लेखन - सौ.प्रिती जोशी
माझं न नवर्याचं एक तत्व आहे.. समजा पैसे असतीलच.. तर माणसानी दुनिया पहावी.. बावळट सारखं घराला डेकोरेटच करणं, इंटीरियरच करणं ह्या सारख्या क्षुद्र गोष्टींवर पैसे घालवु नयेत.. आता ह्या वाक्यातली मुदलातली "समजा पैसे असतीलच तर.." हीच अट पुर्ण होत नसल्याने आम्ही पुढच्या भागाकडे कधी वळलोच नाही..! पण तरी वर्षातुन एकदा "कुठे तरी जायला हवं राव" नावाचा किडा वळवळतो..आणि मग लोक कसं ऋण काढुन सण साजरा करतात.. तसं आम्ही ऋण काढुन भटकायला जातो..! तसंही पैसा नाही म्हणुन कुरकुरायचय.. असंही कुरकुरायचय.. मग किमान दुनिया भटकुन मग घरी येऊन कुरकुरू..!
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी (२०१४) नोव्हेंबरात "कुठे तरी जायला हवं राव" डोकं वर काढु लागले.. त्यातच दिर कोइंबतुरला असल्याने "जाऊन तर पाहु" असा सुर लागु लागला.. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन "खड्ड्यात गेली शिंची नोकरी.. चला आता कुठेतरी" चा भुंगा गुणगुणत होताच.. आणि सरते शेवटी आजपासुन बरोब्बर १५ दिवसांनी आठवड्याभरासाठी तामिळनाडुत जाऊ असा ठराव पास करण्यात आला. (अर्थातच तत्काळ तिकिट काढायला लागणार असल्याने, "बॅगा तर भरुन ठेवु, मिळालं तिकिट तर जाउ, नाही मिळालं तर बसु घरीच" असा उपठरावही पास केला गेला!)
मला हातातली कामं धामं सोडुन ट्रिप प्लान करायची कित्ती कित्ती आवड आहे हे इकडच्या स्वारींना माहित असल्याने स्वारी माझ्यावर सर्व सोपवुन, तिकडेच तोंड करुन निघुन गेली.. तिजोरीतला खडखडाट पहाता "बजेट टुर" फक्त मीच प्लान करु शकते (जन्मतःच देणगी म्हणुन मिळालेल्या कंजुसी वॄत्तीमुळे!!) हा स्वारींचा विश्वास मी लवकरच सार्थ ठरवला..! केवळ एक सप्ताहात ९ दिवसांची, ५ माणसांची सहल केवळ अर्ध लक्ष रुपयांमध्ये बसवुन दाखवली..!
ह्या एका सप्ताहात मी झोपेत सुद्धा ट्रिप अॅडव्हायझर वर माहिती काढत होते, तामिळनाडुत फोन करुन "अय्यो राम पाप्पं.." च्या टोन मध्ये बोलत होते..हापिसातल्या तमिळ लोकांकडुन बेसिक संभाषण शिकत होते.. तामिळनाडु आणि कर्नाटकाच्या स्टेट ट्रन्सपोर्टच्या कस्टमर केअरला शुद्ध मराठीत प्रश्न विचारुन छळत होते..
जन्मोजन्म आपण तामिळनाडुतच राहिलो आहोत इतक्या आत्मविश्वासाने मी लोकांना पुढचा प्लास दिला..
पुणे - रामेश्वरम / धनुषकोडी- मदुराई - कोइंबतोर - कुन्नुर - बंदिपुर - म्हैसुर - पुणे (व्हाया बंगलोर)
आता हा रुट असाच का? हेच सर्वात जास्त सोयीच की अजुन काही? मग कोडाई करावं की उटी? की कुन्न्नुरलाच २-४ दिवस मुक्काम टाकावा? असे अनंत प्रश्न तुम्हाला पडु शकतात. ह्या सर्वांचे उत्तर "मला माहिती नाही" हे आहे..
त्याचं असं होतं की सोबत अबीर आणि साबु-साबा, दिर कोइंबतोरला असल्याने
तिकडे प्रेक्षणीय काही नसले तरी जायचे हे निश्चित (.. आणि तिकडे अप्रतिम
कांचीपुरम साड्या मिळतात हा एक बारिकसा मुद्दा... ज्याने आमचं बजेट
कोलमडवलं!).. आमचे साबु साबा हे निसर्गरम्य ठिकाणी.. निवांत दिवसभर आराम
करत पडुन रहायचे कॅटेगरीत येत नसल्याने त्यांना बोअर होणार नाही ना? हा
धाक, आम्हाला निसर्ग प्रिय तर त्यांना धार्मिक स्थळं..
ह्या इतक्या अटींच्या कचकचाटातुन आलेला प्लान आहे हा. हेक्टीक होताच.. पण आम्ही एन्जॉय केला.. त्यामुळे आता वरचा प्लान असा वाचा...
पुणे - रामेश्वरम (धार्मिक स्थळ) / धनुषकोडी (सुर्योदय!!) - मदुराई (मंदिर) - कोइंबतोर (दिर + खरेदी) - कुन्नुर (टॉय ट्रेन + थंड हवेच ठिकाण) - बंदिपुर (वाघ!!!) - म्हैसुर (कुठुन तरी ट्रेन पकडायची तर परत खाली का जा? म्हणून बंगलोरला जाताना वाटेतले बघणेबल शहर) - पुणे (व्हाया बंगलोर)
आम्ही रोज एका नव्या जागी गेलो.. पण पुन्हा पुन्हा असं येणं होत नाही म्हणुन हावरटसारखं शक्य तितकं बघायचं होतं.. थोडक्यात २ ट्रिप आम्ही एकीत कोंबल्या.. पण मंडळींचा उत्साह इतका दांडगा की रोज टणाटण उड्या मारत फिरले..!
मंडळी कामाला लागली.. सोबत आबालवृद्ध (मारणार सासुबाई!) लोक असल्याने खायला प्यायला जंगी नेणार होतो सोबत.. सुई-दोर्या पासुन सर्वकाही घेतलं होतं.. शुक्रवारच्या ४ वाजताच्या नागरकोलने आधी मदुराईला जायचा प्लान होता. तिथे मुक्काम ठोकुन रामेश्वरमला जाऊन यायचं होतं. तत्काळमध्ये तिकिटं मिळाली होती..! आम्ही नक्की जात होतो!!
शुक्रवारी घरातुन मोजक्या ८ बॅगा घेऊन निघालो.. रुटीन प्रमाणे सतत "काहीतरी राहिलय" असं वाटत होतंच.. गाडी आली.. बहीणाबाई आणि मांसाहेबांनी जातीने उपस्थिती लावुन खाण्या पिण्याच्या अजुन २ बॅगांची भर घातली!!
वातावरण अत्यंत उत्साही... गाडी निघाली.. मंडळींच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वहात होता!!... रात्र झाली.. खाणे पिणे आटपुन मंडळी आता ताणुन देणार.. की बाजुच्या सहप्रवाशांकडुन बातमी आली... "तामिळनाडुत धुवांधार पाऊस सुरु आहे.. समुद्र किनार्यावर वादळाचा अॅलर्ट आहे..!!"
ही सुवार्ता कानी पडते न पडते तोच... अबीरने "मला घरी जायचय.. आत्ताच्या आत्ता खाली उतरा..." असा टाहो फोडला..
........
त्यारात्री ३ वाजता... नुकत्याच रडुन रडुन झोपलेल्या पोराला मांडीवर जोजवत एक व्यक्ती धनुषकोडीच्या सुर्योदयाचं गणित आता कसं बसवावं ह्याचा विचार करत होती..
.... आणि उत्तर म्हणुन काचेवरुन पावसाचे थेंब ओघळत होते...
क्रमशः
बाकी चेन्नईत टी नगरला व तामिळनाडुतही अनेक ठिकाणी 'सर्वाना स्टोअर' व 'को-ओप्टेक्स' च्या शो रूमस आहेत .जिथे योग्य किमतींना कपडे मिळतात ( कांचीपुरम साड्या , पांढरे व्हाइट शर्ट व धोती ) . त्या तुलनेत 'नल्ली' ,'पोथी' या शो रूमस नुस्त्याच भपकेबाज व दिखाउ वाटतात .
रामेश्वरम
शनिवारी संध्याकाळी आम्ही मदुराईला पोहोचलो.. वातावरण ढगाळ होतं.. थोडा थोडा पाऊसही चालु होता...आणि धनुषकोडीला जाऊन सुर्योदय पहायचं स्वप्नं त्या पावसात केव्हाचं वाहुन जाऊन एव्हाना रामेश्वराच्या चरणी पोहोचलं होतं.. आता मात्र पुढंच कसं करावं ह्याचा विचारही करवत नव्हता..
नवरा आधीच इथे एकदा येऊन गेल्याने त्याला मदुराई आणि रामेश्वरमची माहिती होती.. मागच्या वेळेस तो जिथे राहिला त्या "कावेरी महल" मध्ये जायचं होतं.. एकतर आमचा मदुराई की रामेश्वरमला मुक्काम हेच डळमळीत असल्याने आणि नवरोबांना आपण सोडुन जग्गात कुण्णी कुण्णी म्हणुन कावेरी महलला जाणार नाही ह्याची खात्री असल्याने बुकींग केलं नव्हतंच.. रिक्षात बॅगा टाकुन मी आणि नवरा साबांना घेऊन पुढे गेलो.. आमचं नशिब थोर असल्याने कावेरी महल फुल्ल होतं! मग पुढचा अर्धा तास "मदुराई की गलियोंमे" फिरण्यात गेला. अखेरीस पुढच्याच गल्लीत "हॉटेल एम्पी" सापडले..
वास्तविक आम्ही काही फाइव्ह स्टार वगैरे हॉटेल शोधत नव्हतो.. ना आमच्याकडे वर तोंड करुन बोलायला कुठलं बुकींग होतं.. पण तरीही... "हॉटेल एम्पी" हे सात भिकार हॉटेल आहे हे मी सगळीकडे नोंदवुन ठेवते.. रया गेलेल्या रुम्स.. मोठे मोठे पण टणक गाद्यांचे बेड्स.. त्यावर कळकट बेडशीट्स.. अंघोळीला गार पाणी.. स्लो सर्व्हिस..आणि त्यामानानी रुमचे भाडे मात्र दणकट इ. अनेक मुद्दे होते.. पण नाविलाज को क्या विलाज...
पुढचे दोन दिवस वातावरण तसेही पावसाळी असणार होते.. दिराला फक्त रविवारी येणे जमणार असल्याने दुसर्याच दिवशी सकाळी उठुन ७ च्या पॅसेंजरने रामेश्वरमला जायचे ठरले आणि मंडळींनी ताणुन दिली..
झोपा मस्तच झाल्या असणार कारण उठलो तेव्हा ६.१५ होऊन गेले होते!! ५ माणसांना अंघोळी करुन स्टेशनवर न्यायचे होते.. बाहेर दणादण पाऊस!! धावपळ करत, कुर्मगतीने चालणार्या आणि १ किमी साठी ५०/- घेणार्या थुत्तरछाप रिक्षातुन स्टेशनवर गेलो.. मी, साबु, साबा नी अबीर कडेवर असे पळत होतो.. दिर न नवरा तिकीट आणि नाश्ता ह्यांच्या भानगडीत होते.. जागोजागी हजारो पाट्या होत्या.. पण प्लॅट्फॉर्म नबंरची पाटीच नाही.. तिथे एका पोलीसाला विचारल्यावर त्याने पलीकडच्या फलाटाकडे बोट दाखवले.. आम्ही रेल्वे ट्रॅक तसाच ओलांडुन पलीकडे गेलो.. आणि आमच्या डोळ्या देखत रामेश्वरमची पॅसेंजर त्याच्याही पलीकडच्या फलाटावरुन हलली!!!
तामिळनाडु... तिथली लोकं.. त्यांचा पाट्या न लावण्याचा मुर्खपणा.. तो पोलीस.. आणि आपण स्वतः सोडुन बाकी इतर अशा समस्त जनांना शुद्ध मराठीत आणि "स्वर टिपेचा" लावुन शिव्या घातल्या.. चुकांचं खापर वरील सर्वांवर फोडलं.. आणि मंडळी आक्खं मदुराई रेल्वे स्टेशन डोक्यावर घेऊन मगच स्टेशनबाहेर पडली..
भरपुर शोधाशोध करुन, मदुराईच्या चक्रम लोकांशी हुज्जत घालुन शेवटी एका रिक्षात बसलो आणी जगाच्या दुसर्या टोकाला असणार्या बस स्टॅण्डला गेलो. मदुराईत म्हणे ५ बस स्टॅण्ड आहेत. प्रत्येक स्टॅण्ड वरुन विशिष्ट गावच्याच गाड्या सुटतात. आमचं नशीब अजुन जोरात असतं तर ते पाचही स्टॅण्ड फिरुन शेवटी आम्ही इष्ट स्थळी पोहोचलो असतो.. पण दुर्दैवानी पहिल्याच फट्क्यात योग्य ठिकाणी नेऊन सोडलं बाबा रिक्षामालकांनी!!
८ ची गाडी.. २.३०-३ तासात रामेश्वरम.. म्हण्जे ११ ला जरी पोहोचलो तरी अजुन एक मज्जा अशी होती की रामेश्वराचं मंदिर दुपारी १२ ला बंद होतं म्हणे.. म्हण्जे एका तासात पळत जाऊन ते मंदिर पाहुन बाहेर येणं आवश्यक होतं... आता जे होईल ते होईल असं म्हणुन निघालो.. रस्ता छान होता.. ढणाढणा गाणी वाजत होती.. पण त्याचंही काही वाटु नये इतकं छान वातावरण होतं.. पाऊस नव्हता पण कडक ऊनही नाही.. आल्हाददायक अगदी.. छोट्या छोट्या गावांमधुन बस जात होती. तामिळनाडु मधले वर्ल्ड फेमस फ्लेक्स जागोजागी झळकत होते! कशाबद्द्ल फ्लेक्स लावलाय हे कळत नव्हतं पण डेंजर फोटो होते एकदम..
टुमदार गावांमधुन जाताना आता समुद्राचा खारा वास यायला लागला.. कधी एकदा ही बस थांबते आणि पळत जाऊन समुद्र बघते असं झालं.. रामेश्वरममध्ये शिरताना हा पंबन ब्रिज लागतो.
पंबन ब्रिज भारतातला पहिला आणि सर्वात मोठा (आता बांधलेला वरळी सी लिंक सोडला तर!) समुद्रात बांधलेला ब्रिज आहे.
मोठ्या जहाजांसाठी हा ब्रिज वर उचलल्या जाऊ शकतो.
आता आलंच रामेश्वरम म्हणता म्हणता ११ ला पोहोचलो.. ही बस सोडते तिथुन लगेच ५/- मध्ये दुसरी बस पार मंदिराच्या दारात सोडते. पळत पळत मंदिर गाठले तर कळाले की मंदिर १२-३ नाही तर १-३ बंद असते.. आधी तर हे ऐकुन बरं वाटलं.. पण आत शिरल्यावरचा भुलभुलैय्या पाहुन १ पर्यंत तरी तो रामेश्वर दिसेल का अशी शंका वाटु लागली...
* आंतरजालावरुन साभार
हे एक भव्य मंदिर आहे.. वरच्या फोटोत दाखवल्या प्रमाणे सर्वात मोठा कॉरिडॉर(?) असणारे हे मंदिर आहे. १२ ज्योतिर्लिंग आणि चार धामांपैकी एक असे हे मंदिर आहे सुद्धा तितकेच सुंदर! आत जायला दोन प्रवेशद्वार आहेत. ह्या मंदिरात रामेश्वराचे मंदिर तर आहेच, शिवाय पार्वतीमातेचेही एक मंदीर आहे. आत गेल्यावर २२ पवित्र विहिरींमध्ये डुबक्या मारायच्या आणि तशाच ओलेत्या अंगाने मुख्य मंदिरात जायचे. आम्ही काही ते केलं नाही.. हे मंदिरातले एक मोठे कुंड..
रामेश्वरममध्ये रामायणातल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या नावाने कुंड आहे.. राम, लक्ष्मण, सीता.. अगदी जटायु सुद्धा.. मला अजिबात नावं लक्षात नाहीत. पण तिथल्या एखाद्या रिक्षावाल्यासोबत डिल केलं की तो १ दिवसात सगळं फिरवुन आणतो.. मी जर काही नावं खाली वर केली तर समजुन घ्या.
इतक्या धावपळीनंतर जेव्हा आपण फक्त तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात रामेश्वराला चालु असलेला अभिषेक आणि आरती पहातो तेव्हा सगळी दगदग विसरायला होते! तामिळनाडुच हे एक आहे. माझ्या सारखे देवावर विश्वास न ठेवणारे लोकही इथली मंदिरं पाहुन भारावुन जात असावेत.. एक तर भव्यता.. स्वच्छता.. आणि सर्वात सुंदर म्हणजे केवळ दिव्यांच्या प्रकाशात दिसणारा देव! ज्या कुणी अनाम कलाकारांनी ही मंदिरं घडवायला जीव ओतला असेल त्यांना मनोमन दंडवत घातला!
दर्शन झालं.. नॉर्मली लोक मग नाहेर पडतात आणि पुढच्या रस्त्याला लागतात.. पण अर्थातच तसे काही आमचे योग नव्हते.. आमच्या समोर लाईन मध्ये लागलेला दिर आणि नवरा अर्धा तास झाला तरी येईनात म्हणुन शेवटी पुढच्या मंदिरात असतील अशा विचाराने आम्ही पार्वतीच्या मंदिरात गेलो.. मग अजुन पुढच्या... करत करत संपलं सगळं पाहुन.. तरी हे बंधु गायब.. भुकेनी आता उपस्थिती जाणवुन द्यायला सुरवात केली होतीच.. साबांचा पारा भयंकर चढला होता.. पार अगदी मंदिरा बाहेर जाउन शोधुन आलो.. आधी मनाला भावलेली मंदिराची भव्यता आता डोक्यात जाउ लागली..!! सरते शेवटी जोडगळी डुलत डुलत येताना दिसली.. "दिसला नाहीत.. म्हणलं असालच इथे कुठेतरी..." असं थंड आवाजात बंधु "काय मग कसं काय?" च्या चालीत बोलले.. बर थंड अशासाठी की भिजुन आले होते.. म्हणजे कुठल्या तरी कुंडात डुबक्या मारत बसले असणार.. वर "आता काही बोलु नका.. आम्ही चुकलो बिकलो असलो तरी कुंडात डुबकी मारली आहे.. त्यामुळे सगळे हिशोब निल आहेत.." हे म्हणुन आम्हालाच गप्प केलं..
मग हे सगळं बारदान घेऊन जेवणाची शोधाशोध केली.. मंदिराबाहेरच ७०-८०/- मध्ये उत्तम थाळी (म्हण्जे भात + सांबार + इतर क्षुद्र पदार्थ) पोळी बिळी मागायची नाही. केळीच्या पानावर दणादणा भात वाढत रहातात.. आणि आजुबाजुला पाहुन आपण गोळे करुन हाणत रहायचं असा कार्यक्रम असतो..! आमच्या मते आम्ही १ क्विंटल भात संपवल्यावर जेव्हा हात वर केले तेव्हा वेटरच्या मते आम्ही जेवलोच नव्हतो..!
आता मात्र वेध लागले होते "धनुषकोडी"चे.. तसल्या वातावरणात सुर्योदय काही बघायला मिळणार नव्हताच.. पण किमान जास्तीत जास्त वेळ तिथे घालवायला मिळावा म्हणुन आम्ही धडपडत होतो.. रामेश्वरम मध्ये ५ जण बसतील अशा मोठ्या रिक्षा असतात. त्या ४००-५००/- मध्ये महत्वाची ठिकाणं दाखवुन आणतात. असाच एक रिक्षावाला आम्ही पकडला. त्याला म्हणलं आधी "धनुषकोडी".. मग वेळ उरला तर बाकीचं... पण "उरलेलं बाकीचं" बद्दल सांगायला मला काही मुळात लक्षातच नाहीये त्यामुळे रामेश्वरम मधल्या काही मह्त्वाच्या जागांचे फोटो देऊन ठेवते.
कोदंडधारी रामाचे मंदिर
हनुमान मंदिर
हे काय होतं ते मला कळलं नाही
गुगलमध्ये जे बिभीषण मंदिर म्हणुन दिसते ते मंदिर. धनुषकोडीला जाताना मध्येच एक रस्ता डावीकडे जातो. त्या रस्त्याचा शेवट म्हणजे हे मंदिर आहे.
धनुषकोडी बीच वरील मंदिर
धनुषकोडीला जायची गंमत अशी आहे की ह्या रिक्षा तुम्हाला फक्त धनुषकोडी बीच पर्यंत नेतात. पण तो काही भारताचा शेवट नव्हे. तिथुन पुढे ३ किमी वर साधारण पणे भारताचे शेवटचे टोक आहे. पण तिथे रस्ता जात नाही. तिथे जायला मिनीबस सारख्या गाड्या आहेत. दुसरा काहिही पर्याय नसल्याने काहीच्या काही पैसे मागतात. (साधारण १००-२००/- माणशी) त्यांना एका ट्रिपचे जे काही पैसे अपेक्षित असतील तेवढे मिळाल्याशिवाय गाडी हलत नाही.
परत आभाळ भरुन यायला लागलं होतं.. आम्ही थोडेच लोक होतो.. त्यामुळे माणशी जास्त पैसे दिले तर गाडी हलेल म्हणे.
न देउन सांगतोय कुणाला...! नक्की आहे तरी काय पुढे ह्याची उत्सुकता घेऊन त्या गाडीत बसलो...
धनुषकोडी
* आंतरजालावरुन साभार
धनुषकोडी हे भारताचे एक टोक आहे. पण केवळ तितकेच नाही.. पुर्वी इथे एक रेल्वे स्टेशनही होते. छोटेसे गाव होते. वस्ती होती.. १९६४ साली.. २२ डिसेंबरला आलेल्या एका मोठ्या चक्रीवादळात हे गाव वाहुन गेले.. नुसतेच गाव नाही तर पंबन वरुन आलेली पॅसेंजर.. आतील ११० प्रवासी आणि ५ कर्मचार्यां सकट एका मोठ्या लाटेने ओढुन नेली.. ह्या वादळात पंबन ब्रिजचेही नुकसान झाले.. त्यानंतर हे गाव "घोस्ट टाऊन" म्हणुन ओळखले जाऊ लागले. आता इथे कुणाचीही वस्ती नाही.. फक्त मासेमारांच्या तुरळक झोपड्या दिसतात..
जशी गाडी डांबरी रस्ता सोडुन रेतीमध्ये घुसली तसं समजलं की का हे लोक इतके पैसे घेत आहेत.. रेतीमध्ये गाडी वेड्यासारखे हेलकावे खात होती. आधीच्या ज्या गाड्या गेल्या होत्या त्यांच्या टायर प्रिंटवरुनच गाडी न्यायची.. क्षणोक्षणी वाटत होतं की आता ही गाडी उलटणार.. पण ड्रायव्हर अण्णा एकदम निवांत होते.. इनके खुन मे रजनीकांत दौडता होगा!
आजुबाजुला फक्त समुद्री वनस्पती.. पक्षी.. लाटांच्या पाण्यानी झालेला फेस.. आणि आता हा शेवट आलाच म्हणता म्हणता दिसत रहाणारे जमिनीचे तुकडे..
जागोजागी धनुषकोडीमधले भग्नावषेश दिसत रहातात. इथेले रेल्वे स्टेशन.. चर्च इ. इमारतींचे हे अवषेश..
धनुषकोडीमध्ये म्हणलं तर बघायला काहीही नाही.. ना चमचमती रेती.. ना स्वच्छ समुद्र.. ना नितळ पाणी.. ना हिरवीगार झाडी.. ना डोळे दिपतील अशा वास्तु... एक वेगळंच वातावरण आहे तिथे... अशा काहीही नसलेल्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या झोपड्या आहेत..
मऊ मऊ रेतीत चालावं म्हणलं तर सर्वत्र पसरलेली काटेरी झाडी आहेत..
आणि तरीही... इथुन जाऊच नये असं वाटावं असं काहीतरी तिथे आहे... एक चिरंतन शांतता इथे रहात असावी... त्या चक्रीवादळापुर्वी ह्या जागेत किती मानवी भाव भावना नांदल्या असतील.. किती आवाज ह्या समुद्राने ऐकले असतील.. लहान मुलाच खिदळणं असेल किंवा निरोपाचे हुंदके असतील.. बांगड्यांची नाजुक किणकिण असेल किंवा रेल्वेची कर्कश्श शिट्टी असेल... काहीच किलोमीटरवर असलेल्या रामेश्वरम सारखी लगबग इथेही होत असेल.. ही लगबग पोटात घेऊन गाडी झुक्झुक करत येत असेल...
आणि अचानक... एक लाट... हे सगळं पोटात घेउन गेली असेल...
..केवळ माणसं किंवा रेल्वेच नाही... तर इथला आवाज... इथल्या भावभावना... सगळंच...
मागे आक्रंदायलाही कुणी शिल्लक राहिलं नाही... एका क्षणात सगळं शांत....
पण तरीही ही स्मशान शांतता नाही... ह्या नीरव वातावरणाला कोणताही भावच नाही... सगळं बोलणं.. वाटणं.. समजणं... जिथे संपुन जातं.. आणि मग जे उरतं.. ते...
.....काहीच नसलेपण....
.... फक्त.... शांssतता....
क्रमशः
मदुराई
रामेश्वरमहुन परत आल्यावर खरं तर कुठेही जाण्याची परिस्थिती नव्हती.. पण मीनाक्षी अम्माच्या मंदिरातल्या घंटा वाजु लागल्या.. आणि पाय आपोआप तिकडे वळाले..
दोन वर्षांपुर्वी नवरा चैन्नईला आला होता तेव्हा का कोण जाणे त्याने "रामेश्वरमला जाऊन येतो" असा हेका धरला होता. मला तेव्हा तामिळनाडु.. तिथली मंदिरं ह्याबद्द्ल फारशी काहीच माहिती नव्हती.. धनुषकोडीबद्दल ऐकलं तेही तेव्हाच. थोडं गुगलुन पाहिल्यावर मी त्याला जाता जाता मग तंजावर आणि मदुराई तरी करच असा सल्ला दिला. कुरकुर करत साहेब मदुराईला गेले खरे.. आणि परत येताना मदुराईच्या प्रेमात पडुन आले..!
प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही मदुराईला फार कमी वेळ दिला. आम्हाला फक्त मीनाक्षी मंदिर पहायचे होते. ते काय होईल २-४ तासात पाहुन म्हणुन आम्ही पुढचं वेळापत्रक आखलं. पण प्रत्यक्षात पुन्हा पुन्हा पहात रहावं.. वेळ काढुन निवांत फिरत रहावं.. दिवसा उजेडीच नाही तर रात्रीच्या वेळीसुद्धा जाऊन पहायलाच हवं असं हे मंदिर आहे..! इतकंच नाही तर तिथला राजमहाल सुद्धा अत्यंत मह्त्वाची वास्तु आहे. आम्ही इतका विचार केलाच नाही. एकतर गाडी चुकल्याने आमची वेळेची गणितं फसली. त्यामुळे रात्रीच्या वेळेस मंदिर फार पहायला मिळाले नाही. राजमहाल आम्ही पाहिलाही असता पण मीनाक्षी मंदिर पाहुन तेवढा वेळ आणि शक्ति उरलीच नाही..
अर्थातच धनुषकोडी आणि मदुराईला परत परत जायचा इरादा पक्का आहे.. तेव्हा राहिलेली सगळी कसर पुरी करणार हे नक्की!
आता मीनाक्षी मंदिराबद्दल थोडेसे..
मलयध्वज पांड्य राजा आणि त्याची पत्नी कांचनमलाई ह्यांना एका यज्ञातुन प्राप्त झालेली कन्या म्हणजे मीनाक्षी! हिला जन्मतः तीन स्तन असल्याने राजा चिंतेत पडला. पण मीनाक्षी जेव्हा तिच्या भावी वराला भेटेल तेव्हा हा स्तन गळुन पडेल अशी आकाशवाणी झाली. मीनाक्षी मोठी झाल्यावर पांड्य राज्यावर राज्य करु लागली. साम्राज्य स्थापन करण्यासाठी तिने युद्ध करुन ब्रह्मलोक, विष्णुलोक आणि इंद्रलोक जिंकला. कैलास जिंकण्यासाठी आल्यावर मात्र जेव्हा ती शिवाशी लढायाला आली तेव्हा शिवाचे रुप पाहुन पहिल्यांदाच तिच्या मनात लज्जा निर्माण झाली आणि तिचा तिसरा स्तन गळुन पडला. पुढे तिचा शिवाशी विवाह झाला. तोच हा सुंदरेश्वर! (द्राविडी लोक त्याला "छोक्कलिंगम" म्हणतात.)
मीनाक्षी मंदिर हे मुळ पांड्य राजाच्या काळात बांधले गेले असावे. पण ते मलिक काफुरच्या आक्रमणात जवळ जवळ नष्ट झाले. तिरुमल नायकाने हे मंदिर पुन्हा बांधुन घेतले. मीनाक्षी आणि सुंदरेश्वराची मुळ मुर्ती सोडता बाकी सर्व भाग सोळाव्या शतका नंतर बांधलेला आहे.
मीनाक्षी मंदिर अत्यंत भव्य असुन त्याच्या सभोवताली तटबंदी आहे. चारी दिशांना गोपुरे आहेत. दक्षिणेकडील गोपुर सर्वात मोठे असुन, सर्वच गोपुरांवर देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिरात मीनाक्षीचे मंदिर, सुंदरेश्वराचे मंदिर, अनेक सभामंडप, जलाशय आणि लहान मोठी मंदिरे आहेत.
* हे चित्र आंतरजालावरुन साभार
मंदिरात प्रवेश करताना चप्पल-बुट, कॅमेरा, इ वस्तु बाहेर जमा कराव्या लागतात. मंदिरात कॅमेरा नेता येत नाही पण १००/- भरुन मोबाईल कॅमेरा वापरा येतो. ह्या मंदिरात कपड्यांचेही नियम आहेत. संपुर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे लागतात, गुडघ्यापासुन वर दुमडलेली अण्णा स्टाईल लुंगी चक्क चालत नाही. आता मध्ये फक्त हिंदुना प्रवेश आहे.
प्रवेशद्वार
एका भल्यामोठ्या लाईन मध्ये उभे रहावे लागते.लाईन मधुन फिरता फिरता दिसणारा सभामंडप आणि खांबावर कोरलेली शिल्पे. रामेश्वरम प्रमाणेच इथेही छतावर पुष्कळ रंगकाम केले आहे.
जागोजागी अशा रांगोळ्या रंगवल्या आहेत.
एका वाली आणि सुग्रीव ह्यांचे युद्ध चालु आहे आणि समोरच्या खांबावरुन राम बाण मारत आहे (लाईन मध्ये धक्का लागत असल्याने फोटो फार चांगला आला नाही.)
मंदिरात सर्वत्र असे खांब आहेत.
मीनाक्षीचे दर्शन घ्यायला मात्र फार कसरत करावी लागते. एकतर रांगेत फार वेळ थांबावे लागते. मुख्य प्रवेशद्वारापाशीच १००/- माणशी देऊन फास्ट लाईन मध्ये लागता येते. आम्ही आधी ते तिकिट घेतले नाही. पण जशी जशी रांग पुढे जाऊ लागली तसं आपण फक्त बाहेरच्या सभा मंडपात आहोत, अजुन प्रत्यक्ष गाभार्या पर्यंत जायला किमान १ तास तरी लागेल असे लक्षात आले. मग दोनदा आम्ही ५०/- चे तिकिट घेऊन तेवढी लाईन भरकन पुढे सरकलो. (ते तिकिट आधीच घ्यायला हवे होते हा साक्षात्कार तेव्हा झाला!)
मंदिरात फक्त सभामंडपात फोटो घेता येतात, त्यामुळे एकदा तो सोडला की आत कितीही अप्रतिम कलाकुसर दिसली तरी फोटो घेता येत नाहीत. आम्ही फास्ट लाईनच्या तिकिटामुळे १० मिनिटात गाभार्यापाशी आलो. जिथे मीनाक्षीची मुर्ती आहे तो मंडप केवळ अवर्णनीय...
काळ्या दगडातुन घडवलेले मंदिर.. प्रकाशासाठी बांधलेले झरोके आणि त्यातुन येणारे सुर्यकिरण.. मंडपात योजलेला पिवळ्या रंगाचा प्रकाश.. गाभार्याभोवती पाणी फिरवण्यासाठी किल्ल्या भोवती जसे खंदक असतात तशी व्यवस्था.. गाभार्याच्या बाहेरच्या भिंतींवर सोडलेल्या पितळी समया.. त्यात मंद तेवणार्या वाती.. आणि त्यांच्या प्रकाशानी उजळेल्या देव देवतांच्या मुर्ती.. त्यांना नेसवलेली रेशमी वस्त्रे... केवळ अवर्णनीय...!!!
आणि ह्यावर कहर म्हणजे खुद्द मीनाक्षीची कमनीय मुर्ती... असं देवाच्या मुर्तीला "वाह! क्या बात है!" किंवा "ला ज वा ब!"
म्हणता येतं का ते माहित नाही.. पण त्या मुर्तीचे वर्णन करायला शब्द तोकडे
आहेत. काय त्या चेहर्यावरचे भाव.. काय ती नजाकत.. काय ती उभं रहण्याची
ढब..! हे शिल्प मी आजवर प्रत्यक्षात.. फोटोमध्ये.. कुठेही पाहिलेल्या
शिल्पांमधले सर्वोत्कृष्ट शिल्प आहे.
ती मुर्ती मनोहारी म्हणावी की ज्या पद्धतीने तिचा साज शॄंगार केला तो जास्त मोहक म्हणावा..! फक्त दिव्यांच्या प्रकाशात उजळेलेली मुर्ती, तिला नेसवलेली रेशमी वस्त्र, तिला घातलेले फुलांचे हार, तिच्या समोर ओवाळला जाणारी पंचारती आणि हे सगळे सोहळे जिच्यासाठी ती मीनाक्षी अम्मा! कितीही पाहिलं तरी मन भरत नाही...
तिथेच फतकल मारुन बसावं आणि अम्माकडे पहात रहावं असं वाटलं तरी ते तसं करु देत नाहीत, हाकलतातच.. नाईलाजानी बाहेर आलो. पुढे सुंदरेश्वराचेही दर्शन घेतले.
बाहेरच्या सभामंडपात एकाहुन एक अप्रतिम मुर्ती आहेत. पण मीनाक्षीच्या मुर्ती पुढे मला आता काय लिहावे ते सुचत नाही म्हणुन फक्त फोटो देते.
विष्णु मीनाक्षी आणि शिवाचे लग्न लावुन देताना
रामेश्वरम इतका भव्य नसले तरी इथेही मोठे मोठे कॉरिडॉर आहेत
कोणत्याही बाजुने पाहिलं तरी आपल्याचकडे तोंड केलेले शिवलिंग
करंगळीवर गोवर्धन उचलणारा कृष्ण आणि मोरावर बसलेली सरस्वती
मंदिराचा परिसर
गोपुरे
गोपुरांवरील शिल्पे
मंदिरात "सहस्त्रसभामंडप" म्हणुन ९८५ खांबावर तोललेला सभा मंडप आहे. तिथे आता मंदिर कला संग्रहालय आहे.
मंदिरातुन बाहेर पडल्यावर साड्यांची अनेक दुकाने आहेत. मदुराईमध्येही
चांगल्या साड्या मिळतात. मदुराईअचा दालवडा जागतिक दर्जाचा खतरनाक चविष्ट
पदार्थ आहे. सकाळी नाश्त्याला इथल्या इडल्या, वेगवेगळ्या प्रकारचे वडे आणि
कॉफी!!! पोळ्यांच्या विरहात आम्ही मदुराई रेसिडेन्सी नावाच्या महागड्या
हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये ५०/- ला एक ह्या प्रमाणे वाईट्ट तंदुरी रोट्या
खाल्ल्या. चेट्टिनाड नावाने एक भाजी घेतली ती ही बेचव पाण्यात तरंगणार्या
भाज्या अशी निघाली. पण मंडळींचे मॉरल टिकवायला त्यांना भात सोडून काहीतरी
खाउ घालणं आवश्यक होतं!!
मदुराईचा राजमहाल सुद्धा अगदी आवर्जुन बघावी अशी वास्तु आहे पण दुर्दैवाने आम्ही ती पाहु शकलो नाही. संध्याकाळच्या तामिळनाडू स्टेट ट्रान्स्पोर्टच्या गाडीने कोईंबतोर गाठले.
देव देव करुन झालं होतं.. आता कांचीपुरम साड्या खुणावत होत्या!!! धार्मिक वातावरणातुन मंडळी भौतिक जगात परतली होती.. मोजुन मापुन ठरवलेल्या बजेट टुरच्या बजेट्ला पार होत्याच नव्हतं करुन टाकणारा दिवस आलेला होता!
मंडळी कोइंबतोरच्या लक्ष्मी रोडवर येऊन धडकली होती.....!
क्रमशः
साउथ मध्ये व्हेज संगीथा ( संगीता) , सर्वाना भवन , दिंडीगुल थलप्पाकुट्टी ही रेस्टॉरंटस प्रसिद्ध असुन त्यांच्या बरेच ठिकाणी शाखाही आहेत ( देश परदेशात ). येथे बरयाच ठिकाणी 'जिगरठंडा' नावाचे काहिसे फालुदासारखे असणारे आईस्क्रीम/मिल्कशेक मिळते. त्यामुळे शक्यतो प्रवासात खाण्याचे हाल होत नाहीत . या सुंदर मंदीराचे फोटो बघुन थिरुवायुर , त्यागराजा इत्यादी मंदीरांचीही आठवण झाली.
अगदी मंदिराजवळ होते.रजवळच सौदिंडियन थाळीचे तिथले स्पेशल हाॅटेल होते.नाव
आठवत नाही.मस्त जेवलो होतो.मंदिराबाहेर मदुराई टेंपल बाॅर्डरच्या साड्या
घेतल्या होत्या. मंदिरात शीव पार्वतीचे लग्न झाल्याची आख्यायिका आहे.तो
कल्याण मंडप.तिथे ते पाणीग्रहणाचे सुंदर शिल्प आहे.त्यातल्या पार्वतीच्या
चेहेर्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत!मूर्तीकला आवडणार्याला पर्वणीच आहे हे
मंदिर!
मस्त फोटो.नादमय खांबांना विसरली आहेस का?त्या सहस्त्र खांबांमधुन सुंदर नाद निर्माण होतो.पण गाईड सोबत हवा,कोणते ते दाखवायला.
मिनाक्षी मंदिरात एका खांबावर मुळ मिनाक्षीचे शिल्प आहे, ज्यात तिचे तीन स्तन दिसतात.
खरं सांगु का.. कोइंबतोर विषयी मला काहीच माहिती नाही! आम्ही इथे दोनच कारणांसाठी गेलो, एक तर दिर कुठे रहातो, काय काम करतो वगैरे पहायला आणि दोन म्हणजे साड्या! दिराची रुमच मुळात कोइंबतोरच्या बाजारपेठेत असल्याने काही फिरायचा योगही नाही आला. सकाळी उठलो, दणकट सौदेंडियन नाश्ता केला आणि दुकानांमध्ये घुसलो!
(दोन घास खाल्ल्यावर फोटोच आठवलं!!)
(सुचना - साड्या खरेदी प्रेमींनीच हे वाचावं! इतरांनी डायरेक्ट पुढच्या सुचनेपाशी भेटा!)
पुण्यातल्या लोकांना लक्ष्मी रोडवर मोठ्या दुकांनामध्ये खरेदी करण्यातला फोलपणा ठाऊक असतो, पण बाहेरुन आलेल्या व्यक्तिला कानाकोपर्यातली अस्सल माल मिळणारी दुकानं माहिती नसल्याने त्याला लक्ष्मी रोडशिवाय पर्याय नसतो तसंच आमचंही झालं. बाकी कुठलं काहीच ठाउक नसल्याने आम्ही आपले सरळ मोठ्या शोरुम मध्ये घुसलो..
पोथीज, पी.एस.आर इ. मोठ्या मोठ्या दुकानांच्या भव्य शोरुम्स दुतर्फा होत्या. कुठुन सुरवात करावी हाच प्रश्न होता. आम्ही मदुराईमध्ये असताना एका बाईंची साडी आवडली म्हणुन सरळ तिला गाठुन "अय्या! कुठुन घेतली हो? किती छान!" अशा गप्पा ठोकल्या होत्या. जगभरातल्या बायका "कपडा खरेदी" ह्या विषयावर आरामात गप्पा मारु शकतात. त्या बाईंना फक्त तमिळ येत होतं आणि आम्ही हिंदीवाले. पण खाणाखुणा करुन करुन तिला दुकानांची नावं विचारली! तेवढ्यात तिची लेक आली आणि तिला इंग्लिश येत असल्याने तिने सध्याची फॅशन काय वगैरे पासुन इथ्यंभुत माहिती दिली. तिच्याच सल्ल्याप्रमाणे मदुराई ऐवजी कोइंबतोरलाच सगळी खरेदी करायचं ठरवलं तिच्या बोलण्यात पोथीजचं नाव जास्त आलं म्हणुन इथेही पोथीज मध्येच घुसलो.
दक्षिडेकडची खरेदीमधली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे दुकानांमध्ये खुर्च्यांवर बसुन साड्या पहायची सोय! आपल्याकडे जशा गाद्या खाली घातलेल्या असतात, मग त्यावर पसरलेल्या साड्या तुडवत आपण कुठेतरी जागा शोधतो आणि बसतो. तसं इथे नव्हतं. बुटक्या काउंटर सारखी रचना.त्यावर गाद्या घातलेल्या. आपण समोर खुर्ची टाकुन साड्या पहायच्या. सकाळी सकाळी आम्ही पहिलेच गिर्हाईक, दाखवणारे पण मुड मध्ये आम्ही पण मुड मध्ये! खुर्च्या धरुन त्यावर मांडीच ठोकुन बसलो. बजेट म्हणून साधारण जी खरी रेंज आहे त्याच्या पेक्षा हजार रुपये कमीच सांगितले, कारण हे लोक दाखवतातच बजेटच्या वरच्या साड्या हे अनुभवानी माहिती होतं. पुणं काय नि तामिळनाडु काय, मार्केटींग सारखंच! आमचा अंदाज चुकला नाही. एकाचढ एक साड्या दाखवायला सुरवात झाली. सुमारे ५० साड्या पाहुन झाल्यावर मग मी "आता एक काम करा, ह्या रंगातली, तशा बॉर्डरची आणि अशा बुट्ट्यांची... दाखवा.." तो माणुसही भारी, त्याला नेमकं समजलं की माझा चॉईस कोणत्या दिशेला झुकतो आहे. त्याने करेक्ट साड्या काढल्या. पैकी काही साड्यांचे हे फोटो
मग सुरु झाल्या ट्रायल्स! कमरेला बेल्ट बांधुन आणि पदराला ब्लाऊज सारखं गुंडाळुन त्या बाईने मला १५ सेकंदात पर्फेक्ट साडी नेसवली. इतकी नेटकी साडी तर मला लग्नानंतर ४ वर्षानीही नेसता येत नाही. ती साडी घालुन आरशासमोर उभी राहिले आणि एका क्षणात निश्चित झालं.. यही है वोह! साडी कशी हवी, जिचा रंग चेहर्यावर उतरेल! मनासारखी साडी मिळाली! अर्थात माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी! त्यामुळेच इतका वेळ लावुन, इतका जीव काढुन मी साड्या पहात होते!
तिकडे साबांनीही अर्धे दुकान खाली काढायला लावुन मनाजोगती साडी मिळवली होती. नव्या नव्या साड्या घालुन दोघींनी मिरवुन झालं! गंमत म्हणुन आजुबाजुचे महागाच्या साड्यांचे सेक्शन बघुन दचकुन आलो. एखादी मॉडेलला नेसवलेली साडी पाहुन "हीच माझी साडी" म्हणुन नाचत जावं आणि किंमत पाहुन दुप्पट वेगानी परत यावं, ते ही करुन झालं. कॉटनच्या २-३ साड्या घेऊन झाल्या आणि (आम्ही दोघी तरी) अत्यंत आनंदात बाहेर पडलो!
पुरुष मंडळींना वाटलं झालं.. आता संपली खरेदी! आता काय जेवायचं न जाऊन झोपायचं. आम्ही काही त्यांचा आनंद हिरावुन घेतला नाही. एका हॉटेलात सौदेंडियन जेवण हाणुन त्यांना म्हणलं आता तुम्ही घरी जा, आम्ही अजुन थोड्या साड्या घेऊन येतो! त्यांच्या कडे आधीच्या खरेदीच्या बॅगा सोपवुन आम्ही सासु-सुना मस्त भटकलो. अजुन थोड्या कॉटनच्या साड्या घेतल्या (मग!.. घरातल्या बाकीच्या बायकांना काही नको का?!) स्वस्तात मस्त साड्या मिळाल्या. मग रात्री आईचा फोन आला की "अगं तू सकाळी ज्या साडीचा फोटो पाठवला होतास ना, ती पण मला आवडली आहे, तर ती सुद्धा आण!" मग काय पडत्या फळाची आज्ञा घेऊन दुकान बंद होत असताना पळत जाऊन ती साडी सुद्धा घेऊन आलो. आधी आमचा विचार होता की ही वाढीव बॅग कुरीयरनी पुण्याला पाठवुन द्यायची. पण प्रत्यक्षात मात्र इतक्या महागाच्या साड्या दुसर्याच्या हाती सोपवेनात, म्हणुन मग उरलेली सगळी ट्रिप आम्ही त्या वागवल्या!
(सुचना - धोका टळलेला आहे! आपण पुढे वाचु शकता!)
ह्या व्यतिरिक्त कोइंबतोर बद्दल मला काहिही ठाऊक नाही. तिथे बिर्याणी चांगली मिळते म्हणे, पण ती नॉनव्हेज! त्यामुळे माझा पास. आम्ही तर जेवणात परत वेगवेगळे डोसे, इडलीअप्पम वगैरे पदार्थ हाणले.
कोइंबतोरच्या पुढचं खरं आकर्षण म्हणजे टॉय ट्रेन!!
निलगीरी ब्लु माउंटन म्हणुन ओळखली जाणारी ही टॉय ट्रेन निलगिरी पर्वतांमधुन धावते. आजुबाजुला दिसणार्या निसर्गसौंदर्यामुळे ती अत्यंत प्रसिद्ध आहे. २००५ साली युनेस्कोने दार्जिलिंगच्या हिमालयातुन जाणार्या टॉय ट्रेन सोबत हिलाही "वर्ल्ड हेरिटेज"चा दर्जा दिला आहे. इतकं वर्णन वाचल्यावर हिच्यातुन प्रवास करणं मस्ट होतं. कोइंबतोर जवळ ४० मिनिटावर असणार्या "मेटुपलायम" (MTP) स्टेशन वरुन सकाळी ७ ला ही ट्रेन सुटते. हीचं बुकिंग मिळणंही तसं अवघडच. आम्ही अर्थातच तत्काळवर अवलंबुन! आम्हाला तत्काळ मधुन फक्त ३ तिकिटे मिळाली. आम्ही माणसे तर ४ जाणार होतो. पण नेहमीप्रमाणे दैवावर हवाला ठेवुन निघालो.
कोइंबतोरवरुन सकाळी ६ ला टॅक्सीने निघालो. सकाळची वेळ, थंड वातावरण, आजुबाजुला दिसणारे डोंगर, हिरवागार परिसर, कालच झालेली मनसोक्त खरेदी..! फारच भारी वाटत होतं! त्यात कॅब ड्रायव्हरनी तमिळ रोमँटीक गाणी लावलेली. "वेप्पम" ह्या पिक्चरच्या "Maazaai Varum" ह्या गाणातल्या व्हॉयलीनचा पीस वाजत होता! सगळं कसं जुळुन आलं होतं. ह्या प्रवासाखेरीज काही आयुष्य आहे हेच विसरायला झालं होतं. आजही तो क्षण मनात पक्का कोरला गेलाय. जेव्हा कधीही खुप वैतागायला होतं तेव्हा डोळे मिटुन जर ह्या क्षणाला आठवलं तर मी परत एकदा त्या कॅबमध्ये "Maazaai Varum" ऐकत असते. माझ्या आयुष्यातली दगदग तिकडे दूssssर पुण्याला असते. मी आणि नवरा फक्त आनंदात भटकत असतो..!
असं आनंदात तरंगत तरंगत मेटुपलायमला पोहोचलो आणि समोर ही टॉय ट्रेन उभी!
आनंदाला पारावार न रहाणे किंवा आनंदानी वेडेपिसे होणे अवस्थेत मी एव्हाना पोहोचले होते. ती ट्रेन काय किंवा ते टुमदार मेटुपलायम स्टेशन काय.. स्वप्नच हो!
हे त्या ट्रेनच वाफेचं इंजिन
आतुन ट्रेन अशी दिसते.
एका डब्यात असे ५ छोटे कंपार्ट्मेंट असतात. आणि प्रत्येक कंपार्ट्मेंटमध्ये समोरासमोर टाकलेली २ बाकडी असतात. ज्यात खरं वाटणार नाही पण एका बाकड्यावर "५" लोकांनी बसणं अपेक्षित असतं आणि बाकड्यांखाली सामान ठेवणं. (त्यामुळे १,५, ६, १० हे सीट्स दाराजवळ येतात हे लक्षात ठेवा!) आमच्या एका तिकिटाचा प्रश्न एका ग्रुपमध्ये एक जण कॅन्सल झाला असल्याने टिसीने ऑन द स्पॉट तिकिट देऊन सोडवला. नेमकी ते सिट बाकीच्या ३ सोबतच आले. नवर्याने वाफाळत्या इडल्या, मेदुवडे आणि सांबार नाश्ता म्हणुन आणलं. स्वर्ग म्हणतात ना तो हाच! म्हणलं समर्थांना सांगा, "जगी सर्व सुखी" मी आहे!
झुक्झुक करत ठरल्या वेळेला ट्रेन निघाली. दुरवर दिसणार्या निलगिरी पर्वतांच्या रांगा
डोंगरांमधुन चाललेली गाडी
खळाळणार्या ओढ्यांवरुन जाताना
आजुबाजुचं जंगल
ह्या गाडीची अजुन एक अफलातुन गोष्ट म्हणजे वाटेतल्या लहान लहान स्टेशनवर गाडी थांबवतात. खाली उतरुन आपण आजुबाजुला फिरुन येऊ शकतो. आम्हाला महागडे कॅमेरे सांभाळणं होणार नाही म्हणुन मोबाईलच्या कॅमेरावरच भिस्त होती. पण अस्सल फोटोग्राफर ह्या जागेचं सोनं करतील!
बाजुला सतत सोबती.. निलगिरी!
ब्रिजवरुन जाताना
उटीला घनदाट जंगलातुन जाणारे रस्ते
अशाच एका ठिकाणी थांबल्यावर..
आता चहाचे मळे दिसायला सुरवात झाली. कुन्नुर जवळ आलंय हे लक्षात आलं..
आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती!
क्रमशः
पौंडेचेरीला बॉटेनिकल गार्डन आहे.
तिथे २ रूपये टॉय ट्रेन आणि छोटे मत्स्यालय् तिकीट ५ रूपये होते जुलै २०१३ ला.
अगदी खात्रीने.
अवांतर,
तिथेच अरविंदो आश्रमात सकाळचा नाष्टा ,दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे सगळे
मिळून फ़क्त २० रूपयात मिळते. चकाचक डबलबेड रुम दिवसाला १५० रुपये.
जेवनात दुध दही फळे यांचा समावेष असतो. ब्राउन ब्रेड तिथेच तयार होतो. आश्रमाच्या गायी आहेत त्यामुळे एकदम शुद्ध दूध.
कोणीही जाऊन राहु शकतो.
भरजरी किंवा रंगीबेरंगी साड्या तर सुंदर असतातच पण, गोल्डन बॉर्डरच्या
व्हाईट साड्या पण जबरी दिसतात... अगदी "टिपीकल साउथ स्प्येश्यालिटी"... आता
यासाठी काय उदा. देउ बर ?
ह्म्म.....
सेट सारी आहे. तिकडे सगळ्या शुभकार्यांमध्ये आणि लग्नात मस्ट.
आणि अशा साडीची रेंज ३००/- पासून ५००००/- पर्यंत असते असं माझ्या सौधेंडिअन
मैत्रीणीने सांगितलं.गोल्डन बॉर्डरच्या व्हाईट साड्या - त्यांना 'केरळ
सिल्क' म्हणतात .
आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती!
कुन्नुर हे उटी जवळ अवघ्या २० किमी वर असणारे गाव. पण उटीपेक्षा फारच गोड्डुलं!! "उटीपेक्षा कुन्नुरला या" असं ट्रिप अॅडव्हायझर वरच्या फोरम्स मध्ये स्थानिकांनी सांगितलं. बर्याच ठिकाणी कुन्नुरचं कौतुक ऐकुन अखेर कुन्नुर मध्येच हॉटेल शोधलं. अनेक महागड्या हॉटेल्स नंतर सहज B & B मध्ये शोधलं तर मिळालं "अल दिवानो!". म्हणलं, वाह काय नाव आहे!! मेल वर बरंच निगोसिएशन करुन अखेर बुकिंग करुन टाकलं. कुन्नुर मध्ये उतरल्यावर रिक्षानी १० मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हॉटेल जरी अगदी लहानसं असलं तरी आहे फारच क्युट! पाहताक्षणी मनातच भरलं!
* हा फोटो आंतरजालावरुन साभार
हॉटेल मधुन दिसणारा नजारा..
कुन्नुरमध्ये आमच्याकडे फक्त एकच दिवस होता. त्यात सगळेच पॉईंट्स फिरत बसायची इच्छा नव्हती म्हणून निवडक २-३ जागा पाहुन पुढे बंदिपुरला जायचं होतं. पण ते सगळं नंतर पाहु, आधी जेवायची सोय काय ते पहायला हवं होतं. अल दिवानो वाले ऑर्डर दिली की बाजुच्या हॉटेल्स मधुन आणुन देतात खरं. पण कुन्नुर आणि उटी मधल्या "क्वालिटी" रेस्टॉरंट बद्दल फार वाचलं होतं. ते आमच्या हॉटेलच्या अगदी शेजारीच असल्याने तिकडे कुच केलं.
क्वालिटी मध्ये दुपारी बुफे असतो. नेहमी प्रमाणे सुप, सॅलड ते डेझर्ट असणार असा आमचा कयास. तसंच होतं ते, पण विथ साउथ इंडीयन ट्विस्ट! म्हण्जे साधी कोबीची भाजी हो, पण चारदा घेऊन खाल्ली इतकी क्लास! रस्सम तर अहाहाच!
आडवा हातच मारला अगदी!! सुप, सॅलेड, मश्रुम इन व्हाईट ग्रेव्ही, पनीर टिक्का, कोबीची साऊथ इंडियन स्टाईल भाजी, रस्सम, सांभार, पुलाव, कर्ड राईस, चायनीज काही पदार्थ, पायनॅपल कस्टर्ड आणि फक्त पायसमवर एवढंच काय ते खाल्लं!! बुफेवर ताव मारल्यावर मिशा पुसुन आधी किचन मध्ये जाऊन शेफ शोधला. त्याला म्हणलं "या महाराजा! तुमचा फोटो मस्ट आहे!"
हॉटेलचे मॅनेजर श्री. श्रीधर सोबत शेफ श्री. अब्दुल!
कुन्नुरमध्ये भयंकर गारवा होता, त्यात हे असलं जेवण. आता साक्षात रंभा उर्वशी जरी नृत्य करायला उतरल्या असत्या तरी ते पहायला आम्ही जागे रहाणार नव्हतो. दुलईमध्ये घुसुन मंडळी घोरु लागली.
हॉटेल मॅनेजरने गाडी मिळवुन दिली होती. उठल्यावर साईट सीईंगला निघालो. आजुबाजुला भयंकर धुके पसरले होते. अशा धुक्यात काय दिसणार अशी धाकधुक होती. पण आमचा "गाडीवान दादा" फुल्ल कोण्फिडन्स मध्ये आम्हाला "डॉल्फिन्स नोझ" कडे नेत होता.
म्हणाला "अरे साब, एकबार जोरसे हवा आयी तो १ मिनिट्मे ये सब हट जायेगा.. आप चलो तो.."
चलो तर चलो..!
फक्त आणि फक्त चहाचे मळे, चहाची हिरवीगार झुडपं, त्यात "एक कली दो पत्तीया" करत चहाची पानं तोडत असणार्या बायका, वळणावळणाचे रस्ते असा माहौल होता. आजुबाजुला निलगिरी पसरला होता, पण त्याची भव्यता धुक्यात लपुन गेली होती.
बर्याच वेळानंतर डॉल्फिन नोझ आले. मुळात असे वेगवेगळे पॉईंट्स का बनवले आहेत तेच कळत नाही. कुन्नुरमध्ये कुठेही उभे रहा तेच दृश्य सतत दिसत रहाते.. निळेशार आकाश, हिरवेगार चहाचे मळे आणि मागे उभा निलगीरी..! त्यासाठी कोणत्याही विशिष्ट ठिकाणी जायची गरजच नाही. पण तरी आम्ही गेलो.
असा डोंगरावर एक पॉईंट होता, समोर दरी, आणि जिथे उभं राहुन आपण पहातो ती जागा लंबु़ळ्की आहे म्हणुन म्हणे "नोझ"!! तिथे एक माणुस दुर्बिण घेऊन उभा होता. दहा रुपयात, १० सेकंदात, ५ पॉईंट्स दाखवत होता. ते पॉईंट्स म्ह्णजे समोर दिसणारा धबधबा, एक झोपडी आणि असंच काहीबाही. वास्तविक हा पागलपणा होता, पण प्रत्येक जण १०/- देऊन तो करत होता. न जाणो काही बघायचं राहुन गेलं तर!
त्यापैकी दुर्बिणी शिवायही डोळ्यांना दिसणारा आणि कानाला ऐकु येणारा धबधबा.
ह्यानंंतर जाऊन धडकलो "हायफिल्ड टी फॅक्टरी" मध्ये.
ह्या फॅक्टरी मध्ये चहा बनतो आणि मग त्याचा लिलाव होतो. मोठ मोठ्या कंपन्या हा चहा विकत घेऊन मग त्याला आपलं नाव देतात. आत गेलं की तिथे बसलेल्या माणसाने फॅक्टरी बघायचीये का म्हणुन सरळ आम्हाला गाईड प्रमाणे व्यवस्थित सर्व दाखवुन आणले. आधी त्याने चहाचे झाड, त्याचे शास्त्रीय नाव, कोणती पाने तोडायची, कोणत्या पानाचा कोणता चहा बनतो (वरच्या कळीचा व्हाईट टी - कॅन्सर साठी उत्तम, मग दोन पानांचा - ग्रीन टी - अॅण्टीऑक्सिडंट आणि उरलेल्या खालच्या पानांचा नेहमीचा चहा) हे सांगितले. हे झाड छाटत रहावे लागते. छाटले नाहीच तर ते इतके मोठेही होते.
पुढे जाऊन मग ही पाने वेगवेगळी करुन वाळवतात, मग कटर मध्ये बारिक होऊन त्यावर फर्मेंटेशनची क्रिया होते, मग चाळुन वेगवेगळ्या प्रतीचा चहा बनतो. (सर्व काही जसं आठवतय तसं लिहीलय, चु.भु.दे.घे)
वरच्या ह्या प्रक्रियेचे काही फोटो
सर्व पाहुन झाल्यावर बाहेर Factory Outlet मध्ये आलो. तिथे वेगवेगळ्या चवींचे चहा मिळतात. आधी चव घेउन हवा तो चहा तुम्ही घेऊ शकता. मसाल्याचे पदार्थ, वेगवेगळी औषधी तेलं वगैरेही बरंच काय काय मिळतं. आम्ही सगळंच थोडं थोडं घेतलं. गाईडने पैसे काहीच घेतले नाहीत. बहुदा त्यांना कमिशन मिळत असावी.
टि फॅक्टरी समोर दिसणारे विहंगम दृश्य
ह्या नंतर थेट गेलो "सीम्स पार्क" मध्ये
सीम्स पार्क ही एक उतारावर बांधलेली फार मोठी बाग आहे. व्यवस्था सुद्धा उत्तम आहे. उताराच्या शेवटी एक तळे आहे. त्यात पुर्वी बहुदा बोटींग वगैरे असावं.
माझ्याकडचे इथले फोटो सापडत नाहीत म्हणून हे काही आंतरजालावरुन साभार
घनदाट झाडं, शांतता, पक्ष्यांची किलबिल, कमालीची स्वच्छता, कलात्मक रचना ह्यामुळे सीम्स पार्क ही आवर्जुन पहावी अशी जागा आहे. कधीतरी इथे जाऊन नुसतेच पक्ष्यांचे आवाज ऐकत बसायला फार आवडेल मला..!
दुसर्यादिवशी उठुन आम्ही उटी मार्गे बंदिपुरला जाणार होतो. उटी पहाण्यात तसा काही इंटरेस्ट नव्हता आम्हाला पण वाटेत आहेच म्हणुन जाणार होतो. जाताना मात्र डोळ्याचं पारणं फिटावं असा निसर्ग! आज स्वच्छ सुर्यप्रकाश होता. काल जे डोंगर धुक्यामुळे दिसत नव्हते ते आज निळ्यारंगाच्या नाना विविध छटांमध्ये दिसत होते. ह्या डोंगर रांगांना Blue Mountain का म्हणतात ते आता समजत होतं. गाडी थांबवुन तिथेच बसुन रहावं आणि मनभरुन हे सौंदर्य डोळ्यात साठवावं असं वाटत होतं!
जाताना दोडाबेट्टा पहायचाही इरादा होता, पण तो रस्ता चांगला नसल्याने तिथे जाता आले नाही. उटी सुरु झालं आणि सगळीकडे नुसता गजबजाट. अपेक्षेप्रमाणे उटीचा अनुभव काही कुन्नुर एवढा सुखद नव्हता. कुन्नुरला अत्यंत गारवा होता तर उटीला चक्क उकडत होतं. रोझ गार्डनला गेलो तर तिथे सिझन नसल्याने की काय पण फारसे गुलाब नहते आणि जे होते ते ही सुकत चाललेले. उटी लेकला गेलो तर तिथे तर जत्राच होती. आलोच आहोत म्हणुन थोडं बोटींग केलं.
उटीला फार वेळ घालवण्यात अर्थ नाही हे कळुन चुकलं. त्यापेक्षा लवकर पोहोचुन दुपारची सफारी तरी गाठता येईल म्हणुन आम्ही बंदिपुरचा रस्ता धरला. गाडी मदुमलाई नॅशनल पार्क मधुन धावत होती. इथे एरवी सुद्धा हत्तींचे कळप दिसतात म्हणे. नॅशनल पार्कने परत माझ्या मनावर गारुड केलं. परत माझे डोळे "search" मोड मध्ये गेले. खरं तर इतक्या मोठ्या अपेक्षा आणि इतके कमी चान्सेस घेऊन नॅशनल पार्कमध्ये फिरणं म्हणजे छळ आहे नुसता. पण एकदा ते व्यसन लागलं की पाय वळतातच.
ह्या वेळेस आता वाघाची वाट पहायची नाही असा मी पक्का निश्चय केला आणि डोळे मिटुन बसले. माझ्या निश्चयाला कसे धमाकेदार सुरुंग लागणार होते ते थोड्याच वेळात कळणार होतं!!
क्रमशः
उटी आता कमर्शियल झालं आहे. नुसतं बांधकामच दिसतं सगळी कडे. कुन्नुरमध्ये अजुन तरी तसं झालेलं नाही.
शिवाय बजेट चांगलं असेल तर कुन्नुरमध्ये खुप भारी हॉटेल्स आहेत. ती तर अगदी चहाच्या मळ्यातच आहेत.
कन्याकुमारी:
विवेकानंद स्मारक सुर्योदयापुर्वी...
प्रचि १
-
-
-
सुर्योदय
प्रचि २
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
विवेकानंद स्मारक
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
कवि थिरूवाल्लूवर.
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
पाँडिचेरी:
येथील अरबिंदो स्वामींचा आश्रम व चर्च प्रसिद्ध आहेत.
पाँडिचेरी चा समुद्र किनारा.
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
ऊटी:
ऊटी निलगिरी पर्वतराजींमध्ये वसलेले आहे. येथील उद्याने, टॉय ट्रेन, व चहाचे मळे पहाण्यासारखे आहेत.
(खालील सर्व फोटोज् मोबाईल कॅमेर्यातुन घेतले आहेत.)
प्रचि २४
-
-
-
बोटॅनिकल गार्डन.
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
निलगिरी पर्वतराजींमधील जंगल
प्रचि २८
-
-
-
चहाचे मळे..
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
पायकारा धबधबा.
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
-
त्यासाईडला जाणार असाल तर टॉयट्रेन आणि कुन्नुर मस्ट सी! बंदिपुरचा भाग उद्या टाकेन, त्याचाही कदाचित उपयोग होईल.