊनच नाष्ट्यासाठी आमच्या खोलीबाहेर पडलो. आमचा एकूण २७ सदस्यांचा समुह होता. भरपेट नाष्टा करून आम्ही केप टाऊन विमानतळाची वाट धरली. साडेआठ वाजेपर्यंत आम्हाला विमानतळावर पोचायचं होतं आणि आम्ही तसं पोचलोदेखील. सर्वांनी आपापलं सामान तपासुन विमानतळावरच्या एका खास काऊंटरकडे धाव घेतली. त्या काऊंटरकडे जाताना आजुबाजूचे लोक आमच्याकडं काहिश्या कुतूहलाने बघत होते पण माझ्या मनाचा कल दुसरीकडेच होता. अधुनमधून त्या काऊंटरवर लिहिलेल्या नावाकडे मी सारखा पहात होतो. तब्बल दीड वर्ष पाठपुरावा आणि प्रतिक्षा केल्यानंतर आज हा दिवस उजाडला होता. माझ्या मनात संमिश्र अशा भावना होत्या. एका वेगळ्याच-अनोख्या दुनियेत जायची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होतेय यासाठी मनात एक प्रकारची खळबळ माजली होती तर पहिल्यांदाच घरापासून, पुण्यापासून  आणि सह्याद्री-गडकोट यांपासुन लांब रहावं लागणार याची खंतसुद्धा होती. सोबतचे इतर सदस्यसुद्धा आपापल्या घरी फोन करून निरोप घेत होते. हे सर्व सुरु असतानाच इमिग्रेशन करून आम्ही आत गेलो. नंतर एका बसमध्ये बसून आम्ही विमानापर्यंत पोचलो. त्या खास बनावटीच्या विमानाला इतर विमानांपेक्षा वेगळं उभं केलं गेलं होतं. बसमधून उतरू लागताच सकाळपासून काळवंडलेल्या आभाळानं पाणी बरसवायला सुरुवात केली, पाऊस सुरु झाला. सह्याद्रीतल्या पावसाला मुक्तहस्ताने कवटाळणारा मी यापुढे १५ महिने पावसाला मुकणार होतो. म्हणूनच की काय असं वाटलं जणू काही तो फक्त माझ्यासाठीच, मला निरोप द्यायला आला होता.

आमच्याबरोबर 'ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षण, युनायटेड किंग्डम' या संस्थेचे काही सदस्य देखील होते. आम्ही सर्वजण विमानात चढलो. या विमानाची खासियत म्हणजे हे विमान डांबरी रस्त्यावरही चालू शकतं आणि बर्फावर उतरूही शकतं. ८० माणसं आणि २० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे विमान आम्हाला नव्या जगात घेऊन जाण्यासाठी सुरु झालं आणि बघताबघता दक्षिणेकडे झेपावलंसुद्धा. या विमानाला पुढे एक कॅमेरा लावला होता त्यामुळे आम्हाला समुद्रावरून, १०००० फुटावरून होणारा प्रवास डोळ्यांनी पाहता येत होता. त्याचबरोबर काहीजण हा प्रवास आपापल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करत होते. एकंदर पाच तासाच्या प्रवासानंतर वैमानिकाने सुचना दिली की "तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की आपण अंटार्क्टिका वर्तुळ (Antarctica Circle) छेदुन अंटार्क्टिकामध्ये प्रवेश केला आहे. कृपया सर्वांनी ध्रुवीय वेशभूषा (Polar Dress) परिधान करा."

गडद निळ्या रंगात दर्शविलेले - अंटार्क्टिका वर्तुळ (Antarctica Circle)

वैमानिकाने दिलेली सुचना ऐकताच मनात कुतूहल निर्माण झालं. आता आपण एका तासात अंटार्क्टिकामध्ये पोचणार. कसं असेल? काय असेल? किती थंडी असेल? अशा खुप साऱ्या प्रश्नांनी एकाच वेळी गर्दी केली. त्याच मनस्थितीमध्ये मी कपडे घालायला वळलो. या सर्व गरम कपड्यांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती 'डांगरी'. डांगरी पँट-शर्ट सारखी वेगवेगळी नसते, एक सबंधच पोषाख असतो पँट-शर्ट मिळुन झालेला आणि थंडीपासून बचाव व्हावा म्हणून नेहमीच्या कपड्यापेक्षा कापडही जाडजूड, म्हणुन डांगरी घालणं म्हणजे फार जिकिरिचं काम. सगळी गरम कपडे घालून झाल्यावर आम्ही अतिनील किरणांपासुन (Ultraviolet Rays) सरंक्षण व्हावं म्हणून सन क्रीम (Sun Cream) सुद्धा लावलं. आम्ही सीट बेल्ट लावुन समोरच्या स्क्रीनवर नजरा लावुन बसलो. अवघ्या काही मिनिटातच विमान उतरण्याची सुचना झाली. विमानातुन उतरताना आम्हाला काळा चष्मा घालायला सांगितला. अखेर विमान 'नोवो धावपट्टी (Novo Runway)' वर उतरलं. काळा चष्मा डोळ्यांवर चढवुन उत्साहाने मी जमिनीवर पाय ठेवला. जमीन? जमीन नव्हतीच ती. तो होता आइस शेल्फ (Ice Shelf). आइस शेल्फ म्हणजे अस्थायी बर्फ जो जमिनीवर-जमिनीला पापुद्र्यासारखा चिकटुन असतो. पहिलं पाऊल जेव्हा बर्फावर ठेवलं तेव्हा चंद्रावर उतरल्यासारखं भासत होतं, कारण जिकडे पाहिल तिकडे पांढरा शुभ्र बर्फच बर्फ दिसत होता. सुर्य प्रकाशसुद्धा लख्ख होता आणि दृश्यमानता (visibility) इतकी होती की ४० किलोमीटर दुरवरचं पाहु शकत होतो. आपण जणू काही बर्फाच्या वाळवंटामध्येच आलोय असं काही वेळ वाटू लागलं. आम्ही उतरलो त्यावेळी धावपट्टीवरचं तापमान होतं -७ अंश सेल्सियस. आयुष्यात पहिल्यांदाच उणे तापमान काय असतं ते अनुभवत होतो पण उत्साह इतका होता की तितकी थंडी जाणवलीच नाही. खुप दिवसांनी एक मोठं स्वप्न पुर्ण झालं होतं म्हणून त्याचा आनंदही तितकाच मोठा होता.

नोवो धावपट्टीवर उतरलेले विमान आणि माझे सहकारी 

डांगरी परिधान केलेला मी

आम्हाला घेण्यासाठी धावपट्टीवर मैत्री केंद्रातुन काही सदस्य आले होते. नोवो धावपट्टीपासुन मैत्री केंद्र अंदाजे ५-६ किलोमीटर आहे. त्यांच्यासोबत आम्हाला नेण्यासाठी त्यांनी तीन 'पिस्टनबुली' (PistenBully) गाड्या आणल्या होत्या. आम्ही मैत्री केंद्रामध्ये एक दिवस मुक्काम करून दुसऱ्याच दिवशी भारती केंद्राकडे कूच करणार होतो. एकूण २७ जणांपैकी आम्ही ११ जण 'भारती' केंद्रामध्ये जाणार होतो त्यामुळे आम्ही आमचं सामान धावपट्टीवरच ठेवणार होतो. सर्व सामानाची तपासणी करून आणि व्यवस्था लावुन आम्ही पिस्टनबुलीमध्ये बसुन मैत्री केंद्राकडे निघुन गेलो. मैत्री केंद्रात पोचलो तेव्हा तिथे तापमान होतं -१० अंश सेल्सियस. संपुर्णपणे लाकडापासुन बनवलेलं मैत्री केंद्र हे सन १९८९ पासुन कार्यरत आहे. मैत्रीकरांनी केंद्रात पोचल्यावर आमचं मनापासुन स्वागत केलं. मैत्री केंद्राबाहेर असलेल्या उन्हाळी लाकडापासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये (Summer Huts) आमची रहायची-झोपायची व्यवस्था केलेली होती. अशा प्रकारच्या एका झोपडीमध्ये ४ जण झोपू शकतात. या झोपड्यांमध्ये थंडीपासुन संरक्षण व्हावं यासाठी कुठलंच यंत्र किंवा उपाययोजना नव्हती. अंगावर पांघरण्यासाठी स्लिपिंग बॅग्स (Sleeping Bags) होत्या त्यामुळे -१० अंश सेल्सियस मध्येच आम्ही कशीबशी ती रात्र काढली.

भारताचे अंटार्क्टिकामधील १९८९ पासून कार्यरत असलेले केंद्र - मैत्री

भारती केंद्राला जाण्यासाठी आम्हाला दुसऱ्या दिवशी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजता धावपट्टीवर पोचलो. पण वैमानिकाने भारती केंद्राकडील हवामान खराब असल्यामुळे निघण्यास नकार दिला. वैमानिकाने त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता येण्यास सांगितलं. अंटार्क्टिकामध्ये हवामान खराब होणं ही नित्याची बाब आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं तटस्थ भावनेने, ठीक आहे असं म्हणून मैत्री केंद्रावर माघारी आलो. रात्री झालेली अपुरी झोप पुर्ण करून संध्याकाळी ४ वाजता पुन्हा आम्ही धावपट्टीवर पोचलो. पण तेव्हाही आमचा हिरमोड झाला, वैमानिकाने पुन्हा तेच कारण सांगत निघण्यास नकार दिला. त्याने आम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर २०१ ला पहाटे ३ वाजता या असं सांगितलं. या वेळी मात्र नाराज भावनेने आम्ही मैत्री केंद्रात परतलो. त्या झोपडीमध्ये वाजणारी बोचरी थंडी, पुर्ण झालेली झोप आणि हाताशी असणारा वेळ याचा साधकबाधक विचार करून आम्ही काही हौशी तरुणांनी मैत्री केंद्राजवळ असणाऱ्या बर्फाच्या गुहा पाहायला जायचं ठरवलं. जवळपास एक तासाची पायपीट करून आम्ही त्या गुहांजवळ पोचलो. जवळ गेल्यावर त्या गुहांची गंभीरता लक्षात आली. इथे उन्हाळा असल्यामुळे बर्फ हळू हळू वितळायला सुरुवात झाली होती. जर आम्ही गुहेत फार आतमध्ये गेलो आणि नशिबाने एखादा बर्फाचा तुकडा वितळल्यामुळे पडला तर माघारी यायची वाट बंद होणार होती. त्यामुळे आम्ही उसनं धाडस न करता माघारी फिरायचा निर्णय घेतला. अजुन नविन काहितरी पाहायला मिळालं म्हणुन आनंदी मनाने मैत्री केंद्रात परतलो आणि थोडंसंच जेवण करून आपापल्या झोपडीमध्ये जाऊन विसावलो.

निसर्गनिर्मित बर्फाच्या गुहा (Ice Caves)

नोव्हेंबर महिना असल्यामुळे पहाटे ३ वाजता काय आणि दुपारी ३ वाजता काय उजेडच उजेड होता, कारण त्यावेळी २४ तास सुर्य होता. यावेळी मात्र हेलपाटा होऊ नये यासाठी आम्ही मनोमन प्रार्थना करत होतो. आम्ही सर्वजण आधीच्या दोन वेळेसारखंच वेळेवर पोचलो होतो. आम्ही तिथे पोचल्यानंतर वैमानिकाने साधारण अर्ध्या तासाने हिरवा कंदिल दिला. सर्व सामान-सुमान विमानात चढवलं. पण या विमानाची फक्त ३ टन वजन वाहून नेण्याची क्षमता असल्यामुळे आम्हाला आमच्या बरोबर सगळं सामान नेता येईना. थोड्या विचारानंतर आम्ही कमी गरजेचं सामान मागे सोडायचं अशा निष्कर्षास पोचलो. त्याप्रमाणे आम्ही कमी गरजेचं सामान उतरवुन विमानात बसलो. वैमानिकाने विमानाचं इंजिन चालू केलं आणि थोड्याच वेळात उड्डाण भरलं. सरतेशेवटी एकदाचं आम्ही भारती केंद्राकडे निघालो होतो.


आम्हाला मैत्री केंदातून भारती केंद्रावर घेऊन जाणारे BT-67 विमान

मैत्री केंद्र आणि भारती केंद्र यातील अंतर आहे सुमारे २३०० किलोमीटर. आत्तापर्यंत केलेल्या प्रवासामध्ये सर्वात अवघड प्रवास तो हाच होता. कारण अंटार्क्टिकामधून हा प्रवास करावयाचा होता. विमानसुद्धा आरामदायक नव्हतं; त्याचा खुप जोराने येणारा आवाज, प्रशस्त नसलेली आसनं, एवढंच काय तर अगदी शौचालयसुद्धा नव्हतं. त्यात बिनभरवशाचं हवामान; कधी वादळ येईल किंवा बर्फवृष्टी होईल याचा नेम नाही. जर का निम्म्या प्रवासात असं काही घडलं तर वैमानिक जवळपास चांगली जागा बघुन विमान उतरवतात हे आम्ही ऐकून होतो पण खरंच असं झालं तर?, हा विचारसुद्धा करवत नव्हता. जर असं काही झालंच तर एक दोन दिवस निघावेत म्हणून विमानात स्लिपिंग बॅग्स सुद्धा होत्या.

साधारण चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही जपान देशाच्या 'स्वोया' (Swoya) नावाच्या केंद्रावर विमानात इंधन भरण्यासाठी थांबलो. जपानी मोहिमेचे सदस्य आमच्यासाठी प्यायला पाणी-ज्युस, खायला बिस्किट्स वगैरे घेऊन आले होते. इथे तर आमचं विमान वैमानिकाने चक्क गोठलेल्या समुद्रावर उतरवलं होतं. जेव्हा आम्हाला हे समजलं तेव्हा आम्ही आश्चर्यचकित तर झालोच पण मनात वैमानिकाबद्दल आदरयुक्त भावना निर्माण झाली. आम्ही इथे उतरलो तेव्हा फार ढगाळ वातावरण होतं. नुकतीच इथे बर्फवृष्टी होऊन गेली होती. विमानाचे चाकसुद्धा निम्मं बर्फामध्ये रुतलेलं होतं. याआधी एकदम सपाट धावपट्टीवरूनच विमानं उडतात आणि उतरतात हे पाहुन आणि ऐकुन होतो पण इथे मात्र एक वेगळंच चित्र दिसत होतं. इंधन भरून झाल्यावर आम्ही जपानी मोहिमेच्या सदस्यांचा निरोप घेऊन पुन्हा विमानात बसलो. त्या बर्फ साठलेल्या धावपट्टीवरून उडण्यासाठी अपेक्षित गती मिळावी म्हणून वैमानिकाने नेहमीच्या अंतरापेक्षा जास्त अंतर विमान चालवलं आणि अपेक्षित गती मिळताच विमानाने उड्डाण घेतलं. आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. भारती केंद्र आता फक्त ४ तास प्रवासाच्या अंतरावर राहिलं होतं.

जपानच्या स्वोया केंद्रावर 

भारती केंद्राकडे कूच करताना BT-67  विमानातला एक क्षण 

मैत्री केंद्रापासुनच्या प्रवासात आम्ही फक्त पांढरा शुभ्र बर्फ पहात होतो. कित्येक आइस शेल्फ आम्ही मागे टाकले होते. स्वोया केंद्रापासुन अंदाजे दोन तास प्रवास केल्यांनतर आम्हाला विमानामध्ये प्राणवायूची कमतरता जाणवू लागली. तशी सुचना आम्ही सहवैमानिकास करताच त्याने आम्हास आमच्या आसनाजवळच असलेल्या नळकांड्या देऊन प्राणवायूचा पुरवठा केला. त्यांनतर १०-१५ मिनिटांनी आम्ही प्राणवायू सिलेंडरविना नेहमीसारखा प्राणवायू घेऊ शकलो. त्यानंतर एक तासाभराने आम्हाला सततचा आइस शेल्फ दिसणं बंद होऊन मोठमोठे बर्फाचे डोंगर दिसू लागले. मागच्या ७ तासाच्या प्रवासात सतत आम्हाला नवीन काहीतरी पाहायला मिळत होतं. ते बर्फाचे डोंगर नसून गोठलेल्या समुद्रावर असलेले हिमनग (Ice-Berg) आहेत हे आमच्या जरा वेळाने लक्षात आलं. तितक्यात वैमानिकाने सुचना दिली की आपण अर्ध्या तासात भारती केंद्राजवळ असणाऱ्या प्रोग्रेस धावपट्टीवर (Progress Runway) पोचणार आहोत. सर्वजण एकमेकांकडे पाहुन आनंदाच्या भरात स्मितहास्य करू लागले. अर्ध्या तासात हा कंटाळवाणा प्रवास संपणार म्हणून मन आणि शरीर दोन्हीही प्रफ्फुल्लित झाले होते.  

बाहेर दिसणारे हिमनग आणि घड्याळाचे काटे पहात पहात अर्धा तास संपला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच काही माणसे हात हलवुन आमचं स्वागत करताना दिसली. आम्हाला घेण्यासाठी धावपट्टीवर भारती केंद्रातुन काही सदस्य आले होते. विमान एकदाचं प्रोग्रेस धावपट्टीवर उतरलं आणि आमची उतरायची लगबग सुरु झाली. भारती केंद्रातुन आलेल्या त्या ७-८ सदस्यांनी आमचे मनापासुन स्वागत केले. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्यापेक्षाही जास्त आनंद दिसत होता आणि त्याचं कारणही तसंच होतं. आमच्या येण्याने त्यांच्यासाठी घरी जाण्याचे मार्ग मोकळे झाले होते. तब्बल एक वर्ष अंटार्क्टिकासारख्या ठिकाणी राहिल्यामुळे त्यांना घरची ओढ खुणावत होती. आम्ही उतरताच त्या सर्वांनी अत्यंत प्रेमाने आमची गळाभेट घेतली, शिवाय आमचं सगळं सामान उतरवायला आणि पिस्टनबुलीमध्ये चढवायलादेखील त्यांनी मदत केली. त्यांनी एकूण तीन पिस्टनबुली गाड्या आणल्या होत्या. बोलता बोलता मला असं समजलं होतं की दोन पिस्टनबुली गाड्या जरा लांबच्या मार्गाने जाणार आहेत आणि त्यांना भारती केंद्रामध्ये पोचायला दोन तास लागणार आहेत, म्हणून मी त्या राहिलेल्या एका पिस्टनबुली गाडीतुन जाणं पसंत केलं. मी आणि माझे सहकारी ज्या पिस्टनबुली गाडीत बसलो होतो ती गाडी आडमार्गाने जाणार असल्यामुळे लवकर पोचणार होती. आम्ही आइस शेल्फवरून साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर एका ठिकाणी पोचलो त्याचं नाव होतं 'पिस्टनबुली ठिकाण' (PistenBully Point). इथे आम्ही ती पिस्टनबुली गाडी सोडून 'स्कीडू' (Ski-Doo) गाडीत बसलो, कारण पुढे खुप मोठा उतार होता ज्यावरून पिस्टनबुली नेणं अत्यंत धोकादायक होतं. आता पिस्टनबुली ठिकाणापासुन भारती केंद्र केवळ १५-२० मिनिटाच्या अंतरावर होतं. एवढ्या सगळ्या कंटाळवाण्या प्रवासात शरीर पुर्ण थकलं होतं, कधी एकदाचं पोचतोय असं झालं होतं. आम्ही लगेचच स्कीडू गाडी सुरु करून मार्गस्थ झालो. त्या भयंकर मोठ्या उतारावर आमच्यातील काही जणांना उतरायला सांगुन स्कीडू गाडी त्या सदस्याने कुशलतेने उतरवली. आता आम्ही पुढचा प्रवास गोठलेल्या समुद्रावरून करणार होतो. मुंबईपासुन आम्ही खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात केली होती. मुंबईपासुन सुमारे १६००० किलोमीटरचा प्रवास मागच्या दहा दिवसात झाला होता. आता थोड्याच वेळात आम्ही भारती केंद्रावर पोचणार होतो.

पिस्टनबुली गाडी

स्किडू गाडी

अवघ्या दहाच मिनिटात आम्हाला एक चढ चढत असताना एक पाटी दिसली - भारती : भारतीय संशोधन केंद्र (अक्षांश : ६९°२४.२७१ दक्षिण, रेखांश : ७६°१२.१४७ पुर्व). आता मात्र शरीरातला सगळा थकवा नाहिसा होऊन अंगात नुसता जोम चढला होता. दोन मिनिटात आम्ही ती टेकडी चढुन वर आलो आणि आम्हाला भारती केंद्राची इमारत नजरेस पडली. 

भारती केंद्र आणि आजूबाजूचा परिसर

भारती केंद्रामधील सर्व सदस्य आमच्या स्वागतासाठी मुख्य दरवाज्याजवळ उभे असल्याचं आम्ही पहिलं. डोळे आपोआपच भारती केंद्राच्या आजुबाजूचा परिसर न्याहाळत होते. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. घरून निघुन तब्बल दहा दिवसांनी ऐच्छिक ठिकाणी सुखरूप पोचलो होतो. मन अगदी समाधान पावलं होतं. 

मुंबई पासून ते भारती केंद्र असा प्रवासाचा Route Map

आता पुढचे १५ महिने हेच माझं घर, माझ्या कामाचं ठिकाण असणार होतं. आता मला अंटार्क्टिकामधील थंडी अनुभवायची होती, बर्फवृष्टी (Snow Fall) कशी असते ते पाहायचं होतं, इथे तयार होणारी वादळे झेलायची होती, पेंग्विन्स कसे दिसतात हे स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं, चोवीस तासाच्या असणाऱ्या दिवस-रात्री अनुभवायच्या होत्या, कुमेरु ज्योती (Aurora Australis) पाहून पृथ्वीवरच्या एका अप्रतिम सौंदर्याला आठवणींमध्ये साठवणार होतो. याच साऱ्या विचारात मी पायऱ्या चढून मुख्य दरवाज्यात पोचलो आणि सगळ्यांचं स्वागत स्वीकारू लागलो. मला नेमून दिलेल्या खोलीमध्ये सामान ठेऊन भूक नसतानासुद्धा पोटभर जेवण केले. माझा भारती केंद्रात पोचायचा प्रवास उत्तम झाला होता. या प्रवासात अनुभवलेल्या अविस्मरणीय आठवणींचा ठेवा मनाशी घट्ट करून गाढ झोपी गेलो.

उन्हाळा अंटार्क्टिकाचा


उन्हाळा म्हटलं की नजरेसमोर येतात अंगावर लागलेल्या घामाच्या धारा, भट्टीसारखे तापलेले रस्ते आणि जीवघेणा उकाडा. आपल्याकडे उन्हाळ्यात मे महिन्यात तर सुर्य जणू काही आगच ओकत असतो. या दिवसांत रणरणत्या उन्हात काम करणारे शेतकरी व कामगारसुद्धा झाडांचा आसरा घेऊ लागतात. शहरी भागात तर आज-काल एसी किंवा फॅन याशिवाय उन्हाळा निघूच शकत नाही. आजकाल तर ५० अंश सेल्सिअस (सर्वोच्च) तापमान हि तर उन्हाळ्यातली नित्याची बाब झाली आहे. असा हा उन्हाळा, जवळपास सर्वांनाच नकोनकोसा असलेला. पण याला अपवाद म्हणजे अंटार्क्टिका. इथला उन्हाळा आपणा सर्वांना हवाहवासा वाटेल असाच असतो. अंटार्क्टिका खंड म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात थंड ठिकाण असलेला प्रदेश. अंटार्क्टिकामध्ये दोनच मुख्य ऋतू आहेत. एक हिवाळा आणि दुसरा म्हणजे उन्हाळा. इथे आपल्यासारखा पावसाळा वगैरे काही नसतं. वर्षभरात इथे केव्हाही पाऊस म्हणजेच बर्फ पडतो. सतत उणे तापमान असल्यामुळे इथे कायम बर्फवृष्टीच होते.

अंटार्क्टिकाचा भौगोलिक नकाशा

अंटार्क्टिकामधला उन्हाळासुद्धा सुर्याच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. अंटार्क्टिका हे पृथ्वीच्या दक्षिण टोकाला असल्यामुळे, सुर्य या उन्हाळ्याच्या दिवसात २४ तास दिसतो म्हणजेच या काळात इकडे रात्र होतच नाही. पृथ्वी तिच्या अक्षापासुन २३.५ अंश झुकलेली असल्यामुळं इकडे आपल्याला अशी किमया पाहावयास मिळते. अंटार्क्टिकामध्ये उन्हाळ्यात दक्षिण ध्रुवावर सहा महिने म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च एकसारखा उजेड असतो आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी एकसारखा उजेड असतो. अंटार्क्टिका म्हणजे एक मोठं - महाकाय बेटच आहे, चारही बाजुंनी पाण्यानी वेढलेलं. तापमान सतत उणे असल्यामुळे हिवाळ्यात समुद्राचं पाणी किनाऱ्यापासुन एक ते दीड हजार किलोमीटर पर्यंत गोठतं आणि ते जमिनीचाच एक भाग होऊन जातं. यामुळे अंटार्क्टिकाचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट होऊन जाते. पुन्हा मग जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ वितळून पुन्हा त्याचे पाण्यात रुपांतर होते.

आत्तापर्यंतच्या निरीक्षणावरून तापमानाबाबत बोलायचं झालं तर इथलं वर्षभराचं सरासरी तापमान हे उणे तापमान आहे. समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात इथे सरासरी -१० अंश सेल्सिअस तापमान असते तर दक्षिण ध्रुव आणि आतील पठारी-पर्वतीय भागात सरासरी तापमान -६० अंश सेल्सिअस असते. उन्हाळ्यात मात्र समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागात हेच तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर जाते तर आतल्या भागात -३० अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोचते.


उन्हाळा हाच इथला काम करण्यासाठी उत्तम ऋतू आहे. जरी उणे तापमान असलं तरी हिवाळ्याच्या तुलनेने इथला उन्हाळा हा गरम मानला जातो. इथे उन्हाळ्यात नवीन संशोधन केंद्रांची उभारणी किंवा असलेल्या केंद्राची डागडुजी ही मुख्य कामे सर्वच देशांमार्फत केली जातात. उन्हाळ्यात संशोधनासाठी वेगवेगळ्या देशांचे शास्त्रज्ञ येऊ लागतात. दळणवळणासाठी हेच दिवस उत्तम असल्यामुळे विमानं उतरवण्यासाठी आईस शेल्फवर धावपट्ट्या तयार केल्या जातात आणि म्हणूनच जगातील सर्वांत धोकादायक धावपट्ट्या ह्या अंटार्क्टिकामध्येच आहेत. तसेच काही समुद्र किनाऱ्याजवळच्या केंद्रांवर मुख्य दळणवळण हे जहाजांद्वारे चालते. उन्हाळ्यात समुद्रावरचा बर्फ वितळून गेल्यामुळे जहाजे येणं सोपे होऊन जाते. त्यामुळे हिवाळ्यासाठी लागणारी संपुर्ण रसद ही जहाजांद्वारेच येते आणि मोहिमेतील बाकी सदस्यांची ये-जा विमानांमार्फत होते.


भारताची अंटार्क्टिकामध्ये कार्यरत असलेली दोन संशोधन केंद्रे आहेत - 'मैत्री' आणि 'भारती'. त्यातील भारती केंद्र हे समुद्रकिनारी आहे. इथेसुद्धा उन्हाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात असतो. या दिवसात नवीन सदस्य आणि जुन्या सदस्यांची अदलाबदल होते. मी भारती केंद्रामध्ये नोव्हेंबर २०१५ महिन्याच्या अखेरीसच पोचलो होतो. याच काळात चौतिसाव्या मोहिमेच्या सदस्यांची आपापल्या घरी जाण्याची घाई-गडबड होती. आम्ही नवीन सदस्य ज्या विमानाने आलो त्या विमानाने मागचे एक वर्ष अंटार्क्टिकामध्ये राहिलेले जुने सदस्य मायदेशी परत गेले. आम्हा नव्यानेच आलेल्या सदस्यांमध्ये बरेच जण शास्त्रज्ञ होते. अंटार्क्टिकामध्ये विज्ञानाच्या मुख्य शाखांपैकी पुढे दिलेल्या शाखांमध्ये भारतीय शास्त्रज्ञ काम करतात - हवामानशास्त्र, भूशास्त्र, भू-भौतिकीशास्त्र, भू-चुंबकीयशास्त्र, वायुमंडलीय भौतिकीशास्त्र, आण्विकशास्त्र, हिमनदशास्त्र, समुद्रशास्त्र, सुक्ष्म-वनस्पतीशास्त्र, सुक्ष्म जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, मानव शरीरशास्त्र आणि योगशास्त्र.

भारताची अंटार्क्टिकामध्ये कार्यरत असलेली दोन संशोधन केंद्रे

आम्ही इथे आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून सगळ्या शास्त्रज्ञांनी आपापलं वैज्ञानिक काम करायला सुरुवात केली. पण आम्ही पोचल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून बर्फवृष्टी सुरु झाली आणि ती जवळपास आठवडाभर सुरूच होती. त्यातल्या एका दिवशी तर वादळ पण सुरु झाले होते. त्या दिवशी पहिल्यांदा मी प्रतिताशी ७० किलोमीटर या वेगाचे वारे अनुभवले. आठवडाभरानंतर मात्र आम्हाला सुर्याचं दर्शन झाले. त्यानंतर काही शास्त्रज्ञांचे वैज्ञानिक काम हे केंद्राबाहेर असल्यामुळे स्किडू गाडीने ते त्यांच्या अपेक्षित ठिकाणी जाऊ लागले. मीसुद्धा माझ्या कामाला लागलोच होतो. पुढील पुर्ण वर्ष इथे रहायचं असल्यामुळे आणि केंद्राच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आम्हा चार अभियंत्यांवर असल्यामुळे केंद्रातील सर्व यंत्रणा समजावुन घेण्याच्या कामास आम्ही लागलो होतो. नंतर जसा जसा वेळ मिळेल तसं आम्ही अंटार्क्टिकाचा आनंद घेण्यासाठी फिरावयास जाऊ लागलो. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत तापमान साधारणपणे शुन्य अंश सेल्सिअस पर्यंत वाढले होते त्यामुळे भारती केंद्राच्या आसपास असणारे सर्व गोठलेले तलाव वितळू लागले होते. जिथे छोटे-मोठे खड्डे आहेत तिथे साचलेला बर्फ वितळून त्याचे पाणी होऊ लागले होते. कुतूहलापोटी मी एकदा ते पाणी पिऊन पाहिले. अतिशय गोड, चविष्ठ पण तितकंच थंड पाणी होते ते.

उन्हाळ्यात भारती केंद्राजवळच्या परिसरात तापमान सरासरी -१० ते ५ अंश सेल्सिअस असते त्यामुळे मध्यम थराचे कपडे घालुन बाहेर फिरू शकत होतो, डांगरी घालणे काही जरुरीचे नव्हते. पृथ्वीवर असणाऱ्या ओझोन वायूच्या थराला जे छिद्र पडले आहे ते अंटार्क्टिकाच्या वरच आहे, त्यामुळे सुर्यापासून येणारी अतिनील किरणे मानवी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात आणि म्हणून अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी आम्ही चेहऱ्यावर आणि इतर उघड्या शरीरावर सन क्रीम लावून बाहेर जात असू. पांढऱ्या शुभ्र बर्फामुळे आणि सुर्यप्रकाशाबरोबर येणाऱ्या अतिनील किरणांमुळे डोळ्यांना काही हानी होऊ नये यासाठी काळा चष्मा सतत डोळ्यावर असे. केंद्रापासून जर कधी लांब कामासाठी जायचे असल्यास संवाद साधण्यासाठी सदस्य वॉकी-टॉकी घेऊन बाहेर पडत असत.


ओझोन थराला पडलेले सर्वाधिक मोठे छिद्र - सप्टेंबर २००६

डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत सर्व तलाव पूर्णपणे वितळलेले होते. याही महिन्यात एक वादळ येऊन गेले होते. तेव्हा वाऱ्याचा कमाल वेग प्रतिताशी ९४ किलोमीटर इतका होता. दरवर्षीप्रमाणेच पृथ्वी २२ डिसेंबर २०१५ रोजी दक्षिणेकडे सर्वात जास्त कललेली होती. त्या दिवशी दिसणाऱ्या सुर्यप्रकाशाचे प्रमाण हे इतर दिवसांपेक्षा सर्वात जास्त होते. आम्ही भारती केंद्रावर पोचल्यापासून २४ तासांचा दिवस अनुभवत होतो म्हणजेच आम्ही पोचल्यापासुन सुर्य कधी मावळलाच नव्हता, भारती केंद्राभोवती तो फक्त गोलाकार फिरत होता. त्यातही आपल्याकडे संध्याकाळी ४ वाजल्यानंतर जसा सुर्यप्रकाश पडतो तसा सुर्यप्रकाश दिवसातुन बारा-चौदा तास पडत होता. आम्हा नव्याने गेलेल्या सगळ्यांसाठी हे सगळं अद्भुत, अद्वितीय होतं. डिसेंबर महिन्यात आम्ही निसर्गाची मजा तर घेतलीच पण केंद्रामध्येही आम्ही दोन-तीन सदस्यांचे वाढदिवस तसेच ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात साजरे केले.


उन्हाळ्यात टिपलेले भारती केंद्राचे हवाई दृश्य

२०१६ या नवीन वर्षाचा पहिला महिना आणि त्याचा दुसराच दिवस आमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. आम्हाला वर्षभरासाठी लागणारी संपुर्ण रसद घेऊन येणारं जहाज भारती केंद्रापासून अवघ्या अठ्ठावीस किलोमीटरवर येऊन पोचले होते. जहाज केप टाऊनपासून निघून या ठिकाणी पोचायला नऊ दिवस लागले होते. अतिशय आनंदाची बातमी होती ही. विनाजहाज इथे संपुर्ण वर्षभराचे सामान भरणं म्हणजे महाखर्चिक आणि जवळपास अशक्य काम कारण भारती केंद्राला येणारं विमान एका वेळी फक्त हजार ते बाराशे किलो वजनाचे सामान आणू शकते. जहाज आल्याची बातमी कळताच आम्ही सर्वांनी संवाद कक्षामध्ये असलेल्या रेडिओकडे धाव घेतली आणि रेडिओवरून जहाजावर असलेल्या सदस्यांचे स्वागत केले. थोड्या वेळाने जहाजावर असलेल्या हेलिकॉप्टरमधून आम्हाला भेटावयास जहाजाचे लीडर आणि कमांडर आले. त्यांचे स्वागत आम्ही आनंदाने केले.


समुद्रावरील बर्फाचा थर तोडून पुढे सरकताना जहाज

जहाज केंद्राजवळ आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून हेलिकॉप्टरने सामान येणे सुरु झाले. त्यात प्रामुख्याने पालेभाज्या, चिकन, अंडी, ज्युस, दुध आणि इतर खाण्याच्या पदार्थांचा समावेश होता. दिवसातून दोन-तीन वेळा हेलिकॉप्टर असे सामान आणून केंद्राच्या मुख्य दरवाज्यासमोर आणून उतरवत असे आणि मग सर्व सदस्य पाळीपाळीने ते सामान आतमध्ये घेऊन फूड स्टोअरमध्ये ठेवत असू. खाण्याचं काही सामान जसे कि मॅगी, बिस्कीट, चॉकलेट, पीठ, तांदूळ हे बाहेर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. खाण्याव्यतिरिक्त असलेले सामानसुद्धा बाहेर असलेल्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आले. मग जसे लागेल तसे आठवडाभरात आम्ही यातला सामान केंद्रामध्ये असलेल्या फूड स्टोअरमध्ये ठेवत असू. प्रत्येक जण स्वतःचं असलेलं काम सांभाळून सामान उतरवणे आणि चढवणे यात प्रामाणिकपणे भाग घेत होता. काही जुन्या सदस्यांनी या कामाला 'श्रमदान' असं खोचक पण अर्थपूर्ण नाव दिले होते. या कामाबरोबरच जहाजाबरोबर आलेल्या शास्त्रज्ञांची कामेसुद्धा सुरु झाली होती.


सामान उतरवताना हेलिकॉप्टर

जहाज केंद्रापासून जरी फक्त अठ्ठावीस किलोमीटर असले तरी ते काही एक-दोन दिवसात केंद्राजवळ पोचणार नव्हते कारण समुद्रावर असणारा बर्फाचा थर अजून वितळलेला नव्हता. समुद्रकिनारी पाणी जरा जरा जमायला सुरुवात झाली होती. तो पातळ थर तोडून जागोजागी समुद्री प्राणी - 'सील' उन्हाळ्याचा आस्वाद घेत पहुडलेले दिसत होते. या दिवसात समुद्रावर स्किडू किंवा पिस्टनबुली गाडी घेऊन उतरणं अत्यंत धोकादायक होते. अशातच डिसेंबर महिन्याच्या मध्यात असाच एक छोटासा अपघात झाला. काही शास्त्रज्ञांचे वैज्ञानिक काम असल्यामुळे ते समुद्रावरून स्किडू गाडीने जात होते. पण एके ठिकाणी बर्फाचा वरचा थर वितळल्यामुळे गाडीचा पुढचा भाग रुतून बसला. समुद्राच्या ऐन मध्यावर चिखलात रुतल्यासारखी स्किडू गाडी रुतल्याने सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी पटकन जवळ असलेल्या वॉकी-टॉकी वापरून केंद्राला झाल्या प्रकारची माहिती कळवली. लगेचच केंद्रामधून एक पिस्टनबुली घेऊन ४ सदस्य त्यांच्या मदतीस रवाना झाले. सर्व शास्त्रज्ञ आणि टीम सुखरूप स्किडू वरून उतरले होते. पिस्टनबुली अपघातस्थळी पोहोचली आणि स्किडू गाडी दोऱ्या बांधून पिस्टनबुलीने ओढून वर काढली. सर्व जण दोन्ही गाड्यांसह सुखरूप केंद्रामध्ये परतले. आणि तेव्हापासून समुद्रावर गाड्या चालवणे बंद केले गेले.

याच दरम्यान जहाज बर्फ तोडत तोडत हळूहळू पुढे सरकत होते. प्रतिदिवशी जहाज फक्त एक-दोन किलोमीटर प्रवास करत होते. अखेर तब्बल पंधरा दिवसांनी म्हणजे १८ जानेवारीला फक्त अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करून जहाज भारती केंद्राजवळच्या किनाऱ्याला लागले होते. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनपासून भारती केंद्रांपासून अठ्ठावीस किलोमीटर दूर हे अंतर म्हणजेच सुमारे साडेपाच हजार किलोमीटर अंतर जहाजाने फक्त नऊ दिवसात कापले पण बर्फाच्छदित असलेल्या समुद्राचे अठ्ठावीस किलोमीटर अंतर कापायला जहाजाला पंधरा दिवस लागले. म्हणजे विचार करा जर ऐन हिवाळ्यात जुलै महिन्यात जहाज यायचं झालं तर हजार-दीड हजार किलोमीटरवरचा बर्फ तोडायला जहाजाला किती दिवस लागतील?

जहाज ज्या दिवशी किनाऱ्याला लागले त्यादिवशी भारती केंद्रामध्ये जहाजामधून आलेल्या सर्व सदस्यांना मेजवानी देण्यात आली, मोठ्या उत्साहात त्यांचे सर्वांनी स्वागत केले. जहाज अठ्ठावीस किलोमीटर दूर असल्यापासून हेलिकॉप्टरने आलेल्या सामानाच्या निम्म्यापेक्षा जास्त सामान उतरवुन झाले होते. ज्या कामासाठी जहाज किनाऱ्याला लागणे अतिशय गरजेचं होते ते मोहिमेतील सर्वांत म्हणजे सर्वांत महत्वाचे काम जहाज आल्याच्या दुसऱ्याच दिवशीच सुरु झाले. जहाजावरील अधिकारी व खलाशी मिळून सर्वांनी शंभर मीटर पाईपलाईन टाकली आणि किनाऱ्याजवळच असणाऱ्या मोठ्या मोठ्या टाक्यांमध्ये इंधन भरायाचे काम सुरु झाले. जरी जहाज समुद्रकिनाऱ्याला लागलेले असले तरी आजूबाजूच्या बर्फावर माणसे चालू शकत होती आणि त्याच बर्फावरून ही पाईपलाईन टाकली होती. समुद्रावर गाड्या नेणं मात्र याआधीच बंद केलं होतं. हे इंधन भरायचे काम जवळजवळ दीड दिवस एकसारखे चालू होते. हेच इंधन वापरून जनरेटर वर्षभर कार्यरत ठेवायचं काम आम्हा अभियंत्यांच्या टीमकडे होते. जनरेटरपासून निघणाऱ्या गरम वाफेपासून संपूर्ण केंद्र गरम (साधारण वीस डिग्री सेल्सिअस) पर्यंत ठेवता येत असे. त्यामुळे सर्वांत महत्वाचं सामान उतरवून पूर्ण वर्षभराची काळजी मिटवली होती. 


भारती केंद्राजवळच्या किनाऱ्यालगत (बर्फावर) स्थिरावलेले जहाज

जहाज केंद्राजवळ लागल्यानंतर तीन दिवसांनी जहाजातील सदस्यांनी केंद्रातील सदस्यांना मेजवानीसाठी आमंत्रित केले. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जहाजामध्ये जाणार होतो. अखेर आम्ही सात-आठ जण रात्री आठ वाजताच्या सुमारास पण तिन्हीसांजेला असतो तशा सूर्यप्रकाशात जहाजाकडे चालत निघालो. समुद्रावरून चालत आम्ही जहाजावरुन सोडलेल्या मोठ्या लोखंडी शिडीवर चढून जहाजात प्रवेश केला. आत गेल्यावर सर्वांनी आमचे हस्तांदोलन करून स्वागत केले. मेजवानीला सुरुवात झाली. जहाजावर असताना चारही बाजूने बर्फ, बाहेर रात्री उणे असणारं तापमान पाहून हे सगळं एखाद्या सिनेमासारखं भासत होतं.

जहाज किनाऱ्याजवळ आल्याच्या आठवडाभरातच समुद्रावरचा संपुर्ण बर्फ वितळून गेला. एक महिन्यापुर्वी ज्या बर्फावर गाड्या चालत होत्या त्याचे पुर्णपणे पाण्यात रूपांतर झालेले होते. फक्त उन्हाळ्यासाठी संशोधनास आलेले शास्त्रज्ञ जानेवारी अखेरपर्यंत मायदेशी परतले होते. आम्हाला केंद्रातील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचे हस्तांतरण देण्यासाठी मागे राहिलेले मागच्या मोहिमेचे चार अभियंते मात्र मायदेशी जायचे अजून बाकी होते. ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघून गेले. आता संपुर्ण वर्षभरासाठी मी आणि माझ्याबरोबर असणारे अभियंते भारती केंद्र तांत्रिकदृष्ट्या सांभाळणार होतो. 


समुद्रावरचा बर्फ पुर्णपणे वितळून पाणी झाल्याचे दृश्य

जानेवारी संपेपर्यंत जहाजामधून या वर्षी लागणारे सर्व सामान उतरवून झाले होते. जहाजावरील शास्त्रज्ञांची थोडीफार कामे अजून बाकी होती म्हणूनच जहाज अजून मुक्कामास होते पण जहाजाचे लीडर आणि कमांडर यांनी जहाज माघारी निघण्याची तारीख ठरवुन निघण्याची तयारी सुरू केली होती. सर्व कामं आटोपल्यानंतर जहाज निघायच्या आदल्या दिवशी पुन्हा जहाजावरील सदस्यांना केंद्रातील सदस्यांतर्फे मेजवानी देण्यात आली. त्या दिवशी जहाजावरील सर्व सदस्यांनी केंद्रातच मुक्काम केला. आणि अखेर १२ फेब्रुवारी २०१६ रोजी जहाज मैत्री केंद्राकडे मार्गस्थ झाले. जहाज ५० किलोमीटर अंतरावर दूर गेले असताना जहाजावरील सदस्यांनी रेडिओद्वारे पुनःश्च आमचा निरोप घेतला.


जहाज परतताना


जहाज परतत असताना सर्वांमध्ये दुःखी भावना होत्या. आता आम्हाला पुढच्या वर्षी जहाज येईपर्यंत आहे त्या साधनसामुग्रीमध्ये राहायचे होते. संपुर्ण जगाशी आता आमचा संबंध पुढच्या नऊ महिन्यांसाठी तुटला होता कारण विमान नोव्हेंबर २०१६ आणि जहाज जानेवारी २०१७ मध्येच येऊ शकेन याबद्दल शंका नव्हती. जहाजाच्या जाण्याने अलिखित स्वरूपात उन्हाळा संपला होता. 

भारती केंद्रावर आता आम्ही फक्त तेवीस जण राहणार होतो. या पुढच्या नऊ महिन्यात आम्हाला जगाच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट हेच काय ते माध्यम होते. या काळात आम्ही भारती केंद्र सोडून कुठेही जाऊ शकणार नव्हतो, ना कोणी आम्हाला घ्यायलाही येणार नव्हते. आता आम्हाला अंटार्क्टिकामधील हिवाळा अनुभवायला मिळणार होता. उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाणाऱ्या तापमानाची तीव्रता आम्ही जाणून घेणार होतो. आठवडा-आठवडा चालणारी बर्फवृष्टी, वादळे यांचा आनंद घेणार होतो. इथे दिसणारा अरोरा म्हणजे तर आमच्यासाठी आकर्षणाचे केंद्रच होता. तसेच चोवीस तासांच्या रात्री म्हणजेच ध्रुवीय रात्री अनुभवायला मिळणार होत्या. ह्या सगळ्यात थोडी खुशी आणि थोडा गम या मनस्थितीमध्ये फेब्रुवारी महिना संपला होता. Game of Thrones या टीव्ही मालिकेत असणारे एक प्रसिद्ध वाक्य सतत मनात घोंगावत होते, ते म्हणजेच Winter is coming....

हिवाळा अंटार्क्टिकाचा - पूर्वार्ध

फेब्रुवारी अखेरपर्यंत उन्हाळ्यासाठी आलेले सर्व सदस्य मायदेशी परतले होते. आमच्यासाठी हिवाळा सुरु झाला होता. आम्ही हिवाळ्याची मनाशी पूर्ण तयारी करून होतो. आता आम्ही तेवीस जण हे केंद्र पूर्ण वर्षभरासाठी सांभाळणार होतो. आपल्याकडे टीव्ही सिरीयल मध्ये एक 'बिग बॉस' नावाचा कार्यक्रम दरवर्षी दाखवला जातो. त्यात शंभर दिवस काही सदस्य एकत्र एकाच घरात राहत असतात आणि त्या सर्वांचं त्या शंभर दिवसातलं राहणीमान, वागणं, बोलणं आणि वेगवेगळे खेळ दाखवले जातात. त्याच प्रकारचा खेळ अनुभवायला आम्ही तयार होत होतो. आम्ही आता संपूर्ण जगापासून पूर्ण वेगळे झालो होतो. आहे त्या साधन-सामुग्रीमध्ये आम्हाला हिवाळा काढायचा होता. आता आम्हाला खायचं सामान आणून द्यायला ना जहाज येणार होतं ना कुठलं विमान. आजारी पडलो, हात मोडला, पाय मोडला किंवा काहीही मोठा आजार उद्भवला तरी आम्हाला इस्पितळात न्यायला ना कोणी येणार होतं ना आम्ही स्वतःहून जाऊ शकत होतो. तसं छोट्या-मोठ्या आजारांसाठी आमच्या सदस्यांमध्ये एक सदस्य डॉक्टर होते आणि त्यांना मदतनीस म्हणून एक परिचारकही होता. पण तरीही या अशा ठिकाणी त्यांना पण मर्यादा होत्या आणि आपल्याला माहित आहेच कि एक डॉक्टर सर्व आजारांवर कधीच उपचार करु शकत नाही शिवाय इथे तर उपकरणेसुद्धा मर्यादित. त्यामुळे सर्वांना आपापली काळजी स्वतःच घ्यायची होती.

आमच्यामध्ये दोन सदस्य हे आचा-याचं काम करण्यासाठी म्हणून आले होते. आता तेच आमच्या पोटाची भूक भागवणार हाते. आम्हाला रोज सकाळी साडेआठ वाजता नाष्टा, त्यानंतर दुपारी एक वाजता आणि रात्री आठ वाजता जेवण मिळत असे. तसं पाहिलं तर केंद्रामध्ये सर्वांत जास्त वेळ काम या दोघांनाच असे. बाकी सदस्य आपापल्या कामात ठरवलं तर चालढकल करू शकत होते पण यांना तसं करून चालणार नव्हतं कारण शेवटी सगळ्यांच्या भुकेचा प्रश्न होता. म्हणून आमच्या लीडरने दोघांना जेवण बनवायचे काम वाटून दिले होते. संपूर्ण भारतीय पद्धतीचे जेवण आम्हास मिळत असे. त्यामुळे जेवण बनवण्याचा प्रश्न सुटला होता, आता प्रश्न होता तो स्वच्छतेचा. इथे प्रत्येक जण हा काही ना काही म्हणजेच संशोधनात्मक किंवा देखभाल-दुरुस्तीचे काम करणार होता त्यामुळे घरकाम वा साफसफाईसाठी वेगळा कोणी सदस्य आमच्याबरोबर नव्हता. लीडरने बनविलेल्या तक्त्याप्रमाणे आमच्यापैकी आळी-पाळीने एक जण दर दिवशी दिवसा स्वयंपाकघरात आचाऱ्यांना मदत करत असे आणि रात्री साफसफाईची कामे करत असे. साफसफाईमध्ये स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय आदी जागांचा समावेश होता. सर्व शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, तंत्रज्ञ आणि अगदी लीडरसुद्धा ही सर्व कामे करत असत. त्याचबरोबर आमचे मोहिमेचे लीडर रोज सकाळी नऊ वाजता सर्व सदस्यांची बैठक घेत असत. या बैठकीत आजच्या दिवसात कोण काय काम करणार हे ठरत होते आणि त्याप्रमाणे दैनंदिन कामे होत होती.


रात्रीच्या वेळी चित्रित केलेले भारती केंद्राचे छायाचित्र

सगळ्या सदस्यांनी आपापल्या नेमून दिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित केले होते. हिवाळ्यामध्ये सर्व उपकरणे व्यवस्थित चालावीत यासाठी आम्ही अभियंतेसुद्धा कामाच्या योजना आखत होतो. केंद्रातील उपकरणे संपूर्ण हिवाळ्यात कमीत कमी बिघाड होता कशी नियमित सुरु राहतील यासाठी आम्ही प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीची कामे सुरु केली. त्यामुळे आमची रोजची दिनचर्या नियमित झाली होती. मार्च महिन्याअखेरीस होळीचा सण आला. या मोहिमेतील बरेचसे सदस्य उत्तरेकडील राज्यांचे असल्यामुळे होळी साजरी करायची असे ठरले. त्याची परवानगी आमच्या लीडरनी विना आढे-वेढे घेता देऊन टाकली. कोणीतरी एका सदस्याने आधीच ठरवून की काय होळीची रंगत वाढविणारे रंग सोबत आणले होते. हे रंग सर्वांनी एकमेकांना लावून संपूर्ण देशाबरोबरच होळी हा सण उत्साहात साजरा केला. आमच्या आचा-यांनी त्या दिवशी छान चमचमीत जेवण बनवले होते. 

होळीचा सण साजरा करताना आमच्या मोहिमेचे सदस्य

असंच मागच्या महिन्यात आम्ही महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली होती. माझ्या माहितीप्रमाणे भारती केंद्रावर साजरी करण्यात आलेली ही पहिलीच शिवजयंती होती. शिवप्रतिमेचे पूजन करुन बर्फाळ प्रदेशात पारंपारिक भगवा ध्वजही आम्ही फडकवला होता. त्यावेळी आम्ही मराठी भाषिक सदस्यांनी उत्साहाच्या भरात घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याबरोबरच इतर सर्व सदस्यांनी आमच्या सूरात सूर मिसळत घोषणा दिल्या. "जय भवानी ! जय शिवाजी !" "जय भवानी ! जय शिवाजी !"

शिवजयंती साजरी करताना आमच्या मोहिमेचे सदस्य

बघता बघता कामे मार्गी लागत गेली आणि मार्च महिनाही संपला. या पूर्ण महिन्यात कामांमुळे आम्ही केंद्राच्या बाहेरही पडलो नव्हतो. रोज सकाळी ऊठून कामे करून आणि नियमित दिनचर्या पार पाडून व्यस्त दिवस गेले होते. आता कामेही फार नसल्यामुळे आम्ही तीन चार जणांचे समूह करुन बाहेर जात असू. भारती केंद्र हे समुद्र किनाऱ्यालगत  असलेल्या एका बेटावर असल्यामुळे फार लांब आम्हाला जाता येत नसे. या बेटाचे क्षेत्रफळ अंदाजे चार ते पाच वर्ग किलोमीटर इतके आहे. आता बाहेरील तापमान -१५ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले हेाते त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा बर्फ बनायला सुरुवात झाली होती. समुद्राच्या पाण्याचा पसारा मोठा असल्यामुळे आणि सततच्या वाऱ्यामुळे समुद्राच्या पाण्याचा बर्फ बनण्यास वेळ लागतो. तरीही समुद्राच्या पाण्यावर खूप सारे बर्फाचे पापुद्रे जमा झाले होते. आम्ही कधी कंटाळा आला तर केंद्राच्या गच्चीमधून समुद्रावर तरंगणारे हिमनग पाहत बसत असू. इंग्रजी भाषेत सांगायचं झालं तर A million dollar view असायचा हा.

A million dollar view

मार्च अखेरच्या दिवसात सूर्य बारा तास दिसत असे आणि बारा तासांची रात्र होत असे. पण दिवसा मध्यान्हाच्यावेळी सूर्य कधीच डोक्यावर येत नसे. तो नेहमी उत्तर दिशेला ४५ डिग्री मध्ये कललेला असे. भारती केंद्रासमोरील छोट्याशा बेटावर ऊगवणारा सूर्य हिमनगांच्या क्षितिजावर जाऊन मावळत असे. मी वेळ मिळत असे तेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त माझ्या कॅमेरात बंदिस्त करत असे.

भारती केंद्रापासून समोरच्या बेटावर होणारा सूर्योदय

हिमनगांच्या क्षितिजावर होणारा सूर्यास्त

एप्रिलमध्ये रोजच्या कामांबरोबरच सूर्योदय आणि सूर्यास्त पहायला जाणे हे नित्याचे झाले होते. तीन-चार दिवसाआड आम्ही चार-पाच जणांचा समूह बनवून या बेटावर फिरायला जात असू. या बेटावर एकूण सात तळी आहेत. याही तळ्यांवर पाण्याचा बर्फ मोठ्या प्रमाणावर झाला होता पण त्या बर्फावर चालणे अजूनही धोक्याचे होते. बेटावर असणा-या टेकडीवजा उंचवट्यावर जाऊन आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत असू. इथून उत्तरेकडे पाहिल्यास बर्फाचा थर घेऊन अथांग पसरलेला समुद्र तर दक्षिणेकडे पाहिल्यास हजारो वर्ष पडून पडून साचलेल्या बर्फाची पांढरीशुभ्र् चादर असे विलोभनीय दृश्य दृष्टीस पडे. 

बर्फवृष्टी झाल्यानंतर पांढरे शुभ्र दिसणारे भारती बेटावरचे टेकडीवजा शिखर

मे महिना सुरू झाला. आता मात्र दिवस आकुंचन पावून सहा तासांचा झाला होता. तब्बल अठरा तासांची रात्र आम्ही अनुभवत होतो. साधारण सकाळी नऊ वाजता सूर्य ऊगवत असे आणि दुपारी तीनच्या सुमारास सूर्य मावळतही असे. असंच हळूहळू रात्रीचे प्रमाण वाढत चालले होते. सर्व उपकरणे सुरळीत चालत असल्यामुळे कामे फार नव्हती तरीही दिनचर्या मात्र तीच होती. एकटेपणा जाणवू नये यासाठी सर्वजण एकत्र राहण्याचा प्रयत्न करत असू. कधी एकत्र सिनेमा बघत असू तर कधी टेबल टेनिस खेळत असू, कधी कॅरम तर कधी पत्ते आणि तीन-चार दिवसाआड केंद्राबाहेर फेरफटका मारायला जात असू. समुद्रावरचा बर्फ इतकाही घट्ट झाला नव्हता की त्यावर आम्ही चालू शकू. त्यामुळे एका बंदिस्त बेटावरचे जीवन आम्ही अनुभवत होतो. कधी कधी एक प्रकारे कारागृहामध्ये असल्याचा अनुभव येत असे. म्हणूनच की काय सर्वांचे कंटाळलेले चेहरे पाहून आमच्या लीडरने मे महिन्याच्या अखेरीस टेबल टेनिसच्या स्पर्धा आयोजित केल्या. त्या स्पर्धेमध्ये एक आठवडा असा निघून गेला.


एखाद्या अंतराळ स्थानकाप्रमाणे (Space Station) भासणारे भारती केंद्र

हिवाळा सुरु झाल्यापासूनच आम्ही सर्व सदस्य सकाळी सात ते आठ या वेळेत योगाभ्यास करत असू. सुरवातीपासूनच योगसाधना करत असल्यामुळे आम्हाला या धृवीय रात्रींमध्ये (Polar Nights) मन स्थिर राहण्यासाठी फायदा होत होता. मे महिन्याच्या अखेरपर्यंत केंद्राच्या परिसरातील तापमान हे -२५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोचले होते. केंद्राच्या बेटावरील सर्व तलाव तळापर्यंत गोठले होते. आम्ही त्या तलावांवर आता जमिनीवर चालतो तसे चालू शकत होतो. पण अशा गोठलेल्या तळ्यांवर चालताना फार काळजी घ्यावी लागत असे. कारण या बर्फावरचा स्नो जर वाऱ्यामुळे उडून गेला असेल तर हा जमलेला पूर्ण बर्फ गुळगुळीत झालेला असतो आणि खूप निसरडाही झालेला असतो.


एका गोठलेल्या तळ्यावर

रात्र पण खूप मोठी झाली होती. मेच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला फक्त एक तासाचा दिवस अनुभवत होतो. दिनचर्या मात्र घडाळ्याच्या काट्यावर नियमित चालू होती. मागच्या दोन-तीन महिन्यात मध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे आजूबाजूची सर्व बेटे, भारती केंद्राचा परिसर, समुद्रावर गोठलेला बर्फ आणि दक्षिणेकडील आईस शेल्फ हे सगळं शुभ्र् पांढरं पडलं होतं. ना कुठे झाडं ना कुठे इमारतं, ना कुठे रस्ता ना कुठे मनुष्य वस्ती. आम्ही खऱ्या अर्थाने हिवाळयांच्या मध्यान्हात प्रवेश केला होता. 


संपूर्ण पांढरा पडलेला भारती केंद्राचा परिसर

अखेर तो दिवस उजाडलाच, नाही नाही… दिवस नाही. ती होती रात्र. चोवीस तासांची रात्र. आज आमच्या इथे सूर्य उगवणारच नव्हता. मे महिना संपायला अजून तीन दिवस बाकी होते. आमच्या केंद्रावर धृवीय रात्री सुरु झाल्या होत्या. चोवीस तासांची रात्र जरी असली तरी भारती केंद्र हे समुद्रकिनारी असल्यामुळे सकाळी साडेअकराच्या सुमारास पाऊण तास आपल्याकडे तिन्हीसांजेला पडतो तसा थोड्या फार प्रमाणात उजेड पडत असे पण सूर्य मात्र उगवत नसे. पृथ्वीच्या दक्षिण धृवावर तर मार्चमध्येच चोवीस तासांची रात्र सुरु होते. या रात्रींमध्ये आणि तिथे कसल्याही प्रकारचे प्रदू्षण नसल्यामुळे अवकाशातील ग्रह-तारे स्पष्ट दिसत असत. त्यामुळे आम्ही केंद्रामधूनच खोलीच्या खिडकीमधून अवकाशातील ग्रह-तारे न्याहाळत असू. या दिवसांत केंद्राबाहेर जाऊन करायची सर्व कामे बंद झाली होती. आत्तापर्यंत नियमित सुरु असलेल्या दिनचर्येमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे रात्री खूप उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. मानसिक संतुलन आवर्जून, ठरवून व्यवस्थित ठेवावे लागत होते. काही सदस्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला होता. लगेच व्यक्त होणे किंवा एकटे-एकटे राहणे असे काही सदस्यांचे प्रकार सुरु होते. या रात्रींमध्ये काही काही सदस्य तर आठवडा-आठवडा दिसायचेच नाही, सतत आपापल्या खोल्यांमध्ये पहुडलेले असायचे. अशातच Mid-winter day दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला. दरवर्षी २१ जून या दिवशी पृथ्वी उत्तरेकडे सर्वात जास्त कललेली असते. या दिवसानंतर पृथ्वी दक्षिणेकडे कलायला सुरवात होते. म्हणून अंटार्क्टिकामध्ये २१ जून हा दिवस Mid-winter day म्हणून साजरा केला जातो. अंटार्क्टिकामधील इतर केंद्रांप्रमाणेच आम्हीदेखील Mid winter day उत्साहात साजरा केला. तसेच भारती केंद्रापासून अंदाजे नऊ ते दहा किलोमीटर पूर्वेकडे असणाऱ्या चीन आणि रशियाच्या केंद्रांना आमच्या लीडरने रेडिओवरुन शुभेच्छा दिल्या.


Mid-winter day साजरा करताना आमच्या मोहिमेचे सदस्य

आता केंद्राबाहेर तापमान रोज -३० ते -३५ डिग्री सेल्सिअस असायचे. रात्र तर ग्रह ताऱ्यांनी उजळून निघायची. एके रात्री याच धृवीय रात्रींमध्ये सर्वांत हवीहवीशी गोष्ट बघायला आम्ही सात-आठ जण तरुण एका रात्री बाहेर पडलो. डांगरी, कानटोपी, तोंडाला बंडाणा (Buff), पायात जाड मोजे आणि त्यावर बूट घालून आम्ही बाहेर पडलो. बाहेर मस्त बर्फाचा सडा पडलेला होता. चालताना पाय अर्ध्या-पाऊण फुटापर्यंत गाडत होते. केंद्रामधल्या दिव्यांचा ऊजेड दिसणार नाही अशा ठिकाणी पण केंद्राजवळच आम्ही जाऊन थांबलो. त्या अंधारात आकाशात ऑरोरा दिसत होता. एक मोठ दिव्य होतं ते आमच्यासाठी. ऑरोरा म्हणजे आकाशात रात्रीच्या वेळी हिरव्या रंगाचा प्रकाश दिसतो. जसे आपल्याकडे पावसाळ्यात इंद्रधनुष्य पहायला मिळते, तसे अंटार्क्टिकामध्ये रात्रीच्या वेळी ऑरोरा पहावयास मिळतो. ऑरोरा म्हणजे आपल्या भारतीयांसाठी एक स्वप्नवत गोष्ट आहे कारण आपला देश पृथ्वीच्या कर्कवृत्तावर येतो त्यामुळे ऑरोरा आपल्याकडे कधीच दिसत नाही. त्या रात्री आम्ही आकाशाला नजर लावूनच बसलो होतो. सर्व सदस्य आपापले फोटो ऑरोराबरोबर काढून घेत होते. ज्या रात्री ऑरोराचा प्रभाव जास्त असेल तेव्हा आकाशात एक प्रकारचा हिरवा रंग नाचत आहे असा भास होतो. ज्या गोष्टीची आम्ही गेले सहा महिने आतूरतेने वाट पहात होतो ती गोष्ट आम्हाला आज पहायला मिळत होती. याबरोबरच आकाशातील ग्रह-तारे तर दिसतच होते पण आकाशगंगाही स्पष्ट नजरेस येत होती. या दिवसात ऑरोरा सतत दिसत असल्यामुळे आम्ही ज्या दिवशी त्याचा प्रभाव जास्त असेल तेव्हाच ऑरोरा पहाण्यासाठी बाहेर पडत असू. नंतर इतका ऑरोरा पाहिला की, आम्ही बाहेर जाण्यापेक्षा खिडकीतूनच ऑरोरा पाहणे पसंत करत असू. 

केंद्राजवळ दिसणारा ऑरोरा

आकाशगंगेसोबत चित्रित केलेला ऑरोरा

भारती केंद्रासोबत चित्रित केलेला ऑरोरा

आमच्या बरोबर हवामान खात्याचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी एकेदिवशी चहा पीत असताना 'Water creats clouds' हा एक अंटार्क्टिकाच्या वातावरणात घडणारा नैसर्गिक चमत्कार सांगितला. जेव्हा वातावरणाचे तापमान हे -२५ डिग्री सेल्सिअसच्या कमी म्हणजे -२८, -३० किंवा -३५ डिग्री सेल्सिअस वगैरे असेल तेव्हा गरम उकळलेले पाणी जर त्या थंड वातावरणात फेकले तर त्या पाण्याची लगेचच वाफ होते आणि त्याचे ढगांत रूपांतर होते. मग काय? लागलो प्रात्यक्षिक करायच्या तयारीला. यासाठी गरम पाणी एका कपात घेवून केंद्राच्या इमारतीच्या गच्चीवर गेलो. ते गरम पाणी मोकळया हवेत भिरकावून दिले. आणि खरोखरच एक चमत्कार झाल्यासारखं त्या गरम पाण्याचे एका सेकंदाच्या आतंच ढगात रुपांतर झाले. हा सारा प्रकार चमत्कारीक पण गमतीशीर वाटला. पुन्हा प्रात्यक्षिक करण्यासाठी गरम पाणी घेवून आलो. पुन्हा हवेत पाणी भिरकावल्यावर पुन्हा ढग तयार झाला. असा गमतीशीर खेळ आम्ही दोन-तीन रात्री खेळत होतो.

गरम पाण्यापासून तयार केलेला ढग

Mid-winter असल्यामुळे त्या आठवड्यात वारेही जोरात वाहत होते. त्याच आठवड्यात एका दिवशी तापमान -३९ डिग्री सेल्सीअस इतके कमी होते आणि हे तापमान त्या वर्षातील भारती केंद्रातील सर्वात कमी तापमान म्हणून नोंदविले गेले. जसं आम्हाला हे समजलं की आज या वर्षातील सर्वात कमी तापमानाचा दिवस आहे तसं आम्ही केंद्राबाहेर जायचं ठरवलं. पूर्ण पोषाख चढवून आम्ही टेकडीवजा शिखरावर पोचलो. त्याच दिवशी वारेही जास्त प्रमाणात वाहत असल्यामुळे भासणाऱ्या तापमानाचा आकडा (Feeling Temperature) -५१ डिग्री सेल्सीअसपर्यंत गेला होता. आम्ही टेकडीवर पोचलो खरे पण अतिशय कमी तापमानामुळे श्वासोच्छवासाच्यावेळी नाकाजवळ बर्फ जमू लागला. डोळ्याच्या पापण्या, डोळ्याच्या खोबण्या यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या अंशाचादेखील बर्फ बनू लागला. त्यामुळे डोळे उघडझाप करताना त्रास होवू लागला. कोणोकोणाला डोकं गच्च होऊन बधीर झाल्यासारखे वाटू लागले. हाताची बोटे आणि पायाची बोटे थंड पडू लागली. सर्वांनाच असा त्रास होऊ लागल्यामुळे आम्ही परतायचा निर्णय घेऊन लगेचचं टेकडी उतरायला सुरवात केली. केंद्रामध्ये अत्याधुनिक कार्यप्रणालीमुळे २० डिग्री सेल्सीअस पर्यंत तापमान असते. केंद्रामध्ये आल्यावर सर्व शरीर सुरळीत व्हायला जवळपास अर्धा तास गेला खरा पण हा असा अनुभव पुन्हा होणे नाही.

-५१ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चेहऱ्यावर जमलेला बर्फ

आज तब्बल ४९ दिवसानंतर आमच्या इथे सूर्य उगवणार होता. त्याची उगवण्याची वेळ होती सकाळी ११ वाजून ५० मिनिटे. आमच्यासाठी नवीन आशेचा किरण घेऊन आलेल्या सूर्यदेवांनी आपली वेळ अचूक साधली.  आजच्या दिवशी आमच्या चोवीस तासांच्या धृवीय रात्री संपल्या होत्या. केंद्रामध्ये सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. इथून पुढे असंच सूर्यनारायण उगवणार होते आणि मावळणारही होते. पुढच्या चार महिन्यात आमच्यापैकी काही सदस्यांना मायदेशी पोचण्याची संधी मिळणार होती. त्याबाबत काही सदस्यांमध्ये सुरु असलेली चर्चाही कानावर पडत होती. अर्धा हिवाळा आम्ही उत्तमरित्या पार पाडला होता. सर्वजण खुप खूष होते. एकमेकांना हस्तांदोलन करून, गळाभेट घेऊन एकमेकांचे अभिनंदन करत होते. केंद्रामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण झाले होते. या साऱ्या कार्यक्रमातच सूर्य मावळला सुद्धा होता. पहिल्या दिवशी फक्त पंधरा मिनिटांसाठीच सूर्यदेवांनी आम्हाला दर्शन दिले होते. पण तरीही सर्वांचे चेहरे सूर्याच्या तेजामुळे उजळून निघाले होते. 

४९ दिवसानंतरचा सूर्योदय

हिवाळ्यात अजून एक मोठी गोष्ट आमच्याबरोबर घडायची राहून गेली होती. ती म्हणजे वादळ. तसे आम्ही भारती केंद्रात आल्यापासून खुप वादळे पाहिली होती पण मोठं आणि खुप दिवस चालणारं वादळ अजून पाहायला मिळालं नव्हतं. तेही दान लवकरच पावलं. धृवीय रात्रीनंतर पहिल्यांदा सूर्योदय झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच वादळाला सुरुवात झाली. वादळाबरोबरच बर्फवृष्टीदेखील सुरु झाली. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता म्हणून जोरजोरात वारे वाहत होते आणि बर्फवृष्टीपण सुरु झाली होती. तीन-चार दिवस झाले वादळ येऊन पण ते थांबायचं काय नावंच घेईना म्हणून हवामान शास्त्रज्ञांकडे विचारायला गेलो असता त्यांच्याकडून एक माहिती समजली. त्यांनी सांगितलं आज या वर्षातील वाऱ्याचा वेग हा सर्वाधिक आहे, ८७ किलोमीटर प्रतितास... माझ्या सोबत आलेल्या अभियंत्याने माझ्याकडे पाहून आश्चर्यचकित होऊन डोळेच विस्फारले. बापरे ! मग काय ? लागलो तयारीला... सोबतीला अजून तीन चार जणांना तयार केलं. धृवीय पोषाख चढवला आणि पडलो बाहेर हवा खायला. नव्हे.. वारं खायला... केंद्राचा मुख्य दरवाजा उघडला तर हे बर्फ (Snow) वाऱ्याबरोबर उडून आत आला. लगेचच बाहेर पडून दार लावून घेतलं. बाहेर soft snow सगळीकडे पसरला होता. चालताना पाय काही ठिकाणी एक फूट, काही ठिकाणी दोन फूट तर काही ठिकाणी तीन फूटांपर्यंत स्नोमध्ये आत जात होते. वाऱ्याच्या वेगामुळे स्नोचे बारीक बारीक कण उडत होते त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा-वीस फूटावरचंच दिसत होतं. त्यात वाऱ्याचा वेग हा एवढा प्रचंड की सरळ उभं कुणी राहूच शकत नव्हतं म्हणून मग सर्वजण एकमेकांना धरून चालत होतो. त्यामुळे कोणी जर एकटा मागे राहिला तर तो भरकटलाच म्हणून समजा.


८७ किमी प्रतितास असलेल्या वादळामध्ये

हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी त्यांची संशोधनाची उपकरणे केंद्रापासून २०० मीटर अंतरावर एका Hut मध्ये ठेवली होती. अशा परिस्थिती तिकडे जाण्याची वेळ आलीच तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी केंद्रापासून या Hut पर्यंत एक दोरी बांधून ठेवली होती. ह्याच दोरीचा आधार घेत आम्ही त्यांच्या Hut पर्यंत जाऊ शकलो. त्या Hut मध्ये थोडा वेळ थांबून आम्ही परत दोरी पकडत केंद्रामध्ये माघारी आलो. 

क्रमशः

हिवाळा अंटार्क्टिकाचा - उत्तरार्ध

एके दिवशी पूर्वेकडील चीनच्या 'झोन्गशान' नावाच्या केंद्राच्या लीडरचे आमच्या लीडरना स्नेहभोजनासाठी आमंत्रण आले. त्याप्रमाणे आमच्या लीडरने सोबत दहा जणांची निवड केली. समुद्र गाड्या चालवण्यासाठी अजून खुला झाला नव्हता त्यामुळे आम्ही प्रोग्रेस धावपट्टीमार्गे आईस शेल्फवरून जाण्याचा निर्णय घेतला. प्रोग्रेस धावपट्टी हीदेखील आईस शेल्फचाच एक भाग आहे. थोड्या वेळाने आम्ही आईस शेल्फ मागे टाकत  डोंगर-दऱ्यांच्या प्रदेशातून जाताना एका घाटमार्गाला लागलो. या छोट्याश्या घाटात एके ठिकाणी मात्र तीव्र चढ होता. त्या चढाजवळ आम्ही निम्मे जण पिस्टनबुलीमधून पायउतार होऊन चालत गेलो. साधारण ५०-६० अंशाचा तो चढ चढून आम्ही उंचवट्यावर आलो. समोर पाहतो तर आहाहाहा ! काय नजारा होता. वाह ! मन अगदी प्रफुल्लित झाले. समोर नुकत्याच गेलेल्या उन्हाळ्यात वेगळे झालेले हिमनग आईस शेल्फपासून दिसत होते. तो क्षण इतका सुंदर होता कि पापण्या झाकतच नव्हत्या. पण तरीही लीडरच्या आदेशानुसार इच्छित स्थळी रवाना झालो. 

  चीन देशाच्या केंद्रावर जाताना दिसणारा हिमनगांचा परिसर

थोड्याच वेळात आम्ही झोन्गशान केंद्राजवळ पोचलो. चिनी लीडर आणि त्यांचे सदस्य आमच्या स्वागतासाठी दारामध्ये उभे होते. आम्ही वेळ न दवडता लगेचच हस्तांदोलन करून त्यांच्या केंद्रामध्ये प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम ज्यूस देऊन आम्हास त्यांचे केंद्र दाखवण्यास सुरुवात केली. चिनी सदस्यांमध्ये एक-दोन सदस्यांनाच इंग्रजी भाषा बोलता येत होती. त्यामुळे ते दुभाष्याचं काम करत होते. भारती केंद्राच्या बांधणीत आणि या केंद्राच्या बांधणीत असणारा फार मोठा फरक आम्हाला जाणवत होता. चिनी सदस्यांनी त्यांच्या भोजन कक्षामध्ये छान लाल रंगाची सजावट केलेली होती. तो लाल रंग डोळ्यात असा सारखा भरत होता. आम्ही तब्बल पाच महिन्यानंतर बाहेरील माणसांना भेट देत होतो. इतके दिवस आम्ही आमचं बेट सोडून कुठेच गेलो नव्हतो ना कोणी आमच्याकडे आलं होतं. त्यांनी आमच्या पाहुणचारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मासे, चिकन, मटण तळले होते. ब्रेड, टोस्ट, केक असे बेकरी प्रकारातील खाद्यही होते तसेच मद्यपान करणाऱ्यांसाठी देखील व्यवस्था केली होती. त्यांच्या केंद्रामध्ये भरपेट भोजन घेऊन आणि पाहुणचार घेऊन त्यांनाही भारती केंद्रात येण्याचे निमंत्रण देऊन गेलो त्याच मार्गाने पुन्हा माघारी भारती केंद्रात आलो. 

चीन देशाचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - 'झोन्गशान'

त्यानंतर पुढच्या आठवड्यातच रशियन केंद्र - 'प्रोग्रेस' मधून आम्हाला स्नेहभोजनाचं आमंत्रण आले. रशियन आणि चिनी देशांची केंद्रे ही एकमेकांजवळच आहेत, साधारण एक किलोमीटरच्या अंतरावर. म्हणून मग आम्ही मागच्या वेळी चीनच्या केंद्रामध्ये गेलेलो त्याच रस्त्याने गेलो. रशियन लीडरनेही दारातच आम्हा सर्वांचे स्वागत केले. यांचेही एक-दोन सदस्यच तोडकं-मोडकं इंग्रजी बोलू शकत होते. भारती केंद्र आणि प्रोग्रेस केंद्र या दोन्ही केंद्राचं परंपरागत एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर आपण एखाद्या मित्राच्या घरी आलो आहोत असा भास झाला. तिथेही आम्ही पूर्ण केंद्राचा फेरफटका मारून थंड पेये घेतली. थोडा वेळ आम्ही तिथे टेबल टेनिसही खेळलो. काही वेळाने दोन-तीन रशियन सदस्यांबरोबर लुडो हा खेळही खेळलो. ना आम्हाला कोणाला रशियन भाषा येत नव्हती ना त्यांना कोणाला हिंदी आणि इंग्रजी. तरीही हा खेळ खेळताना फार गमती-जमती झाल्या. त्यानंतर त्यांनी केलेल्या भोजनाचा आनंद घेऊन भारती केंद्रात माघारी परतलो. 


रशिया देशाचे अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्र - 'प्रोग्रेस'

जुलै अखेरीस समुद्र चालण्यासाठी किंवा गाड्या चालवण्यासाठी खुला होतो, असा दरवर्षीचा कल असे. पण आमच्या केंद्रामध्ये तशी चाचणी करण्याकरिता काहीच उपकरणे नव्हती. दरवर्षी अशी चाचणी करण्याचा मान रशियन केंद्राला असे. उत्तर रशियामध्ये असेच थंड वातावरण असल्यामुळे रशियन केंद्रातील सदस्य या गोष्टींमध्ये जास्त पारंगत असतात. त्यामुळे एकदा की रशियन सदस्यांच्या गाड्या समुद्रावर फिरताना दिसल्या की, भारती केंद्राच्या गाड्या समुद्रावर प्रवेश करत असत. भारती केंद्र नव्याने सुरु झाल्यापासून हीच परंपरा पडली होती. त्यामुळे आमचे लीडरही वरचेवर रशियन केंद्राशी संपर्क साधत होते. 

आणि अचानक एक दिवस कोणाला तरी एक रशियन पिस्टनबुली समुद्रावरून भारती केंद्राकडे येताना दिसली. त्या सदस्याने ही माहिती लगेचच रेडिओ कक्षाकडे पोचवली. मग संपूर्ण केंद्रात ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. थोड्याच वेळात चार रशियन सदस्य केंद्राच्या दारात पोचले. आमचे लीडर स्वतः त्यांच्या स्वागतासाठी गेले. त्यांना भोजन कक्षात नेऊन त्यांचा यथोचित पाहुणचार केला. समुद्रावर गाड्या कुठल्या भागात चालू शकतात, कुठल्या भागात नाही हे सांगायला ते आले होते. त्यामुळे आता आम्हीही आमच्या पिस्टनबुली, स्किडू या गाड्या समुद्रावर घेऊन जाऊ शकणार होतो, यात शंकाच नव्हती. 

रशियन सदस्यांची स्वदेशी बनावटीची पिस्टनबुलीसारखी गाडी

रशियन सदस्य येऊन गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारती केंद्राच्या परिसरात एक छोटंसं वादळ आलं. या वादळात वाऱ्याचा वेग अंदाजे पन्नास किमी प्रतितास असा असावा. आधी अनुभवलेल्या वादळापेक्षा फार कमी. पण जो स्नो पसरला होता भारती बेटावर तो पाहून बाहेर जाऊन येऊच म्हटलं जरा. म्हणून आम्ही सहा जण बाहेर पडलो. प्रत्येक वेळी नवीन भासणारा हा परिसर. आपण बाहेर पडायचं, एखाद्या उंचवट्यावर जाऊन शांतपणे सूर्यास्त पहात बसायचं तर कधी हिमनगे मोजत बसायचं. कोणता हिमनग मोठा आहे, कोणता जास्त लांब आहे, हे मोजायचं. मनसोक्त फिरायचं, निसर्गाची नवीन नवीन रूपं नजरेत साठवायची आणि केंद्रात माघारी यायचं. 

वादळामध्ये चालत असताना

रशियन सदस्य भारती केंद्रामध्ये येऊन गेल्यापासून गोठलेल्या समुद्रावर कधी जातोय असं झालं होतं. सुदैवाने काल आलेलं वादळ काल रात्रीच शमलं होतं त्यामुळे आज आम्हाला समुद्रावर जाण्यापासून कोण रोखू शकणार नव्हतं. मी, एक आचारी आणि एक इसरोचे शास्त्रज्ञ असे तिघे जण गोठलेल्या समुद्रावर चालायला निघालो. आज आम्ही खूप दिवसाच्या सुट्टीनंतर समुद्रावर चालायला फिरायला जाणार होतो. कधी एकदा समुद्रावर जातोय असं झालेलं. भारती बेटाचा उतार संपवून आम्ही समुद्रावरच्या बर्फावर उतरते झालो. गोठलेल्या समुद्रावर चालत जाण्याची ही या हिवाळ्यातील पहिलीच वेळ असल्याने थोडी भीती वाटत होती. एकेक पाऊल अंदाज घेऊन टाकत होतो. शंभर एक मीटर एकदाचा किनारा सोडून जरा आतमध्ये गेल्यावर मात्र प्रफुल्लित झालो. आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. अंटार्क्टिकामध्ये दृश्यमानता अधिक असल्यामुळे लांबच्या गोष्टीही जवळ भासतात आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आत्ताही आला. भारती बेट आणि त्यासमोरचे बेट यामध्ये बरोबर मध्यभागी जायला आम्हाला आम्ही अंदाज बांधलेल्या वेळेपेक्षा तीनपट वेळ लागला होता. म्हणून जास्त लांब न जाता माघारी फिरून भारती बेटाजवळच येऊन आम्ही फिरू लागलो. सूर्यास्त होत असल्यामुळे आजूबाजूच्या बेटांवर छान तांबडं ऊन पडलं होतं. भारती केंद्रही समुद्रावरून फार वेगळे भासत होते. 

समुद्रावरून दिसणारे भारती केंद्र आणि आजूबाजूचा परिसर

या आठवड्यात पहिल्यांदाच या वर्षातील चिनी मोहिमेचे सदस्य आणि रशियन मोहिमेचे सदस्य भारती केंद्रास भेट देऊन गेले होते. त्यांनी आमचा केला तसाच त्यांचा पाहुणचार आम्हीही केला होता. तसेच आमच्याही केंद्रातील राहिलेले सदस्य त्यांच्या केंद्रांना भेट देऊन आले होते. स्वातंत्र्यदिन जवळ येऊ लागला होता. अंटार्क्टिकामध्ये राष्ट्रीय सण साजरी करायची ही माझी दुसरी वेळ होती. याआधी उन्हाळ्यात आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला होता. तीन-चार दिवस आम्ही श्रमदान करून केंद्राचा कानाकोपरा स्वच्छ केला. आदल्या दिवशी सर्वांनी मिळून कार्यक्रमाची रूपरेषाही ठरवली. चिनी आणि रशियन केंद्रांना या सोहळ्यास निमंत्रणही दिले होते. चिनी आणि रशियन सदस्य वेळेत पोहोचले त्यामुळे आम्ही वेळेत म्हणजेच सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण केले. बर्फाळ प्रदेशात तिरंगा फडकावयाचे भाग्य लाभले यामुळे कृतकृत्य झालो. आम्ही उत्तमरीत्या ध्रुवीय रात्री काढल्यामुळे आम्हा सर्व भारतीय मोहिमेच्या सदस्यांना तीनही देशांच्या लीडर्सचे स्वाक्षरी असलेले 'अंटार्क्टिक पोलर एक्सप्लोरर' हे प्रमाणपत्र याच दिवशी देण्यात आले. हे प्रमाणपत्र घेताना आपोआपच अभिमानाने छाती फुलून आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे खाण्या-पिण्याचा कार्यक्रम झाला. चिनी आणि रशियन सदस्यांना भारतीय पद्धतीची मेजवानी खूपच आवडली होती. 

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण झाल्यावर सर्व सदस्यांचे सामूहिक छायाचित्र

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अखेर आमच्या लीडरने आम्हाला हिमनग बघायला जाण्यासाठी परवानगी दिली. या दिवसासाठी आम्ही सर्वजण फार उत्सुक होतो. पिस्टनबुलीमध्ये दरवाजे बंद केल्यावर जास्त गार वाटत नसे आणि मोठी असल्याने कुठे रुतण्याची पण संधी नाही, त्यामुळे आम्ही पिस्टनबुली गाडी सोबत घेऊन जाणे पसंत केले. खाण्यासाठी चिवडा, फरसाण, बिस्किट्स वगैरे तर पिण्यासाठी ज्यूस, पाणी आणि थंड पेये घेतली व उत्तर दिशेला प्रस्थान केले. गेले पाच महिने पाहत आलेलो ती हिमनगे आता आम्हाला जवळ जाऊन पाहायची होती. हिमनग जेवढा आपल्याला वर तरंगताना दिसतो त्याच्या तीनपट तो समुद्राच्या पाण्यात असतो. अंटार्क्टिकामध्ये समुद्राच्या पाण्याचा बर्फ होत असल्यामुळे हे हिमनग हिवाळ्यात एकाच ठिकाणी अडकून पडतात आणि उन्हाळ्यात पाणी वितळले की वारे किंवा पाणी जसं वाहून नेईल तसे वाहत जातात. केंद्रापासून दोन-तीन किलोमीटर लांब आल्यानंतर हिमनगांच्या रांगा सुरु झाल्या. काही हिमनगांवर सूर्यप्रकाश थेट पडत असल्यामुळे बर्फाचा वरचा थर निघून जाऊन ती जागा स्फटिकाप्रमाणे चमकत होती. आम्ही आता या निळ्या बर्फाच्या डोंगरांची मजा घेत होतो. काही हिमनग दहा-अकरा मजल्याच्या इमारतीइतके उंच तर काही तेवढेच लांब आडवे. असा हा अंटार्क्टिकामधील अजून एक चमत्कार आम्ही पाहत होतो.

हिमनग

ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत ऑरोरा दिसायचं प्रमाण कमी झालं होतं. दिसला तरी पुसट पुसट ऑरोरा दिसत असे त्यामुळे या दिवसात आम्ही हिमनगे पाहण्यावरच भर दिला होता. आम्ही तीन-चार, तीन-चार दिवसांच्या अंतराने एकूण पाच वेळा हिमनगे पाहायला गेलो, कधी चालत तर कधी पिस्टनबुलीने तर कधी स्किडूने त्यामुळे भारती केंद्रापासून दहा-बारा किलोमीटरच्या पट्ट्यातले सर्व हिमनग पाहून झाले होते. मध्येच आम्ही चिनी केंद्रावर परत एकदा जाऊन आलो होतो. चिनी केंद्राने आम्हाला आणि रशियन केंद्रातील सदस्यांना बॅडमिंटनच्या स्पर्धा आयोजित करून त्यात भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते. चिनी केंद्रात बॅडमिंटन खेळण्यासाठी एक प्रशस्त हॉल होता. तिथे त्यांनी एका फलकावर 'हिवाळी खेळ - बॅडमिंटन तिरंगी मालिका (अंटार्क्टिका येथे)' असं लिहून तीनही देशांचे ध्वज लावले होते. अगदी आंतरराष्ट्रीय सामान्यांमध्ये जसं पोषक वातावरण असते तसेच वातावरण तयार झाले होते. आमच्या दृष्टीने तर आम्ही आपल्या देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत जाऊन केव्हाच बसलो होतो. रशियन सदस्यांनी कडवी टक्कर दिली पण तरीही मालिका थोड्याश्या फरकाने का होईना पण आम्हीच जिंकली. सर्व खेळ झाल्यावर चिनी सदस्यांनी Barbecue ची मेजवानी दिली. मस्तपैकी खाण्या-पिण्याचा कार्यक्रम उरकून आम्ही समुद्रमार्गे भारती केंद्रात माघारी परतलो. 

चीन देशाच्या केंद्रामध्ये बॅडमिंटन खेळताना

एके दिवशी सकाळीच लॉजिस्टिक टीमचे चार सदस्य दोन पिस्टनबुली घेऊन समुद्रमार्गे प्रोग्रेस धावपट्टीला सर्वात लांबून जाणारा मार्ग चिन्हांकित (route marking) करण्यासाठी निघाले. मला हे समजताच मी त्यांना भेटून त्यांच्यासोबत येण्याची इच्छा दर्शवली. आम्ही मिळूनच आमच्या लीडरशी बोलून परवानगी मिळवली. मी पटकन तयार झालो आणि लगेचच आम्ही मार्गस्थ झालो. हा मार्ग केंद्राच्या पश्चिम दिशेला जाऊन एका डोंगरावरून दक्षिण दिशेला जातो. ठराविक अंतरानंतर पुन्हा पूर्वेस वळून प्रोग्रेस धावपट्टीला मिळतो. पण हिवाळ्यात आलेल्या वादळांमुळे आणि झालेल्या बर्फवृष्टीमुळे आम्हास हे वळण समजलेच नाही. त्यामुळे आम्ही जिथून पूर्वेकडे वळायला पाहिजे होते तिथे न वळता सरळ दक्षिणेकडे गेलो. दक्षिणेकडे पसरला होता समुद्राइतकाच अथांग आईस शेल्फ. आम्ही खूप लांबवर आलो होतो. जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं तसं उंचवटा वाढतच होता. याचाच अर्थ असा होता की आम्ही आईस शेल्फ मागे टाकून एका हिमनदीवर (Glacier) आलो होतो. आम्ही केंद्रापासून अंदाजे वीस किलोमीटर लांब आलो होतो. प्रोग्रेस धावपट्टी तर यापेक्षाही फार कमी अंतरावर होती. आम्ही समजून गेलो कि आम्ही चुकलो होतो. समोर एक टेकडीवजा शिखर दिसत होते. म्हणून मग आम्ही गाड्या थांबवून एकत्र चर्चा केली. आमच्याबरोबर सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या शर्मासाहेबांचं थोडं पुढे जाऊन पाहू असं मत पडलं. आमच्याकडे आता एकच मार्ग होता की आलो तसे परत जायचं किंवा थोडं पुढे जाऊन त्या दिसणाऱ्या शिखरावरून अंदाज घ्यायचा. आम्ही शर्मासाहेबांच्या मतास होकार कळवत गाडीमध्ये बसून त्या शिखराकडे मार्गस्थ झालॊ. मी शर्मासाहेबांच्याच गाडीमध्ये होतो आणि शर्मासाहेब गाडी चालवत होते. थोडं अंतर पुढे जाताच एके ठिकाणी गाडी पुढे आल्यावर शर्मासाहेबांना आरश्यातून मागे बर्फामध्ये एक खड्डा तयार झाल्याचे दिसले म्हणून त्यांनी लगेचच गाडी थांबवली. आम्ही दोघेही काय झालं हे पाहायला गाडीतून उतरलो. गाडी उभी केल्याच्या जागेपासून तीस फूट मागे चालत गेलो तर पाहतो तर काय... आम्ही एका Crevasse (हिमनदीतील मोठी भेग) वरून गाडीसकट पुढे आलो होतो. मागून आमची दुसरी गाडी येताना दिसली तसे लगेचच त्यांना हातवारे करून थांबण्याच्या इशारा केला. त्यांनी लगेच गाडी थांबवून चालत पुढे आले. त्यांनाही क्रेवास पाहून धक्काच बसला. साधारण तीस फूट खोल आणि सात-आठ फूट रुंद असा हा क्रेवास होता. लांबीला तो कमीत कमी पाचशे-सहाशे मीटर होता यात आम्हाला शंकाच नव्हती कारण हिवाळ्यात झालेल्या बर्फवृष्टी आणि कमी तापमानामुळे क्रेवासचे तोंड किंवा त्याची उघडी बाजू पापुद्र्यासारख्या बर्फाच्या थराने झाकली गेली होती. आम्ही आजूबाजूचा बर्फ आणि क्रेवासवरचा बर्फ यात निरखून पाहिले असता हलका फरक जाणवत होता. खरंच तो क्रेवास लांबीला खूप मोठा होता. जसजसं हिमनदी समुद्राच्या दिशेने पुढे सरकते तसे हे क्रेवास रुंद होत जातात. आमच्यासाठी हा अद्भुत पण तितकाच भीतीदायक प्रसंग होता. पण तरीही शर्मासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढेच जाण्याचा निर्णय घेतला. आमची मागची गाडी आम्ही नव्याने खुल्या झालेल्या क्रेवासच्या तोंडापासून तीस-चाळीस फूट लांबून जास्त वेगाने क्रेवासवरून पार केली. आमच्यामधलं वातावरण तणावयुक्त झाले होते पण तसं कोण कोणाला हे जाणवू नये याची खबरदारी घेत होतो. दहा मिनिटातच आम्ही त्या टेकडीवजा शिखरावर पोचलो. पण उत्तरेकडे आम्हाला सूर्यप्रकाशामुळे फक्त बर्फ चमकत दिसत होता. तिकडे लांब दूरवर एक-दोन बेटे आणि हिमनगे दिसत होती. आम्हाला ना प्रोग्रेस धावपट्टी दिसत होती ना भारती केंद्र. आम्ही खूप दूरवर तीस-पस्तीस किलोमीटर दक्षिणेला भरकटलो होतो. त्यामुळे आम्ही हताश झालो. आता आमच्यासमोर एकच पर्याय शिल्लक होता तो म्हणजे आल्या वाटेने माघारी जाणे. आलेली वाट पिस्टनबुलीच्या चाकाच्या पट्ट्यांमुळे पडलेल्या व्रणांमुळे त्या मानाने सोपी होती. या वाटेने आम्ही केंद्रात पोचायला काहीच अडचण नव्हती, अपवाद होता फक्त क्रेवास. क्रेवास पार केला तरच आम्ही केंद्रात जाऊ शकू हे स्पष्ट होते. त्यामुळे आम्ही त्या शिखरापासून क्रेवासजवळ येऊन पाहणी करू लागलो. आता आम्हाला क्रेवासची पूर्ण माहिती झाली होती, तो किती मोठा आहे हे लक्षात आलं होतं. आमच्या दुसऱ्या गाडीतील एक सदस्य पाय आपटून पाहणी करत होता. मी त्याला मागून त्याचा हात धरून आधार देत होतो. एके ठिकाणी त्याने पाय आपटला असता मोठे भगदाड पडले, माझा हाताचा आधार असल्यामुळे तो त्यात जात जाता वाचला. क्रेवासचा वरचा थर इथे अतिशय पातळ होता. सुदैवाने त्याला मी घट्ट पकडू शकलो नाहीतर दोघेही आत पडण्याची शक्यता होती. तणाव अजूनच वाढला. इतक्यात शर्मा साहेबांचा 'वॉकी-टॉकी' वरून संदेश आला कि इकडे या, इथे जरा सुरक्षित वाटत आहे. लगेचच आम्ही ही जागा सोडली. शर्मासाहेबांनी प्रथम एक गाडी त्या सुरक्षित वाटलेल्या जागेवरून पार केली होती. तशीच दुसरी गाडीही थोड्याश्या अंतरावरून पार झाली. आम्ही त्या जागेवरून चालत तो क्रेवास पार केला. जीव भांड्यात पडला. आम्ही तिथेच एकमेकांचे हस्तांदोलन करून गळाभेट घेतली पण तरीही सर्वांच्या चेहऱ्यावरचा तणाव लपत नव्हता. मृत्यूच्या दारातून, समोर उभ्या असलेल्या यमदेवाला हरवून आम्ही परत आलो होतो. प्रोग्रेस धावपट्टीच्या मार्ग पुन्हा कधीतरी चिन्हांकित करू असे ठरविणे आणि हा असा अद्भुत, चित्तथरारक अनुभव घेऊन आम्ही माघारी परतलो. 

हिमनदीतील मोठी भेग (Crevasse) 

सप्टेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात गणपतीचा सण आला. मी आणि इतर मराठी भाषिक सदस्यांनी आपल्या महाराष्ट्रात जसा साजरा होतो तसा गणेशोत्सव साजरा करायचे ठरवले. त्यासाठी सजावट करायला सुरुवात केली. सजावटीचा विषय अर्थातच अंटार्क्टिकाचाच होता. एका पुठ्ठयावर आम्ही कापूस अंथरून त्यावर चार-पाच पेंग्विन्सचे फोटो चिकटवले आणि झाली आमची सजावट पूर्ण. गणपती बसवायच्या दिवशी आम्ही केंद्राबाहेरून केंद्रामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढली. गोडाचा नैवेद्यही केला. त्या आठवड्यात आम्ही रोज सकाळी-संध्याकाळी आरती करत असू. असेच दहा दिवसानंतर उत्सव करून अनंतचतुर्दशीला आम्ही गणपतीचे विसर्जनही केले. 

अंटार्क्टिकाचीच आरास असलेला अंटार्क्टिकामधील गणपती


(सूचना : अंटार्क्टिकामध्ये आम्ही साजरा केलेल्या गणेशोत्सवावर एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे. त्याचा दुवा पुढे देत आहे. https://maheshantarctician1.blogspot.com/2019/11/blog-post.html

एके दिवशी चार-पाच अ‍ॅडली पेंग्विन समुद्रावर फिरताना आम्हाला दिसले. ते जवळून पाहण्यासाठी आम्ही समुद्रावर गेलो. त्यांच्या शरीरावर इतर पेंग्विन्सप्रमाणे एकही पिवळा पट्टा नसतो. फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे हे पेंग्विन्स खूप सुंदर दिसतात. अ‍ॅडली पेंग्विन हे जरासे म्हणजे इतर पेंग्विन प्रजातींच्या तुलनेत आक्रमक असतात. त्यांच्यासाठी माणूस म्हणजे कधीही न पाहिलेला प्राणी असतो. आपण जर त्याच्या जवळ गेलो तर कुतुहलापोटी आपल्या जवळ येतो आणि लहान मुलासारखा आपल्याकडे पहात राहतो की अरे हे काय आहे म्हणून. 

अ‍ॅडली पेंग्विन

आक्रमकता दाखवताना अ‍ॅडली पेंग्विन

अंटार्क्टिकामध्ये आल्यापासून आधी ठरवल्याप्रमाणे सर्वच wonders (आश्चर्ये) पाहून झाली होती. आता फक्त एकच महत्त्वाचं ठिकाण पाहायचं बाकी होतं. त्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी म्हणून आम्ही आमच्या लीडरकडे गेले महिनाभर पाठपुरावा करत होतो. नाही नाही म्हणता एक दिवस आम्हाला या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळालीच. हे ठिकाण होतं जगातील सर्वात मोठ्या प्रजातीच्या पेंग्विन पक्ष्यांची प्रजनन वसाहत. जगातील सर्वात मोठ्या पेंग्विन पक्ष्यांची प्रजात ही अंटार्क्टिकामध्येच आहे. ह्या पेंग्विन पक्ष्यांना इंग्रजीमध्ये Emperor Penguin असे नाव आहे. ही वसाहत भारती केंद्रापासून पूर्वेला अंदाजे चाळीस किलोमीटर आहे. इकडे जाताना आम्हाला खूप सारे हिमनग पाहायला मिळाले. या वाटेवर आम्ही इतके सुंदर, इतके भव्य हिमनग पहिले कि आम्ही आधी पाहिलेले हिमनग या हिमनगांपुढे काहीच नव्हते. साधारण दोन अडीच तासांच्या प्रवासानंतर आम्ही वसाहतीजवळ पोहोचलो. निशब्द... काय पहात होतो हे आम्ही. हजारोंच्या संख्येने Emperor Penguins. नर मादी आणि त्यांची ती छोटी छोटी गोंडस पिल्लं. त्या पिल्लांमध्ये तर गोंडसपणा ठासूनच भरलेला. अतिशय भारदस्त, मानेवर पिवळा पट्टा असणारे हे Emperor Penguins खरंच योद्धा, लढवय्या वृत्तीचे असतात. -३० ते -४० अंश सेल्सिअस तापमानामध्ये अंटार्क्टिकाच्या समुद्रकिनाऱ्यावर अशा वसाहती स्थापन करून भर हिवाळ्यात ते प्रजनन करतात. एवढ्या कमी तापमानात आणि ऐन हिवाळ्यात अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर राहणारा हा एकमेव पक्षी आहे. त्या दिवशी मन भरून आम्ही पेंग्विन पक्षी पाहिले. डोळ्यांचं पारणं फिटलं. इतका आनंद कि पोटात मावेनाच. आमच्या लीडरने इथे आम्हाला फोटो काढण्यास परवानगी दिली नाही तरीही या खूप छान आठवणी डोळ्यात साठवून माघारी परतलो. केंद्राकडे परत येत असताना सील प्राणी समुद्रावर गोठलेल्या बर्फावर पहुडलेले दिसले. त्यातील एका मादीने तर नुकताच एक-दोन दिवसांपूर्वी एका पिल्लाला जन्म दिला होता. अतिशय गोंडस दिसत होता तो छोटा सील. 

Emperor पेंग्विन

हिमनगाबरोबर सूर्यास्ताच्यावेळी Emperor पेंग्विन

आपल्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लासोबत मादी सील

ऑक्टोबर महिना संपत आला होता. आम्ही अजूनही समुद्रावर जाऊ शकत होतो. या दिवसांमध्ये साधारण -१५ ते -२० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले होते. आता उन्हाळा जवळ येऊ लागला होता. सर्व जण दोन महिन्यांनी मायदेशी, आपापल्या घरी परतणार होतो. याला अपवाद फक्त आम्हा अभियंत्यांचाच होता. संपूर्ण केंद्राच्या कार्यप्रणालीचे हस्तांतरण करण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे आम्ही उन्हाळा संपल्यानंतरच मायदेशी जाणार होतो. भारती केंद्राचा परिसर आम्ही पिंजून काढल्यामुळे आता जास्त बाहेर जात नसू. शिवाय उन्हाळा आल्याने लीडरने श्रमदानाचे कामही वाढवले होते. त्यामुळे अगदीच वाटलं बाहेर जावं तर आम्ही भारती बेटावरच फिरत असू किंवा बेटावरच वेगवेगळ्या ठिकाणी समूहभोजनाचा आनंद घेत असू. 

गोठलेल्या तळ्यावर मेजवानी करताना

नुकताच दिवाळीचा सण होऊन गेला होता. आम्ही दिवाळीला गोडाधोडाचे जेवण केले होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत दिवाळी साजरी केली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक बातमी आली की प्रोग्रेस धावपट्टीवर रशियन केंद्राचे पहिले विमान आज येत आहे. म्हणजेच आमच्यासाठी आता हिवाळा संपला होता आणि याचाच अर्थ असा की थोड्याच दिवसात भारतीयांचे पण विमान नक्की येणार होते. आमच्यापैकी लॉजिस्टिक टीमचे काही सदस्य त्या दिवशी प्रोग्रेस धावपट्टीवर काहीतरी कामानिमित्त जाणार होते. मीही त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले. रशियन सदस्यांनी धावपट्टी स्वच्छ करून विमान उतरण्यास पोषक धावपट्टी तयार केली होती. आम्ही धावपट्टीवर पोचल्यानंतर काही वेळातच नियोजित वेळेनुसार प्रोग्रेस धावपट्टीवर विमान उतरले. हंगामातले पहिले विमान यशस्वीरीत्या उतरल्यामुळे सर्व जण खूष होते. आता पुढील काही दिवसात सर्वच केंद्रांवर सदस्यांची अदलाबदल होणार होती. आमच्या सदस्यांचे काम उरकून आम्ही माघारी परतलो. आमच्यापैकी एका सदस्याला त्याच्या एका रशियन मित्राने आजच आलेल्या विमानातून आलेले ताजे दोन कांदे भेट म्हणून दिले होते. रात्रीच्या वेळी भोजन कक्षात जेवण करत असताना तो ते घेऊन आला. आम्ही तब्बल सोळा जणांनी ते दोन ताजे कांदे एकमेकांत वाटून खाल्ले. जवळपास दहा महिन्यानंतर आम्ही ताजे अन्न तोंडाला लावले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान दिसत होते. मागच्या उन्हाळ्यात जहाज माघारी गेल्यापासून इतके दिवस आम्ही गोठवलेले अन्नच (frozen food) खात आलो होतो. गोष्ट तशी छोटी होती पण आमच्यासाठी ती फार फार मोठी होती. 

थोड्याच दिवसात आम्हा भारतीयांचेही विमान आले. त्यात खूप साऱ्या ताज्या भाज्या आणि प्राधान्य असलेल्या इतर वस्तू होत्या तसेच नवीन आलेले सहा सदस्यही होते. हे नवीन सदस्य आता पुढचे वर्षभर इथे राहणार होते आणि आमच्यापैकी काही सदस्य आता मायदेशी परतणार होते. आमच्यासाठी आज खऱ्या अर्थाने हिवाळा संपला होता. आम्ही आमच्या सदस्यांना निरोप द्यायला धावपट्टीवर गेलो. प्रत्येक जण एकमेकांची गळाभेट घेत होता. भारतात गेल्यावर भेटूया, फोन करत रहा, संपर्कात राहा अशा सूचना आम्ही एकमेकांना करत होतो. आज वर्षभर एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहिल्यानंतर आमचे दहा सदस्य मायदेशी परतत होते. मन जड झाले होते. दोघे जण तर अक्षरश: रडलेच. काय करणार? एक वर्ष हा काही छोटा काळ नसतो आणि तेही अशा वातावरणामध्ये. शेवटी अत्यंत दुःखी मनाने निरोप घेऊन ते सर्व जण निघून गेले. 

आमच्यासोबत हिवाळ्यामध्ये असलेल्या सदस्यांना धावपट्टीवर निरोप देताना

डिसेंबर महिन्यात आमच्याबरोबर असलेले सर्व सदस्य आणि आमचे लीडरही मायदेशी परतले होते. आमच्या मोहिमेमधले फक्त आम्ही चार अभियंते मागे राहिलो होतो. नवीन वर्षाची नवीन मोहीम सुरु झाली होती. उन्हाळ्याची मोठ्या दुरुस्तीची कामे सुरु झाली होती. आम्ही चौघे नव्याने आलेल्या सदस्यांमध्ये हळूहळू मिसळू लागलो होतो. आम्हाला अजून दोन महिने काढायचे होते. ज्यांच्याबरोबर एका कुटुंबाप्रमाणे राहिलो ते सर्व सदस्य आपापल्या घरी परतले होते त्यामुळे आम्हालाही आमच्या घरी परतायची ओढ लागली होती पण ज्या घरात आम्ही गेले वर्षभर राहत होतो तेही आम्हाला सोडायचे नव्हते. आम्ही अशा द्विधा मनःस्थितीमध्ये भारती केंद्रामध्ये राहत होतो. कामे उरकून वेळ मिळॆल तसा आम्ही नवीन सदस्यांबरोबर आम्ही पाहिलेलं अंटार्क्टिका त्यांना दाखवायला जात असू. अशा प्रकारे आम्ही फक्त दिवस ढकलत होतो. नवीन लीडर आम्ही इथे पूर्ण वर्ष काढल्यामुळे काही गोष्टींमध्ये आमचा सल्ला घेत होते. नाताळ आणि नवीन वर्षाच्या मेजवान्याही झाल्या होत्या. जहाज मात्र मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी जरा उशिरा आले. या वर्षासाठी आलेले सर्व सामान आम्ही श्रमदान करून उतरवून घेतले. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करून राष्ट्रीय सण साजरा केला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डेविस नावाच्या केंद्रामधूनही काही सदस्य आले होते. 

प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण झाल्यावर सर्व सदस्यांचे सामूहिक छायाचित्र

जानेवारी महिना संपला. आम्ही आता घरी परतण्यासाठी व्याकूळ झालो होतो. आणि अखेर आम्ही परतायची तारीख जाहीर झाली, ६ फेब्रुवारी २०१७. भारती केंद्राचा निरोप घ्यायची वेळ आली होती. आदल्या रात्री शेवटचं म्हणून आम्ही चौघेही केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारून आलो. वर्षभर जमा केलेल्या आठवणी आणि त्या आठवणींशी निगडित अशा ठिकाणांना आम्ही आवर्जून भेट देऊन आलो. जिथे जिथे आम्ही जाऊ तिथे तिथे काही ना काही प्रसंग घडलेलाच होता. असे सारे प्रसंग आठवत, त्या आठवणींमध्ये रमत आम्ही केंद्रात परतलो. त्या रात्री आमच्यापैकी कोणी झोपलंच नाही, चौघेही रात्रभर गप्पा मारत राहिलो. एवढ्या साऱ्या आठवणींमध्ये रमलो कि रात्र केव्हा संपली कळलंच नाही. सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टर आम्हाला घ्यायला आले. आमच्या चौघांबरोबर उन्हाळ्यात आलेले काही सदस्यही होते. अतिशय जड अंत:करणाने हेलिकॉप्टरच्या दिशेने निघालो. पाय उचलता उचलत नव्हते. कितीतरी वेळा मागे वळून पाहत होतो. इथे आल्यापासून खूप वेळा हेलिकॉप्टरमधून फिरलो होतो पण यावेळी तसा आनंद होत नव्हता. सर्वजण हेलिकॉप्टरमध्ये बसल्यावर लगेचच हेलिकॉप्टर वर जाऊ लागले. शेवटचं डोळेभरून भारती केंद्राची इमारत पहिली. हलकेसे डोळे पाणावले. पण तसाच शांत बसून राहिलो. पुढच्या दहाच मिनिटात प्रोग्रेस धावपट्टीवर पोचलो. तिथे आम्हाला मैत्री केंद्राकडे घेऊन जाणारं विमान लागलंच होतं. आम्हाला सोडायला आलेल्या सदस्यांच्या निरोप घेऊन आणि त्यांना हिवाळ्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गस्थ झालो. नऊ तासाच्या प्रवासात अंटार्क्टिकाची अनेक रूपं पाहून नोवो धावपट्टीवर सुखरूप पोचलो. मैत्री केंद्रात दोन दिवस मुक्काम करून केप टाऊनला जाणाऱ्या विमानात बसलो. या दिवशी आकाशात ढगाळ वातावरण होते. आम्हाला तर ते काळवंडल्यासारखेच वाटत होते. आता आम्ही अंटार्क्टिकाचा निरोप घेऊन मानवी वस्तीमध्ये तब्बल १५ महिन्यांनी प्रवेश करणार होतो. पुन्हा कधी इकडे यायला मिळेल न मिळेल अशा आविर्भावात डोळे भरून अंटार्क्टिकाच्या जमिनीला, त्या बर्फाला पाहत होतो. शेवटी वेळ कोणासाठी थांबत नसते. वैमानिकाने सीट बेल्ट बांधण्याचा आदेश दिला आणि आम्ही तब्बल पंधरा महिन्यांनंतर मानवी वस्तीकडे मार्गस्थ झालो.....

महेश दारवटकर

छत्तीसगड

 छत्तीसगड हे मध्य भारतातील एक राज्य आहे आणि १ नोव्हेंबर २०२० रोजी आग्नेय मध्य प्रदेशातील सोळा छत्तीसगढ़ी भाषिक जिल्ह्यांचे विभाजन करून त्याच...